June 2018

नवी दिल्ली - तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं आहे का ?जर तुम्ही तुमचं पॅन आधारशी लिंक केले नसेल तर आजच करुन घ्या. कारण पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. आज पॅन आधारसह लिंक केले नाही तर ते रद्द होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला यासाठी पाच हजार रुपये दंडही भरावा लागेल. एवढेच नाही तर ३१ जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल.आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिला. केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिलेली आहे. आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

भंडारा - एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. भंडारा जिल्ह्यातील चर्चित प्रीती बारिया खून प्रकरणी त्यांनी हा निकाल दिला आहे. अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत अशी या दोन आरोपींची नावे आहेत. ३० जुलै २०१५ रोजी या दोघांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याच रात्री या दोघांनी तकिया वॉर्ड येथील रुपेश बारिया यांच्याही घरी एसी दुरुस्तीच्या मिषाने प्रवेश केला. घरात असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांना ठार केले. त्यांचा मुलगा भव्य (९) हा या ठिकाणी आला असता त्याच्याही डोक्यावर जोरदार वार केल्याने त्यालाही कायमचे अपंगत्व आले आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी १ वाजता शिक्षा सुनावली. यात अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांना भादंवि ३०७ कलमान्वये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

मंदसौर ( मध्यप्रदेश) -मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला. या पीडित मुलीची आता मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडित मुलीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने ३ सेंटीमीटरची जखम झाली आहे. त्यामुळे पीडित मुलगी बोलू शकत नाही. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या शरीरावरही अनेक जखमा आहेत. तिच्या प्रायव्हेट पार्टच्या जखमाही खोलवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. या मुलीवर इंदौरमध्ये उपचार सुरु आहेत. या मुलीची स्थिती काही प्रमाणात सुधारते आहे. मात्र अद्यापही मानसिक धक्क्यातून ती सावरलेली नाही. अनेक जखमांतून रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने अजूनही तिच्या मृत्यूचा धोका टळलेला नाही. या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मंदसौरच्या जनतेचा आक्रोश आंदोलनातून समोर आला आहे. एका २० वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली होती. त्यानंतर आता आणखी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे. आंदोलन करून लोकांनी नराधामांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

मुंबई - गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. १५ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आहे. नाहीतर १६ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असे शेट्टी म्हणाले त्यातून जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल पण यापुढे शेतकऱ्याची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

शिर्डी - शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थानच्या विश्वस्थ व्यवस्थेविरोधात ग्रामस्थांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. हनुमान मंदिरा समोरून ग्रामस्थांच्या मोर्चाला सुरुवात झाली. विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून ७१ कोटी देण्याच्या निर्णयावरून शिर्डीतील ग्रामस्थ संतापले आहेत. हनुमान मंदिर ते संस्थांच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल पर्यंत जाणार शिर्डी ग्रामस्थांचे निषेध मोर्चा होत आहे.

मुंबई - मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. धमकी द्यायला आलेली देसलेंची माणंस होती असा आरोपही त्यांनी केला आहे. घरी आलेल्या या माणसांच्या हाती बंदूक होती. देसलेंची कागदपत्र बाहेर काढून नका नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारी सांगितले. जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार होते. याआधी त्यांच्या पाच एकर बागायती जमीनीसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले होते. पण धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी १२ शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत. दत्ता पडसलगीकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आज सुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेण्याची शक्यता आहे.

ठाणे - ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे. या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास साधारण काही तास तरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूकीवर परिणाम झाला. ठाणे-ऐरोलीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा घोळ झाला. नेहमीप्रमाणे ऑफिसल्या जाणाऱ्यांची जास्त गर्दी नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झाला.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयातच हा गोळीबार झाला. वॉशिंग्टनच्या पश्चिमेस हे शहर आहे. याप्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत.

नंदुरबार - मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन तीघांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांची गाडी पेटवुन दिल्याची भयावह घटना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावात घडली आहे. संशयीत हे पंढरपुर मधील माजी नगरसेवकांसह त्यांचे सहकारी असुन मजुर शोधण्यासाठी या भागात आले होते.मात्र संतप्त जमावाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची शहानिशा न करता म्हसावद पोलीस ठाण्यात घुडदुस घातला. त्यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड करत गाडी जाळून टाकली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या.या सगळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील अतिरीक्त कुमक म्हसावद येथे तैणात करण्यात आली आहे. संपूर्ण भागात सध्या तणावपुर्ण शांतात आहे. पंढरपुरचे माजी नगरसेवक नंदकुमार ढोबे आपल्या दोन साथीदारांसह मजुर शोधात नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद गावाजवळ आले होते. मजुरांची चौकशी करत असतांनाच मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय येत काही जणांनी त्यांच्या सह त्यांच्या साथीदारांना बेदम मारहान केली.त्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनातुन म्हसावद पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना वाऱ्या सारखी गावात पसरल्यानंतर संतप्त जमावाने म्हसावद पोलीस स्टेशनकडे आपला मोर्चा वळवला. या संशयीतांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत त्यांची इनो्व्हा गाडीची मोडतोड करत तिला आग लावुन दिली. परिस्थीती हाता बाहेर जात असल्याचे पाहुन पोलिसांनी लाठी चार्ज करत आठ ते दहा अश्रु धुराच्या कांड्या फोडल्या .

जम्मू - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. जंगल भागामध्ये ही चकमक सुरु आहे.शोपियनमध्ये लष्कराचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी सदर भाग रिकामी केला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

सोलापूर - सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाच्या घराला आग लावली आणि या घटनेत चार जणांना आगीत होरपळून मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी गावात ही घटना घडली. देवकते कुटुंबात संपत्तीवरून वाद होता. याच वादातून मोठ्या भावाने आपला लहान भाऊ राहुल देवकते आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. राहुल देवकाते आणि कुटुंब रात्री झोपेत असताना मोठ्या भावाने लहान भावाच्या घरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे.

मुघलसराय - बीएसएफच्या ८३ व्या बटालियनचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादहून जम्मूकडे जात होते. हे जवान एका खास रेल्वेने जात होते. मात्र, हे सर्व जवान बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मुघलसराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या जवानांचा शोध घेण्यात येत आहे.पश्चिम बंगालहून लष्करासाठीच्या विशेष रेल्वेने जम्मू कश्मीरमधील सांबा जिल्ह्यासाठी हे जवान रवाना झाले होते. सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जवानांचे अपहरण झाले की ते पळून गेले याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही. हे सर्व जवान बीएसएफच्या ८३ व्या बटालियनमध्ये तैनात होते. रेल्वेतून जम्मू-काश्मीरकडे जात असता वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनादरम्यान ते बेपत्ता झाले. उत्तर प्रदेशातील मुघलसराय रेल्वे स्थानकात गाडी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी मुघलसरायच्या जीआरपी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुंबई - आपण निर्दोष असून आपल्यावर अन्याय झाला असे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी भुजबळांवरील आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालय ठाम आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा आरोप संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. छगन भुजबळ यांनी संपूर्ण घोटाळ्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आणि राज्य शासनाची फसवणूक केली, असा आरोपही यात करण्यात आला आहे.महाराष्ट्र सदन आणि सांताक्रूझ-कालिना येथील राज्य ग्रंथालय या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यापाठोपाठ संचालनालयानेही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून छगन व समीर भुजबळ यांना अटक केली. ते दोघेही सध्या जामिनावर आहेत. संचालनालयाने तिसरा गुन्हा दाखल करीत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्य़ात भुजबळ यांच्यासह इतर सर्वानी जामिनासाठी अर्ज तयार ठेवले होते. परंतु फक्त दिलीप खैरे हे नवे संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट करीत त्यांना जामीन मंजूर केला आणि ६ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे यांना ८१२७ मतांच्या आघाडीने विजयी झाली. ही निवडणुक भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेही प्रतिष्ठेची बनवली होती.विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत किशोर दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. तर संदीप बेडसे यांना तेरा हजार ८३० मते मिळाली . काही दिवसांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने शिवसेनेला बळ मिळाले आहे.

पुणे - शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट हमीभाव आणि दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी २९ जूनला पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दुसऱ्या विधेयकात दुधासह भाजीपाल्याला हमी भाव मिळण्यासाठी लोकसभेत कायदा हवा यासाठी २३ राजकीय पक्षांना आणि १९२ संघटनांना बरोबर घेऊन बिल बनवले, पावसाळी अधिवेशनात सरकारने हे बिल मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.शेतकरी कर्ज माफी योजना पूर्णपणे फेल गेली असून, संपूर्ण कर्ज माफी केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा संपणार नसल्याचा इशारा, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

मुंबई - घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सहवैमानिक मारिया यांच्या पतीने गंभीर आरोप केले आहेत. खराब हवामान असतानाही यू वाय कंपनीने उड्डाण करायला भाग पाडल्याचा आरोप मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केला. मारियाशी आपला सकाळी संवाद झाला होता. त्यावेळी तिने आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा प्रभात यांनी केला आहे. प्रदीप राजपूत यांचेही तेच म्हणणे होते असेही प्रभात यांनी सांगितले आहे. एक वाजता कुठे आहे, असा मारियाला मेसेज केला होता. मात्र मारियाकडून प्रतिसाद आला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने भीती वाटू लागली. त्यानंतर बातम्यांमध्ये विमान दुर्घटनेचे वृत्त कळल्याची माहिती प्रभात यांनी दिली.मारिया ही मूळची अहमदाबादची असून ती को-पायलट होती. मारिया १५ वर्षांपासून मुंबईतल्या मीरा रोडला राहत होती. तिला १५ वर्षांची मुलगी आहे.

मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. त्याआधारे ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष अर्ज केल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व अन्य आरोपींना समन्स बजावले होते. त्याप्रमाणे हे आरोपी बुधवारी न्यायालयात हजर झाले. मात्र, सर्व आरोपी आधीच जामिनावर असल्याने नव्याने जामीन मिळवण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत न्यायालयाने ६ ऑगस्टला याबाबत निर्णय देऊ, असे सांगत भुजबळांसह कुटुंबियांना तोवर तात्पुरता दिलासा दिला.‘या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामिनाकरिता नव्याने बाँड देणे कायदेशीररित्या उचित ठरत नाही. शिवाय एकाच गुन्ह्यासाठी दोनदा अटक करता येत नाही. हे कायद्याच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात ठरते’, असा युक्तिवाद भुजबळ कुटुंबीयांच्या वतीने अॅड. शलभ सक्सेना व अन्य वकिलांनी मांडला; तर पुरवणी आरोपपत्राची दखल घेत त्याची नोंद ‘वेगळा गुन्हा’ म्हणून करण्याची विनंती ईडीच्या वकिलांनी केली. मात्र, या मुद्यावर ६ ऑगस्ट रोजी निर्णय देऊ आणि आरोपींना सध्या ज्या अटींवर जामीन मंजूर झालेला आहे, त्याच अटी कायम राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली - कॅनडाहून भारत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीवर हॉस्टेलच्या डॉर्मेटरी कॉर्डिनेटरने दारुच्या नशेत दिल्लीत बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक बंटे याला अटक केली. बुधवारी त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागात ही घटना घडली. कॅनडाची रहिवासी असेलली १९ वर्षीय तरुणी भारतात आली होती. ती वेब डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतेय. ४० दिवसांपूर्वी टूरिस्ट व्हिजावर ती एका ग्रुपसोबत भारतात आली होती. हा ग्रुप दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाला होता. हा ग्रुप रात्रीच्या वेळेस सफरदरजंग एन्क्लेव्हच्या हौजखास स्थित 'ओरो पब'मध्ये पार्टी करण्यासाठी दाखल झाला होता. इथे डॉर्मेटरी चालवणारा अभिषेक बंटे नावाचा इसमही काही लोकांना घेऊन दाखल झाला होता. त्याची या तरुणीशी ओळख झाली दोघांनी एकमेकांचे नंबरही शेअर केले. त्यानंतर एक कॅब बुक करून अभिषेक या तरुणीला लक्ष्मीनगर स्थित हॉस्टेलला घेऊन गेला आणि इथे त्याने तरुणीवर बलात्कार केला.

मुंबई - ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे. तसा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने तयार केला असून, त्यावर २४ जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.सहकारी बँकांना परवाना रिझर्व्ह बँकेकडून मिळतो, पण बँकांवर देखरेख करण्याचे काम राज्याच्या सहकार विभागाकडे असते, तर बँक चालविण्याचे काम संचालक मंडळ करते. बँकेच्या दैनंदिन कामाकाजासह कर्ज मान्य करणे, कर्जांची वसुली व बँकेसाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, अशी सर्वच कामे संचालक मंडळ करते, पण सहकारी बँकेत ठेवीदारांचा पैसा असल्याने त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठीच या बँकांवर व्यवस्थापन मंडळाची नेमणूक करून, त्या आता थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मुंबई - गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देऊ पण नाणारची एकही वीट रचू देणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. नाणारची एकही वीट रचू देणार नाही. राज्यसभेचा खासदार जरी असलो तरी कोकणचा सुपुत्र आहे. शिवसेनेसारखे बोलून नाही दाखवणार, गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा फेकेन, खासदार जरी भाजपचा असलो तरी विरोध कायम राहणार. असं ठाम वक्तव्य करून नारायण राणेंनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे की, मी जनतेच्या बाजुने आहे, अशी ठाम भूमिका नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. दरम्यान, मी शिवसेनेसारखे बोलून नाही दाखवत असे म्हणत त्यांनी शिवसेनेस टोमणाही मारला आहे.

वॉशिंग्टन - इराणकडून तेल आयात करू नका, असे आवाहन अमेरिकेने भारत व इतर मित्रराष्ट्रांना केली आहे. येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत इराणशी होत असलेले तेल व्यवहार पूर्णपणे थांबवा, इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचे पूर्वीच ट्रम्प प्रशासनाने घोषित केले होते. भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांपैकी इराण तिसरा मोठा निर्यातदार आहे. इराक व सौदी अरेबियानंतर इराणचा क्रमांक येतो. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन कच्चे तेल निर्यात केले होते.गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषित केले होते. येत्या ९० ते १८० दिवसांत इतर देशांनीही इराणशी तेल-व्यवहार थांबवावा, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. वॉशिंग्टन दबाव तंत्राचा वापर करत आहे. भारत व चीनवरही त्यांनी तेल आयात बंद करण्यासाठी दबाव टाकला आहे. हे दोन्ही देश सकारात्मकच प्रतिसाद देतील, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तसे झाले नाही तर भारत व चीनसोबतच्या उद्योग व व्यापार धोरणावर अमेरिका पुनर्विचार करेल. या दोन्ही देशांच्या कंपन्यांवर निर्बंध लादण्यात येतील. अमेरिका इराण धोरणाविषयी प्रचंड संवदेनशील असून हा सुरक्षेचा मुद्दा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर - अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. पण खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कारण बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात पुढच्या ४८ तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.पहलगाम बेस कॅम्पपासून सुरू झालेली ही यात्रा नन वॅन कॅम्पजवळ थांबवण्यात आली आहे. जेव्हा मुसळधार पडणारा पाऊस थांबेल आणि हवामान सुधारेल तेव्हाच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मूमध्ये कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. काश्मीरची रेल्वे स्थानक, मंदिरे, बस स्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोलापूर - शहरात ठिकठिकाणी ‘नो पाìकग’मध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा भाडोत्री क्रेनच्या साह्याने कारवाई करीत असते. परंतु मंगळवारी या क्रेनवरील वाहतूक शाखेचे पोलीस आणि त्यावरील कर्मचा-यांनी संतापजनक प्रकार करून सोलापूर पोलिसांची मान खाली घातली. दुचाकी वाहन तर उचललेच परंतु वाहनधारक आणि त्याच्या शाळेला निघालेल्या छोट्या मुलीलाही चक्क क्रेनवर बसवून घेऊन गेल्याची संतापजनक घटना घडली.

बडोदा - देशात पावसाने चांगला जोर धरला आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण पाहायला मिळत आहे. गुजरात राज्यात वलसाड, सुरत आणि नवसरी जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचे दिसत आहे.बडोदा शहरात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली होती. यावेळी बडोद्याच्या महापौर डॉ. जिगिशा सेठ यांची गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर महापौरांचीच गाडी खड्यात गेल्याने टीका सुरु झाली आहे.

औरंगाबाद - औरंगाबादचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एमपीएसीच्या मार्गदर्शनासाठी घरी बोलावून बलात्कार केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनंच दाखल केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने व्हाट्सअॅप वरून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर , मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी ची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी - कोळी भवन या सांकृतिक भवनात चालू आहे. या तीनही मतदारसंघाच्या ३६ उमेदवारांचा फैसला आज होणार असून, या मतमोजणी ची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे.मतमोजणी साठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली आहे. कोकण पदवीधर मतदार संघासाठी २८ टेबल माडण्यात आले असून, मतमोजणी चे सहा राउंड होणार आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघा साठी १४ टेबल मांडण्यात आले आहेत.याचे अडीच राउंड होणार आहेत. मुंबई पदवीधर मतमोजणी साठी २० टेबल असणार असून, चार राउंड मध्ये मतमोजणी होणार आहे.

मुंबई - ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने राज्यभरातील महानगरपालिकांना दिलेल्या आदेशांचे पालन करा नाहीतर कारवाईला तयार राहा असा इशाराच दिलाय. या वर्षी होणाऱ्या सण-उत्सवांदरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित महानगरपालिकांची अजिबात गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद हायकोर्टाने दिली आहे.ध्वनी प्रदूषण करणा-यांविरोधात कारवाई केली गेली नाही तर संबंधित मनपा आयुक्तांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा कोर्टाने दिला आहे.

लखनऊ - लखनऊमध्ये आंतरधर्मिय विवाहामुळे पासपोर्ट नाकारण्यावरून झालेल्या वादानंतर प्रकाशझोतात आलेल्या तन्वी सेठ यांचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या अहवालात तन्वी या गेल्या १० वर्षांपासून नोएडामध्ये राहत असल्याचे उघड झाले.लखनऊ पोलिसांनी याबाबतचा अहवाल विभागीय पारपत्र कार्यालयाला पाठवला होता. या अहवालाचा आधार घेत तन्वी सेठ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचे समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे.पासपोर्ट हवा असेल तर तन्वी सेठ यांच्या मुस्लिम पतीला धर्म बदण्याचा सल्ला विकास मिश्रा या अधिकाऱ्यानं दिल्याचा आरोप या जोडप्याने केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यात लक्ष घालून त्यांना पासपोर्ट मिळवून दिला आणि मिश्रा यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. तन्वी यांच्या पतीचा पासपोर्टही रद्द होण्याचीही शक्यता आहे.

रांची - झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात सहा जवान शहीद झालेत. झारखंडच्या गडवा जिल्ह्यात भूसुरूंगाचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झारखंड जग्वार दलाचे सहा जवान शहीद झालेत. जिल्ह्यातल्या चिंजो जंगलात नक्षली लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस शोध घेत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. नक्षल्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ६ जवान शहीद झालेत. पोलिसांची आणि नक्षल्यांची चकमक अजून सुरू आहे.

जळगांव - जळगाव महापालिकेतील १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.आमचे नेते सुरेश जैन हे आहेत असे सांगत महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे १२ नगरसेवक खान्देश विकास आघाडीतर्फे मनपाची निवडणूक लढविणार आहेत. सुरेश जैन यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून पुढील निवडणूक लढविणार आहोत, असे महापौर कोल्हे यांनी जाहीर केलेय.जळगाव महापलिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. १ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. आज मनसेचे ललित कोल्हे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीतर्फे लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेला जळगावात जोरदार धक्का बसला.

मुंबई - गोरेगाव प्रेम नगर येथे ३४ वर्षीय महिलेचा त्याच परिसरात राहणाऱ्या इसमाने तीष्ण हत्याराने अनेक वार करून तीच क्रूरपणे खून केल्याने गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.सादर गुन्ह्याची माहिती गु.प्र.शा.गु अ.वि.कक्ष ११ कांदिवली मुंबई या पथकास प्राप्त होताच कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन घटनेबाबत माहिती घेतली.सादर गुन्ह्यातील संशयित आरोपी विषयी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचे मित्र व नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली.चौकशी अंती गुन्हेगार मुंबई सोडून पसार झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार आरोपीची मुंबईबाहेर लपण्याची ठिकाणे निश्चित करून आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रावण करण्यात आली.पथकाने आरोपीच्या खात्रीलायक बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपीच्या सुरत येथील नातेवाइकांच्या स्थ्यानी शोध घेतला मात्र आरोपीतेथून पळून गेला.आरोपीला पोलीस मागावर असल्याचा संशय आल्याने टॉसतात जागा बदलत होता.गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी कुठे जाऊ शकतो हे निश्चित करून त्या त्या ठिकाणी पंथाने रवाना करण्यात आली.शोध मोहिमेदरम्यान आरोपी वाराणसीला गेल्याचे कळले.आणि आरोपीच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या कक्ष -११ मधील सपोनि शरद झीने व पथकाने त्यास वाराणशी एयरपोर्ट भागातून शिताफीने अटक केली.आरोपीने तपासात सांगितले कि, वारंवार मयत महिलेशी भांडण होत असल्याने त्याने घरातील चाकूने तिच्यावर वार केले.सदरची यशस्वी कामगिरी सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.आशुतोष डुंबरे,मा. पोलीस उप-आयुक्त (प्र१) श्री.निसार तांबोळी,स.पो.आयुक्त (प्र-उत्तर)श्री.अभय शात्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.पो.नि.श्री.चिमाजी आढाव, पोनि आनंद रावराणे,रईस शेख,सपोनि श्री.शरद झिने, नितीन उतेकर तसेच अमलदार नरेन्द्र मयेकर,अविनाश शिंदे,शिवाजी सावंत,रवींद्र भांबीड,किशोर नलावडे,सुधीर कोळगावकर,अशोक गोळे,नितीन शिंदे,राजू गोरे,सुबोध सावंत, संतोष माने, संतोष देसाई, दयानंद बुगडे,शिवाजी दहिफळे,सचिन कदम,राकेश लोटणकर,अजित चव्हाण,निलेश शिंदे,व महिला अंमलदार रीया आनेराव यांनी पार पडली.

ऑनलाईन - २०१५ च्या विश्वचषकात बुकींकडून आपल्याला दोन लाख अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आली होती अशा प्रकारचं वक्तव्य करुन पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलने गेल्या काही दिवसांमध्ये खळबळ उडवून दिली होती. पाकिस्तानमधील सामा वृत्तवाहिनीच्या Sports Action या कार्यक्रमात बोलत असताना उमर अकमलने हा दावा केला होता. त्याचं हेच वक्तव्य आता त्याच्या अंगलट येणार असल्याचं दिसतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलला मॅच फिक्सींगच्या वक्तव्यावरुन नोटीस पाठवल्याचं समजतं आहे.

नांदेड - नांदेड महापालिकेने सुरु केलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. यात महाराजा रणजीतसिंघ मार्केटमधील प्लास्टिकच्या दोन गोडावून मधील जवळपास ४ ते ५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.महापालिकेच्या वतीने तीन दिवसांपासून प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. आज महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्यासह उपायुक्त माधवी मारकड, सहायक आयुक्त गुलाम सादिक, डॉ. फरहतउल्ला मिर्झा बेग, वसीम तडवी, अतिक अन्सारी आदीनी महाराजा रणजीतसिंघ मार्केटमध्ये अग्रवाल बॅग या प्लास्टिक होलसेलर दुकानावर धाड टाकली.



पुणे - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप शरद पवारांनी पुण्यात केली आहे. पुणे पोलिसांसह शरद पवारांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला असल्याचेही शरद पवारांनी म्हटले आहे. ही पोलिसांची चूक असल्याचे शरद पवारांना म्हणायचे आहे असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. रवींद्र मराठे हे एका आठवड्यापासून जेलमध्ये आहेत. डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणातून रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 



मुंबई - राज्यातल्या प्लास्टिक बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे. प्लास्टिक कंपन्यांकडून निवडणूक फंड वसूल करण्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काही काळानंतर सगळे सुरळीत होईल, असे राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदी करण्याची काय घाई होती? देशात प्लास्टिक बंदी नाही मग महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी का आहे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. व्यापारी किंवा सामान्य माणसांवर तुम्ही पाच हजार रुपयांचा दंड लावता, अचानक काय झाले, असे राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्री गप्प का आहेत? हा राज्य सरकारचा निर्णय आहे का खात्याचा आहे, असेही राज ठाकरेंनी विचारले व यावेळी महापालिकांनी त्यांची जबाबदारी जनतेवर ढकलल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी आणीबाणी विरोधात आज देशभर काळा दिवस म्हणून पाळणार आहे. गेल्या ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता, अशी टीका करत आणीबाणी विरोधात भाजपा काळा दिवस पाळणार आहे. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी भाजपाने देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते सहभाग घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई भाजपाने आयोजित आणीबाणीविरोधी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर अहमदाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहे



मालवण - धुरीवाडा येथे राहणार्‍या संजना ऊर्फ सोनाली चंद्रशेखर पेंडुरकर (वय १९) या महाविद्यालयीन तरुणीने सदनिकेतील आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.संजना हिचे प्राथमिकचे शिक्षण येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये झाले. कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती सध्या रत्नागिरीतील फिनोलेक्समध्ये तृतीय वर्षात शिकत होती. पंधरा दिवसांपूर्वी ती परीक्षा देऊन धुरीवाडा येथील घरी आली होती. काल सकाळी तिची आई, दोन लहान बहिणींना घेऊन कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर वडील आपल्या सोन्याच्या पेढीवर गेले होते. घरात कोणी नसल्याने सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान तिने आपल्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.दुपारी आई घरी परतली तिने मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून दरवाजा लॉक होता. त्यामुळे दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला असता संजना ही गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. 

हरयाणा - हरयाणा येथील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीला ठुमकेवाली म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला स्वतः सपना चौधरीने सडेतोड उत्तर दिले आहे. ते माझे ठुमकेच बघत असतील, म्हणून त्यांनी असे विधान केले, असा पलटवार सपना चौधरीने भाजपा खासदारावर केला. भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला होता.सपना चौधरी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मी काँग्रेसचा प्रचार करू इच्छिते असे विधान सपना चौधरीने केले होते. याबाबत भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सपना चौधरीचा उल्लेख ठुमकेवाली असा केला. काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे? मला असे वाटते काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे अशीही टीका चोप्रा यांनी केली होती.चोप्रा यांच्या या विधानाचा समाचार घेताना सपना चौधरी म्हणाल्या, ‘ते माझे ठुमकेच बघत असतील,म्हणून त्यांनी असे विधान केले. मी खरंतर त्यांचे आभार मानते, कौतुक केल्याबद्दल आभारी. कोणाबद्दल काही माहित नसताना त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला नसतो’, अशा शब्दात सपना चौधरी यांनी भाजपा खासदाराला फटकारले.

नवी दिल्ली - रॉबर्ट वद्रा हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने वद्रा यांना सुमारे ४२ कोटी रूपयांच्या अघोषित संपत्तीप्रकरणी नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण स्कायलाइट हॉस्पिटीलिटीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ९९ मालकी हक्क हे वद्रा यांच्याकडे आहेत.आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वद्रा यांना याप्रकरणी ३० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. आयकर विभागाने यापूर्वीही याप्रकरणी वद्रा यांना नोटीस पाठवली होती. पण वद्रा यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देत नोटिशीत आमच्या कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड पार्टनर असा उल्लेख केल्याचे म्हटले होते. वास्तविक आमची कंपनी ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप होती, असे न्यायालयाला सांगितले होते. आयकर विभागाने आता पुन्हा एकदा वद्रा यांना नोटीस पाठवली आहे.

मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूल करायचा की नाही, यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) अहवाल अद्याप आला नसल्याने राज्य सरकारने अंतिम निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून नऊ आठवड्यांची मुदत मागितली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) याप्रकरणाची चौकशी करत असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले होते. सोमवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकिलांनी एसीबीचा चौकशी अहवाल न्या. अभय ओक व न्या.रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सादर केला.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूल करायचा की नाही, याबाबत एमएसआरडीसीने त्यांचे मत द्यायचे आहे. त्यांना त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत हवी आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यास राज्य सरकारला सहा आठवडे लागतील, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी २ जुलैला ठेवली.

जळगाव - राज्यातल्या प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचे ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केले. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.सध्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेकांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा धसका घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा धसका घेतल्याचे पहायला मिळाले.

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये असलेले बहुतांश चेहरे या वेळीही मदानात उतरणार असले तरी यावेळच्या निवडणुकीमध्ये एक बदल प्रामुख्याने जाणवतो आहे तो म्हणजे भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष सत्तेचा प्रमुख दावेदार म्हणून लोकांसमोर जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेसाठीची पारंपरिक सुंदोपसुंदी या वेळी दिसणार नाही, असे संकेत मिळत आहेत. महापालिकेवर आतापर्यत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मागील निवडणुकीमध्ये जरी विकास महाआघाडीचा प्रयोग केला असला तरी या आघाडीला एकमुखी म्हणता येईल असा कारभार केवळ साडेतीन वर्षांचाच मिळाला. अखेरची दीड वष्रे आपसातील राजकीय कुरघोडीत गेली. काँग्रेसला या वेळी पूर्ण पाच वष्रे सत्ता राखता आली असली तरी पक्षांतर्गत बेदिलीतून स्थायी समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात एक वर्ष देण्यात आली.महापालिकेच्या मावळत्या सभागृहात काँग्रेसचे ४१ आणि सहयोगी एक असे ४२ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादीकडे १९ अधिक सहयोगी सहा तर स्वाभिमानी विकास आघाडीकडे ११ अधिक सहयोगी दोन असे १३ सदस्य आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असा प्रश्न पडावा अशीच राजकीय स्थिती पाहण्यास मिळाली.

मुंबई - आणीबाणीवरुन सुरु झालेल्या राजकीय धुमश्चक्रीत आता मनसेने उडी मारली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली आणीबाणी ही दोन वर्षांची होती पण गेली चार वर्षे आपण अघोषित आणीबाणी झेलतोय' असे ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.भारतीय पक्षाचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीवर टीका करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती. त्याचेच समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही ट्विट केले होते. आज मोदी याच विषयावर मुंबईत भाषण करणार आहेत. आणि त्यावरूनच देशपांडे यांनी आता भाजपवर टीका केली आहे.



मुंबई - सोहराबुद्दीन शेख व तुलसीदास प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीच्या खटल्यात एकामागोमाग ७२ साक्षीदार फितूर झाले असताना सोमवारी एका साक्षीदार महिलेने मला व माझ्या पतीला साक्ष देऊ नये यासाठी गुजरात पोलिसांकडून आणि राजस्थानमधील राजकारण्यांकडून अनेकदा धमक्या देण्यात आल्या अशी धक्कादायक बाब आपल्या साक्षीत उघड केली. या खटल्यात साक्ष देऊ नये यासाठी आम्हाला आमच्या घरातील नंबरवर धमक्यांचे अनेक फोन आले. साक्ष दिली तर तुम्हालाही तुलसीदास प्रजापतीप्रमाणे ठार करू, अशा स्वरूपाच्या धमक्या राजस्थानमधील काही राजकारणी आणि गुजरात पोलिस दलातील काहींनी आम्हाला दिल्या, असे रिझवाना खान यांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्यासमोर सांगितले. तसेच पतीने लिहिलेले एक पत्रही त्यांनी न्यायाधीशांना दिले. 

पुणे - प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई चूकीची असल्याचा आरोप पुण्यातील व्यापा-यांनी केला. तसेच कोणत्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करावी किंवा करू नये याबाबत स्पष्टता नसल्याने सोमवारी व्यापा-यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे बापट यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेतर्फे.शहरातील विविध ठिकाणच्या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील काही खाद्य पदार्थ उद्योजकांनी तयार केलेले पदार्थ स्वत:च्या ब्रॅण्डच्या नावाचा उल्लेख असलेल्या पिशवीत विक्रीसाठी ठेवले तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.परंतु,नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच मुंबई व पुण्यात वेगवेगळ्या पध्दतीने कारवाई केली जात आहे.त्यामुळे कोणत्या प्लास्टिकवर कारवाई केली जाईल; यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणी पुण्यातील व्यापा-यांनी केली.

नवी दिल्ली - देशात आणीबाणीलागू होऊन आज ४३ वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर लिहिलेल्या लेखात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली आहे.हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटना रद्द ठरवली नाही मात्र त्यांनी लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत करण्यासाठी राज्यघटनेचा वापर केल्याचे मत त्यांनी फेसबुकवरच्या आपल्या लेखात व्यक्त केले आहे.हिटलरने विरोधीपक्षांच्या सदस्यांना अटक केली आणि संसदेत बहुमताच्या जोरावर मनमानी बदल करत सर्व अधिकार स्वत:कडे घेतले.त्याचप्रमाणे इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना अटक करून संसदेतल्या दोन तृतीयांश बहुमताच्या जोरावर राज्यघटनेत चुकीच्या दुरूस्त्या करून घेतल्या.काही गोष्टी ज्या हिटलरने केल्या नाहीत अशा अनेक गोष्टी इंदिरा गांधी यांनी केल्या होत्या.त्यांनी संसदेच्या कार्यावाहीचे वार्तांकन करण्यास त्यांनी माध्यमांना मनाई केली. संसदेची कार्यवाही प्रसिद्ध करू दिली जावी यासाठी फिरोज गांधी यांनी पुढाकार घेतला होता. त्याच आधारे त्यांनी त्या काळात हरिदास मुंद्रा घोटाळा बाहेर काढला होता. अशा पद्धतीचे बदल हिटलरने कधी केले नव्हते. निवडणूकीतल्या गैरप्रकाराच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांची निवडणूक अवैध ठरवली होती.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीवरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. प्लास्टिकबंदीवरून मनसेने टीका केली होती. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोर्टापेक्षा राज ठाकरे स्वत:ला मोठे समजतात काय अशी टीका त्यांनी केली.रामदास कदम यांच्या या टीकेमुळे प्लास्टिक बंदीवरून मनसे आणि शिवसेनेत हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक बंदीवरून निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद बोलावली होती. गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोलचा वापर करावा की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी एक हायपॉवर कमेटी स्थापन करण्यात आली आहे.ही कमेटी चर्चा आणि अभ्यास करून निर्णय देईल अशी माहितीही कदम यांनी दिली. प्लास्टिक बंदीचा निर्णय हा ९ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याचवेळी प्लास्टिक आणि थर्मोकोल उत्पादकांनी पर्याय शोधायला पाहिजे होता त्यामुळे त्यांची जबाबदारी सरकारवर येत नाही असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात शनिवारपासून प्लास्टिक बंदी ला सुरुवात केली.

अयोध्या - अयोध्येत राम मंदिर व्हावे ही तर प्रभू रामचंद्रांचीच इच्छा आहे तुम्ही चिंता करू नका असे आवाहन करत आज योगी आदित्यनाथ यांनी संतांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. महंत नृत्यगोपाल दास यांच्या जन्मदिवसानिमित्त अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनात ते बोलत होते. राम मंदिर होणारच यामध्ये कोणतेही दुमत नाही, असण्याचा प्रश्नच येत नाही. संतांनी थोडे सबुरीने हे समजून घ्यावे की हा प्रश्न कायदेशीर बाबींमध्ये आहे.संत समाजाने आणखी थोडा काळ संयम बाळगला पाहिजे. जे लोक कालपर्यंत रामजन्मभूमीचा विरोध करत होते त्यांच्या तोंडून आता राम मंदिर झाले पाहिजे अशी भाषा येते आहे. कदाचित ही एक नवी खेळीही असू शकते, आपल्याला सावध राहिले पाहिजे असेही आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. आज आम्हाला असे लोक राम मंदिर कधी होणार हा प्रश्न विचारत आहेत ज्यांनी त्यावेळी राम भक्तांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले.

मुंबई - तब्बल ८० लाखांची चोरी करुन फरार झालेल्या कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी रमेश रावत भुलेश्वर येथे कुरिअर कंपनीत काम करत होता. ७ एप्रिल रोजी आपल्याच कंपनीतून त्याने ८० लाख रुपये चोरले आणि फरार झाला. पण हेच पैसे लोकांना दान करण्याच्या नादात त्याचे पितळ उघडे पडले आणि मथुरा येथून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केले होते. मथुरा पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वृंदावन येथून त्याला अटक केली आहे. रावत हा मुळचा गुजरातचा असून गेल्या दोन वर्षांपासून कुरिअर कंपनीत काम करत होता.पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रमाणापेक्षा जास्त दान करणे त्याला महागात पडले. आपले पाप लवकराच लवकर धुण्याच्या नादात रावत २० दिवसांपुर्वी एका मंदिरात पोहोचला होता. तिथे त्याने एक मोठा भंडारा आयोजित करत त्यावर आठ लाख रुपये खर्च केले. इतकेच नाही तर त्याने चोरी केलेले आठ लाख रुपये लोकांमध्ये वाटले.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget