January 2020

मुंबई - मुंबईत घर मिळावे यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात अशातच म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळण्यासाठी अर्जही दाखल केले जातात अशातच अनेकदा लोक घर घेण्याच्या नादात फसतात. म्हाडामध्ये घर मिळवून देतो, म्हणून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार आतापर्यंत अनेकदा उघडकीस आलेला आहे. मात्र, चक्क पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड याने वर्ष २०११ ते २०१२ दरम्यान त्याची माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख असून मला पंचवीस लाख द्या, मी तुम्हाला म्हाडा मधले स्वस्तात आणि मोठे घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाकडून २५ लाख उकळले. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही मिळाले आणि पैसेही नाही मिळाले. त्यामुळे पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गायकवाडविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी नितीन गायकवाड हा यापूर्वी माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर त्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. याचाच फायदा घेत म्हाडा मधले घर तुम्हाला स्वस्तात राहायला देतो आणि त्यानंतर तुमच्या नावावर करुन देतो. त्यासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्याने २५ लाख उकळल्या प्रकरणी आता मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी नितीन गायकवाड याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे. ह्यापूर्वीही आरोपी गायकवाडवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

बैरूत - रशियाच्या सरकारने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये सिरियाच्या इदलिब प्रांतातील दहा नागरिकांचा गुरुवारी मृत्यू झाला. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईट्सने म्हटले आहे, की इदलिब प्रांतातील अरिहा शहरातील मृतांमध्ये कमीतकमी पाच महिलांचा समावेश आहे. येथे रशियन समर्थित सरकारी सैन्याने देशातील शेवटच्या प्रमुख बंडखोर बुरुजावर हल्ले केले आहेत.या हल्ल्यात एका क्लिनिकजवळ बॉम्ब पडला. एटीपीच्या वार्ताहरांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर धुळीने माखलेल्या एका डॉक्टरने ओरडत अल-शमी क्लिनिकमधून बाहेर पळ काढला. या क्लिनिकच्या आसपासच्या तीन इमारतीही या हल्ल्यात कोसळल्या.या हल्ल्यानंतर, गेल्या २४ तासांमध्ये रशियन एअर स्ट्राईकमुळे सीरियामध्ये मारले गेलेल्या एकूण नागरिकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, रशियाने १२ जानेवारीपासून अंमलात आलेल्या बंडखोर समर्थक तुर्कीशी झालेल्या युद्धबंदीनंतर इदलिब प्रदेशात कोणतीही लढाऊ कारवाई सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र यानंतर रशियाच्या हल्ल्यांमध्ये वाढच झाली आहे.लष्कराच्या समर्थनार्थ सीरियामध्ये हजारो रशियन सैनिक तैनात केले गेले आहेत. तर, मॉस्कोच्या खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक तुकडीही सीरियामध्ये कार्यरत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे.  वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज दिल्लीतून एअर इंडियाचे विशेष विमान वुहानच्या रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वुहानमध्ये असलेल्या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
चीनच्या वुहान विद्यापीठात मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना विमानमार्गे थेट भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने चीनची परवानगी मागितली होती. कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन २१३ जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल सात हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.


श्रीनगर - जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक तपासणीसाठी रोखण्यात आला होता. त्यावेळी ट्रकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. या घटनेत एक पोलीस जखमी झाला. तर सुरक्षादलाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन सुरु असून यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अजून एक दहशतवादी लपला असल्याची शक्यता असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

केरळ - कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले असून आता त्याने भारतातही शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये हा रुग्ण आढळला आहे. हा तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या त्याला रग्णालयात डॉक्टरांच्या देखेरेखेखाली ठेवण्यात आलं असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसची साथ पसरण्यामध्ये चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी हुआन मुख्य केंद्र आहे. हा व्हायरस आता जगात अनेक ठिकाणी पसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १७० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून हुबेई प्रांतातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. व्हायरस वेगाने पसरू लागल्यानंतर भारतीय सरकारने हुआन येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चीनमधून परतणाऱ्या सर्व भारतीयांची विमानतळावर तपासणी केली जात आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतल्या जामिया नगरमध्ये सीएएविरोधात (CAA) शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक एका अज्ञाताने गोळीबार केल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला. आंदोलन सुरू असताना एक अज्ञात अचानक आला आणि त्याने पिस्तूल काढून आंदोलकांच्या दिशेने फायरिंग केली. यात शादाब नावाचा तरुण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्ती पोलीस आणि माध्यमांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. मी सर्वांना आझादी देईल असेही तो बोलत असल्याचे समजते याचवेळी त्या व्यक्तीकडून गोळीबार झाला. यात एका विद्यार्थ्याला गोळी लागली. हा विद्यार्थी जामिया विद्यापिठातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार करणाऱ्या अज्ञाताला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी ते अधिक चौकशी करत असल्याचे सांगितले.

बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. आजपर्यंत तब्बल १७० जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास आठ हजार लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजत आहे.चीनबाहेर जवळपास ९० लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अमेरिका, जपान आणि इतर देश चीनमधील आपापल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी पुढे सरसावले आहेत. चीनच्या हुबेई प्रांतातील भारतीय नागरिकांना देशात परत पाठवण्यासाठी चीन सरकारने परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी चीनमधील भारतीय दूतावास चीन सरकारशी बोलणी करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून भारतात अनेक ठिकाणी संशयित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये ८०६ नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे. तर, बंगळुरुमध्ये चार चिनी नागरिकांना विशेष कक्षांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्येही आठ रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्या दिवशीच १९४८ मध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. महात्मा गांधी जयंती निमित्ताने आज या दिवशी देशातील अनेक भागात नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात प्रदर्शन होणार आहे. जामिया मिलियाचे विद्यार्थी राजघाटापर्य़ंत मार्च काढणार आहेत. मात्र पोलिसांकडून अद्याप त्यांना हा मार्च काढण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. राजघाच येथे CAA, NRC या कायद्याविरोधात प्रदर्शनादरम्यान मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल ६० विद्यार्थी युनियन सहभागी होणार आहेत. ही साखळी सायंकाळी ५.१० पासून ५.१७ या वेळेत करण्यात येणार आहे. याच वेळेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. दुसरीकड़े य़शवंत सिन्हा यांची गांधी शांती यात्रा आज राजघात येथे समाप्त होईल.गुरुवारी राजघाटावर नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात जन एकता जन अधिकार आंदोलनच्या सुरुवातीला तब्बल १०९ संघटना राजघात येथून शांतीवन आणि तेथून पुन्हा राजघाट असा मार्च काढणार आहेत. हा मार्च हनुमान मंदिर, लाल किल्ला, जामा मशिद आणि दिल्ली गेट येथून पुढे जाईल.
दरम्यान,काल भारत बंददरम्यान CAA आणि NRC विरोधातील आंदोलनात पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये CAA आणि NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. रस्त्यावर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी काठीने मारहाण केली.

मुंबई - गोरखपूरमध्ये प्रक्षोभक भाषण करणाऱ्या डॉ. काफिल खानला मुंबईत अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील खानने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भाषण केले होते. भाषणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने डॉ. काफिल खानला मुंबईत अटक केली. १३ डिसेंबर २०१९ रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासूनच तो परागंदा होता. 
डॉ. खानवरील पुढील कारवाई उत्तर प्रदेशमध्ये होणार असून सुरुवातीला त्याला सहार पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधून डॉ. काफिल खानला २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते. मेडिकल कॉलेजमधील बालकांच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.‘मोटाभाई’ सर्वांना हिंदू किंवा मुस्लिम होण्यासाठी शिकवतात, पण माणूस होण्यास शिकवत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व दिसल्यापासून माझा संविधानावर विश्वास राहिलेला नाही. सीएए मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिकत्व देते आणि एनआरसी लागू होताच लोकांना त्रास दिला जाईल, असा आरोप काफिल खानने भाषणातून केला होता.

नाशिक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज ५ महत्वाचे मंत्री दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत. जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा आढवा बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र बैठक घेऊन, सुरु असलेल्या प्रकल्पांचा आणि इतर कामकाजाची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत.या आढवा बैठकीलाअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादा भुसे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढवा बैठक घेणार आहेत.छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. तर दादा भुसे हे पालघरचे, हसन मुश्रीफ नगरचे, तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री आहेत. हे सर्व त्या त्या जिल्ह्यांच्या आढावा बैठकीला हजर असतील. 
दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने महत्त्वाचे चार निर्णय घेतले. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील सभेत इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटल्याचे वक्तव्य केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून या टीकेचा तात्काळ समाचार घेतला.अशोक चव्हाण यांनी म्हटले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला. भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतील कुरबुरी काही थांबायला तयार नाही. तीनपैकी एका पक्षाचा नेता काहीबाही विधान करतो मग त्यावर इतर पक्ष नाराज होतात, यानंतर सारवासारव केली जाते.
दरम्यान, काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही आपली बाजू स्पष्ट केली. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी होते. परंतु, आणीबाणीबद्दल मतमतांतरे असू शकतात, हे सत्य मी लपवू इच्छित नाही. इंदिराजी आणि मोदी-शहांची तुलना होऊच शकत नाही, असे आव्हाड यांनी सांगितले. 

मुंबई - डीएचएफएलचा माजी संचालक कपील वाधवान याने तब्बल १२ हजार ७७३ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा दावा अंमलबजावणी संचलनालयाने केला आहे. वाधवाननो डीएचएफलचा पैसा विविध ठिकाणी वळवल्याचा दावाही करण्यात आला आहे. वाधवानने वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल एक अकाऊंट ओपन करून आणि मुंबईत तब्बल ७९ बोगस कंपन्या स्थापन करून हा पैसा फीचवल्याचे ईडीने कोर्टात सांगितंले. याप्रकरणी मुंबईतला आणखी एक मोठा बिल्डरसुद्धा ईडीच्या रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


ठाणे - ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर आजपासून वातानुकूलित रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे. यानंतर उद्यापासून सामान्य प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल. ठाणे-वाशी-नेरूळ-पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या दररोज १६ फेऱ्या धावणार आहेत. या लोकलची पहिली फेरी पहाटे ५.४४ वाजता पनवेल-ठाणे मार्गावर होईल, तर ठाणे-पनवेल मार्गावर रात्री ९.५४ ला शेवटची फेरी असेल. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत आज एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 
तब्बल दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित रेल्वे धावली होती. तेव्हापासून मध्य रेल्वेवर एसी लोकल कधी धावणार, याची प्रतिक्षा प्रवाशांना होती. मध्य रेल्वेवरील पहिल्या एसी लोकलचे सारथ्य मोटर वुमन मनीषा म्हस्के करणार आहेत.

बिहार - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या शारजील इमाम याला पोलिसांनी मंगळवारी बिहारच्या जेहानाबाद येथून अटक केली. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शारजील फरार होता.जेहानाबादमधील काको या गावातून त्याला अटक करण्यात आली.शारजीलविरोधात उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीत गुन्हे दाखल आहेत. या राज्यांतील पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला मंगळवारी अटक केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी आर. के. राजक यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्यांनी शारजीलला दिल्ली पोलिसांकडे सोपविण्याचे आदेश दिले.‘जेएनयू’मध्ये पीएचडी करत असलेला शारजील हा आयआयटी, मुंबईचा माजी विद्यार्थी आहे. आसामसह ईशान्येचा भाग भारतापासून वेगळा करण्याबाबतचे भाष्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ‘आसामला भारतापासून तोडणे ही आमची जबाबदारी असून, त्यानंतर सरकार आपले ऐकेल’, असे इमाम म्हणाला होता.
दरम्यान,शारजीलचा भाऊ मुजामिल याला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुजामिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले.

पुणे - गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी जेलमध्ये असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे. डीएसकेंच्या २० गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १३ अलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या १३ वाहनांची किंमत २ कोटी ८६ लाख ९६ हजार इतकी आहे. येत्या १५ फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे.
मावळचे प्रांत अधिकारी संदेश सिर्के यांनी या गाड्यांच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. या १३ गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, पोर्षे, टोयोटो अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यता कोर्टाने या गाड्यांच्या लिलावाला परवानगी दिली होती. बीएमडब्ल्यू गाडीची किंमत ८५ लाख रुपये आहे, तर पोर्शे या गाडीची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे. एमव्ही ऑगस्टाची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे, तर टोयाटो कॅमेराची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे.
डी एस कुलकर्णींनी गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके सध्या कारागृहात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार आपले पैसे मिळतील या अपेक्षेत आहेत.
मुंबई - सीएए व एनआरसीच्या विरोधामध्ये देशभरात विरोधाचे वातावरण उभे राहिले असून या कायदाला विरोध करण्यासाठी आज बहुजन मुक्ती मोर्चाने भारत बंदचे, आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावर रेल्वे अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, वेळीच रेल्वे सुरक्षा बल व पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. बहुजन मुक्ती मोर्चाकडून सीएए व एनाआरसी कायदा हा देशविरोधी व विशिष्ट धर्माला लक्ष्य करत असल्यामुळे हा कायदा केंद्र सरकारने परत घ्यावा, यासाठी आज देश बंद करण्याची हाक दिली होती. त्याचे पडसाद राज्यातील काही भागांमध्ये उमटत आहेत.

नांदेड - मी तीन्ही पक्षांच्या (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीन्ही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तावेज आहे. मी जे बोललो ते त्याअनुषंगाने होते. मात्र त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है, असे सांगून आपल्या विधानावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सारवासारव केली. 
दरम्यान, जो पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा महाविकास आघाडी सरकारवर वरदहस्त आहे तोपर्यंत बाकीच्या चर्चा व्यर्थ आहे. यावर चर्चा करणे योग्य नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सल्ला दिला आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काम करत असताना शंका कुशंका आणि गैरसमज निर्माण होईल, असे वक्तव्य कोणीही करु नये, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला.
सरकारकडून कोणतीही घटनाबाह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. ते रविवारी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारादरम्यांचा खुलासा केला होता. मात्र, विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर आणि सरकारमधील मंत्र्यांनी याबाबत अशी काही विधान करु नये, अशी भूमिका घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत सावध प्रतिक्रिया दिली. 

सातारा - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने आज २९ जानेवारी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.परंतु, या बंदला महाराष्ट्रातील काही व्यापारी संघटनांनी पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर सातारा शहर व्यापारी संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात बंद न पाळण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे.
दरम्यान, सातारा शहर व्यापारी संघटनेप्रमाणे परळी आणि उदगीरच्या व्यापारी संघटनांनीदेखील भारत बंदला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. २९ जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असे निवेदन परळी शहर व्यापरी संघटनेने प्रशासनाला दिलं आहे.उदगीर व्यापारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. “आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. कोणी आमच्या व्यापारी प्रतिष्ठानवर दगडफेक केली आणि नुकसान झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहिल”, असे निवेदनात म्हटले आहे.

अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या होत्या.
नवी दिल्ली - अनुराग ठाकूर यांना एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर आव्हान दिले आहे. मी अनुराग ठाकूर सांगतील, त्याठिकाणी यायला तयार आहे. त्याठिकाणी तुम्ही मला गोळ्या घालून दाखवाच, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात जराही भीती निर्माण झालेली नाही. कारण आमच्या माता-भगिनी देशाला वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत, असे ओवेसी यांनी सांगितले. 
त्यामुळे आता भाजपकडून ओवेसी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
रिठाला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अनुराग ठाकूर, हंसराज अहिर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. 

जळगाव - राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्ज माफी आणि इतर विषय समोर ठेऊन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. कर्जमाफीचा तिढा सुरूच आहे. शेतीला पुरेसा वीजपुरवठा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर भाजपच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.गिरीश महाजन सोमवारी सायंकाळी जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, असे या सरकारने जाहीर केले होते. मात्र, आज शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसेही या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आम्ही २५ हजार रुपये हेक्‍टरी भरपाई देवू, असे सरकारने जाहीर केले होते. पण आजपर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. शेतकरी कर्जमाफी ताबडतोब करू, असे सांगितले. परंतु, अद्यापही ही कर्जमाफी झालेली नाही. तांत्रिक मुद्यातच ती अडकलेली आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.राज्यभर विजेचा प्रश्‍न गंभीर-आमचे सरकार असताना राज्यात वीज पुरवठा सुरळीत होत होता. मात्र, हे सरकार आल्यापासून राज्यात विजेचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. तब्बल चार-चार तास भारनियमन होत आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नाही. ट्रान्सफार्मर मिळाले तर त्यासाठी ऑईल मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे शेतीपिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असेही ते म्हणाले.राज्यातील हे सरकार अतिशय निष्क्रीय आहे. मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नासाठी पंकजा मुंडेंना उपोषण करावे लागले आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी भाजप राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. सरकारने आठवडाभरात जर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवले नाहीत. तर, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्‍यात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.

जम्मू-कश्मीर - जम्मू काश्मीरच्या पोलिसांना यश मिळाले आहे. लष्कर-ए-तोयबाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. १९ वर्षाचा दहशवादी शाझीद फारुख डारला जम्मू काश्मीर पोलिसांनी बारामुला येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या स्वयंभू प्रमुख कारी यासिरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय सैन्यासाठी हे मोठे यश होते. गेल्या वर्षी पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने याला तोडीस तोड उत्तर दिले आहे.
त्रालमध्ये झालेल्या चकमकीमध्ये ३ दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. कारी यासीर मागील वर्षी फेब्रुवारी (IED) स्फोट आणि लेथपोरा स्फोटात सामील होता. तो आयईडी तज्ज्ञ आहे आणि दहशतवाद्यांना भरती करण्यात तसेच पाकिस्तानमधून त्यांची वाहतूक करण्यात तो काम करतो.या गोळीबारात लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.

नांदेड - महाविकासआघाडी सरकारचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार फडणवीस यांनी घेतला.महाविकासआघाडी हा मल्टीस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा असल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते सोमवारी नांदेडमध्ये बोलत होते. 
अशोक चव्हाण यांनी आमचे सरकार म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा असल्याचे म्हटले होते. सुदैवाने आमचा सिनेमा सध्या बरा चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे, कुणालाही वाटले नव्हते की आम्ही एकत्र येऊ. पण हल्ली मल्टिस्टारर सिनेमाचा जमाना आहे. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असेही चव्हाण यांनी म्हटले होते. जनतेला मल्टीस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा पाहावा लागत आहे. तसेच सत्ता स्थापन करण्यापूर्वी सोनिया गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी कोणते पत्र लिहून दिले, याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी करावा, असे फडणवीस यांनी म्हटले. 
अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता. परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले. परंतु, त्यावेळी आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला होता. 

कॅलिफोर्निया - बास्केटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर, हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधले कुणीही वाचू शकले नाही. या अपघातात कोबीसह त्याची मुलगी आणि ९ जण असल्याची माहिती समोर आली आहे.आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने ५ स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या. कोबीने १८ वेळा 'एनबीए ऑल स्टार'चा किताब पटकावला होता. २०१६ कोबीने निवृत्ती जाहीर केली. २०१२ आणि २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी कोबीने दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.

औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषण करणार आहेत. औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे आज सोमवार २७ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे नेतेही उपोषणात सहभागी होणार आहेत.मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन छेडण्याचे संकेत दिले होते.मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचे आवाहन भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले होते. प्रीतम मुंडेंनी गेल्या आठवड्यात फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना साद घातली होती.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात आज सोमवार २७ जानेवारी मनसेची बैठक होणार आहे. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने ९ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या मोर्चाची दिशा यावेळी ठरवली जाणार आहे.मनसेच्या महाअधिवेशनानंतर पक्षात नवी उर्मी आलेली दिसत आहे. महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.
देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवे. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करत महाअधिवेशनाला सुरुवात केली होती. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे.

मुंबई - मुंबईत सुरू करण्यात आलेल्या नाईट लाईफचा पहिल्याच रात्रीत फज्जा उडाला आहे. नियोजनाअभावी घेतलेल्या निर्णयामुळे नाइट लाईफच्या निर्णयाची अंमलबाजवणी फसल्याचे पहिल्याच रात्रीत पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मॉल्स, मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते. तर गिरगाव चौपाटीसह इतर सहा ते सात ठिकाणी फूड ट्रक्स आणि रात्रभर खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र, काल रात्री गिरगाव चौपाटी पूर्णत: शांतच होती. मरिन ड्राईव्हवर नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी होती. परंतु रात्री दीड-दोननंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे इथलीही गर्दी हटवली. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले.
काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने 'नाईट लाईफ' योजनेला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागातील मॉल्स, हॉटेल आणि दुकाने रात्रीच्यावेळी सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुंबईत रात्रीच्यावेळी अनेक पर्यटक येतात. अशावेळी त्यांना खाण्यापासून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शहरात रात्रीच्यावेळी काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय आवश्यक होता. यामुळे रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.मात्र, भाजपने सुरुवातीपासूनच नाईट लाईफला विरोध केला आहे. 


मुंबई - २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोरेगाव येथे 'फॅम संघटना व भाकर फाऊंडेशन मुंबई' यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील असंघटित कामगारांच्या १०० मुलांना मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले या कार्यक्रमात असंघटित कामगारांचा मुलांनी परिवर्तनाची गाणी गायली आणि समान पाणी हक्क या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले त्याच बरोबर मान्यवरांसोबत अनेक सामाजिक क्षेत्रातील युवकांचा सत्कार करण्यात आले 
या कार्यक्रमात फॅम, भाकर फाउंडेशन, नशामुक्ती मंडळाचे पदाधिकारी, पालकवर्ग व बाल सभेचे सदस्य उपस्थित होते.अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला 
(बाल सभेतील सदस्यांची परवानगी घेऊन त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे)
मुंबई - देशभरात ७१वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शिवाजी पार्क मैदानात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. दिल्लीतील संचलनात सहभागी होऊ न शकणारा महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईच्या संचलनात सादर करण्यात आला.दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ७१ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ध्वजारोहण केले. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हे ध्वजारोहण करण्यात आले.

डिब्रूगड (आसाम) - प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसाममध्ये एकामागून एक चार बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिब्रूगडमध्ये दोन स्फोट घडले तर एक सोनारी येथे आणि दुसरा पोलीस स्टेशनजवळील दुलियाजन येथे घडला आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही. भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात हालहाल व्यक्त केली आहे. 
आसाममधील डिब्रूगडमधील राष्ट्रीय महामार्ग ३७ वरील दुकानाजवळ हा बॉम्बस्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी सांगितले की, 'आम्हाला दिब्रूगडमधील स्फोटांची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून यात कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.

नवी दिल्ली - देशभरात ७१वा प्रजासत्ताकदिन साजरा केला गेला.नवी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी २१ तोफांच्या सलामीसह तिरंग्याला सलामी दिली. 
७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युदध स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली वहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.

हैदराबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. हैदराबादमधील एका सभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना अकबरुद्दीन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जे लोक कागदपत्रे पाहण्यासाठी घरी येतील, त्यांना सांगा की, आम्ही या देशात ८०० वर्षे राज्य केले आहे. ही चारमिनार माझ्या वाडवडिलांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही, असे वक्तव्य अकबरुद्दीन यांनी केले आहे. अकबरुद्दीन आपल्या भाषणात म्हणाले की, कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. ते काय बोलतात ते मान्य करण्याचीही आपल्याला गरज नाही. मुसलमानांकडे काय आहे, असे जे लोक विचारतात, त्यांना मी सांगतो की तू माझी कागदपत्रे तपासू इच्छितो. मी ८०० वर्षापर्यंत या देशात राज्य केले आहे, शौर्य गाजवले आहे. 
हा देश माझा होता, माझा आहे आणि माझा राहील. माझे वडील आणि माझ्या आजोबांनी या देशाला चारमिनार दिली, कुतुबमिनार दिली, जामा मशीद दिली. या देशाचा पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतो, तो लाल किल्ला देखील आमच्याच पूर्वजांनी दिला आहे. जर कुणी तुमच्याकडे कागदपत्रे मागत असेल, तर त्याला स्पष्ट सांगा की, तू आमच्याकडे कागदपत्रे का मागत आहेस.. ती जी चारमिनार आहे ती माझ्या पूर्वजांनी बनवली आहे, तुझ्या बापाने नाही, असेही अकबरुद्दीन ओवेसी विधान केले आहे.

पुणे - CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNAच्या आधारावर NRC लागू करा, या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. २९ तारखेला देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.CAA, NRC हा कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नसून, तो एस.सी, एन.टी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजेच शीख, जैन, बुद्धिष्ट, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लीम यांच्या विरोधामध्ये आहे. आरएसएस प्रणित केंद्र सरकारद्वारे NRC केवळ मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे षड्यंत्र आहे, असा दावा बहूजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी भारताच्या मूळ रहिवासी लोकांनाच ७० वर्षांपूर्वींचा रहिवासी असल्याचा पुरावा मागितला जातो आहे. रहिवासी असलेल्या पुराव्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. तर जन्माची नोंद किंवा शैक्षणिक दाखला हेच ग्राह्य धरले जाणार आहे. असेही बहुजन क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

जळगाव - कंजारभाट जातपंचायतीच्या जाचास कंटाळून एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जळगावात घडली आहे. मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे (रा. कंजरवाडा, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. मानसीच्या आई-वडिलांनी २० वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यामुळे तिला कंजारभाट जातीत सामावून कुळ देण्यास जातपंचायतीच्या सदस्यांसह तिच्या आजोबांचा नकार होता. हा त्रास असह्य झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.मानसीचे वडील आनंद बागडे हे 'एमएसईबी'त नोकरीला आहेत. त्यांनी २० वर्षांपूर्वी बानो नामक महिलेशी आंतरधर्मीय विवाह केला होता. या दोघांना मानसी आणि काजल या मुली आहेत. मात्र, हा विवाह आनंद यांचे वडील दिनकर बागडे यांना मान्य नव्हता. ते कंजारभाट जातपंचायतीचे सरपंच असल्याने त्यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. म्हणून त्यांनी आनंद यांचा आधी विवाह झालेला असताना जातीतील दुसऱ्या महिलेशी विवाह लावून दिला होता. या विवाहानंतर आनंद हे बानो यांना सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते. दरम्यान, आता आनंद यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी मानसीचे लग्नाचे वय झाले होते. तिचा विवाह कंजारभाट समाजातील मुलाशी व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. याप्रश्नी मानसीचे काका विजय बागडे यांनी पुढाकार घेत तिच्यासाठी समाजातील कोल्हापूरचा मुलगा शोधला होता. परंतु, तिचे आजोबा दिनकर बागडे यांचा तिला जातीत घेऊन 'जातगंगा' देण्यास विरोध होता. आजोबांचा नकार असल्याने जातपंचायतीचा देखील या गोष्टीला विरोधच होता. या जाचाला कंटाळून अखेर मानसीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मानसीने आत्महत्या केल्यानंतर बागडे कुटुंबीय हादरले. त्यांनी तिचा मृत्यू मेंदूत ताप गेल्याने नैसर्गिकरित्या झाल्याचे दर्शवले. दूरवरचे नातेवाईक अंत्यसंस्काराला येणार असल्याचे सांगत हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह घरातच तब्बल १२ तास ठेवला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मात्र, या घटनेसंदर्भात माहिती देणारा फोन अज्ञात व्यक्तीने एमआयडीसी पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत मानसीचा अंत्यसंस्कार थांबवत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. त्यात तिचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे उघड होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

कोल्हापूर - विनाअनुदानित शिक्षक गेली वीस वर्षे सरकारकडून सकारात्मक निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या पाच वर्षात १०० अनुदान देण्याचे ठरले असताना सरकारकडून केवळ २० टक्के अनुदानावर बोळवण केली जाते. सरकारने कोणतेही कारण न सांगता विनाअट नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा एक फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येतील. राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, आनंदा वारंग, जनार्दन दिंडे, शिवाजी खापणे, सावता माळी, शिवाजी घाटगे, यशराज गाडे यांनी दिला आहे.

पुणे - राज्याचा कारभार राज्याने करावा आणि केंद्राचा कारभार केंद्राने करावा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल प्रकरणावर दिली. कारभार करत असताना काही चुकीचे घडले तर केंद्राने लक्ष द्यावे, असेही पवार म्हणाले.कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा त्यांचे मत मांडल्याचे अजित पवार म्हणाले. मात्र, राज्याचा कारभार राज्याने करावा आणि केंद्राचा कारभार केंद्राने करावा असेही पवार यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही चौकशी करणार होतो. माञ, केंद्राने हा तपास अचानक एनआयएकडे सोपवल्याचे अजित पवार म्हणाले.

कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे आणि दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचे काम सुरू होणार असून मुंबईतील एका कंपनीकडून नाममात्र मानधनावर हे ऑडिट करण्यात येणार आहे. 
स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजेच इमारत संरचना पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे. यातून मंदिराच्या बांधकामाची स्थिती, स्थिरता याबाबतची सद्यस्थिती समजणार आहे. विशेष म्हणजे अंबाबाईचे मंदिर सातव्या शतकातील असल्याचा उल्लेख आढळतो. ज्योतिबाचे मंदिर हे सतराव्या शतकात बांधले असल्याचा उल्लेख आढळतो. मंदिर संवर्धन करण्यासाठीही या अहवालाचा उपयोग होणार आहे. मंदिराची पडझड झालेला भाग आणि त्याची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. तसेच मंदिराच शिल्पसौंदर्याचे सुद्धा आता जतन होणार आहे

मुंबई - अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. आता चित्रपटाने २०० कोटींचा पल्ला पार करत नवा विक्रम केला आहे. 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने तान्हाजी चित्रपटाची कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. प्रदर्शनाच्या १४ दिवसांमध्ये चित्रपटाने १९२ कोटी २८ लाख रुपयांची विक्रमी कमाई केली होती. यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले. आता १५व्या दिवशी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘तान्हाजी’ हा यंदाच्या वर्षातील २०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट आहे.

मुंबई - या वर्षातील मोस्टअवेटेड चित्रपट ‘पृथ्वीराज’ आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार आणि माजी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. चित्रपटाची शूटिंग गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झाली आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पृथ्वीराजच्या पत्नीच्या भूमिकेत मानुषी छिल्लर दिसणार आहे. चित्रपटाची पहिली झलक सध्या समोर आली आहे. मानुषीने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या भूमिकेचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटो हा तिच्या सावलीचा फोटो आहे.हा चित्रपट एक ड्रामा आहे. तसेच राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून चौहान यांचा पराक्रम दाखवण्यात येणार आहे. 
चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय मानव विज, आशुतोष राणा आणि सोनू सूदही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याच्यावर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. विनय शर्मा याच्या वकिलांनी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी म्हटले की, विनय याला तिहार तुरूंगात विष देण्यात आले होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाने त्यावेळी आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप विनय शर्मा याच्या वकिलांनी केला. 
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तिहार तुरुंगात सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र, दोषींच्या वकिलांकडून कायदेशीर पळवाटांचा अवलंब करून फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. आतादेखील विनय शर्मा याच्या वकिलांकडून तसा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
विनय शर्मा याचे वकील एपी सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे की, तिहार जेल प्रशासनाने अद्याप दोषी पवन, अक्षय आणि विनय यांची कागदपत्रे दिली नाहीत. म्हणूनच, राष्ट्रपतींकडे क्यूरेटिव्ह याचिका आणि दया याचिका पाठविण्यास विलंब होत आहे. मात्र, फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोषीच्या वकिलांकडून वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी केला.यापूर्वी २०१६ मध्ये विनय शर्मा याने तिहार तुरुंगात फास लावून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. यापूर्वी त्याने झोपेच्या गोळ्यांचे सेवनही केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला होता. 

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एल्गार परिषद’ प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर केंद्राने हे प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग केलं. त्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेले नाही. त्यामुळे तपास होणे गरजेचे आहे. पण, त्यातून सत्य बाहेर येईल म्हणून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला,असा आरोप पवार यांनी केला आहे.
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेवत अनेका कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण कारवाईवर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पत्र दिले होते. त्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेऊन जा अशी टीका करणाऱ्या भाजपला राऊत यांनी जोरदार टोला लगावला. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती सईदला अयोध्येला घेऊन जावे अशी टीका त्यांनी केली. राम जन्मभुमीचा वाद मिटल्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची सुत्र हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाणार आहे. सरकारच्या १०० दिवसपूर्तीनिमित्त ते अयोध्येत भेट देणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

भिवंडी - समदनगर परिसरात असलेल्या मुलचंद कंपाउंमधील गोदामांना आग लागली असून यात दोन गोदामे जळून खाक झाली आहेत. आग एव्हडी भयानक होती कि,सहा तासांपासून अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न करत होते. या आगीत मालमत्तेची हानी झाली असली, तरी कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही.ही आग नेमकी कशामुळे लागली या बाबतचे कारण अस्पष्ट आहे. या गोदामांच्या आसपास घरे असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, या गोदामांच्या जवळच वस्ती असल्याने या आगीबाबत स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्री ही आग लागल्यानंतर गोदामांजवळील नागरिकांनी घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घेतला. विशेषत: परिसरातील मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२४ विदेशी नागरिकांवर पारपत्र विभागाने कारवाई केली आहे. २०१८ ते २०१९ या काळात या परकीय नागरिकांनी घुसखोरी केली असून त्यात ५४ नागरिक आफ्रिका खंडातील, ७० नागरिक बांगलादेशी व उर्वरित विविध आठ देशांतील आहेत.नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी आणि नायझेरियन नागरिकांचा वावर दिसून येतो. खास करून बोनकोडे, कोपरी आणि कोपरखैरणे गावाठाण भागांत त्यांचे प्रमाण जास्त आहे. दुप्पटतिप्पट भाडय़ाच्या लालसेपोटी घरमालकही त्यांना ठेवत होते. दरम्यान, या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने याच कारणाने विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी ठोस कारवाई केली.खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांच्या पथकाने केली. पारपत्र विभागाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी दिल्ली मुख्यालयाकडे करण्यात आली आहे.बोनकोडे गावात तर एकाच सदनिकेत ५५ नायझेरियन पुरुष महिलांनी मद्य प्राशन करून परिसरात गोंधळ घातला होता. त्यांना अडवणाऱ्या पोलिसांनाही त्यांनी मारहाण करून पळ काढला होता. या घटनेनंतर या विदेशींना बोनकोडेतही घर भाडय़ाने देणे बंद झाले. त्यामुळे या लोकांनी आता आपला मोर्चा पनवेल, खारघर परिसरांत वळवला आहे. बांगलादेशी नागरिक स्वस्तात मजुरी तर महिला घरकाम करण्याचे प्रमाण जास्त आहे.नायझेरियन किवा अन्य आफ्रिका खंडातील नागरिक हे ऑनलाइन फसवणूक आणि अमली पदार्थ वितरण करीत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले होते. पर्यटन, नोकरी व शिक्षणाच्या व्हिसावर येऊन ते देशात शिरकाव करतात. मात्र त्यानंतर ते गैरमार्गाला लागतात. 


ठाणे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. यामुळे प्रवीण दरेकर यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत कार्यक्रमाला जावे लागले.त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी काय असते ते नेते मंडळींना चांगलेच कळाले असेल.दिवा येथे पूर्व नियोजित कार्यक्रमाकरता प्रवीण दरेकर निघाले होते. मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंब्रा बायपास ते दिवा असा प्रवास दरेकर यांना करायचा होता. मुंबई ते ठाणे ते आपल्या ताफ्या सहित विरोधी पक्ष नेते ठाण्यात आले मात्र आधीच मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला होता. त्यात ठाण्यात भाजपा आमदार आणि नेते मंडळी त्यांच्या स्वागताकरता उभे होते. प्रवीण दरेकर हे नेते मंडळींजवळ पोहोचताच ठाणे ते दिवा मोठी वाहतूक कोंडी असल्याचे ठाण्यातील भाजप नेत्यांनी सांगितल्यावर शेवटी लोकल ट्रेनने जाण्याशिवाय दुसरा पर्याय भाजप नेत्यांना दिसत नव्हता. पण रात्रीची वेळ चाकरमानी मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासावर असतील, हे दरेकरांच्या लक्षात आले. पण पर्याय नसल्याने शेवटी प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आपल्या नेते मंडळींसह धीम्या लोकलने गर्दीने भरलेल्या ट्रेनने दिव्याकडे निघाले.

मिरा रोड - 'दिल तो हॅप्पी है जी' या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्मा हिने आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. सेजलने आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीमधून स्पष्ट झाले.मिरा रोड पूर्व येथील रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये सेजल आपल्या मैत्रिणीसह राहत होती. सेजल काम करत असलेली "दिल तो हॅप्पी है जी" ही मालिका ऑगस्ट २०१९पासून बंद झाली होती. त्यानंतर ती कामाच्या शोधात होती. मात्र दीड महिन्यांपासून काम मिळत नसल्याने ती निराशेच्या गर्तेत सापडली होती. यातूनच तिने हे पाऊल उचलले. मी नैराश्यापोटी आत्महत्या करत असून त्याकरिता कोणालाही जबाबदार धरू नये, असे तिने आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीमध्ये लिहिले होते.याबाबत माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबई - समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिल्याने अबू आझमी आक्रमक झाले आहेत.राज ठाकरे कोण आहेत? मनसेचा अवघा एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने एवढे मोठे केले आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही, असे अबू आझमी म्हणाले.मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे आमदार त्रस्त आहेत, त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असे अबू आझमी म्हणाले.
राज ठाकरे आता भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असे म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीका केली.शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा मनसे प्रयत्न करीत आहे. सरकार स्वतः पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम करत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असंही अबू आझमींनी स्पष्ट केले.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget