April 2019

मुंबई - मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर जनजागृती करण्यात आली होती,तरीही मुंबईकरांनी अपेक्षेप्रमाणे मतदानाचा हक्क बजाविला नाही. परंतु २०१४च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का काहीसा वाढला आहे. राज्यात सर्वात कमी मतदानाची नोंद कल्याणमध्ये झाली. मुंबईत मतदानाचा टक्का वाढत नाही, असा अनुभव होता. २००९ मध्ये मुंबईत ४५ टक्क्य़ांच्या आसपास मतदान झाले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेत मुंबईत सरासरी ५३ टक्के मतदान झाले होते. यंदा प्राथमिक अंदाजानुसार ५४ ते ५५ टक्के मतदान झाले आहे. मुंबईत मध्यमवर्गीय, झोपडपट्टय़ा आणि अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये चांगले मतदान झाले. मुंबई, ठाण्यात सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.सकाळच्या सत्रात मतदारांमधील उत्साह, मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगा, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारींचा अपवाद वगळता मुंबईत शांततेत मतदान पार पडले.

धुळे - जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप समर्थनार्थ समाजमाध्यमातून संदेश दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चंदू हे धुळे तालुक्यातील असल्याने अधिक प्रयत्न केले होते. लोकसभा निवडणुकीत समाजमाध्यमांद्वारे भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फेसबुकवर त्यांनी भाजप समर्थनार्थ संदेश दिले असून धुळे मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यासोबत असलेले आपले छायाचित्रही त्याने टाकले आहे.यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याने प्रशासकीय अधिकारी अभिनव पवार यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी तक्रार दिली होती.

तामिळनाडू - फानी चक्रीवादळ येत्या दोन दिवसात रौद्र रूप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार फनी चक्रीवादळ ४ मे रोजी ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकते. फनी सोमवारी रात्री बंगाल खाडीत चेन्नईपासून ७०० किमी अंतरावर होते. त्यानंतर १८ किमी प्रतितास वेगाने वादळ किनाऱ्याकडे सरकत आहे. याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत उत्तर-पश्चिम दिशेला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने येईल. त्यानंतर पुढे ओडिशाच्या किनारपट्टीला ध़डकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ ४ मे ला पहाटे किंवा ३ मे ला संध्याकाली ओडिशाच्या किनाऱ्याला धडकू शकते. नेमके कोणत्या ठिकाणी वादळ धडकेल याचा अंदाज लावता येत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. ओडिशाच्या किनारपट्टीवर फेनी धडकल्यास त्याचा वेग १७० ते १८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान होऊ शकते. किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊ शकते.फनी वादळामुले ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीसह काही भागात पावसाची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी आज मंगळवारी होत आहे.दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरच्या निकालात ३६ राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेवर संशय घेण्यास जागा नसल्याचे स्पष्ट करत या व्यवहारात गैरप्रकार घडल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या फेरविचार याचिकांच्या गुणवत्तांबाबत उत्तर दाखल करण्यास आपल्याला आणखी वेळ हवा असल्याचे केंद्राने पत्रात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांसह इतर पक्षांना हे पत्र देण्याची परवानगी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर. बालसुब्रमणियन यांना दिली.माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिका मंगळवारी दुसऱ्या सत्रात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीच्या यादीत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि अ‍ॅड. विनीत धांडा यांच्या याचिकांवरही मंगळवारीच सुनावणी होणार आहे.

मुंबई - गोरेगाव येथे कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री २.३० च्या सुमारास करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या १२ हून अधिक गाड्या सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ५ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सीरिया - आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने तब्बल पाच वर्षानंतर व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओनंतर बगदादीने ऑडियो क्लिपही जारी केली असून यात त्याने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर भाष्य केले आहे. जुलै २०१४ नंतर बगदादी पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे.आयसिस या दहशतवादी संघटनेने सोमवारी बगदादीचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत बगदादी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या मागे अत्याधुनिक शस्त्र देखील दिसत आहे. व्हिडिओत बगदादी म्हणतो, “बागूजमधील युद्ध संपले आहे”. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सीरियातील बागूज येथे आयसिस आणि सैन्यात सुरु असलेले युद्ध गेल्या महिन्यात संपले होते. बगदादीचा हा व्हिडिओ १८ मिनिटांचा असून तो अरबी भाषेत बोलत आहे.बागूजमधील रक्तरंजित संघर्षाचा बदला श्रीलंकेतील तुमच्या बांधवानी घेतला आहे, असे त्याने व्हिडिओच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या ऑडियो टेपममध्ये म्हटले आहे. आमचा लढा सुरुच राहणार आणि आम्ही बदला घेणारच, अशी धमकीही त्याने दिली आहे. 

खेड - शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येप्रवेश का केला याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी छत्रपतींच्या गादीची कधीच गद्दारी करणार नाही, ही भावना मनात धरून शिवसेना सोडल्याचे सांगत यावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता झाली. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा खुलासा केली. शिवसेनेने मला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला. त्याचवेळी मी त्याचक्षणी त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही, असे स्पष्ट सांगितले आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली, अशी जाहीर माहिती अमोल कोल्हे दिली. यावेळी अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.अमोल कोल्हे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सेनेला का जय महाराष्ट्र केला यावर भाष्य केले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारच्या अखेरच्या दिवशी भाष्य केले. तसेच सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा, अशी विचारणा होते.

नाशिक - नाशिकचा विकास आपण केल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला जनतेने घरी का बसवले?स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेत मनसेचा कोणीही प्रतिनिधी नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष, आमची शाखा कोठेही नाही, अशी मनसेची अवस्था असल्याची खिल्ली उडवत लवकरच त्याप्रमाणे राष्ट्रवादीचीही स्थिती होणार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नोटाबंदीने राज ठाकरे यांचे दुकान बंद पडले. यामुळे ते त्या विरोधात गळा काढत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कारागृहात राहिलेले छगन भुजबळ हे सध्या जामिनावर आहेत. लवकरच त्यांचा खटला सुरू होईल. पुढे काय काय होईल ते पाहावे, असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केले. 
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. याच मैदानावर आदल्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती. समारोप सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे वेगवेगळे व्हिडिओ सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मनसेच्या कार्यकाळात नाशिकच्या झालेल्या विकासाकडे लक्ष वेधले होते. राज यांच्या सभेला महायुतीने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर दिले. कुंभमेळ्यात नाशिक शहरात जी विकास कामे झाली, त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटींचा निधी दिला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. महापालिका निवडणुकीत आपण शहराला दत्तक घेतले. दोन वर्षांत दोन हजार कोटींची कामे, प्रकल्प मांडून शहराच्या विकासावर भर दिला. या कामांची लांबलचक यादी मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखविली. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी शहरात ‘हायब्रीड मेट्रो’चे भूमीपूजन करण्यात येईल. लवकरच शहरात महापालिकेची इलेक्ट्रीक बस सेवा सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.मनसेचे इंजिन सध्या शरद पवार यांनी भाडय़ाने घेतले आहे. हे इंजिन तोंडाच्या वाफेवर चालते. पण, त्या इंजिनासारखीच राष्ट्रवादीची अवस्था होणार असल्याचा टोला लगावला. राज यांनी आपल्या भाषणात भुजबळांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. हा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांसारखा नटसम्राट महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचे सांगितले.भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांना क्षेपणास्त्राला बांधून पाठवायला हवे होते, असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला.

नाशिक - नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी समीर भुजबळ यांना विजयी करा,असे मेसेज शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने नाशिकमध्ये फिरत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच नाशिकमध्ये युतीतील नेत्यांच्या नावाने राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मदत करण्याचे खोटे मेसेज प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहेत. BW-NASHIK हा अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहेत.याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिकेची विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. तर सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.खोट्या मेसेजेसबाबत नेत्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता यामागे नक्की कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पोलिसांचा सायबर सेल कामाला लागला आहे. खोडसाळपणातून हा प्रकार करण्यात आला की राजकीय लाभासाठी कुणी ठरवून हे केले, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत प्रत्येकजण अंदाज व्यक्त करताना दिसत आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असे म्हटले आहे.शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक निकालानंतर आम्ही एका समान अजेंड्यावर एकत्र येऊन देशाला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न करू. एनडीएतीलही काही पक्ष आघाडीत येतील, याबाबतचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.दरम्यान, शरद पवार यांचेही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिले आहे. यावेळी जर कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यास पवारांचे नाव पुढे येऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, यांच्यापासून ते अगदी ममता बॅनर्जी एम. के. स्टॅलिन, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, नितीश कुमार, शरद यादव आणि अगदी तेजस्वी यादवपर्यंत अनेक राज्यांच्या अनेक पक्षांच्या संपर्कात शरद पवार असतात. गेल्या काही काळात शरद पवार या यादीतल्या सगळ्यांना आणि आणखीही काही नेत्यांना भेटले. तिसऱ्या आघाडीची शक्यता चाचपडून बघताना अशी आघाडी झालीच तर त्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राचा हाच मुरलेला राजकारणी निभावणार असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मुंबई - या देशाच्या निवडणुकीत बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांबरोबरच बँकांचा म्हणजेच जनतेचा पैसा लुबाडून पोबारा करणे हा अत्यंत महत्वाचा विषय राहिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात जवळपास ३६ कर्जबुडव्यांनी देशातून पोबारा केला आहे. अनेक कर्जबुडवे आजही भाजप सरकारच्या छत्रछायेखाली मजेत वावरताना दिसत आहेत. आम्ही कारवाई करत आहोत असे भासवण्याकरता मोदींनी कायदे कडक करण्याचा आविर्भाव मधल्या काळात केला. परंतु आता भाजप स्वतःच किती या प्रकरणात गुंतला आहे हे स्पष्ट झाले आहे. भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन या सीबीलनुसार थकबाकीदार म्हणजेच विलफुल डिफॉल्टर आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 
विलफुल डिफॉलटरच्या यादीत निरव मोदी, विजय मल्ल्या सारख्या अनेकांबरोबरच पूनम महाजन त्यांचेही नाव विराजमान दिसत आहे. रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार पैसे असूनही न देणे किंवा कर्जाचे पैसे दुसरीकडे वळवणे इत्यादी गंभीर बाबींमध्ये विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषीत केले जाते. पूनम महाजन आपल्या पतीच्या कंपनीकडे थकबाकी असलेल्या ११.४० कोटी रुपयांच्या कर्जाकरिता जामीनदार म्हणून थकबाकीदार आहेत. परंतु ही बाब त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दडवली आहे. यासंदर्भात त्यांच्यावर बँकेने दावा देखील दाखल केलेला आहे. त्यांचा सीबील स्कोअर हा ६०० असून वैयक्तिक कर्जाचा स्कोअर ५७० आहे. या सीबीलच्या आकडेवारीनुसार त्यांची पत पूर्णपणे संपुष्टात आली असून त्यांना एक पैशाचेही कर्ज मिळू शकत नाही. या महाजन पती पत्नीवर इंडियन ओव्हरसीज बँक व पंजाब नॅशनल बँक यांचे एकूण ६७.६५ कोटी रुपयांच्या वसुलीचे दावे दाखल आहेत. सदर बाब जनतेपासून दडवणे हे अत्यंत गंभीर अशा तऱ्हेचे कृत्य आहे म्हणूनच भाजपासारखा नैतिकेचा बुरखा बाळगणाऱ्या पक्षाला याचे उत्तर देणे गरजेचे आहे, असे सावंत म्हणाले.पूनम महाजन यांची मालमत्ता ही २००९ रोजी १२ कोटी रुपये होती, २०१८ ला १०८ कोटी झाली तर २०१९ रोजी फक्त २ कोटी राहिली आहे. यातूनच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे हे स्पष्ट होते. बँकांनी यांच्या कर्जाचा किती काही भाग ‘राईटऑफ’केला आहे हेही शोधण्याची आवश्यकता आहे, असे सावंत म्हणाले. 
याचबरोबर फिनिक्स ऑटो प्राइवेट लिमिटेड, या कंपनीसंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली नाही. या कंपनीमध्ये पूनम महाजन यांच्या पतीची ५१ टक्के भागिदारी आहे. कार्पोरेट गॅरंटीवर पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी १९६.७४ कोटी रुपयांचे आद्या मोटार कार कंपनी प्रा. लिमिटेड (पूनम महाजन व त्यांच्या पतीची कंपनी) कर्ज दिले होते. या दोन्ही कंपन्या फिनिक्स व आद्या सिस्टर कंसर्न कंपन्या आहेत. पूनम महाजन ३० मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१५ पर्यंत या दोन्ही कंपनीच्या संचालक होत्या. आद्या रिअलटर्स अँड इस्टेट प्रा. लि. या कंपनीचा २०१९ व यापूर्वीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुठेच उल्लेख नाही. आद्या रिअलटर्स अँड इस्टेट प्रा, लि या कंपनीत पूनम महाजन यांच्या पतीची ५१ टक्के भागिदारी आहे. जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र देणे हा लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या १२३ कलमानुसार गुन्हा आहे. यासंदर्भात लवकरच न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - क्रिकेटचे मैदान गाजविणारा गौतम गंभीर निवडणुकीच्या मैदानावर अडचणीत सापडला आहे. भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीर यांच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीर याने शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांकडून तक्रार केली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत तात्काळ दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.याआधी गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात ‘आप’ने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी होणार आहे. ‘आप’च्या उमेदवार आतिशी यांनी तक्रार केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचाही समावेश आहे. पण उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नाहीत तर अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा दर्शवत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिकीट देऊन भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याच जागेवरून अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनीही अर्ज भरला होता. एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मते विभागली जाण्याची भीती भाजपने व्यक्त केली होती.हा गोंधळ टाळण्यासाठी स्वतः साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांचे मन वळवण्यासाठी त्यांना घरी बोलावले. या भेटीमध्ये साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांना आपल्या विरोधात निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. साध्वींनी केलेल्या विनंतीला मान देत ठाकूर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत समर्थनही दर्शवले. यानंतर साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांना भगवी शाल देऊन त्यांचा सन्मानदेखील केला.

महोबा - उत्तर प्रदेशच्या एटाहून भारतीय जनता पार्टीचे खासदार राजवीर सिंह यांची शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान बाळगळले. प्रचार सभेला संबोधित करताना त्यांच्या जीभेचा ताबा सुटला आणि राजवीर सिंह यांनी महाआघाडीवर टीका केली. हत्तीवर सायकल चढेल की सायकलवर हत्ती ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. भाजपा खासदार एवढ्यावरच थांबला नाही. यावेळेस महाआघाडी पराभूत होऊन त्यानंतर १५ ते २० वर्षे देशात निवडणूक होणार नाही असेही ते म्हणाले.महोबाच्या चरखारीच्या विद्या मंदिर येथे भाजपा उमेदवार पुष्पेंद्र चंदेल यांच्यासाठी प्रचारसभा झाली. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे पुत्र भाजपा खासदार राजवीर सिंह हे यावेळी प्रचाराला आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. हत्ती आहे की हत्तीण आहे हे समजत नाही. जर सायकलवर हत्ती चढला तर सायकल दिसणारच नाही..माती होऊन जाईल. तुरुंगवास होऊ नये म्हणून लोकांनी महाआघाडी केली आहे. जर यावेळी तुम्ही महाआघाडीला घरी बसवले तर १५ ते २० वर्षे देशात निवडणूक होणार नाही असे रणवीर म्हणाले. काँग्रेस शौचालयाबद्दल बोलत होती. खूप लहान डोकं आहे. राहूल गांधी तुमची आज्जी आणि आई शेतात गेल्या असत्या तर तुम्हाला समजले असते अशी बोचरी टीका त्यांनी केली. वस्तरा माकडाच्या हातात गेला तर तो सर्वांची दाढी करेल आणि स्वत:ची देखील करेल अशी टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा, या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली असून जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.जोपर्यंत भाजप अस्तित्वात आहे, तोपर्यंत जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग राहील, काश्मीर हा भारतमातेचा मुकुट असून तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे सांगून ते म्हणाले, की जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर आम्ही ३७० वे कलम रद्द करू. 
३७० व्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे. शहा म्हणाले, की एकाच देशाला दोन पंतप्रधान असावेत का ?यावर लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. भाजपने मोदींना पंतप्रधान केले त्यानंतर देशाची सुरक्षा बळकट झाली, यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात पाकिस्तानच्या दहशतवादी गटांनी अनेकदा भारताला लक्ष्य केले. पण मनमोहन सिंग हे मौनीबाबा होते, त्यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. देशाच्या सुरक्षेवर आम्ही तडजोड करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले, की पाकिस्तान काश्मीरचा लचका तोडू पाहत आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. पाकिस्तानने गोळी झाडली तर इकडून आम्ही गोळे टाकू असेही ते म्हणाले.

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उलंघन केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. आपचे राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींनी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी एक कोटी २७ लाख रुपयांचा चुरडा केल्याचे म्हटले आहे. यावर भाजपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.लोकसभा मतदार संघासाठी उमेदवाराला ७० लाख रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. संजय सिंह म्हणाले की, लोक येथे चार्टर्ड प्लेनने आले. वाराणसीतील सर्व हॉटेल देशभरातून आलेल्या भाजप नेत्यांसाठी बुक करण्यात आलेल्या होत्या. दुपारच्या जेवनाचे हजारो पॅकेट वाटण्यात आले. तसेच अर्ज सादर करताना शेकडो गाड्या आल्या होत्या. संपूर्ण वाराणसी शहर बॅनर, झेंडे आणि पोस्टर्सने रंगले होते. सोशल मीडिया आणि साउंड सिस्टम बसविण्यासह इतर बाबींवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. हा खर्च सुमारे एक कोटी २७ लाख रुपये असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.यावेळी संजय सिंह यांनी आरोप केला की, उमेदवारी अर्ज भरताना धार्मिक गाणे लावण्यात आले होते. यातून जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच महादेव आणि हनुमानाचे रुप धारण करून कलाकारांकडून 'हरहर मोदी'चे नारे लावण्यास सांगितले गेले. याचा विरोध दर्शवित संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई - काँग्रेसला राम राम ठोकल्या नंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी माहिती प्रवेशाच्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांची शिवसेनेने उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यात आले. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या नाराज होत्या. टि्वटरवरुन त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. आपण काँग्रेस पक्षासाठी घाम गाळला तसेच रक्त आटवले. मात्र काँग्रेसमध्ये किंमत नाही, गुंडांना मान मिळतो, अशा आशयाचे ट्वीट चतुर्वेदी यांनी केले होते. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. महिलांच्या हक्कांसाठी आपल्याला माध्यमातून काम करावयाचे असून त्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपले मत मांडले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असताना आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या आहेत. अशाच मनसे सरचिटनीस संदीप देशपांडे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.आशिष शेलारांना सभा घ्यायची होती तर एकदा कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे़कडून धडे घ्यायचे होते अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शेलारांवर टीका केली आहे. राज ठाकरेंबाबत जर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर आम्ही त्याला मारणारच. त्यामुळे तुम्हाला अनुभवायचे असेल तर बोलून बघा असेही संदीप देशपांडे म्हणाले.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना आशिष शेलार यांनी त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले होते. बघाच तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी केलेले सर्व आरोप भाजपने फेटाळून लावले होते. राज ठाकरेंच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरणे दाखवली, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले होते. राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोलले होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले. खोटे व्हिडिओ दाखवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात, अशी टीकाही शेलार यांनी केली होती. त्यावर आता मनसे आणि भाजपमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत.संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, बलात्काराची आकडेवारी कमी झाल्याचा मुख्यमंत्र्याचा व्हिडीओ शेलारांनी दाखवला. पण आम्ही राज्यातील नाही देशातील आकडेवारी बाबत बोलत होतो. अमित शहा यांनी बालाकोटच्या २५० मृतांचा आकडा दिला आहे. आम्ही त्याचा पुरावा मागितला. त्यामुळे आशिष शेलारांच्या व्हिडिओत दम नव्हता मात्र तरीही आम्ही उत्तर देतो.दरम्यान, संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका महिलेला बोलावले होते. ही महिला म्हणजे भाजपाच्या पेपरमधील जाहिरातीत लाभार्थी म्हणून ज्या महिलेचा फोटो वापरला गेला ती महिला होती. यावेळी सदर महिलेनी भाजपाची पोलखोल केली. सरकारने माझ्या बाबात खोटी माहिती जाहिरातीत प्रसिद्ध केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांसारख्या विचारवंतांच्या हत्या प्रकरणांच्या तपासात हस्तक्षेप करण्याऐवजी राजकीय पक्षांसह त्यांच्या नेत्यांनी त्याबाबत थोडी परिपक्वता दाखवावी आणि तपास यंत्रणांना विनाअडथळा तपास करू द्यावा, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. एवढेच नव्हे, तर अशा हल्ल्यांत कुठल्याही विचारधारेची व्यक्ती वा संघटना सहभागी असली तरी त्यांची गय केली जाणार नाही हेही लक्षात ठेवण्याचे न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने स्पष्ट केले. 
दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत असमाधानी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच दोन्ही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाच्या गतीबाबत न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी नाराजी व्यक्त करतानाच गृहखात्यासह ११ महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणारे राज्याचे मुख्यमंत्री एवढे व्यग्र आहेत ती त्यांना अशा प्रकरणांच्या तपासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही? ते राज्याचे नेते आहेत की एका पक्षाचे? अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली होती.त्या पाश्र्वभूमीवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्याच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. तो वाचल्यानंतर विशेषत: सीबीआयने आपल्या अहवालात मोठय़ा कारवाईबाबत नमूद केल्याचा दाखला देत दोन्ही हत्या प्रकरणांच्या तपासासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी सहकार्य करावे असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिवांनी सीबीआय-एसआयटीसोबत बैठक घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच वेळी सगळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी संवेदनशील प्रकरणांच्या तपासात हस्तक्षेप करण्याऐवजी त्याबाबत थोडी परिपक्वता दाखवावी, असे सुनावले.

नवी मुंबई - कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह ,फोटो व नावे असलेली यादी सापडली.रणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी , विजय त्रिंबक चिपळकर(नगरसेवक पनवेल मनपा यांनी या इसमांना पोलिसांच्या ताब्यात दिले. 


नालासोपारा - आर्थिक टंचाईमुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या नालासोपाऱ्यातील एका कर्मचाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्करोगाच्या आजारामुळे आर्थिक तंगी जाणवत असल्याने हा कर्मचारी तणावात होता. नालासोपाऱ्यात राहणाऱ्या ४५ वर्षीय शैलेश सिंग यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शैलेश जेटमध्ये सीनियर टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. आर्थिक तंगीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा जेटच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यांना कर्करोग झाला होता. त्यात त्यांची आर्थिक तंगी सुरू होती. त्यामुळे तणावात असलेल्या शैलेंद्र यांनी शनिवारी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.शैलेश सिंह यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि दोन मुली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

वसई - नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी वसई मधील गुंडिगरी मोडून काढू अशी भाषा विरोधंकाबाबतकेली आहे. वसईमध्ये काही समस्यां होत्या त्या एकण्याकरिता भेट असल्यामुळे दोन तास उशीर झाल्याने दिलिगरी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. २५ वर्षे सत्ता भोगूनही वसईमधील सामान्य लोकांच्या व्यथा आणि समस्यां अजून पर्यंत का नाही सोडवल्या, २९ गावे वगळण्याचा प्रश्न किंवा त्या गावातील लोकांना मनपात सामील व्हायचे नसतानाही जबरदस्तीने मनपा त्यांच्यावर का लादता ? असे अनेक प्रश्न विरोधकांना विचारले आहे. भर उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघून आनंदी झालो असून कार्यकर्ते विचाराने तापलेले असून उन्हाने नाही, गुंडिगरीने तापलेले आहे, लोकांची सहशीलता संपली असून ते तुम्हाला तुमची जागा दाखवून युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. या परिसरातील गुंडिगरी मोडून काढणार, संपवून टाकणार पण हे अशी थेट टिका आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर केली.यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर, उमेदवार राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे, विवेक पंडित, रवींद्र फाटकसह अनेक महायुतीचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

ठाणे - रेल्वेच्या 'वन रुपी क्लिनिक' च्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा एक यशस्वी प्रसुती केली आहे. पूजा मुन्ना चौहान या २० वर्षीय महिलेने कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये एका मुलाला जन्म दिला आहे. मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या पूजा चौहान यांना पहाटे ५.४० वाजल्यापासून ट्रेनमध्येच प्रसूती कळा येऊ लागल्या. ट्रेन ठाणे स्थानकात थांबवण्यात आली. स्टेशन मास्तरांनी वन रुपी क्लिनिकच्या स्टाफला बोलावले. पूजा यांना वन रुपी क्लिनिकमध्ये आणण्यात आले. क्लिनिकमध्ये त्यांची प्रसूती करण्यात आली. नंतर मायलेकांना पुढील उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. वन रुपी क्लिनिकच्या ठाणे शाखेच्या डॉ. ओमनकर आणि सिस्टर पूजा यांनी ही प्रसूती केली. वन रुपी क्लिनिकची ही सातवी तर ठाणे शाखेची ही चौथी प्रसूती आहे. 

विक्रमगड - राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालघर लोकसभेकरीता निवडणूक आयोगाकडून देण्यांत येणाऱ्या मतदान चिठ्ठयांवर (व्होटर स्लीप) पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोंटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. तर या स्लीप वाटप करणाऱ्या बिएलओंना या चुकांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील जुनी बाजारपेठे येथील रहिवासी भास्कर बाळकृष्ण मुळे व अतुल विलास वाडेकर यांचे व्होटर स्लीपर महिलेंचा फोटो छापण्यात आला आहे़ तर शालीनी बाळकृष्ण मुळे यांच्या व्होटर स्लीपवर पुरुषाचा फोटो छापला आहे़ विक्रमगडमध्ये बुधवारपासून बिएलओ यानी व्होटर स्लीप वाटण्यासाठी सुरुवात केली़ परंतु बुधवारी स्लीप वाटपा दरम्यान त्यांना लक्षात आले की, काही स्लीपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लीपवर तर सदनिका क्रमांक नाही, काही त्या ठिकाणी राहातच नाहीत अशा अनेक समस्या आहेत़ आणखीही काही समस्या समोर येवु शकतात. त्यामुळे बिएलओ कर्मचाऱ्यांना व्होटर स्लिप वाटतांना मोठा त्रास होत आहे.यामुळे मतदारही गोंधळलेले आहेत. 

मुंबई - माजी विश्वसुंदरी, अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिचा प्रियकर रोहमन शॉल याच्याबरोबर साखरपुडा केल्याची चर्चा आहे. सुष्मिताने इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला दोघांचा फोटो यासाठी निमित्त ठरला आहे. सुष्मिताने शेअर केलेल्या फोटोत तिच्या बोटात एक अंगठी दिसत आहे. त्यावरूनच त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.एखाद्यावर विनाअट प्रेम करणे अवघड असते. कारण, आपल्याला अट घालण्याची सवय असते. मनाचं म्हणणे ऐकणे कठीण असते कारण, बुद्धी नेहमीच त्यावर कुरघोडी करत असते. बुद्धी अट घालण्यावर लक्ष देते आणि मनाचे सर्व लक्ष विश्वास कसा ठेवता येईल याकडे असते. अशावेळी प्रेम एखाद्या बोनससारखे वाटू लागते,असे सुष्मिताने फोटो खाली लिहिले आहे. 'मैत्री, प्रेम, सन्मान, विश्वास, सोबत आणि मनाचे म्हणणे ऐकण्यासाठी मी बिनशर्त तुझी आहे रोहमन' असेही तिने पुढे म्हटले आहे. 

मुंबई - 'दबंग' आणि 'दबंग २'च्या हाउसफुल यशानंतर आता सलमान खानचा 'दबंग ३' चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वतः सलमाननेच या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे. पोस्टरच्या माध्यमातून २० डिसेंबर २०१९ ही प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे.'दबंग ३'च्या नव्या पोस्टरमध्ये पोलिसाची वर्दी घातलेला सलमान आणि त्याच्या छातीवर 'चुलबुल पांडे' असा बॅज लावलेला दिसत आहे. सलमानचा चेहरा या पोस्टरमध्ये दिसत नाही. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २० डिसेंबर २०१९ अशी लिहिली आहे. सलमानच्या चाहत्यांना हे पोस्टर अतिशय भावले आहे. चुलबुल पांडेच्या स्वागतासाठी सर्व चाहते

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि नताशा दलाल गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. लहानपणीचे मित्र- मैत्रीणी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आतापर्यंत नताशा आणि वरुण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल गुप्तपा बाळगली होती. पण आता दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला असून लवकरच लग्न करण्याचा विचार ते करत आहेत. बी- टाऊनमधील चर्चेनुसार, दोघांना यावर्षी डिसेंबरमध्येच लग्न करायचे होते. तशा तयारीलाही दोघांनी सुरुवात केली होती. पण आता त्यांचे लग्न काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.याबद्दल बोलताना वरुणचे बाबा आणि दिग्दर्शक डेविड धवन म्हणाले की, वरुणचे लग्न पुढच्यावर्षी होईल. मेन्सएक्सपीला दिलेल्या मुलाखतीत डेविड म्हणाले की, ‘मी दोघांच्या निर्णयामुळे फार आनंदी आहे. एका बापाला याहून जास्त काय हवे असते. सध्या वरुण त्याच्या वाढदिवसानिमित्त परदेशात सुट्टीसाठी गेला आहे. वरुणने व्हिडीओ कॉल करून आमच्यासोबत केक कापला. यावेळी आमच्यासोबत माझी नात नायराही होती असेही ते बोलले.

नवी दिल्ली / मुंबई - नुकसानीच्या गर्तेत अडकलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आज मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीचा सीता सर्व्हरच बंद पडल्याने पहाटे ३.३० पासून विमानोड्डाणे ठप्प झाली होती. हा सर्व्हर तब्बल ५ तासांनी सुरु झाल्याची घोषणा संचालक अश्विनी लोहाणी यांनी केली आहे. देशभरात सीता सर्व्हर बंद पडल्याने विमानांचे उड्डाण रखडले. यामुळे मुंबई, दिल्लीसह विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. 


सोलापुर - मुंबईत दहशत पसरविणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या नावाने सोलापूर ग्रामीण पोलिसांना फोन करून सोलापुरात जोडभावी पेठेत बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती देऊन दहशत निर्माण करणाऱ्या बार्शीतील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितासह एका महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने खोडसाळपणाने हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.हणमंतु वाघमारे (रा. जयशंकर दाळ मिलसमोर, बार्शी) याच्यासह सुवर्णा मिरगणे (रा. पंकजनगर, बार्शी) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांपैकी वाघमारे यास अटक करण्यात आली आहे. पहाटे सोलापूर ग्रामीण पोलिसांना एका भ्रमणध्वनीद्वारे फोन करण्यात आला होता. पलीकडील व्यक्तीने, आपण दाऊद इब्राहीम कासकर बोलत असून, सोलापुरातील जोडभावी पेठेत आज बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर फोन लगेचच बंद झाला. रात्री पोलिसांनी गंभीर दखल घेऊन सोलापूर शहर पोलिसांशी संपर्क साधून जोडभावी पेठेत बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती देणारा भ्रमणध्वनी आल्याचे कळविले. त्यानुसार सोलापूर शहर पोलिसांनीही जोडभावी पेठ भाग पिंजून काढला. परंतु बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती खोटी निघाली. संशयास्पद असे काहीच आढळून आले नसल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांना ज्या भ्रमणध्वनीद्वारे फोन आला होता, त्या भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची माहिती घेण्यात आली. यात संबंधित भ्रमणध्वनीवरील क्रमांकाची सीमकार्डधारक व्यक्ती सुवर्णा रविकांत मिरगणे ही असल्याचे आढळून आले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तीन महिन्यांपासून सुवर्णा मिरगणे हिने आपले सीमकार्ड हणमंतु खंडू वाघमारे यास वापरण्यासाठी दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी हणमंतु वाघमारे याचा शोध घेतला असता त्याने स्वत: पोलिसांना खोटी माहिती देणारा फोन केला होता, अशी कबुली दिली. पोलीस आणि नागरिकांत भीती निर्माण करण्यासाठी खोटेपणाने दाऊद इब्राहीमच्या नावाने खोटा फोन केल्याची कबुली वाघमारे याने दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तसेच स्वत:चा सीमकार्ड स्वत: वापरणे कायद्याने बंधनकारक असताना तो दुसऱ्याला अनाधिकाराने दिल्याबद्दल सुवर्णा मिरगणे हिलाही या गुन्ह्य़ात आरोपी करण्यात आले आहे.

मनमाड - राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. मागील दोन दिवसामध्ये तीन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवले आहे. मालेगावच्या वडगावमधील प्रकाश ठोके, नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी येथील रतन चव्हाण या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, नांदगांवच्या साकोरा येथील दत्तू बोरसे या शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली.
सध्या राज्यात पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळ आहे. शेतीची अवस्था देखील बिकट आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाला असून नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे.शुक्रवारी रिसोड तालुक्यातील मांडव्या येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपवला. दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने या तरुण शेतकऱ्याने गळफास लावला. ७ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. अमोल भीमराव राठोड (२० ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.अमोल हा गुरुवारी रिसोडच्या बँकेत दुष्काळ निधी व इतर पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी गेला होता. परंतु, खात्यात पैसे जमा न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या अमोलने घरी आल्यावर आधारकार्ड, बँकेचे पासबूक जाळले व घराला कुलूप लावून रात्री ९ वाजेच्या सुमारास शेताकडे निघून गेला. शुक्रवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसून आला.

अहमदनगर - बोल्हेगावात रस्त्याबाबत शहर अभियंता वालझाडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपैकी एकाने बूट फेकून मारल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी दुपारी महापालिका कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अभियंत्यांनी बूट फेकण्याच्या प्रकाराचा निषेध केला आहे. निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई - ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या पार्श्वभूमिवर आता देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तिने ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. त्यामुळे कर्नाटकच्या डीजीपींनी केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र, गोवा आणि पॉडेचेरी या राज्यांना पत्र पाठवून त्याबाबतची कल्पना दिली आहे. फोनवरून माहिती देणाऱ्या व्यक्तिने १९ दहशतवादी तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे असल्याची देखील माहिती दिली आहे. ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास २५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे १९ दहशतवादी लपून बसल्याची माहिती देखील यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तिनं दिली. मूर्ती हे ट्रेक ड्रायव्हर असल्याचा कळते. स्वामी सुंदर मूर्ती असे या फोन करणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता स्वामी सुंदर मूर्ती याने बंगळूरू पोलिस ठाण्यात फोन करून त्याबाबतची माहिती दिली. दहशतवादी हे ट्रेनमध्ये हल्ला करू शकतात अशी माहिती फोनवरून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - केन्द्रीय अन्वेषण विभागाने (Central Bureau of Investigation) उत्तरप्रदेशतल्या साखर घोटाळ्याची चौकशी सुरू केली. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी सुरू झाल्याने मायावतींच्या अडचणीत भर पडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ - १२ मध्ये मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांच्या विक्रीत बाजारदरापेक्षा कमी किंमतीत विकल्याने सरकारी खजान्याला कथित स्वरुपात जवळपास ११७९ करोड रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ऐन लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत हा घोटाळा बाहेर काढला आहे.
सीबीआयनं कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी एक प्राथमिक तक्रार नोंदवली तसेच सहा प्रारंभिक चौकशी सुरू केली. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गेल्या वर्षी १२ एप्रिल रोजी या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. तब्बल वर्षभरानंतर सीबीआयला या चौकशीसाठी वेळ मिळाली. साखर घोटाळ्याच्या चौकशीत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा मंत्र्याला आरोपी बनवण्यात आले नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. परंतु, उत्तर प्रदेश राज्य साखर महामंडळ लिमिटेडचे कारखाने खरेदी करण्यासाठी खोटी कागदपत्र जमा करणाऱ्या सात जणांविरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.


आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजची विमानसेवा अखेर स्थगित करण्यात आली आणि जेटच्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजली. बँकांतर्फे ४०० कोटी रुपयांचे कर्ज त्वरित उपलब्ध न झाल्याने कंपनीने विमानसेवा थांबविण्याची घोषणा केली. जेटने बँकांकडे ४०० कोटी रुपयांच्या तत्काळ कर्जाची मागणी केली होती, हे खरे असले तरी गुंतवलेले भांडवल नियमितपणे कसे परत मिळेल? हा प्रश्न बँकांना होता, त्यामुळेच बँकांनी कर्ज देण्याचे नाकारले.खरेतर जेटकडे पैसाच नसल्यामुळे, सेवा सुरू ठेवण्यासाठी साधे इंधन विकत घेणे वा अन्य अत्यावश्यक खर्च करणेही या विमान कंपनीला अशक्य होते. आठ हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या एअरवेजचे बंद होणे हा मोठा झटका मानला जात आहे.साधारण १६ हजार स्थायी आणि ६ हजार कंत्राटी अशा एकूण २२ हजार कर्मचाऱ्यांच्या परिवारावर याचा परिणाम होणार आहे. हे सर्व कर्मचारी रस्त्यावर आले असून, आता कुठे काम मिळणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये आहे. किंगफिशरनंतर बंद होणारी जेट एअरवेज ही दुसरी भारतीय विमान कंपनी ठरली आहे. दिवसाला ६५० विमानांचे उड्डाण करणा-या जेट एअरवेजचे बंद होणे धक्कादायक आहे. आर्थिक संकटांनी घेरलेल्या जेट एअरवेजला अद्याप १५०० कोटी रुपयांची मदत मिळू शकलेली नाही. आणि जेट एअरवेजला वाचविण्यासाठी फारसा कुणी पुढाकार घेतलेला नाही.जेट एअरवेजला वाचविण्यासाठी नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले होते.२२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्याचा त्यामागे हेतू होता. पण, त्याबाबत निर्णय झाला नाही. निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहिता यामुळेच जेटबाबत पुढाकार घेतला गेला नसावा. पण, निवडणुकीनंतर नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर याबाबतचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. अन्यथा विमान उड्डाण क्षेत्रात भारत नवी भरारी घेत असताना, एक व्यावसायिक कंपनी बंद पडण्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.जेट एअरवेजची फ्लाईट सव्‍‌र्हिस बंद झाल्यानंतर ती बँकांच्या नियंत्रणाखाली आली असून, यासाठी आता बोली लावली जाणार आहे. एतिहाद एअरेवज, एनआयआयएफ, टीपीजी आणि इंडिगो पार्टनर हे चौघेजण बोली लावण्याच्या रांगेत आहेत. बोलीच्या प्रक्रियेतून नरेश गोयल यांनी आधीच स्वत:ला वेगळे केले आहे. चारही बोलीदात्यांकडे बोली लावण्यासाठी १० मेपर्यंतचा वेळ आहे. सध्या जेट एअरवेजची मालकी सरकारी बँकांनी घेतली असून, खासगी गुंतवणूकदारांना कंपनी विकण्यासाठी बोली लावण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.जेट एअरवेजची अधोगती किंगफिशर, डेक्कन व सहारा आदी विमान कंपन्यांच्या पतनाच्या पार्श्वभूमीवर बघायला हवी. जेट एअरवेजचे बंद होणे ही नागरी उड्डाण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांसाठी, कंपनी व्यवस्थापनांसाठी, मालकांसाठी आणि नवउद्योजकांसाठी सावधगिरीचा इशारा आहे. भारतीय हवाई उद्योग क्षेत्रातील इतर खासगी कंपन्यांचा विचार केला, तर जेट एअरवेज ही भारतातली हवाई वाहतूक क्षेत्राचा पाया रचणारी कंपनी होती. उच्च दर्जाची सेवा, किफायतशीर दर आणि चांगले स्वागत, यामुळे प्रवाशांमध्ये या कंपनीची लोकप्रियता अधिक होती.कर्जात बुडालेल्या ‘एअर सहारा’ला १४५० कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय जेटने २००७ मध्ये घेतला त्यावेळपासूनच जेट हळूहळू गोत्यात येऊ लागली होती. हा व्यवहार झाल्यानंतर जेटवरील कर्जाचा डोंगर वाढत होता आणि त्याचे हप्ते चुकविणेही कंपनीला जड जात असल्याने आज जेटीवर हि परिस्थिती ओढवली आहे.एकीकडे स्पाईस जेट, गो एअर, इंडिगोसारख्या कंपन्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी ठेवले. त्यामुळे आपोआपच प्रवाशांचा ओढा या कंपन्यांकडे वाढत गेला. दुसरीकडे जेट एअरवेजचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष कंपनीला अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरला. त्याचवेळी होत असलेली रुपयाची घसरण आणि जागतिक बाजारपेठेतील इंधनाच्या सतत बदलणाऱ्या किमतीमुळे जेट आर्थिक दृष्ट्या कोलमडून पडला. सध्या निवडणुकीच्या प्रचारात ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’चा दांडोरा पिटला जात आहे,परंतु उद्योग बंद पडत आहेत, जेट एअरवेजसारखी खासगी कंपनी बंद पडली, तर २२ हजार कर्मचाऱ्यांच्या परिवारावर परिणाम होणार असून, चुकीचा संदेश जागतिक पातळीवर जाणार आहे.त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. 

लखनऊ - समाजवादी पार्टीचे नेते तसेच मैनपुरीचे उमेदवार मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी अचानक लखनऊच्या संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. पीजीआयचे राकेश कपूर, प्रोफेसर अमित अग्रवाल, सुशील गुप्ता, डॉक्टर अभय वर्मा यांच्या टीमने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. पीजीआयने दिलेल्या आरोग्य अहवालानुसार मुलायम सिंह हे नियमित तपासासाठी आले होते. 
नियमित तपासणी सोबत मुलायम सिंह यांना अशक्तपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या टीमने त्यांचा मधुमेह देखील तपासला. मुलायम सिंह यांना पूर्ण तपासणी झाल्यानंतर सोडण्यात येणार आहे. शारिरीक अस्वस्थ्यामुळे ते मैनपुरी येथील सभेला संबोधित करु शकले नाही.

मुंबई - बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणे हे काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाली आहे. अंकिता बिझनेसमन विक्की जैनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघांची ओळख एक कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. माहितीनुसार या वर्षाच्या अखेरिस अंकिता आणि विक्की लग्न करु शकतात. दोघे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत आहेत. सध्या अंकिता विक्कीच्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.

नवी मुंबई - लिकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात १२७ इमारतींमध्ये तब्बल ८३८ मतदान केंद्रे असून प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग नागरिकांसाठी १२ ठिकाणी सुविधा कक्ष निर्माण करणार असून दिव्यांग मित्र नावाने समन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये ७२ इमारतींमध्ये ४५२ मतदान केंद्रे असून अभय करगुटकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. बेलापूर मतदारसंघामध्ये ५५ इमारतींमध्ये ३८६ मतदान केंद्रे असून रूपाली भालके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. शहरामध्ये ५३७ दिव्यांग मतदार आहेत. त्या सर्वांना विनाअडथळा मतदान करता यावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्रे आहेत; परंतु तेथे लिफ्टची सुविधा नाही अशा इमारतींमध्ये डोलीची व ती उचलण्यासाठी स्वयंसेवकांची सोय केली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेकरिता विशेष कक्ष स्थापित करण्यात येणार असून कोपरखैरणे,घणसोली, ऐरोली, दिघा, तुर्भे, बेलापूर, नेरूळ व वाशी विभाग कार्यालय परिसरामध्ये रिक्षांचीही सोय केली आहे. शहरामध्ये १२ सुविधा कक्ष असून तेथे दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. प्रत्येक ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती केली आहे. दिव्यांग मित्र त्यांच्या क्षेत्रामधील मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी व पुन्हा घरी सोडण्यासाठीची व्यवस्था आहे.दिव्यांगांप्रमाणे लहान मुले असणाऱ्या महिलांनाही सुलभपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र असलेल्या सर्व इमारतींमध्ये बालसंगोपन केंद्र स्वरूपातील पाळणाघर स्थापित करण्यात येणार आहेत. त्यासाठी बालवाडी शिक्षिका व लिंकवर्कर यांची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली ऐरोलीसाठी संध्या अंबादे व बेलापूरसाठी चंद्रकांत तायडे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग विभागातील शाळेकडे खंडणी मागणाऱ्या चौघांविरोधात शुक्रवारी वसई न्यायालयाच्या आदेशाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.नालासोपारा पूर्वेकडील ओस्तवाल नगरीमधील सरस्वती हाईट्स बिल्डिंगमधील रूम नंबर ७०७/७०८ मध्ये राहणाऱ्या मंजू श्रीदेव यादव (३०) यांच्या मालकीची धानिवबाग येथे माता भगवती युग निर्माण विद्यालय ही शाळा आहे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील पूजा, अजित मनिकांत, मनीषा भावेश प्रजापती आणि भावेश प्रजापती हे चौघे २९ नोव्हेंबर २०१८ ला सकाळी साडे अकराच्या दरम्यान शाळेत प्रवेश करून मुख्य गेट बंद करून घेतला. मंजू यांनी गेट उघडण्यासाठी चोघांना विनंती केली की, शाळा सुटणार आहे पण त्यांनी गेट उघडण्यास नकार देत शाळा सुरू ठेवायची असेल तर ५ लाख रुपयांची मागणी केली. गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी भावेश प्रजापती यांनी अश्लील चाळे केले असल्याची तक्रार दिली आहे. मंजू यांनी सदर घटना वालीव पोलिसांना सांगितल्यावर तक्रार दाखल केली. तरीही हे चौघे त्रास देत असल्यामुळे शेवटी कंटाळून वसई न्यायालयात १५६ (३) प्रमाणे तक्रार दाखल केली होती त्यावर न्यायालयाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी वालीव पोलिसांना आदेश दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारून ऐन वेळी मनोज कोटक आयांना उमेदवारी दिल्याने ईशान्य मुंबईची लोकसभा निवडणूकीकडे सर्वच मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. घाटकोपर, मुलंड, कांजुरमार्ग याठिकाणी गुजराथी मतदारांचे प्रमाण जास्त आहे. मनोज कोटक गुजराथी असल्याने त्याचा फायदा त्यांना इथे मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील हे मुंबईमधील राष्ट्वादीचेएकमेव उमेदवार आहेत.मागच्या निवडणुकीतही संजय दिना पाटील हेच इथून लढले होते. मोदी लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि किरीट सोमय्या निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्यासमोर भाजपचा नवा उमेदवार आहे.या मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचे प्राबल्य आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भांडुपला झालेली सभा आघाडीसाठी कितपत फायदेशीर ठरेल हे पुढे कळेलच. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका या मतदारसंघात भाजपला जास्त बसू शकतो.

वाराणसी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भव्य असा रोड शो करण्यात आला. बनारस हिंदू विद्यापीठाबाहेरल पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नरेंद्र मोदी यांनी रोड शो ची सुरुवात केली. यानंतर तब्बल सहा किलोमीटरचे अंतर पार करून दशाश्वमेध घाटाजवळ या रोड शो ची सांगता झाली. या 'रोड शो'च्या निमित्ताने वाराणसीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या सगळ्यांकडून मोदीनामाचा गजर केला जात आहे. नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या पार्श्वभूमीवर आज मोदींकडून या रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रोड शो'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी झाले. 

गडचिरोली - दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यातला एक माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रमुख आहे, तर दुसरी त्याची पत्नी आहे. या दोघांवरही १४ खुनाच्या गुन्ह्यांसह ४० च्या वर गुन्हे दाखल आहेत.माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य दीपक उर्फ मंगरू सुकलू बोगामी हा त्यापैकी एक कट्टर माओवादी. त्याच्याविरोधात ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी मोती उर्फ राधा झूरू मज्जी हिच्या विरोधात २ खुनांसह १७ गुन्हे दाखल आहेत.
नक्षलवादी चळवळीत ओढल्या गेलेल्या या दांपत्याच्या शोधात गेले अनेक दिवस पोलीस होते. एकूण १८ लाख ५० हजार रुपये बक्षीस दोघांवर लावलेले होते.हे दोघेही गुरुवारी पोलिसांसमोर हजर झाले. त्यांचे आत्मसमर्पण हे महाराष्ट्रातल्या माओवादी चळवळीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गोवंडीत हिंसक वळण लागले आहे.गोवंडीतल्या स्थानिक नगरसेविकेच्या पतीवर रात्री हल्ला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसीन शेख कार्यालयाबाहेर फोनवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर तीन ते चार जणांनी हत्यारांसह हल्ला केला. त्यात मोहसीन गंभीर जखमी झालेत.जखमी अवस्थेत मोहसीन शेख यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु, हा हल्ला राजकीय वैरातून की पूर्ववैमनस्यातून होता? याचा पोलीस तपस करत आहेत. 

अहमदनगर - काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय यांने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राधाकृष्ण विखे पाटल यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहेत.
काँग्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीका केली होती. विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. 
दरम्यान,राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना विखे गैरहजर होते. तसेच - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काँग्रेसची एकही सभा विखे पाटील यांनी अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम कायम होता. आता तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. तो काँग्रेसने स्वीकारला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई - उत्तर पश्चिम मुंबईतील युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम या दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे.यांच्या आक्रमक प्रचारामुळे अखेरच्या टप्प्यात चुरशीची बनली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत कीर्तिकर यांनी माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता.या मतदार संघातील ४२ पैकी ३७ नगरसेवक हे भाजप व शिवसेनेचे आहेत. ही कीर्तिकर यांच्यासाठीचांगली बाब आहे. शिवाय शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे प्रचारातून दिसते.
दुसरीकडे संजय निरुपम यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पाणी सोडत हा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला आहे. निरुपम यांनी प्रचाराच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली आहे. २८ वर्षे त्यांचे या मतदारसंघात वास्तव्य असल्याने या लढतीत निरुपम यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. याच मतदार संघातून निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी गेल्या काही काळापासून या मतदारसंघाची बांधणी केली आहे. मात्र त्यांच्या प्रचारात गुरूदास कामत आणि कृपाशंकर सिंग यांचा गट दिसत नसलातरी आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेऊन निरुपम प्रचार करताना दिसतात.भाजपशी युती झाल्याने गुजराती-मारवाडी समाजाची मते युतीलाच मिळतील, असा शिवसेनेचा दावा आहे; तर उत्तर भारतीयांचे प्रश्न सुरूवातीपासून मांडल्याने तो समुदाय माझ्यासोबत असल्याचा दावा निरूपम करतात,याच मतदार संघातून समाजवादी पक्षातर्फे सुभाष पासी रिंगणात असल्याने उत्तर भारतीयांच्या मतविभाजनाची शक्यता आहे.मनसे या वेळी निवडणुकीच्या रिंगणात नाही. परंतु राज्यभरात मनसे आघाडीचा प्रचार करत असताना मनसे आणि निरुपम यांचे संबंध कसे आहेत हे सर्वच मुंबईकरांना माहिती आहे. निरुपम यांच्या प्रचारात मनसे उतरणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०१४ साली मनसेला पडलेली ६६ हजारांवर मराठी मते नेमकी कोणत्या पक्षाकडे वळणार हा मुद्दा आहे.

उस्मानाबाद - पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाने दरवाजा तोडून केलेल्या मारहाणीत ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड या गावी बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. पहाटेपासूनच मयत दत्तू मोरे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मद्यप्राशन करुन कारवाई करणाऱ्या पोलिसांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी चारचाकी गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे त्यात दोघांचा भाजून मृत्यू झाला होता. वेळेवर अग्निशमन दलाची गाडी न आल्याने संतप्त गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक केली होती. पोलिसांनी याप्रकरणी २५ ते ३० अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्यातील पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर तलमोड गावात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. गाढ झोपेत असलेल्या गावकऱ्यांनी घराचे दरवाजे तोडून झोडपून काढले. याच गोंधळात झालेल्या मारहाणीमुळे दत्तू मोरे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अचानक झालेल्या पोलिसांच्या हल्ल्यामुळे बिथरलेल्या आणि मोरे यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह घेवून पहाटे पाच वाजेच्या सुमारास थेट पोलीस ठाणे गाठले. मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून आपल्यावर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील शेकडो महिला आणि पुरुष पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई - मुंबईत २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत असून, निवडणूकीसाठीचा प्रचाराला वेग आलेला दिसत आहे.सर्वच दिग्गज नेट प्रचारामध्ये सामील झाले असून, दक्षिण मुंबईत आघाडी आणि महायुतीकडून मतदारांना प्रभावित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. मराठी मतदारांचे वर्चस्व असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ आता बहुमिश्रित मतदारांचा झाला आहे. मराठी भाषिकांची संख्या कमी होत आहे. या मदतर संघात जैन,मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एका बाजूला अरविंद सावंत यांच्यासाठी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस सभा घेत आहेत तर मिलिंद देवरा हे देखिल मतदारसंघ पिंजून काढत आहेत. 
कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, मलबार हिल,शिवडी,वरळी हे सहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतात. यातच झवेरी बाजार,मलबार हिल या भागात जैन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. भेंडी बाजार,भायखळा या परिसरात मुस्लिम मतदार तर लालबाग,शिवडी या ठिकाणी मराठी मतदार लक्षणीय आहे. एकूण ३६ नगरसेवकांपैकी १८ शिवसेनेचे,१० भाजपचे, ६ काँग्रेसचे, अखील भारतीय सेना १, समाजवादी पक्षाचे १ असे नगरसेवक आहेत.जैन धर्मियांवरुन प्रचार केल्याप्रकरणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याची दखल निवडणूक आयोगाने घेत मिलिंद देवरांना नोटीस पाठवली. काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी थेट लढत दक्षिण मुंबईत पहायला मिळणार आहे.

अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रंगत वाढत चालली आहे. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात कुणाचाही प्रचार करणार नसल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराच्या फलकावरुन त्यांचा फोटो गायब करण्यात आला होता. मात्र, आता मतदारसंघात फिरत असलेल्या काही प्रचार वाहनांच्या फलकावर त्यांचा फोटो दिसून येत आहे. राजकीय विरोधक असलेल्या विखे-थोरातांचा फोटो अगदी शेजारी शेजारी छापण्यात आला. अचानक फलकावर फोटो झळकू लागल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचाऊ लागल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील फलकावर पहिल्यांदाच बाळासाहेब विखेंचा फोटो पहावयास मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून विखेंचा फोटो फलकावर नव्हता मात्र आता अचानक पुन्हा फलकावर विखे यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.

राळेगणसिद्धी - मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्याने आता पक्षाचे चिन्हे नको, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, व्हीव्हीपॅटच्या पन्नास टक्के पावत्यांची मोजणी करण्याची मागणी २१ विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबतची पुनर्विचार याचिका विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका रद्दबातल ठरवत फक्त पाच ठिकाणच्या व्हिव्हिपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

वाराणसी - भारताचे पंतप्रधान आणि वाराणसी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस आपल्या मतदारसंघात असणार आहेत. आज दुपारी नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये येणार असून, त्यानंतर शहरात त्यांचा रोड शो होणार आहे. तसेच ते संध्याकाळी गंगा आरतीमध्येही सहभागी होतील. शुक्रवारी २६ तारखेला पंतप्रधान आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 
गुरुवारी दुपारी वाराणसीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची रोड शो लंका स्थित महामना मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करून सुरू होईल. जवळपास ७ किलोमीटरच्या अंतरावर ४ तासांचा प्रवास करून पंतप्रधान दशाश्वमेध घाटावर दाखल होणार आहेत. इथल्या फ्लोटिंग प्लॅटफॉर्महून गंगेचं वैदिक रितीने पूजन करून ते भव्य गंगा आरतीसाठी सहभागी होतील. त्यानंतर राजेंद्र प्रसाद घाटावर बनवल्या गेलेल्या मंचावरून पंतप्रधान भाषण करणार आहेत. 
भगव्या रंगात रंगलेल्या घाटावर बनारसचं मंदिर, कला आणि संस्कृती चित्रित करण्यात आलीय. इथे लावण्यात आलेलं १०० फूट उंच पंतप्रधानांचा फोटो दूरवरूनही दिसत आहेत. हा तोच घाट आहे जिथून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगा सफाई अभियानाचा शुभारंभा केला होता. 
पंतप्रधानांच्या या भव्य रोड शोसाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आलीआहे. यासाठी २१ एडिशनल एसपी, ५५ सीओ, ६२० इन्स्पेक्टर, ३१०० कॉन्स्टेबल, १२ कंपनी पीएसी, १६ कंपनी पॅरामिलिटरी फोर्स, १५० महिला शिपाई यांच्यासमवेत एसपीजी आणि एलआयूच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

अनंतनाग - जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरूवारी सकाळी अनंतनानच्या बगेंदरमध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही चकमक झाली तिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा आणि दारु गोळा सापडला.
बगेंदरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या दरम्यान सुरक्षा रक्षकांवर गोळीबारास सुरूवात झाली. सुरक्षारक्षकांनी याला जशास तसे उत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget