एनएमएमटीचे उत्पन्नवाढीसाठी प्रवाशांवर भार?

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका परिवहनसेवेच्या (एनएमएमटी) बससेवांच्या फेऱ्या या महिन्यापासून वाढवण्यात आल्या असल्या, तरी प्रवासीसंख्येवर मर्यादा असल्यामुळे लॉकडाउनमध्ये तीन महिन्यांत आर्थिक संकटात सापडलेल्या एनएमएमटीचे कंबरडे अधिकच मोडले आहे. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणेही परिवहन सेवेला जड जात आहे. या गर्तेतून बाहेर येण्यासाठी आता एका प्रवाशाचे एका प्रवासासाठी दोन तिकिटे फाडण्याचा म्हणजेच दुप्पट भाडेवसुली करण्याचा विचार एनएमएमटी करत आहे. उत्पन्नवाढीच्या या उताऱ्याचा भार प्रवाशांच्या माथी मारण्याच्या जनतेकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून एनएमएमटीच्या बस फक्त आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चालवल्या जात होत्या. या महिन्यात ८ जूनपासून बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मात्र करोनामुळे प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आहे. एनएमएमटीकडून नवी मुंबईमधून मुंबई, बोरिवली, वांद्रे, कल्याण, डोंबिवली, ठाणे, उरण, पनवेल या परिसरात प्रवासी वाहतूकसेवा पुरवली जाते. एनएमएमटीच्या ५५० बस या ४५पेक्षा अधिक मार्गांवर आपली सेवा देत आहेत. यात सर्वसाधारण बसेसबरोबर वातानुकूलित बससेवाही आहे. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यावर सर्व बस एनएमएमटीच्या आगारातच उभ्या राहिल्या. त्यातच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर ,परिचारिका, पोलिस यांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहनच्या वतीने १०५ बस रस्त्यावर उतरवल्या जात होत्या. मात्र त्यांच्या फेऱ्या नियमित होत नव्हत्या. त्यामुळे परिवहनला काहीही उत्पन्न मिळत नव्हते.तीन महिन्यांनी संख्या वाढून २०५ बस रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्यात पुरेसे प्रवासीभारवहन कमी झाले आहे. करोनाचे संकट वाढतेच असल्यामुळे सुरक्षित वावराचे नियम कसोशीने पाळणे गरजेचे आहे. बसमध्ये एका सीटवर एकच प्रवाशास परवानगी आहे. शिवाय तीन ते पाच प्रवाशांनाच उभ्याने प्रवास करण्याची परवानगी आहे.आता बससंख्या वाढल्या तरीही एनएमएमटीचे उत्पन्न चार ते सहा लाखांपर्यंतच जात आहे. नेहमीचे दिवसाचे उत्पन्न सरासरी ३३ ते ३४ लाखांच्या घरात असते.
या उत्पन्नातून इंधनखर्च निघणे कठीण झाले आहे. आतापर्यंत कशीबशी ही सेवा सुरू ठेवली होती. जून निम्मा संपत आला, तरी कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार मिळालेला नाही. दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता तिकीट दरवाढीशिवाय दुसरा उपाय नाही, हे मानून परिवहनने एका प्रवाशाला दोन तिकिटे देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अशा आशयाचे परिपत्रक सोशल मीडियावर पसरल्याने प्रवाशांनी आधीच त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीला बस सुरू करतानाही एनएमएमटीने हा पर्याय अवलंबला होता. तीन महिने घरी बसलेले लोक आता कुठे कामावर जाऊ लागले आहेत, त्यांचेही उत्पन्न कमी झाले आहे, अशा परिस्थितीत प्रवाशांवर हा भार का टाकावा? असा प्रवाशांचा सवाल आहे. हा निर्णय घेण्याबाबत विचार सुरू असून, अजून तो लागू करण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन व्यवस्थापनाने दिले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget