March 2021

मुंबई - परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत राज्य सरकारमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती.यानुसार सामान्य प्रशासन विभागाने गृहमंत्र्यांच्या चौकशीबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही समिती सहा महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. 

न्यायमूर्ती कैलास चांदीवाल याची माहिती

न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे मूळचे औरंगाबादचे आहेत

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात साडेसहा वर्षे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.

सध्या ते महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

 तसेच रेराच्या अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती होते.

शिर्डी संस्थानच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.

मुंबई - सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांत मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांत पुन्हा एकदा २६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेचे सर्व प्रभारी बदलण्यात आले आहेत.सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर आता सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने सचिन वाझे या API दर्जाच्या अधिकाऱ्याला या पदावर बसवण्यात आले होते. त्यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. तर खंडणीविरोधी पथकाच्या प्रभारीपदी पीआय योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आले आहे. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

मागील काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. १५ वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतले जाते. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचे म्हटले होते. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.


मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचे दिसत आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचे चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

शिवसेना प्रवत्यांची नावे - 

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)

अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)

मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)

डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)

किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)

संजना घाडी (नवीन वर्णी)

आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)

नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

मुंबई - फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम -दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाली आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे! असा खोचक सल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. पवार हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बड्या उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय? पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील? ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय? असा प्रश्नही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले. पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ''अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.'' महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ''मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,'' असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा, पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे, ते या निमित्ताने दिसले. मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळय़ांत आधी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी? अशी विचारणाही करण्यात आली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पोटात दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात असणाऱ्या असणारे खडे काढण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले होते. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी त्यांना त्रास होवू लागला. त्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी रात्रीच शस्रक्रीया करण्यात आली.रयशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. त्यांनी ट्वीटकरत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान पवारांवर शस्रक्रीया होत असताना रूग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहीत पवार उपस्थित होते.

मुंबई - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे निधन झाले. मंगळवार (३० मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १९७३ मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले.काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली.जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल १९९२मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.

पुदुच्चेरी - काँग्रेस पक्षाने नुकताच पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला १००० रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मोफत कोव्हीड लसीकरण, नवे शिक्षण धोरण आणि शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणाही काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत. आता निवडणुकीत काँग्रेसला याचा फायदा मिळणार का? हे पाहावे लागेल. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट (NEET) परीक्षा आणि नवे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचे आश्वासन पुदुच्चेरीच्या मतदारांना देण्यात आले आहे. तसेच कराईकलमध्ये कृषी विद्यापीठ आणि एक विधी विद्यापीठ स्थापन करु, असेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्यातील काँग्रसचे सरकार पडले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची परिस्थिती फारशी चांगली नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने योजनाबद्ध पावले टाकून, पुदुच्चेरीत काँग्रेसची ताकद कमी केली आहे. मतदानपूर्व एक्झिट पोल्समध्येही पुदुच्चेरीत काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी राज्यातील रेशनकार्डधारक कुटुंबातील गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आगामी दहा वर्षात तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करु. तसे झाल्यास राज्यातील दरडोई वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये इतके असेल. यामुळे जवळपास एक कोटी लोक गरिबीतून मुक्त होतील, असा आशावाद एम.के. स्टॅलिन यांनी व्यक्त केला होता.पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांकडून पुदुचेरीची सत्ता मिळवण्यासाठी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करुन वेळोवेळी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरुन दूर केल्याने काँग्रेसच्या हातातील हुकमी मुद्दाच काढून घेतला आहे.

गडचिरोली - जिल्ह्यात होळीच्या दिवशी भल्या सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या पाचही नक्षल्यांवर ४३ लाख रुपयांचे बक्षीस होते. मृतांमध्ये नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता यांचा समावेश आहे.पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २७ मार्चपासून नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिष कल्वानिया यांच्या नेतृत्वात खोब्रामेंढा परिसरात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान विशेष अभियान राबवत होते. शनिवारी तेथे चकमक झाली. त्यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त केले होते. होळीच्या दिवशी सकाळी त्याच परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी चकमक उडाली. त्यात भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता हे नक्षलवादी ठार झाले.भास्कर हिचामी उर्फ ऋषी रावजी उर्फ पवन हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता. तसेच तो उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर १५५ गुन्हे दाखल असून, शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम हा टिपागड एलओएसचा उपकमांडर होता, त्याच्यावर १४ गुन्हे असून, शासनाने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.अमर कुंजाम कसनसूर एलओएसचा सदस्य होता. त्याच्यावर ११ गुन्हे दाखल असून, शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.सुजाता उर्फ कमला उर्फ पुनिता गावडे उर्फ आत्राम ही टिपागड एलओएस प्लाटून क्रमांक १५ ची सदस्य होती. तिच्यावर ३१ गुन्हे दाखल असून, ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.अस्मिता उर्फ सुखलू पदा ही टिपागड एलओएसची सदस्य होती. तिच्यावर ११ गुन्हे दाखल असून, २ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.२०१९ मध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख नर्मदाक्का हिला पोलिसांनी तिच्या पतीसह अटक केल्यानंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळीची सर्व सूत्रे भास्कर हिचामी याच्याकडेच आली होती. परंतु त्याचा खात्मा करण्यात आला. हा नक्षल्यांना मोठा धक्का आहे. ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. दरम्यान दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य चकमकीत ठार होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

नांदेड - जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा परिसरात दरवर्षी होणाऱ्या शीख भाविकांचा हल्ला महल्ला (हल्लाबोल) मिरवणूक कार्यक्रमावरही यंदा निर्बंध होते. होळी आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुद्वारा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण अचानकपणे काही शीख भाविकांनी थेट पोलिसांवर हल्ला करून पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. यात पोलीस अधीक्षकाच्या अंगरक्षकासह चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान हल्लाबोलचे व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाले आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच सर्व धर्मगुरू यांच्याशी चर्चा करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तसेच गुरुद्वारामध्येच हा उत्सव करण्याचे ठरले होते. मात्र, काही जणांनी वाद घालत पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्याचा आग्रह धरत पोलिसांवरच हल्ला चढवला. सोमवारी सायंकाळी चार वाजेताच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेट्स तोडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, यात चार पोलीस जखमी झाले असून आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी सांगितले..दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्यावर तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला आणि दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत. सोबतच पोलिसांच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या आहेत.

कोलकाता  -  देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आज पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 47 जागांसाठी आज मतदान होत आहे. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. तर आसाममध्ये भाजपासमोर सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. 2016 च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने या 30 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. आसाममध्ये भाजपाने 47 पैकी 35 जागांवर विजय मिळवला होता.  दोन्ही राज्यांमधील मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. कोरोना आजारपणामुळे वेळ एका तासाने वाढविण्यात आली आहे.बंगालमधील 30 जागांपैकी भाजपा 29 जागा लढवत आहे. त्यापैकी एक अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (एजेएसयू) देण्यात आले आहे. तृणमूलही 29 जागा लढवणार असून एका जागेसाठी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील. तर काँग्रेस केवळ पाच जागांवर निवडणूक लढवेल. तर उर्वरीत जागा डावे पक्ष लढवतील. त्यापैकी सीपीएम 18 आणि सीपीआय 4 जागावर आपले उमेदवार मैदानात उतरवतील.  आसाममध्ये भाजपा पहिल्या टप्प्यातील 47 पैकी 39 जागा लढवत आहे. तर उर्वरीत जागांवर आसाम गण परिषद 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.  आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. हे पक्ष 43 जागा लढवणार आहेत. तर मतदारांसाठी भाजपा आणि काँग्रेस महागठबंधन वगळता तिसरा पर्यायही आहे. मतदारांसाठी तिसरा पर्याय म्हणजे नवख्या आसाम राष्ट्रीय परिषद (एजेपी), गेल्या वर्षी अखिल आसाम विद्यार्थी संघटना आणि आसाम राष्ट्रीय चतुर युवा परिषद परिषदेने याची स्थापना केली होती.

दौसा (राजस्थान) - खासदार शरद पवार शुक्रवारी दौसा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांनी दौसा येथील एका खासगी शाळेचे उद्घाटन केले. या वेळी त्याच्या बरोबार खासदार प्रफुल्ल पटेल ही उपस्थित होते.या वेळी त्यांच्या हस्ते दौसा येथील खासगी शाळेच उद्घाटन करण्यात आले. यानंर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी शाळेचे कौतुक केले. ते म्हणाले ही एक उत्तम शाळा आहे. मी देश-विदेशातील अनेक खासगी शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या सारखीच ही एक सर्वोत्कृष्ट शाळा आहे. ही शाळा दौसा जिल्ह्यासाठी चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील घटानांबद्दल प्रश्न विचारले. त्यांना गृह मंत्र्यांचा राजीनामा आणि लहान मुलांच्या रुग्णालयातील मृत्यू बद्दल विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी गृह मंत्र्यांचा प्रश्न न्यायालयात आहे, या विषयी बोलने योग्य होणार नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.आज भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी यांचं विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड झाले. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होत्या. ढाका एअरपोर्टवरुन पंतप्रधान मोदींचा ताफा थेट बांग्लादेशच्या राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाऊन तिथे पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.शहीद स्मारकावरुन निघाल्यानंतर पंतप्रधान पॅन पॅसिफिक सोनारगाव हॉटेलमध्ये पोहोचतील. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोंदीच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान मोदी नॅशनल परेड ग्राऊंडवर पोहोचतील. तिथे पुन्हा एकदा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांचे स्वागत करतील. ढाका इथल्या नॅशनल परेड ग्राऊंडवरच स्वातंत्र्याच्या ५० व्या सोहळाचे राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाल्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर विविध धर्मग्रंथांचं वाचन होईल. त्याचबरोबर ५० व्या स्वातंत्र्यदिनाचं एक थिम साँगही असेल आणि काही व्हिडीओही दाखवले जातील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांग्लादेशचे लिबरेशन ऑफ अफेयर्सचे मंत्री मुजम्मिल हक यांचे स्वागताचे भाषण होईल. त्याचबरोबर पंतप्रधान शेख हसीना यांच्या भगिनी रेहाना सिद्दीकी यांचेही संबोधन होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे सबोधन होईल. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे दाखले सांगणारा कार्यक्रम होणार आहे.

मुंबई - भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल ११ तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ६१ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. 

भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या २० गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. 

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमके कसे गेले, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मार्च रोजी ४ महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याच भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला. केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि कामगार कायद्यातील अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने २६ मार्च २०२१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे.२६ मार्चचा संपूर्ण भारत बंद यशस्वी करण्यासाठी युनायटेड किसान मोर्चा देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे भारत बंद यशस्वी होईल हे स्पष्ट आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. भारत बंदचा फटका दिल्लीतही दिसून येणार आहे. या वेळी भारत बंद पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी ते गावोगावी फिरत असल्याचे शेतकरी नेते सांगतात. सर्वत्र मोठ्या संख्येने लोकांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक राज्यातील लोक इच्छा करूनही दिल्ली आघाडीवर येत नाहीत, असे लोक त्यांच्याच राज्यात निषेध करीत आहेत.२३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिवसानिमित्त तरुण देशभरातून दिल्लीच्या आसपासच्या ठिकाणी धरणे धरण्यासाठी आलेत. शेतकरी चळवळीत महिला आणि पुरुष आधीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या संसदीय समितीने अत्यावश्यक वस्तू कायद्याची (ECAA) तातडीने अंमलबजावणी करण्याचा तीव्र निषेध केला. गरीब जनतेच्या अन्नसुरक्षेबाबत आणि शेतकऱ्यांची खरेदी वाढविण्याच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी नेते म्हणाले.कर्नाटकच्या शिमोगा येथे महापंचायतीनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी रविवारी अनेक ठिकाणी शेतकरी नेत्यांसमवेत बैठक घेतली. दक्षिण भारतात ही चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी एक रणनीती आखली गेली. या बैठकीत मंडी यंत्रणेच्या बळकटीकरणावर चर्चा झाली.

मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल १३० पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.गृह खात्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितले असते, तर त्या संदर्भातील पुरावा राहिला नसता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. लेखी पुरावा म्हणून मी पत्र लिहिले आहे. मेल केलेला होता. मात्र, त्यावर सही केली नव्हती, असेही सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर चौकशीला हजर होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय करावा, असे वाटत असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावेळेस परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर येत आहे.या याचिकेच्या माध्यमातून परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात विनंती केलेली आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या त्यांच्या बदलीसंदर्भात न्यायालयाने योग्य ती दखल घ्यावी. तसेच गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निष्पक्ष सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

कोलकाता - आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने अंतिम उमेदवार यादी जाहीर केली. मात्र नुकतेच भाजपचा झेंडा हाती धरलेले दिग्गज अभिनेते आणि माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना यादीत स्थान मिळालेले नाही. रासबिहारी विधानसभा मतदारसंघातून मिथुनदा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.मंगळवारी भाजपने जाहीर केलेली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची उमेदवार यादी अखेरची मानली जाते. यामध्ये १३ जणांची नावे आहेत. रासबिहारी मतदारसंघातून मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु तिथे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा यांना तिकीट देण्यात आले आहे. साहांनी महत्त्वाच्या काळात भारतीय सैन्यासाठी काश्मीरची खिंड लढवली आहे.मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतेच आपले मतदार कार्ड मुंबईहून कोलकात्याला ट्रान्सफर केले. त्यामुळे मिथुनदा रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली होती. नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांना टफ फाईद देणारे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी ३० मार्चला मिथुनदा प्रचार करणार आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रोड शो करण्याची चिन्ह आहेत.कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये सात मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.

मुंबई - सचिन वाझेला झालेली अटकेनंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली बदली, त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी टाकलेला लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमिवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत. त्यात पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्याचे पोलीस सहआयुक्त प्रशासन राजकुमार व्हटकर यांनी या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळी पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दल, विशेष शाखा, वाहतूक, संरक्षण व सुरक्षा सारख्या विभागात या बदल्या झाल्या आहेत.राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. या अधिकाऱ्याला गुन्हे शाखा इथून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने या अधिकाऱ्याची सुद्धा एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.राज्य पोलीस दलातील बदल्यांसंदर्भातील आरोपांविषयीचे त्यांच्याकडे असलेले दस्तावेज यावेळी फाडावीसांनी गृह सचिवांना दिले. या दस्तावेजांनुसार योग्य कारवाईचे आश्वासन गृह सचिवांनी दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळख असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा अलिकडील काळात समोर आलेल्या प्रकरणांमुळे नक्कीच खराब झाली आहे. या संक्रमणातून पोलीस दलाला बाहेर काढावे लागेल असे फडणवीस म्हणाले. यावेळी तत्कालीन डीआयजींनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांना याविषयी ब्रीफ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. मात्र, यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कुणाला वाचविण्याचा प्रयत्न या प्रकरणी झाला आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबई -
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा याकरीता भाजपा कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकालगत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहिना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले असल्याचे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. ही बाब फारच गंभीर असून महाराष्ट्र राज्याला आणि पोलिस खात्याला काळीमा फासणारी असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा याकरीता भारतीय जनता पार्टी, मालाड पश्चिम विधानसभा मंडळ अध्यक्ष सुनिल कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज (२३ मार्च) सकाळी ११ वाजता मालाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकालगत आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी युनुस खान, नरेन्द्र राठोड, नगरसेविका योगिता सुनिल कोळी, जया तिवाना, सेजल देसाई, मंडळ महामंत्री सुरेश मापारी, उदय चौघुले, मालाड मंडळ मंत्री हेमांग शहा, उपाध्यक्ष कोमल चौव्हाण तसेच प्रभाग अध्यक्ष प्रमोद पाटील, मंगेश चौधरी, जिग्नेश परमार, मुन्ना गुप्ता, अरविंद यादव, गुरुदयाल यादव यांच्यासह महिला आघाडी, युवा मोर्चा, कार्यकर्त्यांसह मालाडमधील विविध विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंडळ अध्यक्ष सुनील कोळी यांच्या नेतृत्वाखाली मालाड पश्चिमेकडील सर्व वॉर्डात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

मुंबई - मनसुख हिरेन हत्येप्रकरणात आरोपी असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एक डायरी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए)च्या हाती लागली आहे. या डायरीमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या पाच आलिशान गाड्या, ५ लाखांची रोख रक्कम, पैसे मोजण्याचे मशीन आणि डायरी ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ईडी उतरण्याची शक्यता आहे. वाझेंच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासातून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.मनसुख हिरेन यांची हत्या केल्याप्रकरणी नरेश रमणिकलाल गोर (वय ३१) आणि विनायक बाळासाहेब शिंदे (वय ५१) या दोघांना अटक केली आहे. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा मुंबईत बुकी म्हणून बेकायदेशीर धंदा करत होता. त्यानेच सचिन वाझेंना सिमकार्ड पुरवले आहेत. दुसरा आरोपी विनायक शिंदे हा पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी आहे. लखन भैया बनावट चकमकीप्रकरणी शिंदे आरोपी होता. शिंदे हा सचिन वाझेंसाठी पैसे गोळा करण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत शिंदेकडे ३२ बार आणि क्लबच्या नावांची यादी मिळाली आहे. त्यामुळे शिंदेच्या चौकशीतून मुंबई पोलिसांचे वसूलीचे रँकेट उघड होण्याची शक्यता आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे हे हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबत होते. याच हॉटेलमध्ये त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. म्हणून एनआयएच्या टीमने हॉटेलमधून महत्त्वाची माहिती गोळा केल्याचे समजते. 

मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहे.१०० कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी शिवदीप लांडे यांनी रविवारीच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती दिली होती. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे जाण्यापूर्वीच एटीएसने याप्रकरणाचा छडा लावला आहे. यानंतर सोमवारी एटीएसकडून पत्रकारपरिषद घेतली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. यावेळी मनसुख हिरेन हत्याप्रकरणाविषयी माहिती दिली जाऊ शकते.या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृहखात्याचे अधिकारीही उपस्थित राहतील. दुपारी चार वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

देहरादून - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. फाटक्या जिन्सवरुन केलेल्या विधानावर आधीच मोठ्या प्रमाणात टीका झालेली असताना रावत यांनी कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला का घालत नाही? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. विशेष म्हणजे त्यांनी नैनितालमधील सभेत भारतावर अमेरिकेने २०० वर्ष राज्यं केल्याचेही विधान केले होते.  त्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती. त्यातच त्यांच्या धान्यासाठी अधिक मुले जन्माला घालण्याच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या धान्यवाटप कार्यक्रमाविषयी बोलताना तिरथ सिंह रावत म्हणाले, “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळाले. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळाले. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवले आणि ते विकले.”“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण २० मुलांना जन्म का दिला नाही असेही तुम्हाला वाटत असेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष, कैलास विजयवर्गीय, बाबुल सुप्रियो, दिनेश द्विवेदी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आली तिथे भाजपने तातडीने जाहीरनाम्यातील घोषणांवर काम करायला सुरुवात केल्याचा दावा अमित शाह यांनी केला. आमच्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे आणि हे ‘सोनार बांग्ला’चे संकल्पपत्र असल्याचे शाह म्हणाले.“संकल्प पत्रात फक्त घोषणा नाहीत, तर संकल्प आहे जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा, देशात १६ पेक्षा जास्त राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा, हा संकल्प आहे त्या पक्षाचा जो सलग दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. या संकल्प पत्राचा मूळ उद्देश सोनार बांग्ला आहे”, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मच्छिमारांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीचा पैसा देण्याचं वचन भाजपने दिले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे :

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण

शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीद्वारे १८ हजार रुपये, त्यानंतर केंद्राचे वर्षाला ६ हजार रुपये, त्यात राज्याचे ४ हजार रुपये जोडून एकूण १० हजार रुपये

पहिल्या कॅबिनेटमध्ये बंगालमधील सर्व गरीबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ

मच्छिमारांना वार्षिक ६ हजार रुपये

 घुसखोरीवर पूर्णपणे लगाम लावला जाणार

 नागरिकता संशोधन विधेयक पहिल्या कॅबिनेटमध्ये लागू होणार

ओबीसी आरक्षणात समुहांना जोडले जाईल

 सर्व मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण

सार्वजनिक वाहतुकीत महिलांना मोफत प्रवास

भूमिहीन शेतकऱ्यांना वर्षाला ४ हजार रुपये

३ नवे एम्स रुग्णालय उभारले जाणार

 प्रत्येक परिवारातील कमीत कमी एकाला नोकरी

सातवा वेतन आयोग लागू करणार

 मुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत एन्टी करप्शन हेल्पलाईन

प्रत्येक घरात शौचालय आणि पिण्याचे स्वच्छ पाणी

 ११ हजार कोटी रुपयांचा सोनार बांग्ला फंड

विधवा पेन्शन १ हजार रुपयावरुन ३ हजार रुपये

गरीब आणि अनुसूचित जातीतील महिलांना विशेष शिष्यवृत्ती

 

गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या वतीने प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी रविवारी आसामच्या जोरहाटमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी आसामातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय प्रियंका गांधींनी नाझिरा आणि खुमताईमध्येही रॅलीला संबोधित करत विविध मुद्यांवर भाष्य केले.यावेळी बोलतांना गांधी म्हणाल्या की, 'आसाम सरकार आसाममधून नव्हे तर दिल्ली येथून चालविण्यात जात आहे. तर आसाममध्ये दोन मुख्यमंत्री असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. शिवाय "दिल्लीची परवानगी घेतल्याशिवाय आसाम सरकार काहीही करु शकत नाही. असा आरोपही यावेळी प्रियंका गांधी यांनी केला आहे.२०१६ मध्ये आसाम निवडणुकीपूर्वी भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनावर बोलताना प्रियांका म्हणाल्या की, "आधीच्या निवडणुकीत भाजपाने बरीच आश्वासने दिली होती. २५ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. शिवाय आसाम करारातील सहा कलम अंमलात आणू. जे आसामी संस्कृतीचे रक्षण करेल.मात्र त्यांनी तसे केले नाही. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नसल्याचेही बोलले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी उलट काम केले. असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.चहा बाग क्षेत्रातील लोकांची भाजपाकडून फसवणूकचहा बाग कामगारांना भाजपने काही खोटी आश्वासने दिली होती, असा गंभीर आरोप गांधी यांनी यावेळी केला आहे. सोबतच "चहा बाग कामगारांना भाजपने आश्वासन दिले होते की, त्यांची जीवनशैली उंचावण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. मात्र ज्या महिला मला भेटल्या त्यांनी मला सांगितले की, ' चहा बाग क्षेत्रातील आरोग्याच्या सोबतच त्यांच्या रोजच्या भाकरीसाठीही त्यांनी धडपड केली आहे. कारण सरकारने त्यांचे वेतन वाढविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाकडून खोटी आश्वासने देण्यात आल्याचेही यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये रविवारी मध्यरात्री नंतर सुरक्षारक्षक आणि दहशवाद्यामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. शोपियामधील मुनिहाल भागात आज सकाळच्या सुमारास त्यांचा खात्मा करण्यात आला.जम्मू-कश्मीरच्या शोपियांमधील मुनिहाल परिसरात सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी ही चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत ठार झालेल्या चार दहशवाद्यांपैकी दोन जन लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. चकमकीच्या ठिकाणी आणखी एक दहशवादी असल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांकडून अद्याप कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. बऱ्याच वेळा त्याचे चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. पण अभिषेकने याकडे दुर्लक्ष केले. पण आता अभिषेकने त्याच्या नावात बदल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने हे पाऊल त्याचा आगामी चित्रपट हिट होण्यासाठी उचलले असल्याचे म्हटले जात आहे.अभिषेकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदा केले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये अभिषेकने त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी Abhishek A Bachchan असे दिसत आहे. अभिषेकने त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पूर्वी अभिषेक असे नाव लिहित होता.अभिषेकने ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याचे नाव Abhishek A Bachchan असे लिहिले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावात बदल केल्यामुळे अभिषेकला करिअमध्ये फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. आता अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

मुंबई - जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या कोरोना काळातही पहिल्याच दिवशी चित्रपटाने दोन कोटी रुपये कमावले असल्याचा रिपोर्ट आहे. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वेळेतच चित्रपटाची लिंक लीक झाली होती.मुंबई सागाबद्दल बोलायचे तर, जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे, जो प्रसिद्ध गुंड अमर्त्यराव उर्फ ​​डीके रावच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. जॉन आणि इमरान व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही झलक आहे. व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणाले होते की, ‘मुंबई सागा’कडून कमाईची जास्त शक्यता आहे.संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला समजेल की मुंबई सागामध्ये फारसे नवीनपण काही नाही. त्याच्या जुन्या चित्रपटांप्रमाणेच पोलिस आणि चोर यांच्यातील गेम दिसेल. विजयची भूमिका इमरान हाश्मी आणि अमृत्य जॉन अब्राहमने साकारली आहे. जॉनला गॅंगस्टर बनवताना, दिग्दर्शकाने प्रथम अर्धा भाग टाकला आणि पोलिस त्याला कसे पकडू इच्छितात हे दाखवण्यात आले आहे. अर्जुनला गुंडांनी मारुन टाकल्यानंतर अमृत्य माफिया होण्याचा निर्णय घेतो.जॉन अब्राहमने सध्या सत्यमेव जयते २ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जॉन शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत पठाण चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इम्रानबरोबर अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील.

मुंबई -  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ मोटारीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. सरकारच्या दणक्याने पोलीस दल हादरले असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व घडामोडींवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपास करताना आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या, अशी कबुली देत गृहमंत्री देशमुख या सर्व घटनाक्रमावर बोलले.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, असे देशमुख यांनी नमूद केले. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून एका गुन्ह्याचा तपास एनआयए करत आहे, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास एटीएस करत आहे. या चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. यात कोणत्याही दर्जाचा अधिकारी दोषी आढळला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. चौकशीत ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या माफ करण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आयुक्तांच्या बदलीचा निर्णय घेतला. चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणूनच हे पाऊल उचलले, असेही देशमुख यांनी पुढे स्पष्ट केले. त्याआधी मी राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.सचिन वाझे यांच्या अटकेने मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच हे प्रकरण गांभीर्याने घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशमुख यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात पोलीस दलात खूप मोठे बदल करण्यात आले. परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.‘सचिन वाझे प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’ योग्य प्रकारे करत आहेत, त्यानुसार कारवाई केली जाईल असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, वाझे वापरात असलेल्या मर्सिडीज गाडीतून हस्तगत करण्यात आलेली पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, कपडे आणि ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्यांबाबत चौकशी सुरू आहे.

मुंबई - जळगाव पालिकेत शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आणि सांगली महापालिके प्रमाणे जळगावातही भाजपाचा करेक्ट कार्यक्रम झाला. त्याच प्रमाणे आमचा कार्यक्रम मुंबईत गेल्या पंचवीस वर्षापासून परफेक्ट कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम बदलणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केले तरी त्याठिकाणी आमचा कार्यक्रम होणार नाही. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल, मुंबईवर भगवा फडकतो आहे आणि तो फडकतच राहणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.कोरोना लसीचा तुटवडा आणि पुरवठा करण्यावरून भाजपाकडून महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात आहे. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. एकाबाजूला कोरोना वाढतो म्हणून बोंब मारतात, मात्र केंद्राकडून कोणतही सहकार्य केले जात नाही. कारण महाराष्ट्रात सध्या निवडणुका नाहीत, आणि निवडणुका झाल्या तरी भाजपाला यश मिळणार नाही, म्हणून केंद्राकडून राज्याला लसींचा पुरवठा होत नाही, असा आरोप आणि टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकार व राज्यातील भाजप नेत्यावर केली.सांगली आणि जळगावात जे घडले ते सगळीकडे घडायला सुरुवात झाली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता होती म्हणून सगळीकडे यश मिळायचे. मात्र आता राज्यात इतरही ठिकाणी सांगली जळगावसारखा करेक्ट कार्यक्रम होईल असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.वाझे प्रकरणात केंद्राने एनआयला पाठवले, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस दिली जात नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की या प्रकरणी केद्राला कशी लस द्यायची आम्हाला चांगले माहिती आहे, असे म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केले. तसेच वाझे प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होवू द्या, एनआयए तर आलीच आहे आता सीआए किंवा केजीएफला बोलवा म्हणावे, असा टोलाही राऊत यांनी लगवाला.

ठाणे - नवी मुंबईमधील विविध परिसराचा विकास व्हावा, येथील नागरिकांचे जीवनमान उंचावे, येथील परिसर औद्योगिकदृष्टया विकसित व्हावा, या दृष्टीकोणातून महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई परिसरात १७ मार्च १९७० रोजी सिडको महामंडळची स्थापना केली. मात्र, या सिडकोनेच येथील स्थानिक भुमीपुत्रांवर नेहमी अन्याय केल्याने रायगड जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई परिसरातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमीपुत्र यांनी १७ मार्च हा सिडकोचा स्थापना दिन असल्याने काळा दिवस म्हणून पाळला. तसेच या निमित्ताने सिडको महामंडळ बरखास्त करा, अशी मागणीही स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने करण्यात येत आहे.या १७ मार्च २०२१ रोजी सिडकोच्या स्थापनेस ५१ वर्ष होत असून १७ मार्च २०२१ रोजी सिडकोच्या स्थापनेचा दिवस हा प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यातील काळा दिवस मानून नवी मुंबईतील ठाणे जिल्हा, पनवेल व उरण येथील सिडकोबाधित ९५ गावांतील भूमिपुत्र, नैना प्रकल्प, एस्.ई.झेड, जे.एन.पी.टी, विरार अलिबाग कॉरिडोर, विमानतळबाधित शेतकरी व मच्छीमार, एम.आय.डी.सी, लॉजिस्टिक्स पार्क या सर्वांनी बाधित झालेले भूमिपुत्र यांनी  संबंधित सर्व नियमांचे, सुरक्षित अंतराचे पालन करून आपापल्या घरी तसेच गावातील प्रमुख ठिकाणी हातात निषेधाचे फलक घेऊन सिडकोचा निषेध केला. १७ मार्च २०२१ रोजी सिडकोची स्थापना झाल्यापासून गेल्या ५१ वर्षात हे सर्व भूमिपुत्र आपल्या न्याय मागण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत असून त्यांच्यावर अन्याय करणारे सिडको महामंडळ बरखास्त करा, अशी मागणी यानिमित्ताने सर्व भूमीपुत्रांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

भूमिपुत्रांना एकरी पंधरा हजार रुपये दिलेल्या सिडकोने एक महिन्यापूर्वी सानपाडा येथील भूखंड एका चौरस मीटरला २ लाख ६१ हजार म्हणजे गुंठ्याला २ कोटी ६१ लाख म्हणजे एका एकरला जवळ जवळ ९० कोटी रुपये किमतीला विकला आहे. सर्व भूमिपुत्रांच्या जमिनी निरनिरळ्या प्रकल्पांसाठी कवडी मोलाने संपादन करून त्या विकायचा धंदा सिडकोने केला आहे, असा आरोपही नवी मुंबई उरण पनवेलमधील भूमिपुत्र करीत आहेत.

ठाणे -  पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी एकमेकांना केल्याचे दिसून आले. एखाद्या गल्लीतील गुंड बोलतात तशी भाषा नागसेवक करत होते. जाहीर दमबाजी या शाब्दिक चकमकीमुळे वाद वाढत असल्याचे लक्षात घेऊन अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थी करून हा वाद मिटविला.ठाणे पूर्व परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मलवाहिनी आणि पाणीपुरवठय़ासंबंधीचे काम सुरू आहे. या कामावरून शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन सभेत शिवसेना नगरसेविका मालती पाटील आणि भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्यात वाद झाला. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामामध्ये जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी सांगितले, तर ही कामे शिवसेना नगरसेवकांमार्फत सुरू असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण हे नागरिकांना सांगत असून यामुळेच आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा शिवसेना नगरसेविका मालती पाटील यांनी केला. यावरूनच पाटील आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद रंगला असतानाच या वादात सभागृह नेते अशोक वैती यांनी उडी घेतली. महिला सदस्याशी बोलताना व्यवस्थित बोला, अशी सूचना वैती यांनी केली. यावरून वैती आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान ‘महापालिका इमारतीखाली ये बघतोच तुला..’ असे वैती यांनी चव्हाण यांना म्हटले, तर ‘इमारतीखाली नाही तर तुझ्या घरी येऊन बघेन..’ असे प्रतिउत्तर चव्हाण यांनी वैती यांना दिले. या जाहीर दमबाजीनंतर दोन्ही नगरसेवकांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

ठाणे - महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी पाच महिन्यांपूर्वी पालिका मुख्यालय इमारतीत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या १७ नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळून भाजपला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर आक्षेप घेत भाजप नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी पालिकेतील डुम्बरे यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घालून जाब विचारला होता. याप्रकरणी भाजपने केलेल्या मागणीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल केला होता. करोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर आता पालिकेचे सुरक्षारक्षक सूर्यकांत पौळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी आता भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान या नगरसेवकांनी सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनामुळे करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.

ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर भाजप गटनेते मनोहर डुम्बरे यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी डुम्बरे यांना नोटीस बजावून १५ दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, आशा शेरबहादूर सिंग, नारायण पवार, नंदा पाटील, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड आणि अशोक राऊळ यांचा समावेश आहे.

भिवंडी - जंगलात गेलेल्या एका आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुशीला दिघे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. बकऱ्या चरण्यासाठी गेली होती जंगलातभिवंडी तालुक्यातील काटई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगरपाडा मांगत पाडा मृतक आदिवासी महिला पतीसह राहत होती. गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलार गावाजवळील जोगमोरी या जंगल परिसरात गेली होती. मात्र महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मित निधन म्हणून करण्यात येत असतांना महिलेच्या नातेवाईकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला असता अखेर शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात केली. घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळून आली असून अंगावरचे दागीने व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यामुळे महिलेवर शारिरीक अत्याचार करून सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई - करोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणाऱ्या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या करोना लाटेशी दोन हात करण्यासाठी तयार झालेली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाली असून एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडे करोना रुग्णांची काळजी अशा दुहेरी पातळीवर ही प्रशासने कार्यरत आहेत. नवी मुंबई व पनवेल पालिका आणि उरण नगरपालिकेवर सिडको या महामंडळाचा वरदहस्त असून सिडकोने नवी मुंबईसाठी वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्र मोफत दिले आहे. पालिकेने या ठिकाणी राज्यातील एक अद्ययावत व सुसज्ज असे कोविड काळजी केंद्र उभारलेले आहे. त्या ठिकाणी एक हजार २०० रुग्णांची काळजी घेतली जात आहे. या कोविड काळजी केंद्राबद्दल अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त केले असून येथील उपचाराबद्दल रुग्णांनी प्रशासनाकडे कौतुक केले आहे. याच रुग्णालयात ७५ रुग्णशय्या या अत्यवस्थ रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात २०० रुग्णांवर उपचार होणार असून यातील ८० रुग्णांसाठी अत्यवस्थ रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयाचे एक तयार रुग्णालयात सर्व  वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून ७५ रुग्णांवर कोणत्याही क्षणी उपचार होऊ शकणार आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या वर्षी पन्नास हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार झालेले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० ते ३० जणांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करणारी सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. गृह अलगीकरणातील रुग्णांवर पाळत ठेवली जात असून त्यांच्या इमारती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांसाठी तुर्भे येथील निर्यात भवन व राधा स्वामी सत्संग सभागृह तयार ठेवण्यात आले आहे. वाढत्या रुग्णांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने हजारो मुखपट्टी न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून एक कोटीपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे. पालिकेच्या या तयारीबरोबरच नवी मुंबईत रिलायन्स, अपोलो, एमजीएम, फोर्टिज, डी. वाय. पाटीलसारखी अद्ययावत व आधुनिक रुग्णालये मुंबईनंतर नवी मुंबईत आहे. याशिवाय २००पेक्षा जास्त खासगी रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेत नवी मुंबई वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करू शकलेली आहे. आता या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात करोना रुग्णांचे प्रसार केंद्रावर लक्ष ठेवले जात असून लसीकरण वेगात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांबरोबरच ३७ ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे. याशिवाय १५ खासगी रुग्णालयात ही सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. कडक निर्बंध लादून पालिका या दुसऱ्या लाटेवर आरूढ होण्यासाठी तयार असून एक विशेष वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.


मुंबई - सायन रेल्वे स्थानकावर आपण रेल्वे टीसी असल्याचे सांगत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोगस टीसीचा प्रकार कुर्ल्याचे वरिष्ठ तिकीट तपासनीस सिकंदरजित सुखदेव सिंग यांनी निदर्शनास आणून दिला आहे. या बोगस तिकीट तपासकाचे नाव सुमित ठाकूर असून, तो स्वत:ला टीसी असल्याचे सांगून संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही उकळत होता.मध्य रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासक सिकंदरजित सुखदेव सिंग सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकावरून ड्युटी संपवून आपल्या निवासस्थानी जात होते. यादरम्यान सायन रेल्वे स्थाकानांवर उतरले असताना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक अनोळखी इसम तीन इसमाना पकडून घेऊन जाताना दिसले. तेव्हा सिकंदरजितला त्या तिकीट तपासकावर संशय आला. त्यांनी वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा चित्रा वाकचौरे यांनी बनावट टीसीला याबाबत विचारपूस केल्यावर, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. तसेच या बनावट टीसीच्या खिशाला सीआरएमएसचे कार्ड होते. त्याबाबत बोगस टीसीला विचारले असता, त्याने मध्य रेल्वेमध्ये कामाला असल्याचे सांगितले.त्यानंतर ओळखपत्र दाखवण्याबाबत विचारले, असता त्याने दाखविलेले ओळखपत्र हे एका खाजगी कंपनीच्या हाउसकीपिंगचे होते. त्यानंतर वरिष्ठ टिकीट तपासक चित्रा गणेश वाकचौरे यांनी या तिन्ही इसमांना दादरच्या लोहमार्ग पोलिसांकडे घेऊन गेले.बनावट टीसीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तेव्हा पोलीसांनी केलेल्या चौकशीत बनावट टीसीचे नाव सुमित मनोहरलाल ठाकूर असून तो मध्य रेल्वेत हाउसकीपिंगचे काम करतो. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. स्वत:ला टीसी असल्याचे सांगून तो, संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही घेत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसने क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावले आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची लीड मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे.मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावले होते, असे त्यांनी सांगितले होते.दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे निलंबित API सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर असणार आहेत. आसाममध्ये या महिनाअखेरीस विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. यासाठी राहुल काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.शुक्रवारी राहुल लाहौल आणि दिब्रुगढमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट घेतील. त्यानंतर ते दिंजॉय आणि पानितोलामधील चहाच्या मळ्यांना भेट देतील. त्यानंतर सायंकाळी तिंसुकियामध्या त्यांची प्रचारसभा पार पडेल. राहुल यांच्या प्रचारयात्रेनंतर प्रियांका गांधीही आसाममध्ये प्रचारासाठी दाखल होणार आहेत. या दोघांनी यापूर्वीही आसामला भेट दिली आहे.१५ वर्षे आसाममध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला २०१६ मध्ये भाजपाने धक्का दिला होता. गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे. तर, दुसरीकडे हातातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल.काँग्रेसची महाआघाडी..आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. १२६ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल. २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर, २ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

भोपाळ - देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढत आहे. विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल २५ हजार ८३३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. अशावेळी मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर २० मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी मध्य प्रदेशात कोरोनाचे ९१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या २ लाख ७१ ङजार ९५७ झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या ६ हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारोच्या संख्येनं रुग्ण वाढत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत २० मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात. बसेसवर घालण्यात आलेली बंदी कधीपर्यंत असेल हे परिस्थिती पाहून ठरवण्यात येईल, असे मध्य प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले आहे.देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक केले आहे. कर्नाटक सरकारने माहाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.केवळ ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

मुंबई - मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला. आता या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान मुंबई, इंदुर, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी छापे टाकून ईडीने निवासी, व्यावसायिक व इतर प्रकरणातील ३२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूवी या वाहिन्यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तब्बल ४६ कोटी रुपयांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात या वाहिन्यांच्या विरोधात ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे.ईडीने केलेल्या तपासात, बॅरोमीटरच्या माध्यमातून टीआरपीमध्ये फेरफार करून फक्त मराठी, महा मुवी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा टीआरपी हा वाढवण्यात आला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी १ हजार ८०० बेरो मीटरचा वापर करण्यात आलेला आहे. तर, देशभरात जवळपास ४४ हजार बॅरोमीटर वापरण्यात येत आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांसाठी काही घरात टीआरपी फेरफार करणारे बॅरोमीटर लावण्यात आले होते. ज्यामुळे या दोन वाहिन्यांचा टीआरपी पंचवीस टक्क्याहून अधिक दाखवण्यात आलेला होता.टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क) ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बार्क काम करत असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात येते. मुंबईत १ हजार ८०० हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. यात फेरफार झाल्याचा आरोप आहे. टीआरपीसाठी निवड करण्यात आलेल्या कुटुंबीयांना काही ठराविक काळात एखादीच वाहिनी सुरू करून ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यासाठी त्यांना पैसे दिले जात असल्याचे तपासात पुढे आले.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. ममता यांनी झाडाग्राम इथं २ प्रचार रॅली केल्या आणि त्यानंतर लगेच त्या कोलकाता इथे परतल्या. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ममता यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात रेशन, पेन्शन आणि 

तृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणा –

१८ वर्षाच्या विधवेला १ हजार रुपये विधवा पेन्शन दिली जाणार

घरोघरी रेशन पोहोचवलं जाणार, सध्या राज्य सरकार नि:शुल्क रेशन देत आहे.

पुन्हा सत्तेत आल्यास विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना १ हजार रुपये दिले जाणार

ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गातील लोकांना प्रति वर्षी १२ हजार रुपये दिले जाणार

सामान्य परिवारातील लोकांना प्रति महिना ५०० रुपये

अनुसूचित जाती आणि जमातीच्या परिवारातील मोठ्या महिलेला १ हजार रुपये दिले जाणार

शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. पण आता १० हजार रुपये दिले जाणार

१० लाखाचे क्रेडिट कार्ड विद्यार्थ्यांना दिले जाणार

मंडल आयोगानुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करुण घेण्यासाठी आयोगाची स्थापना होणार

उद्योगांच्या विकासावर भर दिला जाणार

विद्यार्थी, महिला आणि युवकांना सुरक्षा दिली जाणार

 टॅब आणि सायकलसाठी १० हजार रुपये दिले जाणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर TMCकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. अधिकारी यांचे नंदीग्राम आणि हल्दिया अशा दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याचा आरोप आहे.तत्पूर्वी, शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही एक आरोप केला होता. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यावरील काही गुन्हे लपवल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. त्यानंतर आता TMC कडून अधिकारींवर दोन मतदारसंघातील मतदार यादींमध्ये नाव असल्याचा आरोप केला. तसेच निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणीही TMC कडून करण्यात आली आहे. इतकच नाही तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून अधिकारी यांचे नाव वगळण्याची मागणीही TMCने केली आहे.

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये सध्या हायराईझ इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू आहे. याबाबत नागरिकांना आवाहन करूनही कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले जात नाही, असे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' या हॉटेलवर महापालिकेने रात्री धाड टाकली. त्यावेळी तेथे विनामास्क असलेल्या २४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हॉटेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या पंधरा दिवसात दर दिवसाला १ हजार ५०० ते २ हजार ३०० रूग्ण आढळले आहेत. रूग्ण संख्या वाढण्याची भीती असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. त्यानंतरही नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. नागरिक गर्दी करतात अशा बार, हॉटेल, पब, रेस्टोरंट, लग्न समारंभ आदी ठिकाणी पालिकेने धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. या धडीदरम्यान विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच ५० टक्के क्षमतेची परवानगी असताना जास्त नागरिक आढळून आल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयातर्फे काल (बुधवारी) रात्री ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २४५ लोक विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

भाटापारा - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.येथील राजकीय वातावरण तापले असताना राजकारणाला हिंसक वळण आले  आहे. भाटापारामधील भाजपचे खासदार अर्जून सिंह यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. हे बॉम्ब हल्ले बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाले आहेत.भाजपचे खासदार अर्जून सिंहअ यांच्या घराजवळ हे बॉम्ब हल्ले झाल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही भाजप खासदार सिंह यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी तपास करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरून हिंसक राजकारणाला सुरुवात झाल्याचे चित्र या घटनेवरून समोर येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. अर्जून सिंह हे बैरकपूरचे खासदार आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात जवळपास १२ ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणी हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये पंतप्रधान मोदींची प्रचारसभा पार पडणार आहे. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, की संपूर्ण बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे. भाजपाचे सुशासन पश्चिम बंगालमध्ये आणण्याचा बंगालमधील लोकांचा निर्धार आहे.

मुंबई - अंबानी यांच्या घराकडे स्कॉर्पियो गाडीत स्फोटक जिलेटीन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री १२ च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.अंबानी यांच्या घराकडे स्कॉर्पियो गाडीत स्फोटक पदार्थ प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.

शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले. सचिन वाझेंची शिवसेनेकडून करण्यात येत असलेली पाठराखण आणि हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेले अपयश यामुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वजण काम करत आहेत. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो, असे पवार म्हणाले.


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget