October 2017ऑनलाईन - ‘ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचं वर्णन करणारं हे गाणं आपल्या तोंडात चांगलंच बसलं आहे. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्घंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्घंधी निघून जाते.
– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

नाशिक - येथील पाथर्डीफाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला.
घरातील रहिवाशांनी जेव्हा बाहेरील बल्ब सुरू केला तेव्हा गाडीच्या चाकाजवळ साप बसलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या सापाला कुठल्याहीप्रकारे असुरक्षितता निर्माण होईल, असे कृत्य न करता सावधगिरीने प्रसंगावधान राखत सर्पमित्र संस्थेशी संपर्क साधला. दरम्यान, काही वेळेतच सर्पमित्र त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी सुरक्षितरित्या सापाला रेस्क्यू केले. यावेळी सदर साप हा पहाडी तस्कर जातीचा असल्याचे लक्षात आले. हा साप फारसा आढळून येत नाही. यामधील तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामिण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो. सध्या बदलत्या वातावरणामुळे जमिनीखाली उष्णता अधिक वाढत असल्याने सर्प बिळांमधून बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या महिनाभरात सुमारे ४७पेक्षा अधिक सर्प रहिवाशी भागातून ‘रेस्क्यू’ करत नैसर्गिक अधिवासात मुक्क केल्याची नोंद आहे. नागरिकांनी या हंगामात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

नाशिक - ग्रामीण व शहरी भागातील तक्रारींची सोडवणूक एक दिवसीय ‘जनता दरबारात’ करण्याचे प्रशासनाचे नियोजन तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडल्याने कोलमडले. ग्रामीण भागातील तक्रारींचा निपटारा करण्यास विलंब लागल्याने शहरी भागातील तक्रारींची दखल घेण्याकरिता स्वतंत्रपणे दरबार भरवण्याचा ऐनवेळी केलेला प्रयत्नही अंगाशी आला. यावरून सोमवारी जनता दरबारमध्ये कमालीचा गोंधळ उडून लोकप्रतिनिधी व प्रशासनाला तक्रारदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वाची समजूत काढत रात्री उशीर झाला तरी शहरी तक्रारींची आजच दखल घेतली जाईल असे आश्वासन द्यावे लागले. प्रदीर्घ काळ लांबलेल्या जनता दरबाराने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरी परीक्षा पाहिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी जनता दरबारला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासून तक्रारदारांची झुंबड उडाली होती. नियोजन सभागृह खच्चून भरले होते. आवारात शेकडो तक्रारदार दाद मागण्यासाठी ठिय्या देऊन होते. सभागृहात जाण्यासाठी काही तक्रारदारांचे बंदोबस्तावरील पोलिसांशी वादही झाले. ग्रामीण भागासाठी सकाळी नोंदणी करून दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान तक्रारींची सोडवणूक करण्याचे वेळापत्रक आखले गेले. दुपारी अडीचनंतर नाशिक शहरातील तक्रारींची सुनावणी ठेवली गेली होती. परंतु, ग्रामीण भागातील अर्थात तालुकानिहाय आलेल्या तक्रारींची सोडवणूक करताना सर्वाची दमछाक झाली.

मुरबाड - मुरबाड तालुक्यातील दुर्गम गावपाडय़ांमध्ये पुन्हा एकदा बिबटय़ाचा वावर आढळून आला असून त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. सिंगापूरमधील एका पाडय़ावर एका बिबटय़ाने बोकडावर हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धसईजवळील ओजिवडे येथील बकऱ्यांवर हल्ला झाल्याचे आढळून आले. या घटनांनंतर वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून संवेदनशील गावपाडय़ांमध्ये रात्री फटाके फोडून आवाज केले जात असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. वर्षभरापूर्वी टोकावडे परिक्षेत्रातील जंगलात एका बिबटय़ाने गावकऱ्यांची झोप उडवली होती. सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमधील माळशेज, भीमाशंकर तसेच जुन्नर परिसरातील जंगलांमध्ये बिबटय़ांचे अस्तित्व आहे. गेल्या काही वर्षांत मुरबाड तालुक्यातील दुर्गम गावपाडय़ांमध्ये घुसून तेथील पाळीव प्राण्यांवर तसेच माणसांवरही बिबटय़ाने हल्ला केल्याचे प्रकार घडले होते. गेल्या वर्षी एका बिबटय़ाने फारच उच्छाद मांडला होता. अखेर वनाधिकाऱ्यांनी त्याला ठार केले.त्यानंतर या परिसरातील गावपाडय़ांमधील रहिवाशांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. जंगलाशेजारी असणाऱ्या पाडय़ांबाहेर सौरदिवे बसवून रात्री, बिबटय़ा वस्तीत शिरणार नाही, याची काळजी घेण्यात आली. गेल्या वर्षीच्या त्या हल्ल्यातून ग्रामस्थ कसेबसे सावरत असतानाच आता पावसाळा सरताच पुन्हा बिबटय़ा वस्तीत शिरल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत.नागपूर - ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित बिलाचे हप्ते पाडून ते अदा करावेत, अशी शेतकऱ्यांना दिलासादायक योजना राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी दुपारी पत्रपरिषेदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या थकित बिलासाठी तयार केलेली मुख्यमंत्री संजीवनी या नावाची ही नवी योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरीच संजीवनी ठरावी असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नव्या योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरावे. चालू बिल सात दिवसांच्या आत भरलं नाही तर त्यांचं विजेचं कनेक्शन कापलं जाऊ शकतं, असा इशाराही उर्जा मंत्र्यांनी यावेळी दिला. याखेरीज शेतकऱ्यांकडे थकबाकी असलेल्या विजेच्या बिलाचे हप्ते करून देण्यात येतील आणि त्यावर दंड व्याज आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी या योजनाला प्रतिसाद द्यावा व विजेचे बिल भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

डोंबिवली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही सलग चौथ्या दिवशी ‘नागूबाई निवास’च्या रहिवाशांना सोमवारही रस्त्यावरच काढावा लागला. या रहिवाशांच्या पर्यायी निवा-याची व्यवस्था व्हावी, याकरिता केडीएमसी प्रशासनासह महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिवसभर प्रयत्न करूनही तांत्रिक मुद्यांची पूर्तता न झाल्याने बीएसयूपीच्या घरांमध्ये किंवा पांडुरंगवाडीच्या रात्रनिवारा केंद्रात सोमवारीही रहिवाशांना प्रवेश मिळाला नाही.
‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे हे दिवसभर इमारतीमधील सामान बाहेर काढण्यात व्यस्त होते, तर संध्याकाळनंतर मात्र त्यांनी पोकलेन लावून इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रहिवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. रहिवासी एकत्र आले व त्यांनी पालिकेच्या अधिका-यांना जाब विचारला. पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या निवा-याचे काय झाले? त्याची पूर्तता कधी होणार? इमारत पाडण्याआधी याची उत्तरे आम्हाला मिळायला हवी. त्याखेरीज, आम्ही इमारत जमीनदोस्त करू देणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याने तणाव वाढला होता. रहिवाश्यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी अधिकारी वानखेडे व नगरसेवक आमच्यासमवेत बसून पर्यायी निवा-याची पूर्तता करणार होते. मात्र, त्याचे नेमके काय झाले. ते संध्याकाळ झाली तरी आम्हाला कळले नाही. संध्याकाळी साडेपाचनंतर अचानक वानखेडे यांनी पोकलेन आणले आणि दोन मजल्यांवरील गॅलरी पाडल्या. अजूनही बहुतांश घरांमध्ये पंखे, दिवाण, कपाट असे सामान आहे. ते काढण्यापूर्वीच इमारत कशी पाडणार, असा आम्हा रहिवाशांना पडलेला सवाल आहे. पर्यायी निवाºयाची सोय झालेली नाही. घरांतील सर्व सामान बाहेर काढलेले नाही, अशा परिस्थिती आम्ही कारवाई करू देणार नाही, असे ते म्हणाले.

वसई - सर्वधर्मीय स्मशानभूमीचा भूखंड सीआरझेड बाधित असतानाही कोणतीही परवानगी न घेता केलेले बांधकाम १५ दिवसात पाडून टाका, तसेच बेकायदा भरावही काढून टाका असे आदेश हरित लवादाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने याकामासाठी खर्च केलेले १० कोटी रुपये वाया जाणार आहेत.
दिवाणमान येथील सनसिटीलगत सर्व्हे क्रमांक १७६ ए व १७७ मध्ये सर्वधर्मीय स्मशानभूमी व दफनभूमी बांधण्याचे काम वसई विरार महापालिकेने हाती घेतले आहे. ही जागा हरित पट्ट्यात असून ती सीआरझेड -१ (किनारा नियंत्रण क्षेत्र) मध्ये येत असतानाही महापालिकेने हे काम सुरु केले होते. याविरोधात शिवसेनेचे नवघर-माणिकपूर उपशहरप्रमुख सुनील मुळे आणि सनसिटी पब्लिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विनय पुजारी यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती.
याप्रकरणी सुनावणी सुरु होती. लवादाने तक्रारदार आणि महापालिकेची बाजू ऐकून घेतली. यावेळी ही जागा सीआरझेड-१ बाधित असताना महापालिकेने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीची परवानगी न घेताच बेकायदा माती भराव करून त्याठिकाणी बांधकाम केल्याचा निष्कर्ष लवादाने नोंदवला. त्यानंतर लवादाचे न्यायमूर्ती यु. डी. साळवी आणि लवादाचे तज्ञ डॉ. नागीण नंदा यांनी महापालिकेविरोधात आपला निर्णय दिला. येत्या पंधरा दिवसात बांधकाम निष्कासित करावे आणि भराव काढून टाकावा असे निर्देश लवादाने दिले आहेत.
दरम्यान, याठिकाणी बेकायदा माती भराव केल्याप्रकरणी वसई तहसिलदारांनी महापालिकेवर कारवाई करून ४ कोटी ७५ लाख ३९ हजार ८०० रुपये दंडही वसूल केला होता. तर जागेची भरणी आणि कंपाऊंड भिंत बांधकामासाठी महापालिकेने ४ कोटी १३ लाख ४५ हजार ७१५ रुपये खर्च केले होते. त्याचबरोबर मोजमाप करण्यासाठी ४० लाख रुपये मोजले होते.
एकंदर बेकायदा काम करून महापालिकेने लोकांच्या कराचे पैसे वाया घालवण्यात आल्याचा आरोप सुनील मुळे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणच्या सर्व्हे क्रमांक १७६ मध्ये महापालिकेने बेकायदा माती भराव केल्याची तक्रार युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली होती. त्यावेळी तहसिलदारांनी महापालिकेला १ कोटी १० लाखाची नोटीस बजावली होती. या प्रकरणी वर्तक यांनी हायकोर्टात दाद मागितली असून सद्या प्रकरण प्रलंबित आहे.

नवी मुंबई - सिडको क्षेत्रात देण्यात आलेल्या मोफत वाढीव चटई निर्देशांकाला राज्य शासनाची रीतसर परवानगी न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे सिडको क्षेत्रात सध्या बांधकाम परवानगी देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल या सिडको क्षेत्रातील विकास ठप्प झाला आहे. अनेक गृहप्रकल्प रखडले असून पनवेल पालिकेनेही सिडको क्षेत्रातील बांधकाम परवानगी बंद केली आहे. मोफत वाढीव एफएसआयला सिडकोने शासनाची परवानगी न घेतल्याने संपूर्ण शहरात एफएसआयचे उल्लघंन झाल्याचे चित्र आहे. याचा फटका शहरातील पुनर्बाधणी व प्रकल्पग्रस्तांनाही बसलेला आहे.

पंढरपूर - कार्तिकी यात्रेसाठी तीन लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. तथापि, यंदा तुलनेने गर्दी कमी दिसत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी 15 तास लागत होते. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणांहून दिंड्या येत असतात. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करणाऱ्या वैष्णवांमुळे सारे वातावरण मंगलमय झाले आहे. शहरातील गर्दी आणखी वाढली. शहरातील विविध मठ आणि धर्मशाळांमधून भाविक कीर्तन, प्रवचनात तल्लीन झाल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात नवमी (ता. 29) ते पौर्णिमा (ता. 4) या कालावधीत तंबू व राहुट्या उभारण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. जादा स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याने यंदा वाळवंटात स्वच्छता दिसत आहे. यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त आहे.नवी मुंबई - पाच अपक्ष आणि दहा काँग्रेस नगरसेवकांच्या बळावर अडीच वर्षे नवी मुंबईचे महापौरपद टिकविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी यंदाची निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसच्या १० नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून त्यातील सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्यात स्वारस्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा एकगठ्ठा पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडला जाऊन साकडे घातले आहे. नवी मुंबई पालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पालिकेतील १११ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५२, शिवसेना ३८, काँग्रेस १०, भाजप ६ आणि अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. बहुमतासाठी ५७ जागा जिंकणे आवश्यक होते. राष्ट्रवादीने पाच अपक्षांच्या बळावर ही संख्या गाठली आहे. यात अपक्ष असलेले पण राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले सुधाकर सोनावणे यांना महापौरपद देण्यात आले. केवळ पाच अपक्षांच्या बळावर सत्तेची जोखीम स्वीकारणे योग्य नसल्याने राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसच्या १० नगरसेवकांचाही पाठिंबा मिळविला. त्याबदल्यात त्यांना उपमहापौरपद व काही विशेष समित्यांचे सभापतिपद देण्यात आले. अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीतील मतभेद उफाळून आला असून काही नगरसेवक पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. काही जणांना शिवसेना, भाजपबरोबर जाण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसच्या १० नगरसेवकांना तर राष्ट्रवादीचा घरोबा नकोसा झाला आहे. त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसचे नेते व आमदार भाई जगताप यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समोर काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांतील असहकाराचा पाढा वाचला आहे.

मुंबई - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेविरुद्ध संजय निरूपम वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्या निरूपम यांच्या घरासमोरच मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी दुकाने थाटून निषेध नोंदविला. अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील निरूपम यांच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी भाज्या आणि फळांच्या गाड्या लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘संजय निरूपम हाय हाय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या बाजूने थेट दादरमध्ये मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. १ नोव्हेंबर रोजी हा मूक मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा मानस आहे. मात्र, त्याला मनसेकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या वादात उतरलेल्या नितेश राणे यांनी पुन्हा एकदा निरूपम यांच्यावर निशाणा साधला. लहान मुलांच्या खेळण्यांवर बसलेल्या निरूपम यांचा एक फोटो टिष्ट्वट करत, ‘हम सब बच्चेही है’ असा पलटवार नितेश राणे यांनी केला. खासदार गोपाळ शेट्टी यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. अनधिकृत फेरीवाल्यांना मारहाण करुन फरार झालेल्या पाच मनसे कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी अटक केली.

मुंबई - मुंबईतील एलफिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार असल्याची शक्यता आहे. एलफिन्स्टनचा पूल कमीतकमी वेळात बांधला जावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे शेलार यांनी ट्विट करुन म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत पहिल्यांदाच लष्कराकडून पुलाची उभारणी होणार आहे.रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एलफिन्स्टन पुलाची पाहणी करणार आहेत. त्यावेळी याबद्दलची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले होते. यासोबतच शेलार यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे ट्विट शेलार यांनी केले आहे. मोदी सरकारने अतिशय तत्परता दाखवल्याचेही शेलार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई - ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांना वेठीस धरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्याने महामंडळाने वेतनकपातीचा निर्णय घेतला. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. 'ना काम ना दाम' या तत्त्वानुसार संपाच्या प्रत्येक दिवसासाठी आठ दिवसांची वेतनकपात करण्यात येईल. म्हणजे ३६ दिवसांचे वेतन कापण्यात येईल. शिवाय, संपकाळात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाल्याबद्दल प्रत्येक कामगाराचे चार दिवसांचे वेतन कापण्यात येईल. ऑक्‍टोबरच्या पगारातून चार दिवसांचे; तर उर्वरित ३६ दिवसांचे वेतन सहा महिन्यांत कापण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनांनी १७ ते २० ऑक्‍टोबरदरम्यान संप केला होता. संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या काळात महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या संपाविरोधात प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, कर्मचाऱ्यांची पगारकपात करण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात मुंबई औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार एक दिवसाचा संप केल्यास संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा नियम आहे. विविध मागण्यांसाठी महामंडळातील काही कर्मचारी २०१५ मध्ये एक दिवसाच्या संपावर गेले होते. त्या वेळी कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांचे वेतन कपण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आठ दिवसांची वेतन कपात झाली नव्हती.

मुंबई - सरकारने एखाद्या जनहितार्थ प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतील तर काही लोकांच्या हितासाठी तो प्रकल्प थांबवला जाऊ शकत नाही,अशी भूमिका मांडत सरकारने समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे समर्थन केले. या प्रकल्पामुळे राज्यातील बहुतांशी नागरिकांना लाभ होणार असून नव्या शहरांचा विकास होण्याची शक्यता आहे, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवदे ग्रामपंचायत व ९२ शेतकºयांनी समृद्धी महामार्गाविरुद्ध अ‍ॅड. रामेश्वर गीते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामार्गासाठीची सुमारे ८४ टक्के जमीन शेतजमीन असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारने या महामार्गासाठी पर्यायी जागा शोधावी किंंवा प्रस्तावित महामार्गाला समांतर असलेल्या घोटी-सिन्नर याच महामार्गावरून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विकास करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे.
मुंबई-नागपूर अशा ७०१ कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. हा लोकोपयोगी प्रकल्प काही लोकांच्या हितासाठी थांबवला जाऊ शकत नाही. या प्रकल्पामुळे लोकांना मोठा लाभ होणार आहे. या मार्गाच्या आजूबाजूला नवीन शहरांचा विकास होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे सरकारने याचिकेला उत्तर देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

पंढरपूर - राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे झाले असून खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीनिमित्त सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते असून या रस्त्यांवर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पाटील यांनी यापूर्वीही रस्त्यावर खड्डे नसतील, असा दावा केला होता. मात्र यानंतरही राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे आता तरी चंद्रकांत पाटील दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केल्याने त्यांचा दर्जा चांगला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कोकणातील रस्ते पावसाळ्यापूर्वी चांगले केले होते, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे - आणीबाणीच्या काळात देशात पुन्हा लोकशाही रुजावी यासाठी अनेकांनी संघर्ष केला. या संघर्षामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पण पक्षवाढीसाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’ नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.सोमवारी धुळे येथे मदनलाल मिश्रा यांच्या ‘आणीबाणी- चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला एकनाथ खडसे उपस्थित होते. भाषणादरम्यान खडसे यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली. देशात पुन्हा लोकशाही रुजावी आणि नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी अनेकांनी आणीबाणीच्या काळात संघर्ष केला. हा संघर्ष केला नसता तर आज केंद्रात भाजपचा पंतप्रधान आणि १८ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री नसते, अशी आठवण खडसेंनी करुन दिली. सध्याच्या तरुण पिढीला हा इतिहास माहित नसून सध्याच्या अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार- खासदारांचे विशेष वर्गही घ्यावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणीत संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारख्या त्यागी नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे असेच सुरु राहिले तर जुन्या माणसांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला.नवी दिल्ली- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सरदार पटेल यांचे योगदान विस्मृतीत जावे, यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. 
‘सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत आहे. त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान आहे. पण सरदार पटेल यांचं योगदान लोकांनी विसरावे, यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तरीही देशातील तरुणांच्या मनात सरदार पटेल यांच्याविषयी अतिशय आदराची भावना आहे. देश एकसंध ठेवण्यात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळेच देशातील तरुणाई त्यांच्याकडे आदराने पाहते,’ असेही मोदींनी म्हंटले.

नवी दिल्ली - मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या योजनेच्या अपशयाचा मोठा फटका सैन्याला बसला आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेतील प्रकल्पांना गती न मिळाल्याने शस्त्रास्त्रे आणि आवश्यक सामग्रीचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होऊ शकलेले नाही. लालफितशाही, कंटाळवाणी सरकारी प्रक्रिया, तांत्रिक अडचणी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे अनेक प्रकल्प अडकून पडले आहेत. गेल्या ३ वर्षांमध्ये एकही मोठा प्रकल्प पूर्ण न झाल्याने संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून साडेतीन लाख कोटींचे ६ मोठे प्रकल्प अडकले आहेत. या प्रकल्पांमध्ये फ्युचर इन्फंट्री कॉम्बट व्हिइकल्स (एफआयसीव्ही), लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स, नेव्हल मल्टी-रोल चॉपर्स, जनरल स्टेल्थ सबमरीन, फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट, माईन काऊंटर मेजर व्हेसल्स (एमसीएमव्ही) यांचा समावेश आहे. लालफितशाहीच्या कारभारात अनेक मोठे प्रकल्प अडकल्याने देशाच्या संरक्षण सिद्धतेवर परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली - रेल्वेकडून लवकरच आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. सध्या रेल्वे तिकिटासाठी आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता तिकीट आरक्षित करताना आणि ते रद्द करताना भरावा लागणाऱ्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी वेगळा पर्याय दिला जाणार आहे. याबद्दलची सूचना रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागांना देण्यात आली आहे. ‘तिकीट अर्जात पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे एम आणि एफ असे दोन पर्याय देण्यात येतात. मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी टी हा पर्याय द्यावा,’ अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्व बोर्डाने सर्व विभागांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक न्याय मंत्रालयाकडून तृतीयपंथीयांसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख आहे. तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक २०१६ चा संदर्भही या पत्रात आहे.

मेरठ - मेरठमध्ये एका शंभर वर्षाच्या दलित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर रूग्णालयात उपचार घेत असताना या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे मेरठ शहर हादरून गेलं आहे.
रघुनाथपूर गावात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. रविवारी ही वृद्धा आजारी असल्यामुळे घराच्या अंगणात झोपली होती. रात्री जेव्हा तिच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा घरातील लोकांनी बाहेर येऊन पाहिले असता गावातील अंकीत पुनिया नावाचा व्यक्ती तिच्यावर बलात्कार करत असल्याचं दिसलं. अंकीत दारूच्या नशेत होता. वृद्धेच्या घरच्यांना पाहून अंकीतने तिथून पळ काढला. या वृद्धेच्या घरच्यांनी रात्रीच १०८ नंबरवर फोन करून रूग्णवाहिका बोलावली आणि त्यांना आधी पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंकीतला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.चेन्नई - तमिळनाडूतील ग्रॅनाईट गैरव्यवहार प्रकरणी चेन्नईतील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी "ईडी'ने काही ग्रॅनाईट व्यावसायिकांशी संबंधित ५१७ स्थावर मालमत्ता जप्त केल्या असल्याचे सांगण्यात आले.
पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे "ईडी'च्या संयुक्त संचालकांनी स्पष्ट केले. या ग्रॅनाईट व्यावसायिकांच्या विरोधात २०१३ मध्ये पोलिसांत प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी सरकारच्या मालकीच्या जागेतून विविध रंगी ग्रॅनाईट खनिजाचे उत्खनन केल्याचा आरोप या व्यावसायिकांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे.
२००१ ते २०१२ या काळात हा गैरव्यवहार झाला असल्याचे "ईडी'चे म्हणणे आहे. या प्रकरणी "ईडी'ने दोनशे कोटी रुपये किमतीच्या५१७ स्थावर मालमत्ता जप्त केल्या असल्याचे सांगण्यात आले. "ईडी'ने या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात कारवाईच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मुंबई - झोपु योजनेतल्या मनमानीसाठी विकासक संघटित गुन्हेगारी टोळीला हाताशी धरून गरीब झोपडीधारकांचा विरोध मोडून काढतात, हे स्पष्ट करणारी अलीकडच्या काळातली दुसरी कारवाई गुन्हे शाखेने केली. दिंडोशीतील झोपू योजनेत अमी कन्स्ट्रक्शन, प्राडिग्राम या विकासक कंपन्यांच्या आड येऊ नका, अशी धमकी कुख्यात गुंड रवी पुजारीने रहिवाशांना दिली आहे. या प्रकरणी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने पुजारी विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्या तीन साथीदारांना बेडय़ा ठोकल्या आहेत.दशरथ शिंदे ऊर्फ आत्माराम पाटील, सुनील जाधव ऊर्फ दया आणि विक्रांत वरंदानी अशी अटक आरोपींची नावे आहेत. शिंदे हा पुजारीचा विश्वासू साथीदार असून त्याच्यावर मुंबई, ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे २० गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ांची नोंद आहे. अलीकडेच तो ठाण्याच्या एका मोक्का प्रकरणातून जामिनावर बाहेर आला होता. मात्र अटकेत असताना ठाणे मोक्का न्यायालयातून शिंदेने तक्रारदाराला धमक्या दिल्या होत्या.दिंडोशी, खडकपाडा येथे सुमारे पाचशे झोपडय़ा, बठय़ा चाळींच्या साई विसावा सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपू योजना राबविण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी व कायदेशीर सल्ल्यासाठी निर्वाणा एंटरप्रायझेसची नियुक्ती केली. तर अमी कन्स्ट्रक्शनला विकासक म्हणून नेमले. प्रक्रिया सुरू झाली आणि सर्वेक्षणात पाचशेपकी फक्त ९० झोपडीधारक पात्र ठरले. त्यानंतर सल्लागार निर्वाणा व संस्थेच्या प्रतिनिधींनी जाब विचारण्यास सुरुवात केली. हे सुरू असताना अमी कंपनीने कोणालाही विश्वासात न घेता प्राडिग्राम कंपनीला भागीदार केले. त्यामुळे रहिवाशांचा विरोध वाढला. या पाश्र्वभूमीवर निपुण ठक्कर(अमी), पार्थ मेहता(प्राडिग्राम) यांनी तोडगा काढण्यासाठी जुहूत बैठक घेतली. त्यात या दोघांचा प्रतिनिधी विक्रांत याने विरोध मागे घ्या, माझ्या संघटित टोळीतल्या अनेक गुंडांशी ओळखी आहेत, अशी धमकी दिली. जुलैमध्ये रहिवाशांच्या प्रतिनिधीला ठाणे न्यायालयात सुनावणीस आलेल्या शिंदे याने पुजारीचे नाव घेत धमकावले. तर ८ सप्टेंबरला थेट पुजारीने फोन करून धमकावले. शिंदेकडून आलेले धमकीचे फोन रेकॉर्ड पुरावा म्हणून देण्यात आला आहे.

मुंबई - फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपा आणि मनसेवर आरोपांच्या फैरी झाडल्या. हप्तेबाजी सुरू राहावी, यासाठी फेरीवाल्यांना नियमित केले जात नाही. मनसेचेही काही नेते फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात, असा आरोप निरूपम यांनी केला. फेरीवाल्यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्यास काहीही चुकीचे नसल्याचे सांगत निरूपम म्हणाले की, फेरीवाले जिथे कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र, जिथे फेरीवाले मजबूत असतील तर तिथे मनसेला मार खावाच लागेल. मनसेचे कार्यकर्ते गेले अनेक दिवस मुंबई आणि उपनगरात मारहाण करतात; परंतु गुन्हा दाखल होत नाही. मनसे अध्यक्ष परवानगीशिवाय मोर्चा काढतात, तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही; पण मी फेरीवाल्यांसोबत बैठक घेतली, तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप निरूपम यांनी केला. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. मुख्यमंत्री आणि आयुक्तांना कोण रोखत आहे. कोणाला अवैध फेरीवाले बंदच करायचे नाहीत. त्यांना हा धंदा सुरूच राहावा असे वाटते. या फेरीवाल्यांकडून अनेक पक्षातील नेते हप्ता घेतात. मनेसेचेही काही नेते हप्ता घेतात. त्यांची नावे मी लवकरच सांगणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई - एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन केल्या प्रकरणी रविवारी अंधेरी पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे अशी माहिती मुंबई पोलीस दलातील डीसीपी दीपक देवराज यांनी दिली. गुरुवारी दुपारी एक व्यक्ती मेट्रो स्टेशनवरच्या जिन्याजवळ हस्तमैथुन करत असल्याचे महिलेला आढळले.मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यानंतर मी एका व्यक्तीला हस्तमैथुन करताना पाहिले. माझ्याआधी दोन महिलांनी सुद्धा हे दृश्य पाहिले व त्यांनी रेल्वे स्टेशनवरच्या सिक्युरिटीला माहिती दिली. सुरक्षारक्षक या व्यक्तीच्या दिशेने गेल्यानंतर तो शिडीवरुन खाली उतरुन पळून गेला. सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. फक्त तो तिथून निघून जाईल एवढेच पाहिले असे तक्रार दाखल करणा-या महिलेने म्हटले आहे. या महिलेने घाटकोपर मेट्रो स्थानकात लिखित तक्रार दिली त्यानंतर टि्वटरवरुन मेट्रोच्या अधिका-यांना माहिती दिली. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने या टि्वटला प्रतिसाद देताना म्हटले आहे कि, तुमचा मेसेज मिळाला. प्रवाशांची सुरक्षा मुंबई मेट्रोसाठी सर्वात महत्वाची आहे. आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेतली असून, असे प्रकार रोखण्यासाठी उपायोजना सुरु केल्या आहेत. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला पोलीस तक्रार दाखल करण्याची विनंती करतो असे मुंबई मेट्रोने म्हटले आहे.

माथेरान - माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. सुरक्षिततेची पूर्तता केल्यानंतर नेरळ ते माथेरान ही सेवा सुरू केली जाईल. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक पर्वणीच होती. मोठय़ा संख्येने येणारे पर्यटक या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद लुटतात. तसेच स्थानिकांच्या वाहतुकीचेही हे एक साधन बनले. मात्र जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या. दोन घटना तर रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा मे २०१६ पासून बंदच ठेवण्यात आली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने केलेल्या सुरक्षा उपाययोजनांपैकी नेरळ ते माथेरानपर्यंत संरक्षक भिंतीचे तसेच रुळांचे काम हाती घेण्यात आले. यातील अमन लॉज ते माथेरानपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या दरम्यानची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गादरम्यान बारा फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

सावंतवाडी - मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलीस व रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्लॅटफॉर्म व डब्यांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी, तसेच केंद्र शासनाच्या निर्भया निधीतून सुरक्षेसाठी निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना गृह विभागाचे राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी नुकत्याच येथे दिल्या. उपनगरीय लोकल रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आमदार नीलम गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात महिला प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.त्या वेळी आमदार नीलम गोऱ्हे, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एम. प्रसन्न, पश्चिम रेल्वेचे सहायक सुरक्षा आयुक्त सी.व्ही. उपाध्ये, अनिल नायर यांच्यासह तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे, सुझान फ्रान्सिस, निकिता जैतपाल, वैशाली वाढे, नीलिमा चिमोटे, आशा डिसोझा आदी या वेळी उपस्थित होते.

अलिबाग - रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच आता स्वच्छतेसाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. गडावर प्लास्टीक बंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापुढे पर्यटकांना गडावर प्लास्टिक बाटली अथवा पिशवीबंद खाद्यपदार्थ न्यायचे असल्यास यापुढे अनामत रक्कम भरावी लागणार आहे. रिकामी बाटली अथवा पिशवी परत दिल्यावरच ही अनामत रक्कम पर्यटकांना परत मिळणार आहे. तमाम शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या किल्ले रायगडाला दरवर्षी लाखो शिवभक्त भेट देतात. या भेटी दरम्यान ते गडावर खाद्य पदार्थ आणि प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या मोठय़ प्रमाणात घेऊन येतात. या बाटल्यानंतर अस्ताव्यस्तपणे गडावरील परिसरात पडून राहतात. यामुळे किल्ल्यावर अस्वच्छता पसरते. शिवप्रेमी आणि स्थानिक प्रशासनाकडून अधुनमधून गडावर स्वच्छता मोहीमा राबविल्या जातात. पण प्लास्टिक कचऱ्याचा ओघ निरंतर सुरु राहतो. ही बाब लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्यावर प्लास्टीक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची गरसोय होऊ नये. म्हणून यापुढे गडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला प्लास्टिक बाटली आणि खाद्यपदार्थाच्या पिशव्यांमागे प्रत्येकी २५ रुपयांची अनामत रक्कम रोपवेजवळ जमा करावी लागणार आहे. गडावरूनखाली आल्यावर प्लास्टीकची रिकामी बाटली आणि रिकाम्या पिशव्या जमा केल्यावर अनामत रक्कम पर्यटकांना परत मिळणार आहे.

मुंबई - 'हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही आहे', असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. यावर सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला मारला आहे. 
''कोणीही एकटा नेता किंवा पक्ष देशाला महान बनवू शकत नाही. प्राचीन युगात विकासासाठी लोक देवाचा धावा करीत असत, कलियुगात लोक त्यासाठी सरकारकडे पाहतात'', सरसंघचालकांनी सत्य सांगितले आहे. पण ''सत्य आणि स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसत आहे काय? प्रभू श्रीराम व लाखो कश्मिरी पंडितही सरकारकडेच डोळे लावून बसले आहेत'', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आमदार पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मिळवताना त्यांनी कारखान्याची जमीन त्यांनी तारण म्हणून ठेवली होती. हीच जमीन आमदार पंडित यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-या व्यक्तीस साडेतीन लाख रुपयांना विकली. त्यामुळे बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या तक्रारीवरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई - वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे गुरुवारी कारवाई सुरू असतानाच, दुपारी लागलेल्या आगीप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी शाबीर खान (२९), या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. येथील पाडकामाची कारवाई थांबविण्यासाठी शाबीर खान याने आग लावल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, त्याला साथ देणाऱ्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या अवैध बहुमजली झोपडपट्टीत पाडकामाच्या कारवाईला सुरुवात केली. दुपारी येथील अधिकारी कारवाई करून जेवायला गेले. हीच संधी साधून खान याने एका झोपडीला आग लावली आणि याच घरातील घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. परिणामी, आगीने सर्वत्र पेट घेतला. खान याचा गारमेंटचा व्यवसाय असल्याचे पोलिसानी सांगितले.
या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असतानाच या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. 

अहमदाबाद - जेट एअरवेजच्या मुंबई – दिल्ली विमानाचे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे लँडिंग करण्यात आले असून बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे. जेट एअरवेजचे ९डब्ल्यू ३३९ हे विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले. पहाटे तीनच्या सुमारास विमानाने मुंबईतून उड्डाण केले. मात्र पावणे चारच्या सुमारास विमानाचे अहमदाबादमध्ये लँडिंग करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले असून सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे. विमानात ११५ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स होते.

नवी दिल्ली (पीटीआय) - चीन आणि पाकिस्तान सीमेवरील तणाव, देशांतर्गत नक्षलवाद आणि अन्य विघटनकारी शक्तींचे वाढलेले प्राबल्य लक्षात घेता भारतीय लष्कराने आधुनिकीकरणासाठी वेगाने पावले उचलायला सुरवात केली आहे. लष्कराचेच अभिन्न अंग असणाऱ्या पायदळालाही आता "मॉडर्न टच' मिळणार आहे. हलक्‍या पण प्रखर भेदक क्षमता असणाऱ्या मशिनगन, बंदुका आणि रायफलीही खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी लष्कराने ४० हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे, जुन्या शस्त्रांची जागा आधुनिक शस्त्रे घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. 
सात लाख रायफली, ४४ हजार हलक्‍या मशिनगन आणि ४४ हजार ६०० कार्बाईन बंदुका खरेदी केल्या जाणार असून, ही एक मोठी खरेदी प्रक्रिया आहे. संरक्षण मंत्रालयाने याला हिरवा कंदील दर्शविल्यानंतर लष्करानेही त्यांच्या खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उच्चस्तरीय पातळीवर जरी शस्त्र खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असलीतरीसुद्धा ही शस्त्रे लवकरात लवकर आमच्या हाती यावीत अशी अपेक्षा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पाटणा - युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमारला बेगूसराय किंवा बिहारमधील अन्य एखाद्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे भाकपचे राज्य सरचिटणीस सत्यनारायण सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत कन्हैया कुमारला कल्पना देण्यात आली आहे का?, कन्हैयाचा होकार आहे का?, अशी विचारणा केली असता कन्हैयाशी बोलणं झालं आहे आणि त्याने होकार दिला आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
कन्हैया बेगूसरायमधील बरौनीजवळच्या बिहटमधील रहिवाशी असून तो काही दिवसांपूर्वीच बेगूसरायला आला होता. त्याने या भागात दौरा करून लोकांशीही संवाद साधला, असेही सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सेल्फीची मोठी क्रेझ सध्या दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मादी यांनीही ‘सेल्फी विथ डॉटर’ ही मोहीम सुरू केली होती. तेव्हा हजारो लोकांनी आपल्या मुलींबरोबरची सेल्फी शेअर केली होती. अशीच एक मोहीम आता कोलकातामधील एक स्वंयसेवी संस्थेने गाय वाचवण्यासाठी सुरू केली आहे. ‘सेल्फी विथ काऊ’ असं त्यांच्या अभियानाचे नाव आहे. या अभियानाला ‘काऊफाय’ असे नावही देण्यात आले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे अभियान सुरू करणारी स्वंयसेवी संस्था ‘गो सेवा परिवार’ने म्हटले आहे.या संस्थेशी निगडीत असलेले अभिषेक प्रताप सिंह यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, गायीच्या सुरक्षेची राजकारण किंवा धर्माशी सांगड घालू नये. सामाजिक आणि वैज्ञानिक उपयोगासाठी गायीची सुरक्षा केली पाहिजे. प्रत्येक उत्पादन गायीपासून आहे, विशेष म्हणजे गायीचं शेण आणि गोमूत्रही मूल्यवान असल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन वर्षांपासून रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’ करतात. यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘मन की बात’ सुरु केली आहे. मात्र यासाठी केजरीवाल रेडिओच्या नव्हे, तर पत्राचा आधार घेत आहेत. केजरीवाल दिल्लीतील जनतेशी पत्राच्या माध्यमातून थेट संवाद साधत आहेत. केजरीवालांनी दिल्ली विद्युत बोर्डाच्या निवृत्ती वेतनधारकांना आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतून प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले आहे.कोणतीही समस्या असल्यास ईमेल किंवा फोनच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केजरीवालांनी पत्राच्या माध्यमातून केले आहे. लोकांनी त्यांच्या समस्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवल्यास तातडीने पावले उचलली जातील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. केजरीवाल येत्या काही दिवसांमध्ये ५ लाख पत्र लिहिणार आहेत. आतापर्यंत त्यांनी ४० हजार पत्र लिहून जनतेशी संवाद साधला आहे. ५ लाखांपेक्षा अधिक पत्र लिहिण्यात आल्यावर दुसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही पत्र लिहिली जाऊ शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिल्लीत विविध योजनांमधून १० लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.दिल्लीतील जवळपास ३१ हजार मुलांना ईडब्ल्यूएस श्रेणीतून शाळेत प्रवेश मिळाला आहे. या मुलांच्या पालकांना केजरीवालांनी पत्र लिहिले आहे. यासोबतच निवृत्ती वेतनासह विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी मदत स्वीकारणाऱ्या ५ लाख लोकांना केजरीवालांकडून पत्र पाठवली जाणार आहेत. ईडब्ल्यूएस श्रेणीतून शाळेत प्रवेश मिळालेल्या पालकांचे केजरीवालांनी पत्रातून अभिनंदन केले आहे.ठाणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे नकोसे वाटत होते. त्यामुळे त्यावेळी नरेंद्र मोदी यांचा जो विजय झाला त्यात निम्मा वाटा राहुल गांधी यांचा होता, असा टोला लगावत, ‘यंदा मात्र राहुल यांना गुजरातमध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे’, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी नोंदवले.
दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांनी शुक्रवारी डोंबिवली व कल्याण ग्रामीण मतदारसंघातील पक्षकार्यकर्त्यांची बैठक घेतली. संध्याकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात गुजरातमधील निवडणुकांचा विषय निघाला. ‘राहुल गांधी यांना गुजरातेत पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतून लोक मधूनच उठून जात असल्याचे दिसते आहे. अशाही स्थितीत गुजरातमध्ये भाजपने १५०पेक्षा अधिक जागा जिंकल्या तर त्यात मतदानयंत्रांचा वाटा मोठा असेल’, अशा टोला त्यांनी लगावला. ‘निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. गुजरातमध्ये निवडणूक वेळेवर जाहीर करणे ही आयोगाची जबाबदारी होती’, असे सांगत राज यांनी निवडणूक आयोगाकडून गुजरात निवडणूक विलंबाने जाहीर केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सातारा - भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला. त्यांच्या शैक्षणिक जीवनाची तेव्हापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी आहे. हा दस्तऐवजही शाळेने जपून ठेवला आहे. सातारामधीलच प्रवर्तन संघटनेचे अध्यक्ष अरुण जावळे यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यात शाळाप्रवेश दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. दोन्ही मंत्र्यांनी त्याची दखल घेऊन बाबासाहेबांनी शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणून त्यांचा शाळाप्रवेश दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरून डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यानंतर कुलगुरुपदाचे दावेदार कोण, असा प्रश्‍न आहे. डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. विभा सुराणा, डॉ. नीरज हातेकर आणि डॉ. नरेशचंद्र या जुन्या चेहऱ्यांचीच चर्चा अधिक आहे. कुलगुरुपद नियुक्ती प्रक्रियेला दीड महिना लागणार आहे. तोपर्यंत प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनाच विद्यापीठाची धुरा वाहावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई -  प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील (आरटीओ) भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, मुंबई मध्य आरटीओने कामकाज प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओमधील लागणारी नागरिकांची रांग कमी करण्यासाठी १६ सेवांकरिता आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधांमध्ये कर भरणे, वाहन हस्तांतरण या सुविधांचादेखील समावेश आहे.
आरटीओ कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिकांच्या नेहमीच रांगा लागतात. अशा वेळी काम लवकर करून देण्याचे आमिष दाखवून, आरटीओ कार्यालयाजवळील एजंटद्वारे नागरिकांकडून पैसे उकळण्यात येतात, तर अर्ज भरून देण्यासाठीदेखील नागरिकांकडून पैसे घेण्याचे प्रकार आरटीओत सर्रास घडतात. याबाबत तक्रारीदेखील आरटीओ कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. यामुळे एजंटला आळा घालण्यासाठी मुंबई (मध्य) आरटीओने १६ सेवांकरिता आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. यात वाहन हस्तांतरण, वाहन चालकांचा मृत्यू झाल्यानंतर वारसाचे वाहन हस्तांतरण, लिलावातील वाहन विक्रीची नोंद घेणे, पत्ता बदलणे, भाडे कराराची नोंद करणे, कराचा भरणा करणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, योग्यता प्रमाणपत्र तपासणीची आॅनलाइन वेळ ठरविणे, वाहनात बदल करणे, नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहन प्रकाराचे रूपांतर करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे आणि व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे या सेवांचा समावेश आहे.

पणजी - गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा विचार आता प्रथमच गोवा सरकारने चालवला आहे. मासे गोमंतकीयांच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाचा घटक. माशांवीना गोमंतकीय व्यक्ती जगू शकत नाही. मात्र अलिकडील काळात गोमंतकीयांना खूपच महागात माशांची खरेदी करावी लागत आहे. प्रचंड प्रमाणात गोव्याहून माशांची निर्यात होते. शिवाय गोव्यातील मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये बहुतांश ताजी मासळी पाठवली जाते. परिणामी सामान्य गोमंतकीय ग्राहकासाठी बाजारात मासळीचा तुटवडा असतो. जे थोडे मासे उपलब्ध असतात ते अत्यंत महाग स्वरूपात खरेदी करून घरी न्यावे लागतात. सरकार आता यावर उपाय काढू पाहत आहे.मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले की, माशांच्या निर्यातीवर बंदी लागू करण्याचा निर्णय यापुढे घ्यावा लागेल. गोमंतकीयांना स्वस्त दरात मासे उपलब्ध व्हायला हवे. गोव्याचे सगळे समुद्र धन परराज्यात आणि विदेशात पाठविले जात असल्याने गोमंतकीयाना स्वस्त दरात मासे मिळत नाहीत.

नाशिक - खुनाचा प्रयत्न, दंगा, वेश्या व्यवसाय अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा उर्फ साबळे (वय २५, रा. विनयनगर) याच्यावर पोलिसांनी शुक्रवारी तडीपारीची कारवाई केली. त्यास लागलीच कसारा येथे सोडण्यात आले आहे.
माजी नगरसेवक संजय साबळे यांचा मुलगा आकाशवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेषतः विनयनगर परिसरातील भारतनगर झोपडपट्टी येथील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर स्थानिक नागरिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आकाश पोलिसांच्या रडारवर आला. दरम्यान, आकाशवर खुनाचा प्रयत्न, दंगा करणे, स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आकाशला तडीपार करण्याच्या दृष्टीने प्रकरणाची चौकशी हाती घेतली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आकाशला शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले.

मुंबई - आग लागल्याने वांद्रे परिसरातील गरीबनगर झोपडपट्टीतील अतिक्रमणे हटवण्याचे काम थांबवावे लागले असले, तरी सोमवारपासून पुन्हा एकदा कारवाई हाती घेतली जाणार आहे. यापूर्वीही अतिक्रमणे हटवताना स्थानिकांचा विरोध तसेच आग लागण्याच्या घटना घडल्याने त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजूनच कारवाई हाती घेतली जाईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.जलवाहिनीच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येत्या डिसेंबर अखेपर्यंत ही अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात असली, तरी वांद्रे पूर्व, कुर्ला तसेच वडाळा भागात अतिक्रमणे हटवताना पालिकेला विरोध सहन करावा लागत आहे. वांद्रे येथील गरीबनगर परिसरात अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावून त्यानंतर गुरुवारी कारवाई करण्यात आली. मात्र रेल्वे स्थानकानजिकच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याने ही कारवाई आटोपती घ्यावी लागली.यापूर्वीही अनेकदा या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. अतिक्रमणे हटवताना अनेकदा आग लागते. मात्र न्यायालयाचा आदेश असल्याने ही कारवाई पुढे सुरू ठेवली जाणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीत भस्मसात झालेल्या झोपडय़ांच्या आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी कारवाई केली गेली नाही. सोमवारपासून तानसा जलवाहिनीच्या इतर भागातील झोपडय़ाही तोडल्या जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गांधीनगर - गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. मोदी यांनीही गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते राज्यात ५0 ते ७0 जाहीर सभा घेणार आहेत.
या वर्षी काँग्रेस व राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे. तेथील लोकांमध्ये असलेले सरकारविरोधी वातावरण व नाराजी यांचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, ते यशस्वी होऊ नयेत, यासाठी स्वत: मोदीच गुजरातमध्ये सभा घेत फिरणार आहेत. या सभा दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातेत होतील. मोदी यांनी या महिन्यात तीनदा तर वर्षभरात १0 वेळा गुजरातचा दौरा केला. भाजपा आणि मोदी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचेच हे संकेत आहेत. 
पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल २ वा ३ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते अधिकृतपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील, असे सांगण्यात आले. ते तसेच नरेंद्र पटेल, जिग्नेश मेवाणी, निखिल वसाणी हे नेते काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

नवी दिल्ली - ताजमहाल परिसरातील बहुस्तरीय मोटार पार्किंग पाडून टाकण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आग्रा येथे ताजमहाल नजीक हे पार्किंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असून हे पार्किंग सतराव्या शतकातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या ताजमहालच्या पूर्व दरवाजापासून एक कि.मी. अंतरावर आहे. या पार्किंगचे पुढील बांधकाम मात्र थांबवण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे. न्या. एम.बी.लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी अतिरिक्त सरकारी वकील तुषार मेहता यांना सांगितले, की ताज ट्रॅपिझियम झोन व आजूबाजूच्या भागांच्या संरक्षणाबाबतचे सर्वसमावेशक धोरण नेमके काय आहे ते उत्तर प्रदेश सरकारने सांगावे. ताज ट्रॅपिझियम झोन हा ताजमहाल भोवतीचा १०४०० चौरस किमीचा परिसर असून तो ऐतिहासिक ताजमहालचे रक्षण करण्यासाठी आहे. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, की ताज महालचे रक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. याबाबतचे सर्वंकष धोरण न्यायालयाला सादर करण्यात येईल. न्यायालयाने याप्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरला बहुमजली मोटार पार्किग पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. पर्यावरणतज्ज्ञ एम.सी.मेहता यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. ताज महालचे संरक्षण व विकास कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले आहे. मेहता यांनी याचिकेत म्हटले आहेत की, ताजमहालचे विषारी वायू व जंगलतोडीपासून संरक्षण करावे. 

कॅटलान - गेल्या चार वर्षांपासून स्वतंत्र होण्यासाठी धडपड करणाऱ्या स्पेन पूर्वेतील कॅटलान प्रातांच्या पार्लमेंटने शुक्रवारी स्पेनपासून वेगळे होत स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी मतदानापूर्वीच विरोधकांनी सभात्याग करीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर कॅटलानच्या प्रांतीय पार्लमेंटने स्वत:ला स्वतंत्र्य घोषित केल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांनी ट्वीट करीत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. स्पेनने कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याला आधीपासूनच विरोध केला असून मॅडरिड सरकार कॅटलानची सुत्रे हातात घेण्याच्या तयारीत आहे. हा ठराव कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करीत स्पेनसोबत कॅटलानला समान दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पारित करण्यात आला आहे. कॅटलान पार्लमेंटच्या ७० सदस्यांनी स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले. तर या विरोधात १० सभासदांनी मतदान केले. तर दोन सभासद अनुपस्थित होते. १३५ सदस्यांच्या कॅटलना पार्लिमेंटमध्ये विरोधकांनी या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला. दरम्यान या स्वायत्त प्रदेशाला कलम १५५ नुसार स्पेनच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा ठराव स्पेनकडून मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. स्पेनपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबाबत जनमताचा कौल घेण्यात आला होता. या वेळी लष्कर आणि जनतेच्या चकमकीत सुमारे ४०० लोक जखमी झाले. तर केवळ ४२ टक्के जनतेने मतदान केले. त्यातील ९० टक्के जनतेने स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने कौल दिला होता.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात फेरबदलाची शक्यता आहे. विभागीय संतुलन पाहता, मुख्यमंत्री (नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन), वित्तमंत्री, सामाजिक न्याय, कृषी, ऊर्जा, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व अन्न आणि नागरीपुरवठा सोडले, तर महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे नाहीत, तसेच संख्याबळही कमी आहे. हा राजकीय अनुशेष विस्तारात भरून काढला जाऊ शकतो. मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच नाही. हा अनुशेष सर्वाधिक आहे. एकाच वेळी विरोधी पक्ष व शिवसेनेशी सामना करीत, तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा टक्का वाढू शकतो. विदर्भातील एक-दोन मंत्र्यांना कामगिरीच्या आधारे वगळले जाऊ शकते. त्यात एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसे झाल्यास विदर्भातून किमान दोन नवे चेहरे दिसू शकतील. मुंबईत विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यापैकी मेहतांवर संक्रांत येऊ शकते. मात्र, मुंबईला आणखी एक मंत्रिपद नक्की दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला मंत्री आहेत. त्यातही ठाकूर यांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नाशिक शहरातून महिला आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. या जिल्ह्यात भाजपाचा एकही मंत्री नाही.मुंबई - खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत. यामध्ये दोन ते तीन महिन्यांत आणखी १ हजार २०० बस दाखल होणार आहेत. या बस वातानुकूलित असून, त्यामध्ये आरामदायी आसने आणि एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे शिवशाही बसचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एसटीच्या ताफ्यात १६ शिवशाहीर बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बससाठी निविदा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांमध्ये १ हजार २०० शिवशाही बस दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली.मुंबई - तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बोलघेवड्या, कृतिशून्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. ३१ ऑक्‍टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. तर, आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. या वेळी "राष्ट्रवादी'ने "भाजपचे तीन साल, महाराष्ट्र बेहाल' अशी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारी माहिती पुस्तिका प्रकाशित केली. यामध्ये सरकारने या तीन वर्षांत जनतेचा जो भ्रमनिरास केला, त्याबद्दलची माहिती संकलित केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आणि टीव्हीवर चाललेली मुख्यमंत्र्यांची जाहिरात पाहिली, त्यात त्यांनी "प्रामाणिक' कर्जमाफी असा शब्द वापरला आहे. मात्र, ही कर्जमाफी अप्रामाणिक असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रमाणिक या शब्दापुढे "अ' लावावा अशी कर्जमाफीची परिस्थिती असल्याची टीका तटकरे यांनी केली. परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

सोलापूर - विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. केंद्रातील मोदी सरकारला साडेतीन वर्षे तर राज्यातील फडणवीस सरकारला आता कोठे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र कोणताही राजकीय मुद्दा नसल्यामुळेच विरोधकांकडून लोकसभा व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची हूल उठविली जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. शुक्रवारी दुपारी सोलापुरात भंडारी आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेजारच्या गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतरही महाराष्ट्र विधानसभेला व लोकसभेला बराच कालावधी शिल्लक राहिलेला असताना मध्यावधी निवडणुका घ्यायच्या कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. सोलापुरात पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात उफाळलेल्या संघर्षांकडे लक्ष वेधले असता त्यावरही भंडारी यांनी सावध उत्तर दिले. दोन्ही देशमुखांनी पक्षवाढीसाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे पक्षाला मोठा लाभ झाला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर - सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून चार महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. हा निर्णय घेताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे साहजिकच प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यांच्यासमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळेच पुन्हा एकदा पुजारी आणि समिती आमनेसामने आले आहेत. प. महाराष्ट्र देवस्थान समितीने पुजाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. इतकेच नाही तर कॅमेरे बंद केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजताच पुजारी हटाव संघर्ष समितीने या पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत या बैठकीतून पुजाऱ्यांना बाहेर काढले. महालक्ष्मी देवीच्या थेट प्रक्षेपणासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने गुरूवारी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र संध्याकाळीच हे कॅमेरे पुजाऱ्यांनी बंद केले. इतकेच नाही तर शुक्रवारी सकाळी हे कॅमेरे कापडात बांधून ठेवले होते. या प्रकाराबाबत समितीने तातडीने पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींसह कार्यालयात बैठक बोलावली. शुक्रवारी बैठक सुरू होताच समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पुजाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. या बैठकीत पुजाऱ्यांच्या वतीने बाबूराव ठाणेकर, माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर, अनिल कुलकर्णी आणि गजानन मुनीश्वर या सगळ्यांनी समितीला निवेदन दिले. समितीने बळजबरीने कॅमेरे लावून पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे तेव्हा हे कॅमेरे त्वरित काढून घ्यावेत. तसे न झाल्यास समितीविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा पुजाऱ्यांनी यावेळी दिला.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget