October 2018श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्कराने मोठी कारवाई केली. या कारवाईत एका स्नायपरसह आणखी एकाचा खात्मा करण्यात आला. या घटनेत दहशतवादी मसूद अजहरचा भाचा उस्मान हैदरचा खात्मा करण्यात आला आहे. उस्मान हैदर हा स्नायपर स्क्वॉडचा डेप्युटी चीफ म्हणून ओळखला जात होता. त्याच्या सोबत आलेल्या साथीदाराचाही खात्मा करण्यात आला. लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली. पुलवामातील त्राल भागात लष्कराच्या जवानांनी पॅरा कमांडोंसोबत दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली.हे दोन्ही दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते. लष्कराने त्यांच्या विरोधात कारवाई करताना हे घरच नेस्तनाबूत केले. या चकमकीनंतर लष्कराने एक स्नायपर रायफलही जप्त केली आहे. आता या परिसरात कॉम्बिग ऑपरेशनही सुरु करण्यात आलं आहे. पाकिस्तानतले चार प्रशिक्षित स्नायपर्स काश्मीरमध्ये लपून बसले आहेत अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. या चौघांनाही शोधण्याचं आव्हान लष्करापुढे होतं. चार पैकी एका स्नायपरचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्रालमध्ये स्नायपरने केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. १८ सप्टेंबरपासून हे स्नायपर्स काश्मीरमध्ये लपून बसल्याचे समजते आहे. आता यापैकी एका स्नायपरचा खात्मा करण्यात आला आहे.

मुंबई - नोकरीच्या नावाखाली परदेशात पाठवून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी फरीद उल हक शाह, कमाल अन्वर शेख आणि टिंकू राज यांना अटक करण्यात आली. भारतातून परदेशात तरूणींना पाठवण्यासाठी तिघांनी संपूर्ण यंत्रणाच तयार केली होती. सुरुवातील आग्रा राजस्थान उत्तरप्रदेश सारख्या राज्यातून गरजू मुलींना हेरले जात असे. त्यानंतर त्यांना मुंबईला बोलावून त्यांची मुलाखत घेऊन ठराविक गोष्टींच्या आधारे किंमत ठरत असे. यानंतर या मुलींना नोकरी करण्यासाठी बहारिनसारख्या आखाती देशात नोकरीसाठी पाठवले जात असे. मात्र परदेशात जाताच मुलींवर वेश्यावृत्ती करण्यासाठी जबरदस्ती करत आणि तसे न केल्यास पासपोर्ट जप्त करून डांबून ठेवले जात असे. राजस्थानच्या एका तरुणीला अशाचप्रकारे डांबण्यात आलं होते. शेवटी २ लाख रुपये मोजल्यानंतर तिची सुटका करण्यात आली.

पुणे - दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी ची सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. १ ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याचकाळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल. पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.

केरळ - केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरीच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यातच मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यामुळे दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी आणि आंदोलकांचा महिलांच्या प्रवेशाला होणारा विरोध या सर्व गोष्टी हाताळताना केरळच्या पोलीस यंत्रणांच्या नाकी नऊ आले आहेत. मंदिर परिसरात होणाची श्रद्धाळूंची गर्दी आणि हे एकंदर वातावरण पाहता केरळ पोलीसांनी मंगळवारी 'डिजिटाईज्ड क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम'ची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. यंदाच्याच वर्षी ही यंत्रणा लागू होणार आहे. या सेवेअंतर्गत श्रद्धाळू शबरीमला मंदिराला भेट देण्यासाठीची तारीख आणि वेळ निवडू शकणार आहेत.

कोल्हापूर - शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करुन आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. ‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यानी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी सांगितले.


मुंबई - दुध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी (३० ऑक्टोबर) गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ला यश मिळाले. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये जवळपास ३५० लीटर भेसळ दूध हस्तगत करण्यात आले असुन याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसय्या थोडासू (४७), रवी निम्मागौटी (४०), वेंकय्या मुकाम्मला (४०) आणि साहिलकुमार थोडासू (२४) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघे अंधेरी पश्चिमच्या जीवननगर परिसरात राहतात. दूध भेसळ करणारी टोळी अंधेरीत कार्यरत असल्याची माहिती कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास सपोनि शेख, जाधव, पोउनी कोरे या त्यांच्या पथकाने एफडीएसोबत जीवननगरमध्ये खोली क्रमांक १५२ आणि २९० मध्ये धाड टाकली. तेव्हा चार जण दूध भेसळ करत असताना त्यांना रंगेहाथ सापडले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाहुन अमूल ताजा, अमूल गोल्ड, गोकुल क्रीम या कंपन्यांचे १६ हजार ९४७ रुपये किमतीचे भेसळ दूध हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अमूल कंपनीच्या १२८ रिकाम्या पिशव्यांसह ब्लेड, मेणबत्ती, पुनेल, स्टोव्ह आणि कैची हे पॅकिंगसाठी वापरले जाणारे तेराशे रुपयांचे साहित्य देखील ताब्यात घेतले असल्याचे ते म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना पुढील कारवाईसाठी अंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने ऐन दिवाळीच्या काळात नवीन नियम लागू केले आहेत. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांनुसार आता एसबीआय एटीएम धारकांना एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा ४० हजार रुपये एवढी होती. एसबीआयच्या क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्ड धारकांसाठी हा नियम असणार आहे. बँकेकडून सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.एसबीआयने जवळपास एक महिन्यापूर्वी क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डधारकांसाठी ३१ ऑक्टोबरपासून एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती दिली होती. जर तुम्हाला एका दिवसात २० हजाराहून जास्त पैसे काढायचे असतील तर उच्च श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. ‘ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड’ आणि ‘प्लॅटिनम कार्ड’च्या मर्यादेत बदल करण्यात आलेला नाही. ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड धारकांना दिवसाला ५० हजार आणि प्लॅटिनम कार्ड धारकांना १ लाखापर्यंतची रक्कम काढण्याची मुभा आहे.


भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे आमदार संजय शर्मा आणि माजी आमदार कमलापत आर्य यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती दिली. त्यामुळे राज्यात ऐन निवडणुकीवेळी भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. दुसरीकडे किरार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नातेवाईक गुलाबसिंह किरार हे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे सांगण्यात येते. प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर किरार पक्षात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. नंतर त्यांनी हे ट्विट हटवले. प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष शोभा ओझा यांनीही किरार यांनी राहुल यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सहभागी झाल्याचे वृत्त फेटाळले.नरसिंहपूर जिल्ह्यातील तेंदूखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शर्मा आणि दतिया जिल्ह्यातील भांडेरचे माजी आमदार आर्य यांनी भाजपाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे शर्मा आणि आर्य हे भाजपात सहभागी होण्यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. त्यानंतर दोघे भाजपात गेले आणि भाजपाच्या तिकिटावर आमदारही बनले. आता दोघेही आपल्या जुन्या पक्षात परत आले आहेत.दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी अशा गोष्टींचा भाजपावर काही फरक पडणार नसल्याचा दावा केला आहे. आम्ही बहुमताने ही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीपूर्वी पक्षांतर होणे या गोष्टी सामान्य असल्याचे ते म्हणाले.

मुंबई - कमी पावसामुळे कांदा, बटाटा व टोमॅटो या सर्वाधिक मागणीच्या तीन भाज्यांचे दर वधारू लागले आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत (जानेवारी-मार्च २०१९) किरकोळ महागाई दरात वाढीची शक्यता आहे. हा दर ४ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो, असा स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचा अंदाज आहे.आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर जुलैच्या ४.१७ टक्क्यांवरून ३.६९ पर्यंत घसरला, पण खरिपाच्या पिकांची स्थिती कमी पावसामुळे आॅगस्टनंतर बदलली. सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात कांदा ९ टक्के महाग झाला आहे. नोव्हेंबर ते मे या काळात कांद्याची मागणी मोठी असते. यामुळे कांद्याचे दर किमान २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. सध्या २ टक्के महाग झालेला टोमॅटोसुद्धा ५ ते १० टक्के व अडीच टक्के महाग असलेले बटाट्याचे दरही १० टक्क्यांपर्यंत वधारू शकतात. यातूनच महागाई दर वाढेल, असा अंदाज बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धान्यांची आवक यंदा वाढलेली आहे, पण भारतीय बाजार हा देशांतर्गत पिकांवर अवलंबून असतो. कमी पावसामुळे देशांतर्गत भाजीपाला व धान्यांची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता आहे.

सोलापूर - वाहनाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून बार्शी शहरात राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाच्या तरुण मुलाचा दहा-बारा जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना घडली. संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी काही जण भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत याचे समर्थक असल्याचे दिसून आले. बार्शीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल व त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांच्या गटात अधूनमधून खून खराब्याचे प्रकार घडतात.बार्शी शहरात उपळाई रस्त्यावर सोलापूर जनता सहकारी बँकेच्या शाखेच्या समोर रात्री आठच्या सुमारास अंकुल ऊर्फ गोलू श्रीधर चव्हाण (वय २५, रा. अंकुश स्मृती, नाईकवाडी प्लाट्स, बार्शी) हा आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या वाहनाजवळ थांबला होता. त्या वेळी अचानकपणे मोटारसायकली घेऊन दहा-बारा जणांच्या जमावाने तेथे येऊन दहशत निर्माण केली व नंतर अंकुल चव्हाण याच्यावर तलवारी, कोयता, लोखंडी गज, लाकडी दांडके व दगडाने जोरदार हल्ला केला. त्याला लाथाबुक्क्य़ांनीही मारहाण केली गेली.या सशस्त्र हल्ल्यात अंकुल चव्हाण हा गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या हल्ल्यात त्याची चिमुकली मुलगी पार भेदरली. ती देखील खाली पडल्याने जखमी झाली. या घटनेने परिसरात पळापळ झाली. व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली.दरम्यान, मृत अंकुल चव्हाण याचा भाऊ आकाश श्रीधर चव्हाण याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद दशरथ माने, सूरज ऊर्फ सोन्या प्रकाश माने, रमेश भगवान माने (रा. अलीपूर रोड, माउली चौक, बार्शी) यांच्यासह अमोल सुभाष वायकुळे, अर्जुन ऊर्फ अज्जू अरुण नागणे (रा. पाटील प्लाट्स, शिवाजी नगर, बार्शी), सागर उमेश माने, विजय ऊर्फ आबा किसन वाघ, दीपक माने (रा. अलीपूर रोड, बार्शी) तसेच अन्य चौघा अनोळखी व्यक्तींचा या गुन्ह्य़ात सहभाग होता.


मुंबई - ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू होते. यशवंत देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले होते.आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. त्या नंतरच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला होता.

मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे.आपण फरार नाही, तसेच आपण तपासासाठी सहकार्य करत नाही, हा ईडीने केलेला दावा खोटा आहे, असे मोदी याने त्याच्या याचिकांत म्हटले आहे. न्यायालयाने सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना आर्थिक फरारी गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात यावे व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी, यासाठी ईडीने काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर मोदीने उत्तर दिले आहे.पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रीच कँडी शाखेत तब्बल १२ हजार ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. अ‍ॅक्सिस आणि अलाहबाद बँकेच्या परदेशी शाखांचाही या घोटाळ्यात फसगत झाल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळ्याचा कट नीरव मोदी, मेहुल चोक्सी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी रचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोदी व चोक्सी यांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी देशाबाहेर पळ काढला.भोपाळ - आपल्या मुलावर राहुल गांधी यांनी आरोप केल्यामुळे शिवराजसिंह चौहान चांगलेच भडकले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगल्याचे दिसत आहे. सोमवारी राहुल गांधी यांनी भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये रोड शो करुन आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. यादरम्यान त्यांनी पनामा पेपर आणि व्यापम घोटाळ्याचा उल्लेख करत शिवराज आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांच्यावर हल्लाबोल केला.आपल्या मुलावर राहुल गांधी यांनी आरोप केल्यामुळे शिवराजसिंह चौहान चांगलेच भडकले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसकडून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर बेबनाव आरोप करत आहेत. आम्ही सर्वांचा मान ठेवत मर्यादा राखतो. पण आज तर राहुल गांधी यांनी माझा मुलगा कार्तिकेय याचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून कहर केला आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी राज्याची आर्थिक राजधानी इंदूर येथे रोड शो केला. राहुल यांच्या रोड शो दरम्यान अनेक ठिकाणी ‘हर हर महादेव’च्या घोषणा देण्यात आल्या.


मुंबई - दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वषार्साठी मोफत प्रवास सवलत पास देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी येथे केली.शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत १०० टक्के असेल. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ३५ लाख विद्यार्थ्यांना सवलतीचा फायदा होईल.

लखनऊ - जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा हिंदू राजा होता तोपर्यंत इथले हिंदू सुरक्षित होते. शिख बांधवही सुरक्षित होते. मात्र हिंदू राजवटीचा ऱ्हास होऊ लागला आणि काश्मीरमध्ये हिंदूंचाही ऱ्हास झाला. आज काय स्थिती आहे ती आपण पाहतोच आहोत. काश्मीरमध्ये कोणीही सुरक्षित आहे असे म्हणता येईल का? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर या इतिहासावरून आपल्याला योग्य तो धडा घेतलाच पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. लखनऊ येथील विश्वेश्वरया ऑडिटोरियममध्ये झालेल्या एका कार्यक्रमा योगी आदित्यनाथ बोलत होते. शिख बांधवांच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांची हजेरी होती. यावेळी त्यांनी गुरु तेज बहाद्दुर सिंग यांचेही उदाहरण दिले. तेज बहाद्दुर यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आणि काश्मीरचे रक्षण केले. त्यांनी देशासाठी आणि धर्मासाठी चार मुलांचाही त्याग केला होता असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांचीही उदाहरणं योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात दिली. दहशतवादी हल्ले कसे केले जात आहेत. इम्तियाज अहमद मीर या अधिकाऱ्याची हत्या कशी केली गेली हेदेखील त्यांनी सांगितले. तसेच हिंदू राजा होता तोपर्यंत काश्मीर हिंदू आणि शिख बांधवांसाठी सुरक्षित होते आता मात्र ते कोणासाठीच सुरक्षित राहिलेले नाही असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.


नागपूर - नागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी महालक्ष्मीचे मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री अकरापर्यंत महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास मंदिराचे पुजारी आले असता त्यांना तिथे चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. चोरटे दानपेटी फोडताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

मुंबई - मुंबई महापालिका कर्मचा-यांना १५ हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय. १ लाख ५ हजार कर्मचा-यांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे. मागील वर्षी १४ हजार ५०० रूपये बोनस दिला होता. यामध्ये यंदा ५०० रूपयांची वाढ करण्यात आली. मुंबई महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कामगार संघटनांची ४० हजार रूपये बोनसची मागणी होती.

मुंबई - मुंबई विमानतळावर एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला, मात्र त्याचवेळी सीआयएसएफच्या एका जवानाने धावून जात या प्रवाशाचे प्राण वाचवले. ही घटना २६ ऑक्टोबरची आहे. मुंबईच्या आंतरदेशीय विमातळावर सीआयएसएफच्या जवानांकडून प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तपासणीच्या काऊंटरजवळच कोसळला. त्यावेळी सीआयएसएफच्या जवानाने तातडीने या प्रवाशाच्या दिशेने धाव घेतली आणि कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन अर्थात CPR दिला. मोहीत कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्याने देवदूत बनूनच प्रवाशाचे प्राण वाचवले. या प्रवाशाला नंतर नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता या प्रवाशाची प्रकृती ठीक आहे असेही समजते आहे.
श्रीनगर - जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून लपून होणारे हल्ले (स्नायपर अटॅक) ही काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांसाठी चिंतेची बाब बनली आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून अशा हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांचे ३ कर्मचारी मारले गेले आहेत. पाकिस्तानने प्रशिक्षण दिलेले चार स्नायपर्स काश्मीर खोऱ्यात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून होणारे असे हल्ले हाणून पाडण्यासाठी आपले डावपेच नव्याने आखणे सुरक्षा यंत्रणांना भाग पडत आहे.पुलवामातील नेवा येथे १८ सप्टेंबरला झालेल्या अशा प्रकारच्या पहिल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. हा तुरळक हल्ला असावा असे सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटले, मात्र अलीकडच्या काही छुप्या हल्ल्यांमध्ये त्राल येथे सशस्त्र सीमा बलाच्या व एका लष्करी जवानाचा, तसेच नौगाम येथे सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना छुप्या हल्ल्यांची कल्पना आली. सीआयएसएफचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद यांच्यावर शनिवारी हल्ला झाला. चेहऱ्यावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या दोन वेगवेगळ्या ‘मित्र’ गटांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला असून, काही स्थानिक पाठीराख्यांच्या मदतीने त्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात तळ ठोकला आहे.

नाशिक - मनुस्मृतीला विरोध केलात तर तुमची अवस्थाही दाभोलकर आणि पानसरे यांच्यासारखी करु, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात आली आहे. नाशिकमधील 'भुजबळ फार्म' हाऊसवर एका निनावी पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात संभाजी भिडेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्यावरूनही भुजबळांना धमकावण्य़ात आले आहे. गुरुजींचे कार्य तुला कळणार नाही. यापुढे त्यांच्याबद्दल एखादे अवाक्षर काढले तर तुम्हाला संपविण्यासाठी वेळ लागणार नाही, असा मजकूर या पत्रात आहे.राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याचे समजते. तसेच, या धमकीच्या पत्रामुळे ‘भुजबळ फार्म’वर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होत आहेत.


मुंबई - धनगर आरक्षणाचा अहवाल पूर्णपणे प्रतिकूल नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कालमर्यादेत मार्गी लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात आले, तर त्यांचे स्वागतच असेल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. राज्य सरकारच्या कामगिरीला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने झी २४ तासचे वृत्तवाहिनीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यात राज्यातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी रोखठोक उत्तरे दिली.


नवी दिल्ली - रामजन्मभूमी प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या महत्वाच्या सुनावणीकडे लागले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीआधी मंदिराचे बांधकाम सुरू करा असा अखिल भारतीय आखाडा परिषदेने इशारा दिला आहे.विजयादशमी मेळाव्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला कायदा करून राम मंदिर बांधण्याचा सल्ला दिला होता. मात्र भाजपने हा निर्णय सर्वस्वी न्यायालयावर सोडला आहे.दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले. त्यासाठी भागवतांनी बाप्पाचा विधीवत अभिषेकही केला. अभिषेकादरम्यान भटजींनी राम मंदिर लवकर व्हावे यासाठी गुरूजींच्या सूचनेनुसार संस्कृतमध्ये खास मंत्रही म्हटले.

बारामती - खडकवासला कालव्यातून जनाई-शिरसाई योजनेला पाणी उपलब्ध करून द्या. दुष्काळी परिस्थितीचा विचार करता नियम बाजूला ठेवून अधिकारी वर्गाने काम केले पाहिजे. काही तांत्रिक अडचणी असतील तर सबंधीत खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्यात येतील. मात्र कोणत्याही परिस्थीतीत माणसांबरोबच पशूधनासाठी पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला दुग्धविकास मंत्री महेदव जानकर यांनी दिला.बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल विभाग, महावितरण, पाटबंधारे, पशू संवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, बारामती पंचायत समिती याबरोबरच इंदापूर तालुक्याची कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बारामती तालुक्यातील ६ गावे व ४७ वाड्या वस्त्यांना ६ टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार हनुमंत पाटील व गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली. यावर जानकर यांनी पाणी टंचाई असणाऱ्या गावांमधील पशूधनाचेही सर्व्हेक्षण करा. तसेच जनावरांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन जनावरांना देखील प्रतिजनावर ८० लिटर पाणी उपलब्ध करून द्या, अशी सुचना दिली.

जकार्ता - जकार्ताहून उड्डाण केलेले लायन एअरवेजचे विमान बेपत्ता झाले आहे. उड्डाणानंतर अवघ्या १३ मिनिटानंतर विमानाशी संपर्क तुटला. इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून हे विमान पान्गकल पिनांग येथे निघाले होते. विमान कोसळले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.सोमवारी सकाळी ६.३३ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रशासनाने डोंगर परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे, असे वृत्त ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ने दिले आहे.

पंजाब - सीमा सुरक्षा दलांनी पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत. एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी चलन, दोन मोबाइल, दोन सिम कार्ड हे देखील जप्त करण्यात आलं आहे. हे दोघेही भारतात घुसखोरी करण्याच्या बेतात होते त्याचवेळी सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते त्याचवेळी हे दोघे जण भारतात घुसखोरी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. आता या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. हे दोघे नेमक्या कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन त्यांनी का आणले होते याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे.

महाबळेश्वर - सहलीसाठी आलेल्या पर्यटकांचे ओळखपत्र घेतल्याशिवाय कोणालाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी परवानगी देवू नये, असे स्पष्ट निर्देश मागील आठवडयात जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व हॉटेल लॉज चालकांना दिले होते. परंतु याचे पालन केले नाही म्हणून आता हॉटेल मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाबळेश्वर येथे हॉटेल चालकाने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मालक व चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहलीसाठी आलेल्या पर्यटकांचे ओळखपत्र घेतल्याशिवाय कोणालाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी परवानगी देवू नये, असे स्पष्ट निर्देश मागील आठवडयात जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व हॉटेल लॉज चालकांना दिले होते. परंतु, याचे पालन केले नाही म्हणून आता हॉटेल मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिंगमळा धबधब्यावरून आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल ज्या हॉटेलमध्ये उतरले होते. तेथील हॉटेल व्यावसायिकाने हॉटेलमध्ये प्रवेश देताना केवळ पुरूषाचेच ओळखपत्र घेतले होते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी आल्याने पोलीस अधीक्षकांनी याबाबत आदेश दिले.महाबळेश्वर येथे मोठया प्रमाणावर पर्यटक येतात. यामध्ये काही वेळा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही असतात. अशा लोकांची ओळख पटावी व त्यांना महाबळेश्वरसारख्या ठिकाणी लपून राहता येऊ नये, याकरिता हॉटेलमध्ये खोली देण्यापूर्वी येथे आलेल्या प्रत्येकाचे ओळखपत्राची एक प्रत हॉटेलमध्ये घ्यावी तसेच त्यांचा मोबाइल नंबर व त्यांच्या वाहनाचे नंबर अशी सर्व माहिती हॉटेल व्यावसायिकांनी जतन करून ठेवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी गेल्या आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांच्या झालेल्या बैठकीत केले होते.काही बेकायदशीर हॉटेल व्यवसाय करणारे पर्यटकांची कोणतीच माहिती घेत नाहीत असे वारंवार निदर्शनास आले आहे. पर्यटकांसोबत लहान मुले असतील तरी त्यांचे ओळखपत्र घेतलेच पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले होते. या बैठकीस आठ दिवसही उलटले नसताना, जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. लिंगमळा धबधब्यावरून आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये उतरले होते . हॉटेल व्यावसायिकाने दोघांपैकी केवळ पुरूषाचेच ओळखपत्र घेतले. तर महिलेचे ओळखपत्र घेतले नव्हते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्यानंतर प्रेमी युगुलापैकी महिलेची ओळख लवकर पटवण्यास पोलिसांना अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल मालक सलीम मोहंमद अमिनकाजी ( मुंबई) व हॉटेलचा व्यवस्थापक फईज अहमद इक्बाल बढाणे (रांजणवाडी, ता. महाबळेश्वर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.उदय सामंत हे म्हाडाच्या अध्यक्ष पदी आल्यानंतर म्हाडाच्या अंतर्गत सुधारणा आणि सामान्य नागरिकांच्या समस्याकडे गंभीरपणे लक्ष घालताना दिसत आहेत.

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्ष उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे वडाळा पश्चिम येथील हनुमान चाळ या उपकरप्राप्त इमारतीतील १६ रहिवाशांना संबंधित विकासकाने गेल्या तीन महिन्यांपासून थकविलेले घरभाडे मिळालेम्हाडा मुख्यालयात अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते या इमारतीतील १६ रहिवाशांना थकीत घरभाड्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. २००८ मध्ये सदरहू उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाला प्रारंभ झाला. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित विकासकामार्फत रहिवाशांना घरभाडे दिले गेले नव्हते. या प्रकरणी आठवडाभरापूर्वी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची सदरहू इमारतीतील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपली व्यथा मांडली. अध्यक्ष उदय सामंत यांनी तातडीने रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत विकासकाला रहिवाशांचे थकीत भाडे देण्याचे आदेश दिले. म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांच्या आदेशानंतर अवघ्या आठच दिवसात विकासकाने सहापैकी तीन महिन्याचे थकीत भाडे दिले. उर्वरित तीन महिन्याचे भाडे लवकरच देण्याचे आश्वासन संबंधित विकासकाने सामंत यांना दिले.थकीत भाडे मिळाल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व आनंद व्यक्त करीत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचे आभार मानले. संबंधित विकासकाने उर्वरित थकीत भाडेही लवकर द्यावे व सदरहू इमारतीचा लवकरात लवकर पुनर्विकास करावा, असे आदेश सामंत यांनी दिले. यावेळी वसंतराव जाधव, हेमा हरनोळ आदींसह रहिवाशी उपस्थित होते.बीड - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सर्वच स्तरातून आंदोलने करण्यात येत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. बीडमधील शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कर्जमाफीसाठी या महिलांनी मुंडन आंदोलन केले. यामध्ये या महिलांनी प्रत्यक्षात मुंडन केल्याने त्यांच्यावर कुटुंबिय आणि इतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अशाप्रकारे केस कापल्यामुळे महिलांना अतिशय वाईट वागणूक द्यायला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी सध्या या कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत.स्वाती जाधव या शिवसेनेच्या या कर्जमाफी आंदोलनाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून ओळखल्या जातात. टीव्ही ९ या वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी या आंदोलनात मुंडन केल्याने जाधव यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. यांना पतीने घरातून हाकलून दिले, तर कुटुंबातील इतर मंडळींनी त्यांना वाळीत टाकले आहे. त्यामुळे हे आंदोलन त्यांचा संसार उध्वस्त करायला कारणीभूत ठरले आहे. आता पक्षाच्या आंदोलनामुळे घराबाहेर पडण्याची वेळ आल्यावर पक्ष त्यांच्याकडे लक्ष देईल असे वाटले होते. मात्र तसे न होता पक्षानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोटापाण्यासाठी काहीतरी करायला हवे यासाठी स्वाती जाधव यांनी अहमदनगर गाठले. माहेरच्या मंडळींकडेही त्यांना प्रवेश नसल्याने त्या एका वडापावच्या गाडीवर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत इतरही काही महिलांवर अशीच वेळ आली आहे.या आंदोलनाला आता दिड वर्ष झाले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या आंदोलनाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. मात्र या महिलांवर घराबाहेर पडण्याची वेळ आली असताना मात्र त्यांचे किंवा पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचे मात्र त्याकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे अशी परिस्थिती आली असताना शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही या महिलांची चेष्टा केली जात आहे. त्यामुळे पक्षासाठी आंदोलन केले आणि संसार आणि जीवन उध्वस्त झाले अशीच या महिलांची अवस्था झाली आहे.मुंबई - जीएसटी कायद्यांतर्गत राज्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील व्यापारी मोदसिंग पद्मसिंह सोढा यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत पुण्याच्या जीएसटी कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. ७९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने सोढा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.नागपूर - नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी कुठल्याच पालिकेत नकोत अशी भूमिका महापौर परिषदेत राज्यातल्या महापौरांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या कुठल्याही पालिकेत नियुक्ती देण्यात येऊ नये असा ठराव महापौर परिषदेत मांडण्यात आला आणि तो पारित करण्यात आला अशी चर्चा सध्या रंगते आहे. मात्र असा कुठलाही ठराव आलाच नसल्याचे मुंबईचे महापौर आणि या महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे. शनिवारी नागपुरात महापौर परिषदेची अठरावी सभा आयोजित करण्यात होती. या परिषदेला राज्यातल्या १९ महापौरांनी हजेरी लावली होती.


मुंबई - आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कामगिरीपेक्षाही आमच्या सरकारची चार वर्षांतील कामगिरी कितीतरी दमदार असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतची आकडेवारीच सादर केली. सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत येताना आपण दिलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमधील सगळ्या वचनांची पूर्तता केली असल्याचे ते म्हणाले.स्टार्ट अप उद्योगांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आल्याची आकडेवारी संसदेत सादर करण्यात आली आहे. देशातील १० हजार ९५० स्टार्टअपपैकी २१३० महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी २००९ ते २००१४ या काळात केवळ ११७१ कोटींची तरतूद करण्यात आली होती. आमच्या काळात ती ४३४५ कोटी रु.असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई वगळता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आघाडी सरकारने १२०० कोटी रुपये दिले तर आम्ही ३२०० कोटी रुपये दिले अशी तुलनादेखील त्यांनी केली. सेवा हमी कायद्यांतर्गत ५ कोटी ४७ लाख प्रकरणांमध्ये ५ कोटी ३१ लाख सेवा या वेळेत प्रदान करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पीटसबर्ग - अमेरिकेत पीटर्सबर्ग सिनगॉग येथे ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळावर अंदाधुंद गोळाबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती केडीकेएकडून देण्यात आली आहे. या गोळीबाराबाबत नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी काही मार्ग बंद केले असून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.पीटसबर्गमधील घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे टि्वट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा गोळीबार भीषण असल्याचे सांगितले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, इतकी वर्षं झाली तरी हे सारखं सारखे बघावे लागत आहे, हे लाजिरवाणे आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांना पार्सल बॉम्ब पाठवण्यात आला होता. अमेरिकेत यापूर्वी सुद्धा गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी, २९ ऑक्टोबरला सुनावणी सुरू होईल आणि या खटल्याची नियमित सुनावणी कशी करायची याचीही रूपरेषा त्याच दिवशी निश्चित केली जाईल.सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या पीठापुढे ही सुनावणी होईल. रामजन्मभूमी-बाबरी वादाची नियमित सुनावणी २९ ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते.त्यानुसार सोमवारी या खटल्याची पहिली सुनावणी होणार असून, खटल्याच्या पुढच्या तारखा त्याच दिवशी निश्चित केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होऊन राममंदिर उभारण्यात यावं असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आलोक वर्मांना घरी बसवल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील राफेल गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करून त्यांची रूम सील करण्यात आली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.ते म्हणाले, राफेलप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल हे मोदींना पक्के ठाऊक आहे. वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे हे बेकायदा आहे. असा निर्णय घेण्याचा अधिकार कायद्याने पंतप्रधानांना नाही. सरन्यायाधीश व लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याशी चर्चा करून असा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र मोदींनी असे काही केले नाही.

मुंबई - राज्यात दुष्काळ जाहीर करायचा की नाही, यावर ३१ आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. आतापर्यंत २०१ तालुक्यांचा आढावा घेतला असून १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले. राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास जाणुनबुजून विलंब करत आहे. त्यामुळे दुष्काळ व्यवस्थापन, आर्थिक साहाय्य, शेती कर्जे पुनर्गठन करण्याचे निर्देश सरकारला द्यावे, अशी विनंती करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. महेश सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. राज्य सरकारने आतापर्यंत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची नावे जाहीर करायला हवी होती. मात्र, राज्य सरकार त्यास जाणुनबुजून विलंब करत आहे, असा आरोप लाखे-पाटील यांनी केला. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी राज्य सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे न्यायालयाला सांगितले.मुंबई - मुंबई महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना पूर्ववत सुरू करत यंदा दिवाळीत ४० हजार रुपये बोनस द्यावा, या मागणीसाठी मनपा कर्मचारी व अधिका-यांच्या सर्वपक्षीय संघटनांनी गुरुवारी आझाद मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अ‍ॅड. सुखदेव काशिद यांनी दिला आहे.काशिद म्हणाले, सर्व कामगारांत प्रशासनाविरोधात नाराजी पसरली असल्याने कामगार संघटनांनी एकजूट दाखवत मोर्चात सहभाग घेतला आहे. त्यामुळे कामगारांच्या भावनांचा आदर ठेवत प्रशासनाने दिवाळीत ४० हजार रुपये बोनसची घोषणा करावी; तसेच मेडिक्लेम योजनेअंतर्गत ज्या कामगारांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, ती तत्काळ मार्गी लावावीत. अन्यथा कामगारांना टोकाचे पाऊल उचलावे लागेल.या मोर्चासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनसह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी-महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, बृहन्मुंबई मनपा कामगार कर्मचारी महासंघ, मुंबई मनपा शिक्षक सेना, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेना या संघटनाही एकवटल्या होत्या. या सर्वपक्षीय संघटनांच्या मोर्चात हजारो कामगारांनी एकत्रित येत आझाद मैदान दणाणून सोडले.सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मनपा कामगार व अधिकाºयांचा १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीचा वेतन करार करण्याची कामगार नेत्यांनी व्यासपीठावरून केली.प्रशासनाने १ जानेवारी २०१६ पासून नवीन वेतन करार करणे आवश्यक असूनही कामगार संघटनांच्या नेत्यांबरोबर कोणत्याही प्रकारची वाटाघाटी केलेली नाही. त्यामुळे कामगारांच्या रोषाचा उद्रेक होण्याआधी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्याचीमागणी कामगार नेते महाबळ शेट्टी यांनी केली.


भिवंडी - गेल्या काही दिवसांपासून भिवंडीत सुरू असलेलं दुचाकी जाळण्याचं सत्र थांबताना दिसत नाही. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भिवंडीत दुचाकी जाळण्यात आल्या. शहरातील हनुमान नगर परिसरातील दत्त मंदिरासमोर पार्क करून ठेवलेल्या दुचाकींना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही घटना घडताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. मात्र अग्निशमन दल दाखल होईपर्यंत या आगीत चार दुचाक्या आणि एक सायकल जळून खाक झाली. सतत घडणाऱ्या या जळीतकांडांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला असून इथल्या लोकांना श्वास घेण्यासही अडचणी येत आहेत. आता दिवाळी सणही येत असल्याने या काळात फटाक्यांमुळे इथली हवा अधिकच विषारी बनणार आहे. याची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काळजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सण साजरे करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याबाबत सामाजिक संघटनांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करावी अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.दिल्लीत आंतरराष्ट्रीय आर्य महासम्मेलन २०१८ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रपती म्हणाले, सध्याचा काळ हा हिवाळी सणांचा काळ आहे. या काळात हवेतील प्रदुषणाच्या पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे दिल्लीकरांना श्वसनासही अडचणी येत आहेत. त्यामुळे या सणांच्या काळात समाजात शांतता आणि एकोपा टिकवण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी सामाजिक संघटनांनी जनजागृती करावी.गेल्या काही आठवड्यात दिल्लीतील हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून त्यामुळे दिवसभर शहरात धुसर वातावरण असते. याला काही नैसर्गिक कारणे असली तरी शहरातील वाहनांमधून होणारे प्रदुषण, बांधकाम उद्योगामुळे उडणारी धूळ तसेच शेजारील पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यांमध्ये थंडीच्या काळात नव्या गव्हाच्या हंगामासाठी जुन्या निघालेल्या पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा थेट परिणाम दिल्लीतील हवेवर होत असतो. दिल्लीतील हवा प्रदुषणाची ही समस्या आता नेहमीचीच बनली असून श्वसनासाठीही त्रास होत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.त्याचबरोबर एकामागून एक येणाऱ्या सणांच्या काळात पर्यावरणाचा विचार होत नसल्याने त्याचेही परिणामही भोगावे लागत आहेत. दसऱ्याच्या दिवशी येथे रावण दहनाचे शेकडो कार्यक्रम घेण्यात आले, फटाके फोडण्यात आले. त्यामुळेही हवेच्या प्रदुषणात भर पडली आहे. त्यानंतर आता दिवाळी सण येणार असल्याने त्यावेळीही फटाके फोडताना या हवा प्रदुषणात आणखीनच भर पडणार आहे.भंडारदरा - जायकवाडीसाठी भंडारदरा धरणातून गुरुवारी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सध्या हे पाणी निळवंडे धरणात जमा होत असून निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दोन तीन दिवसात निळवंडे धरणातून जायकवाडीतून पाणी सोडण्यास सुरवात होईल.भंडारदरा, निळवंडे धरणातून ३ हजार ८५० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडावयाचे आहे. मात्र निळवंडे धरणातून तांत्रिक कारणामुळे अधिक पाणी सोडण्यात मर्यादा आहेत. त्या साठी निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. भंडारदरा धरणातून १० ऑक्टोबरपासून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळी भंडारदऱ्याच्या स्पिल वे मधूनही पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली.सकाळी ९ वाजता स्पिल वे व वीज केंद्रातून मिळून २ हजार ४६ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. १० वाजता तो ३ हजार ८३६ क्यूसेक, तर दुपारी २ वाजता तो ४ हजार ४०८ क्यूसेक असा वाढविण्यात आला.चार वाजता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली. भंडारदऱ्यातून स्पिल वे व वीजनिर्मितीसाठी मिळून ४ हजार ९८० क्यूसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले जात आहे .हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे . आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणी साठा ६ हजार ९०१ दशलक्ष घनफूट होता .म्हणजेच धरण काठोकाठ भरण्यासाठी आता १ हजार ४१९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता आहे .


मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित स्मारक हे एकट्या भाजपचे नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला. शिवस्मारकाचे श्रेय एकट्यानेच लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला 'सामना'तील अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवस्मारक हे पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. श्रद्धा कमी व राजकारण जास्त असे दुर्दैवाने स्मारकाच्या बाबतीत घडत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना मुंबईत बोलावून घाईघाईने स्मारक उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला. हे स्मारक सरकार बांधत नसून भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे, असे वातावरण निर्माण करण्यात आल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला निघालेल्या बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. या कार्यक्रमाला इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित न केल्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाच्याबाबतीत भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. 


पिंपरी-चिंचवड - भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या कानफटात मारल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडली. गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. केंदळे विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. अखेर केंदळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नवी दिल्ली - सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. त्यासोबतच प्रशांत भूषण यांच्या 'कॉमन कॉज' नावाच्या सामाजिक संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरही वर्मा यांच्या याचिकेसोबतच सुनावणी होईल. भूषण यांच्या संस्थेनं सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी एक दिवस अगोदर सीबीआय प्रवक्त्यांनी आलोक वर्मा सीबीआय संचालक पदावर कायम राहतील तसेच राकेश अस्थाना विशेष संचालक पदावर कायम राहतील असे म्हंटले आहे.

लखनऊ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशात नेमकी काय रणनिती असावी, यावर या बैठकीत खल झाला. मात्र यामध्ये राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्यावर विशेष भर दिला होता. मात्र अमित शहांसमोर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराचा विषय उपस्थित केला नाही. लखनऊमधील आनंदी वॉटर पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अमित शहांसह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ आणि भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी योगी सरकारच्या कामाचं कौतुक केल्याची माहिती भाजपाच्या नेत्यानं दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काय असावी, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवल्या जाव्यात, याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील या बैठकीनंतर संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही नियमित बैठक होती. भविष्यातील योजना काय असाव्यात, याची चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती गोपाल यांनी दिली. या बैठकीत राम मंदिराबद्दल चर्चा झाली का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला. यावर गोपाल यांनी नाही, असे उत्तर दिले. ही बैठक राजकीय स्वरुपाची नव्हती.औरंगाबाद - नाशिकमधल्या धरणांतून जायकवाडीकरता पाणी सोडण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून, पाणी सोडलं जाणार आहे. यावेळी गोदावरी नदीकाठावरच्या शेतकऱ्यांना पाणी न उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी तसंच पोलीस बंदोबस्तात पाण्याचा हा विसर्ग होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या फरकानं म्हणजेच २ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात हे पाणी मिळणे अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जायकवाडीचे धरण भरेल असे प्रकल्प आपण नाशिक जिल्ह्यात करत असून यासाठी तीस हजार कोटी रुपये नियोजित केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. दमणगंगापिजाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला असून २०,००० कोटी रुपये जलसंपदा विभागाला दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.श्रीनगर - श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. नौगामच्या सुथू भागात आज सकाळी ही चकमक उडाली. या चकमकीनंतर त्या भागात जाण्यास लोकांना मज्जाव करण्यात आल्याने तिथे तणाव निर्माण झाला होता.सुथू भागात तो अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यावेळी प्रथम दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, हे जवानांच्या लक्षात आले आणि त्यांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात दोघेही मरण पावले. तीन दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर तेथील दारूगोळा नष्ट करण्याचे राहून गेले होते. त्या दारूगोळ्याचा स्फोट झाल्याने सात नागरिक मारले गेले होते. त्यामुळे आजच्या चकमकीनंतरही तिथे स्फोटके असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लोकांना तिथे जाण्यास मज्जाव केला. संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. 

मुंबई - नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. या निर्णयाचा फटका इतर महापालिकांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेमधील विद्यमान ५ नगरसेवकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आज दुपारी ३ वाजता मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि एन.एस.कर्णिक यांच्या खडपीठासमोर ५ नगरसेवकांच्या विरोधातील याचिकांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या दोन व भाजपच्या तीन अशा एकूण पाच नगरसेवकांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागणार आहे. तर २०१७ च्या पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या ३ काँग्रेसच्या १ आणि समाजवादी पार्टीच्या १ नगरसेविकेला यंदाची दिवाळी गोड जाणार असून त्यांना पालिकेत नगरसेवक म्हणून संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना उमेदवाराने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यास ‘महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल अ‍ॅक्टच्या कलम ९ अ’ नुसार निवडून आलेल्या नगरसेवकाने ६ महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे नगरसेवक सहा महिन्यात असे प्रमाणपत्र सादर करत नाहीत, त्यांचे पद आपोआप रद्द होते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांसंबंधी दिलेल्या निकालात दिला होता. शासनाने गेल्या २७ सप्टेंबर रोजी वटहुकूम काढून सहा महिन्यांची ही मुदत वाढवून एक वर्षांची केली आहे. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीला सुमारे दीड वर्षे झाले असून त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रुद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या निर्णयाचा फटका मुंबई महापालिकेतील एकूण ७ नगरसेवकांना बसला असता. मात्र, त्यामधील दोन नगरसेवकांचे पद लघुवाद न्यायालयाने आधीच रद्द केले आहे. यामुळे आता उर्वरित पाच नगरसेवकांना या निर्णयाचा फटका बसेल अशी शक्यता पालिकेच्या अधिकार्‍याने वर्तवली आहे. तर प्रभाग क्रमांक ३२ मधील कॉंग्रेस नगरसेविका स्टेफी किणी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत नंतर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सौदी - सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या मृत्यूसंदर्भात सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी अखेर मौन सोडले आहे. खाशोगी यांची हत्या ही निंदनीय घटना असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खाशोगी हे २३ दिवसांपूर्वी तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तिथेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती. यामुळे या प्रकरणात संशयाची सुई राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे वळली होती. सौदी अरेबियात प्रतिष्ठेची आर्थिक परिषद सुरू असून त्यावर खाशोगी खून प्रकरणाची छाया होती. या परिषदेत बुधवारी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या मृत्यूसंदर्भात भाष्य केले. ‘खाशोगी यांची हत्या ही निंदनीय आणि घृणास्पद घटना आहे. सौदीतील प्रत्येकासाठी ही एक दु:खद घटना आहे. सौदी अरेबिया खाशोगी यांच्या हत्येचा सखोल तपास करेल आणि दोषींना न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.सौदीच्या राजपुत्रांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील खाशोगी हत्या प्रकरणाबाबत भाष्य केले होते. ‘खाशोगी यांच्या मारेकऱ्यांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे’ असे त्यांनी सांगितले होते. ‘सौदी राजघराण्याची धूरा सध्या राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे आहे. शेवटी तिथे जे काही होणार त्याची जबाबदारी सलमान यांच्यावरच आहे’, असे सूचक विधान करत त्यांनी खाशोगी यांच्या हत्येमागे राजपुत्राचा सहभाग असू शकतो असे म्हटले होते. तर तुर्कस्तानने या हत्याकांडासाठी सौदी अरेबियाला जबाबदार ठरवले होते. खाशोगी यांची हत्या म्हणजे शांत डोक्याने रचलेला एक कट होता, असे तुर्कस्तानने म्हटले आहे.

पुणे - पुण्यातील फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही लैगिंक शोषणाचा प्रकार पुढे आलाय. संस्थेतील एका विद्यार्थिनीने थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केलीय. संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या बाबतीत लैंगिक शोषणाची वारंवार तक्रार करुनही एफटीआयआयचे संचालक आणि एफटीआय प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचा आरोप या विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत केला आहे.तसेच तक्रार केल्यानंतर कामात अडथळे आणण्यात आल्याचा आरोपही केला. तर संचालकांनी विद्यार्थिनीचे आरोप फेटाळलेत. संबंधित विद्यार्थिनीच्या शैक्षणिक तक्रारीमुळे तिची शिष्यवृत्ती नाकारल्याचे स्पष्ट केले आहे.नागपूर - सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला.नीलेश दिलीप पोटफाटे (२७) असे आरोपीचे नाव असून, तो वरुड, जि. अमरावती येथील रहिवासी आहे. फिर्यादीचे नाव दालचंद हेमराज गजभिये (४२) असे आहे. ते नरखेड येथील रहिवासी आहेत. ही घटना १८ आॅक्टोबर रोजी घडली होती. गजभिये धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त दीक्षाभूमी येथे जाण्यासाठी नागपूरला आले होते. ते दुपारी १२.३० च्या सुमारास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून दीक्षाभूमीकडे जात असताना गणेश टेकडी मंदिरापुढे आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली तसेच त्यांच्या खिशातील २०० रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर गजभिये यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली तसेच प्रकरणाचा झटपट तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयानेही तातडीने सुनावणी पूर्ण करून निकाल दिला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. राजेश श्यामसुंदर व अ‍ॅड. साधना बोरकर यांनी काम पाहिले.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget