April 2021

जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी त्यांच्या पत्नी सुनिता गहलोत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर गहलोत यांनी कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नसून, प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. तसेच, आपण सध्या विलगीकरणात असून, आपल्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यासोबतच, विलगीकरणातूनच आपण सर्व कामकाज सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन २४ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे.मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. त्याने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावे. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.मनसुख हिरेन यांना भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला. मनसुख यांना दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केले. ज्यामध्ये विनायक शिंदे होता. त्यानेच मनसुख यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले. त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरु केला, जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखचे शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळावे आणि तपासाची दिशा भरकटली जावी. सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास एनआयएकडून सध्या केला जात आहे. एटीएस या प्रकरणात तपास करत असतानाच सुनील मानेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करणार होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र त्यापूर्वीच तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश आले होते.

सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. सुनील मानेला २३ एप्रिलला एनआयएने अटक केली आहे.

अकोला - माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त व सध्याचे राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अकोला शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अकोला पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या बी. आर घाडगे या पोलीस निरीक्षकाने परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. या तक्रारीत या पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.मुख्यमंत्री ठाकरेंना लिहले होते पत्रपोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पत्रामध्ये घाडगे यांनी २०१३ मध्ये कल्याण मधील एका गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडून दबाव टाकला गेल्याचा आरोपही केलेला आहे. परमबीर सिंह यांनी सांगितल्या प्रमाणे आपण काम केले नाही, म्हणून आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी केलेला आहे.परमबीर सिंह यांच्या बरोबर इतर ३२ जणांच्या विरोधातसुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बी आर घाडगे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये ते शेड्युल कास्ट- शेड्युल ट्राईब समाजातून येत असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता असाही आरोप करण्यात आला आहे.

ठाणे - मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे भांडुप, विरार पाठोपाठ याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत दगावलेल्या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर स्थलांतर करताना उपचार न मिळाल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांपैकी जनरल वॉर्डमध्ये १४ तर आयसीयूमध्ये सहा रुग्ण होते. ठाणे मनपाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

मृतांची नावे..

यास्मीन सय्यद (४६) नवाब शेख (४७) हलिमा सलमानी (७०) हरीश सोनावणे (५७)

प्राईम रुग्णालयात आगीची घटना घडली त्यावेळी २० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र त्यातच आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली आहे.

रांची - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामिन मिळून दहा दिवस उलटले तरी त्यांची अजून तुरुंगातून सुटका झालेली नाही. झारखंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संखया वाढल्यानंतर बार काऊन्सिलने काही दिवसांसाठी न्यायालयीन कामकाजाच्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे बार काऊन्सिलकडून पालन केले गेले आहे. निर्बंध शिथील होऊन बार काऊन्सिलचे काम ३ मे रोजी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी लालूप्रसाद यांना तुरुंगाबाहेर पडण्याची संधी मिळणार आहे.लालूप्रसाद हे कोट्यवधींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना नुकताच झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे ते तुरुंगातून प्रत्यक्ष बाहेर पडू शकलेले नाहीत. न्यायालयाने त्यांना दुमका ट्रेजरी प्रकरणात १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याचवेळी त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या काही शर्थी-अटीनुसार मंजुरीविना त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही.देशाच्या इतर भागांप्रमाणेच झारखंडमध्येही कोरोनाच्या रुग्णसंखयेत मोठी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील सर्व प्रशासनाची चिंता वाढली. याच पार्श्वभूमीवर झारखंड बार काऊन्सिलने संपूर्ण राज्यातील वकिलांना २ मेपर्यंत सर्व प्रकारच्या न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये लालूप्रसाद यांच्या जातमुचलक्याची रक्कम भरण्याची तसेच त्यांच्या सुटकेच्या आदेशाची प्रत घेण्याची कार्यवाही पूर्ण होऊ शकलेली नाही. सीबीआय न्यायालयाने त्यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावली होती. लालूप्रसाद यांनी तुरुंगवासाच्या शिक्षेचा निम्मा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. लालूप्रसाद यांना याआधी चारा घोटाळ्याशीच संबंधित असलेल्या चाईबासा आणि देवघर प्रकरणात जामीन मिळाला आहे.

नवी दिल्ली - कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान १८ वर्षांवरील सर्व लोकांना १ मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी २८ एप्रिल बुधवारपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केले. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे.आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारने लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आहे.१ मेपासून वय वर्षे १८ हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती २४ एप्रिलपासून सुरू होईल, असे सांगण्यात येत होते. पण सरकारने  २४ नव्हे तर २८ तारखेपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता https://selfregifications.cowin.gov.in/.

कोरोना लस नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू होईल आणि या लस देण्यास १ मेपासून सुरुवात होईल. १८-४५ वर्षे वयोगटातील लोकांना भेटीशिवाय लसीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे १८ अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा ​​आदेश देण्यात आला आहे.पीआयबीने सरकारच्या वतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.पोर्टलवर नोंदणीचा ​​एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.

येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.

तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो १८० सेकंदात टाईप करावा लागेल.

नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.

आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.

या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या

नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.

यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.

केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.

“तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.

पुणे - परमबीरसिंग यांच्या पत्रावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी केली. त्यानुसार एफआयआर दाखल करून छापे मारले. त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी पुण्यात बोलत होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांचीही राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली चंद्रकांत पाटील म्हणाले, एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावरून उच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. त्याच प्रकारचे गंभीर आरोप सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर केले आहेत. अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या ५० कंत्राटदारांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केला होता. वाझेला महाविकास आघाडी सरकारनेच निलंबन रद्द करून पुन्हा पोलीस सेवेत आणले होते. त्यावर परब यांनी खुलासा केला असला तरी सीबीआय चौकशी झाल्यानंतरच त्यातील सत्य बाहेर येईल. वाझे याच्या पत्रात घोडावत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. घोडावत याचीही सीबीआय चौकशी करावी. काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत. हे फार दिवस चालणार नाही, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई चालू आहे, तरीही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपाचे कारस्थान म्हटले आहे. मुश्रीफ यांचे हे विधान उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. परमबीरसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण गंभीर आहे असे सांगत आधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्याच्या विरोधात अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाचा संबंध कोठे येतो? त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भाजपवर केलेले आरोप हास्यास्पद आहे, असेही पाटील म्हणाले. 

 

मुंबई - राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षांपर्यंतचे लसीकरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आमदार निधीतून १ कोटी रूपये लसीकरणासाठी वापरावेत, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहे. राज्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मुंबई शहरासह उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचे धोरण शासनाने आखले आहे. मात्र, लस मोफत न मिळाल्यास गरीब व दुर्बल घटकांतील व्यक्ती वंचित राहतील. ही बाब विचारात घेऊन, मुंबादेवी विधानसभा आमदार संघातील १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींच्या मोफत लसीकरणासाठी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना आमदार निधी चार कोटी रूपयांपर्यंत वाढवून दिला आहे. त्यातील एक कोटी रूपये हे कोरोना संदर्भात वापरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार आपला एक कोटींचा निधी लसीकरणासाठी वापरावा अशी विनंती आमदार अमीन पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाबाबत राज्याला धोरण ठरवायचे आहे. कॅबिनेटमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले होते. तसेच ज्यांना परवडेल त्यांनी लस विकत घ्यावी, असा सल्लाही दिला होता. राज्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी पुढाकार घेतल्यास सरकारवर भार कमी होईल, असे आमदार पटेल म्हणाले.

नवी दिल्ली - देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल यावरून मते मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितले. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी करोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले असून, ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स ब्लॉक करण्याच्या कारवाई बद्दल ट्विटरकडून जाहीरपणे भाष्य करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर कोणते विशिष्ट ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आणि का ब्लॉक करण्यात आले याबद्दलही ट्विटरने काहीही म्हटलेले नाही. ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंट धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचे ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.ट्विटरकडून कारवाई करण्यात आलेले ट्विट्स देशातील करोना औषधी आणि आरोग्य सुविधांची वाणवा याबद्दल भाष्य करणारी होती. औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाबद्दलची होती. तर काही ट्विट्स हरिद्वारमधील कुंभमेळ्याबद्दलची होती. देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना होत असलेल्या कुंभमेळ्याबद्दल भाष्य करणारे ट्विट्सही ब्लॉक करण्यात आले आहेत. मात्र, जे ट्विट्स परदेशातून करण्यात आले आहेत, ते अजून दिसत असून, भारतातून करण्यात आलेले ट्विट्स मात्र डिलीट करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - कोविड १९ ची दुसरी साथ मध्यावर असून सुनामीसारखी ती वाढत आहे, त्यासाठी केंद्राने काय तयारी केली आहे, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केली असून येथील रुग्णालयांच्या प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला फासावर चढवू, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.न्या. विपीन सांघी व न्या.रेखा पल्ली यांनी दिल्लीतील विविध रुग्णालयांनी दाखल केलेल्या याचिकांवर तीन तास सविस्तर सुनावणी करताना कठोर भूमिका घेतली आहे.  न्यायालयाने म्हटले आहे की, या विषाणूजन्य आजाराने मृत्युदर खरेतर कमी आहे,पण ज्यांच्यात प्रतिकारशक्ती नाही ते बळी जातात, हे खरे असले तरी ज्या लोकांना वाचवणे शक्य आहे तेही मरत असतील तर तो प्रश्न गंभीर आहे. आताच्या परिस्थितीत मृत्युदर कमी झाला पाहिजे. कानपूर येथील आयआयटी वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा हवाला देऊन न्यायालयाने सांगितले, की कोविड लाटेचे शिखर मे महिन्याच्या मध्यावर गाठले जाणार आहे. आम्ही त्याला लाट म्हणत असलो तरी ती प्रत्यक्षात सुनामी असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी, लशी, ऑक्सिजन या पातळ्यांवर काय तयारी केली आहे हे सांगावे. केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांनी २६ एप्रिलपर्यंत याबाबत अहवाल सादर करावा. कारण पुढची सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे. राजधानीत ऑक्सिजन, खाटा, श्वासनयंत्रे, वैद्यकीय कर्मचारी व औषधे यांचा पुरवठा योग्य प्रमाणात असायला हवा.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले, की मे व जून महिन्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून देशाने वाईटात वाईट परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. पंतप्रधान व इतर काही जण यावर काम करीत आहेत. त्यांनी ऑक्सिजन आयात करण्याची तयारी केली आहे. कुठल्या पद्धतींनी ऑक्सिजन तयार करता येईल याचे मार्ग शोधले जात आहेत.महाराजा अग्रसेन रुग्णालय, जयपूर गोल्डन रुग्णालय, बत्रा  रुग्णालय, सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालय यांनी ऑक्सिजनपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याबाबत याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायालयाने सांगितले, की तुम्ही काळजी करू नका, जो कुणी ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणील त्याला आम्ही फाशी देऊ. कुणालाही सोडणार नाही. दिल्ली सरकारने आम्हाला केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनातील एखाद्या व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणल्याचे दाखवून द्यावे आम्ही त्याला सोडणार नाही असे न्यायालयाने  म्हटले आहे. कुणी स्थानिक अधिकाऱ्यांनी असे केले तरी निदर्शनास आणावे, असेही न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले आहे.दिल्ली सरकारने असे म्हटले आहे, की त्यांना दिवसाला केवळ ३८० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज मिळत आहे. शुक्रवारी ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काय उपाय केले याची विचारणा यावर न्यायालयाने केली आहे. सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सांगितले, की याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठादार व फेरभरण करणाऱ्या संस्था यांना असे आदेश दिले, की त्यांनी दिल्लीतील विविध रुग्णालयांना किती ऑक्सिजन पुरवला याची माहिती समन्वय अधिकाऱ्यांना द्यावी. कारण यात पारदर्शकता असली पाहिजे. प्रत्येक रुग्णालयाला केव्हा व किती ऑक्सिजन पुरवला याचा तपशील देण्यात यावा. दिल्ली सरकारने रुग्णालयांशी व शुश्रूषा गृहांशी संपर्क ठेवण्यासाठी १० आयएएस अधिकारी व २८ डीएएनआयपी अधिकाऱ्यांचा चमू तयार करावा. दिल्लीला रोज ४८० मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा मिळणार हे स्पष्ट करावे. २१ एप्रिलला तो उपलब्ध होईल असे सांगण्यात आले होते. आम्हाला निश्चित तारीख हवी आहे. दिल्लीतील लोकांना अशा प्रकारे मरू देता कामा नये.

पणजी - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारवर केवळ टीका करण्याऐवजी काही मार्गदर्शक सुचना दिल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. ज्याचा व्यवस्थापनाकरिता उपयोग होईल, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकियांना केले.डॉ. सावंत यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता कोविड नियंत्रणासाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी राज्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.यावेळी डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू खूप दु:खदायक आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. त्याला जनतेकडून सहकार्य आवश्यक आहे. ज्यांना लक्षणे दिसतात अशांनी वेळीच तपासणी करून घरी अलगिकरणात रहावे. तर ज्यांना शक्य नाही अशांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे. संक्रमण रोखण्यासाठी सरकारने विविध निर्बंध लागू केले आहेत. मात्र, लॉकडाऊन हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही.लॉकडाऊनमुळे काय झाले हे मागील वर्षी सर्वांनी अनुभवले आहे. त्यामुळे काहींना रोजगार गमावावा लागला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोरोना पुढील महिने राहणार आहे. अशावेळी त्याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर बाळगून लोकांनी गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले. सावंत यांनी शनिवारी सकाळी खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. तसेच जे कोणी यामध्ये सहकार्य करण्यास इच्छुक आहेत, अशांनी पुढे यावे, असे आवाहन करतानाच डॉ सावंत म्हणाले, गोव्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख लोकांना लस घेतली आहे. तर सर्वच नागरिकांना मोफत लस देण्यासाठी कोविशिल्ड लस सरकारने मागवली आहे. लोकांनी लस घेऊन मृत्यू दर कमी करण्यासाठी सहकार्य करावे. मुख्यमंत्री म्हणून पदाचा ताबा घेतल्यानंतर राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे लक्ष निर्धारित केले आहे, असे सांगून डॉ सावंत म्हणाले, शेती, फलोत्पादन, दुग्धोत्पादन यामध्ये तर सध्या स्वयंपूर्ण बनण्याचे लक्ष आहे. त्यामुळे 'व्होकल फॉर लोकल' उपक्रम राबविला जात आहे. म्हादईचा लढा जिंकण्याचा विश्वास आहे. तसेच खाण महामंडळ स्थापन करून खाण उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, प्लाझ्माची आवश्यकता विचारात घेता राज्यांनी पुढे यावे. त्यांना आवश्यक सहकार्य आणि प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगून डॉ सावंत यांनी कोविड रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या गोव्यातील सध्या तीन रुगणालयांचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले. तसेच गोव्यात दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीला मंजूरी दिल्याबद्दल आणि सहकार्यासाठी केंद्र सरकारचे आभार मानले. यामधील पहिला प्लांट पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. त्याबरोबरच वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन १५ मे पर्यंत नव्याने उभारलेल्या सुपरस्पेशलिटी इस्पितळाचे कोविड रुग्णालयात रुपांतरण करून तेही कार्यान्वित केले जाईल, असेही ते म्हणाले.

देहरादून - उत्तरखंडच्या चामोलीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. भारत-चीन सीमेजवळ सुमना क्षेत्रात आयटीबीपीच्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाले. ही दुर्घटना शुक्रवारी (२३ एप्रिल) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत ४३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. तर अजूनही ४०० ते ५०० लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.लष्कराच्या माहितीनुसार सुराई ठोसा येथून मलारी क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर हिमस्खलन झाले. बचावकार्यादरम्यान आठ मृतदेह जवानांना सापडले. दुसरीकडे जखमींना तातडीने वायूसेनेच्या हेलिकॉप्टद्वारे जोशीमठे येथील सेनेच्या रुग्णालयात नेले आहे. संबंधित दुर्घटना ज्या भागात घडली त्या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून लगातार मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घटनास्थळापासून अवघ्या काही ठिकाणावर जवानांचे कॅम्प आहेत.उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचेदेखील घटनास्थळाकडे पूर्ण लक्ष आहे. त्यांनी हेलिकॉप्टद्वारे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचनाही दिल्या.“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सुमना येथील हिमस्खलनाच्या घटनेची गंभीरतेने दखल घेतली. त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करुन उत्तराखंडला पुरेपूर मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आयटीबीपीला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवर दिली आहे. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता घटनास्थळी एसडीआरएफचे पथक रवाना करण्यात आले आहे. 


मुंबई - आपली भूमिका प्रभावीपणे सादर करण्यासाठी कलाकार स्वत:मध्ये शारीरिक बदल घडवत असतात. शाहरुख खान ने ‘सिक्स पॅक अ‌ॅब्स’ प्रसिद्ध केल्यापासून बरेच कलाकार भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करत असतात. ‘हिज स्टोरी’ या चित्रपटातील समलिंगी भूमिकेसाठी अभिनेता मृणाल दत्तने तब्बल १५ किलो वजन वाढवले आहे.आपले पात्र अधिक प्रभावी करण्यासाठी त्याने हे वजन वाढवले. मृणाल दत्तसाठी ‘प्रीत’ची भूमिका साकारणे सोपे नव्हते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्याने स्वत:मध्ये अनेक बदल केले. मृणाल दत्तने त्याच्या पात्राचा काळजीपूर्वक अभ्यास केला आणि भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी सुरुवातीला ५ ते ६ किलो वजन वाढवले. तो नेहमीच ६० किलोच्या घरात असतो, परंतु शूटिंगदरम्यान ते तब्बल ७५ किलोपर्यंत पोहोचले होते.मृणाल दत्त ‘प्रीत’ची भूमिका साकारतो आहे, जो एक समलिंगी आहे. तसेच फूड समीक्षक आणि अनुभवी पांतस्थ आहे. त्याचे संबंध साक्षी (प्रियमणी) आणि कुणाल (सत्यदीप) सोबत येतात. साक्षी त्याला रेस्टॉरंट ओपनिंगसाठी बोलावते. पण, आपलाच नवरा त्याच्या प्रेमात आहे हे तिला माहित नसते. पुढे जे घडते ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे.‘एका अर्थी मला तो काळ आवडून गेला कारण मी वाटेल ते खाऊ शकत होतो. पण, मी एक काळजी घेतली की स्वतःला आडवा-तिडवा सुटू दिले नाही. ते सर्व वजन कमी करतानाची दमछाक म्हणजे विलक्षण अनुभव होता’, असे मृणालने सांगितले. डिंग एंटरटेन्मेंट निर्मित ‘हिज स्टोरी’ २५ एप्रिलला अल्ट बालाजी आणि झी५ वर एकाच वेळी प्रसारित होईल.

मुंबई - मुंबईसह देशभरातील कोरोनाची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर ठरत आहे. तर आरोग्यव्यवस्थाही मोठ्या संकटात सापडली आहे. ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध, बेड्स यांचा साठा अपूरा पडत आहे. परिणामी रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी आता मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेता सोनू सूद हा मागील वर्षभरापासून नागरीकांची मदत करत आहे. तर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ही मदतीचा हात पुढे केला आहे.रिया गेली अनेक महिने मीडिया तसेच सोशल मीडियापासून दूर आहे. पण आता तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने आपण मदतीसाठी आपला इनबॉक्स खुला केला असल्याचे म्हले. रियाने पोस्ट मध्ये लिहले, ‘कठीण काळात एकजुटीची गरज आहे, ज्यांना मदत करू शकता त्या सगळ्यांना मदत करा. मदत लहान किंवा मोठी मदत मदत असते, मला मेसेज करा, जर मी काही करू शकत असेन तर नक्की करीन. काळजी घ्या आणि सगळ्यांना खूप प्रेम’.रियाने अशाप्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. रिया अनेक महिन्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होऊ लागली आहे.

मुंबई - मुंबईत कोरोनाचा वाढलेला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाच मुंबईतील लोकलमधील गर्दी मात्र अजूनही कमी होताना दिसत नाही. जणू काही कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याच्या थाटातच मुंबईकर लोकलमधून प्रवास करत आहेत. मुंबईतील विविध स्थानकात लोकल गर्दी दिसत असून कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचेही पाहायला मिळत आहे.मुंबईत अत्यावश्यक सेवेतील केवळ १५ टक्के नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, सर्व सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी नसतानाही लोक सर्रासपणे लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती. तर इतर स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रेल्वेत सर्वसामान्यांची कुठलीच चेकिंग सध्या होत नाही. सर्व गेट बहूतेक ठिकाणी खूलेच आहेत. त्यामुळे कोरनाचा प्रसार कसा थांबणार? असा सवाल केला जात आहे.अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच लोकलमध्ये प्रवेश दिला जात असून इतरांनी विनाकारण रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आले आहेत. रस्त्यांवर विनाकारण वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोडचे नियम लावले होते. मात्र, काही दिवसातच हे कलर कोडचे नियम रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कलर कोडचे नियम रद्द केल्यानंतरही वाहनांची तपासणी सुरूच राहील, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात आला होता. अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड होता. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली जात होती. महाराष्ट्र पोलीस खात्याकडून अत्यावश्यक कारणासाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. covid19.mhpooice.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ई-पास घेता येईल. एखाद्या व्यक्तीकडे इंटरनेटची व्यवस्था नसेल तर, तो राहत असलेल्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हा पास मिळू शकतो. मागीलवर्षी देखील लॉकडाऊनमध्ये ई-पासची सुविधा देण्यात आली होती.

ठाणे - आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबी सेलने मेल गाड्यांमधून लूटमार व चोरी करणाऱ्या टोळीतील ६ दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पाच प्रकरणांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे सीआयबीचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर अन्वर शाह, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल ललित वर्मा, नीलकंठ गोरे आणि कल्याण सीपीडीएस (बी) टीम एएसआय एस. के. सैनी, हेड कॉन्स्टेबल अनिल उपाध्याय आणि जितेंद्र सिंह यांच्या पथकाने छापा टाकला. शंकर निर्मल शाह, प्रकाश मनशंकर सेवक, धनंजय ओमप्रकाश शुक्ला, इमरान उमर खान, बालेश्वर विजय साहू आणि राजेश राधेश्याम चौधरी या आरोपींना पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर या ६ दरोडेखोरांना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सीआयबीच्या पथकाने या सर्व लुटारुंना पुष्पक आणि कामयानी एक्स्प्रेसमधून जेरबंद केले आहे. हे आरोपी ४ वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचे दागिने, मोबाईल फोन, पर्स आणि मौल्यवान वस्तू चोरी करत आहेत. दरोडेखोर टोळीच्या अटकेनंतर लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये होणाऱ्या चोऱ्या-लुटमारीला बऱ्याच अंशी चाप बसणार आहे.

भिवंडी - भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी अवघ्या ५०० रुपयात कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट विकत होती. याप्रकरणी पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कलम ४२०,४६५,४६८, ४७१, २६९,२७०, ३४ सह कोवीड – १९ उपाययोजना २०२० नियम ११ प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.नामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद (वय ३१ , रा. भिवंडी), अफताब आलम मुजीबुल्ला खान (वय २२, रा. पिराणीपाडा), मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख (वय २०, रा. शांतीनगर), मेहफुज आलम मुजीबुल्ला खान (वय २९, रा. भिवंडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांना आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोना निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह बनावट रिपोर्ट ५०० रुपये दराने बनवून दिला जात असल्याची गुप्त माहिती भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांना मिळाली.यानंतर भिवंडी युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोर असलेल्या महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे डमी व्यक्ती कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेण्यासाठी पाठविले. आरटीपीसीआर तपासणी करीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोरोना निगेटिव्ह बनावट रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून देताना महेफुज क्लिनिकल लॅब मधील तिघांना रंगेहात पकडले.महेफुज क्लिनिकल लॅबची झडती घेतली असता कोरोनाचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ नागरिकांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटिव्ह व ५ रिपोर्ट हे पोझिटिव्ह दिसले. हे बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांची बारकाईने विचारपुस केली. त्यांनी ६४ जणांचे कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट हे लॅबमध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याचे कबुली दिली. भिवंडी शहरातून परराज्यामध्ये जाण्यासाठी; विमान, रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि विविध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोरोना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे. त्यामुळे या आरोपींनी प्रत्येक रिपोर्ट हा कमीत कमी ५०० रुपये एवढ्या दराने बनावट रित्या थायरोकेअर या पॅथॉलॉजीच्या लेटरहेडवर तयार केले. तसेच, यापूर्वी सुध्दा अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवून दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट मेहफुज क्लिनिकाल लॅबचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केलेले व लोकांना दिलेले असल्याची कबुली दिली आहे. 

पनवेल - करोना रुग्णविस्फोट होत असल्याने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू करीत कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे शेजारील नवी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी पनवेलमध्ये मात्र रुग्णवाढ कायम आहे.नवी मुंबईतील लोकसंख्या १५ लाख तर पनवेल तालुक्याची लोकसंख्या १२ लाख असताना नवी मुंबईपेक्षा पनवलमध्ये रुग्णवाढ कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यात येथील आरोग्य व्यवस्थाही तोकडी असल्याने चिंता व्यक्त होत आहे.पनवेलमध्ये सध्या ६,१४७ करोना रुग्ण हे उपचार घेत आहेत. असे असताना आपुरी आरोग्य व्यवस्था, लसींचा तुटवडा व प्राणवायूंचा तुटवडा भासतआहे. त्यात दैनंदिन करोना रुग्णवाढ कायम असल्याने शहराचा धोका वाढला आहे.पनवेल पालिकेत मुळात मनुष्यबळ अपुरे आहे. उपलब्ध मनुष्यबळावर येथील आरोग्य व्यवस्था चालविली जात आहे. ग्रामीण पनवेलची आरोग्य व्यवस्था रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाकडे आहे. ग्रामीण भागातही घरोघरी करोनाची लक्षणे असणाऱ्यांची शोधमोहीम व करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविल्या गेली नाही. उलट करोना चाचणीचे अपुरे संच अशा विविध समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण पनवेलमध्ये वैद्यकीय मोबाइल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. नवी मुंबई पालिकेकडून  २४ तास लसीकरण सेवा व करोना चाचणीची मोहीम विविध केंद्रांवर राबवली जात आहे.औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची करोना चाचणी नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु पनवेल पालिका व महसूल विभागाकडून असे उपक्रम राबविले जात नाहीत. उलट कारखानदारांनीच ही जबाबदारी स्वीकारावी असे प्रशासनाचे मत आहे


नवी मुंबई - जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा म्हणून एपीएमसीची पाचही घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची आणि या समितीत दिवसरात्र कष्ट करणाऱ्या माथाडी, मापाडी या घटकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास नाकारायचा हा परस्परविरोधी निर्णय तात्काळ रद्द करून कडक निर्बंधांच्या या काळात माथाडी व मापाडी कामगारांना रेल्वे, बस प्रवासात सूट देण्यात यावी अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार रात्री उशिरापर्यंत निर्णय न घेतल्यास शनिवार व रविवारी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.तुर्भे येथील भाजी, फळ, अन्नधान्य, कांदा बटाटा, मसाला या पाच घाऊक बाजारपेठेत काम करणारे माथाडी व मापाडी कामगारांना शुक्रवारी सानपाडा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी प्रवास करण्यास मज्जाव केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माथा़डी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सानपाडा रेल्वे स्थानकात धाव घेतली. राज्य सरकारने संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्राला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या या पाच घाऊक बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र या घाऊक बाजारपेठेत सर्व प्रकारची कामे करणारे माथाडी, मापाडी, वारणार, साफसफाई कामगार, वाहतूकदार यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला नाही. या घटकाशिवाय बाजारपेठेतील पानदेखील हलत नसताना बाजारपेठा सुरू ठेवा पण यासाठी काम करणाऱ्या कामगारांचा अत्यावश्यक सेवेत प्रवेश न करता त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे माथाडी कामगार संतप्त झाले असून या निर्णयाच्या विरोधात माथाडी भवनमध्ये एक तातडीची बैठक घेऊन शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा निर्णयात बदल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे. गेल्या वर्षीदेखील या घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.


मुंबई - अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसातील अजून एका पोलीस अधिकाऱ्याला एनआयएने अटक केली आहे. एआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून याआधी सचिन वाझे, रियाझ काझी यांच्यावर कारवाई झालेली असताना या प्रकरणात आता अजून एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव आले आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना एनआयएने अटक केल्याची माहिती एएनआयने दिली आहे. त्यामुळे अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सचिन वाझेला १३ मार्च रोजी तर रियाझ काझीला ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होते. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आता या कटात आणखी कोण कोण सामील आहे, याचा एनआयए कसून तपास करत आहे.

दरम्यान, अँटिलिया स्फोटकं प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सुनील माने यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर काही दिवसांतच स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. सुरुवातीला आत्महत्येचे चित्र असलेला हा मृत्यू नंतर हत्या असल्याचे एनआयएच्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे.याआधी सचिन वाझेसोबतच रियाझ काझी नावाच्या अधिकाऱ्याला देखील एनआयएने अटक केली आहे. काझीने विक्रोळीमधील एका नंबर प्लेटच्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज नष्ट करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात सचिन वाझेला मदत केल्याचा प्रमुख आरोप काझीवर आहे. याच दुकानातून अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारसाठी बनावट क्रमांक बनवून घेण्यात आला होता.

मुंबई - अंधेरी ते विरार दरम्यानच्या १५ डब्याच्या धीम्या लोकल सोडण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र करोनामुळे सध्या सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव धीम्या लोकल फेऱ्यांचा दिलासा तूर्तास तरी मिळणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन साधारण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या  प्रकल्पासाठी ५९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फलाटांची लांबी वाढवणे, रेल्वे यार्ड, रूळ, ओव्हरहेड वायर अशी अनेक तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी करोनाकाळात मनुष्यबळाअभावी या कामांना काहीसा ब्रेक लागला होता. परंतु पावसाळ्यानंतर पुन्हा कामाला गती दिली गेली. जानेवारी २०२१ आणि त्यानंतर मार्च २०२१ पासून या मार्गावर वाढीव १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे पंधरा डब्यांच्या नवीन फेऱ्या सध्या तरी चालवणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई -  एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा, दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू तर तिसरीकडे विविध दुर्घटनेमुळे लोकांना जीव गमवावे लागत आहेत. यामुळे मरण स्वस्त झालं का? असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या महिनाभरात मुंबईसह महाराष्ट्रात तीन दुर्घटना घडल्या. या तिन्ही दुर्घटनेत एकूण ४७ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आज (२३ एप्रिल) अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. या आगीत होरपळून १३ जणांना प्राण गमवावे लागले. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना २१ एप्रिलला घडली. या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील १५० जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी २५ जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळे नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाली.नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारी १२.३० च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरण्याचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये २४ जणांना जीव गमावावा लागला.भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला २६ मार्चला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून काही ना काही मदत केली जाईल. तर जखमींनाही मदत केली जाईल. घटनेची सखोल चौकशीही होईल. कारवाई केली जाईल. पण यामुळे त्या कुटुंबातील मृत्यू झालेला व्यक्ती परतणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवी दिल्ली - लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. परंतु त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु कैलास नावाच्या ट्विटर युजर्सने सुमित्राताई स्वस्थ असल्याचे रिट्विट करून त्यांना सांगितले. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या माहितीचे ट्विट डिलीट केले.मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही लोक फिरत आहेत, वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास २१ दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.यापूर्वी शरद पवार यांच्यावर १२ एप्रिलला  पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती.  त्याआधी शरद पवारांना ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा संसर्ग भलत्याच वेगाने वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जात असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही कठोर पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या गुरुवारपासून म्हणजेच २२ एप्रिलपासून केवळ तातडीच्या सुनावणी केली जाणार आहे. देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्गाने टेन्शन वाढवले आहे. गेल्या काही दिवसांत न्यायालयातील बर्‍याच कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. निम्म्याहून अधिक कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. हा संसर्ग वेळीच रोखण्याच्या हेतूने न्यायालयाकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्याच अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आता २२ एप्रिलपासून केवळ तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले.

संबंधित वकिल किंवा पक्षकारांना त्यांच्या खटल्यांची तातडीने सुनावणी घ्यायची असेल तर स्वाक्षरी केलेला अर्ज आणि संबंधित कागदपत्रे न्यायालय रजिस्ट्रींकडे पाठवावी लागणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून त्यावर तातडीची सुनावणी घ्यायची की नाही, हे ठरवले जाईल. आवश्यकता असेल अशाच प्रकरणांत न्यायालय तातडीची सुनावणी घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

सध्या उच्च न्यायालये संकटाच्या स्थितीत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची बरीच पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जर सरकारला कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावावर आक्षेप असेल तर सरकारने त्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि सुधारीत नावे पाठवावीत, असेही न्यायालयाने सूचवले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या जवळपास ४० टक्के रिक्त पदांवर ही चिंता व्यक्त केली.

देशभरातील जवळपास सर्वच उच्च न्यायालयांत मोठ्या प्रमाणावर खटले वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. या खटल्यांचा वेळीच निपटारा करून नागरिकांना न्याय देण्याची नितांत गरज आहे. याच अनुषंगाने न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून वेळेची मर्यादा तसेच इतर मुद्यांवर निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. देशातील नागरिकांना जो त्रास होत आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या दुखा:त सहभागी असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले. आज देश पुन्हा कोरोनाविरूद्ध एक मोठी लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती स्थिर होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. कोरोनाचे हे आव्हानाला आपल्याला धैर्याने सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. देशात ऑक्सिजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी अनेक स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये नविन ऑक्सिजन प्लांट्स तयार करणे, उद्योगांमध्ये वापरले जाणारे ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरणे, ऑक्सिजन रेल, अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे शहरांमधील कर्मचार्‍यांना ही लस जलद गतीने उपलब्ध होईल आणि त्यांच्या कामावर कोणाताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटले आहे.तसेच या सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.


कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चालले आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपा नेते सयंतन बसू आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे. दोन्ही नेत्यांवर १८ एप्रिल सांयकाळी ७ ते १९ एप्रिल सांंयकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी असेल. या वेळेत दोन्ही नेते निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकणार नाहीत.यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली होती. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर १५ एप्रिल सांयकाळी ७ वाजल्यापासून ते १६ एप्रिल सायंकाळी ७ पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर ४८ तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.भाजपाचे खासदार सौमित्र खान यांच्या सुजाता मंडल पत्नी आहेत. मंडल यांच्या तृणमूलमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या पतीने त्यांना तलाक देण्याची घोषणा केली होती. राजकारणाच्या या ड्राम्यामुळे त्यांचं १० वर्षांचे नात संकटात आले होते.

मुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा फाउंडेशन संस्था (मुंबई) व बटरफ्लाईज संस्था (दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल रोजी ' ब्लू अम्ब्रेला डे 'मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात आली.'मुलांचे लैंगिक शोषण ' या संवेदनशील विषयावर समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे तसेच मुलीं प्रमाणे मुलांवर देखील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध समाजभान निर्माण करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संस्थेचे लाभार्थी मुले व त्यांच्या कुटुंबीयांना या विषयावर माहिती देण्यात आली. मुलांच्या सहभागातून बनविलेल्या पोस्टर, घोषणा यांच्या माध्यमातून  या विषयावर आधारित एक 'ध्वनीचित्रफित' तयार करण्यात आली. त्याद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. मुंबई-महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत ही मोहीम राबविण्यात आली. हमारा फाऊंडेशन द्वारे या जनजागृती मोहिमेकरिता श्री चाऊस शेख व श्री अरुण अवघडे यांनी विशेष योगदान दिले. याकरिता संस्थेच्या  संस्थापक विश्वस्त प्रा.आशा राणे व व्यवस्थापिका सौ श्रद्धा चोणकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाला.

मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कलर कोड व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांवर आता कलर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता फक्त कलर कोड असलेली वाहनेच धावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात येणार असून, अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल कलर कोड असणार आहे. या बरोबरच भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड लावण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे. तसेच त्या वाहनाचा दुसऱ्या कोणत्या कामासाठी उपयोग झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून सदरचे कलर कोड जारी करण्यात आले असून, स्थानिक पोलीस ठाण्यातून हे कलर कोड मिळणार आहेत. या नव्या पद्धतीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बारामती (पुणे) - देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने लोकांना भीती वाटू लागली आहे. त्यातच आता बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन ३५ हजार रुपयांना विक्री करून मालामाल होण्याच्या या टोळीचा डाव पोलिसांच्या कारवाईमुळे फसला आहे.देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्याने, या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आली.

इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला ३५ हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम ४२०/३४, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे.

रांची - चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे दोषी, राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना अखेर झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दुमका कोषागारातून १३.३ कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यामुळे, आता लालूंचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या, लालू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.झारखंड उच्च न्यायालयाने अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर लालूंना हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. या दरम्यान त्यांना एक लाखांचा जात-मुचलकाही भरावा लागणार आहे. तसेच परवानगीशिवाय लालू देशाच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. आपला पासपोर्ट त्यांना जमा करावा लागणार आहे. लालूंना राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांकही बदलण्याची परवानगी नसेल.गेल्या काही महिन्यांपासून लालू प्रसाद यादव हे प्रकृती अस्वास्थ्यालाही सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारण देत जामीन मिळवण्याची धडपड सुरू होती.यापूर्वी लालूंना चारा घोटाळ्यातील आणखी तीन प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे दुमका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी तिहार तुरुंगात अटकेत असलेला अभिनेता  दीप सिद्धू याला  शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता; पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे तपास विभागाने शनिवारी त्याला पुन्हा अटक केली. संरक्षित स्मारकाची नासधूस केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक झाली असून याप्रकरणी पुरातत्त्व विभागाने तक्रार दाखल केली होती.विशेष न्यायाधीश निलोफर अबिदा परवीन यांनी शुक्रवारी त्याची तीस हजार रुपयांचे व्यक्तिगत बंधपत्र व तेवढ्याच रकमेची दोन हमीपत्रे याच्या आधारे सुटका करण्याचे आदेश  दिले होते. सिद्धू याला ९ फेब्रुवारी रोजी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी मोर्चा लाल किल्ल्यावर वळवून तेथे हिंसाचार करण्यात आला होता. त्यात सिद्धू याला अटक करण्यात आली होती.  न्यायालयाने सांगितले की, पोलिसांनी सिद्धू याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्याची पुन्हा कोठडी मागितली आहे, ती अयोग्य आहे. हा खटला   चित्रीकरण व समाजमाध्यमावरील ध्वनिचित्रफितींवर आधारित आहे.  त्या पुराव्यांमध्ये आरोपी हस्तक्षेप करण्याची शक्यता नाही.


हरिद्वार - ८३ वर्षांनंतर, सन २०२१ मध्ये ११ वर्षात आलेला कुंभ उत्सव इतिहासात प्रथमच काळाच्या आधी पार पडू शकतो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत ३० एप्रिलपर्यंत कुंभ आयोजित करण्याविषयी बोलत आहेत. परंतु सध्या उत्तराखंडची जी परिस्थिती आहे. त्या दृष्टीने सरकार कुंभमेळा वेळेपूर्वीच पार पाडू शकतो. जर हे घडले तर, इतिहासात प्रथमच असे होईल की १२ वर्षानंतर होणारा कुंभ काळाच्या खूप आधी संपेल. याआधी ५ महिने चालणारा कुंभ कोरोना पाहता एक महिन्यापुरता मर्यादित झाला आहे. इतिहासामध्येही प्रथमच अशी वेळ आली आहे की कुंभला एक महिन्यात कमी केले गेले आहे.राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेता लवकरच सरकार मोठा निर्णय घेऊ शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. कुंभ मेळ्यामुळे कोरोना संसर्गाची परिस्थिती नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसांत उत्तराखंडमध्ये दररोज १९०० हून अधिक कोरोना संकमीत रूग्ण आढळत आहेत. पाच दिवसांत ८ हजार ७६५ लोकांना उत्तराखंडमध्ये संसर्ग झाला आहे, तर पाच दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला आहे.केवळ कुंभ नगरी हरिद्वार बद्दल बघीतले तर पाच दिवसांत २ हजार ५२६ कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. शाही स्नानानंतर या आकडेवारीत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये निरंजन अखाडाचे सचिव महंत रवींद्र पुरी यांच्यासह आखाड्यातील १७ संत पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याचबरोबर, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी ११ एप्रिलपासून कोरोनामुळे आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या बरोबरच, इतर अनेक आखाड्यांशी संबंधित संतही कोरोनामुळे त्रस्त आहेत. आतापर्यंत ६० हून अधिक संत कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. बरेच संत आणि भक्तही आजारी आहेत. हरिद्वारचे सीएमओ अर्जुनसिंग सेंगर यांनी याची पुष्टी केली आहे.


नवी दिल्ली - कुंभ मेळ्यातून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृहविलगीकरणात ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. शहरातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिली.४ ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीच्या ज्या नागरिकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली होती, त्यांनी स्वतःची माहिती सरकारला द्यायची आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या एका लिंकवर ही माहिती भरता येणार आहे. यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आल्याचेही देव यांनी स्पष्ट केले. तर, १८ ते ३० एप्रिलपर्यंत कुंभला जाणाऱ्या लोकांनी जाण्यापूर्वीच आपली माहिती देऊन जायचे आहे. यामुळे कुंभहून आलेल्या लोकांचा अधिक प्रभावीपणे शोध घेऊन, त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.जर कोणी अशी माहिती दिली नाही, आणि कुंभहून परतल्याचे आढळले तर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन आठवड्यांसाठी पाठवण्यात येईल, असेही देव यांनी सांगितले. आतापर्यंत कुंभ मेळ्यामध्ये दोन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे याठिकाणहून येणारे भाविक हे सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कुंभमधून शहरात परतलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे शनिवारी सांगितले होते. तसेच, देशातील इतर राज्यांनीही असाच निर्णय घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

रायपूर -  करोनाच्या संकटामुळे रुग्णालयावरील भार वाढत असतानाच आगीच्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रातील भंडारा आणि नागपूरमधील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेप्रमाणेच छत्तीसगढमधील रायपूरमध्ये एका रुग्णालयात आग लागली आणि त्यात  आयसीयू विभागात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.रायपूरमधील एका रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागली. रुग्णालयातील आयसीयू विभागामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती असून, आग लागल्यानंतर रुग्णांना होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल, अशी माहिती रायपूरच्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक टारकेश्वर पटेल यांनी दिली.आग लागली तेव्हा या रुग्णालयात ५० रुग्ण उपचार घेत होते. यात काही कोविड बाधित रुग्णही होते. महाराष्ट्रातही रुग्णालयात आग लागल्याच्या तीन घटना अलिकडेच घडल्या आहेत. भंडारा, नागपूरबरोबरच मुंबईतही एका रुग्णालयात आग लागल्याने १० रुग्णांचा मृत्यू झाला होता.

चेन्नई - तामिळ अभिनेते विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १६ एप्रिलला विवेक यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये त्यांना डाक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. १५ एप्रिलला विवेक यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली होती. यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली. सरकारी रुग्णालयात लस घेण्यामागचे कारण त्यांनी सांगितले होते. ” कोव्हिड लस सुरक्षित आहे. पण आपण लस घेतली आहे म्हणजे आपण आजारी नाही होणार असे समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.” असे मीडियाशई बोलताना ते म्हणाले होते.विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शोक व्यक्त केला. मुंबई - निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने २०१९ मध्ये आपल्या ‘दोस्तना’ या चित्रपटाचा सिक्वल जाहीर केला होता. यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार होता. पण नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार कार्तिक आर्यन आता ‘दोस्ताना २’चा भाग असणार नाही. एका व्यापार स्त्रोताने कार्तिकच्या या चित्रपटातून एक्झिटविषयी वक्तव्य केले आहे. इतकेच नाही, तर धर्मा प्रॉडक्शन कार्तिक आर्यनबरोबर भविष्यात कधीच काम करणार नसल्याचे म्हटले आहे. यामागचे कारण कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातला कलह असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्तिकमध्ये क्रिएटिव्ह मतभेद देखील झाले आहेत. मात्र, कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सुरुवातीला कार्तिकला या चित्रपटाच्या तारखा आणि शेड्युल याबाबत तक्रारी होत्या. ज्यामुळे पुढे अनेक समस्या सुरू झाल्या. यापूर्वीही असे म्हटले जात होते की, कार्तिकने या चित्रपटाचे शूटिंग कित्येक महिने पुढे ढकलले होते. तर, हा चित्रपट सोडून त्याने राम माधवानीच्या ‘धमाका’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, त्यामुळे करण त्याच्यावर चिडला होता.वृत्तानुसार, बर्‍याच दिवसांपासून कार्तिक कोरोना व्हायरसच्या साथीमुळे शूटिंग पुढे ढकलण्याविषयी बोलत होता. त्याला सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यायची इच्छा होती, यामुळे करण जोहरने देखील त्याला शूटबद्दल विचारले नाही. पण, जेव्हा त्याने ‘धमाका’चे चित्रीकरण पूर्ण केले, तेव्हा करण जोहर त्याच्यावर संतापला. त्यांनी अनेक बैठका घेतल्या ज्यात करण जोहरनेही आपला संताप व्यक्त केला. ज्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यात वादावादी झाली. शशांक खेतानचा ‘वॉरियर’ हा चित्रपट शाहिद कपूरला देण्यात आल्यानंतर देखील कार्तिक धर्मा प्रॉडक्शनवर चिडला होता. शाहिदने हा चित्रपट नाकारला असला, तरी ही भूमिका कार्तिककडे गेली नाही 

कार्तिक आर्यनकडे जेव्हा दोस्ताना २च्या शूटिंगसाठी तारखा नव्हत्या, त्यामुळे करणने विकी कौशलसोबत ‘मिस्टर लेले;चे शूटिंग सुरू केले आहे. कार्तिकला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने प्रॉडक्शन हाऊसला सांगितले की, आपल्याकडे ‘दोस्ताना २’ साठी केवळ एप्रिलपासूनच्या तारखा आहेत. करणला जेव्हा कार्तिकच्या या गोष्टींबद्दल कळले तेव्हा त्याने कार्तिकला या चित्रपटातून रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार करण आणि कार्तिक दोघांचेही संभाषण पूर्णपणे बंद झाले आहे.करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष्य, कार्तिक आर्यनसोबत झळकणार होते. या चित्रपटाद्वारे लक्ष्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. कार्तिक आर्यनच्या जागी करण जोहर या चित्रपटात कोणता अभिनेता घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई - कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना केले आहे. संजय राऊत यांनी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना हे आवाहन केले. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पहिला संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये घेतला. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे, असे राऊत म्हणाले.यावेळी त्यांनी लसीकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी फटकारले. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असेही ते म्हणाले.राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार ३४ सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के झाले आहे.

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) २ ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी ३ जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. १५ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्यामध्ये एका आफ्रिकन तस्करचाही समावेश आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या अगोदर अटक केलेल्या एका अमली पदार्थ तस्कराची चौकशी केली. या चौकशीमध्ये मुंबईसह, ठाणे, डोंबिवली, परिसरामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जावेद जहांगीर शेख व अर्षद खत्री या दोन आरोपींची नावे कळाली. या दोन आरोपींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डोंबिवली येथील पलावा सिटी येथील एका घरामध्ये हाड्रोपोनिक गांजाची लागवड करत असल्याचे सांगितले. पलावा सिटी येथील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये अमली पदार्थाचे उत्पादन हे दोन्ही आरोपी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. त्यात हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी बियाणे, झाडे व इतर साहित्य जप्त केले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार ज्या घरामध्ये गांजाचे उत्पादन घेतले जात होते ते घर रेहान खान या सौदी अरबमध्ये असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे. त्याने दिलेल्या आर्थिक मदतीवर हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन केले जात होते. हे आरोपी गांजाचे झाड उगवण्यासाठी लागणारे साहित्य डार्क नेटच्या माध्यमातून नेदरलँड्स, ॲम्स्टरडॅम येथून मागवत होते, असे समोर आले आहे. हायड्रोपोनिक नावाने ओळखले जाणारे हे अमली पदार्थ तब्बल २५०० प्रति ग्राम विकले जाते. उच्चभ्रू वर्गात याची मोठी मागणी आहे.या बरोबरच मुंबईत केलेल्या कारवाईदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सॅम्युअल माईक या आफ्रिकन वंशाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून ३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताक्रुज, परिसरामध्ये हे कोकेन अमली पदार्थ विकले जात होते.

मुंबई - गुजरात, राजस्थान राज्यांत जाण्यासाठी परप्रांतीय श्रमिकांना बनावट चाचणी अहवाल उपलब्ध करून देणाऱ्या टोळीस घाटकोपर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही टोळी ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित आहे.लालबहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन बस थांब्याजवळ ही टोळी कार्यरत होती. दोनशे ते तीनशे रुपये स्वीकारून आरोपी गुजरात, राजस्थान राज्यांत जाणाऱ्यांना ‘करोना बाधा नाही’ असे सांगणारा बनावट अहवाल तयार करून देत होते. त्यानंतर या श्रमिकांना स्वत:च्याच वाहनातून या राज्यांत नेत होते. ही बाब महापालिकेच्या एन पूर्व विभाग कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी सापळा रचून टोळीतील सहा आरोपींना अटक केली.


 

ठाणे - शहरामध्ये दररोज सरासरी १५०० नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण होऊ लागला असून यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली. १५ दिवसांत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यातून २४ तासांत २० टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायुचा तुटवडा जाणवू लागला आहे. प्राणवायू पुरवठ्याअभावी पालिकेचे पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास रुग्णालय बंद आहेत. ही दोन्ही रुग्णालये सुरू झाली तर, २३०० खाटा रुग्ण उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्लोबल रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी होईल. प्राणवायूच्या तुटवड्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसून यामुळे त्यांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच येत्या काही दिवसांत प्राणवायू तुटवड्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता स्वत:चा प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रकल्पास स्थायी समितीने मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना काळ संपल्यानंतरही हा प्रकल्प सुरूच राहणार आहे.औरंगाबादच्या आयरॉक्स टेक्नॉलॉजिज या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महापालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड याठिकाणी असे प्रकल्प उभारले आहेत. पीएसए तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प असून त्यातून १७५ सिलिंडर म्हणजेच २४ तासांत २० टन प्राणवायुची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला ३ कोटी २० लाख रुपये खर्च करणार आहे.


पनवेल - पंतप्रधानांनी लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर १२ ते १४ एप्रिलदरम्यान अवघे पाच हजार नवे लसीकरण पनवेल पालिका करू शकली. त्यानंतर उत्सवही संपला आणि लसीही संपल्या अशी स्थिती पनवेल पालिकेची झाली आहे. पनवेल पालिकेला लस कधी व किती मिळणार याची नेमकी तारीख आरोग्य विभागाला सांगता येत नसल्याने पालिकेच्या केंद्रातून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या रोज केंद्रांवर हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे.खारघर येथील अयप्पा मंदिराशेजारील लसीकरण केंद्रात शुक्रवार सकाळपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेण्यासाठी पालिकेच्या केंद्रामध्ये नोंद केली आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रातून संबंधित लस लाभार्थीना नंबरचे टोकन देण्यात आले आहे. परंतु या केंद्रात आल्यावर लस उपलब्ध नसल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळते. अनेक ज्येष्ठ नागरिक रिक्षांचा प्रवासखर्च करून तर अनेक नागरिक चालत आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येतात. मात्र येथे आल्यावर त्यांना लस नेमकी कधी मिळणार याचे उत्तर मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.पनवेल ग्रामीण भागातही वावंजे आरोग्य केंद्रवगळता इतर कुठेही लसीकरण शुक्रवारी सुरू नव्हते. ग्रामीण भागातही लशी संपल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून लशी आल्यानंतर लसीकरणाचा पुढील कार्यक्रम सुरू होईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी तयार नसल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे.


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget