May 2018लखनऊ - येथील कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सहानपूर आणि शामली येथे होणार आहे. तर नुरपूर विधानसभेची मतमोजणी बिजनौर येथे होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येतील. कैराना ही जागा भाजपकडे आहे. येथे राष्ट्रील लोक दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या आघाडीत ही निवडणूक झाली. पुढील वर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
कैराना लोकसभा मतदार संघात भाजपकडून मृगांका सिंग तर राष्ट्रीय लोकदलकडून तबस्सूम हसन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे खासदार हुकुम सिंग यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. भाजपने या जागी त्यांची मुलगी मृगांका सिंग हिला निवडणुकीसाठी उतरवले.
नुरपूर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अवनी सिंग आणि समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांच्यात सामना होत आहे. या ठिकाणी एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बिजनौर जिल्ह्यातील नुरपूर विधानसभा निडणूक ही आमदार लोकेंद्र सिंग यांच्या निधनानंतर जाहीर झाली होती. त्यामुळे ही निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशाच्या हत्याप्रकरणातील ११ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ६ दोषींना हत्या आणि हत्येचा कट रचणे यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य ५ दोषींना मोक्काअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.चेंबूरमधील टिळकनगर परिसरात २ जून २०१० रोजी दिवसाढवळ्या राहत्या घरातच फरीद तनाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता. फरीद अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. एका गुन्ह्यात २००५ ते २००८ दरम्यान फरीदला कोठडीची हवाही खावी लागली होती. फरीद तनाशा, भरत नेपाळी व विजय शेट्टी हे छोटा राजन टोळीचे सदस्य होते. २००९मध्ये राजन टोळीचे वर्चस्व कमी झाले. त्यामुळे नेपाळी व शेट्टी या दोघांनी स्वतंत्र टोळी सुरू केली. २००५पासून अटकेत असलेला तनाशा हा २००९मध्ये जामिनावर बाहेर आला. त्यानेही टिळकनगर परिसरात स्वत:चे बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. तनाशाने आर्थिक फायद्यासाठी टिळकनगर परिसरात चालू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये सहभाग घेऊन विकासक व सोसायटी यांच्यामध्ये तेढ निर्माण केली. यातूनच विकासक दत्तात्रय भाकरेने नेपाळीला तनाशाची सुपारी दिली. यासाठी भाकरेने नेपाळीला ९० लाख रुपये दिले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे येताच त्यांनी ११ आरोपींना बेड्या ठोकल्या. या अकराही आरोपींवरील दोष सिद्ध होत त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने यापैकी जफर खान उर्फ अब्बास, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी उर्फ लालजी यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली.बेंगळूरु - राज्यातील शेतकऱ्यांना पंधरवडय़ात संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी दिली. शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी हे आश्वासन दिले.धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सत्तेवर येताच २४ तासांत संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही देण्यात आली होती. ती पाळण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कुमारस्वामींनी शेतकरी नेत्यांची तीन तास बैठक घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री परमेश्वर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे गोविंदा करजोळाही सहभागी होते.शेतकऱ्यांना संरक्षण देण्यास आमचा अग्रक्रम राहणार आहे. वित्तीय शिस्तीला धक्का न लागता शेतकऱ्यांचे पूर्ण हितरक्षण कसे करता येईल, याबाबत १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

ठाणे - ठाण्यामध्ये मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीला आले आहे. ठाण्यातल्या वाघबिळ परिसरात ही घटना घडली. शौमिक घोष असे या इसमाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या बहिणींच्या नावे एक चिठ्ठीही लिहिली. शौमिक यांची सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. निराशेत शौमिक यांनी आपल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून आणि उशीने तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर बोस यांनी स्वत:ला गळफास लावून घेतला या प्रकरणी कासारवडली पोलीस अधिक तपास करत आहेत. वाघबीळ येथील विजय इन्लेकव्ह सोसायटीत राहणारा शौमिक घोष (३९) संगीत शिक्षक होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्येत बुडाले होते. पहिल्या पत्नीच्या घटस्फोटानंतर दुसरी पत्नीही सोडून गेल्याने ते तणावग्रस्त होते. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. मात्र दोन ते तीन महिन्यांपूर्वी दुसरी पत्नी शौमिकला सोडून माहेरी गेली. यामुळे घरात शौमिकसोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगा एकांश राहत होता. मंगळवारी शौमिकची दुसरी पत्नी घरी येऊन पुन्हा घरात पाऊल ठेवणार नाही, असे सांगून निघून गेल्याने तो चिंताग्रस्त होता. त्यातच आर्थिक चणचण असल्याने त्याने कालच पत्नीचे दागिने बँकेत जमा केले होते. अखेर मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्यानंतर शौमिकने गॅलरीतील हुकला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

यवतमाळ - यवतमाळमधून शिवशाही बसच्या अपघाताची बातमी समोर येत आहे. ट्रकला ओव्हरटेक करायला गेलेल्या शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी ठार झालेत तर १८ प्रवासी गंभीर जखमी झालेत. नागपूर मार्गावरील बेलोणा गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या शिवशाही बसच्या ड्रायव्हरने केला होता. परंतु, समोरून दुचाकीस्वार आल्याने त्याला सांभाळण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद - ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट कंपनीच्या शहरातील डिलेव्हरीचे काम इन्स्टाकार्ट कुरियर कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. खेळण्यांच्या नावाखाली शस्त्रे असलेली पार्सल पाठवण्यात येत होती. ऑर्डर बुक केल्यानंतर पाच दिवसांत कुरियर कंपनीच्या पार्सल ऑफिसला मुंबईहून पार्सल पाठवण्यात येत होती, मात्र इन्स्टाकार्टच्या स्थानिक व्यवस्थापनाला संशय आल्याने गेल्या आठ दिवसांपासून ही पार्सल डिलेव्हरीसाठी पाठवण्याचे टाळण्यात आले होते. पोलिसांनी इन्स्टाकार्टच्या जयभवानीनगर व मुकुंदवाडी येथील कार्यालयावर मध्यरात्री छापे टाकले. यामध्ये त्यांनी या पार्सलची तपासणी केली. हे पार्सल ऑनलाइन खरेदी करणारे ग्राहक व कंपनी यांचे ऑनलाइन खरेदीचे रेकॉर्ड तपासण्यात आले. यामध्ये ही पार्सले पाठवणाऱ्या ग्राहकाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. खेळण्यांच्या नावाखाली ही पार्सल कुरियरच्या ऑफिसला आली होती. यामध्ये काही पार्सलची बुकिंग १६ मे रोजी करण्यात आले असून, १७ मे रोजी त्याचे बिल तयार होऊन औरंगाबादच्या कुरियरच्या ऑफिसला २१ मे रोजी शस्त्राचे पार्सल आले होते. ग्राहक अनेक वेळा ऑनलाइन क्रिकेटचे साहित्य मागवतात. त्या पार्सलचा आकार व शस्त्राच्या पार्सलचा आकार सारखा असल्याने सुरुवातीला कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत संशय आला नाही, परंतु त्यांना नंतर संशयास्पद वाटल्याने त्यानी या पार्सलची डिलेव्हरी सबंधित व्यक्तींना न करण्याचा निर्णय घेतला. ही पार्सल एकत्रित करून पुन्हा पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालघर - शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपाला एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्याच मागण्यांसाठी येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी प्रहार, किसान सभा व लाखगंगा आंदोलकांनी सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून व सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार आहे. लाखगंगा येथे झालेल्या ग्रामसभेत आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई - रेशन दुकानांमध्ये ३५ रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री करण्यात येणार आहे. आतापर्यंत हा दर ५५ रुपये इतका होता. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक व तामिळनाडूमध्ये रेशनच्या तूरडाळीचा दर अनुक्रमे ३८ व ३० रुपये आहे. राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत कमीतकमी किमतीत तूरडाळीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णत: अथवा अंशत: अनुदानित संस्था याद्वारे होणारी तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दराने करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.

गोंदिया - भंडारा - गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र २३३ वर पुन्हा यंत्रात बिघाड झाला आहे. बटन दाबल्यानंतर १० मिनिटाने मतदानाची प्रकिया पूर्ण होत होती. त्यामुळे मतदान केंद्रावर ईवीएम दुरुस्तीस्तीसाठी अभियंते दाखल झाले असून मतदान यंत्राच्या बॅटरी बदलण्यात आली. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भंडारा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज (बुधवार, ३० मे) फेरमतदान होत आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यावेळी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बराच काळ मतदान थांबवावे लागले होते. आज या ४९ केंद्रांवर या सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर, नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. फेरमतदानावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावण्यात येणार आहे. भंडारा गोंदियाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची मतदानातल्या घोळानंतर बदली करण्यात आली. समन्वयाचा अभाव असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता कादंबरी बलकवडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत.

नंदुरबार - बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. गोपाळ नगरातील या प्रकारामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली. दुपारी दीडच्या सुमारास तुकाराम भिका पाटील (३५, रा़ कार्ली, ता़ नंदुरबार) हा शेतकरी धुळे चौफुली लगतच्या गोपाळनगर भागातील मोबाइल टॉवरवर चढला. त्याने लिहिलेली ५ पानी चिठ्ठी जमलेल्या लोकांना सापडली. चिठ्ठीवर नाव आणि पत्त्यासह मोबाइल क्रमांक होता़ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाटील यास मोबाइलवरून समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्ज मंजूर होणार नाही, तोवर खाली येणार नाही; प्रसंगी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली़ अखेर नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी जिल्हा बँकेतून मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साडेतीनच्या सुमारास पाटील खाली उतरला.

नवी दिल्ली - मुंबईतील कमला मिल संकुलातील मोजोज बिस्रो रेस्टॉरण्टला डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत १४ जण ठार झाले होते त्या प्रकरणातील आरोपी आणि रेस्टॉरण्टचा सहमालक युग तुली याला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तथापि, तीन महिन्यांनंतर कनिष्ठ न्यायालयात नव्याने जामीन अर्ज करण्याची सवलत सर्वोच्च न्यायालयाने तुली याला दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तुली याला जामीन नाकारला होता त्याला त्याने आव्हान दिले होते, मात्र न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. एम. एम. शांतनागौडर यांच्या पीठाने जामीन देण्यास नकार दिला. तुली याच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, तुली याच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नाही, रेस्टॉरण्टला लागलेली आग ‘वन अबाव्ह’ हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे लागली होती.मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जून अखेरीस परततील, अशी माहिती परिवहनमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली आहे. पर्रिकरांवर सध्या स्वादुपिंडाच्या आजारावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत. ७ मार्चपासून पर्रिकर अमेरिकेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात गोवा सरकार आपली ५ वर्षं पूर्ण करेल, असेही ढवळीकर म्हणाले आहेत. गेल्या १०० दिवसांपासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्याचा दावा करून काँग्रेस विधीमंडळ पक्षाने राष्ट्रपतींना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच काँग्रेस आमदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश ( उन्नाव ) - उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे योगी सरकारची नाचक्की झाली असतानाच आता आणखी एका भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. बदायू जिल्ह्यातील बिसौली येथील आमदार कुशाग्र सागर यांच्यावर मोलकरणीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून लग्नाचे आमिष दाखवून कुशाग्र सागर यांनी बलात्कार केला. मी लग्नाचा विषय काढताच मला व माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित तरुणीचे वडील बेरोजगार आहेत. तर तिची आई मोलकरीण म्हणून कुशाग्र सागर यांच्या घरी काम करायची. २०१२ मध्ये मी १६ वर्षांची होती. माझी आई मदतीसाठी मला त्यांच्या घरी न्यायची. याच सुमारास माझी कुशाग्र सागर यांच्याशी ओळख झाली. कुशाग्र सागरने मला लग्नाचे आमिष दाखवले आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत त्याने माझ्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तू १८ वर्षांची झाल्यावर लग्न करुया, असे मला कुशाग्र सागरने सांगितले. पण नंतर त्याने लग्नास नकार दिला. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून आता कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही. कुशाग्र सागर माझ्याशी लग्न करतील म्हणून मी हे इतके दिवस सहन केले. पण आमदार झाल्यापासून ते मला व माझ्या कुटुंबियांना धमकी देत आहेत, असे पीडित मुलीने सांगितले. १७ जून रोजी कुशाग्र सागर यांचा विवाह होणार असून त्यापूर्वीच बलात्काराचे आरोप झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पोलीस अधीक्षक नैथानी यांनी बलात्काराची तक्रार दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सखोल चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल.

मुंबई - आजपासून राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी २ दिवसांच्या संपावर जाणार आहेत. संपासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महिनाअखेरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळं या महिन्याचा पगार तर लांबणीवर पडणार नाही ना अशी शंकचे पाल चाकरमान्यांच्या मनात चुकचुकत असणार.तसेच एटीएममध्येही खडखडाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या वेगवेगळ्या ९ कर्मचारी संघटनांचे १० लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर आणि आर्थिक व्यवहारावर पहायला मिळणार आहे. इंडियन बँक असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मागच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांना जवळपास १५ टक्के पगारवाढ देण्यात आली होती. केंद्रीय कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करत संप होऊ नये यासाठी खटाटोप केला खरा, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात एका रबराच्या गोदामाला मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग १५ तासांनंतरही धुमसत आहे. ही आग इतकी भीषण आहे की, चार ते पाच किमीपासून या आगीच्या ज्वाळा लोकांना पहायला मिळत आहेत. दरम्यान, ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही ती आटोक्यात येत नसल्याने अखेर हवाई दलाला पाचारण करण्यात आले आहे. हवाई दलाच्या Mi 17 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.दिल्लीच्या अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची वर्दी देणारा फोन आम्हाला मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आला. त्यानंतर आगीची तीव्रता लक्षात घेता ती विझवण्यासाठी अग्निशामकच्या ३५ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. त्यानंतर रात्रभर ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र, तरीही आग आटोक्यात आलेली नाही. ही आग इतकी भीषण आहे की, ५ किमी दूर अंतरावरूनही या आगीच्या ज्वाळा स्थानिकांना दिसत आहेत.ज्या गोदामाला ही आग लागली ते गोदाम संत निरंकारी शाळेजवळ आहे. आगीची घटना घडली त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने कोणीही तेथे नव्हते. अनेक तासांनंतरही आग आटोक्यात येत नसल्याने पोलिसांनी आसपासच्या घरांमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, गोदामातून रबरांच्या चादरी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली, नंतर ही आग संपूर्ण गोदामात पसरली आहे.

ठाणे - गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला अंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकी सोनू जालान यास ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली. कल्याण येथे त्याच्या साथीदाराला भेटण्यासाठी सोनू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यासाठी त्याने सट्टा लावल्याचे समोर आले आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वी ५ जणांना अटक केल्यानंतर आता सोनू हा सहावा आरोपी आहे.सट्टा लावण्यासाठी सोनूने बेट आणि टेक नावाची वेबसाईट बनविली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून हवालाच्या मार्गाने पैसे या ठिकाणी जमा करण्यात येत होते. त्यानंतर सट्टा लागत असल्याचे समोर आले आहे. सोनूला वेबसाईट बनवून देणारा एकांश शहाचा देखील पोलीस शोध घेत आहे.

मुंबई - राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रमाणे 'शिवशाही' बसमध्ये खास सवलत मिळणार आहे. ही सवलत १ जूनपासून लागू होणार आहे. सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसेसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरू झालेल्या 'शिवशाही' बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ही सवलत थोडी कमी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही बसेसमध्येसुद्धा सवलत मिळावी अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रावते यांच्याकडे केली होती. याची दखल घेत रावते यांनी घेतली आणि ही घोषणा केली.एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या टाटा बनावटीच्या ५०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील एकूण ७०० वातानुकूलित शिवशाही बसेसचा समावेश महामंडळाच्या वाहन ताफ्यात होणार आहे. मात्र सध्या ३५० शिवशाही बसेसचा समावेश आहे. वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसेसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्यात येईल. १ जून २०१८ पासून म्हणजे एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू होणार आहे. याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती एसटी प्रसासनाकडून देण्यात आली आहे.


मुंबई - मिशन शौर्यअंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपुरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, या पाचही जणांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़ ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल़ १६ मे रोजी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकविला़ या शौर्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली. अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. प्रारंभी ५० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यातून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

मुंबई - मालाड स्टेशनजवळील एम. एम. मिठाईवाला दुकानाला आग लागली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येतेय. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. मालाड स्टेशनच्या अगदी जवळ हे दुकान आहे. स्टेशन परिसर आणि त्यातही ऑफिसला पोहोचण्यासाठी लोकांची घाई असल्याने याठिकाणी गर्दी वाढली होती. मालाड पोलीस गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करता करता नाकी नऊ आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पोलीस अधिक तपस करीत आहेत.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या मागणीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाठिंबा द्यावा यासाठी सोमवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव तसेच, किसान सभेचे नेते अतुल अंजान, समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंह यांचा समावेश होता.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भातील दोन खासगी विधेयकेही मांडली जाणार आहेत. राजू शेट्टी आणि राज्यसभेचे खासदार के. के. राजेश यांच्याकडून ही विधेयके मांडली जाणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी दिली जावी तसेच, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला उत्पादन शुल्काच्या दीडपट मूल्य मिळावे अशा मागण्या विधेयकाद्वारे केल्या जाणार आहेत. या विधेयकाला २१ राजकीय पक्षांचे समर्थन असल्याचा दावा या नेत्यांनी केला.

पंजाब - पंजाबमधील तुरूंग व्यवस्थेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील फरीदकोट तुरूंगात बंद असलेल्या एका कैदीने सुमारे तीन मिनिटे फेसबुकवर लाइव्ह येत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राज्याचे पोलीस महासंचालक सुरेश अरोरा आणि तुरूंग मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव असून त्याला याचवर्षी एप्रिल महिन्यात तुरूंगात धाडण्यात आले आहे. त्याने फेसबुकवर लाइव्ह येत अमरिंदर सिंग यांना धमकी देत तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशी धमकीच दिली. भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख गोविंदने व्हिडिओत केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी. पंजाबमध्ये आजही अंमली पदार्थ प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होतात आणि त्यात माझे भाऊ-बहीण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे. माझ्याकडे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांचा फोन नंबर उपलब्ध नसल्यामुळे मला फेसबुकवर लाइव्ह यावे लागल्याचेही त्याने म्हटले. जर माझ्याकडे त्यांचा फोन नंबर असता तर मी स्वत: त्यांना फोन केला असता, असे म्हणत त्याने तुरूंगातील गैरसुविधांचाही उल्लेख केला.

सांगली - सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, प्रथमच काँग्रेसेतर पक्ष म्हणून भाजपाने महापालिकेची सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला असून यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. समविचारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्र लढण्याऐवजी मत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत दिसत आहेत. यामुळे बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता सध्या तरी दिसत आहे. महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू झाली असून प्रभाग रचना अंतिम करण्यात आल्याने इच्छुकांनी आपली मोच्रेबांधणी सुरू केली आहे. समोर कोण असेल यापेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करीत आहेत.

माणगाव - रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील वावे गावातील अपहरण झालेल्‍या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगाव, माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावातल्या बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. दियाचा मृतदेह तिच्‍या घरापासून जवळच असलेल्‍या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला आहे . २५ मे रोजी सायंकाळपासून दिया बेपत्‍ता होती . गावातील दुकानात खाऊ आणण्‍यासाठी गेलेली दिया परतलीच नाही . तिच्‍या नातेवाईकांनी शोध घेवून ती सापडली नाही. त्‍यामुळे माणगाव पोलीस ठाण्‍यात अपहरणाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.२५ मे रोजीच गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली. त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. वरिष्‍ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी पोहोचले आहेत. दियाचा मृतदेह माणगाव सरकारी रूग्‍णालयात आणण्‍यात आला तेव्‍हा तेथे ग्रामस्‍थांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा दिया मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी मुंबईत नेण्‍यात आला आहे. 


पुणे - काँग्रेसकडून सातत्याने संविधान बचावाचा नारा दिला जात आहे. मात्र, त्याची काही आवश्यकता नसून राहुल गांधी यांनी 'काँग्रेस बचावा'साठी प्रयत्न करावा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी लगावला. भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा काँग्रेस हा डाव आहे, असा आरोपही आठवले यांनी या वेळी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात आठवले बोलत होते. या वेळी पुण्याचे पालकंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार अॅड. राहुल कुल, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, प्रा. एम. डी. शेवाळे, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजा सरवदे, संयोजक बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांच्यासह शहरातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लखनऊ - कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधक एकत्र आले होते. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू असल्याचा संदेश यातून देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर, विरोधक एकत्र आल्यास भाजपाचे काय होणार, याची लिटमस टेस्ट आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघात होईल. कैराना मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाविरोधात बहुजन समाज पक्ष,समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.कैरानामध्ये भाजपच्या म्रिगांका सिंह यांच्यासमोर राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांचे आव्हान असेल. तबस्सुम यांना बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध इतर सर्व, अशी लढत याठिकाणी पाहायला मिळते. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव उपस्थित होते. विरोधकांनी दाखवलेली ही एकी भाजपासाठी किती अडचणीची ठरते, हे कैरानामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कैरानामधील पोटनिवडणूक महत्त्वाची आहे.


रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाराऱ्यावर २ दोन गटात फिल्मी स्टाईलमे जोरदार हाणामारी झाली आहे. यात ५ जण गंभार जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून ही हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.मुरुड समुद्र किनाराऱ्यावर पाजपंढरी गावातील काही तरूण फिरायला गेले असता समुद्र किनाऱ्यावर मुरुड गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर हाणामारीत झाले.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत आहेत. कुलगाममध्येही आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि आता पुलवामातील काकपोरा येथेही दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट केलं. हल्ल्यात एक जवान व एक स्थानिक जखमी झाले होते. या दोघांनाही तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.

जम्मू - पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारापासून संरक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये साधारण ५५०० बंकर आणि २०० समाजगृहे बांधण्यात येणार आहेत. राज्यातील राजौरी जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करत असते. त्यात सीमावर्ती भागातील नागरिकांचे मोठे नुकसान होते आणि अनेक घटनांमध्ये त्यांना जीवही गमावावा लागला आहे. अशा घटनांमध्ये नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे राज्य सरकार आणि केंद्रीय गृह खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बंकर आणि भूमिगत निवारे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. हा प्रकल्प चालू आर्थिक वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी १५३.६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राजौरी जिल्ह्य़ाचे विकास आयुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी नुकतीच या संदर्भात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.

बंगरूळ - विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकांना पूर्ण जनादेश मागितला होता. पण ते मिळाले नाही. त्यामुळेच आज आपण काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहोत, असे स्पष्टीकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी कृषी कर्ज माफ करण्यास आपले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जर मी कर्ज माफ करण्यात असफल ठरलो. तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले.माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांना जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही.

मुंबई - मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र, इमारतीमधील २ जण बेपत्ता असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला आहे.गोरेगावमधील आर. बी. एल. इमारतीला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आणि काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागली त्यावेळी इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता २ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता नागरिकांना शोधण्याचे काम सुरु आहे.

अमरावती - जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मांजरखेड येथील तांडा परिसरात हल्ला करण्यात आला. यात सतीश मडावी या पोलिसाचा मृत्यू झाला तर जाधव नावाचे पोलीस गंभीर जखमी झालेत. हे दोन्ही पोलीस गावठी दारू चोरी पकडायला गेले होते. तिथे कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे - ठाण्यात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीला बेदम चोप दिला. माजीवाड नाका येथे रस्त्यानं चालणाऱ्या मुलीच्या अंगावर धावून तिला तृतीय पंथीयांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.मात्र तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई झाली नाही म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तृतीयपंथीला बेदम चोप दिला. या तृतीयपंथीयाकडून सर्रास देहविक्री केली जात होती. त्याचबरोबर रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही ते लुटायचे. त्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. तिने याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.नंतर या संदर्भात तरुणीने मनसेकडे तक्रार केली. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

मुंबई - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदान होत असून त्यासाठी जिल्ह्य़ात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालघरची निवडणूक भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आव्हान तगडे आहे. जिल्ह्य़ातील दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापकी १४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पालघरबरोबरच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आहे.भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपची निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची जनमानसातील स्वच्छ प्रतिमा असा हा सामना आहे. भाजपने ही जागा स्वत:कडे राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे कुणबी समाजाचे असून सुमारे चार लाख मतदान या एका समाजाचे या मतदारसंघात आहे. गोंदिया जिल्ह्य़ातील हेमंत पटले हे भाजप उमेदवार भंडारा जिल्ह्य़ात फारसे परिचित नाहीत. तरीही त्यांची पोवार समाजाची मते अडीच ते तीन लाखांच्या घरात आहेत. मतमोजणी ३१ मे रोजी आहे.

पालघर - पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना अमिष दाखवत आहेत. काही भागात पेट्रोल एक रूपयांनी स्वस्त विकले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाला हाताला धरून भाजपा रडीचा डाव खेळत आहे. मध्यरात्री अधिकारी मशीनमध्ये कसले सेटिंग करत होते, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.जिथे जिथे बविआचे प्राबल्य आहे. तिथे मशीन्स बंद ठेवण्यात आले आहेत. मतदार वाट पाहून जात आहेत. या निवडणुकीत भाजपाने सेटिंग केले आहे, असा आरोप करत आमची लढत ही भाजपा नव्हे तर शिवसेनेबरोबर असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

जळगाव - मे महिन्याच्या सुट्या असल्याने रेल्वे प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही संधी साधून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अकोला येथील एजंट व त्याच्या दोन साथीदारांना भुसावळ रेल्वे बलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. रेल्वे बुकिंग तिकिटांमध्ये हेरफेर करून अवैध मार्गाने तिकिटे बनवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळत होती. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ मध्य रेल्वे विभागात एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकावरील अधिकृत आरक्षण बुकिंग खिडक्या व आयआरसीटीसीचे परवानाधारक एजंट याच्यावरसुद्धा नजर ठेवण्यात आली होती. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी एजंट नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा आयडी अवैध मार्गाने सॉफ्टवेअरमध्ये वापरून तिकीट काढतात व मोठ्या किमतीत विकतात.या कारवाईत निरीक्षक प्रवीणकुमार कस्बे, उपनिरीक्षक आशू शर्मा, संजीव रायज, समाधान वहुलकर, अंबिका यादव, कर्मचारी मनीष शर्मा, योगेश पाटील, विनोद जेठवे आदींनी अकोला येथील पवन इन्टरनेट कॅफे दुकानावर धाड टाकली. त्या ठिकाणावरून २१,६७५ रुपयांची १५ अवैध तिकिटे मिळाली. दुकान मालक रमेश गेडीमल लाछवानीसह दोन साथीदारांनाही पकडण्यात आले. त्याचबरोबर कप्युटर, लॅपटॉप, जियो वाय -फाय डोंगल, प्रिन्टर असे उपकरणे जप्त करण्यात आली. मध्ये रेल्वे अंतर्गत प्रवाशांनी अवैध दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच अवैध तिकीट खरेदी करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हा दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोने घेऊन फरार झाला आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला आहे. दुबईतील नीरव मोदीच्या रिटेल आउटलेटमध्ये हे सोने विक्रीला ठेवण्यात आले होते. पीएनबी घोटाळ्याचा तपास करीत असलेली सीबीआय दुबईपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती वाटल्याने नेहलने विक्रीसाठी ठेवलेले सर्व सोने घेऊन दुबईतून पळ काढल्याचे सूत्रानुसार कळते. नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्समध्ये कार्यरत होता. पीएनबी घोटाळ्यात नेहल हा आरोपी नाही. परंतु, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मनी लॉड्रिंगमध्ये त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.


मुंबई - राज्य पोलीस दलातील तब्बल २४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी पोलीस मुख्यालयातून काढण्यात आले. तर ६० अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्थापन करण्याबाबत आदेश काढल्यानंतर या पोलीस निरीक्षकांना बदलीसाठी सोडण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, भानुदास जाधव, दिलीप भोसले, सुनील दहिफळे आणि प्रदीप लोंढे यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि सतीश पवार, तर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, टी. मुजारवर आणि श्रीराम पौळ, रायगड पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, अहमदनगर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौडचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.तर कार्यकाळ पूर्ण झालेल्या ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, जळगावमधील पोलीस निरीक्षकांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे, मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुणे शहरातील एकूण ११९ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या विनंतीवरून बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ३१ मेपर्यंत त्यांना नवीन बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातून या बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे स्वत: बैलबंडी चालवत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये हे बैलबंडीवरून घोषणा देत होते. या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या माध्यमातून मख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजाभाऊ टांकसाळे, सलील देशमुख, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे पाटील, वेदप्रकाश आर्य आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने देश होरपळून निघाला असताना आता विजेच्या दरवाढीचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी जास्त असताना, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरेसा पुरवठा नाही. पश्चिम भारतातून उत्तरेकडील राज्यांना वीज पुरवणारी महत्त्वाची ट्रान्समिशन लाइन नेमकी या काळात तुटल्यामुळे वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित आहे. इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये विजेची किंमत २ वर्षांतील सर्वाधिक म्हणजे ६ रुपये २० पैसे प्रति युनिट नोंदली गेली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये सोमवारी विजेचा दर ८ रुपयांवर पोहोचला, जो आधी ७ रुपये ४३ पैसे युनिट होता. एक्सचेंजमध्ये एका आठवड्यात वीजदरात युनिटमागे २ रुपये वाढ झाली. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश व तामिळनाडूत वीज टंचाई दूर करण्यासाठी वीज वितरण कंपन्या थेट स्पॉट मार्केटमधून वीज खरेदी करतात. या कंपन्यांना महाग दराने वीज मिळाल्यास तो बोजा त्या ग्राहकांवर टाकतात. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना वेळेवर पुरेसा कोळसा पुरवठ्यावरील देखरेखीचे काम केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडे आहे.
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका शाळेत एक मोठा अपघात झाला आहे. महापालिकेच्या शाळेचा गेट पडल्याने एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सौरभ चौधरी असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सौरभ ५ वी इयत्तेत शिकत होता. सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.हा गेट पडल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमीदेखील झाला आहे. जखमी विद्यार्थ्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ४० कोटी रुपये खर्च करुन महापालिकेची ही नवीन शाळा उभारण्यात आली होती. यंदाच्या शालेय वर्षापासून ही शाळा सुरु होणार होती. पण त्याआधीच या शाळेच गेट पडल्याने तिथे खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्यात जीव गेला आहे.कोपरखैराणेमधील सेक्टर १८ मध्ये ही शाळा उभारण्यात आली आहे. अवाढव्य खर्च केला म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तिथल्या इंजिनिअरला कामावरुन निलंबित केले होते. त्यामुळे ही शाळा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेली आहे.

शांतिनिकेतन - भारत व बांगलादेश यांच्यात सहकार्य व समझोत्याचे बंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वभारती विद्यापीठाच्या ४९ व्या पदवीदान समारंभात सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच विद्यापीठाचे कुलगुरू सबुजकोली सेन या वेळी उपस्थित होते.मोदी म्हणाले की, भारत व बांगलादेश हे वेगवेगळे देश असले तरी ते सहकार्य व समझोत्याच्या धाग्याने जोडले गेले आहेत. मग ती संस्कृती असो, की सार्वजनिक धोरण, दोन्ही देशातील लोक एकमेकांपासून शिकत आहेत. बांगलादेश भवन हे त्याचे उदाहरण आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये सैन्याच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत पाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात सैन्याकडून शोधममोहीम राबवली जात आहे.शनिवारी पहाटे तंगधार सेक्टरमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या निदर्शनास आले. यानंतर झालेल्या चकमकीत सैन्याने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू- काश्मीरमध्ये सैन्याने शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेवरील गावात राहणाऱ्या ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमारेषेजवळील गावात राहणाऱ्या हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले होते.


नवी दिल्ली - सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना नोटीस जारी केली आहे. ही नोटीस आयसीआयसीआय बँकेच्या व्हिडिओकॉन ग्रुप अर्थात न्यूपावर यांच्यातील संशास्पद व्यवहारांबाबत जारी करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या बँकेने शेअर बाजाराला ही माहिती दिली. न्यूपावरमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. दरम्यान, बँकेने म्हटले आहे की, सेबीला उत्तरादाखल योग्य ते स्पष्टीकरण दिले जाईल.दरम्यान, हे प्रकरण आयसीआयसीआय बँकेद्वारा २०१२मध्ये व्हिडिओकॉनला ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज दिल्या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. सीबीआय़ने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेसह बँक समुहाकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी कथित रूपात न्यूपावररिन्युएबल्समध्ये ६४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली.

रत्नागिरी - माझा विकासाला विरोध नाही. पण कोकणात रिफायनरी प्रकल्प नकोच, असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.राज ठाकरे सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी नाणार परिसरातील नियोजित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शवला. कोकणासारखी सुपीक जमीन देशात कुठेच मिळणार नाही. येथील फळे, खाद्यपदार्थ अन्यत्र कुठेही नाहीत. एवढे सगळे असतानाही जमिनी विकून तुम्ही करणार काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझा विकासाला विरोध नाही पण रिफायनरीची कोकणात गरज नाही, हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा असे त्यांनी ठणकावले.रिफायनरी गुजरातमध्ये नेऊ, असे मुख्यमंत्री सांगतात. प्रकल्प कुठेही न्या, पण इथे नको. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोललात. प्रकल्प न्यायचा असेल तर अन्य राज्यात कुठेही न्या. गुजरातमधेच कशाला हवे, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपाचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरुच आहेत. भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप दुपारी शिवसेनेकडून झाल्यानंतर, आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा केला.उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

मुंबई - यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.मान्सूनची पुढील वाटचालीसाठीही वातावरण अनुकूल, असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेय. मान्सून २३ मे २०१८च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता. मात्र, दोन दिवस उशिराने मान्सून दाखल झाला. त्यामुळे यावेळी वेळेत गोवा आणि मुंबईत पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. तसेच गेल्या दोन तीन दिवसात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य वातावरण तयार झाले होते. या पोषक वातावरणामुळे अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, तो आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे.


जळगाव - धावत्या रेल्वे मालगाडीसमोर झोकून देत अभियंता असलेल्या तरुण पोलिसपुत्राने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १:१५ वाजता घडली. तुषार शिवलाल गालफाडे (वय २७, रा. हौसिंग सोसायटी, शाहू नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत असून, या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शाहू नगरातील हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल शिवलाल पंडित गालफाडे यांचा यांचा तुषार हा मुलगा आहे. बुधवारी रात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वे गेटपासून काही अंतरावर त्याने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. त्यात त्याचा अंत झाला असल्याची माहिती मालगाडीचे लोको पायलट यांनी स्टेशन मास्तर डी. एम. पारधी यांना कळविली. 

कुडाळ - सौदीच्या कंपनीची नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात भागीदारी आहे. त्यामुळे कोकणात परबांच्या ठिकाणी अरब येतील, म्हणजेच परब गेले आणि अरब आले असे चित्र उभे राहील असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. जमीनदार शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार बनविण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत असेही ते म्हणाले. कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर उपस्थित होते.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget