November 2017

मुंबई - राजकीय व्यक्तींना सरकारी तिजोरीतून वा करदात्या जनतेच्या पैशातून पोलिस संरक्षण का दिले जाते? त्याऐवजी हा खर्च संबंधित नेत्याच्या पक्षाने केला पाहिजे, असे परखड मत मुख्य न्या. मंजुला चेल्लूर यांनी बुधवारी व्यक्त केले.खासगी व्यक्ती आणि राजकीय व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पोलिस संरक्षणासाठी सुमारे एक हजार पोलिस तैनात करण्यात आल्याचे याविषयी केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे. पोलिस संरक्षणासाठी झालेल्या खर्चापोटीचे लाखो रुपये खासगी व्यक्तींकडून थकवण्यात आले आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्या. चेल्लूर यांनी राज्य सरकारला वरील विचारणा केली. एखाद्या व्यक्तीला धमक्या येत असल्याने त्याला पोलिस संरक्षण दिले जाते; मात्र धमक्या येणे बंद झाल्यानंतरही पोलिस संरक्षण सुरूच असते. त्याची सातत्याने तपासणी झाली पाहिजे, असे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी बुधवारी सरकारला बजावले.

मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ जानेवारीला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी आयसिसने दिली. याबाबतचे धमकीपत्र विमानतळाच्या कार्गोच्या शौचालयात सापडल्याने खळबळ उडाली. त्यामुळे सीआयएसएफ परिसराची कसून तपासणी करत असून शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हे पत्र कार्गो टर्मिनल इमारतीच्या शौचालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना सापडले. आयसिस या दहशतवादी संघटनेकडून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर येत्या २६ जानेवारी रोजी हल्ला घडवून आणण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस आणि सी.आय.एस.एफ यांनी मिळून तातडीने कार्गो परिसर रिकामा करून तपास करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (३ विशेष), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूर (६ विशेष) आणि सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (२ विशेष) अशा मार्गांवर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष ट्रेनमुळे राज्यभरातून चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणे सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांनी प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे. या गाड्यांचा लाभ मध्य प्रदेश तसेच कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांंना होणार आहे.औरंगाबाद - युती सरकारने नेमलेले शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ औरंगाबाद खंडपीठाने घटनाबाह्य ठरवले आहे. एवढेच नाहीतर नव्या विश्वस्त मंडळात विद्यमान सदस्यांचा समावेश करू नये, असे स्पष्ट निर्देशही हायकोर्टाने दिलेत. युती सरकारने १८ जुलै २०१६ रोजी बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांना शिर्डी संस्थानचं अध्यक्षपदी बसवत नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती. पण या विश्वस्त मंडळाची नियुक्ती ही नियमबाह्य पद्घतीने झाल्याचा मुद्दा उपस्थित करत याचिकाकर्ता संजय काळे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमलेले विश्वस्त हे मंडळ पूर्णतः राजकीय स्वरूपाचे असून त्यांच्यावर गुन्हे आहेत, मंडळ नेमताना सरकारने हायकोर्टाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे हे मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिलाय. शासनाने २ दोन महिन्याच्या एका विशेष समिती स्थापना करून शिर्डी संस्थानचे नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे, तोपर्यंत विद्यमान विश्वस्त मंडळच संस्थानचा काळजीवाहू कारभार पाहिल पण त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असेही न्यायाधिशांनी म्हटले आहे युती सरकारसाठी हा खूप मोठा दणका मानला जातो.

मुंबई - ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याबद्दल खासगी गृहसंस्थांना दंड ठोठावणाऱ्या महापालिकेने मंत्रालयालाही नोटीस बजावली आहे. १०० किलोहून अधिक कचरा निर्मिती करणाऱ्या इमारतींना कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. या इमारतींनी तीन महिन्यांची मुदत मागितली होती, मात्र उपाययोजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेने आता मंत्रालय आणि इतर सरकारी कार्यालयांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात एकूण १४१ इमारतींचा समावेश आहे.

अहमदनगर - कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु न निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले होते. या प्रकरणी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक झाली होती. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर एक वर्ष चार महिन्यांत निकाल आला.या गुन्ह्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५,कोपर्डी) याला बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी तर संतोष गोरख भवाळ (वय ३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) यांना या कटात सहभागी असल्याच्या कारणावरुन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सकाळी साडेअकरा वाजता शिक्षा सुनावण्याचे कामकाज सुरु झाले. यावेळी न्यायदान कक्ष गर्दीने तुडूंब भरला होता. न्यायाधीशांनी तिनही आरोपींना आरोपी बसण्याच्या जागेवरुन न्यायपिठासमोर बोलावले. त्यानंतर निकालपत्र वाचत प्रत्येकाला शिक्षा सुनावली. न्यायदानकक्षात पहिल्याच रांगेत पीडितेची आई, बहीण, भाऊ व इतर नातेवाईक निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. निकाल ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. सकाळपासूनच न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त होता.एका वेदनेच्या प्रवासाला कोपर्डी (ता. कर्जत) येथून प्रारंभ झाल्यानंतर त्याचे आक्रोशात रूपांतर झाले, आंदोलनाने समाजजीवन ढवळून निघाले. तिघांच्या फाशीच्या शिक्षेने न्याय मिळाला. तिघा आरोपींच्या कुटुंबाने गाव सोडले असले, तरी त्यांचे नातेवाईक गावात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वसई - २६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सचिन देसाई यांनी आपल्या मोबाईल नंबरवरून वसई ग्रीन क्लीन वसई ग्रुपवर शहीद अधिकाºयांना श्रद्धांजली वाहणारा बॅनर टाकला आहे. त्यात शहीदांच्या रांगेतून हेमंत करकरे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्याऐवजी सध्या हयात असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया आणि सदानंद दाते यांचा फोटो टाकण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये अनेक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सभापती, नगरसेवक, विविध पक्षांचे पुढारी, समाजसेवक, पत्रकार आहेत. त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही.
मात्र मनसेचे नालासोपारा शहर सचिव राज नागरे यांना हा प्रकार लक्षात येताच निषेध नोंदवला. याप्रकरणी देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी देसाई यांनी माफी मागण्याची मागणी केली असता पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर देसाई यांनी याप्रकरणी माफी मागून अशी चुक पुन्हा करणार नाही, याची ग्वाही दिली.

सातारा/ पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगदाजवळ अपघात झाला आहे. बोगदा पार करून पुढे जाणाऱ्या खासगी बसला मागून वेगाने येणाऱ्या दूधाच्या टँकरने धडक दिल्याने हा अपघात झाला. टँकरची धडक बसला बसल्याने त्या बसची धडक त्याच्या पुढे असलेल्या ट्रकला बसली नंतर तो ट्रक रांगेत असलेल्या दुसऱ्या ट्रकवर धडकून हा अपघात झाला. या अपघातात नागपूरहून सहलीसाठी आलेले १२ विद्यार्थी व बस आणि टॅकरचालक जखमी झाले .एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले आहे . घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खांबाटकी बोगदा ते धोम -बलकवडी कालवा दरम्यान बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला . खांबाटकी बोगदा ओलांडून पुणे बाजूकडे जाताना उतारावर काही वाहने थांबली होती . समोर वाहने थांबल्याने लक्झरी बसचालकाने गाडी थांबवली . त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेला दूध टँकरला ब्रेक न लागल्याने बसच्या पाठीमागील बाजूवर आदळून डाव्या बाजूच्या कठडयावर धडकला . दोन्ही वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्याने वाहतूक ठप्प झाली.

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्याआधी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शहझाद पुनावाला यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर तोफ डागली. राहुल यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याआधी उपाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शकपणे होणार असल्यास मीदेखील निवडणूक लढवेन, असे पुनावाला यांनी म्हटले. याबद्दल त्यांनी राहुल गांधी यांना पत्रदेखील लिहिले आहे. ‘दिखावा म्हणून घेतली जाणारी निवडणूक मी लढणार नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असल्यास मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवेन. मात्र ही निवडणूक म्हणजे केवळ दिखावा आहे. किंबहुना ही निवडणूक नसून केवळ नेमणूक आहे,’ असे पुनावाला यांनी म्हटले.नवी दिल्ली - जर तुमच्या दैनंदिन जीवनात इंटरनेट वापर होत असेल आणि अद्यापपर्यंत तुम्ही आधार कार्ड बनवले नसेल, तर सर्व कामी बाजूला ठेऊन आधी आधार कार्डचे काम आटोपून घ्या. कारण इंटरनेटचा वापर करता यावा यासाठीदेखील आता आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहे. देशात इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता ग्राहकांकडून त्यांच्या आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच इंटरनेटची सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता आपल्या सेवा पुरवण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेन्टिटी नंबरचा तपशील मागणार आहेत. त्यामुळे आता आधार क्रमांकाविना कोणत्याही ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन आणि संबंधित अन्य सेवा मिळणार नाहीत. तर दुसरीकडे ऑनलाइन विक्री करणारी कंपनी अॅमेझॉननंही आपल्या ग्राहकांना वेबसाइटवर त्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवण्यास सांगितले आहे. आधार क्रमांकाच्या आधारे ग्राहकांचं हरवलेल्या सामानाचा शोध घेणे सोपे होईल, असे अॅमेझॉनचं म्हणणे आहे. तर बंगळुरूमध्ये भाड्यावर कार देणा-या जूमकार कंपनीनंही ग्राहकांना बुकींग करताना आधार क्रमांक देणे सक्तीचे केले आहे.

कल्याण - कल्याणमध्ये होली क्राॅस रुग्णालयात तोडफोड आणि पत्रकाराला मारहाण प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.कल्याणमधील पश्चिमेकडे होली क्रॉस रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड करत डॉक्टर, कर्मचार्‍यांसह वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला होता.या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात २५ ते ३० जणांविरोधात सशस्त्र दंगलीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे महात्मा फुले पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. योगेश किसन भोईर (२८, रा. वरप), महेश लक्ष्मण भोईर (२९, रा. वरप), अनमोल बबन भोईर (२४, रा. म्हारळ) आणि हरेष गुरुनाथ पाटील (२२, रा. सापर्डे) या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी दुपारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा धडाडत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात वाक्युध्द रंगले आहे. गेल्या दोन दशकांत मोदींनी गुजरात उद्योजकांना विकला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी बुधवारी अमरेली येथे केला.चहा विकला, पण देश विकला नाही, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसला लक्ष्य केले होते. राहुल गांधी यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. ”मोदींनी गुजरातची गावे उद्योजकांना विकली आहेत. नोटाबंदीदरम्यान मोदींनी संपूर्ण देशातील नागरिकांना रांगेत उभे राहायला लावले. या रांगांमध्ये मोदींचे सुटाबुटातील मित्र दिसले का, तुम्ही रांगेत अदानींना पाहिले का, असे सवाल राहुल यांनी केले.बेरोजगाराच्या मुद्यावरही राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. मोदी आपल्या भाषणांत रोजगाराबाबत का बोलत नाहीत, असा सवाल राहुल यांनी केला. मोदी २४ तासांत केवळ ४५० नोकऱ्या देत आहेत, हे वास्तव आहे, असेही राहुल म्हणाले. राज्यात कॉंग्रेसचे सरकार आल्यास १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले आहे. कॉंग्रेसने गुजरातच्या विकासात खोडा घातला हा भाजपचा आरोपही राहुल यांनी फेटाळला.

हैदराबाद - भारतात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, हे लक्षात घेऊन पुरुषांनी पुढे होऊन या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन सीबीईच्या संस्थापक चेरी ब्लेअर यांनी नुकतेच केले. येथे सुरू असलेल्या ग्लोबल आंत्रप्रुनर समिटच्या दुसऱ्या दिवशी ‘महिलांसाठी कौशल्य विकास आणि कामाच्या ठिकाणी त्यांचे प्रमाण’ या विषयावरील चर्चेत बोलताना ब्लेअर यांनी हे मत मांडले.

मुंबई - राज कोरडे अपहरणप्रकरणी आ. प्रकाश सुर्वे यांना अटक करावी, अशी मागणी करत मंगळवारी भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बोरीवली पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच याबाबत लेखी पत्रदेखील त्यांनी पोलिसांना दिले. आ. प्रकाश सुर्वे हे जैविक वडील असल्याचा खळबळजनक आरोप राज कोरडे यांनी केला होता. त्यानंतर त्याचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा, या मागणीसाठी देसाई यांनी आंदोनल केले. या प्रकरणी आ. सुर्वे, गणेश नायडू आणि त्यांचे सहभागी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना लेखी निवेदनही दिले आहे. सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस खात्यावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडत चालल्याची खंतही देसाई यांनी व्यक्त केली. यामुळे अशा प्रकारचे गुन्हे दाखल न होता जर ते दाबले जाणार असतील, तर फिर्यादीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीदेखील देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मुंबई - कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने महिला पोलिसांचा जामीन मंजूर करण्यास मंगळवारी नकार दिला. आरोपी वसिमा शेख, सुरेखा गुळवे आणि बिंदू नायकोडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे विशेष महिला न्यायालयाच्या न्या. शायना पाटील यांनी म्हटले. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी ठेवली. ‘मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसून नैसर्गिकरीत्या झाला आहे. तिच्या शरीरावर व्रण नाहीत. मात्र, भायखळा कारागृहातील महिला कैद्यांनी दबाव आणल्याने आपल्यावर गुन्हा नोंदवला आहे. आपल्याला यात नाहक गोवण्यात आले आहे,’ असा युक्तिवाद सर्व आरोपींच्या वकिलांनी विशेष न्यायालयात केला.
सरकारी वकील विद्या कासले यांनी आरोपींचे म्हणणे खोडत म्हटले की, शेट्येच्या शरीरावर १४ जखमा होत्या. या जखमा मारहाणीमुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील काही जखमा तिच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. पीडिता अर्जदारांच्या ताब्यात होती. त्यामुळे तिचे रक्षण करण्याची जबाबदारी अर्जदारांची होती. मात्र, त्यांनी तिचे रक्षण करण्याऐवजी तिला मारहाण केली. परिणामी, तिचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्जदारांचा जामीन मंजूर कशाला करावा.

नाशिक - महापालिका-एसटी महामंडळाच्या वादात शहर बसेसच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय कपात केल्याच्या निषेधार्थ मनविसेने मंगळवारी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत बसगाडय़ांवर चढून महामंडळाच्या विरोधात घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.शहर बस सेवेत तोटा होत असल्याने ती महापालिकेने ताब्यात घ्यावी, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. महापालिका प्रतिसाद देत नसल्याने काही महिन्यांपूर्वी शहरातील बसच्या फेऱ्यांमध्ये जवळपास निम्म्याने कपात करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर, मनसे विद्यार्थी सेनेतर्फे एन डी पटेल रस्त्यावरील विभाग नियंत्रक कार्यालयात धडक देण्यात आली. विभाग नियंत्रक यामिनी जोशी कार्यालयात नसल्याचे समजल्यावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी काही कार्यकर्ते आवारात उभ्या असलेल्या एसटी बसच्या टपावर चढले. परिवहन मंत्र्यांसह, एसटी महामंडळाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी दीड तास कार्यालयात ठिय्या देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मुंबई - नायगावच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या २२ वर्षीय पोलीस शिपाई तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मंजू गायकवाड असे या मृत तरुणीचे नाव आहे.
राखीव पोलीस दलात कार्यरत असलेली मंजू २०१४ मध्ये पोलिस दलात भरती झाली होती. नायगावच्या बीडीडी चाळीत मंजू मोठी बहीण आणि भावासोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून मंजू मानसिक तणावाखाली होती. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास तिची मोठी बहीण भावाला डबा देण्यासाठी गेली असताना मंजूने गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळाली नसल्याने आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

जव्हार - तालुक्यातील बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या आजाराविषयी माहिती नसल्याने गावकरी दहशतीखाली आहेत. तालुक्यापासून अगदी १० कि.मी. अंतरावर असलेल्या बाळकापरा गावात गत आठवड्यापासून डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यातच मलेरिया आणि टाईफाईडचे रुग्णही आढळले आहेत. गावात १४० कुटुंब राहत असून, गत काही दिवसांपासून येथे हिवतापाचे रुग्णही आढळले आहेत. ज्या रुग्णांना ताप येतो त्या संशयित रुग्णावर प्राथमिक उपचार करून लगेच जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येत आहे. गावातील १८ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णलयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नवी मुंबई - नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा लावणा-यांवरही कारवाईची संख्या मोठी असल्याने काळ्या काचांमागचे गूढ काय हे अद्याप उघड झालेले नाही.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार यांनी सर्व युनिटच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालय क्षेत्रात सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांसह फॅन्सी नंबरप्लेट तसेच काळ्या काचा वापरणाºयांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे - सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या व शेवटी त्यांच्या हाती बनावट नियुक्तीपत्रे देऊन पोबारा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत ३१ तरुणांकडून ८६ लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून विविध शासकीय विभागांचे रबरी शिक्के तसेच बनावट नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एका विमा कंपनीमध्ये काम करणारा दिनेश लहारे हा मूळचा अहमदनगर येथील रहिवासी या टोळीचा म्होरक्या आहे. झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासातून त्याने बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने विनय अनंत दळवी (५२), शंकर बाबुराव कोळसे-पाटील (४२), रमेश बाजीराव देवरे (५२), प्रवीण वालजी गुप्ता (२९) या चौघांसोबत मिळून एक टोळी तयार केली. ही टोळी सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पालकांना गाठून त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आमिष दाखवायची आणि त्यानंतर नोकरीसाठी दोन लाखांपासून ते १७ लाखांपर्यंत पैसे घेऊन त्यांना शासकीय सेवेचे बनावट नियुक्तीपत्र द्यायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती होती, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

नागपूर - एका पायाने अपंग आणि अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणाऱ्यास मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीचे नाव महादेव दमडुजी धोंगडे (५५, रा. पेंढरी, ता. पारशिवनी) असे आहे. पीडित मुलीच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तर तिच्या आईने दुसरे लग्न केले. यामुळे मुलगी पेंढरी येथील आत्याच्या घरी रहायची. पीडित एका पायाने अपंग असून तिला पंडूरोग सुद्धा आहे. ती इयत्ता आठवी विद्यार्थिनी होती. घटनेच्या दिवशी म्हणजेच ३० जून २०१३ रोजी मुलीची आत्या घरी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार कुणापुढे येऊ नये, यासाठी पीडितेला कुंभापूर येथे राहणाऱ्या आजीकडे नेऊ ठेवले. मात्र, हा संपूर्ण प्रकार माहित असलेल्या धनराज वासनिक याने मुलीचा चुलत भाऊ मंगेश पंढरी वासनिक याला फोन करून संपूर्ण हकीगत सांगितली. त्यानुसार चुलत भाऊ मंगेश याने पारशिवनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. याप्रकरणात पीडितेचे बयाण नोंदविण्यात आले. प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हे आंदोलन २३ मार्च २०१८ मध्ये होणार आहे. आंदोलन म्हणजे उपोषण नव्हे तर सत्याग्रह राहणार असून त्याला ‘अन्ना का सत्याग्रह’ असे म्हणण्यात येत आहे. हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये मंगळवारी ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना ही घोषणा केली. लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हे आंदोलन होणार आहे. पूर्वी हे आंदोलन फेब्रुवारी महिन्यात करण्याचा विचार होता. मात्र, आता ते २३ मार्च या शहीद दिनी होणार आहे. यासंबंधी माहिती देताना हजारे म्हणाले, ऑक्टोबर महिन्यात राळेगणसिद्धीमध्ये देशभरातील सुमारे ८० निवडक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पत्र पाठवून आंदोलनाच्या तारखेसंबंधी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यांना २५ फेब्रुवारी आणि २३ मार्च यापैकी तारीख सूचविण्यास कळविले होते. बहुतांश कार्यकर्त्यांनी २३ मार्च म्हणजे शहीद दिनाची तारीख योग्य असल्याचे कळविले. त्यामुळे आता या दिवशी आंदोलन करण्याचे ठरले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकव्याप्त कश्मीरवर तिरंगा फडवूच, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपातील नेतेमंडळी करतात. यावरुन जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान केंद्र सरकारला दिले. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. ''डॉ. अब्दुल्ला चुकीचे किंवा देशविरोधी बोलले असतील तर त्यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर लटकवा, नाहीतर अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे लाल चौकात हिंदुस्थानचा तिंरगा फडकवून दाखवा!'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई - विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केलाय. प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली. लाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी ३९ कोटी २६ लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. त्यांची पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायली कडे एक कोटी १५ लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.लाड यांच्याकडे ५५ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे. लाड यांच्या पत्नीकडे ५४ कोटी ९४ लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.

मुंबई - राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली वित्त विभागात (लेखा व कोषागरे) करण्यात आली. वित्त विभागातील प्रधान सचिव (सुधारणा) आर.ए. राजीव यांना याच विभागात प्रधान सचिव (व्यय) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी एस.व्ही.आर. श्रीनिवास हे माहिती तंत्रज्ञान विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांची बदली मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सेलच्या संचालकपदी करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आतापर्यंत सांभाळत असलेले आर.डी. निवतकर हे मुख्य सचिव कार्यालयाचे नवे सहसचिव असतील. मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव असलेले एस.डी. मांढरे हे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसाल यांची नागपूर येथे मनरेगा मुख्यालयात आयुक्तपदी करण्यात आली आहे.

मुंबई - शेतकरी कर्जमाफी, शिष्यवृत्तीसह विविध प्रकरणांमध्ये प्रचंड टीकेचे लक्ष्य ठरलेले माहिती तंत्रज्ञान विभागाचे (आयटी) प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची आज वित्त विभागात बदली करण्यात आली. शिवाय, माहिती-तंत्रज्ञान विषयक (संगणक आदी) खरेदीचे आयटी विभागाकडे असलेले अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच विभागात साफसफाई केली आहे. कर्जमाफी, शिष्यवृत्ती वाटपातील प्रचंड बेपर्वाई, संगणकांच्या खरेदीसाठी सर्व विभागांना वेठीस धरण्याचा प्रकार या बाबी विजयकुमार गौतम यांच्यावर शेकल्या आणि त्यांची उचलबांगडी झाली. मात्र, तेवढ्याच टीकेचे लक्ष्य ठरलेले मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी कौस्तुभ धवसे यांना अभय देण्यात आले आहे. गौतम सध्या रजेवर आहेत.

सोलापूर - दक्षिण सोलापूरचे माजी आमदार व विधान परिषदेसाठी कॉँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यासह पाचजणांविरुद्ध बलात्कारप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दोन कोटी रूपये न दिल्यास अश्लील फोटो समाजमाध्यमांवर टाकतो, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. दिलीप ब्रह्मदेव माने (५२), निखिल नेताजी भोसले (३०), तृप्ती निखिल भोसले ( ३०), वेदमती नेताजी भोसले (४८), धनंजय भोसले (४५) अशी आरोपींची नावे आहेत. यातील निखिल भोसले याने पीडित महिलेशी विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख काढून मैत्री केली. त्यानंतर त्याने तुळजापूर मंदिरात खोटे लग्न करून या महिलेशी शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी त्याने पीडितेचे नग्नावस्थेतील फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकी दिली. तसेच निखील याने दिलीप माने यांच्याकडे पाठवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले नाही तर नग्न फोटो सर्वत्र पसरवतो, असे धमकावले, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे फोटो पसरवले आणि पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंताकिंदी करीत आहेत.

गडचिरोली - पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी आदिवासी युवकाची हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोल‌िस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथे ही घटना घटना घडली. मनोज राजू नरोटे (वय ३०, रा. झारेवाडा) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
गट्टा पोल‌िस ठाण्यांतर्गतच्या झारेवाडा येथील मनोज नरोटे याच्या घरी सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र माओवाद्यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी मनोजला झोपेतून उठवून जंगलात नेले. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास झारेवाडा येथूनच २ किमी अंतरावर मनोजचा मृतदेह आढळून आला. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

बीड - लिंगबदलाची परवानगी मागणा-या बीड पोलीस दलातील ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून ललीताकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहिले जात आहे. ललिता या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. त्यांनी लिंगबदल करण्यासाठी रजेचा अर्ज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. तेथून महासंचालकांकडे गेला. महासंचालक माथूर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
ललिता यांना लिंग बदल झाल्यानंतर पोलीस खात्यात पुरूष म्हणून कायम रहायचे आहे. परंतु असा नियम पोलीस विभागात नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आदेश महासंचालकांना दिले होते. त्यानुसार महासंचालक माथूर यांनी अधीक्षक जी. श्रीधर यांना एक पत्र पाठवून साळवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करून त्यानंतर आयकर न भरल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय, मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करून आयकर भरणारेही आयकर विभागाच्या रडारवर आहेत.नोटाबंदीनंतर २५ लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा करणा-या लोकांची संख्या १८ लाख इतकी होती. या १८ लाखांचे वर्गीकरण दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणारे आणि १० ते १५ लाख रुपये जमा करणारे, असे दोन गट तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणा-या १ लाख १६ हजार लोकांनी आतापर्यंत आयकर भरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. २५ लाखांहून अधिकची रक्कम बँकेत भरणा-या १ लाख १६ हजार लोकांनी अद्याप आयकर भरलेला नाही. त्यांना पुढील ३० दिवसांमध्ये आयकर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे, असे चंद्रा यांना सांगितले. नोटाबंदीनंतर १० ते २५ लाख रुपये बँकेत जमा करून अद्याप आयकर न भरलेल्यांची संख्या २.४ लाख इतकी असल्याची माहिती त्यांनी दिली. या २.४ लाख लोकांना दुस-या टप्प्यात नोटीस बजावली जाणार आहे.

अहमदाबाद - आज गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार होणार आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आज गुजरातच्या मैदानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चारपैकी तीन सभा सौराष्ट्रात घेणार आहेत तर राहुल गांधीचा आजचा संपूर्ण दौरा सौराष्ट्रात आहे. पंतप्रधान मोदी मोरबी, जुनागढ जिल्ह्यातील प्राची, भावनगर जिल्ह्यातील पालिटाना या सौराष्ट्रातील भागात प्रचार सभा घेतील तर दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे प्रचारसभा घेतील. तर राहुल आज गिर सोमनाथ, जुनागढ अमरेली या जिल्ह्यांच्या जाऊन प्रचार करणार आहेत. तर पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल हा देखील आज सौराष्ट्र्त जाऊन प्रचार करणार आहे. हार्दिक पंतप्रधान मोदी मोरबी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता प्रचार करणार आहे. त्याचवेळी त्याच जिल्हयात कालवाड इथं प्रचार करणार आहे. तसेच त्यानंतर त्याची राजकोट इथे सभा आहे.मुंबई - बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रूझ परिसरातील ऑफिसमधील बेकायदेशीर पार्टीशनवर मनपाने हातोडा मारला आहे. अनिक कपूरने आपल्या ऑफिसमध्ये विना परवाना काही पार्टीशन्स टाकले होते. मात्र, हे वाढीव काम करताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते, पण अनिक कपूरकडून अशा प्रकारची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.याच बेकादेशीर बांधकामप्रकरणी बीएमसीने अनिल कपूरला गेल्या सप्टेंबर महिन्यातच रितसर नोटीसही पाठविली होती पण या नोटीसीला अनिल कपूरने साधी दखलही न घेतल्याने शेवटी पालिकेने गेल्या शुक्रवारी हे विनापरवाना बांधकाम पाडून टाकले. मनपाच्या एच-वेस्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.

नवी दिल्ली - वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते. रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली. एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

श्रीनगर - जम्मू- काश्मीरमध्ये सीमा रेषेवरुन ‘लष्कर-ए- तोयबा’च्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवाद्याला दिल्लीतील विशेष न्यायालयासमोर हजर केले असून त्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथून सैन्याने २४ नोव्हेंबर रोजी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. मोहम्मद आमीर अवान असे दहशतवाद्याचे नाव आहे. २१ नोव्हेंबर रोजी ‘लष्कर’च्या दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्यामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर एक जवान शहीद झाला होता. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सैन्याने ही कारवाई केली होती. संशयित दहशतवाद्याला मंगळवारी एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएच्या पथकाने दहशतवाद्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुनम बंबा यांच्यासमोर हजर केले. दहशतवाद्याची चौकशी करायची असून त्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवावे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. यानंतर न्यायमूर्तींनी त्या दहशतवाद्याला १० दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोहम्मद आमीर अवान असे दहशतवाद्याचे नाव असून तो ‘लष्कर’मध्ये अबू हमाज या नावाने ओळखला जायचा. मोहम्मद हा मूळचा कराचीचा असून त्याने पाकमध्ये ‘लष्कर’च्या तळावर प्रशिक्षण घेतले होते, अशी कबुली दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून त्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. त्याच्या चौकशीत एनआयएला पाकिस्तानमधील ‘लष्कर’च्या तळांबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.

हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद मेट्रोचे उद्घाटन केले. त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह मेट्रोचा प्रवासही केला. या वेळी त्यांच्याबरोबर तेलंगण व आंध्र प्रदेशाचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहा, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण उपस्थित होते. बहुप्रतिक्षित हैदराबाद मेट्रोचा हा पहिला टप्पा असून, यामध्ये ३० किलोमीटर अंतरापर्यंत सुविधा निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - उत्तर कोरियाने मंगळवारी पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने संपूर्ण जग हादरले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने या वृत्ताला दुजोरा दिला असून यामुळं जगावर चिंतेचं सावट पसरलं आहे. उत्तर कोरियाची ही कृती म्हणजे जगासाठी धमकी असून 'बघून घेऊ', असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री उत्तर कोरियाने ही चाचणी केली. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी याआधी सप्टेंबरमध्ये अशीच क्षेपणास्त्र चाचणी केली होती. उत्तर कोरियाच्या या कृत्याची अमेरिकेचे ट्रम्प यांनी गंभीर दखल घेतली आहे. उ. कोरियाला 'बघून घेऊ', असा इशारा त्यांनी दिला आहे.

अहमदनगर - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज (बुधवार) शिक्षा सुनावली जाणार आहे. कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान, न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला आहे. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे रखडलेल्या निकालाच्या अपयशाचे खापर मेरिट ट्रॅक या कंपनीने मुंबई विद्यापीठावरच फोडले आहे. अपुरे मुष्यबळ आणि संवादाच्या अभावामुळेच निकालाचा अभूतपूर्व गोंधळ झाला असल्याचे दावा मेरिट ट्रॅक कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष नागेंद्रन सुंदरराजन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
आम्हाला एका आठवड्यात सर्व उत्तरपत्रिका सर्व्हरवर अपलोड करायच्या होत्या. मात्र देण्यात आलेला वेळ आणि मनुष्यबळ खूप कमी असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जास्त वेळ गेला. त्याचप्रमाणे अंतर्गत गुणे देणे यासह इतर कामेही आमच्या कंपनीची जबाबदारी नव्हती, तरीदेखील ती आम्हाला पार पाडावी लागली. त्यामुळे निकाल विद्यापीठाला सादर करण्यास जास्त कालावधी गेला, असे सुंदरराजन यांनी स्पष्ट केले आहे.मुंबई - रेल्वेच्या देशभरातील गर्दीच्या स्थानकांमध्ये पादचारी पुलाला जोडणारे तीन हजार सरकते जिने आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 372 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात येणार आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस यांची नजर त्यातील फुटेजवर असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली.एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन रोड, आंबिवली आणि करी रोड या तीन स्थानकांतील पूल बांधण्याचे काम लष्करावर सोपवण्यात आले. त्यापैकी आंबिवली आणि एल्फिन्स्टन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. एल्फिन्स्टन आणि करी रोड पुलाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर रेल्वेमंत्री बोलत होते. 31 ऑक्‍टोबरला मुंबई भेटीदरम्यान ज्या घोषणा केल्या होत्या, त्या पूर्ण होत आहेत. संबंधित विभागाला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्याही वेळेत पार पडल्या आहेत. सर्व विभागांनी तातडीने कामे हाती घेतली आहेत; तसेच तिन्ही पुलांचे बांधकाम वेळेच्या आधी पूर्ण होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला

मुंबई - म्हाडातील भूखंड वाटप तसेच भाडेकराराच्या नूतनीकरणातील अनियमितताप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एक उपमुख्य अधिकारी व कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी आहे. मागील आठवड्यात पत्राचाळ प्रकरणात एका कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले होते. दोन आठवड्यात म्हाडाच्या तीन अधिका-यांना अशा प्रकारे निलंबित करण्यात आले आहे.म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात असलेले उपमुख्य अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्यावर भूखंड वाटपातील अनियमितता व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणताही कल्पना न देता भूखंडाच्या भाडेकराराचे नूतनीकरण केले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. एका संस्थेने भुईभाडे थकवले होते, तर अन्य एका संस्थेने म्हाडाच्या भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही भाडे कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या अनियमितता लक्षात घेऊन या दोघांवर कारवाई केल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यात गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन यांना निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद - जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळविली, मात्र आता जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केले. हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते; मात्र सत्ता मिळवून साडेतीन वर्षे झाली तरी अद्याप एकाही व्यक्तीच्या खात्यावर १५ रुपये जमा झाले नसल्याचे ते म्हणाले. ‘कुठे गेले तुमचे अच्छे दिन?’ असा सवाल अण्णांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने भक्तांच्या सोयीसुविधांविषयी मोठय़ा प्रमाणावर फेरबदल करण्यात येत आहेत. मात्र मंदिराच्या पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा खंडित करण्यासह मंदिराच्या वास्तुशास्त्रातही बदल करण्यात येत असल्याने पुजाऱ्यांसह भक्तांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. मंदिर समितीच्या कारभाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा उंबरठाच काढून टाकल्याने माथा कुठे टेकायचा, असा सवाल पुजारी-भक्तांमधून केला जात आहे. हिंदू धर्मात घराच्या उंबरठय़ाला मोठे महत्त्व आहे, तर मंदिराच्या उंबरठय़ावर माथा टेकून देवदेवतांसमोर भाविक नतमस्तक होतात. मात्र तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने सुधारणेच्या नावाखाली मंदिराच्या गर्भगृहाच्या पुरातन दरवाजाचा उंबरठाच हटविल्याच्या प्रकारामुळे समितीच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहासमोर चांदीचा दरवाजा आहे. अठराव्या शतकातील हा दरवाजा असल्याचे सांगण्यात येते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले भाविक दरवाजाच्या उंबरठय़ावर माथा टेकून नतमस्तक होत होते. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मंदिराच्या पुरातन भिंतीची तोडफोड करण्यासह चक्क उंबरठादेखील हटविला गेला. नवरात्र महोत्सव कालावधीत केलेला हा बदल गर्दी ओसरल्यानंतर पुजाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्या मुळे पुजाऱ्यांसह भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठाणे - महागाई, शेतकरी आत्महत्या, मराठा- धनगर- मुस्लिम आरक्षण आदी सर्वच आघाड्यांवर या सरकारने जनतेची पिळवणूकच केली आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. भाजप- सेनेच्या सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना जनता धडा शिकवेल, अशी टीका यावेळी आंदोलनाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राज्य सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यासोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयशच आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे; आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे, आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात हा मोर्चा काढण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले. गडकरी रंगायतनपासून सुरू झालेला हा मोर्चा मासुंदा तलावाला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सहभागी झालेले फेरीवाले, पोतराजांनी आत्मक्लेश करून सरकारचा निषेध केला.

लातूर - नांदेड राज्य महामार्गावरील कोळपा पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोळपा पाटीजवळ थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झालेत. मंगळवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या महामार्गावरील १५ दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे.क्रूझर जीप (क्रमांक एम एच २४ व्ही ११०४) ही लातूर रोड हून लातूर येथे येत होती. यामध्ये मंगळवारी पहाटे लातूर रोड रेल्वे स्टेशनवर उतरलेले प्रवासी प्रवास करत होते. तर दुसरी क्रूझर जीप (क्रमांक एमएच १३ बीएन २४५४ ) ही पंढरपूरहून नांदेडच्या दिशेनं जात होती. यादरम्यान कोळपा पाटीवरील थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना ही भीषण दुर्घटना घडली.

तामिळनाडू - केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या महिलेने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे आणि आपल्याला आपले स्वातंत्र्य परत हवे असल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने तिच्याशी चर्चा करून पुढील शिक्षणासाठी तिची रवानगी तामिळनाडूतील सालेम येथील होमिओपथी महाविद्यालयात केली. धर्मातर करून शफीन जहान या मुस्लीम पुरुषाशी विवाह केलेल्या अखिला (आता हादिया) या केरळस्थित हिंदू मुलीने आपल्याला पुन्हा आपले स्वातंत्र्य हवे असल्याचे सोमवारी प्रथमच सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सांगितले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हादियाने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने हादियाला, राज्य सरकारच्या खर्चाने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे का, असे विचारले, तेव्हा आपल्याला शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, मात्र त्यासाठी लागणारा खर्च राज्य सरकारने करण्याची गरज नाही, आपला पती काळजी घेण्यास समर्थ असल्याचे सांगितले.

लखनऊ - उत्तर प्रदेशात पोलिसांची एक अजब कारवाई समोर आली आहे. फुलांचे नुकसान केले म्हणून पोलिसांनी थेट गाढवांनाच अटक करुन जेलमध्ये बंद केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या कारवाईवर जितकं आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तितकीच खिल्लीही उडवली जात आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भटक्या गाढवांवर कारागृहाबाहेरील फुलाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी गाढवांना अटक केली. इतकेच नाही तर त्यांना चार दिवस कारागृहात बंदही करण्यात आले होते. याप्रकरणी उरई कारागृहाचे हेड कॉन्स्टेबल आर के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाढवांनी कारागृहाबाहेर लावण्यात आलेल्या महागड्या फुलांचे नुकसान केले होते. घटनेनंतर गाढवांच्या मालकांना गाढवांना कारागृहाबाहेर फिरकू न देण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र यानंतरही गाढवांनी फुलांचे नुकसान केल्याने पोलिसांचा संताप झाला होता. गाढवांनी नष्ट केलेली फुले फार महागडी होती. वरिष्ठ अधिका-यांनी स्वत: ती लावली होती अशी माहिती आर के मिश्रा यांनी दिली आहे.

बलरामपूर - उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातून गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला होता, मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आता पुन्हा गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात परतू लागले आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे सांगितले.राज्यातील यापूर्वीच्या राजवटीत गुन्हेगार सोकावले असल्याने गुंतवणूकदारांनी उत्तर प्रदेशातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती, मात्र भाजप सरकारने गुन्हेगारांना त्यांची योग्य जागी म्हणजेच कारागृहात रवानगी केल्याने गुंतवणूकदार पुन्हा राज्यात परतण्यात सुरुवात झाली आहे, असे आदित्यनाथ यांनी येथे एका निवडणूक सभेत सांगितले. सपाच्या राजवटीत दंगली होत होत्या, मात्र आता दंगली उसळण्याचे प्रकार थांबले असून उत्तर प्रदेश राज्य गुन्हेगारीमुक्त झाले आहे. सपा आणि बसपाच्या राजवटीत सापत्नभाव होता, मात्र भाजप सर्वाना बरोबर घेऊन जात आहे, आम्ही पोलीस दलांत भरती सुरू करणार आहोत आणि पुढील तीन वर्षांत चार लाख युवकांना रोजगार देणार आहोत, असेही आदित्यनाथ म्हणाले.

भुज - मी गरीब घरातून आलेला असल्याने काँग्रेस पक्षाला आवडत नाही. गरीब घरातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला आहे. मी चहा विकला मात्र, देश विकला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. युवक काँग्रेसच्या ‘युवा देश’ या नियतकालिकाने अधिकृत ट्विटर हँडलवरून मोदी यांना ‘चायवाला’ असे संबोधून टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी राजकोट येथील प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. ‘पाकिस्तानात हाफीज सईद मुक्त झाला, तर काँग्रेसजन इथे टाळ्या का पिटत आहेत,’ असा सवाल करून सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. ‘डोकलामचा वाद सुरू असताना ते चिनी राजदूतांना मिठ्या मारत का होते,’ अशा शब्दांत त्यांनी राहुल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दोन दिवसांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात सोमवारी सौराष्ट्रातील भुज येथून झाली. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात येथे पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. स्वतःला गुजरातचा भूमिपुत्र म्हणवून घेत मोदींनी गुजराती अस्मितेलाही हात घातला.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने आधी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवून दाखवावा,’ अशी आव्हानाची भाषा फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. अब्दुल्ला यांनी याआधीही काश्मीरबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र आता या विधानावरुन अब्दुल्ला यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. पाकव्याप्त काश्मीर कोणाच्या बापाचे नसून, ते कधीही भारताचे होऊ शकत नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते. काँग्रेस नेते आणि माजी खासदार जी. ए. डोगरा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त फारुख अब्दुल्ला यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘ते (मोदी सरकार आणि भाजप) पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या गोष्टी करतात. मात्र त्यांनी आधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा. ते लाल चौकात तिरंगा फडकवू शकत नाहीत. मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या बाता करतात,’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले.

पाटणा - केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात केली आहे. आता त्यांना ‘झेड प्लस’ ऐवजी ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येणार असून, राष्ट्रीय सुरक्षा रक्षण ब्लॅक कॅट (एनएसजी) कमांडोंचे सुरक्षा कवचही काढून घेण्यात आले आहे. त्यावर ‘एनडीए सरकारकडून लालूंच्या हत्येचा कट रचला जात आहे,’ अशी प्रतिक्रिया लालू यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकताच सर्व अतीमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपीं) पुरविण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था व त्यांना असलेला धोका यांचा आढावा घेतला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर संतापलेले लालूप्रसाद यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच धमकी दिली आहे. लालूप्रसाद यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यांच्या सुरक्षेत कपात करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल आणि मोदी यांची चामडी सोलून काढू, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, पुत्राची जीभ घसरल्याने होणाऱ्या टीकेमुळे लालू यांनी सारवासारव करत ‘पुन्हा पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरू नये,’ अशी समज त्यांनी तेजप्रसाद यादव यांना दिली.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget