August 2020

पंढरपूर - वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी आणि वारकरी सेनेकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा वंचित आणि वारकरी सेनेकडून देण्यात आला होता. या आंदोलनाच्या दृष्टीने वारकरी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होत आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पंढरपुरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरातील धार्मिकस्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर देश अनलॉक होत असताना देशातील काही महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य सरकारने अद्याप मंदिरे खुली करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, वंचित आघाडी आणि विश्व वारकरी सेनेने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.शहरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत.पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे. विशेष म्हणजे आदोलकांची मोठी संख्या जिल्ह्याभरातून दाखल होत आहे.आंदोलनादरम्यान एसटी बसची तोडफोड होऊ नये म्हणून पंढरपूर आगारातील एसटी बसेस बंद राहणार आहेत. पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. विठ्ठल मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने संयुक्त ऑपरेशन राबवत ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मेजर जनरल ए. सेनगुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली असून गुप्त माहितीच्या आधारे अचूक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
शुक्रवारपासून गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळे ऑपरेशन राबविण्यात आले. यात आम्हाला आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली आहे, असे मेजर जनरल सेनगुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.काश्मिरी तरुणांची दिशाभूल करून पाकिस्तानातील हस्तक काश्मीरातील तरुणांना दहशतवादी बनवत आहेत. आठ जणांपैकी ज्या सात जणांना मारण्यात आलं आहे ते २०२० साली दहशतवादी संघटनेत भरती झाले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खोटी आश्वासने देऊन त्यांना भरती करून घेतले होते. दहशतवादी संघटनांमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असून तरुणांची भरती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे सेनगुप्ता यांनी सांगितले.निश्चितच दहशतवाद्यांमध्ये नेतृत्वाची कमतरता आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. तरुणांची दिशाभूल करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे काम त्यांनी सुरू केल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले.काश्मीर पोलिसांनुसार, दक्षिण काश्मिरातून यावर्षी ८० तरुण दहशतवादी संघटनांत सहभागी झाले, असे पोलीस उपमहानिरिक्षक अतुल गोयल यांनी सांगितले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकांवर आणि जवानांवर हल्ले केले होते, असे सेनगुप्ता म्हणाले.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक ४ ची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नव्या नियमांनुसार आता मेट्रो सेवा ७ सप्टेंबपासून सुरू होणार आहे. मेट्रो सेवा देशभरात २२ मार्चपासून कोरोनाच्या प्रसारानंतर बंद ठेवण्यात आली होती. देशभरात अनलॉकचा हा चौथा टप्पा आहे. नवी मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली असून, ३० सप्टेंबरपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.कोरोना नियमावलीचे पालन करत टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी नागरी आणि गृह मंत्रालयाकडून नियमावली जारी केली जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 
अनलॉक ४ मधील महत्त्वाचे मुद्देसामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १०० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होऊ शकत नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे.कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्क घालण्याचे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सहभागी व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग, हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.खुल्या चित्रपटगृहांना २१ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश ऑनलाईन शिक्षणाच्या कामासाठी ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेत बोलावू शकते. यास २१ सप्टेंबरपासून फक्त कन्टेंन्मेट झोन बाहेर परवानगी देण्यात आली आहे.नव्या नियमानुसार केंद्राशी चर्चेशिवाय कंन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी व्यक्तींची मर्यादा २० सप्टेंबर पर्यंत आधीच्या नियमानुसारच राहील. तर २१ सप्टेंबर पासून १०० माणसांना परवानगी देण्यात आली आहे.९ वी ते १२ वीचे विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा, महाविद्यालया जाऊ शकतात. मात्र, यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - ईडीने शनिवारी दिल्ली, गुरुग्राम, मुंबई आणि पुण्यात १५ ठिकाणी छापे टाकले असून चीनी कंपन्यांच्या १२६८ कोटीच्या मोठ्या ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटचा खुलासा केला आहे. ईडीने कारवाई करत HSBC बँकेच्या ४ खात्यांमध्ये जमा ४६.९६ कोटी रुपये जप्त केले आहेत. त्याशिवाय ईडीने ५ लॅपटॉप, १७ हार्ड डिस्क, फोन आणि महत्त्वाचे कागदपत्रही जप्त केले आहेत.हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने ही छापेमारी केली आहे. हैदराबाद सायबर पोलिसांनी Dokypay Technology Private Ltd आणि Linkyun Technology Pvt Ltd विरुद्ध गुन्हा दाखल करुन चीनच्या नागरिकांसह इतर तिघांना अटक केली आहे.हैदराबाद प्रकरणाच्या तपासात, चीनी कंपन्या भारतात सट्टेबाजीचे मोठे नेटवर्क चालवत असल्याचे समोर आले आहे. चीनी नागरिक चीनमध्ये राहूनच भारतात सीएच्या मदतीने नवीन कंपन्या सुरु करुन त्यात भारतीयांना डमी डायरेक्टर बनवत होते. या लोकांद्वारे भारतात HSBC बँकमध्ये खाते सुरु करण्यात आले होते.त्यानंतर काही दिवसांनी चीनी नागरिक भारतात येऊन कंपन्यांची डायरेक्टरशीप घेऊन, बँकेत सुरु करण्यात आलेल्या खात्याचा ऑनलाईन वापर करण्यासाठी यूजर आयडी, पासवर्ड चीनमध्ये पाठवून पैशाचा व्यवहार करत. बँक खात्यांसह, व्यवहारासाठी Paytm, Cashfree, Razorpay वॉलेट अकाऊंटही सुरु केले होते.चीनी कंपन्यांनी सट्टेबाजीसाठी एक वेबसाईट बनवली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून भारतातील लोकांना सट्टेबाजीत फसवले जात होते आणि त्यानंतर ऍपद्वारे सट्टेबाजी केली जात होती. या चीनी लोकांनी आपले एजंट तयार केले होते, जे सट्टेबाजीसाठी लोकांना तयार करायचे. ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांद्वारे, Dokypay Technology Pvt Ltd ने गेल्या वर्षी १२६८ कोटी सट्टेबाजीतून कमावले. त्यापैकी ३०० कोटी Paytmमधून आले. तर ६०० कोटी Paytmमधून पाठवले गेले. Linkyun Technology द्वारे १२० कोटींचा व्यवहार झाला. भारतातील ऑनलाईन चायनीज डेटिंग ऍप्सद्वारेही पैशांचा व्यवहार समोर आला आहे.  

मुंबई - मोटारसायकलवरुन येऊन मोबाईल फोन चोरणाऱ्या व त्यानंतर आयएमईआय क्रमांक बदलून फोनची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल फोनची ५ ते १० हजारात विक्री करणाऱ्या६ जणांच्या टोळीला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणावरुन लुटलेले व आयएमईआय क्रमांक बदललेले ४८ महागडे मोबाईल फोन व इतर साहित्य जफ्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-७चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या टोळीने गत दिड वर्षामध्ये लुटलेल्या शेकडो मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलून त्यांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
युसुफ हैदरअली शेख (२४),नावेद नदीम शेख (२१),मोहमद अमीन शेख (४६), इक्बाल नासीर खान (३२),सलमान अदील अहमद सिध्दीकी (३२) व साबीर सलीम खान (३४) या सहा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे समावेश आहे. युसुफ आणि नावेद हे दोघेही मोटारसायकलवरुन जाऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील महागडे मोबाईल फोन लुटून नेत होते. त्यांनतर ते मोहम्मद शेख व इक्बाल खान या दोघांना लुटलेले मोबाईल फोन देत होते. त्यानंतर ते दोघे सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांकडून लुटलेल्या मोबाईल फोन मधील आयएमईआय क्रमांक बदलून घ्यायचे. हे मोबाईल फोन५ ते १० हजारात विकले जात असल्याचे तपासात आढळून आले. २५ ऑगस्टला सकाळी युसुफ आणि नावेद या दोघांनी अशाच पद्धतीने घाटकोपर येथील नित्यानंद नगर मध्ये राहणाऱ्या मोहम्मद रिजवान युसुफ खान याचा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन लुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मोहम्मद रिजवान याने आरडा-ओरड केल्यानंतर त्या भागात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार कदम आणि पोलिस शिपाई रोकडे त्यांचा पाठलाग करुन प्रथम युसूफ शेख याला नंबर फ्लेट नसलेल्या मोटारसायकलसह पकडले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा पळून गेलेला साथीदार नावेद शेख याला मानखुर्द येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसुन चौकशी केली असता, या दोघांनी गत दिड वर्षामध्ये चेंबूर,घाटकोपर,दादर,विक्रोळी,मुलुंड आदी भागातील अनेक नागरिकांचे मोबाईल फोन लुटल्याचे व त्यांचे आयईएमआय क्रमांक बदलून विकल्याची कबुली दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांच्या पथकाने मोहमद शेख व इक्बाल खान या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सलमान अदील अहमद सिध्दीकी व साबीर सलीम खान यांच्या मानखुर्द शिवाजीनगर येथील मोबाईलच्या दुकानावर छापे टाकले असता सदर दुकानामध्ये जबरी चोरी करुन आणलेले व आयएमइआय क्रंमांक बदलण्यात आलेले वेगवेगळया कंपन्यांचे 48 महागडे मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी सर्व मोबाईल फोन, तसेच हार्डडिस्क, दोन लॅपटॉप, दोन मोटारसायकल जफ्त करुन सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांना अटक केली. सलमान व साबीर हे दोघेही संगणकामधील एसपी टुल या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मोबाईल फोन मधील आयएमइआय कमांक बदलून देत असल्याचे तपासात आढळून आले आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींवर विकोळी,चेंबूर,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांनी कोणकोणत्या ठिकाणाहून मोबाईल फोन लुटले आहेत. तसेच किती मोबाईल फोनचे आयएमइआय कमांक बदलून त्यांची विक्री केली आहे, याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

ठाणे - शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवणे आणि मालमत्ता कर वाढवणे याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून ती यादी सोमवारपर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश दिले. सदरची यादी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी निष्काषणाची व्यापक मोहीम ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी झाली आहे. ही चांगली बाब असली तरी गाफिल राहून चालणार नाही, असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी यापुढे मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढावी यासाठी सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. यामध्ये शिथीलता खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.मालमत्ता कर वसुलीबाबत बोलतना त्यांनी स्पष्ट केले, की सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर निरीक्षकांना प्रभागातील नवीन मालमत्ता शोधून त्यांना कर आकारणी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच किती नवीन मालमत्तांना कर आकारणी केली त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा.

वसई - वसई-विरारमध्ये कोरोना काळात कामचुकारपणा करणाऱ्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांनी ही कारवाई केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे इतर कर्मचारी धास्तावले आहेत.सोनू सरबटा, चंदू सोलंकी असे निलंबन केलेल्या दोन कायमस्वरूपी सफाई कामगारांची नावं आहेत. महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या रिद्धी विनायक हॉस्पीटल, नालासोपारा (प.) या रुग्णालयात या दोघांची नियुक्ती केली होती. 
सफाई कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे आयुक्त यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तडकाफडकी दोघांचेही काल २८ ऑगस्ट रोजी निलंबन केले आहे.दरम्यान, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यासोबत नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

लॉस एंजेलिस - 'ब्लॅक पँथर'मध्ये अतुलनीय कामगिरी करणारे अमेरिकन अभिनेता चॅडविक बोसमन याचे आतड्याच्या कर्करोगाने निधन झाले. चॅडविक हा गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी लढा देत होता आणि अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की २०१६ मध्ये त्याला या आजाराचे निदान झाले होते. शेवटच्या क्षणी त्याची पत्नी आणि कुटुंब एकत्र होते.
मार्शल चित्रपटापासून ते डीए ५ ब्लड्सपर्यंत, असे असंख्य चित्रपटाचे शूटिंग त्याने केले होते. या काळात त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरू होती. त्याने ब्लॅक पँथरमध्ये साकारलेली किंग टी चाल्ला ही व्यक्तीरेखा त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात सन्मानजनक होती.कुटुंबाने त्यांच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले आणि कठीण परिस्थितीत कुटुंबाशी असलेला स्नेह कायम ठेवण्याची विनंती केली.

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हव होते, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे. २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला सन्मानित केले जाणार आहे. मात्र या पुरस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुशांतला मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.याआधी त्याचा कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून सन्मान करण्यात आला होता. याची माहिती सुशांत बहिण श्वेता सिंहने दिली होती. हा सन्मान देखील त्याला मृत्यूनंतर मिळाला. 
१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आपला जीवन प्रवास संपवला. त्याच्या मृत्यूला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आले नाही.सुशांत आत्महत्या प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. याप्रकरणातील अनेक नवे बारकावे समोर येत आहे. सुशांतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले आहेत.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिर, धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यातील प्रार्थना स्थळं खुली करावीत, यासाठी आज भाजपचे राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरु आहे. मुंबई, शिर्डी, पुणे, नाशिकमध्येही घंटानाद आंदोलन करत मंदिरं सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थाने भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिरं अथवा धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. नाशिकच्या रामकुंडावर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. सरकारला जाग यावी, यासाठी घंटानाद आणि डमरुनाद करण्यात येत असून दार उघड, उद्धवा दार उघड अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
पुण्यातही आज प्रार्थना स्थळ खुली व्हावी याकरता घंटानाद आंदोलन सुरु आहे. दार उघड, उद्धवा दार उघड या टॅगलाईनखाली आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यातील ओकांरेश्वर मंदिरासमोर आंदोलन सुरु असून पुण्यात भाजपकडून जवळपास 100 मंदिराबाहेर आंदोलन करत मंदिर खुली करण्याची मागणी केली जात आहे. आंदोलनात उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. दुसरीकडे शिर्डीतही साईमंदिर खुलं करण्याची मागणी करण्यात येत असून आंदोलन सुरु आहे.

मुंबईत कित्येक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो.त्यातच पावसाळा म्हंटले कि रस्त्यावर जागोजागी खड्डे अशा वेळी वाहन चालक अक्षरशः तारेवरची कसरत करत गाडी चालवताना दिसतो. महापालिका,एमएमआरडीए किंवा वाहतूक पोलीस असो यांना वाहन चालकांच्या त्रासाचे काहीच घेणेदेणे नाही असेच येथील रस्त्यावर दिसते. गेल्या कित्येक महिन्यापासून येथील रस्ता बंद आहे

मुंबई - मुंबईत कित्येक मार्गावर असणारी नेहमीची वाहतूक कोंडी,त्यात पावसाळा म्हणजे रस्त्यावर खड्डे अगोदरच वैतागलेल्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेली मेट्रोच्या कामासाठी म्हणजे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले अनेक रस्ते या कारणांमुळे मुंबईची वाहतूक सध्या कमालीची विस्कटली आहे. बंद केलेल्या रस्त्याच्याबाजूने जरी रस्ता काढला तरी वाहनचालक खुश असेल आणि त्याला योग्य वेळी कामावर आणि घरी पोहचता येईल. बंद रस्त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिकांनाही तोशीस पडत आहे. मेट्रोकामामुळे कित्येक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. वाहतूक कोंडीची नवी ठिकाणे तयार झाली आहेत. या ठिकाणी तर पर्यायी रस्ताही उपलबध आहेत परंतु, तो रस्ताही बंद करण्यात आल्याने वाहन चालकांना इनॉर्बिटच्या मागील बाजूने चिंचोली बंदर सिग्नल गाठावे लागत आहे. हा रास्ता निमुळता असल्याने आणि या रस्त्यावरच हॉटेल्स असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रंग लागलेल्या असतात त्यातच लीक रोड वरील वाहतूक आत आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. या पट्ट्यात कमालीची बेशिस्त असून, अस्ताव्यस्त, दुहेरी पार्किंग, खराब रस्ते, गॅरेजचा पसारा, रस्त्याकडेला उभी अवजड वाहने यातून वाट काढत प्रवास करावा लागतो.सकाळ व संध्याकाळच्या वेळेत या मार्गाने प्रवास म्हणजे सहनशक्तीचा अंत पाहण्यासारखे आहे. इनॉर्बिट ते चिंचोली हे अंतर जेमतेम ५/७ मिनिटांत पूर्ण करता येते. पण आता हेच अंतर कापण्यास किमान अर्धा तास सहज लागतो. त्यातच या मार्गावर मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहन चालक संताप व्यक्त करीत आहेत.येथे पर्यायी मार्ग आहेत खरे, पण तो मार्गही बंद केल्याने वाहतूक दारांना दाटीवाटीने जावे लागत आहे. शिवाय मार्गावरील वाहतूक पोलिस बाइकस्वारांना पकडण्यातच दंग असतात.

रत्नागिरी - अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांना ३० कोटी रुपये खंडणीसाठी धमकी मिळाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने मिलिंद तुळसकर या आरोपीला रत्नागिरीतून अटक केली आहे. तो मुंब्र्याचा राहणारा आहे. कोविड-१९चे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये काम बंद झाले आणि हाताला काम नाही. त्यामुळे तो रत्नागिरीच्या घरी आला होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने दिग्दर्शक महेश मांजरेकरांना फोन करुन ३० कोटींची खंडणी मागितली. ही रक्कम हवालामार्फत द्यायली सांगितली. मात्र पोलिसांनी सापळा रचत मिलिंद तुळसकरला अटक केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने गूगलवरून माहिती घेत गँगस्टर कसे धमकी देतात याचा अभ्यास केला होता. मात्र पोलिसांनी या आरोपीला आता बेड्या ठोकल्या.२६ ऑगस्ट रोजी महेश मांजरेकर यांना खंडणीचा कॉल आला होता. याप्रकरणी महेश मांजरेकर यांनी दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. 
चंदीगड - पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करणाऱ्या 5 संशयित लोकांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी कंठस्नान घातले. ही माहिती सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.या घटनेची मिळालेली माहिती अशी, की पंजाबमधील तरणतरण जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शनिवारी सकाळी काही लोकांची संशयास्पद हालचाल सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसली. त्यानंतर जवानांनी त्यांना थांबण्यास सांगितले. यावेळी त्या संशयित लोकांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी संशयास्पदांपैकी 5 जण ठार झाले. त्यानंतर जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली आहे.
नवी दिल्ली दिल्ली पोलिसांनी मध्यवर्ती भागातील रिज रस्ता परिसरातून सुधारित स्फोटक यंत्रांसह (आयईडी) आयसीसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री चकमकीनंतर दहशतवाद्याला अटक करण्यात आली.आयसीसच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक“धौला कुआन आणि करोल बाग दरम्यान रिज रस्त्यावरील गोळीबारानंतर दहशतवाद्याला अटक करण्यात आली”, असे पोलीस उपायुक्त (स्पेशल सेल) प्रमोदसिंग कुशवाह यांनी सांगितले आहे.या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर, विशेष पथकाने धौला कुआन येथे आयसीसच्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी या दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार देत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि दहशतवाद्याला पकडले.आयसीसच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटकदहशतवाद्याला लोधी कॉलनीतील विशेष कार्यालयात आणण्यात आले आहे.
पटना - बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक हालचालींना वेग आला आहे. आता जीतनराम मांझी यांचा पक्ष महाआघाडीपासून विभक्त झाला आहे. मांझी यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीने हा निर्णय घेतला आहे. यापुढे ते महाआघाडीचा भाग असणार नाहीत. पण जीतनराम मांझी जेडीयूबरोबर जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.जीतनराम मांझी यांच्या घरवापसीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या. मांझीचा पक्ष हा जेडीयूमध्ये पूर्णपणे विलीन झाला पाहिजे, अशी जेडीयूची इच्छा आहे, पण तसे न झाल्यास मांझी यांच्या पक्षासोबत काही जागांचा वाटाघाटी करुन त्यांना सोबत घेतले जाईल.आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीतनराम मांझी यांचा पक्ष जेडीयूशी हातमिळवणी करणार की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु जेडीयू आणि मांझी यांच्यात बोलणी झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई - जुहू येथील इर्ला भागात सोमवारी झालेल्या अब्दुल मुनाफ शेख या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येतील प्रमुख आरोपी नदीम शेख यास गुन्हे शाखेने अटक केली आहे. या हत्येसाठी शेखला पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले.बांधकाम व्यावसायिक आणि ट्रॅव्हल एजन्सीचा मालक असलेल्या अब्दुल शेखची सोमवारी हत्या झाली. त्याचा तपास करताना जुहू पोलिसांनी अब्दुल रहमान लतीफ ऊर्फ सोनू शेख या आरोपीस अटक केली होती. त्याच्या चौकशीतून नदीम शेखचे नाव पुढे आले. हत्येनंतर फरार असलेल्या नदीमचा शोध घेत गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या पथकाने त्याला गोवंडीतून अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीत अब्दुल शेखच्या हत्येमागील प्रमुख सूत्रधार लतीफ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच या हत्येसाठी नदीमला पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती.साधारण दहा वर्षपूर्वी अब्दुलने लतीफच्या वडिलांकडून १२ हजार चौ. मीटर भूखंड घेतला होता. हा भूखंड आणि एसआरए प्रकल्पावरून दोघांमध्ये वाद उद्भवला होता. तेव्हा लतीफने अब्दुलला ठार मारण्याची धमकीही दिली होती. अब्दुलने जानेवारी २०२० मध्ये त्याच्याविरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यात स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे नमूद केले होते.

आजमगड - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे त्यांनी रस्त्यावर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. पण, आता उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.उत्तर प्रदेशमधील बसगावमध्ये मागस वर्गात सरपंचाची हत्या झाली होती. या सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे आज सकाळी ठरल्यामुळे कारने रवाना झाले होते. परंतु,आजमगड सीमा भागात पोहोचल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले. नितीन राऊत यांना आजमगडमध्ये येण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला. त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली.
पोलिसांनी अडवल्यामुळे नितीन राऊत यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे. बसगावला जाऊ द्यावे, अशी मागणी काँग्रेस समर्थकांनी केली. त्यानंतर बऱ्याच वेळ हे आंदोलन सुरू होते. अखेर त्यानंतर नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते हे पायीची उत्तर प्रदेशकडे निघाले. त्यामुळे पोलिसांनी नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.नितीन राऊत यांचावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे युपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे.
उत्तर प्रदेशातील आझमगडमधील बांसगावमध्ये एका मागास समुदायातील सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या सरपंचाची हत्या ही उच्च जातीतील व्यक्तींनी केली आहे. ४२ वर्षीय सत्यमेव जयते असे या बांसगावच्या सरपंच नाव आहे. जयते यांनी ठाकूर समाजातील व्यक्ती वाकून नमस्कार केला नाही, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत' असे म्हणत त्यांनी 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.' अशा शब्दात टीका केली आहे.सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांत सिंहला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसेच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे न्यायालयानेच स्पष्ट केले हे बरे झाले. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचे 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत', म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन खोचक टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे देण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाप्रमाणे होऊ नये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे

जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अंतुर्ली येथे मध्यप्रदेश सरकारने कोरोनामुळे तपासणी नाका उभारला आहे. हा नाका मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असला तरी तो महाराष्ट्रात येतो. या नाक्यावरील अधिकाऱ्यांनी एक रुग्ण वाहिका अडवून ठेवल्याने रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बंडू वामन बावस्कर (वय ६५ वर्षे), असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून ते रावेर तालुक्यातील अंतुर्लीचे रहिवासी होते. दरम्यान, या घटनेनंतर सीमा तपासणी नाका स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
बंडू बावस्कर यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईक त्यांना खासगी रुग्णवाहिकेने मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने निघाले होते. रस्त्यात अंतुर्ली फाट्यावर मध्यप्रदेशच्या तपासणी नाक्यावर वाहनाला अडवण्यात आले. तेव्हा रुग्णावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे, अशी विनंती करुनही मध्यप्रदेशच्या पोलिसांनी वाहनास रोखून माघारी पाठवले. नाईलाजाने मागे फिरुन नायगावमार्गे मुक्ताईनगरकडे येताना रस्त्यातच बंडू बावस्करांचा मृत्यू झाला. ते समजताच नातेवाईकांसह नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदाेलन सुरू केले. ही माहिती मिळताच खासदार रक्षा खडसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक नीलेश सोळंके आंदोलनस्थळी पोहचले. नायगावमार्गे रस्ता अत्यंत खराब असल्याने शेतकरी, मजुरांचे हाल हाेतात. मुक्ताईनगर, जळगावसाठी इच्छापूरमार्गे रस्ता चांगला असल्यानेे अंतुर्ली, पातोंडी व नरवेलचे नागरिक त्यामार्गे जातात. परंतु, तपासणी नाक्यावरील परप्रांतीय पोलीस अडवणूक करतात. याबाबतची माहिती घेत खासदार खडसे यांनी बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तेव्हा हा तपासणी नाका शहापूर मार्गावरील जुन्या बऱ्हाणपूर फाटा रस्त्यावर हलवणार असल्याचे त्यांनी सांगितले.घटनेनंतर आली जाग, अंतुर्लीच्या शेतकऱ्यांना मिळणार पासमध्यप्रदेश पोलिसांचा तपासणी नाका त्यांच्या हद्दीतील जुना बऱ्हाणपूर फाट्याजवळ हलवण्यात येणार आहे. दोनच दिवस आधी बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तपासणी नाक्यावरील 3 पोलिसांना निलंबित केले होते. यामुळे मध्यप्रदेशातील पोलिसांचा तपासणी नाका आपल्या राज्यात असताना सुद्धा त्यांनी रुग्णाची गाडी सोडली नाही. आता मध्य प्रदेशातील तो तपासणी नाका जुना बऱ्हाणपूर फाट्याजवळ जाईल. त्या परिसरातही अंतुर्लीच्या अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी पास देणार असल्याचे तहसीलदार शाम वाडकर यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजप वेळोवेळी अनेक टीका करत असल्याचे पाहायला मिळते, यावर सरकारमधील मंत्री देखील जशास तसे उत्तर देतात. यामध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली आहे.चंद्रकांत पाटील यांनीट्विटरवरून म्हटले आहे की, महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव आहे ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं 'बजेट' नाही... 'टार्गेट' असते, अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.याआधी राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले होते. चंद्रकांत पाटलांची ही मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी केला होता. यावर आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर ट्रान्सफर मंत्रालय म्हणून पाटील यांनी टीका केली आहे. त्यावर महाविकास आघाडी नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे गरजेचे ठरेल.


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने मंगळवारी रात्री ९.२४ वाजता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातपैकी तिसरे धरण भरून ओसंडून वाहू लागले आहे. या आधी तुळशी आणि विहार धरण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे आता लवकरच मुंबईकरांसाठी लागू असलेली २० टक्के पाणीकपात मागे घेतली जाऊ शकते, असे पालिकेच्या जल विभागाने म्हटले आहे.मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धारणक्षेत्रात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. यामुळे मोडकसागर तलाव १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला. मागील वर्षी हा तलाव २६ जुलै २०१९ रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी दिनांक १५ जुलै २०१८ रोजी ओसंडून वाहू लागला होता.
मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.४ ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा ५ लाख ५ हजार ८९६ इतका होता. परंतु, तलावांत पावसाची संततधार सुरुच असून सध्या म्हणजेच १८ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत सातही धरणांत ८२.९५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरायला सुमारे अडीच लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे.सात धरणांपैकी २७ जुलैला तुळशी तर ५ ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणी कपात केली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - तब्बल तीन वेळा पुढे ढकलले राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे प्रस्तावित कामकाज वेळापत्रक राज्य सरकारकडून अखेर जाहीर करण्यात आले. येत्या ७ सप्टेंबरपासून हे अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे याआधी दोन वेळा विधिमंडळ अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.आता तिसऱ्यांदा अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यामध्ये कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक देण्यात आलं आहे. ७ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत अशा १४ दिवसांचा कार्यक्रम या वेळापत्रकात देण्यात आला आहे.
अधिवेशन किती मंडळ सभागृहात घ्यायचे की सभा घराबाहेर याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार बैठकीमध्ये हा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आग्रा - प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपहरणानंतर जवळपास १० तास उलटून गेले तरी पोलिसांना अद्याप या बसचा कसलाही थांगपत्ता लागलेला नाही.आर्थिकविषयीचे अधिकारी असल्याचे सांगून संबंधित आरोपी या बसमध्ये बसले होते. एक कार बसच्या समोर आडवी घालून बस थांबवण्यात आली. कुबेरपूरच्या जवळपास चालक आणि वाहकाला महामार्गावर खाली उतरवून आरोपी बस घेऊन पसार झाले. या बसमध्ये ३४ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील सरकारी नोकरी केवळ स्थानिक लोकांनाच देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भाजपने ऐतिहासिक म्हणून घोषित केला असतानाच कॉंग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री चौहान यांनी जाहीर केले की, मध्य प्रदेशातील सरकारी नोकऱ्या आता केवळ राज्यातील लोकांनाच देण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आम्ही आवश्यक कायदेशीर तरतुदी करत आहोत.मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील तरुणांना सरकारी नोकर्‍या देण्याच्या निर्णयाचे भाजपने स्वागत करत, हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले आहे. 'मध्य प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकर्‍या उपलब्ध होतील, यासाठी मी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. या ऐतिहासिक निर्णयाने राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे', असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा म्हणाले.या निर्णयावर कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी, 'आपल्या १५ वर्षांच्या सरकारमध्ये बेरोजगारीची स्थिती काय होती, हे लपलेले नाही. हातात पदवी घेऊन तरुण भटकत राहिले. हजारो पदवीधर क्लर्क, शिपायाच्या नोकरीसाठीही लाईनमध्ये उभे राहतात. मजुरांची, गरिबांची आकडेवारी ही वस्तुस्थिती सांगत असल्याचे', ते म्हणाले.
फरीदाबाद - हरियाणा पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्पशूटर राहुल याला अटक केली आहे. तो जानेवारी महिन्यात मुंबई येथे अभिनेता सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी आला होता. सलमान खान याने काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी नाराज झालेल्या बिश्नोईंच्या आदेशावरून त्याने हे काम केल्याचे सांगितले आहे. त्याच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. फरीदाबादच्या पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली.फरीदाबाद जिल्हा गुन्हे शाखेने मंगळवारी केलेल्या या खुलाशाने खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खानची हत्या करण्यासाठी मुंबईत रेकी करणाऱ्या बदमाशांना अटक करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने त्याच्या राहुल नावाच्या गुंडाकडून सलमान खानची रेकी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या वकीलाचे महत्वाचे विधान समोर आले आहे. यात सुशांत आत्महत्येप्रकरणी महत्वाचे खुलासे झाले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख देखील आहे. रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही. केव्हा आदित्य ठाकरेंना कधी भेटली देखील नाही. ती डिनो मोरियाला ओळखते. कारण डिनो हे इंडस्ट्रीमध्ये तिला सिनियर आहेत.रिया चक्रवर्ती ही भारतीय सैन्यातील सर्जनची मुलगी आहे. तिची आई महाराष्ट्रीयन असून गृहीणी आहे. रिया चक्रवर्तीला मुंबई पोलीस आणि केंद्रीय एजन्सी ईडीने अनेकवेळा चौकशीसाठी बोलवले. रियाने प्रत्येकवेळी तपासामध्ये सहकार्य केल्याचे कळते.मुंबई पोलीस आणि ईडीने रिया आणि सुशांतच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारले. पैशांच्या व्यवहाराबद्दल देखील विचारणा केली. मुंबई पोलीस आणि ईडीने इलेक्ट्रॉनिक्स, फॉरेन्सिक आणि डीएनए सॅंपल देखील घेतले आहेत. दोन्ही एजन्सीकडे रियाचे बॅंक स्टेटमेंट, आयटीआरची फाईल, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि इतर डेटा आहे.याचा रिपोर्ट मुंबई पोलिसांनी बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात पाठवला. अशात रिया चक्रवर्तीसोबत तिसरी एजन्सी देखील चौकशी करु शकते. तेव्हाही रिया सहकार्य करेल. आजच्या इलेक्ट्रॉनिक जमान्यातकोणत्याही पुराव्यांशी छेडछाड होऊ शकत नाही असेही रियाच्या वकिलांनी स्पष्ट केले. 
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत दोघे २०१९ मध्ये रिलेशनशीपमध्ये आले. माऊंट ब्लॉकमध्ये रिया चक्रवर्ती ८ जूनपर्यंत सुशांतसोबत राहीली. त्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली. 

मुंबई - वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्पना इमारतीसमोर असलेली ही चार मजली रिकामी इमारत शेजारच्या निवासी इमारतीवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दजाचे जवान, ८ फायर वाहने, दोन रेस्क्यू वाहने, दोन जेसीबी, चार डंपर आणि ५० मजूर घटनास्थळी दाखल झाले. 
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त इमारत गेले काही महिन्यांपासून रिकामीच होती, असे सांगण्यात येत आहे. इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नवी दिल्ली - लडाखमधील तणावांच्या पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये उच्च क्षमतेच्या तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा ४,६०० मीटर उंचीवर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तैनात केल्याने भारताचा बराच भाग त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात येणार आहे.याच बरोबर चीनने त्यांची १५० लाईट कंबाइन्ड शस्त्राने सज्ज असलेली सैन्याची ७७ वी तुकडी तिबेटच्या मिलीटरी डिस्ट्रिक्टमध्ये तैनात केली आहे. चीनने एलएसीवर आपल्या सैन्याची हालचाल वाढवली आहे.सीमावादावरील चर्चा रेंगाळली..जुलैच्या मध्यवधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नाही. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत.
पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यावेळी कंपनीत २० कामगार होते. यातील दोघांचा मृत्यू झाला असून ४ कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाच्या आवाजाने १० किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. स्फोटानंतर बोईसर पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. बचावकार्यादरम्यान गॅस गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलाला काही वेळ अडथळा निर्माण झाला. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आले. स्फोटानंतर कंपनीतून २० पैकी १४ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, या भीषण स्फोटात संदीप कुशवाहा, ग्रीजेश मौर्या या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद मोहसीन अल्ताफ (३० वर्ष), दिलीप गुप्ता (२८ वर्ष), उमेश कुशवाहा (२२ वर्ष), प्रमोदकुमार मिश्रा (३५ वर्ष) हे जखमी आहेत. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कंपनीत डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल या रासायनिक उत्पादनाचे काम चालू असताना मिश्रणामध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डिस्टिलेशन चालू असताना रिॲक्टरचा दाब वाढून हा स्फोट झाल्याची माहिती कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग यांनी पोलिसांना दिली आहे.
नवी दिल्ली - बिहार आसाममध्ये पुराचा कहर सुरुच आहे. काही भागात शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे पुरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील १६ जिल्ह्यातील १३० भागात अद्यापही पुराचे पाणी पसरलेले आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ लाख हेक्टरमधील शेती पूर्णपणे पाण्यात गेली आहे.आसाममध्येही पुरामुळे लोकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सिंगरा नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेक लोक डुबल्याची माहिती आहे. आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला तर भूस्खलनामध्ये २६ जण दगावले. तीन पूरग्रस्त जिल्ह्यात २८ गाव आणि १५३५ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

मुंबई - संपूर्ण देशभरात सध्या कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे.सैनिकांप्रमाणे सन्मान का मिळत नाही आहे ? अश्या कठीण प्रसंगी तरी पोलिसांना आर्थिक स्वरूपात जर का अतिरिक्त फायदा मिळाला तर त्यात काय हरकत आहे ? असे बरेच विषय घेऊन सध्या "पुलिस की आवाज" ही संघटना केंद्रीय सरकार कडे निवेदन करण्याच्या तयारीत आहे.
"पुलिस की आवाज" या संघटनेचे संस्थापक पाल पंधारी यांनी देशभरातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणी स्थापित केली आहे. समाजात पोलिसांप्रती असणारे गैरसमज दूर व्हावेत यासाठी "पुलिस की आवाज" चे संपूर्ण भारतातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे रोड शो या सारखे जनजागृतीचे कार्यक्रम करीत आहेत. 
महाराष्ट्रात जर म्हटले तर महाराष्ट्र प्रभारी महेंद्र तिवारी यांनी मुंबईतील पोलीस ठाण्यातील कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, पाणी, चहा वितरित करून कोरोना च्या महामारीत एक खारीचा वाटा म्हणून मदत म्हणून पुढाकार घेतला आहे. तसेच कोरोनाचे संकट टळेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू राहील असे महेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष गगन, राष्ट्रीय सचिव महेन्द्र चौधरी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक

नवी दिल्ली - नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर आपण संकटात टाकत आहोत असे म्हटले. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असेही यावेळी न्यायालयाने सांगितले.
करोनावरील लस लवकरच येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी अशी विनंती करत असल्याचे वकील अलख यांनी यावेळी म्हटले.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल असे न्यायालयाला सांगितले. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचे नुकसान होणार नाही का ? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल असे म्हटले.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले आहे. मागील सात दिवसांतील सरासरीच्या बघता या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अधिक कोरोना अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे.जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या कोरोनाव्हायरस रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्ण आढळण्याची साप्ताहिक सरासरी ११ ऑगस्टपर्यंत भारतात ६०,००० इतकी होती. अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेत भारताची ही सरासरी अधिक आहे.भारतातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ब्राझील आणि अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. भारतात दर २४ दिवसांत कोरोना रुग्ण दुप्पट होतात तर ब्राझीलमध्ये ४७ दिवसांत व अमेरिकेत ६५ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसत आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत या दोन्ही देशांमधील कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अशाप्रकारे जर भारतात रुग्णसंख्या वाढतच गेली तर हे भारतासाठी चिंतेची बाब आहे.दरम्यान, कोरोना रुग्ण आढळण्याचा कालवधी दुप्पट करण्यात अमेरिकेला यश आले आहे. परंतु, आतापर्यंत भारताला रुग्ण दरवाढ रोखण्यास यश आलेले आहे. आता भारतही अमेरिकेप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत असून अमेरिकेप्रमाणे, भारतही कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.मिळालेल्या माहीतीनुसार, २२ जुलैला अमेरिकेने कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठला होता. या दिवशी रुग्णवाढीची आठवड्याची सरासरी ६७,००० इतकी होती. भारतातील सध्याची परिस्थिती बघता बहुधा भारत हा विक्रम पार करेल अशी चिन्हे दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या वृत्तानुसार ब्राझीलचा मृत्यूदर स्थिर असून, अमेरिकेचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हळूहळू कमी होत आहे. तर , भारताचा मृत्यूदर या दोघांपेक्षा कमी आहे. मृत्यूच्या संख्येबाबत भारत आणि अमेरिका अजूनही ब्राझीलच्या मागे आहे.आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत भारतातील कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४९९८० इतकी आहे. ती केवळ २०,००० च्या तुलनेत कमी होती. तर, या स्थितीत, अमेरिका,ब्राझील आणि मेक्सिकोने ५०,००० मृत्यूचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूची आकडेवारीचा पाहता, भारत कोरोना केंद्र बनत असल्याचे दिसत आहे.

हैदराबाद - प्रख्यात अभिनेता आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांना यकृताच्या आजाराने ग्रासले होते. आज हैदराबादमधील गचीबौली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.लिव्हर सीरियोसिस या आजाराने त्यांना ग्रासले होते. याचप्रमाणे त्यांना अन्य संसर्ग झाला होता. 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. ११/७ च्या मुंबई ट्रेन ब्लास्टवर आधारित 'मुंबई मेरी जान' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. इरफान खान यांनी काम केलेल्या 'मदारी' चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकारलेल्या 'फोर्स' आणि 'रॉकी हॅन्डसम' या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

किनवट - किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुनिल आनंदराव ईरावार (वय २७) यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना रविवारी सकाळी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला.आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका, असा उल्लेख केला आहे.
आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या छोट्याशा पत्रात त्यांनी आपल्या आईची व कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे. यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार गजानन चौधरी हे करीत आहेत. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना पार्थिव सोपविण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, काका, काकू, तीन भाऊ व दोन वहिनी असा परिवार आहे.

मुंबई - शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहेत. सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचाऱ्यांची नुकतीच कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये या सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर काहीजणांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सुरक्षारक्षकांना सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.सुदैवाने शरद पवार गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आले नव्हते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस शरद पवार यांनी कोणालाही न भेटण्याची शक्यता आहे.कालच शरद पवार बारामतीला जाणार होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अजित पवारांशी त्यांची फोनवर सकारात्मक चर्चा झाल्याने पवारांनी बारामतीला जाणे रद्द केले आणि ते मुंबईला परतल्याचे सांगिते जात आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील काही प्रांतांमधून दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांना वेग आला असला तरीही दहशतवादी कारवाया मात्र रोज एक नवे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर उभे करत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्टच्या रात्री जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तुजन या गावानजीक एका पुलाखाली स्फोटके लावल्याचे निदर्शनास आले.माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी त्याचा शोध घेतला आणि मोठा घातपात टळला. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून तुजन आणि दलवान या गावांजवळील रस्त्यावरील एका पुलाखाली ही स्फोटके घातपाताच्या उद्देशाने ठेवण्यात आली होती.सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे या भागात मोठा हल्ला होताहोता टळला आहे. मुख्य म्हणजे पुलवामा आणि बडगाम या भागांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरुन अनेकद्या सैन्य आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या वाहनांचीही ये-जा असते. त्यामुळे एक मोठा घातपात होता होता टळला आहे. 
सांगली -  कोयना धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग  सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कृष्णा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर प्रशासनाकडून येथील १० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. सध्या वारणा धरणातून तब्बल १५ हजार क्युसेक्स तर कोयना धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
पुणे आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे.सकाळी सात वाजता २ लाख १० हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू होता. आत्ताहाच विसर्ग २ लाख ५० हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे.

रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी रस्तेमार्गाने कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.यामध्ये १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू, रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. याशिवाय, २८ ऑगस्ट सकाळपासून ते २९ ऑगस्ट या कालावधीतही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुन्हा बंदी घातली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यंदा कोरोनाचे संकट असूनही चाकरमनी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत. आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोक बाहेरून कोकणात दाखल झाले आहेत. आगामी काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गोंदिया - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. त्यामुळे, हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास राज्य शासनाचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुखसुशांत सिंह प्रकरणात सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. त्याबाबत प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यात आली आहेत. न्यायालयाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार असून त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे देशमुख म्हणाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. जसा निर्णय येईल, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, असे देशमुख म्हणाले.

जुन्नर - अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या शिवजन्मभूमीत अर्थात किल्ले शिवनेरीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सकाळी भेट देणार आहेत. गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी ते नतमस्तक होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून ३ तास ते गडावर असतील.राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या शासकीय नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासन घेत आहे. पावसामुळे कोणत्याही प्रकारची अडथळा राज्यपालांच्या दौऱ्यात किल्ले पाहणीच्या वेळात येवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे.गडावर बिबट्यांचा वावर असतो. या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात यावी. झाडाझुडूपात हिंस्त्रपशू थांबणार नाहीत याची काळजी संबंधित विभागांनी घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दौऱ्याच्या अनुषंगाने देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाकडून या दौऱ्याचे नियोजन केले आहे.
गेल्या २० वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. या दौऱ्यासाठी राज्यपाल सकाळी ८ वाजता राजभवन येथून मोटारीने जुन्नरकडे निघाले आहेत. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अवसरी खुर्द येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे थांबणार असून त्यानंतर जुन्नरकडे रवाना होतील.जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे येवून ते किल्ले शिवनेरीवर जातील. किल्ले शिवनेरीवर ३ तास भेटीच्या दौऱ्यानंतर ते राजभवनाकडे रवाना होणार आहेत.

गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग शनिवार रात्रीपासून बंद झाला आहे. पुराचे पाणी भामरागड शहरातही शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली आहेत. तर तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटतो. गतवर्षी तब्बल आठ वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. यावर्षी आतापर्यंत जोरदार पाऊस न झाल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने भामरागड लगतची पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्या दुथडी भरून वाहत असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले. तर रात्री उशिरा भामरागड गावातही पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम कालपासूनच प्रशासनाकडून सुरू आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्ग बंद असल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

पाटणा - बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपासमोर एक नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएतील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयू आणि रामविलास पासवान यांच्या लोजपामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. जदयूचे नेते राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर टीका केल्याने दोन्ही पक्षातील वादाला तोंड फुटले असून, लोजपा नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार मोचेर्बांधणी सुरू असतानाच एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयू आणि लोजपामध्ये वाद उफाळला आहे. जदयूचे वरिष्ठ नेते आणि मुंगेरचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी लोक जनशक्ती पाटीर्चे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधला होता. ललन सिंह यांच्या टीकेमुळे लोजपा नाराज असून, नितीश कुमार सरकारचा पाठिंबा काढण्याच्या विचारात आहे.खासदार सिंह यांनी लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना कालिदास यांच्याशी केली होती. ‘कालिदासाप्रमाणेच ज्या फांदीवर बसलेले आहात तिच कापायला लागले आहेत,’ असे सिंह म्हणाले होते. या टीकेनंतर लोजपा नाराज झाली आहे. लोजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ललन सिंह यांच्या विधानावर पक्षात चर्चा करण्यात आली. लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनीही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आणि या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. नड्डा यांच्या भेटीनंतर चिराग पासवान यांनी शनिवारी पक्षाच्या पाटणा येथील कार्यालयात बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे चिराग पासवान यांनी या बैठकीची माहिती माध्यमांना न देण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बिहारसह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोजपाच्या एका नेत्याने सांगितले की, ‘ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अपमान केला आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या सरकारचा पाठिंबा काढू शकतो,’ असे ते म्हणाले. दरम्यान, लोजपा आणि जदयूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कुरबुर सुरू झाल्याने भाजपासमोर हा वाद मिटवण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लोजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी व्हर्च्युअल प्रचार सभा घेण्यासही लोजपाने विरोध केल्याने भाजपा यातून कसा मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे.


 
कोलकाता - हुगळी ग्रामीण परिसरातील खानाकूलमध्ये शनिवारी एकाच ठिकाणी ध्वजवंदन करण्याच्या वादातून दोन गटांत झालेल्या दगडफेक-हाणामारीत एकाचा मृत्यू ओढवला. सुदर्शन प्रामाणिक (४०) असे त्याचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. प्रामाणिक याच्या मृत्यूच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
तृणमूल कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा भाजपचा आरोप आहे. या घटनेनंतर दिवसभर या भागात तणावपूर्ण स्थिती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांच्या लोकांना ध्वजवंदनासाठी एकच जागा पाहिजे होती. त्यावरून वाद निर्माण झाला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक तथागत बसू यांनी सांगितले.
प्रामाणिक यांच्या मृत्यूनंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान काही पक्ष कार्यालयांची नासधूस करण्यात आली. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपने १२ तासांचा बंद पुकारला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा म्हणाले की, ते (तृणमूल) आम्हाला या प्रकारे रोखू शकणार नाहीत. तृणमूल काँग्रेसने मात्र हा प्रकार भाजपमधील अंतर्गत वादातून घडल्याचा दावा केला आहे.

जम्मू-काश्मीर - करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने स्थगित ठेवण्यात आलेली जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्य़ातील त्रिकुट टेकडय़ांमधील वैष्णोदेवी या गुहेतील तीर्थक्षेत्राची यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. ही यात्रा गेल्या १८ मार्चला स्थगित करण्यात आली होती.ही यात्रा सोमवारपासून सुरू होईल आणि पहिल्या आठवडय़ात यात्रेकरूंची संख्या दररोज २ हजारांपर्यंत मर्यादित केली जाईल. यापैकी १९०० यात्रेकरू जम्मू- काश्मीरमधील आणि उर्वरित १०० बाहेरच्या राज्यांतील असतील. यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले.यात्रा नोंदणी खिडकीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी, केवळ ऑनलाइन माध्यमातून नोंदणी केल्यानंतर लोकांना यात्रा करण्याची परवानगी दिली जाईल. या यात्रेकरूंना त्यांच्या मोबाइलवर आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. मुखपट्टी व चेहऱ्यावरील आच्छादन घालणे अनिवार्य राहणार असून, यात्रेच्या प्रवेशस्थळी लोकांचे तापमान मोजले जाईल, असेही कुमार म्हणाले.१० वर्षांखालील मुले, गर्भवती स्त्रिया, अनेक आजार असलेले लोक आणि ६० वर्षांहून अधिक वयाचे लोक यांना यात्रा टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या गटासाठी नव्याने सूचना जारी केल्या जातील, अशीही माहिती कुमार यांनी दिली.

लखीमपूर - देशात बलात्काराच्या घटना वाढतच आहेत त्यातच आता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर प्रकार घडला. शुक्रवारी पोलिसांना उसाचा शेतात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि रिपोर्ट पाहून पाया खालची जमीनच सरकली.मुलगी खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर पोलिसात मुलगी घरी आली नसल्याची माहितीही दिली.अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. तिथून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केल्याचे दिसत होते. जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते. गळ्यातील ओढणीने तिला खेचल्याचे व्रणही मृतदेहावर उठल्याचे दिसत होते. उसाच्या शेतात हा मृतदेह फेकून दोघेही तरुण फरार झाले.शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली आहे.

तिरुवनंतपूर - केरळ सोने तस्करी प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी निलंबित आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांची ५ तास चौकशी केली. शिवशंकर यांना शनिवारी दुपारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलाविण्यात आले आणि त्यांची चौकशी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव आयएएस अधिकारी एम शिवशंकर यांची पुन्हा चौकशी झाली आहे. सोन्याच्या तस्करीत हात असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याआधी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि केरळच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. त्यांच्यावर सोन्याची तस्करी करणाऱ्या स्वप्ना सुरेश आणि सुरेश नायर यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.आपला मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क होता, अशी माहिती सुरेशने दिल्याचे शुक्रवारी ईडीने विशेष न्यायालयात सांगितले. सुरेशची विचारपूस केली असता, आपला शिवशंकर यांच्याशी निकटचा संबंध असल्याचे त्याने सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान, सोन्याच्या तस्करी प्रकरणी सीमा शुल्क विभागाने ११ जुलै रोजी स्वप्ना सुरेश आणि सुरेश नायर या दोघांना अटक केली होती.

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमच दिली जाणार आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संयुक्त जनता दलाबरोबर भाजप निवडणूक रिंगणात उतरणार असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच जाहीर केले आहे.
भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची निवडणूक तयारीची बैठक गुरुवारी रात्री दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पार पडली. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींसह ज्येष्ठ भाजप नेते, भूपेंद्र यादव व देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. फडणवीस यांच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्तीची घोषणा लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याबरोबर आशीष शेलार यांच्यासह काही नेत्यांना बिहारमध्ये पाठविले जाण्याची शक्यता आहे.मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेली मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन सामान्यांसाठी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, राज्यातील अर्थचक्र गतीमान करायचे असेल तर मुंबई पूर्वपदावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु झालीच पाहिजे. यासाठी राज्य सरकार अनुकूल असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. याशिवाय, आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेसही सुरु होण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी वर्तविली.
मात्र, लोकल सेवा सुरु करताना काही नियम आखून देण्याची गरज आहे. यादृष्टीने राज्य सरकार विचार करत असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. इतर नागरिकांना अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मुंबईलगतच्या परिसरातील चाकरमन्यांना नोकरी आणि उद्योगधंद्यासाठी शहरात येणे शक्य नाही. बेस्टची सेवा काहीप्रमाणात सुरु असली तरी प्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे यंत्रणेवर ताण येत आहे. या सगळ्यात नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या मुंबईतील कोरोनाची साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र, गर्दी वाढल्यास पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून सावधपणे पावले टाकली जात आहेत. 

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याबाबत गेल्या खूप काळापासून अनेक बातम्या समोर येत आहेत. कंगना राजकारणात जाऊ इच्छित असल्याची चर्चा सुरू होती. यावर अखेर कंगना रणौत हिच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम लागला आहे. कंगना रनौत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन सुरुवातीपासून करीत आहे. याच कारणामुळे ती राजकारणात येणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. आता कंगनाने याप्रकरणात आपले मौन सोडले आहे. तिने स्पष्ट केले आहे की, 'अभिनय माझे पहिले प्रेम आहे'.कंगनाने याबाबत दोन ट्विट केले आहेत. यात तिने लिहिले आहे - ज्यांना वाटते की मी मोदीजींचे यासाठी समर्थन करते कारण मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे, त्यांना मला स्पष्ट सांगायचे आहे की माझे आजोबा १५ वर्षांपर्यंत काँग्रेसमध्ये MLA होते. माझे कुटुंब राजकारणाशी जोडलेले आहे आणि मला माझा गँगस्टर चित्रपटानंतर दरवर्षी काँग्रेसकडून ऑफर दिली जात आहे.
तिने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की मणिकर्णिका चित्रपटानंतर भाजपनेही मला एका तिकिटाची ऑफर दिली होती. मी माझ्या कामावर प्रेम करते आणि कधीच मी राजकारणात जाण्याबाबत विचार केला नाही. त्यामुळे जे लोक माझ्या आवडीच्या व्यक्तीला समर्थन करण्यासाठी मला ट्रोल करीत आहे, त्यांना आता थांबायला हवे.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget