April 2018

भोपाळ - पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात विविध आखाड्यातील नागा साधूंनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदविला आहे. यादगार-ए-शहाजहाँनी पार्कमध्ये या साधुंनी जोरदार निदर्शने केली. नर्मदा सेवा यात्रेतील भ्रष्टाराचार चव्हाट्यावर आणू नये म्हणूनच शिवराज सिंह चौहान यांनी या पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिल्याचा आरोप नागा साधूंनी केला आहे. स्वामी वैराग्यानंद गिरी यांनी या साधूंच्या या मोर्चाचे नेतृत्व केले. या साधूंना मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत मोर्चा न्यायचा होता. पण त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. घोटाळ्याविरोधातील आवाज दाबण्यासाठीच साधुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन गप्प बसविले असल्याचा आरोपही या साधुंनी केला.

नाशिक - लिंगायत धर्मास शासन मान्यता मिळावी आणि आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करूनही यश मिळालेले नाही. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने करो वा मरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे नेते ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने रविवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर नाशिक विभागीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘हिंदू-लिंगायत’ असा उल्लेख असलेल्यांना इतर मागास वर्गाचे दाखले मिळावेत, लिंगायतमधील जंगम प्रवर्गास मागासवर्गीय म्हणून तसेच गवळी प्रवर्गास भटक्या विमुक्त जाती जमातीचे दाखले तातडीने देण्याच्या सूचना शासकीय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशा मागण्यांचा समावेश आहे. कोल्हापूर येथे महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर क्रांतिदिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच १५ ऑगस्ट रोजी तिरंग्यासह लिंगायत धर्माचा ध्वज फडकाविण्यात येणार असल्याची घोषणाही संघर्ष समितीने केली आहे. मोर्चाचे नेतृत्व काका कोयटे यांच्यासह नाशिकचे चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले, वसंतराव नगरकर, अ‍ॅड. अरुण आवटे, दुर्गेश भुसारे आदींनी केले.

जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी रविवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कविंदर गुप्ता हे आता उपमुख्यमंत्री असतील. गुप्ता सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, आज (सोमवार) मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. या फेरबदलात भाजपाकडून काही नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल एन.एन.व्होरा आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.


जम्मू-काश्मीर - एका २४ वर्षीय तरुणीने सीआरपीएफच्या एका जवानावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे या जवानासह त्याला साथ देणाऱ्या तीन जवानांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी पुंछ जिल्ह्यातील मंडी येथील राहणारी आहे. '१० मार्च रोजी तीन जवानांनी मला रस्त्यात अडवले आणि त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात घेऊन गेले. त्यानंतर त्यातील एकाने आपल्यावर बलात्कार केला,' असा आरोप या तरुणीने केला आहे. आरोपी जवानांनी या घटनेची व्हिडिओ क्लिपही तयार करून या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचा आरोपही तिने केला आहे. याप्रकरणी डोमाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन तिन्ही जवानांना निलंबित करण्यात आले.


अकोले - तालुक्यातील गर्दनी येथील प्रवचन व कीर्तन करणारा तथाकथीत महाराज अनिल रामचंद्र तळपे याने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली आहे.एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्यावरील लैंगिक शोषणासंदर्भात अहमदनगर येथील चाइल्डलाइन या संस्थेच्या कार्यकर्त्यांना सर्व हकिकत सांगितल्यानंतर शासकीय यंत्रणा वेगाने फिरली. स्वतः पीडित विद्यार्थ्याने अकोले पोलिस ठाण्यात जाऊन महाराजाविरोधात तक्रार नोंदवली. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पीडित मुलगा सायबर कॅफेमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉल तिकीट काढायला गेला होता. तेथे बाहेर आरोपी अनिल तळपे याने त्या मुलास, 'चल माझ्याबरोबर तुला ऑफिस दाखवतो', असे म्हणून सोबत नेले. त्यानंतर आरोपीने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याने झालेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी चाइल्डलाइन या संस्थेत माहिती दिली व अकोले पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अनिल तळपेविरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.लखनऊ - भाजपा सरकार राम मंदिर उभारू शकत नाही, असे विधान शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केले आहे. केंद्रात आमची सत्ता असल्यामुळे आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाकडून सांगण्यात येते. परंतु, घटनेनुसार केंद्र सरकार हे निधर्मी आहे. परिणामी हे सरकार राम मंदिर, मशिद किंवा गुरुद्वारा उभारू शकत नाही. केवळ आमच्यासारखे रामभक्तच राम मंदिर बांधण्यास समर्थ आहेत, असे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी शंकराचार्यांनी आसाराम बापू व राम रहीम यांच्यासारख्या स्वयंघोषित धर्मगुरूंवरही टीका केली. भारतातील लोकांनी आसारामला मोठे केले. चमत्कारांवर विश्वास असणाऱ्या लोकांनी कोणालाही संत केले. ख्रिश्चन धर्मीयांमुळे हा पायंडा पडला. आम्ही लोकांच्या दु:खाचे निवारण करतो, असा प्रचार ख्रिश्चन धर्माच्या प्रसारकांकडून करण्यात आला. हीच गोष्ट आसाराम बापू आणि राम रहिम यांच्या पथ्यावर पडली, असे शंकराचार्यांनी सांगितले.

चंद्रपूर - नागपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या अंगातील भूत काढून देतो, असे म्हणून अघोरी विद्येच्या नावाखाली मात्रिकाने तिच्यावर दोनदा अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.पीडित मुलीच्या तक्रारीवरून मांत्रिक मुन्ना समशेर खान रमजान पठाण, किशोर भाऊराव वाळके, आशिष पद्माकर कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्याने पीडित मुलीला मांत्रिकाकडे दाखविण्याकरिता आई-वडिलांनी भद्रावती येथील आशिष कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर किशोर वाळके याने नागपूर येथील मुन्ना नामक मांत्रिकाचा पत्ता दिला. त्यानुसार २२ एप्रिलला मांत्रिकाने भद्रावती येथील वाळके यांच्या घरी कुटुंबाला बोलावून घेतले. बंद खोलीमध्ये तिच्या अंगावरून तीन तास भूत काढावयाचे आहे, असे सांगत पूजापाठ करून तिला विवस्त्र केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तिन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. टेम्पोनं दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई लेनवर 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. सोमवारी (30 एप्रिल) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.बंद पडलेल्या ओम्नी कारला धक्का मारत असताना मागील बाजूनं भरधाव येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी-प्रगतीसाठी राज्य सरकार उद्योग धोरण तयार करत असून सप्टेंबर २०१८ मध्ये नवीन उद्योग धोरण जाहीर करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे.सूक्ष्म व लघु उद्योगांच्या (एसएमई) संघटनेतर्फे आयोजित आर्थिक परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना देसाई यांनी ही घोषणा केली. नीती आयोगाचे प्रमुख डॉ. राजीव कुमार तसेच ‘एसएमई’चे प्रमुख चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते. राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अनेक नियम, अटी शिथील केल्या आहेत. यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत तीन हजारांहून अधिक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. ही गुंतवणूक केवळ मोठय़ा शहरांत नसून नंदुरबार, हिंगोली जिल्ह्य़ातही गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांनी सुरुवात केली आहे, असे देसाई यांनी सांगितले. विद्युत वाहनांच्या उत्पादनाबाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. उद्योगक्षेत्रातील महिलांचे प्रमाण केवळ ९ टक्के असून ते २० टक्क्यांवर नेण्यासाठी, उद्योग क्षेत्रात महिलांचा वाटा वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘एसएमई’साठी मुद्रा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत राज्य सरकार नवे उद्योग धोरण राबविणार आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, सूचना कळवाव्यात असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.

नाशिक - गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररित्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी नाशिकमधील हिरावाडीतील साईनाथ रो-हाऊसमध्ये घडली. स्वरा प्रवीण शिरोडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी खासगी रूग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई - भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी येथील साई सदन चाळीमध्ये सार्वजनिक शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. लोबाबेन धीरुभाई जेठवा (४२) आणि बाबूलाल झोमाजी देवासे (४५) अशी मृतांची नावे आहेत.शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे शौचास गेले असतानाच शौचालयाचा ढाचा कोसळला. यात दोघेही ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनडीआरएफचे पथकही बोलावण्यात आले. पालिका कर्मचारी आणि महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही बचावकार्याकरिता मदत घेण्यात आली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.स्थानिकांच्या माहितीनुसार,हे सार्वजनिक शौचालय घुशींनी पोखरले होते. शौचालयाच्या टाकीतील गॅसमुळे स्फोट झाला असावा आणि त्यामुळे शौचालय खचले असावे,असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे.

सांगली - लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली नियुक्ती ही निवडणुकीच्या तोंडावर मराठा कार्ड खेळण्याच्या राष्ट्रवादीच्या परंपरेचा भाग असल्याचे मानले जाते. गेल्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अपयश धुऊन काढत पुन्हा यश मिळवण्याचा हेतू पाटील यांच्या नेमणुकीमागे आहे.सहा जिल्ह्य़ांमधील विधानसभेच्या ७० जागांपैकी अवघ्या १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ मध्ये जिंकता आल्या होत्या. आपल्या हक्काच्या भागातच पक्षाला फटका बसला. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची धूळधाण झाली होती. मोदी लाटेचा तो परिणाम होता. ओबीसी समाजातील सुनील तटकरे त्या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना जून २०१४ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका-नगरपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीची पीछेहाटच होत गेली. मराठा मोर्चाचे यशही पक्षाला वाचवू शकले नव्हते. मराठा जनमानस फडणवीस सरकारवर नाराज असले तरी पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांची नस पकडेल, त्यांना जवळचा वाटेल, त्यांची मते आपल्याकडे वळवू शकेल, असे नेतृत्व राष्ट्रवादीकडे नसल्याची चर्चा होती. या पाश्र्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने माजी अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री, सहकाराच्या राजकारणातील जाणकार अशी ओळख असलेल्या जयंत पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याची चाल खेळली आहे.

पाटणा - नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्यानंतर आता भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बॉलिवूडबरोबरच राजकारणातही सेक्सची मागणी आणि ऑफर दिली जाते, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. बॉलिवूडमध्ये आणि राजकारणात काम करण्यासाठी सेक्सची मागणीही होते आणि ऑफरही दिली जाते. पुढे जाण्यासाठी अतिशय जुना आणि यशस्वी ठरलेला हा पर्याय आहे. सेक्सच्या मागणीचा प्रकार हा मानवाच्या सुरुवातीपासून होत आहे. यात खेद करण्यासारखे काहीच नाही, असे सिन्हा यांनी सांगितले.

नवी दिल्ली - टेलिकॉम सेक्टरमध्ये धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओने आता नोकरी शोधणा-यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८० हजार जणांची भरती करणार आहे. नव्या लोकांच्या भरतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाणार आहे. रिलायन्स जिओचे मुख्य मानव संसाधन अधिकारी(Chief human resources officer) संजय जोग यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. जिओ यावर्षी ७५ हजार ते ८० हजार नव्या नोक-या उपलब्ध करेल असं ते म्हणाले. आधीपासूनच कंपनीत १.५७ लाख लोकं नोकरी करत असून यावर्षी आम्ही आणखी भरती करणार आहोत अशी माहिती जोग यांनी दिली.

लखीमपूर खीरी - उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी येथे ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत. लखीमपूर खीरी येथे राष्ट्रीय महामार्गावर 'पापा जी का ढाबा' जवळ हा अपघात झाला. घटनास्थळी ९ जणांचा मृत्यू झाला. तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. शाहजहाँपूर येथून सीतापूर येथ जाणारी टाटा मॅजिक थेट ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे टाटा मॅजिक गाडीतील १७ पैकी ९ जण जागीच ठार झाले. तर अन्य चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अपघातातील जखमींना सीतापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टाटा मॅजिक सुस्साट वेगाने होती. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळविण्यात चालकाला अपयश आले आणि थेट ट्रकवर जावून आदळली आणि अपघात झाला.

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे निकाल घोषीत झाले असून गिरीश बडोले हा राज्यात प्रथम आला असून देशात विसावा आलाय. गिरीश बडोले हा मुळचा उस्मानाबादचा आहे. एकूण ९९० विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहे. देशात दुरुशेट्टी अनुदीप यांनी प्रथम, अनु कुमारी व्दितीय, तर सचिन गुप्ता यांनी तिसरा क्रमांक संपादन केला आहे.

सांगली - संभाजी भिडे गुरुजींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ५ पोलिसांवर शुक्रवारी रात्री निलंबनाची कारवाई करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी हे आरोपी आहेत. भीमा कोरेगावमधील हिंसाचारानंतर संभाजी भिडे गुरुजी यांच्या बंदोबस्तासाठी सरकारच्या पाच पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी अशी सुरक्षा देण्यात आली आहे. गुरुजींच्या सुरक्षेची जबाबदारी असताना काही दिवसांपूर्वी हे कर्मचारी बंदोबस्त सोडून परस्पर अन्यत्र गेले होते. गुरुजींची त्या दिवसाची माहिती देखील या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला कळवली नव्हती. भिडे गुरुजी नुकतेच पुणे येथे गेले असता त्यांच्यासोबत एकही पोलीस कर्मचारी नव्हता. त्यामुळेच ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

नाशिक - शुक्रवारी सकाळपर्यंत नाशिकच्या एकलहरे परिसरात राहणाऱ्या गोधडे यांच्या कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि आता स्मशानशांतता पसरली आहे. कारण लग्नासाठी पाहुणी म्हणून आलेल्या १४ वर्षीय मुलीने पाचव्या मजल्यावरून उडी मारली.मुलीने उडी मारल्याचे समजताच तिचे वडील तिला झेलण्यासाठी धावले. मात्र ती मुलगी वडिलांच्या अंगावर कोसळली आणि त्यात वडिलांचा मृत्यू झाला. विजय गोधडे असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर उडी मारणारी सुनंदा गभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्न समारंभादरम्यान घडलेल्या या घटनेने परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे - स्वत:च्या नावावर घर आणि जमीन असूनही त्या जमिनीत आणि घरात तुम्हाला येऊच दिले जात नसल्याने पुणे जिल्ह्यातील घोडेगावमधल्या एका वृद्धेने उपोषण केले आहे. पुण्यातल्या आंबेगाव तालुका तहसील कार्यालयासमोर ७० वर्षांच्या सरस्वतीबाई काळे उपोषणाला बसल्या आहेत. स्वतःची जमीन असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना या वयात आपल्या भावाकडे राहून मोलमजुरी करावी लागत आहे. कारण त्यांच्या जमिनीशी काहिही संबंध नसलेली व्यक्ती त्यांना त्यांच्या जमिनीत येऊही देत नाही. त्यामुळे, न्यायासाठी सरस्वतीबाई काळे यांच्यासमोर बेमुदत उपोषणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. हक्कासाठी गेली दहा वर्षं सरस्वतीबाईंचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरु आहे. मात्र यंत्रणेने त्याची साधी दखलही घेतलेली नाही.

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेरेशन लि.(एमएमआरसीएल)ने आरे कॉलनीत सुरू असलेले मेट्रो कारशेडचे काम स्वत:च्या जबाबदारीवर सुरू ठेवावे, असा इशारा उच्च न्यायालयाने एमएमआरसीएला शुक्रवारी दिला.याचिका प्रलंबित असल्याने न्यायालयाने इशारा दिला आहे.आरे कॉलनीत सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामाला रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. पी.डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर होती. आरे परिसर पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असल्याने येथे कुठलेही बांधकाम केले जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.एमएमआरसीएलने स्वत:च्या जबाबदारीवर काम करावे, पण हे प्रकरण अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे. मेट्रोसाठी सरकारने आरक्षण बदलले, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे, तर यापूर्वी एमएमआरसीएलने आपल्या प्रतिज्ञापत्रात आरेचा २५ हेक्टर भूखंड आरक्षित जंगल म्हणून जाहीर केला नव्हता, असे म्हटले.  पुढील सुनावणी १२ जूनला आहे.

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या वा येणाऱ्या हजारोंहून अधिक पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईत पर्यायी जागा उपलब्ध करण्यात सरकार असमर्थ असल्याची हतबलता मुख्य सचिवांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात व्यक्त केली. मात्र हा दावा फेटाळून लावत न्यायालयाने तिसऱ्यांदा मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र फेटाळून लावले. एवढेच नव्हे, तर या पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करणे शक्य नसल्यास ते स्वत:च घराचा प्रश्न सोडवू शकतील यासाठी सरकारने त्यांना पैसे द्यावेत, असे आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करू शकत नाही, अशी असमर्थता व्यक्त करणारे प्रतिज्ञापत्र मुख्य सचिवांच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आले. सलग तिसऱ्यांदा मुख्य सचिवांनी तीच असमर्थता आणि तोच दावा करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई - मॉडेल आणि अभिनेत्री नताशा सूरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. तसेच आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ड्वेन ब्रावो आणि नताशाच्या रिलेशनचीच सगळीकडे चर्चा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर कौस्तूभ कांबळेने केलेल नताशाचा फोटोशूट सगळीकडे व्हायरल होत आहेत. पण तरीही तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ड्वेन ब्रावोदेखील तिच्यासोबतचा फोटो शेयर करताना दिसत आहे.

मुंबई - भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. माधव भांडारी यांची पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीवर उपाध्यक्ष म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मंत्री पदाच्या सर्व सुविधा भंडारी यांना मिळणार आहेत. यापूर्वी दोन वेळा विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने भंडारी नाराज होते. मंत्रीपदाचा दर्जा असलेले पद देऊन भंडारींची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, माधव भंडारी यांना विधान परिषदेवर पाठविले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यांचा पत्ता यावेळी कापण्यात आला. तर दुसरीकडे भाजपकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्यात आले. मात्र, माधव भंडारी यांच्या नावाचा उल्लेख होत नसल्याने ते नाराज होते. भाजपच्या स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते अशी माधव भंडारी यांची ओळख आहे.

सिक्कीम - भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘हमरो सिक्कीम पार्टी’ असे त्याच्या पक्षाचं नाव आहे. सिक्कीमच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहोचत नाहीत. युवकांची टीम बांधून सिक्कीमच्या विकासासाठी काम करु आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊ असे यावेळी भुतियाने म्हटले. २०१४ मध्ये बायचुंग भुतियाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूकही लढवली, पण निवडणुकीत एस.एस. अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला. फेब्रुवारीमध्ये त्याने तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. सिक्कीममध्ये राहात असल्याने पक्षासाठी स्वतःचे कर्तव्य पार पाडता येत नव्हते असे उत्तर भुतियाने तृणमूल सोडण्याच्या प्रश्नावर दिले.

पिंपरी -  कोट्यवधी रूपयांचे रक्तचंदन बेकायदेशीररित्या घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी पकडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईला कोट्यवधींचे रक्तचंदन बेकायदेशीररित्या घेऊन जाणारा कंटेनर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे फौजदार प्रवीण स्वामी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे फौजदार हरीश माने यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण (गुन्हे) यांनी सहायक निरीक्षक दत्तात्रय लोंढे, फौजदार माने यांच्यासह कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, भैरोबा यादव, धुमाळ, गंभीरे, कुडाळ, नदाफ, बंडू हजारे, नितिन गेंगजे, अशोक दुधावणे यांची दोन पथके बालेवाडी रोड-वाकड पूल ते रावेत कोपऱ्यापर्यंत पेरली. पथकाला एक मोठा कंटनेर 'हॉटेल ताज ढाबा' येथे थांबल्याचे समजले. त्यानंतर सापळा रचून पथकाने कंटनेर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. चालकाला केवळ तमिळ भाषा अवगत होती. त्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला.

बंगळुरु - कर्नाटकमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळलाय. याप्रकरणी काँग्रेसने चौकशीची मागणी केली. गुरुवारी राहुल गांधी एका विशेष विमानाने दिल्लीहून हुबळीला पोहचेल. विमान जमीनीवर उतरत असताना त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पण हा तांत्रिक बिघाड नसून त्यामागे घातपाताची शंका काँग्रेसने व्यक्त केली. याप्रकरणी डीजीसीए मार्फत चौकशी व्हावी यासाठी पायलटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.राहुल गांधींबरोबर विशेष विमानात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनंही कर्नाटक पोलीस महासंचालकांकडे आणि महा निरिक्षकांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीत विमान उतरतेवेळी हवामान स्वच्छ होते. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.मात्र राहुल गांधी यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री हुबळी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा घातपाताचाही प्रयत्न असू शकतो, असे तक्रारीत नमूद केले आहे.

मुंबई - बनावट दस्तावेज बनवून पश्चिम उपनगरातील पाली हिल व अक्सा येथील सुमारे तीनशे कोटींच्या मालमत्तेवर दावा करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक समीर भोजवानीला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने गुरुवारी अटक केली आहे. दिव्यकांत खटाऊ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार व सायरा बानू यांनीही याबाबत जानेवारी महिन्यात फसवणुकीची तक्रार दिली असून त्या प्रकरणात त्याला अटकपूर्व जामीन मिळाला होता. पश्चिम उपनगरातील पाली हिल परिसरात अभिनेत्री सायराबानू यांच्या मिळकतीच्या बाजूलाच खटाऊ ट्रस्टची ३०० कोटींचा तीन एकरचा भूखंड आहे. बांधकाम व्यावसायिक भोजवानी याने बनावट दस्तावेज बनवून या भूखंडावर दावा केला होता. त्याबाबत दिव्यकांत खटाऊ यांनी तक्रार दिली होती. भोजवानी याने दिलीप, महेंद्र व हितेन खटाऊ याच्यासमवेत संगनमत करुन बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्तेवर दावा सांगितला होता. तपासाअंती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने भोजवानी व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. आता बनावट दस्तावेज बनवून पश्चिम उपनगरातील पाली हिल व अक्सा येथील सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर दावा केल्याप्रकरणी भोजवानीला मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली आहे. फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

जामनगर - फेसबुकवरुन अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे गुजरातमधील एका बिझनेसमॅनला चांगलेच महागात पडले आहे. गिरीश भूत असे फसवणूक झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. गिरीश भूत (३७) यांना हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवून एका टोळक्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. या कटामध्ये एकूण सहाजण सहभागी होते. त्यामध्ये तीन महिला होत्या. या महिलांनी पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करु अशी धमकी गिरीश यांना दिली. गिरीश भूत यांच्या मालकीची एक फॅक्टरी असून ते मावडी चौक येथे राहतात. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी फेसबुकवरुन जान्हवी अहीर नावाच्या महिलेबरोबर मैत्री केली. बुधवारी जान्हवीने त्यांना जामनगर रस्त्यावरील नागेश्वर एरिया येथे भेटण्यासाठी बोलावले. गिरीश त्यांच्या बाईकवरुन तिथे पोहोचल्यानंतर आधीपासूनच तिथे उपस्थित असलेल्या गीता, रसिला, केतन, कुलदीप आणि आणखी एका व्यक्तिने त्यांना जबरदस्तीने निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे या सर्वांनी गिरीश यांना जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडले व जान्हवी नावाची महिला सुद्धा विवस्त्र झाली. त्यानंतर अन्य पाच जणांनी या दोघांचे नागड्या अवस्थेतील फोटो काढले. एवढयावरच हे सर्व थांबले नाही. त्यांनी गिरीश यांना जबरदस्तीने हस्तमैथुन करायला भाग पाडले व वीर्य जमा करुन घेतले. त्यानंतर या महिलांनी गिरीश यांच्याकडे १० लाख रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी त्यांनी दिली.आपल्याकडे इतके पैसे नाहीत हे गिरीश यांनी पटवून दिल्यानंतर पाच लाख रुपयांचा सौदा ठरला. पण या टोळक्याला त्यांच्याकडून तात्काळ १ रुपये हवे होते. अखेर गिरीश यांनी त्यांचा भाऊ शैलेशला फोन लावला व १ लाख रुपये देण्यास सांगितले. शैलेशला काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला व त्याने लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचला व शैलेशला भावाला फोन करुन राया क्रॉसरोडवर येण्यास सांगितले. गीता आणि रसिला भूत यांच्या बाईकवरुन पैसे घेण्यासाठी आल्या त्यावेळी पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली.

चांदूरबाजार - आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्षा व नियम धाब्यावर बसवून या बांधकामात पिवळी मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गुरुवारी या मार्गावर एक अपघात झाला. तो पाहून आ. कडू यांनी सुपरवायझरच्या कानशिलात लगावली.या रस्त्याचा कंत्राट एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतला आहे. या मार्गावर काही ठिकाणी चिखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आ. बच्चू कडू कुरळपूर्णा येथून चांदूर बाजार येथे परत येत असताना हैदतपूर वडाळा या गावाजवळ रस्त्यावरील चिखलामुळे एक विद्यार्थी घसरून पडला. रस्त्यावर पाणी टाकल्याने सर्वत्र पिवळी माती उडत होती. याची दखल घेत आ. कडू यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुपरवायझरला विचारणा केली. मात्र सुपरवायझरतर्फे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतापलेल्या आ. बच्चू कडू यांनी त्याच्या कानशिलात लगावली आहे.

मुंबई - निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत. चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळणारे सुनील तटकरे यांच्या जागी नवीन नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. येत्या रविवारी २९ एप्रिलला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सर्वसंमतीने नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.प्रदेशाध्यक्षपदाची चार वर्षे आपण जबाबदारी संभाळली, आता ही जबाबदारी अन्य सक्षम नेत्याकडे द्यावी अशी आपण पक्ष नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

पुणे - बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे. अटक होऊन साठ दिवस उलटले तरी आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद डीएस कुलकर्णींच्या वकीलांनी केला. तर डी एस कुलकर्णींवर कलम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.या कलमांतर्गत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत असते, असा सरकारी वकीलांचा युक्तीवाद आहे. डीएसकेंना जामीन मिळतो का याकडे लक्ष लागले आहे.


कठुआ -  कठुआ मधील बलात्काराच्या घटनेची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कुरूकवाडी येथील श्रीधर पाटील हे आयपीएस आहेत. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणाने देश ढवळून निघाला. त्याच प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आता श्रीधर यांच्यावर आहे. कठुआ जिल्ह्यातही अद्यापही भीतीचे आणि संतापजनक वातावरण आहे. या परिस्थितीत या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी कोल्हापूरच्या श्रीधर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळं पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आता श्रीधर पाटील यांच्यावर असणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील श्रीधर पाटील हे २०१० च्या आयपीएस बॅचचे आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी हा जम्मू-काश्मीरमध्येच गेला आहे. तसेच त्यांचे पहिले पोस्टिंगसुद्धा श्रीनगर येथे झाल होते. पाटील यांना जम्मू-काश्मीरच्या एकूण परिस्थितीचा चांगला अभ्यास आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था कुशलपणे सांभाळण्याची त्यांची सर्वोच्च क्षमता असल्याचे त्यांनी यापूर्वी दाखवून दिले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पाटील यांना देशासह जगभरातील माध्यमांचे लक्ष लागून राहिलेल्या कठुआ जिल्ह्याचा पदभार देण्यात आला आहे.


सूरत - मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेली साध्वी प्रज्ञा ठाकूरने मंगळवारी सूरतमध्ये रोड शो केला. यादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. 'हिंदू धार्मिक नेत्यांना कुठल्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात डामले जात असल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला. 'एक महिला सत्तेत असताना संतांना तुरुंगात राहून यातना सहना कराव्या लागल्या. याचे कारण म्हणजे ती महिला इटलीतून आली होती, अशी टीका साध्वी प्रज्ञा यांनी केली. त्यानंतर आपल्या भाषणात साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा इटलीतून आलेल्या बाईचा उल्लेख करत सोनिया गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. मालेगाव बॉम्ब स्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञाने अनेक वर्ष तुरुंगात घालवली आहेत. मंगळवारी सूरतमध्ये आयोजीत सभेच्या वेळी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी साध्वी प्रज्ञाचे जोरदार स्वागत केले. 

नवी दिल्ली - आधार प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्वपूर्ण खुलासा केला. कोर्टाने सरकारला कधीही मोबाईलशी आधार क्रमांक जोडण्यास सांगितले नव्हते. गेल्या काही काळापासून बँकिंगसह सर्वच क्षेत्रांकडून आपल्या ग्राहकांना आधार आणि मोबाईल क्रमांक जोडण्याबाबत दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी महत्वाची मानली जात आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, सरकारने ६ फेब्रुवारी २०१७ ला दिलेल्या त्यांच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे.मोबाईलशी आधार क्रमांक जोडण्याच्या सरकारच्या निर्णयावर बुधवारी सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मोबाईल क्रमांकाबाबत दिलेल्या मागच्या आदेशाचा एक हत्यार म्हणून वापर करण्यात आला. आधार आणि २०१६ च्या एका कायद्याविरोधात आव्हान याचिकांवर सुनावणी करताना ‘लोकनीति फाऊंडेशन’ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, मोबाईलच्या उपयोगकर्त्यांना राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्याची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, आपल्या या आदेशाचा चुकीचा अर्थ घेत मोबाईल-आधार जोडण्याबाबत मोहिम राबवण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह ५ सदस्यीय खंडपीठाने म्हटले की, मुळात होयकोर्टाने असा कुठलाही आदेश दिलेला नाही. मात्र, सरकारने याला मोबाईल वापरकर्त्यांना आधार अनिवार्य करण्यासाठी हत्याराप्रमाणे वापरले आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर जिह्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कुशीनगर जिल्ह्यातील बिशनपुरा गावाजवळ आज एक मानवरहित रेल्वे फाटकावर एक्स्प्रेसनं स्कूल बसला धडक दिली. त्यावेळी बसमध्ये २५ मुले होती. अपघातात १३ मुलांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

नाशिक - नाशिक शहरात मुलींचं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरातून एकवीस दिवसांत २५ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. शाळांना सुट्टी लागल्याने मुली आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने पालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरातील गुन्ह्यांच्या आलेखात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे पालकांसह नाशिक पोलिसांसमोर हा विषय चिंतेचा बनला आहे.अशा प्रकारच्या घटनांमुळे नाशिक पोलिसांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. नाशिक पोलिसांकडून महिला सुरक्षासाठी वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र, तरिही २५ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

ठाणे - शहापूरचे शिवसनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. निमसे यांच्या अनैतिक संबंधांमुळे कुटुंबातून बेदखल होण्याच्या भीतीने पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी वैशाली उर्फ साक्षी निमसे (३६) हिच्यासह एका मारेकऱ्याला अटक केली. शैलेश निमसे (४३) यांचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह २० एप्रिल रोजी देवचोळे गावाजवळील जंगलात आढळून आला होता. शैलेश यांची पत्नी वैशाली हिने काही राजकीय व्यक्तींची नावे घेतली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, त्यामध्ये काहीच तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांचा वैशालीवरच संशय बळावला. तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत अखेर तिने हत्येची कबुली दिली. शैलेश यांचे एका महिलेशी अनैतिक संबध होते. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. वैशालीला मारहाणही होत होती. तिच्या नावावरील मालमत्तेचे हक्कही काढून घेतले होते. तसेच घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या घेऊन शैलेश त्या महिलेसोबत विवाह करणार होता. आता आपण बेदखल होऊ या भीतीने तिने आसनगाव येथे राहणाऱ्या ओळखीच्याच प्रमोद लुटे (३२) याला दीड लाख रु.ची सुपारी दिली, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत कदम यांनी दिली. प्रमोदने इतर साथीदारांच्या मदतीने रश्शी व बेल्टने शैलेश यांचा गळा आवळून खून केला. नंतर कारमधून मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोलच्या सहाय्याने जाळण्याचा प्रयत्न केला. वैशाली आणि लुटे या दोघांना न्यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, इतर तिघा आरोपींचा शोध सुरू आहे.


मुंबई - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी असल्यामुळे शिक्षकांवर बदल्यांमध्ये यापुढे कोणताही अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.या निर्णयामुळे राज्यातील सुमारे साडेतीन लाख जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षकांच्या बदल्यातील राजकीय हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराला तिलांजली मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.पंकजा मुंडेच्या या निर्णयामुळे समस्त शिक्षकवर्गाला दिलासा मिळणार आहे. 

नगर -  मुख्यमंत्री विकासकामांत व्यस्थ असल्याने त्यांना राज्यातील माता-भगिनींच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे, त्यामुळे गृहमंत्री स्वतंत्रच हवा, सत्तेसाठी भाजपने गुंडांना पाठीशी घालत वाल्यांना वाल्मीकी बनवू नये, सरकारचे नाकर्तेपण आणखी वाढले तर शिवसेनेला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. केडगाव उपनगरातील पोटनिवडणुकीत संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघा शिवसैनिकांची सात एप्रिलला हत्या करण्यात आली. या दोन कुटुंबीयांचे सांत्वन ठाकरे यांनी केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, खा. सदाशिव लोखंडे, आमदार औटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी म्हणणे दाखल करताना माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले. दुर्गे यांनी पहिल्याच मुद्द्याचे खंडन करताना भिडे यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे न्यायालयात सांगितले. तक्रारदार संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना त्यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी (वय ५९) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून त्यांचे नाव संभाजी भिडे (वय ८१) असे आहे. त्यामुळे ते दुरुस्त करण्यात यावे, असे सुचविल्याचे अ‍ॅड. दुर्गे यांनी सांगितले. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार भिडे यांच्याविरोधातील व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, कोरेगाव-भीमा संर्दभातील पत्रके, फोटो, तक्रार यांची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तक्रारदार यांनी त्यांच्याकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना द्यावी, असा आदेश दिला आहे. याप्रकरणी अनिता सावळे या सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रथमच भिडे यांच्या वतीने सुमारे चार महिन्यांनंतर प्रथमच अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी म्हणणे सादर केले.

मुंबई - महिन्यांच्या शेवटच्या शनिवारपासून ते मे महिन्याच्या मंगळवारपर्यंत सलग सार्वजनिक सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत. एप्रिलच्या २८ तारखेला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार, ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि १ मे ला महाराष्ट्र दिन, कामगार दिवस असल्याने, सलग चार दिवस बँकांचे काम ठप्प राहील. यामुळे चेक वटवणे, बँकेत पैसे टाकणे/काढणे शक्य होणार नाही. नागरिकांच्या हातात बँकांचे व्यवहार करण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. बँक बंद असलेल्या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध आहे. २ मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होतील.


नागपूर - भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे नवे अध्यक्ष विष्णू कोगजे या नेत्यांनी बुधवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हे भाजपवर नाराज आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तोगडियाकडून भाजपला होणारे नुकसान कमी करण्यासाठी अमित शहा आणि कोगजे यांनी सरसंघचालकांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.बुधवारी सकाळी विष्णू कोकजे आणि अन्य पदाधिकारी संघ मुख्यालयात आले आणि त्यांनी डॉ. भागवत आणि भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उमा भारती संघ मुख्यालयात पोहोचल्या. त्यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या पक्ष संघटनेतील बदलांबाबत चर्चा केली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संघ मुख्यालयात पोहोचले. जवळपास चार तास ते तेथे होते. शहा यांनीही आगामी कर्नाटक, छत्तीसगड व मध्य प्रदेश निवडणूक तसेच तोगडिया यांनी भाजप विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत सरसंघचालक आणि विहिंपने त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याच्या खटल्यातील रवी पुजारी टोळीच्या दहा साथीदारांना बुधवारी 'मोक्का' न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. दोघा आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले आहे. तथापि सर्व आरोपींविरुद्ध संघटीत गुन्हेगारीबद्दल लावण्यात आलेला ' मोक्का' चा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. रवी पुजारीच्या आदेशावरून महेश भट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. जुहुमध्ये चित्रपट निर्माता करीम मरोनी यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराबद्दल पोलिसांनी १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी १३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या कबुलीतून पुजारी याने मोरानी बंधू आणि महेश भट यांच्या हत्येसाठी आरोपींना ११ लाख रुपये दिल्याचे स्पष्ट झाले. या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम १२०ब( कट रचणे) आणि कलम ११५ ( हत्येच्या कटाची तयारी करणे) त्याशिवाय शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत खटला भरण्यात आला होता.'मोक्का' न्यायालयाचे न्या. श्रीधर भोसले यांच्यापुढे खटला चालविण्यात आला. त्यात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारतर्फे काम पाहिले. शिक्षा झालेल्यांमध्ये इशरत शेख ऊर्फ राजा, मोहम्मद खान, आझीम खान, आसीफ खान, फिरोज सय्यद,शबीर शेख, रहीम खान, मोहम्मद मर्चट, शहनवाज शेख ऊर्फ शानू, अशफक सय्यद बचकाना आणि ओबेद मर्चंट यांना शिक्षा देण्यात आली. रवीकेश सिंग आणि युसूफ बचकाना यांची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली. रवी पुजारी व सरवण सिंग हे फरारी आहेत.

मुंबई - मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरं मिळणार आहेत. दंडात्मक कारवाई करून अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा सरकारचा निर्णय आहे. अपात्र निवासी भाडेकरुंना २२ हजार ५०० रुपये, अनिवासींना ४५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. खरेदी-विक्री आणि इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या बीडीडी सदनिकाधारकांना दंड आकारून घरांसाठी पात्र करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने याबाबत आपला अहवाल सरकारला दिला आहे. सुमारे ३ हजार रहीवाशांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याने बीडीडी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. चाळीतील पात्र निवासी भाडेकरूस ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची निवासी पुनर्विकास सदनिका मालकी तत्वावर मोफत दिली जाणार आहे. १९९५ पासून या चाळींच्या पूनर्विकासाचा प्रश्‍न रेंगाळत पडलेला आहे. म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पाचे २२ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाही. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. २०१९ नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. चौबे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अश्विनी चौबे यांनी बाबतपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनी १५ मिनिटे बोलण्याची संधी देण्याच्या मोदींना दिलेल्या आव्हानावरून राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल.

नायजेरिया - नायजेरियात एका चर्चवर काही बंदुकधारी हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात किमान १९ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये चर्चच्या दोन मुख्य धर्मोपदेशकांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी हा हल्ला झाला. मध्य नायजेरियाच्या बेन्यू प्रांतातील एका गावातील चर्चवर हा हल्ला करण्यात आला. जवळपास ३० हल्लेखोरांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्यांवर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी जवळपास ५० घरांना आग लावल्याचीही माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.

जोधपूर - लैंगिक अत्याचार प्रकरणी ५ वर्षापासून तुरुंगात असलेले आध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या शिक्षेवर थोड्याच वेळेत सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जेलमध्येच ही सुनावणी होणार आहे. जेलच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आसाराम बापूंना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. २०१३ मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षाच्या मुलीने आसाराम यांच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम हे जेलमध्ये आहेत. ५६ महिन्यांनंतर आता काय निर्णय येणार याकडे लक्ष आहे.

नागपूर - मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात जाणार आहे. पुणे येथे ३ जून रोजी यात्रेचे समापन होणार आहे. परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चा बरोबरच आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, शिरोमणी अकाली दल, सेंगल अभियान, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय नाभिक महासंघ, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ, आॅल इंडिया जैन-ओबीसी आॅर्गनायझेशन, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जमियत ए उल्मा हिंद आदी संघटनेचा सहभाग आहे. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात आलेला निर्णय, न्यायपालिकेतील जातीय पूर्वग्रह, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्यांक यांच्यावरचे अन्याय, ईव्हीएममधील भ्रष्टाचार आदी विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - फरार आर्थिक घोटाळेबाज विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने या आरोपींची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यानुसार, पहिली कारवाई लंडनला पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्यावर होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणाऱ्या कोर्टांशी संपर्क साधत या सर्वांविरोधात नव्या अध्यादेशानुसार ईडीला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, फरार आरोपींच्या देशातील तसेच परदेशातील संपत्तीवर तत्काळ जप्ती आणण्यात येणार आहे. आजवर ईडीच्यावतीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत जप्तीची कारवाई केली जाऊ शकत नव्हती. या कायद्यानुसार, संपूर्ण सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच ईडीला संपत्ती जप्तीची कारवाई करता येत होती. या प्रक्रियेला मोठा काळ लागत होता.

नागपूर - सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला. बिंदो गणेश पाटील (५०) असे आरोपीचे नाव असून ती बदनापूर, ग्वाल्हेर येथील मूळ रहिवासी आहे. ती नागपुरातील गंगाजमुना वस्तीमध्ये अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत होती. लकडगंज पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून अल्पवयीन मुलीची देहव्यापारातून सुटका केली. तसेच, आरोपी बिंदोविरुद्ध भादंवि व पिटा अंतर्गत गुन्हे नोंदवून तिला अटक केली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.


पुणे - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून ठेवलेल्या अंदाजे २०० वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाले आहेत. ही घटना (दि.२४) रोजी संध्याकाळी हांडेवाडी येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात पावणेसातच्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पुणे महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हांडेवाडी सर्व्हे क्र. ५६ येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात हातगाडी,दुचाकी आणि चार चाकी गाड्या जप्त करून ठेवलेल्या सुमारे २०० वाहनांना आग लागून ही वाहने जळून खाक झाले आहेत. एक टँकर आणि खासगी टँकरच्या मदतीने ही आग साडेआठच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

नवी मुंबई - एकाच वेळी तीन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी आणि नारलबस कंपन्यांना आग लागली आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.तीन कंपण्यांना लागलेली आग विझविण्यासाठी वाशी, ऐरोली, सीबीडीसह पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. नवी मुंबईत एकाच वेळी तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget