July 2019

मुंबई - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा उद्यापासून सुरु होणार आहे, तर आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रासुरु केली आहे.आता याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. राष्ट्रवादीकडून या शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या शिवस्वराज्य यात्रेचा धुरा सोपवण्यात आला आहे. यावेळी उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार आहेत.शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपतीं शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून सुरू होईल. ही यात्रा रोज ३ विधानसभा मतदारसंघातून जाईल. शिवस्वराज्य यात्रा ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा येथे संपेल.१६ ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल. या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची भाजप पक्षात प्रवेश करण्याचे सुरु आहे.आज गरवारे क्लब हाऊस येथेभाजप प्रवेश प्रक्रिया पार पडली. पिचड पिता-पुत्र, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत अखेर भाजपात प्रवेश केला. तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनीदेखील आज भाजपात प्रवेश केला. यावेळी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीता होले यांनीदेखील भाजपात प्रवेश केला.मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे स्वागत करत भाजपाची शाल त्यांच्या गळ्यात टाकली. 
उद्यापासून भाजपाची महाजनादेश यात्रा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पक्षाकडून एक मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. ८९८०८०८०८० या क्रमांकावर मिस कॉल देऊन कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश मिळवता येणार आहे. 


मुंबई - राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीररीत्या आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.जेथे जेथे अन्याय आणि अत्याचार झाला,तेथे तेथे मी आवाज उठवला, मी सरकारविरोधात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले.माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडविण्यासाठी मी भाजपामध्ये आले आहे भाजपा सत्ताधारी पक्ष आहे. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचेही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे. 
यावेळी महाराष्ट्रातील शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या.या महिलांनी 'चित्रा ताई आज बढो हम तुम्हारे साथ है' असे म्हणत सभागृह दणाणून सोडला.
दरम्यान, चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे शरद पवार म्हणाले होते.

मुंबई - राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. ही निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.१ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित अशा एकूण ६७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे ९ ते १६ ऑगस्ट २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १९ ऑगस्ट २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्टपर्यंत मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ३ सप्टेंबर २०१९ रोजी होईल.

नवी दिल्ली - 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या आवाहनाला प्रतिसाद देत आज देशभरातील खासगी डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला आहे. बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ६ पर्यंत सर्व खासगी ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहतील. केवळ आपत्कालीन सुविधा सुरू राहतील, असे ‘आयएमए’कडून सांगण्यात आले आहे. लोकसभेत संमत झालेल्या 'राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयका'ला विरोध करीत 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने आज देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया' बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला 'आयएमए'ने विरोध केला आहे.

नव्या आयोगात २५ सदस्यांच्या नेमणुकीबाबत कोणतीही नियमावली विधेयकात नाही
‘कम्युनिटी हेल्थ वर्कर’ची विधेयकातील संकल्पना अस्पष्ट आहे
 वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे
 या विधेयकाच्या सेक्शन ३२ नुसार, ३.५ लाख नवशिक्यांना प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळणार आहे, याला डॉक्टरांचा आक्षेप आहे
या विधेयकामुळे वैद्यही डॉक्टर बनतील, असं त्यांचं म्हणणं आहे
 नव्या कायद्यानुसार, खासगी महाविद्यालय आपल्या मनमानीप्रमाणे फी ठरवू शकतील. त्यामुळे गरीब मुलांचं मेडिकलचं शिक्षण घेण्याचं कधीही पूर्ण होऊ शकणार नाही
यामुळे मेडिकल क्षेत्रात भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता आहे

मंगळुरू - सीसीडीचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाल्यानंतर बुधवारी सकाळी नेत्रावती नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सोमवारपासूनच सिद्धार्थ बेपत्ता झाल्याची माहिती हाती येताच कर्नाटक पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली होती. नेत्रावती नदीच्या पात्रात नौकादलही त्यांच्या शोधासाठी पाठवण्यात आले होते. सकलेशपूरच्या वाटेवर असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी कारचालकाला कार मंगळुरूच्या दिशेने वळवण्यास सांगितली आणि उल्लाल येथे ते नदीच्या पुलापाशी कारमधून उतरले. तेव्हाच त्यांना अखेरचे पाहिले गेले होते. सीसीडीचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र हस्तगत करण्यात आले. ज्यामध्ये त्यांनी एका चांगल्या व्यवसायाचा आराखडा न उभारता आल्याची खंत व्यक्त केली होती. आपण परिस्थितीचा सामना केला. पण, अखेर याच परिस्थितीपुढे हतबल होत आपल्याला हात टेकावे लागत असल्याची स्वीकृती त्यांनी दिली. आर्थिक व्यवहार प्रकरण आणि आयकर विभागाकड़ून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणीचा तपास सध्या सुरु आहे.

नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेने रशियाकडून १५०० कोटी रूपयांच्या ‘आर -२७’ या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे भारताच्या हवाई दलाची ताकद वाढणार आहे. सुखोई-३०एमकेआय या विमानांवर ही क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत.मागील ५० दिवसांत भारताने रशियाकडून ७ हजार ६०० कोटी रुपयांची संरक्षण खरेदी केली आहे. हवाई दलाने Spice-२००० या क्षेपणास्त्राची तातडीने खरेदी केली होती. आता भारताची मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्र खरेदीस मंजुरी देण्यात आली होती.पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तिन्ही सेना दलांना तत्काळ संरक्षण खरेदीचे अधिकार दिले आहेत. 
इस्लामाबाद - पाकिस्तानी सैन्याचे विमान रहिवाशी परिसरात कोसळल्याने भीषण दुर्घटना झाली आहे. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (३० जुलै) पहाटेच्या सुमारास रावळपिंडीतील गरारी शहराजवळ हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पाच पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे. घटनास्थळावर सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारण जखमींची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई - निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नाराज असलेले भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचा एक आमदार ३१ जुलै (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संदीप नाईक, आमदार वैभव पिचड आणि काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचे पाहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. शिवेंद्रराजे यांनी शरद पवार यांची पुण्यातील निवास्थानी भेटही घेतली होती. पण त्यानंतर शिवेंद्रराजेंचा भाजपप्रवेश रोखण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याचे दिसत आहे.बुधवारी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, यावर आता नक्की झाले आहे.
कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार आहे, असे म्हणत काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर शिवेंद्रराजे यांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेश करावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

नवी मुंबई - नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवीन नेतृत्व उभे करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.नवी मुंबईत नाईक कुटुंबासह राष्ट्रवादीचे इतर नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नगरसेवकांना रोखण्यसाठी ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने आपली सर्व शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे.मात्र काही नगरसेवक राष्ट्रवादी सोडणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व ५७ नगरसेवक राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगत होती. या नगरसेवकांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडू शकते. नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गड समजला जातो आणि तिथेच खिंडार पडल्याने पक्षासाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच नाराज नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात, राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची ३१ जुलै रोजी भेट घेणार आहेत.ईव्हीएम विरोधातील आंदोलन तीव्र करण्यासाठी ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व विरोधकांनी टीका केली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. आता राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात आवाज उठवणार आहेत. ईव्हीएम विरोधात राज ठाकरे सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. नवी दिल्लीत राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यासोबतच काल राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष सुरू असताना, राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे महासचिव बीएल संतोष यांच्यासह प्रदेश कोअर समितीचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले. गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर आज एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे.
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. बैठकीत जम्मू-काश्मीरचे भाजप अध्यक्ष रवींद्र राणा, माजी उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता, राम माधव, जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. कोअर समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह देखील सहभागी आहेत.अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. ३ जुलैला आणखी सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यात आली. 

बंगळुरू -  भाजप नेते एस.एम. कृष्णा यांचे जावई आणि 'सीसीडी' अर्थात 'कॅफे कॉफी डे'चे मालक, संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता आहेत. त्यांचे बेपत्ता होण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट असले तरीही प्राथमिक पातळीवर आत्महत्येचा संशय असल्याची माहिती समोर येत आहे. 
सूत्रांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या पुलाजवळील परिसरात सिद्धार्थ त्यांच्या कारमधून उतरले. पण, जवळपास तासाभरानंतरही ते कारमध्ये परत आलेच नाहीत, हे पाहता कारचालक काहीसा गोंधळला आणि त्याने सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांना त्यासंबंधीची माहिती दिली. दक्षिण कन्नड पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासूनच त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 
कारचालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते सोमवारी रात्री बंगळुरूहून मंगळुरूच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरुन जात असताना उल्लाल येथे असणाऱ्या नेत्रावती नदीच्या पुलावर चालकाला कार थांबवण्यास सांगण्यात आले. त्यावेळी ते फोनवरच बोलत होते. आपण लगेचच परत येऊ असं सांगत ते कारमधून उतरले आणि चालकाने त्याचवेळी त्यांना शेवटचे पाहिले, अशी माहिती मंगळुरूचे आयुक्त संदीप पाचील यांनी दिली. मुंबई - विक्रोळी-घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या गटारात पडून एक इसम वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावरून चालणारा एक व्यक्ती मोठ्या गटारात पडत असल्याचे काहीजणांनी पाहिले. यानंतर संबंधित लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपतकालीन विभागाच्या पथकाने या ठिकाणी शोध मोहीम देखील राबवली. मात्र, या व्यक्तीचा पत्ता लागू शकला नाही. गटारात वाहून गेलेली ही व्यक्ती ६८ वर्षाचे प्रदीप कामदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्त्रायल - जागतिक राजकारणात बेंजामिन नेतान्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र समजले जातात. इस्त्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नेतान्याहू यांनी मोदींच्या प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर केला आहे.इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. नेतन्याहू यांच्याकडे आघाडी होती मात्र इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशिल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. बेंजामिन नेतान्याहू हे इस्त्रायलच्या ७१ वर्षाच्या इतिहासातील इस्त्रायलचे सर्वाधिककाळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी इस्त्रायलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दमदार नेते गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अगोदरही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा होत होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीसाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर चित्रा वाघही भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यानंतर आता तिसरा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.
ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करा, अशी मागणी केली. त्यानंतर घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत पराभवालासमोर जावे लागेल या चिंतेने नगरसेवकांना ग्रासले आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवी दिल्ली - काश्मीरसंदर्भात रविवारी सुरक्षादलांची एक महत्त्वाची बैठक झाली. गुप्तहेरांच्या काही अहवालांनंतर सुरक्षादलांना काश्मीरबाबत काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेत. केंद्र सरकारने अतिरिक्त १० हजार सैनिकांना काश्मीर खोऱ्यात तैनात केले आहे.सुरक्षादलांच्या बैठकीत चार महिन्यांचे दाणापाणीही जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी खोऱ्याचा दौरा केल्यावर केंद्र सरकारने तातडीने १० हजार सैनिक खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलम ३५ ए रद्द करण्याबाबत काही निर्णय झाल्यास प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. 
याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील राजकीय परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी भाजपाच्या जम्मू-काश्मीर कोअर गटाची मंगळवारी बैठक होणार आहे. 

रायबरेली - उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली. या अपघातात पीडित तरुणीची काकी आणि वकील महेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.पीडित तरुणीला सध्या व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिची अनेक हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. तसेच तिच्या डोक्यालाही जबर मार लागला आहे. या मुलीचे काका रायबरेली येथील तुरुंगात आहेत. त्यांना भेटायला हे सर्वजण तुरुंगाच्या दिशेने जात होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताच्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक नव्हता. या भीषण अपघातात गाडीतील सर्वजण गंभीर जखमी झाले. 
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. कुलदीपने पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगरला ताब्यात घेतले होते. यापूर्वी एप्रिल महिन्यात पी़डित तरुणीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पोलीस कोठडीत असताना त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई - छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आणि क्रिकेटच्या मैदानावरही आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अनेकदा सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून शेअर करत असते. मंदिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंदिरा गुलाबी रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहून ४६ वर्षीय अभिनेत्रीला अनेक जणांकडून तिच्या फिटनेसचे रहस्य काय? असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या वर्षीही मंदिरा आपला मुलगा आणि पतीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. 
मंदिराने टीव्ही सीरियल 'शांति'पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर मंदिरा शाहरुख-काजल फेम 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या हिट सिनेमातही दिसली. त्यानंतर तिने औरत, दुश्मन, क्योंकि सास भी कभी बहू थी यांसारख्या अनेक सीरियलमध्ये काम केले. टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर मंदिरा एका क्रिकेट होस्टच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफी होस्ट केल्यानंतर २००६ मध्ये मंदिराने आयपीएलचा दुसरा सीझनही होस्ट केला.

मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. फिटनेसच्या बाबतीत ती खूप जागरुक असून ती कधीच तिच्या जिम, योगाच्या वेळा स्किप करत नाही. तिचे डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी ती कटाक्षाने पाळते. सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पण यामुळे मलायकाच्या फिटनेस रुटीनमध्ये काहीही अडचण आलेली नाही. ती छत्री घेऊन तिच्या योगा क्लासला जात असतानाचा फोटो वायरल झाला आहे. हा फोटो मलायकाच्या योगा क्लासच्या बाहेरचे आहे. यावेळी मलायका नो मेकअप लुक व्हाइट स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लाक पॅन्टमध्ये दिसली. नो मेकअप लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. हे सर्व फोटो मलायकाच्या योगा क्लासच्या बाहेरचे आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाचा स्प्लिट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वयाच्या ४५ व्या वर्षीही मलकाचा हा फिटनेस पाहून सर्वजण अवाक होतात. तिच्या स्प्लिटच्या फोटोवर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मलायका मागच्या काही महिन्यांपासून अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केले जाते. २०१७ मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आता अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मलायकानं त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यामातून ऑफिशिअल केले होते .

मुंबई - शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचा संभ्रम कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार आगामी काळात मीच मुख्यमंत्री होईन, असा पुनरुच्चार करून शिवसेनेला टोला लगावत आहेत. शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटरमध्ये वितरण करण्यात आले. यावेळी अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की असून मीच मुख्यमंत्री होईन, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे या विधानानंतर नवीन चर्चांना तोंड फुटणार आहे.अतिआत्मविश्वास नाही, पण आत्मविश्वास नक्की, मुख्यमंत्री होईन; फडणवीसांचा पुनरुच्चारएकीकडे शिवसेनेकडूनही युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून लोकांपुढे आणले जात आहे तर, भाजपकडूनही मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी एका मंचावरून युतीचे शिक्कामोर्तब करताना वाटाघाटी बाबत आमचं ठरलंय, असे सांगितले होते. मात्र. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून सातत्याने मुख्यमंत्री पदाबाबत दावे केले जात असल्याने भाजप आणि शिवसेनेत आलबेल नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याबरोबरच माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाने अधोरेखित केलेल्या विविध गटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातल्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग, संचालक अजय आंबेकर यावेळी उपस्थित होते.

पनवेल - पनवेल परिसरातली एका वेअरहाऊसमधून १३० किलोंचे आणि तब्बल १३२० कोटी रुपयांचे हेरॉइन शुक्रवारी जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही कारवाई केली असून आतापर्यंत एकूण ३३० किलो हेरॉइन पनवेल परिसरातून जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती अनेक दिवसांपासून होती. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही शुक्रवारी कारवाई केली आणि मोठा साठा जप्त करण्यात आला. 
पनवेल तालुक्यातील हद्दीमध्ये वेअरहाऊसची संख्या जास्त आहे. यामुळेच येथे हेरॉइन साठवून ठेवण्यात येत होती. पळस्पे येथील एका वेअरहाऊसमध्ये हे हेरॉइन २६० गोण्यांमध्ये भरून ठेवले होते.या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये लपवलेल्या होत्या. या वेअरहाऊसमधून दोन इसमांना अटकही करण्यात आली आहे. यातील एक आरोपी दिल्लीचा रहिवाशी आहे, तर दुसरा आरोपी हा कंधार, अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती मिळते आहे. याप्रकारामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत रस्त्याच्या मार्गाने हेरॉइनची तस्करी होत होती. पण आता तस्करांनी समुद्र मार्गाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. पंजाबमध्ये ५३२ किलोचे ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या मते, हे रॅकेट आयएसआय-तालिबानद्वारे चालवण्यात येत आहे. मेक्सिकोच्या मार्कोस, जलालाबादच्या केमिकल एक्सपर्ट्स आणि अफगाणिस्तानहून भारतात हेरॉइनची तस्करी करण्यासाठी नागरिकांना बोलवले जाते अशी असल्याचे समजत आहे.

पनवेल - पनवेलमध्ये उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन उदघाटनाची प्रतीक्षेत आहे.. मनुष्यबळाच्या भरतीनंतर हे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित असल्याचे सांगण्यात येत आहे.उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यावर पनवेलकरांना दिलासा मिळेल.१२० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा सेंटर आहे. व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदन गृहाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये शव ठेवण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागतात. विशेष म्हणजे, पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाजवळील शवविच्छेदनगृह अपुºया जागेत, दुरवस्था झालेल्या खोलीत आहे. उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शवविच्छेदनगृह असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. 
पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसतो. नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभागाचा यात समावेश आहे.शस्त्रक्रिया केंद्र व अतिदक्षता विभाग सुरू होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी जाणार असला तरी उर्वरित सर्व काम पूर्ण झाल्याने लवकरात लवकर हे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेलकरांकडून होत आहे. 
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ५४ कायमस्वरूपी पदे तर ९७ तात्पुरत्या स्वरूपातील पदे भरली जाणार आहेत. तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांच्या मार्फ त देण्यात आले आहेत.

कल्याण - मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाणी साठल्याने लोक अडकून पडले होते. दरम्यान, पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथक आणि हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे. 
कल्याण येथील म्हारळ मध्ये उल्हास नदीचे पाणी साचले आहे. बैठ्या चाळी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंत पाणी साचले होते.तसेच वरप, कांबा गावात पाणी भरले आहे. येथील स्थानिक आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या छतावर गेले. वरप येथील पेट्रोल पंप वरील छतावर ८० जण अकडले होते. त्याची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती .तर डोंबिवलीमदील खाडीकिनारीही पुरस्थिती निर्माण झाली.पश्चिमेतील कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली खाडी परिसर पाण्याखाली गेला डोंबिवलीमध्ये सुद्धा एनडीआरएफची टीमने मदतकार्य केले.

नालासोपारा - वसर्ई - विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर रूपेश जाधव यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आणि हितेंद्र ठाकूर यांनी तो लगेच स्वीकारल्याने वसई-विरारमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. महापौरांच्या राजीनाम्यानंतर उमेश नाईक या पक्षातील वरिष्ठ चेहऱ्याला महापौरपदी बसण्याची संधी देण्यात येऊ शकते, सध्या त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. 
पुढील वर्षी वसई-विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून महापौरपद हे राखीव वर्गासाठी असल्याने एका वर्षासाठी पक्षातील सर्वसाधारण वर्गातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास या पदावर बसण्याची संधी द्यावी, असा विचार करून महापौर पदाचा त्याग केल्याची भावना महापौर रूपेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्याच्या रणांगणात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मने जपण्यासाठी तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करून नालासोपाऱ्यातील बहुजन विकास आघाडीच्या मतांची मोट बांधण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.लोकसभेच्या निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव यांना नालासोपाºयातून सपाटून मार खावा लागला होता. नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असतानादेखील येथे शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना तब्बल २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. महापौर जाधव यांच्या आचोळ्यातील प्रभागातूनही राजीव गावित यांना मतांची आघाडी मिळाल्याने हितेंद्र ठाकूर नाराज होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही उमेदवारी प्रदीप शर्मा यांना देऊ केल्याचे समजते. उत्तर भारतीय मतांची मोट बांधण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचा अंदाज आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतील नाराज कार्यकर्ते तसेच अंतर्गत दुफळी भरून काढण्यासाठी पक्षीय स्तरावर मोठे बदल करण्याच्या हालचाली बविआच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. राजीनामा हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेला बदल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पाटणा - बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर असून कोसी नदी तुडूंब भरुन वाहत आहे. कोसी बंधाऱ्यातून १ लाख ४४ हजार २० क्यूसेक तर बराह क्षेत्रातून ९६ हजार ८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे या नजीकच्या परिसरात पुराचे संकट वाढत असून यात १३ जिल्हे प्रभावित झाले आहेत.प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बिहार राज्यातील आतापर्यंत १२७ लोकांनी आपला जीव गमावला असून ८२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे उत्तर बिहार मागील पंधरवाड्यापासून बेहाल आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत, शेतीही पाण्यात गेली आहे घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी घरे सोडून दिली आहेत, बाजार बंद पडले आहेत, पूरग्रस्त लोकांनी एकतर उंच ठिकाणी आसरा शोधला आहे किंवा लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 
बिहारमधील १३ जिल्हे शिवहर, सीतामढी, मुजफ्फरपुर, पूर्वी चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार आणि पश्चिम चंपारण यांना पूराचा तडाखा लागला आहे.यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दरभंगा जिल्ह्यातील १४ तालुके अधिक प्रभावित झाले आहेत. या भागात अनेक घरे पाण्यात बुडालेली असून पुरग्रस्तांची उपासमार सुरू आहे. 
या दरम्यान मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या पूरात आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला असून ८२ लाख ८३ हजार लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते दुरुस्त केले जात असून बचावकार्य सुरु आहे.पुरानंतरचे उद्धवस्त पुरावेपूराचे हे रौद्र रुप बिहार वासियांसाठी नविन नाही. दरवर्षी बिहारमधे अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळते. यात शैकडो लोकांचा मृत्यू होत असतो कित्येक घरे उध्वस्त होताना दिसतात.

बंगळुरु - कर्नाटक विधानसभेत बंड करणारे काँग्रेस, जेडीएसच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी अपात्र ठरविले आहे. येडीयुरप्पा सोमवारी विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. त्याला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन रमेशकुमार यांनी केले आहे.१४ आमदार अपात्र ठरल्यामुळे विधानसभेची सदस्यसंख्या आता अध्यक्षांसह २०८ वर आली. याचा फायदा भाजपालाच होणार अशी चिन्हं आहेत. 
विधानसभेत सोमवारी येडीयुरप्पा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडतील तेव्हा २०७ सदस्य मतदान करतील. ठराव संमत करण्यासाठी १०४ मतांची भाजपाला गरज आहे. भाजपाकडे सध्या १०५ अधिक एक अशी मतं आहेत. तर काँग्रेसकडे ६६ आणि जेडीएसकडे ३४. बसपाचा एक सदस्य आहे.

Add caption
नवी दिल्ली - दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दि.२८ आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचे आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केले. 
जल संरक्षण, अमरनाथ यात्रा, विज्ञानाबाबत लहान मुलांची आवड वाढावी यासाठी प्रश्नोत्तरा स्पर्धा अशा अनेक विषयांना यावेळी मोदींनी हात घातला. पाणी वाचविण्यासाठी वेगळी नीति तयार करणारे मेघालय देशातील पहिले राज्य बनल्याचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला आणि मेघालयच्या राज्य सरकारचे अभिनंदन केले. यानंतर मोदींनी अमरनाथ यात्रे यशस्वी आय़ोजनासाठी काश्मीरच्या नागरीकांची प्रशंसा केली. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा अमरनाथ यात्रेत सर्वाधिक भाविक सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 
देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेले जाईल. प्रश्नोत्तर स्पर्धेत चांगले त्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे ७ डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेले जाईल असेही मोदींनी सांगितले. याशिवाय क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंचही मोदींनी कौतुक केले आणि देशासाठी सन्मानाची व अभिनामानाची बाब असल्याचं ते म्हणाले.

मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी नेते, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची जबाबदारी झोपडपट्टटी पुनर्वसन प्राधिकरणावर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाने शुक्रवारी तसा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. घाटकोपर, चिरागनगर येथे अण्णाभाऊंचे वास्तव्य होते, ते घर स्मारक म्हणून या आधीच राज्य सरकारने घोषित केले आहे. अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडा किंवा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत करण्यात येणार असून, प्रकल्पाचे विकासक म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण राहील, असे सामाजिक न्याय विभागाच्या आदेशात म्हटले आहे. 
दरम्यान, अण्णाभाऊ साठे यांच्या नातेवाईकांनी गोरेगाव सिद्धार्थ नगर मधील वास्तू सरकारने स्मारक म्हणून घोषित करावी यासाठी लवकरच मुख्यमंत्रांना भेटणार असून त्यांना निवेदन देणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. 
अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक वंचित 
अण्णाभाऊ साठे यांचे लहान बंधू शंकर भाऊराव साठे यांची कन्या रेखा शंकर साठे आताचे नाव रेखा पवार असे आहे शिवाय हे कुटुंब सायन कोळीवाडा येथे राहत आहेत.अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक शासनाच्या सर्वच धोरणांपासून वंचित राहिलेले आहेत.आज सायन कोळीवाडा येथील झोपडपट्टीत राहण्याची त्यांची वेळ आली असून ते घरही भाड्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

राळेगणसिद्धी - माहिती अधिकार कायदा कमजोर करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने संसदेत विधेयक मांडून कायद्यात बदल केला असून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे दिला. कायद्यातील बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका असून त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.
माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असे बंधन आहे. परंतु कायदा तयार होऊन १४ वर्षे झाली तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कायद्यामध्ये आपल्या फायद्यासाठी बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारचा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असे ते म्हणाले

मुंबई - मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री जोरदार पावसामुळे. मुंबईतल्या दादर, शिवडी, परळ भागात पाणी भरले होते. हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला होता. या भागातले पाणी ओसरायला सुरुवात झाली. मुंबईत चेंबूर, गोवंडी, मानखुर्दमध्ये पाऊस पडत असून या भागात पाणी साचल्याने दिसून येत आहे.
दरम्यान मुंबईसह उपनगरी भागांत अति मुसळधार पाऊस येत्या ४ तासांत होणार असल्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. मुंबईत कुलाब्यामध्ये गेल्या १२ तासांत १७१ मिमी तर सांताक्रुझमध्ये ५८ मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबईत कुलाबामध्ये दोन तासात ५२ मीमी पाऊस बरसला. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत.

मुंबई - कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपने साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करत सरकार पाडले आहे. अखेर हुकूमशाहीचा उदय झाला असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. कर्नाटकमध्ये बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस)च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला. यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर अखेर पडदा पडला आणि कुमारस्वामींचे सरकार कोसळले. कुमास्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली आहे. यावर धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली आहे. आम्हाला जी भीती होती ती आता सत्यात उतरत आहे. बहुमताच्या जोरावर भाजप आता कोणतेही निर्णय घेत असल्याचे मुंडे म्हणाले.

मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरातील तांडेल लेनवरील केसरबाई, ही चार मजली इमारत कोसळली होती. या भयानक दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ९ जण जखमी झाले होते. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. केसरबाई इमारत दुर्घटनेच्या बाबतीत झालेल्या प्राथमिक चौकशीत, ही इमारत अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेला दोषी असणाऱ्यांवर डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम करणारा ठेकेदार व इमारतीची मालकी असणाऱ्या ट्रस्टच्या विरोधात कलम ३०४ (अ), ३३८, ३३७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोलापूर - पावसाने दडी मारल्याने सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचे ठरवले होते.पण सोलापुरात कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला आहे.विमानाने तब्बल दोनशे किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यामुळे सोलापूरकरांचा हिरमोड झाला. कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकराच्यावतीने सोलापुरात उभारण्यात आलेल्या निरीक्षण केंद्रावरुन पहिले टेस्ट फ्लाईटचे उड्डाण करण्यात आले होते. सोलापुरातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. राज्यात सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव या तीन ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी राज्य सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूदही केली. यापूर्वी २००३, २००४, २०१० आणि २०११ मध्येही महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आले. मात्र यातला कुठलाही प्रयोग यशस्वी झालेला नाही.

पाटणा - बिहारमध्ये पुरामुळे आतापर्यंत १२४ जणांचा बळी गेला आहे. तर मंगळवारी रात्री वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २६ जणांनी आपले प्राण गमावलेत. ७७ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला. १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला शिवहर, सीतमढी, मुजफ्फरपूर, पूर्व चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अरिरिया पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून सुमारे ८१ शिबिरांमध्ये ७६ हजार ४०० पूरग्रस्तांनी आसरा घेतला. पूरग्रस्त भागात बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची २६ पथक, आणि १२५ मोटरबोटच्या साहाय्याने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
यामध्ये जुमाई भागात वादळात ८ जणांनी तर औरंगाबादमध्ये विजेच्या धक्क्याने ७ जणांचा जीव गेला. बाका जिल्ह्यातही तीन वेगवेगळ्या घटनांत ३ जणांचा मृत्यू झाला.

बंगळुरू - काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांच्या बंडखोरी नाट्यानंतर मंगळवारी कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. यामध्ये ९९ विरुद्ध १०५ अशा मतांनी कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. यानंतर बसपा प्रमुख मायावती यांनी कर्नाटकातील आपल्या एकमेव आमदाराला पक्षातून निलंबित केले. एन. महेश हे बसपाचे आमदार आहेत. ते विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी गैरहजर होते. यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मायावती यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एन.महेश यांनी विश्वासदर्शत ठरावावरील मतदानावेळी कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या पक्षादेशाचे उल्लंघन केले. ते यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. पक्षाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे मायावती यांनी सांगितले. 
२२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. त्यामुळे निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले.

भिवंडी - भिवंडीमध्ये रसायनाच्या गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली असून कुलिंगचचे काम सुरू करण्यात आले आहे. आगीमध्ये आत्तापर्यंत तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास भिवंडीतल्या दापोडा गावात अंजुर फाट्याजवळ प्रेरणा केमिकल्स गोडाऊनला आग लागली होती. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आग नियंत्रणात आली. भीषण आगीत ६ ते ७ गोदामे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

धुळे - धुळे जिल्ह्याच्या दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली आहे. डॉक्टर देशमुख अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले.जिल्हा न्यायालयाने डॉ. देशमुख यांना तात्पुरता जामीन दिला होता, तो रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. त्यानंतर डॉक्टर देशमुख कारवाई पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत होते. मात्र अखेर याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रमाणेच राजकीय दबावाला बळी न पडता माजी मंत्री डॉक्टर देशमुख यांच्यावरती खटला चालवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.२०१६ साली या गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, ३ तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, ३ तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास १५ कोटी रुपयांचा व्यवहार केला होता.
घरकुल योजना राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे हे सदस्य होते. म्हणून त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही, याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण १० आरोपी करण्यात आले. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून ३ नगराध्यक्ष , ३ मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरता जामीनावर आहेत.


बंगळुरू - कर्नाटकमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्याचा आज शेवटचा अंक असू शकतो. कुमारस्वामी सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जायला अखेर तयार झाले आहेत.आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रथम विश्वासदर्शक ठरावावर बोलतील आणि त्यानंतर सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता पण त्यानंतर चर्चेचे कारण देत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार टाळाटाळ करत होते पण विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी कर्नाटकची जनता आपल्या सर्व व्यवहाराकडे पाहते आहे, त्यामुळे विश्वासदर्शक ठराव किती वाजता मांडणार याबद्दल स्पष्ट सांगा, अशी सूचना सोमवारी केली. त्यावेळी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज संध्याकाळी सहाच्या आत मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विश्वासदर्शक ठराव मांडतील असे सांगितले. पण विधानसभा अध्यक्षांच्या वेळकाढू धोरणाबाबत भाजपा नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ११ आमदारांना पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार नोटीस बजावली असून आज सकाळी ११ वाजेपर्यंत अध्यक्षांच्या दालनात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांचा नवा पवित्रा पाहायला मिळतो. विधानसभा अध्यक्षकांपुढे हजर होण्यास ४ आठवड्याची मुदत मागितलीय. तूर्त सगळे आमदार मुंबईतील पवईतच आहेत. आज त्यांना अकरा वाजेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत.

बंगळुरू - कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारची आज अग्निपरीक्षा असणार आहे. तब्बल दोन वेळा राज्यपालांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानंतर आज पुन्हा एकदा कुमारस्वामी हे विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरू आहे. या राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण जेडीएसकडून काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू होती. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी ही चर्चा फेटाळली आहे. या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'कुमारस्वामी हेच मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही आज भाजपचे पानिपत नक्की करू,' असे दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. त्यामुळे आज बंगळुरूमधल्या विधानसभेत काय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, कर्नाटकमधील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत ११७ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे ७८ तर जेडीएसचे ३७, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. २२५ सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह १०७ जणांचा पाठिंबा आहे. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप बंडखोर आमदारांच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात कोर्टने दिलेल्या आदेशामुळे आधीच कुमारस्वामी यांना झटका बसला आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत आज नेमक्या काय हालचाली होतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजारा खिळल्या आहेत.

मुंबई - मीच मुख्यमंत्री होणार, मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येऊन मुख्यमंत्री मीच असेल असा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढणार, याबद्दल शंका बाळगू नका, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. आपल्या मित्रपक्षामध्ये बऱ्याच लोकांना बोलायची खुमखुमी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेऊ नका, आपण ही निवडणूक युतीमध्येत लढणार आहे, ही निवडणूक आपण युतीतच लढणार आहोत, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.युतीमध्ये लढत असताना कोणत्या जागा आपल्या आणि कोणत्या जागा मित्रांच्या याचा निर्णय लवकरच होणार, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी राज्यातील भाजपा नेत्यांना कार्यान्वित करण्यासाठी भाजपाच्या विस्तारीत प्रदेश कार्यकिरणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी बैठकीसाठी उपस्थित लावली होती. 

सांगली - काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. देशमुख यांच्याशी भाजपा नेत्यांची बोलणी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सत्यजित देशमुख हे भाजपाकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद मिळणार असल्याबाबत चर्चा सुरू आहे. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वाची घटना महत्वाची मानली जात आहे. भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. सत्यजित यांना भाजपमध्ये आणण्यासाठी कित्येक महिन्यापासून प्रयत्न सुरु होते. सत्यजित यांच्या सोबत काँग्रेसमधील नाराज नेते देखील भाजपात येण्याची शक्यता आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये रविवारी वीज पडल्याने ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वीज पडून कानपूर आणि फतेपूरमध्ये ७, झाशी ५, जालाऊन ४, हमीरपूर ३, गाझीपूर २ आणि पठाणगडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबींयाबद्दल दु:ख व्यक्त केले असून प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे. तसेच जखमी झालेल्यांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
श्रीहरीकोटा - चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवार) दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे चांद्रयान २ अवकाशात झेपावणार आहे. रविवारी संध्याकाळी ६.४३ मिनिटांनी चंद्रयान-2 चे काऊनडाऊन सुरु झाल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष सिवन यांनी सांगितले. राँकेट आणि आंतराळ यान प्रणालीची तपासणी केली जात आहे. तसेच राँकेटच्या इंजिनात इंधन भरले जात आहे. याआधी जीएसएलवी-एमके-३ राँकेट १५ जुलैला मध्यरात्री २.५१ वाजता उड्डाण घेणार होते. पण तांत्रिक अडचणींमुळे उड्डाणाच्या तासभरआधी हे थांबविण्यात आले. 
चंद्रयान-2 ला अवकाशात पाठविण्यासाठी इस्त्रो पुर्णपणे तयार आहे. याचा प्रक्षेपणासंदर्भातील सर्व तयारी इस्त्रोने केली आहे. पहिल्या प्रक्षेपणावेळी जी तांत्रिक अडचण आली होती ती दूर करण्यात आल्याचेही सिवन यावेळी म्हणाले. चांद्रयान- २ चं एकूण वजन हे ३ हजार ८७७ किलोग्रॅम आहे. या यानाची निर्मिती आधी रशियाच्या सहाय्याने करायची होती. मात्र रशियाने ऐनवेळी अंग काढून घेतल्यानं चांद्रयान-२ ची निर्मिती स्बबळावर करण्यात आली आहे. चांद्रयान -२ चे एकूण ३ प्रमुख भाग आहेत. चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारा लँडर आणि चांद्रभूमीवर संचार करणारा रोव्हर. या तीन भागांवर एकूण १३ वैज्ञानिक उपकरणं आहेत. त्यांची निर्मिती इस्रोनेच केली आहे.

कल्याण - उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथे राहणारा अरुणकुमार गुप्ता मुंबईतील आपली पे्रयसी प्रतिमा प्रसाद हिला भेटायला कल्याणमध्ये आला होता. फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. कल्याणमधील एका गेस्टहाउसमध्ये दोघांची भेट झाली. तेथे अरुणकुमारने आपला अंगठा कापून प्रतिमाचा मळवट भरला आणि काही क्षणांत तिची हत्या करून गळफास घेऊन स्वत:लाही संपवल्याची घटना कल्याणात शुक्रवारी रात्री उघडकीस आली. 
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्टहाउसमध्ये अरुणकुमार (२०) थांबला होता. त्याला भेटण्यासाठी तेथे प्रतिमा (१९) आली होती. रात्री ९ च्या सुमारास वेटरने त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला; मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाल्यानंतर वेटरला संशय आला. त्याने ही बाब व्यवस्थापकाला सांगितली असता त्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता प्रतिमा मृतावस्थेत, तर अरुणकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. 
बनारस येथे फिरायला जात असल्याचे वडिलांना सांगून १८ तारखेला घराबाहेर पडलेल्या अरुणने कल्याण गाठले. तर, घाटकोपर येथील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या प्रतिमाने आपल्याला काम असल्याचे सांगत नीलम गेस्टहाउस गाठले. तेथे अरुणने स्वत:चा अंगठा कापून आपले रक्त प्रतिमाच्या कपाळाला लावले. त्यानंतर, तिची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. एकमेकांवर प्रेम करणाºया या दोघांमध्ये अचानक असे काय घडले की, अरुणने प्रतिमाची हत्या करत स्वत: आत्महत्या केली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


नवी मुंबई -  माणगाव, रोहा, श्रीवर्धन, म्हसाळा, आणि अलीबाग या रायगड जिल्ह्य़ातील तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी सिडको एक सर्वेक्षण करणार असून त्यावर १४ कोटी रुपये खर्च करणार आहे. चार तालुक्यांतील ८६ गावांतील १९ हजार हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वेक्षणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
यातील १५ हजार ९५४ हेक्टर जमीन ही औद्योगिक वसाहतीसाठी तर चार हजार हेक्टर जमीन ही नागरी वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये राजापूरमधून विस्थापित होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा समावेश असण्याची शक्यता आहे. सिडको या सर्व जमीन संपादनात समन्वयाची भूमिका पार पाडणार आहे.राज्य शासनाने मुंबईला पर्याय म्हणून पन्नास वर्षांपूर्वी नवी मुंबईची निमिर्ती केली. त्यासाठी ६० हजार शेतकऱ्यांची १६ हजार हेक्टर जमीन संपादन केली. नवी मुंबई निर्मितीचे कार्य आता संपत आल्याने सरकारने नदी व समुद्रकिनारी तिसऱ्या मुंबईचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी श्रीवर्धन, म्हसाळा, रोहा व अलीबाग या चार तालुक्यांतील १५ हजार ९५४ हेक्टर जमीन तिप्पट दर देऊन संपादन केली जाणार आहे. या भागात सरकारला एकात्मिक औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. समुद्रकिनारी असलेल्या या जमिनीवर रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाकारण्यात आलेला रिफायनरीचा नाणार प्रकल्प उभारता येणार आहे. त्यासाठी लागणारी जमीन संपादन प्रक्रिया रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार असून सिडको समन्वयाची भूमिका पार पाडणार आहे. त्यासाठी एक सनदी अधिकाऱ्यासह आठ इतर उच्च अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सिडकोत सध्या व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह इतर दोन सनदी अधिकारी आहेत. सरकारने दोन दिवसांपूर्वी आणखी एक सनदी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती केली असून यातील एक अधिकारी हा या तिसऱ्या नवी मुंबईच्या भूसंपादनात समन्वयाचे काम करणार आहे.

नवी मुंबई - पनवेलजवळील सुकापूर येथे घर देण्याच्या नावाने सुमारे २५० लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला त्वरित अटक करून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिरीष रंगराव चव्हाण असे या विकासकाचे नाव असून, त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरीष चव्हाण यांनी सुकापूर येथील ८७ गुंठे जमिनीवर प्रस्तावित गृहप्रकल्पातील घरांच्या बुकिंगपोटी २५० ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये उकाळल्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी उजेडात आले होते. या प्रकरणी ग्राहकांनी न्यायालयात दाद मागितली; परंतु विविध कारणे दाखवत विकासकाने ग्राहकांना झुलवत ठेवले. त्यानंतर चव्हाण यांनी प्रस्तावित गृहप्रकल्पाची जमीन श्रवणकुमार जे. अगरवाल आणि विनयकुमार एस. अगरवाल यांना विकली. या जमिनीवर आता टोलेजंग इमारत उभारली जात आहे. मुळात या जमिनीच्या नावाने अगोदरच २५० लोकांची फसवणूक झाली असताना आता त्याच जमिनीवर बेकायदेशीर टॉवर उभारला जात असल्याची बाब महाराष्ट्र ओ.बी.सी. सेनेचे मुख्य संघटक शरद भोवर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. विशेष म्हणजे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कृष्णा मोरे हे मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणी लढा देत आहेत. त्यांनी पनवेल न्यायालयात विकासक शिरीष चव्हाण यांच्याविरोधात खटलाही दाखल केला आहे; परंतु वेळोवेळी चव्हाण गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारी २०१९ रोजी फरार घोषित केले आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस शिरीष चव्हाण यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भोवर यांनी केला आहे.सुमारे २५० ग्राहकांची फसवणूक करणारे शिरीष रंगराव चव्हाण यांच्यासह श्रवणकुमार जे. अगरवाल व विनयकुमार एस. अगरवाल यांची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शरद भोवर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निविदेनाद्वारे केली आहे.

मुंबई - भायखळा स्थानकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुंबईकर प्रवाशांचा लोकलप्रवास जास्तीतजास्त सुसह्य़ करण्याची आणि त्यांच्या गैरसोयी दूर करण्याची ग्वाही दिली. 
भायखळा स्थानकासह सीएसएमटी, कुर्ला, मुंब्रा, ठाणे, डोंबिवली, आंबिवली, वाशिंद, चुनाभट्टी, निळजे आणि पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्थानकाचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ होईल, अशी माहिती गोयल यांनी दिली. या स्थानकांचे काम सामाजिक उत्तरदायित्व निधीतून खासगी कंपन्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी भायखळा स्थानकाची पाहणी केल्यानंतर प्रवाशांशी संवादही साधला. भायखळा स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे काम भाजप नेत्या आणि ‘आय लव्ह मुंबई’ संस्थेच्या प्रमुख शायना एन. सी. आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टमार्फत केले जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वे आणि संस्थेत सामंजस्य करारही करण्यात आला. येत्या आठ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget