December 2020

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेली नोटीस आणि विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य निवडण्यासाठी पाठवलेल्या १२ जणांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपावर हल्लाबोल केला आहे.' ईडी ' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहे. तो भाजप आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण हेच भाजपचे भविष्य आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे 'ईडी' प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका 'महात्म्या'ने 'ठाकरे सरकार' पाडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी 'ईडी पिडी'च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, 'ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का? 'पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. घटनेची सगळय़ात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त १२ जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

२०२० चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? कुणा कुडमुड्या ज्योतिषाने मार्च-एप्रिलचा मुहूर्त दिला असेल तर तो मूर्खपणाच ठरेल. त्यामुळे 'ईडी'च्या बाबतीत ज्यांना 'घटना' आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, 'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?' त्यातलाच हा प्रकार! 'ईडी' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताच त्यांना 'ईडी'ची नोटीस यावी याला काय घटनेच्या चौकटीत राहत केलेले कार्य म्हणावे? आंध्र प्रदेशातील 'टीडीपी' खासदारांच्या घरावर ईडीच्या धाडी पडताच भेदरलेली मेंढरं निमूट भाजपच्या कळपात सामील झाली. ईडीचा प्रयोग लालू यादवांच्या बाबतीत फसला, अशी टीका अग्रलेखातून केली आहे.

प. बंगालात ईडीचा धाक दाखवून रदा चीट फंड घोटाळय़ातील मुकुल राय वगैरे मंडळी एका रात्रीत भाजपमध्ये घुसली. भाजपमध्ये सामील होताच असे सर्व लोक शुद्ध करून घेतले जातात व ईडी याकामी पौरोहित्याचे काम करीत असते. शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत. खडसे, सरनाईक असतील नाहीतर महाविकास आघाडीतील इतर कोणी, त्यांच्यावरील कारवाया म्हणजे विकृतीचा कळस आहे. कायद्याच्या अंमलबजावणीचा हेतू शुद्ध असेल तरच तो कायदा जनतेने पाळायचा असतो. बेकायदेशीर आदेश पाळणे हे नागरिकांच्या सनदेमध्ये बसत नाही, असे म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर ताशेरे ओढण्यात आले.


भडोच - आदिवासींच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे गुजरातमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने त्याबद्दल जारी केलेली अधिसचूना मागे घ्यावी अशी मागणी मनसुख वासवा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली होती. या अधिसुचनेमुळे या १२१ गावांमधील आदिवासींकडून उठवला जाणारा आवाज तसेच निषेधाचा प्रभाव कमी करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ मे २०१६ रोजी स्कुल्पनेश्वर अभयारण्य आणि आजूबाजूच्या गावांना संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा जी अधिसूचना वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली होती त्याचा वसावा यांनी विरोध केला होता.

भडोच मतदारसंघाचे सहावेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या वसावा यांनी गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आऱ. पाटील यांनाही पत्र पाठवले आहे. आपल्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आपण राजीनामा देत आहोत. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत. कृपया आपल्याला माफ करावे, असे वसावा यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आपण लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी पत्रात म्हटले आङे. पक्षाशी एखनिष्ठ राहण्याचा आणि आयुष्यात पक्षाची मूल्ये आत्मसात करण्याचा आपण सदैव प्रयत्न केला. आपण माणूस आहोत. माणसाकडून चुका होतात, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.दरम्यान, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते भरत पंड्या यांनी वसावा यांचा राजीनामा प्रसारमाध्यमांद्वारे पक्षाकडे आला आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून पक्ष त्यांचे सर्व प्रश्न सोडवेल असे आश्वासनही पंड्या यांनी दिले.

कोलकाता - आगामी वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींनी वेग घेतला आहे. यातच हावडाच्या शालिमारमध्ये एकाला गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. धर्मेंद्र सिंह असे मृतकाचे नाव असून ते तृणमूल कँग्रेसचे नेते होते. या घटनेनंतर संतप्त तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असून हावडामधील दुकानांना आग लावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दुचाकीस्वार दुचाकीवर आले आणि त्यांनी धर्मेंद्र यांना गोळ्या घातल्या. तातडीने धर्मेंद्र यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धर्मेंद्र हे हावडाच्या प्रभाग क्रमांक- ३९ मध्ये टीएमसीचे कार्यवाह अध्यक्षही होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची हत्या एका व्यावसायिक वैमनस्यातून करण्यात आली आहे.यापूर्वी नोव्हेंबरमध्येही तृणमूल कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचे समोर आले आहे. उत्तर २४ परगणामधील जगदल पोलीस स्टेशनच्या पाल घाट रोड भागात आकाश प्रसाद या तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती. तृणमूलचे नेते अशोक साव आणि त्यांच्या साथीदारांनी आकाशला ठार केल्याचा आरोप कुटंबीयांनी केला होता.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या बंगाल दौऱ्यावेळी तृणमूलवर भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून पश्चिम बंगालमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचे ते म्हणाले होते. बंगालमध्ये राजकीय हिंसाचार शिगेला आहे. ३०० पेक्षा जास्त भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येच्या चौकशीत एक इंच प्रगतीसुद्धा दिसून येत नाही, असा आरोप त्यांनी केला होता.

मुंबई - मुंबईत उद्या नववर्ष स्वागतासाठी रात्री समुद्र किनारे, चौपाट्यांवर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईत ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र हे जमावबंदीचे आदेश आहेत, संचारबंदीचे नाहीत असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन रस्त्यांवरून फिरायचे नसून गर्दीदेखील करायची नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. चारचाकी वाहनातही ४ किंवा त्याहून अधिक प्रवासी नसावेत असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करु नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.

महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री १० नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलमनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. जिल्हयातील हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री ११ पर्यंतच हॉटेल्स चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले.शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे ६१ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे, असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी विनंतीही नगरविकास मंत्री शिंदे यांनी केली आहे.

मुंबई - ३१ डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. नव्या वर्षाचे स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणाने करावे. असे आवाहन गृह विभागाने केले आहे.राज्यात ५ जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गेटवे, मरिन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक मिरवणुका ३१ डिसेंबरला काढता येणार नाहीत. भारतात ही विविध राज्यांमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये वर्षाच्या अखेरीस लोकांनी गर्दी करु नये म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे.


नवी दिल्ली - कुख्यात गुंड छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल तिकीट पाच रुपयांचे असून टपाल तिकीट छोटा राजन आणि मुन्ना बजरंगीचे आहेत. टपाल खात्याला यासाठी ६०० रुपये फी दिली गेली. तिकिटांची छपाई करण्यापूर्वी ना छायाचित्रांची तपासणी केली गेली, ना प्रमाणपत्र मागितले गेले.

टपाल तिकिटावर गुंड आणि माफियांची छायाचित्रे छापता येतील का? हा प्रश्न आम्ही तुम्हाला यासाठी विचारलाय की कुख्यात गुन्हेगाराचे टपाल तिकीट छापण्याचा कारनामा उत्तर प्रदेशात घडला. साहजिकच अशी तिकीट तर छापता येत नाही, परंतु जर सिस्टममध्ये एखादी त्रुटी असेल तर गुन्हेगाराचे सुद्धा टपाल तिकीट छापता येऊ शकते. कानपूरमध्ये नेमके हेच घडले आहे. इथे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय माफिया छोटा राजन आणि बागपत कारागृहात झालेल्या चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी हे टपाल तिकिटे बनले आहेत. या तिकिटांच्या माध्यमातून देशात कुठेही पत्रे पाठविली जाऊ शकतात.छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे मुद्रांक भारतीय पोस्टल विभागाच्या 'माय स्टॅम्प' योजनेंतर्गत छापण्यात आले. हे टपाल अशा परिस्थितीत हिंसा करणाऱ्या गुन्हेगारांचाच काय तर दहशतवाद्यांचा शिक्काही छापला जाऊ शकतो, हेच यावरुन दिसून येत आहे.

बंगळुरु - कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्री समोर आली. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. 

दरम्यान, कर्नाटक विधान परिषद उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे. गौडा यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर संपत्तीची माहिती लिहून आपल्या मुलाला अर्धवट राहिलेले घर पूर्ण कर असे सांगितले आहे.अलिकडेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. बेकायदेशीरपणे सभागृहाच कामकाज चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला होता.

मुंबई - गेल्या महिन्याभरात केंद्र सरकारने गॅस दरात १०० रुपयांनी वाढ केली आहे. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोणत्याही जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढ करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पंतप्रधानांनी पाळले नाही. उलट गॅसच्या दरात सातत्याने वाढ केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत. दरवाढीने महिलांना भगिणीचं आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाही. आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, जर गॅस दरवाढ कमी नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन करु, असा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना होऊन गेला आहे. अद्याप शेतकरी आंदोलावर तोडगा निघाला नाही. सिंघू, टिकरी सीमा आणि बुरारी येथील निरंकारी मैदानावर शेतकरी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. यातील बुरारी मैदानावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची शेती सुरू केली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुभाजकामधील जागेतही शेती सुरू केली आहे.

बुराडी येथील निरंकारी मैदानावर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 'एक महिन्यापासून येथे बसून आहे. मोकळे बसून करणार तरी काय? त्यामुळे आम्ही शेती करायला सुरूवात केली आहे. जर मोदींनी आमचे म्हणणे नाही ऐकले तर सगळ्या मैदानावर शेती पिकवू' असे एका शेतकऱ्याने सांगितले.सहा महिने पुरेल एवढं राशन बरोबर आणल्याचे शेतकरी सांगत आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनस्थळी अनेक सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. खालसा एड या संघटनेने शेतकऱ्यांसाना गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी मॉल सुरू केला आहे. काही संघटनांनी शेतकऱ्यांसाठी मसाज सेंटर सुरू केले आहे. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनही सीमेवर दाखल झाले आहे. सर्व शेतकरी आंदोलनस्थळीच जेवण बनवत आहेत. त्यासाठीचा भाजीपाला स्वयंसेवी संस्था पुरवत आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सिंघू सीमेवर असलेल्या गुरू गोविंद सिंह स्मारकाला रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भेट दिली. यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांचीही भेट घेतली. तसेच, याठिकाणी बोलताना केंद्र सरकारने कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी केजरीवाल यांनी केली.दिल्ली सरकारच्या पंजाब अकादमीने याठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले होते. या अकादमीचे चेअरमन हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आहेत. याठिकाणी उपस्थिती दर्शवत केजरीवाल आणि सिसोदिया यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्येही सहभाग नोंदवला. तर सीमेवरील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री अरविंद हे स्वतः ठिकठिकाणी जाऊन त्याबाबतच्या नियोजनाची पाहणी करत असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.

गेल्या ३३ दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात आणि देशभरातील अन्य ठिकाणचे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून आहेत. केंद्र सरकार तीन कृषी कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण दिल्लीच्या सीमा सोडणार नाही अशी भूमीका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मुख्य ४० शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांमधील शेतकरी याठिकाणी आंदोलन करत आहेत. तसेच या आंदोलनाला काँग्रेससह अन्य १२ विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे.

फिरोझाबाद - देशभरात महिलाविरोधातील हिंसाचाराचा मुद्दा सातत्यानं ऐरणीवर आहे. अशातच एका महिलेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकावर बलात्काराचा आरोप केला आहे. घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत स्वयंसेवकाने बलात्कार केल्याचा दावा महिलेने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्राजवळ असलेल्या फिरोझाबादमध्ये ही घटना घडली आहे. एक स्थानिक आरएसएस स्वयंसेवक अधूनमधून महिलेच्या घरी यायचा. एक दिवस त्याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने विरोध करत त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. त्याचबरोबर परत कधीच घरी न येण्याचा इशारा दिला.आरएसएस स्वयंसेवक असलेली ती व्यक्ती काही दिवसानंतर अचानक त्या महिलेच्या घरात घुसली. फिर्यादी महिलेसोबत जबरदस्ती केली. तिच्या डोक्याला बंदूक लावत आरोपीने बलात्कार केला. अत्याचार करत असताना महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या बहिणीचा पती आवाज ऐकून धावत आला. यावेळी आरोपीने आपण आरएसएस स्वयंसेवक असून, आपले कुणीच काहीही करू शकत नाही, असे म्हणत निघून गेला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख रामचंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. जर तक्रारीत तथ्य आढळून आल्यास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ती व्यक्ती जर दोषी असेल, तर मग ती आरएसएस स्वयंसेवक असो अन्य कुणी कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही. 


मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आले. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला बोलावण्यात आले असून, महिन्यापूर्वीच ईडीची नोटीस वर्षा राऊत यांना पाठवण्यात आल्याची आल्याची माहिती आहे.त्यानंतर आता ईडीने समन्स बजावले आहे. यानंतर संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत ट्वीट करत भाजपला टोला लगावला.

'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम', असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तर ईडी हा भाजपचा पोपट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली.वर्षा राऊत यांच्या बँक अकाऊंटवर काही पैसे जमा झाल्यासंदर्भात त्यांना खुलासा करायला ईडीच्या नोटीशीमध्ये सांगण्यात आले होते. पण अजूनही ईडीचे समन्स आले नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.जेव्हा समन्स माझ्यापर्यंत पोहचेल, तेव्हा नक्की सांगेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पण त्याचवेळी संजय राऊत यांनी हे सूचक ट्विटही केले आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, करोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असे म्हणत उद्योगपतींनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 

नवी दिल्ली - वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतूक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेले, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले,'व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचे आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा,' असे आवाहन मोदी यांनी केले.मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हाने होती, संकटे पण आली. करोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या पण भारताने प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


नवी दिल्ली - राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी ‘फास्टॅग’ प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे ‘फास्टॅग’ मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे ‘फास्टॅग’ प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे. तरीही राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी? असा विचार करणारे बरेच आहेत. 

तुमच्या वाहनाला ‘फास्टॅग’ नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाही. एप्रिल, २०२१पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. जानेवारीपासून ‘फास्टॅग’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे.२०१७ पासूनच्या वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य होते.

आरटीओ रजिस्ट्रेशनवेळी ‘फास्टॅग’चा नंबर द्यावा लागत होता. २०१७ आधीच्या वाहनांना फास्टॅग नव्हता. यामुळे ही वाहने आजही ‘फास्टॅग’शिवाय धावत आहेत. ‘फास्टॅग’ खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे. एनएचएआयनुसार तुम्ही ‘फास्टॅग’ कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी २०० रुपये घेतले जातात. फास्टॅगवर कमीत कमी १०० रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्यासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस, सिटी युनियन बँकसारख्या बँका ‘फास्टॅग’ विकत आहेत.याशिवाय फास्टॅग एनएचएआय च्या सर्व टोल प्लाझा, पेटीएम, ईकॉमर्स वेबसाईटवटवरही उपलब्ध आहे. ऑनलाईन टॅग खरेदी करण्यासाठी माय फास्टॅग अ‍ॅपदेखील उपलब्ध आहे.

मुंबई - बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला सलमान खान आज त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी सलमानच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर जमू नका, असे आवाहन सलमानकडून करण्यात आले आहे. असे असले तरी रात्री काही चाहते सलमानला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर पोहचल्याचे पाहायला मिळाले.

दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर धूमधडाक्यात साजरा करतो. पण यंदा सलमान त्याचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सलमानने एक पत्रक प्रसिद्ध करुन चाहत्यांना आवाहन केले आहे. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला प्रचंड प्रेम देतात, मात्र यावर्षी कोरोनामुळे माझ्या घराच्या बाहेर गर्दी करु नका, सोशल डिस्टंन्सिंग पाळा आणि सुरक्षित राहा, मी यावेळी गॅलेक्सीत नाही, असेही सलमानने आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन काळात सलमानने लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग अवलंबला होता. यात लोकांनी घरी रहावे, फिजीकल डिस्टन्सिंग पाळावे यासाठी त्याने विविध माध्यमांचा वापर केला. लॉकडाऊननंतर सर्व प्रकारच्या शूटिंगना स्थगिती मिळाली. अशावेळी सलमानने ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट्स एसोसिएशन (एआईएसएए) शी संबंधित रोजंदारीवरील कामगारांना आर्थिक मदत करण्यापासून ते ३२ हजार श्रमिकांना त्याने मदतीचा हात दिला. सलमान निरंतरपणे कुठे मदत करु शकू यावर लक्ष ठेवून आहे.

अभिनेता सलमान खान आगामी 'राधे - युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाचे शुट ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले होते. यापूर्वी दिशा पाटनी आणि रणदीप हूडा यांची भूमिका असलेला 'राधे' हा चित्रपट यापूर्वी २२ मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता पण कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे त्याला उशीर झाला आहे.


मुंबई -  मराठीच्या मुद्यावर अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.मनसेच्या  महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेकडून विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण यामध्ये सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांनुसार भाषाही वापरणे बंधनकारक केले आहे, पण असे असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही, असा आक्षेप मनसेने घेतला आहे.पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा बहुंताश भाग हा मुंबईमध्ये येत असून स्थानिक मराठी भाषेचा वापर केला जात नाही. मराठी भाषेचा वापर सुरू करणेबाबत आग्रह आहे. पण, त्याची दखल घेतली जात नसून अजूनही संबंधित अधिकारी मुजोरी करत आहे, असा आरोपही मनसेने केला आहे.

पश्चिम रेल्वे विभागाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन प्रसिद्ध होणारी पत्रके, जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, 'मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही', असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे. लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा ॲमेझॉन आपल्या साइटवर नमूद केले आहे. शुक्रवारी ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतल्या गोडाऊनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  हल्लाबोल केला होता.  मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खट्याक स्टाईलने तोडफोड केली होती. त्यानंतर वसईमध्येही अ‍ॅमेझॉनच्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली होती.

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट इशारा दिला आहे. माफियांनी राज्य सोडून निघून जावे, अन्यथा त्यांना जमिनीत १० फूट खाली गाडू, अशा शब्दांत चौहान यांनी माफियांना इशारा दिला. होशंगाबाद जिल्ह्यातल्या बाबई विकासखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला. राज्य सोडा, अन्यथा परिणाम भोगा, असा इशाराच चौहान यांनी दिला. ‘आज काल मी अतिशय खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांविरुद्ध अभियान सुरू आहे. माफिया त्यांचा प्रभाव वापरून कुठे कुठे अवैधपणे कब्जा करत आहेत. काही ठिकाणी ड्रग माफिया सक्रिय आहेत. माफियांनो ऐका, मध्य प्रदेश सोडा, अन्यथा जमिनीत १० फूट खाली गाडेन. कुठेही कळणार नाही,’ असा इशारा चौहान यांनी माफियांना दिला.

मध्य प्रदेशात केवळ सुशासन चालेल, असे चौहान यांनी म्हटले. ‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची जयंती आपण सुशासन दिवस म्हणून साजरी करतो. जनतेला कोणत्याही अडचणींविना सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ मिळावा हाच आमच्यासाठी सुशासनाचा अर्थ आहे. इथे फन्ने खां चालणार नाही. इथे केवळ सुशासन चालेल,’ असे चौहान म्हणाले.


नवी दिल्ली - दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत शनिवारी माहिती दिली.दरवर्षी दहावी आणि बारावीच्या केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा (सीबीएसई) या फेब्रुवारीमध्ये सुरू होतात. मात्र, २०२१मधील बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये होतील असा कोणताही प्रस्ताव अद्याप मांडण्यात आला नाही. यासोबतच, बोर्ड परीक्षांशी संबंधित कामकाजालाही अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली होती.बोर्डाची परीक्षा कधी होणार याबाबत काहीही स्पष्टता नसल्यामुळे देशभरातील कित्येक शाळांनी ऑनलाईनच सराव परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शाळांना सराव परीक्षा, प्रात्यक्षिके आणि इतर गोष्टींचे नियोजनही करता येणार आहे.२०२१मधील सीबीएसई परीक्षा ऑनलाईन होईल का याबाबत विचारले असता, तसा काही विचार नसल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. बोर्डाची परीक्षा ही नेहमीप्रमाणे पेन आणि कागदाचा वापर करुनच द्यावी लागणार आहे

लखनऊ - दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून भारतीय किसान युनियन ठिय्या आंदोलनात आघाडीवर आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.अज्ञात व्यक्तीने फोनवरून टिकैत यांना किती हत्यारे पाहिजेत? असा प्रश्न विचारला. टिकैत यांनी प्रतिप्रश्न केला असता, तुम्हाला मारण्यासाठी किती हत्यारे घेवून यावे लागतील, असे उत्तर या व्यक्तीने दिले. एका मंदिर प्रकरणी राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. या प्रकरणात त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

मागील ३२ दिवसांपासून राकेश टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून टिकैत सतत माध्यमांपुढे असतात. धमकीचा फोन आल्यानंतर तत्काळ त्यांनी पोलितांत तक्रार दिली आहे. फोन नंबरचा शोध घेवून आरोपीला तत्काळ अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास इंदिरापुरम या क्षेत्रीय पोलीस ठाण्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

भाईंदर - भाईंदर पश्विमेच्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात चार खाजगी बस गाड्या अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत बसेस जळून पूर्णपणे खाक झाल्या. शनिवारी पहाटे सूर्योदयाच्या आधी ही घटना घडली. मागील आठवड्यात एका खाजगी बसमध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्या प्रकरणाचा संबंध लावत ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.भाईंदर पश्विम परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या उभ्या असतात. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चार बस गाड्यांना आग लावून पेटवून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीत आटोक्यात आणली. आग कुणी आणि का लावली? त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र मागील आठवड्यात एका खाजगी बसमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे ही आग लावण्याचे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तपास करणाऱ्या पोलिसांनी मात्र या दोन प्रकरणांचा संबंध असल्याच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही.

कल्याण - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी कॅफेच्या नावाखाली खुले आम हुक्का पार्लर सुरू होते. याबाबत कल्याण क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री ११ च्या सुमारास या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला.त्यावेळी शंभरहून अधिक तरुण-तरुणी त्याठिकाणी हुक्क्याच्या नशेमध्ये धुंद असल्याचे दिसून आले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या सर्वाना ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री ११ ते सकाळी ६वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत याठिकाणी कॅफेच्या नावाखाली खुले आम हुक्का पार्लर सुरू होते.याप्रकरणी क्राईम ब्रँचकडून इथल्या ग्राहकांसह संबंधित कॅफेमालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. याठिकाणी आढळलेले हुक्क्याचे साहित्य क्राईम ब्रँचने जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

कल्याण डोंबिवली शहरात आणखी काही हायप्रोफाइल भागात खुलेआमपणे अशा प्रकारचे हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याठिकाणी असणारा तरुण-तरुणींचा ओढा पाहता कल्याणातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या बड्या व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे हुक्का पार्लर सुरू राहणे अशक्य असून त्यावर वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त आहेत.

नवी मुंबई -  शहरात करोना रुग्णांत हळूहळू घट होत गेल्याने करोना उपचारासाठी व अलगीकरणासाठी पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयही सामान्य केले असून आता वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार होणार आहेत. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.नवीन रुग्ण संख्या शंभरच्या आत गेल्या काही दिवसांपाून स्थिरावल्याने १३ करोना काळजी केंद्रापैकी ९ केंद्रे पालिकेने अगोदरच बंद केली होती. आता उरलेल्या चारपैकी तीन केंद्रांत नव्याने प्रवेश बंद केला असून एकाच ठिकाणी उपचार केंद्रित केला आहे.मागील ९ महिन्यांपासून शहरात करोनाचा कहर सुरू आहे. मंगळवापर्यंत शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५०,६०६  इतकी झाली असून मृतांचा आकडा १०४२ इतका झाला आहे. तर ४८,५६३ जण करोनामुक्त झाले आहेत.

करोनाचे दिवसाला दोनशे ते तीनशे रुग्ण सापडत होते. आता ही परिस्थिती नियंत्रणात येत दिवसाला नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या घरात आली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळत करोनासाठी उपचार यंत्रणांची गरज कमी होत गेली. त्यामुळे काही केंद्रांमध्ये एकही रुग्ण शिल्लक न राहिल्याने ती बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. अगोदर ९ काळजी केंद्रे बंद केली होती व चारच ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र गेले काही दिवस उर्वरित चार केंद्रांपैकी तीन केंद्रांत एकही करोना रुग्ण न राहिल्याने आता तीही बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर, सीबीडी सेक्टर ३, आगरी कोळी भवन, सेक्टर ९ नेरुळ, सावली सेक्टर ५ नेरुळ, समाजमंदिर सेक्टर ५ ऐरोली, ईटीसी केंद्र वाशी, बहुउद्देशीय केंद्र ५ कोपरखैरणे तसेच इंडिया बुल तसेच लेवा पाटीदार समाज, निर्यातभवन व राधास्वामी सत्संगभवन येथील केंद्र बंद करण्यात आली आहेत. आता फक्त सिडको येथील प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या काळजी केंद्र व रुग्णालयात उपचार सुरू ठेवले असून डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होणार आहेत. घटती करोनाची संख्या ही शहरासाठी मोठा दिलासा आहे.

मुंबई - काही वर्षांपूर्वी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता ललित प्रभाकर याने कमी कालावधीत अनेकांच्या मनावर राज्य केले. तर, अनेकींच्या गळ्यातले ताईत झाला. त्यामुळे सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठलेला हा अभिनेता बऱ्याचदा रुपेरी पडद्यावरच पाहायला मिळतो. लवकरच ललितचा टर्री हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ललितने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केले आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरकडे पाहिल्यानंतर एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातून बिनधास्त, बेधडक असलेल्या तरुणाईची गोष्ट उलगडणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.टर्री या आगामी चित्रपटातून एक नवा विषय हाताळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटाविषयी अद्याप कोणत्याही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव ऐकून अनेकांना प्रश्न पडले आहेत. ‘टर्री’ म्हणजे नेमके काय? हा एकच प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.‘टर्री’ म्हणजे बेधडक जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण, जो बेफिकीर, बेधडक आहे. काहीही करण्याची धमक असलेला, टेररबाज वृत्तीचा, वेळप्रसंगी समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगी असलेला एखादा डॅशिंग तरुण म्हणजे ‘टर्री विशेषत: ग्रामीण भागात अशाप्रकारच्या बोलीभाषेतील शब्दाचा वापर केला जातो. एखादा बेधडक तरुण दिसला की, त्याला ‘टर्रीबाज’ म्हटले जाते. त्यामुळंच मराठीतील या धडाकेबाज ‘टर्री’ सिनेमाचे  मोशन पोस्टर प्रथमदर्शनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.


मुंबई - जुन्या मराठी चित्रपटातील काही गाणी अजरामर आहेत. 'गंमत जंमत' या चित्रपटातील 'उधळीत ये रे गुलाल सजणा' हे गाणे त्यापैकीच एक आहे. हे गाणे आजही पाय थिरकायला लावते. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी या गाण्यावर केलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहे. याच गाण्यावर त्या पुन्हा एकदा थिरकताना दिसणार आहेत.'सुख म्हणजे नक्की काय असते' या मालिकेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे एकत्र जमणार असून धमाल करणार आहेत. त्यामुळे वर्षा 'उधळीत ये रे...' या गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. तब्बल ३३ वर्षांनी त्या एखाद्या कलाकृतीत, त्यातल्याच पटकथेचा भाग म्हणून हे सादरीकरण करणार आहेत.

याबदद्ल त्या सांगतात, '३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आला. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केले नाही. मालिकेच्या विशेष भागाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू हिने हे नृत्य बसवले आहे'. त्यांना पुन्हा एकदा त्या गाण्यावर नृत्य करताना बघून त्यांचे चाहते सुखावणार आहेत. 

मुंबई - खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे नगरसेवक पद खिशात टाकणाऱ्या कांदिवलीतील राजपती यादव यांच्या जागी निवड झालेल्या एकनाथ हुंडारे यांच्याही जात प्रमाणपत्र व पडताळणी पत्रावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. या ओबीसींकरिता राखीव प्रभागात ‘मराठा’ असूनही ‘कुणबी’ जातीची कागदपत्रे दाखवून त्यांनी पद मिळवल्याचा आरोप आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीत कांदिवली प्रभाग क्रमांक २८ मधून निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांनी खोटय़ा कागदपत्रांचा आधार घेतल्याने जून, २०२०मध्ये त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आपोआप यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांच्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ पडली. परंतु हुंडारे यांनीही सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा आरोप कांदिवलीतील सामाजिक कार्यकर्ते रुपेश धनावडे यांनी केला आहे. त्यासंदर्भातील पुरावे त्यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केले आहेत. या प्रकरणी सध्या समितीसमोर सुनावणी सुरू आहे.हुंडारे यांनी अनुक्रमे पहिली ते पाचवी इंग्रजी, सहावी-सातवी मराठी तर आठवी ते दहावी गुजराथी अशा तीन माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतले. तीन वेगवेगळ्या माध्यमात शिकण्याचा हा प्रकार विरळाच आहे. विशेष म्हणजे हुंडारे यांनी उल्लेख केलेली मालाड नाईट हायस्कूल या शाळेची नोंदणी शासनाकडे नाही. हुंडारे यांच्या पुतणीच्या शाळेच्या दाखल्यावरही ‘हिंदू मराठा’ अशी जात नमूद आहे. हुंडारे यांनी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी ५० वर्षे गावी स्थायिक असून शेती करत असल्याचे सांगितले आहे. परंतु गेली अनेकवर्षे ते मुंबईत स्थायिक असून वाहतूक व्यवसायात आहेत,  असे धनावडे सांगतात. हुंडारे यांचे नातेवाईक, भावकी आणि गावातले हुंडारे आडनावाचे सर्व जातीने मराठे आहेत. मग हा एक अपवाद कसा. केवळ पदासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून कुणबी जात सिद्ध करण्यात आली असल्याने यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू नये,अशी विनंती धनावडे यांनी केली.

आजवर खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनेक उमेदवार निवडून आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे सत्य उघडकीस आले तरी न्यायालयाकडून स्थगिती आणून उमेदवार दोन ते तीन वर्षांचा कार्यकाल सहज पुढे नेतात. शिवाय निलंबनानंतरही पालिका त्या प्रतिनिधींवर कोणतीही कारवाई करत नाही.

पदासाठी खोटी कागदपत्रे जोडून राखीव प्रभागानुसार जात बदलणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. २००७ ते २०१२ या कालावधीत १२ उमेदवार, २०१२ ते २०१७ मध्ये ४ उमेदवार तर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७ उमेदवार जात प्रमाणपत्र अवैध असल्याने निलंबित करण्यात आले.

जळगाव -  दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला हादरा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर खानदेशात भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता खडसेंपाठोपाठ त्या घड्याळ हाती बांधणार, म्हणजेच घरवापसी करणार, की शिवबंधनात बांधल्या जाणार, याची उत्सुकता वाढली आहे. 

प्रा. डॉ. अस्मिता पाटील या जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. ‘मी अस्मिता नित्यानंद पाटील वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’ असे पत्र अस्मिता पाटील यांनी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे यांना लिहिले आहे.

अस्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीसोबत काही वर्ष काम केले आहे. नुकतेच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना घरवापसीची साद घातली होती, तिला प्रतिसाद देत अस्मिता पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर भाजपची खानदेशातील गळती वाढली आहे. त्यामुळे खडसेंच्या पावलावर त्या पाऊल टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे, अस्मिता पाटील यांच्यासमोर शिवसेनेचाही पर्याय उपलब्ध असल्याची पाचोरा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्या हाती घड्याळ बांधणार की शिवबंधन, याची उत्सुकता आहे.

एकीकडे जयंत पाटलांनी मेगाभरतीची घोषणा केली, तर दुसरीकडे अजित पवारांनीही थेट नेत्यांना साद घालून, राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


नाशिक - महापालिकेतील ५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार ड्रेस कोड लागू तर महिला कर्मचाऱ्यांना साडी , सलवार कुर्ता , ट्राऊजर पॅन्ट-कुर्ता आवश्यक, गडद रंगाचे, चित्र विचित्र नक्षीकाम केलेले पेहराव करण्यास बंदी, ड्रेस कोड बदलला तरी कामाचा दर्जा सुधारणार का असा सवाल केला जात आहे. 

मुंबई - माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. हा दिवस सुशासन दिवस साजरा केला जातो. भाजप शुक्रवारी देशातील १९ ठिकाणांहून अधिक ठिकाणी कार्यक्रम साजरा करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ९ करोड शेतकऱ्यांना १८००० करोड रुपये सरळ बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. २५ डिसेंबरला एका क्लीकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होतील असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी सरकारचे कायदे समजून घ्यावेत. आम्ही खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत. सरकार सर्वांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होणारेय. आज दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बटन दाबून शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता हस्तांतरित करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणारेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. ३ हप्त्यांत २ हजार रुपये दर ४ महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा केले जातात. 


मुंबई -  २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहेत. रात्री एखादी व्यक्ती विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास मुंबई पोलिसांकडून त्या व्यक्तीचे वाहन जप्त केले जाणार आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर मात्र ही कारवाई होणार नाही, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. “रात्रीच्या संचारबंदी आदेशाचे कठोर पालन केले जाईल, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवली जाईल. नाकाबंदीमध्येही वाढ केली जाणार आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळता रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्याचं वाहन जप्त केले जाईल. नागरिकांनी रात्री रस्त्यावर येऊ नये आणि घरातूनच नववर्षाचे स्वागत करावे”, असे मुंबई पोलीस उपायुक्त एस. चैतन्य म्हणाले.
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'गंगूबाई कठियावाडी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईची भूमिका साकारत आहे. भूमिकेतील तिचा लूक देखील समोर आला होता. मात्र आता चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवले जाण्याची शक्यता आहे. गंगूबाईच्या कुटुंबाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे.

संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी 'गंगूबाई कठियावाडी' या चित्रपटातची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या 'गंगूबाई' यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे. यावर गंगूबाई यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन झैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात २२ डिसेंबरला खटला दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ७ जानेवारी २०२१ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.


नवी दिल्ली  - राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. गुरजीत सिंग निज्जर असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून पुणे येथील एका प्रकरणात त्याचा सहभाग होता. मात्र, तो परदेशात लपून बसला होता. महाराष्ट्रातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.गुरजीत निज्जर हा मुळचा अमृतसरमधील अजनाला येथील आहे. २०१७ साली तो भारतातून पळून गेला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला फरारी घोषित केले होते. पुढील तपासासाठी त्याला मुंबईलाही आणण्यात येणार आहे. पुणे खलिस्तानी प्रकरणात सहभाही असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक केली.एनआयएने २०१९ साली निज्जर आणि दुसरा एक आरोपी हरपाल सिंगवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला होता. निज्जर हा मुख्य गुन्हेगार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना खलिस्तानी चळवळीत सहभागी होण्यासाठी भडकावत असे. भारतात खलिस्तानी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी तो कार्यरत होता.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिनत सिंग यांची हत्या करणारा दहशतवादी जगत सिंग हावरा याची स्तुती करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट, ऑपरेशन ब्लू स्टार, खलिस्तानी चळवळीशी संबधीत पोस्ट आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकत असे. त्याद्वारे तरुणांना दहशवादाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न निज्जरचा होता.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गुपकर अलायन्सला चांगला पाठिंबा मिळाला. त्यानंतर बुधवारी पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर सरकारवरही त्यांनी टीका केली. लढायचे असेल तर राजकीय मार्गाने लढा, ईडीच्या माध्यमातून नको, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला आपल्या हातातील खेणे बनवले आहे. माझ्याबरोबर लढायचं असेल तर राजकीय मार्गाने लढा, ईडीच्या माध्यमातून लढू नका. माझ्या जवळ लपवण्यासाठी काहीही नाही. दहशतवादाला निधी पुरवणाच्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांना यश आले नाही. आम्ही फक्त ६० जागांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्यातील ३० जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपा आत्ता घाबरली असून विधानसभा निवडणुका इतक्या लवकर घेणार नाही, असे त्या म्हणाल्या.

पीडीपीच्या नेत्यांवर खोटे भ्रष्टाराचाराचे आरोप लावण्यात येत आहेत. अंजूम फाजली आणि अल्ताफ या नेत्यांच्या घरावर छापे मारण्यात आले. माजी मंत्री नईम अख्तर यांना ताब्यात घेतले. मात्र, मी जम्मू काश्मीरच्या नेत्यांसाठी आवाज उठवत राहील. काश्मीरच्या जनतेला माझ्या आवाजाची गरज आहे, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.भाजपा काश्मीरातून पीडीपीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने अफरातफर केली. अनेक उमेदवारांना फोडले. पश्चिम बंगालमध्ये जे चालू आहे, तेच काश्मिरात करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप तोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोलकाता - गेल्या काही महिन्यांपासू तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये घमासान सुरू आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.पश्चिम बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, भाजपा-तृणमूल काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर पलटवार केला.

एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, बंगालची भूमी जीवना स्त्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावे की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असे व्हायला नको. आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन.आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही,असे म्हणत ममतांनी भाजपावर टीका केली.राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा पश्चिम बंगालमधून देण्यात आला. बंगाल सर्वोकृष्टतेला महत्त्व देतो. आम्ही बंगालला गुजरातसारखे करण्याची सहमती देऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. 

बारामती - लॉकडाऊननंतर लाल परीने आता हळूहळू व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. बारामती आगारातून पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून एसटीचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केली.प्रवाशांच्या सोयीसाठी आता बारामती आगारातून कोकण दर्शन, अष्टविनायक दर्शन, गाणगापूर दर्शनासाठी डिसेंबरअखेर गाड्या सुरू होणार आहेत. बारामती आगारातून कोकण दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या साधी बस सुरू करण्यात आली आहे. ही बस बारामती आगारातून सकाळी सात वाजता सुटून रात्री अकराला परतणार आहे. ही बस कोयना नगर डॅम गार्डन, डेरवन, संगमेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी थिबा पॅलेस, सुरूबन बीच, भगवती किल्ला, मारलेश्वर आदी पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. २६ डिसेंबरपासून ही बस सेवा सुरू होणार असून प्रती प्रवासी १ हजार २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे

मुंबई -  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारीला गर्दी करू नका. अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कोरेगाव भीमा विजय स्तंभाला ऐतिहासिक अस महत्व आहे. पेशवा आणि इंग्रजांच्या लढाई दरम्यान तत्कालीन महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढाई लढून पेशव्यांचा पराजय केला होता. विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्यामुळे आंबेडकरी जनता दरवर्षी एक जानेवारीला लाखोंच्या संख्येने पुणे येथील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला भेट देऊन अभिवादन करते. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी दोन गटात दंगलही झाली होती. यामुळे यादिवशी विशेष असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो.

यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध घालण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल लावणे यावरही निर्बंध घालण्यात आले असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या सूचनांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी राज्याच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग,  आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबधित महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

मुंबई - लंडनहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे. पुढचा धोका ओळखून जागरूक राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असून तशा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.

मुंबईत रविवारपासून ब्रिटनहून तब्बल ५९१ जण परतले आहेत. मात्र आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतील १८७ आणि  राज्यातील १६७ तर परराज्यातल्या २३६ प्रवाशांचा समावेश आहे. यातील २९९ जणांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर राज्यांतील प्रवासी दुसऱ्या विमानाने आपापल्या राज्यात परतले आहेत.

दरम्यान, ब्रिटनहून भारतात रविवारपासून परतलेले तब्बल २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये थैमान घातलेल्या नव्या कोरोनाची दहशत भारतातही पसरली आहे. लंडनहून दिल्लीत परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. त्यापाठोपाठ अमृतसरमध्ये आठ जण, अहमदाबादेत पाच जण तर चेन्नईत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे ब्रिटनहून परतेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.


श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक सुरू होती. यानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. हे दोनही दहशतवादी स्थानिक रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचा इशारा दिला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचीही मदत घेतली. अखेर कुटुंबीयांच्या आवाहनानंतर दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. कुलगामच्या तोंगडौनू भागामध्ये ही चकमक घडली.हे दोघे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली.यापूर्वी १७ डिसेंबरला करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले होते. तर दुसरीकडे, याच दिवशी पंजाबमधील अटारी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

मुंबई - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. त्या बैठकीत राज्यात २२ जानेवारीपासून मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहुल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आज २६ वा दिवस आहे. यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार केला आहे. यासोबतच २५ ते २७ डिसेंबरपर्यंत हरियाणाच्या सर्व महामार्गांवरील टोल वसूली करु देणार नसल्याचेही आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीच्या विविध सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे ५०० कृषी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. तसेच, कित्येक विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे, की २३ डिसेंबरला दुपारचे जेवण टाळून शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवावा. यादिवशी शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच शेतकरी दिन साजरा करणार आहेत.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. "मला नक्की तारीख किंवा वेळ माहिती नाही. मात्र, उद्या किंवा परवा तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करतील" असे शाहांनी रविवारी स्पष्ट केले.

दिल्लीमध्ये सुरू असलेले आंदोलन लवकरात लवकर संपावे यासाठी सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यापूर्वी कृषी कायद्यांमध्ये केलेल्या बदलांनंतर तुमच्या याबाबत काय अडचणी आहेत, याबाबत चर्चा करण्यासाठी एक ठराविक तारीख निश्चित करुन आम्हाला कळवावी अशा आशयाचे पत्र सरकारने कृषी संघटनांना पाठवले आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोटेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले  


मुंबई -
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संपुर्ण राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विविध समाजहिताच्या आणी जनहिताच्या योजना राबवल्या जात आहेत.दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर करून राज्यातील नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले असता यास प्रतिसाद देत मुंबईतील  राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची जी कमतरता सध्याच्या घडीला आहे,ती भरून काढण्यासाठी गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक २० डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रसंगी जिल्हा निरक्षक ताज्जूदिन भाई जिल्ह्याअध्यक्ष अजित रावराणे महिला जिल्हा अध्यक्षा आरती ताई साळवी तालुका अध्यक्ष अजय विचारे,महिला तालुका अध्यक्षा हर्षदा आयरे, सुनीता निवळे सर्व वॉर्डचे अध्यक्ष सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबई प्रदेशचे  चिंतामणी द्विवेदी सुभाष मालू  पक्षाचे जेष्ठ नेते यशवंत देसाई उपस्थित होते. शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

नाशिक - शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे बाळासाहेब सानप सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, थेट प्रदेश पातळीवरूनच सानप यांना पक्षप्रवेशाच्या पायघड्या घालण्यात आल्याने भाजप नाशिकमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बुलडाणा - केंद्र व राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व केंद्राने पारित केलेल्या शेतकरी कायदे रद्द करावे, या व इतर मागण्यांसाठी बहुजन वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गुरुवारी १७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मुख्यत: भारतीय रेल्वेचा वापर केला जातो. मात्र, केंद्र सरकारकडून या भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. खासगीकरणामुळे शेतमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होणार आहे. परिणामी महागाईत वाढ होऊन सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा, दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी या निवदेनाच्या माध्यमातून वंचित आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचीही भूमिका प्रामाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश काढण्यात यावा. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधाभूत किंमत मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतुद करावी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली होती.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरला. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राहुल गांधी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहले होते. आता पत्र लिहणाऱ्या त्या नेत्यांशी सोनिया गांधी स्वत: चर्चा केल्याचे समजते. 

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही काँगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिले गेले असल्याचे मत व्यक्त केले होते. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.काँग्रेसचे इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गाधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील ९९.९ टक्के लोकांची इच्छा आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.शिवाय सामान्य दिवसाप्रमाणेच व्यवस्था होती. सुरक्षा व्यवस्था देखील नेहमीप्रमाणेच होती. यावेळी कोणता विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुरु तेगबहादुर यांच्या त्यागाचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) घोटाळ्या प्रकरणात पीएमएलएअंतर्गत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची ११.८६ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली. संलग्न मालमत्तांमध्ये तीन निवासी घरे समाविष्ट आहेत. यामध्ये श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावरील घराचा समावेश आहे.हे प्रकरण जेकेसीएकडून २००१ ते २०११ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्यात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आलेल्या निधीच्या गैरवापराचे आहे. जेकेसीएला २००५-२००६ ते २०११-२०१२ या आर्थिक वर्षात बीसीसीआयकडून ९४.०६ कोटी रुपये देण्यात आले होते.केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) २०१८ मध्ये अब्दुल्ला यांची पहिल्यांदा चौकशी केली होती. सीबीआयनेही अब्दुल्ला यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अब्दुल्लांची चौकशी सुरू केली. राज्य क्रिकेट असोसिएशनमधील ११३ कोटींच्या घोटाळ्याबाबत ईडीने अब्दुल्लांची अनेकदा चौकशी केली आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांच्याविरोधात जेकेसीएन निधीतून ४३.६९ कोटींचा गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह इतरांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते.निवेदनात म्हटले आहे की, 'जेकेसीएच्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून हे निधी घेण्यात आले. जेकेसीएच्या नावावर अनेक खाती उघडली गेली, ज्यात निधी हस्तांतरित करण्यात आला. अस्तित्त्वात असलेल्या बँक खात्यांसह अशी अन्य बँक खाती नंतर जेकेसीएच्या निधीच्या गैरव्यवहारासाठी वापरली जात होती. अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त एफआयआरमध्ये जेकेसीएचे सरचिटणीस सलीम खान, कोषाध्यक्ष मोहम्मद अहसान मिर्झा आणि जम्मू-काश्मीर बँकेचे कार्यकारी बशीर अहमद मनाशीर यांची नावे आहेत. या लोकांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.

राँची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अडचणीत आले आहेत. हेमंत सोरेन यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही सर्वात मोठी अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या एका महिलेने हेमंत सोरेनवर बलात्काराचे कथित आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजपाने सोरेन यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढेच नाही बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील भाजपाने केली आहे.

भाजपाने यावर म्हटले आहे की, ही चौकशी यासाठी महत्त्वाची आहे कारण, देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की, एका राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीपदावर असताना एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, तेव्हा सत्य जे काही असेल ते देशासमोर येणे गरजेचे आहे.तर दुसरीकडे झारखंड मुक्ति मोर्चा म्हणजेच जेएमएमने म्हटले आहे की, भाजप डर्टी पॉलिटिक्स करत आहे.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आणि सुरेश नागरे या इसमाविरोधात २०१३ साली कोर्टात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर या महिलेने लग्न आणि केस लढू शकत नसल्याचे कारण देत ही केस मागे घेतली होती.मात्र आता याच महिलेने ८ डिसेंबर २०२० ला मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देत हेमंत सोरेन विरोधात गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबई - महानगरपालिका किंवा मुंबई शेजारच्या शहरांमधील पालिकेत नोकरी लावून देतो म्हणून १०० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असून दुसरा आरोपी हा मुंबई महानगरपालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. याबरोबरच तिसरी महिला आरोपी ही मुंबई पोलीस खात्यातील सेवानिवृत्त अंमलदार असल्याचे समोर आलेला आहे. मुंबईत अशा प्रकारची टोळी सक्रिय असल्याचे समोर आले हते. त्यानंतर मालमत्ता कक्ष पोलिसांनी या संदर्भातील पीडित व्यक्तींना संपर्क साधून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन ही कारवाई केली आहे. आरोपींनी पीडितांचा विश्वास बसावा म्हणून मुंबई महानगरपालिकेचा बनावट नियुक्तीपत्र वैद्यकीय तपासणी केल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन प्रत्येकी तीन लाख पन्नास हजार रुपये घेतले होते. आतापर्यंत या आरोपींनी १०० अधिक तरुण-तरुणींना गाठून त्यांना महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन प्रत्येकाकडून लाखो रुपये उकळले आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget