मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा प्रश्न मिटला ; विधानपरिषद निवडणूक २१ मे रोजी निश्चित

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा प्रश्न मिटला असून,विधान परिषदेची निवडणूक २१ मे रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर मिळाल्याने उद्धव ठाकरे २८ मे पूर्वी विधान परिषदेचे सदस्य बनून मुख्यमंत्रिपदी कायम राहतील हे आता निश्चित झाले आहे.गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्य होण्याच्या मार्गातील अडथळ्यांमुळे जे राजकारण रंगलं ते एखाद्या रंगतदार सामन्यापेक्षा कमी नव्हते.राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती करावी अशी शिफारस राज्य सरकारने दोनदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. पण राज्यपालांनी अशी नियुक्ती करणे टाळल्याने भाजप आणि शिवसेनेत चांगलेच राजकारण रंगले. एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालांशी गाठीभेठी वाढल्या आणि दुसरीकडे राज्यपालांना विनंती करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्याही फेऱ्या वाढल्या. पण राज्यपालांनी सस्पेन्स कायम ठेवल्याने राज्यात राजकीय पेच निर्माण होणार का ? भाजप या परिस्थितीचा फायदा उठवणार का? याचीही उत्सुकता वाढली होती. 
राज्यपाल मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहेत असे लक्षात येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच फोनवरून चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन शिष्टाई केली. या भेटीत त्यांनी राज्यपालांबरोबल विधानपरिषदेच्या पुढे ढकललेल्या ९ जागांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. निवडणूक लवकर घेण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यासाठी राज्यपालांना या भेटीत विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे याबाबतचे पत्र राज्यपालांना देण्यात आले.त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणूक लवकर घेण्याबाबत कळवले आहे. आयोगाची तातडीची बैठक झाली त्यात निवडणूक २७ मे पूर्वी घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही निवडणूक आता २१ मे रोजी होईल असेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना निवडून येण्याची सहा महिन्याची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच आमदार होतील, हे आता निश्चित झाले आहे. 
दरम्यान, भाजप नेत्यांच्या राज्यपालांकडे होत असलेल्या गाठीभेटीमुळे भाजप नेत्यांच्या मनात नेमके काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. कोरोनाच्या संकटात भाजप नेते राजकारण करत असल्याची टीकाही झाली. पण राज्यपाल मात्र घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते सरकार वाचवण्यासाठी घटनात्मक सर्व अस्त्र आणि पर्याय वापरण्याच्या प्रयत्नात होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget