January 2018

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्रांतून स्वतःची भूमिका व्यक्त करत आहेत. त्याप्रमाणेच आता त्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपा अध्यक्ष अमित शाहांना व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावर अचूक बोट ठेवणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी न्या. लोया मृत्यू प्रकरणावरून अमित शाहांवर मार्मिक टीका केली आहे.व्यंगचित्रातून एक भलामोठा कुत्रा भाजपाचे अध्यक्ष अमित शाहांच्या मागे लागल्याचे दाखवण्यात आले असून, या कुत्र्याच्या पाठीवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी व्यक्त केलेली शंका, असे लिहिण्यात आले आहे. तसेच या कुत्र्याला घाबरून अमित शाह जीव घेऊन पळत असल्याचेही दाखवले आहे व त्यात मध्येच कबरीतून हात वर आल्याचे दाखवण्यात आले असून, त्या कबरीवर न्या. लोया प्रकरण अशी पाटी लावण्यात आली आहे.

रायगड - बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान याला आयकर विभागाने दणका दिला आहे. अलिबाग येथील त्याचा 'डेजाऊ' बंगला आयकर विभागाने सील केल्याची माहिती आहे. बेनामी संपत्ती म्हणून आयकर विभागाने ही कारवाई केल्याचं वृत्त आहे.  शाहरुखने अलीबागमध्ये ही जमीन शेतीसाठी  खरेदी केली होती, पण त्या जागेवर त्याने एक फार्महाऊस बांधलं. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने यासंबंधी शाहरूखला नोटीस पाठवून ९०  दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. अखेर आज त्याचा बंगला सील करण्यात आला.  

मुंबई - ज्या सत्तेचा गैरवापर केला तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे आणि उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्टेजवर चढून जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठा वगैरेंवर बोलत असतात. मीच हरिश्चंद्राचा अवतार असून भाजपने माझे पंचप्राण परत करावे, असे त्यांना वाटत असले तरी सध्या यमाला शरण आणणारे मांगल्य राजकारणात उरले आहे काय?, असा सवाल करतानाच 'या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत. अशोक चव्हाण व अजित पवार यांची त्यांना 'खुली' ऑफर आहे. पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काढला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांना कानपिचक्या दिल्या आहेत. 'मुक्ताईनगरचे आमदार एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे. राज्यातील सत्ताबदलानंतर ते मुख्यमंत्री व्हायला म्हणजे 'हीरो' बनायला निघाले होते, पण राजकीय रंगमंचावर त्यांना जो 'साईड रोल' मिळाला तोदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला. विरोधी पक्षनेते म्हणून व नंतर महसूलमंत्री म्हणून स्वतःलाच गाजवणारे एकनाथ खडसे हे आज भाजपच्या राजकारणातून तसे बाद झाले आहेत व महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे,' असा टोला उद्धव यांनी लगावला आहे.

लखनऊ - प्रत्येक नागरिकाला सुरक्षा पुरविण्यास आपले सरकार बांधील आहे, अराजक माजविण्याचा जे प्रयत्न करतील त्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी समाजकंटकांना दिला. कासगंजचा हिंसाचार उत्तर प्रदेश राज्यावरील कलंक असल्याचे मत राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आदित्यनाथ यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे. देशभरात कोठेही अशा प्रकारची घटना घडली तर केंद्रीय गृहमंत्रालय अहवाल मागवितो, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. दंगलीत ज्यांचा हात असेल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा राम नाईक यांनी व्यक्त केली, सरकारने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, गेल्या आठ-नऊ महिन्यांत उत्तर प्रदेशात अशी घटना घडली नाही, जातीय हिंसाचाराचा उद्रेक होणे आपल्यासाठी शरमेची बाब आहे, असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकारने कासगंजचे पोलीस अधीक्षक सुनीलकुमार सिंह यांची मेरठमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली केली.

नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. २०१७ साली अमेरिकेची एकूण संपत्ती ६४,५८४ अब्ज डॉलर इतकी होती. दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४,८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर, चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनची संपत्ती ९,९१९ अब्ज डॉलर, पाचव्या क्रमांकावरील जर्मनीची संपत्ती ९,६६० अब्ज डॉलर आहे. भारत सहाव्या क्रमांकावर असून, त्यांनंतर फ्रान्स (७) , कॅनडा (८), आॅस्ट्रेलिया (९) व इटली (१०) क्रमांक आहे.

शिलाँग - मेघालय निवडणुकीच्या काही दिवस आधी शिलाँगला पोहोचलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे जॅकेट परिधान करून पक्षाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. गतवर्षी उत्तराखंड निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत आपला फाटलेला खिसा दाखवणाऱ्या राहुल गांधींनी इतका महाग जॅकेट घालण्यावरून भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.भाजपाच्या मेघालय शाखेने मंगळवारी ट्विट करत राहुल गांधींच्या जॅकेटवर निशाणा साधला. व्यापक भ्रष्ट्राचार करून मेघालयचा सरकारी खजिना लुटल्यानंतर काळ्या पैशातून बनलेले सुटा-बुटाचे सरकार ? आमच्या दु:खावर गाणे गाण्याऐवजी तुम्ही मेघालयच्या नाकर्त्या सरकारचे प्रगती पुस्तक देऊ शकला असता. तुमची उदासीनता आमची थट्टा उडवत आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई - पीएमएल कोर्टाने फेटाळलेल्या जामीनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिले आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या वतीने ते निर्दोष असल्याचा पुनरूच्चार करत सुप्रीम मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम ४५ (१) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेले २१ महिने आपण जेलमध्ये आहोत, पासपोर्ट ईडीकडे जमा आहे, त्यामुळे आता बाहेर येऊन स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्यावतीने कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टाने भुजबळांचा जामीन अर्ज फोटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्याने अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टानं तसेच मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यावर भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्ट काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर व मुंबई येथेही गुंतवणूकदारांना फसविल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई व कोल्हापूर येथे नोंदविलेले गुन्हे रद्द करावेत किंवा ते गुन्हे पुण्याच्या आर्थिक अन्वेषणगुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करावेत, यासाठी डीएसकेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत विशेष सरकारी वकील अनुपस्थित असल्याने न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

कसबा बावडा - मोबाइलचे तीन हजार रुपयांसाठी गांधीनगर येथील तरुणाचा मित्रानेच खून केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संजय बेले या संशयितांला ताब्यात घेतले आहे. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल अंबुरे याने त्यांच्याच भागातील संजय बेले याच्याकडून सात हजार पाचशे रुपयाला मोबाइल विकत घेतला होता. अंबुरे याने साडेसात हजारांपैकी चार हजार रुपये दिले होते. परंतु राहिलेले पैसे देण्यासाठी अंबुरे यांच्याकडून विलंब झाला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे आणि शिवाजी गणपतराव शिंदे यांनी अंबुरे याला रेल्वेलाइन जवळील वंदना फटाका गोडाऊन येथे बोलवून घेतले. यावेळी अतुल आणि संजय यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यात संजय बेले हा खाली पडला असता त्याला दारुची बाटली फुटून हाताला जखम झाली. त्याने रागाने ती फुटलेली बाटली तशीच उचलून अतुल अंबुरे याच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये अंबुरे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या तोंडावर व पाठीवर फुटलेल्या बाटलीच्या काचांनी आणि दगडांनी हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळाले. गांधीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी केलेल्या पाहणीत अंबुरे मृत झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.

वर्धा - धर्माची राजनीती होणार नाही याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर झाला. पण, पुन्हा एकदा देशात धर्माची राजनीती सुरू होत असल्याचे चित्र आहे. हे विदारक चित्र बदलण्याची गरज, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. महात्मा गांधी यांचे योगदान फार मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मूठभर लोकांच्या हाती असलेली स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्यांची कशी होईल यासाठी प्रयत्न झाले. महात्मा गांधी चळवळीत उतरल्याने स्वातंत्र्य चळवळ सर्वसामान्यांची झाली. सामान्य दिन दलितांचे वर्चस्व वाढायला लागले. बहुजणांच्या हातात सत्ता हवी असेल तर या देशातील आर्थिक स्रोत बहुजणांच्या हाती असला पाहिजे. आदर्श राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मतही आंबेडकर यांनी मांडले. धर्माची गरज व्यक्तीला की देशाला आहे? काही लोकांना धर्माच्या आत देशाला घ्यायचे आहे. त्यामुळे सध्या देश वाचविण्याची वेळ आली आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशाला आजही गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

भिवंडी - भिवंडीच्या गायत्री नगरमध्ये भंगारच्या गोदामला आग लागली आहे. ३० जानेवारीच्या रात्री ही आग लागली आहे. या आगीत १५ ते १६ गोदाम जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी ५ अग्नीशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.अद्यापही या ठिगाणी आग धुसमुसतच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत आजूबाजूची भंगाराची १५ ते १६ गोदाम जळून खाक झाली आहे. मात्र ही आग कशी लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही आहे. दरम्यान या स्थळी राहणाऱ्या रहिवास्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पालघर - मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. एकूण १४ लाखांच्या मालमत्तेतून २ लाखांचे कर्ज वजा केले तर कशीबशी १२ लाखांची मालमत्ता त्यांची आहे. लोकप्रतिनिधींचे पी.अ‍े. आणि साधे नगरसेवक करोडपती होण्याच्या काळात तीनदा खासदार व एकदा आमदार झालेल्या वनगांची ही आर्थिकस्थिती त्यांच्या नि:स्वार्थतेचे द्योतक आहे. पक्ष आणि समाज कार्यासाठी त्यांनी २००४ साली घेतलेली इंडिका कार ही एकमेव मोठी अशी मालमत्ता त्यांच्याकडे होती. परंतु ती इतकी जुनी होती की, तिचे काही मूल्येही उरलेले नाही.आपल्या खासदारकीच्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी भरलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रानुसार त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्ट्राच्या तलासरी शाखेचे ६२३३२ रुपयांचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या तलासरी शाखेचे १२२३३२ असे एकूण १८४६६४ रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनीची किंमत ६ लाख होती. तर अकृषिक जमीनीची किंमत ३ लाख होती. पत्नीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र हा एकमेव दागिना त्यांच्याकडे होता. त्याची किंमती ३० हजार रुपये होती. चार बँक खात्यातील शिल्लक अवघी ३२ हजार, राहते घर व गुंतवणूक हिशेबात घेतली तर त्यांची एकूण मालमत्ता १४ लाखांची त्यातून जर कर्जाची रक्कम वजा केली तर ती १२१५३३६ एवढीच होती. आजी-माजी मंत्री, पंतप्रधान, खासदार, आमदार हे शासकीय निवासस्थानाचे लाखो रुपयांचे भाडे व त्यातील सुविधांचे बिल थकविण्यात धन्यता मानत असतांना वनगा यांनी मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेचा एक छदामही बाकी ठेवलेला नव्हता. त्यामुळेच त्यांना नि:स्वार्थी व प्रामाणिक लोकप्रतिनीधी असे संबोधले जात होते.औरंगाबाद - पुढाऱ्यांच्या मागे फिरून कोणीही नेता होत नाही. नेता होण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. स्वतःला सिद्ध करावे लागते त्यामुळे पुढाऱ्यांच्या मागे फिरणे सोडा, कारण त्या पुढाऱ्यांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचवेळी तरूण कार्यकर्त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सल्ला दिला.जनतेची कामे करण्यासाठी युवक काँग्रेस हे मोठे व्यासपीठ आहे. पक्षाकडून काही कार्यक्रम नसेल तर राजीव गांधी आरोग्यदायी योजना तसेच इतर योजना राबवा. लोकांमध्ये मिसळून काम करा. आरोग्याचा प्रश्न मोठा आहे, सरकारने जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्याची जबाबदारी आपली आहे असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. जनतेच्या कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. मतदारसंघात किती काम केलेत हे आता पाहिले जाणार आहे त्यामुळे ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. त्याचमुळे उत्साहाने कामाला लागा असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - उर्दूचे सुप्रसिद्ध शायर मोहम्मद अल्वीयांचे सोमवारी अहमदाबाद येथे निधन झाले. अल्वी हे आधुनिक शायर म्हणून प्रसिद्ध होते. मोहम्मद अल्वी यांनी साध्या आणि सोप्या शब्दात गझल मांडली. अल्वी यांच्या चौथा 'आसमान' या कवितासंग्रहाला १९९२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अल्वी यांचा जन्म १९२७ साली अहमदाबाद येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही अहमदाबाद येथे झाले. अल्वी यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियामधून उच्च शिक्षण पूर्ण केले. अल्वी यांच्या 'खाली मकान', 'आखिरी दिन की तलाश' आणि 'तिसरी किताब' हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत.

नगर - जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटीलयांच्या मृत्यूस केंद्र सरकारही जबाबदार आहे,असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. मृत्यू झाल्यावर भरपाई देण्यापेक्षा केंद्र सरकारने देशभरातील जमिनींचे सर्वेक्षण करून भाव ठरवावेत आणि भूसंपादनाच्या वेळी त्यानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणीही हजारे यांनी केली आहे. 
धर्मा पाटील यांच्या आत्महत्येसंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, 'पाटील यांना योग्यवेळी योग्य मोबदला मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचला असता. आता त्यांना वाढीव मोबदला देऊन काय उपयोग आहे, त्याने त्यांचा जीव थोडाच परत येणार आहे? अशा घटनांना केंद्र सरकारलाही जबाबदार धरले पाहिजे. भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी काही उपाय यापूर्वीच केंद्र सरकारला सूचविले होते. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

मुंबई - घनकचरा, सांडपाणी विनाप्रक्रिया समुद्रात सोडण्यात येत असल्याने हाजी अली दर्ग्याविरोधात पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित लवादापुढे धाव घेतली आहे. त्यावर ५ मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून, हाजी अली दर्ग्यासह प्रदूषण मंडळाला लवादाने नोटिसा बजावल्या आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये आमीर शेख, वैष्णव इंगोले, रेवती बागडे, श्रध्दा सवाखंडे, राकेश माळी, सुधीर सोनावणे, काजल मांडगे, मैत्रेय घोरपडे आणि दीपक चटप या लॉ कॉलेजातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व हाजी अली दर्ग्यात गेले होते. तेथे त्यांना घनकचरा, सांडपाणी विनाप्रक्रिया समुद्रात सोडले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी लवादाकडे धाव घेतली. याप्रकरणी राज्य पर्यावरण विभाग, किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई महापालिका, राज्यस्तरीय देखरेख समिती यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार बिनसल्याने मोहम्मद सर्फराज एहसान उर्फ अमर खन्ना या तरुणाने ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार झीनत अमान यांनी केली होती. 
सर्फराझ आणि झीनत हे एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार सुरू होते. परंतु त्यात नुकसान होत असल्याचा अंदाज येताच झीनत यांनी हा व्यवहार रद्द केला. त्यानंतर सर्फराझने मला धमकी देण्याचे सत्र सुरू केल्याचा झीनत यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एसएमएसवरून धमकी दिल्याची तक्रार झीनत यांनी जुहू पोलिस ठाण्यात नोंदवली. सर्फराझने २५ ते २७ जानेवारीमध्ये एसएमएस पाठवले असून त्यात मुलांसह तुम्हाला ठार करू अशी धमकी दिल्याची झीनत यांनी सांगितले. पोलिसांकडून सर्फराझचा शोध सुरू आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एमए प्रथम वर्गाच्या परीक्षेदरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. पर्सनॅलिटी सायकॉलॉजी विषयाच्या दोन वेगवेगळ्या प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर वाटल्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी वाटण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचाही पुरता घोंधळ उडाला होता. यंदाचा अभ्यासक्रम बदलला असूनही काही परीक्षा केंद्रावर जुन्याच प्रश्नपत्रिका वापरण्यात आल्या आहे. या प्रकारानिमित्तानं मुंबई विद्यापिठाच्या सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आधीच विद्यार्थ्यांचे निकाल उशीरा लावल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यातही अशा प्रकारच्या चुका वारंवार मुंबई विद्यापिठीकडून होतं आहे. त्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरही त्याच्या परिणाम झाला आहे. आता या प्रश्नपत्रिकांच्या घोळामुळे गुणांची नुकसान भरपाई भरुन द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

मुंबई - जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.एका ८४ वर्ष वयाच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही. तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षात साडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.

नवी दिल्ली - तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लवकर संमत करण्याचे नम्र आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांना केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ झाला. संसद भवनाबाहेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.ते म्हणाले, ट्रिपल तलाकसारख्या प्रश्नांवर राजकारण होऊ नये, ही लोकांची अपेक्षा आणि सरकारचे प्रयत्न यामुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही संसदेच्या गेल्या अधिवेशनात आम्ही विधेयक संमत करून घेऊ शकलेलो नाही. मी राजकीय पक्षांना नम्र विनंती करतो की, संसदेच्या या अधिवेशनात नवीन वर्षाची (२०१८) मुस्लीम महिलांना भेट म्हणून हे विधेयक संमत करावे.दरम्यान, केंद्र सरकारचे तलाकबाबतचे विधेयक हे भयानक, तसेच संदिग्ध आहे, असे सोमवारी महिला कार्यकर्त्यांच्या गटाने म्हटले आणि ते आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. हैदराबाद येथील मुस्लीम महिला रिसर्च केंद्रच्या निमंत्रक अस्मा झेहरा म्हणाल्या की, ट्रिपल तलाकला गुन्हा ठरवून, पतीला ३ वर्षांच्या तुरुंगवासात जावे लागणार असल्यामुळे महिला व मुले यांना त्रासच सहन करावा लागेल, शिवाय त्यात पोटगीचा उल्लेख नाही. तोंडी तलाकचा कायदा संमत झाल्यास जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण देशात तो लागू होईल. तोंडी तलाक दिल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा असून, हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

नवी दिल्ली - सतत देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात होत राहणा-या निवडणुका आणि त्यामुळे वाढणार खर्च पाहता लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमतीचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अभिभाषणात व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकत्रित निवडणुकांबद्दल सकारात्मकता दर्शविली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती कोविंद ट्रिपल तलाकचाही मुद्दा उपस्थित केला. ट्रिपल तलाकवरील बंदीमुळे मुस्लीम महिला व मुली यांना आत्मसन्मान आणि धार्ष्ट्य प्राप्त होईल. ट्रिपल तलाक हे विधेयक म्हणजे महिलांसाठी प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊलच असेल, असा दावा त्यांनी केला. सुरक्षेवर भर देताना राष्ट्रपतींनी सुरक्षा दले ईशान्य भारतातील राज्ये व जम्मू-काश्मीरमध्ये तसेच नक्षलग्रस्त राज्यांत उत्तम काम करीत असल्याचा निर्वाळा दिला. मोदी सरकारच्या नवभारत योजनेतील जवळपास सर्व योजनांचा उल्लेख त्यांनी केला. या योजना एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा नसून, देशातील १३० कोटी जनतेच्या विकासाचा तो अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया याचा फायदा देशातील तरुणांना मिळू लागला असून, सरकारने आता २४०० ‘अटल टिंकरिंग लॅब्ज’ सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तरुण व मुले यांच्या नवनवीन कल्पनांना उडण्याचे पंखच मिळतील, असे राष्ट्रपती म्हणाले.

मुर्शिदाबाद - पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी भरब नदीच्या पुलावरून बस नदीत कोसळली. या घटनेत बसमध्ये बसलेल्या ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत ३६ जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या बसमध्ये एकूण ५६ प्रवासी बसले होते अशी माहितीही समोर येते आहे. हा अपघात झाला तेव्हा बसचा चालक मोबाइल फोनवर बोलत होता अशीही माहिती समोर आली आहे.बस चालवताना मोबाइलवर बोलू नकोस अशी विनंती या ड्रायव्हरला प्रवाशांनी वारंवार केली होती. मात्र त्यांचे न ऐकता तो फोनवर बोलतच होता. अशात समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी ड्रायव्हरने पुलावर बस वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नात पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली आणि ३६ प्रवाशांना त्यांचे प्राण गमवावे लागले.पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविलेले पुण्यातील अखिल भारतीय समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला. गेल्याच आठवड्यात पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्या निर्णयाला एकबोटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. भूषण गवई व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल करण्यात आला. ३१ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. एकबोटे व सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी ही हिंसा घडविल्याची तक्रार पुण्याच्या एका महिलेने पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी व इतर काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

नवी मुंबई - महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ही कारवाई करण्यात आल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.सिडकोने भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेला शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यासाठी सानपाडा सेक्टर १५ येथे ३,४९१ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ६५ लाख ४६ हजार ६२३ रुपये या नाममात्र किमतीत दिला होता. या भूखंडाचा करार १८ आॅक्टोबर २00३ रोजी करण्यात आला होता. करारातील अटी व शर्तीनुसार निर्धारित वेळेत बांधकाम परवानगी घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करणे गरजेचे होते, परंतु संस्थेकडून आजतागायत बांधकाम परवानगीच घेतली नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सिडकोकडून या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, परंतु या नोटिसीला संस्थेकडून समानधानकारक उत्तर न मिळाल्याने सिडकोने हे भूखंड वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला.

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन पट्टेदार वाघांमध्ये दुचाकीस्वार सापडल्याची चित्रफित समाज माध्यमांवर सध्या चांगलीच फिरत आहे. हे दुचाकीस्वार ‘बिट गार्ड’ होते व त्यांची सुटका ताडोबाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम २० ते २५ मिनिटांचा आहे. या घटनेत वाघांनी दुचाकीचे बेहाल केले आहे. गार्डला दुसऱ्या गाडीत घेतले नसते तर त्यांना प्राण गमवावा लागला असता, असे त्रिवेदी यांनी सांगितले. त्रिवेदी म्हणाले, २८ डिसेंबरचा तो दिवस कधीच विसरू शकणार नाही. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जामनी येथून मोहुर्ली गेटकडे परत येत असताना दोन बिट गार्ड दुचाकीने परत येत होते. त्यांना मार्गात दोन वाघांनी घेरले. एक समोर तर दुसरा मागे होता. त्यामुळे बिट गार्डने गाडी तिथेच थांबवली आणि वाघ जाण्याची वाट बघू लागले. वाघ असल्याने त्यांना हलताही येत नव्हते. त्याच वेळी घटनास्थळी पोहचलो. गार्डला धीर देत, त्यांना शांतपणे एकाच ठिकाणी उभे राहण्याचा सल्ला दिला. जवळपास तीन ते चार मिनिटे वाघ तिथेच घिरटय़ा घालत होता. त्याचवेळी आपल्या गाडीतील एक कर्मचारी या संपूर्ण घटनाक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण करीत होता. दरम्यान, वन पथकाला बोलवण्यात आले. पथक घटनास्थळी आले. तेव्हा वाघ दुचाकीच्या अगदी जवळ पोहोचला होता. काही अंतरावर तो जाताच गार्डने त्यांचे वाहन हळूहळू पुढे घेतले. बिट गार्डने त्यांची दुचाकी सोडून लगेचच दुसऱ्या गाडीत उडी घेतली. त्यावेळी वाघही त्यांच्या दिशेने धावला. मात्र, तोवर गार्ड गाडीत चढले होते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

मुंबई - बीडीडी चाळीत ३० वर्षापासून राहणाऱ्या पोलीसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला दिले. ते आज मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळीत गेल्या ३० वर्षांपासून जवळपास २९५० पोलीस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी २९५० घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत. घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा. १९९६ नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणाऱ्या कुटूंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली तसेच म्हाडाची घरांची कामे तातडीने सुरु करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.मुंबई - आगामी अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराला अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षा कितपत प्रत्यक्षात येतात यावरच बाजाराची आगामी वाटचाल अवलंबून राहणार आहे. अपेक्षांच्या हिंदोळ्यावर वरवर झेपावत असलेल्या बाजाराला काही प्रमाणात अपेक्षाभंग सहन करावा लागण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे अर्थसंकल्पानंतर बाजारात अल्पकाळ घसरण होण्याचीच शक्यता आहे.शेअर बाजाराचा विचार करता बाजाराला अर्थसंकल्पाकडून बरेच काही मिळावे, असे वाटत आहे. परस्पर निधी आणि आस्थापनांना लाभांश वाटपाच्या आधी त्या रकमेवर कर भरावा लागतो. सध्या या कराचा दर २५ ते २८ टक्के इतका आहे. हा कर काढून टाकावा, अशी अपेक्षा असली तरी ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे. मात्र या कराच्या दरामध्ये काही प्रमाणात कपात होणे शक्य आहे. म्युच्युअल फंडांकडील रकमेवरील दीर्घकालीन भांडवली लाभ (लाँग टर्म कॅपिटल गेन) च्या व्याख्येत मागील अर्थसंकल्पात बदल करण्यात आला आहे. ही मुदत आता ३६ महिने केली गेली आहे. यापूर्वी ती १२ महिने आणि नंतर २४ महिने करण्यात आली होती. ही मुदत कमी केली जावी, अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली लाभावरील करांचे दर कमी करण्याचीही मागणी आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीचा मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. यामुळे या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकानुनयी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी हा अर्थसंकल्प फारसा मृदू नसेल, असे संकेत दिल्याने त्यामधून कितपत लाभ मिळणार याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेसाठी आज बीसीसीआयनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात टी-२० स्पेशालिस्ट सुरेश रैनानं पुनरागमन केलं आहे. तर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आलं आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि जयदेव उडाटकटलाही १६ जणांमध्ये संधी देण्यात आली आहे. धोनीच्या साथीला अतिरिक्त विकेटकिपर म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या संघात तीन सलामिवीर, दोन वकेटकिपर, दोन अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील जबाबदारी विराट, रैना आणि मनिष पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. 
 भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एम.एस. धोनी(WK), दिनेश कार्तित (WK), हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूरऑनलाईन - आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रिची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे केस पातळ होतात. शिवाय सध्या ताण हे केस गळण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांचे सौंदर्य तर त्यांच्या केसातच असते असे म्हटले जाते. केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. केसांच्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे उत्तम तेल आणि शाम्पू गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आहार आणि इतरही गोष्टी केसांचे आरोग्या चांगले राहण्यासाठी तितक्याच आवश्यक असतात. पाहूयात केस जाड व्हावेत यासाठी नेमके काय करावे.

भांग बदला - आपल्यातील अनेक जण कायम एकच भांग ठेवतात. त्यामुळे केसांना त्याचप्रकारचे वळण लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केस गळतात आणि टक्कल दिसायला लागते. त्यामुळे ठराविक काळानंतर केसांचा भांग बदलावा. त्यामुळे टक्कल पडण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.ब्लो ड्राय - ब्लो ड्राय केल्याने केस जाड आहेत असे वाटते. त्यामुळे केस जास्तच पातळ वाटत असतील तर ते तात्पुरते जाड दिसण्यासाठी ब्लो ड्राय हा चांगला पर्याय असू शकतो. एकदा शिकून घेतले की राऊंड ब्रशने ब्लो ड्राय केल्यास त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन - सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा अद्यापपर्यंत एकही चित्रपट रिलीज झाला नाही; मात्र इंडस्ट्रीत तिची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. कारण सातत्याने मीडियामध्ये या बातम्या येत आहेत की, बरेचसे दिग्दर्शक सारा अली खानसोबत चित्रपट करण्यास उत्सुक आहेत. वृत्तानुसार सारा अली खानकडे एका साउथ चित्रपटाची आॅफर आहे. ज्यामध्ये ‘बाहुबली’ सिरीजमधून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाससोबत ती बघावयास मिळणार आहे. ग्लूट डॉट कॉमच्या एका वृत्तानुसार, प्रभास सध्या त्याच्या आगामी बिग बजट ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर त्याने एक नवा चित्रपटही साइन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग याच वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून सुरू केली जाणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांचीच ही इच्छा आहे की, सारा अली खान प्रभाससोबत मुख्य भूमिकेत असावी. वृत्तात सांगण्यात आले की, दिग्दर्शक राधाकृष्ण कुमार यांनी सर्वांत अगोदर या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याशी चर्चा केली. त्यांनी दीपिकाला चित्रपटाची स्क्रिप्टही ऐकविली. मात्र दीपिकाने बराच काळ निर्मात्यांना काही उत्तर दिले नसल्याने राधाकृष्ण यांनी सैफची मुलगी साराला या चित्रपटात साइन करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - खासदारांच्या वेतनात वाढ करू नये अशी मागणी भाजप खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे केली आहे. सोळाव्या लोकसभेत सुमारे ४४० खासदार कोट्यधीश आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात वाढ करू नये, अशा आशयाचे पत्र त्यांनी महाजन यांना दिले आहे. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या खासदारांनी आपले उर्वरित काळातील वेतन सोडावे, असे आवाहन त्यांनी खासदारांनाही केले आहे.लोकसभेतील प्रत्येक खासदाराकडे सरासरी १४.६१ कोटी रूपयांची तर राज्यसभेतील प्रत्येक खासदाराकडे २०.१२ कोटींची संपत्ती आहे. अशावेळी महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष या नात्याने कोट्यवधींची संपत्ती असलेल्या खासदारांना वेतन घेऊ नये असे अपील करावे. वरूण यांनी आपल्या पत्रात एक उदाहरणही दिले आहे. १९४९ मध्ये पंडित नेहरूंच्या कॅबिनेटने देशाची आर्थिक स्थिती पाहून तीन महिने वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. वेळोवेळी खासदार आणि आमदारांचे वेतन केव्हा आणि कितीने वाढायला हवे, यासाठी एक संवैधानिक समिती बनवण्याची गरज असल्याचे वरूण यांनी आपल्या पत्रात म्हटले.

केरळ - केरळमधील अलाप्पुझा येथे असणाऱ्या कोचीन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुट्टनाडमधील काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर त्यांना जाणून बुजून ‘बीफ’ खाऊ घातल्याचा आरोप लावला आहे. शनिवारी अलाप्पुझाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या विद्यार्थ्यांनी एक पत्र लिहून याविषयीची माहिती दिली. या पत्राद्वारे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांविरोधात तक्रार करत आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.‘येथील बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना असून, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मुख्य म्हणजे त्यातील काही विद्यार्थ्यांना या सर्व प्रसंगाविषयी आपल्या पालकांना माहिती देताना बुझल्यासारखे वाटत आहे’, असे एका विद्यार्थ्याने स्पष्ट केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने प्रसिद्ध केले.

मुंबई - कर्जवसुलीसाठी बॅँकेने जप्त केलेल्या किमती गाड्या स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने, अनेकांना गंडा घालणाऱ्या एका ठगाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशन जगतियानी उर्फ मनिष लालवानी उर्फ राजू भाई (वय ४१, रा. ओटी सेक्शन पुछ पंचायत, उल्हासनगर) असे त्याचे नाव असून, अशा प्रकारे त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.खासगी बॅँकांच्या अधिकाऱ्यांशी आपली मैत्री आहे. कर्जाची वसुली न झाल्याने जप्त केलेले ट्रक, टेम्पो, कार व अन्य मोठी वाहने कमी किमतीत मिळवून देतो, असे सुनील जगतियानी हा लोकांना आमिष दाखवत त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेत असे. अशा प्रकारे लाखो रुपयांना गंडा घातल्याबाबत एका व्यापाऱ्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी जगतियानीला अटक केली असता, त्याच्याकडून फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध ठाण्यातील उल्हासनगर, एफएमसी पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल असून, तक्रारदारांनी पवई पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नगर - भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अनियंत्रित अशा करणी सेनेविरुद्ध अशीच कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान माजी खासदार, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले. अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या असून, त्याची झळ केवळ मुस्लीम, ख्रिश्चन, दलितच नाही तर सर्व मध्यमवर्गीय हिंदूंना बसत आहे. करणी सेना ही अशीच अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांची प्रतिनिधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात आयोजित करण्यात आलेल्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी प्रकाश आंबेडकर येथे आले होते, तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. अनियंत्रित संघटनांनी मुस्लीम, ख्रिश्चनांना त्रास दिला. त्या वेळी कुणी बोलल नाही. भीमा कोरेगावला त्यांनी ओबीसी लोकांना ‘टार्गेट’ केल्यानंतर आपण प्रतिक्रिया देऊ लागलो. गुरगावलाही शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली. संघटनांचे हे भांडण आता सर्व मध्यमवर्गीय हिंदूंच्या घरापर्यंत पोहोचले आहे. या संघटना न्यायालयाच्या निर्णयाला महत्त्व न देता स्वत:च निर्णय करतात. देशात व राज्यातही कायदेशीर मार्गाने चालणाऱ्यांवर दडपशाही होते आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देणाऱ्यांवर साधी फिर्यादही दाखल होत नाही.आरोपी संभाजी भिंडेंना वाचवण्याचा पंतप्रधान कार्यालयातून दबाव टाकण्यात येत आहे. योग्य तपास न झाल्यास भिडे व पंतप्रधान कार्यालयाचे असलेले कनेक्शन पुराव्यासह सादर करण्यात येईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्री सरदार पटेलांचे नाव घेतात. स्वातंत्र्यानंतर रा. स्व. संघाच्या नेत्यांना तुरुंगातून बाहेर सोडताना सरदार पटेल यांनी तिरंगा फडकवणार असल्याचा करार केला. त्यानंतर संघाच्या लोकांना सोडण्यात आले. त्यामुळे आजही संघाच्या लोकांवर संशय घेतला जातो. २०१४ पूर्वी नागपूरच्या मुख्यालयात कधी तिरंगा फडकविला गेला नाही. आता तर मोहन भागवत स्वत: तिरंगा फडकावत आहेत. लोकांकडून संघावर होणारे आरोप, त्यातील झेंडावंदनाची स्वेच्छा की जबरदस्ती याचा खुलासा होणे आवश्यक आहे. भाजप सत्तेत आल्यानंतरच संविधान दुरु स्तीची नव्हे तर बदलाचीच चर्चा सुरू झाल्याचेही आंबेडकर म्हणाले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केलेल्या एका फोनने दुरावा दूर झाला आणि हे पक्ष पुन्हा भाई-भाई म्हणून एका व्यासपीठावर आले. प्रजासत्ताक दिनी मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पावर यांनी घेतलेल्या पुढाकारास यश आले.काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्वत: राहुल गांधी यांना फोन केल्याने दोन्ही पक्षांमधील दुरावा दूर झाला. देश आणि राज्यघटना वाचविण्यासाठी भाजपाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज पवार यांनी राहुल गांधींना पटवून दिल्यावर या रॅलीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस इतर विरोधी पक्षांसोबत एका व्यासपीठावर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई - माथाडी कामगार कायद्याच्या मूळ रचनेत बदल करून कामगारांचे नुकसान करण्याच्या राज्य सरकारच्या मालकधार्जिण्या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरातील माथाडी कामगार उद्या, मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे माथाडी कामगार संघटनांनी जाहीर केले आहे. 
दिवंगत ज्येष्ठ माथाडी कामगार नेते मनोहर कोतवाल यांच्या अथक प्रयत्नांनंतर महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण), कायदा १९६९ हा कायदा राज्यात करण्यात आला होता. माथाडी कामगारांसाठी कायदा होणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते. परंतु, राज्य सरकारने १० फेब्रुवारी २०१६ व १७ जानेवारी २०१८च्या परिपत्रकांद्वारे राज्यातील ३६ माथाडी मंडळे बरखास्त करून एकच महामंडळ निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून माथाडी कायद्यातील अनेक कामगार हितांच्या तरतुदी वगळून माथाडी कायदा निष्प्रभ करण्याचाच घाट घातला जात आहे, असा आरोप माथाडी कामगार संघटनांनी केला आहे. या विषयावर विविध संघटनांची नुकतीच वाशी येथे संयुक्त बैठक झाली. त्यात मंगळवार, ३० जानेवारी रोजी संपूर्ण राज्यातील माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक - व्हिडीओ कॉलिंगने नवोदित जोडप्याला घटस्फोट देण्याचा निकाल नुकताच नाशिकमध्ये लागला. जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे घटस्फोट देण्यात आला. यापूर्वी पुण्यात असा निकाल देण्यात आला होता. या प्रकरणातील मुलगा दुबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. मुलगी नाशिकला राहते. दोघांचा विवाह नाशिकला झाला. मतभेदांमुळे ते नांदू शकले नाहीत. त्यांनी समझोता करून हिंदू विवाह कायदा कलम १३ (ब)अन्वये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनी नाशिक दिवाणी न्यायाधीश सचिन पाटील यांच्या कोर्टात दावा दाखल केला. सुनावणीवेळी मुलगा भारतात नसल्याने न्यायालयाने त्याच्याशी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला. नंतर घटस्फोट मंजूर करण्यात आली. दोघांतर्फे अॅड. श्रीकांत बोराडे यांनी काम पाहिले.

अलिबाग - राज्यात जरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाली तरी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अशी आघाडी होणार नाही. सुनील तटकरे यांनी सलग तीन वेळा आमची फसवणुक केली आहे. याचा राजकीय बदला घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, मग पक्षाने कारवाई केली तरी चालेल असे शाब्दीक हल्ला माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी चढवला. बेलोशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शेकापचे आमदार सुभाष पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते. आमदार सुभाष पाटील यांनी जिल्ह्यात शेकाप आणि राष्ट्रवादीची भक्कम आघाडी झाली आहे. यात आता काँग्रेसनेही सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र मधुकर ठाकूर यांनी त्यांच्या या अपेक्षांना आपल्या जाहिर भाषणातच सुरुंग लावला. आणि सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टिका केली.

पुणे - पुणे शहरातील विशेषत: सत्ताधारी आमदारांकडून महापालिकेच्याच निधीवर डोळा ठेवण्यात येत असल्याचे गत अंदाजपत्रकावरून स्पष्ट झाले आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकातही या आमदारांकडून सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी मागण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने अंदाजपत्रकातील सहयादी फुगणार आहे. त्याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीवर होत असल्याने नगरसेवकांमधील नाराजी वाढत आहे. सत्ताधारी पक्षाच्या बहुतांश आमदारांनी विधानसभेवर जाण्यापूर्वी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक, त्याद्वारे मिळणारा निधी आणि त्यातून होणारी कामे याचा त्यांना पूर्ण अंदाज असल्याने आमदारांकडून महापालिकेच्या निधीवर डोळा ठेवण्यात येत आहे. सत्ताधारी आमदारच महापालिकेच्या निधीवर डोळा ठेवत असल्याने त्याचा थेट फटका नगरसेवकांकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांवर होत आहे.

मुंबई - जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या कारभारामुळे पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांनी सांगितले आहे.धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्याने वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६००आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त रविवारी केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदीविधेयक संमत करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेत विरोधकांनी त्यात सुधारणा सुचवल्या आहेत. या विधेयकाच्या मंजुरीसाठी एकमत साधण्याचा केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करेल, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.वस्तू व सेवा कराचे विधेयकही सर्व पक्षांचे एकमत झाल्यावरच संमत करण्यात आले. त्याचप्रमाणे तिहेरी तलाकबंदी विधेयकही संसदेत संमत केले जाईल. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित असून त्यावर वरिष्ठ सभागृह निर्णय घेईल, असे अनंतकुमार म्हणाले. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली तसेच, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेस), मुलायम सिंह यादव (समाजवादी पक्ष), डी. राजा (भाकप), कणीमोळी (द्रमुक), डेरेक ओब्राएन, सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), तारिक अन्वर (राष्ट्रवादी काँग्रेस), दुश्यंत चौताला (आयएनएलडी) आदी विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

नवी दिल्ली - भ्रष्टाचार जो कोणीही करेल त्याला तुरुंगात टाकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती कोणीही असो, त्या व्यक्तीला सोडणार नाही. देशात सध्याच्या घडीला भ्रष्टाचार करणारे तीन माजी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत.असे म्हणत यापुढे एकाही भ्रष्टाचारी माणसाला माफ करणार नाही अशी गर्जनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात सुरु झालेली लढाई त्याचे उच्चाटन होईपर्यंत थांबणार नाही. या लढाईत तरुणाईने सहभाग घेतला पाहिजे असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोणी किती ताकदीचा असो, त्याचे वर्तन जर भ्रष्ट असेल त्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणारच असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.सध्या भ्रष्टाचार केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला या तिघांचीही रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरु असलेली लढाई थांबणार नाही. भ्रष्टाचाराची कीड देश पोखरते आहे. त्यापासून देशाचे रक्षण करायचे असेल तर तरूणाईने पुढे यायलाच हवे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.

नाशिक - प्रजासत्ताक दिनी ड्राय डे असल्याची संधी साधून शहरात विक्रीसाठी आणलेला मद्यसाठा क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केला. संजय रावसाहेब शेजवळ (४२ रा. आडगाव मेडिकल कॉलेज फाटा, आडगाव) असे कारमधून मद्यविक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. २६ जानेवारी निमित्त शुक्रवारी ड्रायडे असून, या पार्श्वभूमीवर कारमधून मद्यविक्री होणार असल्याची माहिती युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे व सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त अशोक नखाते आणि युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ याच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादरोड ते आडगाव मार्गावर ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले. औरंगाबादरोडवरील उड्डाणपुलाखाली संशयास्पद उभ्या असलेल्या कारची (एमएच १५ इएक्स १२०९) पोलिसांनी तपासणी केली असता पोलिसांना मद्यसाठा सापडला. या कारमध्ये देशी-विदेशी आणि विविध कंपन्याचा सुमारे ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी संशयित शेजवळला अटक केली. मद्यसाठ्यासह कार असा सुमारे ४ लाख ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मुंबई- मुंबईमध्ये विरोधीपक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीला काढली. या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा सहभाग घेतला होता. आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया अशी ही रॅली होती. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरूवात झाली असून रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाही. कोणतीही घोषणाबाजी न करता विरोधकांची मूक रॅली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, खासदार राजीव सातव, आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले. दरम्यान, संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळते आहे. परवानगीशिवाय रॅली काढल्याने कारवाई केली जाणार असून मुंबई पोलीस आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget