October 2020

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने दिरंगाई केली, त्यामुळेच या आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारविरोधात उद्या रविवारी मुंबईत संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, यासाठीची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबईचे राजाराम मांगले यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि सदस्य विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना महाराष्ट्रातील रस्त्यावर कुठेही फिरू देणार नाही, असा गंभीर इशारा देण्यात आला. आम्ही आता यापुढे कोणत्याही आंदोलनाला परवानगी घेणार नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे अध्यक्ष पद काढून ते एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावे आणि यापुढे आमच्या आरक्षणाला कोणी आडवे येत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम यांनी दिला.संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावेमराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या संघर्ष यात्रेला लालबाग येथून सुरुवात होणार आहे. ही संघर्ष यात्रा पुढे सायन, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, कत्रमवारनगर व भांडुप याठिकाणी थांबून तेथील समन्वयक व कार्यकर्त्यांसोबत सभा घेऊन मराठा आरक्षणाची सद्यस्थिती व राज्य सरकारबाबतची अस्वस्थता आणि त्याबाबतची आंदोलनाची पुढील दिशा या बाबत चर्चा होईल व त्यानंतर सदर यात्रेची सांगता ही ठाणे येथे होईल, सदर संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे करण्यात येत आहे.मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाहीमराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकर भरतीबाबत होणारे नुकसान, यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी व सध्या आरक्षणाची व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करत या यात्रेची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबई - सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार? असा मुंबईकरांचा प्रश्न आहे.नोकरी करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागलत आहे. यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारवर टीका सुरु केली. दरम्यान, राज्य सरकारने रेल्वेला रितसह पत्र पाठवून लोकल सुरु करण्याची मागणी केली. मात्र, रेल्वेकडून याला खोडा घातलण्याचे काम करण्यात येत आहे. यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वेला चांगलेच टोकले आहे. मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतेही राजकारण आणले जाऊ नये असेही त्यांनी खडसावले आहे.अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले, की राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सूचवले. कधी गाड्या सोडायच्या आणि महिलांसाठी तासाला गाडी सोडण्याचे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, रेल्वे काहीना काही कारण सांगून बोट दाखवत आहे. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत रेल्वेने राजकारण करू नये, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बजावले आहे.

लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत राज्य सरकारने सविस्तर वेळापत्रक रेल्वेला दिले आहे. गर्दी होऊ नये या अनुषंगाने हे वेळापत्रक दिले गेले आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने राजकारण करू नये. यापूर्वीही परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. आता पुन्हा वादाची ठणगी पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आला आहे. रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ?  अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा, असेही यात म्हटले आहे.  त्याचवेळी राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रात प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालवावी असे म्हटले आहे. पण ते तूर्तास शक्य नाही, असे रेल्वेने  राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई - मुंबई पोलीस खात्यामध्ये दोन गट निर्माण झाले असून यातील एक गट हा सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासंदर्भात नाराज आहे. तो गट परवीर सिंह यांच्या विरोधात बंड करणार असल्याचे वृत्त रिपब्लिक या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलीस खात्याची बदनामी करण्याचा आरोप करत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या शिवानी गुप्ता ,निरंजन नारायण स्वामी, शावन सेन व सागरिका मित्रा या कर्मचाऱ्यांचे पोलिसांनी जवाब नोंदवले आहेत.

एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत चार जणांची चौकशी करण्यात आली आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीकडून प्रसारित झालेल्या बातमीच्या जबाबदारीची शहानिशा करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही प्रशासनाकडून या गुन्ह्यातील तपासाकरिता आवश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. यासाठी वृत्त वाहिनीला यासंदर्भातील नोटीस देण्यात आलेली असून या गुन्ह्याच्या तपासासाठीची माहिती टीव्ही चॅनलकडून मागण्यात आलेली आहे. मात्र, रिपब्लिक वृत्तवाहिनीकडून एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या संदर्भात चार जणांची चौकशी केली असता, यातील एक आरोपी शिवानी गुप्ता ज्या सीनियर असोशीएट एडिटर म्हणून रिपब्लिक वृत्तवाहिनी काम करत आहेत. त्यांनी ज्या प्रकरणी तक्रार केली आहे. तो मजकूर वाचला असल्याचे म्हटले आहे. शिवानी यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी न्यूज रूम मधील आय न्यूज नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट शिफ्ट इंचार्जच्या मार्फत टेलिप्रोम्प्टरवर प्राप्त झालेला मजकूर कार्यक्रमात अँकर म्हणून वाचून दाखविला आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीवर २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित झालेल्या बिगेस्ट स्टोरी टूनाईट या कार्यक्रमादरम्यान मुंबई पोलीस खात्यात दोन गट पडले असून एक गट सध्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात बंड करणार असल्याची बातमी प्रसारीत केली होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून रिपब्लिक नेटवर्कमध्ये काम करत असलेल्या अँकर शिवानी गुप्ता रिपोर्टर , रिपोर्टर सागरिका मित्रा शावन सेन , एक्झिक्युटिवे एडिटर निरंजन नारायण स्वामी यांच्या विरोधात कलम ३(१) पोलीस ( आप्रितीची भावना चेतविणे) अधिनियम १९२२ सह कलम ३४ नुसार गुन्हा नोंदविला होता.

मुंबई - हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारीत वेब सीरीज स्कॅम १९९२ रिलीज झाली आहे. ही सीरीज रिलीज झाल्यानंतर हर्षद मेहता या व्यक्तीची जोरदार चर्चा सध्या आहे. ही सीरीज पाहण्याआधी हर्षद मेहता म्हणजे शेअर बाजार भ्रष्टाचारातील आरोपी एवढेच मनात असते. पण हर्षद मेहता वाढला कसा, शेअर बाजारात बिग बूल झाला कसा, भ्रष्टाचार कसा उघड झाला, ते थेट त्याच्या मृत्यूपर्यंतची उत्कंठा सर्वांना लागून असते, ती या सिरिजमध्ये मांडण्यात आली आहे.प्रेक्षकांना स्कॅम १९९२ मध्ये हर्षद मेहता आणि त्याची पत्नी ज्योती मेहता यांची भूमिका कुणी पार पाडली, त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. हर्षद मेहता याची भूमिका पार पाडली, प्रतीक गांधी याने, तर ज्योती मेहताची भूमिका पार पाडली, अंजली बरोट या अभिनेत्रीने.स्क्रीनवर हर्षद मेहता याची भूमिका ज्याने पार पाडली तो प्रतीक गांधी हुबेहुब हर्षद मेहता सारखा दिसतो. प्रतीक गांधी हा गुजराथी थिएटर आणि सिनेमांमध्ये काम करणारा कलाकार आहे.तो 'दो यार', 'रॉन्ग साइड', 'मैं चंद्रकांत बख्शी', 'मोहन का मसाला' 'मेरे पिया गए रंगून' सारख्या नाटकांमध्ये भूमिका पार पाडत आला आहे 'स्कॅम १९९२' च्या यशानंतर अर्थातच प्रतीक गांधीचा प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

नवी मुंबई - सिडकोच्या महागृहनिर्मितीतील सहा हजार घरांची विक्री न झाल्याने घरांची संख्या आणि किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. दोन वर्षांपासून सिडकोने जवळपास २४ हजार घरांची सोडत काढली असून यातील सहा हजार घरे विक्रीविना शिल्लक राहिली असल्याची बाब समोर आली आहे.ऑक्टोबर २०१८मध्ये १४ हजार ७३८ तर ऑक्टोबर २०१९मध्ये ९ हजार ४६६ घरांची सोडत काढण्यात आली. या घरांसाठी सिडकोकडे लाखो ग्राहकांचे मागणी अर्ज आले आहेत. मात्र नंतर लाभार्थी ग्राहकांनी सादर केलेल्या कागदपत्रात अनेक त्रुटी आढळून आल्याने हे अर्ज अपात्र ठरले. यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, आरक्षित क्षेत्र आणि हप्ते भरण्यात आलेली अडचण या कारणांचा समावेश आहे. अर्ज केल्यानंतर भाग्यवंत ठरलेल्या अनेक ग्राहकांना सिडकोचे घर घेताना संकटांचा सामना करावा लागला आहे.

करोनाकाळात तर रोजगार व वेतन कपातीमुळे तसेच करोना उपचारासाठी अनेकांनी सिडकोच्या घरांवर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. ही संख्या आता सहा हजारांच्या घरात गेली आहे. सुमारे २४ हजार घरांमध्ये सहा हजार घरे विक्रीविना शिल्लक राहत असल्याने सिडकोने या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी घरांच्या रचनेत बदल करून होणारा बांधकाम खर्च कमी केला जाणार आहे.

याशिवाय महामुंबई क्षेत्रात तयार होणाऱ्या परवडणाऱ्या घरांचा अभ्यास सिडकोचा अर्थ विभाग करणार आहे. सिडको मुख्यालयातील मनोऱ्यात बसून आतापर्यंत विद्यमान बाजारभावांचा अभ्यास करून सिडकोचा अर्थविभाग घरे तसेच गाळ्यांच्या किंमती ठरवत असल्याने वस्तुस्थितीचा विसर पडत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात विक्रीविना शिल्लक असलेली घरे, बदलते बांधकामांचे आयाम याचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ किंमत ठरविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.


मीरा भाईंदर - मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ७१८ मोबाईल टॉवर धारकांकडून ५३ कोटी रुपयांची थकबाकी ठेवून अधिकाऱ्यांनी केलेल्या मोबाईल टॉवर घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात जबाबदार असणाऱ्याची उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे.मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विविध कंपन्यांचे ७१८ मोबाईल टॉवर आहेत. टॉवर उभारणीस महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी देण्यात येते. तर कर संकलन विभागाकडून कर आकारणी करण्यात येते. मोबाईल टॉवरना शास्तीसह आकारणी केल्यामुळे टॉवर धारक कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आठ वर्षांपूर्वी न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती; परंतु एवढी वर्षे विधी विभागाने स्थगिती आदेश उठविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सामान्य मालमत्ता कर धारकाची थकबाकी असल्यास त्याचा पाणी पुरवठा खंडित करणारे पालिका अधिकारी मोबाईल टॉवर धारकांना का पाठीशी घालत आहेत, याबाबत प्रशासनाने ठोस पाऊले का उचलली नाहीत, असा प्रश्न दळवी यांनी केला आहे. दरम्यान ५३ कोटी रुपयांपैकी ३ कोटी २५ लाख रुपये वसुली झाल्याचे तसेच ७१८ पैकी १९८ मोबाईल टॉवर बंद असल्याचा दावा कर विभागाने केला आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी प्रयत्न न करणाऱ्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उच्च स्तरिय चौकशी करावी, तसेच कर आकारणीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कोलब्रो कंपनीच्या माध्यमातून मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे.

ठाणे - मीरा-भाईंदर शहरातील कचरा उचलणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ पोलिसांनी कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली.मीरा-भाईंदर शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी एका ठेकेदाराला मनपा प्रशासनाने नियुक्त केले आहे. ठेकेदाराकडून कचरा उचलण्यासाठी वाहन, कर्मचारी ठेवले आहेत. मात्र अनेक वाहनांना परवाने नाहीत. वाहन चालकाकडे परवाना नाही. वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नाही. अशी तक्रार समाजसेवक पवन घरत यांनी मनपा आयुक्त तसेच वाहतूक विभागाकडे केली होती.मीरा-भाईंदर शहरातील कचरा उचलणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.वाहतूक पोलिसांनी या कचऱ्याच्या गाड्यांची कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक वाहने विनापरवाना आढळून आली. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या गाड्या शहरात विनापरवाना फिरत आहे. मनपा वाहतूक प्रशासनकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात वाहतूक विभागाकडून  कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई - मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेसवर अंधेरी जवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. जोगेश्वरीहून बांद्राला जाणारी मेट्रोची क्रेन अंधेरीच्या गुंदावली भागातल्या बस स्टॉपवर कोसळली. क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की क्रेनचे दोन तुकडे झाले.बस स्टॉपवर उभी असलेल्या महिलेच्या अंगावर ही क्रेन कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.फाल्गुनी पटेल असं या महिलेचं नाव आहे.महिलेसह या बस स्टॉपवर असलेले आणखी दोघजण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेन चालक फरार झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

इस्तांबूल - युरोपातील ग्रीस आणि तुर्कस्तान देशांच्या मध्यभागी असलेल्या एजीएन समुद्रात काल (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. त्यामुळे तुर्कस्तानाच्या पश्चिम भागातील अनेक इमारतील कोसळल्या. ७ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात १९ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाल्याची माहिती इझ्मीर प्रांताच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीचे भीषण व्हिडिओ समोर आले आहेत. यात अनेक इमारती कोसळल्या असून काहींना तडे गेल्याचे दिसत आहे. संपूर्ण प्रांतात भूकंप झाल्यानंतर गोंधळ उडाला आहे. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही नुकसान पोहचले आहे.एजीएन समुद्रात १६.५ किमी खोल भूगर्भात भूकंपाचे केंद्र असून ७ रिश्टर स्केलचा भूकंप होता, त्यानंतर तुर्कस्तानातील इझ्मीर प्रांतात बचाव पथके पाठविण्यात आले आहे, असे तुर्कस्तानच्या आपत्ती निवारण पथकाने म्हटले आहे. भूमध्य समुद्र युरोपीयन भूगर्भशास्त्र केंद्राने ७ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याचे सांगितले. भूकंपाचे केंद्र ग्रीस देशाच्या समोस बेटांपासून १३ किमी दूर असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. तर अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने ७ रिश्टर स्केलचा भूकंप असल्याचा दावा केला आहे. इझ्मीर शहराचे महापौर तुन्क सोयर यांनी माध्यमांशी बोलताना नुकसानीची माहिती दिली. सुमारे २० इमारती भूकंपाच्या धक्क्याने कोसळल्याचे ते म्हणाले. तुर्कस्तानातील इझ्मीर प्रांतात भूकंपामुळे नुकसान झाल्याचे व्हिडिओ स्थानिक माध्यमांनी दाखविले आहेत. यामध्ये बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे. इमारती कोसळल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. इझ्मीर हे शहर तुर्कस्तानातील तीसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शहरात सुमारे ४५ लाख रहिवासी राहतात. इझ्मीर प्रांताबरोबर इतर सहा प्रांतातही इमारतींना तडे गेल्याचे गृहमंत्री म्हणाले.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने शुक्रवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेल्या या क्रूझ क्षेपणास्त्राची सुखोई-३० लढाऊ विमानाद्वारे चाचणी घेण्यात आली. बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.सुखोई-३० लढाऊ विमानाने पंजाबमधील ९ वाजता हलवाडा हवाई तळावरून उड्डान भरले. हवेत इंधन भरल्यानंतर विमान बंगालच्या उपसागरात पोहचले. बंगालच्या उपसागरात क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राने दुपारी दीडच्या दरम्यान समुद्रातील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या क्रूझ क्षेपणस्त्राची ही दुसरी चाचणी होती.पहिली चाचणी१८ ऑक्टोबरला नौदलाच्या स्टेल्थ डिस्ट्रॉयरचा वापर करुन ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. या चाचणीवेळी ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य यशस्वीरीत्या भेदले होते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाद्वारे एकत्रित विकसित केले आहे.

मुंबई - कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद होती. याकाळात राज्य परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतनही थकले आहेत. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी आगार आणि स्थानके बँकांकडे गहाण ठेवण्याचा विचार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने काही दिवसांपूर्वी कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना एक महिन्याचे वेतन दिले आहे. शिल्लक राहिलेले वेतनही लवकरच देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही थकीत वेतन न मिळाल्याने एसटी कामगार संघटनांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत आपण परिवहन मंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन शरद पवारांनी कामगार संघटनांना दिले होते.कोरोनाचा प्रसार होत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटीला मिळणारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले नाही. परिणामी एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा संचित तोटा ५ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधने वाढली पाहिजे अन्यथा तोटा आणखी वाढत जातो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधने वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाले. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकले, परिवहन मंत्री परब यांनी सांगितले.दिवाळी सण आल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे गरजेचे आहे. म्हणून परिवहन विभागाने सरकारकडे ३ हजार ६०० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याचीही आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागानेच कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. २ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल. बँकांकडे एसटीची पत चांगली आहे. कर्जासाठी बँकांकडे एसटी आगार आणि स्थानके गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीची ही मालमत्ता केवळ विशिष्ट काळासाठी त्यांच्या ताब्यात राहील. पैसे दिल्यानंतर आपली मालमत्ता सोडवण्यात येईल, असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या ८६५ गावांमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे.याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, की सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार समर्थपणे उभे आहे. त्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री १ नोव्हेंबर रोजी काळी फित लावून कारभार करणार आहेत. सीमा भागातील ८६५ गावात राहणारे मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. परंतु कर्नाटक सरकार सातत्याने दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध म्हणून सीमावासीयांकडून १ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येतो. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार ठामपणे उभे आहे.

मुंबई - राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीने नावं निश्चित केल्याचे कळते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष त्यासाठी प्रत्येकी चार नावे सुचवणार आहेत. ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहेत. राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणारे सदस्य विविध क्षेत्रांतील असावेत, असा संकेत आहे. तशी नावे नसल्यास राज्यपालांकडून ही नावे फेटाळली जाऊ शकतात. महाविकास आघाडीने संभाव्य यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केल्याचे कळते. त्यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याचे कळते. उर्मिला या अभिनय क्षेत्रातील असल्याने त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिलाशी चर्चा केल्याचे सूत्रांकडून कळते. मात्र, उर्मिला मातोंडकर यांनी ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता, 'मी देखील अशी चर्चा ऐकतो आहे. तो अधिकार मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्यांचा असतो. उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हे घेतील.असे ते म्हणाले.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र, त्यावेळी भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादातून त्या पक्षातून बाहेर पडल्या. मात्र, विविध मुद्द्यांवर त्या मतप्रदर्शन करत होत्या. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूडवर केलेले आरोप, मुंबईबद्दल केलेले वक्तव्य या सर्व विषयांवर त्यांनी जाहीर मत मांडत कंगनाचा समाचार घेतला होता.

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमलबजावणी केली जाऊ शकते असे ते म्हणाले आहेत. जदयूचे वाल्मिकीनगरमधील खासदार वैद्यनात महतो याचे निधन झाले आहे. यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत नितीश कुमार बोलत होते.जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतंरच घेऊ शकतो. तोपर्यंत निर्णय आपल्या हातात नाही. जातींच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण असावे यामध्ये आमच्यात कोणतेही दुमत नाही, असे नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार यांनी यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी स्पष्ट भाष्य केले नाही. नितीश कुमार यांनी याआधीही ही मागणी केली आहे.लोकांनी मला १५ वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी पुन्हा संधी दिली तर लोकांमध्ये जाऊन दखल न घेतलेल्या समस्यांबद्दल चर्चा करणार, तसेच त्यांच्यासाठी काम करणार, असे आश्वासन नितीश कुमार यांनी यावेळी दिले. नितीश कुमार यांनी यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या १० लाख रोजगाराच्या आश्वासनांचीही त्यांनी खिल्ली उडवली. नितीश कुमार यावेळी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सहाय्याने आपण बिहारच्या विकासासाठी काम केल्याचा उल्लेख केला

मुंबई - मुंबई महानगर पालिकेला ३० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय घेतला. सांडपाणी प्रक्रीया न करताच समुद्रात सोडल्याने मुंबई महानगरपालिकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.सांडपाण्यावर प्रक्रीया न झाल्याने खाडी, समुद्र प्रदुषित झाला. याचा ठपका पालिकेवर ठेवण्यात आलाआहे.  नवी दिल्ली - भारतात येणारी आणि येथून इतर देशांमध्ये जाणारी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे केंद्राने बुधवारी सांगितले.ही बंदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे विशेष मंजूर झालेल्या विमान उड्डाणांवर लागू होणार नाही, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.मात्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे केस-बाय-केस (केस-टू-केस) आधारावर निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.सध्या भारताने अनेक देशांशी 'एअर बबल' करार केले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांना कोणत्याही दिशेने प्रवास करण्यास अनुमती देण्यात येते.कोविड - १९ चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे २५ मार्चला सर्व प्रवासी हवाई सेवा बंद करण्यात आल्या. यानंतर २५ मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

लखनऊ - उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी राजकिय पक्षांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. यानिमित्ताने बसपा प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यातील राजकिय लढाई टोकाला पोहोचली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने बसपाचे सात आमदार फोडले आहे. लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपा एकत्र निवडणूक लढली होती. याचा फायदा समाजवादी पार्टी ऐवजी बसपालाच झाला होता. सपाचे पाच तर बसपाचे १० खासदार निवडून आले होते.

अखिलेश यादव यांनी मायवती यांचा लोकसभा निवडणुकीतील बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान अखिलेश यादव यांनी मायावतीशी हातमिळवणी केली. मात्र संधी मिळताचा बसपावर जोरदार प्रहार केला. सपाने बसपाचे सात आमदार फोडले आहेत. या सर्व घटनाक्रमावर भाजपाने टीका केली आहे. आमदारांचा त्यांच्या पक्षावर विश्वास राहिला नाही. योगी सरकारच्या कामगिरीमुळे विरोधकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका भाजपा प्रदेश प्रवक्ते हीरो वाजपेयींनी केली आहे.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने मुंबईतील मुबारक वसीम खान मार्ग, टँक स्ट्रीट या ठिकाणी केलेल्या कारवाईत एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम वजनाचे एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल ही कारवाई करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपीचे नाव अहमद अब्दुल अहमद अन्सारी असे असून तो मुंबई व मुंबई उपनगर परिसरामध्ये एमडीची मोठ्या प्रमाणात विक्री करत होता. अहमद अन्सारी हा मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाणे, जेजे मार्ग पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत.

ठाणे - मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली. ते संध्याकाळी  रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे होते. चार हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत तीक्ष्ण हत्याराने वार केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चार संशयितांना जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.

राकेश पाटील हे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान रिलायन्स रेसिडेन्सी भागातील पटेल आर मार्टजवळ उभे असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी  त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तिथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोर्टीस हॉस्पिटलबाहेर धाव घेतली. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला. राकेश पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी दोन गाड्यांमधून पळून गेले. त्यापैकी ते एक गाडी अंबरनाथमार्गे मुरबाडच्या दिशेने गेली. या दरम्यान मुरबाड पोलिसांनी रायता परिसरात नाकाबंदी केली आणि काही वेळातच आरोपी पळून जात असलेली गाडी पोलिसांनी पकडली. 

या गाडीतून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली गाडी अंबरनाथमधील एका गावगुंडाच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा गुंड अंबरनाथ शहरातील एका नामांकित बिल्डरसाठी काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठी नावे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई - विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या निवडीचा प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे. यासाठी महाविकास आघाडीची आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत १२ जागांच्या निवडीसाठीच्या प्रस्तावाला मंत्र‍िमंडळात मंजुरी दिली जाणार आहे. शिवाय यासाठी ज्या सदस्यांची नावे येतील त्यांच्या शिफारसीचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना बहाल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती केली जाते. या १२ जागांवर कोणाची वर्णी लावावी यासाठी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची वर्णी लावायची यावर चर्चा झाली. त्यानुसार या नावांना आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या नावांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर ही नावे राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद असल्याने राज्यपाल कोश्यारी या नावांना मंजुरी देतील का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.त्यातच नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजभवन सचिवल्याने प्रकाशित केलेल्या 'जनराज्यपाल' कॉफी टेबल बुक या पुस्तकावरून राज्यपाल कोश्यारी यांना खोचक पत्र लिहले आहे. त्या पत्रानंतर राज्यपाल राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी ज्या नावांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्या नावांना मंजुरी देण्यास काही अडथळा तर आणणार नाहीत ना? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सर्वाधिक नावे ही काँग्रेसमधून समोर आली आहेत. काँग्रेसने पाच महिन्यांपासून राज्यभरातील इच्छुक सदस्यांची यादी मागवली होती. त्यामध्ये काँग्रेसकडून तब्बल १२० जणांचे अर्ज आणि त्यांची माहिती आली होती. तर राष्ट्रवादीमध्ये ८० हून अधिक जणांनी आपल्या नावाची राज्यपालांकडे शिफारस व्हावी, अशी मागणी करणारे अर्ज काँग्रेसकडे दिले आहेत. विधानपरिषदेवर प्रत्येक पक्षांकडून आपल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदींना संधी दिली जाते. शिवाय एकदा विधानपरिषदेचे सदस्य झाल्यानंतर आयुष्यभर पेन्शन, भत्ते आदी अनेक लाभही सुरू असतात. त्याचा या सदस्यांना लाभ होत असतो.

पाटणा - बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. एकूण ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. १६ जिल्ह्यांमध्ये ७१ जागांसाठी मतदानात दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. ६ मंत्र्यांसह १ हजार ६६ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे. कोरोनाची साथ पसरल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये एकूण ७ कोटी १८ लाख मतदार आहेत.

या निवडणुकीत मतदान केंद्रात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे बंधनकारक होते. प्रत्येक मतदानकेंद्रावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर्स, साबणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वाधिक ४२ ठिकाणी आरजेडी रिंगणात आहे. त्याखालोखाल ३५ ठिकाणी जेडीयू, २९ ठिकाणी भाजप तर २० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत.  

पहिला टप्प्यातील मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता दुसरा टप्पा ३ नोव्हेंबर होणार असून तिसरा टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघात तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात मतदान होईल. तर १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

परभणी - परभणीमधील शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात संजय जाधव यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली असून दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा केला आहे.आपली हत्या करण्यासाठी नांदेडमधील रिदा गँगला दोन कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचे खासदार संजय जाधव यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. परभरणीमधील एका मोठ्या व्यक्तीकडून ही सुपारी देण्यात आली असल्याचे संजय जाधव यांचे म्हणणे आहे. संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून संपूर्ण माहिती घेतल्यानंरच गुन्हा दाखल केला जाणार आहे.

मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.आता लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ट्विटरवर प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ” असे सांगितले. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असेही ते म्हणाले आहेत.

याआधी विजय वडेट्टीवार यांनी महानगर प्रदेशातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती.


नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजूनही थांबले नसून, देशातील प्रमुख शेतकरी संघटनांनी ५ नोव्हेंबरला देशव्यापी 'चक्का जाम' आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळेत रस्त्यावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शेतकरी संघटनांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची माहिती दिली.नोव्हेंबर २६ आणि २७ ला 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनांनी केली आहे. दिल्लीला येण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. ऑल इंडिया कृषी संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीनेही या फेडरेशनमध्ये सहभाग घेतला आहे.योगेंद्र यादव, व्ही. एम. सिंह, राजू शेट्टी या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या आंदोलनासाठी पाच सदस्यांची समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी विरोधी कायद्यांचा संघटना विरोध करणार असल्याचे अधिकृत माहिती संघटनेने जारी केली. केंद्राने पंजाब राज्यात जाणाऱ्या मालवाहू रेल्वे थांबविल्या आहेत. याचाही संघटनेने निषेध केला. केंद्र सरकारने मागील महिन्यात तीन कृषी कायदे आणले आहेत. या कायद्यांना पंजाब आणि हरयाणा राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. राज्यभर आंदोलने आणि निदर्शने सुरू असतानाच पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी चार नवी विधेयके आणली आहेत. त्यानुसार तांदुळ आणि गहू जर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी/विक्री केला तर कमीत कमी ३ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद विधेयकात केली आहे.

श्रीनगर - बडगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलातील जवानांनी ठार केले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली. सुरक्षा दलातील जवानांनी चाडूरातील मौचवा येथे सर्च ऑपरेशन चालवले आहे. दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही.बडगाव जिल्ह्यातील चाडूरा परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्याला चोख प्रत्यूत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवणे सुरू असून एक विदेशी दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एक अतिरेकी सुरक्षा दलांना शरण आला. या अतिरेक्याचे नाव साकिब अकबर वझा असे आहे. तो पुलवामाच्या गुलशानपूरा भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाटणा - बिहार बिधानसभेच्या निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या दोन सभा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी यापुर्वी देखील प्रचार सभेला संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात सभा घेणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम चंपारणमधील वाल्मीकीनगर आणि दरभंगामधील कुशेश्वरस्थानचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या प्रचार फेरीत बिहारमधील विकासकामांचा गुणगौरव केला होता. तर बेरोजगारी, उद्योग आणि शिक्षणाच्या संदर्भात राहुल गांधींनी सरकारवर तोफ डागली होती. पहिल्या प्रचार फेरीत दोघांनीही एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले होते. त्यामुळे दुसऱ्या प्रचार फेरीतील सभांमध्ये हे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे बिहार वाशीयांचे  लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली - मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सोपवले होते. मात्र आजची सुनावणी न्या. नागेश्वर राव यांच्याच खंडपीठापुढे होणार असल्याने, याबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी जुन्या खंडापीठाऐवजी घटनापीठासमोर झाली पाहिजे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी केली आहे. तसेच याबाबतचा निर्णय देणे सरकारच्या हाती नसून न्यायालयाला याचे सर्वाधिकारी आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. २०१४ साली नारायण राणे समितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार काँग्रेस सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र या आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेले. न्यायालयाने आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसी समाजाच्या कोट्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली. तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली. त्यामुळे दरम्यानच्या काळात ओबीसी-मराठा संघर्ष होतांना दिसतो आहे.

नवी दिल्ली -  राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशच्या १० आणि उत्तराखंडच्या एका जागेसाठी राज्यसभा निवडणुका ९ नोव्हेंबरला होणार आहेत. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे. भाजपाने उत्तर प्रदेशातून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा नीरज शेखर आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव दिले आहे.उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० खासदारांची मुदत २५ नोव्हेंबरला संपत आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे अरुण सिंह, नीरज शेखर, हरदीपसिंह पुरी, समाजवादी पक्षाचे जावेद अली खान, राम गोपाल यादव, चंद्रपालसिंह यादव, रवी प्रकाश वर्मा, बसपाचे राजाराम, वीर सिंह, काँग्रेसचे पीएल पुनिया यांचा समावेश आहे.तसेच उत्तराखंडमधून काँग्रेस नेते राज बब्बर यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रामजी गौतम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उत्तर प्रदेशमधील राज्यसभेसाठी भाजपाचे आठही उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे कारण पक्षाला राज्य विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील राज्यसभेसाठी पक्षाच्या उमेदवारानेही विजयी होण्याची शक्यता आहे. या नऊ नवीन सदस्यांसह, राज्यसभेतील भाजपची स्वत: ची संख्या २४५ सदस्यांच्या सभागृहात ९० च्या पुढे जाईल.उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या ज्या जागा रिक्त पडत आहेत, त्यापैकी भाजपचे तीन, समाजवादी पक्षाच्या चार, बहुजन समाज पक्षाच्या दोन आणि काँग्रेसची एक जागा आहे.

मुजफ्फरपूर - बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून राजकीय चिखलफेक सुरू आहे. या दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका सभेत, नितीश कुमार यांच्याविरोधातच घोषणाबाजी करण्यात आली.नितीश कुमार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या.महाआघाडी विरुद्ध एनडीए अशी सरळ लढत बिहारच्या राजकीय मैदानात बघायला मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काही महिला उमेदवारही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशात नितीश कुमार रॅली, सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशाच एका सभे दरम्यान, नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नितीश कुमार कांटी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी, मडवन येथील गांधी जानकी उच्च विद्यालयाच्या मैदानात सभा घेण्यासाठी आले होते. या सभेसाठी ते हेलीकॉप्टरने आले असता, काही कार्यकर्त्यांनी नितीश यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यात त्यांनी 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. यानंतर सुरक्षारक्षकांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभेच्या ठिकाणावरून बाहेर काढले.यानंतर सभेला सुरूवात झाली. 

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. तत्पूर्वी या टप्प्यातील प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. पहिल्या टप्प्यात ७१ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहेत.२८ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार ०६६ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवार दिनांक २८ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होईल. मात्र, वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान संपन्याचा कालावधी वेगवेगळा निश्चित करण्यात आला आहे.मतदानाची वेळ-३६ विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ लवकरच समाप्त होणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवल्यानुसार पहिल्या टप्प्यात ४ जागांवर सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ मतदारसंघामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केले जाईल. पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा वेळ दिला आहे. उर्वरीत ३५ जागेंवर सकाळी ७ वाजल्यापासून सायं ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.पहिल्या टप्प्यातील १४ जागा या मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. या टप्प्यात मतदान होणारे काही मतदार संघ हे नक्षलग्रस्त भागातील आहेत. त्यामध्ये चैनपूर, नवीनगर, कुटंबा याबरोबरच जमुई जिल्ह्याती अनेक मतदारसंघांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव नक्षल प्रभावित मतदार संघात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही आपतकालीन घटनेस तोंड देण्यासाठी २४ तास सुरू राहणारी कंट्रोल रुम उभारण्यात आली आहे. ज्यांच्या मार्फत ईव्हीएम घेऊन गेल्यानंतर आपली कामगिरी सुरू करतील. नक्षल प्रभावित भागात नजर ठेवण्यासाठी २ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघी बहिणींना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आज (सोमवार) आणि उद्या असे दोन दिवस त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार आहे. या चौकशीला दोघी बहिणी उपस्थित राहतील की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटवरून एक वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये हिंदू- मुस्लीम तणाव असून, मुस्लीम कलाकार आणि हिंदू कलाकार यांच्यामध्ये मतभेद आहेत. या ट्विटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत, मूनवर अली खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.खान यांनी दाखल केलेल्या या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच, वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगनाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.दरम्यान, वांद्र्याप्रमाणेच मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट न्यायालयातही कंगना रणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आली कशीफ खान देशमुख यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे. कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाउंटवर दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार केले असून, त्यासंबंधी कलमांनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई - 'तारीख पे तारीख देतात, देवू देत. अनेकजण स्वप्न पाहताहेत सरकारचे पाडण्याचे पण आताही आवाहन करतो, 'जर हिंमत असेल तर सरकार पाडा'.आम्ही सत्तेला डसणारे मुंगळे नाहीत,' असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाला सुरूवात केली. 

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा केला. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. ३० ऑक्टोबर १९६६ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तेव्हापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. 

एकच पक्ष एकच मैदान असा या दसरा मेळाव्याचे वेगळेपण आहे. हे वेगळेपण शिवसेनेने जपले आहे. फक्त शिवसैनिकच नाहीत तर संपूर्ण जनता 'दसरा मेळावा' पाहण्यास आणि खास करून यामधील भाषण ऐकण्यास उत्सुक असते. गेल्यावर्षीच्या म्हणजे २०१९ च्या दसरा मेळाव्यात '२०२० मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल', असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाकीत केले होते. आणि हे भाकीत खरे ठरले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या व डिंपल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘शिवगंध’ या पुस्तकाचे प्रकाशन पवारांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथे करण्यात आले.याप्रसंगी शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, नारायणगावमधून येऊन एक दर्जेदार डॉक्टर, तितकाच उत्तम अभिनेता आणि आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवणारा संसदपटू असणाऱ्या अमोल कोल्हे यांची वाटचाल मी जवळून पाहतो आहे. माझे स्नेही डॉ. रवी बापट हे मला सुरुवातीपासून अमोल कोल्हे यांच्याबद्दल सांगत असत. ‘राजा शिवछत्रपती’ या गाजलेल्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना आलेल्या अनुभवांविषयी, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी त्यांनी ‘शिवगंध’ या पुस्तकात रंजकतेने लिहिले आहे. डॉ. नीतिन आरेकर यांनी त्यांचे अनुभव तशाच रंजकतेने शब्दांकित केले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, लेखक आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुस्तकाचे शब्दांकनकार डॉ. नीतिन आरेकर, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये, कौतुक मुळ्ये, हॉटेल प्रीतमचे संचालक अमरदीपसिंग कोहली आदी उपस्थित होते.

 

नागपूर - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या संघटनांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारे कार्यक्रम अतिशय थोड्याथोडक्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सावधगिरी बाळगत घेण्यात आलेल्या याच निर्णयाच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.यंदाच्या वर्षी संघाच्या पारंपरिक सोहळ्याचे चित्र पाहता येणार नसले तरीही, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र ऑनलाईन माध्यमातून स्वयंसेवकांना आणि देशाला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राम मंदिरापासून सीएएपर्यंत आणि देशातील कोरोना स्थितीपर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. सीएएला काहींनी विरोध केला, पण यामुळे कोणाचेही नागरिकत्व मात्र धोक्यात आलेले नाही असे मोहन भागवत म्हणाले. तर, राम जन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाचे स्वागत केले. 


अयोध्या - येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांनी दिली आहे. या अतर्गंत आता पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. १७ डिसेंबरपर्यंत अयोध्यामध्ये कलम १४४ लागू राहणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, दीपोत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. दीपोत्सवानंतर रामाच्या राज्याभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, त्यानंतर भजनासाऱख्या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या काळात मिरवणुकीला प्रतिबंध असल्याचेही ते म्हणालेत. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवहर - बिहारमध्ये निवडणुकीआधीच पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या या  हिंसात्मक घटनेमुळे अख्या देशाचे लक्ष याकडे वेधले आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये निवडणुकीआधीच झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. शिवहर जिल्ह्यात जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.नारायण सिंह हे समर्थकांसह प्रचारासाठी निघाले असता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये पिपराही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हथसार गावात बेछूट गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यांना प्रचारात सहभागी झालेल्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. ज्यामध्ये एका हल्लेखोराचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे. 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत, या हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. नारायण सिंह हे बिहारच्या शिवहर विधानसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे राहिले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच सिंह हेसुद्धा प्रचाराला निघाले होते. आपल्या कार्यकर्त्यांसह पायीच प्रचाकर करतेवेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयातही दाखल करण्यात आले. पण, सीतामढी येथील रुग्णालयाच्या दिशेने जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

मुंबई - मुंबईच्या गोरेगावमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापारचे रॅकेट उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह ३ मुलींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते डिलर्सलासुद्धा भेटले.सगळ्या गोष्टींचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. जीच्यावर मोठ्या हॉटेल्समध्ये देह व्यापारासाठी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचा आरोप आहे. बॉलिवूडच्या एका आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आणि दोन टीव्ही मालिका करणाऱ्या अभिनेत्रींवर या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसाठी १० लाखांची डिल केली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकून सेक्ट रॅकेट उधळून लावण्यात आले. 


मुंबई - मराठा क्रांती मोर्चाचे २६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मुंबईच्या वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले उपस्थित राहणार आहेत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात राज्य सरकारने कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे, मराठा समाज शैक्षणिक व नोकरीतील संधीपासून वंचित राहिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत सरकार कोणतीही पाऊले उचलताना दिसत नाही. १२ हजार पदांची पोलीस भरती आणि ९ हजार ऊर्जा खात्यातील नोकऱ्या जाहीर करून सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तो पर्यंत नोकर भरती करू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल, २७ ऑक्टोबरला सुनावणीआरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. जर निकाल सरकारच्या बाजूने लागला नाही, तर सरकारने याबाबत काय तयारी केली, याची माहिती मराठा समाजाला देण्यात आलेली नाही. मराठा समाजा संदर्भात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळाचे आर्थिक पाठबळ वाढवण्याची घोषणा झाली. पण पुढे कार्यवाही झालेली नाही. सर्व जिल्ह्यात वसतिगृह बांधण्याची घोषणाही कागदावरच राहिली. यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असून ती सोमवारच्या आंदोलनात व्यक्त होईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क घालून हे आंदोलन होईल. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली. 

मुंबई - कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी खासगी रुग्णालयातील भरमसाठ बिलावर नियंत्रण आणण्यासाठी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कमी किमतीत माक्स. आता कोरोनाबाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविरची किंमत कमी केली आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे. 

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खासगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत, अशी माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 


मुंबई - मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गीता जैन यांना शिवबंधन बांधले. गीता जैन या भाजपमध्ये होत्या. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला होता. भाजपच्या माजी नेत्या आणि विद्यमान आमदाराने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेसाठी ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. सुशांतचे निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणानंतरही कलाविश्वातील अनेक धक्कादायक प्रकरणांवरचा पडदा दूर होताना दिसत आहे. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट हे सातत्याने चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी महेश भट्ट यांच्यावर काही आरोप केल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्येच आता महेश भट्ट यांच्या सुनेने लविना लोध हिने त्यांच्यावर आणि तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहे.महेश भट्ट कलाविश्वातील डॉन आहे, त्याच्या एका फोनमुळे कलाविश्वातील सगळे चित्र पालटून जाते असे तिने म्हटले आहे.

महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लविना लोध हिने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पती सुमित आणि महेश भट्ट यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच माझा पती सुमित ड्रग्स आणि मुली सप्लाय करतो असा आरोपही तिने केला आहे.

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझे लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झाले असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असे लविना म्हणाली.

 “ही सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुमच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले तर ते तुमचे जगणे कठीण करुन टाकतात. महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचे काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचे आयुष्य़ बर्बाद केले आहे. त्यांच्याविरुद्ध मी तक्रार दाखल केल्यानंतर ते सातत्याने मला त्रास देत आहेत. मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर मी त्यांच्याविरोधात एनसी करायला गेले तर कोणत्याच पोलीस ठाण्यात एनसी नोंदवून घेतली जात नाही, आणि जर का ती घेतली तर कोणीही त्यावर काहीच कारवाई करत नाही. जर पुढे जाऊन माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत काही कमी जास्त झाले तर त्याला महेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सेहगल, कुमकुम सेहगल हे जबाबदार असतील”.

दरम्यान,लविना लोध हिने केलेल्या आरोपांनंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. 

मुंबई - २०२० हे वर्ष अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी अतिशय कठीण गेले आहे. कोरोनाच्या काळात दीपिकाचा मेगा बजेट सिनेमा ८३ हा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत ड्रग्स प्रकरणात दीपिका फसली. एनसीबीने दीपिकाशी गेल्या महिन्यात चौकशी केली. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्स प्रकरणाबाबत एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागले.एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तब्बल एका महिन्यानंतर दीपिका सोशल मीडियावर ऍक्टिव झाली आहे. दीपिकाने आपला मित्र आणि सहकलाकार प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.दीपिकाने आपल्या इंस्टा स्टोरीवर प्रभासचा फोटो शेअर करत आहेत. या पोस्टमध्ये तिने म्हटले की,'तू कायम निरोगी आणि आनंदी राहा. आशा करते की, तुला हे वर्ष आनंदी जाऊ दे.' 

प्रभासचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या यादीत आदीपुरूष ते अगदी राधेश्याम सिनेमांचा समावेश आहे. अनेक मेगा बजेट सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. या यादीत प्रभास दीपिकासोबत देखील दिसणार आहेत. या सिनेमाबाबत दीपिकाच्या नावाची घोषणा तर झालेली नाही. मात्र दीपिकानेच स्वतः एका सिनेमाची घोषणा केली आहे.  

नवी मुंबई - मुंबईच्या रस्त्यांवरील वेळखाऊ वाहतूककोंडी लक्षात घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे (एमपीटी) लवकरच मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईपासून बेलापूर, वाशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मांडवा या दरम्यान वॉटर टॅक्सी चालविण्याची योजना आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुख्य शहरातून रस्तेमार्गे दीड तास खर्च करण्याऐवजी केवळ ३०-४० मिनिटांत नवी मुंबई गाठणे शक्य होणार आहे.नोव्हेंबरपासून माझगाव प्रिन्सेस डॉक येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवरून (डीसीटी) वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे नियोजन आहे. मुंबईतून बाहेर पडताना प्रचंड कोडीचा सामना करावा लागतो. केवळ शहराबाहेर पडायलाच प्रवाशांची ४०-५० मिनिटे खर्ची पडतात. अशावेळी वॉटर टॅक्सीचा पर्याय मुंबईकरांसाठी अधिक परिणामकारक ठरेल, असे वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे. यामुळे समुद्रमार्गे नवी मुंबईच्या कुठल्याही भागात अवघ्या ३५-४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यापूर्वी 'एमपीटी'तर्फे मुंबई ते अलिबागदरम्यान रो-रो सेवा (जलवाहतूक) सुरू झाल्याने मांडवा, अलिबाग भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला होता. ही सेवा पुरवणाऱ्या 'एम२एम फेरीज' कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ५ हजार प्रवासी, १२००हून अधिक मोटारी, २७० दुचाकी, १६ सायकली तसेच ७४ पाळीव प्राण्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या आकडेवारीतून जलप्रवासाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत वॉटर टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. या सेवेमुळे कुठल्याही थांब्याशिवाय थेट इच्छित स्थळी पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

ही सेवा पुरवण्यासाठी जवळपास सहा एजन्सी तयार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी एक किंवा दोन ऑपरेटर लवकरच सेवा सुरू करण्याची शक्यता असून, या सेवेसाठीचे शुल्क ऑपरेटरद्वारे निश्चित केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई - कोल्हापूर आणि सातारा येथे वाहतूक केली जात असलेली ९२९ किलो चांदी नवी मुंबई पोलिसांनी वाशी पथकर नाक्यावर गुरुवारी रात्री जप्त केली. या चांदीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी १७ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे. एका वाहनातून चांदी आणि चांदीच्या वस्तुंची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी वस्तू आणि सेवाकर विभागामार्फत तपास करीत आहे.मुंबईतून चांदीची बेकायदा पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती परिमंडळ-१चे उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती. त्यानुसार वाशी पथकर नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी केलेल्या कारवाईत  चांदीच्या वस्तू ताब्यात घेण्यात आली.‘एक्स्प्रेस कुरियर’ यांच्यामार्फत ही चांदी पुणे, कोल्हापूर येथील काही व्यापाऱ्यांना देण्यात येणार होती. जीएसटी भरण्यात आला नव्हता. कर चुकवेगिरी करून चांदीची वाहतूक सुरू होती. संशय येऊ नये म्हणून कुरियरच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता.

ठाणे - ठाण्यातील येऊर येथील वनाधिकाऱ्यांच्या जाचाच्या विरुद्ध शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी कोर्ट नाका येथे रस्ता रोको आंदोलन केले. येऊरच्या डोंगरावर पारंपरिक पद्धतीने भातशेती करणाऱ्या आदिवासींची वर्षानुवर्षे कापणीला तयार असलेली भात, तूर, नागली ही सर्व पिके त्यांना न कळवता या वनाधिकाऱ्यांनी चोरासारखी अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. या गोष्टीचा निषेध करत ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.

आदिवासींचा वन विभागाच्या विरोधात मोर्चायेऊर परिसरातील शेतजमीन ही अनधिकृत असल्याचे कारण देऊन सदरच्या जमिनीतील पिके उध्वस्त करण्यात आली आणि गेले ७ महिने या क्षेत्रात झालेले ढाबे, लॉन्स, बंगले अशी शेकडो बेकायदेशीर बांधकामे मात्र अधिकृत आणि पर्यावरण पूरक आहेत का? असा संतप्त सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या लॉकडाऊनने आधीच गरिबांचे कंबरडे मोडले आहे, त्यात आता कापणीला तयार असलेली पिके वनाधिकाऱ्यांनी अक्षरशः उध्वस्त करून लुटून नेली. त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी व त्या वनाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

मुंबई - रूग्णालयाच्या शौचालयात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह अढळल्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे रुग्णालायाच्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हा धक्कादायक प्रकार शिवडीच्या टीबी रुग्णालयातील असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे  रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होत होता का? शौचालयात अढळलेल्या मृतदेहावर कोणाला कसा दिसला नाही? याचा अधिक तपास रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस करीत आहेत.

टीबी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती कळताच रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे कठिण झाले. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या नोंदी आणि इतर सर्व बाबी तपासल्यानंतर या व्यक्तीची ओळख पटली.रुग्ण सदर रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

दरम्यान ४ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून एक २७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडून नोंदवण्यात आली होती. परंतु ही तिच व्यक्ती आहे का? हे अद्याप समजू शकलेले नाही. असे रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 


मीरा-भाईंदर - भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.मीरा - भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना त्यांनी भाजप सोडण्याचे  सोडण्याचे कारण सांगितले.तसेच भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करेन असे सांगितले. आता माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाल्यासारखे आज वाटत आहे. भाजपमध्ये अन्याय होत असल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असेही खडसे म्हणाले.

राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे शरद पवार यांचे आभार मानतो. ऐकाएकी भाजप सोडेल असे कधी वाटले नाही. माझी भाजपमध्ये छळवणूक झाली. मी खूप संघर्ष केला असून, तो मंत्रिमंडळामध्ये देखील केला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असेही  म्हणाले.काही दिवस जाऊ द्या कोणी किती भूखंड घेतले हे मी सांगतो असे  भाजपाला संबोधून  म्हणाले. 

शरद पवार काय म्हणाले 

अजित पवार, जितेंद्र आव्हाड हे एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, कोणीही नाराज नाही. अजित पवार देखील नाराज नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.आजचा दिवस आनंदाचा आहे. नाथाभाऊंमुळे खान्देशात राष्ट्रवादीची ताकद वाढेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 

मुंबई - माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. खडसे आज पत्नी मंदाकिनी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

खडसे यांच्या स्वागतासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार प्रफुल पटले, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर गुरुवारी मुंबईकडे येण्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत मला न्याय मिळत नसल्यानेच मी माझ्या समर्थकांशी चर्चा करून अखेर पक्षांतर करण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते उद्या मुंबईत येणार आहेत. काही आजी आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण आहे. एवढ्या आमदारांनी राजीनामे दिले तर निवडणूक घेणे शक्य नाही. राष्ट्रवादीला आमच्या भागात नेतृत्त्व नाही, म्हणून मी राष्ट्रवादीची निवड केली. नेतृत्त्व म्हणून आपल्याला राजकारणात सक्रिय राहता येईल, हा हेतू असल्याने मी राष्ट्रवादीची निवड केली. नाही तर मला शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर होतीच असेही खडसे म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या या सूचक वक्यव्यावरून खडसे आज शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नाकात दम करण्यासाठी राष्ट्रवादी खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील १५ हून अधिक मतदारसंघात खडसे यांना मानणारा मतदान आणि मोठा वर्ग आहे. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या क्षेत्रात भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत सुमारे १५ विधानसभा जागांवर फटका बसू शकतो. तर मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत जात नाही, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

मुंबई - मेट्रो ३ (कुलाबा ते सीप्झ) या मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविल्यानंतर आता मेट्रो ४ चे (कासारवडवली ते वडाळा) कारशेडही कांजूरमार्गला नेण्याची हालचाल सुरू झाली आहे.हे कारशेड ठाण्यात मोघरपाडा येथे बांधण्याचे प्रस्तावित होते.मेट्रो ३ च्या आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे मेट्रो ३ आणि ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) या दोन्ही मार्गिकांचे एकत्रीकरण होईल, त्यास आता मेट्रो ४ चीदेखील जोड मिळण्याची शक्यता आहे.मेट्रो ४ मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथे बांधण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत नुकतीच चर्चा झाली. या संदर्भात लवकरच सुसाध्यता अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथील राज्य सरकारच्या ताब्यातील १०२ एकर जागा मेट्रो ३ आणि ६ साठी वापरण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले. आता याच ठिकाणी मेट्रो ४ चे कारशेडही बांधण्यात येईल. जागेच्या उपलब्धतेनुसार कारशेडची रचना कशी असेल हे ठरविण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

डेपोच्या बांधकामास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित असतो. करोनापूर्व काळात मेट्रो ४ ची प्रकल्पपूर्ती ऑक्टोबर २०२२ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट होते. टाळेबंदीतील काम बंदचा फटका काळ धरून यात सहा महिन्यांची वाढ होऊ शकते. मोघरपाडा येथे मेट्रो ४ सोबतच मेट्रो १० (गायमुख ते शिवाजी चौक) आणि मेट्रो ४ चा विस्तार मेट्रो ४ ए (कासारवडवली ते गायमुख) यांचे कारशेडदेखील प्रस्तावित होते. तसेच पाच मजली प्रशासकीय इमारतीचेही नियोजन होते. त्यासंदर्भात सुसाध्यता अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

मेट्रो ४ चे कारशेड कांजूरमार्ग येथे बांधल्यास भविष्यात या ठिकाणी चार मेट्रो मार्गिका एकत्र येऊ शकतील. मेट्रो ३ आणि ६ बरोबरच येथे मेट्रो १४ (कांजूरमार्ग ते बदलापूर) ही मार्गिका प्रस्तावित आहे. मेट्रो ४ च्या डेपोमुळे चौथ्या मार्गिकेची भर यामध्ये पडेल. त्यामुळे ठाण्याहून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी मेट्रो ३ चा पर्यायही वापरता येईल. तसेच ठाणे ते पश्चिाम उपनगरात वांद्रे कुर्ला संकुल, आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी जोडणीदेखील होऊ शकते.


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget