September 2018


मुंबई - आॅनलाइन कंपन्यांच्या निषेधार्थ देशभरातील ७ कोटी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंद पुकारला आहे. अ. भा. व्यापारी महासंघाने या बंदची हाक दिली आहे.वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार व आॅनलाइन कंपन्यांमुळे पारंपरिक किरकोळ व्यापार संकटात आला आहे. यावर नियंत्रण आणण्यास सरकार धोरण आणत नसल्याचा महासंघाचा आरोप आहे. त्यासाठीच हे आंदोलन होत आहे. देशातील २० हजार व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होतील. सर्व घाऊक बाजारपेठा, किरकोळ बाजारपेठा व किरकोळ दुकानेही बंद असतील. देशभरातील १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प होईल, असा दावा महासंघाने केला आहे. विदर्भातील पेट्रोल पंपही दुपारी बंद राहतील. आॅनलाइन विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांच्या संघटनेनेही स्वतंत्रपणे बंदची हाक दिली. त्यामुळे औषध दुकानेसुद्धा बंद असतील.

मुंबई - राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला.काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह विविध काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 'राफेल खरेदीची चौकशी झालीच पाहिजे, पंतप्रधान इस्तीफा दो..' अशा घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. संजय निरुपम यांच्यासह अनेक मोर्चेक-यांनी तर 'मेरा पंतप्रधान चोर है' अशा आशयाचे टी-शर्ट घातले होते. महालक्ष्मी रेसकोर्स येथून सुरू झालेला हा मोर्चा आॅगस्ट क्रांती मैदानावर पोहोचताच त्याचे सभेत रूपांतर झाले. काँग्रेस आघाडीच्या काळातील करारानुसार एका राफेलची किंमत ५५० कोटी होती. मोदी सरकारने एका विमानाची किंमत १६५० कोटी केली. या व्यवहारात गडबड आहे. एका विमानामागे ११०० कोटी कोणाच्या खिशात घातले जात आहेत, याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावे अशी मागणी खर्गे यांनी केली.
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षाने पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच शरद पवारांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे.विशेष म्हणजे काल पवारांनी मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचे सांगितले होते आणि आता पक्षाने ही वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने लढाऊ विमाने असलेल्या राफेलच्या खरेदी किमतीबाबत खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच मीडियाने पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
.

मुंबई - आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीचा झटका देणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल २२ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागलं आहे. पेट्रोलने आधीच नव्वदी पार केली असून लवकरच शंभरी गाठेल अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर ९०.५७ रुपये प्रति लिटर झाला असून डिेझेलचा दर ७९.० रुपये प्रति लिटर झाला आहे. तसंच दिल्लीत पेट्रोलचा दर ८३.२२ वर पोहोचला असून डिझेलचा दर ७४.४२ रुपये झाला आहे. सोमवारी पेट्रोल ११ पैशांनी, तर डिझेल ५ पैशांनी महागले होते. तर मंगळवारी पेट्रोल १४ पैसे तर डिझेल १० पैशांनी महागलं होतं. यानंतर दोन दिवस दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र पुन्हा एकदा इंधनात दरवाढ झाली आहेनवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा कवच मिळाले आहे. देशातील निवडक व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात येते. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत होती. गुप्तचर विभागाच्या समीक्षेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षेअंतर्गत शाह यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करेल आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागेल. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अमित शाहंच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाह यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएलचे पथक कार्यक्रमस्थळी जाऊन निरीक्षण करेल. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांच्या सुरक्षेसंबंधी एक समीक्षा बैठक झाली होती. यामध्ये आयबीने त्यांना उच्च स्तरीय धोका असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा पुरवण्याची शिफारस केली. शाह यांना २४ तास सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात येईल. त्याचबरोबर ३० कमांडो प्रत्येक क्षणी त्यांच्या अवतीभोवती असतील. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेत राज्यातील स्थानिक पोलीसही असतील.
सध्या एएसएलचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षा सेवा देतात. दरम्यान, ज्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवण्यात येतात. एसपीजी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात येते. वेळोवेळी या व्यक्तींच्या सुरक्षेची समीक्षा केली जाते. त्यानुसार संबंधित व्यक्तीची सुरक्षा वाढवायची किंवा कमी करायची याचा निर्णय घेतला जातो.माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मालमत्तेचा लिलाव होईल. त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे ४.३४ कोटी रुपये बुडवले आहेत.

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मालमत्तेचा लिलाव होईल. त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे ४.३४ कोटी रुपये बुडवले आहेत. बँक कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करेल.पंकज व समीर हे दोघे आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २००६ पासून संचालक आहेत. सत्यान केसरकर हे २०१० मध्ये कंपनीचे संचालक झाले. त्यानंतर या कंपनीने २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यात साखर कारखाना उभा केला. २०१५ मध्ये केंद्राच्या साखर निर्मिती धोरणांतर्गत कंपनीने ३.८६ कोटींचे कर्ज घेतले होते. या धोरणानुसार कर्जावरील व्याज पहिल्यावर्षी केंद्र भरणार होते. त्यानंतर चार वर्षाचे व्याज राज्य सरकार भरणार होते. पण कर्ज घेतल्यानंतरही कारखाना ठप्प झाल्याने कर्ज बुडित खात्यात गेले. आता व्याजासह वसुलीसाठी बँकेने लिलावाची नोटीस काढली आहे. या कंपनीच्या नावावरील ४२५० चौरस मीटर भूखंडासह त्यावरील ६०० चौरस मीटर कार्यालयाचाही लिलाव होईल.
अकोला - अकोल्यातील बहुचर्चित बिल्डर किशोर खत्री हत्येप्रकरणी दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका राजकीय पक्षाचा माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे आणि निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी उर्फ जसवन्तसिंह या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली. ३ डिसेंबर २०१५ ला बिल्डर किशोर खत्री यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.आरोपी एका राजकीय पक्षाचा माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे आणि निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी उर्फ जसवन्तसिंह या दोघांना अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ३ डिसेंबर २०१५ रोजी बिल्डर किशोर खत्री याची आर्थिक देवाण घेवाणातून बंदुकीच्या गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा आरोप रणजित चुंगडे आणि त्याच्या ३ साथीदारांविरुद्ध होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी २७ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात झाली.कट रचून हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपी रणजितसिंह चुंगडे आणि साथीदार जस्सी उर्फ जसवंतसिंह याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.बीड - बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांच्यानंतर आता अजून एका महिला कॉन्स्टेबलने लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे. ललिता साळवे यांना लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे म्हणून त्यांनी पदभार स्विकारला होता. यानंतर ललिता साळवेची ओळख ‘ललित’ अशी झाली. ललिता साळवे यांच्याप्रमाणे रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या (RPSF) महिला कॉन्स्टेबलनेही अशीच परवानगी मागितली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक या प्रकल्पाविरोधात आक्रमक आहेत. मात्र या प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनीच तसे संकेत दिले आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्प करताना सागरी मार्ग महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. यासंदर्भात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड म्हणजेच आर आर पी सी एल कंपनीशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु झाली. मात्र रिफायनरी प्रकल्प नक्की कुठे होईल यानंतरच पुढली दिशा ठरणार असल्याचं कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोकण रेल्वेच्या सुरु असणाऱ्या विविध प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली. रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यात सरकारकडून हा प्रकल्प रेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प करताना सागरी मार्ग महत्वाचा ठरणार आहे.

औरंगाबाद - स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या २१ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप असलेले तत्कालीन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा मंजूर अटकपूर्व जामीन जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायधीश अंजली खडसे यांनी रद्द करताना श्रीरामे यांचा अटी शिथिल करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर तक्रार पाठवल्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, त्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान त्यांनी अर्ज मागे घेतला. जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्या. एस. एस. भीष्मा यांनी राहुल श्रीरामेंना यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. नंतर श्रीरामे यांनी ठाण्यातील हजेरी रद्द करण्यासाठी अर्ज केला. दरम्यान, तो जामीन रद्द करण्यात यावा, असा विनंती करणारा अर्ज पीडिताने अ‍ॅड. राजेश काळे यांच्या मार्फत केला. या दोन्ही अर्जावर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अंजली खंडसे यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली असता श्रीरामे यांनी शहर सोडून जाण्यास हरकत नाही, मात्र त्यांची पोलीस ठाण्याची हजेरी सुरू ठेवावी असा युक्तिवाद अ‍ॅड. राजेश काळे केला. अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, हा अर्ज न्यायालयाने मंजूर केल्यामुळे श्रीरामेंचा जामीन आपोआप रद्द झाला. खंडपीठात निर्णयाला आव्हान देण्यासाठी १५ दिवसांची अंतरिम स्थगिती दिली. तर श्रीरामे यांचा फौजदारी अर्ज फेटाळून लावला.


कोल्हापूर - कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत आहे. गेल्या दोन दिवसांत स्वाइन फ्लूने चौघांचा बळी घेतला आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या १४ वर पोहचली आहे. मंगळवारी तपासण्यात आलेल्या संशयित रुग्णांपैकी पाच रुग्ण बाधित आढळले आहेत. वातावरणातील बदलांमुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिराळा तालुक्यातील बिउर येथील धनाजी नामदेव पाटील (वय ३५), शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील श्रीपती शंकर पाटील (वय ६०) यांचा मंगळवारी (ता. २५) मृत्यू झाला. शहरातील जरगनगर येथील अडीच वर्षाच्या हर्षाली बाळासाहेब शिरगावकर या बालिकेचा व गडहिंग्लज तालुक्यातील हसुरचंपू गावातील दुंडप्पा सिद्धाप्पा दुंडगे (वय ६४) यांचाही सोमवारी खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. मुंबई - प्राध्यापकांच्या मागण्या, काम बंद आंदोलन यांबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे. दरम्यान प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये कोणतेही ठोस आश्वासन नसल्याचा आक्षेप घेत संघटनेने काम बंद आंदोलन कायम ठेवले आहे.विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या संघटनेने मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. तक्रार निवारण समितीची बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.या बैठकीच्या इतिवृत्तात कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असे प्राध्यापक संघटनेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी संघटनेची मागणी आहे. प्राध्यापक संघटनांच्या मागण्यांपैकी प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवणे आणि तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करणे या मागण्यांबाबत कार्यवाही सुरू आहे असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.त्याचप्रमाणे प्राध्यापकांच्या यापूर्वीच्या आंदोलन काळातील ७१ दिवसांच्या वेतनाबाबत उच्चशिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे शासन आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे.


शिमला - हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीति जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या जवळपास ६७२ जणांची सुखरुप सुटका करण्यात सुरक्षायंत्रणेला यश आले आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे आणि बर्फामुळे या भागातील रस्ते बंद झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) रस्ते मार्गाने सुरु केलेल्या अभियानात ६४१ जणांना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना लाहोलच्या शिशु सुरुंगच्या मार्गाने मनालीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यामध्ये, भारतीय वायुसेनेनेही मदतीचा हातभार लावत३१ जणांना हवाई मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

उत्तर प्रदेश - आमदार सोम यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धमकीचा फोन आला नसल्याचे माध्यमांना सांगितले. दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु अशी धमकी देण्यात आली होती, असे ते म्हणाले.भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या उत्तर प्रदेशमधील मीरत येथील घरावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. तसेच हँड ग्रेनेडही फेकण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार सोम हे सुरक्षित आहेत. जो ग्रेनेड फेकण्यात आला होता. त्याचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

नवी दिल्ली - नौदलाचे वाईस चीफ एसबी देव यांनी चुकून स्वत:वरच गोळी झाडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना दिल्लीतील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पीटल (आरआर हॉस्पीटल) मध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या गुडघ्यात प्लेट टाकण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.एसबी देव यांच्याकडून चुकून स्वत:वर गोळी झाडली गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तरीही दिल्ली पोलीस याप्रकणी प्राथमिक चौकशी करत आहेत. वाईस चीफ एसबी देव हे जून १९७९ मध्ये फायटर पायलट होते तर जानेवारी २०१७ मध्ये एअरफोर्सचे वाईस चीफ बनले. काही दिवसांपूर्वीच राफेल वर त्यांची प्रतिक्रिया आली होती. राफेल हे सुंदर एअरक्राफ्ट असल्याचे त्यांनी म्हटले होते.

सांगली - सांगली जिल्ह्यातील कुरलप गावात असलेल्या मिनाई प्राथमिक आश्रम शाळेत पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मिनाई प्राथमिक आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद पवार याने पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. याप्रकरणी ६० वर्षांच्या अरविंद पवारला अटक करण्यात आली.पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. चौकशीत अन्य तीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचीही माहिती पुढे आलीय. शाळेत घडत असलेल्या प्रकारांची शिक्षकांनाही कुणकुण लागली होती. पीडित मुलींनी शिक्षकांना या प्रकराची कल्पना दिली पण शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. नराधम अरविंद पवार अत्याचारापूर्वी मुलींना कसल्या तरी गोळ्या खायला देत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात अरविंद पवार या नराधमाला मनीषा कांबेळे नावाची महिला मदत करत असल्याचे कळल्यानंतर मनीषा कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे.


राजस्थान - राजस्थानमध्ये जमावाकडून मारहाण करत हत्या करण्यात आल्याची अजून एक घटना समोर आली आहे. मासेमारी केल्याने मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाला. राजस्थानमधील चितौडगडमध्ये ही घटना घडली आहे. पीडित तरुण आपल्या मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी मंदिराजवळील नदीकिनारी आला होता. मात्र गावकऱ्यांनी मासेमारी करण्यावरुन त्याला बेदम मारहाण केली.हे प्रकरण १७ सप्टेंबर रोजीचे आहे. २२ सप्टेंबरला उदयपूरच्या सरकारी रुग्णालयात तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतले आहे.माहितीनुसार, १७ सप्टेंबरला अजहर खान आपले तीन मित्र शाहनवाज खान (२३), नौशाद खान (४७) आणि अन्वर खान (४१) यांच्यासोबत रुपारेल नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला होता. तिथे उपस्थित लोकांची त्यांच्यावर नजर होती. मासे मारण्यासाठी त्यांना जाळं टाकताच मंदिर अपवित्र करत असल्याचा आरोप करत काहीजणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी बाकी तिघेजण पळून गेले, मात्र अजहर खान तोल गेल्याने तिथेच अडखळला. गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. पळून गेलेल्या तरुणांना अजहरच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अजहर जखमी अवस्थेत पडला होता. त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींच्या संख्येत मोठी कपात करत नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व दुप्पट करण्याचा निर्णय मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.वर्षानुवर्षे राज्य बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँकेचे वर्चस्व आहे. मात्र आता भाजपाचे वर्चस्व असलेल्या नागरी सहकारी बँकांना झुकते माप देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, खा. संजय पाटील, प्रशासक मंडळाचे संचालक अविनाश महागावकर व संजय भेंडे आदी उपस्थित होते. सभासदांनी संचालकांची रचना बदलण्याचा एकमताने निर्णय घेतला. नवीन रचनेनुसार, बँकेच्या संचालक मंडळात २१ सदस्य कायम असतील. जिल्हा बँकांचे प्रतिनिधीत्व १२ वरून ७ करण्यात आले. नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व २ वरून ४ वर नेण्यात आले. सुमारे एक लाख गृहनिर्माण सोसायट्यांना १ जागा देण्यात आली आहे. साखर कारखान्यांसाठी दोन व पाच राखीव जागा कायम असतील. दोन तज्ज्ञ सदस्यसुद्धा निवडून येणार आहेत, असे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. जिल्हा बँक आता नागरी सहकारी बँकांनासुद्धा कर्ज वाटप करेल. बँकांनी वेळेत कर्जाची परतफेड केल्यास पुढील कर्जासाठी १ टक्का सवलत देण्यात येईल. राज्यात ५०१ नागरी सहकारी बँका आहेत.
मुंबई - पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील बाजू पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. २८ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे प्रवाशांनी उत्तर दिशेकडील पायऱ्यांचा वापर करण्याच्या सूचना रेल्वेने दिल्या आहेत.पश्चिम रेल्वेवरील स्थानकांतील पुलांसह रोड ओव्हर ब्रिज आणि पादचारी पूल या पुलांची पाहणी नुकतीच करण्यात आली. या पाहणीनुसार, चर्नी रोड स्थानकातील फलाट क्रमांक ४ वरील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेला केल्या आहेत. पुलाच्या दक्षिण दिशेला असलेल्या पायºयांची त्वरित डागडुजी करण्याचा सल्ला विशेष पथकाने पश्चिम रेल्वेला दिला होता. यानुसार शुक्रवार, २८ सप्टेंबर ते सोमवार, २६ नोव्हेंबर या ६० दिवसांत हे काम केले जाणार आहे.

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही घट झाली आहे. मुंबई शहरात १०.७२ टक्क्यांची तर, उपनगरात २९.२६ टक्क्यांची घट झाली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ हजार ३४३ कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट समोर ठेवले असून या कालावधीत ५ हजार ५०१ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात विभागाला यश आले आहे. गतवर्षी या कालावधीत ४ हजार ५९९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता झालेली ही वाढ १९.६१ टक्के इतकी आहे. नियोजित उद्दिष्टाच्या एकूण ३५.८६ टक्के महसूल जमा करण्यात विभागाला यश आले आहे.कोल्हापूर विभागाचे उद्दिष्ट १,२९० कोटी रुपये एवढे असताना आतापर्यंत या विभागाकडून ४५७ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २२.४४ % आहे.औरंगाबाद विभागाचे उद्दिष्ट ४,८२४ कोटी असून आतापर्यंत १८९२ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ही वाढ १८.५२ % इतकी आहे. ठाणे विभागाचे उद्दिष्ट २,६९९ कोटी असून आतापर्यंत ८१६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही १६.६० % वाढ आहे. तर नागपूर विभागाचे उद्दिष्ट ८८२ कोटी असून आतापर्यंत केवळ १८६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये २९.५८ टक्क्यांची घट झाली आहे.


नवी दिल्ली - केंद्र सरकार २८ सप्टेंबरला 'सर्जिकल स्ट्राइक'चा दुसरा वर्धापन दिन दणक्यात साजरा करणार आहे. 'पराक्रम पर्व' असे या कार्यक्रमाचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला या कार्यक्रमांची सुरूवात करणार आहेत. याचा मुख्य कार्यक्रम इंडिया गेटवर होणार आहे. सर्व देशभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी एक गीतही तयार करण्यात आले आहे. प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिले आहे. ''मेरा देश मेरी जान है, मेरा गर्व है अभिमान है. ये अभिमान है जिंदा क्योंकि सीमा पर है वीर जवान.. असे त्या गीताचे शब्द आहेत.प्रसिद्ध गीतकार प्रसुन जोशी यांनी लिहिलेलं हे गीत गायक कैलाश खेर यांनी आपल्या बुलंद आवाजात गायले आहे. एक दोन दिवसांमध्ये हे गीत रिलीज करण्यात येणार आहे. NSS कॅडेट्सना या निमित्त भारतीय जवानांच्या पराक्रमाबद्दल माहिती दिली जाणार आहे.सर्व राज्य सरकारांनीही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मान्यता दिली असून पंजाब सरकार मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करणार आहे. लष्कराच्या १०० कॅन्टोंमेंट बोर्डात पराक्रम पर्व चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांनीही सहभागी होण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरगाव - तालुक्यातील मुर्शतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्त्रीलंपट शिक्षकाने अभ्यासाच्या नावाखाली शाळेतच लैंगिक शिक्षणाचे धडे सुरू केले. त्याची वाच्यता विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्यांचे पालक थेट शाळेत धडकले व त्यांनी सदरच्या शिक्षकास चांगलाच चोप देत त्याची धुलाई केली. मुख्याध्यापक व सह शिक्षकासह सर्व जण प्रकरण निपटण्याच्या प्रयत्नात होते.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या या शाळेत परिसर अभ्यासाच्या नावाखाली पाचवीच्या विद्यार्थ्यांना आहार विहार आणि कुटुंबामधील मुला-मुलीमध्ये आहारात बदल का केला जातो, या विषयावर धडा शिकवला जात होता.मात्र या शिक्षकाने त्या धडय़ाऐवजी चक्क लैंगिकतेवर धडा सुरू केला. ही बाब काही विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर पालकांना सांगितली.त्यामुळे पालकांत तीव्र संतापाची लाट उसळली. मंगळवारी सदर शिक्षक शाळेत आल्याचे कळताच पालकांनी त्याची वर्गातच धुलाई केली. धुलाईनंतर तो गयावया करू लागला. माफी मागू लागला. सदर शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्या शिक्षकाला पाचवीच्या वर्गावरून काढून चौथीच्या वर्गावर टाकले. सदर शिक्षकाला त्वरित निलंबित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई - कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली. कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला बोनस दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा, या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदरावर आडसूळ, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि डीएफ अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी भारतीय रेल्वेप्रमाणे रेल्वे कामगारांनाही बोनस मिळाला पाहिजे आणि तो कसा देण्यात यावा, यावर चर्चा झाली. त्यावेळी दिवाळीचा बोनस देण्याचे आश्वासन संजय गुप्ता यांनी यावेळी दिले.


नागपूर - महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात महापालिका तांत्रिक विभाग कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. भाजप नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्या दिराने महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू करण्यात आले. नगरसेविकेचा दिर विक्की ठाकूर विरुद्ध हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विक्की ठाकूरवर कडक कारवाईची मागणी करीत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन करत आहेत. नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाने महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेध करीत नागपूर महापालिका तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला.


मुंबई - इंधन दरवाढीमुळे होणारी सामान्यांची होरपळ सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. मुंबईतपेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी ९०.२२ रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातील वाढदेखील सुरुच आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलचा दर ७८.६९ रुपयांवर पोहोचला आहे.

रत्नागिरी - नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. प्रकल्प उभारणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांनी ही समिती स्थापन केली आहे. समिती सहा महिन्यात त्यांच्या शिफारशी कंपनीचे प्रवर्तक व सरकारला देणार आहेत. रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. तसेच सत्ताधारी शिवसेनेसुद्धा हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन केलेली समिती प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे न्यायोचित पद्धतीने संपादन करणे, प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन तसेच समस्यांचे पूर्ण निराकरण करण्यास कार्यपद्धती अर्थात रोडमॅप आदींबाबत विस्तृत अभ्यास करेल. माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ. विजय केळकर, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा. अभय पेठे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. जे. बी. जोशी व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. बी. कद्रेकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे.पुणे - राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर आहेत. प्राध्यापकांच्या एमफुक्टो संघटनेने पुकारलेल्या या संपात २५ हजार प्राध्यापकांचा सहभाग आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकीत ७१ दिवसांचे वेतन मिळावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.प्राध्यापकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक होणार आहे. राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. यासाठी प्रमुख संघटनांना बोलावण्यात आलं असलं, तरी बेमुदत संपावर ठाम असल्याची माहिती एमफुक्टोचे मधू परांजपे यांनी दिली. एमफुक्टो संघटनेच्यावतीनं त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. याआधी संघटनेकडून राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती. याशिवाय ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संपदेखील करण्यात आला होता. मात्र या आंदोलनाची शासनानं काहीच दखल न घेतल्यानं त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी दिली.

नाशिक - महाराष्ट्र राज्यातील पहिली कर्जमुक्त महानगरपालिका म्हणून नाशिक मनपाची ओळख निर्माण झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शिस्तबद्ध कारभार आणि कामात गतिमानता आलेल्या नाशिक मनपाने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. आयुक्त मुंढे यांनी स्थायी समितीत कर्जफेडीचा प्रस्ताव मांडला होता आणि त्याला स्थायीने मंजूरी दिली. या निर्णयामुळे महापालिकेचे वार्षिक तीन कोटी रुपये वाचणार आहेत.नाशिक मनपाने विविध कामांसाठी १३० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या रकमेतून कुंभमेळ्याची कामे आणि शहरातील घरकुल योजनेची कामे झाली. यापैकी मनपाकडून ३२ कोटींची परतफेड केली गेली आहे. या कर्जावर ९.६० टक्के व्याजदराने महापलिकेला पैसे भरावे लागतात. तर महापालिकेकडे असलेल्या एफडीवर साडेसहाच टक्के व्याजदर मिळत होते. त्यामुळे महपालिकेला दरवर्षी ३ कोटी अतिरिक्त भर अंगावर घ्यावा लागत होता.


बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवण्यात आले आहे. हे नॉमिनेशन तामिळनाडूमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या रुपात जगातील सर्वात मोठ्या स्वास्थ्य योजनेची सुरुवात केली. यासाठी त्यांना नोबल शांती पुरस्कार मिळायला हवा, असा उल्लेख या नॉमिनेशनमध्ये करण्यात आला. हे नॉमिनेशन सुंदरराजन यांच्या पतीने केले. ते एका खाजगी युनिव्हर्सिटीत नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.नवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरण्यापूर्वी त्याला अपात्र ठरवावे की नाही तसेच वकील असलेल्या खासदार आणि आमदारांना प्रॅक्टिस करता येणार की नाही, अशा दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुप्रीम कोर्ट  आज  निर्णय देणारआहे.गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारसह याचिकाकर्त्यांनी त्यांची बाजू मांडली होती. युक्तिवाद संपल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आरोपपत्र दाखल असताना लोकप्रतिनिधीला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे की नाही, यावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.युक्तिवादादरम्यान केंद्र सरकारची बाजू मांडताना के. के. वेणुगोपाळ यांनी राजकीय यंत्रणा स्वच्छ करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेतूची प्रशंसा केली होती. मात्र, कायदा तयार करण्याच्या क्षेत्रात न्यायपालिका शिरकाव करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.


हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशला पावसाने झोडपले आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाच्या प्रवाहात मनालीतील बसस्थानकावर उभी असलेली व्होल्वो बस पाण्यात वाहून गेली. सुदैवाने, बस रिकामी होती आणि त्यामुळे कुणी जखमी झाले नाही.व्यास नदी दुथडी भरून वाहत असल्याने कुलू आणि मनाली दरम्यानचा संपर्क तुटला. या पुरामुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम झाला आहे. कारण अशा दृश्यांमध्ये शेकडो पर्यटकांनी हिमाचलची ट्रिप रद्द केली आहे, आणि या राज्यात अनेक भागांमध्ये उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत पर्यटनच आहे.पुराच्या या तांडवामुळे १२ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला, कुल्लू, सोलन, चंबा, कांगरा आणि सिरमौरमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पंजाबमध्येही आज शाळा बंद आहेत.हिमाचल प्रदेशमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं चंबा भागातल्या धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाली. इथल्या चामेरा धरणातून हजारो लीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं व्यास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.या सगळ्यामुळे हिमाचलचे वातावरण अचानक बदलले. इथे ऐन सप्टेंबर महिन्यात जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे मनालीहून लेहला जाणारा मार्ग बंद झाला. रोहतांग पास इथे अनेक फूट बर्फ रस्त्यावर साचला होता. हा मार्ग खुला करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ लागू शकतो. बर्फवृष्टीमुळे इथे र्यटकांना येण्यासही मनाई करण्यात आली आहे.

मुंबई - रविवारी राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असताना काही भागांत दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले. राज्यात विसर्जन करताना २५ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर मुंबईत घाटकोपर येथे एका २४ वर्षांच्या तरुणाचा मिरवणुकीत नाचताना मृत्यू झाला.मुंबईत गणपती विसर्जनासाठी भांडुप येथील भांडुपेश्वर तलावात उतरलेल्या यज्ञेश मळेकर (३२) याचा बुडून मृत्यू झाला. भांडुपच्या भवानी नगर परिसरात राहणारा यज्ञेश रात्री दोनच्या सुमारास इतर जीवरक्षकांसोबत गणेश विसर्जनासाठी तलावात उतरला होता. एका ठिकाणी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घाटकोपरच्या अशोक नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये अमित वर्मा (२४) याचा मृत्यू झाला. मिरवणुकीत नाचता-नाचता अमित कोसळला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.उत्तर महाराष्ट्रात सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात जळगावमधील चार आणि नाशिकमधील दोन युवकांचा समावेश आहे. चेतनानगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थी चेतन बोराडे याचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला.विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या चेतनला पाण्याचा अंदाज आला नाही. तो गाळात रुतल्याने त्याचा मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील जालखेड येथे पाझर तलावात बुडून विनोद खराटे (१५) याचाबुडून मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्य़ात अविनाश कोळी (२०, सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यात तापी नदीत नितीन मराठे (३२, ऑर्डनन्स फॅक्टरी, दर्यापूर शिवार) याचा, तर जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे मनीष दलाल या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिरमधील दहावीचा विद्यार्थी प्रफुल्ल पाटील (वलवाडी, भडगाव) याचाही नदीत बुडून मृत्यू झाला.जालना येथील मोती तलावात विसर्जनावेळी अमोल रणमुळे, निहाल चौधरी (वय २६) आणि शेखर भदनेकर (वय २०) यांचा बुडून मृत्यू झाला. मूर्ती पाण्यात नेत असताना हे तिघेही मूर्ती खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जुन्नर तालुक्यात कावळ पिंपरी येथे पाच मुले बुडाली होती. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलडाण्यातील शेलगावमध्ये विसर्जनासाठी धरणात उतरलेल्या महादेव ताकतोडे आणि पुरुषोत्तम सोळाके यांचा बुडून मृत्यू झाला.पुण्यात देहुगाव येथे इंद्राणी नदीत बुडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अहमदनगरमध्ये संगमनेर येथे प्रवरा नदीत विसर्जनावेळी दोन तरुण वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचवण्यात आले आहे, तर नीरव जाधव बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. अमरावतीच्या वरुड तालुक्यात खदानीत विसर्जनासाठी उतरलेल्या राहुल नेरकर याचा बुडून मृत्यू झाला. तर साताऱ्यातील माहुली गावाजवळील कृष्णा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोलापुरातही एकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील मामा तलावात घटविसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. वैभव संभा आडे (१४) आणि संकेत कविंद्रकुमार कन्नाके (१५) अशी त्यांची नावे आहेत.


वर्धा - काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला जागा देण्यास सेवाग्राम आश्रम व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे काँग्रेसला आता एक तर पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागेल किंवा बैठकीचा बेत रद्द करावा लागेल.गांधीजींच्या १५० जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला काँग्रेसने कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम आश्रमात घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी काँग्रेस सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी बैठकीच्या आयोजनाबाबत चर्चा केली. दोन ऑक्टोबरलाच शासनाच्या वतीने आश्रम परिसरात कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचे नियोजन आधीच झाले आहे. त्यामुळे कार्यकारिणी बैठकीसाठी आश्रम परिसर उपलब्ध करून देता येणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी गेहलोत यांना सांगितले.त्याऐवजी आश्रमाच्या मागील भागातील (नई तालिम)जागा देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शवली. मात्र, तेथे बैठक घेण्यास काँग्रेस इच्छुक नाही.

चंद्रपूर - चंद्रपूरचे लाडके व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे रविवारी दुपारी ३.२३ वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते असले तरी मूलत: राजकारणात राहूनही कोणतीही संस्था, व्यक्ती आणि समस्या याकडे निरपेक्ष सांस्कृतिक दृष्टीने पाहण्याचा त्यांचा स्वभाव होता. शांताराम पोटदुखे यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याने शांत, संयमी आणि सुस्वभावी नेत्याला गमावले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.८५ वर्षीय शांताराम पोटदुखे यांना सोमवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पोहचताच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, मुलगी भारती (रिमा) चवरे, स्नुषा रमा गोळवलकर-पोटदुखे, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे.


मुंबई - नव्या रूपात बांधण्यात आलेल्या माहिम बस डेपोजवळील ४८३ चौ. मी. भूखंड परत करण्याबाबत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (बेस्ट) ने एका कंपनीला बजावलेली नोटीस योग्य असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने बेस्टला दिलासा दिला. संबंधित कंपनीने जागा परत करण्यास नकार दिल्याने, डेपोच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र अडले असल्याचे न्यायालयाने म्हटले.फोर्टपॉइंट आॅटोमोटिव्ह प्रा. लि. चे १९९२ पासून माहिम बस डेपोच्या जागेवर कार्यालय आहे. ही जागा बेस्टने कंपनीला भाडेतत्त्वावर दिली. मात्र, ही जागा भविष्यात केव्हाही परत मागितली जाऊ शकते, अशी अटही बेस्टने कंपनीला घातली. या अटीच्या अधीन राहून १९९२ पासून या कंपनीच्या परवान्याचे वारंवार नूतनीकरण करण्यात आले. शेवटचे नूतनीकरण २०१३ पासून २०१८ पर्यंत करण्यात आले.सप्टेंबर २०१५ मध्ये बेस्टने या कंपनीकडून जागेचा ताबा मागितला. बेस्टने माहिम डेपोचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना ही जागा परत हवी होती. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आणि संबंधित कंपनीला जागेचा ताबा महापालिकेला देण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली. मात्र, अचानकपणे जागेचा ताबा मागितल्याने कंपनीने या नोटीसच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. डेपोचे नूतनीकरण करण्यात जनहित नसल्याचे कंपनीने याचिकेत म्हटले. मात्र, उच्च न्यायालयाने करारामधील अटीची आठवण कंपनीला करून देत, कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला.
शिमला - हिमाचल प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या राज्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कुलू आणि मनाली भागांतील नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. मनाली येथील बियास नदीला आलेल्या पुराचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बियास नदीच्या किनाऱ्यावर अनेक वाहनचालक ट्रक आणि बसेस उभ्या करतात. यापैकी एक बस नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. नदीच्या पाण्याचा जोर इतका आहे की, मोठी वाहनेही सहजपणे नदीपात्रात खेचली जात आहेत. कुलूमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे. येथेही अनेक ट्रक नदीपात्रात वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे या भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या स्थानकि प्रशासनाकडून पुराचा वेढा पडलेल्या भागातून लोकांची सुटका केली जात आहे. या लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.हरीगढ - बनासकांठाजवळील हरीगढ गावात शनिवारी रात्री स्थानिकांनी ५० वर्षांच्या व्यक्तीला चोरीच्या संशयातून पकडले. जमावाने त्या व्यक्तीला झाडाला बांधून त्याला बेदम मारहाण केली. सुमारे ४० ते ५० जणांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एक व्यक्ती अमरत प्रजापती यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याने घरातील एका वृद्ध महिलेकडील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. वृद्धेने मदतीसाठी हाक मारताच कुटुंबातील अन्य सदस्य तिथे पोहोचले. त्यांनी संशयित चोरट्याला पकडले. यानंतर संशयित चोरट्याला गावातील एका झाडाला बांधून ठेवले आणि अन्य ग्रामस्थांच्या मदतीने त्याला मारहाण केली, असी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप सेजूल यांनी दिली. अमरत प्रजापती, शिवा प्रजापती, दशरथ प्रजापती, जयंती प्रजापती आणि बाबू प्रजापती अशी या अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

आंध्र प्रदेश - आंध्र प्रदेशच्या दंबारीकुडा भागात रविवारी दुपारी माओवाद्यांनी तेलगु देसम पार्टीच्या दोन नेत्यांची गोळया झाडून निघृर्ण हत्या केली. आजी-माजी आमदारांच्या हत्येनंतर येथे तणावाचे वातावरण आहे. आपल्या नेत्यांची हत्या झाल्यामुळे डुंबरीगुडा पोलीस स्थानकाला आग लावली. आपल्या नेत्याला वाचवण्यात पोलिसांना अपयश आल्याचा राग समर्थकांमध्ये होता. तर दुसरीकडे या हल्ल्या प्रकरणी आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसफ, एसओजी आणि सीरपीफ यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी आमदार सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची हत्या केली होती. सर्वेश्वरा राव यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरु असताना या हत्या करण्यात आल्या. माओवाद्यांनी आठवडाभर २७ सप्टेंबरपर्यंत स्थापना दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. किदारी सर्वेश्वरा राव यांनी वायएसआरसीपीच्या तिकिटावर अराकूमधुन आमदारकीची निवडणूक जिंकली पण नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला. किदारी सर्वेश्वर राव आणि सिवरी सोमा हे दंबारीकुडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सर्व राजकारण्यांना नक्षलग्रस्त भागामध्ये जाण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे असे ग्रामीणचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले. आमदार किदारी सर्वेश्र्वरा राव आणि सोमा यांनी त्यांच्या भेटीची कोणतीही कल्पना दिली नव्हती असे शर्मा यांनी सांगितले.


नाशिक - नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जनावेळी एक अमानुष प्रकार समोर आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. नाशिकच्या इगतपुरी मधील धक्कादायक घटना आहे यात एकाची प्रकुर्ती अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.विसर्जनावेळी झालेला किरकोळ वाद थेट एकमेकांना जाळल्यापर्यंत पोहचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर हा प्रकार घडताच तात्काळ इतर गणेश भक्तांकडून जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. यातील २ जणांची प्रकृती योग्य आहे पण एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.हे तिघेही जण गणपती विसर्जन पाहण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण दोन गटात किरकोळ कारणारून वाद झाला आणि त्यात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.मुंबई - काल रात्रीपर्यंत जवळपास सर्व गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्या. लालबागच्या राजाचे विसर्जन आज सकाळी झाले. तराफ्यावरची हायड्रॉलिक ट्रॉली अलगदपणे समुद्रात उतरवली गेली आणि राजानं निरोप घेतला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या हे सांगण्यासाठी गिरगाव चौपाटीवर उसळला भक्तांचा विराट महासागर होता.जवळपास २२ तासांहून अधिक वेळ झाला लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही मिरवणूक सुरू होती. शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले होते.

पुणे - उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही पुण्यात अनेक मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला तिलांजली देत विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा वापर केला. डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यात २५ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ध्वनीप्रदुषण होत असल्याने राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. न्यायालयाच्या आदेशाचे राज्यभरातील गणेश मंडळांनी अतिशय गांभीर्याने पालन केल्याचे दिसून आले आहे. मुंबईसारख्या महानगरातही गणेश मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. मात्र, सांस्कृतीक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या पुण्यात कोर्टाच्या आदेशाला सपशेल केराची टोपली दाखवण्यात आली. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर बहुतेक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरु केला.पुण्यामध्ये पाचव्या आणि सातव्या दिवशी डीजे वाजवणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर पुण्यात काही मंडळांनी एकत्र येऊन डीजे बंदीविरोधात पवित्रा घेत मिरवणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र, विसर्जनात त्यांनी कोर्टाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करीत डीजे वाजवलेच. डेक्कन, कुमठेकर रस्ता, मंगळवार पेठ, दांडेकर पूल या भागात डीजे जोरात सुरु होते. दरम्यान, पुण्यातील एसपी कॉलेज परिसरात डीजे बंद करण्यावरुन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त होते. तर खडकी भागात डीजे बंद करायला सांगितल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस नाईक थेटे यांना मारहाण करण्यात आली, या मारहाणीत कार्यकर्त्यांनी शेटे यांच्या डोक्यात काठीने प्रहार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - राहुल गांधी हे त्यांच्या सभांमध्ये जे आरोप करतात त्यावरून ते हास्यास्पद युवराज असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवरील लिहिलेल्या ब्लॉगमध्ये केली आहे. मोदी सरकार १५ उद्योगपतींना दिलेली २.५ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करणार आहे, असा आरोप राहुल यांनी केला होता. जेटली यांनी म्हटले आहे की, देशातील कर्जबुडव्या १२ उद्योगपतींना २०१४ च्या आधी कर्जे मंजूर झालेली आहेत. या उद्योगपतींकडून ही देणी वसूल करण्याचे काम आता मोदी सरकार करीत आहे. राफेल, बुडीत खाती गेलेली कर्जे यांच्यासंदर्भात राहुल गांधी यांनी बिनबुडाचे आरोप केल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाने आरेमधील मेट्रो ३ च्या कारशेडला मंजुरी दिलीय.जुलै २०१५ पासुन या प्रकरणावर लवादासमोर सुनावणी सुरु होती.मे मध्ये याबाबत लवादाने कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती देत जैसे थे चा आदेश दिला होता. वनशक्ती ही एनजीओ सातत्याने या डेपो बांधकामचा विरोध करत राष्ट्रीय हरित लवादापुढे गेली होती. स्थानिक लोकांनीही वनशक्ती एनजीओला पाठींबा दर्शवला होता. २२९८ झाडांची कत्तल होणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेनही या डेपोला विरोध दर्शवला होता. पण आता हरित लवादाच्या या निर्णयानंतर मेट्रो तीन चा डेपो हा आरेतच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


हिंगोली - हिंगोलीत भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला. भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृत व जखमी हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव व सुरवाडी येथील रहिवासी आहेत.


जळगाव - जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. भुसावळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात कापूस, मूग, उडीद, सोयाबीनसह ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले. कुऱ्हे पानाचे गावात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला. अगोदर पावसाने पाठ फिरवली, त्यानंतर आलेल्या पावसाने काढणीला आलेली पिकंच लोळवल्याने पुढे काय करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. भुसावळ भागात वादळी पावसाने पीके जमीनदोस्त झाली आहेत.आधीच भुसावळ परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्याने अतोनात प्रयत्न करून पिके उभी केली होती मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे कमालीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केले जात आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारी (२१ सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्रीपासून शोपियान जिल्ह्यातून चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. संशयित दहशतवाद्यांनी या चार पोलिसांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियांमधून तीन एसपीओसहित चार पोलीस बेपत्ता झाले आहेत. या सगळ्यांचे अपहरण झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या चारही पोलिसांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.यापूर्वी येथील अनधिकृत बांधकामावर उपजिल्हा अधिकारी (अतिक्रमण-निष्कासन ) व पी/दक्षिण मनपा यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई झाली होती,परंतु सध्या याच भूखंडावर पुन्हा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. याची दखल घेत नागरिक वार्ताने गोरेगाव उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) यांना येथील अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर त्यांनी या जागेची पाहणी केली असून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.यावर पी/दक्षिण मनपा इमारत विभागातील अभियंते या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात समर्थ आहेत का? कारण उपजिल्हाधीकारी गोरेगाव यांच्याकडून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पी/दक्षिण मनपाचा फौजफाटा लागणार असून कारवाई मानपालाच करायची आहे. मुंबई - गोरेगाव (प.) येथे अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे,शासकीय व निमशासकीय मोकळ्या भूखंडावरच भूमाफियांनी ताव मारत अनधिकृत बांधकाम केले असल्याने उपजिल्हाधिकारी अतिक्रमण -निष्कासन व पी/दाक्षीम मनपा इमारत विभागातील अभियंते काय करत आहेत,असा प्रश्न निर्माण होत आहे. मनपाच्या कायद्याला फाट्यावर मारून कोणत्याही प्रकारची बांधकामपरवानगी न घेऊन मोकळ्या भूखंडावर व्यावसायिक गाळे बांधून विकले जात आहेत,परंतु या अनधिकृत बांधकामावर आणि बांधकाम करणाऱ्यावर उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्कासन व पी/दक्षिण मनपा इमारत विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही.त्यामुळे अनधिकृत बांधकाम करीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे धाडस वाढले आणि पुन्हा बांधकाम जोरात सुरु केले.त्यामुळे अनधिकृत बांधकामाविषयी पी/दक्षिण मनपा इमारत खात्यातील अभियंते किती सतर्क आहेत हे यावरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे याठिकाणी चाललेल्या बांधकामाविषयी नागरिक वार्ताने उपजिल्हाधिकारी अतिक्रमण- निष्कासन गोरेगाव विभाग श्री.पांढरे यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली असून लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले आहे,परंतु कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी महापालिकेलाच पाचारण केले जाते.आता यावर पी/दक्षिण मनपा इमारत विभागातील अभियंते या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का?कि टाळाटाळ करणार? याकडेच स्थानिकांचे लक्ष लागून आहे.कित्येक वेळा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरिता शासनाकडून मनपाला निष्कासन करण्यासाठी लागणारा फौजफाटा घेऊन येण्यासाठी निवेदन पत्र दिले जाते,परंतु कित्येक वेळा मनपा अभियंते व अधिकारी मनुष्यबळ नसल्याचे आणि पोलीस संरक्षण नसल्याचे सांगत आपले हात वर करत असतात.अनधिकृत बांधकाम केल्यामुळे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर व भूमाफियांवर मनपा कायद्याअंतर्गत एमआरटीपी कारवाई कधीच केली जात नसल्याने भूमाफिया व बांधकाम व्यावसायिक मात्र मोकाटच आहेत.


पुणे - मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. संबंधित व्यक्तीचे नावदेखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले. पुणे पत्रकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित शोधनिबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपांचे पुढे काय झाले? तसेच समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या प्रकाराच्या सर्वांच्या मागे कोण आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजपा सरकार राज्यात सत्ता येऊन चार वर्षे झाली. त्यादरम्यान त्यांनी सिंचन प्रकल्पावर किती काम केले, याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.


मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांच्या मंत्रालयातील दालनाच्या नूतनीकरण कामात ४६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब विभागाच्या दक्षता पथकाने केलेल्या चौकशीत समोर आली आहे.या संदर्भात भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी चौकशी करून अहवाल विभागाकडे सादर केला. नूतनीकरणाचे काम तुकडे पाडून कंत्राटदार विश्राम माने यांच्या मे.विश्राम एंटरप्रायजेस या फर्मला देण्यात आले होते. प्रत्यक्षात कामे न करताच कंत्राटदारास जादाची रक्कम कशी अदा करण्यात आली याचा लेखाजोखा चौकशी अहवालात मांडण्यात आला आहे.मंत्रालयातील कामांची जबाबदारी असलेल्या शहर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या मनोरा आमदार निवासातील घोटाळ्याप्रकरणी सध्या निलंबित आहेत. उपअभियंता असलेले के.आर.जाधव निवृत्त झाले आहेत. तर, शाखा अभियंता नारायण बासुंदे यांना उपअभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. वांद्रे शासकीय वसाहतीचा कारभार त्यांना दिला आहे.आशिषकुमार सिंग यांच्या दालनाचा क्रमांक ६१८ होता. तेथे मंजूर काही कामांवरील निधी हा सार्वजनिक बांधकाम सेवा केंद (मंत्रालय शाखा) तसेच विस्तारित इमारतीतील पाचव्या मजल्यावरील कॉमन प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी खर्च केल्याचे चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षता त्या ठिकाणीही कामे केली नाहीत मग पैसा कुणाच्या खिश्यात गेला असा प्रश्न निर्माण होतो.


कामे न करताच दिलेली रक्कम

इम्पोर्टेड वॉलपेपर कामापोटी २१ हजार ६०५ रुपये

लाकडी फर्निचर बसविणे १ लाख ४ हजार ४६१ रुपये

अ‍ॅकॉस्टिक पॅनेल बसविणे १ लाख ६७ हजार ९८२ रुपये

फाल्स सिलिंग लावणे आणि फ्लोरिंग करणे८८ हजार ८५१ रुपये

फर्निचर अधिक ग्लास पॅनेल बसविणे १ लाख ७२ हजार ८१५

बेसिक वॉल पॅनेल बसविणे ५० हजार ५९६ रुपये.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget