July 2020

जयपूर - राजस्थानमधील सर्व धार्मिक स्थळे १ सप्टेंबरपासून सामान्य भाविकांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी शासनाने देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद केली होती.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व ग्रामपंचायतींना "ग्रामरक्षक" निवडण्याची सूचना केली आहे. हे ग्रामरक्षक पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय साधतील.राजस्थानातील सर्व धार्मिक स्थळे १ सप्टेंबरपासून भाविकांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, अशी माहिती राजस्थान सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक अंतर आणि आरोग्य प्रोटोकॉलची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार राजस्थानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १० हजार ७४५ सक्रिय रुग्ण आहेत.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अखेर त्या गावांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे अशी या १३ नगरसेवकांची नावे आहेत.
पालिका निवडणूक विभागाने आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल पाठवला होता. यानंतर आयुक्तांनी या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुदत संपण्यापूर्वीच नगरसेवक पद रद्द झाल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार घेसर, हेदुटणे, भाल, उंब्रोली, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडीवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांची मिळून आता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होईल. कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने ती ओळखली जाईल. नगरविकास विभागाने यासाठीची प्रारूप अधिसूचना जारी केली होती. 

जयपूर - राजस्थानात सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर जयपूर-दिल्ली महामार्गावरील हॉटेलमध्ये थांबलेल्या अशोक गेहलोत यांच्या गोटातील आमदारांना शुक्रवारी जैसलमेर येथे हलविण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आमदारांना हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आमदारांना संबोधित करणार आहेत.जयपूर शहरापासून जवळच असलेल्या ‘फेअरमॉण्ट’ हॉटेलवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांना १३ जुलैपासून ठेवण्यात आले होते. राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यापासूनच आमदारांच्या घोडेबाजाराने वेग धरला, असा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने गुरुवारी कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर बंदी घातली आहे. भारत सरकारने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. या निर्णयाचे उद्दीष्ट टेलिव्हिजन (TV) चे देशांतर्गत उत्पादन वाढविणे आणि चीनसारख्या देशांकडून आवश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करणे हे आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कलर टेलिव्हिजनचे आयात धोरण विनामूल्य व बंदीमध्ये बदलण्यात आले आहे.
ही आयात बंदी एक रंगीत टेलिव्हिजन सेट आहे ज्यात स्क्रीन आकार ३६ सेंटीमीटर ते १०५ सेंटीमीटर आहे, तसेच ६३ सेंटीमीटरपेक्षा कमी स्क्रीन आकाराचे एलसीडी टेलिव्हिजन सेट आहेत. कोणतीही वस्तू प्रतिबंधित आयात प्रकारात ठेवण्याचा अर्थ म्हणजे वरील वस्तूंच्या आयातदारास वाणिज्य मंत्रालयाच्या डीजीएफटीकडून आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो.
भारतात टीव्ही निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलँड आणि जर्मनी यांचा समावेश आहे. दरम्यान, देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि इतर देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीला प्रोत्साहन देणे हे या मागचे उद्दीष्ट आहे. डीजीएफटीने यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. कलर टेलिव्हिजनसाठी आयात धोरण बदलले गेले आहे. आता मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे या अधिसूचनेत म्हटलेले आहे.
भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयाने चीनला मोठा फटका बसणार आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर भारत-चीनमधील संबंध बिघडले आहेत. चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी करत सीमावाद पुन्हा उकरुन काढला. चीनकडून करण्यात आलेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर भारताकडून दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचेही दुप्पट जवानांचा मृत्यू झाला. त्यानंतर तणावात अधिक भर पडली. भारताने चीनला धडा शिकविण्यासाठी व्युहरचना सुरु केली. त्याचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. 
सरकारी खरेदीतही चिनी कंपन्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. या अर्थ चिनी कंपन्या केंद्र व राज्य सरकारच्यावतीने कोणत्याही प्रकारच्या सरकारी खरेदीच्या बोलीमध्ये भाग घेता येणार नाही सीमा वादाच्या तणावापूर्वीच एप्रिल महिन्यात भारताने भारताने थेट विदेशी गुंतवणुकी (एफडीआय) संबंधी नियम बदलले. करोनाच्या संकटाचा फायदा घेऊन चिनी कंपन्यांच्या ताब्यात भारतीय कंपन्या जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला होता.

 नवी दिल्ली - कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला. त्या उत्तर प्रदेशात राहायला जाणार आहेत. मात्र, सद्या त्या दिल्लीतच राहणार आहेत. त्यांनी मध्य दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोणतीही पुढे डोकेदुखी ठरु नये म्हणून त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. बंगला रिकामा केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर सर्वकाही तपासण्यासाठी पाठवले. नंतर नवीन वाद किंवा आरोप होऊ नये, म्हणून त्यांनी स्पष्ट केले. पाहा सर्व काही बसवलेले बंगल्यातच सोडून जात आहे, असे प्रियंका गांधी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 
प्रियंका वाड्रा या आता गुरुग्राममध्ये काही दिवस राहणार आहेत. त्यानंतर मध्य दिल्ली भागातील निवासस्थानात शिफ्ट होणार आहेत. प्रियंका यांनी आपल्या मध्य दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या घराचे रंगकाम आणि दुरुस्ती सुरू आहे, अशी माहिती प्रियांका यांच्याशी संबंधित सूत्रांनी दिली, दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. हा वाद डोळ्यासमोर ठेऊन प्रियंका वाड्रा यांनी सर्व काळजी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद येथील केटरिंग व्यवसायाशी संबंध असणाऱ्या एका व्यापाऱ्यावर मणी लौंडरिंगच्या संशयावरून ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) कारवाई केल्याचे समोर आले आहे. कारवाईत ईडीने व्यापार्‍याच्या घरासह दोन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला होता. यात अधिकाऱ्यांना ६२ लाख रोख आणि ७ किलो सोने आढळल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या घरासह इतर ठिकाणांवर झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. यात अधिकाऱ्यांना रोख रक्कमेसह मोठ्या प्रमाणात सोने आढळून आले. याबाबत ईडीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कारवाईत गुप्तता पाळण्यात आली. काही दिवसांपासून व्यावसायिकाची गुप्त पद्धतीने माहिती काढण्यात येत होती. त्यानंतर संशय बळावल्याने मुंबईतील विशेष पथक पहाटे तीन वाजता औरंगाबादेत दाखल झाले. एका अधिकाऱ्याने संबंधित कॅटरिंगचे कार्यालय ईडीच्या अधिकाऱ्यांना दाखवले. त्यानंतर सकाळी ६ वाजेपासून अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. कारवाईत आर्थिक व्यवहारासंबंधी महत्त्वाचे दस्तावेज, बिले, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाईविषयी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले आहे. कारवाई करणारे अधिकारी हे केरळ आणि वेगवेगळ्या राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काठमांडू - ५ महिन्यांच्या कालावधीनंतर नेपाळने गुरुवारी एव्हरेस्ट व अन्य हिमालयातील शिखरे पर्यटनासाठी खुली केली, अशी माहिती पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. सामान्यत: मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या सर्व वसंत ऋतूतील मोहिमांना कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीमुळे स्थगिती देण्यात आली होती. सरकारने गिर्यारोहण मोहिमांसाठी परवानग्या देणे थांबविले होते. तसेच, दिलेल्या परवानग्याही रद्द केल्या होत्या.“पर्वतारोहण करणार्‍यांसाठी पर्वत आता मोकळे झाले असून, विभागाने गुरुवारपासून नव्या गिर्यारोहकांना परवानग्या देण्यास सुरवात केली आहे,” असे पर्यटन विभागाच्या संचालक मीरा आचार्य यांनी सांगितले. आता पर्वतारोहणाच्या उद्देशाने देशात ४१४ शिखरे उघडली आहेत.आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या अनुषंगाने सरकारने गुरुवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स, ट्रेकिंग आणि पर्वतारोहण सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नेपाळ सरकार गिर्यारोहकांकडून वर्षाकाठी चार दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रॉयल्टी वसूल करते.पर्यटन विभाग माउंट एव्हरेस्टच्या सामान्य मार्गासाठी क्लायंबिंग परमिट फी म्हणून ५,५०० डॉलर्स आणि शरद ऋतूतील अन्य मार्गासाठी ५,५०० डॉलर्स वसूल करतो. आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी देश तयार होत असल्याने शरद ऋतूतील हंगामासाठी पर्यटक बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.‘अलगीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवावी किंवा नाही, ही बाब अद्याप चर्चेत आहे. यामुळे आम्ही परदेशी गिर्यारोहकांना देशात येऊ देऊ शकत नाही,’ असे आचार्य यांनी वृत्तपत्राला सांगितले.नेपाळमध्ये आतापर्यंत १९२७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे

मुंबई - दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चौकांवर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने ही घोषणा केली आहे. 
दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे. 
१ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत व निदर्शने करत हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. लॉकडाऊनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव १७ रुपयांपर्यंत खाली कोसळले. शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने प्रति दिन १० लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान २५ रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली. राज्यातील ७६ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे १७ रुपयांपर्यंत खाली आले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे ही मागणी किसान सभा व संघर्ष समिती करत आहे.
मुंबई - एका २१ वर्षीय तरुणीस अनोळखी इसमाकडून वेगवेगळ्या बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून तिचे खाजगी व्हिडीओ,फोटो स्क्रिनशॉट पाठवून वायरल करण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याची तक्रार बांगूर नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.त्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठपोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्ह्याचा शोध घेण्यास आदेश आले होते. त्यानुसार गु.प्र.शा. गु.अ.वि. कक्ष ११ कांदिवली पश्चिम येथील अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपीने इंस्टाग्रामवर चार बनावट अकाउंट बनविल्याचे समोर आले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कक्ष ११ च्या अधिकाऱ्यांनी तूर्तास आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. माहितीच्या आधारे आरोपी इसमास बांद्रा पश्चिम येथील अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पैश्याच्या हव्यासापोटी हे सर्व केल्याचे काबुल केले. आरोपीने वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त करून पुढील कारवाईसाठी बांगूर नगर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला. अशा प्रकारे कक्ष ११ च्या पथकाने बांगूर नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा उघडकीस आणला. 
हि यशस्वी कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप कर्णिक,अति कार्यभार सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. पोलीस उप आयुक्त ( प्रकटीकरण-१)श्री.अकबर पठाण,सहायक आयुक्त श्री.राजेंद्र चिखले,यांच्या मार्गदर्शनाखाली गु.प्र.शा. गु.अ.वि. कक्ष ११ चे प्रपोनि चिमाजी आढाव,पो.नि. राईस शेख,पो.नि. सलील भोसले,स.पो.नि.विठ्ठल चौगुले,स.पो.नि. शरद झिने,स.पो.नि.विशाल पाटील, तसेच पोलीस अंमलदार स. फौ. अविनाश शिंदे, पो.ह. रवींद्र भांबिड,राजू गारे,दिलीप वाघरे, सुबोध सावंत, महादेव नावगे, राकेश लोटांकर,अजित चव्हाण,निलेश शिंदे, म.पो.शि. रिया अणेराव व सारिका कदम यांनी पार पाडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मधून एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सहा हजार वर पोहोचली आहे. बुधवारी २२१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना मुक्तांची संख्या ६ हजार ९३ झाली आहे.मीरा भाईंदर हद्दीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना, बुधवारी शहरासाठी दिलासादायक बातमी मिळाली. कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजार पार झाली असली तरी कोरोनामुक्तांची संख्या सहा हजार वर पोहोचली आहे. आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २४ हजार १५३ जणांनी कोविड चाचणी करण्यात आली आहे या मध्ये १५ हजार ५५० जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. तर ७ हजार ९८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.बुधवारी शहरात १४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ५ जणांचा उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार मृत्यूची एकूण संख्या २६६ वर पोहोचली.तसेच शहरातील आणखी ६२० जणांचा कोविड १९ चाचणीचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. १ हजार ६२४ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ९६ नवीन रुग्ण तर ४९ जणांचा कोरोना बधितांचा संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे, अशी माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

जिल्ह्यातील चार शहरांमध्ये लागू केलेल्या संचारबंदीचा गुरुवारी अखेरचा दिवस असून ३१ जुलैपासून संचारबंदीत सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर शिथीलता देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नंदुरबार शहराकरिता दोन मोबाईल स्वॅब तपासणी प्रयोगशाळेची सुविधा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ९ ऑगस्टला आदिवासी गौरव दिनानिमित्त जिल्हा महिला व बालकल्याण रूग्णालयात १५० बेडची सुविधा असलेल्या ऑक्सिजन रूग्णालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चार शहरांमध्ये आठ दिवसांची कडक संचारबंदी लागु केली होती. या संचारबंदीचा अखेरचा दिवस असल्याने मध्यरात्री १२ वाजेपासून संचारबंदीला शिथीलता देण्यात आली आहे. ३१ जुलै ते ३ ऑगस्ट यादरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. त्यानंतर दि.४ ऑगस्टपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. परंतु शहरी भागात रविवारी लागु केलेला जनता कर्फ्यु कायम राहील. अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. कोरोना नमुन्यांच्या तपासणीसाठी अ‍ॅन्टीरॅपीडसह दोन प्रकारच्या किट वापरण्यात आल्या. शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी ५०० किट दिल्या होत्या. परंतु आणखीन ६ हजार किटची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत ४ हजार नमुने तपासणी आल्याने त्यात ५०० हुन अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ३३० जण बरे होवुन २९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी व शासनाच्या नियमांच्या पालनासह आता जिल्ह्यातील नागरिकांनी नमुने देण्यासाठी स्वतःहुन पुढे येण्याची गरज आहे. यासाठी नंदुरबार व शहादा येथे सेंटर सुरू करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात दोन मोबाईल स्वॅब तपासणी शाळेला मान्यता दिली असून लवकरच हे पथक कार्यान्वित होईल. या पथकाने घेतलेले स्वॅब दोन ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ३० हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी असून जिल्ह्या करिता १० इंजेक्शन प्राप्त झाले होते. त्यातील पाच इंजेक्शनचा उपयोग करण्यात आला आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण रूग्णालयात ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधुन स्वतंत्र १५० खाटांचे अद्यावत ऑक्सिजन रूग्णालय सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहादा, तळोदा येथेही रुग्णालय सुरू करण्यात येणार असून जिल्ह्यात एकूण ८०० खाटांचे रुग्णालये कोविडसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे.तालुक्यातही नमुने तपासणीसाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात ८० लाखांची आरटीपीसीआर स्वतंत्र लॅब तयार करण्याचा प्रयत्न आहे. ६० लाखांच्या आरटीपीसीआर किटस्ची मागणी असणार आहे. 

- वाढीव वीज बिलाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना जाब विचारून वाढीव वीज बिलाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानंतर बुधुवार वाढीव वीज बिलाबाबत जनतेत असलेला आक्रोश दर्शवण्यासाठी बोरिवलीच्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर मनसेने धडक दिली.
अदानी इलेक्ट्रिसिटीने आकारलेल्या अवाजवी बिलांबद्दल मनसे सरचिटणीस नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने अदानीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेच्यावतीने निवेदन दिले. यावेळी बांद्रा ते भायंदरमधील मनसे विभागअध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. वाढीव वीज बिलात ५० टक्के सवलत ग्राहकांना द्यावी. ग्राहकांच्या शंकेचे निरसन करावे. लॉकडाऊन कालावधीत वीज कपात करू नये आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसेच ३ दिवसांचा अवधी मनसेकडून देण्यात आला आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नयन कदम यांनी दिला आहे.

राज्यात लॉकडाऊन वाढला असला तरी, लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स सुरू राहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्यातील मॉल्स सुरु करण्यात येणार असले, तरी मॉल्समधील थिएटर आणि फूड मॉल तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंदच राहणार आहेत. मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टाचे किचन पार्सल देण्यासाठी खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नव्या शिथिलतेसोबतच मागच्यावेळच्या शिथिलतेचे नियमही कायम राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती जुन्या नियमांप्रमाणेच ठेवावी लागणार आहे. 
प्रवासासाठीही ५ ऑगस्टपासून लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. दुचाकीवर आतापर्यंत एकालाच परवानगी होती, आता दोन जण प्रवास करू शकणार आहेत. चार चाकीमध्ये १ +२ ऐवजी १+३ परवानगी असेल, रिक्षात १+१ ऐवजी १+२ परवानगी असेल टॅक्सीमध्ये १+२ ऐवजी १+३ अशी वाहतुकीस परवानगी असेल.याशिवाय खुल्या मैदानातील खेळ जसे गोल्फ, आऊटडोअर फायरिंग, खुल्या मैदानातील जिम्नॅस्टिक, टेनिस, खुल्या जागेतील बॅडमिंटन याला ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे.केंद्र सरकारने ५ ऑगस्टपासून जिम उघडण्यास परवानगी दिली आहे, पण राज्यामध्ये मात्र जिमवर अजूनही बंदी कायम आहे. तसेच केंद्राने रात्रीची संचारबंदी उठवली असली, तरी राज्याने मात्र याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. राज्यामध्ये १५ मार्चपासून मॉल्स, शाळा, कॉलेज आणि जिम बंद करण्यात आल्या होत्या. 


फायटर जेट हवाईदलाच्या ताफ्यात बुधवारी दाखल झाले. पहिल्या टप्प्यातील पाच राफेल विमाने बुधवारी भारतात आली. भारतातही या लढाऊ विमानांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांदेखील राफेल विमाने हवाईदलाच्या ताफ्यात सामिल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याव्यतिरिक्त त्यांनी सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.
सरकारने उत्तर द्यावे की प्रति विमान ५२६ कोटी रूपयांऐवजी १६७० कोटी रुपये का देण्यात आले?, एकूण १२६ विमानांऐवजी ३६ विमानांची खरेदी का करण्यात आली?, हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेडऐवजी दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचे कंत्राट का देण्यात आले ?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला हे प्रश्न विचारले.
राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटले जाते. त्यामागे कारण सुद्धा खास आहे. एसयू-३५, मिग-३५ आणि युरोफायटर टायफून या स्पर्धक कंपन्यांच्या फायटर विमानांच्या तुलनेत राफेल पूर्णपणे उजवे आहे. शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचे तंत्रज्ञानामुळे राफेल इतर विमानांपेक्षा वेगळे ठरते.
राफेलचे  वैशिष्टय म्हणजे ते एका मल्टीरोल फायटर विमान आहे. राफेलचा जन्म होण्याआधी टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला यासाठी वेगवेगळी विमाने  लागायची. पण आता एकटे राफेल ही सर्व कामे करण्यासाठी सक्षम आहे. आठ विमानांची काम एकटे राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटले जाते. राफेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या विमानाची इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, रडार आणि शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम सतत सरु असते. त्यामुळे आज फोर प्लस जनरेशनचे असलेले हे विमान उद्या ५ जनरेशनमध्ये बदलल्यास आश्चर्य वाटणार नाही. राफेल विमान हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. या विमानात २५ किलोमीटर वायरींग असून ३० हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत. २० हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकणाऱ्या या विमानाचा ताशी वेग २,१३० किलोमीटर आहे.हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणे महत्वाचे असते. त्या दृष्टने राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे. १०० किलोमीटरच्या रेंजमधील एकाचवेळी ४० टार्गेट शोधण्याची क्षमता यामध्ये आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आज सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जाईल. यावेळी मॉरिशस न्याय विभागाचे वरिष्ठ सदस्य आणि दोन्ही देशांतील अन्य मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होतील.
सर्वोच्च न्यायालयाची ही नवीन इमारत भारताच्या सहकार्याने उभारण्यात आली. ही इमारत भारतीय सहयोगाने उभारलेला मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस मधील पहिला पायाभूत सुविधा प्रकल्प असेल. २०१६ मध्ये मॉरिशसला देण्यात आलेल्या 'विशेष आर्थिक पॅकेज' अंतर्गत भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या पाच पायाभूत सुविधांपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचा हा एक प्रकल्प आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन इमारतीत २६ हजार चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. ज्यामध्ये २४ कोर्ट रूम आणि अत्याधुनिक उपकरणे तसेच दोन भूमिगत कार पार्किंगचा समावेश आहे. या नवीन पायाभूत सुविधांमध्ये तीन सहाय्यक न्यायालये, चार व्यावसायिक न्यायालये, औपचारिक बाबींसाठी एक न्यायालय आणि कौटुंबिक बाबींसाठी एक न्यायालय देखील असेल.पोर्ट लुईसमधील एडिथ कॅव्हल स्ट्रीट येथे नवीन सर्वोच्च न्यायालयाच्या बांधकामाचा ठेका भारतीय राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळाला (एनबीसीसी) देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या गरजा आणि अपेक्षा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी हा प्रकल्प अधिक आधुनिक करण्यात येणार आहे.महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी संयुक्तपणे मॉरिशसमधील मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे आणि नवीन ईएनटी हॉस्पिटल प्रकल्पाचे उद्घाटन केले.

केंद्रिय कॅबिनेटच्या बैठकीत आज(बुधवार) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला मंजूरी मिळाली. या धोरणानुसार २०३५ पर्यंत उच्च शिक्षणात ५० टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २१ व्या शतकातील राष्ट्रीय शिक्षण धोरण मंजूर करण्यात आल्याचे केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषददेत सांगितले.
२१ व्या शतकासाठी शिक्षण धोेरण मंजूर करण्यात आले आहे. मागील ३४ वर्षांपासून शिक्षण धोरणात बदल करण्यात आला नव्हता हे महत्त्वाचे आहे. देश पदेशातल्या शिक्षण तज्ज्ञांसह संपूर्ण समाज या धोरणाचे स्वागत करेल’, असे जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.भारताला ३४ वर्षानंतर नवे शिक्षण धोरण मिळत आहे, त्यामुळे हा ऐतिहासिक दिवस असल्याचे उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी मत मांडले. या धोरणांनुसार ५० टक्के ग्रॉस इनरोलमेंट रेषो((GER) २०३५ पर्यंत साध्य करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शैक्षणिक, व्यवस्थापन, आणि आर्थिक स्वायत्तता शैक्षणिक संंस्थांना देण्याची व्यवस्था नव्या शैक्षणिक धोरणात आहे. यामध्ये उच्च शिक्षणासाठी फक्त एकच नियामक संस्था असणार आहे. पारदर्शिपणे कारभार करण्यासाठी अनेक नियमाकांऐवजी एकच नियामक संस्था असणार असल्याचे खरे म्हणाले.नव्या धोरणांतर्गत स्थानिक भाषेत ई- कोर्सस तयार करण्यात येणार आहेत. याबरोबरच व्हर्च्युअल लॅब आणि नॅशनल एज्युकेशन टेकनॉलॉजी फोरम तयार करण्यात येईल. शिक्षण धोरण करताना मोठ्या प्रमाणात सल्ला मसलत करण्यात आली. ग्रामपंचायत, विविध सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकांच्या मताचा विचार करण्यात आल्याचे खरे म्हणाले.

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छूक पदवीधर अभियंते आणि विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या किंवा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसह ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायवयाचा आहे. निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार (Level-10 (7th CPC) सॅलरी मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख  १७ ऑगस्ट २०२० आहे.

या पदांसाठी होणार भरती -
- पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग - ३७
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग - ३५
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग - ३१
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग - १२
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : मटेरियल सायन्स आणि इंजिनियरिंग/मेटॉलॉजिकल इंजिनियरिंग - १०
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : फिजिक्स - ८
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत फिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव  केमिस्ट्री - ७
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : केमिकल इंजिनियरिंग - ६
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : एरोनॉटिकल इंजिनियरिंग - ४
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : मॅथमॅटिक्स - ४
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत मॅथमॅटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : सिविल इंजिनियरिंग - ३
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परीक्षेत उत्तीर्ण
- पदाचे नाव : सायकॉलॉजी - १०
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात नेट उत्तीर्ण
वयोमर्यादा : २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२०

मुंबई -
इनस्टाग्रामवर असलेल्या प्रत्येक खात्याची चाचपणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सुरू केली आहे. यात चित्रपट-मालिकांशी संबंधीत व्यक्तींसह देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिडापटू, टीकटॉक स्टार आदींचा समावेश आहे.
विशिष्ट सॉफटवेअरद्वारे कृत्रिमरित्या चाहत्यांची (फॉलोअर) संख्या वाढवून देणाऱ्या ५४ सोशल मिडीया मार्केटींग कंपन्या आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांकडून चाहते विकत घेणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींचा घोटाळा गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उघडकीस आणला. पुढील टप्प्यात पथकाने अशा आणखी २५ कंपन्या शोधून त्यांची चौकशी सुरू केली. आतापर्यंतच्या तपासातून चित्रपट तारेतारका, मेकअप आर्टीस्ट, नृत्यकलाकार, नशीब आजमावण्यासाठी धडपडणाऱ्यांसह टीकटॉक अ‍ॅपवरील प्रसिद्ध व्यक्ती, क्रिकेटपटूंची नावे पुढे आली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने  दिली.टाळेबंदीमुळे दौरे किंवा सामने नसले तरीही भारतीय क्रिकेट संघातील आजीमाजी खेळाडूंचे इन्स्टाग्राम चाहते झपाटय़ाने वाढतात, असे निरीक्षण आहे. मात्र इतरांच्या तुलनेत अवघ्या तीन दिवसांत एका आघाडीच्या खेळाडूच्या चाहत्यांमध्ये पाचपटीने वाढ झाली आहे. म्हणजे इतरांचे शंभर चाहते वाढले तर या क्रिकेटवीराच्या चाहत्यांची संख्या पाचशेने वाढली आहे.  चाहत्यांमध्ये अशी अचानक झालेली वाढ संशयास्पद आहे. विशेष पथकाचे अशा अकाऊंटवर लक्ष असणार आहे. 
या प्रत्येकाच्या इन्स्टाग्रामवरील चाहत्यांची संख्या, या संख्येत अचानक झालेली मोठी वाढ, या व्यक्तीने पोस्ट केलेले छायाचित्र, मजकूर किंवा ध्वनिचित्रफित, असे साहित्य आणि त्याला मिळालेला प्रतिसादासादाचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. या तपासातून कोणी, कधी, किती चाहते विकत घेतले, त्याचा वापर कसा केला, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे, प्रफुल्ल वाघ, नितीन लोंढे यांच्या विशेष पथकाने सुरू केला आहे.

मुंबई -
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक आणि माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व 'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे संरक्षण माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात येत होती. त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर  बैठकीत विचारविमर्श करण्यात आला आणि निर्णय घेण्यात आला. 
कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि. २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतुदीनुसार राज्यामध्ये ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू असणार नाही.

बीड -
मित्र करोनाबाधित निघाल्याने आपल्यालाही करोना झाला असेल? या भीतीनेच गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी करोनाची चाचणी नकारात्मक आलेली असतानाही बाधित मित्राबरोबर फिरल्याची भीती मनात कायम राहिल्याने चार दिवसांपासून ते अस्वस्थ होते. यातच रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, २५ वर्षांपासून अधिक काळ एकाच वर्तमानपत्रात तालुक्यात काम करणाऱ्या पत्रकाराच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले मागील काही दिवसांपासून आपल्या मित्राबरोबर शहरात फिरत होते. आठ दिवसापूर्वी सोबतच्या मित्राला करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत उघड झाले. परिणामी आपल्यालाही लागण झाली असेल या भीतीने ते अस्वस्थ झाले. दोन दिवसापूर्वी त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आल्यानंतर अहवाल नकारात्मक आला. तरीही ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसू लागल्याने ते अधिकच अस्वस्थ होत गेले. सोमवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवार दि. २८ जुलै रोजी दुपारी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा आणि विवाहित दोन मुली असा परिवार आहे. सुस्वभावी आणि धडाडीचा पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. 

मुंबई -
विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी केली. काही मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घेऊया, अशी विरोधी नेत्यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे अशी भूमिका घेतली. कायदेशीर दृष्ट्या विरोधकांच बरोबर आहे. तसेच दोन्ही सभागृहातील सदस्यांची संख्या आणि त्यांच्याबरोबर असलेले पीए आणि इतर लोकांची व्यवस्था करणे थोडे कठीण असल्याने पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली.
पावसाळी अधिवेशन हे ७ सप्टेंबर रोजी होईल. आता ते किती दिवसांचे करायचे, कशा पद्धतीने करायचे हे ठरवण्यासाठी अधिवेशनाआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत अधिवेशनाचे दिवस, कोणते विषय घेतले जातील, याचा निर्णय होईल असे अनिल परब यांनी सांगितले.तसेच, मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. या संदर्भातील सूचना मुख्यमंत्र्यांकडे करण्यात याव्या. आरक्षण टिकाव ही सरकारची इच्छा आहे. त्याला दुसरे वळण लागणार नाही याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया देखील परब यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिली.

पुणे -
राज्यासह पुण्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचे रुग्ण  वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच उत्तर मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. 
मुख्यमंत्री ठाकरे हे पुण्यासह विभागातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७५ हजारहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीकाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात  पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या पुण्यात येत आहेत. एकूणच मुख्यमंत्र्यांचा दौरा कोरोना बरोबरच राजकीय दृष्टीकोनातून लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना अर्थात भाजपला उत्तर देणार का? याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. तसेच कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत, असे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली -
राम मंदिराचे भूमीपूजन ५ ऑगस्टला प्रस्तावित आहे. अयोध्येत या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जैश- ए- मोहम्मद आणि लष्कर- ए-तोयबा या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंंत्रणांनी दिली आहे.
भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनास उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळी अनेक नेते आणि व्हिआयपी उपस्थित असतील. त्यांना लक्ष्य कऱण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमावर हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचा इशारा रॉ ने दिला आहे. राम मंदिर भूमी आणि परिसरात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांच्या मदतीने मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे रॉ ने आपल्या अहवालात म्हटले आहे.राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी आयएसआयने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर पाकिस्तानी आय़एसआयने अयोध्या आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी भारतात हल्ले करण्यासाठी तीन ते चार दहशतवादी पाठविल्याचे रॉ च्या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, अयोध्या आणि काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लखनऊ -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील नागरिकांनाही या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राम जन्मभूमीर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी याबाबत माहिती दिली.
राय यांनी नागरिकांना अयोध्येमध्ये न येण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपल्या घरीच राहून हा सोहळा अनुभवावा, आणि घरीच आनंद साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, अयोध्येला येण्याऐवजी सायंकाळी जवळपासच्या मंदिरात जाऊन प्रार्थना कराव्यात असेही त्यांनी सुचवले आहे. स्वतंत्र भारतातील ही एक ऐतिहासिक घटना असेल, असेही ते पुढे म्हणाले.पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनाही आमंत्रित केले गेले आहे.

श्रीनगर -
पाकिस्तानकडून ‘एलओसी’वर कुरापती करणे सुरूच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघ करण्यासोबतच पाकिस्तानकडून घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. अशाचप्रकारे राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, एवढेच नाहीतर दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा देखील करण्यात आला आहे. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत दोन पाकिस्तानी घुसखोर ठार तर पाकिस्तानचा अन्य एक घुसखोर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जवानांकडून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील केरन व मच्छल सेक्टर आणि राजौरीच्या कलला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या घुसखोरीत पाकिस्तानी सैनिकाबरोबरच दहशतवादी देखील होता. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार सुरू असलेल्या गोळीबारासही भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले आहे.
या अगोदर जम्मू-काश्मीरमधील रणबीरगड  येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ज्यामध्ये लष्कर ए तोयबाचा  कमांडर इश्फाक रशीद खान व एजाज अहमद यांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक एके-47 रायफल व पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली होती.

मुंबई - 
मुंबई - राज्यात करोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.रोज हजारो रुग्ण सापडत आहेत शिवाय कोरोनामुळे कित्येक लोकांनी आपले पर्ण गमावले आहे. अशातच  मुंबईतील एका प्रख्यात बिल्डरचा करोनाने मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या पश्चात नोकरांनी डाव साधला. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचे प्रयत्न केले. कांदिवली क्राइम ब्रांचने या नोकरांचा डाव उधळला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शफीक शेख, प्रीतेश मांडलिया, अर्शद सय्यद, स्वप्नील ओगेलेकर अशी या आरोपींची नावे आहेत. यातील शफीक शेख हा याच बिल्डरकडे नोकरी करतो. त्यानेच हा कट रचला. अटक केलेल्या आरोपींपैकी शफीक हा बिल्डरकडे काम करत होता. काही दिवसांपूर्वी ८१ वर्षीय बिल्डरचे करोनामुळे निधन झाले. बिल्डर कोणती कागदपत्रे, महत्वाचे दस्तावेज कुठे ठेवायचा हे शफीकला माहिती होते. तो काहीतरी बहाणा करून ऑफिसमध्ये गेला. त्याने बिल्डरचा चेकबुक चोरी केला. त्यातील काही चेकवर सह्या करून ठेवल्या होत्या. त्याने ऑफिसमधून बिल्डरचा आधार कार्ड घेतला. त्याची झेरॉक्स काढून त्यावर आपल्या एका साथीदाराचा फोटो लावला. त्यानंतर एक नवीन झेरॉक्स काढली. ती घेऊन तो एका मोबाइल गॅलरीत गेला आणि तेथून बिल्डरच्या नावाने सिमकार्ड खरेदी केला. बिल्डरच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करताना ओटीपी मिळावा म्हणून त्याने हे कृत्य केले. मात्र, शफीक आणि त्याच्या साथीदारांचा हा डाव उधळून लावला. कांदिवली क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव आणि शरद झीने यांच्या पथकाने त्यांना अटक केली. शफीकसह चौघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ३१ जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.


मुंबई -
बॉलिवूडमधील दिग्दर्शक परवेज खान यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ५५ व्या वर्षांचे होते. त्यांनी दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या ‘अंधाधुन’ आणि ‘बदलापूर’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. परवेज यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
परवेज खान यांना अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने मुंबईमधील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती परवेज खान यांच्यासोबत काम करणारे निशांत खान यांनी पीटीआयला दिली होती. सोमवारी सकाळी त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून परवेज खान यांचे निधन झाल्याचे सांगितले.
‘परवेज खान यांना सोमवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला आणि मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास नव्हता.चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ट्विट करत परवेज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परवेज आणि हंसल यांनी शाहिद या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांनी ट्विटमध्ये ‘नुकतच कळाले की अॅक्शन दिग्दर्शक परवेज खान यांचे निधन झाले आहे. आम्ही दोघांनी शहिद चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांनी एका टेकमध्ये शूट केले होते. ते अतिशय चांगले व्यक्ती होते’ असे म्हटले आहे.
परवेज यांनी करिअरची सुरुवात अॅक्शन दिग्दर्शक अकबर बक्शी यांना असिस्ट करत केली होती. त्यांना अकबर यांनी अक्षय कुमारचा चित्रपट खिलाडी, शाहरुख खानचा बाजीगर आणि बॉबी देओलचा सोल्जर या चित्रपटासाठी असिस्ट केले होते. २००४ मध्ये त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम केले. त्यानंतर परवेज यांनी श्रीराम राघवन यांच्यासोबच जॉनी गद्दार, एजंट विनोद, बदलापूर आणि अंधाधुन या चित्रपटांसाठी काम केले.

नवी दिल्ली -
भारताकडून बांगलादेशला दहा रेल्वे इंजिन पुरवण्यात येत आहेत. १० डिझेल इंजिन ‘डब्ल्यूडीएम ३ डी’ प्रकारातील असून त्यांच्या देखभालीसाठीही भारताने बांगलादेशशी भागीदारी केली आहे. यामुळे बांगलादेशला माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणे सोपे होणार आहे.
१९९६ ला भारतीय रेल्वेने बांगलादेशला वाराणसी येथील कारखान्यात तयार केलेली १० मीटर गेजची डिझेल इंजिन पुरवली होती. त्यानंतर भारताचा व्यापार बांगलादेशशी अद्यापही सुरूच आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान मैत्री व बंधन या दोन एक्स्प्रेस सेवाही चालवल्या जातात.नुकतेच लासलगाव येथून बांगलादेशला कांद्याची निर्यातही करण्यात आली. यानंतर आता प्रवासी रेल्वे व मालगाडी अशा दोन्हींना चालवण्यासाठी दहा इंजिन पुरवण्यात आली आहेत.
तेथील गरजेनुसार त्याच्या उंचीमध्ये आवश्यक ते बदल केले आहे. या सर्व इंजिनांचे आयुर्मान २८ वर्षांहून अधिक आहे. त्यांच्या मोटरची क्षमता ३३०० हॉर्स पॉवर इतकी असून या इंजिनांचा वेग दर ताशी १२० किमी इतका असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मुंबई -
कोरोनाच्या या भयंकर साथीविरोधात देशाने, महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. 
भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेची अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले याप्रसंगी  मुख्यमंत्री  ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि १० लाख लोक बरे झाल्याचे सांगितले.
कोरोना लढ्यात ही आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध सध्यातरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर २० दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. ‘चेस दि व्हायरस’ परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत. कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला. या  थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागला आहे.
केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पुढेदेखील राज्यांना पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कचा पुरवठा करावा अशी विनंती करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि गावोगावी ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्चमध्ये राज्यात दोन प्रयोगशाळा होत्या. त्या आता १३० पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाययोजनांची देखील माहिती यावेळी दिली.  
राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. राज्यात २६६५ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय आहेत. एकूण ३ लाख ६ हजार १८० आयसोलेशन बेड्स. ऑक्सिजन बेड्स ४२ हजार ८१३, आयसीयू बेड्स ११ हजार ८८२,  ३७४४ व्हेंटीलेटर्स, ७ लाख ६ हजार ९११ पीपीई किट्स, १२ लाख ५९ हजार ३८२ एन ९५ मास्क अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमीचे 'ई-भूमीपूजन' करण्यात यावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. यावरुन आता विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंचा निषेध केला आहे. ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे एकेकाळी 'हिंदुत्ववादी' असणारा पक्ष संपत चालल्याचे लक्षण असल्याचे मत व्हीएचपीचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या हिंदुत्ववादी शिवसेनेकडून अशा प्रकारचे वक्तव्य येणे हे निंदनीय आहे. तसेच, उद्धव ठाकरे हे अंधपणे या गोष्टीला विरोध करत आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपण पृथ्वीमातेची परवानगी घेतो, जेणेकरुन ते बांधकाम चांगले होईल. अशाप्रकारची पूजा ही ऑनलाईन होऊ शकत नाही, असे कुमार म्हणाले. देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, या पूजेसाठी केवळ २०० लोकच उपस्थित राहतील अशी दक्षता आम्ही घेऊ, असे कुमार यांनी स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाने प्रतिकात्मक रथ यात्रेसाठी परवानगी दिली होती. तसेच, अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पूजेचे सर्व विधी पार पडणारच आहेत. त्यामुळे राम मंदिराचे भूमीपूजन करण्यालाही कोणाची काही हरकत नसावी. विश्व हिंदू परिषद ही पहिल्यापासून यासाठी खबरदारी बाळगत असतानाही, लोकांच्या आरोग्याचे कारण ठाकरेंनी पुढे केले आहे, जे नक्कीच खोटे आहे असे कुमार म्हणाले.

श्रीनगर - 
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रात मंत्री असलेले ओमर अब्दुल्ला यांनी, आपला पक्ष नेशनल कॉन्फ्रेंससाठी आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी काम करत राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.अनेक दशकांनंतर, बदललेल्या परिस्थितीत, या केंद्रशासित प्रदेशात परिसीमन प्रक्रियेनंतरच निवडणूका घेण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर दोन केंद्र शासित प्रदेशात विभागले गेले होते.मी राज्याच्या विधानसभेचा नेता राहिलो आहे. ही एकेकाळी सर्वात मजबूत विधानसभा होती, जी आता देशातील सर्वात शक्तिहीन विधानसभा बनली आहे, मी याचा सदस्य होणार नाही. ही धमकी किंवा ब्लॅकमेल नाही किंवा हे निराशेचे लक्षणही नाही. ही एक सामान्य कबुली आहे, ज्यात मी कमजोर विधानसभा किंवा केंद्रशासित प्रदेश विधानसभेचा भाग होऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले.अमरावती -
जन्मादात्या बापानेच सहा वर्षीय चिमुकल्या मुलाची आधी गळा दाबून व नंतर पाण्यात बुडवून हत्या केली. ही धक्कादायक जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मोझरी गावात समोर आली आहे. धर्मा शेलुकर असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास शेलुकर याला अटक केली आहे. वडिलानेच मुलाची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा व पत्नी असा परिवार आहे. आरोपीने मुलाची हत्या करण्यासाठी त्याला चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्याच्या परिसरात नेले. तेथे आधी मुलाचा गळा आवळला व त्यानंतर तेथेच असलेल्या नाल्यात बुडवून त्याची हत्या केली आणि मृतदेह जमिनीत पुरून ठेवला. हत्या केल्यानंतर घरी परतलेल्या आरोपी पित्याला घरच्यांनी मुलाबाबत विचारले असता त्याने हत्या केल्याची धक्कादायक माहीती कुटुंबीयांना दिली. आरोपीच्या वडीलांनी चिखलदरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पिता रामदास शेलुकर याला अटक केली आहे.

रत्नागिरी -
येथील कोविड रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधिताच्या नातेवाईकांनी चक्क त्याचा मृतदेह जबरदस्तीने उचलून नेला. इतकेच नव्हे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध न जुमानता त्यांनी या नातेवाईकांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.
अंत्यसंस्काराला जवळपास ३० ते ४० जण उपस्थित राहिले. तर या धक्कादायक प्रकारावर काय कारवाई करायची, यासंदर्भात आज निर्णय होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

जळगाव -
 भाजपच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सोमवारी नियुक्तीपत्र दिले आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे हे पद रिक्त होते. या पदावर कुणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता होती. यात अनेकांच्या नावाची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्रही त्यांना देण्यात आले आहे. आमदार भोळे यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनास प्रारंभ केला. १९९९ ते २००० मध्ये ते भाजपतर्फे जळगाव पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले. त्यानंतर पक्षाने त्यांची जिल्हा महानगराध्यक्षपदी नियुक्ती केली, गेली ६ वर्षे ते महानगराध्यक्ष होते. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. शिवसेनेचे दिग्गज नेते सुरेश जैन यांचा त्यांनी पराभव केला. ते जायंट किलर ठरले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीतही त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली व ते दुसऱ्यांदा विजयी होवून जळगावचे पुन्हा आमदार झाले. पक्षाने आता त्यांना जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

मुंबई -
राज्यात बकरी ईदसाठी काही नियम शिथील करण्यात यावेत. कुर्बानीसाठी बकरे सहजपणे बाजारात मिळतील अशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी सोमवारी राज्यातील मुस्लिम आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मागील अनेक दिवसांपासून सरकारकडे आम्ही याचा पाठपुरावा करतोय, परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने, आपणच आता पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या आमदारांनी केली असल्याचे सांगण्यात आले. पवार हे मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील, असा विश्वास यावेळी मुस्लिम आमदारांकडून व्यक्त करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवारांची समाजावादी पक्षाचे आमदार अबू आझमी, माजी आमदार व काँग्रेसचे नेते नसीम खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदींसोबतच पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते.यावेळी अबू आझमी म्हणाले की, आज आमचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ऐकले असून, त्यांच्याकडेही आम्ही बकरी ईदसाठी कुर्बानीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. बकरे ऑनलाईन खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे, मात्र ‍ ज्या गाड्यांमधून बकरे आणले जात आहेत, ते ठिकठिकाणी अडवले जात आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आम्हाला सरकारने मागे म्हटले की, प्रतिकात्मक कुर्बाणी द्यावी, परंतु, तशी आम्हाला देता येणार नाही. यामुळे सरकारने आमच्या भावनांचा विचार करून बकरी ईदसाठी नियमावली तयार करावी अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेणार आहोत. यासाठीचा कार्यक्रमच आम्ही सादर केला असून, तोच कार्यक्रम घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीत आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले असून, आता सरकारकडून त्यासाठी लवकर नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी यावेळी मुस्लिम आमदारांनी केली. 

मुंबई -
ऑगस्ट महिन्यात सणांची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. हे दिवस लक्षात घेऊन नागरिकांनी आपली बँकेतील सर्व महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल करण्यात आले आहेत. 
ऑगस्ट महिन्यात बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका असे सण या महिन्यात येणार आहेत. तसेच या महिन्यात पाच रविवार देखील आहेत. त्याचप्रमाणे ८ आणि २९ ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार येणार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.  

 ऑगस्ट महिन्यातील सुट्टया 
१ ऑगस्ट शनिवारी बकरी ईद 
३ ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन 
११ ऑगस्ट मंगळवार गोकुळाष्टमी 
१२ ऑगस्ट बुधवार गोकुळाष्टमी 
१५ ऑगस्ट शनिवारी स्वातंत्र्य दिन 
२१ ऑगस्ट शुक्रवार तीज-हरतालिका 
२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी 
३० ऑगस्ट रविवार मोहरम 
३१ ऑगस्ट सोमवार ओनम 

पंढरपूर -
पंढरपूर शहर भाजपा अध्यक्ष आणि निर्भिड आपले मत या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक संजय अंबादास वाईकर (वय ५१) यांचे करोना विषाणूमुळे निधन झाले आहे. दहा दिवसांपूर्वी वाईकर यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वाखरी येथील कोविड सेटंरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोलापूरला हलवण्यात आले.सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून वाईकर यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वाईकर यांचं रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण वाढल्यामुळे आज, पहाटे मृत्यू झाला. वाईकर यांच्यावर सोलापुरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाईकर यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.वाईकर यांनी दै. प्रभात, दै. निर्भिड आपले मत, साप्तिहिक आपले मत च्या माध्यमातून सुमारे दहा वर्ष पत्रकारिता केली. गेल्या तीन वर्षांपासून वाईकर भाजपाचे पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

मुंबई -
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून,  दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याने आणखी लॉकडाऊनची गरज नाही. तसेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यावर लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोनाचा रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. २२ मार्च पासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हा पासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत. मुंबईतील अनेक व्यवसाय, कार्यालये बंद आहेत. यामुळे मुंबईचे आणि राज्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६७ दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर ७३ टक्क्यांवर पोहचला आहे. पालिकेची आणि खासगी रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. यावरून कोरोना नियंत्रणात आला असल्याने आता लाॅकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट संकेत पालिका आयुक्तांनी दिले. आता मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला, तर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येईल, असे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत.मुंबई अनलॉक करण्याबरोरबच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील म्हणजेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना तो आकडा नियंत्रणात आला तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार, असेही आयुक्तांनी सांगितले. 

रायगड -
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी १४ वर्षांची होती. रविवारी संध्याकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. 
पोलिसांच्या अंदाजानुसार,रविवारी संध्याकाळी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तांबडी परिसरातील एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यानंतर नराधमांनी तिचा खून करुन तिचा मृतदेह गावाच्या बाहेर टाकून पळ काढला. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर , अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हे रोह्यात दाखल झाले आहेत. रोहा पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. 

नवी दिल्ली  -
जगभरात तसेच देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ४९ हजार ९३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ३५ हजार ४५३ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत देशभरात ३२ हजार ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत ९ लाख १७ हजार ५६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर काही प्रमाणात वाढला आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ६३.९२ इतका झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. त्यातून मृत्युदरही कमी करण्यात यश आले आहे. देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यात लवकरच यश येईल अशी आशा आहे. 

नवी दिल्ली -
राज्य सरकारने मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील ३ दिवसीय सुनावणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा बांधवांना शिक्षण आणि नोकरीसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रवर्गात आरक्षण वर्गात १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याला परवानगी दिली होती. याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर आजपासून तीन दिवस सुनावणी होणार आहे.
घटनेने आरक्षणाची ५० टक्के घातलेली मर्यादा ओलांडली आहे, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दुर्बल घटक २०१८ कायद्यान्वये मराठा बांधवांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मंजूर करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याच्या आधारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणे न्यायोचित नसल्याचे म्हटले होते. नोकरीत आरक्षण आरक्षणाची मर्यादा १२ टक्क्यांपेक्षा अधिक तर शैक्षणिक प्रवेशात १३ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असे, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.काही वकिलांनी मराठा आरक्षणावरची सुनावणी ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न घेता प्रत्यक्ष उपस्थित राहून घ्यावी, अशी खंडपीठाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात सध्या उपस्थित राहून सुनावणी घेणे शक्य नसल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात १५ जुलै रोजी अंतरिम आदेश देणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी वकिलांनी त्यांचे लेखी कागदपत्रे आणि अतिरिक्त कागदपत्र देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते.

जयपूर -
सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये सुरु झालेल्या राजकीय नाट्यात आणखी एक ट्विस्ट आला आहे. बहुजन समाज पार्टीने BSP रविवारी राजस्थानमधील आपल्या सहा आमदारांसाठी व्हीप जारी केला. यामध्ये गेहलोत सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यास काँग्रेसविरोधात मतदान करा, असे म्हटले आहे. या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्यात येईल व त्याचे विधानसभा सदस्यत्त्व रद्द होईल, असेही 'बसप'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आर. गुढा, लाखन सिंह, दीपचंद, जेएस अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली अशी बसपाच्या सहा आमदारांची नावे आहेत. गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडल्यास या सहा आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. या पार्श्वभूमीवर बसपकडून हा व्हीप जारी करण्यात आला आहे. 
याशिवाय, 'बसपा'कडून राज्यपाल कलराज मिश्र आणि विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनाही पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बसपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचे राज्य स्तरावर विलीनकरण करता येणार नाही. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आपल्याला आमदारांनी व्हीप जारी करण्याचा अधिकार असल्याचे पत्रात म्हटले आहे. 

सातारा -
'करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबींसाठी १० ते २ वाजण्याच्या दरम्यान काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली आहे. १० ते २ या वेळेत करोना होत नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
करोना महामारीवर सामूहिक प्रयत्नांद्वारे करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह व अन्य तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर निदर्शनास आलेल्या काही गोष्टी उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. लॉकडाऊन हा करोनाची साखळी तोडण्याचा पर्याय नव्हे. तसे असेल तर मग काही तास शिथिलता कशी दिली जाते? त्या काळात करोना होत नाही का?, असा खोचक सवाल त्यांनी केला.लॉकडाऊनमुळे  अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लोकांचे रोजगार गेले आहेत. चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे लस लवकरात लवकर मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.

सिंधुदुर्ग -
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यातून जाणारा सागरी महामार्ग प्रकल्प अडचणीत आला आहे. रेवस ते रेड्डी असा हा प्रकल्प आता आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोकणच्या पर्यटनाचा राजमार्ग ठरणाऱ्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर बनवणाऱ्या ठेकेदाराचा ठेका समाप्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.
रायगडमधील रेवस ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गावर ८२ पूल उभारण्यात येणार आहेत. त्यात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ४१ पूल, ठाण्यात १३ पूल, रत्नागिरीत १८ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पुलांचा समावेश आहे. त्यात रेवस ते बाणकोट, बाणकोट ते जयगड, जयगड ते देवगड आणि देवगड ते रेड्डी या चार टप्प्यांचा समावेश आहे.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सागरी महामार्ग उभारण्याला प्राधान्य दिले गेले होते. त्याचा डीपीआर तयार करून तो मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला सागरी महामार्ग केंद्र शासनाकडे वर्ग केल्याने महामार्गाला गती मिळणार असे चित्र होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सागरी महामार्गासाठी पुढाकार घेऊन नव्याने रेवस बंदर ते आरोंदा किरणपाणी या गोव्याच्या हद्दीपर्यंत ५५० किलोमीटरच्या सागरी महामार्गाला नवे रूप देण्याचा निर्णय घेतला.अडीच हजार कोटींचा डीपीआर तयार करून मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला गेला. डीपीआरमधील अनेक गोष्टी केंद्र शासनाने मान्यही केल्याचे पुढे आले. त्या डीपीआरनुसार सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी बारा हजार कोटीपेक्षा अधिक निधीची आवश्‍यकता भासणार होती. निधी तरतुदीच्या प्रतीक्षा होती मात्र सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका विकासकामांना बसत आहे. सागरी महामार्गासाठी ज्या चार कंपन्यांनी डीपीआर बनवलेला आहे, त्यांचा ठेका समाप्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबतच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हा महामार्ग झाला नाही तर कोकणच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.

सोलपूर -
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एक लाख १८ हजार रुपयांच्या गाई व वासरांना ताब्यात घेऊन संशयित आरोपीवर कारवाई केली आहे. अहमद शहाबुद्दीन हादीमनी (वय ३९, रा. देसाईनगर, सोलापूर)याला अटक केली आहे. त्याच्याकडील गाई व वासरे गो शाळेत पाठवण्यात आली आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुभाष मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री अहमद हादीमनी याने देसाईनगर येथील एका पत्रा शेडमध्ये गाई व वासरांना अतिशय दाटीवाटीने व कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले होते. एक खबऱ्यामार्फत ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सर्व गाईंची सुटका करून, त्यांना गोशाळेत पाठवले, तर संशयित आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्याअंतर्गत एमयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमध्ये ६० हजार रुपयांची ३ खिलार गायी, ३० हजार रुपयांची गिर जातीची गाय, १० हजार रुपयांचे खिलार जातीचे दोन वासरे, १४  हजार रुपयांचे गिर जातीचे दोन वासरे, ४ हजार रुपयांचे एक गिर जातीचे बैलवासरू, असा एकूण एक  लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करत आहेत.

रायगड -
रायगड जिल्‍ह्यात पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहण्‍याच्‍या आशा आता पल्लवीत झाल्‍या असून त्‍यादृष्‍टीने हालचालीही सुरू झाल्‍या आहेत. त्‍यासाठी अलिबाग जवळच्या खानाव येथे ३४ एकर जागा देखील उपलब्‍ध झाली आहे.रायगड जिल्‍ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्‍यामुळे मोठी अडचण होत आहे. वैद्यकीय महाविद्यालय असावे असे रायगडकरांचे बऱ्याच वर्षांपासूनचे स्‍वप्‍न होते. सुनील तटकरे रायगडचे पालकमंत्री असताना त्‍यांनी जिल्‍ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळवली होती. परंतू, राजकीय वादात ते रखडले होते.
अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होण्‍यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे विनंती केली होती. त्याअनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी सहभागी झाले होते. या बैठकीत अदिती तटकरे यांनी अलिबाग नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे, या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी सूचना केली.
वैद्यकीय संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करून भारतीय आयुर्विज्ञान परिषद तसेच केंद्र शासनाकडे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्‍पष्‍ट केले आहे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget