May 2020

नवी दिल्ली - करोनाच्या संकटाशी लढताना दिल्ली सरकारची तिजोरी आता खाली झाली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे केजरीवाल सरकारने केंद्र सरकारकडे पाच हजार कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली आहे, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे याची माहिती दिली.
सिसोदिया म्हणाले, करोना आणि लॉकडाउनमुळे दिल्ली सरकारची ८५ टक्के कर वसुली थांबली आहे. त्यासाठी मोठ्या तातडीच्या मदतीची सरकारला गरज आहे. त्यासाठी मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर केंद्राच्यावतीने राज्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यता निधीची रक्कमही दिल्लीला अद्याप मिळालेली नाही,असे ते यावेळी म्हणाले.दिल्ली सरकारच्या महसूलाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, दिल्ली सरकारच्या तिजोरीत आता पुरेसा पैसाच शिल्लक राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांचे पगार आणि गरजेच्या खर्चांसाठी सरकारला ३,५०० कोटी रुपयांची गरज भासते. मात्र, आत्तापर्यंत एकूण १७३५ कोटी रुपयांचचे महसूल गोळा झाला आहे. तर आणखी ७,००० कोटी रुपयांचा महसूल येणे बाकी आहे. त्यामुळे केंद्राकडे कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी आणि आवश्यक कामकाजांसाठी पाच हजार कोटी रुपयांची तातडीची मागणी दिल्ली सरकारकडून करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन - जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरु असलेला हिंसाचार अद्यापी थांबलेला नाही. उलट अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत.आंदोलना प्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील १७ शहरातून १४०० जणांना अटक करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी हिंसक पद्धतीने विरोध सुरु आहे.
अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची संख्या १४०० पेक्षा सुद्धा जास्त असू शकते. कारण शनिवारी रात्री सुद्धा अमेरिकेत आंदोलने झाली. पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लॉयड यांच्या ‘कुटुंबीयांशी मी बोललो असून ती खूप चांगली माणसे आहेत’ असे ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले होते. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे.

मुंबई - अर्थर रोड जेलमध्ये आरोपींना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने अर्थर रोड जेचले अधीक्षक एन. बी. वायचळ यांची बदली करण्यात आली आहे. जेलमध्ये सुमारे २०० च्या वर कैदी आणि जेल कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक कैद्यांना तात्पुरते सोडण्यातही आले आहे.जेलमध्ये कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. एक ही नवा कैदी अर्थर रोड जेलमध्ये न घेण्याचा निर्णय झाला होता. नव्या आरोपी मार्फत कोरोना जेलमध्ये प्रवेश करू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. असे असूनही जेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.जेलमध्ये ही लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, सर्व सुरक्षा उपाय योजना करूनही अखेर कोरोना जेलमध्ये पोहचला. एका कैद्यांमार्फत कोरोना अर्थर रोडमध्ये पोहचला आणि कैदी आणि कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली.अर्थर रोडमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने याबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर अर्थर रोड जेलचे अधीक्षक एन बी वायचळ यांच्यावर टीका झाली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र, आता त्यांना अर्थर रोड जेलच्या अधीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी जे. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन ५ ची घोषणा केली आहे. ३०जूनपर्यंत लॉकडाउन ५ लागू असणार आहे. या दरम्यान अटी आणि शर्थींसह वेगवेगळ्या क्षेत्रांना परवानगी दिली जाणार आहे. देशभरातील शाळा कधी सुरू होणार ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोडला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्य व केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. आपआपल्या राज्यात शाळा कधी सुरू करू शकता? अशी विचारणा या पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याबाबत काय उपायोजना करता येतील आणि शाळा कशा प्रकारे सुरू करता येईल, याबद्दल केंद्र सरकारला माहिती कळवायची आहे.केंद्रसरकारने पाचव्या ताळेबंद संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली त्यात शाळा महाविद्यालय हे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने सुरू कराव्यात अथवा जुलै महिन्यात सुरू कराव्यात अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे.
राज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वत्र शाळा सुरू होत असतात यंदा विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, धुळे अशा प्रमुख शहरात वाढत असल्यामुळे शहरी भागातील हद्दीत शाळा सुरू करणे अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे तूर्तास शाळा राज्यात सुरू करू नयेत अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून आकाशवाणी आणि दूरदर्शन च्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे धडे सुरू करण्याचा विचार आहे. शाळा जरी सुरू झाल्या नसल्या तरी शालेय अभ्यासक्रमास सुरुवात करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय आहे.राज्यात बहुतेक भागात केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार, साधारणतः जुलै महिन्यापर्यंत किंवा जून महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू होतील, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे.

पुणे - ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आम्ही करोनाच्या लशीच्या चाचण्यांवर काम करीत आहोत. सुरक्षा आणि त्याची परिणामकारकता यशस्वी झाल्यानंतरच सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकेल, अशी आमची अपेक्षा आहे, अशी माहिती सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. पहिल्या सहा महिन्यांसाठी सुमारे ५० लाख लशींचे उत्पादन घेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 
करोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीबाबत पुण्यासह देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्या लसींच्या प्रक्रियेबाबत सीरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी एका आठवड्यापूर्वीच लस येण्यास दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल असे सांगितले होते. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लशीच्या चाचण्यांबाबत अद्ययावत घडामोडींची माहिती दिली. लस तयार करणाऱ्या सात जागतिक संस्थांपैकी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी लस प्रकल्पात भागीदारी केली आहे. तेथील डॉ. हिल यांच्यासह आमच्या तज्ज्ञांचे पथक काम करत आहे. लसीच्या चाचण्यांमध्ये आवश्यक सुरक्षा आणि परिणामकारकता तपासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येऊ शकते. इंग्लंडमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत क्लिनिकल चाचण्या यशस्वी होतील, या अपेक्षेने आम्ही लस तयार करणार आहोत. क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यास पुरेसे डोस उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आम्ही या लशीच्या भारतातही चाचण्या सुरू करणार आहोत,'अशी माहिती पूनावाला यांनी दिली. 
लस उत्पादनासाठी आमची पुण्यातील सुविधा सज्ज आहे. लशीसाठी नव्याने सुविधा तयार करण्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. आमच्या सध्याच्या तयार असलेल्या एका युनिटचे उत्पादन सुमारे तीन आठवड्यात सुरू होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली. नियमांचे पालन करूनच चाचण्या करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परभणी - लॉकडाऊन घोषित केल्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित नागरिक परतले आहेत. शिक्षण, नौकरी रोजगार मिळवण्यासाठी हजारो नागरिक मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद सारख्या महानगरात गेली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे अनेक उद्योग धंदे कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या हातच काम गेले आहे, हाताला काम उपलब्ध नसल्याने लाखो मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्या प्रमाणेच परभणी जिल्ह्यात ही कोरोनाचा धोका वाढला आहे. 
परभणी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० वर जाऊन पोहचला आहे. यातील बहुतांशी बाधित मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या रेड झोन मधून आलेले आहेत. परभणी जिल्ह्यात मागील दोन महिन्यात ५४ हजार १८३ जणांनी प्रवेश केला आहे. यात सर्वाधिक संख्या मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्यांची आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळॆ कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम हाती घेण्यात आलीआहे. यासाठी १० हजार पथकांमार्फत कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका कमी झाला आहे.मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथून आतापर्यंत परभणीत अनेकजण आले आहेत. यामध्ये गंगाखेड तालुक्यात १३ हजार ५७४, जिंतूर तालुक्यात ७ हजार ६२२, मानवत २ हजार १४०, पालम ३ हजार ५०, परभणी ४ हजार ८०९, पाथरी ९ हजार १८, पूर्णा 4 हजार ५७१, सेलू ८ परतले आहेत. अनधिकृत जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही यापेक्षा अधिक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.परभणी जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्यांची संख्या ही फार कमी असून शहर आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या २ हजार मजुरांना ८८ बसच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात आणि राज्यात सुखरूप पोहचावण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर, महाराष्ट्राचा क्रमांक १७वा असेल.त्याआधी उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह किमान १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. शिवाय केंद्राचे सरकारही करोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले म्हणून त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल', असा सणसणीत टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
भाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. करोना साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत राणे यांनी ही मागणी केली. या मागणीवर राणे भाजपात एकाकी पडले असले तरी राष्ट्रपती राजवटीच्या चर्चांनी राज्याचे राजकारण मात्र ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याचवेळी 'हे सरकार टिकायला हवे हे सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची मजबुरी आहे', हे वास्तवही त्यांनी अधोरेखित केले आहे.
‘करोना’ संकटाशी सामना करण्यात महाराष्ट्राचे सरकार अपयशी ठरले व करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लादले जाईल, असे सांगण्यात आले. हा विचार किंवा कारस्थान कोणी करत असेल तर ते त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल.
'सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्गत झगड्यांतून पडेल', असे एक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत.
शरद पवार हे ‘ठाकरे सरकार’ स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते. सरकारच्या भवितव्याविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर आहे, हे त्यांचे म्हणणे कायम आहे. काँग्रेसचे चित्तही विचलित झालेले नाही. सत्ताधारी घटक पक्षांच्या आमदारांतील कोणी घोडेबाजारात उभे राहिलेले नाही. त्यामुळे सरकार पडेल असे विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. अंतर्विरोधाच्या ठिणग्या उडाल्या तरी सरकारला धोका नाही. असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे..

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांनी टोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात बँड आणि फटाके वाजवावेत. फटाक्याच्या धुराने टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत, असा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यांनी शनिवारी नागपूर जिल्ह्यातील टोळधाडीने नुकसान केलेल्या भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशी सूचना त्यांनी दिली.टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपुर, गणेशपुर, शेकापुर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.जेणेकरून टोळधाडीपासून शेतकऱ्यांचे पीक,फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत. मोठ्याप्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले. नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सातारा - शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, मनोरुग्ण तसेच अनाथांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अक्षयने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देताना जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर यासंदर्भात आरोप केले आहेत. या लाईव्हमध्ये त्याच्यासोबत नेमके काय घडले हे सांगितले आहे. या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र निषेध केला आहे. 
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करुन या तरुणाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे, परंतु कोणी राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलीत करणारे असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

आग्रा - शहराला १२० किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाचा तडाखा बसला असून, ताजमहालाचेही या वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे. वादळात ताजमहालच्या मुख्य कबरीची संगमरवरी रेलिंग तुटली आहे.वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी एएसआय अधिकारी आणि कर्मचारी ताजमहाल आणि इतर ऐतिहासिक इमारतींचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले.या वादळात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्रा येथे झालेल्या प्रचंड वादळाने ताजमहालच नव्हे तर शहरातील विविध भागांना उद्ध्वस्त केले. या वादळात १० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान वादळानंतर गारपीट व मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
कर्नाटक - कर्नाटक भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे काही आमदार विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपामधील काही आमदारांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.आतापर्यंत तरी हायकमांड मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बाजूने आहे. येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत नाही असे हायकमांडचे मत आहे. पण जे आमदार भेटले व फोनवरुन चर्चा केली, त्यांच्यामध्ये बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
करोना व्हायरसच्या या संकटकाळात येडियुरप्पा यांनी आपल्या आमदारांबरोबर कुठलीही चर्चा केलेली नाही तसेच आमदारांच्या मतदारसंघात काय सुरु आहे याची सुद्धा त्यांना अजिबात चिंता नाही असे आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत, असे आमदारांना वाटते. वयोमानामुळे येडियुरप्पा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला असे आमदारांचे मत आहे.
आमदारांकडून समोर आलेले नाव बासनगौडा पाटील हे सुद्धा लिंगायत समाजाशी संबंधित आहेत. एक वेळ विधानपरिषदेवर आणि तीन वेळ आमदार राहिलेले बासनगौडा पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले आहे. उत्तर कर्नाटकातील वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जवळपास ४० आमदार बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव हाय़कमांडला सुचवायला तयार आहेत. मागच्या काही दिवसात २५ आमदार वेगवेगळया ठिकाणी भेटले व ६० आमदार फोनवरुन परस्परांच्या संपर्कात होते.

नवी दिल्ली - मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटतं की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये करोना योद्ध्यांवर हल्ले झाले आहेत. यावर बोलताना शाह म्हणाले, “सरकार प्रत्येक करोना योद्ध्यासोबत आहे. देशभरात अशा ७० ते ८० घटना समोर आल्या आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी कठोर पावलं उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी परिवर्तनं आणली होती. मात्र, यावेळी संपूर्ण देशचं याच्याशी लढत आहे. लोकांनी जनता कर्फ्यू, थाली वाजवून आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करुन देशाला या महामारीविरोधात मजबूत केले.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे करोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सरकारांनी करोनाचा फैलाव होण्यासाठी मरकजच्या कार्यक्रमाला जबाबदार धरले होते. त्यावेळी या कार्यक्रमामुळे सुमारे ३० टक्के करोना विषाणूचा फैलाव संपूर्ण देशात झाल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून २०० रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याकरता IRCTCची वेबसाइट आणि App वर रेल्वेने २१ मे पासून तिकिट बुकिंग देखील सुरू केली आहे. याआधीपासून धावणाऱ्या श्रमिक रेल्वे आणि ३० स्पेशल एसी गाड्यांव्यतिक्त २०० गाड्या १ जूनपासून धावणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत आणि यामध्ये एसी व नॉन एसी असे दोन्ही क्लास असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही. लॉकडाऊन काळात तब्बल दोन महिन्यांनी मेल आणि एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने काही गाइडलाइन देखील जारी केल्या आहेत.
या रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट तपासणारा रेल्वेचा स्टाफ देखील पीपीई किट, ग्लोव्ह्ज आणि मास्क घालून असेल. तिकिट तपासण्यासाठी त्यांच्याकडे मॅग्निफायिंग ग्लास असणार आहे
सर्व २३० रेल्वे गाड्यांसाठी आगाऊ बुकिंगचा कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस केला आहे
तात्काळ बुकिंग आधीप्रमाणेच सामान्य करण्यात आले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकावर ते आधारित असेल.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता रेल्वेने असे आवाहन केले आहे की गरोदर महिला, १० वर्षांखालील लहान मुले आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी रेल्वे प्रवास करू नये. अति अत्यावश्यक परिस्थितीमध्येच त्यांना प्रवास करता येईल
रेल्वेने आरक्षण काऊंटरवर तिकिटांचे बुकिंग आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस, आयआरसीटीसी यांसारख्या अन्य पर्यायांचा वापर करून देखील तिकिट बुक करता येणार आहे.

नवी दिल्ली - यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटनुसार दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी ३० मे रोजीच केरळात दाखल झाला आहे. गेल्या वर्षी मान्सून ८ दिवस उशीरा केरळमध्ये पोहोचला होता.
हवामान विभागाने, गेल्या आठवड्यात मान्सून १ जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून १ जूनपूर्वीच दाखल झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने ३० आणि ३१ मे रोजी, तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. भारतात जून ते सप्टेंबर याकाळात दक्षिण-पश्चिम मॉन्सून पडतो.२ ते ४ जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकण गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, १० जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाखल होऊ शकतो. याशिवाय १५ जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून कडक उन्हानंतर गुरुवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानाचा पारा खाली आला असून थंड वारा वाहत आहे. वाऱ्याचा कल बदलला असून दक्षिणपूर्व वारे वाहत आहेत. वातावरणात काही प्रमाणात गारवा आला आहे.मुंबई - एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असून,रूग्णांना दाखल करून घेत नाहीत, रूग्णवाहिका नाहीत मुंबईत हॉस्पिटल उभे केले तर डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, असे चित्र तर दुसरीकडे रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येऊ देत नाहीत. आणि केंद्र सरकारकडून मदत आलीच नाही, असे सांगीतले जात आहे. महाराष्ट्रात सरकारची ‘अशी ही बनवाबनवी’ सुरू आहे, असे सांगत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
महाराष्ट्रात दुर्दैवाने रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. विशेषत: मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे. कधी वरळी पॅटर्न, कधी मुंबई पॅटर्न असे नवे नवे स्वत: च्या कौतुकाचे पॅटर्न तयार केले जात आहेत. केंद्रीय प्रधिकरणांंचे, पथकांचे खोटे हवाले देऊन महाराष्ट्र सरकार आपले कौतुक करीत आहे. मुंबईत कोरोना रोखण्याच्या कामाचे निती आयोगाने कौतुक केले असे खोटे वृत्तही महाराष्ट्रात पसरवण्यात आले. त्यावर निती आयोगाने तातडीने खुलासा करून अशा प्रकारे कोणतेही कौतुक करण्यात आले नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारची बनवाबनवी सुरू असल्याचे शेलार म्हणाले. त्यासोबतच केंद्र सरकार बाकी देशातील सर्वच राज्यांना मदत देते आहे आणि एकट्या महाराष्ट्रावरच अन्याय करते आहे, असे खोटे चित्र महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडून तयार केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तर केंद्राकडून एकही पीपीई किट आले नाही, असे सांगितले. तसेच जीएसटी परताव्याबाबतही भाष्य केले. एसटीच्या मंत्र्यांनी जीएसटीबाबत बोलल्यावर त्यांना विषय समजेल असे नाही. त्यांना देण्यात आलेल्या कागदावरील माहिती वाचली तरी, प्रत्यक्षात सत्य मात्र वेगळे आहे.
केंद्र सरकारकडून १० एप्रिलपासून २७ मे अखेर दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारला एन-९५ मास्क एकूण १५ लाख ०८ हजार ४०० तर पीपीई किट ९ लाख ८२ हजार ७३० आले आहेत. पीपीई किटचा उल्लेख केंद्र सरकार ‘कव्हर ऑल’ असा करण्यात हे बहुधा महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना माहित नसल्याने ते पीपीई किट आलेच नाहीत, असे सांगत आहेत. हात मोजे १ लाख ६८ हजार आले आहेत. गाँँगल्स ५ लाख ३ हजार ४२५ या सर्व वस्तू केंद्र सरकारकडून देण्यात आल्या तरीही महाराष्ट्रातील राज्यकर्ते जर काहीच मिळाले नाही असे ओडरत असतील तर मग या वस्तू गोदामांनी खाल्या की काय, कसा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.याशिवाय जीएसटी परतावा आणि केंद्र सरकारकडून थेट मदत आली नाही, असेही ते सांगत आहेत, मात्र आज आम्ही घेतलेल्या माहितीनुसार डिव्होलेशन आॅफ टॅक्समधून कार्पोरेशन टॅक्सचे १४७९.८४ कोटी, इन्कम टँक्स १३७५.९८ कोटी, सेंट्रल जीएसटी २०८०.२२ कोटी, कस्टम ४२८.९६ कोटी, युनियन एक्साईज ड्यूटी २८०.२८ कोटी, सर्व्हिस टँक्स ३.६६ असे एकूण ५६४८.९४ कोटी रुपए केद्र सरकारकडून राज्याला मिळाले आहेत, याची सविस्तर माहिती उघड करून शेलार यांनी महाराष्ट्रातील सरकार अशी बनवाबनवी करते आहे, असा टोला लागावला आहे.

मुंबई - मुंबईतील चेंबूर भागात बसून टेलिफोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय लष्कराची जम्म-काश्मीरमधली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी करण्यात आली आहे. लष्कराचे एक पथक आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवरुन भारतीय लष्कराची जम्मू काश्मीरमधील माहिती व सैन्यदलाच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता.या छापेमारीदरम्यान पोलिस आणि लष्कराच्या पथकाने बऱ्याच महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत. ३ कार्यरत असलेली चायनिज सिमकार्ड, याव्यतिरीक्त १९१ सिमकार्ड, लॅपटॉप, मॉडम, अँटीना, बॅटरी आणि कनेक्टर असा माल पथकाच्या हाती लागला आहे. चायनिज सिमकार्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आवाज बदलून वोइप तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय लष्कराची माहिती मिळण्याचा प्रयत्न सुरु होता अशी माहिती मिळत आहे.पोलिसांनी केलेल्या तपासात पाकिस्तानवरुन आलेले कॉल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक नंबरवर डायव्हर्ट करुन भारतीय लष्कराची गोपनिय माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे मुंबई पोलीस या प्रकारात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्येही सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या या कारवाईला महत्व प्राप्त झालेले आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलीस अशा प्रकारची स्पाय नेटवर्क आणखी किती ठिकाणी तयार करण्यात आली आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई - करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी पुढे येत खार येथील त्यांच्या कार्यालयाची इमारत मुंबई महापालिकेला मदतीसाठी दिली. करोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी या कार्यालयाची इमारत वापरावी असे म्हणत शाहरुखने मदत केली. त्यानंतर या कार्यालयात आवश्यक ते बदल करण्यात आले व विलगीकरणासाठी तयार करण्यात आले. आता महिन्याभरानंतर मुंबई महापालिकेने सहा करोना रुग्णांना याठिकाणी हलवले आहे.शुक्रवारी सहा रुग्णांचे या कार्यालयात विलगीकरण करण्यात आले. शाहरुखच्या ‘मीर फाऊंडेशन’ची ही इमारत आहे. यामध्ये २२ जणांना क्वारंटाइन करण्यात येईल, अशी सुविधा करण्यात आली आहे.
शाहरुखचे कार्यालय महापालिकेला सोपवल्यानंतर त्यात काही बदल करण्यात आले. प्रत्येक मजल्यावर दरवाजे, पाण्याचे फिल्टर्स, तात्पुरती शौचालये, बेड या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. डॉक्टर्सची कमतरता असल्याने हे विलगीकरण कक्ष अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. मात्र आता स्थानिक रुग्णालयांच्या मदतीने ते सुरू करण्यात आले आहे”, अशी माहिती एच (पश्चिम) वॉर्डचे सहाय्यक नगरपालिका आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.शाहरुख सध्या विविध मार्गांनी शक्य होईल तितकी मदत करत आहे. आतापर्यंत त्याने अनेकांना आर्थिक मदतीसोबत जेवणंदेखील पुरवले आहे. त्याने ५० हजार पीपीई किट्ससाठी सरकारला निधी, मुंबईतील ५५०० कुटुंबाना जेवण, दिल्लीतील २५०० रोजंदारी कामगारांना आणि १०० अॅसिड हल्ला पीडितांना किराणा सामानाची मदत केली आहे.

मुंबई - बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा बोलबोला नेहमीच दिसत आला आहे. अनेक स्टारकिड्सनी आजपर्यंत धमाकेदार एंट्री केली आहे. त्यातील काही जण आपल्या आई-वडिलांप्रमाणे यशस्वी होतात आणि इंडस्ट्रीमध्ये नाव कमावतात. दरम्यान आता आणखी एक नाव स्टारकिड्सच्या यादीमध्ये जोडले गेले आहे. अभिनेता हृतिक रोशनची बहिण पश्मीना बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. स्वत: हृतिकने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती 'बॉलिवूड रेडी' असल्याची प्रकर्षाने जाणवत आहे. 
हृतिक रोशनने बहिण पश्मीनासाठी इन्स्टाग्रावर खास पोस्ट लिहून हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसून येत आहे. तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज अनेकांना भावला आहे. हृतिकच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. 
या फोटोंप्रमाणेच आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हृतिकने पश्मीनासाठी लिहलेली लांबलचक कॅप्शन. आपल्या बहिणीवर असणारं प्रेम हृतिकच्या या कॅप्शनमधून झळकून येत आहे. हृतिकने या कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की त्याला पश्मीनाचा किती अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे त्याचं पश्मीनावर किती प्रेम आहे. तो म्हणतो की, 'मला तुझा अभिमान वाटतो. तू खूप स्पेशल आणि असामान्य आहेस. तू जिथे जातेस तिथे प्रकाश पसरते. मला कधीकधी वाटते की तुला ही जादू कशी प्राप्त झाली, पण अनेकदा तु आपल्या कुटुंबात असल्यामुळे मी देवाचे आभार मानतो.' अशा आशयाची पोस्ट हृतिकने शेअर केली आहे. शेवटी त्याने असे म्हटले आहे की, 'तु चित्रपट कर किंवा नको, तु स्टार आहेस.

मुंबई - कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा शासननिर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमत्री अजित पवार यांनी दिली.विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्यस्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारीवर्गाला ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्‍या संबंधित कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत असलेले ३२ पोलीस कर्मचारी शुक्रवारी निवृत्त झाले असून पोलिसांच्या इतिहासात प्रथमच त्यांची निवृत्ती प्रक्रिया आणि कार्यक्रम ऑनलाइन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी ऑनलाइनच संवाद साधला. दरम्यान, करोनाच्या लढाईतील ३२ सैनिक निवृत्त झाल्याने ही पोकळी लवकर भरून काढणे गरजेचे आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये काम करणारे एक सहाय्यक पोलीस आयुक्त दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह एकूण ३२ पोलीस कर्मचारी शुक्रीवारी निवृत्त झाले. एरव्ही निवृत्तीचा जंगी कार्यक्रम घेत त्यांची विदाई केली जात होती. त्यावेळी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार आयुक्तांच्या हस्ते होत होता. तर त्यांच्या कार्यकाळातील उत्तम कामांचा धावता आढावाही घेतला जात होता. मात्र, यंदा कोरोना या जागतिक महामारीचा नवी मुंबईत झालेला उद्रेक पाहता जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये काहीशी उदासी दिसत होती.
मात्र, अत्याधुनिक पद्धतीने ऑनलाइन हा कार्यक्रम घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम सुरु झाला निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. तर ‘सिस्को वेब पिट’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे एकाच वेळी सर्वच जण एकमेकांना ऑनलाइन पाहू शकत होते. तर शेवटी आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी संवाद साधत विदाई करताना आभार मानले.
विशेष म्हणजे निवृत्तीच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जसे सर्व निवृत्त कमर्चारी व अधिकाऱ्यांना मानपत्रे व अन्य कागदपत्रे देण्यात येतात ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखा उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

ठाणे - भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ते येथील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपासून वास्तव्यास होते. तेथेच त्यांचा रुममध्ये मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हॉटेल व्यवस्थापनाला रुममधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यावेळेस त्यांच्या निर्दशनास ही बाब आली.हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

बदलापूर - बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शनिवारी आणखी ७ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता २१३ वर पोहचली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे.
शनिवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत. उर्वरित दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला असून एक रुग्ण हा खासगी मराठी वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करतो. अद्याप ३२ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांत शहराच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर १०५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ५६ रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.

मुंबई - सध्या मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यासाठी सरकारने खाजगी डॉक्टरांनाही दवाखाने चालू ठेवण्यास सांगितले आहे.शिवाय आता पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे रोगराईचे लक्षणे वाढू शकतील म्हणून डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी या डॉक्टरांना सरकारतर्फे व्यक्तिगत सुरक्षा साधणे (पीपीई किट) द्यावीत असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
करोना प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त उपस्थित होते.

मुंबई - मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यातील बँकर्स समितीची १४७ वी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी त्यांनी खरीप पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले.बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विविध बँकांना दिली.व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मनोज सौनिक, आशिषकुमार सिंह, विकास खारगे, आभा शुक्ला, एकनाथ डवले आदी अधिकाऱ्यांसह केंद्र शासनाचे प्रतिनिधी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, नाबार्डचे प्रतिनिधी, राज्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल २०२० अखेर ही योजना संपायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या संकटामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी राहिली आहे. बँकांनी आता येत्या खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांची खाती थकीत गृहीत न धरता त्यांनाही नवीन पीक कर्ज देणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांचे आधीचे थकीत कर्ज मुक्त करण्याची हमी राज्य शासन घेत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.कोरोनाच्या काळात शेतकरीही मोठ्या संकटात आला आहे. पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे आवाहन त्यांनी केले.

औरंगाबाद - राजकारणातून संन्यास घेतलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा मृत्यू झाला तर त्याला रावसाहेब दानवे जबाबदार असतील, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंवर सडकून टीका करतानाचा एक व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी युट्यूबवर टाकला आहे.२००४ साली मला शिवसेनेची ऑफर होती, मात्र याबाबत तुम्ही मला कळवले नाही, कारण जबाबदारी तुमच्यावर होती. माझ्या निवडणुकीला तुम्ही पैसे दिले म्हणतात, पण मी आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका माझी संपत्ती विकून लढलो,असे जाधव यांनी म्हंटले आहे. 
तुम्ही फक्त रागातून माझ्यावर खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मला पोलिसांनी हे सांगितले आहे. मी तुमच्यासोबत बोलायला दिल्लीला आलो, तर तुम्ही मला धमकावले. माझ्या आईवर गुन्हा दाखल करायची धमकी दिली. माझ्या प्रॉपर्टीवरून तुम्ही खूप खालच्या भाषेत बोललात. तुम्ही राजकारण करताना घरं भरली, पण आम्ही लोकांचे काम केले. तुम्ही कार्यक्रमात टेबल खुर्चीवर जेवता आणि माझ्या आईला मातीत बसवता, तिचा अपमान करता, असे आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
माझे वडील आयएएस अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, तरी जास्त पैसे कमावलेत. पैसे कमवणे माझे संस्कार नाहीत. मला धमकी देऊन तुम्ही २ महिने दिल्लीला ठेवले. तुमच्या मुलीला तुम्ही काही बोलला नाहीत, फक्त मला धमक्या दिल्यात. माझ्यामागे कोणी नसल्याचे तुम्ही म्हणालात, पण तरीही विधानसभा निवडणुकीत मला मते कोणी दिली? तुमच्यात हिंमत असेल, तर मोदींचा चेहरा बाजूला करा, भाजप बाजूला करा आणि लढून दाखवा, पक्षश्रेष्ठींचे पाय चोळल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, अशी घणाघाती टीका जाधव यांनी केली.तुम्हाला वाटतं हा फार फडफड करतो, कुठेही धरून याला कापून टाकू, पण मी तुमचे छक्के-पंजे असणारे व्हिडिओ काढले आहेत आणि वकिलांना पाठवले आहेत. मला तुम्ही मारलंत किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही, असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. पुणे - शाळा सुरु होणार कि नाही यावर अनेक प्रश्नचिन्न पालकांना पडले असताना त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेऊन राज्यातील शाळा १ जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यात शाळा, कॉलेजदेखील पुढच्या महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा १ जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही. १ जुलैला शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून करता येईल.एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्यादेखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली आहे. 

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी गेल्या एक वर्षात आपल्या सरकारने काय काम केले, याचा हिशेब लोकांसमोर मांडला आहे.तसेच, अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिराचा निर्णय, तिहेरी तलाकच्या कुप्रथेला चाप लावणे आमि नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) अशा ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख मोदींनी या पत्रात केला आहे. 
२०१९ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि भारताला महासत्ता करण्याचे स्वप्न नागरिकांना दाखवले होते. गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांमुळे आपण त्या लक्ष्याच्या समीप पोहोचल्याचे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक करून आपले सामर्थ्य दाखवून दिले. तसेच वन रँक वन पेन्शन, वस्तू व सेवा कर कायदा (GST) आणि शेतकऱ्यांना किमान हमीभाव यासारखे बऱ्याच वर्षांपासून खितपत पडलेले प्रश्न मार्गी लावले. हे प्रयत्न निरंतर सुरु ठेवण्यासाठी जनतेने २०१९ मध्ये जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. आज देशातील १३० कोटी जनता स्वत:ला या विकासगाथेची भागीदार मानत असल्याचे मोदींनी या पत्रात म्हटले आहे.संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्य दलात समन्वय वाढला आहे तसेच ‘गगनयान’ अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे. गरीब, शेतकरी, महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला सरकारने प्राधान्य दिले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी पत्रात सांगितले आहे. 

नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमध्ये नुकतेच १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मार्केटमध्ये चिंतेचा विषय बनला होता. १२ सुरक्षारक्षकांना कोरोना झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने आता खासगी बॉडीगार्ड नेमले आहेत. तसेच मार्केटमध्ये गेल्या काहीदिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे .नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार एपीएमसी मार्केटमध्ये काम करणारे किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ५९० कोरोनाबाधित प्रकरणे आहेत. अशा कठीण परिस्थितीत एपीएमसीच्या नियमित १२ सुरक्षारक्षकांची चाचणीही पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारी न घेता थेट खासगी सुरक्षारक्षकांची निवड केली आहे. या खासगी सुरक्षारक्षकांना (बाऊन्सर) नियमित सुरक्षारक्षकांच्या पगाराच्या दुप्पट रक्कम देऊन त्यांना मार्केटमध्ये तैनात केले आहे.
खासगी बाऊन्सर तैनात करण्याबाबत एपीएमसीचे सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे म्हणाले, कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या आमच्या १२ सुरक्षकांव्यतिरिक्त, लॉकडाऊन कालावधीत गैरहजर राहिलेल्या ४२ सुरक्षारक्षकांना प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे परत पाठविले आहे. त्यामुळे खासगी बाऊन्सर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.मात्र एपीएमसीमध्ये पोलीस आणि होमगार्ड याआधीच तैनात केले गेले आहेत, तर खासगी सुरक्षेच्या कामावर पैसे का घालायचे, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनारजित चौहान यांनी विचारला आहे.मुंबई - नागपाड्यात स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अटक करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे. तसेच अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.२६ मे रोजी रात्री समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी नागपाडा पोलीस स्टेशनबाहेर स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केले आणि लॉकडाऊन दरम्यान लागू असलेला अपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याने त्यांचे ऐकले नाही म्हणून संबंधित महिला अधिकाऱ्याला वाईट शब्दांत शिवीगाळ केली, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोमैया यांनी ट्वीट केला असून अबू आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
महिला पोलिसांना शिवीगाळ करणे, अपमान करणे त्याबरोबरच भारतीय दंडविधान कलम १८८ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. आझमी यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त, तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही सोमैया यांनी तक्रार केली आहे.

मुंबई - मुंबई अग्निशमन दल कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. गुरुवारी अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा कोरोना संसगार्मुळे मृत्यू झाला. हा जवान पश्चिम उपनगरातील गोरेगाव अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर काम करत होता. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने कोरोनामुळे आतापर्यंत दोन जवान गमावले असून गेल्या आठवड्यात गवालिया टँक अग्निशमन केंद्रातील जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील एकूण ४१ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी चार जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तीन जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४ जणांचे त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आले आहे.
गोरेगाव अग्निशमन केंद्रात ड्रायव्हर-ऑपरेटर पदावर सेवेत असलेले रफिक शहाबुद्दीन शेख (५७) यांचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. विरार येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. याआधी ५८ वर्षीय उमेश गोंगा या अग्निशमन जवानाचा २४ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता.
मुंबईत कोरोना साथीने थैमान घातले आहे. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गुरुवारी ३५ हजारपार गेला आहे. या साथीशी लढा देत असताना मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेसोबतच बाकी यंत्रणाही अहोरात्र सेवा देत आहेत. त्यात मुंबईचे पोलीस दल, अग्निशमन दल तसेच अन्य अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांचा प्रत्यक्ष रुग्णसेवेत सहभाग नसला तरी विविध सेवांच्या माध्यमातून हे सर्वजण मुंबईकरांसाठी आपले आरोग्य धोक्यात घालून दररोज घराबाहेर पडत आहेत. त्यातूनच अनेक पोलीस, अग्निशमन जवान, पालिका कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

मुंबई - लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत asun,कित्येक लोक कोठे ना कोठे अडकून पडले आहेत. तसेच परप्रांतीय मजूर गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत. रेल्वेकडून आधी स्पेशल श्रमिक रेल्वे चालविण्यात आल्या आणि येत आहेत. तसेच रेल्वे रुळावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना परराज्यात जाण्यासाठी रेल्वे १ जूनपासून धावणार आहे. या गाड्या आता कोणत्या स्थानकावर थांबणार आहेत, त्याची यादी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी प्रवाशांना पाहणे गरजेचे आहे. गेल.पुढील सोमवारपासून भारतीय रेल्वे २०० अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. परंतु अद्यापही प्रश्न आहे की ज्या गाड्या चालवल्या जातील त्या तुमच्या घराजवळील स्टेशनवर थांबतील की नाही. म्हणून आम्ही येथे तुम्हाला खास ट्रेनची सर्व माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्हाला तिकीट आरक्षण करताना त्रास होणार नाही.

पिंपरी - आज औंध रावेत उड्डाणपूलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवणार क? असा प्रश्न विचारला असता,या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेले २१ लाख कोटी कोणाला भेटणार या बाबत अनेक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले. काही तर म्हणत आहे नुसतेच मोठमोठे आकडे आहेत, असे सांगत अजित पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार आहे.लाखो मजूर परत गेले आहेत. त्यांची वाट बघण्यापेक्षा आता स्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी स्किल देण्याची गरज असेल तर राज्य सरकार त्यासाठी तयार आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारी कमी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
लोकभावनेचा आदर करून आषाढी वारीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकट लक्षात घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही पवार यावेळी म्हणाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि राज्यात जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. फक्त नियम पाळा आणि चालत जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असताना त्यानंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.राज्यातील अर्थचक्र सुरु करण्यासाठी ३१ मेनंतर लॉकडाऊनध्ये आणखी शिथिलता दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रीन झोनमध्ये बऱ्यापैकी व्यवहार सुरु करण्याचा राज्याचा विचार आहे. मात्र, यासाठी काही निमय व अटी निश्चित घालण्यात येणार आहेत. नियम व अटींचे उल्लंघन केल्यास हे व्यवहार बंद केले जातील, याची कल्पना नागरिकांना देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाचा कहर असल्यामुळे देशात लॉकडाऊन चालू आहे.त्यामुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामाला खूपच विलंब झाला असून मनुष्यबळदेखील कमी आहे. अशा परिस्थितीत नालेसफाईत कोणताही घोळ होऊ नये म्हणून नालेसफाईच्या कामावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सर्वत्रच सफाईच्या कामावर चोख लक्ष ठेवले जाणार आहे.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई क्र मप्राप्त असते. नालेसफाईत काही वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नालेसफाईतून गाळ व्यवस्थित काढला जात नसल्यामुळे मुंबईत दरवर्षी पाणी तुंबत असल्याचेही आरोप होत असतात. त्यामुळे नालेसफाईतील गैरप्रकार रोखण्यासाठी सफाईची छायाचित्रे व ध्वनीचित्रफिती, गाळाचे वजन करणे अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यापुढे जाऊन आता नवनियुक्त महापालिका आयुक्तांनी ड्रोनने नालेसफाईवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी अपेक्षित नालेसफाई झाली नाही, त्या ठिकाणी तत्काळ पुन्हा तपासणी करून घेतली जाते.२९ मेपर्यंत पालिका अशा प्रकारे नालेसफाईवर ड्रोनने नजर ठेवणार आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत देण्यात आली. ड्रोनने टिपलेल्या माहितीचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा जास्त आहे. त्याचाही अंदाज येईल. त्यानुसार पुढील नियोजनही करता येणार आहे.

अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरुवात झाली असून, त्यावरून पाकिस्तानने भारतावर टीका केली आहे.पाकिस्तानच्या या टीकेनंतर साधुसंत संतप्त झाले आहे. पाकिस्तानने आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नये. अन्यथा आम्ही इस्लामाबादमध्येच राम मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अंसारी यांनीही पाकिस्तानला चार शब्द सुनावले आहेत.अयोध्येतील संतांनी सरकारला सांगितले की, पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे. पाकिस्तान भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. आता अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे,अशी त्यांचीही इच्छा आहे.
दरम्यान,पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राम मंदिराच्या बांधकामावरून भारतावर टीका केली होती. एकीकडे जग कोरोनाशी झुंजत असताना आरएसएस आणि भाजपा आपला अजेंडा रेटण्यामध्ये गुंतलेले आहेत. बाबरी मशिदीच्या जागेवर सुरू झालेले मंदिराचे बांधकाम हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पाकिस्तान सरकार आणि येथील लोक त्या कृतीचा निषेध करतो, अशी टीका पाकिस्तानने केली होती.

कोलकाता - राज्य सरकार करोनाची परिस्थिती सांभाळण्यात अयशस्वी ठरते असे वाटत असेल तर तुम्हीच प्रयत्न करा आणि स्वत: परिस्थिती हाताळत का नाही ? अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावले आहे, ममता बॅनर्जी यांनी रेल्वे मंत्र्यांवर गंभीर आरोप केले असून स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरुन राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातून पुढील २४ तासात २८ ट्रेन पोहचणे अपेक्षित आहे.
मी अमित शाह यांना सांगितले आहे की, तुम्ही वारंवार केंद्रीय टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवत आहात. तुम्ही जे हवे ते करु शकता. पण जर पश्चिम बंगाल सरकार योग्य काम करु शकते असे तुम्हाला वाटत नसेल तर मग तुम्हीच हे करोना संकट का हाताळत नाही ? मला काहीच समस्या नाही. ममता बॅनर्जी कोलकातामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी त्यांनी हा पत्रकार परिषद बोलावली होती.अमित शाह यांनी जे उत्तर दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानले. त्यांनी निवडून आलेल्या सरकारमध्ये आपण दखल कसे काय देऊ शकतो असे म्हटले,असेही ममता बॅनर्जी बोलल्या.
करोनावरुन पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध रंगले आहे. केंद्रीय गृहसचिव आणि बंगालचे मुख्य सचिव यांनीही एकमेकांना पत्र पाठवली असून संताप व्यक्त केला आहे. अमित शाह यांनीदेखील करोनाची परिस्थिती हाताळण्यात असणाऱ्या त्रुटी दाखवणारे पत्र ममता बॅनर्जी यांना लिहिले होते. पण ममता बॅनर्जी यांनी पत्राचे उत्तर देण्याआधीच हे पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ममता बॅनर्जी यांनी टीका केली होती.
“मी हे असे जाहीर करत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता मला अमित शाह यांना एकच सांगायचे आहे की, काळजी घ्या. तुम्ही लॉकडाउन लावला आहे पण ट्रेन आणि विमाने सुरु आहेत. मग लोकांचे काय?,” अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
“मला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी घ्या असे सांगायचे आहे. आपल्याकडे आधीच करोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. काहीजण राजकारणासाठी फैलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सगळीकडे फैलाव होत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे? पंतप्रधानांनी अशा वेळी मध्यस्थी करावी,” अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

मुंबई - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत त्यातच मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून,रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळण्यात अडचणी येत आहेत तर दुसरीकडे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने’ मुंबईतील प्रत्येक वॉर्डात १२ मोफत टॅक्सी रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला सादर केला आहे. यासाठी टॅक्सीत आवश्यक त्या सुधारणा करून रुग्णांना मोफत सेवा देण्याची तयारी मनसेने दाखवली आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे महापालिका १०८ क्रमांकाच्या माध्यमातून चालवत असलेल्या रुग्णवाहिकांमधील ३२ चालकांना करोनाची लागण झाली आहे. बेस्टच्या काही बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून आता उबर टॅक्सीच्या माध्यमातून सुमारे ४५० रुग्णवाहिका मुंबईत चालविण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने रुग्णांसाठी वीस हजार खाटा असलेली तात्पुरती रुग्णालये मुंबईत उभारण्याचा सपाटा लावला आहे. बी के सी, महालक्ष्मी, वरळी, गोरेगाव, मुलुंड ते दहिसरपर्यंत ही तात्पुरती रुग्णालये उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय जूनपर्यंत एक लाख क्वारंटाईन सेंटर व जूनच्या मध्यावधी पर्यंत दीड लाख लोकांची क्वारंटाइन केंद्रात व्यवस्था केली जाणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.
रुग्णांना वेळेत रुग्णालयात अथवा क्वारंटाइन केंद्रात पोहोचवण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची गरज लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नेमकी ही अडचण ओळखून त्यांच्या संघटनेतील टॅक्सी व रिक्षा चालकांची बैठक घेऊन टॅक्सी-रिक्षा रुग्णवाहिकांची संकल्पना मांडली” असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. आमच्या संघटनेतील जवळपास हजाराहून अधिक रिक्षा टॅक्सी चालकांनी या संकल्पनेला मान्यता दिल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आम्ही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना भेटून दिला. यानंतर सुरेश काकाणी यांनी टॅक्सीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील असे सुचवले त्यानुसार आम्ही बदल करण्याची तयारीही केली आहे. आम्ही प्रत्येक विभागासाठी १२ टॅक्सी व रिक्षा तयार ठेवल्या आहेत. या रुग्णांना मोफत रुग्णालय वा क्वारंटाईन केंद्रात रुग्णांना पोहोचवतील, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.महापालिका नियंत्रण कक्षमधून पालिकेच्या विभाग कार्यालयाला रुग्णवाहिकेसाठी कळवले जाईल व जेथे रुग्ण असेल तेथून संबंधित विभाग कार्यालयातून टॅक्सी चालकाला मोबाईलवर संदेश जाऊन तो रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाईल, असे संदीप देशपांडे म्हणाले. ही सर्व सेवा मोफत असून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ही टॅक्सीरुग्णवाहीका चालवली जाणार आहे. .

कर्नाटक - करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारने आज गुरूवारी मोठा निर्णय घेतला. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.देशात करोनामुळे अनेक राज्यांची स्थिती गंभीर आहे. कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
करोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकने थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.

अकोला - लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून लॉकडाउन बाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. अकोला करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक स्तरावर क्वारंटाइन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाईल. मूल्यांकनात काही चुकीचे आढळले तर कारवाई केली जाईल. मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. १ ते ६ तारखेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर कऱण्यात आला आहे. सगळं काही बंद असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.क्वारंटाइन करणे, रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. संचारबंदीत मेडिकल तसंच शेतीच्या काही कामांना सवलत देणार आहोत. नियमांचे उल्लंघन कऱणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

मुंबई – काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली, राज्यातील काँग्रेसमध्ये नेतृत्वात बदल करण्याची भूमिका नेतृत्वाची आहे असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहे. या प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची निवड करण्यात येईल तर रिक्त होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदात कोणता रस नाही, भाजपातून काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचे आश्वासन मिळाले होते.पुढील काळात राज्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला गरज पडणार आहे. त्यासाठी नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीत गळ घातली आहे.दिल्लीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा महत्त्वाचा नेता सरकारच्या बाहेर राहणे हे पक्षासाठी चांगले नव्हते, त्यासाठी संघटनात्मक दृष्टीतून पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष पद देऊन नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येऊ शकते. राज्यात आमचा सरकारला पाठिंबा आहे पण डिसिजन मेकर नाही असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सरकारमधील काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, पक्षाने विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते स्वीकारले, प्रदेशाध्यक्ष पद दिले तर तेही काम करुन दाखवू, प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. तर विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत कुठलीही चर्चा माझ्याशी झालेली नाही, पण पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.

मुंबई - देशात कोरोनाचा प्रसार अजूनही थांबल्याची चिन्ह दिसत नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार होतच असून, चाचणी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. कोरोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारले जाते. मात्र, आता लवकरच कमी पैशात कोरोनाचे निदान करणे शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीने कोरोनाचे निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे.
कोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी माहिती दिली. कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अ‍ॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचे प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झाले आहे, असं मांडे यांनी सांगितलं.
आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे. कारण त्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी काहीच खर्च नाही. त्याचबरोबर ती जलदगतीनं करता येते. वेगवेगळ्या भागातही कोरोनाच्या निदानासाठी या चाचणीचा वापर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्रामीण भागातही तातडीने घेऊन जाऊन शकतो, असे ते म्हणाले.सीएसआयआरने हे जाहीर केले की, जम्मूतील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीन आणि रिलायन्स उद्योग एकत्र येऊन कोरोनाचे निदान करणारी एक नवीन आरटी-लॅम्प किट विकसित करणार आहे. याविषयी बोलताना मांडे म्हणाले,या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच कोरोना चाचणीचा रिपोर्ट आपल्याला मिळू शकतो, अशी माहिती मांडे यांनी दिली.

रायपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता या गोष्टींना सध्या भरपूर महत्त्व आले आहे. मात्र, छत्तीसगडच्या विलगीकरण केंद्रांमध्ये या दोन्हीपैकी काहीच दिसून येत नाही.शेकडो किलोमीटर पायी चालत येऊन, जेव्हा स्थलांतरीत कामगार आपल्या गावी पोहोचतात, तेव्हा तातडीने त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात येते. मात्र ही विलगीकरण केंद्रे अशी आहेत, की,तेथे कोणतीच पिळवणूक केली जात नसल्याने विलगीकरण कक्षांमध्ये आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे.१४ मेला एका तरुणाने केलेल्या आत्महत्येने राज्यातील विलगीकरण कक्षांमधील पहिला बळी नोंदवला गेला होता. त्यानंतर १७ मे रोजी मुंगेलीमधील विलगीकरण कक्षात एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. हा व्यक्ती पुण्याहून परतला होता. १९ मेला बालोडमधील एका विलगीकरण कक्षात सूरज यादव या व्यक्तीने आत्महत्या केली. २० मेला बलरामपूरमधील विलगीकरण कक्षात रुजू असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर बेमेतारामधील एका विलगीकरण कक्षात राजू ध्रुव या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तर, राजनंदगावमधील विलगीकरण कक्षात २१ मे रोजी आणखी एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर, २५ मेला अंबिकापूरच्या विलगीकरण कक्षात एका व्यक्तीने आत्महत्या केली.२६ मे रोजी एका कामगाराचा राजनंदगावमधील विलगीकरण कक्षात मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी बालोदमधील विलगीकरण कक्षात एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २८ मेला गरियाबंद विलगीकरण केंद्रावर एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.यामुळे छत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रे कितपत सुरक्षित आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने स्थलांतरित मजुरांबाबत राज्य आणि केंद्र सरकारला काही निर्देश दिले आहेत. यामध्ये न्यायालयाने या मजुरांच्या खाण्याची आणि राहण्याची तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले आहे. स्थलांतरित मजुरांसमोर असलेल्या अडचणींविषयी आम्हाला काळजी आहे. त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींमध्ये रजिस्ट्रेशन, प्रवास तसेच अन्न आणि पाण्याची सोय या सर्व गोष्टींमध्ये त्रुटी दिसून येत आहेत, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश दिले 
मजुरांकडून रेल्वे अथवा बसचे प्रवास भाडे आकारू नये. राज्यांनी हे प्रवासभाडे वाटून घ्यावे.राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये अडकलेल्या मजूरांच्या अन्नाची आणि राहण्याची व्यवस्था संबंधित प्रशासानाने करावी. तसेच, त्याबाबत त्यांना माहिती द्यावी. जोपर्यंत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हे करावे.स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासाठी असलेल्या नोंदणी प्रक्रियेवर प्रशासनाने लक्ष ठेवावे.ज्या राज्यातून हे मजूर निघणार आहेत, त्या राज्याने प्रवासापूर्वी त्यांना अन्न आणि पाणी पुरवावे. तसेच, प्रवासादरम्यान रेल्वेने त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी.स्थलांतरित मजुरांसंबधी घेण्यात येणारे सर्व निर्णय जाहीर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. याप्रकरणी पुढील सुनावणी पाच जूनला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे चार दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशभरातील महत्वाच्या ११ शहरांमध्ये लॉकडाऊन चालू ठेवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या शहरांत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशभरातील या शहरांमध्येही लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ३१ मे नंतर धार्मिक स्थळे खुली केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिले आहे.या पत्रात पवारांनी बांधकाम व्यवसायाच्या परिस्थितीबाबत लिहिले आहे.कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असे पवारांनी या पत्रात नमूद केले आहे. बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावे आणि आवश्यक पावले उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे. 
याआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मेरोजी आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मेरोजी पत्र लिहिले होते. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या.

जम्मू-काश्मीर - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिजबुलचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. पुन्हा एकदा गाडीमध्ये IED स्फोटकं भरून हिजबुलचा दहशतवादी कार चालवत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सायकलचा नंबर लावून सेन्ट्रो कार या हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने हा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा मोठा घातपात थोडक्यासाठी टळला आहे.
पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल यांनी एकत्र येऊन कारवाई केली. या गाडीमध्ये IED स्फोटकं होती. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात जवानांना यश आले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ही गाडी चालवत असल्याचे सांगितले जात आहे. गाडीतून जवानांवर तुफान गोळीबार करण्यात आला. मात्र काहीवेळानंतर हा दहशतवादी गाडी सोडून फरार झाला. या प्रकरणाची चौकशी NIA करणार आहे. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही गाडी पकडण्यात आली
हिजबुल आणि लष्कर ए तोएबा दोघांचा मिळून मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती सुरक्षा दलाला रविवारी मिळाली होती. त्यामुळे पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल सतर्क होते. हे फोटो पाहून केवढ्या मोठ्या हल्ल्याचा कट असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.

आसाम - आसाम राज्यात बुधवारपासून पाऊस कोसळत आहे. आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसाचा ११ जिल्ह्यातील सुमारे तीन लाख लोकांना फटका बसला आहे. तर ब्रह्मपूत्रा नदी ओसंडून वाहूत असून अतिवृष्टीमुळे राज्यातील किमान सात जिल्हे बाधित झाले आहेत.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अहवालानुसार गोलपारा जिल्ह्यातील रोंगजुली येथे एकाचा मृत्यू झाला. धेमाजी, लखीमपूर, नागाव, होजई, दरंग, बारपेटा, नलबारी, गोलपारा, पश्चिम कार्बी आंग्लोंग, दिब्रूगड आणि तीनसुकिया या जिल्ह्यात सध्या सुमारे दोन लाख ७२ हजार लोक पूरग्रस्त झाले आहेत.
गोलपारा हा सर्वाधिक बाधित जिल्हा असून २.१५ लाख लोक प्रभावित झाले असून, त्यानंतर नालबारीतील २२,००० आणि नागगावमधील सुमारे ११,००० लोक आहेत. गोलपारा येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफने नऊ जणांची सुटका केली आहे, तर बाधित नागरिकांमध्ये १७२.५३ क्विंटल तांदूळ, डाळ, मीठ आणि ८०४.४२ लिटर मोहरीचे तेल आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप केले.
ब्रह्मपूत्रा जोरहाटच्या निमगिघाट येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ३२१ गावे पाण्याखाली गेली असून २,६७८ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अधिकारी पाच जिल्ह्यात ५७ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवित आहेत. ज्यात १६,७२० लोकांनी आश्रय घेतला आहे.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ या कायद्यामध्ये राज्यातील अनुसूचित क्षेत्रासाठी महत्वाची सुधारणा करण्यात आल्याने, आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायद्याच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत. वन हक्क कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत, अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे.
सदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरीता लागू असेल. नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीयस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे. जिल्हास्तरीय समिती कडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. आता या अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खासगी रुग्णालयांसाठी देखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली असून परिचारिकांच्या संघटनांबरोबर चर्चा करून काम न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत दूरचित्रसंवादाद्वारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या खासगी रुग्णालयांमध्ये १०० पेक्षा जास्त खाटा आहेत, त्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा शासकीय नियंत्रणाखाली घेण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खासगी रुग्णालय प्रशासनासोबत बैठकही घेतली होती. त्यामध्ये रुग्णालयांनी परिचारिका काम सोडून जात असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची कमतरता अशा कारणांमुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिकांनी काम सोडून त्या मूळ गावी परतल्या आहेत किंवा परतत आहेत.या पार्श्वभूमीवर डॉ. म्हैसेकर म्हणाले, खासगी रुग्णालयांमधून परिचारिका काम सोडून जात असल्याचे खरे आहे. मात्र, त्यांनी काम सोडून जाऊ नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. .

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget