June 2017

मुंबई - ‘मुंबईत तुमचे स्वागत आहे, तुम्ही आमचे अतिथी आहात, मी तुम्हाला थोडक्या पैशांमध्ये इथली प्रसिद्ध धार्मिकस्थळे दाखवतो,’ अशी मधाळ गळ घालून परदेशी पर्यटकांना लुटणाऱ्या भामटय़ाला ताडदेव पोलिसांनी दिल्लीच्या पहाडगंज परिसरातून अटक केली. अय्याज शेख असे या भामटय़ाचे नाव आहे. ताडदेव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या तेव्हाही तो आपले सावज शोधत होता. सहावीपर्यंत शिकलेला, मोडकेतोडके इंग्रजी बोलणाऱ्या अय्याजच्या जाळयात परदेशी पर्यटक अडकतातच कसे, याबाबत मात्र ताडदेव पोलीस आश्चर्य व्यक्त करतात. चौकशीत त्याने मुंबई, नवी मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे अशा प्रकारे अनेक गुन्हे केले आहेत. तूर्तास मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने अशाच प्रकारे गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. जोसेफ हेन्री वॉकर हा २२ वर्षांचा तरुण १२ जूनला इंग्लंडहून भारत पर्यटनासाठी मुंबईत आला. नाना चौकातल्या कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये तो वास्तव्य करत होता. १४ जूनला तो मुंबई फिरण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडला. फोर्ट परिसरातील एका एटीएममधून पैसे काढून बाहेर पडणार तोच त्याला अय्याजने गाठले. जोसेफ अय्याजच्या आमिषाला बळी पडला आणि त्याच्यासोबत महालक्ष्मी मंदिरासह अन्य धार्मिक स्थळे फिरण्यास तयार झाला. महालक्ष्मीच्या हिरापन्ना सेंटरसमोरील कॅफे कॉफी डे येथे दोघे कॉफी पिण्यासाठी गेले. तेव्हा अय्याजने जोसेफच्या कॉफीत गुंगी आणणारी गोळी मिसळली. अवघ्या काही मिनिटांमध्ये जोसेफ तिथेच बेशुद्ध पडला. संधी साधून अय्याजने जोसेफकडील २१ हजारांची रोकड, सुमारे शंभर युरो आणि जोसेफची डेबिट क्रेडिट कार्ड घेऊन पोबारा केला. जोसेफला शुद्ध आली, तेव्हा तो जसलोक रुग्णालयात होता आणि ताडदेव पोलीस नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी गोळा झाले होते. पुढल्या काही कालावधीत आपल्या कार्डावरून सुमारे दहा हजार रुपयांची खरेदी घडल्याचे झाल्याचे जोसेफच्या लक्षात आले. जोसेफच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे, उपनिरीक्षक सुनील पवार आणि पथकाने जोसेफच्या कार्डावरून ज्या दुकानात खरेदी झाली होती ते गाठले. तेथील सीसीटीव्हीवरून अय्याजचे चित्रण मिळवले. पुढे त्याची ओळख पटवून तांत्रिक तपासातून तो नेमका कुठे आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अय्याज दिल्लीत असल्याची माहिती मिळताच त्याला तेथून अटक केली

मुंबई - शहरासह उपनगरात पावसाचा तडाखा सुरूच आहे. गुरुवारची दुपार वगळता सकाळसह सायंकाळी आणि रात्री पावसाने लावलेल्या हजेरीने मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. पावसाची बरसात सातत्याने सुरू असतानाच गुरुवारी पहाटे १ वाजता पवई तलाव ओव्हर फ्लो झाला. पवई परिसरात आतापर्यंत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा मारा सुरू राहिल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शहरात ४९.८९, पूर्व उपनगरात ६९.८६ आणि पश्चिम उपनगरात ५३.८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारसह शनिवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे पावसामुळे होणारी पडझड सुरूच आहे. शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. शहरात ७, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १८, पूर्व उपनगरात २४ आणि पश्चिम उपनगरात ३८ अशा एकूण ८० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई - अंधेरी पूर्व एमआयडीसी सीप्झ येथील राज्य विमा निगम कामगार रुग्णालयात गेले दहा दिवस सुरू असलेला संप गुरुवारी सायंकाळी अखेर मिटला. येथील वैद्यकीय अधीक्षक आभा जैन आणि ईएसआयएस नर्सेस असोसिएशन यांच्यामध्ये दुपारी ४ वाजता सुरू झालेली बैठक सकारात्मक चर्चेअंती सायंकाळी ७ वाजता संपली. येथील युनियनचे उपाध्यक्ष कैलास धायल यांची युनियनला विश्वासात न घेता औरंगाबाद येथे बदली केल्यामुळे युनियनने संपाचे हत्यार दहा दिवसांपूर्वी उपसले होते. येथील १३० नर्सेस संपावर गेल्यामुळे राज्याच्या विविध औद्योगिक आस्थापनातून येथे दाखल होत असलेल्या रुग्णांचे हाल झाले होते. गुरुवारच्या बैठकीत यापुढे येथील कर्मचारी वर्गाची बदली करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच जे कर्मचारी ईएसआयएसच्या राज्यातील दुसऱ्या आस्थापनात स्वखुशीने जाण्यास तयार असतील; त्यांना बदलीत प्राधान्य देण्यात येईल. कैलास धायल यांच्या बदलीबाबतीत त्यांना फक्त दोन महिन्यांकरिता औरंगाबाद येथे पाठवण्यात येईल, असे व्यवस्थापनाने लेखी दिले आहे.मुंबई - मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना राबवणाऱ्या पालिकेतर्फे शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८३ शौचालयांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वडाळा, दादर, गोरेगाव, कुलाबा, देवनार या भागांसह शहरातील अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या या शौचालयांमध्ये एकूण १२१५ शौचकुपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरात आजमितीला ३५ हजार शौचकुपे आहेत. परंतु, त्यावर अवलंबून असलेले नागरिक पाहता ही संख्या दुप्पट होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई शहर हागणदारीमुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, अनेक भागांत आजही उघडय़ावर प्रातर्विधी सुरूच आहेत. डिसेंबरमध्ये पालिकेने ११८ ठिकाणी २ हजार ९३९ शौचकुपांची व्यवस्था केली होती. मात्र तरीही उघडय़ावर शौच करण्याचे प्रकार कमी न झाल्याने पालिकेने आता आणखी ८३ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था केली आहे. यात सामुदायिक, सशुल्क तसेच फिरत्या शौचालयांचा समावेश आहे. या सर्व शौचालयांमध्ये वीज व पाणी पुरवठा सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील पूर्व मुक्त मार्गाजवळ व परळ परिसरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने तयार केलेला माहितीपट व ध्वनिफीत यांचेही लोकार्पण याचवेळी करण्यात येणार आहे. सामुदायिक शौचालयात महिना पन्नास रुपये शुल्क व सशुल्क ठिकाणी प्रत्येक वेळी दोन रुपये शुल्क आकारले जाते, असे किरण दिघावकर यांनी सांगितले. गेल्या वर्षीपर्यंत शहरात सुमारे २ हजार सार्वजनिक शौचालये व दीड हजार सशुल्क शौचालये उपलब्ध होती. या शौचालयांमध्ये उपलब्ध असलेली साधारण ३० ते ३५ हजार शौचकूपे शहरातील तसेच रोजगारासाठी शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी अत्यंत अपुरी असून ३०० हून अधिक व्यक्तींसाठी एक शौचकूप एवढे भयावह प्रमाण आहे. प्रत्येकी ५० व्यक्तींमागे एक शौचालय असणे गरजेचे आहे, असे कोरो संस्थेच्या कार्यकर्त्यां मुमताज शेख म्हणाल्या.

सर्वाधिक शौचालये
वडाळा (१५९), दादर (१४०), गोरेगाव (१३५), कुलाबा (१०४), देवनार(९६)
३१ सामुदायिक शौचालये (६५६ शौचकुपे)
१० सशुल्क शौचालये (१६२ शौचकुपे)
४२ फिरती शौचालये (३९७ शौचकुपे)

मुंबई - आंदोलने... न्यायालयीन लढा... समित्यांची स्थापना... पर्यायी जागेचा शोध... शिवसेनेचा विरोध-भाजपचा पाठिंबा... या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षे सुरू असलेल्या वादानंतर अखेरीस आरे कॉलनीत मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची वीट रचली जाणार आहे. कारशेडचे ३२८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’ मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी विविध कामांची कंत्राटे यापूर्वीच देण्यात आली आहेत. दिल्लीस्थित ‘सॅम बिल्टवेल प्रा. लि.’ या कंपनीला २५ हेक्टर जागेवर शेड उभारणीचे काम देण्यात आले आहे. जागेवर भराव टाकणे, ट्रेन उभ्या करण्यासाठी ट्रॅक टाकणे, ट्रेन धुण्यासाठी यंत्रणा उभी करणे, कारशेडचे नियंत्रण करण्यासाठी इमारत उभारणे, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी शेड, संरक्षक भिंत बांधणे आदी कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत.
आरे कॉलनीत मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी सुमारे पाच हजार झाडे तोडावी लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर संघर्षाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर गेली दोन वर्षे हा संघर्ष सुरू होता.

मनमाड - ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्राध्यापक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यासारख्या व्यक्तीची शताब्दी साजरी व्हावी. समाजामधील सात्विक व्यक्तींचे आयुष्य वाढणे गरजेचे आहे. कारण त्यांचे जीवन समाजाला दिशादर्शक असून त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अस्मितादर्शकार प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यांच्या एकूणच सामाजिक, वैचारिक, साहित्यिक क्षेत्रातील समर्पित आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनमाड शहरातर्फे डॉ. पानतावणे यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजारे बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मनमाडच्या नगराध्यक्षा तथा स्वागताध्यक्ष पदमावती धात्रक, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब कुशारे, समिक्षक प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर आहिरे आदी उपस्थित होते. हजारे यांनी पानतावणे यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा गौरव केला. डॉ. पानतावणे यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. आपल्या साहित्यिक वाटचालीत शुद्ध आचारविचार आणि निष्कलंक जीवन याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. पानतावणे हे आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी कविता सादर करुन या कार्यक्रमात रंगत आणली. डॉ.पानतावणे यांनी समाजातील भूमिका साहित्यातून मांडली. समतेचा संदेश दिला. भारत सरकारने पदमश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांची घोषणा

नांदेड - राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करताना, सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा तसेच जी रक्कम जाहीर केली, त्याची संपूर्ण पडताळणी आम्ही करणार आहोत, याचा पुनरुच्चार करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णयप्रक्रियेत शब्दांचा खेळ करणाऱ्या सरकारी बाबूंचाही येथे समाचार घेतला.फडणवीस सरकारने कर्जमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामागे शिवसेनेची आक्रमकता आणि या पक्षाचा आग्रह कारणीभूत असल्याचे ग्रामीण जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ठाकरे यांचा शेतकरी संवाद सुरू आहे. ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. ती ३० जून २०१७ अखेपर्यंत केली जावी, ही उपस्थित शेतकऱ्यांची मागणी ठाकरे यांनी उचलून धरली. त्यासाठी आमच्यासोबत राहा, असे आवाहन शेतकऱ्यांना त्यांनी केले. कर्जमाफी करण्यास शासनाला भाग पाडल्याबद्दल ठाकरे यांचा फेटा, घोंगडी व काठी देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.

सोलापूर - ‘स्मार्ट सिटी’ म्हणून संपूर्ण देशात पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश झालेल्या सोलापूरच्या प्रगतीची वाट बिकट होत असतानाच चार महिन्यांपूर्वी सोलापूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या प्रथमच भाजपच्या हातात गेल्या तरी या पक्षाला कारभार करणेच मुळी अशक्य झाले आहे. मार्च अखेर मांडला जाणारा अर्थसंकल्प अद्यापि मांडलाच गेला नाही. त्यामुळे पालिकेचा कारभारच ठप्प झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील साधी गटार तुंबली तरी ती दुरुस्ती करायला निधी नाही. कचऱ्याची समस्याही वाढत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळेच भाजपकडून अवघे सोलापूर शहर सध्या वेठीला धरले गेले की काय, अशी रास्त शंका उपस्थित होत आहे.काही अपवाद वगळता सुरुवातीपासून काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या महापालिकेची सूत्रे प्रथमच सोलापूरकरांनी मोठय़ा विश्वासाने भाजपच्या हाती सोपविली. सत्ता ताब्यात आल्यानंतर विशेषत: महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर महापालिकेचा रुतलेला गाडा कसा सुरळीत होईल, अशी भाबडी आशा समस्त सोलापूरकरांनी बाळगली होती. परंतु कसचे काय, पदाधिकारी निवडीपासूनच भाजपला अंतर्गत गटबाजीचा नाट लागला. पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे संबंध अधिकच ताणत गेल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेचा कारभार रुळावर येणे कठीण झाले आहे. यात पक्षांतर्गत गटबाजीचे ओंगळवााणे स्वरूप विचारात घेता काँग्रेस पक्ष सत्ता चालवायला लायक होता, असा निष्कर्ष काढत भाजपच्या हाती सत्ता दिल्याबद्दल पश्चात्तापाची भावना सोलापूरकरांमध्ये हळूहळू दृढ होत चालली आहे.महापौर शोभा बनशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासाचा मार्ग विनाअडथळा पार करण्याची ग्वाही दिली होती. शहरासाठी उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासह अवघे शहराचे रूपडे पालटवत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करताना भाजपला आकाश ठेंगणे वाटत होते; परंतु काही दिवसांतच त्यांचा भ्रमनिरास झाला. स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकणे तर दूरच राहिले, परंतु वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याची साधी कामगिरीही भाजपला करता येत नसल्याचे दिसून येते. मार्चअखेर अर्थसंकल्प मांडण्यासाठी भाजपला तांत्रिकदृष्टय़ा अडचण होती. थोडय़ाच दिवसात अडचण दूर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्प मांडण्यासाठी फारशी अडचण नसताना पुन्हा त्याचा मुहूर्त लांबणीवर पडत गेला. यात प्रमुख कारण म्हणजे भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात बेदिली. पक्षाचे नगरेवक दोन्ही मंत्री देशमुखांच्या गटात विभागले गेल्यामुळे एकमेकांना शह-काटशह देण्यापलीकडे महापालिकेत कारभारच होत नाही. अर्थसंकल्प मांडण्यासाठी जेव्हा पक्षाची बैठक होते, तेव्हा एका देशमुखांचे समर्थक नगरसेवक दुसऱ्या देशमुख समर्थक नगरसेवकांवर कुरघोडी करणे हे जवळपास ठरलेलेच. त्याची अनुभूती वेळोवेळी येत गेल्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला आहे. त्याचा फटका शहराच्या विकासाला बसला आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियाच्यामाध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असल्याचं आपण बघतो आहे. पण गैरव्यवहारासाठी सोशल मीडियाचा वापर किती उंचीपर्यंत होऊ शकतो याचं उदाहरण दिल्लीमध्ये बघायला मिळाले आहे. एका मुलाचे अपहरण करून त्याला जास्तीत जास्त किंमतीला विकण्यासाठी एका महिलेने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड करून त्याची बोली लावली. या माध्यमातून त्या मुलाला विकण्यासाठी एक लाख ऐशी हजार रूपयांची किंमतही निश्चित झाली. विशेष म्हणजे या व्हॉट्सअॅप सेलमुळेच आरोपी महिला आणि तिच्या तीन साथिदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना पकडलेल्या तिघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 
पोलिसांच्या माहितीनूसार, या तीन महिला लहान मुलांना दत्तक घेण्याच्या तसंच सरोगसीच्या रॅकेटमधील आहेत. या मुलाचं जामा मशिदीजवळून अपहरण करण्यात आलं होतं. तसंच त्या मुलाला जास्तीत जास्त किंमतीमध्ये विकता यावं यासाठी त्याला सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात आलं होतं. या मुलाचा फोटो एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर बघितल्यानंतर त्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पकडले जाण्याच्या भीतिने आरोपी महिलेने त्याला रघुवीर नगरमधील एका मंदिरात सोडून दिलं आणि पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा दिसल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत तीन महिला आणि एक पुरूषाला अटक केली आहे. राधा, सोनिया, सरोज आणि जान मोहम्मद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 

मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार अपहरणाची तक्रार दाखल केली होती. जामा मशिदीच्या एसएचओ अनिल कुमार यांच्या अध्यतेखाली एक टीम नेमून अपहरणकर्त्याचा शोध लावला गेला, अशी माहिती पोलीस अधिकारी मंदीप सिंह रंधावा यांनी दिली आहे. 
चौकशी दरम्यान मुलाचं अपहरण कसं केली त्याची माहिती आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांना दिली आहे. 5 जून रोजी जामा मशिदजवळ गेट नंबर एक जवळून मुलाला उचलण्यात आलं होतं. त्याचे आई-वडील नमाजची तयारी करत असताना त्याचं अपहरण करून त्याला शकुरपूरमध्ये राहणाऱ्या आरोपी राधाच्या घरी नेण्यात आलं. मुलाला विकल्यानंतर त्याची चांगली किंमत दिली जाइल, असं राधाने सांगितल्यामुळे अपहरण केल्याची कबूली आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांसमोर दिली आहे. राधाने त्या मुलाला काही दिवस आपल्या घरी ठेवले आणि त्यानंतर दुसरी आरोपी सोनीयाला एक लाख रूपयांमध्ये त्या मुलाला विकलं. सोनीयाने या मुलाला सरोज नावाच्या तिसऱ्या महिलेला विकले. जास्त पैसा मिळावा या उद्देशाने सरोजने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केला. याच दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी केबल ऑपरेटरशी संपर्क करत त्या मुलाचा फोटो टिव्हीवर दाखविण्यात आला. भाग्यवश नावाच्या व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीने मुलाचा टिव्हीवर फोटो पाहून जामा मशिद पोलीस स्टेशनशी संपर्क केला. या व्यक्तीच्या माहितीनंतर आरोपी सरोजला पकडण्यासाठी टीम नेमण्यात आली. आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडणार हे लक्षात आल्यानंतर सरोजने स्वतः पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा सापडल्याचे सांगितले. त्यानुसार मुलाला वाचविण्यात आलं. पोलिसांना फोन करणाऱ्या सरोजचा नंबर परत तपासण्यात आला तेव्हा तो नंबर बंद आला. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तो नंबर ट्रॅक केल्यानंतर सरोज पोलिसांच्या तावडीत सापडली आणि संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांच्या माहितीनूसार सरोज, राधा आणि सोनिया यांची ओळख आयवीएफ क्लिनिकमध्ये झाली होती. याआधीसुद्धा या महिलांनी एका मुलाला गुडगावमध्ये विकले असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सिक्कीम - सिक्कीममध्ये भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी उलट वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी 3 हजार सैनिकांची तुकडी या भागात तैनात केली आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात. या ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक परस्पराविरुद्ध उभे ठाकले असून, मागच्या अनेक दशकात प्रथमच इथे अशा प्रकारची युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गुरुवारी गँगटोक येथील 17 माऊंटन डिविजन आणि कालीमपाँग येथील 27 माऊंट डिविजनच्या मुख्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. भारतानेही कणखर भूमिका घेतली असून, दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीयत. दोन्ही सैन्याच्या लष्करी अधिका-यांमध्ये ध्वज बैठका आणि अन्य पातळीवर झालेल्या चर्चेचा काहीही उपयोग झालेला नाही. 

आपल्या भेटीत रावत यांनी 17 डिविजनच्या तैनातीचा आढावा घेतला. या डिविजनकडे पूर्व सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी असून, या डिविजनच्या चार ब्रिगेडमध्ये प्रत्येकी तीन हजार जवान आहेत. चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर हा तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीममध्ये तीन देशांच्या सीमा मिळतात त्या ट्राय जंक्शनपर्यंत तुम्हाला रस्ता बांधू देणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे.

अकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवकाने सभागृहात डुकराचे पिल्लू आणल्याने मोठीच खळबळ उडाली. यामुळे अकोला महापालिकेची बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा विशेष गाजली.
शहरातील स्वच्छतेच्या मुद्याकडे लक्ष वेधण्याकरिता सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात चक्क डुकराचे पिल्लूच आणले. शहरातील घाण-कचरा व पावसाचे दिवस बघता नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक अजय शर्मा यांनी सभागृहामध्ये प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी महापौर विजय अग्रवाल व आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत त्यांची वादावादीही झाली. खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने घातलेल्या वादाला महापौर विरोधाची किनार असली, तरी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई - तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई मेट्रोच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. 
या बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होते. तर अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाड्या पुढे जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यालय गाठण्यास उशीर होत असल्यानं प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली. 
मात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं तातडीनं बिघाड दुरुस्त करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांना मंजुरी दिली आहे. आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये घरभाडे भत्ता ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के करण्याता आला आहे. केंद्र सरकारच्या या मंजुरीनंतर भत्त्यांचे सुधारित दर १ जुलैपासून लागू होतील. घरभाडे भत्ता आणि अन्य भत्ता मिळणाऱ्या जवळपास ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

नवी दिल्ली - तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा तोटा असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्यास केंद्राने बुधवारी तत्त्वत: मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. निति आयोगाने खासगीकरणाची शिफारस केल्यानंतर जेटली व नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी तसे संकेत दिले होते. विमान व्यवसायातील व अन्य कंपन्याही खासगीकरणाच्या प्रक्रियेत स्पर्धा करू शकतील, असे नूद करून जेटली म्हणाले की, भारतात ५00 ते ६00 तर चीनमध्ये ५ हजार विमाने आहेत. भारतात विमान वाहतुकीला मोठी संधी आहे.याआधी एअर इंडियाला ३0 हजार कोटी रुपये देण्यात आले. तरीही तिचे कर्ज व तोटा वाढत आहे. कंपनीचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ झाल्यास आणि काही मालमत्ता विकल्यास एअर इंडियावरील बोजा कमी वा संपण्यास मदत होईल. सरकार तोट्याचे काय करणार? एअर इंडियाचे खासगीकरण कशा प्रकारे करायचे, हे सरकारने अद्याप ठरविलेले नाही. तसेच एअर इंडियाचा सध्याचा तोटा सरकार भरून काढणार किंवा कसे, हेही निश्चित झालेले नाही. एअर इंडियावर कर्जाचा बोजा असून, त्याची पुनर्रचना करण्यासाठी बँकांशी बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे ती प्रक्रियाही पूर्ण व्हावी लागेल. एअर इंडिया ही कंपनी पूर्णपणे विक्रीत काढायची की त्यात केंद्र सरकारचा काही हिस्सा ठेवायचा, हेही अद्याप नक्की झालेले नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव घसरल्यामुळे आणि प्रवासी संख्येत वाढ झाल्याने फक्त २0१५-१६ मध्येच कंपनीला 105 कोटींचा नफा झाला होता. एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या 15 टक्क्यांच्या आसपास आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांची नोट चलनात आल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. 
काळा पैसा, बनावट नोट आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारनं देशात नोटाबंदी निर्णय लागू केला. या निर्णयानुसार 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. यानंतर 500 व 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला. 
नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वी आरबीआयने 200 रुपयाची नोट छापण्याचे आदेश दिले असून यानंतर सरकारी मुद्रणालयात नोट छापण्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. जुलैपर्यंत या नोटा चलनात आणण्याचे सरकारचे उद्दीष्ट होते. पण आता या नोटा चलनात आणण्यासाठी आणखी वेळ लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बगदाद - इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हिंसक आणि अमानुष कहाण्या सतत उजेडात येत असतात. पण नुकतीच पुढे आलेली एक घटना या सगळ्या क्रूरतेचा कळस ठरणारी आहे. एका महिलेला या दहशतवाद्यांनी तिच्याच चिमुकल्या मुलाचं मांस शिजवून खाऊ घातलं आणि खाऊन झाल्यावर तिला ते मांस तिच्याच मुलाचं आहे हे सत्य सांगितलं. इराकच्या एका खासदारांनी या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची माहिती दिली.
इराकच्या महिला खासदार विआन दाखिल कुर्दी नेत्या आहेत. ISIS च्या छळाला बळी पडलेल्या कुर्दी महिला आणि तरुणींसाठी त्या काम करतात. इजिप्तची एक वृत्तवाहिनी 'एक्स्ट्रा न्यूज' वर विआन यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भयानक घटना सांगितली. मिडल इस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूनने या मुलाखतीचा अनुवाद केला. ISIS च्या तावडीतून विआन यांनी सोडवलेल्या काही महिलांच्या हृदयद्रावक कहाण्या त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या. त्यात या मातेची कहाणी होती. या महिलेल्या एका तळघरात डांबून ठेवलं होतं. तीन दिवस ती उपाशी होती. त्यानंतर काही अतिरेक्यांनी तिला भात आणि मांस असं जेवण आणून दिलं. उपाशी महिलेनं लगेचच हे जेवण खाल्लं. जेव्हा तिने सगळं जेवण संपवलं तेव्हा अतिरेक्यांनी तिला सांगितलं की तुझ्या ज्या एक वर्षाच्या मुलाला आम्ही तुझ्यापासून हिरावून घेतलं होतं त्याचंच मांस तुला शिजवून दिलं होतं!ठाणे - पावसाळा सुरू होण्याआधीच स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. शहरात मंगळवारपर्यंत स्वाइन फ्लूचे १३५ रुग्ण आढळले असून त्यात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचारांसाठी भरती होणाऱ्या रुग्णांना काही हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात इतर रुग्णांबरोबर एकत्र ठेवल्यानेच स्वाइनचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना केल्या आहेत. सर्व रुग्णालयांची गुरूवारी पाहणी होणार असून त्यासाठी दिल्लीचे पथक ठाण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

पुणे, मुंबईनंतर आता ठाण्यात स्वाइन फ्लूच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने याची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आणि कोणत्या प्रकारची खबरदारी शहरातील हॉस्पिटल्सने घ्यायच्या आहेत, यासंदर्भात बुधवारी एका कार्यशाळेचे आयोजन ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात केले होते. या कार्यशाळेमध्ये शहरातील सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत पुणे आणि मुंबईसारखी शहरे बाधित होती. मात्र, आता ठाण्यातही स्वाइनच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. यासाठी ठाणे महापालिकेने अ‍ॅक्शन प्लान तयार केला असून या रोगाला कशा प्रकारे प्रतिबंध करायचा, यासाठी ठाण्यातील डॉक्टरांना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. स्वाइनच्या रु ग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये काय उपाय करण्यात येत आहेत,याची विचारणा केल्यानंतर सर्व रु ग्णांना एकत्र एसी रूममध्ये ठेवण्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली. त्यामुळे आता अशा सर्व रु ग्णांची पाहणी करण्यात येणार असून स्वाइनच्या रु ग्णांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याच्या महत्त्वाच्या सूचना डॉ. केंद्रे यांनी यावेळी केल्या.

नवी मुंबई - जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता, त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. केदार गिरी (५८), असे कारवाई करण्यात आलेल्या सरकारी सहायक अभियोक्त्याचे नाव आहे. त्यांनी रबाळे येथील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या तरुणाच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. जामिनाच्या अर्जावर लवकर निकाल लागावा, याकरिता कोणताही अडथळा नको असल्यास गिरी यांनी लाच मागितली होती. यामुळे अटकेत असलेल्या तरुणाच्या नातेवाइकांनी यासंबंधी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी येथील वाशी कोर्टात उपअधीक्षक भागवत सोनवणे, निरीक्षक धनाजी जळक यांच्या पथकाने सापळा रचला होता. या वेळी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना केदार गिरी यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई - तरुणवर्गातील सेल्फीची हौस अनेकदा प्राणघातक ठरत असल्याच्या घटना उजेडात आल्यानंतरही याचे गांभीर्य तरुण-तरुणींना उमगले नसल्याचे बुधवारी आणखी एका घटनेतून समोर आले. मरिन ड्राइव्ह येथे समुद्राला भरती असताना कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही काळ या परिसरातील कठडय़ावर चढण्यास मज्जाव केला होता. परंतु, तरीही समुद्राच्या भरतीचा आनंद लुटण्याचा तरुणाईचा हट्टाग्रह कायम होता.

चुनाभट्टी येथे राहणारी प्रीती भिसे गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी दुपारी ती मैत्रिणींसोबत मरिन लाइन्सला समुद्रकिनारी फिरायला आली होती. दुपारी तीनच्या सुमारास कठडय़ावर उभी राहून सेल्फी काढत असतानाोोल जाऊन ती समुद्रात पडली. समुद्राला भरती असल्याने तिच्या मैत्रिणींना व मरिन लाइन्सला फिरण्यास आलेल्या पर्यटकांना तिला वाचविताही आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. परंतु सततच्या पावसामुळे त्यात अडथळे येत होते. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तिचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. आजूबाजूचे भान न बाळगता सेल्फी काढण्यात गुंतून जाणे कसे जिवावर बेतू शकते याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा या घटनेने आले आहे. २०१६च्या जानेवारी महिन्यात वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डच्या किनाऱ्यावर तरन्नुम नामक १९ वर्षीय तरुणीचा मैत्रिणीसोबत सेल्फी घेताना पाण्यात पडून मृत्यू झाला होता. या मुलीला वाचविण्याकरिता समुद्रात उडी मारणाऱ्या रमेश वाळुंज या तरुणालाही या दुर्घटनेत जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलिसांनी सेल्फी घेणाऱ्या उत्साहींना इशारा देणारे फलक समुद्रकिनारे, टेकडय़ा, किल्ले अशा ठिकाणी लावण्यास सुरुवात केली. मात्र हे इशारे धुडकावून सेल्फीचा खुळा नाद आजही अनेकांच्या जिवावर बेतत आहे.भाईंदर - पहिल्याच पावसात मिरा-भाईंदर शहर जलमय झाले. तळमजल्यावर असलेली दुकाने, घरांमध्ये पाणी जाऊन घरातील वस्तू खराब झाल्या. यामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी मिरा-भाईंदर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे पहिल्याच पावसात मिरा-भाईंदरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नालेसफाई तसेच नवीन नाले बांधण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. भूमिगत नाले व एकात्मिक नाले योजनेसाठी पालिकेला सरकारडून कोट्यवधी रुपये अनुदान मिळाले; परंतु हे एकही काम व्यवस्थित झालेले नसून, निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने यानिमित्ताने केला आहे.नवी मुंबई - पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करोडो रुपयांची तरतूद असतानाही योग्य कामांवर खर्च केला जात नसून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये उमटले. तळवलीमधील एका महिलेला जुळी मुले झाली. मुलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एनआयसीयू युनिटमध्ये हलविणे आवश्यक होते; पण पालिकेच्या रुग्णालयातील युनिट बंद असल्याने नाईलाजाने मुलांना पीकेसी रुग्णालयात भरती करावे लागले. चार दिवसांनी मुलांचा मृत्यू झाला. सर्वसाधारणसभा व स्थायी समितीने आरोग्य विभागासाठीच्या खर्चामध्ये कधीच हात आखडता घेतलेला नाही. यानंतरही एनआयसीयू युनिट सक्षम का करण्यात येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नामदेव भगत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतले. चौथ्या मजल्यावर डॉक्टरांमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे. एकमेकांविरोधात कटकारस्थान करण्यामध्ये अधिकारी व्यस्त असून, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गटबाजी सोडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे - शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला व मुख्यमंत्र्यांकडे त्यांना परत बोलावण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेदरात अचानक वाढ केल्याबाबत तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौरांनी मुंढे यांना बुधवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याशी चर्चा करून ही वेळ ठरवली होती व तसे सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. मात्र, मुंढे या बैठकीला आलेच नाहीत. त्यांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले. आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही, असा निरोप पाठविला. त्यामुळे महापौर टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. ‘ज्यांना कसलाही अधिकारी नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही’ असे त्यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांची यामुळे धावपळ उडाली; मात्र त्यांच्याशीही मुंढे यांचा संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मात्र महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका निश्चित केली व मुंढे यांचा निषेध करण्याचे ठरले. महापौर टिळक यांनी सांगितले, की मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी ४० लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे ६० टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नाही, असे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांकडे भाजपानेच मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी केली होती, असे लक्षात आणून दिले असता महापौरांनी ‘ते चांगले काम करतील अशी आशा होती,’ असे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या हटवादीपणामुळे ते कितीही चांगले काम करीत असतील तरीही त्यांचा उपयोग नाही, असे त्या म्हणाल्या. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच त्यांना पत्र सविस्तर पत्र लिहिणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.

पुणे - भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ३४व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर बुधवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुलांच्या गटात उत्कर्षने ३४.३० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये वेदीकाने ३६.४९ सेकंद वेळेसह बाजी मारली. कर्नाटकच्या समारा चाको व महाराष्ट्राच्या अपेक्षा यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात संजितीने १ मिनिट ०७.७७ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राचीच पलक धामी (१.८.८२) रौप्यपदकाची मानकरी ठरली.२०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात तामिळनाडूच्या शक्ती बी हिने २ मिनिटे १९.१५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या आन्या वालाने २.२०.८८ मिनिटे तर महाराष्ट्राच्याच अपेक्षा एफ हीने २.२१.५४ मिनिटांसह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.४५० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजिती सहा, अपेक्षा फर्नांडीस, पलक धामी, वेदिक अमिन या संघाने १.५९.४० सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले तर मुलांच्या गटात उत्कर्ष गोर, आरमान जेठा, विवान ठाकूर, रिषभ दास या महाराष्ट्राच्या संघा २.०९.५५ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी, महाराष्ट्र राज्य अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया, अध्यक्ष अभय दाढे, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे उपस्थित होते.

नवी दिल्ली - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ''स्वच्छ भारत अभियान'' राबवत आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेटमधील एक मंत्री स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासताना दिसत आहेत.
हे मंत्री दुसरे-तिसरे कुणी नसून केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह आहेत. केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ते उघड्यावर लघवी करत आहेत. 
कृषि मंत्र्यांचा हे व्हायरल होणारे फोटो त्यांच्या चिंता वाढवणा-या आहेत. दरम्यान राधामोहन सिंह यांचे हे फोटो कुठले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत. 
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा जोरदार प्रचार व प्रसार सुरू आहे. स्वतः पंतप्रधान मोदी अनेक गावं हगणदारीमुक्त झाल्यानं त्यांचे कौतुक करत आहेत. देशवासियांना स्वच्छता राखण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. देशातील प्रत्येक गावात शौचायलं बांधण्यात येत आहेत. तर दुसरीकडे राधा मोहन सिंह यांचे उघड्यावर लघवी करणारे फोटो व्हायरल झाल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका तर होत आहेच, मात्र त्यांची थट्टादेखील केली जात आहे. नगर - राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मीराकुमार यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. असाच बळीचा बकरा काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊन केला होता. निवडून येणार नाही हे माहीत असूनही मीराकुमार यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, असे आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले.भाजपने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करताना, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांचा वारंवार ते दलित असल्याचा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता आठवले यांनी काँग्रेसलाच टोला लगावला. आठवले म्हणाले, हा काँग्रेसचा प्रचार आहे. इतकी वर्षे सत्तेवर राहून काँग्रेसनेच जातीयवाद रुजवला आहे. त्यातूनच वाद निर्माण होत आहेत. कोविंद यांची उमेदवारी हा भाजपचा क्रांतिकारी निर्णय आहे. भाजप हा पूर्वीचा जनसंघाचा नाही तर बहुजनांचा पक्ष झाला आहे. परंतु तरीही भाजपने वारंवार असा उल्लेख करायला नकोच होता. सध्या मराठे, जाट, पटेल, ब्राह्मण असे सारेच आरक्षण मागत आहेत, कोणाचे आरक्षण काढून ते आम्हाला द्या, असे ते म्हणत नाहीत, ही सकारात्मक बाजू आहे. मराठय़ांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कोर्टात टिकेल असे आपल्याला वाटत नाही. मराठय़ांना आरक्षण द्या, यासाठी सर्वात प्रथम पाठिंबा आपणच दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ामुळे ५० टक्क्यांवर आरक्षण देण्यास बंधन आले आहे, त्यामुळे संसदेने कायदा करून २५ टक्के आरक्षण वाढवावे, त्यातील ९ टक्के आरक्षण ज्या जाती आरक्षण मागत आहेत, त्यांना त्यातून द्यावे, सर्वच पक्ष त्यास पाठिंबा देतील, ज्यांचे उत्पन्न १० लाखांच्या आत आहे, त्यांनाही आर्थिक निकषावर शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण द्यावे, त्यातून कोणत्याच समाजात आरक्षणाचा वाद राहणार नाही, असा नवाच प्रस्ताव आठवले यांनी सादर केला.

सेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सध्या कोणत्याच आमदारांना निवडणुका नको आहेत. शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घ्यावे, परंतु पाठिंबा काढू नये आणि जरी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, असे सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ‘आमचे नेहमीच वाहतात ऐक्याचे वारे, पण येतात ऐक्याचे वारे, राहतात फक्त नारे’ अशी कविता मंत्री आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याच्या प्रश्नावर सादर केली.

ठाणे - येथील रेशनिंग विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रकाश सीताराम परदेशी (५६) यांनी बुधवारी सकाळी कार्यालयातच आपल्या केबीनमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने रेशनिंग विभागात खळबळ उडाली असून परदेशी यांनी चाकूने हाताची नसही कापून घेण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येपूर्वी परदेशी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यावरून प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली
आहे. परदेशी कांदिवलीत चारकोप येथील दीप गुंजन सोसायटीत राहत होते. पहिली पत्नी त्यांच्यापासून वेगळी राहत असून त्यांचा एक मुलगा पायलट आहे, तर दुसरा इंजिनीअर आहे. मंगळवारी कामावर न आलेले परदेशी बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास तीन पेट्रोल पंप परिसरातील कार्यालयात हजर झाले. त्यांनी कुणीही मला डिस्टर्ब करू नका असे कर्मचा‍ऱ्यांना बजावले होते. मात्र बराच वेळ त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने तसेच केबिन आतून बंद असल्याने कर्मचा‍ऱ्यांनी केबिनच्या एका बाजूने आत पाहिल्यानंतर परदेशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. कर्मचा‍ऱ्यांनी तातडीने केबिन उघडली आणि नौपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परदेशींचा मृतदेह ताब्यात घेत सिव्हिल रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुंबई - सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी राजकारण तापू लागले आहे. पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी जाणीवपूर्वक अपुरा कालावधी देण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मदत करण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची भेट घेत निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे राबविण्याची मागणी केली. निवडणुकीतील मतदार नोंदणीसाठी अवघा एक महिनाचा कालावधी देण्यात आला असून हा अवधी वाढवून देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावर, ही सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागासमोर मांडण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थीचे अध्यक्ष अमोल मातेले यांनी दिली.महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ रोजी संमत झाला. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी २७ मे २०१७ चा दिवस उजाडावा लागला. त्यानंतर १ जून ते ३० जून दरम्यान विद्यापीठातील सिनेट निवडणुकांसाठी मतदार नोंदणीचा कालावधी देण्यात आला. या निवडणुका २०१५ साली होणे अपेक्षित होते मात्र नव्या विद्यापीठ कायदा येणार असल्याने त्यांना दोन वर्ष विलंब झाला.

विद्यापीठ निवडणुकांच्या मतदार नोंदणीसाठी दिलेला अवधी अपुरा असून ही मुदत एक महिन्यांनी वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. मुंबई विद्यापीठाने मतदार नोंदणीबाबत कोणतीच जागरुकता मोहिम राबविली नाही.मुंबई विद्यापीठाचे पदवीधर या निवडणुकीत सहभागी होवू शकतात. मात्र त्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेने सिनेटचे फॉर्म भरायचे आहेत. त्याची एक प्रत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये जमा करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील पदवीधर अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत. भाजपा सरकारने अभाविपला मदत करण्याच्या हेतून हा डाव रचल्याचा आरोपही मातेले यांनी केला.

मुंबई - कर्नाटक राज्यातून केवळ घरफोडी करण्यासाठी धारावीत येणाऱ्या एका सराईत आरोपीला धारावी पोलिसांनी घरफोडी करताना रंगेहाथ अटक केली. रियाज शेख (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. मूळचा कर्नाटक येथील तुमसर गावातील हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून घरफोडी करत आहे. कर्नाटकमध्ये काही वर्षे घरफोडी केल्यानंतर तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. त्यामुळे त्याने वर्षभरापासून मुंबईत घरफोडी करायला सुरुवात केली होती. घरफोडी केल्यानंतर पुन्हा हा आरोपी त्याच्या मूळ गावी परतत होता. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी हा आरोपी धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील संतोष वाइन्स शॉपजवळ उभा होता. याच वेळी धारावी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना या आरोपीबाबत संशय वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ २५ हजारांची रोकड व दारूच्या अनेक बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वीदेखील त्यानेच वाइन शॉपमध्ये चोरी करत एक लाखाची रोकड लंपास केली होती.

मुंबई - तांत्रिक कारणामुळं मुंबई मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या सध्या केवळ अंधेरीपर्यंतच धावत आहेत. अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गाड्या पुढं जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमुळं मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखद केला आहे. त्यामुळं अल्पावधीतच मेट्रो प्रवासाला लोकांनी पसंती दिली आहे. दिवसभरात लाखो प्रवासी मेट्रोनं प्रवास करतात. सकाळच्या वेळेस तर मेट्रोमध्ये मुंबईतील लोकलइतकीच गर्दी असते. अशा महत्त्वाच्या वेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळं कार्यालयं गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. अंधेरी ते वर्सोवा दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम घाटकोपर-अंधेरी सेवेवरही झाला आहे. या स्थानकांदरम्यानची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू आहे.

रत्नागिरी - कोकणवासीयांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण या पावसाळय़ानंतर फास्ट ट्रॅकवर जाईल, असे गुलाबी चित्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवडय़ात झालेल्या जाहीर कार्यक्रमात रंगवले असले तरी या कामामध्ये सध्या असलेले स्पीडब्रेकर लक्षात घेता चौपदरीकरणाचे राजकारणच जास्त केले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे या चौपदरीकरणाच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कामाचा भूमिपूजन समारंभ गेल्या आठवडय़ात थाटात पार पडला. गडकरी यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि राज्याच्या सत्तेमध्ये राहूनही प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका नेटाने बजावणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा सध्याच्या राजकारणातील स्टार मंडळी या प्रसंगी उपस्थित होती. या कामाच्या रत्नागिरी विभागाचा शुभारंभ गेल्या वर्षी २९ जानेवारी रोजी रत्नागिरीजवळ हातखंबा येथे पार पडला. त्या वेळी प्रभू आणि गीते वगळता उरलेली नेतेमंडळी उपस्थित होती. त्यापूर्वी ऑगस्ट २०१५मध्ये या चौपदरीकरणाच्या कामातील पुलांच्या कामाचा स्वतंत्र शुभारंभ कार्यक्रम गडकरी यांच्याच प्रमुख उपस्थितीत झाला होता आणि त्याही आधी २०११ मध्ये केंद्रात व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना रायगड जिल्हय़ातील या कामाचा शुभारंभ तत्कालीन केंद्रीय व राज्य पातळीवरील मंत्र्यांच्या हस्ते साजरा झाला होता.थोडक्यात, गेल्या सहा वर्षांत ३ भूमिपूजने आणि १ पुलांच्या कामाचा शुभारंभ असा कार्यक्रमांचा धडाका सर्वपक्षीय नेतेमंडळींनी लावून दिला आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या पावसाळय़ात महाडच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेमध्ये ३७ जणांचा बळी गेल्यानंतर १६५ दिवसांत पर्यायी पूल बांधल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा सोहळाही नुकताच पार पडला. पण दुसरीकडे कामांची गती आणि स्थिती अशी आहे की, २०१९च्या लोकसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून डिसेंबर २०१८ पर्यंत संपूर्ण योजना मार्गी लावण्याची ग्वाही गडकरी देत असले तरी ते प्रत्यक्षात येणे म्हणजे एक चमत्कारच ठरेल. इंदापूर ते झाराप या एकूण ३६६ किलोमीटर लांबीच्या या योजनेपैकी रायगड जिल्हय़ातील काम शासन आणि ठेकेदार यांच्यातील वादात दीर्घकाळ रखडलेले आहे. रत्नागिरी जिल्हय़ात भू-संपादनाची प्रक्रियाच संथ गतीने चालू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातही झाराप ते पत्रादेवी हा १९ किलोमीटरचा मार्ग वगळता अजून कामाला प्रारंभही झालेला नाही. पावसाळय़ाचे चार महिने हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सत्कारणी लावले तरी नंतर फक्त एक वर्ष हातात राहणार आहे आणि रायगड व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पूर्ण झालेले काम वगळले तरी उरलेल्या सुमारे ३०० किलोमीटरचे चौपदरीकरण इतक्या कमी काळात होणे हा विक्रमच ठरेल.

मुंबई - १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ‘केस बी’ मध्ये विशेष न्यायालयाने मुस्तफा डोसा व फिरोज खानला दोषी ठरवले आहे. साखळी बॉम्बस्फोटासाठी तयार केलेल्या चार पथकांपैकी एका पथकाचा मुस्तफा डोसा म्होरक्या असल्याचा सीबीआयचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. तसेच फिरोज खाननेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याचाच आधार घेत सीबीआयने या दोघांचीही बॉम्बस्फोटातील भूमिका याच प्रकरणी फाशी सुनावलेल्या याकूब मेमन इतकीच महत्त्वाची असल्याचा दावा विशेष न्यायालयात केला.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात शनिवारी राज्यात महाकर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. परंतु, त्यानंतरही काही शेतकरी संघटना व सुकाणू समितीतील सदस्य या कर्जमाफीच्या निर्णयावर अजूनही नाराज असून ही कर्जमाफी पुरेसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीवर गंभीर आरोप केला आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप केला आहे. बुलडाण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. त्याचा फायदा ८९ लाख शेतकऱ्यांना होणार असून सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. परंतु, सुकाणू समिती सरसकट कर्जमाफीची मागणी करत आणखी आक्रमक झाली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यास पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी समितीचे सदस्य डॉ. अजित नवले, आमदार बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी केली आहे.धुळे - राजकीय कुरघोडीचा केंद्रबिंदू ठरलेली बहुचर्चित पांझरा चौपाटी उठविण्यात अखेर विरोधकांची सरशी झाली. अनेक वर्षांपासून ही चौपाटी बहुतांश धुळेकरांच्या आत्मीयता आणि जिव्हाळ्याचे ठिकाण बनली होती. सरकारी व आरक्षित जागेवर ती उभारली गेल्याने खुद्द गोटे व शहरवासीयांना ती उठविली जात असतानाचे दृश्य पाहावयास लागले. धुळे शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे आणि महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी यांच्या वादात चौपाटी राजकीय बळी ठरली.या घडामोडी गोटे आणि राष्ट्रवादीतील वाद पुढील काळात आणखी तीव्र होणार असल्याच्या निदर्शक आहेत.स्व.अण्णासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मारकासह बगीचा आणि वाहन तळासाठी येथील पांझरा नदीकाठची जागा शासनाने आरक्षित ठेवलेली आहे. आ.गोटे यांनी पांझरा नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधून प्रशस्त असा डांबरी रस्ता बनविला. रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे, पदपथ, वृक्ष लागवड, रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूने डेरेदार वृक्षांची लागवड करून आकारास आणलेल्या छोटेखानी बागेत विशिष्ट बनावटीच्या प्राण्यांची आकृती, सुशोभीकरण अशी विविध कामे केली. ओटय़ावर खाद्यपदार्थ व्यावसायिकांना जागा देऊन तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बैठकीसाठी विशिष्ट आकाराचे टेबल आणि बाक बसवून देण्यात आले होते. या लांब आणि रुंद अशा ओटय़ावर सुरू झालेला खाद्यपदार्थाचा व्यवसाय सात-आठ वर्षांत कमालीचा वाढीस लागला. रोज सायंकाळी पाच वाजेनंतर रात्री साधारणपणे दहा वाजेपर्यंत पांझरा चौपाटीवर कुटुंबीयांसह येणाऱ्यांची मोठी वर्दळ असे. शहरवासीयांचे एक नाते तिच्याशी जोडले गेले. न्यायालय आणि प्रशासनाशी झालेल्या लढय़ात अनेकदा पांझरा चौपाटी शाबूत राहिली. पण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तिला अभय मिळाले नाही. येथील सगळ्याच वस्तू हलविण्याचे आदेश झाल्याने चौपाटीचे निर्मूलन होत असल्याचे धुळेकरांना पाहावे लागले.

सरकारने आरक्षित केलेल्या जागेवर चौपाटी बांधण्यात आली. हे वास्तव असले तरी तिचे सगळेच काम एका रात्रीतून उभे राहिलेले नाही. संरक्षक दगडी भिंत, डांबरी रस्ता आणि इतर कामांसाठी रात्रंदिवस यंत्रणा सक्रिय राहिली. एवढेच नव्हे तर, पांझरा चौपाटी आणि स्व. उत्तमराव पाटील उद्यानाचे उदघाटन, अनावरण व लोकार्पण सोहळाही झाला. या दरम्यान कोणी त्यावर आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. पांझरा चौपाटीचे नाव अल्पावधीत सर्वदूर पोहोचले आणि आ. गोटे यांच्या विरोधकांनी बहुचर्चित चौपाटीला शासन, न्यायालयीन पातळीवर ग्रहण कसे लागेल, याची खटपट सुरू केली. काहीही करून चौपाटी जमीनदोस्त करायची, यासाठी जणू स्पर्धा सुरू झाली. सरकारदरबारी चौपाटी बेकायदेशीर आहे याचे दाखले दिले गेले. प्रभावी युक्तिवाद करत चौपाटी हटाव मोहीम सुरू झाली. दुसरीकडे आ.गोटे समर्थकांसह काही शहरवासीयांनी ‘चौपाटी बचाव’चा नारा दिला. गोटे हे विरोधकांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. पण विरोधकांना चौपाटी काढून टाकण्यात अधिक स्वारस्य असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अखेर चौपाटीवरील स्टॉल स्वत:हून काढून घेण्यासाठी लोकसंग्रामच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. चौपाटी हटविल्यानंतर या ठिकाणी महापालिकेने लगेचच काम हाती घेतले असेही झाले नाही. आठवडाभरात या परिसरात कचरा साठल्याचे दिसत आहे. शहरवासीयांच्या गर्दीने फुलणारी ही जागा आता मद्यपींचा अड्डा बनते की काय, अशी धास्ती व्यक्त होत आहे. दुसरीकडे बेरोजगार झालेल्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही उभा ठाकला आहे.

बीजिंग - सिक्कीमच्या डोका ला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) जवानांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याच्या भारताच्या म्हणण्याचा केवळ इन्कार करून न थांबता चीनने उलट भारतानेच त्यांच्या प्रदेशात बेकायदा शिरकाव केल्याचा आरोप केला असून त्याबद्दल राजनैतिक पातळीवर औपचारिक निषेधही नोंदविला आहे.सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांमध्ये हद्दवादाच्या तिढ्यातून निर्माण झालेल्या तणावामुळेच आपण मानसरोवर यात्रेकरूंना कदापि नथु ला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही, असा इशाराही चीनने केला आहे. जूनच्या सुरुवातीस ‘पीएलए’चे सैनिक डोका ला भागात सीमा ओलांडून भारतात आले व त्यांची भारतीय सैनिकांशी धक्काबुक्कीही झाली. चिनी सैनिकांनी भारताचे दोन बंकरही नष्ट केले, असे वृत्त सूत्रांनी सोमवारी दिले होते. यावर चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतीय सैनिकांनीच निर्धारित सीमा ओलांडून आमच्या प्रदेशात घुसखोरी केली, असा उलटा आरोप बीजिंगमध्ये केला.

श्रीनगर - काश्मीरमधील कट्टर फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयासहीत तीन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेनं बुधवारी (28 जून) ताब्यात घेतले आहे. अयाज अकबर, अलताफ शाह आणि मेहराज उद्दीन कलवल या तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेनं ताब्यात घेतले आहे.
हे तिघंही हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते आहेत. अलताफ शाह हा गिलानी यांचा जावई आहे. या महिन्यात एनआयएनं या सर्व हुर्रियत नेत्यांच्या घरावर छापा मारला होता. या तिघांनाही बुधवारी (28 जून) नवी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

डहाणू - समुद्रकिनाऱ्यावरील विविध गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून ६ जखमी कासवे आढळली. त्यामध्ये रिडले आॅलिव्ह, ग्रीन सी टर्टलचा समावेश आहे. या कासवांवर पारनाका येथील वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रांत उपचार सुरू आहेत. वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणिमित्र संघटनेने डहाणू येथून एक ग्रीन सी टर्टल आणि डहाणू गाव, चिंचणी, नरपड, बोर्डी तसेच पालघर वडराई येथून प्रत्येकी एक रिडले आॅलिव्ह जातीचे जखमी कासव दाखल केल्याची माहिती संस्थापक धवल कन्सारा यांनी दिली.

मुंबई - मुंबईच्या जमिनीला सोन्याचे भाव असल्याने मुंबईतील पाणथळ जागेवर भराव घालून, खारफुटींची कत्तल करून बांधकाम केले जाते. चारकोप येथील साईधाम नगर येथे खारफुटींची कत्तल करून नवी घरे उभारली जातात. ही जमीन अधिसूचित असतानाही या ठिकाणी खारफुटींची कत्तल होत आहे. याविरोधात मेमध्ये अवैध बांधकामावर कारवाई केल्यानंतर पुन्हा एकदा तिथे झोपड्या उभरणे सुरू झाले आहे. मात्र, या खारफुटी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्तीवर झोपडपट्टी गुंडांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे पर्यावरणसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे.
अन्याय निवारण, भ्रष्टाचार निर्मूलन, पर्यावरण संरक्षण संस्था येथील खारफुटीच्या रक्षणासाठी लढत आहे. साईधाम नगर येथे सुमारे दीड हेक्टर खारफुटीच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात २४ मे, १० जून रोजी कारवाई करण्यात आली होती. शनिवारी २४ जून रोजी या कार्यकर्तीने कारवाईनंतर पुन्हा सुरू झालेल्या गाळे बांधकामाविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर झोपडपट्टीतील गुंडांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास तिच्या घराजवळ जाऊन तिचे फोटो काढायला सुरुवात केली. त्यांनी तिला घराबाहेर काढून सळईने मारहाण केली. या मारहाणीनंतर तिच्यावर बलात्कारही केला. या घटनेनंतर या कार्यकर्तीची तक्रार पोलिसांनी ताबडतोब नोंदवून घेतली नाही, असा आरोप अन्याय निवारण, भ्रष्टाचार निर्मूलन, पर्यावरण संरक्षण संस्थेने केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत या कार्यकर्तीला रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून घेतला.

खारफुटीची कत्तल करणाऱ्यांची दडपशाही किती वाढली आहे हे लक्षात येत असून पोलिस आणि वनाधिकारीही याला पाठीशी घालत असल्याचे या संस्थेच्या राज्य अध्यक्ष अर्चना शिंदे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात अमृता फडणवीस यांनी खारफुटी प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अशी घटना घडल्याने मुंबईच्या पर्यावरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वसई - गेली १९ वर्षे रखडलेल्या कामण-बापाणे रस्त्याचे काम सुुरु करावे या मागणी या परिसरातील गावकरी कामण-बापाणे रस्ता कृती समितीच्यावतीने बुधवारी रास्ता रोको करणार आहेत.कामण परिसरातील गावांसाठी या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी सिडकोच्या विकास आराखड्यात डीपी रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर १९९८ साली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून महत्वपूर्ण रस्त्याची जागा निधीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मात्र त्याने त्याचे काम सुरु करण्यास दोन-तीन वर्षांचा कालावधी लावला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर जागा आलेल्या या विभागाने रस्त्याच्या परिसरातील अतिक्रमणे दूर केली. पण, रस्त्याची जागा संपादित करताना अधिकाऱ्यांनी अनेक चुका केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालीत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा फार्स काही वर्षे करण्यात आला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. उलट अतिक्रमणे वाढत गेली आणि रस्त्याचे काम १९ वर्षे झाली तरी सुरु होऊ शकलेले नाही.महापालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित असून आता महापालिकेने रस्त्याचे काम करावे अशी मागणी या कृती समितीने केली आहे. ही मागणी गेल्या चार महिन्यांपासून करण्यात येत असली तरी तिच्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने शेवटी समितीला आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला.

तलासरी - मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविण्यात आलेली सडक तलासरीत पडलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेली, दोन महिन्या पूर्वीच बनविण्यात आलेला वडवली सवणे कवाडा रस्ता तात्काळ उखडला या बाबत दैनिक लोकमत च्या दि.२१ जूनच्या अंकात मुख्यमंत्री सडक उखडली या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, तलासरी परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने ही उखडलेली मुख्यमंत्री सडक पूर्णत: वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे , तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून हा रस्ता बनविण्यात आला होता.

वसई - वाहतूक पोलिसांच्या मागणीवरून वसई विरार महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन कोटी खर्च करून सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालक नियम धुडकावत असल्याने सिग्नल यंत्रणा फेल गेली आहे. वाहतूक विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी वाहतूक पोलिस बेकायदा वाहनांकडून आर्थिक मलिदा मिळवण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात सध्या वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली आहे. यावर उपाय म्हणून शहरात ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी वाहतूक पोलिसांनी वसई विरार महापालिकेकडे केली होती. त्यावर सर्व्हे करून महापालिकेने सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सिग्नल सुरु असतात. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने तिला कुणीही जुमानत नाही. सिग्नल यंत्रणा व्यवस्थितपणे चालवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अवघे ५० संख्याबळ असलेल्या वाहतूक शाखेने ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा मागताना कोणते नियोजन केले होते असा प्रश्न आता महापालिकेतील अधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दुसरीकडे, नव्याने कार्यभार हाती घेतलेले पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकतर मनुष्यबळ वाढवावे, अशी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. त्याचवेळी नवीन महिला पोलिसांना वाहतूक विभागात पाठवून त्यांच्यावर सिग्नलची जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न पाटील करीत आहेत. दरम्यान, वसई वाहतूक शाखेकडे अवघे ५० पोलीस बळ आहे. त्यापैकी दररोज किमान दहा-बारा कर्मचारी रजा, कार्यालयीन कामे, न्यायालयीन कामे आदी कारणांमुळे कमी असतात. त्यामुळे अवघ्या तीस-पत्तीस पोलिसांवर सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहतूक कोंडीचा बोजा पडला आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील सहा स्केटींगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे झालेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत सलग ५१ तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. भार्इंदर येथील राई गावात राहणारा अमन राऊत व भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्टमध्ये राहणारा प्रथम ओस्तवाल हे दोघे मीरा रोड येथील आरबीके या खाजगी शाळेत आठवीत शिकतात. तर मीरा रोड येथील गोल्डन नेस्टमध्ये राहणारे कल्पेश सोनी, क्रिश मायावंशी व सावित बंगेरा हे रामरत्न विद्यामंदिर या खाजगी शाळेत अनुक्रमे पाचवी, सहावी व तिसऱ्या इयत्तेत श्कित आहेत. याच परिसरात राहणारा विजय चापवाले हा मीरा रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल या शाळेत सहावीत शिकायला आहे. हे सर्व प्रशिक्षक दयानंद शेट्टी व क्षितीज सिंह यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. सर्वांमध्ये अनेक तास सलग स्केटिंगची क्षमता असल्याने प्रशिक्षकांनी त्यांना बेळगाव येथील स्केटिंगपटू ज्योती चिंदक यांच्यावतीने झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभाग घेण्याचा सल्ला दिला. या विद्यार्थ्यांनी सलग ५१ तास स्केटींग केले. या जागतिक विक्रमामुळे त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली.

नवी मुंबई - कोपरी सेक्टर-२६ येथील उड्डाणपुलाजवळ एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या एका ट्रकला सोमवारी रात्री आग लागली. ट्रकमध्ये अंदाजे ३०० सिलिंडर होते. अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या आगीत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाला आहे.खोपोलीवरून शहरातील गॅस एजन्सीला, खोपोली येथून भरलेल्या सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सदर ट्रक खोपोलीवरून एपीजीचे भरलेले सिलिंडर घेऊन कोपरीमार्गे वाशीकडे चालला होता. त्यादरम्यान, कोपरी उड्डाणपुलाजवळ ट्रकला अचानक आग लागली. ड्रायव्हरच्या केबिनने पेट घेतल्याने चालकाने गाडी थांबवून क्लीनरसह खाली उडी मारली. या दोघांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आणखी भडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. या ट्रकमध्ये ३00 भरलेले सिलिंडर होते. आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, जवळच लोकवस्ती आहे. एखाद्या सिलिंडरने पेट घेतला असता, तर मोठा स्फोट झाला असता; परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्यापि समजले नसून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नवी मुंबई - महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरोलीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे.
शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या पक्षपातीपणाचे आरोप मीरा कुमार यांनी आज फेटाळून लावले. त्यासाठी त्यांनी स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा पुरावाच दिला. मीरा कुमार ह्या राष्ट्रपतिपदासाठी योग्य नसून लोकसभाध्यक्ष असताना त्यांचं वर्तन पक्षपाती होतं, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला होता. आपल्या आरोपाला आधार म्हणून सुषमा स्वराज यांनी एक व्हिडिओदेखील ट्विट केला होता. मीरा कुमार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ संपल्यानंतर मला निरोप देताना तत्कालीन सदस्यांनी माझ्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. त्यावेळी कुणीही माझ्यावर पक्षपाताचा आरोप केला नव्हता, असं मीरा कुमार यांनी निदर्शनास आणलं. काँग्रेस पक्षानं तर सुषमा स्वराज या मीरा कुमार यांचं कौतुक करत असतानाचा एक व्हिडिओच ट्विट केला आहे.

नवी दिल्ली - ‘काश्मीरमधील आमच्या बांधवाचे रक्त ज्यांच्या हाताला लागले आहे, ते सर्व आमचे शत्रू आहेत,’ अशा शब्दात अल-कायदाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून इशारा दिला आहे. भारताचे लष्कर आणि हिंदू संघटनांच्या नेत्यांना ‘टार्गेट’ करण्याचे आमचे धोरण असेल, अशीही गरळ पत्रकांत ओकण्यात आली आहे.
भारतीय उपखंडातील मुजाहिदीनांसाठी अल-कायदाने नियमावली जाहीर केली असून, त्यामध्ये नेमके काय करावे आणि काय करू नये, यांची यादीच देण्यात आली आहे. ‘भारतीय लष्कराचे सर्व कर्मचारी हे आमचे ‘टार्गेट’ असतील. सीमेवर तैनात असोत किंवा कार्यालयांमध्ये. कामावर असो किंवा रजेवर. लष्करातील सर्व आमचे शत्रू आहेत. जवानांपेक्षा लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारण्याला आमचे प्राधान्य असेल. अधिकारी जेवढा वरिष्ठ तेवढा त्याला मारण्याचे प्राधान्य अधिक. शरियतला विरोध करणारे सर्व जण आमचे शत्रू असतील,’ अशा सांगत अल-कायदाने खुमखुमी दाखवून दिली आहे.

कल्याण - अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथे झालेल्या हिंसक दंगलीनंतर या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सोमवारपासून तैनात केलेले ड्रोन सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे २४ तासांतच कोसळले. पोलिस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी ही माहिती दिली. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नौदलाच्या नावावर असलेल्या जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी २२ जून रोजी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांना मारहाण करत सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील १३५ आरोपींची ओळख पटली असून आजपर्यंत यातील ३२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या परिसरात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके गस्त घालत असल्यामुळे मंगळवारीही तणावपूर्ण शांतता होती. धरपकड होण्याच्या भीतीने अनेक आरोपी भूमिगत झाले आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी मदत व्हावी, तसेच या तणावपूर्ण परिस्थितीत पुन्हा आंदोलन होऊ नये, यासाठी या परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली. याच दरम्यान मुसळधार पावसाचा फटका या ड्रोनला बसला.

इस्लामाबाद - हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सल्लाउद्दीनला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सल्लाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं चुकीचं आहे. काश्मीरच्या नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्तानने मारल्या आहेत.
अमेरिकेच्या या कारवाई नंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वक्तव्य केले आहे. याच वेळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचंही समर्थन केलं आहे. पाकिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचे आणि आत्मनिर्णयाचे समर्थन केल्याने एखाद्याला दहशतवादी घोषित करणे अयोग्य असल्याचं पाकने म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यानच अमेरिकेने सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाल्याचं बोललं जातयं.
काश्मीरप्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यात सय्यद सलाउद्दीन अडथळा बनत आहे. तसंच त्याने भारतीय लष्कराचे स्मशान करण्याची धमकी दिली आहे. शिवाय सय्यद सलाउद्दीनची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

पुणे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पुण्यात किवळेफाटा हायवे येथे रस्त्याच्या मधोमध एक तवेरा गाडी उभीर होती. सुरुवातीला रस्त्यात गाडी उभे असल्याचे आठवले यांच्या गाडीच्या चालकाला दिसले नाही. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं स्वतःची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. 
मात्र, यावेळी आठवले यांच्या वाहनामागे असलेल्या पोलीस वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात रामदास आठवले यांच्या वाहनाचे नुकसान झाले मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. रामदास आठवलेदेखील सुखरूप आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे व सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हेदेखील होते. हे सर्वजण सुखरूप आहेत. 
पुण्यातली बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले तेथे निधाले होते. या अपघातानंतर त्यांनी कार्यक्रमास हजेरीदेखील लावली व त्यानंतर पुढे अहमदनगरकडे रवाना झाले.

नवी दिल्ली - जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसनं गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे, यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. 
हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती. यात युके आणि रशियातील ऑईल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधिक भारतीय सहाय्यक कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे. रॅन्समवेअरसारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशापद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहेत.मुंबई - मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इंद्राणीसह अन्य काही महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान मंजूळाला पोलिसांकडून होत असलेली मारहाण पाहून भितीने बरॅकमध्ये पळ काढल्याचा जबाब इंद्राणीने पोलिसांना दिला आहे.वॉर्डन मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडूनही अंतर्गत चौकशी सुरु आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात कैद आहे. मंजूळा शेट्येच्या हत्याप्रकरणात नागपाडा पोलिसांनी तिचाही जबाब नोंदवला आहे.सकाळी बरॅकमध्ये असताना अचानक जोराचा आवाज झाला. याच आवाजामुळे आम्ही सारे जण बाहेर आलो. तेव्हा मंजूळाला अमानूष मारहाण सुरू होती. ही मारहाण पाहून मी घाबरली. तसेच पोलिसांचे रौद्ररुप पाहून मी बरॅकमध्ये लपून बसल्याचे इंद्रायणीने पोलिसांना सांगितले.हत्याप्रकरणात तक्रारदार मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार इंद्राणीचा जबाबातील माहिती सारखीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंजूळाच्या हत्येप्रकरणी इंद्राणीला नागपाडा पोलीस साक्षीदार बनविणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे.याच कारागृहात रमेश कदम यांची बहिण वैशालीही आहे. मंजूळाच्या हत्येनंतर घडलेल्या दंगलीप्रकरणी इंद्राणीसह वैशाली आणि २९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या दंगलीमध्ये एकूण ७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन नागपाडा पोलीस ठाण्याचे आहेत. तर ४ कारागृहातील कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

मुंबई - एका व्यापाऱ्याच्या कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांना कांदिवलीच्या समतानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनोहरसिंग जोधा आणि नारायणसिंग राठोड अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास उशीर केल्यामुळे व्यापाऱ्याची मोठी फरफट झाली असून, वेळीच पोलिसांनी लक्ष घातले असते तर आधीच दोन्ही ठगांना बेड्या घालण्यात यश आले असते, असे सांगण्यात आले. काळाचौकीच्या महावीर हाईट्समध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याचे झवेरी बाजार येथे सोने-चांदीचे दुकान आहे. याच दुकानात मनोहरसिंग जोधा काम करत होता. काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याने जोधाला हैदराबादहून साडेसात किलोचे सोने आणण्यास पाठविले होते. त्यानुसार ३० मे २०१७ रोजी मनोहरसिंग हैदराबादहून मुंबईला साडेसात किलो सोने लक्झरी बसने घेऊन येत होता. त्यावेळी रात्री गुंगीचे औषध देऊन अनोळखी चोरट्यांनी सर्व सोने लंपास केल्याचा बनाव त्याने रचला. दागिने चोरीला गेल्याचे कळाल्यानंतर व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मनोहरने व्यापाऱ्याला आपण पुण्यात असल्याचे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्याने मनोहरशेजारी कोण बसले होते याची विचारणा करण्यासाठी मनोहरला कंडक्टरला फोन देण्यास सांगितले. मात्र, कंडक्टरने बस सध्या कांदिवलीत असल्याचे सांगताच, मनोहर खोटे बोलत असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले.
मनोहर मुंबईत आल्यानंतर व्यापारी त्याला घेऊन एल. टी. मार्ग पोल‌सि ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेला, मात्र हद्दीच्या वादातून पोलिसांनी व्यापाऱ्याची तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर व्यापाऱ्याने काळाचौकी पोल‌सि ठाण्यात तक्रार दाखल केली. तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पुढे हा गुन्हा अधिक तपासासाठी समतानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप यादव यांनी तपास करत बोरिवलीतून या मनोहर आणि नारायणसिंग यांना अटक केली. पोलिसांनी दोघांकडून १ किलो ९० लाख किंमतीचे सोने हस्तगत केले आहे.लखनऊ - रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यावर जे निकाल येतील ते सगळ्यांच्या समोर असतील पण मला खात्री आहे की देशाला एक चांगला राष्ट्रपती मिळेल, अशी प्रतिक्रिया मुलायम सिंह यांनी लखनऊमध्ये दिली आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळची निवडणूक ही पक्षांतर्गत राजकारणापेक्षा वेगळी असेल असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हे देशाबाहेरचे धर्म आहेत, अशा आशयाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी रामनाथ कोविंद यांनी केले होते. त्यामुळे कोविंद हे धार्मिक कट्टरता मानणारे नेते आहेत असा आरोप काँग्रेसने केला, तसेच त्यानंतर धर्मनिरपेक्ष उमेदवार मीरा कुमार यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवड केली. सध्याच्या घडीला काँग्रेससोबत १७ पक्ष आहेत. मात्र समाजवादी पार्टी आणि जनता दल युनायटेड यांनी रालोआसोबत जात कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. यामुळे राजद आणि जनता दल यांच्यातही वाद पेटला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र मुलायम सिंह यांनी कोविंद यांच्या नावाला पसंती दर्शविल्याने आता लालूप्रसाद यादव यांच्यासमोर मुलायम सिंह यांचे मन वळवण्याचेही आव्हान आहे.
मुलायम सिंह यांनी रामनाथ कोविंद यांना दिलेला पाठिंबा म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या शिष्टाईचे यश आहे अशी चर्चा रंगताना दिसते आहे. सध्याच्या योगी सरकारच्या कारभाराबाबत विचारले असता, १०० दिवसात कोणाच्याही कामाचे मूल्यांकन होऊ शकत नाही. सहा महिन्यांनंतर आम्ही या सरकारबाबत भाष्य करू असे सूचक वक्तव्य मुलायम सिंह यांनी केले आहे. तसेच २० जून रोजी मुलायम सिंह हे मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भेट झाली. तसेच मुलायम सिंह, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दीर्घ चर्चा झाली. मुलायम सिंह यांचा कोविंद यांच्या नावाला असलेला पाठिंबा याच चर्चेचे फलित मानला जातो आहे.

मुंबई - गोराई परिसरातील गेस्ट हाउसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने बलात्कार गेल्याचा गुन्हा एमएचबी पोलिसांनी दाखल केल्याने गोराई - मनोरी भागातील गेस्ट हाउसमधून अनैतिक कृत्यांना मिळणाऱ्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी या अनधिकृत गेस्टहाउसबाबत महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत अग्निशमन दलाने मनोरी परिसराला भेट देऊन येथील अनधिकृत गेस्ट हाउसची पाहणी केली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. दरम्यान, याच वेळी एमएचबी परिसरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर गोराईतील गेस्ट हाउसमध्ये बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणी गेस्ट हाउसचे चालक आणि मालक यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहन कृष्णन यांनी केली आहे. गोराईप्रमाणेच मनोरी परिसरातही अग्निसुरक्षेसंबंधात केवळ सात गेस्ट हाउस, रिसॉर्टकडून योग्य ती कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यात आली तर उर्वरित ४९ गेस्ट हाउसमध्ये अग्निसुरक्षेसंबंधात नियम पाळण्यात आले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटले आहे. मनोरी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत गेस्ट हाउस चालकांकडून या गेस्ट हाउसविरुद्ध कारवाई होऊ नये यासाठी महापालिका विभाग कार्यालयावर दबाव आणला जात आहे. गेल्या आठवड्यात या गेस्ट हाउस चालकांनी पी उत्तर विभाग कार्यालयात काही वेळ ठिय्या मांडला होता. त्यांनी तेथील पालिका अधिकाऱ्याला मोहन कृष्णन यांना कार्यालयात बोलावून घेण्यास सांगितले. मात्र महापालिका अधिकाऱ्याने तसे करणे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना नकार दिला.

अ‍ॅसिड टाकून खून; महिला व दोन मुलांचा समावेश


कर्जत - कर्जत तालुक्यातील दुरगांव रस्त्यावरील जंगलात एक अनोळखी महिला (वय ३२), एक मुलगा (४) व एक मुलगी (६) अशा तिघांच्या अंगावर अ‍ॅसीड टाकून अतिशय भीषण व निर्घृणपणे खून करुन टाकण्यात आलेले मृतदेह आज, सोमवारी आढळले. आठवडय़ापूर्वीच शेवगाव येथे झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडानंतर घडलेल्या या तिहेरी खुनाने नगर जिल्हा हादरला आहे. मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तिघेही परप्रांतीय असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
कर्जतपासून १२ किमी अंतरावर कर्जत-दुरगांव रस्त्यावर वनविभागाचे जंगल आहे. या जंगलात तीन अनोळखी मृतदेह पडल्याचे गुराख्यांना आज दुपारी दोनच्या सुमाराला दिसले. त्यांनी हा प्रकार लगेच गावातील काही जणांना कळवला, वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली, पोलीसही लगेच घटनास्थळी पोहचले. दुरगांव रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर पसरट खड्डा आहे, त्यात बाजूला महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था भीषण होती, अंगावर अ‍ॅसीड ओतल्यामुळे मानेपासून खालचा देह पूर्णपणे जळून कातडींचा रंग बदललेला आहे, उजव्या हाताच्या पंजाला कापल्यासारखी मोठी खोक पडली आहे, हातात धातूच्या बांगडया आहेत. अंगावरील साडी पाहून महिला गरीब कुटुंबातील वाटते. महिलेच्या मृतदेहापासून सुमारे १५ फुटावर छोटया मुलाचा मृतदेह आहे व जवळच मुलीचा मृतदेह आहे. दोन्ही मुलांच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्यामुळे शरीर जळून गेले आहे, पोट फुटून आतडी बाहेर आली आहेत, या तिन्ही मृतदेहांजवळ रक्त सांडलेले आहे.
महिलेचा रंग, चेहऱ्याची ठेवण, हातातील धातूच्या बांगडय़ा यावरून ती परप्रांतीय असावी असा संशय आहे, मुलेही महिलेचीच असावीत, असा कयास व्यक्त केला जातो. मृतदेहावरुन मारणारा किती निर्दयी असावा हेही लक्षात येते.
या परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने तिघांना जंगलात कसे आणण्यात आले, जंगलात मारण्यात आले की मारल्यानंतर जंगलात टाकण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळापासून जवळच कर्जत-श्रीगंोंदे रस्त्यावर, दुरगांव तलावालगत पुलाचे काम सुरू आहे, या कामावरील ठेकेदार व मजूर परप्रांतीय आहेत. तेथे काम करणारे काही कामगार सकाळपासून गायब झाल्याची माहिती मिळाली. त्यापैकी कोणी असावे असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या कामावरील मुकादमाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कामावर महिला मजूर नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काही कामगार सकाळी निघून गेल्याच्या माहितीस त्याने दुजोरा दिला आहे. पोलीस निरीक्षक वसंत भोये अधिक तपास करत आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget