February 2020

मुंबई - एका सच्चा कलाकाराला त्याच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य जगासमोर दाखवण्यासाठी एका माध्यमाची आणि पाठिंब्याची गरज असते. नावातच मंगल असलेल्या ‘मंगली’ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. मंगलीचे मूळ नाव सत्यवती मुडावत, जन्म आंध्रप्रदेश सध्या तेलंगना राज्यातला. जन्मापासूनच स्वत:च्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठीचा मंगलीचा संघर्ष ते टॉलीवूडमधील सप्तगिरी, शैलेजा रेडी अल्लुडू, राज महाल, निधी नाडीओके कथा व अला वैकुंठरमल्ले (२०१९) या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील रामुलो रामला या गाण्याला मिळालेले तब्बल २०० मिलिअन व्ह्युजच्या रुपातून मिळालेले यश... असा हा मंगलीचा यशाच्या मार्गाकडे होणारा प्रवास आता लवकरच आणखी एका नव्या आणि वेगळ्या वळणावर येणार आहे. 
अनेकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणारी मंगली ही अप्रतिम गायिका तर आहेच पण त्याचबरोबर ती सुंदर अभिनेत्री देखील आहे. आणि आता ती लवकरच मराठी सिनेमा पदार्पण करणार आहे. श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटात मंगली आपल्या गोड आवाजाचा आणि अभिनयाचा ठसा उमटवणार आहे. ‘कती तू बंजारा’ या गाण्यामार्फत मंगली आपला मराठमोळा प्रवास सुरु करत आहे. मंगलीचा मधयुक्त स्वर, गोर बंजारा समाजातील सिंधू संस्कृतीची झलक व बॉलिवूडचे सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शक विष्णु देवा ‘कती तू बंजारा’ हे गाणे नक्कीच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात निवास करेल यात शंका नाही. 
आता मंगलीची गायन आणि अभिनय कला श्री. संजीवकुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

मुंबई - बोनस हा शब्द एक वेगळाच आनंद देऊन जातो. मग तो बोनस पैशांचा असो किंवा सुखाचा. बोनस मिळाला तर खुशी नाही मिळाला तर नाराजी अशी ही मिक्स भावना प्रत्येकाची असते.आता फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांना मराठी सिनेसृष्टीतला बोनस अनुभवयाला मिळणार आहे. म्हणजेच लायन क्राऊन एंटरटेनमेंट आणि जीसिम्स यांची प्रस्तुती असलेला, गोविंद उभे, एन. अनुपमा, कांचन पाटील निर्मित आणि युवा दिग्दर्शक सौरभ भावे दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात टॉल अँड हँडसम अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुंदर, प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री पूजा सावंत या कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 
निर्माता म्हणून सिनेमाचा विषय निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार खास करुन सर्वप्रथम करता याचे उत्तर देताना गोविंद उभे यांनी म्हटले की, "निर्माता म्हणून जेव्हा सिनेमाची निवड करायची असते तेव्हा सिनेमाची गोष्ट निवडताना किंवा ‘आपण हा सिनेमा करायचाच’ असा होकार देण्यापूर्वी मी खास करुन काही ठराविक गोष्टींचा विचार करतो आणि तो विचार म्हणजे प्रेक्षकांची चॉईज. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जर मी सिनेमाची निर्मिती करतोय तर त्यांचे निखळ मनोरंजन हे झालेच पाहिजे... ‘बोनस’ची कथा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी ती ऐकली, समजून घेतली आणि मला ती आवडली देखील. या सिनेमाला होकार देताना हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री मला तेव्हा होती आणि अजूनही आहे. सिनेमाचा विषय चांगला आहे आणि कथेसह एक महत्त्वाचा संदेश यातून प्रेक्षकांना मिळेल." 
या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे, तसेच दिग्दर्शन सौरभ भावे आणि छायाचित्रण संजय मेमाणे यांचं आहे... यांच्या विषयी सांगताना त्यांनी म्हटले की, "माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक सौरभ भावे हा उत्तम कथा आणि पटकथा लेखक आहे, या सिनेमाच्या निमित्ताने लिखाणासह त्याचे दिग्दर्शन कौशल्य देखील आता मराठी सिनेसृष्टीला पाहायला मिळेल. यंग दिग्दर्शक, यंग जोडी, यामुळे सिनेमात नाविन्य आणि एक वेगळी कथा पाहायला मिळेल. गश्मीर आणि पूजा हे दोघेही हुशार, समंजस आणि उत्तम कलाकार आहेत, नव्या जोडीची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल... छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली, त्यांची कामं मी पहिली आहे, त्यांची प्रत्येक फ्रेम ही अचूक आणि खूप काही व्यक्त करणारी असते . मला सांगायला आनंद होतोय की 'बोनस'मध्ये त्यांचा मोठा हातभार आहे." 
सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांचा आधीपासूनच आवडीचा विषय. ते कॉलेजमध्ये होते तेव्हा पासून सिनेमाची निर्मिती करायची हे त्यांचं पॅशन होतं. निर्माता बनणं आणि प्रेक्षकांना रुचतील, पटतील असे विषय आणणं ही त्यांची इच्छा कायम असायची आणि आता ती पूर्ण देखील झाली आहे. "आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर काम केलं तर मनाला समाधान वाटतं. निर्माताच्या जबाबदा-या म्हणाव्या तर सिनेमाचे कथा लेखणाची प्रक्रिया ते सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्याला अनेक जबाबदा-या असतात, जे त्याला अगदी शांतपणे आणि समजंसपणाने सांभाळाव्या लागतात", असे देखील त्यांनी म्हंटले आहे. 
महाराष्ट्राची आवडती संगीतकार जोडी 'रोहन-रोहन' यांनी 'बोनस'ला संगीत दिले आहे आणि नुकतेच त्यांचे रॅप साँगही रिलीझ झाले आहे... संगीतकार रोहन प्रधान आणि रोहन गोखले या म्युझिकल जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ‘व्हेंटिलेटर’ मधील गाण्यांच्या माध्यमातून... त्यांच्या विषयी बोलताना गोविंद यांनी म्हटले की, "त्यांनी तयार केलेलं गणपतीचं गाणं ‘या रे या’ आणि ‘बाबा’ हे वडीलांवरचे गाणे... ही दोन्ही गाणी मला प्रचंड आवडली आणि ती मनाला भावली देखील. तेव्हाच ठरवलं की या माझ्या सिनेमाला संगीत हीच जोडी देणार. नुकतंच 'बोनस' मधील 'माईक दे' हे रॅप साँग रिलीझ झाले आहे आणि त्याला पसंती देखील मिळाली आहे.... व्हॅलेंनटाईन डे स्पेशल गाणे देखील तयार करण्यात आले आहे जे लवकरच प्रदर्शित होईल." 
सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांच्या फार जवळचा विषय असल्यामुळे 'बोनस' नंतर ते लवकरच आणखी एक मराठी सिनेमा घेऊन येणार आहेत.

ठाणे - महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर बदली करण्याच्या विनंती अर्जासह दीर्घ रजेवर जाण्याची परवानगी जयस्वाल यांनी मुख्य सचिवांकडे मागितली.संजीव जयस्वाल हे मागील पाच वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे सत्ताधारी, विरोधकांसह अनेकांसोबतचे वाद ठाण्यात पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजनंतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. 'आयुक्तांनी बदलीबाबत अर्ज केला असून दीर्घ सुट्टीची मागणी केली आहे. यादरम्यान त्यांनी कामाचा भार कुठल्याही अधिकाऱ्यावर सोपवला नाही' अशी माहिती यावेळी सभागृहात पालिका प्रशासनाने दिली.ठाणे महापालिका आयुक्तपदाच्या नियुक्तीपासूनच त्यांच्यावर रोष होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. त्यांच्या वादग्रस्त वागण्यामुळे ठाण्यात अनेकदा वाद निर्माण झाला होता. कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याची एवढी मोठी कारकीर्द ठाण्याला कधीही पाहायला मिळाली नव्हती. एकूणच महाराष्ट्रातदेखील एकाच ठिकाणी कार्यरत राहण्याचा पाच वर्षांचा विक्रम संजीव जयस्वाल यांनी मोडून काढला. 


ठाणे - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायबंदी असलेला कैदी चालू गाडीत पोलीस हवालदारावर थुंकल्याचा प्रकार घडला आहे. तसेच या कैद्याने हवालदाराला लाथ मारली आणि त्याच्या करंगळीला चावून जखमीही केले आहे.ठाण्यातील मोहम्मद अंसारी म्हणून न्यायबंदी असलेल्या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टात नेले होते. तिथून परत येताना या कैद्याने पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याचा हा प्रकार घडला. नातेवाईंकांनी आणलेले जेवण देण्यास मनाई केल्याने कैदीने हा घृणास्पद प्रकार केल्याचे बोलले जात आहे.पोलिसांच्या अपमान करणारी ही घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. रक्षणकर्त्या पोलिसांना एखाद्या कैद्याकडून अशी वागणूक दिली जात असेल तर सर्वसामान्यांचं काय?, असा सवाल केला जात आहे.

अंबरनाथ - येथील शिव मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाच्या निधीतून १५ कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर मंदिराचा कायापालट करण्यासाठी हातभार लावण्याचे आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी दिले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित पाचव्या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये शिव मंदिराचा कायापालट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सादरीकरण केले. 
यावेळी पूर्वेकडील शिवाजी चौकापासून शिवमंदिर रस्ता नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्वामी समर्थ चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत आकर्षत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्राचीन शिवमंदिर परिसर रोषणाई बरोबरच विविघ रंगी पडदे लावून सजविण्यात आला होता. 


ठाणे - राजधानी दिल्लीमध्ये जी हिंसा झाली, त्यात ३८ जणांचा बळी गेला आहे. या हिंसेला भाजप नेते परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा आणि एमआयएमचे वारिस पठाण जबाबदार असून त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हे घडले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यामुळे या चौघांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजप नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांच्यासह अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. तर एमआयएचे नेते वारिस पठाण यांनी १५ कोटी मुस्लीम १०० कोटींना भारी पडतील, असे विधान केले होते. या विधानांमुळेच दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.त्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मानवी साखळी धरुन निदर्शने करण्यात आली. यावेळी परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करा. हिंसा नको, शांतता हवी अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी प्रसारमाध्यमांशी शानू पठाण यांनी; परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारीस पठाण यांच्यासारख्या लोकांमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच येथील मुस्लीम हा देशप्रेमी आहे. मात्र हे लोक त्यांना बदनाम करत असल्याचे म्हटले आहे.परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. मात्र, गुन्हे दाखल करण्याऐवजी आदेश देणार्‍या न्यायाधीशांचीच बदली केली जात आहे. ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही, असा इशाराही पठाण यांनी यावेळी दिला. या आंदोलनात नगरसेवक अशरफ शानू पठान, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, सामान्य नागरिक सहभागी झाले होते.

नवी मुंबई - महानगरपालिका निवडणूक जवळ येत असतानाच शिवसेनेचे नेते व महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात आहे. महापालिका विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र वडार संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले यांना ५० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. तसेच विजय चौगुले यांचे काही महिलांसोबत आक्षेपार्ह फोटो असून ५० लाख रुपये न दिल्यास ते फोटोही समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. मात्र, विजय चौगुले यांनी कोणत्याही महिलेसोबत आक्षेपार्ह फोटो असल्याचे नाकारले आहे. तसेच संबंधित प्रकार हा राजकीय विरोधकांच्या माध्यमातून होत असल्याचे म्हटले आहे. या घटनेसंदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत

मुंबई - पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित आरोपीने चक्क पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीतून उडी मारून पलायन केले आहे. इम्रान उर्फ इमू सैफुला खान असे या आरोपीचे नाव आहे.शनिवारी सकाळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस गोवंडी, शिवाजी नगर भागात गस्त घालत असताना पोलिसांना पटलावरील आरोपी असलेला इम्रान संशयितरित्या विभागात फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि हातकड्या घालून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणले. परंतु, त्यानंतर इम्रानने पोलिसांना टॉयलेटला जायचे आहे, असे सांगून आरोपीने चक्क शौचालयामधील खिडकीतून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत पलायन केले.

मुंबई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची घोषणा करण्यात आली आहे.शनिवार २९ फेब्रुवारीला संजय बर्वे निवृत्त झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर परम वीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परम बीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता ते मानाच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेत आहेत. परम बीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे हे महत्त्वाचे पद पोलीस महासंचालक दर्जाचेच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट आहे. 
संजय बर्वे यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते? मुंबईचे पोलीस आयुक्तपद कोणाला मिळणार? याची मोठी उत्सुकता होती. अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.संजय बर्वे शनिवारी सेवा निवृत्त झाले. मुंबई पोलीस पथकाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नायगाव मैदानात त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडला.

मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठीची सोडत १ मार्चला सकाळी ११ वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत असेल.या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहतील. मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत ७२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) येथे २६३० सदनिका आणि लोअर परळ येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौरस फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे.२०१० मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गिरणी कामगारांकडून एकू ण १ लाख १० हजार ३२३ अर्ज प्राप्त झाले. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून २०११ मध्ये पुन्हा गिरणी कामगार वारसांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार ३८ हजार ३८८ अर्ज प्राप्त झाले.या दोन्ही मोहिमांतर्गत सहभागी न होऊ शकलेल्या अर्जदारांना समाविष्ट करून घेण्याकरता सन २०१७ मध्ये पुन्हा माहिती संकलन मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारे एकू ण १ लाख ७४ हजार ३६ अर्ज गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत. 
यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ६ हजार ९२५ सदनिकांची संगणकीय सोडत २८ जून, २०१३ रोजी काढण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यांतर्गत २६३४ सदनिकांची सोडत ९ जून, २०१६ रोजी काढण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यांतर्गत एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत (रेंटल हौसिंग स्कीम) प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील (१६० चौ फुटांच्या दोन सदनिका मिळून एक) अशा २ हजार ६३४ जोड सदनिकांची सोडत २ डिसेंबर, २०१६ मध्ये काढण्यात आली. अशा प्रकारे अद्यापपर्यंत मुंबई मंडळातर्फे एकूण ११ हजार ९७६ सदनिकांपैकी ८ हजार ४९० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.

चीनमधून पसरत चाललेल्या करोना व्हायरसमुळे चीनसहित आजूबाजूच्या देशामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.जागतिक महासत्ता होण्याची घाई असलेला चीन अस्वस्थ झाला असून,‘कोरोना’ व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कित्येक हजार नागरिकांचे यात बळी गेले असून,हजारो लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.‘कोरोना’ व्हायरस आणि नव्याने उद्भवलेल्या बर्ड फ्लू’मुळे चीन अस्तव्यस्त होताना दिसत आहे यासर्व वातावरणातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चीनपुढे आहे. चीनमध्ये पहिल्यांदा आढळून आलेला ‘कोरोना’ व्हायरस आता जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाय पसरू लागला आहे. ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग जगभरात इतरही देशांमध्ये पसरत असल्याने जगभरातल्या नागरी जीवनावर ‘कोरोना’ विषाणू परिणामकारक ठरत आहे. त्याचबरोबर जगभरातल्या देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.‘कोरोना’ व्हायरसचा चीनच्या विकासावर परिणाम झाला असून अन्य देशांच्या आर्थिक प्रगतीवरही मर्यादा येऊ शकतात, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने दिला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आहे. सध्या जगभरातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देणारी चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या परिणामामुळे चिनी अर्थव्यवस्था अपेक्षित विकासदर गाठू न शकल्यास जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन मंदीसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.कोरोना’ व्हायरसचा चिनी शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे.चीनच्या शेंजेन आणि शांघाय स्टॉक मार्केटमध्ये ३.५२ आणि २.७५ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. ‘कोरोना’ व्हायरसमुळे चीनचा विकास दर एक टक्क्याने घटू शकतो. अर्थव्यवस्थेचे ९.६६ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. ‘कोरोना’ व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे सरकारने नववर्षाची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली. जपानमधल्या कार निर्मिती करणाऱ्या टोयोटा कंपनीने चीनमध्ये सद्यस्थितीत असणारे सर्व प्रकल्प काही काळ बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. चीनमध्ये असलेल्या जपानी, कोरियन तसेच अन्य अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. अमेरिकेसह जगभरच्या विमान कंपन्यांनी चीनमधील उड्डाणे रद्द केली आहेत. चीनमध्ये पर्यटनाला जाण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आले आहे. वुहानसारख्या शहराची आणि त्या भागाची ओळख वैद्यकीय शिक्षणाचे हब म्हणून आहे. त्याच भागात आता कोरोना व्हायरस पसरला असल्यामुळे तिथे गेलेले विद्यार्थी परत आले आहेत.संपूर्ण चीनमध्येच आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना विषाणूंमुळे चीनच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.दक्षिण कोरियात‘कोरोना’ची लागण झाली आहे. चीननंतर सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियामध्ये आढळले आहेत. मागील काही दिवसांत दक्षिण कोरियात ‘कोरोना’च्या रुग्णांत अचानक वाढ झाली आहे. ‘कोरोना’बाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तेथील शहरातील व्यवहार ठप्प पडले आहेत. चीनमध्ये ‘कोरोना’ने हाहाकार माजवल्यानंतर दक्षिण कोरियातही ‘कोरोना’चा फैलाव झाला आहे. युरोपियन देशांनीही ‘कोरोना’चा धसका घेतला आहे. इटलीमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. ‘कोरोना’ संक्रमित विभागात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.अशा प्रकारे कित्येक देशात हा वाहायर्स पसरतंच जात असल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. एकंदरच महासत्ता बनण्याच्या अट्टहासापायी विविध प्रयोगांचे गिनीपिक करण्याचा सपाटा लावलेल्या चीनला चांगलेच अडचणीत आणले आहे.परंतु आजू बाजूच्या देशांनाही याचा फटका बसला आहे.या सर्व गंभीर परिस्थितीतून बाहेर कसे पडावे हेच चीनसह संपूर्ण जगाचे उद्दिष्ट आहे.

मुंबई - दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी गोरेगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त 'भाकर फाऊंडेशन मुंबई' व 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने असंघटित कामगारांच्या मुलांसोबत विज्ञान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सोनावणे यांनी सर्वांचे स्वागत केले व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दहिसर विभागाचे निशा ताई व यश दादा यांनी मुलांना चमत्कार बुवाबाजी यांचे हात चलाकीचे प्रयोग आणि विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात भाकर फाउंडेशन मुंबईचे प्रतिनिधी व बाल सभेचे सदस्य उपस्थित होते 
मुंबई - राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. बिघाडीचे सरकार चालवण्यापेक्षा सक्षम पर्याय म्हणून दोन्ही पक्षाने पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा पुनरुच्चार केला.मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला अडचणीत आणत आहे. यातून सेनेने बोध घ्यावा. भाजपचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी हे सरकार ११ दिवसात पडेल असा दावा केला होता. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आठवले म्हणाले की, ११ दिवसात सरकार काही पडले नाही, पण पुढे किती दिवस चालेल हे ही सध्या सांगता येणार नाही.

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले आहेत. मुंबई पोलीस पथकाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नायगाव मैदानात त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडत आहे. त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते, मुंबईचे पोलीस आयुक्तपद कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले होते.नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची जय्यत तयारी झाली असून आज सकाळी ८ वाजता बर्वे यांना पोलीस मुख्य़ालयात अधिकाऱ्यांतर्फे समारंभपूर्वक निरोप दिला.मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते. अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेले सदानंद दाते आता महाराष्ट्रात परतले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतंही पद नाही. दाते आयुक्तपदाच्या शर्यतीतील डार्क हॉर्स ठरू शकतात.

मुंबई - येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेत दिली.ही चळवळ बनवली पाहिजेविधानपरिषदेते बोलताना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण चळवळ बनवली पाहिजे. हे जर आपण केले तर आपण फक्त राज्यातच नाहीतर देशात बदल घडवू शकतो असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - मुंबईत शातंता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्च २०२० पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच, जमाव करण्यास तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलीसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे.

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचाराने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा जीव घेतला. राजधानी दिल्लीतील जीवन आता हळूहळू पूर्वस्थितीत येत आहेत वाहने बाहेर येत आहेत. बाजारात हालचाली पाहायला मिळत आहेत. हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे.हिंसाचाराचे आणखी प्रकार थांबवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळी हिंसाग्रस्त भागात गस्त घातली. मौजपूर, करावल नगर, भजनपुरा, सीलमपूर आणि झफरबाद अशा भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ईशान्य दिल्लीतील या हिंसाचारात २०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ईशान्य दिल्लीतील या हिंसाचारात १२३ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ६३० लोकांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात अमन समितीची बैठक घेत आहेत. सोशल मीडियावर या मेसेजवर पोलिसांचे लक्ष आहे. खोटे आणि अफवा पसरवणारे मेसेज पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतआहे.

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ३ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, २८ फेब्रुवारीला संजय बर्वे यांचा कार्यकाळ संपत असून महाविकास आघाडी आता मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाला पसंती देते, हे पाहण्यासारखे असणार आहे. माहितीनुसार ठाकरे सरकार मुंबई पोलीस आयुक्तपदी एक मराठी अधिकारी आणण्याचे ठरवत असून यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचेही नाव आता पुढे आले आहे.सदानंद दाते यांनी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी सामना केला होता. ज्यात ते स्वतः हॅन्ड ग्रेनेडच्या हल्ल्यात जखमी झाले होते. मुंबई पोलीस आयुक्तपद हे मानाचे मानले जाते. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला त्याच्या कारकीर्दीत या पदावर काम करायला मिळावे, अशी इच्छा असते. मुंबई पोलीस आयुक्त कोण होणार? याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे. तर, सेवा ज्येष्ठतेनुसार अनेक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या रेसमध्ये आहेत.संजय पांडे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी असून आयआयटीत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. शिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पांडे हेच मुंबई पोलीस आयुक्त पदाकरता अग्रस्थानी आहेत. याआधीच्या सर्व सरकारांनी पांडे यांना नेहमी डावलले गेले आहे. पांडे यांनी सर्व महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तर, याही सरकारशी पांडे यांची जवळीक नसल्याने ते मुंबई पोलीस आयुक्तपदी विराजमान होतील असे दिसत नाही.परमबीर सिंग - परमबीर सिंग हे १९८७ बॅचचे आयपीएस आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्याने सिंग यांची वर्णी मुंबई पोलीस आयुक्तपदी लागण्याची दाट शक्यता आहे.रश्मी शुक्ला - पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार तसेच विविध मोठी पदे भुषवलेल्या रश्मी शुक्ला या एकमेव महिला अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला आयपीस म्हणून त्यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता होती. मात्र, महाराष्ट्र बँक प्रकरणामुळे शुक्ला यांनी राज्यातील सरकारची नव्हे तर केंद्र सरकारची देखील नाराजी ओढवून घेतली होती. शिवाय त्यांची या सरकारशी जवळीकही नसल्याने त्यांचा याही वेळेस पत्ता कट होणार आहे. या सर्वांव्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार १९८६ बॅचचे एसपी यादव, संजय पांडे, १९८७ बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी. कनकरत्नम, हेमंत नगराळे, १९८८ बॅचचे रजनीश शेठ, के. व्यंकटेशम यांनाही मुंबई पोलीस आयुक्तपदाची अपेक्षा आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाने पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती कळवणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्यानंतर आता ‘मातोश्री’च्या बाहेरही पोस्टर लावण्यात आले आहे. वांद्रे पूर्व भागातही मनसेने घुसखोरांची माहिती देणाऱ्यांसाठी पारितोषिकाची घोषणा केली. मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रेंनी पोस्टर लावले आहे.‘घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललेच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्याला रोख ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव या संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल’ असे मनसेच्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
याआधीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली होती. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असे आवाहन मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केले होते.बांगलादेशींचा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आज तो मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे रेटून पुढे नेत आहेत. आपण गेली दहा वर्ष मनसेचा ट्रॅक पाहिला, तर मनसे कायम अशा गोष्टींविरोधात प्रखरपणे उभी राहिली”, असे अखिल चित्रे म्हणाले होते.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना मनसेच्या औरंगाबाद विभागाकडून २७ फेब्रुवारी रोजी बक्षीस जाहीर करण्यात आले होते. माहिती देणाऱ्या व्यक्तींना पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे.

नवी दिल्ली - आपचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्याचा आरोप असून त्यांच्यावर दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाने ताहीर यांची सदस्यपदावरून हकालपट्टी केली आहे.ताहीर हुसेन यांच्या घरावरून २५ फेब्रुवारीला दंगलखोरांनी दगडफेक केली होती, असा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच हुसेन यांच्या घराच्या छताचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, आणि मोठे दगड आढळून आले. दरम्यान, ताहीर हुसेन यांनी आरोपांचे खंडन केले आहे. हिंसाचारावेळी मी घरामध्ये उपस्थित नव्हतो, असे त्यांनी म्हटलं आहे.गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येत ताहीर हुसेन यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताहीर हुसेन यांच्या इमारतीतील लोकांनी दगडफेक केल्याने आपला मुलगा ठार झाला असल्याचे अंकित शर्मा यांच्या वडिलांनी म्हटले आहे. मात्र, ताहीर हुसेन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला बदनाम करण्यासाठी हा सर्व कट रचला असल्याचेही ते म्हणाले.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत..

मुंबई - शेअर बाजार खुला होतानाच सेन्सेक्स निर्देशांक तब्बल एक हजार अंशांनी घसरला आहे. सध्या निर्देशांक ३८ हजारावर पोहोचला आहे. तर, निफ्टीमध्येही ३१२ अंशांची घसरून होऊन निर्देशांक ११ हजारावर स्थिरावला आहे.जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण आहे. आज विक्रीचे सत्र सुरू राहिल्यामुळे सकाळी शेअर बाजार उघडताच १,०८३.८५ अंशांनी घसरून ३८,६६१.८१ पोहोचला. तर, निफ्टी ३१२ अंशांनी घसरून ११,३२१.३० वर पोहोचला. तसेच रुपयामध्येही ३३ पैशांची घसरण झाली आहे.

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजना 'एसआरए’ कायद्यात मोठा बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. फ्लॅटधारकांना आता पाच वर्षांतच आपला फ्लॅट विक्रीला काढण्याची मुभा मिळणार आहे. हजारो फ्लॅटधारकांनी नियम धाब्यावर बसल्यानंतर गृहनिर्माण मंत्रालय नियम शिथील करण्याची शक्यता आहे.सध्याच्या कायद्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मिळालेले घर धारकांना १० वर्षांपर्यंत विकता येत नव्हते. परंतु तब्बल १३ हजार फ्लॅटधारकांनी हा नियम मोडत घरं अनधिकृतपणे विकली होती. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी चक्क बक्षिसी देण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात याबाबत संकेत दिले असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.एसआरए सदनिकांच्या विक्री आणि खरेदी संदर्भातील धोरण तपासण्यासाठी २०१७ मध्ये मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे उपसमितीचे अध्यक्ष होते. आता आव्हाडांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या उपसमितीने गेल्या वर्षाच्या अखेरीसच आपला अहवाल सादर केला होता.
२०११ पूर्वी बांधलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी झोपडपट्टी पुनर्वसन योजना अर्थात ‘एसआरए’अंतर्गत विनाशुल्क घर मिळवण्यास पात्र ठरतात. परंतु १० वर्षांच्या कालावधीत सदनिकाधारक आपला फ्लॅट विकू शकत नाहीत, किंवा भाड्यानेही देऊ शकत नाहीत. अन्यथा राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या समान किंवा एक लाख रुपये (जे अधिक असेल तितकी) रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे.
गृहनिर्माण विभागाच्या नोंदीनुसार, मुंबईतील एसआरए फ्लॅटच्या १३ हजार मालकांनी नियम मोडित काढला. २०११ ते २०१७ या कालावधीत त्यांनी आपली मालमत्ता विकली. त्यामुळे नवीन निर्णय काहीही असला, तरी आतापर्यंत नियम मोडलेल्या फ्लॅटधारकांना रेडी रेकनर दराच्या १० टक्के दराने राज्य सरकारला दंड द्यावा लागणार आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांनाच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दिल्लीत धुमसणाऱ्या दंगलीविषयी ६ वायरलेस संदेश मिळाले होते. मात्र हे संदेश मिळाल्यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कॉग्रेसच्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.रविवारी हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांना ६ अलर्ट मिळाले होते. यामध्ये दिल्लीत हिंसाचार घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार योग्य ती तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र पोलीस वेळेत कारवाई करु शकले नसल्याचे वृत्त आहे. स्पेशल ब्रांच आणि Intelligence Wing यांनी वायरलेस रेडिओ मॅसेजच्या माध्यमातून दंगलीचे अलर्ट पाठविले होते. भाजपचे कपिल मिश्रा यांनी उत्तर पूर्व दिल्लीत CAA ला पाठिंबा देण्यासाठी मौजपूर चौक येथे जमण्याचे आवाहन केलं होते. साधारण दुपारी १-२२  वाजता मिश्रा यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना दुपारी 3 वाजता मौजपूर चौक येथे जमण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार Intelligence Wing ने लोकल पोलिसांना या भागातील सुरक्षा वाढविण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोक विविध भागांमध्ये जमू लागले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना दिलेल्या अलर्टकडे दुर्लक्ष करीत हलगर्जीपणा केला. याबाबत एका पोलिसांनी नाव न देता सांगितले की अलर्ट मिळाल्यानंतर पोलिसांकडून नियंत्रण आणण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले होते.
रविवारी मिश्रा जाफराबाद येथे पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले, 'दिल्ली पोलिसांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यांना जाफराबाद आणि चंद बगचे रस्ते रिकामे करावेत. यानंतर आम्हाला समजावू नका. आम्ही तुमचे देखील ऐकणार नाही. फक्त तीन दिवस'. यानंतर मिश्रा यांनी ५ -११ मिनिटांनी पुन्हा ट्विट केले. मिश्रा यांनी सांगितल्यानुसार CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी चांद बागचा रस्ता अडवला होता. त्यांनी दोन मुख्य रस्ते अडवले होते. त्यामुळे तब्बल ३५ लाख नागरिकांना प्रवास करण्यात अडथळा येत होता. शिवाय मुलांना शाळेत जाता येत नसल्याचे ते म्हणाले.

दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत १०६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे.दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी १८ FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात ५६ पोलिसांसह २०० जण जखमी असल्याचे कळते.. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना विषाणूचे केंद्रस्थान बनलेल्या वुहानमध्ये अडकलेल्या ११२ जणांना घेऊन वायूसेनेचे विशेष विमान परतले आहे. या सी-१७ ग्लोबमास्टर विमानातून भारतात आलेल्यांमध्ये ७६ भारतीयांचा आणि वेगवेगळ्या सात देशांतील ३६ नागरिकांचा समावेश आहे.भारतीय वायूसेनेचे हे विमान मास्क, ग्लोव्ज, वैद्यकीय उपकरणे अशा तब्बल १५ टन आवश्यक वैद्यकीय सामग्रीसह वुहान येथे पोहोचले होते. त्यानंतर या विमानातून ७६ भारतीय आणि ३६ नागरिक अशा एकूण ११२ जणांना भारतात आणण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शेजारधर्माच्या धोरणाच्या आधारावर परदेशी नागरिकांनाही मदत देण्यात आल्याचे सांगितले. चीनमध्ये महामारी बनलेल्या कोरोना विषाणूच्या बळींची संख्या वाढून २ हजार ७४४ झाली आहे. ४३३ कोरोनाचे नवे रुग्ण समोर आल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) दिली आहे. वुहान येथून पहिला कोरोनाचा रुग्ण मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रथम निदर्शनास आला होता. यानंतर याचा वेगाने प्रसार झाला होता. मागील काही आठवड्यांत याची तीव्रता कमी झाल्याचे दिसत आहे.

पुणे - नोकरी नसल्यामुळे पैशासाठी एका तरुणाने पुण्यातील एक रुग्णालयच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. अखेर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत या तरुणाला बेड्या ठोकल्या. प्रविण हिराचंद कुंभार (वय ३१ वर्षे, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कुंभार हा बारामती तालुक्यातील रहिवासी असून सध्या तो पुण्यात राहतो. एम. एम.एससी. फिजिक्समध्ये त्याचे शिक्षण झाले असून त्याने अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली. पण, कोठेच त्याचा निभाव लागला नाही. गेल्या काही दिवसांपासून तो बेरोजगार होता. त्यामुळे तो नैराश्यात होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने वडिलांकडून पैसे घेतले आणि गोव्याला गेला. तेथे त्याने मोबाईलवर बनावट ई-मेल अकाउंट तयार केले. त्यावरुन त्याने प्रथम ३१ जानेवारी व त्यानंतर ७ फेब्रुवारीला पुण्यातील नोबेल रुग्णालयाला ई-मेल करुन १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बॉम्बने संपूर्ण रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण रुग्णालय पिंजून काढले. पण, त्यांना काहीही आढळले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील ई-मेलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो गोव्याहून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गुगलशी संपर्क साधून अधिक माहिती घेत वाई येथून प्रविण कुंभार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासासाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.प्रविण याने गोव्यातून इंटरनेटची सुरक्षा भेदून बनावट मेल आयडी तयार केला. त्याने महाराष्ट्र व गोव्यात फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे विना पासवर्ड वाय फाय व हॉट स्पॉटचा शोध घेऊन त्याचा वापर केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी सायबर पोलिसांना संबंधित कंपनीकडून तातडीने माहिती प्राप्त करुन घेण्यात अनेक अडचणी येतात.

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्थिक बेशिस्तीमुळे या बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल ९ कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे या ठेवीदारांनी बँकेचे संचालक तथा आमदार अनिल भोसले यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण हे आमदार भोसले सहकारमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने सहकार खाते त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलक ठेवीदारांनी केला.
मुंबई - बृह्नमुंबई महानगरपालिकेचे जकातीतून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने अखेर बीएमसीने कर थकबाकी सक्तीने वसूल करण्यास सुरुवात केली असून,बीएमसीने थकबाकीदार मेस्को एअरलाईन्स कंपनीची २ हेलिकॉप्टर जप्त केली आहेत यानंतर मुंबईत बीएमसीच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.मेस्को एअरलाइन्स कंपनीकडे १ कोटी ६४ लाख ८३ हजार ६५८ रुपयांचा मालमत्ता कर थकलेला होता. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी जमा न केल्याने अखेर बीएमसीने ‘शेड्युल के’नुसार कारवाई करत मेस्को एअरलाइन्स कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त केले.
वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारच्या कर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. याच परिणाम देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या बृह्नमुंबई महानगरपालिकेवरही झाला आहे. त्यामुळेच बीएमसीने कर थकबाकीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
बीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मुंबई महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रकल्पांचा भार आहे. त्यासाठी पैसा लागणार आहे. त्यामुळे थकबाकीची वसूली ही करावीच लागणार आहे. त्यासाठी जप्तीच्या कारवाईचा मार्ग देखील अवलंबला जाईल.

पुणे - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत दंगल होणे हे धक्कादायक आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे जमत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष आपल्या देशाच्या दौऱ्यावर असताना राजधानीमध्येच हिंसाचार होतो, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गृहमंत्रालय आणि गुप्तहेर खात्याचे हे अपयश आहे. दिल्लीतील हिंसाचाराची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, असेही सुळे म्हणाल्या.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरू आहे. यात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे आहेत. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचारग्रस्त भागात गोंधळ घालणाऱ्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

नवी मुंबई - महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच आणखी एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. मदतीच्या बहाण्याने तरुणीवर तीन नराधामांनी आळीपाळीने बलात्कार करुन तिच्याजवळील ऐवज लंपास केला आहे.पीडित तरुणी घरोघरी तूप विकण्याचे काम करते. दरम्यान, १८ फेब्रुवारीला संध्याकाळी घाटकोपर रेल्वे स्थानकातून लोकल पकडताना तरुणीची नातेवाईकांपासून ताटातूट झाल्याने ती गर्दीत हरवली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती.पीडित तरुणी नातेवाईकांचा शोध घेत मुंब्रा रेल्वे स्थानकात पोहचली आणि रात्री तिथेच झोपली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना शोधण्यासाठी ती दिवा रेल्वे स्थानकात गेली. मात्र, तिला नातेवाईक सापडले नाहीत.तरुणीकडे खर्चाचे पैसे नसल्याने तिने नाकातील सोन्याची चमकी विकण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेला विनंती केली. मात्र, सोन्याची चमकी विकणे शक्य झाले नाही. दरम्यान, तरुणी रात्री साडेआठच्या सुमारास म्हापे परिसरातील साईसागर हॉटेल चौकात आली. तिथे तरुणीने एका रिक्षावाल्याला जवळपास असणाऱ्या रेल्वे स्थानकावर नेण्याची विनंती केली. मात्र, याचा फायदा घेत रिक्षाचालकाने तिला एक तास म्हापे परिसरात फिरवून निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करुन तिच्या कानातील सोन्याची कर्णफुले, नाकातील सोन्याची चमकी व पायातील चांदीचे पैंजण जबरस्तीने काढून घेतले. घटनेनंतर रिक्षावाला पसार झाला.घटनेनंतर पीडित तरुणी रात्री १२ च्या सुमारास स्टेशनचा पत्ता विचारत रस्त्यावर उभी होती. दरम्यान, दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी तिला स्टेशनवर सोडतो, असे सांगून दुचाकीवर ठाणे बेलापूर मार्गावरील पाईपलाईन शेजारी नेले. त्या दोघांनी पीडितेवर तिथे आळीपाळीने बलात्कार केला.या घटनेचा गुन्हा कुर्ला पोलीस ठाण्यातून वर्ग होऊन रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त वाशी विभाग यांच्या अधिपत्याखाली रबाळे एमआयडीसी परिसरात पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तिन्ही अनोळखी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व दुचाकी जप्त करुन तिन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत अटक केली. पीडितेचे दागिनेही रिक्षावाल्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. संबधित आरोपींना २९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरत महाविकास आघाडीत फूट पाडण्याची योजना भाजपने आखली आहे. आज बुधवार सावरकारांच्या ५४ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी गौरव आणि सन्मानदर्शक ठराव मांडण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.सरकारने जर असा ठराव आणला नाही तर भाजपकडून यासंदर्भात ठराव मांडला जाईल. परंतू सत्ताधारी पक्षाचा घटक असलेल्या काँग्रेसचा मात्र सावरकरांचा गौरव करणाऱ्या या ठरावाला विरोध आहे. काँग्रेसने कायमच सावरकरांविरोधात भूमिका घेतली आहे. 'शिदेरी' या मासिकात सावरकरांविषयी अवमानकारक मजकूर असलेले देन लेखही प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे हाच धागा पकडत सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप सभागृहात शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घातला. विरोधकांच्या या गदारोळामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले होते. त्यामुळे आता सावरकारांचा मुद्दा घेवून भाजप सभागृहात पुन्हा आक्रमक पवित्र्यात दिसण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्ली मागील ३ दिवसांपासून धगधगत आहे. जाळपोळ आणि हिंसाचारात आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ईशान्य भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन गट एकमेकांसमोर आल्याने २३ तारखेपासून दिल्लीत हिंसाचार पसरला आहे. दिल्लीत हिंसक आंदोलन सुरु असून अनेक आंदोलकांनी घरे,दुकाने, गाड्या, सार्वजनिक मालमत्तेला आगी लावल्या, तसेच तोडफोडही केली. अनियंत्रित नागरिकांचे टोळके काठ्या, दांडके घेवून रस्त्यावंरून फिरत आहेत. अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.आंदोलकांनी नियंत्रणात आणताताना एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर दीडशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अनेक नागरिक भीतीने घरांमध्ये बसले आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात धुराचे लोट उठले होते. पोलिसांनी काही भागात एक महिन्यापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच 'शूट अ‌ॅड साईट'चे आदेशही देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. 

मुंबई - दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एशियाटीक लायब्ररी परिसरात सीएए आंदोलक एकत्र येणार होते. रात्री ११ च्या सुमाराला इथे आंदोलन करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र मुंबई पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त लावत हे आंदोलन होऊ दिले नाही.एशियाटीक सोसायटी परिसरात एकत्र येण्याचा मेसेज दिवसभर व्हायरल झाला होता. रविवारीही गेट वे परिसरात एकत्र येऊन आंदोलन करण्याचा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र तो प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला होता. 
सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचाराने मंगळवारी अधिक उग्र रुप धारण केले. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीच्या काही भागांमध्ये पोलिसांकडून शुट एट साईटचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या सोशल मीडियावर यमुना विहार येथील नूर ए इलाही चौकातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांकडून शुट एट साईटचे आदेश देण्यात आल्याची घोषणा होताना दिसत आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


नवी दिल्ली - देशभारतील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण १७ राज्यांतून ५५ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणरा आहेत.राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील ५५ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललेअसून, येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे ७ पैकी ५ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते गरजेची आहेत. त्यामुळे आघाडीचे ४ तर भाजपचे २ उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

बारामती - बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाले आहेत. यामध्ये एकूण २१ जागांपैकी आतापर्यंत.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला ११ जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला ५ जागा विजयी झाल्या आहेत.सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला फार मोठा धक्का बसला असून पुढील राखीव पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून गेलेला हा कारखाना पुन्हा सत्ताकाबीज केला आहे.२१ जागांसाठी या दोन्ही पॅनलसह अन्य १४ अपक्ष असे एकूण ५६ उमेदवार रिंगणात आहेत. २३ फेब्रूवारीला या निवडणुकांसाठी मतदान झाले असून २४ तारखेपासून मतमोजणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपला मतदान हक्क बजावला होता. या कारखान्याचे सभासद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या नावलौकिक महाराष्ट्र भर आहे. सध्या या कारखान्यावर पवार विरोधी गटाची सत्ता आहे. पण आता ही सत्ता अजित पवारांनी खेचून घेतली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पणदरे गटातही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. माळेगाव गटातील दोन जागा जिंकल्यानंतर पणदरे गटातील तीनही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या असून या गटातून तानाजी कोकरे, केशवराव जगताप, योगेश जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनल पणदरे गटामध्ये यावेळी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. माजी उपाध्यक्ष तानाजी कोकरे, मातब्बर उमेदवार केशव जगताप आणि योगेश जगताप या अनुभवी लोकांना या गटातून उतरवले होते.
बारामतीत माळेगाव कारखान्याची मतमोजणी करताना दोन मते बाद केल्याने सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे आणि अधिकारी यांच्यात वादही झाला होता. मतमोजणी कक्षातच शाब्दिक चकमक झाली होती. जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत मतमोजणी बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही मतमोजणी आज दुपारपर्यंत चालण्याची शक्यता आहे.


मुंबई - दिल्लीतील तणावानंतर मुंबईतही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. त्याशिवाय मुंबई शहरात संदिग्ध ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यासोबतच सोशल मीडियासह नागरिकांवरही नजर ठेवून आहेत. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अनेक संशयित संघटनांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान काल रात्री गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येतं आहे. पोलिसांनी नागरिकांना हटवल्यानंतर आंदोलक मरीन ड्राईव्ह परिसरात आंदोलन करू लागले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. परवानगीशिवाय विरोध प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या दौऱ्यावर भारतामध्ये असून,आज अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. भारत आणि अमेरिका यांच्यात काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. त्यात प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रातल्या करारांचा समावेश आहे.काल नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात ट्रम्प यांनी भाषणात त्याचे सुतोवाच केले..भारत आणि अमेरिका यांच्यात तब्बल २१ हजार कोटींचा संरक्षण साहित्य खरेदी करार होणार आहे. या कराराअंतर्गत भारत अमेरिकेकडून एमएच-६० रोमियो मल्टीरोल हेलिकॉप्टर्स आणि अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेणार आहे. रोमियो हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेच्या लॉकहीड मार्टीन कंपनीने केलीय. पाणबुडी आणि मोठ्या जहाजांवर मारा करण्यात ही हेलिकॉप्टर्स तरबेज समजली जातात. तसंच शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा हवेतच निपटारा करणारी अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीमही अमेरिका भारताला विकणार आहे.
भारत अमेरिकेकडून अनेक हत्यारं खरेदी करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काह वर्षात संरक्षण सहकार्य वाढत आहे. गेल्या १२ वर्षात भारताने अमेरिकेकडून १८ कोटी डॉलर्सचं संरक्षण साहित्य विकत घेतलं आहे. यात अपाचे हेलिकॉप्टर्स, चिनूक हेलिकॉप्टर्स, एम ७७७ हॉवित्झर गन, पी ८ आय लाँग रेंज एअरक्राफ्ट, हारपून मिसाईल सिस्टीम यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यातला आजचा दिवस हा करार मदारांचा असणार आहे.

नवी दिल्ली - नागरिकत्व कायदा दुरुस्ती (CAA) ने सुरू झालेल्या आंदोलानाने आता दिल्लीत हिंसक वळण घेतले आहे. उत्तर पूर्व दिल्लीत तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. ईशान्य दिल्लीत सोमवारी हिंसाचार झाला होता आज मंगळवारी मौजपूर आणि ब्रह्मपुरी भागात दगडफेक सुरू झाली. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १०० हून अधिक जखमी आहेत. मंगळवारी सकाळी पाच मोटारसायकलींना आग लावण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास मौजपूर आणि आसपासच्या भागात आग लागल्याचे अग्निशमन दलाला फोन आले, ज्यामध्ये एका अग्निशमन इंजिनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन इंजिनला आग लागली. यामध्ये तीन फायरमन जखमी झाले आहेत.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोठी बैठक घेतली. अहमदाबादहून परतल्यानंतर लवकरच अमित शहा यांनी आढावा बैठक घेतली. सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत गृहसचिव, इंटेलिजन्स ब्युरो चीफ, दिल्ली पोलीस आयुक्त आणि गृह मंत्रालयाचे अन्य अधिकारी सहभागी होते. 
दिल्ली पोलिसांनी नागरिकता सुधार कायद्या (CAA) विरोधात झालेल्या हिंचारामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. शाहरुख असे बंदूक घेऊन गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या तरुणाने ईशान्य दिल्लीमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये जमावावर गोळीबार केला तर सध्या या पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान,नागरिकत्व कायद्याबाबत सोमवारी दिल्लीत हिंसक निदर्शने झाली. या हिंसक निदर्शनात पोलिस कॉन्स्टेबलसह ७ जणांचा मृत्यू झाला ईशान्य दिल्लीच्या विविध भागांत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थन आणि विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी एका युवकाने पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यामध्ये हा तरुण पोलीस कर्मचाऱ्याकडे धावत असताना दिसत आहे.
नागरिकत्व सुधार अधिनियम (CAA) च्या निषेधार्थ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचारानंतर शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये कोणत्याही वर्गाच्या परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील असे सिसोदिया म्हणाले आहेत.

अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद विमानतळावर आमगन झाले आहे. त्यांच्या स्वगताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली होती. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.

अकोला - प्रहार संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्येची चौकशी CID (सीआयडी) मार्फत करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते आज पुंडकर यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोटात आले होते.पुंडकर यांची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हंटलंय. तुपकर यांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्य सरकारने संरक्षण देण्याची गरज असल्याचंही म्हंटले. राज्य सरकार कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे न राहिल्यास भविष्यात चळवळ संपणार अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.या हल्ल्यात मारेकरींनी  पूंडकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या यातील दोन गोळ्या तुषार पुंडकर यांच्या पाठीत लागल्याय.गंभीर जखमी झालेल्या तुषार फुंडकर यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते मात्र डॉक्टरांनी पुढील उपचार करिता अकोला नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.तुषार फुंडकर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे विश्वासू होते. तुषार पुंडकर यांच्या माध्यमातून प्रहार संघटनेने जिल्ह्यात चांगली प्रगती करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे हत्या राजकीय द्वेषातून करण्‍यात आली आहे का ? या अनुषंगाने देखील पोलिस पुढील तपास करीत आहे.सोबतच काही दिवसांपूर्वी अवैध उत्खनन करणाऱ्यांची लेखी तक्रार पुंडकर यांनी संबंधित विभागाला दिली होती. त्यामुळे पोलीस याबाबतही तपास करीत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी मारेकरी लवकरच अटक करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.

अकोले - निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावर काही दिवसांपूर्वी त्यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही हा वाद काही शांत होताना दिसत नाही. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्रांना कोंडू, अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.या सर्व प्रकरणानंतर इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी आणि अकोलेतील वारकऱ्यांनी 'अकोले बंद'ची घोषणा केली आहे. रविवारी इंदोरीकर महाराजांचे जन्मस्थान इंदोरी ते अकोले अशी बाईक रॅली काढण्यात आली.या बाईक रॅलीदरम्यान विविध गावांमध्ये लोकांच्या भेटी-गाठी घेतल्या शिवाय, या रॅलीदरम्यान अनेक महिला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या.या रॅलीत इंदोरीकर महाराजांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला. यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र काहीजण हा वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी या निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आले. ‘आम्ही इंदोरीकरांचे समर्थक’ असे बॅनर घेतलेले लोक रॅलीमध्ये दिसत आहे. विविध सामाजिक संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भजन दिंडी काढून इंदोरीकर महाराजांचे समर्थन करण्यात आले.तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फासू असे विधान केले होते, यामुळे संतप्त वारकऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. 
दरम्यान स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असे सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते.

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील जाफराबाद येथे शनिवारी रात्री नागरिकत्व सुधारणा सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात आंदोलन झाले. यावेळी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने मेट्रो स्टेशन खालील रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हते.त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पोलिसांना थोड्या प्रमाणात बळाचा वापरही करावा लागला.शाहीन बाग येथील आंदोलनही मागील ७० दिवासांपासून सुरू आहे. शाहीन बागेतील आंदोलकांशी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन मध्यस्थींची नियुक्ती केली आहे. आंदोलन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली आहे.

वडोदरा - गुजरातच्या वडोदराजवळ ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ही घटना पादरा तालुक्यात रणु-महुवड रोडवर शनिवारी सायंकाळी घडली.गुजरातच्या वडोदरामध्ये दोन वाहनांच्या अपघातात १२ जण ठार, १० जखमीया अपघातातील मृत आणि सर्व जखमी लग्न समारंभ आटोपून परतत असल्यानंतर हा अपघात झाला अशी माहिती मिळाली.या अपघातातील जखमींना पादरा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, काही गंभीर जखमींना वडोदरा इथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली आहेत.

बंगळुरू - नागरिकत्व संशोधन (CAA) कायद्याविरोधात गुरुवारी सायंकाळी एक रॅलीमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणारी अमूल्या लियोना हिची हत्या करण्यासाठी दक्षिणपंथी संघटना श्री राम सेनाच्या एका कार्यकर्त्याने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. 
एका व्हिडिओच्या माध्यमातून श्री राम सेनाचे कार्यकर्ता संजीव मारदी यांनी सरकारकडे अमूल्या हिला जामीन देऊ नका, असे आवाहन केले आहे. अन्यथा तिला जीवे मारण्यात येईल, असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अमूल्या हिच्या विरोधात शनिवारी बेल्लारी येथील श्री राम सेना द्वारे आयोजित एका रॅलीत मारदी म्हणाले, राज्य आणि केंद्र यांनी कोणत्याही परिस्थितीत तरुणीची सुटका करू नये. अन्यथा आम्ही तिला जीवे मारू, याबाबत बेल्लारीच्या पोलीस अधिक्षकांनी नकार दिला असून त्यांनी यासंदर्भात कोणताही व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले. याबाबत चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. 
CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'भारत जिंदाबाद था और रहेगा', आम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचे समर्थन करत नाही. 
सभेत असदुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता अमूल्या हिने माईक हातात घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. तरुणीने व्यासपीठावर येत तुम्हाला 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते', असे सांगत 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. 

सेनेगल - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळया गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. बॉलिवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी त्याने धमकावले होते. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक करण्यात आली आहे. 
गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अधिकारीही तिथे आहेत. इकोनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजारीने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. भारतात परतायचे नसल्याने रवी पुजारीने कायदेशीर पर्याय अवलंबला होता. 
रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह २०० गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे त्याच्यावर आरोप आहे. सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नानडीस या नावाने राहत होता. 

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्ट्रवाद आणि भारत माता की जय या घोषणेचा देशात दुरुपयोग केला जात आहे असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. या घोषणेच्या माध्यमातून अतिरेकी आणि निव्वळ भावनिक कल्पना तयार करण्यासाठी गैरवापर केला जात आहे. मनमोहन सिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणांवर आधारित असलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्यादरम्यान हे वक्तव्य केले आहे. जर भारताची लोकशाही एक उज्ज्वल लोकशाही म्हणून ओळखली जाते, जर भारताला जगातील शक्तींपैकी एक मानले जाते याचे श्रेय देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना जाते. सिंह पुढे जाऊन म्हणाले, नेहरुंनी विषम व अशांत परिस्थितीत भारताचे नेतृत्व केले. त्यावेळी भारताने लोकशाही ही जीवनशैली म्हणून स्वीकारली होती. त्यावेळी समाजात विविध सामाजिक व राजकीय दृष्टिकोन असलेले लोक होते. ते म्हणाले, भारताचा अभिमान बाळगणाऱ्या पंतप्रधानांनी या सर्व गोष्टी आत्मसात केल्या. 
अनोखी शैली असलेले आणि बहुभाषी नेहरुंनी आधुनिक भारतात विश्वविद्यालये, अकादमी, सांस्कृतिक संस्थांचा पाया रचला. दुर्देवाने एक असा वर्ग आहे ज्यांच्याकडे इतिहास वाचण्याचं धैर्य नाही. जे जाणूनबुजून आपल्या पूर्वग्रहांनी चालत आहेत. ते नेहरुंची चुकीची प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र माझा विश्वास आहे की इतिहासात सर्व खोटे आक्षेप नाकारण्याची आणि उपयुक्त गोष्टींना योग्य दृष्टिकोनातून दाखविण्याची क्षमता आहे. 
पुरुषोत्तम अग्रवाल आणि राधा कृष्ण द्वारा लिखित ‘हू इज भारत माता’ हे एक क्लासिक पुस्तक आहे. यामंध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर, नेहरुंची भाषणे, लेख, पत्र आणि अनेक अव्यक्त गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे पुस्तक लोकांसमोर येत आहे ज्यावेळी राष्ट्रवाद आणि भारत माता की जय या घोषणेचा अतिरेकी आणि निव्वळ भावनिक कल्पना तयार करण्यासाठी गैरवापर केला जात असल्याचे सिंह म्हणाले. 

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget