August 2017मुंबई - मनपा आयुक्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २६ जुलै २००५ ची तुलना २९ ऑगस्ट २०१७ शी करत आहेत परंतु ते हे विसरलेले आहेत कि २६ जुलैला एका तासात ९४४ एमएम पाऊस पडला होता आणि बारा तासात ३२० एमएम पाऊस पडला होता. २६ जुलै पेक्षा काल त्यामानाने खूप कमी पाऊस पडलेला आहे आणि तरीही मुंबईची अवस्था यावेळी हि दयनीय झाली आहे. मुंबईचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मुंबई पाण्यामध्ये बुडाली होती. प्रत्येक वेळी निसर्गाला आणि पावसाळा दोष देऊन हे सरकार स्वतःच्या जबाबदारीतून हात झटकत आहेत. मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या या परिस्थितीला शिवसेना आणि भाजप सरकारच जबाबदार आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले कि काल दिवसभराच्या पावसामुळे पूर्ण मुंबई ठप्प झालेली आहे. रेल्वे सेवा बंद पडलेली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. हिंदमाता परिसरात ४ ते ५ फूट पाणी साचलेले आहे. केइएम हॉस्पिटलमध्ये पाणी भरलेले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप सरकार व महापालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार आहेत. यांच्यामुळे मुंबई तुंबलेली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने ६ पंपिंग स्टेशन्स बसवलेले आहेत. ज्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. पंपिंग स्टेशन्सची क्षमता वाढवलेली नाही. ते नादुरुस्त झाले आहेत. महापालिकेतील शिवसेना-भाजप सरकारने ते पैसेसुद्धा खाल्ले. १२ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार असताना केंद्र सरकारकडून वादळी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी BRIMSTOWAD प्रोजेक्ट अंतर्गत महापालिकेला १६०० कोटी रुपये देण्यात आले होते. याचे फक्त ४०% काम पूर्ण झालेले आहे. महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये ड्रेनेज सिस्टिमसाठी खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. ही महापालिकेकडून शिस्तबद्ध पद्धतीने केलेली लूट आहे. हिंदमाताजवळ पाणी साचणे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पश्चिम उपनगरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खोदकाम करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. या सरकारने खूप मोठा रस्ते घोटाळा केलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरामधील लोकांचेही फार हाल झालेले आहेत. मुंबईकरांना पुन्हा एकदा २६ जुलै ची आठवण झालेली आहे. त्यातच भरीस भर म्हणून मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग परिस्थिती आवाक्यात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले कि जर नालेरुंदीकरण आणि ड्रेनेज सिस्टीमवर सरकारने योग्य पद्धतीने भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केले असते, तर मुंबईची अशी दयनीय अवस्था झाली नसती. या सरकारने फक्त भ्रष्टाचार केला. पैसे खाल्ले. त्यामुळेच आज सर्व मुंबईकर अडचणीत सापडलेले आहेत. मुंबईकर नियमित प्रामाणिकपणे टॅक्स भरतात. परंतु त्यांना सामान्य सुखसोईसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिका चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेची सत्ता सोडून द्यावी. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्त म्हणाले होते की, पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा त्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला आहे. मनपा आयुक्त सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत.त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहे की, महापालिका आयुक्त अजोय मेहता याना लाथ मारून या पदावरून हाकलले पाहिजे. मनपा आयुक्त बोगस ठरले आहेत. त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

मुंबई - दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने सलग तिसऱ्या दिवशी टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक बंद आहे. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच लोकल ट्रेन सुरु असून मध्य रेल्वेवरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु आहे. मंगळवारपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. मंगळवारी सकाळी आसनगाव- वाशिंददरम्यान नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे खोळंबली. बुधवारीदेखील मध्य रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरु होती. टिटवाळा- कसारा मार्गावर रेल्वेच्या पथकाला अपघातग्रस्त दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आले होते. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे डबे हटवण्यात आले होते. डबे हटवण्यात आले असले तरी या मार्गावर अजूनही ओव्हरहेड वायर आणि अन्य तांत्रिक कामे बाकी आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळीदेखील टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल सेवा बंद आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेवरील वाहतूकही विलंबाने सुरु असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक ठप्प असल्याने कसारा, आसनगाव येथे राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूर - गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील २१ हजारांहून अधिक संशयितांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. २५५ गुन्हेगारांना तडीपार केले असून, कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ९ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. अवैध व्यवसायांशी संबंधित ५०५ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचा दावा परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी परिक्षेत्रात १८ हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष आहे. या गुन्हेगारांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्याचा दावा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केला आहे. यामुळे गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडणारे नागरिक, महिला आणि लहान मुलांची सुरक्षितता वाढल्याची भावना पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कलम १४९ अंतर्गत १२ हजार ६५६ संशयितांवर कारवाई केली, तर कलम १०७ अंतर्गत ५ हजार ८९२ संशयितांवर कारवाई केली आहे. याशिवाय ८४२ संशयितांविरोधात १४४ कलम लागू केले आहे. गंभीर गुन्ह्यांमधील ९ संशयितांना स्थानबद्ध केले आहे. २५५ संशयितांना तडीपार केले आहे.

लखनऊ - गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘आता मुले दोन वर्षांची झाली की त्याची जबाबदारी सरकारवर टाकावी असे लोकांना वाटत असावे’ असे विधान योगी आदित्यनाथांनी केले आहे.उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमात बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रसारमाध्यमं म्हणतात सर्वत्र कचरा पसरला आहे. कचरा साफ करण्याची जबाबदारी सरकारवर आहे हे मान्य आहे. पण हल्ली जनता सर्व जबाबदारीतून मुक्त झाल्याचे वाटते. लोक स्वत: साफसफाई करणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण आपली जबाबदारी सरकारकडे सोपवली. मला कधी कधी तर वाटते की आता लोक मुले दोन वर्षांची झाली की त्याची जबाबदारी सरकारवर टाकतील असे त्यांनी म्हटले आहे. हे विधान करत योगी आदित्यनाथांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.

पिंपरी - पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास बावधान येथे झाला. तिघेही मूळचे बिहारचे असून एमबीएच्या शिक्षणासाठी ते पुण्यात राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल राजसिंग (वय २५), अमन राज (वय १९) आणि अश्विन अमरकुमार अगरवाल (वय १८, तिघे रा. बावधन) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी टेम्पोचालक शिवा सोमनाथ राठोड (वय ३०, रा. मालखेडा, ता. हवेली, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजतराज सिंग याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गोरखपूर (उत्तर प्रदेश) - बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांनी दिली. मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली.
गंभीर आजारी असलेल्या मुलांना नवजात शिशू अति दक्षता कक्षात उपचारासाठी आणले जाते. यात मुदतपूर्वी जन्मलेली, कमी वजनाची, कावीळ आणि अन्य संसर्गजन्य आजारी असलेल्या बालकांचा समावेश असतो. मेंदुज्वर झालेल्या बालकांना तर अत्यंत गंभीर स्थितीत ऐनवेळी आणले जाते. अशा मुलांना उपचारासाठी वेळीच इस्पितळात आणल्यास नवजात बालकांना वाचविणे शक्य असते, असे प्राचार्य सिंह यांनी म्हटले आहे.गेल्या २४ तासांत मेंदू ज्वराचे १७ बालकांना या इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला, असे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी सांगितले.
दरम्यान, बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांच्या पत्नीला उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ह्युुस्टन - अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. ह्युस्टन शहरात लुटमार वाढली आहे. त्यामुळे तेथे रात्रीच्या काळी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जवळपास एक लाख अमेरिकन भारतीय सध्या वादळ आलेल्या टेक्सास प्रांतात राहतात. तेही या वादळात अडकले आहेत. या वादळाचा लाखो लोकांना तडाखा बसला आहे. मदतकार्य करण्याºया हजारो टीम सध्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अविरत काम करीत आहेत. वादळाच्या काळात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर आला असून, येत्या काळातही आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शुक्रवारपासून आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत १३ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
हार्वे वादळामुळे एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत. टेक्सासच्या ए अँड एम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत शनिवारी ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मैत्रिणीची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यानी सांगितले की, निखिल भाटियाच्या घरच्यांशी आम्ही संपर्कात आहोत.

बारामती - चर्चा काही असो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाही, हे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी बुधवारी सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिमंडळातील चर्चेला पूर्ण विराम दिला. पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सहभागी होणार अशी चर्चा होती. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी झालेल्या यूपीएच्या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कोणीही नेते उपस्थित राहिले नाहीत. तेव्हापासून या चर्चेला अधिक वेग आला होता. याबाबत फारसे भाष्य न करता पवार यांनी राष्ट्रवादीचे कोणीही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले. राज्य सरकारच्या कर्जमाफीवर देखील पवार यांनी टीका केली. ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असे जाहीर केले जाते. मात्र, राज्याच्या कानाकोपरात गेल्यावर एकही शेतकरी कर्जमाफ झाले आहे, असे ठामपणे सांगत नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशात अस्वस्थता आहे. परंतु, भाजपाला सक्षम पर्याय नाही, हे देखील तितकेच खरे आहे. सध्या वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्याच अनुषंगाने लालूप्रसाद यादव सारख्या ‘मासबेस’ नेत्याने घेतलेली भूमिका, त्यांना मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची भूमिका देखील सामंजस्याची आहे. राज्यात देखील काँग्रेसचे नेतृत्व सामंजस्याच्या भूमिकेवर भर देत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे - केंद्र व राज्यातील सत्तेमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांनी बुधवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्यास एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह सत्तेतील पदांवर असणारे कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. देशातील व राज्यातील अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र, शेतकºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडत आहे. ४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे लेखी पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सत्तेतून बाहेर पडल्याने बीजेपीला फरक पडणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्याची चळवळ उभी केली जात आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून या मोहिमेच्या दुसºया टप्प्यास सुरुवात केली जाईल. या अंतर्गत तेलंगणा, आंध्र प्रदेश,कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यातील शेतकऱ्याशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतर येथे देशभरातील १० लाख शेतकºयांचा मोर्चा काढला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.

मुंबई - मुंबईतील जेजे मार्ग परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळते आहे. भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रिट भागात ही दुर्घटना घडली आहे. हुसेनवाला असे या इमारतीचं नाव असून ही इमारत १०० ते १२५ वर्ष जुनी असल्याचीही माहिती मिळते आहे. या इमारत दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. ही रहिवाशी इमारत असल्याने ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती स्थानिकांनी वर्तविली आहे. पण पोलिसांनी अद्यापही या बद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याचे समजते आहे. जेजे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोसळलेली इमारत ही जुनी असल्याचेही समजते आहे. तसंच ही इमारत पूर्णपणे मोडकळीस आली होती, असेही समजते आहे. या इमारतीत एकुण ९ कुटुंब रहात असल्याची माहितीमिळत आहे. इमारत कोसळल्यानंतर एक ते दोन जण स्वतःहून बाहेर आली. गुरूवारी सकाळी आठ-ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास इमारती कोसळल्याची माहिती मिळते आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जात आहे. एनडीआरएफच्या टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.मुंबईमध्ये इमारत कोसळल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे.


ऑनलाईन ह्य़ूस्टन - हार्वे वादळाने अमेरिकेत नऊहून अधिक बळी घेतले असून टेक्सास राज्यात ब्रायन सरोवरानजीक बुडालेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले आहे पण त्यांची प्रकृती गंभीर आहे. जोरदार पाऊस व वादळाने थैमान घातले असून टेक्सासच्या ए अँड एम विद्यापीठात शिकणारे दोन विद्यार्थ्यांना बुडालेल्या अवस्थेतून वाचवण्यात आले. ते पोहायला गेले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रायन पोलिसांनी सांगितले, की या सरोवराच्या गस्त अधिकाऱ्यांना एका व्यक्तीने दोन मुले बुडत असल्याची माहिती दिली. तो त्या दोन विद्यार्थ्यांबरोबर होता. बुडत असलेले विद्यार्थी विशीतील होते. बरोबर आलेल्या व्यक्तीने एकाला तर गस्त अधिकाऱ्याने दुसऱ्याला वाचवले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालिनी व निखिल भाटिया या दोघांना सेंट जोसेफ रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. इतक्या प्रतिकूल हवामानात ते पोहायला का गेले होते हे समजलेले नाही. भारताच्या ह्य़ूस्टनमधील वाणिज्य दूतावासाने दोन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय गरजांकडे लक्ष पुरवले असून निखिल भाटियाच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा नाही तर शालिनी हिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. निखीलची आई डॉ. सुमन भाटिया ही भारतातून येथे आली असून तिला वाणिज्य दूतावास मदत करीत आहे. शालिनीचा भाऊ उद्या येथे येत आहे. पूर व वादळाचा तडाखा १.३ कोटी लोकांना बसला आहे. हार्वे वादळामुळे हाहाकार माजला असून रस्त्यांवर नदीसारखे पाणी वाहत आहे. बुधवापर्यंत ५० इंच पावसाने आणखी हानी होणार आहे.

मुंबई - गणेश चतुर्थीनिमित्त उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. किंग शाहरूख खानही या उत्सवात सहभागी झाला होता. मात्र यावेळी त्याच्यासोबत एक चांगलीच गंमत झाली. जेव्हा गणपतीच्या आरतीत तो सहभागी झाला होता, तेव्हा आरतीनंतर पायात शूज घालणे तो विसरला. बराच वेळ तो शूज न घालताच इकडेतिकडे फिरत होता. जेव्हा पार्टी संपल्यानंतर तो मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर आला तेव्हा त्याला कोणीतरी आठवण करून दिली की, ‘तू शूज घातलेले नाहीत.’त्यानंतर शाहरूखनेही लगेचच त्याच्या असिस्टंटला शूज शोधण्यास सांगितले. तोपर्यंत पार्टीत शाहरूखचे शूज हरविल्याची बातमी वाºयासारखी पसरली. शिवाय शाहरूखलाही त्याने शूज नेमके कुठे काढले हे आठवत नव्हते. त्यामुळे शाहरूखच्या शूज हरविल्याचा किस्सा पार्टीमध्ये चर्चेचा विषय ठरला. शाहरूखच्या असिस्टंटबरोबरच आणखी काही लोक त्याचा शूज शोधत होते. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही बाब मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आला कळली तेव्हा तोही शाहरूखचे शूज शोधत होता. बराच वेळ शोधूनही शूज मिळत नव्हते तेव्हा शाहरूखने स्वत:च शोधमोहीम सुरू केली. शिवाय आकाश अंबानी आपले शूज शोधत असल्याचे शाहरूखच्या लक्षात आल्यानंतर त्याला आश्चर्य वाटत होते. बराच वेळ शोधमोहीम राबविल्यानंतर शाहरूखला त्याचे शूज मिळाले. त्याने शूज घालून लगेचच पार्टीतून काढता पाय घेत घर गाठले.

गोरखपूर - गोरखपूरच्या बाबा राघव दास रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. याआधी याच रुग्णालयात अनेक लहानग्यांनी ऑक्सिजनच्या अभावामुळे अखेरचा श्वास घेतला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणारे बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यावेळी या रुग्णालयातील ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा या रुग्णालयातील बालकांना जीव गमवावा लागला आहे. बाबा राघव दास रुग्णालयात मागील ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील ७२ तासांचा विचार केल्यास रुग्णालयातील ६१ बालकांना जीव गमवावा लागला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे. मागील ३ दिवसांमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाला आहे. मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जीवघेण्या ठरल्या आहेत. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. तर याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

मुंबई - मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली. मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी रस्त्यांवर परिस्थिती नियंत्रणाचा अयशस्वी प्रयत्न करत होते. मात्र परिस्थिती पूर्णत: हाताबाहेर गेली होती. 
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दोनशे रूपयांची नोट चलनात आणली आहे. तसेच ५० रूपयांची नोटही नव्या रूपात चलनात येणार आहे. ५० आणि २०० रूपयांची नोट एटीएममध्ये येण्यास वेळ लागणार आहे. अशात १ हजार रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र एक हजार रूपयांची नोट चलनात आणण्याचा काहीही विचार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही माहिती दिली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० आणि १ हजार नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५०० आणि २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. ५० आणि २०० रूपयांचीही नोट चलनात आणली गेली आहे. त्यानंतर १ हजार रूपयांचीही नोट चलनात आणली जाईल अशी चर्चा सुरू होती. मात्र ही एक हजाराची नवी नोट चलनात आणण्याचा काहाही विचार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबई - दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसानं सध्या विसावा घेतला आसला तरी येणाऱ्या २४ तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये आतापर्यंत १००० हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यात भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाच्या तडाख्यामध्ये अनेक जनांचा बळी गेला आहे.संयुक्त राष्टाने भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तिन्ही देशाची परिस्थिती आणखी खरब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करावी असे त्यांनी सांगिलते आहे. ज्या ठिकाणी पुरस्थिती आहे तिथे आगामी ४८ तासांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहरात एका आत्मघाती हल्लेखोराने बँकेच्या बाहेर केलेल्या स्फोटात पाच ठार, तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असून इदच्या काही दिवस अगोदर हा हल्ला झाला आहे. अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात घातक हल्ले केले असून तीन महिन्यांपूर्वी ट्रक बॉम्बहल्ल्यात १५० जण ठार झाले होते. काबूल बँकेच्या बाहेर हा स्फोट झाला. सुरक्षा जवान व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन या बँकेतून दिले जाते. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले,की आताच्या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून त्यात एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. आठ नागरिक या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले. समाज माध्यमांवर तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इद अल अधाच्या सुटीपूर्वी वेतन घेण्यासाठी जवान व अधिकारी बँकेत येत असताना सकाळच्या वेळी हा स्फोट झाला. बँकेचा बाहेरचा भाग कोसळला असून लोखंडी खांब बाहेर आले आहेत.मुंबई - मुंबईत काल मंगळवारी मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले. या पावसाचा फटका मगरीनाही बसलाय. पवई तलावातून थेट रस्त्यावरच मगर आल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले.
विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर पवई तलावात याआधीही मगर असल्याचेस्पष्ट झाले. कित्येक वेळा मगरी तलावातील छोट्या बेटावर दिसून येत्यात. "तलावात मगरी आहेत, पाण्यात उतरू नये, सावधानता बाळगा’ असे संदेश देणारे फलक पवई तलावा जवळील अनेक भागात लावलेले आहेत. काल मुसळधार पावसामुळे चक्क एक मगर विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर प्रकट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.मध्यंतरी तलावात मगरींची संख्या प्रचंड वाढली असल्याचे समोर आले.

मुंबई - मुंबईत विक्रोळीतील वर्षानगरमध्ये मुसळधार पावसामुळे दोन घरांवर भिंत कोसळली. यात २ वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई काल १२ वर्षांतला रेकाॅर्डब्रेक पाऊस झाला. काल रात्री विक्रोळी पार्क साईटच्या वर्षा नगरमध्ये झोपड्यांवर घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांसह दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. कल्याणी जंगम असे मुलीचे नाव आहे. तर तिचे आई-वडिल जखमी झाले होते. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज कॉलेज (बीआरडी) हॉस्पिटलमध्ये गेल्या ४८ तासांमध्ये सात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यमुळे आणि सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी १०५ बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आसतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी बीआरडी हॉस्पिटलचे माजी प्रिंसिपल राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा यांना कानपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर टीका केली आहे. 'संवेदनाशून्य आणि अपयशी सरकार' असल्याचा आरोप केला जात आहे.

मुंबई - भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे.राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. तेव्हापासून त्यांनी भाजपावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचारापासून अनेक आरोप भाजपाचे नेते करीत आले आहेत. असे असताना त्यांना भाजपात घेतले तर त्यातून पक्षजनांमध्ये काय संदेश जाईल, असा सवााल आता केला जात आहे. राणेंना पक्षात घेण्यास विरोध असलेल्या नेत्यांनीच काही महिन्यांपूर्वी त्यांचा प्रवेश रोखून धरण्यात यश मिळविले होते. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांविरुद्ध आरोप करीत आम्ही सत्तेत आलो, त्यांनाच पक्षात घेतले तर ‘पार्टी विथ द डिफरन्स’चे काय होईल, असा सवाल या नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावणारे नेते होते तसे काही ठिकाणी मंत्र्यांशी दोस्ती ठेवणारेही नेते भाजपा व शिवसेनेत होते आणि त्याबद्दल वेळोवेळी राजकीय चर्चादेखील होत आली. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेता कामा नये, आपण त्यांना विरोध करण्याबाबत ठामच राहिले पाहिजे, असे मानणारे नेतेही भाजपात होते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यात प्रमुख मानले जात होते. राणे उद्या भाजपात आले तर त्यांचे स्थान काय असेल, आज प्रदेश भाजपात प्रस्थापित असलेल्या नेत्यांच्या रांगेत ते कोणाचे स्थान घेतील, विशेषत: मराठा नेता म्हणून त्यांना समोर करण्यात आले तर पक्षात सध्या असलेल्या वरिष्ठ मराठा नेत्यांना ते स्वीकारार्ह असेल काय हे मुद्देही पक्षांतर्गत चर्चेत आहेत.

कोल्हापूर - राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार आहे. बुधवारी (दि. ३०) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील अल्पबचत भवनात दुपारी दोन वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सरकारला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करणार आहेत. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. तूर्त कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता शेतकऱ्याच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती संघटनेने आखली आहे. राज्यातील दोन्ही काँग्रेसचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकून भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात स्वाभिमानी संघटनेचाही वाटा होता. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपसह शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष अशा पाच पक्षांची महाआघाडी झाली.

हिंदू धर्मीयांत घटस्फोट घ्यायचे झाल्यास अनेक वर्षे कोर्टकचे-या चालतात. पण मुस्लिम समाजात तलाक तलाक तलाकअसे तीनदा म्हटले की, महिलेला मुकाटपणे नव-याचे घर सोडावे लागते.हिंदू- मुस्लिम भाई-भाई म्हटले जात असले तरी त्यांच्या कुटुंबसंस्थेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. हिंदूत लग्न हा कुटुंबसंस्थेचा पवित्र पाया असे मानले जाते. हिंदूमध्ये तो ब्राह्मणाच्या साक्षीने वेद-मंत्राचरणात होतो, तर मुस्लिमांमध्ये मुल्ला-मौलवी आणि काझीच्या उपस्थितीत निकाह होतो. एकदा विवाह झाला की ब्राह्मण त्या कुटुंबात ढवळाढवळ करत नाहीत. मुस्लिमात मात्र मुल्ला-मौलवींचा  कुटुंबात हस्तक्षेप असतो. त्यातूनच मुस्लिम धर्मीयांत तलाकची पद्धत रूढ झाली आणि धर्माच्या नावाखाली मुस्लिम महिलांची कोंडी करण्यात आली. तलाकविरोधात मुस्लिम महिला शायरा बानो बंड करून उठली. तिने न्यायालयात धाव घेतली आणि तेव्हापासूनच मुस्लिम महिलांवरील दडपण दूर होईल अशी आशा होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ती प्रत्यक्षात आली. या अघोरी प्रथेतून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे, तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविला आहे. इतकेच नव्हे तर संसदेत याबाबत कायदा करण्याचे आदेश देतानाच सर्वोच्च न्यायालयाने कायदा बनवेपर्यंत तोंडी तलाकवर ६ महिने बंदी घातली आहे.कोणतीही गोष्ट कायद्याने लादण्यापेक्षा समाजाच्या जागरूकतेने ती अमलात आणली तर शांततेत प्रश्न सुटतात. तोंडी तलाक ही सामाजिकदृष्टय़ा वाईट पद्धत समाजात जागरूकता निर्माण करूनच मोडीत काढावी, असे आवाहनच मोदींनी केले आहे.आता देशभरात तोंडी तलाक घेणा-यांवर सामाजिक बहिष्कारघालण्यात येईल, लग्नविधी पार पाडताना निकाहनाम्यावेळी पतींनी तोंडी तलाक देऊ नये,’ अशा सूचना काझींना देण्यात येणार असून याबाबत लेखी हमी घेणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) प्रतिज्ञापत्रच सर्वोच्च न्यायालयात सादर केले. तोंडी तलाक हा शरीयत किंवा इस्लामिक कायद्यान्वये अनिष्ट चालीरीतींचा भाग मानला गेला आहे. पती-पत्नीतील वादावर परस्पर संमतीने तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. पतीने तडकाफडकी तिहेरी तलाकचा निर्णय न घेता, शरीयतच्या नियमाप्रमाणे विधिवत वेगळे होण्याचा मार्ग अवलंबण्यात यावा, याबाबत काझींना कळविले जाणार आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तिहेरी तलाकविरोधात एआयएमपीएलबीआणि ऑल इंडिया मुस्लिम वुमेन लॉ बोर्डाच्या याचिकाही न्यायालयात दाखल झाल्यामुळे न्यायालयाला निर्णय देणे सोपे झाले. तोंडी तलाक हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही.  अतिशय कमी लोक तोंडी तलाकच्या प्रथेचे पालन करत आहेत आणि ही प्रथा जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.तोंडी तलाकला मुस्लीम समुदायातील अनेक विचारवंत आणि संस्थांनी विरोध दर्शविला होता.  इस्लाममध्ये या पद्धतीला कोणतेही स्थान नाही, असे या विचारवंतांचे म्हणणे आहे. काही मुस्लिम पंथांना तोंडी तलाकची पद्धत चुकीची वाटते. शिया आणि बोहरा समाजातील विचारवंतांच्या म्हणण्यानुसार, ‘तोंडी तलाकला कोठेही आधार नाही. तोंडी तलाकबाबत कडक कायदे करण्याची गरज असल्याचे मत ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने व्यक्त केले आहे. तोंडी तलाकची पद्धत आणि मुस्लिमांमधील बहुपत्नीत्वाची पद्धत कायद्याद्वारे बंद करावी, अशी मागणी शायरा बानो यांनी केली होती.आणि त्यांना मुस्लिम महिलांमधून मोठा पाठिंबा मिळत होता.

तोंडी तलाकची पद्धत घटनाविरोधी आणि मुस्लिम महिलांच्या हक्कांवर गदा आणणारी होती. जगातील बावीस मुस्लिम देशांमध्ये ही पद्धत कायद्याने बंद आहे. मग भारतातच ही पद्धत रूढ का याची सल मुस्लिम महिलांना होती. मुस्लिम धर्मीयांत पवित्र कुराणाचा आधार मुल्ला-मौलवी आणि काझी घेतात, त्या कुराणातही तलाकचा नियम कोठेही नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मुस्लिम महिलेला मोकळा श्वास घेणार एवढे मात्र नक्की.

नवी दिल्ली - एकीकडे बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बाबा रामरहीमला सीबीआय न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली असतानाच लैंगिक छळाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांच्यावरील खटल्याचे कामकाज संथगतीने सुरू असल्याबद्दल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारची कानउघाडणी केली. या खटल्याचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जामिनासाठी आसाराम यांनी याआधी दाखल केलेल्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या असल्या तरी आणखी एक जामीनयाचिका त्यांनी दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचे वाभाडे काढले. या खटल्याचे कामकाज जलदगतीने व्हावे असा आदेश याआधीच दिलेला आहे. पुराव्यांचे रेकॉर्डिंग जलदगतीने करण्याचे आदेश एप्रिल महिन्यातच दिले होते. तरीही या खटल्यातील महत्त्वाची साक्षीदार असलेल्या पीडित महिलेची साक्ष अद्याप का घेण्यात आलेली नाही?, असा प्रश्न न्या. एन. व्ही. रामणा व न्या. अमिताव राव यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला. त्यावर तुषार मेहता यांनी न्यायालयात असे सांगितले की, दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची हत्या झाली असून एकजण बेपत्ता आहे आणि १७जण हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. साक्षीदार पीडित महिलेच्या सुरक्षेची खात्री पटल्यानंतर तिची साक्ष नोंदवली जाईल.

कोल्हापूर - ‘कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी यंत्रणा लावू दिली जाणार नाही. व्यावसायिकांनी डॉल्बीची उपकरणे मुख्यालयात जमा करावीत. जे जमा करणार नाहीत त्यांच्या घरात जाऊन ती जप्त केली जातील,’ असा दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भरला. पालकमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेने डॉल्बीवाल्या मंडळांचे धाबे दणाणले आहेत.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी (ता. २८) पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयात मंडळांचे पदाधिकारी, राजकीय नेते, महापौर, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते.

मुंबई - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.
नितीशकुमार आणि शरद पवार ‘एनडीए’त आल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात जेडीयु आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थान मिळू शकते, असे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, या शक्यतांना भाजपामधून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तर, खा. सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताचे तात्काळ खंडण करत ही अफवा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनीही टिष्ट्वट करून ‘एनडीए’त जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याचा इन्कार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सख्य जगजाहीर आहे. पवारांचे बोट धरूनच आपण राजकारणात आल्याचे मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्याऐवजी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबतचे गूढ आणखी वाढविताना भाजपच्या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने या घडामोडींचा संपूर्ण इन्कार केला. राज्यातील भाजप नेत्यांकडून उलटसुलट संकेत दिले जात असताना या अत्यंत महत्त्वाच्या नेत्याने राणेंच्या भाजपप्रवेशाचा प्रस्ताव नसल्याचे ‘अधिकारवाणी’ने स्पष्ट केल्याने अधिक संभ्रम वाढला आहे.‘राणेंच्या पक्षप्रवेशाचा प्रस्ताव नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही. जी काही भेट झाली, ती एका सार्वजनिक समारंभामध्ये’, अशी टिप्पणी या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने अनौपचारिक चर्चेमध्ये केली. किंबहुना आणखी पुढे जात त्या नेत्याने राणेंची तुलना काँग्रेसला रामराम ठोकणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांशी केली. ‘वाघेला काँग्रेसमधून बाहेर पडलेत; पण त्यांना भाजपने पक्षात घेतलेले नाही. आमच्यात सहकार्य मात्र आहे,’ अशी बोलकी पुस्ती त्या नेत्याने जोडली. राणेंची तुलना वाघेलांशी करण्याचे अनेक अर्थ निघू शकतात. राणेंच्या भाजपप्रवेशाच्या वावडय़ा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उठत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहांच्या २७ ऑगस्टच्या मुंबई दौऱ्यात राणेंचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मात्र, शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी केलेल्या गुफ्तगूमध्ये राणेंबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यातच दुसरीकडे फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्ताने राणेंच्या निवासस्थानी भेट दिल्याने तर पुन्हा एकदा सर्वाच्या भुवया उंचावल्या. या सगळ्या पाश्र्वभूमीवर या ‘अत्यंत महत्त्वाच्या नेत्या’ने राणेंबाबत हात वर केल्याने आणखीनच गूढ वाढले आहे. राणेंबाबत भाजपचे विविध नेते विविध पद्धतीने बोलत आहेत. मध्यंतरी दिल्लीत आलेल्या फडणवीसांनी राणेंबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता.नवी दिल्ली - आपली जादू अजूनही संपली नसल्याचे दाखवून देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बवाना विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सोमवारी भाजपला चांगलीच धूळ चारली. तब्बल २४ हजार मतांनी भाजपचा पराभव केला. प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या काँग्रेसला शेवटी तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले.आम आदमी पक्षाचे रामचंदर यांना ५९ हजार ८८६, भाजपचे वेद प्रकाश यांना ३५ हजार ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंद्रकुमारांना ३१ हजार ९१९ मते मिळाली. २०१५मध्ये आम आदमीच्या तिकिटावर निवडून आलेल्या वेद प्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेत भाजपने वेद प्रकाश यांना उमेदवारी दिली, पण त्यांचा पक्षबदलूपणा बवानाच्या मतदारांनाही पटला नाही. दिल्ली विधानसभेत शून्य अस्तित्व असलेल्या काँग्रेसला पहिल्या अकरा फेऱ्यांपर्यंत मताधिक्य होते. मात्र, त्यानंतर सुरेंद्रकुमार मागे पडत गेले आणि थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकण्याच्या नामुष्कीपासून भाजप बचावला.

शिर्डी - मागील वर्षभरापासून होणाऱ्या रस्तालुटीच्या घटनांमुळे हैराण झालेल्या पोलिसांनी सोमवारी पहाटे बाभळेश्वर-श्रीरामपूर आणि बाभळेश्वर-शिर्डी या रस्त्यावर दरोडेखोरांच्या एका टोळीला पकडताना गोळीबार केला. यामध्ये जखमी झालेल्या दोन दरोडेखोरांसह चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले; मात्र, उर्वरित दोन जण पळून गेले. प्रथम दरोडेखोरांनी गावठी कट्ट्यातून पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलिस जखमी झाला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. हे सर्व आरोपी श्रीरामपूर परिसरातील आहेत. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, कोपरगाव, लोणी, शेवगाव, राहुरी या परिसरात रस्तालुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार-शिर्डी, बाभळेश्वर-श्रीरामपूर, लोणी ते पिंपरी निर्मळ, शिर्डी-कोपरगाव, शिर्डी-सिन्नर या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी ट्रक, कार अडवून प्रवासी, वाहनचालकांकडील ऐवज लुटणे, त्यांना मारहाण करणे प्रसंगी जखमी करणे अशा घटना मागील वर्षभरापासून सुरू आहेत. बाभळेश्वर-पिंपरी निर्मळ, बाभळेश्वर-श्रीरामपूर आणि लोणी-पिंपरी, बाभळेश्वर-कोल्हार या रस्त्यावर सतत रस्ता लुटीच्या घटना घडतात. यामुळे येथील गावातील नागरिक आणि प्रवासी हे कायम भीतीच्या सावटाखाली आहेत.चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. गुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय १६ सप्टेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे. म्हणजेच हत्येच्या दोन्ही प्रकरणात राम रहीम आणि सीबीआयच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. सोमवारी न्यायालयाने राम रहीमला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर बलात्काराचे दोन आरोप असल्याने प्रत्येकी १० -१० वर्ष शिक्षा सुनावण्यात आली. 
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाला पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या हत्याप्रकरणी तीन आठवड्यात सुनावणी पुर्ण करण्याचा आदेश दिला होता. पत्रकार राम चंदर छत्रपती यांनी राम रहीमविरोधातील बलात्कार प्रकरणाची चौकशी केल्याने तसंच पीडित साध्वीचं पत्र वृत्तपत्रात छापल्याने राम रहीमच्या आदेशानंतर डेराच्या लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्याप्रकरणातील सुनावणी देखील अंतिम टप्प्यात आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा झाल्याने एकाप्रकारे सीबीआयची बाजू भक्कम होण्यास मदत झाली आहे. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीमच्या चरित्रासंबंधी युक्तिवाद केला जाईल. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'सुनावणीदरम्यान आरोपीचे चरित्रदेखील महत्वाचं असतं. जर आरोपीचं चरित्र संशयित असेल तर त्याच्याविरोधातील पुराव्यांनी बळ मिळते. राम रहीमवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. यासंबंधी अखेरचा युक्तिवाद केला जाईल'.
राम रहीमविरोधातील सुनावणी उशिराने करण्यात यावी यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात ६० हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सीबीआयच्या वकिलांनी विरोध केल्यानंतर उच्च न्यायालयाने सर्व याचिका रद्द केल्या होत्या. उच्च न्यायालयाकडून ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुर्ण करण्याचे ठरवले आहे. मात्र सीबीआयला सप्टेंबरमध्येच ऑर्डर मिळेल अशी अपेक्षा आहे. याआधी सर्व प्रकरणांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत होती. मात्र आता राम रहीम जेलमध्येच बंद असल्याने रोहतक कारागृहात सुनावणी होऊ शकते. यासाठी कारागृहातच विशेष सीबीआय न्यायालय तयार केले जाऊ शकते. हत्येच्या आरोपातील कमीत कमी शिक्षा जन्मठेप आणि जास्तीत जास्त शिक्षा फाशी आहे.

मुंबई - एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेली जमीन मोकळी करण्याच्या वादग्रस्त निर्णयामुळे कथित घोटाळ्यात अडकलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा प्रकार म्हणजे मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मंत्रिपदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी मुंडे यांनी केली आहे.
एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी मोकळ्या करण्याच्या याआधीच्या सरकारमधील म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून अशा प्रकरणांची चौकशी करणे म्हणजे मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही मुंडे यांनी केला. यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या चौकशीचे काय झाले, वादग्रस्त चिक्की खरेदी घोटाळा उघडकीस आल्यानंतरही १५ वर्षांपासूनची चौकशी करण्याची घोषणा झाली होती. त्या चौकशीच्या अहवालाचे काय झाले, असे सवाल मुंडे यांनी केला आहे. अशा चौकशीत कागदपत्रे उपलब्ध करून देणे, साक्षी नोंदवणे ही कार्यवाही विभागाचे अधिकारी करणार आहेत, या अधिकाऱ्यांच्या बदलीचे, त्यांच्या चौकशीचे अधिकार, गोपनीय अहवाल लिहिण्याचे अधिकार त्या विभागाच्या मंत्र्यांना असतात, त्यामुळे हे मंत्री पदावर असताना त्यांच्या विभागाचे अधिकारी त्यांच्याविरुद्ध साक्ष कशी देऊ शकतील, कागदपत्रे कशी पुरवतील, असे सवाल करत, ही चौकशी निव्वळ फार्स ठरेल, असे मुंडे म्हणाले.

मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या सहभागाबाबत चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळली आहे. काँग्रेसबरोबरच आघाडी करू, असे संकेतही देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित आहे. या विस्तारात राष्ट्रवादीला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातून राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले होते. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळून लावली. असा अंदाज बांधण्याकरिता कोणतेही सबळ कारण नाही, असेही पटेल यांनी म्हटले आहे. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसबरोबर राहण्याचीच आहे, असेही स्पष्ट केले आहे.प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अण्णा द्रमुक हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही चर्चा सुरू झाली होती.गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल अशी घेतलेली भूमिका किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला शरद पवार यांनी मारलेली दांडी यामुळे राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपशी जवळीक अधिक सोयीचे वाटू शकते, अशी चर्चा सुरू झाली होती.

मुंबई - रेरा नियामक प्राधिकरणाचा श्रीगणेशा तर उत्तम झाला आहे. तब्बल १३ हजारहून अधिक प्रकल्प महारेराकडे नोंदले गेले आहेत. इस्टेट एजंटांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतीत या प्राधिकरणाचे काम जोरात सुरू झाले आहे. आता कामचुकार, वेळखाऊ, नियमभंग बांधकाम व्यावसायिकांच्या तक्रारी करण्याची जबाबदारी घरखरेदी करणाऱ्यांची आहे.स्थावर मालमत्ता (रिएल इस्टेट) कायदा १ मे पासून अस्तित्वात येऊन त्यानुसार स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची (रेरा) रीतसर स्थापना महाराष्ट्रात झाली आहे. ‘महारेरा’ असे या प्राधिकरणाला संबोधले जात आहे. गृहनिर्माण विभागाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कर्तव्यकठोर निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुतोवाच केले आहे की, चॅटर्जी यांची अध्यक्ष म्हणून पाच वर्षांची नियामक प्राधिकरणातील कारकीर्द ही त्यांच्यानंतर अध्यक्ष होणाऱ्यांना उत्तम मार्गदर्शक असेल. मुख्यमंत्र्यांची भावना आणि चॅटर्जी यांची कर्तव्यकठोरता यांच्याबद्दल कोणालाही शंका येण्याचे कारण नाही. परंतु त्यामुळे ‘महारेरा’कडील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. नवीन तसेच प्रगतीपथावरील प्रकल्पांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केलेले असतानाही काही विकासकांनी ३१ जुलैनंतर प्रकल्पांची नोंदणी केली. १ व २ ऑगस्टपर्यंत नोंदल्या गेलेल्या प्रकल्पांना सरसकट ५० हजारांचा व त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत नोंदलेल्या प्रकल्पांना एक ते दहा लाख दंड करण्याचे महारेराने ठरविले. ३१ ऑगस्टनंतर अधिक कडक होण्याचे प्राधिकरणाचे धोरण आहे.

मुंबई - मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये संरक्षण भिंती, टॉयलेट ब्लॉक व सुशोभिकरणाच्या बांधकाम साहित्याच्या चाचणीचे खोटे अहवाल सादर केल्याचा ठपका ठेवत ‘म्हाडा’ने वीस कंत्राटदार व सतरा मजूर सहकारी संस्थांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने कंत्राटदारांना एकाच वेळेस काळ्या यादीत टाकण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
मुंबई झोपडपट्टी सुधारणा मंडळामार्फत मुंबईतल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये टॉयलेट ब्लॉक्स, व्यायामशाळा, शेडस, स्मशानभूमीचा विकास, उद्यानांचे सुशोभिकरण, नळजोडण्या, मलनिस्सारण वाहिन्या, संरक्षक भिंती बांधण्याचे काम केले जाते. ही बांधकामे पूर्ण झाल्यावर त्याची देखभाल करण्याचे काम पुढे मुंबई महापालिकेमार्फत होते. एका कंत्राटदाराला साधारणपणे पंधरा लाख रुपयांपर्यंतची कामे दिली जातात. या कामांवर व कामाच्या दर्जावर देखरेख ठेवली जात नाही असेही आढळून आले होते. या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. हा खर्च कंत्राटदार उचलतात. मालाच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त करण्यात येत होती. काही कंत्राटदार मालाच्या दर्जाबाबत खोटे प्रमाणपत्र सादर करतात असा संशय होता. कामाचा दर्जा उंचवण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. त्यामुळे म्हाडाच्या दक्षता व कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाने काही कंत्राटदारांच्या कामाची व मालाच्या दर्जाची अचानक तपासणी केली तेव्हा बांधकाम साहित्याच्या दर्जाचे खोटे तपासणी अहवाल सादर केल्याचे उघड झाले. खोटी ब‌लिे व खोटे अहवाल सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश गेल्या माहिन्यात म्हाडाने जारी केले होते.

अलिबाग - कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार देवेंद्र साटम भाजपच्या वाटेवर आहेत. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी सेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. साटम यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यामुळे उत्तर रायगडात सेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्जत खालापुर हा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र आंतर्गत गटबाजी आणि पाडापाडीच्या राजकारणात मतदारसंघात सेनेची वाताहत होत गेली. त्यामुळे जुने जाणते कार्यकत्रे आता पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत. यात आता माजी आमदार देवेंद्र साटम यांचे नावही जोडले जाणार आहे. सेनेकडून सलग तीनवेळा कर्जत खालापुर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारया साटम यांनी आता शिवबंधन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. नवरात्रात हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

मुंबई - मुंबई-कसारा घाटाजवळ दुरंतो एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. नागपूरकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरले. आसनगाव-वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकान ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली. एक्स्प्रेसच्या इंजिनसह सात डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आलेली आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वे पोलीस, डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुंबई - म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या विविध बांधकामांचे बनावट चाचणी प्रमाणपत्र सादर करून देयके मंजूर करून घेणाऱ्या ३७ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्यानंतर मंडळाने कंत्राटदारांवर मेहेरनजर करणाऱ्या १३ अधिकाऱ्यांच्या चौकशीचा प्रस्ताव म्हाडाकडे पाठवला आहे. झोपडपट्ट्यांतील लोकोपयोगी कामांसाठी आमदार, खासदारांना दर वर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. मंडळामार्फत २०१२ मध्ये करण्यात आलेल्या कामांतील भ्रष्टाचार भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या निदर्शनास आला. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडला असल्याने मंडळाने प्रथम २० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले. बोगस प्रमाणपत्र देऊन निधी लाटल्याप्रकरणी म्हाडाने आणखी १७ कंत्राटदारांवरही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर म्हाडाने कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. सुधार मंडळाने शहर, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार १३ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा प्रस्ताव म्हाडाकडे पाठवला आहे. तो मंजूर होताच भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल, असे सुधार मंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणामध्ये मंडळातून बदली झालेले आणि सेवानिवृत्त होण्यास काही दिवस शिल्लक असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. चौकशीच्या भीतीने म्हाडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पल्लीकेली - श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांची वनडे मालिकेत भारताने तिसरा सामना सहा विकेटसनी जिंकत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेने केलेल्या २१७ धावांच्या माफक आव्हानाला सामोरे जाताना भारताने चार विकेटस गमावल्या, पण शतकवीर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी भारताची आणखी पडझड होऊ न देता सहज विजय साकारला. श्रीलंकेच्या या सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे खवळलेल्या प्रेक्षकांनी भारत ४ बाद २१० असा विजयाच्या समीप आलेला असताना हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. स्टेडियमवर प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकण्यास प्रेक्षकांनी प्रारंभ केला आणि सामना थांबवावा लागला. त्या कालावधीत धोनी मैदानात निपचित झोपून होता. त्याचेवळी भारताने मालिका जिंकल्याचेही बोलले जाऊ लागले पण काही कालावधीनंतर धोनी आणि रोहित पुन्हा मैदानात उतरले. पण उरलेल्या आठ धावा त्यांनी आरामात काढल्या आणि भारताने सहा विकेटस व २९ चेंडू राखून हा सामना जिंकला. आता उरलेल्या दोन लढती फारशा महत्त्वाच्या नसल्या तरी निर्भेळ यश मिळविण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. याआधी, कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेविरुद्ध ३-० अशी बाजी मारली होती.

मुंबई - एका बाजूला बेरोजगारी वाढत असली आणि सरकारी नोकरीसाठी तीव्र स्पर्धा असली, तरी मुंबईत निवासाची असणारी गैरसोय, महागाई आणि जीवघेण्या प्रवासाच्या धास्तीने मंत्रालयात नियुक्त झालेले कर्मचारी नोकऱ्या सोडून जात असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. कर्मचाऱ्यांच्या गळतीमुळे सध्या मंत्रालयात लिपिक, टंकलेखक व अन्य तृत्तीयश्रेणी कर्मचाऱ्यांची चारशे पदे रिक्त आहेत. त्यावर उपाय म्हणून मंत्रालय हा स्वंतत्र संवर्ग न ठेवता मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांप्रमाणेच मंत्रालयातही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालय व बृहन्मुंबईतील अन्य शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक, लघुलेखक व साहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची शिफारस केली जाते. त्यातील उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवारांच्या मंत्रालयात नियुक्त्या केल्या जातात व उर्वरित उमेदवारांच्या मुंबईतील अन्य शासकीय कार्यालयात नेमणुका केल्या जातात. परंतु इतर ठिकाणी संधी मिळाल्यानंतर, मंत्रालयातील कर्मचारी नोकऱ्या सोडून जात असल्याने प्रशासन काळजीत पडले आहे.

मुंबई - ‘देवीयों और सज्जनों’ आणि ‘लॉक किया जाए’ ही खर्जातली आणि दमदार आवाजातील वाक्य सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून पुन्हा ऐकायला मिळणार आहेत. कारण बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा भव्य कार्यक्रम घेऊन येत आहेत. कार्यक्रमाचे हे ९वे सत्र असून त्यात स्पर्धकांना सर्वाधिक तब्बल ७ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. आज (सोमवार)पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.
मर्यादित भागांच्या ‘केबीसी९’ या सत्रात नवीन लाइफलाइन्स व आकर्षक बदल दिसणार आहेत. ‘फोन-अ-फ्रेंड’ ही लाइफलाइन आता ‘व्हिडिओ-अ-फ्रेंड’ अशी असेल. तसेच ‘जोडीदार’ ही नवी लाइफलाइन असून त्यात स्पर्धक आपल्या जोडीदारालाही हॉट सीटवर आणू शकणार आहेत. त्याचबरोबर ‘सर्व काही किंवा काहीच नाही’ असा नवा सौदा या सत्रात असेल. ‘जॅकपॉट’चा प्रश्न या वेळी ७ कोटी रुपयांचा असून या वेळी बक्षीसे धनादेशाऐवजी अ‍ॅक्सिस बँकेमार्फत थेट विजेत्याच्या खात्यात जमा केली जातील. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी केवळ ७ दिवसांत तब्बल १९.८ दशलक्ष लोकांनी नोंदणी केली आहे.

मुंबई - शासकीय व खासगी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणीच्या जाचातून मुक्तता करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. वडिलांचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास, त्या आधारावर त्याच्या मुलास व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचे प्रस्तावित आहे. शिक्षणातील प्रवेश, सरकारी नोकरी व निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीयांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षणातील आरक्षित जागेवरील प्रवेश, सरकारी नोकऱ्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे बिगर मागासांनी किंवा बोगस मागासवर्गीयांनी बळकावू नयेत व खऱ्या मागासांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने सन २००० मध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधीचा कायदा केला आहे.

जळगाव - जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये अडगळीत पडलेले एकनाथ खडसे यांनी आपला असंतोष पुन्हा व्यक्त केला आहे. ‘‘माझी अवस्था भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे’’, अशी टिप्पणी खडसे यांनी जळगावमध्ये भाजपच्या बैठकीत केली.खडसे यांच्या पुनर्वसनाच्या मागणीवरून त्यांच्या समर्थकांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. ‘नाथाभाऊ निर्दोष असताना इतके दिवस त्यांना मंत्रिपदापासून दूर का ठेवले जात आहे,’ असा सवाल माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी करत त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडण्याची मागणी केली. खडसे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्याचा ठराव करावा, ही मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली. त्यावर खडसे यांनी समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला. ‘‘राष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींप्रमाणे राज्यात माझे स्थान झाले आहे. मी अनेक वष्रे पक्षासाठी काम केले असून, पक्षविस्तारासाठी खूप मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर अडवाणींनीही पक्षासाठी असेच काम केले. मात्र, सध्या नव्या नेत्यांना संधी मिळते आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे, अशी स्थिती बनली आहे’’ असे खडसे म्हणाले.


लखनऊ - लखनऊमधील लोहिया हॉस्पिटलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया संयुक्त हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री कुत्र्यांनी एका महिलेचा मृतदेह छिन्हविछिन्ह केला. रविवारी सकाळी महिलेचे कुटुंबिय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी त्या महिलेच्या शरीरावरील सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचा आरोपही केला आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. 
चिनहटचे रहिवासी असणाऱ्या विनोद तिवारी यांनी सांगितले,'त्यांची पत्नी पुष्पा तिवारी (४०) यांना शनिवारी पोटात दुखत असल्याने सकाळी साडेनऊ वाजता लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पुष्पा यांनी विष खाल्ले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. म्हणूनच पोस्टमार्टेमनंतर पुष्पाच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह दिला जाणार होता. यासाठी पुष्पा यांचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवगृहात ठेवण्यात आला होता.

कराड - विद्यमान सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आणि केवळ आश्वासनांची घोषणा करणारे आहे. या राज्यकर्त्यांच्या कालावधीत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर, शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीही फसवी असून, किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला हे सरकारने जाहीर करावे असे आव्हान आमदार व माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिले. राज्यकर्त्यांनी इतिहास बदलण्याचे काम करू नये, असे ते म्हणाले. चरेगाव (ता. कराड) येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, पंचायत समिती सभापती शालन माळी, रघुनाथराव माने यांची उपस्थिती होती. जयंत पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकवटले आणि शेतकऱ्यांचा आक्रोश खऱ्या अर्थाने घुमल्यामुळे भाजपा सरकारला मनात इच्छा नसतानाही विरोधकांच्या एकजुटीची ताकद आणि जनसामान्यांच्या तीव्र भावनांची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. परिणामी, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला. पण, कर्जमाफी मिळणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये आजपर्यंत संभ्रम आहे.

सोलापूर - भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले. यामुळेच आज चीन आणि पाक एकत्र आल्यानंतरही गप्प राहिले आहेत. याचे श्रेय इंदिराजींच्या अण्वस्त्रसिद्धतेच्या धोरणाला असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन केले होते. त्यात प्रतिभाताई बोलत होत्या. इंदिरा गांधींच्या रुपाने एक कणखर नेतृत्व देशाला मिळाले. पूर्वी अमेरिकेतून धान्य मागवले जायचे. अन्न धान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे या एकाच भूमिकेतून त्यांनी एकसूत्री कार्यक्रम राबवला. त्यांच्या व्यापक दृष्टीकोनामुळेच आपला देश आज स्वयंपूर्ण आहे, किंबहुना आज भारत एक पाऊल पुढे आहे. देशातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी राष्टयकृत बँकांची निर्मिती केली. देशाला सुरक्षित करण्यासाठी मोठे कार्य केले. पंडित नेहरुंनी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करुन देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. मोहन प्रकाश यांनी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या राजकारणावर चौफेर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंदिराजींनी देशाला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांनी केले.

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. फाशी दिली तरीसुद्धा आम्ही भाजपशी समझोता करणार नाही, अशी गर्जना राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी  येथे 'भाजप भगाओ, देश बचाओ' रॅलीमध्ये केली. 'राजद'च्या या महारॅलीस पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, 'जेडीयू'चे बंडखोर नेते शरद यादव, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना लालू म्हणाले की, ''बिहारमध्ये पूर आलेला नाही तर तो गैरव्यवहार करून आणण्यात आला आहे. जातीयवादी, फॅसिस्ट शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन केली होती. नितीशकुमार हा चांगला माणूस नाही, हे आम्हाला आधीच माहीत होते; पण देश फुटीच्या मार्गावर असल्याने आम्ही या आघाडीस हिरवा कंदील दर्शविला. नितीश यांना मीच तयार केले. ते आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वळचणीला गेले असले तरीसुद्धा ते प्रोडक्‍ट आमचे आहे. शरद यादव यांनीच त्यांना केंद्रामध्ये मंत्री केले होते. आता तोच माणूस सांगतो मी लालूंना तयार केले. आणीबाणीच्या काळामध्ये आम्हाला 'मिसा' कायद्याखाली अटक करण्यात आली होती, तेव्हा नितीश यांचा कोठेच थांगपत्ता नव्हता.''असेही ते म्हणाले.

नगर - नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द काल रात्री ऑपरेशन ऑल ऑऊट योजना राबवून सुमारे १८ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या मोहिमेत शेवगाव पोलिसांनी दरोडेखोरांची पाच जणांची टोळी पकडली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा, चाकू, तलवार आदी प्राणघातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी न्यानकू संसाऱ्या भोसले (वय ३०, रा. औद्योगिक वसाहत, नगर), विष्णू दलाजी काळे (वय २०, रा. हातगाव, ता. शेवगाव), सुनिल निऱ्हाळ्या भोसले (वय २१) व नागनाथ अवचित काळे (वय ३९, दोघे रा. पाथर्डी रस्ता, ता. शेवगाव), अश्पाक वैभव काळे (वय ३०, रा. हिंगणगाव, ता. शेवगाव) यांना अटक करण्यात आली आहे. शेवगाव व परिसरात घरफोडय़ांचे सत्र सुरू झाले होते. त्यामुळे कोबग ऑपरेशन सुरू करण्यात आले. काल पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक नितीन मगर, पोलीस कर्मचारी सुहास हट्टेकर, रवींद्र शेळके, महादेव घाडगे, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब खेडकर, राहुल नरवडे, प्रवीण बागुल, सुरेश टकले, युसूफ सय्यद आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपींना शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील भगूर शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन सुरे, गुप्ती, तलवार व दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. एक दुचाकी नवीन असून तिची परिवहन विभागाकडे नोंदणीही करण्यात आलेली नाही. पोलीस नाईक रवींद्र शेळके यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यवतमाळ - जादूटोण्याच्या संशयावरून आई व मुलाला मारहाण करण्यात करण्यात आली. ही घटना वडगाव जंगल पोलिस ठाण्यांतर्गत वाकी येथे घटली. चंद्रभान वसंत आत्राम (वय २५) आणि त्याची आई लीलाबाई आत्राम (वय ५०) अशी मारहाण झालेल्यांची नावे असून याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगांव जंगल पोलिस ठाण्यांतर्गत वाकी येथील चंद्रभान आत्राम व त्याची आई लीलाबाई आत्राम राहतात. काही दिवसांपासून गावातील श्रावण नामदेव आत्राम व त्याचे काही सहकारी, ‘चंद्रभानची आई गावात जादूटोणा करते’, असा आरोप करीत होते. ‘तिच्या जादूटोण्यामुळे गावातील लोक आजारी पडतात. त्यामुळे त्यांना गावात राहू देऊ नये’, असे म्हणून ते चंद्रभान व त्याच्या आईला त्रास देत होते. ‘आपली आई जादूटोणा करीत नाही’, असे चंद्रभानने श्रावण आत्रामला समजावून सांगितले. पण, त्यांच्याकडून चंद्रभान व त्याच्या आईला त्रास देणे सुरूच होते. दरम्यान, मंगळवारी रात्री श्रावण आत्राम व त्याचे काही सहकारी थेट चंद्रभान आत्राम याच्या घरातच घुसले. चंद्रभान व त्याच्या आईला त्यांनी बेदम मारहाण केली.

मुंबई - राज्यातील गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना आता ‘जलदगती’ प्राप्त होणार आहे. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात २४ जलदगती न्यायालये स्थापन होणार असून, त्यासाठी ४६९.६७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ११ घटकातील गंभीर स्वरूपातील खटले जलदगती न्यायालयात निकाली काढण्यात येतील. २४ पकी चार न्यायालये विदर्भात स्थापन करण्यात येणार आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीशांसह एकूण १४४ पदांच्या निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे.

नाशिक - साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू , तर १५ हून अधिक जण जखमी झालेत. येवला- मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. निजधाम आश्रमासमोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येवल्याहून मनमाडच्या दिशेने एक क्रूझर अतिशय वेगाने जात होती. अचानक उजव्या बाजूचा टायर फुटल्याने ही क्रूझर उलटून मागून येणा-या मारु ती ओम्नी व्हॅनवर जोरात धडकली. त्यात मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील १० जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून काढावे लागले. स्थानिक संभाजीराजे पवार, दत्ता निकम, आणि सावरगाव येथील पवार कुटुंबियांनी केवळ १५ मिनिटात मदत कार्य करीत अपघातग्रस्थानां उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

कोलकाता - गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली. मृत एक व्यक्ती आसामचा तर, दुसरा पश्चिम बंगालमधील आहे. हफीजुल शेख (१९) आणि अन्वर हुसेन (१९) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी या दोन्ही हत्यांना दुजोरा देताना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रात्री एका पिकअप व्हॅनमधून गावातून चालले होते. या व्हॅनमध्ये सात गायी होत्या. बहुधा रस्त्यात भरकटल्यामुळे ते या गावातून जात होते. याचवेळी गावातील काही जणांनी ही व्हॅन रोखली. त्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला. पण, व्हॅनमधील दोन जणांना या जमावाने पकडले. हे गाय चोर आहेत असा संशय घेऊन गावकऱ्यानी त्यांची चौकशी केली. त्यानंतर या जमावाने त्यांना प्रचंड मारहाण केली. या व्हॅनची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी व्हॅनमधील या गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना धूपगडी शहरापासून १५ किमी अंतरावर बडहरिया गावात घडली. मृतातील हफीजुल शेख हा आसामच्या धुबडी जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, अन्वर हुसेन पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील पातालहावा येथील रहिवासी होता. हे दोघे व्यापारी होते अथवा नाही याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget