February 2018

अहमदनगर - नेवासा येथील संकेत पांडुरंग घोरतळे या २२ वर्षांच्या तरुणानं सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केली. ही गोष्ट कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताबडतोब नगरच्या सिव्हिल हॉस्पीटलला उपचारासाठी हलवलं,परंतु उपचार सुरु असताना संकेतनं अखेरचा श्वास घेतला. संकेतनं हे टोकाचं पाऊल का उचललं? त्याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. या घटनेने संपूर्ण नेवासा शहरात खळबळ उडाली. शहरात दिवसभर हळहळ व्यक्त होत होती. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मृतदेहाचे शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मुंबई - बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लब येथे ठेवण्यात आले आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. सेलिब्रेशन क्लब येथून दुपारी २ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे व पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.त्रिपुरा - इशान्येकडील राज्यांमधूनही भाजपला 'अच्छे दिन'चे संकेत मिळाले आहेत. त्रिपुरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळेल, असा अंदाज 'एक्झिट पोल'मधून व्यक्त करण्यात आला आहे. त्रिपुरा विधानसभेच्या ६० जागांपैकी ३५ पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विविध 'एक्झिट पोल'चा अंदाज आहे. जन की बात-न्यूज एक्सच्या 'एक्झिट पोल'नुसार भाजप-आयपीएफटी आघाडीला त्रिपुरात ३५ ते ४५ जागा मिळणार आहेत तर अॅक्सिस माय इंडियाच्या 'एक्झिट पोल'मध्ये भाजप आघाडीला ४४ ते ५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डाव्या आघाडीला राज्यात १४ ते २३ जागा मिळतील, असा जन की बात-न्यूज एक्सच्या 'एक्झिट पोल'चा अंदाज आहे तर अॅक्सिस माय इंडियाने डाव्या आघाडीची ९ ते १५ जागांपर्यंत घसरण होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. भाजप आघाडीला त्रिपुरात २४ ते ३२ जागा मिळतील तर डाव्या आघाडीला २६ ते ३४ जागा मिळतील असा सी व्होटरचा अंदाज आहे. त्रिपुरासह मेघालय आणि नागालँड या राज्यांमध्येही भाजपला चांगले यश मिळेल, असा या 'एक्झिट पोल'चा अंदाज आहे.

चेन्नई - कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हतं. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. आज प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सीतापूर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या २३ मार्च रोजी लोकपाल, लोकायुक्तसाठी दिल्लीत उपोषण करणार आहेत. परंतु, या उपोषण आंदोलनाला ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलावणार नाहीत. केजरीवाल हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा लोकांनी माझ्याकडे येण्याची गरज नाही. त्यांच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. ही बाबही चांगली नाही. निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.अण्णा हजारे मंगळवारी सीतापूर (उत्तर प्रदेश) येथील राजा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. ते म्हणाले, दिल्लीमध्ये मी दोनवेळा उपोषणाला बसलो दोन्ही वेळेस तेथील सरकार पडले. यावेळी हेच होणार आहे. काँग्रेसने लोकपाल कायदा करून फसवणूक केली आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक प्रामाणिक व्यक्ती होते. पण त्यांनी कायदा न करता देशाला धोका दिला.अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मला अपेक्षा होती की अच्छे दिन येतील. पण त्यांनी भ्रष्टाचार आणखी वाढवून ठेवला आहे. कलम ४४ संमत करून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. ही पण एक चोरीच आहे, असे ते म्हणाले.

पुणे - पुणे महापालिकेच्या बाहेरील पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) मुख्य बसस्थानक पुढील काही दिवसांत शिवाजीनगर धान्य गोदामाच्या जागेत हलविण्यात येणार आहे. शहरातील मेट्रो मार्गिकांच्या 'इंटर-चेंज' स्टेशनसाठी सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) ताब्यात असलेल्या गोदामाच्या जागेपैकी काही जागा तात्पुरत्या स्वरूपात पीएमपीच्या स्थानकासाठी देण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आणि पीएमपीचे बसस्थानक एकाच ठिकाणी येत असल्याने त्यावर हा तोडगा काढण्यात आला आहे. महापालिका, महामेट्रो आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी या निर्णयाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे काम आता अखेरच्या टप्प्यात असून, येत्या महिनाभरात त्याचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे बसस्थानक 'महामेट्रो'च्या धान्य गोदामाच्या जागेत सुरू करण्याची सूचना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली. गोदामांच्या जागेत 'महामेट्रो'ने सध्या फक्त ऑफिसचे काम सुरू केले असून, अद्याप इतर कामांना सुरुवात होण्यास काही कालावधी आहे. त्यामुळे जागेची पाहणी करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत 'महामेट्रो'च्या अधिकाऱ्यांनी दिले.

मुंबई - लोकलचे दरवाजे अडवून अन्य प्रवाशांना डब्यात शिरण्यास अटकाव करणाऱ्याविरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) सहाय्याने मंगळवारी केलेल्या कारवाईत २८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन स्टंटबाजांचाही समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील मिरा रोड स्थानकात चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये शिरण्यास प्रतिबंध करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याने एका पत्रकारास बेदम मारहाण केली होती. या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिस, आरपीएफने संयुक्त मोहीम राबवली आहे. मंगळवारी सकाळी विरार, वसई, नालासोपारा येथून सुटणाऱ्या लोकलवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. बोरिवली येथे काही लोकलमध्ये टोळक्यांकडून प्रवाशांना डब्यात शिरण्यास मनाई करण्यात येत होती. अशा टोळक्यावर लागलीच कारवाई करण्यात आली. यामध्ये धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यासह १३ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.चैन्नई - माजी केंद्रीय अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याला आयएनएक्स मीडिया प्रकरणासंदर्भात सीबीआय ने अटक केली आहे. सकाळी ८.०० वाजता ही अटक करण्यात आली आहे. सीबीआईने चैन्नई विमानतळावरून त्यांना ताब्यात केली आहे.याआधीही कार्ती यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अनेकदा सीबीआयनं छापे टाकले आहेत. आयएनएक्स मीडियाला परदेशातून पैसे मिळवता यावे, यासाठी एफआयपीबी या सरकारी संस्थेकडून परवानगी मिळाली होती. त्यावेळी चिदंबरम गृहमंत्री होते. याचाच फायदा घेऊन कार्तीने परदेशातून पैसे घेतले, आणि पैशांचा गैरव्हवहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार या प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी ते सीबीआयला सहकार्य करत नव्हता. त्यामुळे त्यांना ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पी. चिदंबरम हे सध्या लंडनमध्ये आहे. पण मुलाच्या अटकेची बातमी मिळताच ते भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

सावंतवाडी - नारायण राणे यांना मंत्रिपदी स्थान दिले जाऊ नये म्हणून शिवसेना प्रयत्न करत आहे. शिवसेना संपत चालली असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार व आमदाराने साडेतीन वर्षांत विकासासाठी काहीच केले नसल्याची टीका केली. सुंदरवाडी महोत्सवाच्या सांगता समारंभात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, सौ. नीलम राणे, आयोजक संजू परब, दत्ता सामंत, सभापती रवींद्र मडगांवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या सर्वागीण विकासासाठी मी सन १९९० पासून सतत प्रयत्न करत आहे. रस्ते, पाणी व विजेसोबतच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे राणे म्हणाले. मी सी वर्ल्ड, रेडी बंदर, आडाळी एमआयडीसीसारखे अनेक प्रकल्प आणले, पण पालकमंत्री, खासदार व आमदाराने साडेतीन वर्षांत पुढचे पाऊल टाकलेच नाही. विमानतळदेखील रखडून ठेवला असे नारायण राणे म्हणाले.

नागपूर - नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. त्यांच्या सूचनेनुसार मेट्रो रेल्वेने प्रस्ताव सादर केला असून, तो आता लवकरच रेल्वे विभागाकडे सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे बंद केल्या जातील व रेल्वेच्या लाईन वापरून महामेट्रो त्यावर लोकल मेट्रो रेल्वे चालवेल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. समीर मेघे, प्रवीण दटके, संदीप जोशी यांच्यासह महापालिका, नासुप्र, रेल्वे, महामेट्रो, सिंचन, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, रेल्वेचे स्टेशन व रुळ वापरून लोकल मेट्रो रेल्वे चालविण्याची महामेट्रोची योजना आहे.

मुंबई - गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोेलिसांनी ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याचा तपास सुरू आहे. घाटकोपरला राहणारा जिगर सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील त्याच्या कार्यालयातील काम उरकून मरीन ड्राइव्ह येथील एका बँकेत आला होता. तेथून त्याने मरिन प्लाझा गाठले. नंतर त्याने चालक सुनील सिंग याला गाडी पार्क करायला सांगितले. ड्रायव्हरला बाजूला जायला सांगून त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपविले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या दहशतीला घाबरू नका, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दाखवतानाच मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासनासोबतच विविध सामाजिक संघटना करत असल्या तरी या जिल्हय़ात त्याचा काही एक परिणाम दिसून येत नसून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल न केल्याने ४३२ ग्राम सदस्यांचे पद रिक्त राहणार आहेत.एका पाठोपाठ एक जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण करीत असले तरी गडचिरोली जिल्हय़ात अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मनातून काही केल्या नक्षलवाद्यांची दहशत व भीती कमी होत नसल्याची बाब पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आली आहे. गडचिरोली जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूकित १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केलेले नाही. राज्य निवडणूक आयोगाद्वारे १६ ग्रामपंचायतीत नियमित निवडणूक तसेच २०७ ग्रामपंचायतमध्ये उपनिवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यासाठी ५ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिली होती. १६ ग्रामपंचायतमध्ये सरपंचासोबत १३६ पदांसाठी निवडणूक जाहीर केली. मात्र, एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन दाखल न केल्यामुळे ४७ सदस्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर ४२ पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे ही सर्व पदे रिक्त राहणार आहेत. तसेच ४७ पदांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासोबतच २०७ ग्रामपंचायतीच्या ५१९ जागांसाठी उपनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यातही ३९० जागांसाठी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर १०५ उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे आता केवळ उर्वरित २४ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूणच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे १९२ ग्रामपंचायतीत ४३२ पदे रिक्त राहणार आहेत.मुंबई - शिवसेनेच्या आमदार-मंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक होण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील हाॅटेल ट्रायडेंटमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली.नाणार प्रकल्प, सातवा वेतन आयोग, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयांवर सरकारला धारेवर धरण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या शिलेदारांना दिल्या आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्याची मागणी अधिवेशनात होणार आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्रात' झालेल्या घोषणांचा पाठपुरावा करा आणि त्याचा जाब सरकारला विचारा असा थेट आदेशच पक्ष प्रमुखांनी सर्व लोकप्रतिनिधींना दिला.त्यामुळे भाजपची डोकेदुखी तर वाढलीच आहे. पण खरी कसोटी लागणार आहे ती अर्थ संकल्प विधीमंडळात मंजूर करताना. 'अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी सरकारचा त्यामुळे कस लागणार आहे.शिवसेनेच्या विरोधामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे भाजपला विरोधकांपैक्षा मित्र पक्षाचाच मोठा सामना करावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या सहा अलिशान कार आणि एक ३३ लाख रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या वाहनांची किंमत तब्बल पाच कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील डीएसके यांचे कार्यालयाची सोमवारी झडती घेण्यात आली असून, त्यात पोलिसांना महत्त्वाच्या फाइल मिळाल्या आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये कर्ज, एफडी व प्रोजेक्ट फाइल आहेत. या कागदपत्रांच्या आधारे डीएसकेंच्या सीएकडे चौकशी केली जात आहे. जंगली महाराज रस्त्यावरील डीएसकेंच्या मुख्य ऑफिसमध्ये तपासादरम्यान झाडती घेण्यात आली आहे. त्यात पोलिसांना काही महत्त्वाच्या फाइल मिळाल्या आहेत. या ऑफिसमध्ये फाइलची संख्या मोठ्या प्रमाणात असून गेल्या तीन दिवसांपासून येथील ऑफिसमध्ये झडती घेतली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सोमवारीही सायंकाळपयर्यंत झडती सुरू होती.

मुंबई - लष्कराकडून उभारण्यात आलेल्या परळ-एल्फिन्स्टन पूल, करीरोड आणि आंबिवली स्थानकातील पूल आज प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे रेल्वेपुलाच्या गर्दीतून अखेर प्रवाशांची सुटका झाली. आजपासून तीनही पादचारी पूल मुंबईकरांना वापरण्यासाठी खुले करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत त्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.याचबरोबर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या स्थानकासाठी लागणाऱ्या जमिनींच्या कागदपत्राच्या हस्तांतरणाचा कार्यक्रमही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पूलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयानं मुंबईतल्या तीन पूलांचे काम लष्कराच्या हाती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लष्कराकड़ून उभारण्यात आलेल्या या तीनही पादचारी पूल आजपासून मुंबईकरांना समर्पित केले जाणार आहेत.

नवी दिल्ली - दक्षिणेकडील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आले असून, त्यांच्याविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांनीच केली आहे. या राज्यपालांच व संबंधित राज्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. राजभवनात काम करणा-या महिला कर्मचा-यांना त्यांनी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप आहे. गृहमंत्रालयाने या प्रकरणाची अतिशय गंभीरपणे दखल घेतली आहे, तसेच तपास यंत्रणांना आरोपांच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही समजते. चौकशी अहवालात आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास, राज्यपाल महोदयांना राजीनामा देण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.मुंबई - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे. त्याबद्दल संबंधित देशांकडून माहिती मिळावी, याकरिता ईडीनेड विशेष पीएमएलए न्यायालयाला ‘लेटर आॅफ रोगेटरी’ (एलआर) देण्याची विनंती सोमवारी केली.प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत एलआर काढण्यासाठी ईडीने हा अर्ज केला. हाँगकाँग, यूएसई, युके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांत नीरव मोदीची संपत्ती आहे. तो या देशांत व्यवसाय करत होता. त्यामुळे या गुुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे संबंधित देशांकडून मिळावी, याकरिता एलआर काढावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली.
मोदीच्या फर्म्सला अंडरटेकिंग दिल्याचे बँकेच्या दप्तरी नोंद नाही. मोदीने फसवणूक व षड्यंत्र रचून बँकेला लुटले, असे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

नवी दिल्ली - भारतात इलेक्ट्रिक कारच्या व्यापक वापराची सुरुवात केंद्र सरकारच्या बहुतांश मंत्रालयांपासून होणार असून येत्या दोन आठवड्यांमध्ये सरकारी गाड्यांच्या ताफ्यामध्ये पाचशे इलेक्ट्रिक कारची भर पडणार आहे. मोदी सरकारने दहा हजार इलेक्ट्रिक कारच्या खरेदीच्या निविदा काढल्या असून पुढच्या बारा वर्षांमध्ये म्हणजे २०३० पर्यंत देशातील कारच्या एकूण संख्येपैकी तीस टक्के इलेक्ट्रिक कार असाव्यात, असे लक्ष्य निर्धारित केले आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. इलेक्ट्रिक कारसाठी नितांत आवश्यक असलेले चार्जिंगचे धोरणही सरकारने आखले असून येत्या पंधरा दिवसांत ते केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल. इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत तिप्पट असून पाचजण बसण्याची क्षमता असलेल्या कारची किंमत ११ लाख रुपयांच्या आसपास असेल. भविष्यात इलेक्ट्रिक कारच्या किंमती सात-आठ लाखांवर येण्याची शक्यता आहे. भारतात सध्या टाटा मोटर्स आणि महिंद्र अँड महिन्द्र इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करीत आहेत.

नागालँड - पुर्वोत्तर राज्यातील मेघालय आणि नागालँड राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरूवात झाली. हे मतदान सांयकाळी चारपर्यंत सुरू राहील. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या ६०-६० जागा आहेत. पण दोन्ही ठिकाणी ५९ मतदारसंघातच निवडणूक होत आहे. मेघालयमध्ये दि. १८ फेब्रुवारी रोजी ईस्ट गारो हिल्स जिल्ह्यात आयइडी स्फोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जोनाथन एन संगमा यांचा मृत्यू झाल्यामुळे विलियमनगर मतदारसंघातील निवडणूक रद्द झाली आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी प्रमुख नीफियू रियो हे उत्तर अंगामी द्वितीय विधानसभा मतदारसंघातून अविरोध निवडून आले आहेत. दोन्ही राज्यासंह त्रिपुरातील मतमोजणी दि. ३ मार्च रोजी होणार आहे.

बुलडाणा - शिंदी येथील बाप-लेकाने साखरखेर्डा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वी याच घरातील एका मुलीने आणि मुलाने आत्महत्या केली होती. एकाच वर्षात कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. शिंदी येथील संतोष नारायण बंगाळे (६५) यांना लक्ष्मण (४०) हा मुलगा व चार विवाहित मुली आहेत. लक्ष्मण याला एक मुलगी आणि एक मुलगा होता. लक्ष्मण पत्नी मुलांचा छळ करीत होता. श्रावण महिन्यात लक्ष्मण दिंडीला गेला असताना चैतन्यने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाच्यता नको म्हणून रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मुलगी सोनाली हिने वडिलांसोबत भांडण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण गावातच मिटविण्यात आले. लक्ष्मण याच्या विक्षिप्त स्वभावामुळे संतोष मुलापासून वेगळे राहत होते. लक्ष्मणच्या त्रासाबाबत पत्नीने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारही दिली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा पती-पत्नीत भांडण झाले. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली, तर लक्ष्मण सोमवारी लग्नानिमित्त शिंदीला गेला. परत साखरखेर्ड्याला येताना वडील संतोष यांना सोबत घेऊन आला. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास दोघेही दोरांनी गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.

सांगली - शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरची चळवळ उभी करणारे खासदार राजू शेट्टी आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय संघर्ष आता हातघाईवर आला आहे. मात्र, एकमेकांच्या बलस्थानांवर केल्या जात असलेल्या हल्ल्यांतून चळवळीप्रमाणेच शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. राज्यमंत्री खोत यांच्या वाहनावर माढा तालुक्यात झालेल्या हल्ल्याचे पडसाद कर्म आणि जन्मभूमी असलेल्या वाळव्यात उमटले नसते तर नवल. मात्र, या प्रतिक्रिया दोघांच्या अस्तित्वाच्या अपरिहार्यतेतूनच असल्याचे ठळकपणे दिसत आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र मांडले. त्यातूूनच पश्चिम महाराष्ट्रातील चळवळीला दिशा मिळाली. ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत साखर कारखान्याचे धुराडे कधी सुरू करायचे, याचा निर्णय या दोघांच्या भूमिकेवर ठरू लागला. यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात ही जोडी अग्रस्थानी असायची, प्रसंगी पोलिसांच्या लाठय़ाही अंगावर झेलल्या. यामुळेच ऊस उत्पादक साखर कारखानदारीच्या केंद्रस्थानी आला.परंतु,आता मात्र या दोघांमध्ये संघर्ष त्यातला असून शेतकऱयांचे मात्र नुकसान होण्याचे छिन्न दिसत आहे.

सोलापूर -राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये एक जण सोलापूरचा असून चौघे कर्नाटकमधील रहिवासी आहे.यातील एक जण पोलीस शिपाई असल्याचे समजते. जखमींवर सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण औरंगाबादमधील इज्तेमावरुन परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.

पुणे - शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार गंभीर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला जाईल. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता अर्थसंकल्पात घेतली आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यात इतकी वर्षे ‘जाणता राजा’च्या पक्षाचे सरकार होते. त्या काळात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या. आमच्या सरकारने कृषी विभागाची तरतूद वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्यामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार यांनी, शेतकरी संघटनेने जे हल्ले केले ते काँग्रेसच्या काळातही होत होते, असे सांगितले.मुंबई - ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पाडून दोन वर्षे उलटल्यावर या पुलाच्या कामाला अखेरीस मुहूर्त सापडला आहे. सोमवारी या पुलाच्या कामाला आरंभ होणार असून पूल पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. हा पूल बांधण्यासाठी महापालिकेला ५२ कोटी रुपयांचा खर्च येईल. पूर्व-पश्चिम जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हँकॉक पादचारी पुलासाठी तीन वेळा निविदा काढण्याची वेळ आली. पहिल्या वेळी कंत्राटदार काळ्या यादीत असल्याने तर दुसऱ्या वेळी जीएसटीमुळे निविदा रद्द करण्याची पाळी आली. तिसऱ्या वेळी निविदेला आलेल्या प्रतिसादानुसार या ६५ मीटर लांबीच्या पुलाचे काम देण्यात आले आहे.सॅण्डहर्स्ट रेल्वेस्थानकानजीक असलेला हा पूल १८७९ मध्ये बांधला होता.

जळगाव - जळगावात लग्नासाठी येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वारांकडून हल्ला करण्यात आला आहे. डॉ. पाटील हे रविवारी (दि. २५) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास कारने (एमएच. १५, ईएक्स ९००९) जात असताना मानराज पार्कसमोर त्यांच्या कारवर दुचाकीवरील दोन तरुणांनी अचानक हल्ला केला. या दोघांनीही हेल्मेट घातले होते. पाटील हे जळगावात नातेवाईकांकडे लग्नासाठी निघाले होते. चालक गुलाब पाटीलसह सचिव भय्या माणिक आणि आरटीपीसी कोकणे त्यांच्यासोबत होते. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास समोरून दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या दोघांनी कारवर हल्ला केला. यात कारची समोरील काच फुटली आहे. हल्ला करून हल्लेखोर पाळधीच्या दिशेने पसार झाले.सोलापूर - अगोदर जाती नष्ट करा, मग आम्ही आरक्षणाची मागणी करणार नाही, असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या प्रस्तावाला ठामपणे विरोध केला. रिपाइं ऐक्यासाठी मराठा समाजात फूट पाडा, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.रविवारी दुपारी सोलापुरात रिपाइंचा मेळावा आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांची या वेळी उपस्थिती होती. रिपाइंच्या ऐक्यासाठी केवळ एक विशिष्ट समाज संघटित होऊन उपयोगाचे नाही, तर समस्त बहुजन समाजही एकत्र यायला हवा. मराठा समाजालाही सोबत घ्यावे लागणार आहे. त्यासाठी मराठा समाजात फूट पाडा, अशा आवाहनाचा आठवले यांनी पुनरुच्चार केला.

मुंबई - सातव्या वेतन आयोगासाठी आक्रमक पवित्रा घेत, आॅल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशनने ५ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. या वेळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवरही धडक मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आहेत. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदानावर दुपारी २ वाजता हजारो शासकीय कर्मचारी धडक देतील. या वेळी धरणे आंदोलनाने सातवा वेतन आयोग, वाढीव महागाई भत्ता, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल, तर दुपारी १ वाजता राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर जिल्हास्तरीय पदाधिकारी निवेदन घेऊन धडकतील.शासनातील मागासवर्गीय कर्मचा-यांच्या मागण्यांवरही आंदोलनातून आवाज उठविणार असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले. त्यात आरक्षण कायद्याप्रमाणे मागासवर्गीय कर्मचा-यांच्या नेमणुका करण्याचे आवाहन शासनाला केले आहे.

सावंतवाडी - कणकवली नगर पंचायत निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढवील आणि स्वाभिमान पक्ष १७ ही जागांवर विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.कणकवली नगर पंचायत निवडणूक कार्यक्रम अद्याप घोषित झालेला नाही. मात्र तो केव्हाही घोषित होऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाचा शुभारंभ राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नीतेश राणे व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.ज्याला पराभवाची भीती असते तोच आघाडी करतो. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आघाडीची गरज नाही. कार्यकर्त्यांचे श्रम आणि मतदारांचा विश्वास यावरच या निवडणुकीत स्वाभिमान पक्ष १७ ही जागांवर जिंकेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.सांगली - इस्लामपुरात आमचे कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे सर्वश्रुत आहे. बलात्कार, खंडणी आणि खुनाचे गुन्हे दाखल झालेले गुन्हेगार आमच्यावर हल्ले करीत आहेत. ते कोणत्या पक्षात आणि कोणत्या संघटनेत आहेत, त्यांचे कारनामे काय आहेत, हे जगजाहीर आहे.मला फार बोलायला लावू नका, नाहीतर मी सर्व भानगडी पुराव्यासह उघड करीन, त्यावेळी तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा जोरदार हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांवर चढवला. सांगली येथे जिल्हा परिषदेत कार्यक्रमास आले असता शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला. त्या पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना व्यक्ती द्वेषातून आंदोलन करत नाही.

श्रीनगर - सुरक्षा दलातील जवानांनी जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात काही दहशतवाद्यांना घेराव घातल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जवानांनी बांदीपोराच्या हाजिन परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारदेखील केला. यावेळी जवानांनीही दहशतवाद्यांच्या गोळीबारला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, परिसरात किती दहशतवाद्यांचा वावर आहे, याबाबती माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. सध्या जवान दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देत आहेत. घटनास्थळावरुन सीआरपीएफच्या ४५ व्या बटालियनचे जवान आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून हे संयुक्त ऑपरेशन चालवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - नीरव मोदी, मेहुल चोकसीनंतर देशातील आणखी एका कंपनीने एका सरकारी बँकेला ९७ कोटींचा चुना लावला आहे. सीबीआयने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे (ओबीसी) ९७ कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी सिंभोली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला आहे. माध्यमांना मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशची कंपनी सिंभोली शुगर लि.ने २०१७ मध्ये ७४.९८ कोटी रूपयांचे नुकसान दाखवले होते. तर यापूर्वी डिसेंबर २०१६च्या तिमाहीत कंपनीचे १८.०९ कोटी रूपयांचे नुकसान झाले हेाते. विशेष म्हणजे ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असून देशातील सर्वांम मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे. सरकारी बँकांचे कर्ज चुकवले न गेल्यामुळे सीबीआयने कंपनीवर छापे टाकले. पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) ११ हजार ४०० कोटी रूपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर अशा प्रकारचे हे आणखी एक प्रकरण आहे.

पणजी -गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना काल रात्री पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमी रक्तदाब आणि डीहायड्रेशनच्या तक्रारीमुळे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरू आहे. आम्ही विशेषज्ञ चिकित्सक बोलवून त्यांच्यावर उपचार करत असल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले आहे.याआधी त्यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये स्वादुपिंडाच्या विकारावर उपचार सुरु होते. तिथे उपचाराला प्रतिसाद मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्पुरता डिस्चार्ज दिला आणि ते पणजीत दाखल झाले होते. पणजीत गेल्यानंतर घरी थोडा आराम करून त्यांनी राज्याचा बजेट सादर केला. बजेट झाल्यानंतर सभापतींसह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी पर्रिकरांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशा त्यांना शुभेच्छा दिल्या पण, कमी रक्तदाब आणि डीहायड्रेशनच्या तक्रारीमुळे त्यांना पुन्हा गोव्याच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनूसार त्यांनी व्हिलचेअरवर रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते.

नवी दिल्ली - दिल्लीजवळ असलेल्या हापुड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हापुडमधील गांधी रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झालाय. रविवारी रात्री ८.४५ मिनिटांच्या सुमारास काही तरुण रेल्वे ट्रॅकच्या शेजारुन चालत जात होते. त्याच दरम्यान, दिल्ली मुरादाबाद या ट्रेनची धडक या तरुणांना लागली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण गाझियाबादहून हैदराबाद येथे जात होते.

झारखंड - चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादवांचा जामिन अर्ज झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. सीबीआय कोर्टाने लालू प्रसाद यादवना देवघर खजिन्याशी संबंधित चारा घोटाळ्यात दोषी ठरवत साडे तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २३ डिसेंबर २०१७ पासून ते तुरुंगात आहेत. याखेरीज आणखी दोन घोटाळ्यांमध्येही ते दोषी आढळले असून त्यांना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूण सहा चारा घोटाळ्यांमध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून अन्य प्रकरणी कोर्टांमध्ये सुनावणी शिल्लक आहे.लालू प्रसाद यादवांवर चारा घोटाळाप्रकरणी तीन खटले दाखल झाले होते. त्या तिनही प्रकरणी त्यांना २०१३, २०१७ व २०१८ मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि अनुक्रमे पाच, साडेतीन व पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. देवघर खजिन्यातून १९९१ ते १९९४ या कालावधीत ८९.२७ लाख रुपये बेकायदेशीररीत्या काढल्याचा आरोप सिद्ध झाला आणि चारा घोटाळाप्रकरणी सहभागाबद्दल त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली.

वॉशिंग्टन - अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच वन बी व्हिसासाठीचे नियम अधिक काटेकोर करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. याचा मोठा फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेत असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेबाहेरून मनुष्यबळ आणण्याची गरज असेल, तर त्या व्यक्तीला एच वन बी व्हिसा घ्यावा लागतो. आतापर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा व्हिसा मिळायचा. मात्र आता जेवढ्या कालावधीसाठी त्या व्यक्तीला काम असेल, तेवढ्याच कालावधीसाठी हा व्हिसा देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासन घेणार आहे. अमेरिकेच्या बाहेरून मनुष्यबळ आयात करणाऱ्या कंपनीलादेखील आता ज्या पदावर कर्मचाऱ्याला रुजू करायचे, त्याचे तपशील प्रशासनाकडे द्यावे लागणार आहेत. शिवाय किती कालावधीसाठी त्या व्यक्तीसोबत करार केला जाईल, त्या व्यक्तीचे पद, पगार वगैरे बाबीदेखील अगोदरच स्पष्ट करावे लागतील.

औरंगाबाद - एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील विलासपूर येथून आणलेल्या २० वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायाला जुंपल्याचा खळबळजनक प्रकार तिच्याच धाडसाने समोर आला. पुंडलिकनगरातील एका खोलीत डांबलेल्या या तरुणीने गुरुवारी दुपारी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि तिची आपबिती एका दुकानदाराला सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या घरी जाऊन दलालास चोप देत पोलिसांच्या हवाली केले.विकास मन्साराम हिमणे (२०, रा. मुकुंदनगर), असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. आंटी अन्नू ऊर्फ संगीता, अमन आणि दिवाकर मेश्राम यांचा आरोपींमध्ये समावेश असून ते पसार झाले. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विलासपूर येथील बेरोजगार तरुणी स्विटी (नाव बदलले) हिला गावातीलच दिवाकर मेश्राम याने औरंगाबादेतील एका एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. एनजीओमध्ये अधिकारी असलेल्या अन्नू नावाच्या महिलेला त्याने विलासपूर येथे बोलावून घेतले. तेथे अन्नू आणि दिवाकर यांनी पीडितेच्या आईला चांगल्या नोकरीची आणि तिच्या सुरक्षेची हमी दिली आणि १७ फेब्रुवारीला रेल्वेने अन्नूसह ती औरंगाबादेत आली. पुंडलिकनगरातील गल्ली नंबर २ मध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पीडितेला ठेवण्यात आले. त्या खोलीत विकास आणि अमन हे दोन दलाल राहत. अन्नूने विकास हा तिचा भाऊ, तर अमन हा बहिणीचा मुलगा असल्याचे पीडितेला सांगितले. १७ रोजी रात्री दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. नंतर दुसर्‍या दिवशी ते तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे पांढरा शुभ्र ड्रेस घातलेला आणि हातात व गळ्यात सोन्याचे ब्रासलेट आणि दागिने घातलेल्या एका व्यक्तीसोबत अन्नू मद्य प्राशन करीत होती. त्या व्यक्तीने आणि अन्य एकाने तिला हॉटेलमधील एका खोलीत नेऊन अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी सकाळी तिला हॉटेलमधून पुन्हा पुंडलिकनगर येथील रूमवर नेऊन बंद करण्यात आले. तेथे आलेल्या एकाने स्वत: अन्नूचा पती असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केला.गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विकास हा टॉयलेटला गेला होता, तर अमन हा ब्रश करीत होता.  त्यांची नजर चुकवून पीडिता खोलीतून बाहेर पडली आणि गल्ली नंबर ३ मधील एका दुकानदाराकडे गेली. तिने  ‘काका, मला वाचवा’, असे म्हणत टाहो फोडला. ‘ते लोक मला मारून टाकतील, मला मदत करा’, असे ती म्हणू लागली. आरोपीने तिचा मोबाईलही घेतल्याचे सांगितले. काही तरुणांनी या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.ए. सिनगारे यांना कळविली. काही तरुणांनी पीडितेला सोबत घेऊन तिला डांबून ठेवलेल्या रूमवर धाव घेतली. अमन आणि विकासला त्यांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली.  अमन तेथून पसार झाला. मात्र, विकासला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 

मुंबई - गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी अटकेत असलेले डीएस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हेमंती यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. हेमंती यांच्या बँक खात्यातून मुलगा शिरीष आणि पती डीएसके यांच्या खात्यात मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्यात तसंच ड्रीम सिटी गृह प्रकल्पाच्या व्यवहारातून मिळालेले पैसेही विविध खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.दरम्यान, डीएसकेंचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आल्याने वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र,डीएसकेंच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला.तसेच ससून रुग्णालयात डीएसकेंच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत उपचारांची गरज भासल्यास दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच हलवावे असा डीएसकेंच्या वकिलांनी आग्रह धरला. त्यामुळे सरकारी वकिल आणि डीएसकेंच्या वकिलांमध्ये वाद झाला होता.

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले आणि वादाची ठिणगी पडली. केंद्र सरकारचा वरदहस्त असल्याने दिल्ली पोलीस ही दादागिरी करत असल्याचा आरोप आपने केला आहे.सोमवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी केला होता. याबाबत त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालांकडेही तक्रार केली होती. या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या एका टीमने केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडक दिली. पोलिसांच्या पथकाने घरातून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. घरातील २१ कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेजशी छेडछाड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. २० फेब्रुवारी रोजीच आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र, फुटेज उपलब्ध न झाल्याने आम्हाला इथे यावे लागले, असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरेंद्रकुमार सिंग यांनी माध्यमांना सांगितले. केजरीवाल यांच्या घरात २१ सीसीटीव्ही कॅमेरे असून हॉलमधील काही कॅमेरे बंद होते, असे सूत्रांनी सांगितले.

उल्हासनगर - भाजपाच्या पूजा भोईर यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द ठरवला आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक - १ (ब) मधून भोईर भाजपाच्या चिन्हावर एसटी प्रवर्गातून निवडून आल्या. हिंदू महादेव कोळी जात अनुसूचित जमाती प्रवर्गात येत नसल्याचा निष्कर्ष समितीचे सदस्य एस. ए. गोवेकर, पी. व्ही. दाभाडे व एस. टी. भालेकर यांनी काढून जातीचा दाखला रद्द केला. भोईर यांचे पद धोक्यात आल्याने भाजपाला धक्का बसला आहे. महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांनी पत्र आल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पूजा कौर लबाना यांचाही जातीचा दाखला अवैध ठरवल्याने नगरसेवक पद रद्द झाले. एप्रिल महिन्यात त्याजागी पोटनिवडणूक होत आहे. न्यायालय कुठला निर्णय देते याकडे भाजपाचे लक्ष लागले आहे. भाजपा कुठली भूमिका घेत हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वसई - वसई पूर्वेकडील राजावली भोयदापाडा परिसरात असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी कारवाई सुरू केली. या कारवाईला येथील रहिवाशांनी तीव्र विरोध करत पालिका कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.यावेळी पोलीस आणि पालिकेची वाहने आणि जेसीबीची जाळपोळही करण्यात आली.वसई-विरार शहर महापालिकेने सध्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची मोहीम हाती घेतली असून सध्या बेकायदा चाळींना लक्ष्य केले आहे. गुरुवारी सकाळपासूनच राजावली भोयदापाडा पालिकेची तोडक कारवाई सुरू होती. याठिकाणी असलेल्या ५०० बेकायदा चाळी यावेळी जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला विरोध दर्शवत भूमाफियांनी आणि रहिवाशांनी थेट पालिका पथकावरच, पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून लाठीमारही करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठा जमाव समोर उभा राहिल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली. त्यातच या जमावाने केवळ दगडफेक केली नसून कारवाईसाठी असलेल्या दोन जेसीबी, पोलिसांच्या गाडय़ा, महापालिकेच्या गाडय़ांची मोठय़ा प्रमाणावर मोडतोड करून काही वाहनांची जाळपोळही केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असले तरी या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घडलेल्या प्रकारात पोलीस कर्मचारी, पालिका अधिकारी- कर्मचारी मोटय़ा प्रमाणावर जखमी झाले आहेत.

नवी मुंबई - २३ दिवस दुरुस्तीसाठी बंद असलेली वाशी खाडीपुलावरील मुंबईकडे जाणारी मार्गिका अखेर वाहतुकीस खुली करण्यात आली, मात्र त्यानंतर एका वेगळ्याच डोकेदुखीने वाहतूक पोलीस हैराण झाले आहेत. सुसाट प्रवासामुळे किरकोळ अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेले २३ दिवस पर्यायी व्यवस्थेत शिस्तीत वाहने चालविणारे पुलावरील प्रवास सुरळीत झाल्यानंतर वेगाने वाहने चालवू लागले आहेत.ठाणे खाडीवर मुंबई, नवी मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या पुलाची उभारणी सत्तरच्या दशकात करण्यात आली. त्यानंतर २० वर्षांत हा पूल वाहतुकीस अपुरा पडू लागल्याने सरकारने नव्वदच्या दशकात दुसरा पूल बांधला. या पुलावरील वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेमधील दोन तुळयांमधील सांधे खिळखिळे झाले होते. त्यामुळे ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. प्रवास करताना वाहनचालकांना या सांध्यांचे जोरदार धक्का बसत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील महिन्यात या मार्गिकेची दुरुस्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २१ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.

पालघर - स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाविरोधात आईने सफाळे पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन या बापाला अटक करण्यात आली आहे. पालघर न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सफाळेजवळील पेनंद येथे राहणाऱ्या नराधम बापाने स्वत:च्या आठ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते सफाळे (नवघर-पेनंद) जवळील आदिवासी समाजातील एक ४५ वर्षीय व्यक्ती हा पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहते. बापाला दारूचे व्यसन असल्याने तो कुठलाही कामधंदा करीत नसे, मात्र कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्याची पत्नी घराच्या परिसरातून भाजीपाला मुंबई येथे विक्री करण्यास जात असे. या गोष्टीचा गैरफायदा घेत या मुलीच्या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधाची माहिती कुणाला सांगितल्यास तो तिला मारहाणीची धमकीही देत असे. मारहाणीच्या भीतीने मुलीने या प्रकाराची वाच्यता केली नाही. मात्र १६ फेब्रुवारी रोजी पत्नी भाजीपाला विक्री करण्यासाठी मुंबईला गेली असल्याचा फायदा घेत पुन्हा बापाने मुलीवर अत्याचार केला. मुलीवर पाशवी बलात्कार करीत असल्याचे त्याच्या स्वतःच्या मुलाने पाहिले. त्यामुळे त्याने शेजारी रहात असलेल्या एका महिला नातेवाइकाला ही घटना सांगितली आणि बहिणीची सुटका केली. रात्री आई घरी परत आल्यावर तिच्या कानावर ही सर्व हकिगत सांगितली असता आईच्या तक्रारीवरून सफाळे पोलिसांनी या आरोपीवर पोक्सो कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास केळवे सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये करीत आहेत. आरोपीला न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कानपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशीना फित कापायला कात्री मिळाली नाही आणि ते चांगलेच संतापले. कानपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलर पॅनलच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे असलेल्या जोशी यांनी फित कापण्यासाठी अधिका-यांकडे कात्री मागितली तर अधिका-यांमध्ये सावळा गोंधळ दिसला.कात्री न मिळाल्याने चिडलेल्या मुरली मनोहर जोशी यांनी अखेर उदघाटन करण्यास नकार देत रिबनच उखडून टाकली. नंतर कात्री आली पण मुरली मनोहर जोशी उदघाटन न करताच निघून गेले

नवी दिल्ली - सीबीआयने गुरूवारी सायंकाळी रोमोटोमॅक कंपनीचा मालल विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी याला अटक केली. कोठीरी पिता-पूत्रांनी सात राष्ट्रीय बॅंकांकडून घेतलेले ३, ६९५ कोटी रूपयांचे कर्ज न चुकल्याने अटक करण्यात आली आहे. सीबीआय अधिका-यांनी सांगितले की, कोठारी आणि त्याचा मुलाला एजन्सीने दिल्लीला बोलवले होत. अधिकारी म्हणाले होते की. कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल सर्वच रोटोमॅल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी कथित रूपात कर्जाने घेतलेली रक्कम दुसरीकडे गुंतवली. ते म्हणाले की, सात राष्ट्रीय बॅंकांच्या समूहामधील एक बॅंक बदोडाने सीबीआयला कोठारी विरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगितले होते. कारण त्यांना भीती होती की, कोठारी देश सोडून पळेल. तक्रार मिळाल्यावर सीबीआयने १८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला. सुरूवातीला असे वाटले होते की, हा घोटाळा ८०० कोटी रूपयांचा आहे. पण सीबीआयने जेव्हा रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेटा लिमिटेडच्या खात्यांची चौकशी केली तेव्हा खुलासा झाली की, कंपनीने कथित रूपायेन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बॅंक, यूनियन बॅंक ऑफ इंडिया, इलाहाबाद बॅंक आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सकडून कर्ज घेतले. सीबीआयने आरोप लावला आहे की, आरोपींनी सात बॅंकांकडून २,९१९ कोटी रूपयांची रक्कम कर्जाच्या रूपात घेऊन फसवणूक केली. व्याजाची रक्कम आणि देणा-यांची रक्कम धरून कंपनीकडून ३, ६९५ कोटी रूपये घेणे आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर ते देश सोडून जाऊ नये म्हणून तसे आदेश देण्यात आले होते.

नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या ‘विनंती’मुळे खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वतचाच निर्णय मागे घ्यावा लागला आहे. शांतीनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली स्वपन कुमार दत्ता यांची नियुक्ती ‘सरकारच्या सल्ल्यानंतर’ राष्ट्रपतींनी रद्द केली. आता केंद्र सरकार नव्या कुलगुरूंच्या शोधात आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या कार्यकारी समितीची (कर्मसमिती) बैठक बोलावली असून यात नवी कुलगुरू शोधसमिती निवडली जाणार आहे. ही समिती नव्या कुलगुरूची शिफारस करेल.यापूर्वीच्या शोध समितीचे प्रमुख ‘नॉर्थ ईस्ट हिल’ विद्यापीठाचे कुलगुरू एस. के. श्रीवास्तव होते. त्यांनीच दत्ता यांच्यासह अन्य दोघांची नावे विश्व भारतीच्या कुलगुरूपदासाठी सुचवली होती. गेले दोन वर्षे हे विद्यापीठ कुलगुरूंविनाच कार्यरत होते. विद्यापीठ प्रशासनाने सातत्याने कुलगुरू नियुक्तीचा पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारकडून नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या. राष्ट्रपती कोविंद यांनी जानेवारीमध्ये शोधसमितीच्या शिफारशींच्या आधारे दत्ता यांच्या नियुक्तीला संमती दिली होती. मात्र, अधिकृत आदेशपत्र काढण्यात आले नाही. उलट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रपतींना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची आणि नवी शोधसमिती नेमण्याची विनंती केली. केंद्र सरकारकडूनच ही ‘विनंती’ झाल्यामुळे राष्ट्रपतींनी स्वतच केलेली कुलगुरूंची नियुक्ती मागे घ्यावी लागली.मुंबई - राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून २८ फेब्रुवारी रोजी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुंबईत हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर नोव्हेंबरच्या सुमारास राज्यभरातील हल्लाबोल यात्रेचा समारोप म्हणून मुंबईत एक मोठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येईल, असेही तटकरे यांनी सांगितले.उत्तर महाराष्ट्रात १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या काळात हल्लाबोल यात्रा पार पडली. तरुणाई्रत सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे हल्लाबोल यात्रेत अनुभवास आले. नोकरभरती कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे तरुण चिडलेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी वर्गही संतप्त आहे. आज दिवस ढवळ्या मंत्रालयात येऊन लोक आत्महत्या करत आहेत हि एक लाजिरवाणी बाब आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई - समाजमाध्यमे ही खूपच प्रभावी आहेत. त्यांच्यामुळे एखादा संदेश १५ सेकंदांत २५ लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर करून समाजमाध्यमांवर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभे करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा आता ट्विटर जास्त शक्तिशाली व प्रभावी माध्यम आहे. समाजमाध्यमांच्या जोरावर आपण लोकांमध्ये जागृती व उठाव करून भाजप सरकारला उलथवून टाकू शकतो, असा विश्वास गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने व्यक्त केला आहे.हार्दिक पटेल गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागातील पथकाशी संवाद साधण्यासाठी मुंबईत आला होता. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या समाजमाध्यम पथकातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.मुंबई - रस्ते घोटाळ्याच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशीचा अहवाल तयार झाला असून यात १० अधिकारी पदावनत होणार आहेत. या घोटाळ्यात तब्बल १८७ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. यापैकी १० अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे संकेत यापूर्वीच पालिका प्रशासनाने दिले होते. चौकशी समितीने आयुक्त अजय मेहता यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार आणखी काही अधिकाऱ्याना घरी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अभियंता वर्गाचे धाबे दणाणले आहे. मात्र हा अहवाल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे सादर झाल्यानंतर ही कारवाई जाहीर होणार आहे.पालिकेतील सर्व विभागांच्या प्रमुखपदी अभियंताच असल्याने अभियंतावर्गामध्ये या कारवाईबाबत नाराजी आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी दबावतंत्र सुरू असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी भाजपाने शिवसेनेलाच धारेवर धरत हा अहवाल लांबणीवर टाकण्यासाठी जबाबदार ठरवले होते.नुकताच हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून दोषी अभियंत्यांवर कारवाईबाबत लवकरच निर्णय होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चौकशीत शंभरपैकी ९६ अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली होती. चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात १६९ अभियंत्यांची झाडाझडती घेण्यात आली. यापैकी आणखी चार अभियंते सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली तर शंभर अभियंत्यांवर वेतनवाढ व बढती रोखणे अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३५२ तर दुसºया टप्प्यात ९५९ कोटींचा घोटाळा असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पालिकेच्या दोनशे अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget