June 2020

मुंबई - मुंबईत सोमवारी विविध भागांमध्ये मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासणी नाक्यांमुळे काल मुंबईत ही वाहतूक कोंडी झाली.या तपासणी दरम्यान पोलिसांनी एकाचदिवसात तब्बल १६ हजार वाहने जप्त केली. या वाहन चालकांना आपण का बाहेर निघालोय? प्रवासाचे कुठलेही ठोस कारण पटवून देता आले नाही. त्यामुळे या १६ हजार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
नव्या निर्देशानुसार, ऑफिस आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरापासून दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर विनाकारण प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणी रक्त चाचणीसाठी, किराणा सामान आणण्यासाठी किंवा बीपीओमध्ये कामावर जाण्यासाठी निघाले असले, तरी त्यांची वाहन पोलिसांनी तपासणी केली. जवळपास ३८ हजार गाडयांची तपासणी करण्यात आली.पोलिसांच्या या तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार सोपे लक्ष्य ठरले. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गाडयांपैकी ७२ टक्के दुचाकी आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आळंदी (पुणे) - यंदा आषाढी वारीवर कोरोनाचे संकट आहे. आज अलंकापुरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दुपारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस तयार करण्यात आली असून २० वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आजोळ घरी म्हणजेच देऊळवाड्यात चौदा दिवसांचा मुक्कामाला होत्या. आषाढी वारीच्या परंपरेनुसार चौदा दिवस देऊळवाड्यात हरिनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या नादात भजन कीर्तनाचा सोहळा घेण्यात आला. मंगळवारी माऊलींच्या पादुका पंढरीच्या दिशेने निघणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाची विठाई बस सज्ज करण्यात आली आहे. पालखीसोबत २० वारकरी जाणार आहेत.पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसचे एसटी बसचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मास्क हॅन्डग्लोज, असे साहित्य दिले जाणार आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत शासनाकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न शासनाकडून होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मास्कचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळे, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, सार्वजनिक जीवनात वावरताना मास्क लावणे हे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानाही प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा सामुहिक कार्यक्रमाला येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल. प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषध दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करून वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे.महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. प्रत्येकवेळी एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल. पोलीस दल तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील, असे पालिकेने कळविले आहे.

मुंबई - 'टिक टॉक' आणि 'हॅलो' या अतिशय लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरात असणाऱ्या ऍपसह इतरही चिनी बनावटीच्या ऍपवर भारतात बंदी आणण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात त्यामागोमागच आता गुगल आणि अँपल नेही या ऍपना झटका दिला आहे. 
जगभरात अतिशय नावाजलेल्या या ऍपना गुगल आणि अँपलने त्यांच्या ऍप स्टोअरवरुन हटवले आहे. सोमवारी रात्री केंद्राकडून ५९ ऍपवरील बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी तातडीने गुगल आणि अँपलने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. त्यामुळे आता कोणाही भारतीय युजरला हे ऍप डाऊनलोड करता येणार नाहीत. 
सध्या हाती येणाऱ्या माहितीनुसार गुगलकडून प्ले स्टोअरवरुन आणि आणि ऍपल कडून ऍपल स्टोअरवरुन काही चिनी ऍपवर बंदी आणण्यात आली आहे. पण, केंद्राकडून नमूद करण्यात आलेले काही ऍप मात्र अद्यापही ऍप स्टोअरवर दिसत आहेत. असे असले तरीही ऍपल किंवा गुगल यांपैकी कोणीही याबाबतची अधिकृत माहिती मात्र प्रसिद्ध केलेली नाही. 
भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या आणि असंख्य युजर असणाऱ्या टिक टॉक या ऍपवरही कारवाईचा बडगा येताच टिक टॉक इंडियाकडून एका जाहिर निवेदनातून स्पष्टीकरण देण्यात आले. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता आपल्याला प्राधान्यस्थानी असून, आतापर्यंत कोणच्याही युजरची माहिती ही परदेशी सरकारला किंवा चिनी सरकारला देण्यात आली नसल्याचे या निवेदनात म्हटले गेले होते.

विशाखापट्टणम - येथील साईनार फार्मा कंपनीत बेन्जिन गॅस गळती झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना येथील परवाडा फार्मा सिटी येथे घडली. घटनेनंतर जिल्हाधिकारी विनयचंद आणि पोलीस आयुक्त मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. 
यातील जखमींवर आर. के. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एल. व्ही. चंद्रशेखर (३७), पी. आनंदबाबू (४१), डी. जानकीराम (२४) आणि एम. सूर्यनारायण (२९) अशी जखमींची नावे असून चंद्रशेखर यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर आर. नरेंद्र आणि एम. गौरीशंकर अशी मृतांची नावे आहेत.तीन दिवसांतील ही राज्यातील दुसरी घटना -कर्नूल जिल्ह्यातील एसपीवाय कंपनीत २७ जूनला वायू गळती झाली होती. त्यात कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. ही घटना नांदल्या भागात घडली होती. श्रीनिवासराव असे मृत महाव्यवस्थापकाचे नाव होते. कंपनीतील एका पाइपमधून अमोनिया वायूची गळती झाली होती. दुरुस्ती केलेला पाइपच फुटल्याने ही वायूगळती झाली होती. एसपीवाय ही कंपनी नंदी ग्रुपच्या मालकीची आहे

मुंबई - कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ३ लाख २१ हजार ७२२ लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत.

अनंतनाग - जिल्ह्यातील वाघामा परिसरात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी असल्याचा सुरक्षा दलाला शंका असल्याने आसपासच्या परिसरात शोध मोहिस सुरु करण्यात आली आहे.
याबाबत जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक जवान और पाच वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना या चकमकीत ठार केले आहे.सोमवारीही अनंतनाग जिल्ह्याच्या के खुलचोहर परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यात अनंतनाग जिल्ह्यातील हिज्बुल कमांडर व एक लष्कर-ए-तैयबाच्या कमांडराचा समावेश होता.यापूर्वीही २६ जून रोजी पुलवामा जिल्हातील त्रालजवळील चेवा उल्लार परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यानंतर त्राल क्षेत्रातील हिजबुल मुजाहिद्दीनचा सफाया झाला होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे.

पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे.कोविड -१९ च्या साथीमुळे प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत २० जणांना जाण्याची मुभा देण्यात आली आहे. 
दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात आज ३० जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने सोमवारी पत्रकार परिषदेत केले. 
फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते, विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. संपूर्ण जगावर आलेले हे संकट दूर व्हाव म्हणून विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहे. दरम्यान, प्रथेप्रमाणे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंब, जिल्हा पालकमंत्र्यांचे कुटुंब, मंदिर समिती आणि सल्लागार समिती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पूजा करतील आणि जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यावेळी उपस्थित असतील. ज्यांना पंढरपुरातून दुसऱ्या गावात जायचे आहे, त्यांनी इतर मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथे आज रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर इथल्या पादुकांचा यात समावेश आहे.

मुंबई - मुंबई येथील प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पाकिस्तानातील कराचीहून सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या फोन कॉलनंतर ताज हॉटेलबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानहून समुद्रामार्गे १० दहशतवादी आले होते. यावेळी हे दहशतवादी ताज हॉटेल येथेही घुसले होते. यातील ९ दहशतवाद्यांना कंठस्थान घालून एकाला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. जिवंत पकडण्यात दहशतवाद्याचे नाव अजमल कसाब होते. त्याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली.

...तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल
बिगीन अगेन महाराष्ट्राचा दुसरा टप्पा लवकरच घोषित केला जाणार असल्याने वाढत चाललेली रुग्णसंख्या आणि लॉकडाउन शिथिलीकरण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. अखेर ही उत्सुकता संपली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. 
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या लाईव्हमध्ये प्रथम त्यांनी १ जुलै हा कोरोना यौद्धांचा असणार आहे. १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर दिन आहे. तसेच १ जुलै शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. या दोन्ही दिवसाकरता त्यांचे आभार मानले आहेत.
३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच हे सगळे असेच सुरु राहणार का? तर त्याचेही उत्तर नाही असेच आहे.पुढे ते म्हणाले, सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळे सुरु केले म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असे समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे. आपले सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे डगमगून जाऊ नका असे आवाहन केले.
होळी झाली त्यानंतर कोरोना आला नंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असे मी म्हणणार नाही.मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी. आता गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत. त्यामुळे सर्वधर्मीयांचे आभार मी मानतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आषाढी एकादशी निमित्ताने विठूरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे आणि हे संकट दूर व्हावे म्हणून साकडे घालणार असल्याचे  उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाउनचे कठोर नियम पुन्हा पाळावे लागतील. आज मी तुम्हालाच विचारतोय तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का? जर नको असेल तर मास्क लावणे, हँड सॅनेटायझर वापरणे, हात धुत राहणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, उगाच गर्दी न करणे हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल. तुम्हाला लॉकडाउन हवाय का? तुम्ही नियम पाळले नाही तर मात्र लॉकडाउन पुन्हा लागू करावा लागेल असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

मुंबई - मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे मुंबईतील मुलांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली आहे. पश्चिम मुंबईतील एका रुग्णात या आजारीची लक्षण आढळून आली आहे. भारतात कावासाकी आजारी लक्षण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.
मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला दाखल करण्यात आले आहे. या मुलाल तीव्र ताप होता आणि शरिरावर डाग असल्याचे आढळून आले आहे. शरिरावर आलेले हे डाग कावासाकी आजाराची लक्षण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही दिवसांनी या मुलाची प्रकृती अचानक खालावली, त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या मुलावर वेगवेगळी औषधांसह टोसिलजेमेब दिले जात आहे. या मुलाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यालाही कोरोनाची लागण झाली.धक्कादायक म्हणजे, भारतातच नाहीतर इतर देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षणे आढळून आली. एप्रिल महिन्यात अमेरिका, स्पेन, इटली आणि चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्णामध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. अमेरिकेत आतापर्यंत ५८ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. कावासाकी आजाराची लक्षण ही शक्य तो ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळून येतात.
बालरोग तज्ञ तनु सिंघल यांनी सांगितले की, कावासाकी आजारीची लक्षण आढळून आलेल्या युवकांची प्रकृती लवकर खालावत जाते. अशावेळी त्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे.तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, हात पाय सुजणे आणि ओठांना भेगा अशी लक्षण कावासाकी आजारीची आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल करा, असे आवाहन केले आहे.

पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन महिने संचारबंदीची झळ सहन केल्यानंतर पंढरपूर शहरात आता पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत २९ जून ते २ जुलै या काळात चार दिवसांची संचारबंदी लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिक, महाराज मंडळी आणि व्यापारी वर्गातून नाराजीचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. 
कोरोना महामारीच्या सावटामुळे यंदा आषाढी यात्रेची गर्दी पंढरीत पाहायला मिळणार नाही. मात्र, आषाढी वारीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने मानाच्या नऊ पालख्या व काही मोजके मानकरी यांना आषाढीसाठी पंढरीत येण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच सध्य स्थितीत पंढरपुरात कोरोनाचा कोणताही प्रादुर्भाव नाही. मात्र, प्रशासनाकडून आषाढी वारी काळात पुन्हा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय कशासाठी घेतला आहे, असा सवाल आता नागरिकांमधून केला जात आहे.आषाढीच्या निमित्ताने दर्शनासाठी पंढरीत गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने २९ जून ते २ जुलै दरम्यान पंढरपूर आणि दहा किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरू केली आहे. शासनाच्या आदेशाने मंदिर तर बंदच आहे. परंतु जवळपास तीन महिने व्यापारी आपली दुकाने उघडू शकलेले नव्हते. या प्रदीर्घ बंदमुळे पंढरीचे आर्थिक चक्र जागीच थांबले असून छोटे व्यापारी तर यातून सावरणे अशक्य असताना पुन्हा चार दिवसांची संचारबंदी त्रासदायक ठरणार असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त केले जात आहे.आषाढी काळात संचारबंदी लागू न झाल्यास भाविकांची गर्दी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांसाठी बाहेरच उपाययोजना करावी आणि येणारी गर्दी रोखावी, स्थानिक नागरिकांना पुनः संचारबंदीला सामोरे जायला लागू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नाशिक - शहरातील नामांकीत खासगी हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांना लूट असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लाखो रुपये आकारणाऱ्या या हॉस्पिटलचा महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पर्दाफाश केला आहे. या हॉस्पिटलच्या विरोधात याआधी अनेक तक्रारी येऊनसुद्धा कानावर हात ठेवलेल्या महानगरपालिकेने अखेर अशा रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिक शहरात गेल्या २५ दिवसात कोरोनाबधितांचा आकडा एक हजारांनी वाढला आहे. अशात शासनाच्या हॉस्पिटलसोबत काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, त्याठिकाणी रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांसाठी उपचारासाठी लाखो रुपये रुग्णांकडून वसूल केले जात आहेत.इंदिरानगर भागातील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलबाबत दोन तक्रारी प्राप्त झाल्याचा दाखला शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी दिला होता. बिलाच्या नावाने लुटीचा पर्दाफाशही केला आहे. पंचवटीमधील मनोज लुंकड यांचे काका सुरेश लुंकड यांना न्यूमोनिया झाला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची तीन दिवसांनी कोरोना टेस्ट घेतली ती निगेटिव्ह आली. दहा दिवसांनी पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. या काळात रुग्ण मृत झाले. मात्र, हॉस्पिटलने २४ दिवसाचे बिल तब्बल १२ लाख आकारले. तसेच रोज ५० हजार रुपये भरण्याची सक्ती नातेवाइकांना करण्यात आल्याचा अनुभव लुंकड परिवाराला आला. असाच प्रकार सुभाष तिडके यांना आला आहे. त्यांच्याकडून २३ दिवसांचे बिल तब्बल ८ लाख रुपये वसूल कऱण्यात आले. याबाबत स्थानीक आरोग्य यंत्रणा कुठलाच न्याय देत नसल्याने या रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी सहयाद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारानंतर हॉस्पिटलने त्यांना ६० हजार २२७ रुपयांचे बिल दिले. मात्र, शासन नियमानुसार ४९ हजारांचे बिल देणे अपेक्षीत असताना त्यांच्याकडून अतिरिक्त बिल वसूल केले. याबाबत आहिरे यांनी महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलला महानगरपालिकेन नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या नावाने रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आहिरे यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शहरातील तिनही आमदार भाजपचे आहेत. अशात कोरोनाच्या नावाने शहरात नामांकित हॉस्पिटलकडून मोठी आर्थिक लूट होत असताना सत्ताधारी शांत का? या हॉस्पिटल विरोधात कारवाई का होत नाही ? फक्त नोटीस देण्याचे सोपस्कार नको. आम्ही यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तक्रार करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे.

सातारा - रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे. तर चेअरमनपदी पुन्हा डॉक्टर अनिल पाटील यांची वर्णी लावण्याचे निश्चित करण्यात आले. अनिल पाटील हे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांचे नातू आहेत. संस्थेच्या सचिवपदी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली. त्याचबरोबर पाच उपाध्यक्ष, २४ जणांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली 
अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज होता. मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर यांच्यासह २४ जणांची निवड झाली. यामध्ये १२ सदस्य हे राजकीय क्षेत्रातील तर ११ सदस्य हे शिक्षकांमधून निवडले गेले.
रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी (उच्च शिक्षण) प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड आणि माध्यमिक सहसचिवपदी मुख्याध्यापक नागपुरे यांची निवड निश्चित झाली. ही निवड अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, रामशेठ ठाकूर, एन डी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील बैठकीत कार्याध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर सहसचिव आणि विभागीय अध्यक्षांची निवड पहिल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत होणार आहे.सचिवपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर शिवणकर यांनी हा माझा बहुमान असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली - भारत-चीनमध्ये गलवना खोऱ्यात झालेल्या चकमकीचा फटका भारतीय उद्योगपतींना बसला आहे.चीनमधून भारतात मागवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईलचे कंसाईंनमेंट कस्टमच्या गोडाऊनमधे पडून आहे. त्यामुळे उद्योगपतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.भारतीय कस्टम विभागाने चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे चीनमधून वस्तू मागवताना उद्योगपतींनी विचार करावा यासाठी कस्टम विभागाची ही खेळी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील अनेक गोडाऊनमध्ये चीनहून आलेला माल तसाच पडून आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया सेल्लुलर आणि इलेक्ट्रॉनिक गुड्सचे चेअरमन पंकज महींद्रू यांनी केंद्रीय रिव्हेन्यू सचिवांना पत्र लिहिले आहे.
डीएचएल या कुरिअर कंपनीने चीन, हाँगकाँग आणि मकाओ इथून कुरिअर सर्विसेस रद्द केल्याची माहिती जारी केली आहे. त्यामुळे चीनवरुन मागवलेला माल आता असाचा पडून राहणार असल्याने उद्योगपतींना फटका बसणार आहे.
दरम्यान, चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे अनेकांनी आपले मत मांडत सांगितले आहे. भारतानेही चीनसोबतचे आर्थिक व्यवहार रद्द केले आहेत

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची दुसरी लाट जगभरात आहे.एका दिवसात महाराष्ट्रात ५ हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात मागच्या २४ तासांमध्ये १५ हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
वर्ल्डडोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटीहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असा अनुमान लावण्यात आला होता. मात्र हा अनुमान चुकीचा निघाल्याचे सांगितले जात आहे. मे आणि जून महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त ६७ टक्के रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी १ लाख ३५ हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत.
कोरोना विषाणूची दुसरी लहर आली किंवा कोरोनाचा कहर असाच वाढला तर यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना WHO चे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले की, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या थंड वातावरणात साथीच्या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा हाहाकार वाढले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय' PTI वृत्तसंस्थेकडून घेण्यात आलेल्या चिनी राजदुतांच्या मुलाखतीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 'पीटीआय'चे हे वार्तांकन राष्ट्रविरोधी आणि देशाच्या अखंडतेस बाधा आणणारे असल्याचा आरोप प्रसार भारतीने केला आहे. त्यामुळे भविष्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी असलेल्या कराराचा फेरआढावा घेऊ, असा निर्वाणीचा इशाराही प्रसार भारतीकडून देण्यात आला आहे.
१९४९ साली सुरु झालेली पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. 'पीटीआय'साठी ४०० पत्रकार व पाचशे अंशकालीन वार्ताहर आहेत. दिवसाला ते २ हजार बातम्या व २०० छायाचित्रे देतात. अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे परदेशी बातम्यांसाठी करार आहेत. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय'कडून नुकतीच चीनचे राजदूत सन वेडाँग यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये वेडाँग यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे पीटीआय वादात सापडली आहे.
प्रसार भारतीकडून यासंदर्भात पीटीआयला पत्र पाठवण्यात आले आहे. आम्ही लवकरच या पत्राला उत्तर देऊ, असे 'पीटीआय'कडून सांगण्यात आले. प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे. मात्र, आम्ही लवकरच प्रसारभारतीसमोर तथ्य आणि खऱ्या गोष्टी मांडू, असे 'पीटीआय'ने म्हटले आहे. 

लडाख - भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे 
चिनी विमानांच्या प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत.सध्या भारत-चीन युद्ध होणार नसले तरी युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनची कमांडिंग स्थरावर बैठक झाली होती. चीनने आपण सैन्य माघारी घेऊ, असे मान्य केले होते. मात्र, चीनने तसे केले नाही. याउलट सीमाभागात चिनी सैन्याचे क्षेपणास्त्रांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चीनने त्याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, असे शैलेंद्र देवळेकर यांनी सांगितले.चीनकडून नवे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत आपण लष्करीदृष्टीने सज्ज राहावे. कारण चीन कोणत्या क्षणी धोका देईल, हे सांगता येत नाही. चीन सीमेवर आपल्या लष्करी सेनेचं प्रदर्शन करत असल्याने आपल्याला जशास तसे उत्तर देणे गरजेचं आहे. त्यामुळे भारताकडून सीमाभागात क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले. सध्या युद्ध होणार नाही. मात्र, लष्करी क्षमतेचे प्रदर्शन दोन्ही देशांकडून केले जात आहे.नवी दिल्ली - संदेसरा समूहाच्या ५००० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 'ईडी'च्या तीन अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या 'ईडी'च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. यापूर्वी 'ईडी'कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर 'ईडी'कडून अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करून अहमद पटेल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे अहमद पटेल यांनी 'ईडी'ला कळवले होते. त्यामुळे आता 'ईडी'कडून एक पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले. 
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. तब्बल १४५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. 

मुंबई - अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. अशात विरोधकांकडून शालेय शिक्षण, शैक्षणिक फी, बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सरकारवर ट्विटरवरून प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.
सीबीएससीच्या मुलांना "बेस्ट आँफ थ्री" नुसार गुण मिळणार आणि एसएससी बोर्डाच्या मुलांना "बेस्ट आँफ फाईव्ह" नुसार गुण? मग SSC बोर्डाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशात मागे पडणार?, SSC बोर्डाच्या मुलांवर "सरासरी सरकारमुळे" अन्याय होणार, एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार? असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहे.शाळांनी शुल्कवाढ करू नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली? या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार की, संस्था चालकांचा फायदा करणार? अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत देशपातळीवर एकसुत्री निर्णय व्हावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग निर्णय घेणार, अशा बातम्या आल्या तोपर्यंत महाराष्ट्रात गृहपाठ न करता घेतलेला निर्णय "जैसे थे" ठेवण्यास सरकार तयार नाही असे आशिष शेलार म्हणाले.तसेच, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा छळ कधी रोखणार? महाराष्ट्रात शिक्षणाचे एकूणच काय? असे प्रश देखील शेलार यांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर, पालकांना फी वाढीचा खिशाला झटका, ११ वी प्रवेशात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फटका, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार, "सरासरी" सरकार आणि निर्णय “चवली-पावली”, शिक्षणाचे इथे कसले “फेअर काय लवली “? असे प्रश्न विचारत आशिष शेलारंनी सरकारवर निशाणा साधला आहे..

मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांकडून आकारलेले दहा लाख सहा हजार २०५ रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयाला दिले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात नोंदवले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तहसीलदार किंवा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून ते रुग्णालयात देणे अपेक्षित नसते. त्यामुळे रुग्णालयाचा युक्तिवाद प्रथमदर्शनी आम्हाला मान्य नाही, असे म्हणत न्या. आर. डी. धनुका व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने रुग्णालयाला दोन आठवड्यांत रक्कम न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच या याचिकेवरील अंतिम जलद सुनावणी घेण्याचे संकेतही दिले.
गरीबांसाठीच्या दहा टक्के खाटा राखीव योजनेंतर्गत खाटा राखीव ठेवून दुर्बल घटकातील व्यक्तींना उपलब्ध करणे या ट्रस्ट रुग्णालयाला बंधनकारक आहे. तसेच त्यासाठी राखीव असलेल्या ९० खाटांपैकी केवळ तीन खाटा रुग्णालयाने मार्च ते मे महिन्यात संबंधित रुग्णांना दिल्या, असे धर्मादाय आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालयाचे म्हणणे आम्ही स्वीकारू शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने आपल्या अंतरिम आदेशात नोंदवले.
वांद्रे पूर्व भारत नगर झोपडपट्टीत राहणारे अब्दुल शोएब आणि त्यांच्या कुटुंबातील सहा जणांनी अॅड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत या रुग्णालयाविरोधात याचिका केली आहे. करोनाच्या संदर्भात उपचार घेण्याकरिता आम्ही सर्व १४ एप्रिल रोजी या रुग्णालयात दाखल झालो. त्यावेळी कोणत्याही रुग्णालयात प्रवेश मिळणे मुश्कील होते. जीवघेण्या करोनाची प्रचंड भीती वाटल्याने आम्ही या सोमय्या रुग्णालयात दाखल झालो. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तब्बल दहा लाख सहा हजार २०५ रुपयांचे बिल आमच्या हातात ठेवून ते भरण्यास सांगितले आणि न भरल्यास रुग्णालयातून बाहेर काढले जाईल, असा इशारा दिला. बिलात भूलतज्ज्ञ, पीपीई कीट इत्यादीच्या नावाखालीही गैरलागू पैसे लावले. त्यावेळी भीतीपोटी आम्ही आमच्या मित्र परिवाराकडून उसनवारी करत कसेबसे पैसे जमवून रुग्णालयात पैसे भरले. रुग्णालयातून २८ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही रुग्णालयाकडे पैसे परत मागितले. कारण आम्ही सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहोत. मात्र, रुग्णालयाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. महापालिका, जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव याचिका करावी लागली, असे म्हणणे याचिकादारांनी याचिकेत मांडले आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले अनेक उद्योगधंदे यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अनेकांची पगारकपात झाली आहे, तर अनेकांच्या थेट नोकऱ्याही गेल्या आहेत. अशातच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या पालकांपुढे शाळांच्या शुल्कवाढीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या शुल्कवाढीवर बंदी घालणाऱ्या अध्यादेशालाच अंतरिम स्थिगिती दिल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच पगारकपात आणि नोकरकपात अशा संकटांचा सामना करणाऱ्या पालकांना आता पाल्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचीही चिंता भेडसावत आहे. त्यावरच उपाय म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत शैक्षणिक संस्थांना पुढील वर्षभरात (२०२०-२१ ) शुल्कवाढ न करण्याचे आदेश दिले. तसेच मागील वर्षाचे (२०१९-२०) शुल्क एकाचवेळी न घेता टप्प्याटप्प्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र, शिक्षण संस्थांनी या अध्यादेशालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेत शिक्षण संस्थांनी आपली बाजू मांडताना शुल्कवाढीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार शुल्क नियंत्रण समितीला असल्याचे सांगितले. तसेच शुल्कवाढ न केल्यास पुढील वर्षात शिक्षकांचे वेतन आणि शाळेचे इतर खर्च यावर परिणाम होईल, असेही सांगण्यात आले.
शिक्षण संस्थांनी आपल्या या याचिकेत संबंधित शासन अध्यादेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने शिक्षण संस्थांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. तसेच संबंधित अध्यादेशावर अंतरिम स्थगिती दिली. यामुळे शिक्षण संस्थांचा शुल्कवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडणार आहे. शाळांना २०२०-२० या शैक्षणिक वर्षांसाठी फी वाढ न करण्याची सूट मिळाल्याने फी वाढीचा संपूर्ण बोजा पालकांवर पडणार आहे.अशातच आधीच नोकरी गमावलेल्या किंवा पगारकपातीला सामोरे गेलेल्या पालकांसाठी आपल्या मुलांच्या शाळा शुल्क भरणे आव्हान असणार आहे.

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच टिकटॉक स्टार असणाऱ्या सिया कक्कर या १६ वर्षीय तरूणीने देखील आत्महत्या केली. गेल्या आठवडाभरापासून ती नैराश्यात होती. मात्र तिच्या कुटुंबीयांना ती असे टोकाचे पाऊल उचलेल अशी शंका सुद्धा आली नाही. कारण ती या दिवसातही तिची नेहमीची काम नित्याने करत होती. गीता कॉलनी पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे. एका मीडिया अहवालानुसार, तिच्या कुटुंबीयांनी अशी माहिती दिली की, लॉकडाऊनमुळे ३ महिन्यांपासून त्यांचा पूर्ण परिवार घरीच होता, मात्र तरीही तिचे नैराश्य आत्महत्येपर्यंत पोहोचेल कुणाला वाटले नव्हते. दरम्यान पोलीस तिच्या आत्महत्येचे नेमके कारण तपासत आहेत.
दरम्यान पोलिसांच्या हवाल्याने त्यांनी सांगितले आहे की, सियाचे वडील आणि आजोबा डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना तिच्या नैराश्याबाबत काहीशी शंका होती. पण ते एवढ्या टोकाला जाईल असे वाटले नव्हते.गळफास घेऊनच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. तिला कोणती धमकी मिळाल्याच्या गोष्टींना पोलिसांनी नकार दिला आहे. कुटुंबीयांनी देखील ही गोष्ट नाकारली आहे.
मीडिया अहवालानुसार सियाने अवघ्या १० मिनिटांच्या वेळामध्ये तिचे आयुष्य संपवले. तिने गळफास घेण्याच्या १० मिनिटे आधी तिच्या आईने तिला घरात वावरताना पाहिले होते. तिची आई स्वयंपाकघरात होती, तर वडील आणि आजोबा खालीच त्यांच्या क्लिनिकमध्ये होते. तिचे ३ खोल्यांचे घर आहे तर तिला एक भाऊ आणि बहिण देखी आहे. बुधवारी साडेआठ वाजता सियाच्या आईने तिला पाहिले. काही वेळाने तिची आई मागच्या खोलीत गेली तर त्याचे दार बंद होते.तिने हाक मारली पण काहीचउत्तर मिळाले नसल्याने तिने खाली उतरून सियाच्या वडिलांना सर्व हकिगत सांगितली. तिचे आई-बाबा दुसऱ्या खोलीतून आतमध्ये आले, तर त्यांना ओढणीने गळफास घेतलेली सिया दिसली.

मुंबई - जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले शूटिंग हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सरकारच्या नियमांचे पालन करत अनेक मालिकांनी त्यांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांनीही विविध शहरांत कामाला सुरुवात केली आहे.कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘छोटी सरदारनी’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘शुभारंभ’, ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’ आणि अँड टीव्ही वाहिनीवरील ‘एक महानायक डॉक्टर बी. आर. आंबेडकर’, ‘संतोषी माँ सुनाए विराट कथाएं’ या मालिकांची शूटिंग मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आणि मुंबई बाहेरील नायगाव परिसरात सुरु झाली आहे. कलाकार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. सेटवरील सर्वांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘ये है चाहतें’ या मालिकांचीही शूटिंग सुरू झाली आहे. तर झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.निर्माती एकता कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकांच्या शूटिंगच्या तयारीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तीन महिन्यांनंतर पुन्हा काम सुरू करता आल्यामुळे कलाकारांसह निर्माते आणि क्रू मेंबर्ससुद्धा आनंदित आहेत.

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या संथ गतीने सुरू असलेल्या आणि नागरिकांचा विरोध डावलून ठेकेदारांकडून काम सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कामातील त्रृटी लक्षात घेत त्यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली.
मुंबई-गोवा हा चौपदरी महामार्गावर अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे इथल्या गावातील नागरिकांना घेऊन ठेकेदार आणि चौपदरीकरणाचे अधिकारी यांच्या समवेत थेट माजी खासदार निलेश राणेंनी संवाद साधला. अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरत चौपदरीकरणात राहिलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना यावेळी राणेंनी दिल्या. तसेच येत्या काही दिवसात चौपदरीकरणासंदर्भात योग्य कारवाई न केल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला.मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची या शहराशी जोडतो.


नवी दिल्ली - राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये काही मोठा बदल होण्याची चिन्ह असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मदतीवरूनही भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या राजकीय घडामोडीत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आता दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी दोन दिवस नाना पटोले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. 
बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवार देण्याची भूमिका घेतली होती. दिल्ली हायकमांडकडून एक उमेदवार जाहीर झाला होता. तर बाळासाहेब थोरात यांनी आणखी एका उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळ महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी दुसरा उमेदवारी मागे घेऊन वादावर पडदा टाकला होता.

झारखंड - झारखंडमध्ये कोरोना विषाणूपेक्षा मानसिक उदासीनता अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. लॉकडाऊन काळातील आत्महत्यांचा डेटा पाहिल्यास, दररोज आत्महत्या करण्याची संख्या सरासरी ५ ऐवढी आहे.राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मार्च ते २५ जून पर्यंत ४४९ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्येच १३४ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. दर ४ तास ५० मिनिटांनी एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. लॉकडाऊनमुळे नैराश्याचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे.लॉकडाऊन काळात सुमारे १२०० लोक आमच्या संस्थेमध्ये मानसिक उपचार घेत आहेत. आम्हाला दररोज नैराश्याने ग्रासलेल्या लोकांकडून १५० हून अधिक फोन येत आहेत. २० टक्के लोक जीवन संपवण्यास इच्छुक होते, असे रांची येथील सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ सायकायट्रीमधील डॉक्टरांनी सांगितले.१ एप्रिल ते २५ जून या कालावधीत राजधानी रांचीमध्ये ५५ जणांनी आत्महत्या केली. मनोविकार तज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक मंदी, नोकरी गमावण्याची भीती, बेरोजगारी आणि इतर कारणांमुळे लोकांमध्ये नैराश्य येत आहे. असुरक्षिततेची भावना बर्‍याच लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते.लॉकडाऊनमुळे लोक घरामध्ये बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आणि घरगुती हिंसाचार वाढला. या कारणांमुळे बरेच लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले. योग्य समुपदेशनामुळे बरेच जण वाचू शकले असते, असे मानसशास्त्रज्ञ अजय कुमार म्हणाले.

बिकानेर - राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिकानेरच्या गजनेर ठाणे हद्दीतील कोलायत व गोलरीच्या दरम्यान राज्यमार्गावर घडली असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही.या मार्गावर एक कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कंटेनरची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही वाहनांमध्ये आग लागली. कंटेनर व डंपरमध्ये अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांतील चालकांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलायत ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळावरील दृश्यकोलायत पोलीस ठाण्याचे अधिकारी विकास विश्नोई यांनी सांगितले की, डंपर कोलायतहून बिकानेरकडे जात होता. ज्यामध्ये वाळू होती आणि बिकानेरहून कोलायतकडे जाणारा कंटेनर हा रिकामा होता. या अपघातानंतर आग विझविण्यात आली आहे.घटनेचा तपास पोलीस करत असून वाहनांच्या मालकांना शोध सुरू आहे. मालकांचा शोध लागल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे.

गुवाहाटी - मान्सून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर तेथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात पूर आला असून १६ जिल्ह्यातील ७०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना पूर बाधित भागात मदतकार्य वेगात करण्याचे निर्देश दिले आहेत. उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत पाऊस आणि ब्रह्मपुत्रांच्या वाढत्या पातळीमुळे आलेल्या पुराने सुमारे २५,००० लोक प्रभावित झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
एएसडीएमएनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा विभागांनी सहा जिल्ह्यात १४२ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरु केली आहेत. यात १९००० हूनअधिक लोक राहत आहेत. पुरात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील धेमाजी, तिनसुकिया, माजुली आणि डिब्रूगढ हे जिल्ह्ये सर्वाधित प्रभावित झाले आहेत.अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

रांची - झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन पूर्वीसारखेच काटेकोरपणे चालू राहील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकडाऊन कालावधी फक्त ३० जूनचा होता.राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आणि म्हटले आहे की, उच्चस्तरीय बैठकीनंतर कोविद -१९ रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी हे निर्देश जारी केले.
पूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च यांचा समावेश आहे. संस्था बंदच राहतील आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे सुरु राहील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

मुंबई - कोरोनाचे संकट आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदीत राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीच हा प्रस्ताव सादर केला. झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रशुल्क अनुसूचीनुसार वर्गीकृत केलेल्या दराने वापर आकारावर किंवा वापरलेल्या ऊर्जेच्या युनिटवर विद्युत शुल्क आकारले जाते. ९.३ टक्के विद्युत शुल्काच्या दरानुसार सन २०१९-२०२० साठी एकूण २२७५.७६ कोटी रुपये इतकी विद्युत शुल्काची रक्कम होते तर ७.५ टक्के दराने विद्युत शुल्क आकारल्यास १८३५.३० कोटी रुपये इतकी रक्कम होणार आहे. म्हणजे शासनाला दरवर्षी ४४०.४६ कोटी रुपये इतकी तूट होणार आहे. 
आर्थिक मंदीच्या काळात राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक ग्राहकांसाठी विद्युत शुल्काचे दर ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मंत्री मंडळाने मान्यता दिली. याचा फायदा सर्व औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल तसेच राज्याच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उद्योग उभारणीस चालना मिळेल असे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

नाशिक - ऑनलाइन रम्मीच्या नादात एका मुलाने वडिलाचे तब्बल साडेदहा लाख रुपये उधळल्याचे समोर आले आहे. आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने त्याने ऑनलाइन व्यवहाराद्वारे बँक खात्यातील पैशांची चोरी झाल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली. मात्र, पोलिसांनी काही तासांतच मुलाचा बनाव उघडकीस आणला. या घटनेनंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकी सलेकपाल धिंगण (वय - २४, रा. जयभवानी रोड, नाशिकरोड) असे संशयित मुलाचे नाव आहे. विकीनेच २८ मे रोजी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांच्या वडिलांनी मूळ गाव मोरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील जमीन विकून नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी १८ लाख ५९ हजार ४० रुपये पंजाब नॅशनल बॅंकेत जमा केली होती. त्या बॅंकेच्या त्या खात्याशी विकी याचा मोबाइल संलग्न होता. मात्र, त्याने मे महिन्यातील बँक व्यवहार तपासले असता खात्यातून १० लाख ६७ हजार १३८ रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले. त्याने सायबर पोलिसांत धाव घेत ऑनलाइन भामट्यांनी बॅंकेच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतल्याची तक्रार केली होती. सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तपासात विकीचे बिंग फोडले आणि त्यास अटक केली आहे.
विकी याला रमी जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे त्याने वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन साडेदहा लाखांची रक्कम रमी खेळात उडविले. हे लपविण्यासाठी त्याने खोटी तक्रार केली. मात्र, सायबरच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला. संशयिताने रमीसाठी कधी दोन, पाच, सात तर कधी दहा हजार रुपये याप्रमाणे वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पैसे रमी जुगारावर उधळले. सायबर तपासात पैसे रमी गेमवर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तांत्रिक तपास केला असता, पैसे वर्ग झाल्यानंतरचे मोबाइल संदेश विकीच्याच मोबाइलवर गेल्याचे समोर आले.जमीन विकून नाशिकमध्ये घरासाठीची रक्कम मुलानेच रमीमध्ये गमावल्याचे ऐकून सकेलपाल धिंगण यांना धक्का बसला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक आहेत. त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरू आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मत व्यक्त करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतीकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे टि्वट अजित पवार यांनी केले.राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थाने पुढे नेला, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी शिक्षणासाठी मदत केली व प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन,अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत राज्यात तसा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.

अहमदाबाद - भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढतेय. अशातच आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी भाजपावर निशाणा साधत, जर भाजपा चिनी सामानाचा खरेच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे असे म्हटले आहे.चीन आपला शत्रू आहे. जर भाजपाचा चीनला खरच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी, असे छोटू वसावा म्हणाले. तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोप छोटू वसावा यांनी केला. केवाडियाच्या परिसरातील ६-७ गावांमधील जवळपास २५ हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वसावा यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून दूर राहून गुजरातमधील तीन भाजपा उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

मुंबई - कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील हे धोरण असणार आहे. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असतील. 
बीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना ८० टक्के रोजगार देणे आवश्यक आहे, ही अट देखील असणार आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या ८ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. 
या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल १० कुटी उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार १५ फूट लांबी आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मूल्य असेल. 
तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.
या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरु ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल. दरम्यान,पर्यटन विभागाच्या बीच शॅक धोरणाबाबत पर्यटन संचालक दिलीप गावडे हे शनिवार २७ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरुन सविस्तर माहिती देणार आहेत. MaharashtraTourismOfficial या फेसबुक पेजवरुन या संवादाचे प्रसारण होईल.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याप्रमाणे शासनाने आज 'मिशन बिगिन अगेन'च्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांमध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रात सलून्स आणि ब्युटी पार्लर्स २८ जूनपासून सुरू करता येतील. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.
- केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग या मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
- दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
- ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइझ करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइझ करणे गरजेचे आहे.
- फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही, अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइझ करावी लागेल.
- उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुध्दा उपरोक्त नमूद सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.

आसाम - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेली हिंसक झडप आणि नेपाळच्या वृत्तीनंतर भारताच्या आणखी एका शेजारील देशाने चाल चालण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूतानकडून आसाममधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी रोखण्यात आले आहे. बक्सा जिल्ह्यातील २६ हून अधिक गावांमधील सुमारे ६००० शेतकरी सिंचनासाठी मानवनिर्मित सिंचन जलवाहिनी डोंग प्रकल्पांवर अवलंबून आहेत. १९५३ नंतर स्थानिक शेतकरी, शेतीसाठी भूतानमधून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा वापर करतात.भूतान सरकारने, अचानक कोणतेही कारण न सांगता सिंचन वाहिनी बंद केल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. कालीपूर-बोगाजुली-कलानदी अंचलिक डोंग धरण समितीच्या बॅनरखाली शेतकर्‍यांनी सोमवारी निदर्शनं केली. आणि केंद्र सरकारने भूतानसमोर त्यांचा हा प्रश्न उपस्थित करुन लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली.या भागातील शेकडो शेतकरी सुमारे सात दशकांपासून भूतानकडून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून होते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे, भूतान सरकारमधील अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी, डोंगपर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या प्रवेशावर रोख लावण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. 
धरण समितीच्या एका सदस्याने सांगितले कि, गेल्या पाच दिवसांपासून भात शेतात पाणी जात नाही. आम्हाला पाण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात आम्ही आपले आंदोलन आणखी तीव्र करु. कोरोना व्हायरस एक वेगळा मुद्दा आहे आणि जवळपास ७० वर्ष जुन्या प्रणालीवर रोख लावणे वेगळा मुद्दा आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील सर्व आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल राखून आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी डोंगला चॅनेलाईज करु शकतो. भूतान सरकार इतर करणे सांगून हे करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 
दरम्यान, गुरुवारीही त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, ४२ आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.
दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपले असलेल्या भागात घेराव घातला त्यावेळी, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सेनेकडून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरु झाली.गुरुवारी सुरक्षा दलाकडून हे दुसरे सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्याआधी सकाळी सोपोर जिल्हातील बारामुल्लामध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते..

मुंबई - पावसाळ्यात नेहमीच मुंबईची तुंबई होते आणि वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यावर्षी मुंबईत तब्बल ७०० पंप लावण्यात आले आहे. या पंपाच्या साहाय्याने साचलेले पाणी गटार, नाल्यामार्गे समुद्रात सोडले जाणार आहे.
दरवर्षी, मुंबईत २ हजार ५०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात या विभागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंद पडते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्याने शहर ठप्प होते. नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.महापालिका दरवर्षी २५० ते ३०० पंप साचलेले पाणी उपसण्यासाठी वापरत होती. २६ जुलै २००५ च्या अनुभवानंतर पालिकेने हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंदर, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंद आदी पपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या सर्व पपिंग स्टेशनमधून सेकंदाला ६ हजार लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. या प्रत्येक पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पालिकेने १०० कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे.मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचतच असते. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन, सायन स्टेशन, अंधेरी मिलन सबवे आदी विभागात थोडासा पाऊस पडला तरी पाणी साचते. तसेच मुंबईत आता अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळेही पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे.मुंबईत सखल भागांमध्ये रेल्वे मार्गावर आणि मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण ७०० पंप बसवण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या वतीने ३३० पंप, पश्चिम रेल्वेच्या वतीने ५० पंप, मध्य रेल्वेच्या वतीने ७२ आणि एमएमआरडीए व मुंबई मेट्रोच्या वतीने २५४ पंप बसवण्यात आले आहेत. यासर्व पंपाद्वारे साचलेले पाणी गटार, नाल्याद्वारे समुद्रात किंवा मोकळ्या जागेत सोडून पाण्याचा निचरा केला जाणार आहे.पाणी साचण्याचा हॉटस्पॉट हिंदमाता-मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यावर सर्वात आधी दादर हिंदमाता परिसरात पाणी साचते. हिंदमाता पाणी साचण्याचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. या विभागातील पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारांची क्षमता पालिकेने वाढवली आहे. त्यामुळे या विभागात पूर्वीसारखे पाणी साचणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे. पाणी साचले तरी आधीपेक्षा अधिक गतीने त्याचा निचरा होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. मुंबईची रचना बशीसारखी असल्याने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा जलद करता यावा, यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.

मुंबई - कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस रात्रदिवस कर्तव्य बजावत आहेत. मात्र, राज्य पोलीस दलात कोरोनाचा विळखा वाढत आहे. राज्य पोलीस दलात गेल्या २४ तासांत ३ कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा ५४ वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही ९९१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १०६ पोलीस अधिकारी तर ८८५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात ३ पोलीस अधिकारी व ५१ पोलीस कर्मचारी अशा ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३५ हजार ४३१ गुन्हे नोंदविण्यात आले. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या ७४६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल १ लाख ४ हजार ४९२ फोन पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या १,३३५ प्रकरणात २७,५६९ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ८४,४६१ वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल ८ कोटी ४१ लाख ३२ हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या ५६ घटना घडल्या असून ८६ पोलीस जखमी झाले आहेत. राज्यात सध्या एकूण १०९ रिलीफ कॅम्प आहेत. त्याठिकाणी जवळपास ३,५४८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८ हजार ६१७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ३१ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३६ पोलिसांचा राज्यात सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
वसई (पालघर) - वसई-विरार परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापालिकेत सक्षम वैद्यकीय अधिकारी नाही. सदर पदावर सरकारकडून वैद्यकीय अधिकारी मिळवून देऊ,असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वसईतील नागरिकांना दिले. करोनाचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी वसईत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त गंगाथरन, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे,तहसीलदार किरण सुरवसे,महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह महापालिका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हजर होते. यावेळी बोलताना त्यांनी समक्ष वैद्यकीय अधिकारी मिळावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावून असे आश्वासन दिले.आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या हेळसांडपणामुळे होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूला राज्य सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. तर खाजगी हॉस्पिटल मधून होणारी रुग्णांची लूट थांबवली पाहिजे. सरकारच्या नियमानुसार हॉस्पिटल काम करत नाहीत. सरकार मृत आणि रुग्णांचे आकडे लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या व्यवस्थेत बदल झाला नाही तर भाजपला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी बोलताना दिला. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, मनुष्यबळ वाढवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संघटनेकडून आणि अनिलराज रोकडे, संदीप पंडित यांनी आयुक्त करत असलेल्या अवमानाच्या तक्रारी दरेकर यांच्यापुढे करण्यात आल्या. त्यावेळी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात संवाद समन्वय असला पाहिजे. पत्रकारांचाही अवमान होता कामा नये, याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि पत्रकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांची संघर्ष केल्यावर शहराचे वाटोळे झाल्याचे अनुभवलेले आहे, असे परखड मत दरेकर यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचा अवमान करता येणार नाही. समन्वयाची भूमिका घेऊन लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्या. त्यांना विश्वासात घेऊन काम करा, अशा सूचना आयुक्तांना केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

पंढरपूर - कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आषाढी वारी होणार नाही. त्यामुळे पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. तरी काही वारकरी मंडळी छुप्या मार्गाने पंढरपुरात येण्याचा प्रयत्न करत आहे. अशा मार्गाने येणाऱ्या वारकऱ्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारके पंढरपुरात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे उपस्थित होते.
पंढरपुरात आषाढी यात्रा होणार नाही, अशी भूमिका शासनाने आधीच घेतली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी सहभागी होऊ नये. याबाबत दिंडी प्रमुखानांही सूचना देण्यात आल्या आहेत. २५ जूनपासून पंढरीत १ हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामधे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा फौजफटा असणार आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची काळजी घेण्यासाठी सर्व साहित्यांचे कीट पुरवले जाणार आहे. दररोज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.विठ्ठल मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पंढरपूर तालुक्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पंढरपुरातील ५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीत पंढरपुरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. २५ जून ते ५ जुलैपर्यंत ही नाकाबंदी असणार आहे. प्रशासनकडून वारकऱ्यांनी घरीच विठ्ठल- रुक्मिणीची पूजा करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई - राज्यातील सर्वात आवडता दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ‘दहीहंडी समन्वय समिती’तर्फे जाहीर करण्यात आले.दहीहंडी मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता गोपाळकाला हा उत्सव होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे दहीहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे दहीहंडी समन्वय समितीने स्पष्ट केले.
'सर सलामत तो पगडी पचास” किंवा बचेंगे तो और भी लडेंगे/खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा उत्सव पुढील वर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो, ही महामारी लवकरात लवकर दूर होवो ही दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने श्रीकृष्ण परमात्म्याचरणी मनापासून प्रार्थना करण्याचेही बैठकीत ठरले.

नवी दिल्ली - देशाच्या इतिहासामध्ये २५ जून हा दिवस वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चिला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती. यावेळी आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना सरकारने कैद केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.
४५ वर्षांपूर्वी सत्तेसाठी एका कुटुंबाने देशावर आणीबाणी लादली. एका रात्रीत देशाला कारागृहमध्ये बदलून टाकले. पत्रकार परिषद, न्यायालय, व्याख्याने सर्व प्रकारच्या गोष्टी थांबल्या. गरिब आणि दलितांवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर लाखो लोकांच्या प्रयत्नांमुळे ही आणीबाणी उठवण्यात आली. देशाला पुन्हा लोकशाही मिळाली. काँग्रेसने लावलेली आणीबाणी केवळ एका परिवाराच्या फायद्यासाठी होती. आजही काँग्रेस तसेच वागत आहे. असे गृहमंत्री म्हणाले.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल' हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. त्याआधी या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी होती.कोरोनावर अद्याप अधिकृतपणे औषध उपलब्ध नाही. असे असतानाच पंतजलीने कोरोनावर 'कोरोनिल' हे औषध असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे, बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचे क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही, याचा शोध घेणार असून, महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, आयुष मंत्रालयाकडून या औषधाची चौकशीही करण्यात येत आहे. कुणी कोरोनाच्या नावावर औषध बनवून त्याचा प्रचार आणि प्रसार करु शकत नाही, असे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. कोरोनावरील रामबाण उपाय म्हणून कोणीही कोणत्याही औषधांचा दावा करुन त्या औषधांची विक्री केल्यास विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे राजस्थान सरकारने या आधीच स्पष्ट केल्याने कोरोनिल औषध आता संकटात सापडले आहे.

नवी दिल्ली - चीनने भारताबरोबर चर्चेत झालेल्या परस्पर सहमतीला झुगारून चीनचे सैनिक हे गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष ताबा रेषनिजीक असलेल्या ‘पोस्ट १४’ या ठिकाणी गस्त घालण्यासाठी परतले आहेत.चिनी सैनिकांनी 'पोस्ट १४' या ठिकाणी तंबू ठोकले आहेत. तसेच टेहळणी केंद्रही सुरू केले आहे. चीनचे सैनिक हे मोठ्या संख्येने परतल्याचे सूत्राने सांगितले. दोन्ही देश या ठिकाणावरून सैनिक मागे घेण्यासाठी सहमत झाले होते.सूत्राच्या माहितीनुसार कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर भारत आणि चीनमध्ये २२ जूनला बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी तणाव होत असलेल्या पूर्व लडाखमधून सैनिक मागे घेण्याबाबत चर्चा केली होती. ही कॉर्प्स कंमाडरच्या पातळीवर ६ जूननंतर दुसरी बैठक होती.मात्र, असे असले तरी चिनचे सैनिक हे त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने परतले आहेत. चीनने मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैनिक ही भारत सरकारच्यादृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे. असे असले तरी पूर्व लडाखमध्ये सैन्यदल कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे सूत्राने सांगितले.१५ जूनला गलवानच्या खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या हिंसक झटापटीत २० जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यापूर्वी चीनने या प्रदेशात भारतीय सैनिक कसे तैनात आहे, हे पाहण्यासाठी थर्मल इमेजिंग ड्रोन्सचा वापर केला होता. त्यादिवशी चिनी सैनिकांनी केलेला सर्वात मोठा प्राणघातक हल्ला होता, असे सरकारी सूत्राने सांगितले.

बडगाम - लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात जम्मू -काश्मीर पोलिसांना बुधवारी यश आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि लष्करांनी बडगाम येथे जाऊन शोध मोहीम राबवली. त्यानंतर नारबल या भागामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक केली. इम्रान खान, इफ्सान अहमद गनी, ओवेस अहमद, मोहसिन कादिकर आणि अबिद रेथर अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २८ काडतुसे, ए. के. ४७, एक राऊंड आणि २० भिंती पत्रक पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधीत समुह हा दहशतवाद्यांना निवार आणि इतर माहिती पुरवत होता. तसेच ते गेल्या काही महिन्यांपासून लष्कर-ए-तोएबासाठी काम करत होते. पोलिसांनी या पाचही जणांविरोधात युएपीए अंतर्ग कारवाई केली आहे.

पंचकुला (हरयाणा) - पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे संस्थापक रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ आणि साथीचे रोग कायदा, १८९७ नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविंद्र सिंह नारा यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.पतंजली कंपनी, रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनील तसेच श्वासारी औषधाबाबत मंगळवारी (दि.23 जून) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायद्याचे उल्लंघन करत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.तसेच, त्यांनी कोरोनावर हे औषध असल्याचा दावा केला होता. पण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या औषधासंदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या? कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले? संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती? आयसीएमआर व आयुष मंत्रालयाकडून या औषधनिर्मिती तसेच विक्रीची परवानगी पतंजलीला मिळाली आहे का, अशा विविध प्रश्न सुखविंद्र सिंह यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे जोपर्यंत पतंजलीच्या या औषधाला शासनमान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणीही ते औषध घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, 'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अ‌ॅण्ड मॅजिक रेमेडिज् (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget