August 2018

मुंबई - देशात महिलांसाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या नजिकच भिवंडी भागात एक धक्कादायक घटना समोर आली. गुरुवारी सायंकाळी एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या नर्पोली भागात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांची मुलीचं शव ताब्यात घेतले. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर पोलिसांना आणखीन माहिती मिळू शकेल. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात आयपीसी कलम ३०२, ३७६ (डी) (ए) ४५२ आणि पॉस्को ३, ४, ७ अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आलीय. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर हा अतिप्रसंग ओढावला. मृत मुलगी आई-वडील आणि मोठ्या भाऊ - बहिणीसोबत नर्पोली भागात राहते. तिचे आई-वडील मजुरीचे काम करतात. मुलीची शाळाही नर्पोली भागातच आहे. शाळेतून परतल्यानंतर आई-वडील कामाला गेले असल्याने मुलगी घरात एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपीने अगोदर या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि एसओजी यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कराने अनंतनागमधील कोकरनाग परिसरात असणा-या दोन-तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. तसेच, लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमत सुरु आहे. दरम्यान, सुरक्षतेच्या कारणावरुन येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्काराच्या राष्ट्रीय रायफल्सला गुरुवारी रात्री कोकरनागमधील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर येथील पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपसोबत लष्कराच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी कोकरनागमधील घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अंधारातून जवानांवर गोळीबार करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे दहशतवाद्यांचे पळून जाणे अपयशी ठरले. जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.

मुंबई -  क्रिस्टल टॉवर इमारतीतील दुर्घटनेनंतर भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेने सुमारे दोन हजार इमारतींनाच ओसी दिले आहे. तर तब्बल ५६ हजार इमारतींना अद्याप ओसी मिळाले नसल्याचे समोर आले आहे.इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना त्याचा ताबा देण्याआधी विकासकाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र ओसी न घेताच विकासक पळ काढत असून पैसे गुंतविले असल्याने रहिवासी नाइलाजाने बेकायदेशीरपणे इमारतींमध्ये वास्तव्य करतात. महापालिकाही मानवतेच्या दृष्टीकोनातून अशा इमारतींमधील रहिवाशांना दुप्पट शुल्क आकारून पाणीपुरवठा करीत असते. परळ येथील क्रिस्टल टॉवरला ओसी नसल्याने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने २०१६मध्ये बजावली होती. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. आज पहाटे ४ वाजता प्राणज्योत मालवली दुपारी १२ वाजता मुलुंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. आतापर्यंत त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र काल त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. अनेक पुरस्कारांनी नावाजले गेलेल्या चव्हाण यांना २०१८ चा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित करण्यात आला.


नवी दिल्ली - भारतरत्न आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाला बुधवारी अडचणींचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये वाजपेयींच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. अस्थी विसर्जनसाठी वाजपेयींचे कुटुंब पोहोचले होते. मात्र त्यांच्यासाठी घरी परतताना गाडीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत कुटुंबाला रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभे राहावे लागले. खूप वेळाने रिक्षा मिळाल्यानंतर ते घरी पोहोचू शकले. वाजपेयींची भाची कांती मिश्रा यांनी खंत व्यक्त करत सांगितले की, जे चारचाकीवाले होते ते आपापल्या गाडीने पोहोचले. आम्ही रिक्षावाले असल्याने रिक्षाने आलो.वाजपेयींचे ग्लावियरमध्ये जुने घर असून तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, त्यांचे पती ओपी मिश्रा आणि मुलगी कविता यांच्यासहित इतर नातेवाईक राहतात. अस्थी विसर्जनासाठी सर्व कुटुंबीय पोहोचले होते. मात्र तेथून परतत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबई - पावसाने केरळचे जनजीवन विस्कळीत झाले आहे सध्या कुठे पाऊस थांबल्याने मदतीचा ओघ सुरु आहे. केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी हात पुढे केला आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी १० कोटींची मदत दिली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे. केरळमधील पूराने हाहाकार माजवल्याने महाराष्ट्रासह देश आणि जगभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. एसटी कर्मचारी आणि महामंडळानेही केरळ पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कंबर कसली. सर्व कामगार संघटनांनी कामगारांचे एक दिवसाचे वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी देण्याची घोषणा केली. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांचा केवळ अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचा आणि तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्याची सूचना केली. त्यानुसार एकूण १० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून आज दुपारी मुख्यमंत्र्यांना त्याचा धनादेश देण्यात आला.

मुंबई - राज्यभरातील बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारची मुंबई हायकोर्टाने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. मुंबईसह राज्यभरातील बेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यास राज्यसरकारची टाळाटाळ का होतेय याची कोर्टाला माहिती द्या, त्यानंतरच कारवाईसाठी वेळ वाढवून मागा अशा शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारला फैलावर घेतले. यासंदर्भात दोन आठवड्यांत खुलासा करा नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमानाची कारवाई करू असेही हायकोर्टाने सरकारला सुनावले आहे.औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एका बेकायदा मंदिरावर कारवाई करण्यास आलेल्या मनपाच्या कामात अडथळा निर्माण करत त्यांना धमकावले होते. त्यानंतर खैरेंवर कारवाईचे आदेशही हायकोर्टाने दिले होते. पण लोकप्रतिनिधी असा अडथळा आणत असतील तर त्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल कोर्टाने केला.

नवी दिल्ली - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य नाही असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी म्हटले आहे. आवश्यक कायदेशीर तरतुदीशिवाय हे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. रावत यांनी औरंगाबाद येथे निवडक प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे शक्यच नाही असे उत्तर दिले.पुढच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये होणार आहेत.मागच्याच आठवडयात त्यांनी निवडणूक आयोग चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक घेण्यास सक्षम आहेत असे म्हटले होते. डिसेंबरमध्ये चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह लोकसभेची निवडणूक घेण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. भाजपानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’ची चर्चा सुरु केली.

गुहागर - गुहागर तालुक्यात माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील कोंड कारुळ येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी सुद्धा अल्पवयीन आहेत.बलात्काराच्या या घटनेनंतर संपूर्ण गुहागर तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होत आहे. मोबाइलवर सहज उपलब्ध होणारे इंटरनेट आणि टीव्ही पाहण्याचे वाढते प्रमाण यामुळे दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने गुहागरचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुहागर तालुक्यातील महिन्याभरातील बलात्काराची ही दुसरी घटना आहे.

औरंगाबाद - महापालिकेच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एआयएमआयएमचा नगरसेवक सैयद मतीन राशिद याला १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिविटीज ऑफ स्लमलॉड्र्स, बुटलेगर्स, ड्रग ऑफेंडर्स आणि डेंजरस पर्सन अॅक्ट १९८१ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मागील आठवड्यात राशिदने वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी या नगरसेवकाची चांगलीच धुलाई केली होती.सुरक्षा रक्षकांनी राशिदची या दरम्यान सूटका केली. राशिदने भाजप नगरसेवकांच्या अटकेची मागणी केली आहे. मंगळवारी राशिदला या प्रकरणात जामीन मिळाला होता. पण थोड्याच वेळात सिटी चौक पोलीस स्टेशनची एक टीम राशिदच्या घरी पोहोचली आणि राशिदला हरसूल जेलमध्ये घेऊन गेली. राशिदला पोलीस कस्टडीमध्य़े ठेवण्यात आले. यानंतर राशिदला १ वर्षासाठी पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे.

नांदेड - भरदिवसा घरात घुसून एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ही धक्कादायक घटना घडली. किनवट गोकुंदामधील शिवनगर भागात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. सुरेखा राठोड या या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला करुन अज्ञात मारेकरी पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या सुरेखा राठोड यांचा जागीच मृत्यु झाला. शेजारच्यानी ही माहिती पोलिसांना दिली. या खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. भरादिवसा हा खून झाल्याने किनवट शहरात खळबळ उडाली आहे.

मुंबई - क्रिस्टल अग्निकांडप्रकरणात दोषी आढळलेल्या इमारतीचा बिल्डर सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. परळमध्ये असणाऱ्या क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, क्रिस्टल टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तसेच अग्निशमन यंत्रणा बंद ठेवल्याप्रकरणी बिल्डर सुपारीवाला याला पोलिसांनी अटक करण्यात आली होती.क्रिस्टल टॉवरमध्ये आगीच्या धुरामुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोन रहिवाशांनी लिफ्टने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान १६ जणांवर केईएममध्ये उपचार आहेत.क्रिस्टल टॉवरला प्रमाणे मुंबईतील ५६ हजार इमारतींना ओसीच नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. क्रिस्टल या १४ मजल्यांच्या या इमारतीत अनेक कुटुंब राहत होती. पण मूलभूत सुविधाच नसल्याचे पुढे आले. २०१६ मध्ये क्रिस्टल इमारतीच्या बिल्डरला नोटीस पाठवली होती. पण कारवाई मात्र झालीच नाही. इमारतीत आगीवर नियंत्रण आणणारी कुठलीच यंत्रणाही नव्हती. त्यामुळेच आता जशी बिल्डरवर कारवाई होईल तशी पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे

मुंबई - एकीकडे राज्यातील लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे त्याप्रमाणात पोलीस भरती करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली.राज्याच्या पोलीस महासंचालकांनी २०११ साली ६१ हजार ४९४ पोलीसांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला होता. ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला. त्यानुसार २०११ ते २०१४ या काळात आघाडी सरकारने २२ हजार ८६४ पोलीस भरती केली.मात्र त्यानंतर २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारने मागील चार वर्षात केवळ २ हजार ७३३ पोलीस भरती केली आहे.

गुजरात - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. आज ते कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हसिटीच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते जुजवा येथे जनसभेला संबोधित करणार आहेत. सकाळी साधारण १०:३० च्या सुमारास सुरत विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर ते जुनागढला भेट देणार आहेत. संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर राजभवनमध्ये होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर रात्री ९ वाजता अहमदाबाद विमानतळावरुन दिल्लीला प्रयाण करतील.दरम्यान, बुधवारी मनसे अंध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत मोदी यांचा समाचार घेतला. धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, घोषणा दिल्या. पण मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जैन बांधव संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पुण्यात जैन बांधव संवाद मेळाव्यात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्यांवरून वेगवेगळ्या गटांना कानपिचक्या दिल्यात. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

केरळ - केरळमध्ये महापुरात अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्य दलाचे जवान जीवाची बाजी लावत आहेत. जवानांनी दाखवलेले धाडस आणि धैर्याचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे. दरम्यान केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मोरकीनीकरा परिसरात जेव्हा पुराचे पाणी शिरले तेव्हाही जवानांनी जीवाची पर्वा न करता २०० जणांचा जीव वाचवला. तेथील घरांमध्ये आठ फूटांपर्यंत पाणी शिरले होते.तेथील लोकांना आता आपण जिवंत राहू याची शाश्वतीच नव्हती. पण बीएसफच्या जवानांनी हार मानलेली नव्हती. तेथे उपस्थित असणाऱ्या बीएसएफ युनिटने बचावकार्यासाठी मुख्यालयाकडून मंजुरी मिळण्याची वाट पाहण्यात वेळ वाया घालवला नाही. युनिटने तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली. १० तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या मॅरेथॉन ऑपरेशननंतर २०० हून अधिक जणांना वाचवण्यात आले. इतकेच नाही बीएसफ जवानांनी आपल्याकडील जेवण त्यांना दिले. सोबतच त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था केली.

मुंबई - काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री गुरुदास कामत यांच बुधवारी सकाळी दिल्लीत निधन झालं. त्यानंतर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास गुरुदास कामत यांच पार्थिव दिल्लीहुन मुंबईत आणण्यात आले. विमानतळावरून कामत यांच पार्थिव त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी दाखल झाले तेव्हा शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते हजर होते. त्याचबरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान यावेळी हजर होते. गुरुदास कामात यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चेंबूरच्या चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी - चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झाला असून रत्नागिरीतल्या तब्बल १४ सामाजिक संस्थांनी या सभेला कडाडून विरोध केला. सभेच्या ठिकाणी या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या सभेत संभाजी भिडे '३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना व खडा पाहारा योजना' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आता या बैठकीला विरोध होत असल्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. संभाजी भिडेंच्या बैठकीला चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

लखनऊ - देशभरात बकरी ईदचा उत्साह आहे. बकर्‍याचा बळी देऊन हा सण साजरा केला जातो. मात्र प्राण्यांचा असा बळी देणे हा वादाचा मुद्दा झाला आहे. यंदा उत्तरप्रदेशात मात्र यावर एक इको फ्रेंडली पद्धतीने तोडगा काढण्यात आला आहे. लखनऊमध्ये काही मुस्लीम बांधवांनी पारंपारिक पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यापेक्षा बकरीच्या चेहर्‍याचा केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात बकरी ईद साजरी केली आहे. प्राण्याचा बळी देणे उचित वाटत नसल्याने यंदापासून बकरी ईद प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यासाठी त्याच्या चित्राचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन लखनऊच्या एका बेकरी मालकाने केले आहे.

श्रीनगर - देशभरात बकरी ईद उत्साहात साजरा केली जात असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात येत आहे. काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकवले. जमावामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हे युवक सुरक्षा दलावर दगडफेक करत आहेत. जमावाला पांगवण्याचा सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही जमावाकडून काश्मीरमध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले होते. दरम्यान, अनंतनाग येथेही आंदोलकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर तुफानी दगडफेक केली. अनंतनाग येथे अत्यंत तणावाचे वातावरण आहे. कुलगाम येथेही दहशतवाद्यांनी एका पोलिसाला ठार केले आहे.नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी सकाळी दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गुरुदास कामत हे कामानिमित्त दिल्लीत गेले होते. बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांचे निधन झाले होते.गुरुदास कामत यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा. गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.

मुंबई - मुंबईत परेल भागातील क्रिस्टल टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे. 'क्रिस्टल टॉवर' ही सोळा मजल्यांची रहिवासी इमारत आहे. त्यातील बाराव्या मजल्यावर आग लागल्याचे कळत आहे. आग लागली आहे असे कळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. डॉ. आंबेडकर रोडला लागून ही इमारत आहे. इमारतीत अडकलेले नागरिक गॅलरीत येऊन मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत. या इमारतीत अनेक जण अडकून पडले आहेत. त्यातील काही नागरिकांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. टॉवरच्या बाराव्या मजल्यावरून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत. आग पसरल्यामुळे लिफ्ट बंद करण्यात आली आहे. जिन्यांवरही धूर पसरला आहे. खालचे मजले तातडीने रिकामे करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

गडचिरोली - अतिवृष्टीमुळे गडचिरोलमध्ये सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात १०४२ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस सरासरीच्या १०६ % एवढा आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीत भामरागड अंडी मुलचेरा या भागात तुफान पाऊस कोसळत असल्याने सर्व प्रमुख मार्ग बंद झाले आहेत.दरम्यान, मागील ४८ तास गडचिरोलीत कोसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील दीना-प्राणहिता-वैनगंगा नद्या कोपल्या असून या नद्यांना जोडणारे छोटे नदी-नाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुख्य राज्य मार्गांसह कित्येक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.नवी दिल्ली - देशद्रोहाचा आरोप असलेला आणि जेएनयूचा विद्यार्थी असलेल्या उमर खालिदवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दरवेश शाहपुर आणि नवीन दलाल याला बऱ्याच तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. चौकशीत आरोपींनी असे सांगितले की, उमर खालिदवर हल्ला करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर त्या दिवशी कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये जो 'खौफ से आजादी' हा कार्यक्रम होता तो बंद करण्यासाठी आम्ही तेथे आलो होते. तेव्हा तो प्रोग्राम वेळेत सुरू झाला नाही आणि हे बाहेर आले. बाहेर उमर खालिद भेटला आणि त्याच्याशी वाद सुरू झाला. १३ ऑगस्टला कॉन्सिट्यूशन क्लबच्या बाहेर उमर खालिदने दावा केला होता की, त्याच्यावर फायरिंग केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल सेलकडे सोपवण्यात आली आहे.

मध्य प्रदेश - अल्पवयीन तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने २२ वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मध्य प्रदेशमधील बीना येथील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. देवल गावात ७ डिसेंबर २०१७ रोजी २२ वर्षीय तरुणाने १४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या केली होती.पीडित तरुणी आपल्या घरात टीव्ही पाहत असताना आरोपी रब्बू उर्फ सर्वेश सेन पिण्याचे पाणी हवे असल्याचा बहाणा करत घरात शिरला. यावेळी त्याच्यासोबत एक अल्पवयीन तरुणदेखील होता. गुन्हा करण्याआधी त्याने मोबाइलवर तरुणीला अश्लील व्हिडीओ दाखवले होते. बलात्कार झाल्यानंतर तरुणीने नातेवाईकांना याबद्दल सांगण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने केरोसीन टाकत तिला जाळून टाकलं होते.आरोपी रब्बूसोबत असणाऱ्या अल्पवयीन तरुणाने आधी बलात्कार केला होता. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तरुणीला जाळण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखळ करण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता.

पुणे - माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले दरड हटविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.दरम्यान, दरड कोसळून मार्गावर साचलेले दगड, माती हटवून मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.


मुंबई - हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल्या अनेक भागात, मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, तसेच, मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबारच्या विसरवाडीत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा अंदाज महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही. दरम्यान, मागील ४८ तास गडचिरोलीत कोसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील दीना-प्राणहिता-वैनगंगा नद्या कोपल्या आहेत. या नद्यांना जोडणारे छोटे नदी-नाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुख्य राज्य मार्गांसह कित्येक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दक्षिणेच्या टोकावर असलेल्या गोदावरी नदीत होणारा इतर नद्यांच्या पाण्याचा समावेश मंदावला आहे. छत्तीसगड सह ओरिसा राज्यात देखील तुफान पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीने विक्राळ रूप धारण केले आहे.

नॉटिंगहम - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने ३५२-७ वर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५२१ रनची गरज आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमधले कोहलीचे हे २३वे शतक होते. विराट कोहली १९७ बॉलमध्ये १०३ रन करून आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. भारताच्या बॉलिंगच्या वेळी इंग्लंडच्या ५ विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्याने बॅटिंग करताना ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रन केले. तर चेतेश्वर पुजारा ७२ रन करून आऊट झाला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने १२४-२ अशी केली होती. यानंतर कोहली आणि पुजाराने भारतीय इनिंगला आकार दिला आणि भारताला भक्कम स्थितीमध्ये पोहोचवले. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला १६१ रनवर ऑल आऊट केल्यामुळे भारताला आधीच १६८ रनची आघाडी मिळालेली होती.अकोला - भारतीय बहुजन पक्षाचे नेते आसिफ खान यांच्या हत्येने अकोला शहर हादरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी राजकीय हत्या आहे. १६ ऑगस्टपासून आसिफ खान बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. अखेर पूर्णा नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या संशयितांची नावे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी पैशाच्या वादातून आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद यांचाही खून करण्यात आला होता. आसिफखान हे अकोला जिल्ह्यातील वाडागाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक होते. येथील वाडेगावचे ते सरपंचही होते. २०१४ मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून ते निवडणुकीसाठी उभे राहिले होते. यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ५ वर्षं पूर्ण झाली. दोन दिवस आधीच दाभोलकरांचे मारेकरी सापडल्याने हा दिवस पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी समाधानाचा दिवस आहे. कारण मारेकऱ्यांचा शोध लावा या मागणीसाठी हे कार्यकर्ते गेली पाच वर्ष पुण्यातल्या ओकांरेश्वर पुलावर निषेध जागर सभेचं आयोजन करत होते. आजही असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात यात डॉ. बाबा आढाव, मेधा पानसरे, तुषार गांधी, कविता लंकेश, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रीविजय कलबुर्गी यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले आहेत. मारेकरी सापडले आता सूत्रधाराचा शोध लावा अशी मागणी या मान्यवरांनी केली.

नवी दिल्ली - मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात फारूख टकला हा सक्रिय होता व तो दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार होता. त्याने खोटी ओळखपत्रे दाखवून मुश्ताक महंमद मियॉ या नावाने २०११ मध्ये पासपोर्ट मिळवला, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. दुबईच्या भारतीय दूतावासाने त्याला पासपोर्ट जारी केला होता व फारूख टकला हा पकडला गेल्यानंतर जप्त करण्यात आला होता. फारूख टकला याला ८ मार्च २०१८ रोजी भारतात आणले गेले, तेव्हा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती.सीबीआयने गेल्या आठवडय़ात टाडा न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे, की महंमद फारूख यासिन मन्सूर ऊर्फ फारूख टकला हा मार्च १९९३ मधील बॉम्बस्फोटानंतर दुबईला पळाला होता. मुंबईतील त्या बॉम्बस्फोटात २५७ लोक ठार झाले होते. तो मुश्ताक महंमद मिया नावाने दुबईत राहत होता. त्याच्याकडून दुबईच्या भारतीय दूतावासाने दिलेला पासपोर्ट ८ फेब्रुवारी २०११ रोजी जप्त करण्यात आला होता. १९ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. ४ नोव्हेंबर १९९३ रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात टकला हा आरोपी क्रमांक १९६ होता व ४४ फरारी गुन्हेगारांपैकी तो एक होता.

मुंबई - धोकादायक घोषित करण्यात आलेला लोअर परळ पूल पाडण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पुलाचा काही भाग गंजल्यामुळे तो धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता. हा पूल तोडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या कामासाठी सात कोटी २५ लाखांची निविदा मंजूर झाली आहे. हा पूल तोडल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. लोअर परळचा पूल पाडणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याने त्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे ब्लॉक घ्यावा लागणार आहे. हा पूल पाडण्याचा पहिला टप्पा म्हणून शनिवारपासून काम हाती घेण्यात आले आहे. त्यात पुलावरील टाइल्स, दगड काढण्यात आले.तसेच, या पुलावरील संरक्षक जाळीदेखील काढून टाकण्यात येत आहे. त्यासाठी छोट्या जेसीबीची मदत घेण्यात येत आहे.

बंगळुरु - एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूच्या ३ वर्षानंतर त्याच्या मुलाला जन्म दिला आहे. ही कथा नाही तर सत्य आहे. ही संपूर्ण घटना बंगळुरु येथील आहे. मुलाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव सुप्रिया जैन असे आहे. सुप्रिया जैन आणि गौरव यांचा विवाह झाल्यानंतर ५ वर्षापर्यंत त्यांना अपत्य झाले नव्हते. त्य़ानंतर या दाम्पत्याने IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान २०१५ मध्ये गौरव यांचा एका अपघातात मृत्यू झाला.या घटनेच्या जवळपास २ वर्षानंतर सुप्रियाने पतीच्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया जैनने जसलोक हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. मुळची जयपूर येथील राहणारी सुप्रियाला आत्मविश्वास होता. तिने तिच्या आई-वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर सुप्रियाने हा निर्णय घेतला. ती म्हणते की, 'आम्ही मुलासाठी एक सुरुवात केली होती आणि आम्ही पुढचे पाऊल उचलू शकत होतो.' सुप्रियाने डॉ. फिरूजा पारिख यांच्यासोबत चर्चा केली आणि यानंतर आई बनण्याचा निर्णय घेतला.


लंडन - नोबेल शांतता पुरस्काराने गौरविले गेलेले संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी आलेले ते पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकी मुत्सद्दी होते. १ जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर २००६ अशी त्यांचा कार्यकाल होता. मात्र २०१३पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रांसाठी अन्य जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडल्या होत्या.सोविएत युनियनची पडझड झाल्यानंतर सहा वर्षांनी अन्नान संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी आले होते. त्यानंतर ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर अमेरिकेने इराकवर केलेला हल्ला; या कसोटीच्या क्षणी ते या पदावर होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांना मानवतावादी कार्यासाठी मोठय़ा प्रमाणात सज्ज केले होते. जागतिक दहशतवादविरोधी लढय़ाबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील एड्स रोखण्यापासून ते जगभरातील आरोग्य प्रश्नांवरील आणि दारिद्रय़ निर्मूलन कार्याला त्यांनी मोठी चालना दिली होती. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना २००१मध्ये नोबेल शांतता पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठित नागरी पुरस्कार देण्यात आला होता. घाना या देशांत ८ एप्रिल १९३८ रोजी जन्मलेले अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ राहावा यासाठी संयुक्त राष्ट्र विकास समूहाची स्थापना केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रोहिंग्या आणि सीरियातील शरणार्थीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या ‘दी एल्डर’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाबद्दल जागतिक स्तरावर शोक व्यक्त होत आहे.


लंडन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या जबीर मोती याला अटक करण्यात आली आहे. लंडनमधून त्याला अटक करण्यात आली. दाऊदचा उजवा हात अशीही त्याची ओळख आहे. पाकिस्तानने त्याला नागरिकत्व बहाल केले आहे.लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी जबीर मोती याला शुक्रवारी हिल्टन हॉटेलमधून अटक केली. इंग्लंड, यूएई आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या दाऊदच्या काळ्या कारभारावर लक्ष ठेवण्याचे काम मोती करतो. तो दाऊद आणि डी कंपनीसाठी पैशासंबंधित व्यवहारही पाहतो. बनावट भारतीय नोटा, अवैध शस्त्रास्त्रं पुरवठा आणि मालमत्तेसंबंधित व्यवहारावर लक्ष ठेवण्याचं कामही त्याच्याकडे होते, अशी माहिती आहे. मोतीवर ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि इतर गुन्हांमध्ये गंभीर आरोप आहेत. पैशांचा पुरवठा दहशतवादी संघटनांपर्यंत करण्याचे काम मोती याच्या कडे होते असे सांगितले जात आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये शनिवारी संध्याकाळी उशीरा सुरक्षा रक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरजवळ सीमारेषा पार करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराकडून परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना संध्याकाळी सातच्या सुमारास सीमारेषेजवळ संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घोण्यासाठी शोधमोहिम सुरू केली. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी घेरले, त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले.

नाशिक - बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याचे काम बंद पाडून मजुरांना शिवीगाळ केली तसेच बंगलामालकाकडे जमिनीची मागणी करून ती न दिल्यास पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना जयभवानी रोडवरील भालेराव मळ्यात घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़संजय भालेराव (रा़ सरस्वती निवास) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सन्नी हिरालाल गाडेकर (२७) व विकी भावसार (३२, दोघे रा. मेघा किराणामागे, भालेराव मळा, जय भवानी रोड) यांनी मोबाइलवर फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली़ तसेच ११ व १२ आॅगस्ट रोजी भालेराव यांच्या बंगल्याचे सुरू असलेले काम बंद पाडले़ यानंतर भालेराव यांच्याकडे जमिनीची मागणी केली व ती न दिल्यास पाच लाख रुपयांची मागणी केली़ या प्रकारानंतर भालेराव यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गाडेकर व भावसार या दोघांना अटक केली आहे़

गडचिरोली - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हय़ांत हाहाकार माजवला आहे. पावसाने प्राणहानीबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्हय़ातील केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि यवतमाळ या सहा तालुक्यांत पावसाने कहर केला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.एक हजारावर घरांची पडझड झाली असून, अनेक गावे पुरांनी वेढली आहेत. जिल्हय़ात साथीच्या रोगांचाही उद्रेक होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॉलरा, डेंग्यू आणि अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत.चंद्रपूर जिल्हय़ात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून, नदी-नाल्याशेजारील कापूस, धान, तूर, सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. गोंडपिपरी तालुम्क्यातील वेडगाव, पोडसा, सकमुर, सोनापूरचा संपर्क तुटला आहे.गडचिरोली जिल्हय़ात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भामरागड तालुक्यातील अनेक गावे संपर्काबाहेरच आहेत. गोंदिया-भंडारा जिल्हय़ात मुसळधार पाऊस सुरू असून भंडाराजवळील शहापुरात घराच्या छतावर खेळत असलेल्या प्रशांत बागडे या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला.

तिरुवनंतपुरम - केरळमधला हाहाकार थांबायला तयार नाही. गेल्या २४ तासांत १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. एकूण बळींची संख्या तब्बल ३२५ इतकी आहे. एनडीआरएफ, आर्मी, नेव्हीचे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच नेव्हीच्या हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्न पोहचवण्याचे कार्यही युद्धपातळीवर करत आहे. एनडीआरएफच्या इतिहासातील हे आतापर्यंत सर्वात मोठे मदतकार्य आहे. एनडीआरएफने आतापर्यंत १० हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बचावासाठी एनडीआरएफच्या ५७ टीममधून १३०० लोक कार्यरत असून ४३५ बोट बचाव पथकात आहेत. बीएसएफ आणि आर ए एफ यांच्या पाच तुकडी देखील कार्यरत आहेत. एकूण ३८ हेलिकॉप्टर, २० एअरक्राफ्ट, २० विविध प्रकारची मालवाहतुकीची विमाने रसद आणत आहेत. इंजिनिअरींग टास्क फोर्सच्या दहा पथकाद्वारे ७९० लोक कार्यरत आहेत. नौदलाची ८२ आणि तटरक्षक दलाची ४२ पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

नवी मुंबई - घणसोली येथील अर्जुनवाडी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले आहे. सदर जागामालकाला नोटीस बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिडको व पालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी संयुक्तरीत्या कारवाई केली. मात्र, सदर परिसरात अशा प्रकारची अनेक अनधिकृत बांधकामे असून, त्यावरही कारवाईची मागणी होत आहे.पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अनधिकृत नळजोडणी वेळी घणसोली परिसरातील अनधिकृत बांधकामेही समोर आली आहेत. ही बांधकामे सुरू असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात चाळी व इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यावर कारवाईची मागणी होत असताना अर्जुनवाडी येथील संतोष चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी इमारत उभारणीसाठी जागेचे खोदकाम करून पायाभरणीचे काम सुरू होते, त्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याने ते बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिका व सिडकोच्या पथकाने संयुक्तरीत्या त्या ठिकाणी कारवाई केली, यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.ठाणे - कर्ज मिळवून देतो, असे सांगून घेतलेल्या रद्द धनादेशांवर मॅजिक पेन आणि बोगस पॅनकार्डद्वारे बँकेतून रक्कम काढणाऱ्या एका चौकडीला ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा गुन्हा बोगस पॅनकार्डमुळे उघडकीस आला असून या चौकडीकडून विविध मोबाइल कंपन्यांची २१ सीमकार्ड, १५ जणांचे बेअरर चेक, बँकेची बनावट ओळखपत्रे, दोन बोगस पॅनकार्ड आणि चार जणांच्या कर्ज प्रकरणांची कागदपत्रे आदींसह फसवणूक केलेली ४० हजारांची रोकडही हस्तगत केली आहे. तसेच त्यांनी ठाणे, मुंबईतही फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमिष दाखवणाऱ्या भामट्यांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, किंबहुना कुणाची फसवणूक झाली असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मुख्य सूत्रधार प्रसन्ना सावंत हा २०१४ पासून घराबाहेर असून तो कुटुंबीयांच्या संपर्कात नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या टोळीने वागळे इस्टेट, साकीनाका आणि घाटकोपर येथील नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे.रोहित परिहार (३६) रा. कावेसर, घोडबंदर , संजय दुबे (३५) रा. नवी मुंबई, मूळगाव उत्तर प्रदेश, प्रसन्ना सावंत (२५) रा. नवी मुंबई आणि रणजित सिंग (३५) रा. नवी मुंबई अशी चौकडीची नावे आहेत.आरोपींनी ठाण्यातील व्यावसायिक सुनील काळे (४८) यांच्या पत्नीने व्यक्तिगत कर्ज घेण्यासाठी विविध बँकांमध्ये केलेल्या आॅनलाइन अर्जांची माहिती काढली.बँकेचे एजंट असल्याचे भासवून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्जमंजुरीसाठी लागणारे काही दस्तावेज आणि दोन रद्द धनादेश घेतले होते. या रद्द धनादेशांवर मॅजिक पेनने केलेल्या खुणा खोडून या चौकडीने सरजोत जैन नामक व्यक्तीचे बनावट पॅनकार्ड दाखवून तक्रारदारांच्या बँकेतून ४० हजारांची रक्कम काढली होती.

विरार - दरवर्षी प्रमाणे यंदाही वसई नायगाव परिसरात फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मात्र, या वर्षी त्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. वसई मधील सनसिटी, गोगटे सोल्ट, उमेळमान, राजिवली आणि नायगाव येथे फ्लेमिंगो या पक्षांचे वास्तव्य तीन महिने असते. तर पक्षी प्रेमींनी त्यांचे हे मोहक रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी केलली पहावयास मिळत आहे. वसई सनसिटी भागत तर पक्षीप्रेमींची छायाचित्रे काढण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गर्दी होत आहे.दरवर्षी पावसाच्या साचलेल्या पाण्यावर हे परदेशी पक्षी येत असतात. चमचेकरकोचे, उघड चोच करकोचे, राखाडी बगळे, वारकरी बदक आणि अजूनही खूप वेगवेगळे पक्षी येथे हजेरी लावत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांची मोठी गर्दी असते.फ्लेमिंगो या पक्षाला रोहित किंवा हंस हे पारंपारीक नाव आहे. हा पाहुणा दरवर्षी युरोपहून वसई नायगाव मध्ये पाहुणचारासाठी येत असतो. याचे मूळ वास्तव्य हे युरोप मधील सायबेरियात आहे. पावसाळ्यात हे पक्षी इतर ठिकाणी जात असतात. यंदा त्यांनी वसईत मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येत आहे.ऑनलाईन - पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. पहिल्या दिवसातल्या खेळाची महत्वाची गोष्ट म्हणजे, गेले काही दिवस आपल्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेला  सामन्यात सूर गवसला आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत अजिंक्यने पहिल्या दिवसाच्या खेळात १५९ धावांची शतकी भागीदारी केली. कर्णधार विराट कोहलीचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. तो आदिल रशिदच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकडे झेल देत माघारी परतला. याचसोबत अजिंक्यनेही ८१ धावा करत विराटला भक्कम साथ दिली.

दरम्यान ट्रेंट ब्रिजवरील पहिल्या दिवसाच्या खेळात तब्बल १० विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाने भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढलेल्या नाहीयेत. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. सौरवने भारताबाहेर २८ कसोटी सामन्यांमध्ये १६९३ धावा केल्या आहेत. कालच्या खेळीत विराटने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

१ – कसोटी क्रिकेट पदार्पणात षटकाराने डावाची सुरुवात करणारा ऋषभ पंत पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

२ – इंग्लंडमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर. विराटने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ८ वेळा ही कामगिरी केली आहे. महेंद्रसिंह धोनी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, धोनीने आतापर्यंत १० वेळा अशी कामगिरी केली आहे.

२ – कसोटी क्रिकेटमध्ये नव्वदीत बाद होण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली आहे.

३ – आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसात नोंदवलेली ३०७ ही धावसंख्या तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. २००९ साली वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारताने ३७५ तर २००१ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३७२ धावसंख्या उभारली होती.

४ – इंग्लंडमध्ये कर्णधार या नात्याने पहिल्या ५ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर. या यादीत महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली हे कर्णधार पुढे आहेत.

५ – भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऋषभ पंत पाचवा लहान खेळाडू ठरला आहे.

१२ – कसोटी क्रिकेटच्या इतिहासात षटकाराने डावाची सुरुवात करणारा ऋषभ पंत १२ वा खेळाडू ठरला आहे.

१०० – जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा, मुथय्या मुरलीधरननंतरचा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.

३०७ – इंग्लंडमध्ये पहिल्या दिवसाअखेरीस भारताने नोंदवलेली ३०७ ही धावसंख्या तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. १९९० साली ओव्हल कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस ३२४ धावा केल्या होत्या.

ऑनलाईन - मिठाचा प्रमाणाबाहेर वापर हा आरोग्यास हानीकारक असल्याचे आपण आजवर ऐकत आलो आहोत. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी करावे असा सल्ला डॉक्टर देतात. पण मीठ आरोग्यासाठी वाटते तितके हानीकारक नाही, असे नव्या संशोधनातून दिसून आले आहे. योग्य प्रमाणात मीठ सेवन केल्याने शरीराला उपयोगीच ठरते असे संशोधकांचे म्हणणे आहे. याविषयीचे संशोधन लॅन्सेट या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.द प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रुरल एपीडेमिओलॉजी (प्युअर) स्टडी नावाने हे संशोधन करण्यात आले. त्यात १८ देशांतील ३०० जनसमुदायांमधील ९०,००० लोकांचा ८ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला. या लोकांच्या आहारातील मिठाचे प्रमाण आणि त्याचा आरोग्यावरील परिणाम अभ्यासण्यात आला. त्यातून असे दिसून आले की मीठ आजवर समजले जात होते तितके हानीकारक नाही.जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो हे खरे असले तरी दररोज प्रमाणाबाहेर मीठ खात राहिल्यास तो परिणाम होतो. ज्या जनसमुदायांमध्ये दररोज अडीच चमचे मीठ किंवा ५ ग्रॅम सोडियम खाल्ले जाते त्यांनाच रक्तदाब किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवतो, असे या अभ्यासात निष्पन्न झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार लोकांनी दररोज २ ग्रॅमपेक्षा कमी सोडियम आहारात घ्यावे. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सल्ल्यानुसार दररोज २.३ ग्रॅम सोडियम खावे. रोज १.५ ग्रॅम सोडियम हे आदर्श प्रमाण आहे.पुणे - २० ऑगस्ट २०१३ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांचा शोध न लागल्याने सरकार, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आज तब्बल ५ वर्षांनी याप्रकरणातील महत्त्वाचा आरोपी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या पुण्याच्या कोर्टात हजर करणार आहेत.सीबीआयचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. सीबीआय आणि एटीएसने संयुक्तरित्याही कारवाई केली. सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा रहाणारा आहे. त्याला औरंगाबादच्या निराला बाजारमधून अटक करण्यात आली आहे. निराला बाजारमध्ये कापडाच्या दुकानात तो अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याचे आई-वडील हयात नसून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसोबत तो कुंवारफल्ली येथे राहतो. २० अॅगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती . याप्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी एकाने हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. अवैध्य शस्त्रसाठ्या प्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचा देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबूली चौकशी दरम्यान मिळाली आहे. २० ऑगस्टला ५ वर्षे पूर्ण होतील. सीबीआयने एवढ्यावर न थांबता खूनाशी संबधित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई करावी असे हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे.

मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ६३ हजार ७७२ जणांनी घरासाठी नोंदणी केली आहे. कोकण मंडळाच्या या लॉटरीची सोडत २५ आॅगस्टला होईल. म्हाडाने आॅनलाइन लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही लॉटरी आठवडाभर पुढे ढकलली होती. मात्र त्यानंतरही ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद कायम राहिला. त्यामुळे यापूर्वी लाखोंची होणारी नोंदणी यंदा केवळ हजारांवर येऊन थांबली आहे. दरम्यान, ८ आॅगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी दिलेली मुदत १८ आॅगस्टपर्यंत देण्यात आली.म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यातील ही सर्वात मोेठी लॉटरी आहे. मात्र लॉटरी जाहीर झाल्यापासून लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटाला दिलेल्या झुकत्या मापामुळे तसेच काही ठिकाणी घरांच्या किमती अवाजवी असल्याने या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.

तिरुवनंतपुरम - मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भीषण पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार गेल्या १०० वर्षांतील ही सर्वात भीषण परिस्थिती आहे. जवळपास ८० धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. यामध्ये आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती ओढावली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले. ते शनिवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. यावेळी केरमधील आमदारांनी पंतप्रधानांकडे मदतीची याचना केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) आणि भारतीय सैन्यदलाच्या ७०० जवानांकडून याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. ही सर्व पथके अद्ययावत सुविधांनी आणि उपकरणांनी सज्ज आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये ४,८०० लोकांना वाचवण्यात आले आहे. लोकांना वाचवण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करु, अशी माहिती ब्रिगेडियर अरुण सीजी यांनी दिली.

जळगाव - अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसाचे वातावरण असल्याने चालक आणि वाहक हे एसटीपासून दूर असल्याने थोडक्यात बचावले आहे. अमळनेरहून मांडळ येथे जाणारी बस रात्री साडे नऊ वाजता मांडळ येथे पोहचते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बस क्र. एम एच १४ बी टि ४१९ ही रात्री साडे नऊला मांडळला पोहचली होती. 

नांदेड - हिंगोली जिल्ह्यात १५ दिवसांच्या खंडानंतर पावसाने दमदार पुनरागमन केलेय. मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारोळा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पारोळा ओढा ओसंडून वाहत आहे . पुलावरून पाणी वाहत असल्याने पारोळा, भांडेगाव, साटंबा, जामठी, सावा, नवलगव्हाण या सहा गावांचा संपर्क तुटला आहे.२ दिवसांपासून सहा गावचे नागरिक आणि प्राणी एकीकडे अडकले आहे. ओढ्यावरच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विशेष म्हणजे एका व्यक्तीला अतिशहाणपणा नडला. रस्ता बंद असतानादेखील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून पूल पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. मात्र जवळच्या नागरिकांनी त्या व्यक्तीला ओढ्याबाहेर काढले. मागील २४ तासांत जिल्ह्यात ६५ मीमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ६३% सरासरी इतका पाऊस झाला आहे.

नवी दिल्ली - वैमानिकांना मिळणारा उड्डाण भत्ता द्यावा, अन्यथा विमानांचे उड्डाण होणार नाही, असा इशारा एअर इंडियाच्या वैमानिकांनी कंपनीला दिला आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना जुलै महिन्याचे मूळ वेतन मिळाले असले तरी उड्डाण भत्ता देण्यात आलेला नाही, त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे.इंडियन कमर्शिअल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) या बाबत एक पत्र पाठविले असून त्यामध्ये इशारा देण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार १४ ऑगस्टला मिळाला, मात्र पगारातील मोठा हिस्सा असलेला उड्डाण भत्ता देण्यात आलेला नाही. यापूर्वीही पगार उशिराने मिळत असल्याबाबत त्याचप्रमाणे उड्डाण भत्त्याचा पगारामध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. उड्डाण भत्ता मिळाला नाही तर काम करणार नाही, असे वैमानिकांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पाठविण्यात आलेल्या पत्रात, आमच्या पत्राबाबत व्यवस्थापन सकारात्मक विचार करील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सकारात्मक विचार करण्यात आला नाही तर वैमानिक काम करणार नाहीत आणि त्याच्या गंभीर परिणामांना व्यवस्थापन जबाबदार असेल, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget