March 2018

नवी दिल्ली - जनार्दन द्विवेदी आणि बी. के. हरिप्रसाद या काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना सरचिटणीसपदावरून दूर करण्यात आले. हिंगोलीचे खासदार राजीव सातव आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग या दोन तरुण नेत्यांकडे राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. जनार्दन द्विवेदी हे माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात असत. नव्या रचनेत सरचिटणीसपदावरून त्यांना दूर करण्यात आले. याप्रमाणेच बी. के. हरिप्रसाद यांनाही सरचिटणीसपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. गुजरातच्या प्रभारीपदी राज्यातील हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात निवडणुकीत सौराष्ट्र विभागाचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. सौराष्ट्रातील ४५ पैकी सर्वाधिक २८ आमदार काँग्रेसचे निवडून आले होते. ही कामगिरी लक्षात घेऊनच सातव यांच्याकडे राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

मुंबई - नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील जाचक अटींच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवार, २ एप्रिल रोजी पुकारलेला नियोजित संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी दोन तासांचे आंदोलन केले जाणार आहे.एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टरांसाठी आणखी एक परीक्षा घेण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे. पदवी मिळवण्याची कालमर्यादा लक्षात घेता त्याला डॉक्टरांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. तसेच या विधेयकाशी संबधित समितीमध्ये अवैद्यकीय क्षेत्रातील सदस्यांचा भरणा असल्याने त्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांचा अधिक सहभाग असावा, अशी मागणी डॉक्टरांनी केली होती. 'एमबीबीएसची परीक्षा हीच एग्झिट परीक्षा असेल, देशातील वैद्यकीय विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सारखीच असेल', असे मात्र सरकारने स्पष्ट केले आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपथीची प्रॅक्टिस करण्याचा मुद्दा या विधेयकातून वगळण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांच्या अन्य मागण्यांच्या संदर्भातील केंद्र सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. रुग्णहिताला प्राधान्य देऊन देशव्यापी संप रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री जयप्रकाश नड्डा यांनी सोमवारी डॉक्टरांची बैठक बोलावली आहे. त्याच दिवशी सरकारच्या निर्णयांसंदर्भात अधिक सुस्पष्टता येईल व त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई - महापालिकेच्या ‘के’ पश्चिम विभागातील अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार अमित साटम अडचणीत आले आहेत. या प्रकरणात राजकीय पक्षही आक्रमक झाले असून अभियंता वर्गातही तीव्र नाराजी पसरली आहे. अभियंत्यांना नेहमीच लक्ष्य केले जात असल्याने अभियंत्यांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. अमित साटम भाजपाचे आमदार आहेत. गेल्या वर्षीही सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात फेरीवाल्यांनी लेखी तक्रार केली होती. हप्ता न दिल्यास स्टॉल्स हटविण्याची धमकी साटम यांची माणसे देत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या आॅडिओमुळे साटम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘के’ पश्चिम विभागातील एका अभियंत्याला दूरध्वनीवरून शिवीगाळ करण्याच्या या आॅडिओने महापालिकेतही खळबळ उडाली आहे.

मुंबई - आंदोलनादरम्यान करण्यात येणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची आंदोलकांकडूनच भरपाई केली पाहिजे. त्यांना असेच सोडून दिले जाऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे, तर आंदोलन पुकारणारी संस्था वा त्याच्या पदाधिकाऱ्यांनाही या नुकसानासाठी जबाबदार धरण्यात येण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑगस्ट २०११ सालच्या आझाद मैदान येथील दंगलीत सहभागी झालेल्या अहमद नूरी याला नुकसान भरपाईचे आदेश देताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे.शांततेत आंदोलन करण्याऐवजी त्याला हिंसक वळण देऊन आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते. त्यामुळेच तसे करणाऱ्या आंदोलकांवर केवळ फौजदारी कारवाई करून थांबू नये, तर त्यांच्यावर नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याची कारवाईही झाली पाहिजे, असे निरीक्षण न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने नोंदवले. एवढेच नव्हे, तर हिंसा करणाऱ्या आंदोलकांवर ही कारवाई नुकसान भरपाईच्या वसुलीची कारवाई झालीच पाहिजे असे आपले ठाम मत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

बेळगाव - मराठी भाषकांच्या एकीसाठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनासाठी कर्नाटक निवडणुकीत सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगाव येथे जाहीर केले. अशीच भूमिका महाराष्ट्रातील अन्य पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. तसेच मराठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. बेळगाव येथील मराठी भाषकांच्या ‘बेळगाव लाइव्ह’ या ‘सोशल मीडिया’च्या पहिला वर्धापन दिन सोहळय़ात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, किरण ठाकूर, उपमहापौर मधुश्री पुजारी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश बिलगोजी आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झालेत. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर दीप प्रज्वलन करण्यात आले. रायगड स्मारक समिती तर्फे दर वर्षी रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी केले जाते.यावर्षी रायगडावरील राज सदरेत प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत.

शिरवळ - पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथील एका भंगाराच्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (31 मार्च) पहाटे ही घडना घडली आहे. प्रभातफेरीसाठी गेलेल्या स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर याची माहिती गोदाम मालक अमीर शेखला दिली. तोपर्यंत आगीनं रौद्ररुप धारण केले होते. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न सध्या सुरू आहेत. वाई पालिका व भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्याचे अग्निशमन बंबदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागण्यामागील नेमके कारण काय आहे?, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

नवी दिल्ली - सीबीएसईच्या दहावी गणित व बारावी अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणी दिल्लीत संतापाची लाट उसळली असून दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी आणखी दहा जणांचे जाबजबाब घेतले असून गुरुवारी ३५ जणांची चौकशी करण्यात आली. सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकांकडेही तपास करण्यात आला. पेपरफुटीच्या प्रकरणात निषेध करण्यासाठी काही विद्यार्थी संसद मार्गावर जमले होते. निषेध आंदोलनात काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेचाही समावेश होता. त्यांनी शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्यात आले. एनएसयूआयचे नेते नीरज मिश्रा यांनी सांगितले की, अनेक शिक्षण संस्था या परीक्षा माफियांच्या कचाटय़ात आहेत. सीबीएसईचे अध्यक्ष व मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे यास जबाबदार आहेत. जावडेकर व सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता कारवाल यांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा. दहावी गणित व बारावी अर्थशास्त्र फेरपरीक्षेच्या तारखा लगेच जाहीर करा, मुलांना फेरपरीक्षा सक्तीची करू नका अशा दोन मागण्या एनएसयूआयने केल्या आहेत.हिंगोली - हिंगोली शहर पोलीसांनी आठ दिवसांपूर्वी कत्तलखान्यात जाणार्‍या ४१ गोवंशांची अर्थात बैलांची सुटका केली होती. मात्र, आता या बैलांच्या पालनपोषणाचे नवे शुक्लकाष्ट शहर पोलीसांच्या मागे लागल्याने गोहत्या बंदी कायद्याचा नवा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, भोपाळवरून हैद्राबादच्या कत्तलखान्यात २३ मार्चला ४१ बैल ट्रकमधून नेत असताना हिंगोली शहर पोलीसांनी हा ट्रक ताब्यात घेतला होता. तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन सर्व बैलांना पोलीस ठाण्याच्या आवारात उतरवून घेण्यात आले होते. यांपैकी आतापर्यंत तीन बैलांचा मृत्यु झाला आहे. तर उर्वरीत ३८ बैल सांभाळण्याची जबाबदारी पोलीसांवर येऊन पडल्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी की या बैलांचे पालनपोषण करावे असा प्रश्न हिंगोली पोलीसांना सतावत आहे.

कोल्हापूर - महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला. सध्या राज्यात, देशात भाजपची सरकारे असल्यामुळे ढवळे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना काय देणार, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे.महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ७ मार्चला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित तसेच सन २०१८-१९ या वर्षाचे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी त्यावर अभ्यास करून काही फेरफार केले आहेत. सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्यासमवेत त्याकरिता सतत बैठका सुरू होत्या. शुक्रवारी सायंकाळी अर्थसंकल्पावर शेवटची नजर फिरविली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महाअधिवेशनातील आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत आले आहेत. प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी सिद्धू यांच्याकडे वळल्याचे दिसते. प्राप्तिकर विभागाने सिद्धू यांची दोन बँक खाती गोठवली आहेत. सिद्धू यांनी आपल्या विवरण पत्रात कपड्यांवर २८ लाख, प्रवासावर ३८ लाखांपेक्षा जास्त, इंधन खर्च सुमारे १८ लाख आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ४७ लाखांहून अधिक खर्च दाखवल्याचे समजते. वर्ष २०१४-१५ च्या विवरण पत्रात सिद्धू यांनी हे खर्च दाखवले नव्हते. त्यांनी अजून याचे बिलही सादर केलेले नाही. परंतु, सिद्धू यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली असल्याचे सांगितले आहे. एकतर या सर्वांचे बिल सादर करा किंवा कर भरून टाका, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने सिद्धूंना तीन नोटिसा पाठवल्या असल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. नोटिसा पाठवल्यानंतर १४ फेब्रुवारीला सिद्धूंची दोन बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

नवी मुंबई - थकीत मालमत्ता करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशांचा गजर करणे, पाणीपुरवठा खंडीत करणे, अटकावणी, बँक खाती सील करण्यासारखे विविध उपक्रम राबवूनही या आर्थिक वर्षांत गतवर्षीच्या तुलनेत कमी वसुली होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी ६४४ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता, यंदा मात्र शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना वसुलीचा आकडा ५२५ कोटींवर होता.महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी नवी मुंबई पालिकेने यंदा विविध मार्ग अवलंबले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांत आठ विभागांतून मिळून दररोज १ कोटीपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कराची वसुली होत होती. अखेरच्या टप्प्यात मालमत्ता कर वसुली मोठय़ा प्रमाणात झाली असली, तरी गतवर्षीपेक्षा कमीच असल्याचे वसुलीच्या आकडय़ांवरून दिसते. तरीही प्रत्यक्ष वसुली गतवर्षीपेक्षा जास्त असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मुंबई - राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली; मात्र घर, दुकान आदी ठिकाणी असलेले प्लॅस्टिक कुठे टाकावे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बॅग, सजावटीचे प्लॅस्टिक साहित्य, थर्माकोल आदी सामान नागरिकांना जमा करता यावे, यासाठी महापालिका २० ठिकाणी संकलन केंद्रे स्थापन करणार आहे. बाजार आणि रेल्वे स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणी ही केंद्रे सुुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, साठा करणं यावर बंदी आणली आहे. त्यानुसार घरात असलेले प्लॅस्टिक फेकण्यास व त्याचा वापर थांबविण्यास ग्राहकांना १५ दिवस ते एक महिना तर उत्पादकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत ग्राहक आणि उत्पादकांनी आपल्याकडील प्लॅस्टिक संकलन केंद्रामध्ये जमा करावे. या केंद्रात एकत्रित केलेल्या प्लॅस्टिकवर पुन:प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार या संकलन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे.मीरारोड - काशिमीरा येथे दरोडा टाकणारया ५ बांगलादेशी दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील तिघे विमानाने तर दोघे घुसखोरी करून मुंबईत आले होते.द्वारका हॉटेल समोर राहणारे गोकुळ रामदास वाघ यांच्या घरी २२ मार्च रोजी पहाटे अडिजच्या सुमारास अनोळखी दरोडेखोरांनी खिडकीची लोखंडी जाळी काढून आत प्रवेश केला. घरात शिरातच त्यांनी वाघ कुटुंबीयांना चाकू, लोखंडी टॉमी, पाना, स्क्रुडायव्हर आदीचा धाक दाखवून मारहाण केली. नंतर साडी आणि बनियनने सर्वांना बांधून टाकले आणि घरातील रोख, दागिने, मोबाईल, टॅब असा ९ लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता.वाघ यांच्या फिर्यादीवरून काशिमिरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी तातडीने विशेष पथक नेमले होते. पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे, काशिमिरा युनिटचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे, अभिजीत टेलर सह वेळे, ढेमरे, वाडिले, जाधव, पोशिरकर, पंडित, थापा, पाटील, शिंदे, जगताप यांच्या पथकाने या बांग्लादेशी दरोडेखोरांचा शोध चालवला होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटने विविध प्रकारच्या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मधून पोलिसांना या दरोड्यासाठी कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरवात केली असता २८ मार्च रोजी वसई कडून ती घोडबंदरच्या वरसावे दिशेला येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच सापळा रचून गाडी अडवली व आतील लोकांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता ते सर्व बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. वाघ यांच्या घरी दरोडा टाकल्याचे पण त्यांनी कबूल केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे मोहम्मद पलश मोहम्मद इस्माईल हवालदार ( ३२) ; लुकमान चिना मियाँ (२३) ; बप्पी आकुबर शेख (२७) ; मोहम्मद मोनीर लतिफ शेख ( ३१) ; महम्मद अक्रम इरफान अली (२८) अशी आहेत. हे सर्व बांग्लादेशी दरोडेखोर बांग्लादेशच्या खुलाना व सिल्हेट जिल्ह्यातील राहणारे आहेत.पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यात वापरलेली कार, अवजारे काही मुद्देमाल व आरोपींचे मोबाईल आदी हस्तगत केले आहेत

मुंबई - सीबीएसई पेपरफुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असे आवाहन त्यांनी पालकांना केले आहे. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारे परिपत्रक राज ठाकरेंनी काढले आहे.मात्र सीबीएसई पेपरफुटीनंतर तत्काळ प्रतिक्रिया देणारे राज ठाकरे दहावी आणि बारावीच्या मराठी माध्यमांचे पेपर फुटले तेव्हा गप्प का होते, असा सवाल आता केला जात आहे. मराठी माध्यमाच्या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंना जास्त पुळका आहे का, अशी विचारणाही यानिमित्ताने विरोधकांकडून केली जात आहे.पुणे - राज्यातील कमी पटसंख्येच्या बाराशे ते तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पटसंख्या हा दुर्लक्षित करण्यासारखा भाग नाही. परंतु, पटसंख्या कुठे आणि कशी पाहावी याचे तारतम्य असले पाहिजे. शहरी भाग आणि उजाड, आदिवासी पाड्यांसाठी पटसंख्येचा एकच निकष लावला तर दुर्गम भागातील मुलांना शिक्षणच मिळणार नाही. त्यामुळे शाळा बंद धोरणात बदल झाला पाहिजे. नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृतमहोत्सव सांगता समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार म्हणाले की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि पटसंख्येचा निकष या दोन्ही बाबी विरोधाभासाच्या असून, त्या योग्य नाहीत. त्यामुळे त्यात बदल करावा लागेल. मी यात राजकीय भूमिका घेणार नाही. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असेही शरद पवार म्हणाले.

मुंबई - निवडणुकी दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असेही भाजपा जाहीर करू शकते असे म्हणत भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर टीका केली. उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव समाविष्ट केले. भीमराव रामजी आंबेडकर अशी सही बाबासाहेब करत त्याचाच दाखला देत उत्तर प्रदेशात भीमराव रामजी आंबेडकर असे नाव यापुढे लिहिले जाईल असे एक विधेयक पास करण्यात आले. मात्र याच निर्णयावर प्रकाश आंबेडर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.

मुंबई - अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून कुर्ला येथे वाहतुकीला अडथळा ठरणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या महापालिका कर्मचा-यांवर फेरीवाल्यांनी दगडफेक करून त्यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली. कुर्ला ‘एल’ विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई होत असून साकीनाका ३ नंबर खाडी येथील पदपथ आणि रस्त्यावरील अनधिकृत टपरी, गाड्या, बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या दगडफेकीत कर्मचारी जखमी झाले आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथक फेरीवाल्यांचे साहित्य डम्परमध्ये भरत असताना हे साहित्य खेचून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण करून यंत्रणेचे नुकसान केल्यासंबंधी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

केन्द्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ, मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाच्या विस्तारीकरण सोहळ्यात गुरुवारी शिवसेना-भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगले. निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेच्या आमदारांची नावे नसल्याने व वेळेवर कार्यक्रमात नेत्यांनी उपस्थिती न लावल्यामुळे दोन तास ताटकळत राहावे लागल्याने शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.त्यावरून सेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. 'शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत कार्यकर्ते कार्यक्रमस्थळाहून बाहेर पडले.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते, परंतु दिल्लीत अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी गेल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही.
मुंबई - गुरुवार दिनङ्क२९ मार्च रोजी हार्बर लाईनचे उदघाटन होणार होते. उदघाटन सोहळ्याच्या पत्रिकेत शिवसेनेच्या नेत्यांची व आमदारांची नाव नसल्याने भाजप श्रेय घेत असल्याचा आरोप करीत या ठिकाणी स्थानकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला.अशा वातावरणात गुरुवारी रात्री उशिरा हार्बर गोरेगावपर्यंतचा विस्तार सोहळा पार पडला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, खासदार गोपाळ शेट्टी, महिला व बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर आणि आमदार अमित साटम हे व्यासपीठावर उपस्थित होते.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गोरेगाव ते सीएसटी हार्बर रेल्वेला रात्री १०.०७ वाजता हिरवा कंदील दाखवला.मुंबईत ७० लोकल गाड्यांमध्ये एसी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकलमध्ये ३ एसी डबे असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.दरम्यान,पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत हयात नसलेले आमदार प्रकाश सावंत यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तेथे सध्याच्या आमदार तृप्ती सावंत यांचे नाव हवे होते. तर निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे नाव टाळण्यात आले.बुधवारी ‘प्रॉमिस फुलफिल, गुड न्यूज फॉर गोरेगावकर’ असा मथळा देऊन महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे चिरंजीव व भाजपा वॉर्ड क्रमांक ५० चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी सोशल मीडियावरून या उद्घाटनाचे निमंत्रण पाठवले होते. तर ‘गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वेचा विस्तार करण्यात यावा, यासाठी गेली अनेक वर्षे शिवसेनेने केलेले प्रयत्न हे तमाम गोरेगावकरांना ठाऊक आहेत. सेनेच्या खासदारांनी रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी केलेल्या पाठपुराव्यासंबंधी विशेष हँडबिल आणि पोस्टरच्या माध्यमाने शिवसेनेने भाजपाच्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले.हार्बर गोरेगावच्या उद्घाटनानंतर १ एप्रिलपासून नियमित लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी (२१ फेऱ्या) लोकल फेऱ्यांचे गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात येईल. तर अंधेरी ते सीएसएमटी (२१ फेऱ्या) या गोरेगाव स्थानकातून सूटणार आहे. पश्चिम रेल्वे तर्फे सुरु असलेल्या ६ लोकल फेऱ्यांचे देखील विस्तार गोरेगाव पर्यंत होणार आहे. गोरेगाव ते अंधेरी हे रेल्वे अंतर ११ मिनिटांचे आहे. भविष्यात सीएसटी ते गोरेगाव हार्बर सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारित करणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.त्यानंतर वंदे मातरम्, भारतमाता की जय अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आणि उदघाटन सोहळा पार पडला.कर्जत - एकतर्फी प्रेमातून युवतीला तिच्या घरासमोर पेटवून देत तिचा खून केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. तालुक्यातील कोरेगाव येथे २५ मार्च रोजी ही घटना घडली. आरोपींमध्ये शैलेश बारकू आडसूळ व किशोर छगन आडसूळ (रा. कोरेगाव) यांचा समावेश आहे. शैलेश आडसूळ याचे अश्विनी किसन कांबळे (वय २०) या युवतीवर एकतर्फी प्रेम होते. वर्षापूर्वी अश्विनीच्या आईने शैलेश माझ्या मुलीला फोन करून किंवा रस्त्याने जातांना त्रास देतो, अशी तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही शैलेश मुलीला त्रास देत होता. २५ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अश्विनी घरासमोर उभी असताना शैलेश आडसूळ व किशोर आडसूळ यांनी तिला पेटवून पळ काढला. भाजून गंभीर जखमी झालेल्या अश्विनीला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.अश्विनी हिचा मृतदेह कोरेगाव येथे आणल्यानंतर आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. परंतु आरोपींना बुधवारी सायंकाळी अटक केल्यानंतर अश्विनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोलकाता - संचारबंदी लागू असताना हिंसाचार झालेल्या आसनसोल भागात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात कलम १४४चा भंग आणि आयपीएस अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा आरोपही लावला आहे. सुप्रियो आपल्या समर्थकांसोबत या भागातील दौरा करणार होते. त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री या भागात हिंसाचाराची कोणतीही ताजी घटना घडली नव्हती. दरम्यान, बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बर्दवान जिल्ह्याच्या रेलपार भागात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रोखले. त्या ठिकाणच्या काही लोकांनी सुप्रियो यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत त्यांना तातडीने तेथून परतावे अशी मागणी केली. सु्प्रियो यांच्याबरोबरच भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लाकेट चॅटर्जी यांना देखील पोलिसांनी राणीगंज भागात जाताना दुर्गापूर भागातच रोखले. याविरोधात लाकेट यांनी त्या ठिकाणी काही काळ धरणे आंदोलनही केले.नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेने बूट भिरकावण्यात आला. रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांचे उपोषण सुरु होते. तिथे मुख्यमंत्री भाषण करत असताना, उपस्थित गर्दीतून एक बूट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भिरकावला गेला. मात्र तो बूट बाजूला जाऊन पडला.दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर जाऊन अण्णांचे उपोषण सोडवले. मात्र अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने ठोस निर्णय न जुजबी आश्वासन देऊन अण्णांनी बोळवण करण्यात आल्याचे दिसते आहे. कृषी उपकरणांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची घोषणा केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी रामलीला मैदानावर केली. मात्र मागण्यांवर लवकर अंमलबजावणी झाली नाही, तर सप्टेंबरमध्ये पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला. तर अण्णांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केले होते. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या पदांवर होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहीले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मार्च आहे त्यामुळे तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी ९० हजार पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ट्विट हँडलवरुन दिली आहे.

पनवेल - महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. वादळी चर्चेनंतर स्थायी समितीने मंजुरी दिलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेने वाढीव तरतुदीसह ५७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.
पालिकेत समाविष्ट २९ गावांसाठी २३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शुल्क, स्वच्छ भारत अभियान, वस्तू व सेवा कर अनुदान, अग्निशमन आकार, रस्ता दुरुस्ती, सर्वांसाठी घरे, अमृत योजनेअंतर्गत अनुदान, सर्वसाधारण पाण्यावरील कर, जलनि:सारण कर या आयुक्तांच्या तरतुदीत सुधारणा करून रकमेत वाढ आणि घट केली. महापालिका क्षेत्रात रस्त्यावर नवीन खांब उभारणे, भूमिगत, सर्व्हिस लाइन, साहित्य व खरेदीसाठी आयुक्तांनी केवळ पाच कोटींची तरतूद केली होती, स्थायी समितीने यामध्ये तब्बल २५ कोटी रुपयांची वाढ केली. रस्त्यावर नवीन एलईडी पथदिवे बसविण्यासाठी आयुक्तांनी पाच कोटींची तरतूद केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एलईडी दिवे लागणार असल्यामुळे तीन कोटी कमी केले.ठाणे - कल्याण आणि वसई दरम्यान लवकरच जलवाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या फेरी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कल्याण ते वसई हे अंतर अवघ्या ७० मिनिटांत पार करता येणे शक्य होईल. सरकारच्या इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट (आयडब्ल्यूटी) योजनेंतर्गतही ही फेरी सेवा सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी कल्याण-ठाणे ते वसई या मार्गावर डिसेंबरपासून ही फेरी सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. हा मार्ग एकूण ४७ किलोमीटरचा असेल. विशेष म्हणजे प्रवाशांना यासाठी प्रत्येकी २९ रूपये इतके माफक भाडे मोजावे लागेल. दर तीन वर्षांनी या भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ होईल. 

कराची - नोबेल शांति पुरस्कार विजेता मलाला यूसुफजई सहा वर्षांनंतर आपल्या देशात परतली आहे. तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर ती पहिल्यांदाच पाकिस्तानात पोहोचली. २०१२ मध्ये पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणाचे अभियान चालविल्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला. मोठ्या उपचारानंतर तिला वाचविण्यात यश आले. या घटनेनंतर मलला पाकिस्तान सोडुन इंग्लंडला राहू लागली होती. मलाला गुरूवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले.सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिच्या प्रवासाबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. मलाला युसुफजईला आपल्या आईवडिलांसोबत कडेकोट सुरक्षेमध्ये इस्लामाबादच्या बेनजीर भुट्टो आंतरराष्ट्री विमानतळावर पाहिले गेले. स्थानिक प्रसारमाध्यमी आणि फोटोग्राफ्सच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.ऑनलाईन - आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यातही स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत जास्त पझेसिव्ह असल्याचे दिसते. नैसर्गिक सौंदर्य ठिक आहे पण त्यात आणखी भर घालण्यासाठी स्त्रिया विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात, नाहीतर भरमसाठ पैसे घालवून पार्लरमध्ये जातात. पण सौंदर्यासाठी घरच्या घरी करता येतील अशा काही गोष्टी आपल्याला माहित असतील तर? यासाठी काही किमान गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. पाहूयात कोणत्या घरगुती उपायांनी तुम्ही विशेष खर्च न करता तुमचे सौंदर्य खुलवू शकता.
मेनिक्युअर - 
हात हे आपण दिवसभर वेगवेगळ्या कामांसाठी वापरत असतो. ते सुंदर दिसावेत यासाठी मेनिक्युअर करणे आवश्यक असते. हे मेनिक्युअर केवळ पार्लरमध्येच करता येते असा अनेकांचा समज असेल पण तसे नसून घरच्या घरीही तुम्ही ते करु शकता. मेनिक्युअर हे केवळ सौंदर्यासाठीच उपयुक्त नसते तर रक्ताभिसरणासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच मृत पेशी आणि हातावरील मळ निघून जाण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो.
कोमट तेलाने केसांचा मसाज - 
केसांना कोमट तेलाने मसाज करणे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. यामुळे केसांचे मूळांपासून चांगले पोषण होते. तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यासही मदत होते. हा मसाज पार्लरमध्ये घेणे महागडे असते. पण घरच्या घरी तुम्ही ही गोष्ट अगदी सहज आणि फुकटात मिळवू शकता.

नाशिक - वारंवार हेलकावे खाणारी नाशिकची विमानसेवा पुन्हा एकदा बंद झाल्याने नाशिककर निराश झाले आहेत. विमान सेवा स्थगित होण्यामागे वैमानिकांचे प्रशिक्षण हे कारण असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी १५ एप्रिलनंतर मुहूर्त अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. विमानसेवा नव्याने सुरू करताना नाशिक-मुंबई विमान प्रवासाची वेळ दुपार होती ती आता सकाळी करण्यात येणार आहे.उडाण योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विमान सेवेची जबाबदारी एअर डेक्कनवर सोपविण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी नाशिकसह जळगाव शहरातून अतिशय थाटामाटात विमानसेवेचे उद्घाटन झाले होते. या कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिकांची कमतरता आहे. जे वैमानिक भरती केले, त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कंपनीने हवाई वाहतूक विभागाला दिली असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.

नागपूर - न्यायालयाचे आदेश असतानाही भारतीय वैद्यक परिषदेकडून (एमसीए) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) एबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा कमी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येते. त्यांची ही कृती न्यायालयाचा अवमान असून मेयोतील एकही जागा कमी झाल्यास एमसीएच्या अधिकाऱ्यांनी बॅग भरुन तिहार किंवा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जाण्यासाठी तयार राहावे, अशा शब्दात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले. तसेच पुढील ४८ तासांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले.सुविधांचा अभावअसल्याचा ठपका ठेऊन एमसीआय दरवर्षी मेयोला एबीबीएस अभ्यासक्रमाच्या पन्नास जागा कमी करण्याची नोटीस देते. त्यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे मेयोत सुविधा पुरवण्याची विनंती करणारी जनहित याचिका सी. एच. शर्मा आणि इतर तिघांनी उच्च न्यायालयात दाखल केली. २०१४ मध्ये राज्य सरकारने एमसीआयला सुविधा पुरवण्यासंदर्भात हमीपत्र दिले होते. त्यानुसार राज्य सरकारमार्फत मेयो रुग्णालयात अनेक कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. दरम्यान १९ डिसेंबर २०१७ आणि १ व २ फेब्रुवारी २०१८ ला एमसीआय पथकाने मेयोची पाहणी केली व २८ फेब्रुवारीला केंद्रीय आरोग्य विभागाकडे अहवाल सादर केला. मेयोत सुविधांचा अभाव असून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा १५० वरुन १०० कराव्या, अशी शिफारस केली. याला न्यायालयीन मित्रांनी एका अर्जाद्वारे आव्हान दिले. ४ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशानुसार मेयोला एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या १५० जागा मंजूर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही एमसीआयकडून वारंवार या जागा कमी करण्याचा प्रयत्न होत असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा न्यायालयीन मित्रांनी केला. या प्रकरणावर बुधवारी न्या. भूषण गवई आणि न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने एमसीआच्या भूमिकेवर ताशेरे ओढले व ४८ तासांत स्पष्टीकरण दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी बाजू मांडली. तर एमसीआयतर्फे अ‍ॅड. राहुल भांगडे यांनी काम पाहिले.

मुंबई - आपल्या मादक अंदाजासाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या एका वेगळ्याच पेचात सापडली आहे. बुधवारी तिने वांद्रे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी उर्वशीच्या नावे असणाऱ्या बनावट आधार कार्डचा वापर करण्यात आल्याचं प्रकरण या तक्रारीमुळे उघड झालं आहे.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्वशी त्या हॉटेलमध्ये गेली होती, तेव्हाच हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने तिच्या नावे रूम बुक करण्यात आल्याची माहिती तिला दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने उर्वशीला तिच्या नावे रूम बुक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने लगेचच आपल्या सेक्रेटरीकडे अशी कोणतीही बुकींग करण्यात आली आहे का, अशी विचारणा केली. पण, असे काहीच बुकींग झाले नसल्याची माहिती तिला मिळाली. त्यावेळीच कोणीतरी आधार कार्डवरील आपला फोटो आणि नावाचा दुरुपयोग करत हॉटेलमध्ये बुकींग केल्याचे प्रकरण तिच्या लक्षात आले. पण, ते आधार कार्ड आपले नसल्याचे तिने स्पष्ट केले.

पिंपरी - मुंबईहून दीड कोटी रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटं आणि ६० हजार रुपये रोख घेऊन आलेल्या पुण्यातील एका इसमाला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियमजवळ बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील समृद्धी ज्वेलर्सचा कर्मचारी बेहराम पुरोहित हा मुंबईतील झवेरी बाजारातून चार किलो ९०० ग्रॅमची सोन्याची बिस्किटे व रोकड घेऊन येत होता. खासगी विमानाने तो बालेवाडी इथे उतरला. तिथून पुण्याला जाण्यासाठी त्याने रिक्षा पकडली आणि तो टिंबर्स मार्केटच्या दिशेनं प्रवास करत होता. याच दरम्यान, बालेवाडी येथे रिक्षातच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, रोख रक्क्म आणि खिशातील सोन्याची बिस्किटं असा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पुरोहितने लगेचच फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असून, बुधवारी त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी सोनिया यांना केले. सोनिया यांच्या भेटीनंतर ममता यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीत आल्यानंतर मी नेहमीच सोनियांची भेट घेते. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करते. या भेटीत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. देशातून भाजपला हद्दपार केले पाहिजे, असे मला वाटते. भाजप राजकीय सूड उगवण्याच्या हेतूने काम करत आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे म्हणूनच काँग्रेसची साथ मिळायला हवी, असे ममता म्हणाल्या.

नवी दिल्ली - उद्योगपती आणि भारतीय बँकांचे ९ हजार कोटींचेकर्ज बुडवून विदेशात पसार झालेला विजय मल्ल्या वयाच्या ६२ व्या वर्षी तिसरं लग्न करणार आहे. मल्ल्या त्याची प्रेयसी पिंकी लालवानीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येते. पिंकी लालवानी ही मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्समध्ये हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. या दोघांची भेट २०११ मध्ये झाली होती. त्यावेळी मल्ल्याने तिला किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीची ऑफर दिली होती. किंगफिशर एअरलाइन्समध्ये नोकरीला लागल्यानंतर पिंकी आणि मल्ल्या यांच्यात जवळीक वाढली. अनेकदा दोघे एकत्र दिसले होते. दोघेही बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मल्ल्याविरोधात सध्या लंडनमध्ये खटला सुरू असून, पिंकी त्याच्यासोबत कोर्टातही दिसली होती. 

मुंबई - मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवासेनेने वर्चस्व मिळवले आहे. युवासेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडल्यानंतर मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, राखीव प्रवर्गांच्या जागांवर युवा सेनेने एकहाती वर्चस्व मिळवत पाचही जागा जिंकल्याची घोषणा प्रशासनाने बुधवारी केली. तर खुल्या गटातील उमेदवारांनी मिळवलेल्या मतांची मोजणी आज पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. पाचही जागांवर युवा सेनेने सहज विजय मिळवला आहे.

चिखलदरा (अमरावती) - येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अकरावीच्या विद्यार्थ्याशी तीन महिने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्याने तक्रार दिल्यानंतर या ४६ वर्षीय प्राध्यापिकेविरुद्ध मंगळवारी रात्री पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून चिखलदरा पोलिसांनी तिला अटक केली. ७ डिसेंबर २०१७ ते ९ मार्च २०१८ या काळात झालेला लैंगिक छळ पीडित विद्यार्थ्याने वर्गशिक्षक, प्राचार्यांसमोर कथन केला. त्यांनी तत्काळ संस्थाचालक आणि संचालकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले.विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्राध्यापिका आणि विद्यार्थ्याची संस्थाध्यक्ष, संचालक व नेमलेल्या समितीनेही याची चौकशी केली. यात सत्यता आढळून आल्याने पोलिसात तक्रार दिली.

मुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी भाजपाला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा असल्याचे वारंवार त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. त्यात पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत बुधवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाला उत्तर दिले. विखे पाटील यांनी फडणवीस सरकारला उंदीर प्रकरणावरुन टोला लगावत उंदरांनी राज्यातील युती पोखरल्याचे विधान केले होते. याला उत्तर देताना फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार केला. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष म्हणजे सत्तेतील वाघ आणि सिंह आहेत, आगामी निवडणुकीनंतर ते पुन्हा सत्तेत असतील असे सुचक विधान त्यांनी यावेळी केले.

पुणे - माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा, असा फतवा महावितरणच्या पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी काढला आहे. एम. जी शिंदे या अधिका-याने हा तुघलकी फतवा काढला आहे.महावितरणच्या पुणे परिमंडळासाठी त्यांनी हा आदेश १५ मार्च रोजी काढला. शिंदे यांच्या या पारदर्शी कारभाराच्या नमुन्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा आदेश किंवा परिपत्रक मागे घ्यावे अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे. नाहीतर आरटीआय कार्यकर्ते सामूहिकरित्या दोनच नाही तर दहा-दहा अर्ज माहिती अधिकारात करून या आदेशाचा उल्लंघन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई - विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काही विभागांतील भ्रष्टाचारांवर केलेले आरोप त्या विभागांच्या मंत्र्यांनी फेटाळून लावले. खोटे आरोप केले जात असल्याचा दावा मंत्र्यांनी केला. त्यावरुन मंत्री व विरोधी नेत्यांमध्ये आव्हाने-प्रतिआव्हानाची भाषा झाली. भ्रष्टाचाराची चौकशी टाळली जात असल्याची टीका करीत, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत घोषणा देत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी तुर भरडाईच्या कंत्राटात दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यावर सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर देताना मुंडे यांचे आरोप फेटाळून लावले. १३१३ कोटी रुपयांची तूर खरेदी केली असताना, त्यात दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला असा सवाल देशमुख यांनी केला.नोएडा - इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून नक्षलवादी बनलेल्या एका तरूणाला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर भगतअसे त्याचे नाव आहे. त्याच्यावर १५ गुन्हे दाखल असून त्याचा ६ जणांच्या हत्येत सहभाग होता. त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.बिहारमधील मुझफ्फरपूरच्या नक्षली भागात कमांडरसोबत सुधीर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचला व त्यात तो अलगद सापडला. सुधीरला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांना घरात एक पिस्तूल आणि ५ गोळ्या सापडल्या. २००७ साली केवळ १४ वर्षाचा असताना सुधीरने रागाच्या भरात एका तरुणावर गोळी झाडली होती. १४ वर्षाचा असल्यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. बालसुधारगृहातून सुटल्यानंतर सुधीरने शिक्षण सुरूच ठेवले होते. पुढे त्याने मोदी नगरमधील दिव्य ज्योती कॉलेजमध्ये बीटेकमध्ये प्रवेश घेतला. २०१३ साली वडील आणि भावाला शिक्षा झाल्यानंतर सुधीरने इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडले व तो मुझफ्फरनगरला गेला. तेथे तो नक्षलवादी कमांडर अनील रामच्या संपर्कात आला व ग्रुपमध्ये सहभागी झाला.त्यानंतर त्याने मोठ्याप्रमाणात गुन्हे केले पोलीस त्याचा तपस करीत होते. 

नवी दिल्ली - नोटाबंदी, जीएसटी, बँक घोटाळे आदी बाबींमुळे देशातील सामान्य नागरिकांनाही त्रास झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली.ममता यांनी मंगळवारी नवी दिल्लीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह टीडीपी, टीआरएस आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. भाजपविरुद्ध सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. देशातील सर्व संस्था भाजपच्या संस्था बनत असून भाजपने त्यांचा गैरवापर चालवला आहे, असे ममता म्हणाल्या.

चीन - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीत किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्प केल्याचे वृत्त असून कोरियन द्विपकल्पात शांतता रहावी, याबाबतही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनला गुप्त भेट दिल्याची चर्चा रंगली होती. किम जोंग हे विशेष रेल्वे ट्रेनने चीनला पोहोचल्याचे वृत्त होते. चीननेही किम जोंग उन यांच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नाही, असे म्हटले होते. जर ते चीन दौऱ्यावर असतील तर त्याची माहिती लवकरच प्रसारित केली जाईल, असे चीनच्या वतीने सांगण्यात आले होते.कॅनडी - अमेरिकेसोबतचे संबंध ताणलेले असतानाच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अमेरिकेच्या जॉन एफ कॅनडी विमानतळावर कसून तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी अमेरिकेच्या दौ-यावर गेले असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली. आमच्या पंतप्रधानांचा हा अपमान असल्याचे सांगत पाकिस्तानच्या मीडियाने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी टीव्ही वृत्तानुसार, अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात आजारी बहिणीला भेटण्यासाठी अब्बासी गेले असताना हा प्रकार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी दौ-यातही अशाप्रकारे एखाद्या पंतप्रधानांची तपासणी करणे अपमान असल्याचे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. या दौ-यात अब्बासी यांची अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्याशीही भेट झाली असे सांगितले जात आहे.

सांगली - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली असतानाच आज राज्यात विविध शहरांमध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ ‘सन्मान मोर्चा’ काढण्यात येणार आहे. सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघणार असून मुंबई आणि पुण्यातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटेंना अटक झाली असली तरी संभाजी भिडेंना अद्याप अटक झालेली नाही. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी सोमवारी आंबेडकरवादी संघटनांनी मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज (बुधवारी) राज्यात विविध शहरांमध्ये ‘गुरुवर्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. सांगलीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजीमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ एकाच वेळी बुधवारी सकाळी मोर्चे काढण्यात येणार आहेत.

लातूर - राज्याचे कामगारमंत्री आणि भाजपचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. लातूरच्या देवणी तालुक्यातील साकोळ येथील विक्टोरिया एग्रो फ़ूड प्रोसेसिंग प्राइवेट लि. कंपनीच्या कर्जासाठी युनियन बँक ऑफ़ इंडिया तसेच इतर बँकेची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. या संदर्भात आपण स्पष्टीकरण देणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. काळ्या ज्वारीपासून मद्यार्क निर्मितीचा हा प्रकल्प आहे. बनावट गहान ख़त आणि कागदपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे. मात्र आता मंत्री असल्यामुळे बँकेने मेहरबानी दाखवीत जवळपास ७५ कोटी रुपयांचे मुद्दल आणि व्याज कमी करून २५ कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती आहे. माझा आणि त्या कारखान्याचा काहींच संबंध नाही. या भागाचा विकास व्हावा यासाठी आपण संबंधितांना या भागात कारखाना उभा करण्याची विनंती केली. आपली राजकीय कारकिर्द जाणिवपूर्वक डागाळण्यासाठी विरोधकांकडून वारंवार व्हिक्टोरीया कंपीच्या प्रकरणाचा उल्लेख केला जातो. माझ्या त्याच्याशी काहीच संबंध नाही. मी केवळ त्यांचा जामिनदार आहे. कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. या संदर्भात आपण १ तारखेस स्पष्टीकरण देणार आहे, अशी प्रतिक्रिया लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

मुंबई - परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडल्याने आठवीच्या विद्यार्थिनीनेआत्महत्या केल्याची घटना मुंबईतील पवई भागात घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. रिद्धी जयप्रकाश त्रिपाठी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पवईतील एका खासगी हॉस्पिटलमधून २६ मार्च रोजी पवई पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. रिद्धी जयप्रकाश त्रिपाठी ही विद्यार्थिनी तिच्या कुटुंबियांसह पवईतील शिवशक्ती नगरमध्ये राहत होती. कुर्ला येथील सेंट मायकेल हाय स्कूलममध्ये ती इयत्ता आठवीत शिकत होती. 'रिद्धीची परीक्षा २६ मार्च रोजी सुरू झाली होती. पहिला विज्ञान विषयाचा पेपर होता. परीक्षेदरम्यान, मुलीच्या पॅडवर परीक्षेदरम्यान काहीतरी लिहिलेले आढळले. रिद्धी कॉपी करताना आढळल्यावर शिक्षिकेने तिला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये जायला सांगतिले. रिद्धीचा शिक्षिकेने अपमान केला. इतकेच नाही, तर तिला जवळपास एक तासाहून जास्त वेळ मुख्याध्यापक कक्षाच्या बाहेक उभे केले. २६ तारखेला दुपारी परीक्षा देऊन घरी आल्यावर रिद्धीने जेवण केले व ती झोपायला गेली. त्यानंतर रिद्धीची आई नितूसुद्धा शेजारी जाऊन शिवण कामात व्यस्त झाल्या. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांना दरवाजे, खिडक्या आतून बंद असलेल्या पाहायला मिळाल्या. नितू यांनी अनेकदा दरवाजा वाजवला पण रिद्धीने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून स्क्रु ड्रायव्हर घेऊन खिडकी उघडली. तेव्हा त्यांना रिद्धी छताला लटकलेल्या अवस्थेत दिसली. रिद्धीला खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुंबई - म्हाडा प्राधिकरण हे घोटाळ्यांचे आगार झाले असून, गेल्या साडेतीन वर्षांत त्यांना परवडणारे एकही घर बांधता आले नसले तरी कोटय़वधी रुपयांचे घोटाळे मात्र राजरोस सुरू असल्याचा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सरकारवर चढवला. पवई येथील १० हजार चौरस मीटरचा भूखंड न्यायालयात खोटे शपथपत्र सादर करून म्हाडा अधिकाऱ्यांनी पॉपकॉर्न इंडस्ट्रीजला कसा दिला याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच द्यावे, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले.म्हाडामध्ये केवळ खासगी विकासकांचेच चांगभले करण्याचे उद्योग अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून पॉपकॉर्न इंडस्ट्रीजला दिलेला मोक्याचा भूखंड हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या जागेची बाजारभावानुसार किंमत १६०० कोटी रुपये आहे. १९९९ साली हा भूखंड जयकृष्ण इंडस्ट्रीजला हॉटेल बांधण्यासाठी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र, त्यानंतर सत्ता बदलताच हा निर्णय बदलण्यात आला. त्यानंतर २००४ साली सदर भूखंड हॉटेल व्यवसायासाठी ९० वर्षांच्या भाडेपट्टय़ावर देण्यासाठी खुल्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात पॉपकॉर्न कंपनीने २२ कोटी २२ लाख रुपयांचा सर्वोच्च देकार दिला आणि म्हाडाने त्यांच्याकडून पाच कोटी ५५ लाख रुपये इतकी रक्कम जमा करून घेतली. या निविदेला जयकृष्ण इंडस्ट्रीजने उच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, म्हाडाने २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र करून म्हाडातर्फे सदर जागेवर गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी परवानगी मागितली. यानंतर अचानक म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याच भूमिकेत वेळोवेळी बदल केल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये न्यायालयाने याचिका रद्द केली असली तरी म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खोटय़ा शपथपत्राने पॉपकॉर्न प्रॉपर्टीजचा या भूखंडावर दावा निर्माण झालेला आहे.सदरची बाब शासनाच्या निदर्शनास येऊन चार महिने झाले तरीकोणावरही जबाबदारी का निश्चित करण्यात आली नाही असा सवाल मुंडे यांनी केला.

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना येत्या ८ दिवसांत अटक करा, नाहीतर विधान भवनाला घेराव घालू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आझाद मैदानात सोमवारी काढलेल्या एल्गार मोर्चात आंबेडकर बोलत होते. कोरेगाव भीमा प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत असून अटक करण्याऐवजी संभाजी भिडे यांना मोदी सरकार पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला. ते म्हणाले की, पुरावे दिल्यानंतर या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांना दंगलखोर ठरवल्यानंतर सरकारने कारवाई केली. तोपर्यंत पुरावे नसल्याचे कारण देत सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. मुळात एकाच गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एकाला अटक होते, तर दुसरा मोकाट फिरतो. यावरूनच मोदी सरकार भिडे यांना पाठीशी घालत असल्याचे दिसते. त्यामुळे आठ दिवसांची मुदत सरकारला देऊन आज जात आहोत. मात्र पुन्हा आल्यास, जे हवे ते घेतल्याशिवाय परत जाणार नाही. त्या वेळी माझी दादागिरी चालेल. मग विधानसभेला घेराव घालू. त्यासाठी आंदोलनकर्त्यांना १० दिवसांची भाकर घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले.कोल्हापूर - मारामारी, दहशत, अपहरण, खून, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेला इचलकरंजीतील सराईत गुंड गुंड्या जमादार याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला असून, महिन्याभरात कारवाई होणार आहे, अशी माहिती जयसिंगपूर उपविभागाचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे.टोळीप्रमुख गुंड्या ऊर्फ मुसा अब्दुल रजाक जमादार, अविनाश संजय टेके, शीतल अविनाश टेके, जुबेर गुलाब कोटीवाले, इस्माईल मलिक मुजावर (सर्व रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१ते ४) २३ (१-अ) प्रमाणे मोकाची कारवाई केली. जिल्ह्यात खून, घरफोड्या, लूटमारीसारख्या घटना वाढत आहेत. जिल्ह्यातील मटका, जुगार व खासगी सावकार यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले होते.

नवी दिल्ली - 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी एक तास चर्चा झाली. ही चर्चा समाधानकारक झाल्याने उद्यापर्यंत अण्णा उपोषण सोडतील, ' असा विश्वास महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. अण्णा हजारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस होता. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केली. 'अण्णांच्या एकूण ११ मागण्या आहेत. त्यातील जास्तीत जास्त मागण्यांवर काम होत आहे. अण्णांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. आणखी काही मुद्द्यांवर चर्चा होईल आणि अण्णा उपोषण मागे घेतील.अण्णाही उपोषण सोडायला तयार होतील. असे मला वाटते,' असे गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.बंगळूरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं आज बिगूल वाजणार आहे. पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेत परतण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भाजपमध्ये तेथे चुरशीची लढत आहे.दक्षिण भारतात आता केवळ कर्नाटकमध्येच कॉंग्रेसची सत्ता असल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावला आहे. कॉंग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने कर्नाटक दौ-यावर आहेत, तर भाजपाकडून अमित शहा यांचं कर्नाटकवर बारीक लक्ष आहे. उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget