March 2019

हरियाणा - भारतीय लष्करातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार करणारा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) माजी सैनिक तेज बहादूर यादव वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. तेज बहादूर यादव यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. मला अनेक पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी विचारणा झाली. मात्र, मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करातील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे यादव यांनी सांगितले. तेज बहादूर यादव सध्या आपल्या सहकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. जास्तीत जास्त मतदारांना आकृष्ट कसे करता येईल, यावर त्यांचा भर आहे. लवकरच ते आपल्या सहकाऱ्यांसोबत वाराणसीला रवाना होणार आहे. तेज बहादूर हे हरियाणाच्या रेवारी येथील रहिवासी आहेत.निवडणुकीतील विजय किंवा पराभवाची मला चिंता नाही. या माध्यमातून मला सैन्यातील जवानांना विशेषत: निमलष्करी दलातील सैनिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे लोकांसमोर मांडायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जवानांच्या नावाने मतांचा जोगवा मागतात. मात्र, त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना शहीदाचा दर्जा देण्यासही सरकारने नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ साली तेज बहादूर यादव यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. या प्रकारानंतर तेज बहादूर यादव यांची चौकशी झाली आणि त्यांना लष्करातून बडतर्फ करण्यात आले होते.

श्रीनगर - जम्मू-काश्मीर येथील बनिहालमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी या परिसरात झालेल्या स्फेटानंतर सुरु असणाऱ्या तपासानंतर ही दाट शक्यता वर्तवण्यात आली. तपास यंत्रणांना अमोनियम नायट्रेट आणि जिलेटिनच्या कांड्या घटनास्थळी सापडल्या आहेत. त्यामुळे आणखी एका मोठ्या हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. बनिहालमध्ये शनिवारी सकाळी सँट्रो कार सीआरपीएफच्या बसला मागून धडकली. यात सँट्रोमधील सिलेंडरचा स्फोट होऊन गाडी जळून भस्मसात झाली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सीआरपीएफच्या बसचे थोडंसे नुकसान झाले होते. सँट्रोमध्ये यूरिया, तेलाची बाटली आणि एक एलपीजी सिलेंडर आढळून आला. दरम्यान सँट्रो गाडीचा चालक फरार असून, पोलीस याप्रकरणीचा अधिक तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात साआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्यावर अशाच प्रकारे घडवून आणलेल्या एका आत्मघाती हल्ल्यात अनेक जावानंना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. 
एकिकडे बनिहालमध्ये झालेल्या या स्फोटानंतर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. तर दुसरीकडे जम्मू काश्मिरच्या पूंछमधील मनकोट आणि कृष्णाघाटी सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात एक नागरीक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताकडूनही पाकिस्तानच्या या गोळीबारास प्रत्युत्तर देण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्धवस्थ केले होते. त्यानंतर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून सतत शत्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. २६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत तीन भारतीय जवान शहीद झाले असून, सात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अन्थोनी यांनी ही माहिती आज दिली. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेच्या दोन जागांवर उभे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. 
राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. केरळ काँग्रेसने राहुल यांना तसा प्रस्तावही दिला होता. मात्र, त्यावर राहुल यांनी काहीच भाष्य केले नव्हते. परंतु, आज काँग्रेस नेते ए. के. अन्थोनी यांनी राहुल गांधी अमेठीसह केरळमधूनही लढणार असल्याचे जाहीर केले. तर अमेठीशी गांधी कुटुंबाचं कौटुंबिक नाते आहे. अमेठीला राहुल त्यांची कर्मभूमी मानतात. त्यामुळे अमेठीपासून ते दूर होणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी अमेठीसह केरळमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. राहुल यांनी आपल्याच राज्यातून निवडणूक लढवावी, अशी दक्षिण भारतातील तिन्ही प्रदेशातून मागणी करण्यात आली होती. मात्र आम्ही त्यातून केरळच्या वायनाडची निवड केली. कारण हा लोकसभा मतदारसंघ तिन्ही प्रांताना जोडलेला आहे, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.

पंजाब - पंजाबच्या खरड भागात वरिष्ठ महिला आरोग्य अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची त्यांच्या कार्यालयात घुसून एका व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकऱ्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली असून त्याची प्रकृती गंभीर आहे, शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पोलीस महानिरिक्षकांना या प्रकरणाच्या त्वरीत चौकशीचे आदेश दिले आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, अधिकारी नेहा शौरी यांची खरडमध्ये अन्न प्रयोगशाळेत नियुक्ती होती. त्याचबरोबर त्यांच्यावर मोहाली येथील रोपड जिल्ह्यासाठी अन्न व प्रशासन विभागाचा परवाना देण्याची जबाबदारी होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मोरिंडाचा रहिवासी असलेला आरोपी बलविंदर सिंह डॉ. नेहा शौरी यांच्या कार्यालयात घुसला आणि आपल्या परवानाधारी बंदुकीतून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. 
पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात कळते की, आरोपी मोरिंडामध्ये एका औषधाचे दुकान चालवत होता दरम्यान, २००९ मध्ये नेहा यांनी त्याच्या दुकानावर छापा मारला होता तसेच या दुकानातून बंदी असलेली नशेची औषधे जप्त केली होती. त्यानंतर या दुकानाचा औषध परवाना रद्द करण्यात आला होता. या हत्याकांडाचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. मात्र, परवाना रद्द करण्यात आल्यानेच हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे - शिवसेना- भाजपने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समेट केला असला तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हा बदल स्वीकारायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. आता ईशान्य मुंबईपाठोपाठ मावळ मतदारसंघातही असा प्रकार घडला. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना - भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे युतीचे उमेदवार आहेत. मात्र, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप बारणेंसाठी काम करण्यास नकार दिला आहे.जगताप यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वतः मध्यस्थी करत श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप ह्यांच्यात सोबत एक बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल दीड तास ही बैठक चालली. मात्र, बैठकीदरम्यान आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रसंगानंतर संपूर्ण शहरात उलटसुलुट चर्चेला उधाण आले आहे. परंतु, बारणे यांनी भाजपा नेते दोन दिवसांत प्रचारात असतील, असा विश्वास व्यक्त केला.

नाशिक - महायुतीत समावेश असूनही स्थानिक पातळीवरील नेत्यांना शिवसेना भाजपकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(रिपाइं) आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्हा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. महायुतीच्या बैठकांना बोलविले जात नाही तसेच रिपाइं नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल गुरुवारी, चार ४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुपूर्द केला जाणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. 
आरपीआय (आठवले गट) केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात आरपीआयच्या आठवले गटाला विश्वासात घेतले जात नसल्याचा दावा करत, जिल्हाध्यक्ष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याचा आरोप बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या मनोमिलन बैठकीत 'रिपाइं'च्या नेत्यांना बोलविण्यात आले नाही. दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही रिपाइंच्या नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. युतीच्या मेळाव्यांमध्ये 'रिपाइं' अध्यक्ष रामदास आठवले यांचा फोटा लावला गेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे 'रिपाइं'ने नाशिक आणि दिंडोरीसाठी स्वतंत्र उमेदवार द्यावा, असा एकमुखी ठराव बैठकीत संमत करण्यात आला. या बैठकीचा अहवाल येत्या ४ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सादर केला जाणार आहे. यावेळी रामदास आठवले जो आदेश देतील त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रकाश लोंढें यानी दिली.

सांगली - सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज (बाबा) सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने दाखल तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.१८६० चे कलम १७१ आणि १७१ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.सांगली लोकसभा मतदार संघांतर्गत मिरज विधानसभा मतदार संघात दि. २७ मार्च रोजी आणि पलूस-कडेगाव मतदार संघात २८ मार्च २०१९ रोजी पृथ्वीराज देशमुख यांनी केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने आयोगाकडे तक्रार केली गेली होती. तक्रारीची शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध मिरज पोलीस ठाणे आणि भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कार्यालयाने कळविले आहे.

मुंबई - शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्यावी. मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवेन, असा दावा रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात मतदान करण्याची किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा निर्णय भाजप घेऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून लढण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, या मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाईच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील लोक मला ओळखतात. यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती तेव्हा मला २.२५ लाख मते मिळाली होती, असे आठवले यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची मते राष्ट्रवादी आणि मनसेकडे वळण्याची शक्यता आहे. एखादा नवखा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यातही तितकाच धोका आहे. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागू शकतो. रामदास आठवले सुरुवातीपासून रिपाईसाठी लोकसभेची किमान एकतरी जागा सोडावी, यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिल्यास भाजप-शिवसेनेती वाद टळू शकतो.

मुंबई - महाराष्ट्र नव निर्माण सेना लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार या निर्णयावर राजगडावर झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राजगडावर मनसे विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिल्या. मनसे कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात बिनधास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा असे नांदगावकर यांनी सांगितले. 
मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणि त्यानंतर झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत त्यांना साथ देणार असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. 
मोदी मुक्त भारत हेच माझे आणि माझ्या पक्षाचे धोरण आहे. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मागच्याच वर्षी बोललो होतो. आता जे पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत तेच पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचे आहे. काहीही झाले तरीही भाजपाला, नरेंद्र मोदींना आणि अमित शाह यांना मतदान करू नका असेही आवाहन राज ठाकरेंनी केले होते.

सोलापूर - लोकसभेचा प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागण्यास सुरुवात झाली असून आरोप करण्याची पातळी घसरत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही धर्मवादी आणि जातीयवादी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोलापूर मतदार संघाचे उमेदवार आंबेडकर सोलापूरात एका बैठकीदरम्यान म्हणाले भाजप-शिवसेनेचे नेते सांगत आहेत, आमची लढाई बहुजन वंचित आघाडीबरोबर आहे. ते पाहता आमची ताकद वाढली आहे हे सिद्ध झाले आहे. निधर्माचे पुरस्कर्ते असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी, पवार व फडणवीस हे दोघेही धर्मवादी व जातीयवादी आहेत.पक्षांच्या उमेदवारांची नावे आपण जातीसह प्रसिद्ध कशी केली याबाबत आंबेडकर म्हणाले की, राखीव मतदारसंघातील उमेदवार मागासप्रवर्गातील असतात, त्या ठिकाणी काही अडचण नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारही कोणत्या जातीचा आहे हे मतदारांना समजायला हवे. काँग्रेस, भाजप व शिवसेना या पक्षांचे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची जात पाहिली तर ते ठराविक जातीपुरती मर्यादित असतात, आम्ही मात्र सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून संधी दिली आहे. काँग्रेस, भाजपसह सर्व पक्षांनीही त्यांच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची नावे जातीसह प्रसिद्ध करावीत, त्यामुळे त्यांचा कल कुणाकडे आहे हे समजेल. असेही आंबेडकर म्हणाले.

सातारा - लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात निवडणूक रंगणार आहे. राष्ट्रवादीचे उदयराजे यांनी आतापर्यंत साताऱ्याची जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. प्रथमच शिवसेना त्यांना टक्कर देणार आहेत. मात्र, त्यांचा टिकाव किती लागणार याचीच चर्चा आहे. हा मतदार संघ शिवसेना राष्ट्रवादीकडून आपल्याकडे खेचणार का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.साताऱ्यात उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी उदयनराजे यांनी विरोधी गोटात जाऊन आपलीही सगळीकडे मैत्री आहे, असे सांगत राष्ट्रवादीवर दबाव वाढविला होता. तर दरम्यानच्या काळात उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. उदयनराजेंवर राष्ट्रवादी नाराज आहे, असेही वृत्त होते. मात्र, शरद पवार यांनी येथे लक्ष घालून वादावर पडदा टाकला आणि उद्यनराजेच लोकसभेचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. आता उदयन राजे आपली सीट राखणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

नवी दिल्ली - गुप्तचर संस्था रॉ चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यानी दिलेली भेट असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दुलत यांच्या मते, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने निवडणुकीच्या आधी भाजपला भेट म्हणून पुलवामा हल्ला केला.दुलत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, याआधीही मी याबद्दल बोललो आहे. जैशने भाजप, मोदी यांना एक भेटच दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्याची भीती होती आणि ती खरी ठरली. त्यानंतर पाकिस्तानात घुसून कारवाई करणे योग्य होते. 
दुलत म्हणाले की, आपल्याला काश्मीरमधील लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतही बोलायला हवे. चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकवेळ अशी होती की, मनमोहन सिंग सरकार समझोत्यापासून एक पाऊल दूर होते. जर तो समझोता झाला असता तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती. दुलत यांनी मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांच्यात होणारा करार होता होता राहिला होता.

नवी दिल्ली - बॅंकांना हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला व्यावसायिक विजय माल्ल्या याने आपल्यावरील कारवाई चुकीची असून भाजपावर निशाणा साधला आहे. विजय माल्ल्याने ट्विट करत सांगितले की, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, त्यांच्या सरकारने माझ्या बँक कर्जापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून केली आहे. तर भाजपाच्या प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्यं का करत आहे? असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला. विजय माल्ल्याने याने रविवारी ट्विटवरून भाजपाच्या नेत्यांना सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा आधार घेत विजय माल्ल्या याने ट्विटमध्ये लिहले की, पंतप्रधानांची मुलाखत बघितली, ज्यामध्ये ते माझे नावं घेऊन सांगतात की, विजय माल्ल्याने बँकांचे ९ हजार करोड घेऊन फरार झाले असले तरी त्यांच्या केंद्र सरकारने माल्ल्या यांची १४ हजार करोड रुपये संपत्ती जप्त केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याकडून वसूली केल्याची कबुली केली आहे मग भाजपाच्या प्रवक्त्यांची माझ्याविरोधात विधाने का सुरु आहेत ?असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला. 
काही दिवसांपूर्वी विजय माल्ल्याने सरकारी बँकांनी माझ्याकडे पैसै घ्यावेत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला वाचवावे, अशी ऑफर दिली होती. जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत असून कंपनीचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर माल्ल्याने ट्विट केले होते. जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारने किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल त्याने उपस्थित केला होता. जेट एअरवेज अडचणीत असताना सरकारी बँका मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटते. मात्र हीच मदत किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत विजय माल्ल्याकडून विचारत एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला होता.

जोधपूर - .भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२७ युपीजी हे राजस्थानातील जोधपूरजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. दि.३१ सकाळी नेहमीच्या सरावादरम्यान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते मोकळ्या जागेत कोसळले. दरम्यान, विमानाचा पायलट बचावला असून तो सुखरुप असल्याचे सुत्रांकडून कळते.जोधपूरच्या सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील ओडाना गावात ही दुर्घटना घडली. आपल्या दैनंदिन सारावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळानंतर पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने हे विमान कोसळल्याचे माध्यमांतील वृत्तातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पायलटने पॅराशूटच्या माध्यमातून बाहेर उडी घेतल्याने तो सुखरुप बचावला आहे.

परभणी-: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक वादातून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अमरदीप रोडे असे नगरसेवकाचे नाव आहे. परभणी शहरातील जायकवाडी भागात हा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात आरोपींकडून कुऱ्हाडीने वार करत अमरदीप यांची हत्या करण्यात आली आहे. अमरदीप आणि आरोपींमध्ये वैयक्तित वाद होते. त्याच रागात त्यांनी अमरदीप यांची निर्घृण हत्या केली.सगळ्यात धक्कादायक म्हणजे अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वत: नवा मोंढा पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्हाची कबुली दिली.

उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने तरुणाला ३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन पिस्तूल व दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत . ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाण पूल परिसरात एक जण शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाण पूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून सापळा लावला. गुरुवारी (२८ मार्च) दुपारी अद्दीच वाजता एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. या संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल-२६ असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. गोविंद सिंग भदोरिया मूळचा मध्यप्रदेश मधील राहणारा आहे. मात्र सध्या तो शहरातील शांतीनगर परिसरात राहत होता. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी व्हिटीसी मैदान परीसरात मध्यरात्री अडीच वाजता मोटारसायकलवरून फिरणाऱ्याची दोघांची अंगझडती घेतली होती. त्यांच्याकडे एक पिस्तूल मिळाली आहे. पोलिसांनी एकाच आठवड्यात तीन जणांना चार शस्त्रांसह अटक केली आहे. याप्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी काही घातपाताची तर शक्यता नव्हती, यामार्गाने तपास केला जात असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत उभारलेल्या १८ हजार बेकायदा बांधकामांच्या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्या चौकशीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) ठाणे विभागाच्या अधीक्षकांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे.नगरविकास विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून तातडीने बेकायदा बांधकामे आणि त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि पालिकेच्या अहवालाची वाट न पाहता ‘एसीबी’ला चौकशी परस्पर परवानगी दिली जाईल, असे नगरविकास विभागाने कळवले आहे. 
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही, अशी तक्रार करत माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले, श्रीनिवास घाणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ११ वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना तत्कालीन न्या. आर. एम. लोढा, न्या. नरेश पाटील यांनी २००६ नंतर ज्या प्रभागांच्या हद्दीत बेकायदा बांधकामे उभी राहतील त्या प्रभाग अधिकाऱ्यांना बेकायदा बांधकामप्रकरणी दोषी ठरवून आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले होते.अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे शहरात बेकायदा बांधकामे उभी राहून शहर बकाल झाले आहे. बेकायदा बांधकामांची दखल अतिक्रमण नियंत्रण, प्रभाग अधिकारी घेत नाहीत म्हणून घाणेकर यांनी बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरो) ठाणे विभागाचे अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

ठाणे - पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशातून मुंब्य्रात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या जाैनकुमार छुन्नुलाल (४१), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (२६) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (३०) या त्रिकुटाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. तसेच त्यांच्याकडून भारतीय चलनातील दोन हजार रुपायांच्या पावणे सोळा लाख रुपये किंमतीच्या ७८८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्या त्रिकुटाला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. 
मुंब्य्रातील किस्मत कॉलनी परिसरात काहीजण बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक ए.टी.बडे यांना मिळाली होती.त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधूकर कड यांच्या पथकाने त्या परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील जौन आणि मोहम्मद तसेच मुंब्य्रातील जावेद या तिघांना ताब्यात घेत, चौकशी केली असता छुन्नुलाल याच्या बॅगमध्ये कपडयात बांधलेल्या दोन हजार रपये किंमतीच्या १५ लाख ७६ हजार रु पायांच्या ७८८ बनावट नोटा आढळल्यावर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी ४८९ (क), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत कोठडी मिळाली. त्यांनी त्या नोटा पश्चिम बंगाल येथून उत्तरप्रदेशात नेल्या होत्या. तेथून त्या महाराष्ट्रात चलनात आणण्यासाठी आले होते. तद्पूर्वीच त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर करत आहेत.

मुंबई - प्रकाश आंबेडकर यांची जे केले ती त्यांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका होती. आंबेडकर हे विरोधकांची मते फोडण्याचा, विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक त्यांचे काय गणित आहे, काय रणनीती आहे, हे ठरवतील. आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचे कळेलच, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कसल्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत.या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्वाखालचे आघाडी सरकार येईल. काँग्रेस पक्षाने एक व्यापक भूमिका घेतलेली आहे. आम्हालाच सत्ता पाहिजे, असे म्हटलेले नाही. भाजपला आमच्या चुकांमुळे चुकून यश मिळाले. सोशल मीडियाचा आता आम्हीही प्रभावी वापर करत आहोत. पुढील सरकार विरोधकांचे सरकार असेल आणि काँग्रेस मोठा पक्ष असेल.भाजपने आता कितीही आम्हाला देशद्रोही म्हटले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे केला, तरीही आता लोकांना कळलेले आहे की, ‘दाल मे कुछ काला है’ यामुळे नोटाबंदी, युवकांच्या नोक-यांचे प्रश्न, शेतक-यांचे प्रश्न, जीएसटी, विकासदर या प्रश्नांवर भाजपला घेरणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मुंबई - भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर मतदरासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. एकेकाळी अमित शाह यांना अफजल खान यांची उपमा देणा-या उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत हे तर फितूर, वाघ असूच शकत नाहीत, असे म्हटले आहे. 
अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ५ वर्ष एकमेकांना पटकणारे, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझल खानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. दोघांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात असून या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून सचिन तेंडुलकरच्या या भेटीमागे काही राजकीय कारण तर नव्हते ना अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. 
सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची होती. याचा राजकारणाशी संबंध नाही,असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. सचिन-पवार भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण नवाब मलिक यांनी ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

मुंबई - कतारचा व्हिसा मिळवणाऱ्या अर्जदारांच्या सुविधेसाठी मुंबईत कतारचे व्हिसा केंद्र उघडण्यात आले आहे. मुंबईतील कतार दूतावासातील राजदूत सैफ बिन अली अल मोहन्नदी यांनी या केंद्राचे उदघाटन केले. भारतात कतारचा व्हिसा मिळवण्यासाठीचे दिल्लीनंतर मुंबई हे दुसरे शहर आहे. लवकरच कोची, हैदराबाद, लखनऊ, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्येही व्हिसा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. निक-प्रियांका नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र नुकतीच या दोघांबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.निक आणि प्रियांका लवकरच एकमेकांपासून दूर होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र हे वृत्त कितपत खरे आहे याचा कोणताच ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण प्रियांकाचे चाहते हे वृत्त कुठून आले याच्या शोधात आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार या वृत्ताची सुरूवात एका मासिकातून झाली आहे.अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकामध्ये निक आणि प्रियांकामध्ये काही अलबेल नसल्याचे वृत्त पहिल्यांदा छापून आले. या मासिकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये असे म्हटले आहे की, प्रियांका आणि निकमध्ये सध्या लहान-लहान गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. निक प्रियांकाच्या लग्नाला ४ महिने पूर्ण होत असतानाच या मासिकात छापून आलेल्या बातमीने त्यांच्या घटस्फोटाची अफवा पसरली आहे.'ओके' नावाच्या या मासिकानं म्हटले आहे की, निक आणि प्रियांका लग्नानंतर प्रत्येक लहान गोष्टीवरून भांडत असतात. ते दोघंही एकमेकांसोबत आनंदी नाहीत. मासिकाच्या बातमीनुसार निकच्या मते, त्याने हे लग्न खूप घाईघाईत केले आणि लग्नाच्यावेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की, प्रियांका खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकने प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असे जोनस कुटुंबियांना वाटते.

मुंबई - इरफान खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांची मुख्य भूमिका असलेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. त्याचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीक्वलमध्ये अभिनेत्री करिना कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. करिना या चित्रपटात पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी करिना खूप उत्सुक आहे. ‘हिंदी मीडियम २’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागून राहिले आहे. कारण इरफान खान या चित्रपटातून कमबॅक करत आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून लंडनमध्ये तो कर्करोगावर उपचार घेत आहे. एप्रिलमध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे.या सीक्वलचे नाव तूर्तास ‘इंग्लिश मीडियम’ असे असल्याचे म्हटले जात आहे. इरफान खानची मुलगी इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी जाते आणि तिथे तिला शिक्षणासाठी येणाऱ्या समस्येवर या चित्रपटाची कथा आधारित आहे.

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणा-या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेमध्ये अभिनेता सागर देशमुख मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.सागर देशमुख म्हणतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणे, हे माझ्यासाठी नवे आव्हान आहे. बाबासाहेबांचे मोठे कर्तृत्व आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी प्रगल्भ होतोय, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

मुंबई - आर्थिक टंचाईमुळे महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडचे (एमटीएनएल) नेटवर्क १ एप्रिलपासून कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीला टॉवरची सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपनीने आपली १६ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. याचा फटका शहरातील सुमारे साडेबारा लाख मोबाइल ग्राहकांना बसण्याची चिन्हे आहेत. यामुळे अवघ्या दोन दिवसांत 'एमटीएनएल' व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निधीची कमतरता असल्याने एमटीएनएलला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन थकू लागले असून, कंत्राटदारांचेही पैसे ८ महिन्यापासून थकले आहेत. मोबाइल फोनला नेटवर्क मिळावे या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी एमटीएनएल कंपनीने टॉवर उभारले. पण त्यासाठी ठरलेले भाडे सोसायट्यांना वेळेवर दिले जात नसल्याने काही सोसायट्यांनी टॉवरच्या दुरुस्ती-देखभालीसाठी कर्मचाऱ्यांना आवारात प्रवेश देणे नाकारले आहे. त्यातच काही सोसायट्यांनी मोबाइल टॉवरची वीज कापणे सुरू केल्याने काही भागांत एमटीएनएलची सेवा बंद झाली आहे.यातच आता कंपनीला विविध ठिकाणी 'टॉवर' उभारून ते भाडेतत्त्वावर देणाऱ्या मोबाइल टॉवर कंपनीचे तब्बल १६ कोटी ६४ लाख रु.चे भाडे थकले आहे. हे भाडे भरण्यासाठी संबंधित कंपनीने वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही झाल्या. दरवेळेस आश्वासनांव्यतिरिक्त काहीच हाती आले नाही. यामुळे अखेर कंपनीने कारवाईचा बडगा उगारत एमटीएनएलला ३१ मार्चपर्यंत थकबाकी रक्कम भरावी, अन्यथा सेवा थांबविली जाईल, असा इशारा दिला आहे. कंपनीने एमटीएनएलला १८ मार्च रोजी पत्र लिहून हा इशारा दिला आहे. त्याला ११ दिवस उलटून गेले तरी व्यवस्थापनाने पैसे भरलेले नाही. नुकतेच एमटीएनएलला केंद्र सरकारने आर्थिक साह्य दिले असून, कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापर्यंतचे वेतन होईल, इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. 

हैद्राबाद - देशात मोठ्या प्रमाणात EVM मशीनला विरोधकांनी विरोध केला आहे. त्यांनी मतदानाकरता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी केली आहे. पण, त्यानंतर देखील लोकसभा निवडणुका या EVM वरतीच पार पडणार आहेत. दरम्यान, देशातील असा एक मतदार संघ आहे ज्या ठिकाणी EVM नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका पार पडणार आहेत तो मतदारसंघ हैद्राबाद आहे.या मतदारसंघात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी या मुलगी हैद्राबादमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी १७८ हे शेतकरी आहेत. केवळ ६४ उमेदवारांसाठीच EVMचा वापर शक्य आहे. त्यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरूवार पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख होती. पण, अर्ज मागे घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. परिणामी, आता तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची मुलगी कलवकुंतला कवितासाठी निवडणूक कठीण जाणार आहे.

मुंबई - काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.म्हणून काँग्रेसच्या वतीने उत्तर मुंबईत ऊर्मिला मातोंडकर यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी ऊर्मिला यांनी जोरदार भाषण ठोकत भाजपवर हल्ला चढविला. खोट्या मनोवृत्तीचे लोक माझ्या लग्न आणि धर्मावरून वाद निर्माण करत आहेत. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी प्रामाणिकपणे मत मागणार आहे. मी मुंबईकर आहे, मराठी असल्याचे कार्डही अजिबात खेळणार नाही , असे त्यांनी म्हटले.
या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. २००४ साली ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने अभिनेता गोविंदाला मैदानात उतरविले होते. काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरली. २००९ साली गोविंदाने माघार घेतल्याने संजय निरुपम यांना उमेदवारी मिळाली आणि मनसे फॅक्टरमुळे तेही यशस्वी ठरले. सेलिब्रिटी विरुद्ध राजकीय कार्यकर्ता अशा लढाईमुळे पुन्हा सेलिब्रिटींना जनता निवडून नाही ना देणार अशी धास्ती भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.

सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेतला.बसपातर्फे राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळेस प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करू नये, अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी घेतली होती. शुक्रवारी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता. सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघार घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मागासवर्गीय समाज हा काँग्रेस व भाजपा यांच्या पाठीमागे जात होता़ पण यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच सर्वजण संघटित झाले आहेत़ त्यामुळे आम्ही कशाला विरोध करायचा म्हणून बसपाकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे.

जामखेड - शरद पवार यांचे राजकारण हे सूडाचे असून त्यामुळेच प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी माझी आई आणि वडील येऊ शकत नाहीत. मात्र आता मतदारच माझे आई वडील आहेत, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी जामखेड येथे केले.जामखेड येथे भाजपा- शिवसेना-आरपीआय व इतर मित्र पक्ष यांचा मेळावा झाला. या वेळी सुजय विखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड , रवींद्र सुरवसे, सूर्यकांत गोरे, निखिल घायतडक, प्रसाद ढोकरीकर, भगवान मुरूमकर, मंगल भुजबळ , सुधीर राळेभात, गौतम भुतेकर, मनोज कुलकर्णी उपस्थित होते.
जामखेड शहरामधून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली, यानंतर मेळावा झाला. या वेळी सुजय विखे म्हणाले, की ही लढाई सर्वसामान्य जनता विरुद्ध दहशत अशी आहे.या वेळी विखे यांनी पवार यांचे नाव न घेता पवारांच्या सूडाच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप केला.
माढय़ातून शरद पवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार अनेक ठिकाणी बदलावे लागले आहेत. अनेकजण उभे राहण्यास तयार नाहीत. नगर दक्षिणमध्ये सुद्धा सुजय विखे यांच्यासमोर जगतापांची मोठी अडचण झालेली आहे, त्यामुळे तेसुद्धा या ठिकाणी उमेदवार करण्याची शक्यता कमी आहे आणि जरी केली तर ते माघार घेतील

पाटणा - अखेर महाआघाडीने शुक्रवारी बिहारमध्ये सर्व ४० जागांचे वाटप जाहीर केले. त्यात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) २०, कॉँग्रेस नऊ, उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाला पाच, जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाला तीन आणि मुकेश साहनी यांच्या विकाशील इन्सान पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत.आरजेडी त्यांच्या वाट्याला आलेल्या २० पैकी एक जागा डाव्या पक्षाला सोडणार असल्याचे तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाचे १८ मतदारसंघातील उमेदवार ठरल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दरभंगातून सिद्दीकींची उमेदवारी जाहीर केल्याने तेथील विद्यमान खासदार किर्ती आझाद यांची अडचण झाली आहे. आझाद यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पत्रकार परिषदेला कॉँग्रेसचा एकही नेता नसल्याने महाआघाडीतील धुसफूस न संपल्याचे संकेत मिळाले आहेत.

अहमदाबाद - काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेला गुजरात उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पाटीदार आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात हार्दिक पटेल दोषी ठरल्याचा निर्णय रोखण्यास न्यायालयाने नकार दिला. गुजरातमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हार्दिककडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे. काँग्रेसलाही हा मोठा हादरा असल्याचे मानले जाते.हार्दिक यांनी जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान मेहसाणाच्या विसनगरमध्ये दंगल भडकली होती. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर हार्दिक यांना जामीन मिळाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाने हार्दिकची शिक्षा निलंबित केली होती. मात्र, दोषी ठरवण्याच्या आदेशावर स्थगित आणण्यास नकार दिला होता.

मुंबई - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करतानाच, गृहखात्यासह ११ महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणारे राज्याचे मुख्यमंत्री एवढे व्यग्र आहेत की त्यांना अशा प्रकरणांच्या तपासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? ते राज्याचे नेते आहेत की एका पक्षाचे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सुनावले.
पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याकडेच तपास कायम ठेवण्यात आला आहे. मात्र विशेष तपास यंत्रणेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांद्वारे या अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचे पाक्षिक परीक्षण केले जाईल. शिवाय ज्या कारणामुळे फरारी आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या, ते कारण दूर करण्यात येऊन विशेष तपास यंत्रणेची कुमक दुप्पट करण्यात आली आहे. ३० ते ३५ अधिकारी यापुढे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. एवढेच नव्हे, तर आरोपींचा ठावठिकाणा देणाऱ्यांना जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कमही ५० लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. तसेच या सर्व कारणास्तव तपास यंत्रणेला आरोपींचा छडा लावण्यासाठी शेवटची संधी म्हणून तीन महिन्यांची मुदत द्यावी. या मुदतीतही काहीच झाले नाही, तर आम्ही पुन्हा मुदतवाढ मागणार नाही, असा दावाही मुंदरगी यांनी केला.
न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने मात्र तपास अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्यानंतर सरकारला अचानक जाग आल्याचे सुनावले. प्रत्येक तपास न्यायालयाच्या हस्तक्षेपाने केला जाणे हे लज्जास्पद असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले. एवढेच नव्हे, तर पत्रकार गौरी लंकेश हत्येबाबत कर्नाटक पोलिसांकडून योग्य ती माहिती उपलब्ध झाली नसती तर महाराष्ट्र पोलीस दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्याबाबत अद्यापही चाचपडत बसले असते, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.
न्यायालय एवढय़ावरच थांबले नाही. ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून लोक पुढे येतील आणि फरारी आरोपींचा ठावठिकाणा सांगतील असे सरकारला वाटते का? असा सवालही न्यायालयाने सरकारला केला. लोक पुढे येऊन फरारी आरोपींचा छडा लावण्यासाठी मदत करतील, असा समज तपास यंत्रणा करूच कशी शकते, असेही न्यायालयाने सुनावले.

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी (२७ मार्च) उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. मी आज सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे. लहाणपणापासून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी प्रभावित आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे पक्षात प्रवेश केला' असे उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना म्हटले होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम,मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील हे उर्मिला मातोंडकर यांच्या समवेत बुधवारी दिल्लीला गेले होते.

मुंबई - दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत एक कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील विलास दादाराव चव्हाण यांनी फिर्याद दिली होती की, दिलीप काशीनाथ काळभोर (जि. पुणे) याच्याशी त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. तत्कालीन राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांची चांगली ओळख असून, त्यांच्या माध्यमातून दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आमिष काळभोर याने चव्हाण यांना दाखविले. मुंबईतील ‘स्पेन्सर रिटेल’चा परवाना हस्तांतरित करून देतो. त्यासाठी दोन कोटी १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे काळभोर याच्यासह दयानंद वुजलू वनंजे (रा. नांदेड) यांनी चव्हाण यांना सांगितले. याची खात्री पटवून देण्यासाठी दोन्ही आरोपींनी चव्हाण यांना राज्यमंत्री कांबळे यांच्या दालनात नेले. त्या वेळी अटी-शर्ती पूर्ण केल्यास परवाना मिळवून देऊ, असे आश्वासन खुद्द कांबळे यांनी चव्हाण यांना दिले होते. परवान्यासाठी चव्हाण यांनी १५ एकर शेती, खुलताबाद तालुक्यातील वडोद बुद्रुक येथील ‘माथेरान’ हॉटेल आणि औरंगाबादेतील आदित्यनगर येथील राहते घर बँकेकडे गहाण ठेवले. लाखोंची
रोख रक्कमही वेळोवेळी ‘आरटीजीएस’द्वारे वरील तिन्ही आरोपींसह सुनील जबरचंद मोदी (रा. कोल्हापूर) याच्या खात्यावर वर्ग केले. अशा प्रकारे चव्हाण यांनी या चौघांना एक कोटी ९२ लाख रुपये दिले होते. मात्र, परवाना मिळत नव्हता म्हणून चव्हाण यांनी तगादा लावला असता, आरोपींनी टाळाटाळ केली. फोन बंद करून ठेवले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर चव्हाण यांनी ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयात तक्रार दिली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याने अखरे चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर १३ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी काळभोर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी विरोध केला. गुन्हा गंभीर असून, रणजित बाळासाहेब तुपे यांचीही आरोपींनी याच प्रकारे एक कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, याचाही सखोल तपास करावयाचा आहे. आरोपीच्या अटकेशिवाय तपास होऊ शकत नाही. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती मुंडवाडकर यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
राज्यमंत्री कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई - राज्यातील शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी अखेर प्रलंबित विद्यावेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार पत्रव्यवहार, मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना भेटूनही विद्यावेतन नियमित नसल्याने अखेर संयम संपून निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने काहीशा वेगळ्या शैलीत पत्र लिहून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पत्रात म्हटले आहे की, ‘संयम संपेपर्यंत वाट न पाहू नका, आम्ही भिकारी नाही,’ अशा गंभीर शब्दांत इशारा देण्यात आला आहे.
विद्यावेतनाच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टर आणि राज्य सरकार आमने-सामने आहेत. नागपूर, अकोला, अंबेजोगाई आणि लातूरच्या सरकारी रुग्णालयात आरोग्यसेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या काही महिन्यांपासून विद्यावेतन मिळत नाही. याविरोधात मार्डने आता राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. याबाबत सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, नागपूर, अकोला आणि लातूर या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना मिळणारे विद्यावेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. एक हजार निवासी डॉक्टरांचे मानधन डिसेंबर २०१८ पासून मिळालेले नाही.काही महिन्यांपूर्वी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मानधन देण्याचे आदेश दिले होते.
सोमवारी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहोत. या भेटीत मानधन वाढ आणि रखडलेले मानधन देण्याची विनंती करणार आहोत. ही विनंती मान्य न झाल्यास राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जातील, असा इशारा डोंगरेंनी दिला.

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शहा यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी खुद्ध शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. भाजपचे अमित शहा उद्या शनिवारी गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित रहाणार आहेत. अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. यावेळी अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले होते. उद्धव ठाकरेंनीही अमित शहा यांचे निमंत्रण स्विकारले आहे. अमित शहा उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे युतीतील शिवसेना आणि भाजप युतीतील घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

वाराणसी - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभा करू शकत नाही म्हणून मी उभा राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी म्हटले. भीम आर्मीने शनिवारी वाराणसीतून एक मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत आझाद हे स्वत: सहभागी होणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी सांगितले.आझाद म्हणाले, मी शनिवारी वाराणसी दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मी या मतदारसंघातून निवडणूक लढत असून माझ्या प्रचाराची सुरूवात म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. आम्ही एका धार्मिक स्थळावरून सुरूवात करणार होतो. त्यासाठी आम्ही वाराणसीतील रविदास मंदिराची निवड केली आहे. आम्ही दुचाकीवर रविदास गेटपर्यंत म्हणजे सुमारे ७ किमी जाणार आहोत.मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहणार आहे. देशाला दुबळा करणारा व्यक्ती उत्तर प्रदेशमधून जिंकावा असे मला वाटत नाही. मी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव हे जर या मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छित नसतील तर मी वाराणसीतून उभा राहीन. मी मोदींना सहज जिंकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

श्रीनगर - जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ४ जवान जखमी झाले आहेत.बडमाग जिल्ह्यातील सुत्सू गावात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत ४ भारतीय जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या क्रिष्णा घाटीमधली पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारीही जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केलर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले होते. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला होता. सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली होती.

यवतमाळ - केळापूर तालुक्यातील पहापळ येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सरकारचा निषेध नोंदवित आत्महत्या केली. धनराज बळीराम नव्हाते (वय ५२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धनराज बुधवारी सकाळी हिंगणघाट तालुक्यात मुलीकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र ते मुलीकडून परतून घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आढळेल्या चिठ्ठीवर कर्जासाठी आत्महत्या असा उल्लेख आहे.
निसर्ग साथ देत नाही, व्यापारी भाव देत नाही, शासन मदत करीत नाही, असेही त्यात लिहिले आहे. याच चिठ्ठीत त्यांनी या सरकारचा धिक्कार असो असाही उल्लेख केला आहे. या चिठ्ठीमुळे राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या नेत्यांनी पहापळ येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे - बांगलादेशमधील दहशतवादी गटाच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगालच्या नागरिकाला चाकणमधून अटक करण्यात आली. शर्यत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बिहार आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.बिहार एटीएसने बुधवारी पटना जंक्शन रेल्वे स्टेशनजवळ खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोघांना संशयावरून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय संरक्षण दलांशी संबंधित काही कागदपत्र मिळून आली. यामध्ये पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराची तैनाती आणि इसिसशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच हे दोघे बांगलादेशच्या जेनाईदहा जिल्ह्यातील रहिवासी असून, ते जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश आणि इस्लामिक स्टेट बांगलादेश या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे बिहार एटीएसच्या तपासात समोर आले आहे.पुण्यातील चाकण परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या मंडल याला दोन्ही बांगलादेशी संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या संघटनेसाठी युवकांना भरतीचे काम करण्याची विनंती केली होती. त्यासाठी ते शर्यत मंडल याच्याशी नियमित संपर्कात होते. त्यामुळे बिहार एटीएसने मंडल याला महाराष्ट्र एटीएसच्या पुणे पथकाच्या मदतीने गुरुवारी चाकण परिसरातून ताब्यात घेतले. संशयिताला गुरुवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी बिहार एटीएसच्या वतीने संशयित आरोपीच्या प्रवास कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याला बिहारमध्ये चौकशीसाठी नेण्यासाठी १ एप्रिल पर्यंत प्रवास कोठडी मंजूर केली आहे.

मुंबई - ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना या वादाला आता वेगळे वळण लागले आहे. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केली आहे. काहीही झाले तरी सोमय्या यांना पराभव करु असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या घोषणेमुळे सोमय्या यांना अडचणीत आणखी भर पडली आहे.भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप गोधळ आहे. शिवसेनेने या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. 
गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचा छळ केला आहे. त्यामुळे आमचा विरोध भाजपला नाही तर सोमय्या यांना आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल. भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या बाजूने असू असेही राऊत म्हणाले.

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे.आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना चार दिवसांपुर्वी घडली असून आज ती उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांना माहिती दिल्यानंतरही ते वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाही, असे गावक-यांचे म्हणणे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक पुढील तपस तपास करीत आहेत.

नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी फेटाळला आहे. अपक्ष उमेदवार रवींद्र थोरात आणि शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी घेतलेल्या आक्षेपांवर बुधवारी प्रदीर्घ युक्तीवाद झाला. त्यानंतर रात्री उशिरा डोंगरे यांनी हा निर्णय दिला.खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात २०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात १ कोटी ५६ लाख ५७ हजार, आणि ८६ लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होते. मात्र, यावेळी त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला. तसेच, भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या गॅस एजन्सीचे उत्पन्न आपल्या शपथपत्रात दाखविले नसल्याबद्दल आक्षेप घेतला. वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून २०१४ साली दाखविलेली रक्कम या वर्षीच्या शपथपत्रात गायब करण्यात आली आहे. नेमके या फंडाचे काय झाले, त्याचे विवरण अशोक चव्हाण यांनी दिले नसल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला होता.
बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख अफलोद्दीन अजिमोद्दीन यांनी २०१४ आणि २०१९ च्या शपथपत्रात तफावत असल्याने उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविला. त्यांच्या वकिलाने बुधवार सायंकाळपर्यंत वेगवेगळे पुरावे आणि आक्षेप दाखल केले गेले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ते सर्व आक्षेप फेटाळले आहेत.

बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड - बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे, असा आक्षेप काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी घेतला होता. यावरून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्जावर आक्षेप घेतला म्हणून मला भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या सांगण्यावरून मारहाण केली असल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दादासाहेब मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शासकीय कामकाजात अडथळा केल्याबाबत पोलिसांनीदेखील आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेनेने या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवाय सोमय्या यांना मातोश्रीवरुन भेट नाकारण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळेच या मतदारसंघातील उमेदवारीवरून अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले नाही. जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपला देखील कल्पना आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पण त्यांना पहिल्या भाषणापासून टीकेचा सामना करावा लागत आहे. मराठी स्पष्ट बोलता येत नसल्याने पार्थ पवारांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. बुधवारी त्यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करून लोकांशी संवाद साधला. त्यानंतर रात्री पनवेलमध्येच मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. परिसरातील नागरिकांची भेट घेऊन ते मशिदीत जाणार होते. 
मोहल्ला परिसरात जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे.सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. परंतु मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचे समोर येत असून हा निवडणूक पूर्व स्टंट तर नाही ना? असे बोलले जात आहे.
मुंबई - शिवसेना आणि भाजपाने प्रचार सुरु केला असून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीकडून प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही राज्यात आठ प्रचारसभा होणार आहेत. तसेच मुंबईत होणाऱ्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असतानाच दोन्ही पक्षांनी युती केली, तसेच अपवाद वगळता दोन्ही पक्षांचे जागावाटपही सुरळीतपणे पार पडले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी प्रचाराकडे लक्ष केंद्रित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर युतीच्या प्रचाराची धुरा असणार आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ प्रचार सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा १ एप्रिल रोजी विदर्भातील वर्धा येथे होणार आहे. तर मोदींची शेवटची प्रचारसभा मुंबईत होणार आहे. या सभेत नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तसेच संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाटणा - बिहारमधील माजी आमदार आणि भाजपा नेते अनुज कुमार सिंह यांच्या घराला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र या स्फोटात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दरम्यान नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार अनुज कुमार सिंह यांचे डुमरिया येथे घर आहे. येथे त्यांच्या काकांचे कुटुंबीय आणि एक कामगार राहतो. नक्षलवाद्यांनी या घराला लक्ष्य करताना बुधवारी रात्री ११ च्या सुमारास डायनामाइट लावून हे घर उडवून दिले. तसेच अनुज सिंह यांचे चुलत भाऊ जय सिंह यांना नक्षलवाद्यांनी मारहाण केली. यासंदर्भात एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की घटनास्थळावर पोलीस तपास करत आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आळी आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. माजी आमदार असलेल्या अनुज सिंह यांना काही दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून धमक्या देण्यात येत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नक्षलवाद्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा स्फोट घडवून आणला.

कर्नाटक - लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू असतानाच कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारमधील मंत्री सी पुट्टाराजू यांच्या घरावर आयकर विभागाने आज (गुरूवार) छापे टाकले आहेत. आयकर विभागने हसन, मंड्या आणि म्हैसूर येथील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. त्याचबरोबर बांधकाम विभाग आणि सिंचन विभागाच्या १७ ठेकेदार आणि ७ अधिकाऱ्यांच्या घरावरही छापा टाकला आहे. विशेष म्हणजे नुकताच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यात आयकर विभागाचे छापे टाकण्यासाठी देशातील विविध भागातून केंद्राने सीआरपीएफचे जवान तैनात केल्याचा दावा केला होता.
सी पुट्टाराजू: पुट्टाराजू हे कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारमध्ये सिंचन मंत्री आहेत. ते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते मंड्या जिल्ह्याचे प्रभारी देखील आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार आयकर अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांनी मंड्या येथील त्यांच्या घराशिवाय म्हैसूर येथील त्यांच्या भाच्याच्या घरावरही छापे टाकले आहेत. पुट्टाराजू यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, आयकर विभागाचे तीन पथके आणि सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी मंड्यामधील चिन्नाकुरली निवासस्थान आणि म्हैसूर येथील त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget