2017

मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पबमधील बेकायदा बांधकाम, आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती बैठकीत दिली.
गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उमटले. कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला. साकीनाका येथे १८ डिसेंबर रोजी फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम आणि आगीशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी विभागातील अधिकारी आणि साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली. स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरताच आयुक्त अजय मेहता यांनी पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली.

अलिबाग - प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, जमिनीचा योग्य मोबदला यासारख्या मागण्यांसाठी बाळगंगा प्रकल्पग्रस्त गेले ३६ दिवस आंदोलन करत होते. मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखलही घेतली नाही. त्यामुळे आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास रोखून धरली. पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकले असले, तरी या निमित्ताने अनियमिततेच्या गाळात रुतलेले बाळगंगा धरण पुन्हा एकदा चच्रेत आले आहे. नवी मुंबई परिसराचा विस्तार आता पनवेलपर्यंत झाला आहे. आगामी काळात हा विस्तार पेण आणि खालापूर परिसरापर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात जागा आणि पाण्याची मागणी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने या परिसरात लँण्ड बँक आणि वॉटर बँक तयार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याचाच एक भाग म्हणून काळू, शाई आणि बाळगंगा धरणांची निर्मिती केली जाणार आहे. या धरणांचे पाणी व्यापारी कारणांसाठी वापरले जाणार आहे. पाणी घाऊक बाजारपेठ तयार करून त्याची विक्री केली जाणार आहे.धरणाचे बुडीत क्षेत्र १०५५ हेक्टर असून, यासाठी गावांची संख्या १३ संपादित केली जाणार आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी १५९ हेक्टर जमीन लागणार आहे. प्रकल्पामुळे ३४४२ कुटुंबे बाधित होणार असून जवळपास यातील १२०० लोकांच्या पुनर्वसनाबाबत विचारच केला गेलेला नाही. आधी पुनर्वसन आणि मग धरण हे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र या धरणाची निर्मिती करताना या नियमाला बगल देण्यात आली आहे. हेच प्रकल्पग्रस्तांच्या असंतोषाचे मूळ कारण आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला पण उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मात्र अजूनही आपल्या खात्याची सूत्र स्वीकारलेली नाहीत. नितीन पटेल अजूनही गांधीनगर सचिवालयाकडे फिरकलेले नाहीत. अर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्याने नितीन पटेल नाराज असल्याचे समजते. उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच गुजरात सरकारमधील महत्व कमी करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नितीन पटेल यांनी यावेळी विजय रुपाणींकडे अर्थ आणि शहर विकास ही दोन खाती मागितली होती अशी माहिती आहे. नितीन पटेल यांचे सरकारमधील महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयाने व्यक्त केली.

कॅलिफोर्निया - अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या प्रचंड गोळीबाराच्या ताज्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शहरातील लोंग बीच शहरात हा प्रकार घडल्याचे माध्यमांतील बातम्यातून कळते. हा गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

मुंबई - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी केले. राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ प्रभाग स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या प्रभागास ५० लाख रुपयांचे बक्षीस व स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची व अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा त्यांनी केली. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह भिवंडी, उल्हासनगर, पनवेल, ठाणे आदी महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर -म्हैसकर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

पैठण - तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे राजकीय श्रेय घेण्यावरून दोन गटांत लाठ्या, काठ्या कुऱ्हाडीने तुफान हाणामारी झाली. या घटनेत आजी माजी सरपंचासह एकूण पंधरा जण गंभीर झाले आहेत.
अविश्वास ठरावामुळे रांजणगाव दांडगा येथे तत्कालीन सरपंच अकील पटेल व विद्यमान सरपंच रियाज पटेल यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. गुरुवारी याच वैमनस्यातून गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात शेख रियाज बादशहा (वय ३८), राजू बादशहा शेख, (वय ३५), फेरोज अहेमद शहा (वय १८), इसाक अहमद शेख (वय ४५), शेख अलिम अहमद (वय ५४), इसाक बादशहा शेख (वय ४५), अय्याज शबीर शेख (वय ३२), इमरान इसाक शेख (वय १८), राजू शहामद शेख (वय २८), अकबर शाहमद शेख (वय २४), कदीर इसाक शेख (वय २४) आदींचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. औरंगाबादला जावून सर्व जखमींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली.

मुुुंबई - स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रचारात कार्यरत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी वर्सोव्या किना-यावर राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहिमेसाठी ७० लाखांची सामग्री दिली आहे. वैयक्तिक निधीतून ही सामग्री घेण्यात आली असून वर्सोवा बीचवरील स्वच्छता मोहिमेचे जनक अफरोझ शाह यांच्याकडे गुरुवारी सुपुर्द केली. गेल्या दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधूनही गौरव केला होता. मात्र महापालिकेकडून कचऱ्याचा उचलण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळत नसल्याने शाह यांनी स्वच्छता मोहीम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अफरोझ शाह यांनी पुन्हा मोहीम सुरू केली. ‘बिग बी’ने आॅगस्ट महिन्यात वर्सोवा बीचला भेट देऊन शाह यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचे कौतुक करीत त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांनी सात बंगला येथील बीचवरील सागरकुटीर या ठिकाणी ७० लाखांचे ट्रॅक्टर आणि डम्पर अफरोझ शाह यांच्याकडे सुपुर्द केले.

श्रीरामपूर - लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरी नगर जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले असून, एकमेकांना शह देण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. खासदारकीसाठी अनेक इच्छुक असून, नवनवीन नावे पुढे येऊ लागली आहेत.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी हे करतात. त्यांना पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. गांधी हे पक्षाची उमेदवारी मिळणार असे स्पष्ट करीत आहेत. तर काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. विखे यांनी त्यांच्या नगर शहरानजीक असलेल्या विळद घाटातील शैक्षणिक संकुलात मुख्य कार्यालय व वॉररूम सुरू केली आहे. विखे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करणार की अन्य पक्ष, अपक्ष हे अद्याप गुलदस्त्यात आहे. डॉ. विखे यांना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले, उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले. विरोधी पक्षनेते विखे यांनी तो मुद्दा टोलवून लावला, पण डॉ. सुजय विखे यांनी त्यावर मौन बाळगले. खासदार गांधी यांची मात्र त्यात कोंडी होत आहे. त्यांनी कर्डिले हे गमतीने बोलले असे सांगितले. त्यांनी टीका-टिप्पणी न करता गप्प बसणे स्वीकारले आहे.

मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अग्नितांडवात १५ जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे अग्नितांडव एवढे भीषण होते की, मोजोसच्या खाली असलेले लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत होरपळून व गुदमरुन १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ४ तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले असून, सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मोजो पबमध्ये ही आग लागली. पाहता पाहता आग पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कम्पाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घोटी - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवितात. इगतपुरी तालुक्यातील साहसी ट्रेकिंगवीर युवकांनी ट्रेकर्ससाठी आव्हान समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात खडतर लिंगाणा किल्ला सर करून युवकांसमोर आदर्श निर्माण केला. गेल्या वर्षभरात अनेक किल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या घोटीतील या साहसी युवकांनी लिंगाणा किल्ल्यावर पोहचल्यावर आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविली

कोल्हापूर - पंचगंगेमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत महापालिकेला सातत्याने निर्देश देऊनही जयंती नाल्यातील तुटलेल्या पाइपलाइनचे काम शंभर दिवसानंतरही अपुर्णावस्थेत आहे. या दिरंगाईमुळे नदीकाठावरील गावांमध्ये प्रदूषणाची समस्या जीवघेणी बनली असल्याने ग्रामस्थांमध्ये वाढत असलेला असंतोष, मासे मरण्याची घटना, आंदोलने या साऱ्यांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला जबाबदार धरत लक्ष वेधण्यासाठी वीज तोडण्याची कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट केले. १४ सप्टेंबरपासून मिसळत असलेल्या सांडपाण्याबाबत पक्ष, संघटनांच्यावतीने निवेदन तसेच आंदोलने करण्यात आली. सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश मंडळाने दिले होते. पण आजतागायत कोणतेही प्रभावी पाऊल उचलले गेले नसल्याने सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करण्यास ते अयशस्वी ठरले आहेत. सांडपाणी सातत्याने वाहत असून तेरवाड बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले आहेत. शेतकऱ्यांनीही सांडपाणी थांबवण्याबाबत मागणी केली आहे. या सर्व परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी कारवाई केली.

मुंबई - भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्यात येणार असून गुरुवारी देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचा १४० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग असून त्यास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. भीमाशंकरला दरवर्षी साधारणत: २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात भीमांशकर देवस्थानचा विकास आराखडा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर करण्यात आला. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरणस्नेही विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या आराखड्यातील कामांना गुरुवारी अंतिम स्वरूप देण्यात आले. राज्यातील सर्व ज्योर्तिलिंगे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार असून या कामास गती देण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

अकोला - मानलेल्या सुनेनेच सासूचा यवतमाळ येथील राहत्या घरी तोंडात टॉवेल कोंबून निर्घृण खून केला व आपल्या नातेवाईक आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सासूच्या मृतदेहाची अकोल्यात विल्हेवाट लावली. अंगावर शहारे आणणार्‍या या खुनाचा यवतमाळच्या टोळीविरोधी पोलीस पथकाने छडा लावला असून त्या सुनेसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोर्णा नदीच्या पात्रात १८ डिसेंबर रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची २७ डिसेंबर रोजी ओळख पटली असून, सुमन रामभाऊ नक्षणे (६५) रा. संकटमोचन रोड यवतमाळ असे यातील मृत महिलेचे नाव आहे. ही महिला १७ डिसेंबरच्या दुपारपासून आपल्या राहत्या घरून अचानक बेपत्ता झाली. यवतमाळ येथील टोळीविरोधी पोलीस पथकाचे फौजदार संतोष मनवर यांनी खुनाच्या या गुन्ह्याचा छडा लावून, सातही आरोपींना ताब्यात घेतले.जळगाव - माझ्या मनात काय आहे हे मी अजित पवारांच्या कानात सांगितले असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे अजित पवारांनी सांगितले. भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जळगावात एकाच व्यासपीठावर आले होते. आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते एकत्र आले होते. या कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यासह ईश्वर जैन, गुलाबराव देवकर, शिरीष चौधरी, अरूण गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, डॉक्टर सुधीर तांबे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर अजित पवारांसोबत एकत्र आल्यामुळे ते काय बोलता याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.

मुंबई – महाराष्ट्र सरकार राज्यातील १३१४ शाळा बंद करत असल्याच्या मुद्यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला जी नोटीस पाठविली आहे, त्याचा आपल्याला आनंद होत असून किमान आता या विषयावरुन सुरु झालेली मी‍डिया ट्रायल संपेल व ज्युडीशीअल ट्रायल सुरु होईल. आम्ही या संदर्भात जो निर्णय घेतला, तो निर्णय आम्ही आयोगासमोर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे मांडू. बहुजन समाजाच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यादृष्टीने घेतलेला हा निर्णय असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या नोटीशीला ४ आठवड्यात उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, ० ते १० पटसंख्या असलेल्या ज्या १३१४ शाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अद्यापही पूर्णपणे अमलबजावणी झालेली नाही. या शाळा स्थलांतरीत करण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यापैकी २५७ शाळा स्थलांतरीत करण्याची कार्यवाही झाली आहे, तर २८० शाळा स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, उर्वरीत ७५५ शाळांबाबत अद्यापही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यामुळे यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी आदींच्या सूचना विचारात घेण्यात येत आहेत.

नवी द‌िल्ली - अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेऊन कामे केली असती, तर आज देशाची राजधानी सर्वांत प्रदूष‌ति शहर बनली नसती, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी नवी द‌ल्लिी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले. अधिकाऱ्यांनी न‌विासी आण‌ि अयोग्य क्षेत्रांमध्ये कारखाने उभारण्यास दिलेल्या परवानगीबाबतही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आण‌ि न्यायाधीश सी. हरीशंकर यांनी याप्रकरणी तीन नागरी संस्थांना चौकशी करून न्यायालयासमोर १९ फेब्रुवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयाने ‘दिल्ली राज्य औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळल‌ि'ला अन्यत्र जागा देऊनही स्थलांतरित न झालेल्या एक हजार ७०६ कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

नवी दिल्ली - घटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी लोकसभेत गुरुवारी माफी मागितल्यानंतर निवळला. आपल्या वक्तव्याला चुकीचे स्वरूप दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला. माझे शब्द विचित्र वळण देऊन सादर केले गेले. मी तसे काही बोललोच नव्हतो. तरीही जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्या सदस्यांची क्षमा मागतो,असे हेगडे म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास संपताना अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हेगडे यांना तुमच्या विधानांमुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर त्यांची माफी मागा, असे आवाहन केले होते. जीवनात असे होते की जे आम्ही म्हणालो ते बरोबर होते, असे वाटते परंतु त्यामुळे इतर अजूनही दुखावले जाऊ शकतात, असे महाजन म्हणाल्या. हेगडे म्हणाले की, घटना माझ्यासाठी सर्वोच्च असून एक नागरिक या नात्याने मी कधीही त्याविरोधात जाऊ शकत नाही. घटना, संसद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला परम आदर आहे. हेगडे यांच्या खुलाशाला काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतल्यावर हेगडे म्हणाले होते की, माझ्या वक्तव्यांनी जर कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागायला तयार आहे.

नवी दिल्ली - महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागेल. विधेयकावरील चर्चेच्या वेळी काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने या विधेयकाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला. काँग्रेस, अण्णाद्रमुक, डावे पक्ष, सपा, आरएसपी, राजद, बीजेडी यांच्यासह अन्य पक्ष ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा बंद व्हायला हवी, या बाजूचे दिसले. मात्र हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यावर त्यांचा आक्षेप होता. सविस्तर विचार निनिमयासाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठविले जावे व नंतर ते एकमताने मंजूर करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर असे तलाक दिले जात असतील तर त्यावर काय कारवाई करावी यासाठी प्रचलित कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे संसदेने हे विधेयक मंजूर करुन त्याला कायदेशीर स्वरुप द्यावे. त्यामुळे मुस्लिम पुरुषांच्या अत्याचारापासून महिलांची सुटका होऊ शकेल.

नवी दिल्ली - भाजपाकडून राज्यघटनेवरच हल्ले होत आहेत, असे सांगत भाजपा राजकीय फायद्यांसाठी खोट्याचा आधार घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तर सत्य आणि त्यांचे संरक्षण याला आमचा पक्ष प्राधान्य देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या १३३ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भलेही निवडणुका हरल्या तरी, आमचा पक्ष सत्याचे संरक्षण करेल. घटनेत दुरुस्ती करण्याबाबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन ते म्हणाले की, राज्यघटना ही आमच्या देशाचा आधार आहे. जे काँग्रेस पक्षाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यावर हल्ले केले जात आहेत. ज्या दिवशी आम्ही राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी ठरविले की, सर्व जाती, धर्म यांना समान महत्त्व दिले जावे. पण, हे सरकार आणि भाजपा भेदभाव करत समाजाची विभागणी करण्याचे काम करत आहे. भाजपाकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचारावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी खोट्याचा आधार घेतला जात आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना पुन्हा एकदा अमेरिकेतील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘गॅलप’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.गॅलपच्या सर्वेक्षणामध्ये ओबामा सलग १० व्या वेळेस यादीमध्ये आघाडीवर राहिले आहेत, तर हिलरी क्लिंटन सलग १६ व्या वर्षी सर्वात जास्त वेळा प्रशंसनीय महिला म्हणून सर्वेक्षणातून निवडण्यात आल्या आहेत.गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र असे असूनही त्यांनी या सर्वेक्षणामध्ये आघाडी घेतली आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या १७ टक्के लोकांनी ओबामांना आपली सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. गेल्या वर्षी ओबामा यांना २२ टक्के मते मिळाली होती. या सर्वेक्षणात ट्रम्प १४ टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर पोप फ्रान्सिस यांना या सर्वेक्षणात तिसरे स्थान मिळाले आहे.

नवी दिल्ली- तिहेरी तलाकविरोधी विधेयकावरून लोकसभेत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचे छोटेखानी भाषण आणि त्यामागच्या भावना सर्वाना प्रभावित करून गेल्या. विधेयकाचे त्यांनी समर्थनच केले, पण तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करण्याच्या फौजदारी तरतुदीबद्दल रास्त शंका उपस्थित केल्या.त्या म्हणाल्या की, ‘‘तिहेरी तलाकचा अवलंब करणाऱ्यांना कायद्याचा धाक, जरब पाहिजेच, पण त्यासाठी संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरणे योग्य होईल का? जर उद्या नवरा तुरुंगात गेला तर तो कधी पत्नीला पुन्हा आपलेसे करेल का? कदाचित तो पुरुष नवरा म्हणून वाईट असेल, पण कदाचित पिता म्हणून खूप चांगला असेल. मग त्याला तुरुंगात पाठवून निरागस मुलांपासून पित्याला हिरावून घेणार का? कोणत्याही स्त्रीला संसार मोडावयाचा नसतोच, त्यामुळे थेट तुरुंगात पाठवण्याऐवजी, न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याअगोदर समुपदेशनाचा मार्ग चोखाळण्याची सक्ती विधेयकात का नाही,’ असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांनी या विधेयकाची तुलना अप्रत्यक्षपणे हुंडाविरोधी ‘४९८ अ’ कलमाशी केली. ‘४९८ अ कलमामुळे हुंडा घेण्याचे आणि त्यासाठी छळ होण्याचे थांबले का? याउलट सर्वाधिक गैरवापर होणारा म्हणून हा कायदा ओळखला जातो. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घेऊन त्यातील कडक नियम शिथिल करावे लागले. मग तात्काळ तिहेरी तलाकविरुद्धच्या या प्रस्तावित कायद्याचा असाच गैरवापर झाल्यास त्याला कसे रोखणार? एकावरील अन्याय दूर करण्याचा चांगला हेतू कदाचित दुसऱ्यावर तितकाच अन्याय करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक कौटुंबिक वादाचे रूपांतर फौजदारी गुन्ह्य़ातच झाले पाहिजे, असे काही नाही. अनेक वेळा सामोपचाराने मार्ग काढता येतो. या विधेयकामध्ये त्या सामोपचाराच्या संधीस स्थान असले पाहिजे,’’ असे त्या म्हणाल्या.

मुंबई - मुंबई मालाड पूर्व शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने याठिकाणी झोपुयोजना राबविली जात आहे. परिशिष्ट -२ करण्यात आला आहे.सूत्रांच्या माहिती नुसार या संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि खजिनदार हे या ठिकाणी राहताच नसून त्यांचे नावे दुसऱ्या ठिकाणी फ्लॅट आहेत.या प्रकल्पात त्यांची असलेली झोपडी भाड्याने देण्यात आलेली असून देखील त्यांना झोपू योजनेचा लाभ कसा मिळू शकतो? असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.राज्य सरकारने मुंबईतून गलिच्छ वस्ती नाहीशी व्हावी व ज्यांचे मुंबई कुठेही घर नाही अशांना घर मिळावे या हेतूने झोपू योजना अमलात आणली,परंतु मुंबईमध्ये याचा फायदा गरीब झोपडी धारकांना होतो का? हा खरा प्रश्न आहे.झोपू प्रकल्प राबविणारा विकासक फक्त कमिटीतील लोकांकडेच लक्ष देत असतो त्यामुळे गरीब झोपडी धारकांवर मात्र स्वतःचे घर मिळविण्यासाठी पायपीट करताना दिसतो.या प्रकल्पामध्ये संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि खजिनदार यांचे स्वतःचे घर असून देखील यांनी झोपू प्राधिकरणाच्या डोळ्यात धूळ फेकून झोपू प्रकल्पाचा लाभ घेत आहेत. झोपुयोजनेच्या नियमांना धाब्यावर बसवून बैजनाथ यादव सर्वे पीएन- १५४००१३४ व कैलाश यादव सर्वे पीएन- १५४००२३२ झोपु योजनेचा लाभ घेणार आहेत,त्यामुळे झोपू योजना ही कोणासाठी? असा सवाल काही स्थानिक करीत आहेत.स्वतः च्या नावाने मुंबई फ्लॅट असून देखील बैजनाथ यादव व कैलाश यादव यांनी झोपू योजनेतून घर लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राधिकरणाने याकडे जातीने लक्ष घालून याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भाजप सरकार कारभारात पारदर्शकता आणणार असे म्हणते तर दुसरीकडे भाजपचेच कार्यकर्ता झोपू योजनेचा लाभ घेताना दिसतो.दुसरी बाजू ऐकण्यासाठी बैजनाथ यादव व कैलाश यादव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. पारदर्शकतेचा मुद्दा धरून सत्तेत आलेल्या राज्य सरकार मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर पडदा घालणार कि कारवाई करणार ? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे.मुंबई - मुंबईतील एसआरए मधील भ्रष्टाचार दिवसेंदिवस उघड होत चालला आहे.एसआरए म्हणजे विकासकाची सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच म्हणावी लागेल.मुंबईतील झोपू प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असून देखील प्राधिकरण किंवा शासन यावर कायमचा तोडगा काढण्यात असमर्थ ठरत असल्यानेच दिवसेंदिवस विकासक भ्रष्टाचार करून सामान्य लोकांच्या घराची राख रांगोळी करताना दिसतात.मुंबईत सामान्य लोकांना घर घेण्यासाठी अर्धे जीवन निघून जाते पै पै जमा करून कशीबशी घर घेतली. कित्येक वर्षे रखडलेला विक्रोळी पार्कसाईट येथील प्रकल्प तीन विकासकांना विकल्याने स्थानिक चांगलेच गोंधळलेले आहेत, नक्की आपला प्रकल्प कोण राबवत आहेत हा प्रश्न त्यांना पडला आहे.आपली फसवणूक तरी होत नाही ना? याची सावधगिरी बाळगून स्थानिकांनी विकासकाच्या विरोधात आवाज उचलला आहे.नागरिक वार्ताने या ठिकाणी भेट दिल्यानंतर सत्याग्रह करत असलेल्या पुरुष/ महिलांनी नागरिक वार्ताशी संवाद साधत येथील परिस्थिती सांगितली. विकोळी पार्कसाईट हनुमाननगर येथे ओमकार बिल्डरचा झोपडपट्टी पुनर्वसन विकासाचा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाला आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.म्हणूनच घोटाळा दाबण्यासाठी बिल्डरने संदीप येवले यांना एक कोटीची लाच दिली होती परंतु संदीप येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन विकासकाचा भ्रष्टाचार उघड केला होता असेही स्थानिकांनी सांगितले.परंतु अद्याप विकासक किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई प्राधिकरणाकडून किंवा शासनाकडून करण्यात आली नाही. राबविल्या जाणाऱ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून देखील प्राधिकरण आणि शासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.विक्रोळी साईटपार्क येथील हनुमाननगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरने सर्वांना मॅनेज केले असल्याने आमची बाजू कोणताही राजकीय नेता, शासन,पोलीस प्रशासन ऐकून घेत नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. विकासक कशा पद्धतीने कायद्यांचे उल्लंघन करून.राजकारणी, न्यायव्यवस्था आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचा आरोपही हनुमान नगर येथील सत्याग्रहामध्ये सामील झालेल्या महिला नागरिकांनी नागरिक वार्ताशी बोलताना केला. विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमान नांगरच्या कायदेशीर झो.पु.योजनेतील ओमकार,लेक व्हूव व रॉक स्पेसेस या बिल्डरच्या अन्याय,अत्याचार,विरोधात व भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या तसेच मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री,यांच्या असहकार्याविरोधात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन हनुमानगर वासियांनी सुरु केले.स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार यांची कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.शिवाय स्थानिक पोलीस सत्याग्रह करत असलेल्या लोकांवर दबाव टाकत असल्याने स्थानिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी वक्त केली जात आहे.

मुंबई - संपत्तीच्या वादातून अपंग असलेल्या चुलत भावाच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याची घटना गोरेगाव आदिवासी पाड्यात बुधवारी सकाळी घडली. सुनील भिवा कातेले (३०) असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी संतोष लाडक्या कातेले (४०) याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अविवाहित असलेल्या सुनीलला मारून त्याची खोली बळकाविण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी कातेलेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. आदिवासी पाड्यातील आदर्श सोसायटीत कातेले राहात असून, त्यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून वाद आहे. अपंग व अविवाहित असलेला सुनील हा तळमजल्यावर राहात असून, संतोष हा नेहमी त्याच्याशी भांडण करीत असे. बुधवारी सकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर, संतोषने सुनीलला मारहाण करीत, त्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर, खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून दारात उभा राहिला. सुनीलच्या आरडाओरडीमुळे हा प्रकार लक्षात आल्यानंतर, शेजाºयांनी तिकडे धाव घेत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. सुनील ९५ टक्के भाजला होता. प्रकृती गंभीर असल्याने, त्याला नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा सायंकाळी मृत्यू झाला.

मुंबई - केंद्र सरकारने आर्थिक वर्ष बदलून जानेवारी ते डिसेंबर असे केल्यास हिवाळी अधिवेशनातच अर्थसंकल्प मांडावा लागेल. त्यामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात यापुढचे हिवाळी अधिवेशन (डिसेंबर २०१८) मुंबईत घेण्याबाबतचा प्रस्ताव स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. केंद्र सरकार आर्थिक वर्षात करणार असलेले बदल लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन मुंबईत घ्यावे आणि तेच अर्थसंकल्पीय असावे, अशी भूमिका मांडली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना सांगितले की, डिसेंबरमध्ये अर्थसंकल्प मांडल्यास जानेवारीपासून योजनांसाठी पैसे उपलब्ध होतील आणि योजनांवर योग्य वेळेत निधी खर्च करणे सुलभ होईल. आता मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर योजना तयार करणे आणि पैसे उपलब्ध करण्यात एक-दोन महिने जातात. तसेच अनेक विभागांचा मागील वर्षाचा खर्चही पूर्ण झालेला नसतो. योजना मार्गी लागेपर्यंत पावसाळा येतो त्यामुळे योजना राबवता येत नाहीत. पावसाळ्यानंतर योजना राबवताना अनेक अडचणी येतात. यातून मार्ग काढेपर्यंत जानेवारी-फेब्रुवारी उजाडतो आणि नव्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाल्याने कामे पुढे सरकत नाहीत. कामे न झाल्याने जनता राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू लागते. हे सर्व टाळण्यासाठी डिसेंबरमध्ये अर्थसंकल्प मांडल्यास जानेवारी ते जुलैपर्यंतचा वेळ आणि त्यानंतर सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंतचा संपूर्ण वेळ योजना पूर्ण करण्यास मिळेल, असेही बापट म्हणाले.

मुंबई - पश्चिम उपनगरातील अंबोली येथे बुधवारी एका बंद फ्लॅटमध्ये महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली. डॉ. पूनम सातपुते (वय ४०) असे त्यांचे नाव असून, त्या प्रसूतितज्ज्ञ होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, मृतदेह कुजलेला असल्याने २ - ३ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. डॉ. पूनम या अविवाहित होत्या. त्या राहत असलेल्या इमारतीतच अन्य एका फ्लॅटमध्ये त्यांचे आईवडील व भाऊ राहतात. त्या मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होत्या. २३ डिसेंबरला रात्री त्यांच्याशी अखेरचे मोबाइलवर संभाषण झाल्याचे एका सहकारी डॉक्टरकडून सांगण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून, त्यामध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.मुंबई - नविन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ३१ डिसेंबरला घराबाहेर पडणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने खास गिफ्ट दिले आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर १२ विशेष लोकल सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून ८ आणि मध्य रेल्वे मार्गावरून ४ अशा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
सीएसएमटी-कल्याण (डाउन) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल तर कल्याण-सीएसएमटी (अप) मध्यरात्री दीड वाजता व मध्यरात्री तीन वाजता लोकल सोडली जाईल. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील विशेष लोकल
पश्चिम रेल्वेची विशेष (लोकल १) चर्चगेट-विरार ही लोकल चर्चगेटहून रात्री १ वाजून १५ मिनिटांनी निघेल. रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. 

विशेष लोकल (लोकल २) विरार-चर्चगेट विरार येथून १२ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला १ वाजून ४७ मिनिटांनी पोहोचणार आहे. 

विशेष लोकल (लोकल ३) चर्चगेट येथून रात्री २ वाजता निघणार असून, विरारला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.

विशेष लोकल (लोकल ४) विरार येथून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल. 

विशेष लोकल (लोकल ५) चर्चगेट येथून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी लोकल पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी विरार येथे पोहोचेल. 

विशेष लोकल (लोकल ६) विरार येथून १ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल.

विशेष लोकल (लोकल ७) चर्चगेटवरून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून, विरारला पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. 

विशेष लोकल (लोकल ८) विरार येथून रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणार असून, चर्चगेटला पहाटे ४.३७ मिनिटांनी पोहोचणार आहे.

पुणे - ‘तिहेरी तलाकाविरोधातील कायद्याला विरोध करू नका. या कायद्यामुळे तिहेरी तलाक दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, मुस्लिम महिलांवरील अन्याय आणि शोषणास आळा बसणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या महिलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल,’ अशी माहिती भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षातील महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रहाटकर पुण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुस्लिम महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करणाऱ्या तिहेरी तलाक या कुप्रथेविरुद्ध केंद्राने कडक कायदा केला आहे. आत्तापर्यंत मुस्लिम महिलांच्या अन्यायाकडे दुर्लक्ष झाले होते. आता त्यांच्यासाठी सकारात्मक भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. अधिवेशनात कायद्याला सगळ्यांचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे.

दापोली - तालुक्यातील भडवळे येथील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी १३ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडवळे येथील ग्रामस्थ दत्ताराम रामचंद्र लोंढे (सध्या रा. विरार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोंढे यांच्या वडिलांच्या नावे लालबाग-मुंबई येथील चाळीत खोली होती. या खोलीत वडिलांनी सांगितल्यास भडवळे येथून येणाºया गरजू लोकांना राहण्यासाठी जागा दिली जात असे. या खोलीत दत्ताराम लोंढे हेही राहत होते. १९८३मध्ये लोंढे यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर दत्ताराम लोंढे यांनी ही खोली आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, ही खोली वाडीतील ग्रामस्थांची असून, लोंढे यांच्या वडिलांनी ती आपल्या नावावर करून घेतली, असे म्हणणे वाडीतील ग्रामस्थांनी मांडले. दरम्यान, ही चाळ जीर्ण झाल्यानंतर म्हाडाने चाळीचा पुनर्विकास केला. त्यानंतर ही खोली वडिलांच्या नावे झाली. या खोलीच्या मालकीबाबत चर्चा करण्यासाठी ३ डिसेंबर २०१७ रोजी भडवळे उसवाडी येथील अशोक रेवाळे यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दत्ताराम लोंढे यांचा भाऊ जनार्दन, भावजय जोत्स्ना हजर होते. या वेळी ग्रामस्थांनी लोंढे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या खोलीबाबत विचारणा केली. त्या वेळी जनार्दन लोंढे यांनी या विषयाकरिता माझ्या भावाला बोलावणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचा राग मनात धरून बैठकीला असलेल्या १३ ग्रामस्थांनी जनार्दन लोंढे यांच्या कुटुंबीयाशी संबंध तोडून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. या १३ संशयितांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारपासून व्यक्तीचे संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - सन २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना येथील विशेष न्यायालयाने ‘मकोका’च्या आरोपांतून मुक्त केले. त्यांच्यावर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधानातील गुन्ह्यांसाठी खटला चालेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. तीन आरोपींना मात्र पूर्णपणे दोषमुक्त केले. या खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी एकूण १० आरोपींनी अर्ज केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यास विरोध केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. टेकाळे यांनी यापैकी फक्त शिवनारायण कलसांग्रा, श्याम साहू व प्रवीण टक्कलकी या तीन आरोपींना पूर्णपणे दोषमुक्त केले.पुणे - शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यातील संबंध किंवा महाराजांची त्यांच्याबद्दल असलेली भूमिका यावरून अनेक राजकीय वाद आहेत. मात्र आता शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या चाफळ मठाच्या खर्चासाठी गाव इनाम दिल्याचे पत्र ब्रिटिश लायब्ररीत सापडले त्याच वाचन इतिहास संशोधन मंडळाच्या पाक्षिक सभेमध्ये करण्यात आले. मात्र या पत्राला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आणि या पत्राच्या सत्यतेलाच आव्हान दिले आहे.शिवाजी महाराजांनी स्वामी समर्थ अर्थात रामदास स्वामींना इनाम म्हणून गाव दिल्याचा उल्लेख असलेले पत्र शोधल्याचा दावा काही इतिहास संशोधकांनी केला. भारत इतिहास संशोधन मंडळात त्याच वाचन ही करण्यात आले. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या पात्राची मूळ प्रत ब्रिटीश लायब्ररीतून मिळवून भाषांतरित केली. समर्थांबाबतच हे पात्र समोर आल्यानंतर पुन्हा एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असावा की राजकीय वादासाठी असा प्रश्न पुन्हा उपस्थित होईल.

सटाणा - सटाणा- मालेगाव रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अपे रिक्षाला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील सात प्रवासी जागीच ठार झाले. हे सातही जण व्यावसायिक असल्याचे समजते. सटाणा-मालेगाव रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला. शेमळीजवळ अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिली. यात रिक्षातील सात प्रवासी ठार झाले. हे सर्व प्रवासी व्यावसायिक असल्याचे समजते. ते रिक्षातून माल घेऊन जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपघाताची नोंद करण्यात आली असून रिक्षाला धडकलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सिमला - ऐतिहासिक रिज मैदानावर हिमाचल प्रदेशचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून जयराम ठाकूर यांनी बुधवारी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ५२ वर्षीय ठाकूर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. थपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व इतर नेते उपस्थित होते. हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतलेले ठाकूर यांच्या रुपाने मंडी जिल्ह्य़ाला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. ठाकूर यांच्यासह १२ मंत्र्यांनी शपथ घेतली. बिलासपूर व हमीरपूर या दोन जिल्ह्य़ांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे आहेत. राजीव बिंदल हे विधानसभा अध्यक्ष असतील. रोमेश धवला व नरिंदर बरगटा या ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. शपथविधी समारंभाच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

नवी दिल्ली - पाकिस्तानने ताब्यात ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांच्या स्थितीबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्तव्य करण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सकाळी ११ वाजता व लोकसभेत दुपारी १२ वाजता सदस्यांना सर्व परिस्थितीबाबत माहिती देतील.

मडगाव - काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. दक्षिण गोव्यातील लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या मित्रमंडळींसह त्या आल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देउन नववर्षाचे स्वागत केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या गोव्याचा निरोप घेतील. काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर देशभर दौरे करण्यात राहुल गांधी व्यग्र असताना सोनिया गांधींनी गोव्याला जाणे पसंत केले. हॉटेलच्या आवारात मनमुराद सायकलिंग केले. तसेच विदेशांतील पाहुण्यांशी चर्चा केली. अनेक चाहत्यांना त्यांनी आपल्यासोबत सेल्फीही घेऊ दिले. योगा करण्याबरोबरच पुस्तकांचे वाचन करून त्या वेळ व्यतित करत आहेत. मात्र बातम्यांपासून दूर राहण्याची खबरदारी त्या घेत आहेत.

नवी दिल्ली - जीएसटीमुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी सरकारच्या महसुलात मात्र सध्या घट झाल्याचे दिसत आहे. सरकार येत्या तीन महिन्यात आणखी ५० हजार कोटी रूपयांचे कर्ज घेणार आहे. सरकारकडून बुधवारी यासंबंधीची माहिती देण्यात आली. विविध योजनांशी निगडीत खर्च आणि व्याज देण्यासाठी सरकार हे कर्ज घेत असल्याचे सांगण्यात येते. सरकारी सिक्युरिटिजच्या माध्यमातून सरकार हे कर्ज घेत आह. यामागे सरकारी महसुलात झालेली घट आणि जुलैपासून जीएसटीची झालेली कमी वसुली हे कारण असल्याचे सांगण्यात येते.अर्थ मंत्रालयाच्या मते, सरकार हे कर्ज निश्चित कालावधीच्या सिक्युरिटिजच्या माध्यमातून उभारणार आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, २६ डिसेंबरपर्यंत सरकारने चालू आर्थिक वर्षांत बाजारातून ३.८१ लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. रिझर्व्ह बँकेबरोबर सरकारच्या कर्ज कार्यक्रमाची समीक्षा केल्यानंतर सरकारने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बाजारातून अतिरिक्त ५० हजार कोटी रूपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला.

मॉस्को - रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथील एका सुपरमार्केटमध्ये बुधवारी रात्री बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले आहेत. स्थानिक तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटासाठी घरगुती वस्तूंच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या बॉम्बचा वापर करण्यात आला. त्यामुळे या बॉम्बमध्ये लोखंडाचे तुकडे मोठ्या प्रमाणावर होते. या स्फोटात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. परंतु, १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाही.

नवी दिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या राज्यघटना बदलण्याच्या वादग्रस्त विधानावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ उडाला. घटनेविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे अनंतकुमार हेगडे यांना बडतर्फ करण्याची मागणी करीत विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. राज्यघटना बदलण्याचा संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडून विरोधकांनी भाजपची चांगलीच कोंडी केली.लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू होऊन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना प्रश्नोत्तराचा तास तहकूब करावा लागला. एक मंत्री म्हणून हेगडे असे कसे बोलू शकतात, असे म्हणत तृणमूलचे सौगत राय यांनी लोकसभेत दिल्लीशी संबंधित विधेयकावरील चर्चेत भाग घेण्यास नकार दिला. सरकार घटनेशी प्रतिबद्ध असून हेगडे यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले. पण त्यामुळे सदस्यांचे समाधान होऊ शकले नाही.

ठाणे - गुजरातमध्ये माजलेला अनाचार संपवण्यासाठी मी, जिग्नेश आणि हार्दिकने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळेच भाजपची गुजरातमध्ये पिछेहाट झाली आहे. आता महाराष्ट्राला भाजपामुक्त करू, असा निर्धार गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी दिला. मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडवर आयोजित केलेल्या देशातील सर्वात मोठ्या मुशायराला अल्पेश ठाकोर यांनी भेट दिली. या प्रसंगी आ. जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान, राजन किणे आदी उपस्थित होते. ठाकोर पुढे म्हणाले की, या देशात कधी नव्हे एवढी अराजकता माजली आहे. दलित, अल्पसंख्याक दहशतीखाली जगत आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्य जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संविधानाकरिता धोकादायक आहे. शिवाय, राक्षसी बहुमताच्या जोरावर जनविरोधी धोरणांचा अवलंब केला जात आहे. यामुळेच संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठीच मी, जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये भाजपाला आव्हान दिले होते. यामुळेच बालेकिल्ल्यातच भाजपाची पीछेहाट झाली आहे.

मुंबई - उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निकाल गेल्यामुळे, भांडुप पश्चिम नाहूर गाव येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची जागा विकासकाला परत करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडावर पाणी सोडण्याऐवजी, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली होती. मात्र, हा भूखंड देण्यासाठी महापालिकेच्या सुधार समितीसह कोणत्याही समितीच्या मंजुरीची आवश्यकता नसल्याने, हा भूखंड प्रशासनाने या आधीच विकासकाला देऊन टाकला आहे. भांडुपमधील १८ हजार ७६५ चौरस मीटरची आरक्षित जागा विकासक रुणवाल होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महापालिकेला हस्तांतरित केली. हा भूखंड हस्तांतरित करताना, यावरील विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) विकासकाने वापरला. त्यामुळे या भूखंडावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या आरक्षित भूखंडापैकी रस्त्याने बाधित होणारी ८ हजार २०९ चौरस मीटरच्या जागेवर विकासकाने दावा केला. मात्र, सुधार समितीने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे संबंधित विकासकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात महापालिकेची बाजू कमकुवत पडल्याने, ही जागा विकासकाला परत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, ही जागा विकासकाला परत देण्यासंदर्भात सुधार समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
मात्र, हा प्रस्ताव फेटाळून लावत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सदस्यांनी केली होती. न्यायालयाने २ आठवड्यांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. हा भूखंड विकासकाला परत करण्यासाठी सुधार समिती किंवा महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही, असा अभिप्राय वरिष्ठ विधितज्ज्ञ भरूचा यांनी दिला होता. त्यानुसार, हा भूखंड प्रशासनाने २८ सप्टेंबर २०१७ रोजी विकासकाला परत केला.

औरंगाबाद - रिक्षा धुण्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्या काठ्यानी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सेव्हन हिल्स परिसरात घडली. यात सहा जण जखमी झाले आहेत.
सेव्हन हिल्स् परिसरात एका वॉशिंग सेंटरवर बायजीपुरा व नवाबपुरा येथील चालक रिक्षा धुण्यासाठी आले होते. त्यांच्या हाणामारी झाली. या रिक्षाचालकांनी मोबाइल करून त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले. यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या क‌ाठ्यानी अश्लील शिवीगाळ करीत हा धुडगूस दहा मिनीट सुरू होता. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले. पुंडलिकनगर पोलिसांना एका नागरिकाने या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

पुणे - राज्यात दरोडा, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात घट झाली असली तरी, महिला अत्याचार, सायबर गुन्हे व विशेष कायद्यानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. राज्यात दर तीन मिनिटाला दोन दखलपात्र गुन्ह्यांची नोंद होत आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण ३४ टक्क्यांवर गेले आहे. रस्ते अपघात घटले असले तरी अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघातामध्ये सर्वाधिक मृत्यू पुणे ग्रामीणमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१६’ हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये राज्यातील गुन्हेगारीची माहिती देण्यात आली आहे. राज्यात २०१६ मध्ये चार लाख ३१ हजार दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ च्या तुलनेत १.८२ टक्क्यांनी दखलपात्र गुन्हे वाढले आहेत. राज्यात तर तीन मिनिटाला दोन दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. भारतीय दंड संहितेप्रमाणे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत पाच टक्क्यांनी घट झाली असली तरी, विशेष कायद्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. राज्यात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये पोलिस आयुक्तालयात दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ३९.३७ टक्के आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात ३८.१६ टक्के गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात दरोड्याच्या गुन्ह्यात १६.३ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच, जबरी चोरी २९.६, दरोड्यांची तयारी ७.३ टक्यांनी घट झाली आहे. मात्र, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात ०.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई शहर येथे सर्वाधिक पाच हजार ११८ गुन्हे दाखल झाले आहेत. अमरावती शहरात सर्वाधिक गुन्ह्याचे प्रमाण आहे. १८ वर्षाखाली मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यात २.३८ टक्क्यांनी घट झाली आहे.

पारनेर - भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प करण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यास कमजोर केल्याने, तसेच निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळल्याने देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला आहे. देशातील जनताच ‘मन की बात’ बोलू लागली असून विविध राज्यांत घेण्यात आलेल्या सभांमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी तसेच लोकपाल व लोकआयुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हजारे हे येत्या २३ मार्चपासून नवी दिल्लीमध्ये बेमुदत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी हजारे हे गेल्या ९ डिसेंबर पासून उत्तर भारताच्या दौऱ्यावर होते. सोमवारी हा दौरा आटोपून राळेगणसिद्धीत परतल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.मुंबई - माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने क्लीन चिट दिल्यानंतर, ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य शासनाने मंगळवारी फेरनियुक्त केले. मोपलवार हे येत्या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतरही विशेष पद देत, त्यांच्याकडे समृद्धी महामार्गाची जबाबदारी कायम ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोपलवार यांच्या कार्यकाळात भूसंपादनापासून इतर बाबींमध्ये प्रकल्पाला गती मिळाली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीसी करीत असून, त्याची सूत्रे ही मोपलवार यांच्याकडे होती. विधिमंडळाच्या या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात मोपलवार यांच्यावर काही आरोप करण्यात आले आणि त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.बोरीवलीतील एका मोठ्या भूखंडाच्या वाटपात मोपलवार यांची कोकण विभागाचे तत्कालीन आयुक्त म्हणून संशयास्पद भूमिका होती, असा आरोप करीत, काही आॅडिओ टेप बाहेर काढण्यात आल्या होत्या. तथापि, असा कोणताही भूखंडच नव्हता आणि तो मिळविण्यासाठी कोणी अर्जदेखील केला नव्हता. त्यामुळे त्यात मोपलवार यांचा संबंध असण्याचे काहीही कारण नाही, कथित सीडीमध्ये मोपलवार यांचा अन्य ठिकाणचा संवाद मोडूनतोडून जोडण्यात आला, असे स्पष्ट मत, जॉनी जोसेफ समितीने नोंदविल्याची माहिती आहे.

मुंबई - गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांना दणका दिल्यानंतर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आता धर्मादाय संस्थांकडे मोर्चाकडे वळवला आहे. राज्यातील १ लाख ३० हजार संस्थांना धर्मादाय आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तब्बल ६० हजार संस्थांची नोंदणीच रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत राज्यात सुमारे ८ लाख संस्थांची नोंदणी झालेली आहे. यातील ३ लाख ९५ हजार ३०८ संस्था अस्तित्वात असल्या तरी त्या सक्रीय नाहीत. धर्मादाय आयुक्तांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियमांची पूर्तता न करणाऱ्या ट्रस्टचा आढावा घेतला. संस्थेची नोंदणी केल्यानंतर विश्वस्तांची यादी तसेच संस्थेचे उद्देश आणि अन्य इत्यंभूत माहिती देणे बंधनकारक असते. तसेच ऑडीट रिपोर्ट देखील सादर करणे बंधनकारक असते. यातील १ लाख ९० हजार संस्थांनी ऑडीट रिपोर्ट तसेच विद्यमान ट्रस्टींची किंवा ट्रस्टमधील फेरबदलाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे अशा सर्व संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. संस्थांकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताज्या वक्तव्यावरून काँग्रेसला सरकारवर हल्ले व आरोप करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. भाजपाला त्यामुळे चार पावले मागे जावे लागले. हेगडे याच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र हल्ला करताना घटनेत बदल करण्याचे कोणतेही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की घटनेचा अपमान करणे हे भाजपाच्या चारित्र्याचे एक अंगच बनले आहे. वस्तुस्थिती ही आहे की भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळातच घटनेच्याविरोधात आहेत. घटनेच्या कोणत्या कलमांबद्दल आक्षेप आहे म्हणून ते बदलायला निघाले आहेत हे भाजपा आणि मोदी यांनी सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वक्तव्याबद्दलही आक्षेप घेतला आहे. हे अहिर अहंकारात मस्त आहेत, असा काँग्रेसचा आक्षेप आहे. अहिर डॉक्टरांना गोळ्या घालू इच्छितात; कारण का तर डॉक्टर्स त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. हे दोन मुद्दे काँग्रेसच्या हाती लागले असून संसदेच्या दोन्ही सभागृहांत ते जोरदारपणे उपस्थित करण्याचा ते प्रयत्न करतील असे चित्र उभे आहे.

चेन्नई - युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते, असे सूचित करत, आपण राजकारणात उडी घेणार की नाही याचा निर्णय ३१ डिसेंबर रोजी जाहीर करू, असे तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितले.
नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन १९९६मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही.

मेरठ - मेरठच्या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयात रशियन नर्तिकेचे अर्धनग्न नृत्य झाले व या पार्टीसाठी रुग्णवाहिकेतून दारूच्या पेट्या नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लाला लजपतराय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा रजत महोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त ओली पार्टी, अश्लील नृत्य असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याचे बिंग फुटले व त्या पार्टीला हजेरी लावणारे अनेक डॉक्टर्स व विद्यार्थ्यांनी कोणकोणते रंग उधळले, ते सर्व जगासमोर आले. या व्हिडिओमध्ये रशियन नर्तिका अर्धनग्न अवस्थेत नृत्य करताना दिसत आहे व रुग्णवाहिकेतून दारूच्या पेट्या नेताना दिसत आहेत.

नवी दिल्ली - भाजपमधील बंडखोर खासदारांच्या यादीमध्ये आणखी एकाची भर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकेकाळी ‘बामसेफ’ या कडव्या दलित संघटनेशी नाते सांगणारे दिल्लीतील भाजप खासदार डॉ उदित राज हे जवळपास बंडखोरीच्या उंबरठय़ावर असल्याचे चित्र आहे. आरक्षण मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करताना दिसत आहेत. शिवाय राज्यघटना बदलण्याची भाषा करणारे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्याविरुद्धही त्यांनी कठोर शब्द वापरले. डॉ. राज हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अनुसूचित जाती, जमातींच्या अखिल भारतीय महासंघाने मंगळवारी रामलीला मैदानावरील जाहीर सभेमध्ये आरक्षण गुंडाळण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप करून त्याविरुद्ध दंड थोपटण्याची भाषा केली. ‘सरकारी नोकऱ्यांमधील भरती बंद केली आहे आणि आऊटसोर्सिंगच्या नावाखाली कंत्राटीकरण करून दलित, आदिवासींचा नोकऱ्यांमधील हक्क पद्धतशीरपणे डावलला जात आहे. त्याचबरोबर बढत्यांमधील आरक्षणातही खोडा घातला जात आहे. याविरुद्ध आत्ताच एकत्र आलो नाही तर नंतर पश्चातापाची वेळ येईल,’ असा इशारा डॉ. राज यांनी दिला. त्यांनी थेटपणे मोदी सरकारचा उल्लेख करण्याचे टाळले; पण आपले ‘लक्ष्य’ लपविण्याचा प्रयत्नदेखील केला नाही.

नवी दिल्ली - दाऊदच्या इशाऱ्यावरून दिल्लीतील स्थानिक गुंड नीरज बवानाने तिहार तुरूंगात कैदेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या हत्येचा कट रचला होता, अशी गोपनीय माहिती समोर आली आहे. तिहार तुरूंग प्रशासनाला दोन आठवड्यांपूर्वी ही गोपनीय माहिती मिळाल्याचे सांगण्यात येते. ही माहिती समोर आल्यानंतर राजनच्या सुरक्षेची समीक्षा करून त्यात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बवानाच्या एका सहकाऱ्याने दारूच्या नशेत या कटाबाबत सांगितल्यामुळे ‘डी’ कंपनीची ही योजना फसली. नंतर ही माहिती गुप्तचर संस्थांपर्यंत पोहोचल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बवानाच्या बराकमध्ये मोबाइल फोन आढळून आला होता. राजनला मुंबई किंवा महाराष्ट्रातील तुरूंगात ठेवण्यापेक्षा तिहारसारख्या अति सुरक्षित तुरूंगात ठेवल्यास त्याच्यावर हल्ला करणे कठीण जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. तिहार प्रशासनाच्या मते राजनला अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बवानाला त्याच्यावर हल्ला करणे शक्य नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजन क्रमांक दोनच्या तुरूंगात सर्वांत शेवटी आहे. तर बवानाला दुसरीकडे एका हायरिस्क वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. राजनच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा रक्षक आणि आचारी तैनात करण्यात आले आहेत. यांचीही कसून तपासणी केली जाते.

मुंबई - उत्पादन शुल्कातील वाढीनंतर कमाल विक्री किंमत (एमआरपी) वाढवण्याची बीअर उत्पादक कंपन्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने राज्यभरात बीअरच्या बाटलीची किंमत २० ते २५ रुपयांनी वाढणार आहे. ऐन नाताळाच्या आठवडय़ात आणि ३१ डिसेंबरच्या सोहळ्याच्या तोंडावर होणाऱ्या या दरवाढीमुळे आठवडा अखेरीस होणारी बीअर विक्री मंदावणार असल्याचा अंदाज मद्यविक्रेता संघटनेने केला आहे.उत्पादनशुल्कात वाढ झाल्याने नफ्यावर परिणाम होत असून बीअरच्या ‘एमआरपी’त वाढ करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बीअर उत्पादक कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात केली होती. पण त्यावर तातडीने निर्णय झाला नाही. त्यामुळे बीअर कंपन्यांनी पुरवठा कमी केला. राज्यात दरमहा सरासरी बीअरच्या दोन कोटी चार लाख बाटल्यांची विक्री होते. यंदा पुरवठाच ३६ लाख बाटल्यांपर्यंत खाली आला होता. आता राज्य सरकारने बीअरच्या एमआरपीमध्ये वाढ करण्याची मागणी मान्य करत त्याची अधिसूचना काढली आहे. सध्या माइल्ड बीअरची किंमत उत्पादन खर्चाच्या साडेतीन पट आकारता येते. आता ते प्रमाण ३.७५ पट होईल. तर स्ट्रॉंग बीअरची किंमत उत्पादन खर्चाच्या ४.२५ पटपर्यंत आकारता येते. ते प्रमाण आता ४.६ पट असे करण्यात आले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget