May 2019

बीड - लोकसभा निवडणुकीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मूळ झालेल्या मतदानापेक्षा अधिकचे मतदान मोजण्यात आले आहे. बीड मतदारसंघातही सहाशे मतांचा फरक असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. याबाबतची सर्व कागदपत्रे निवडणूक विभागाकडून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत याचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे, त्यामुळे पुरावे हाती आल्यानंतरच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत मदत म्हणून बारामतीच्या अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने पाणीपुरवठय़ासाठी पाठवलेल्या २१ टँकरचे गुरुवारी धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी पत्रकार बैठकीत धनंजय मुंडे म्हणाले,की जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेला प्रथमच ही मोठी मदत मिळाली आहे.

हैद्राबाद - माओवाद्यांचा सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा डाव फसला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. कारण, आंध्रप्रदेश – ओरीसा सीमेवर सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना माओवाद्यांनी आखली होती. विशाखापट्टणम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असलेल्या नुरमतीच्या जंगलामध्ये ४ ठिकाणी दहशतवाद्यांनी प्रत्येक अर्ध्या किलोमीटर अंतरावर दहा – दहा किलोचे भुसुरूंग स्फोटके पेरून ठेवली होती. पण, पोलिसांच्या तपासणीमध्ये माओवाद्यांचा प्लॅन उघड झाला. त्यानंतर स्फोटके निकामी करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे याच मार्गावरून पोलिसांचे पथक हे पायी जाणार होते. त्यांना लक्ष्य करण्याचा डावा हा माओवाद्यांचा होता. पण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे. यापूर्वी देखील भुसुरूंग स्फोटाद्वारे माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले केलेले आहेत.यापूर्वी २२ मे रोजी देखील छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला होता. यावेळी माओवाद्यांनी भुसुरूंग स्फोटाद्वारे दोन ठिकाणी IED बॉम्ब पेरून ठेवले होते. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी IED बॉम्ब निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.
नगर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला गेल्याची चर्चा रंगत आहे.

हातकणंगले - हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव होऊन जनतेने शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला. धैर्यशिल यांनी राजू शेट्टी यांची घरी जाऊन भेट घेत राजकारणाचा आदर्श जनतेसमोर ठेवला. पण आता हातकणंगले मतदार संघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ४५९ मते ईव्हीएम मधून जादा निघाली आहेत. त्याबाबत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
हातकणंगले मतदारसंघात एकूण १२ लाख ५२ हजार २११ जणांनी मतदान केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांना ४ लाख ८७ हजार २७६ मतं मिळाली तर शिवसेनेच्या धैर्यशिल माने यांना ५ लाख ८२ ७७६ मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना १ लाख २३ हजार १५१ मतं मिळाली होती. ईव्हीएम द्वारे१२ लाख ४५ हजार ७९७ मतदान झाले तर ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहे. यामध्ये एकूण ४५९ मते जादा झाली आहेत.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह त्यांच्या सरकारमधील ५७ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी कार्यक्रमानंतर मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटची बैठक शुक्रवारी संध्याकाळी होणार आहे. ही बैठक साऊथ ब्लॉगमध्ये होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या कॅबिनेट बैठकीत मंत्रालयांचे वाटप होऊ शकते. मोदी सरकारमध्ये एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात २४ कॅबिनेट मंत्री, २४ राज्य मंत्री तर ९ राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आहे. मोदींनी यावेळी मंत्रिमंडळात २० नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.केंद्रीय मंत्री म्हणून भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डी.व्ही.सदानंद गौडा, निर्मला सीतारमण आणि रामविलास पासवान यांचा समावेश आहे. शपथविधी कार्यक्रमात नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, गडकरी आणि पासवान यांनी हिंदीत तर गौडा, निर्मला सीतारमण यांनी इंग्रजीत शपथ घेतली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री असलेल्या सुषमा स्वराज, अरुण जेटली, राज्यवर्धन सिंह राठोड आणि मेनका गांधी यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

नवी दिल्ली - अमित शाह यांचा मोदी सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे आता भाजपाचा पुढील अध्यक्ष कोण? याची उत्सुकता आहे. अमित शाहांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. नव्या अध्यक्षांसाठी जे पी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळल्याने नड्डा यांना मोदी आणि शाह यांची पसंती मानली जाते. तर बिहारमध्ये भूपेंद्र यादव यांच्या संघटनात्मक कामाने पक्षाला मोठा फायदा झाला आहे.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. या सोहळ्याला जगभरातून दिग्गजांनी उपस्थिती लावली. देशातल्या दिग्गज राजकारण्यांसह बडे उद्योगपती आणि कलाकारांनीही या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावली. अनेक देशांच्या प्रमुखांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. राष्ट्रपतींनी मोदींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. मात्र, नितीन गडकरींच्या आधी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. २४ जणांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर २४ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अमित शाह यांची अर्थमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई - पालघर नजीकच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसून आल्याने पोलिसांकडून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यानंतर काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे पलायन केल्याचे सांगितले जात होते. या दहशतवाद्यांना मोहम्मद मिरसा नावाच्या व्यक्तीने आपल्या बोटीत आश्रय दिला होता. ही बोट सध्या पालघर नजीकच्या समुद्रात फिरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आणि तटरक्षक दल सतर्क झाले आहे. या बोटीवर मोठ्याप्रमाणात अन्न धान्य आणि अन्य वस्तूंचा साठा आहे. यामुळे तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी शुक्रवारी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये १५ दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचेही सांगितले जात होते. 

मुंबई - जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारे पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशन (आयटीएफ)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. जेट एअरवेज बंद पडल्याने कर्मचारी,अधिकाऱ्यांसमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पंतप्रधानांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे व जेटच्या कर्मचाऱ्याना त्यांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून द्यावी, तसेच त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आयटीएफने केली.लंडन येथे मुख्यालय असलेल्या आयटीएफने जेटच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेत, त्या पंतप्रधानांना कळविल्या आहेत. जेटचे वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी, तंत्रज्ञ व वैमानिकांना जानेवारीपासूनचे वेतन मिळालेले नाही, तर इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही. कामगारांचे कोणतेही हक्क डावलले जाऊ नयेत व त्यांना त्यांची सर्व देणी लवकरात लवकर मिळावीत, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आयटीएफने केली आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची दखल घेण्यात आली असून, लवकरच या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी उत्तर पाठविण्यात आल्याची माहिती एफएआयएने दिली आहे.

मध्य प्रदेश - महात्मा गांधी यांची हत्या करणारा गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य भाजपा आमदार उषा ठाकूर यांनी केले आहे. म्हाऊ मतदारसंघातून आमदार असलेल्या उषा ठाकूर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी हो, असे उत्तर देत नथूराम गोडसेला मी राष्ट्रभक्त मानते असे म्हटले आहे. गोडसे एक राष्ट्रवादी होते. त्यांनी आयुष्यभर देशाची चिंता केली. त्यावेळी काय परिस्थिती असेल जो त्यांनी असा निर्णय घेतला, हे त्यांनाच माहित असेल, असे ठाकूर म्हणताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे उषा ठाकूर या मध्य प्रदेशच्या भाजपा उपाध्यक्षा आहेत. वाद उत्पन्न झाल्यानंतर हा व्हिडिओ एडिट केलेला असल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. प्रसारमाध्यमे सारखे सारखे गोडसे राष्ट्रभक्त होते का? असे प्रश्न विचारत असतात, अशी टीका भाजपाचे नेते बाबू सिंह रघुवंशी यांनी पीटीआयशी बोलताना केली आहे. 

अमरावती - लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळभळ उडाली असून अनेक काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातील चांगल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. औषधाप्रमाणे काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपली आहे, असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते. बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले, ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेना युतीला भरघोस यश दिले, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राज्यात युतीला दमदार यश मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून काँग्रेस पक्ष हा उभा होऊच शकत नाही, असे चित्र आहे.भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी जे निर्णय घेतले, त्यावर जनतेने विश्वास प्रकट केला आहे. राज्य सरकारने देखील लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील सहजपणे जिंकू, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसअंतर्गत अनेक हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पक्षाने आता आणखी एक भूमिका जाहीर केली आहे.पुढील महिनाभर पक्षाचा कोणताही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे. काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. पण हा निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे मात्र काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. 
नवी दिल्ली -  शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १८ खासदार आहेत तर तीन राज्यसभा सदस्य आहेत. याशिवाय महाराष्ट्रात दोन्ही पक्ष जवळपास गेल्या ३० वर्षांपासून युतीत आहेत.
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून आज शपथविधी होत आहे. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले. आज अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना थेट कॅबिनेट पद मिळणार आहे. परंतु, शिवसेनेच्या मुंबईतील खासदारांना झुकतं माप दिल्याबद्दल शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. 

नवी दिल्ली -  जीएसटी नेटवर्कने (GSTN) मंगळवारी देशातील व्यापाऱ्यांना मोठी भेट जाहीर केली. यामुळे जवळपास ८० लाख व्यापारी मोफत जीएसटी रिटर्न फाईल करू शकणार आहेत. वार्षिक १.५ करोड रुपयांचा व्यापार करणाऱ्या अतिलघु, लघु आणि मध्यम एन्टरप्रायजेसना (MSME) नोंदी आणि बिल बनवण्यासाठीचे सॉफ्टवेअर मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे जवळपास ८० लाख छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी जीएसटी प्रक्रिया सहज आणि सोपी बनवण्यासाठी आणि त्यामध्ये गती आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने जीएसटी रिफंडची मंजुरी आणि प्रोसेसिंग दोन्ही कामं एकाच प्राधिकरणाद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर व्यापाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा रिटर्न एकत्रच मिळणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले परंतु, राहुल गांधींच्या या निर्णयाला काँग्रेसमधील इतर नेत्यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास मीही पद सोडणार,अशी भूमिका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, राहुल गांधींनी जरी अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव दिला असला तरी या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या उच्च स्तरावर कोणते बदल होतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक मार्गांचा विचार केला जात आहे. केवळ केंद्रीय पातळीवरच नाही तर महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील पक्षाची अवस्था बिकट आहे. त्यातच राहुल गांधींच्या निर्णयामुळे पक्षात आणखी गोंधळ वाढला आहे.राहुल गांधींच्या निर्णयावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांनी मंगळवारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांची निवासस्थानी भेट घेऊन राहुल गांधी जबाबदारी पासून पळ काढत असल्याचे सांगण्यात आले. पण प्रियांका यांनी या नेत्यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी पळ काढत नाही तर गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे. यासाठी प्रियांका यांनी काँग्रेसमध्ये याआधी नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तींनी पक्षाचे नेतृत्व केल्याची उदाहरणे दिली.

सांगली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर राजीनामे सत्र सुरु असताना अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार पक्ष सोडतील असे तर्क वितर्क काढले जात आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे सुपुत्र आमदार विश्वजीत कदम हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण याबाबत आता स्वत: विश्वजीत कदम यांनी खुलासा केला आहे.'मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. भविष्यातही मी काँग्रेसमध्ये राहणार आहे,' असा खुलासा विश्वजीत कदम यांनी केला आहे. त्यामुळे सध्यातरी विश्वजीत कदम यांचा भाजप प्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबई - नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांची भेट घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पायलच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.
यासंदर्भात बोलताना मंत्री महाजन म्हणाले, डॉ. पायल यांना त्रास देणाऱ्या तिन्ही डॉक्टरना अधिष्ठात्यांनी निलंबित केले आहे. त्याशिवाय पायल शिकत असणाऱ्या विभागातील युनिट हेडचेही निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई - शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली. ‘हीच वेळ आहे हीच संधी लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ असे या पोस्ट मध्ये लिहले आहे.त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
सूत्रांनी सांगितले की, आदित्य यांनी कुठून लढावे यासंदर्भात एक सर्वेक्षण केले त्यात चार मतदारसंघांचा पर्याय समोर आला. वांद्रे पूर्व, माहिम, शिवडी आणि वरळी हे ते चार मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे तृप्ती सावंत, सदा सरवणकर, अजय चौधरी आणि सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यापैकी आदित्य यांच्यासाठी वरळी व माहिमचा पर्याय ठेवण्यात आला, असे समजते. त्यातही पहिली पसंती ही वरळीला असेल. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि चाळीतील रहिवासी असे मिश्रण असलेल्या वरळी मतदारसंघाला आदित्य पसंती देऊ शकतात, असे शिवसेनेतील नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या दमदार यशामुळे युतीत उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण असून चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची खात्री युतीला वाटत आहे. तसे झाले तर मुख्यमंत्रीपद भाजपला आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला असे ठरले तर उपमुख्यमंत्रीपदही त्यांना मिळू शकेल. ठाकरे कुटुंबातील आजपर्यंत कोणीही निवडणूक लढलेली नाही. आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरतील तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती असतील.आदित्य निवडणूक लढविणार का ? याकडे सध्या सर्वच शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.

वसई - वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व आमची वसई सामाजिक संस्थेतर्फे *स्वातंत्र्यवीर सावरकर* ह्यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त *सावरकरांवरील आक्षेपांचे खंडन* ह्या पुस्तकाचे विनामूल्य वाटप रविवार २६ मे २०१९ रोजी पापडी येतील हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला वसई मुंबई येथील अनेक सावरकरप्रेमींनी उपस्थिती दर्शवली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रम सुरु केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राहुल भांडारकर ह्यांनी केले. योगेश पिंगळे ह्यांनी सागरा प्राण तळमळला आणि जयोऽस्तुते महान्मंगले ह्या दोन सावरकर काव्यांचे स्फूर्तीदायक गायन केले. वेदमूर्ती धनंजयशास्त्री गुरुजींनी सावरकर जीवन, देशाचा इतिहास वर्तमान आणि भविष्याविषयी विवेचन केले. वैज्ञानिक, गणितज्ञ, इतिहासकार, कवी, लेखक, क्रांतिकारकांचे आदर्श अशी सावरकरांची विविध रुपे गुरुजींनी वर्णन केली. श्री राहूल भांडारकर यांनी सावरकरांवरील मुख्य पाच आक्षेपांविषयी थोडक्यात माहिती दिली. पाकिस्तानकडून छुप्या पद्धतीने भारतावर होणाऱ्या वैचारिक हल्ल्यांविषयीची माहिती दिली. द्विराष्ट्रवाद वरील आक्षेपाचे खंडन उपस्थित श्रोत्यांना सांगितले व या कार्यक्रम घेण्या मागचा उद्देश कथन केला. सविस्तर मजकुरात काहीशे पानांचे होत असलेले डिजिटल युगात सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी पुस्तिका स्वरूपात वितरीत करण्यात आले.
१००१ पुस्तिकेचे वाटप करण्याचा संकल्प राहूलजींनी केला असून ज्यांना पुस्तिका हवी आहे त्यांनी आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे (७७०९९०७७०३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन श्री राहूलजी भांडारकर, श्री विजय घरत, श्री निलेश भानुशे, श्री योगेश भानुशे व आमची वसई चे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केले होते. मिलिंद पोंक्षे (जाणीव ट्रस्ट), सौजन्य गोंधळे (धर्मसभा सदस्य), भूपेश पाटिल (तरुण उद्योजक), सुनील अनुसे(किंजल चॅरिटेबल ट्रस्ट), प्रतिक चौधरी (युवा भाजप सदस्य), कुशल पाटील (रुद्रतांडव ढोलताशा पथक), विक्रांत चौधरी, पीटर तुलो (टीम कोळी एकता मंच), जयेश राऊत (स्वामी विवेकानंद संस्था), हेमंत मातवणकर (आमची वसई सदस्य) व ईतर संस्थांचे मान्यवर सभासद कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मुंबई - अभिवेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५७ वर्षीय इसम हा मुळचा पुण्याचा असून त्याने उर्मिलाविरोधात केलेल्या विधानामुळे विश्रामबाग पोलिस स्थानकात त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. धनंजय कुडतरकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३५४ (अ) १ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीला अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. या प्रकरणी तपास सुरु असल्यामुळे त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 
उर्मिला मातोंडकर यंदाच्या लोकसभा निव़डणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवत भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्यापुढे आव्हान उभे केले होते.या मतदारसंघातून शेट्टी यांचा विजय झाला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अमित शाह यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जे पी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत असून या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर होताच त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांना केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. अमित शाह हे केंद्रात गेल्यास भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाला संधी दिली जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शाह यांच्यानंतर पक्षाची ही घौडदौड कायम ठेवणे, हे नवीन अध्यक्षांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. तर अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रीपद स्वीकारले नाही तर अमित शाह यांना अर्थ खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, 

मुंबई - भाजपाच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पोहचणार आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनाही वेग आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या संदर्भात मुंबईत विखे पाटलांकडे बैठक झाल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. या बैठकीत काँग्रेस सोडण्याचा आणि भाजप प्रवेश करण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला.जूनच्या पहिल्याआठवड्यात विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत चर्चा करून प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्यात येणार आहे. या दोघांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपाच्या मार्गावर आहेत. तर काँग्रेसचे आणखी एक आमदार जयकुमार गोरे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याने या हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.गिरीश बापट यांच्याकडे असलेली अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि संसदीय कामकाज ही महत्त्वाची खातीही रिक्त होत आहेत. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आरोग्यमंत्रीपद रिक्त आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल हा ९०.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यात कोकणातला निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.२३ इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूरचा ८२.५१ टक्के इतका लागला. तसेच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात २.५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ १५१ विद्यार्थिनींचा समावेश होता. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले आहे. यानंतर मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल काँग्रेसचे २ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे आज भाजपचे कमळ हातात घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी ४ वाजता भाजपच्या कार्यालयात ते पक्ष प्रवेश करतील.लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने यंदा १८ जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील भाजपला फक्त २ जागा येथे मिळाल्या होत्या. मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढली. रॉय हे टीएमसीचे वरिष्ठ नेते होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी संपूर्ण रणनीती आखली. त्यांच्या नेतृत्वात भाजपने हा विजय मिळवला. 
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाच्या बळावर भाजपाने लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळविले.काहींनी मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला काही सल्ले दिले. अभिनेते ऋषी कपूर मोदींना सल्ला दिला आहे. परदेशात कॅन्सरवर उपचार घेत असणाऱ्या ऋषी कपूर यांनी देशाप्रती असणाऱी आपली जबाबदारी जाणत मोदींना काही सल्ले दिले आहेत. 
रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांवर लक्ष देण्याचा आग्रह कपूर यांनी केला आहे. न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी असणाऱ्या कपूर यांनी ट्विटरच्या माध्यामातून नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि स्मती इराणी यांचे अभिनंदन करत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. 'पुनर्निवाचित भाजपा, नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि स्मृती इराणी यांचे मी अभिनंदन करतो आणि विनंती करतो की, भारतात सध्याच्या घडीला मोफत शिक्षणपद्धती, आरोग्य आणि निवृत्ती वेतनाच्या मुद्द्यांवर तुम्ही काम करा. हे कठीण आहे. पण, आजच्या घडीला यावर काम करण्यास सुरुवात केल्यास एके दिवशी या गोष्टी साध्य होतील', असे ट्विट त्यांनी केले आहे. अमेरिकेतील रुग्णालयात मिळणारे उपचार पाहता, फार कमी जनताच तिथपर्यंत पोहोचावी असे का ?, असा प्रश्नही कपूर यांनी उपस्थित करत अमेरिकेत अधिकांश डॉक्टर आणि शिक्षक हे भारतीय असल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. आपण मांडलेल्या मुद्द्यांवर लक्ष दिल्यास अपेक्षित भारताची प्रतिमा येत्या काही वर्षांमध्ये पाहता येईल अशा आशाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

उदयपूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम मंदिराविषयी मौन बाळगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयूपर येथे संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून यासंदर्भातील संकेत दिले. यावेळी त्यांनी म्हटले की, आता प्रभू रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल. यामध्ये भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचा कयास बांधला जात आहे. 
उदयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चार दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण शिबिरात ३०० पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा मार्गी न लागल्यामुळे संघाने भाजप सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. तर लोकसभा निवडणुकीनंतर कोणाचेही सरकार आले तरी राम मंदिराच्या कामाला सुरुवात करणारच, असे संघाच्या एका नेत्याने म्हटले होते. आता भाजपने पुन्हा एकदा बहुमताने सत्ता प्राप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्त्व आले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर-बाबरी मशीद हा खटला प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्याशिवाय राम मंदिरसाठी अध्यादेश काढता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकार आपल्या भूमिकेत बदल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सादर केला आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत, असे चव्हाण यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.मागील निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर विजय मिळाला होता. यंदा मात्र काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुंबई - खासदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेतील काही दिग्गज नेत्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते.या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.शिवसेनेतर्फे कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथवधी आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेला वेग आला आहे. जेडीयू आणि अण्णाद्रमुक हे दोन नवे पक्ष यावेळी मोदी सरकारमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळात पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यातून नवे चेहेरे दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी बिहारमधून पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. येत्या ३० तारखेला म्हणजे गुरुवारी मोदी पंतप्रधान म्हणून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करतील. अर्थात शपथविधी सोहळ्याची अधिकृत तारिख आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच नव्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहेरे असतील हे देखील सांगण्यात आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील जवळ जवळ सर्व मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - भारताची लोकसंख्या दीडशे कोटींच्या पुढे जाता कामा नये. अन्यथा परिस्थिती अवघड होईल, असा इशारा बाबा रामदेव यांनी दिला आहे. त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.यावेळी त्यांनी म्हटले की, भारताच्या लोकसंख्येने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडता कामा नये. आपण यापेक्षा जास्त लोकसंख्येचा भार पेलण्यासाठी तयार नाही. त्यामुळे सरकारने यासाठी कायदाच केला पाहिजे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या नागरिकांचा मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा हक्क काढून घेतला पाहिजे. तसेच त्यांना सरकारी रुग्णालये व शाळा अशा सुविधांचा लाभ देणेही थांबवले पाहिजे, असे सूचक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले. 

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पराभवाने खचून जाऊ नका असे भावनिक आवाहन केले.‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या शब्दात इन्स्ट्राग्रामवर आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चारच खासदार निवडून येऊ शकले तर पुरस्कृत एक खासदार जिंकून आला. स्वत: पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून जिंकल्या पण पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असताना पवार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून पक्ष कार्यकर्त्यांचे धैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीला नव्या जोमाने सामोरे जाण्याचे स्पष्ट संकेत ७९ वर्षीय पवार यांनी दिले आहेत. 
शनिवारी पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी चिलेवाडी व नागेवाडी या गावांना भेट देऊन, तेथील पाहणी केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

नवी दिल्ली - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी मोदींनी अभिवादन करण्यासाठी आलेल्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नथुराम गोडसेला देशभक्त बोलून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपला अडचणीत आणले होते. साध्वींच्या वक्तव्यामुळे भाजपवर चौफेर टीका झाली होती. साध्वींनी माफी मागितली असली तरी, मी त्यांना मनापासून कधीच माफ करणार नाही, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते. त्याची प्रचिती सेंट्रल हॉलमधील बैठकीत आली. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सर्व खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी साध्वींनी मोदींना अभिवादन केले. मात्र, मोदींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडणुकीवेळी वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणणाऱ्या साध्वींना मोदींनी अजूनही माफ केलेले नाही, असेच चित्र दिसत आहे.. 

मुंबई - मुंबईच्या प्रसिद्ध नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार झाल्याचे वृत्त आहे. डॉ. तडवी यांच्या आत्महत्येनंतर महिला डॉक्टरांविरुद्ध ऑट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाल्या असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पायल तडवी (वय २३) हिने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप करत पायलच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवली. याप्रकरणी तिघींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. पायलचा मृतदेह जळगावात आणण्यात आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली.

नवी दिल्ली - एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली यामुळे मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भाषण करण्याआधी मोदी भारताच्या संविधानासमोर नतमस्तक झाले. यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.

नवी दिल्ली - भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या बैठकीत मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आला.'सबका साथ, सबका विकाससोबत सबका विश्वास' अशी नवी घोषणा देतच, 'अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकायचा आहे', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नव्या सरकारचा मानस कथन केला. या बैठकीनंतर मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मोदी सरकारचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी होण्याची चिन्हे आहेत. भाजप-एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला आघाडीचे सर्व नवनिर्वाचित ३५३ खासदार, बडे नेते, भाजप-'एनडीए'शासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध राज्यांतील मंत्री उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मित्रपक्षांचे नेते उद्धव ठाकरे, नितीशकुमार, प्रकाशसिंह बादल, रामविलास पासवान, ई. के. पलानीस्वामी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी तसेच नेफियू रिओ आणि कॉनरॅड संगमा यांच्या प्रस्ताव आणि अनुमोदनाने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची एकमुखाने निवड करण्यात आली. अमित शहा यांनी मोदी यांची पंतप्रधानपदासाठी निवड झाल्याची घोषणा करताच उपस्थित खासदारांनी टाळ्या आणि बाके वाजवून स्वागत केले. नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी बुजुर्ग अडवाणी, जोशी आणि प्रकाशसिंह बादल यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. पंतप्रधानपदासाठी निवड झाल्यानंतर मोदी यांनी सर्वप्रथम सेंट्रल हॉलमध्ये खास आणलेल्या राज्यघटनेला नमन केले. 'यंदाची निवडणूक सामाजिक ऐक्याचे आंदोलन बनली. या निवडणुकीने भिंती तोडण्याचे आणि हृदये जोडण्याचे काम केले आणि भारताच्या लोकशाही जीवनात एका नव्या युगाचा आरंभ केला आहे', असे प्रतिपादन यावेळी मोदी यांनी केले. 'यापूर्वी आपल्या सरकारने सबका साथ, सबका विकास यासाठी कार्य केले. आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे', असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर भाष्य केले. 'ज्या पद्धतीने गरिबांची फसवणूक झाली, तसेच अल्पसंख्याकांनाही फसवण्यात आले. अल्पसंख्याकांच्या शिक्षण, आरोग्याची काळजी वाहायला हवी. आपल्याला त्यांचा विश्वास जिंकायचा आहे', असे मोदी म्हणाले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली नाही तेथील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवीन टीम बनविण्यासाठी संधी द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी हे जबाबदार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतले. ते कुठेही कमी पडलेले नाहीत.महाराष्ट्रातील पराभवावर बोलताना चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने या पराभवाची सर्व जबाबदारी मी घेत आहे. त्याबद्दल कोणालाही दोष देत नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास मी तयार आहे. राज्यातील काँग्रेस पक्षात कसलेही अंतर्गत मतभेद नाहीत. आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतलेले आहेत.वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला.त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला. वंचितने भाजपची बी टीम म्हणूनच काम केले. या आघाडीचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला, असा दावा चव्हाण यांनी केला. लोकसभा निवडणुकीत जे चित्र समोर आले ते चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. यापुढे निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. एमआयएमसह छोट्या पक्षांची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपाने 'वंचित'चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीचा प्रभाव काँग्रेसनंही मान्य केला आहे. 
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केले असून यापुढे काँग्रेसशी स्वत:च्या अटींवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे. आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी चर्चा करण्याची वेळ आल्यास प्रकाश आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे..

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. पराभवाची जबाबदरी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली. पण, CWC ने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. CWCच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोन्ही नेत्यांनी पक्ष हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यानंतर देखील काँग्रेसला अपेक्षित असे यश या दोन्ही राज्यांमध्ये मिळाले नाही. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांना विजयी करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत केले. स्थानिक नेतृत्व तयार करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विधानाचा हवाला देत केले. बैठकीदरम्यान पी. चिदंबरम यांचे नाव देखील राहुल गांधी यांनी घेतले. स्थानिक नेतृत्वाला पुढे आणण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरल्यावर देखील राहुल गांधी नाराजी व्यक्त केली.राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शिवाय, गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमावे असे देखील राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यास दक्षिण भारतात काँग्रेसला त्याचा फटका बसेल असे पी. चिदंबरम यांनी म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

रांची - राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात ते दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रिम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत राजदला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, या निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे त्यांनी अन्यत्याग केल्याचे म्हटले जात आहे. राजदने बिहारमध्ये काँग्रेस आणि रालोसपा यांच्याबरोबर महागठबंधन केले होते.लालू प्रसाद यादव यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग केला असून त्यांची दिनचर्याही नियमित सुरू नाही. ते ताणावात किंवा कोणत्या चिंतेत असावेत, अशी शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याच्या शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, औषधे देण्यासाठी त्यांनी वेळेवर जेवण घेतले पाहिजे, असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात आला असून सध्या डॉक्टर त्यांचे समुपदेशन करत आहेत. 
लालू प्रसाद यादव हे कोणत्याही तणावाखाली नसल्याचे राजद नेत्याकडून सांगण्यात आले. तसेच लालू प्रसाद यादव यांची ही पहिली निवडणूक नसून पराजयामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांनी सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही निर्देश दिल्याचे ते म्हणाले. बिहारमध्ये राजदला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी रालोआने ३९ जागांवर विजय मिळवत सर्वांना धुळ चारली. तर महागठबंधनला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. राजदने पहिल्यांदाच लालू प्रसाद यांच्या अनुपस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी निवडणुकीची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. परंतु निकालानंतर बिहारच्या जनतेने या नव्या नेतृत्वाला नाकारल्याचे दिसत आहे.

श्रीनगर - गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्याबाबतीत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. यापैकी अनेक दहशतवादी हे त्यांच्या प्रेमिकांमुळे लष्कराच्या जाळ्यात फसले आहेत. याचे उदाहरण म्हणून काश्मीरमधील मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसा याच्याकडे पाहता येईल. काही दिवसांपूर्वी त्रालमध्ये भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल होता. मात्र, आता सगळ्यामागचे आणखी एक कारण समोर आले आहे. झाकीर मुसा याचा मृत्यू झाला तेव्हा तो आपल्या दुसऱ्या प्रेमिकेला भेटायला गेला होता. ही गोष्ट त्याच्या पहिल्या प्रेमिकेला न आवडल्यामुळे तिने रागाच्या भरात लष्कराला झाकीरचा ठावठिकाणा सांगितला. या माहितीच्याआधारे लष्कराने झाकीरला घेराव घालून चकमकीत ठार केले. झाकीरने चंदीगडमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले होते. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर दक्षिण काश्मीरमधील पुलवामामधील मूळगावी परतला. कट्टर इस्लामी साहित्यामुळे झाकीर मुसा दहशतवादाकडे वळला होता.यापूर्वीही अनेक दहशतवादी अशाचप्रकारे लष्कराच्या जाळ्यात सापडले आहेत. अनेकजण आपल्या प्रेमिकांना भेटण्यासाठी येतात तेव्हा लष्कराला त्यांची माहिती मिळते. यामध्ये समीर टायगर, सलमान बट्ट, सैफुल्लाह यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे

नवी दिल्ली - लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर मंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही भ्रमात न राहण्याचा सल्ला दिला. ते शनिवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधताना मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या खासदारांना उद्देशून त्यांनी म्हटले की, देशात सध्या अनेक नरेंद्र मोदी तयार झाले आहेत. या सगळ्यांनी आपापल्या अंदाजानुसार मंत्रिमंडळही तयार केले आहे. या सगळ्याचा हिशोब लावायचा झाला तर ५४२ पैकी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे पाचपन्नास खासदारच उरतील, अशी मिष्किल टिप्पणी नरेंद्र मोदी यांनी केली. अनेक नवीन खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून बोलतोय, असे खोटे फोन केले जातात. प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या पाहून अनेकांना मंत्रिपद मिळेलच, असे वाटू लागते. काही महाभाग तर या खासदारांना मंत्रिमंडळाच्या अंतिम यादीत तुमचे नाव होतेच, मात्र राष्ट्रपतींकडे जाईपर्यंत त्यामध्ये बदल झाले, अशा भुलथापा देतात. जणूकाही मंत्रिमंडळाची यादी तयार करताना ते माझ्याच बाजूला बसलेले असतात, असा या महाभागांचा आविर्भाव असतो. 
त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. हे सर्व फूट पाडण्यासाठी, आपले हेतू साध्या करण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल, या भ्रमात राहू नका. कोणाच्याही शिफारशीने मंत्रिपद मिळत नाही. जे काही निकष असतील त्याआधारेच मंत्रिपद मिळेल. माझ्यासाठी कोणीही आपला किंवा परका नाही, जिंकून आलेले सर्वचजण माझे आहेत. शेवटी मंत्रिपद हे मोजक्याच लोकांना मिळू शकते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली - नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, 'राणे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना 'बुडत्या नावेत कोण बसणार?' असा टोलाही फडणवीसांनी लगावला. दरम्यान, नारायण राणेही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यास मात्र नारायण राणेंनी नकार दिला.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राणेंच्या घरवापसीच्या चर्चांना वेग आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. आज दिल्लीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा दाखल करणार आहेत. त्याआधी संसदेच्या केंद्रीय सभागृहात भाजपाच्या तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षांची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कार्यकारिणीने राहुल गांधींचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. काँग्रेसच्या या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे, सोनिया गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रियंका गांधी, मीरा कुमार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, गुलाम नबी आझाद हे नेते दिल्ली कार्यालयात उपस्थित होते.मात्र, काँग्रेस कार्यकारिणीकडून आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यासाठी राहुल गांधी नसल्यास अध्यक्षपदासाठी कोणते पर्याय असतील, यावर बैठकीत खल सुरू होता. लोकसभा निवडणुकीत वेळोवेळी भाजपकडून सातत्याने काँग्रेसमधील गांधींच्या घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचा मोठा फटका पक्षाला निवडणुकीत बसला होता. त्यामुळे गांधी घराण्याबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याचा विचारही यानिमित्ताने सुरु होता.. त्यासाठी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जून खरगे आणि तरुण गोगोई यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. परंतु, अखेर अपेक्षेप्रमाणेच राहुल गांधींचा राजीनामा फेटाळण्यात आला आणि यापुढेही पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबीयांकडे राहणार, यावर शिक्कामोर्तब झाले.

मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नारायण राणे यांच्याकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नारायण राणे यांची काँग्रेसवापसी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नारायण राणे यांना काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र, लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे शिवसेनेशी युती केल्यामुळे भाजपला संपूर्ण राज्यभरात मोठे यशही मिळाले आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्याशी पुन्हा जाहीर हातमिळवणी करणे, भाजपला परवडण्यासारखे नाही. परिणामी नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द संपल्यातच जमा आहे. त्यामुळेच आता नारायण राणे यांच्याकडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्रात काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता नाही. मात्र, नारायण राणेंच्या आक्रमक नेतृत्त्वामुळे ही उणीव भरून काढली जाऊ शकते. यामुळे राज्यात पक्षाला नवसंजीवनी मिळेल, या आशेने काँग्रेसकडून राणेंना निवडणुकीपूर्वीच 'घरवापसी'चा प्रस्ताव देण्यात आला होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी पाठ फिरवली. पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरूपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यामुळे संजय निरूपम नाराज होते. शिवाय, निवडणुकीच्या काळात देखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. त्याचा परिणाम हा निकालांवर देखील झाला. 


मुंबई - मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपच्या उमेदवार लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकले असून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ पाच मतदारसंघांतच आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. तर ३१ विधानसभा मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालेले आहे. यामुळे अवघ्या सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ही काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे.मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर आणि ईशान्य या सहाही जागांवर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य पाचही लोकसभा मतदारसंघांत शिवसेना भाजपच्या उमेदवारांना एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे.अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला कसून तयारी करायला लागणार आहे. 


मुंबई - शहरातील आणि राज्यातील छोट्या नेत्यांना गल्लीतून थेट दिल्लीपर्यंत पोहोचणे फार कमी जणांच्या नशिबात असते. मात्र ही गरूडझेप घेणे आतापर्यंत दोन नगरसेवकांना शक्य झाले आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक नगरसेवकपदावरून थेट खासदारपदी निवडून आले आहेत.महापालिका ही राजकीय प्रवासाची पहिली शिडी म्हणून ओळखली जाते. आपल्या प्रभागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारा नगरसेवक कालांतराने विधानसभा आणि संधी मिळालीच तर लोकसभेत आपले नशीब अजमावत असतो. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील नगरसेवकांना थेट लोकसभेचे तिकीट मिळाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.भाजपने ईशान्य मुंबईतील आपल्या खासदाराचा पत्ता कट करून नगरसेवक कोटक यांना उमेदवारी दिली. मोदी लाटेमुळे मनोज कोटक देखील खासदार झाले असून आता गल्लीतून दिल्ली पर्यंत त्यांनी झेप घेतली आहे असेच म्हणावे लागेल.

मुंबई - अंधेरीतील साकीनाका परिसरातील नहार सोसायटी येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना भरदिवसा घडल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीचे नाव ईबनेहसन खान (60) असे आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत असून आरोपी पोलिसांना स्वतः शरण आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे

भाईंदर - सात देशी पिस्तूल, दोन जिवंत काडतूकसह मध्यप्रदेशहून रेल्वेने आलेल्या दोघांना भाईंदर येथे अटक करण्यात आली आहे. पिस्तूल विक्री करण्यासाठी हे दोघे आले होते. त्यांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल कण्हैयालाल मालविया आणि ईश्वर रमेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. मध्यप्रदेशमधील नलछेडा परिसरात हे दोघे राहणारे आहेत. भाईंदर पोलिसांना हे आरोपी पिस्तूल विक्रीसाठी बंदरपाडा परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नजर ठेवली आणि या दोघांना अटक केली. या दोघांकडून जप्त करण्यात आलेली सात देशी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतली. याची बाजार भावानुसार किंमत सुमारे एक लाख ७५ हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती भाईंदरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.या दोघांवर शस्त्रबाळगल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आसताना देखील हे दोन आरोपी मध्यप्रदेश येथून पिस्तूल विक्रीसाठी भाईंदरपर्यंत पोहोचले, असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे - ठाणे जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमेत असे ३६ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यापैकी ३० डॉक्टरांवर गुन्हेही दाखल केले असून बोगस ३६ डॉक्टरांपैकी निम्मे डॉक्टर हे एकाच मुरबाड या तालुक्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.ठाण्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्येही बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात मुंब्रा येथे बोगस डॉक्टरांच्या चुकीमुळे एका रु ग्णाचा मृत्यू झाला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड,अंबरनाथ,कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्यांतील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची कमिटी तयार केली. त्यानंतर, त्यांच्याद्वारे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत असते. त्यानुसार, आतापर्यंत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३६ बोगस डॉक्टर आढळून आले आहे. त्यापैकी सहा बोगस डॉक्टर कारवाईच्या भीतीने व्यवसाय बंद करून निघून गेले आहेत. ३० डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले असून त्यांची ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.यामध्ये मुरबाड १८, भिवंडीत १६ तर शहापूर, अंबरनाथ येथे प्रत्येकी एकेक बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यातील भिवंडी येथील पाच तर अंबरनाथमधील एका बोगस डॉक्टरने आपला थाटलेला कारभार बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघातून गतवेळच्या तुलनेत दुप्पट मताधिक्य मिळवणारे शिवसेनेचे राजन विचारे हे राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्यांत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातील ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहर या तीन विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी ८० हजारांचे मताधिक्य शिवसेनेचे विजयी उमेदवार राजन विचारे यांनी मिळवले. त्याचवेळी नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून विचारे यांना ८४ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये मीरा रोड, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना २ लाख ८१ हजार २९९ इतके मताधिक्य मिळाले होते. मात्र, यंदा त्यांनी ४,१२,१४५ इतके मताधिक्य मिळवत आपली आणि युतीची ताकद वाढल्याचे दाखवून दिले.ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे महापालिका शिवसेनेच्या, मीरा-भाईंदर महापालिका भाजपच्या आणि नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तसेच सहापैकी केवळ म्हणजेच ऐरोली विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहेत

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget