February 2021

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशाच्या राजकारणाला रणनीतीशी जोडणारे प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी टि्वट करत राज्यात तृणमूल काँग्रेसच सत्तेत येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतातील लोकशाहीची मुख्य लढाई ही पश्चिम बंगालमध्ये लढली जात आहे. पश्चिम बंगालमधील जनता आपला कौल देण्यासाठी तयार आहे, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात प्रचार तज्ञ प्रशांत किशोर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता ते तृणमूल काँग्रेसच्या रणनीतिकारांची भूमिका पार पाडत आहेत. बंगालला फक्त आपली मुलगी हवी आहे, असे ते म्हणाले.आंध्रप्रेदशमधील निवडणुकीत जगनमोहन रेड्डींसाठी प्रशांत किशोर यांनी काम केले होते. यामध्ये वायएसआर काँग्रेसने विधानसभेतील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला होता. तर, लोकसभेतही २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. प्रशांत किशोर यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. त्यांना पडद्यामागील घडामोडींसाठी ओळखले जाते. त्यांनी नितीश आणि लालूंसाठीही काम करताना त्यांना निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले होते.

शिमला - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल शनिवारी शिमला येथे पोहोचले. शिमलाच्या प्रसिद्ध कालीबारी मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल यांनी आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच गोयल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ८ टप्प्यात होत आहेत. मागील वेळी पश्चिम बंगालमध्ये ७ टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यावेळी आठ टप्प्यात होत आहेत. तर मग यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे. इतका राग कशाचा? असा सवाल त्यांनी केला.निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर निवडणुका किती टप्प्यात घेता येतील, हे ठरले. त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे, असे गोयल म्हणाले.पश्चिम बंगालमधील ममतांचे सरकार बदलणे निश्चित आहे. तेथे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांनी आपले आयुष्य मोठ्या संकटात घालवले आहे, असेही ते म्हणाले.भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेप्रमाणे जाहीर केल्याचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठीच निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा आरोपही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला.


बंगळुरू - भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचा PSLV-C51/Amazonia-1 हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे झेपावला. रविवार सकाळी १० वाजून २४ मिनिटींनी उपग्रह सतीश धवन स्पेस सेंटरवरून अवकाशात झेपावला. ब्राझीलचा अॅमेझॉनिया हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी ब्राझीलच्या अवकाश कार्यक्रमाचे प्रमुख आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीही उपस्थित होते. उपग्रहाचे तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणही सामान्यपणे झाले.पोलार सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल श्रेणीतील इस्रोची ही ५३ वी मोहिम आहे. या मोहिमेतून अॅमेझॉनिया हा ब्राझीलचा उपग्रह अवकशात सोडण्यात आला. सोबतच इतर १८ लहान उपग्रहांचाही यात समावेश आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून ही मोहिम राबविण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू असून तेथून प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ही मोहिम सकाळी साडेदहा वाजता राबविण्यात आली. मात्र, हवामानाची स्थिती पाहून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात होता. हवामान स्वच्छ असल्याने ठरवलेल्या वेळीच उड्डाण झाले.अॅमेझॉनिया ही इस्त्रोची व्यावसायिक मोहीम आहे. ब्राझीलचा अॅमेझोनिया उपग्रह रिमोट सेन्सिंगची म्हणजेच पृथ्वीच्या भूपृष्ठाची माहिती पुरवणार आहे. हा उपग्रह अॅमेझॉन जंगलातील वृक्ष तोडीवर निगराणी ठेवणार असून याचा देशातील शेती क्षेत्रातालाही फायदा होणार आहे. मागील काही दिवसांत अॅमेझॉन जंगलातील वृक्षतोड वाढली असून त्याचा पर्यावरणाला फटका बसला आहे. अॅमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत.

नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेस सुरूवात केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवार म्हणजेच १ मार्चपासून प्रचार मोहिमेचा नारळ फोडणार आहेत. आसाम विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला होणार आहे. तर ६ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा, काँग्रेसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. प्रियंका गांधी प्रचाराच्या पहिल्या दिवशी आसाम दौऱ्यावर जाणार असून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्चला प्रियंका गांधी तेजपूर येथे सभेला संबोधित करणार आहेत. आसाम बरोबरच आणखी एका राज्यात त्या प्रचार मोहीम सुरू करणार आहेत.

केरळच्या काँग्रेस महासचिवांनी पत्र लिहून प्रियंका गांधींनी प्रचार मोहिमेच्या तारखा मागितल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नुकताच आसाम दौरा केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा उठवले, असे ते म्हणाले. सीएए कायद्याविरोधी उपरणेही राहुल गांधी यांनी गळ्यात घातले होते. आसाम कराराचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. काहीही होऊ, सीएएला विरोध कायम राहील, असे राहुल गांधी म्हणाले.

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. आसाममध्ये १२६ विधानसभा मतदारसंघासाठी तीन टप्प्यात मतदान होणार. पहिला टप्पा २७ मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला पार पडेल. सध्या आसाममध्ये भाजपा सत्तेत असून काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रँटशी आघाडी केली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांचा काळाबाजार सांभाळणाऱ्या मृत इक्बाल मिरचीची पत्नी हाजरा आणि दोन मुलांना ईडीच्या विशेष न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याबरोबरच या तिघांच्या नावावर असलेल्या मुंबई, खंडाळा, पाचगणी येथील संपत्तीवर टाच आणण्याचे आदेशही विशेष न्यायालयाने दिले आहेत.मृत इकबाल मिरची याची पत्नी व मुलांच्या नावावर खंडाळा येथे ६ एकर जमीन असून , व्हाइट वॉटर नावाने ही जमीन विकत घेण्यात आलेली आहे. त्याचा मालकी हक्क इकबाल मिरचीच्या मुलांकडे आहे. वरळीतील साहिल बंगलोवर इकबाल मिरचीची पत्नी आणि मुलांचा मालकी हक्क आहे. या बरोबरच वरळीतील तीन मजली समुद्र महलवरदेखील ईडीकडून टाच आणण्यात येणार आहे. भायखळा रोशन टॉकीज , जुहू तारा रोडवरील मिनाज हॉटेल , पाचगणी मधला एक बंगला आणि लंडनमधील संपत्तीवर ईडी कडून लवकर टाच आणण्यात येणार आहे.डीएचएफएलचे प्रमोटर धीरज वाधवान, कपिल वाधवाण व मृत ईकबाल मिरचीच्या कुटुंबियांकडून मनी लाँड्ररिंग संदर्भात व्यवहाराचा तपास ईडी करत होती. खंडाळा, मुंबई, पाचगणी येथील संपत्तीची माहिती विशेष न्यायालयात ईडीकडून देण्यात आलेली होती. त्यावर जप्तीची कारवाई करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आहेत.

मुंबई - मराठी भाषा आपल्या नसानसांत भिनली आहे. 'मी मराठी, माझी मराठी'चा बाणा जपण्यासाठी दैनंदिन व्यवहारात, नव तंत्रज्ञानात, माध्यमात आणि समाज माध्यमात मराठी भाषेचा सर्वाधिक वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच वर्षभरात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार, असे ठाम मतही त्यांनी यावेळी मांडले. मराठी भाषा गौरव दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन ही केले आहे.मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृताते ही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी "मी मराठी, माझी मराठी!' असा बाणा जपू या! त्यासाठी मराठीत विचार करु या, मराठीत बोलू या, व्यक्त होऊ या. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या, मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वीकार करू या, मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करू या. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या! असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशातून केले आहे.

मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. मग पाहू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ? या आपल्या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा संदेशात केला आहे.

मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्यावर चार लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. १२ फेब्रुवारीला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्यामुळे ही कारवाई झाल्याचे तर्क लढवले जात आहेत.भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परळ येथील गांधी रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. ५ जुलै २०१६ ला एका प्रकरणात ४ लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले आहे. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर २००६ ते ५ जुलै २०१६ या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबीकडून खुली चौकशीही करण्यात आली होती. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आता लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत. राठोडच पूजा चव्हाण हिचा हत्यारा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.राज्य सरकारमधील मंत्री गुन्ह्यांवर गुन्हे करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या विरोधात पुरावे असूनही त्यांना शिक्षा होत नाही. मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील नेते मंत्र्यांना अभय देण्याचे काम करत असल्यााचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

मुंबई - बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २४ फेब्रुवारीला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. टीझरमधील आलियाचा हटके लूक, तिचा अभिनय या सर्वाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अजय लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.चित्रपटातील अजयच्या सीनसाठी एक मोठा सेट क्रिएट करण्यात आला आहे. अजय आणि संजय लीला भन्साळी यांनी १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता जवळपास २२ वर्षांनंतर ते पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केला. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटले आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकलले.कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.

मुंबई -  बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातला वाद वाढतच चालला आहे. याप्रकरणी आता क्राइम ब्रांचने हृतिक रोशनला समन्स बजावला आहे. याप्रकरणी आता कंगनाने पुन्हा एकदा हृतिक रोशनला लक्ष्य केले असून त्याच्यावर बोचरी टीका केली आहे. तिचे हे वादग्रस्त ट्वीट आता चांगलच व्हायरल होताना दिसत आहे.बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील प्रेमसंबंध प्रकरण आता जुने झाले आहे. पण दोघांत प्रेमसंबंध असल्याची बाब हृतिकने नेहमी नाकारली आहे. तर दुसरीकडे कंगना रणौतने प्रेमप्रकरण असल्याचा दावा केला होता. यामुळे बॉलीवूड वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर हृतिकने असा दावा केला होता की, कंगना ज्या ई मेल आयडी शी बोलत होती. तो बनावट असल्याचा दावा हृतिकने केला होता. याप्रकरणी त्याने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.तर कंगनाचे मते, संबंधित मेल आयडी स्वतः हृतिकने तिला दिला होता. ते दोघेही २०१४ पासून यावर बोलत होते. त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले त्यानंतर कंगनाने अनेकदा हृतिक रोशनवर विविध प्रकारचे आरोप केले आहे. तिने बऱ्याच मुलाखतीत हृतिक रोशनचा अपमान करणारे शब्द वापरले आहेत. आता कंगनाने पुन्हा एकदा हृतिकला लक्ष्य केले आहे.तिने एक ट्वीट करून हृतिक रोशनला अपशब्द वापरले आहेत. यावेळी हृतिकला समन्स बजावल्याची बातमीला क्वोट करताना कंगनाने लिहिले की, 'जग कुठून कुठे पोहचले, तरी माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून तिथेच आहे. त्याच वळणावर आहे, ती पुन्हा फिरून येणार नाही.' तिचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. हृतिक रोशनने कंगना राणौतसोबत काइट्स आणि क्रिश- 3 हे दोन चित्रपट केले आहेत.  हे चित्रपट करेपर्यंत दोघांत सर्वकाही ठिक होते, पण एका मुलाखतीत कंगनाने हृतिक रोशनसोबत सुरू असलेल्या संबंधाची माहिती दिली. तिने हृतिक रोशन हा आपला जुना बॉयफ्रेन्ड असल्याची माहिती दिली. या दोन चित्रपटाच्या काळात आम्ही दोघांनी एकमेकांना डेट केल्याची माहितीही तिने दिली. यानंतर त्यांच्या दोघांतील वादाला सुरुवात झाली.

उरण -  ३५ वर्षे लढा देऊनही  पुनर्वसनाची मागणी पूर्ण होत नसल्याने जेएनपीटी बंदरामुळे विस्थापित झालेले वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी शुक्रवारी सुमद्रात आंदोलन करीत जेएनपीटीची जहाजे अडविली. जेएनपीटीने १७ हेक्टर जमीनीवर पुनर्वसन करावे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.२६ जानेवारी रोजीच हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र महिनाभरात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने ते स्थगित करण्यात आले होते. मात्र यानंतरही जेएनपीटी भूमिकेवर ठाम राहिल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी सुमद्रात व रस्त्यावर दोन्ही ठिकाणी आंदोलन केले. शुक्रवारी पहाटेच ग्रामस्थ आपल्या होड्यांसह समुद्रात जात जेएनपीटीची मालवाहूजहाजांचा मार्ग रोखला. दुपारपर्यंत एकही जहाज जेएनपीटीत येऊ दिले नाही. दरम्यान पोलिसांनी गावातील व सुमद्रातील आंदोलकांना ताब्यात घेत जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये स्थलांतरित केले. त्यानंतर जेएनपीटीचे उपाअध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चा झाली. त्यात पुर्नवसनाचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले नसून सुरूच राहणार आहे. गुरुवारी जेएनपीटी प्रशासनाशी याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.सुमद्रातील आंदोलनाचा मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलवाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी जलवाहतूक बंद ठेवल्याने मोरा येथून मुंबईत जाणाऱ्या अनेक कामगारांना परत फिरावे लागले.
मीरा भाईंदर - येथील भाईंदर पश्चिम भागात तीन नराधमांनी मिळून १७ वर्षीय पीडित मुलींवर गँगरेप केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.भाईंदर पश्चिमेला असलेला भागात एका १७ वर्षीय पीडित मुलीला ओळखीच्या मुलाने त्या पीडित मुलीला चार दिवसांपूर्वी घरी बोलावून घेतले. तसेच तिच्यावर अत्याचार करत तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक गँगरेप केला. तसेच कोणाला याबाबत सांगशील तर याद राख अशी धमकी दिली. याप्रकरणी २५ फेब्रुवारीला भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच २० ते २२ वयोगट असलेले दोन आरोपी आणि ५० वर्ष वयाचा एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्कार गँगरेप प्रकरणी भादवी ३७६ व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या तिन्ही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले हे करीत आहेत.


नवी दिल्ली - देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे वस्तू आणि सेवा कराच्या तरतुदींमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांचा फेरविचार करण्याच्या मागणीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशननेही आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

१ भारत बंदमध्ये देशातील ४० हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार असल्याने बहुतांश बाजारपेठा बंद असतील. मात्र, स्थानिक स्तरावर याची अंमलबजावणी कितपत होणार, याबद्दल अद्याप साशंकता आहे.

२ देशातील अनेक भागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. AITWA ने वाहतूक कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले आहे.

३ बुकिंग आणि बीलासंदर्भातील व्यवहार ठप्प होऊ शकतात.

४ चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अ‍ॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदचे समर्थन केले आहे. त्यामुळे या सेवांवर परिणाम होईल.

५ CAIT चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

६ तसेच GST मधील त्रुटींचा विरोध करण्यासाठी कोणताही व्यापारी आज पोर्टलवर लॉग इन करणार नाही.

या सेवांवर परिणाम होणार नाही

१ भारत बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाज्यांचा पुरवठा सुरळीत राहील.

२ बँकिंग सेवेवरही या बंदचा कोणता परिणाम होणार नाही.

जीएसटी परिषदेने आपल्या हितासाठी जीएसटीला विकृत रुप दिल्यामुळे ही प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप खंडेलवाल यांनी केलाय. जीएसटीच्या मुळ स्वरुपाशी छेडछाड करण्यात आलीय. सर्व राज्य सरकारांना केवळ आपल्या वैयक्तीक स्वार्थ साधायचा आहे. त्यांना कर प्रणालीच्या सुसुत्रीकरणाची कोणतीही काळजी नाही. व्यापारी व्यापार करण्याऐवजी जीएसटीचे पालन करण्यातच गुंतलेले आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले नाही. त्यामुळे जीएसटीच्या वर्तमान स्वरुपाबाबत पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे खंडेलवाल म्हणाले. ‘कॅट’ने वारंवार उपस्थित केलेल्या मुद्यांची जीएसटी परिषदेने दखल घेतली नाही. त्यामुळे आपले म्हणने देशासमोर मांडण्यासाठी भारत व्यापार बंदचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवी दिल्ली - केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. बंगालमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सिंह राज्यातील बालुरघाट भागाचा दौरा करणार आहेत. याठिकाणी एका रोड शोचे आयोजन करण्यात आले असून राजनाथ सिंह यात सहभागी होणार आहेत.२९४ विधानसभा जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र, त्याआधीच राजकीय पक्षांनी सभा, रॅली, रोड शो, जनसंपर्क अभियानाद्वारे प्रचाराचा सपाटा लावला आहे.काल(गुरुवार) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनार बांगला अभियानाला सुरूवात केली. सुमारे २ कोटी नागरिकांच्या सुचना मागवून जाहीरनामा तयार करण्यात येईल, असे नड्डा म्हणाले. दरम्यान, बंगालमध्ये भाजपाकडून परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, यास प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.बंगाल शेजारील आसाम राज्यातही येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (गुरुवार) आसाम दौऱ्यावर गेले होते. राज्यातील नागोन आणि कारबी आंगलोंग जिल्ह्यात त्यांची जाहीर सभा झाल्या. आसाममध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. समाजसुधारक आणि संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मगावाला गृहमंत्र्यांनी भेट दिली.

पुद्दुचेरी - केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नारायणसामी सरकार कोसळल्यानंतर नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी गृह मंत्रालयाकडे केली होती. पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आज राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अधिसूचना जारी करण्यात आली.विधानसभेत २२ फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारायणसामी यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा स्वीकारला. आमदारांनी राजीमाना दिल्याने काँग्रेस सरकारकडे ११ तर विरोधकांकडे १४ असे संख्याबळ होते.काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूबरोबरच पुदुच्चेरीचाही दौरा केला. पुद्दुचेरीतील कारिकल जिल्ह्यातील NH45-A या ५६ कि.मी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. सुमारे २ हजार ४२६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. याच जिल्ह्यात मोदी मेडिकल कॉलेजच्या इमारतीचीही पायाभरणी केली. हा प्रकल्प सुमारे ४९१ कोटी रुपयांचा आहे. पुद्दुचेरीत एका बंदराच्या कामाचा शुभारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे.पुद्दुचेरी हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. ३० निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून ३३ आमदारांची विधानसभा आहे. भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले आहे. पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने ३ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा १६ आहे.

तिरुवनन्तपूरम - गुरुवारी रात्री मुंबईत स्फोटके सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ११७ जिलेटिन स्टिक आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे. चेन्नईतील एका महिलेकडूनही स्फोटके ताब्यात घेण्यात आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सीट खाली स्फोटकांचा साठा सापडला आहे. ही महिला चेन्नईहून थालास्सेरीकडे जात होती. मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेनेच ही स्फोटके आणली होती का? याबाबतच्या वृत्ताला कुणीही दुजोरा दिलेला नाही. ही स्फोटके या महिलेने आणली की इतर कुणी तिच्या सीट खाली ठेवली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहे. चौकशीअंतीच पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईत काल मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये २० जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.

अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी ८ ते १० पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत.

नवी दिल्ली - टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मुळकच्या याचिकेवर दिल्लीतील पटियाला न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने शंतनू मुळूकला ८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आता शंतनूला दिलासा मिळाला आहे.औरंगाबाद खंडपीठाकडून मिळालेल्या अटकपूर्व जामीनाची मुदत उद्या (२६ फेब्रुवारी)ला संपत आहे. त्याआधी पुन्हा अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता. त्यानुसार शंतनूला आता ८ मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. शेतकरी आंदोनाबाबत टुलकिटद्वारे देशाची प्रतिमा मलिन होईल, अशी खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुळूकवर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी बंगळुरूतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रवी आणि शंतनू मुळूक या दोघांची एकत्र चौकशी केली. दोघांनीही शेतकरी आंदोलनाच्या आधी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली होती. ही ऑनलाइन कॉन्फरन्स 'पोएटिक जस्टिस फाऊंडेशन' या संस्थेने आयोजित केली होती. या संघटनेचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा असून त्यांच्याशी दिशा रवी, आणि शंतनू मुळूक यांचे संबध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.मंगळवारी दिल्लीतील न्यायालायने दिशा रवीला जामीन मंजूर केला. शेतकरी आंदोलासंबंधी टुलकिट प्रसारित केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. ३ फेब्रुवारीला स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गने हे टुलकिट शेअर केले होते. मात्र, हे ट्विट नंतर थुनबर्गने डिलीट केले होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तिने पाठिंबा दिला आहे. मुंबई येथील वकील निकिता जेकब यांच्यावरही पोलिसांनी टुलकिट पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

मुंबई - भारतीय रेल्वेकडून प्रवास या व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात येतात. यातील एक योजना म्हणजे आता पश्चिम रेल्वे मार्गावर पाच रेल्वे स्थानकांवर वातानुकूलित सलूनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक आणि अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन सलून उभारण्यात येणार आहे.पश्चिम रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांना केस कापणे, मसाज करणे, फेशियल करण्याची सुविधा रेल्वे स्थानक परिसरात मिळावी, याकरिता पश्चिम रेल्वेकडून स्वरसय्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावरील सलूनचा वेळ सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रवासी या वेळेत सलून सेवेचा लाभ घेऊ शकतात. प्रवाशांचा जास्त कालावधी लोकल प्रवासात इच्छित लोकांची वाट बघण्यात जातो. त्यामुळे प्रवाशांचे त्यांच्या दैनंदिन सोयी सुविधांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक आणि अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन सलून उभारण्यात येणार आहे. तर, गुजरातमध्ये सुरत येथे एक सलून उभारण्यात येणार आहे. या रेल्वे स्थानकावर प्रत्येकी २५६ चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, रेल्वेकडून पाच वर्ष करार करण्यात येणार आहे.केस कापणे, डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश, केसाला ड्रायसारख्या सर्व सुविधा या वातानुकूलित सलूनमध्ये असणार आहे. यामध्ये प्रत्येक बाबीचे शुल्क माफक दरात असणार आहे. सलून चालकाने किंवा कंत्राटदाराने नियमाचे उल्लंघन केल्यास किंवा प्रवाशांना इच्छित सेवांना दिल्यास कंत्राटदाराला दहा हजार रुपये दंडाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच रेल्वे स्थानकातील प्रत्येक सेलमध्ये तक्रार वही असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

मुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व स्टॉलचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी प्रशासनाला दिले. यामुळे बेकायदेशीररित्या स्टॉल वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मुंबईत आरे दूध विक्रीचे मोक्याच्या ठिकाणी सुमारे १ हजार ६०० स्टॉल असून त्यांचा दुरुपयोग होतो. आरेचे दूध या स्टॉलच्या माध्यमातून विकले जात नाही, ही बाब निदर्शनास आल्याने मुंबईत आरेचे दूध न विकणाऱ्या आरे स्टॉलधारकांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. याबाबत मंत्रालयात आरे स्टॉलसंदर्भात आढावा घेण्यात आला.पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी, मुंबईत आरे स्टॉलवरून सद्यस्थितीत आरे उत्पादनाची होणारी स्टाॅलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टाॅलची संख्या, सध्या प्रत्यक्ष चालत असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉलची संख्या, अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्व्हेक्षण करावे, असे निर्देश दिले आहेत.आढावा बैठकीला पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच.पी. तुम्मोड उपस्थित होते.

मुंबई - बोरिवली पश्चिममधील देवकी नगर परिसरातील चिंतन गार्डनजवळ सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. सद्यस्थितीत अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सजावटीची दुकाने आहेत. या दुकानातील लाकडी बांबूसह कपड्याचे साहित्य जळून खाक झाले. अद्यापपर्यंत आगीचे कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मुंबई -गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुरेश पुजारी उर्फ सुर्या तृतीयपंथ समुदायाचे प्रमुख होते. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास गोरेगाव येथील रुमानिया हॉटेलजवळून जात असताना काही अज्ञात त्यांच्याकडे आले आणि हल्ला केला अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त आहे.हल्ल्यानंतर सूर्या यांनी आरोपींसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी एका आरोपीने चाकू काढून त्यांच्या मानेवर वार केला. सूर्या मदतीसाठी ओरडत असल्याने तेथे उपस्थित लोकांनी धाव घेतली. यानतंर आरोपींनी तेथून पळ काढला.हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्या यांनी स्थानिकांनी रुग्णालयात नेले   तसेच पोलिसांनाही फोन करुन घटनेची माहिती दिली. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सूर्या यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. सूर्या यांची सोन्याची चेन आणि पाकिट यांना आरोपींनी हात लावला नसल्याने हत्या हाच मुख्य उद्धेश होता असे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.ही पूर्वनियोजित हत्या असावी कारण आरोपींना सूर्या यांच्या दैनंदिनीबद्दल माहिती होती. आम्ही सध्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करत असून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांचा जबाब नोंदवत आहोत. सध्या तरी आम्हाला तीन मारेकरी होते इतकीच माहिती मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

कोलकाता  - पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. ते पश्चिम बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामी हिला पोलिसांनी कोकेन आणि १० लाख रुपयांसह पकडले होते. पोलिसांनी याप्रकरणी पामेला गोस्वामी हिच्यासह दोन जणांना अटक केली होती. या प्रकरणात भाजपाचे नेते राकेश सिंह यांचे नाव समोर आले होते. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपाचे महासचिव असलेल्या कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय असलेल्या राकेश सिंह यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.नोटीस बजावल्यानंतर राकेश सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.पोलिसांच्या कारवाई व्यत्यय आणल्याबद्दल राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलांना राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई - वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे २३ फेब्रुवारी सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती. आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले.उद्धव ठाकरे म्हणाले, मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितलं. हे याचसाठी सांगितलं कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे.

नवी दिल्ली - दररोजच्या इंधन दरवाढीवरुन संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याकरिता इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला.इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. इंधन भाववाढीच्या बातम्याही आता रोजच्या ठरलेल्या. अशा परिस्थितीत दररोज वाढलेल्या महागाईने सर्वसामान्याचं कंबरडे मोडले. अशावेळी इंधनाचे दर कमी केले जावे, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.इंधनाच्या वाढत्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरच्या अप्रत्यक्ष करात कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे शक्तीकांता दास म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत त्यांनी आपले मत मांडले.डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्य आणि इंधनाचा महागाईचा दर ५.५ टक्के राहिला. इंधन दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तरित्या करकपात करण्याची गरज असल्याचे शक्तीकांता दास म्हणाले.दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रामानंतर पुन्हा इंधन दरवाढ झाली. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रत्येकी पैशांची वाढ झाली. या दरवाढीने पेट्रोल चक्क ९७ रुपये क्रॉस झालं तर डिझेलही जवळपास ८८ रुपये लीटरवर गेले आहे.

मुंबई - दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.गुजराती भाषेतील चिठ्ठीत काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे समजते आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.नरिमन पॉईंट येथील ‘सी ग्रीन साऊथ’ हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरील खोलीत डेलकर हे दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मोहन रविवारी रात्री हॉटेलमध्ये आले. सोमवारी आत्महत्येची बाब उघड झाली तेव्हा ते खोलीत एकटेच होते, अशी माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. मोहन यांनी  सोबत आणलेल्या शालीचा गळफास घेण्यासाठी वापर केला. त्यावरून त्यांनी ठरवून टोकाचे पाऊल उचलले, असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.या प्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद  केली आहे. मोहन यांचा मृतदेह  शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवल्याचे पोलीस प्रवक्ता चैतन्य एस. यांनी सांगितले.प्राथमिक चौकशीनुसार ही आत्महत्या असून संशयास्पद असे काही आढळले नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोहन यांच्या वाहन चालकाने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. बराचवेळ मोहन यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चालकाने गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या डेलकर कुटुंबाला ही बाब कळवली.कुटुंबाचेही दूरध्वनी मोहन स्वीकारत नसल्याने अस्वस्थता वाढली.

हॉटेल व्यवस्थापनाचे अन्य चावीने दार उडण्याचे प्रयत्न फसल्याने चालकाने शेजारील खोलीच्या गॅलरीतून मोहन यांच्या गॅलरीत उडी घेतली तेव्हा मोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.


नवी दिल्ली - हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले. १९ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी २०२० पासून या औषधावर काम सुरू केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कोरोनिल औषध बाजारात आणण्यात आले. मात्र आता औषधाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आशियासंदर्भातील ट्विटर अकाऊंटवरुन जागतिक आरोग्य संघटनेने करोनासंदर्भातील कोणत्याही पारंपारिक औषधाला आम्ही परवानगी दिलेली नाही असे स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नौऋत्य विभागाचे काम पाहणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरुन ज्या दिवशी बाबा रामदेव यांच्या कोरोनिलला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल करण्यात आल्याचे सांगण्यात आले त्याच दिवशी एक ट्विट करण्यात आले होते. “जागतिक आरोग्य संघटनेने पारंपारिक औषधांचा वापर करुन करोनावर उपचार करण्याच्या कोणत्याही पद्धतीची तपासणी केली नाही किंवा त्याला प्रमाणपत्रही दिलेले नाही,” असे ट्विट करण्यात आले आहे.मात्र पतंजलीला कोरोनिलसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे आयुष मंत्रालयाकडून प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा हे औषध बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आलेल्या कार्यक्रमामधील बॅनरवर करण्यात आला होता. विशेष म्हणजे दोन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते हे औषध आणि त्यासंदर्भातील संशोधनाचे अहवाल प्रकाशित करण्यात आले होते. मात्र आता जागितक आरोग्य संघटनेच्या या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

स्वामी रामदेव यांनी या औषधासंदर्भात बोलताना, कोरोनिल हे सर्वानाच करोनाविरोधी उपायात प्रभावी असल्याचे दिसून येईल असे म्हटले होते. निसर्गोपचार पद्धतीचा वापर यात केला असून ते सर्वाना परवडणारे औषध आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती सादर केली असून कोरोनिल गोळ्या या कोविड १९ विषाणूला प्रतिबंध करतात, असा दावा रामदेव यांनी केला होता.ट्विटरवर #ArrestRamdev हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. बाबा रामदेव यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात यावी अशी मागणी अनेकजण करत आहेत.

पुणे - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने अवघ्या दिवसांत जवळपास ९ लाखांचा दंड वसूल केला आहे.गेल्या दोन दिवसांत पुणे पोलिसांकडून रात्रीच्या संचारबंदींचे उल्लंघन करणाऱ्या १७०० जणांवर कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, काहीजण विनाकारण रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरताना आढळून आले. अशा लोकांवर पोलिसांनी संचारबंदी उल्लंघन कलमातंर्गत गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, विनामास्क फिरणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आतापर्यंत शहरात २ लाख ५३ हजार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.शहरात सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स, मॉल्स आणि दुकानांवर पालिकेच्या पथकांकडून धडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या ५६८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने तीन दिवसांत १,५५, ०५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे, वैशाली हॉटेलचाही समावेश आहे. सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या आस्थापनांकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीची घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असणार आहे. काल रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.


मुंबई - स्टुडिओला आग लागण्याचे प्रकार सतत सुरूच आहे. रविवारी दुपारी ३:२० वाजता मुंबई मालाडमध्ये आगीची घटना घडली आहे. यावेळी अग्निशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पी - ३ नावाच्या स्टुडिओत आग लागली. मुंबई मालाड पश्चिम मार्वे रोड स्थित पी - ३ स्टुडिओला आग लागली होती. आगीत लाकडाचा स्टुडिओ सेट पेटला आहे असे सांगण्यात आले होते. त्यात अनेक पोशाख आणि वस्तू ठेवल्या होत्या त्यादेखील जळाल्या असे सांगितले होते. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे नुकसान झाले आहे.


कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं राजकारण तापताना दिसत आहे. कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांचा पुतण्या खासदार अभिषेक बनर्जी यांच्या पत्नी विरोधात चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बनर्जी यांना नोटीस देण्यासाठी सीबीआयची टीम कालीघाट येथील त्यांच्या घरी पोहोचली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या टीममध्ये ५ जणांचा समावेश होता.कोळसा तस्करी प्रकरणी सीबीआयची टीम अभिषेक बनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी पोहोचली. मात्र, त्यावेळी घरी कोणीही नव्हते. यामुळे सीबीआयची टीम नोटीस घरावर चिकटवून परतली. सीबीआयला रुचिरा बॅनर्जी यांची चौकशी करायची आहे. सीबीआयला रुचिरा यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा संशय आहे. नोटीसमध्ये सीबीआयनं रुचिरा बॅनर्जींना चौकशीत येण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. तर, सीबीआयची टीम घरी येऊन चौकशी करेल, असे म्हटले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नोटीस मध्ये फोन नंबर दिले आहेत. त्यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.कोळसा तस्करीसह इतर घोटाळ्यांमध्ये अभिषेक बॅनर्जींचा समावेश असल्याचा आरोप भाजप करत आहे. भाजपच्या नेत्यांकडून अभिषेक बॅनर्जींना ममता बॅनर्जींकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात येतो. तर, तृणमूल काँग्रेस आणि अभिषेक बॅनर्जी सातत्याने भाजपचे आरोप फेटाळत आहेत.कोळसा घोटाळ्याप्रकरणी तपास करताना सीबीआयला रुजिरा बॅनर्जी यांच्या खात्यात व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सीबीआयला रुचिरा यांची चौकशी करायची आहे. सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालमधील ४ जिल्ह्यांमध्ये १३ ठिकाणी छापे टाकले होते. पुरुलिया, बांकुड़ा, पश्चिम बर्धमान आणि कोलकातामध्ये सीबीआयने चौकशी केली आहे. पोलीस आणि सीबीआय कोळसा घोटाळ्यातील अनूप मांझीची चौकशी करत आहे. अनुप मांझी विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय विनय मिश्रा यांचे नाव देखील या प्रकरणी समोर आले होते.

मुंबई - देशात इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीची फास्टॅग ही प्रणाली लागू झाली आहे. राज्यात एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) च्या काही टोलनाक्यांवर याची १०० टक्के अंमलबजावणी होण्यास अजून महिन्याभराचा काळ आहे. पण राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर याची १०० टक्के अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अधिकृत फास्टॅग असताना ही तो स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत होता. पण आता मात्र या अडचणीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कारण आता अधिकृत फास्टॅग स्कॅन न होणे ही तांत्रिक चूक मानत, वाहनचालकाला विना टोल जाऊ देण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा वाहनचालकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर विना फास्टॅग प्रवास करता येत नाही. असा प्रवास केला तर तो महागात पडत आहे. त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. राज्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मार्गावर केवळ २ लेन हायब्रीड लेन म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. विना फास्टॅग हायब्रीड लेनऐवजी फास्टॅग लेनमधून गेल्यास दुप्पट टोल घेतला जात आहे. अशावेळी आता राज्यात फास्टॅग लावून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र त्याचवेळी फास्टॅग स्कॅन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. फास्टॅग खात्यात पैसे असताना ही दुप्पट टोल द्यावा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. याचा फटका नुकताच प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनाही बसला होता. यावर त्याने संताप व्यक्त करताना हा फास्टॅग नव्हे स्लोटॅग असल्याचे म्हटले होते.

फास्टॅग स्कॅन न होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे सध्या बोगस फास्टॅगची विक्री सुरू आहे. त्यामुळे बोगस स्टिकर असल्यास ते स्कॅन होत नाही, व वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागतो. त्यामुळे वाहनधारकांनी अधिकृत फास्टॅगच लावावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसरे म्हणजे तात्रिक अडचणींमुळे फास्टॅग स्कॅन होत नाही. याचा फटका वाहनधारकांना बसू नये म्हणून आता फास्टॅग स्कॅन न झाल्यास त्या वाहनाकडून टोल वसूल केला जाणार नसल्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. रविवार सकाळी ही कारवाई करण्यात आली. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षा दलांना शस्त्रसाठ्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोहिम राबवत ही कारवाई केली.तीन एके-५६ बंदुका, चिनी बनावटीचे दोन पिस्तूलासह मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलांनी जप्त केला. कृष्णा ढाबा हल्ल्यातील संशयितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी माहिती मिळाली होती. जगभरातील राजदूत आणि प्रतिनिधींचे पथक बुधवारी काश्मीर दौऱ्यावर आले होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी प्रसिद्ध कृष्णा ढाब्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ढाब्याचा मालक जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.

या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा दलांनी राजौरी जिल्ह्यातील बुधाल भागातील खेत चाका येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. काश्मिर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला होता. ५ ग्रेनेड लॉन्चर, ए. के असॉल्ट रायफल, ९४ राऊंन्डस, दोन पिस्तूल कारवाईत पोलिसांनी जप्त केले. डोंगराळ भागात दगडाच्या कपारीत शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती.

मुंबई - राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून मुंबई  महानगरपालिकेने कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्सवर पालिकेच्यावतीने धडक कारवाई केली जात आहे.मुंबईसोबतच महराष्ट्राच्या इतर अनेक भागात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महानगरपालिका अलर्ट झाली आहे. म्हणून दोन दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी धडक कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्री वांद्रे आणि खार परिसरातील पाच रेस्टॉरंन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली. यात ६५० जणांकडून महानगरपालिकेने १ लाखापेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील १४५ कॅफे अँड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही. म्हणून सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात १८८ व २६९ कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याशिवाय वांद्र्यातील आयरिश हाऊस, खार स्टेशनजवळील क्वॉर्टर पिलर, थ्री वाईस मंकी आणि यू-टर्न लाऊन्जमध्ये देखील महानगरपालिकेकडून तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली झालेली दिसली.अनेक ग्राहक विना मास्क फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर मनपाकडून दंडात्मक कारवाई केली गेली. मुंबईच्या अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. सर्वसामान्य लोकांनी सावध रहावे, नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबई - खोटी बिले देऊन सरकारची कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कारवाई केली. सरकारने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मे. लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे. आर्यन इंटरनॅशनल असे या कंपन्यांचे नाव आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले होते. तपासात ते दोषी आढळले आहेत या प्रकरणात २२ डिसेंबर २०२० रोजी तपासासाठी भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, मे. लॅव्हिश एन्टरप्राइजेसचे मालक प्रकाश कुमार वीरवाल आणि मे. आर्यन इंटरनॅशनलचे मालक प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. सरकार दप्तरी नोंद करण्यात आलेल्या जागेवर ते कोणताही व्यवसाय करत नाहीत. एक वर्षापासून हे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम,२०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन झाले. वस्तूंच्या पुरवठ्यांशिवाय ४२८ कोटी रूपयांचे बनावट बिले देऊन आणि ७९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून देण्यात आली. म्हणूनच दोन्ही करदात्यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-२०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांनी वस्तूंचा पुरवठा न करता बिल जारी करून शासनाचा कर बुडवला. सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली. न्यायालयाने सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सूरजसिंग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय आहे. शासनाच्या करोडो रूपयांची महसूल हानी केल्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई. रविंन्द्रन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण या तिघांवर संशय व्यक्त केला गेला आहे. मात्र, अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. या प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचे मानले जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. पण विलासही गायब असल्याने हा विलास कोण आहे? तो कुठे आहे? याबाबतचे गूढ वाढले आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील एका क्लिपमध्ये कथित मंत्री आणि विलास चव्हाणचे संभाषण झाले होते. या कथित क्लिपमध्ये विलास हा पूजाचा भाऊ असल्याचे अरुण राठोडने पोलिसांनी सांगितल्याचे दिसून येते. परंतु, पूजाची चुलत आजी शांताबाई यांच्यानुसार पूजाला एकही भाऊ नाही. त्या सहा बहिणी आहेत. त्यात पूजा पाचवी आहे. इतर चौघींची लग्नं झालेली आहेत. त्यामुळे हा विलास चव्हाण कोण? तो पूजा सोबत पुण्यात का राहत होता? अरुणने तो पूजाचा भाऊ असल्याचे का सांगितले ? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.पूजा चव्हाण प्रकरणात विलास चव्हाण हा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे  बोलले जाते. विलास हा पूजाच्या रुममध्ये राहत होता. शिवाय पूजाने आत्महत्या केली. त्या दिवशी तो तिथेच होता. रुग्णालयातही तो होता. तसेच कथित मंत्र्याच्या संपर्कातही होता. त्यामुळे पोलीस चौकशीत त्याची साक्ष महत्त्वाची ठरू शकते, असे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण हा वन विभागातील सामाजिक वनीकरण विभागात नोकरीला होता. जानेवारीपासून तो या विभागात शिपाई म्हणून कार्यरत होता. पूजा चव्हाणच्या आत्महत्येपूर्वी म्हणजे एक महिनाच तो या विभागात आला होता. कंत्राटदार कंपनीने त्याची या विभागात नेमणूक केली होती. विलाससह अरुणही याच विभागात कामाला होता. त्यामुळे दोघांची चांगली ओळख झाली होती. विलासही बीडचाच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एकूण १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातील शेवटची क्लिपमध्ये अरुण, विलास आणि कथित मंत्र्यांचा संवाद आहे. पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतरचा या तिघांचा हा कथित संवाद आहे. मात्र, या क्लिपमधील आवाजाबद्दल कोणीही पृष्टी केलेली नाही. शेवटची क्लिप ही २ मिनिटं २२ सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचे शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊ विलासही आहे.

पुणे  - “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेले पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेले कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.“अयोध्येत आपले दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेले पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झाले, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसत आहे. असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिक - मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार निवडीवरून काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी नवीन आमदारांना अधिवेशनामध्ये येण्यासाठी संधी द्यायला हवी. मात्र, ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडी संदर्भात एक निर्णय घेत आहेत आणि नवीन आमदारांच्या निवडी संदर्भात एक निर्णय, त्यांची अशा प्रकारे वेगवेगळी भूमिका का आहे? याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे मत महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केले आहे.खासगी कार्यक्रमासाठी आलेले राज्याचे महसूल मंत्री यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी थोरात म्हणाले, की राज्यपाल हे नवीन आमदारांच्या हक्कांवरती गदा आणत आहेत. नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी घटनेप्रमाणे नवीन आमदारांची नावे घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु तेच राज्यपाल वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचे आता राज्यासमोर येत आहे.विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यानंतर राज्यपालांनी तातडीने या ठिकाणी अध्यक्ष नियुक्त करावा, असे सरकारला सूचित केले आहे. परंतु त्याच विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सभागृहासाठी आमदारांची नियुक्ती करणे हे राज्यपाल मान्य करत नाहीत, अशी भूमिका का घेतात? असा प्रश्न थोरातांनी उपस्थित केला. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की राज्यपालांच्या या दुहेरी भूमिकेबाबत आता संशय येत आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे, तो सहयोगी मित्र पक्षांबरोबर चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की आज नागरिकांनी खबरदारी न घेतल्यामुळे राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि तो रोखण्यासाठी आता सक्तीने पावले उचलावी लागणार आहेत. जर नागरिक खबरदारी घेणार नसतील तर नाईलाजाने सरकारलाही कडक भूमिका घ्यावी लागेल, असाही सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. एखादा सामान्य व्यक्ती राजा झाल्यावर त्याला अंहकार येतो आणि त्या गर्विष्ठ होतो, असे जुन्या कथांमध्ये सांगितले जात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाल्याने ते अंहकारी झाले आहेत. ते एक हे अहंकारी राजा आहेत, असे त्या म्हणाल्या.केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना पंतप्रधानपदी बसवलेल्या शेतकऱ्यांशी ते चर्चा का करत नाहीत. मोदींनी त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे त्या म्हणाल्या. उसाची थकबाकीवरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला.उसाची थकबाकी देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही. कोटी खर्च करून नवीन संसद भवन बांधण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पण शेतकऱ्यांना उसाचा थकीत हप्ता दिला नाही. शेतकरी त्रस्त आहेत. श्रीमंत अब्जाधीशांनी हजारो कोटींची कमाई केली असून त्रासलेले शेतकरी आंदोलन करत आहेत, असे त्या म्हणाल्या

गेल्या सोमवारी प्रियांका गांधींनी चांदपूर येथे किसान पंचायतीला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साठी दोन विमान खरेदी करण्यासाठी १६ हजार कोटी खर्च केले. ते इतर देशांचे दौरे करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच पंतप्रधान आपल्या भांडवलशाही मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत. नव्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदार त्यांचे भांडार भरू शकतील. पण शेतकऱयांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.


कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून, त्यातच आता एक ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. त्या आपल्या गाडीतून कोकेन घेऊन जात होत्या. या प्रकरणी पामेला गोस्वामी यांनी शनिवारी पक्षाचे सहकारी राकेश सिंह यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कैलास विजयवर्गीय यांचे सहयोगी असलेले भाजपाचे नेते राकेश सिंह यांना अटक करण्यात यावी. त्यांनी माझ्याविरोधात कट रचल्याचे त्या म्हणाल्या. पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डे ला दक्षिण कोलकाताच्या न्यू अलीपूरमधून १०० ग्राम कोकेनसोबत अटक करण्यात आली आहे.

पामेला यांच्याशी गेल्या एक वर्षांपासून संपर्क झाला नाही. मी चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. चौकशीसाठी त्यांनी मला, कैलास विजयवर्गीय यांना किंवा गृहमंत्री अमित शाह यांना बोलवावे. मला वाटते यामध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग आहे. त्यांच्या पाठिंब्याने पोलीस हा कट रचत असून त्यांनी पामेला यांना माझ्याविरोधात बोलण्यास सांगितले असावे, असे सिंह म्हणाले.हे संपूर्ण प्रकरण भाजपाचा खरा चेहरा दाखवते. यापूर्वी एका भाजपा नेत्याला लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी अटक झाली होती. आता एका नेत्याला ड्रग्स प्रकरणात अटक झाली आहे. यातून भाजपाचा खरा चेहरा सिद्ध झाला आहे, असे टीएमसीचे सरचिटणीस पार्थ चटर्जी म्हणाले.पामेला गोस्वामी यांनी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या करिअरची सुरवात मॉडेलिंगपासून झाली होती. यानंतर त्यांनी एअर होस्टेस म्हणूनही काम केले होते. नंतर बंगाली टेलिव्हिजनच्या जगात त्यांनी प्रवेश केला. पामेला गोस्वामी यांनी पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पक्षाच्या कार्यात खूप सक्रिय असल्याचे म्हटले जात. तसेच त्या सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

कोलकाता - पश्चिम बंगाल राज्यात येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अनेक वेळा राजकीय दौरे, यात्रा आणि सभांना हिंसक वळण लागल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नॉर्थ २४ परगाणा जिल्ह्यात भाजपाने काढलेल्या परिवर्तन यात्रेवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. जिल्ह्यातील बशिरहाट परिसरात ही घटना घडली यावेळी कार्यकर्त्यांनी परिवर्तन यात्रेवर हल्ला देखील केल्याचा आरोप होत आहे.तृणमूलच्या नेत्यांनी यात्रेदरम्यान आमच्यावर हल्ला केला. यात एका भाजपाच्या कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली, असे स्थानिक भाजप नेत्याने सांगितले. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नियोजितपणे हल्ला करण्यात आला, असे पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांनी सांगितले. बशिरहाट येथील मिनाखा येथे भाजपाने आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हल्लाकरून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पश्चिम बंगालची जनता योग्य पक्षाला सत्तेत आणेल, असे घोष म्हणाले.

दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मनिखा येथील तृणमूलच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. २९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी मोठी राजकीय चुरस सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग वाढतच आहेत. देशातील बर्‍याच भागात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरून युवक काँग्रेस संघटनेकडून शास्त्री भवन येथील पेट्रोलियम मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यांनी इंधन दरामध्ये कपात करण्याची मागणी केली.गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काहीच केले नाही. सरकार लोकांचे लक्ष खऱ्या प्रश्नांकडून वळवण्यासाठी फक्त 'जुमला' देत आहे. पण आता असे होणार नाही. शेतकरी रस्त्यावर बसले आहेत, गृहिणींना अडचणीचा सामना करावा लागत आहे, असे आयसीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले. मोदी आहेत तर महागाई आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच सरकारने इंधनाच्या किंमती कमी न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.इंधन दर प्रकरणी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली होती. केंद्र सरकारने गेल्या साडेसहा वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात जनतेकडून २१.५० लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, असा दावा त्यांनी केला. 'इंधनकरजीवी' मोदी सरकार देशातील लोकांसाठी एक शाप बनले आहे, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेत सहभागी २० लोकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. शनिवारी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. लाल किल्ल्यावरील व्हिडीओ स्कॅन करुन हे फोटो काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात २०० लोकांचे फोटो प्रसिद्ध केले होते.आम्ही फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि तपास सुरु केला आहे, अशी माहिती एक पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळे दिल्ली हिंसाचार झाला नसल्याचा दावा दिल्ली पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आरोप केला आहे की, कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅलीसाठी नियोजित मार्गाचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी एकप्रकारे विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप पोलीस आयुक्तांनी केला.दिल्ली पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरुन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली नाही. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे विश्वासघात केला आहे. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या हिमतीने परिस्थिती आटोक्यात आणली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १५२ जणांना अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला शेतकरी संघटनांनी उत्तर दिले आहे.

गेले वर्षभर कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. संपूर्ण जगातील वैद्यकीय तज्ज्ञण्यानी कोरोनावर लास बनवण्यासाठी प्रयत्न करत असताना,करोनाच्या साथीवर  भारताने लस काढली असली तरी, करोनाने अद्यापतरी भारतातून काढता पाय घेतलेला दिसत नाही.कारण गेल्या काही आठवड्यांमध्ये करोना ज्या वेगाने पसरला, त्याच नव्या वेगाने पसरत आहे. देशभरात निर्बंधांमध्ये शिथिलता आली आणि लोक घराबाहेर पडू लागली. नागरिकांनी स्वत:च आपल्या मनाशी 'करोना संपला' असा निष्कर्ष काढून शासनाने लावलेले निर्बंध तोडले. आता त्याचा उलटा परिणाम झाला असून महामुंबईसहित पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी अशा अनेक शहरांमधील करोना रुग्णांच्या संख्येचा आलेख उलटतो आहे. या शहरांमधील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक बनत चालली आहे. खरेतर, करोना आल्यापासून सर्व वैद्यकीय तज्ज्ञ आता आपल्याला आपली जीवनशैली बदलावीच लागेल, असा इशारा वारंवार देत आहेत.  परंतु लोकांनी निर्बंध पाळलेले दिसले नाही त्यामुळेच पुन्हा करून पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.बाहेर वावरताना मास्क लावणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे या दोन साध्या गोष्टी जर आपण शिकलो नाही तर कितीही लसी आल्या तरी भारतासारख्या  देशातून करोनाचे उच्चाटन होणार नाही, हे समाजाने लक्षात घ्यायला हवे. एकीकडे, भारतभर करोनाचे आकडे खाली येत असताना केरळ आणि महाराष्ट्र ही दोन प्रगत, राज्ये मात्र काळजी वाढवत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांनी बाहेर वावरताना नियम पाळले नाहीत तर उद्या एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या असे दुहेरी आव्हान आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहण्याची भीती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'नियम पाळले नाहीत तर राज्यात पुन्हा टाळेबंदी आणावी लागेल,' असा इशाराही दिला आहे, त्याचा अर्थ राज्यातल्या सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजात   युद्धपातळीवर पोहोचवायला हवा. नागरिकांनी 'काळजी घेऊन, शारीरिक अंतर राखत आपले व्यवहार पूर्ववत करीत नेणे' हा एकमुख उपाय आहे. मात्र, नागरिकांना नेमके तेच समजत नाही. त्यामुळेच, अनेकांच्या घरी साजरे होऊ लागलेले विवाह तसेच इतर समारंभ पाहिले की, जागरूक नागरिकाच्या मनात भीती निर्माण झाल्यापासून राहणार नाही.देशभरात जे लसीकरण सुरू झाले आहे, ती मोहीम महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्यास आणखी सहा महिने लागू शकतात. शिवाय, ही लस दोनदा घ्यावयाची आहे.शिवाय, ब्रिटन, ब्राझील तसेच दक्षिण आफ्रिकेतून करोनाचे नवे अवतार भारतात शिरकाव करण्याची टांगती तलवार आहेच. त्यांच्यावर सध्या उपलब्ध असणाऱ्या लसी प्रभावी ठरतात का? या प्रश्नाचे उत्तर कुणालाही माहीत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आणि त्यानंतर आता लसीकरण सुरू झाले की, आता सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल, यावर अनेकांनी विश्वास ठेवला आहे. महाराष्ट्रात आजही करोनाचा प्रसार रोखणारी अशी कोणतीही सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही. तशी ती झाली असती तर राज्याच्या करोना कार्यगटाला धोक्याची घंटा वाजवावी लागली नसती. महाराष्ट्रात आणि विशेषकरून मुंबईत वेगवेगळ्या निमित्तांनी जमणाऱ्या गर्दीवर जर नियंत्रण आणले नाही तर परिस्थिती अवघ्या आठ-दहा दिवसांमध्ये हाताबाहेर जाऊ शकते, हे कोणीही नाकारू शकत नाही. लग्नसोहळे, गाठीभेटी, सणसमारंभ, राजकीय मेळावे आणि सहली हे सर्व आता आपल्याला पूर्वीच्याच वर्तनशैलीने साजरे करता येणार नाहीत, हेच आपल्याला समजत नाही. सर्व सण साजरे करा पण थोडे नियम पाळून, थोडी बंधने स्वीकारून आणि काहीसे अंतर राखून करायचे, इतका सोपा हा मार्ग आहे. तो जर आपण अनुसरला नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. आज अमेरिका आणि ब्रिटन तशी ती मोजत आहेत.भारतातील लोकसंख्येमुळे रुग्णांचे आकडे जास्त दिसत असून, अनेक शहरांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचेही उद्दिष्ट पुरे झालेले नाही. महाराष्ट्रातील नागरिकांनी जर शिस्त आणि संयम पाळला नाही तर करोनाच्या लढाईत  मिळालेले यश मातीमोल होण्याची होईल. करोनाचा विळखा थोडासा सैल झाला असला तरी, नागरिकांच्या वर्तनाने तो पुन्हा आला आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.

मुंबई - सैराट, फँड्री असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे. विषयातलं वेगळेपण आणि मांडणीतली कल्पकता यामुळे त्याचे चित्रपट सर्वच वयोगटातल्या लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. नागराजचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.नागराज मंजुळेने आपल्या सोशल मिडीया हँडलवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या १८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे, ही विशेष बाब. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचे वृत्त आजतकने दिले होते. एका वर्षापूर्वी ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे आणि करोना संकटामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता तो १८ जून २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने तसेच या चित्रपटाच्या टीमनेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

मुंबई - लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुप्रतीक्षित ‘सरसेनापती हंबीरराव’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटात मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget