May 2021

नवी दिल्ली - पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सीला मंगळवारी डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर मेहुल चोक्सी सध्या डोमिनिकाच्या तुरुंगात आहे. सुरुवातीला डोमिनिका सरकार मेहुल चोक्सीला भारतात सोपणवार असे सांगितले होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सुनावणीत डोमिनिका सरकारने आपला निर्णय बदलला. मेहुल चोक्सीला पुन्हा डोमिनिका सरकार अँटिग्वाकडे सोपवण्यात येणार आहे. दरम्यान मेहुल चोक्सीला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.भारताने एक विशेष विमान डोमिनिकाला पाठवले आहे. अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.२७ मे रोजी हे प्रायव्हेट जेट डोहा- भारत- मेड्रिड अशा मार्गाने डोमिनिका येथील डगलस चार्ल्स विमानतळावर पोहोचले. भारताने पाठवलेले बॉम्बार्डियर ग्लोबल ५००० हे प्रायव्हेट जेट अजूनही विमानतळावर आहे. या विमानातून भारताने मेहुल चोक्सीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे पाठविली आहेत. जी न्यायालयात हजर केली जातील. कागदपत्रांच्या माध्यमातून हे सिद्ध केले जाईल की चोक्सी हा फरारी आहे. मेहुल चोक्सी प्रकरणी डोमिनिका न्यायालयात पुढील सुनावणी २ जून रोजी होणार आहे. मेहुल चोक्सीचा डोमिनिका तुरुंगातला त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये चोक्सीच्या हातावर मारहाणीचा खुणा दिसून येत आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल केंद्रीय वित्त मंत्रालयाने घेतली आहे. करोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर जीएसटीत सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीची दखल केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती जीएसटी माफी, सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन ८ जून रोजी आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर यावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे.मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आपला अहवाल तयार करणार आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मंत्री मौविन गोडीन्हो, केरळचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल, ओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुयारी, तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा स्थापन करण्यात आलेला मंत्रीगट करोना औषधांवर जीएसटी सवलतीच्या आवश्यकतेची तपासणी करेल तसेच त्यावर शिफारस करेल. समितीच्या अहवालावरुन या केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे.लॉकडाऊनमुळे झालेली महसूल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नसल्याने, महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी वर्ष २०२२-२३ ते वर्ष २०२६-२७ असा पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. पेट्रोल, डिझेल सारख्या वस्तुंवरील विविध उपकर आणि अधिभारापोटी केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. वर्ष २०२०-२१ मध्ये सुमारे ३.३० लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडे जमा झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांचे हात बळकट करण्यासाठी या निधीचे राज्यांना सुयोग्यपणे वाटप करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या होत्या.करोना प्रतिबंधित लस, औषधे, करोना तापसणी किट, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, पल्स ऑक्सिमीटर, हँड सॅनिटायझर्स, ऑक्सिजन थेरपी उपकरणे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, एन 95 मास्क, सर्जिकल मास्क, तापमान तपासणी उपकरणे यांच्यासह कोविड विरुध्दच्या लढ्यासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे.

अमरावती - परदेशात अथवा राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संपर्कात राहून कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व त्यांचा वेळही वाया जातो. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'स्मार्ट कार्ड' देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 'विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देश-विदेशात जाताना दस्तऐवजाचे मोठ ओझे सोबत घेऊन फिरावे लागते. सतत महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे लागते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्याचा विचार सुरू आहे,' असे सामंत यांनी सांगितले.

'स्मार्ट कार्ड'मध्ये विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीपासून ते सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षापर्यंतची सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे असणार आहेत. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, विविध परीक्षा, ब्लॉगचे विषय, विद्यार्थी कल्याणाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी सरकारी पातळीवर विचारविनिमय व नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.


सोलापूर - महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असून ते लवकरच भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत असतील, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते सोलापूरात बोलत होते.

एका खासगी दौऱ्यानिमित्त सोमय्या सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी मनपा, कोविड सेंटर्स, रुग्णालयांना भेटी देत आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी 'सचिन वाझेंसोबत पाच ऑफिसर निलंबित झाले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली, परमबीर सिंग घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्याच्या नावाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ठाकरे सरकारच्या कोविड भ्रष्टाचाराला भाजपा विरोध करत आहे. हे सरकार पाच वर्ष टिकावे मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भाजपकडून मी करणार आहे, असे सोमय्या यावेळी म्हणाले.दरम्यान, 'शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना ५५ लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी 'एसआरए'चे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झाले आहे. तर अनिल परब, अनिल देशमुख यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर आहे. त्यामुळे "आगे आगे देखो होता हैं क्या"असे म्हणत सोमय्यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना ही लक्ष्य केले आहे.महाविकास आघाडी सरकारने सत्तेची इतकी घमेंड करू नये जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे. त्यातील चार पोलीस निलंबित झाले आहेत. पण या प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी व्हायला हवी,' अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

जळगाव - मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या ४ भाजप नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर काही तास उलटत नाही, तोच जळगावातही शिवसेनेने भाजपला दुसऱ्यांदा मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या आणखी ३ नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढून ४५ इतके झाले आहे. दरम्यान, भाजपचे अजून काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते येत्या दोन दिवसात हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या पिंप्राळा भागातील नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी आणि शबिना बी शेख शरीफ या नगरसेवकांनी शनिवारी (२९ मे) शिवसेनेत प्रवेश केला. नगरसेवकांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्या हाती शिवबंधन बांधले.मार्च महिन्यात शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी भाजपतून शिवसेनेत दाखल झालेले कुलभूषण पाटील यांना संधी मिळाली होती. या घडामोडी घडल्यानंतर दोन महिन्यातच शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला. भाजपचे आता पुन्हा ३ नगरसेवक फोडल्यामुळे महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ४५ पर्यंत पोहोचले आहे. महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या उर्वरित ३० नगरसेवकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत होती. हिच आयती संधी साधत शिवसेनेने भाजपचे पुन्हा ३ नगरसेवक गळाला लावले आहेत.भाजपचे आणखी ५ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील. आम्ही कुणाला बळजबरी करत नाही. पालकमंत्री पदाचा बडेजावपणाही दाखवत नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत दिली. जळगाव महापालिकेत भाजपने ५७ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते. परंतु, गेल्या २ महिन्याच्या काळात भाजपातून ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा भाजपला मोठा सेटबॅक मानला जात आहे.

पिंपरी चिंचवड - कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशाही परिस्थितीत खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वाढल्या आहे. अखेर राज्य सरकारने दणका देत जास्तीचे बिल वसूल करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चाकणमध्ये खासगी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने दराबाबत नियमावली जाहीर केली आहे. पण तरी सुद्धा खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची लूट सुरूच आहे. अखेर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बिल तपासून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.पिंपरी चिंचवडमधील चाकण क्रीटीकेयर  हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी विजय पोखरकर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने पुष्पा विजय पोखरकर यांना २ लाख ५३ हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरण्याबाबत पुष्पा पोखरकर यांनी हॉस्पिटलकडे विचारणा केली, पण हे बिल भरावेच लागेल, असे सांगण्यात आले.विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून २ लाख ५३ हजारांची रक्कम रुग्णाला भरण्यास सांगितली होती. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला रक्कम शासकीय नियमाप्रमाणे द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. वारंवार सूचना करूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीची दखल घेण्यात आली नाही. अखेर या प्रकरणी चाकण क्रीटीकेयर हॉस्पिटलला दणका देत संचालक डॉ. घाटकर आणि डॉ.स्मिता घाटकर यांच्यासह डॉ.राहुल सोनवणे आणि डॉ.सीमा गवळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराचा चांगलाच झटका बसला आहे.भोपाळ - भोपाळमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात ‘एफसीआय’च्या एका लिपीकाच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयने तब्बल २.१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. एवढेच नाही तर ८ किलो सोने व नोटा मोजण्याची मशीन देखील हस्तगत करण्यात आली आहे.शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने लिपीकाच्या घरी छापेमारी केली होती. आतापर्यंत २.१७ कोटी रूपयांचा खुलासा झाला असून, ही कारवाई लाच प्रकरणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच प्रकरणी विभागीय व्यवस्थापकासह चार जणांना रंगहात पकडले होते.भोपाळमधील छोला भागात लिपीक किशोर मीरा मीणाच्या घरी अद्यापही सीबीआयची कारवाई शनिवारीही सुरु होती. याचबरोबर सीबीआयला भ्रष्टाचाराचे काही पुरावे देखील घरून मिळाले आहेत. सांगण्यात येत आहे की, अटक करण्यात आलेल्या तिन्ही व्यवस्थापकांचा भ्रष्टाचारा पैसा देखील लिपीक किशोर स्वतःकडेच ठेवत होता.गुडगावमधील एका सिक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर लिपीक किशोर मीना आणि व्यवस्थापकासह तीन जणांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली होती. तपासात समोर आले की, हा लिपीक सर्वांचे लाचेचे पैसे आपल्याच घरी ठेवत होता. माहितीनुसार किशोर मीना या अगोदर एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. मोठ्या लोकांसोबत भ्रष्टाचारात सहभागी झाल्याने त्याल लिपीक बनवले गेले होते.


चेन्नई - काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी निकिता कौल धौंडियाल या शनिवारी भारतीय सैन्यात 'लेफ्टनंट' पदावर दाखल झाल्या आहेत. लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी चेन्नईत निकिता कौल यांच्या खांद्यावर स्टार चढवले.'२०१९ साली पुलवामात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांची पत्नी निकिता कौल यांना सेनेची गणवेश परिधान करत आपल्या पतीला सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली अर्पण केली. हा त्यांच्यासाठी निश्चितच एक अभिमानाचा क्षण आहे, लष्कर कमांडर लेफ्टनंट वाय के जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर स्टार चढवले' असे ट्विट करण्यात आले. तामिळनाडूच्या चेन्नई अधिकारी ट्रेनिंग अकादमीत पासिंग आऊट परेड पार पडली. लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांनी या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण केले.शहीद मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या मृत्यूपूर्वी केवळ दहा महिने अगोदर विभूती आणि निकिता यांचा विवाह पार पडला होता. निकिता कौल धौंडियाल लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


नवी दिल्ली - अलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करुन योगगुरु बाबा रामदेव चांगलेच अडचणीत आले आहेत. योगगुरु रामदेव बाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद आणखी वाढीस लागला आहे. बाबा रामदेव यांनी आयएमएला २५ प्रश्न विचारून आव्हान दिले होते. आता आयएमएने रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पत्र आयएमएने रामदेव बाबा यांना पाठवले आहे.

आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ अजय खन्ना यांनी रामदेव बाबा यांना पत्र पाठवले आहे. रामदेव बाबा आणि त्यांच्या टीमचे सदस्य आचार्य बालकृष्ण यांनी आयएमएच्या डॉक्टारांसोबत खुली चर्चा करावी. आयएमएचे डॉक्टर तुमच्या २५ प्रश्नांची उत्तरे देतील. तसेच तुम्हाला डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तसेच चर्चा कधी व्हावी, हे तुम्ही निर्धारीत करा तर चर्चा कुठे व्हावी, हे आयएमए ठरवेल, असे डॉ अजय खन्ना यांनी रामदेव बाबांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.रामदेव बाबा यांनी दावा केला होता, की त्यांनी आतापर्यंत हजारो अलोपॅथी रुग्णालयातील रुग्णांना बरे केले आहे. यावर आयएमएने संबंधित रुग्णांची आणि त्या रुग्णालयाची माहिती मागवली आहे.बाबा रामदेव यांनी ८ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना ज्ञान नाही. त्यांचे बोलणे आयएमएने गंभीरपणे घेऊ नये. डॉक्टारांनी रामदेव बाबांकडे दुर्लक्ष करावे. शिक्षित समाजातील लोक आपले कार्य करत आहेत. कोरोना संकटात कोण चांगले कार्य करत आहे, हे लोकांना समजत आहे, असे आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यअक्ष आणि केंद्रीय समितीचे सदस्य डॉ डी डी चौधरी यांनी म्हटले. रामदेव बाबा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. त्यानुसार आता त्यांनी अलोपॅथी डॉक्टर आणि कोरोना उपचारपद्धती विरोधात वादग्रस्त विधान करत मोठ्या वादाला सुरुवात केली. अलोपॅथी उपचार पद्धतीमुळेच आज लाखो लोकांचा जीव गेला आहे. अलोपॅथी हे मुर्ख सायन्स आहे. तर दोन लस घेऊनही १० हजार डॉक्टर आणि एक लाख लोक दगावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबाने केले. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयएमएने तर रामदेव बाबावर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबांना १५ दिवसांमध्ये माफी मागावी नाहीतर १ हजार कोटींची दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी डॉ लेले यांनी दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात रामदेव बाबा विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहराजवळील बलीपोरा गावात संशयित दहशतवाद्यांनी शनिवारी सायंकाळी दोन स्थानिक युवकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यातील एकाच रुग्णालयात जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. पोलिसांनी शोध मोहिम राबवत या परिसराची कडक नाकेबंदी केली होती. काश्मीर झोनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात बंदुधाऱ्यांनी दोन युवकांवर गोळीबार केला. यात ते दोघेही जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र यातील अब्दुल अझीम पारे यांचा मुलगा संजीद अहमद पारे (१९) याला मृत घोषित करण्यात आले. दुसरा घुकलाम कादिर भट यांचा मुलगा शान भटला उपचारासाठी श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोरांना पकडण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली. पोलिसांनी या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, अन्य एका घटनेत जम्मू काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलात चकमक झाली. यात एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे शोपियां जिल्ह्यातील गनोवपोरा गावात एक दहशतवादी असल्याचे समजले. त्यामुळे सुरक्षादलाने या भागात शोधमोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत संबंधित दहशतवादी मारला गेला. घटनास्थळावरुन एक एके रायफल आणि काही आक्षेपार्ह साहित्य मिळाले.  

कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या स्फोटात एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या स्फोटात तरुणीची आई देखील जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाराच्या शरकूत विलगाम परिसरात राहणाऱ्या सारा बेगम (४९) आणि त्यांची मुलगी गुलनाज बानो बुधवारी (२६ मे) भाजी आणण्यासाठी जंगलात गेल्या. भाजी आणतानाच त्यांना जंगलात हा बॉम्ब सापडला असावा. मात्र त्यांना तो बॉम्ब असल्याचे लक्षात आले नसावे. त्यांनी घरी आल्यावर भाजीची पिशवी रिकामी करण्यासाठी जशी जमिनीवर सोडली तसा बॉम्ब जमिनीवर आदळून स्फोट झाला. यात मायलेकी दोघी जखमी झाल्या. तरुणी गलनाज इतकी जखमी होती की तिचा जागेवरच मृत्यू झाला, तर आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली - एकीकडे देशात व्हॅक्सिनचा तुटवडा असल्याने अनेक राज्यात धीम्यागतीने व्हॅक्सिनेशन सुरू आहे. अशातच काही खासगी रुग्णालयांनी हॉटेलांशी हात मिळवणी करून व्हॅक्सिनेशनचा (लसीकरण) धंदा सुरू केला आहे. या खासगी रुग्णालयांनी हॉटेलांशी संगनमत करून व्हॅक्सिनेशन पॅकेज द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अशा रुग्णालये आणि हॉटेलांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.काही रुग्णालये आणि हॉटेल एकत्र मिळून व्हॅक्सिनेशन पॅकेज देत आहेत. सरकारने घालून दिलेल्या गाईडलाईनचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून ही रुग्णालये आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार तात्काळ बंद झाला पाहिजे, असे या चिठ्ठीतून नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.सरकारने लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात लसीकरणासाठी केवळ चार पर्याय दिले आहेत. त्यानुसार सरकारी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर, सरकारी रुग्णालयांद्वारे चालणारे खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर आणि सरकारी रुग्णालयात व्हॅक्सिनेशन केले जात आहे. तसेच खासगी रुग्णालयांद्वारे सरकारी कार्यालयात व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बुजुर्ग आणि दिव्यांगांसाठी ग्रुप हौसिंग सोसायटीत, आरडब्ल्यूए कार्यालय, कम्युनिटी सेंटर, पंचातय भवन आणि शाळा-महाविद्यालयात व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


मुंबई - लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने नवीन सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लस दिली जाणार आहे. पालिके च्या कस्तुरबा, राजावाडी, कूपर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी लस घेता येणार आहे. तसेच यापुढे ४५ वर्षांवरील नागरिकांनाही सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी नजीकच्या केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे.पालिकेने नियमावलीत बदल करीत ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना कोविशिल्डची पहिली व दुसरी मात्रा घ्यायची आहे अशा नागरिकांना सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट लस घेता येईल. यात अपंगांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनाही कोविशिल्ड लसीचे दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी यांनाही याचा लाभ घेता येईल. स्तनदा माता यांनाही या लशीचा थेट लाभ घेता येणार आहे.


मुंबई - आधीच मराठा आरक्षणावरून राज्य सरकार अडचणीत आले आहे. आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. ओबीसी प्रवर्गातील पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि प्रशासनाविरोधात हा हक्कभंगाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अनुसुचित जाती,जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण कायदा २९ जानेवारी २००४ रोजी अंमलात आला. कलम ५ (१) मध्ये पदोन्नतीमधील आरक्षण पदोन्नतीच्या सर्व टप्यात लागू असेल अशी तरदूत करण्यात आली. हा कायदा अंमलात येऊनही ओ.बी.सी प्रवर्गाला कायद्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले नाही. या कायद्यावर उच्च न्यायलयात स्थगिती देण्यात आली होती. परंतु सन २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सदर अधिनियमावरील स्थगिती उठवली. तथापि, शासनाने ओ.बी.सींना पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर आरक्षण देण्याचे जाणिवपूर्वक टाळले. आज पर्यंत वेळोवळी सदस्यांनी ओबीसीमधील पदोन्नती आरक्षणाबद्दल मुद्दा उपस्थित केला पण शासनाने आश्वासनच दिले आणि पूर्तता न करता सभागृहाची दिशाभूल केली, असे पडळकर यांनी म्हटले आहे.आरक्षण लागू करणे हे शासनाचे संवैधानिक कर्तव्य होते. तथापि, शासनाने आपले संवैधानिक कर्तव्य न बजावता ओ.बी.सीसाठी पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर आरक्षण देण्याचे जाणिवपूर्वक टाळले. ही भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे. विधीमंडळाने पारित केलेला कायदा अंमलात आणण्याची घटनात्मक जबाबदारी शासनावर असताना त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून संवैधानिक कर्तव्य टाळले आहे. हा विधानसभेचा विशेषाधिकार भंग व अवमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.त्यानुसार पडळकर यांनी भारतीय संविधानातील संविधानातील अनु.१९४ आणि विधानसभा २८३ व २७४ अन्वये विधान परिषदेचा विषेधाधिकार भंग व अवमान झाल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, इतर मागारवर्ग कल्याण विभाग व मुख्यसचिव, सा.प्र.वि, अप्पर मुख्य सचिव, सा.प्र.वि, प्रधआन सचिव, इतर मागासवर्ग कल्याण विभाग यांचे विरूद्ध विशेषधिकार भंग व अवमानाची सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे केली आहे. ॲटर्नी जनरलने दिलेल्या अभिप्रायानुसार ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देता येणार नाही. मात्र अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हिजेएनटी, एबीसी प्रवर्गाला आरक्षण देताना ॲटर्नी जनरलचा सल्ला घेतला होता का?, असा सवालही पडळकरांनी केला आहे. या सरकारने कायद्याची अंमलबजावणी न करता सभागृहाची दिशाभूल आणि सर्व संसदीय प्रथा परंपरांचे संकेत पायदळी तुडवले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारच्या विरोधात पुढील कारवाईसाठी सभागृह समितीकडे हक्कभंग प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पडळकरांनी दिली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ओबीसींची ताकद आपण जाणताच. हा समाज आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय. ओबीसींना पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केली होती. 

मुंबई - मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली महापालिका ठरली आहे. मुंबईतील गोवंडी पूर्व भागातील रहेजा सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोअर टू डोअर कोरोना लस मिळण्यास सुरुवात झाली आहे.काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सोसायटयांना खासगी रुग्णालयासोबत करार करून लसीकरण करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मुंबईतील रहेजा सोसायटीने करार केला आहे. यामुळे रहेजा सोसायटीतील रहिवासी, ड्रायव्हर, घर काम काम करणाऱ्या महिला यांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मुंबईत सोसायटीमध्ये लसीकरण करणारी मुंबई महापालिका पहिली पालिका ठरली आहे. यामुळे लसीकरणचा वेग वाढणार आहे, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले. तसेच मुंबईत कोरोना लसीकरणाचा तुटवडा लक्षात घेता याबाबतचे ग्लोबल टेंडर काढले आहे. एकदा लस मिळाली की मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल. त्यानंतर मग सोसायटींना मोफत लस देण्याबाबतचा विचार करु, असेही राहुल शेवाळे सांगितले.राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील ६ सिस्टर सिटीजने मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे. 


माथेरान - जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात नाराज झालेल्या माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या १० नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागील निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या भाजपला 'रेडीमेड' १० नगरसेवक मिळाले आहेत. सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुकीमुळे ही राजकीय उलथापालथ सुरू झाल्याचे बोलले जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.२०१६ साली झालेल्या माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेचे १७ पैकी १४ नगरसेवक निवडून आले. दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेस असे पक्षीय बलाबल असलेल्या नगरपालिकेत प्रेरणा सावंत या थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी विश्वासात न घेता काम केल्याचा आरोप करीत १४ पैकी नऊ नगरसेवक, एक स्वीकृत नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाला. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत एकही नगरसेवक नसलेल्या भाजपाच्या हाती १० नगरसेवक लागल्यामुळे माथेरानमध्ये पक्षाची ताकद वाढली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, नगरसेविका रुपाली आखाडे, प्रियांका कदम, सोनम दाभेकर, सुषमा जाधव, प्रतिभा घावरे, ज्योती सोनावळे नगरसेवक संदीप कदम, राकेश चौधरी आदींसह शिवसेना उपशहर प्रमुख कुलदीप जाधव, शिवसेना शहर संघटक प्रवीण सकपाळ, माजी नगरसेवक प्रदीप घावरे आदींचा समावेश आहे.

नवी मुंबई - टाळेबंदीचे उलंघन करणाऱ्या दोघांनी पोलिसांवरच हल्ला करीत महिला पोलिसाला मारहाण केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कामोठे पोलिसांनी केली आहे. अलिशाह ढालवणे आणि सुरेखा अलिशाह ढालवणे अशी अटक आरोपींची नावे आहेत. करोना संसर्गाला आळा बसून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक संचारबंदी केली आहे. असे असताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.  अशाच एका कारवाईत काही मुली आढळून आल्या. त्या अत्यावश्यक सेवेतीलही नव्हत्या तसेच विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कामोठे पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. नाव नोंदणी आणि दंड वसुली करून समुपदेशक करीत योग्य ती कारवाई करण्यात येणार होती. कारवाईत पकडून आणलेले नागरिक पळून जाऊ  नये म्हणून प्रवेशद्वारावर (गेटवर) महिला पोलीस कर्मचारी तैनात होत्या. ही कारवाई सुरू असताना सुरेखा ढालवणे व अलिशाह हे दोघे कामोठे पोलीस ठाणे आवारात येत आमच्याच मुलींना का पकडले, इतर लोक बाहेर हिंडत नाहीत का? म्हणून अर्वाच्य शिवीगाळ करीत होते. त्यांना समज देण्याचा प्रयत्न करीत असताना एका महिला पोलिसाचा हात सुरेखा हिने पिरगाळला तर अन्य पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण केली.


मुंबई -  २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (ऑप्शनल) सीईटी घेण्यात येईल. ही प्रवेशपरीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना विभागातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा केली आहे. सर्व घटकांशी सखोल चर्चा करून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.कोविड-१९चा प्रादुर्भाव मार्च २०२१पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे दहावी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने नववी व दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे, असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.मंडळामार्फत जून २०२१अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.पुनर्परीक्षा आणि श्रेणीसुधार पुनर्परीक्षार्थी (रीपिटर स्टुडंट), खासगी (फॉर्म नं. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठीदेखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील, असे त्या म्हणाल्या.विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (ऑप्शनल) सीईटी घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.

विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण. दहावीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण. • विद्यार्थ्यांचा नववीचा अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश) हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोनापूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे.


कोलकाता - ऑलिओपॅथी उपचार आणि डॉक्टरांवर टीका करणे योग गुरु रामदेव बाबांना चांगलेच भोवताना दिसत आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या बंगाल शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कोलकात्याच्या सिंथी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयएमएचे बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसीचे खासदार डॉ. शांतनू सेन यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि अॅलोपॅथी कोरोनावर उपचार करू शकत नाही, असे रामदेव बाबा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे सेन यांनी सांगितले. याआधी आयएमएने रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याचा आणि मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आधुनिक औषधांनी कोरोना पीडितांचा मृत्यू होत आहे असे रामदेव बाबांनी म्हटले आहे. कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही दहा हजार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे रामदेव बाबांनी म्हटले आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गंभीर गुन्हा आहे. रामदेव बाबा आधुनिक उपचार पद्धतीची बदनामी करत आहेत. एकीकडे डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांना वाचवत आहेत. देशाची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचा सन्मान केला पाहिजे. मात्र रामदेव बाबा त्यांना बदनाम करत असल्यानेच गुन्हा दाखल केला आहे, असे सेन यांनी सांगितले.यापूर्वी रामदेवबाबाने व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचे आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरले, नंतर अँटिबायोटिक्स फेल झाले, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असे ते म्हणाले होते. तापावर दिले जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरले. जेवढे औषधे देत आहेत त्या सर्वांचे हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असे जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधे काम करत नाही. कारण ते शरीराचे तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता.


 


मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या मविआ सरकारला आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील मविआ सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. 

ओबीसींना २७ टक्क्यांच्यावर आरक्षण देऊ नका. २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला मविआ सरकारने आव्हान दिले होते. मात्र मविआ सरकारची ही याचिका फेटाळून लावली आहे.आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांवर असल्याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढी दिली. दरम्यान, नंदूरबार येथील एका सदस्याचे सदस्यत्‍व रद्द करण्यात आले. मुदतवाढ असल्याने सदस्यत्व रद्द करता येत नसल्याच्या कारणावरून सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले.उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मुदतवाढीचा आदेश अयोग्य ठरवत सहा महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी सरकारने ओबीसींच्या लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा अध्यादेश काढला. परंतु, ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नसल्याचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले.

दरम्यान, राज्यात सत्तापरिवर्तन झाले. मविआ सरकारने निवडणुका घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या अधिन राहून निवडणुका घेण्यास परवानगी दिली. पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार २७ टक्के नुसारच जागा निश्चित करायच्या आहेत.राज्यात एससीला १३ टक्के, एसटीला ०७ आणि ओबीसी – VJNT ३० टक्के आरक्षण आहे. यानुसार आधीच अकोला, नागपूर, वाशिम जिल्हा परिषदेत ओबीसींना आरक्षण कमी आहे. निर्धारीत टक्केवारीपेक्षा एससी आणि एसटीला जास्त जागा आहे, त्यामुळे राज्य सरकारने एससी आणि एसटीच्या जागा कमी कराव्या, ओबीसींच्या जागा कमी केल्यास, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करणार’ असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वीच दिला होता.
मुंबई ( गोरेगाव) - 
स्थानिक आमदार विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील मान्सून पूर्व कामांची पाहणी केली यावेळी पिरामल नगर नाला आणि वालभट नाल्याची सद्यस्थिती तसेच आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आमदार विद्या ठाकुर यांनी सूचना दिल्या.यावेळी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर,प्रभाग समिती अध्यक्ष हर्ष पटेल,नगरसेवक संदीप पटेल,दीपक ठाकुर, नगरसेविका श्रीकला पिल्ले,विजय गायकवाड,बलवंत वर्मा,विक्रम राजपूत,अमेय मोरे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबई - छोट्या पडद्यावरचा शो बिग बॉसप्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा १४ वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या १५ व्या सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत. बिग बॉस १४ च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, १५ व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.या शोची ऑडिशन प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. बिग बॉस १५ साठी ऑडिशनची प्रक्रिया २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि ३१ मे २०२१ पर्यंत चालणार आहे.सध्या बिग बॉस १५च्या प्रीमियरची तारीख ऑक्टोबर २०२१ असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या वेळी निर्मात्यांना काही एक्स जोड्यांसह, सामान्य लोकांना देखील शोमध्ये आणायचे आहे. याशिवाय काही स्पर्धकांची नावे देखील पुढे आली आहेत.दिव्यांका सध्या खतरों के खिलाडी ११ मध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी या दोघांकडे संपर्क साधला. मात्र, या जोडीने शोला होकार दिला आहे की, नाही याची अद्याप खात्री नाही.बालिका वधूमध्ये काम करणार्‍या नेहा मर्दाने नुकतीच पुष्टी केली की, बिग बॉस १५ साठी तिच्याशी संपर्क झाला होता. नेहा म्हणते की, बायो बबलमध्ये शूटिंग केल्यामुळे तिला वाटते की, ती बिग बॉसच्या घरात मिनी ट्रायल देत आहे. ती म्हणाली, या अनुभवानंतर मी बिग बॉसमध्ये गेले तर मी एक प्रबळ दावेदार होईन आणि मी हा कार्यक्रम जिंकू शकेन.या शिवाय या शोमध्ये अभिनेत्री सान्या इराणी देखील दिसू शकते. या शोसाठी अभिनेत्रीला देखील ऑफर देण्यात आली आहे.

मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हीरो टायगर श्रॉफने ‘हीरोपंती’ या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘हीरोपंती २’ येणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे. तो अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आहे.‘हीरोपंती २’ या चित्रपटात नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार आहे. गेल्या वर्षी ‘हीरोपंती २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण हे  यंदाच्या वर्षी होणार होते. मात्र, महाराष्ट्रात करोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही. या नंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. दरम्यान, चित्रपटाचा काही भाग हा या आधीच शूट झाला आहे.२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरोपंती’ या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेननने मुख्य भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री तारा सुतारिया ‘हीरोपंती २’ मध्ये दिसणार आहे. टायगरने या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचे सांगितले . ‘हीरोपंती २’ हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधी हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता.टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या अहमद खान हीरोपंती २ चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत.‘हीरोपंती २’ चित्रपटापूर्वी टायगर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या आधी टायगरचा ‘बागी ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘हीरोपंती २’ नंतर टायगर ‘बागी ४’ आणि ‘गणतप’ आणि ‘रैंबो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ओडिशा - यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. किनारपट्टीच्या भागात जवळपास १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण २४ परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने ओडिशा राज्यासाठी ६४१ कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिफारशीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मदतीची घोषणा केली.चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बालासोर आणि भद्रकी हे दोन जिल्हे जास्त प्रभावित झाले आहेत. बालासोर तसेच क्योंझर येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यावषयी माहिती घेण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या १२८ गावांना आगामी सात दिवसांसाठी मदत मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे सामान या ग्रामस्थांना दिले जाईल.

मुंबई - आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव्यासह तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाऊनबाबतही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्री वादळामुळे राज्याच्या कोकण किनारपट्टीभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळांच्या बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून कोकणाला निसर्ग वादळाप्रमाणे मदत देऊ असे आश्वासन दिले होते. त्यावर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.पदोन्नती आरक्षणमराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यसरकारने यापुढे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जारी केला. मात्र, याला महाविकास आघाडीतील काँग्रेसचा विरोध आहे. त्यावर देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी होऊ लागला आहे. मात्र, म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा घेतला जाईल. यामध्ये प्रामुख्याने राज्यात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत १ जूनला समाप्त होत आहे. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन वाढवायचा का? आहे त्या परिस्थितीमध्ये शिथीलता द्यायची याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


हरियाणा - हरियाणाच्या शेतकऱ्यांनी २४ मे रोजी भाजपच्या सरकारविरुद्ध एक मोठा विजय मिळवला. त्या दिवशी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हिसार शहराच्या क्रांतिमान पार्कमध्ये १०,००० हून अधिक शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. राज्य सरकारने त्या दिवशी आंदोलन दडपण्यासाठी ३००० हून अधिक पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो तैनात केले होते. पण हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर्स, ट्रॉली, टेम्पो, गाड्या व इतर वाहनांनी जमताच या दमन यंत्रणेचे काही एक चालले नाही. १६ मे रोजी हिसार येथे भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांद्या फोडल्या. शेकडो शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले. त्यावर कडी म्हणजे पोलीस केसेस होणार नाहीत असे आधी मान्य करूनही दोन दिवसांनी भाजप सरकारने ३५० शेतकऱ्यांवर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) व इतर गंभीर कलमे लावून खटले भरले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. २४ मे रोजी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचे ठरवले होते. पण घेराव सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने एसकेएमला चर्चेचे आमंत्रण दिले. विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी तब्बल ४ तास चर्चा झाली. शेवटी ३५० शेतकऱ्यांवरील १६ मेचे व त्यापूर्वीचे सर्व पोलीस खटले मागे घेण्याचे, १६ मे रोजी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ज्या अनेक वाहनांची नासधूस केली होती त्यांची नुकसानभरपाई देण्याचे आणि रामचंद्र नावाचा जो शेतकरी २४ मेच्या आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे प्रशासनाला मान्य करावे लागले. १६ मेच्या पोलीस दडपशाहीबद्दल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली. हा शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे मत शेतकरी संघटनेने व्यक्त केले.संयुक्त किसान मोर्चाच्या ज्या नेत्यांनी या विशाल सभेस संबोधित केले आणि प्रशासनासोबतच्या चर्चेत भाग घेतला त्यात बलबीर सिंग राजेवाल, जोगिंदर सिंग उग्राहान, गुरनाम सिंग चडुनी, राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, जगजीत सिंग दलेवाल, युधवीर सिंग, इंदरजीत सिंग, सुरेंद्र सिंग, पी. कृष्ण प्रसाद, मेजर सिंग पुनेवाल, फूलसिंग शेवकंद, सुमीत यांचा समावेश होता. हिसारच्या विशाल सभेत जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या मोदी सरकारवरही टीकेची झोड उठविण्यात आली आणि २६ मेचे देशव्यापी आंदोलन प्रचंड यशस्वी करण्याची हाक देण्यात आली.

नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी राहणार आहे. गतवर्षी डिसेंबरमध्येच तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. ती विनंती मान्यही करण्यात आली होती.यापूर्वी जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.जैस्वाल यांनी केंद्रामध्ये प्रतिनियुक्ती मागितल्याने विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर केली होती टीकाविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस डिसेंबर २०२० मध्ये म्हणाले होते, की सुबोधकुमार जैस्वाल हे एक अतिशय कार्यक्षम पोलीस महासंचालक राज्याला लाभले होते. मात्र, पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कंटाळून त्यांनी प्रतिनियुक्ती मागितली, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सुबोध कुमार जैस्वालहे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये काम केले आहे. रॉमध्ये त्यांनी ९ वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता. सुबोधकुमार हे २००६ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकातदेखील सहभागी होते. मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जुलै २०१८ मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती.

मुंबई - तौक्ते चक्रीवादळानंतर आठवडा उलटून गेला, तरीही राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी. अन्यथा कोकणवासीय नागरिक म्हणून मी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार, असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शिवसेनेची सामाजिक बांधिलकी कुठे आहे?', असा सवालही दरेकरांनी केला आहे.सामाजिक बांधिलकी हा शिवसेनेचा प्राणवायू होता. आज शिवसेनेचा प्राणवायू कुठे आहे? हे राऊतांनी पाहावे. निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा शिवसेना कुठे होती? आज शिवसेना कुठे आहे? परवा तौक्ते चक्रीवादळात शिवसेना कुठे होती? यापूर्वी कोकण संकटात असताना शिवसेना शाखाप्रमुख तत्काळ कोकणवासीयांच्या मदतीला धावून जात होते. पण आज शिवसेनेने सामाजिक बांधिलकी हरवलेली आहे. यामुळे संजय राऊत यांनी त्याची चिंता करावी', असे दरेकरांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन तासांचा रत्नागिरी दौरा केला. आता त्या गोष्टीला तीन दिवस झाले. पंचनामे पूर्ण झाले असतील किंवा नसतील; तरीही राज्य सरकारने कोकणवासीयांना मदत जाहीर करावी, अन्यथा पुढील काही दिवसांत मी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण करेल', असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रथमदर्शी अहवाल तयार आहे. त्याचा हवाला सरकारने घ्यावा, अशीही मागणी दरेकरांनी केली.

कोलकाता/भुवनेश्वर - पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर यास (यश) चक्रीवादळ धडकणार असून, यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे चक्रीवादळ काही तासांमध्ये तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची पूर्व किनारपट्टी सज्ज झाली आहे.ओडिशा आणि बंगाल प्रशासनाने किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.एनडीआरएफने आपल्या सुमारे ९५० जवानांना देशातील विविध ठिकाणांहून एअरलिफ्ट करुन, बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात तैनात केले आहे. याठिकाणी २६ हेलिकॉप्टरही स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत. जामनगर, वाराणसी, पटना आणि अराकोन्नमहून कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये सुमारे ७० टन साहित्य आणण्यात आले असल्याची माहितीही लष्कराने दिली.सुमारे ८०० हून अधिक ओडीआरएएफ कर्मचारी टॉवर लाईट, सर्च लाईट, जेनसेट्स, जेसीबी, हायड्रा क्रेन्स, इन्फ्लेटेबल बोट्स, हायड्रॉलिक ट्री कटर्स, गॅस कटर्स, प्लाज्मा कटर्स, सॅटेलाईट फोन्स आणि वॉकीटॉकी अशा साहित्यासह येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली.

चेन्नई - मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहीन, असे ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मैय्यमचे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्ट केले. कमल हासन यांनी तमिळनाडूची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हासन यांनी स्वतः दक्षिण कोयम्बतूरमधून निवडणूक लढवली होती. पण त्यांनाही भाजपाच्या उमदेवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. राज्यभरात मक्कल निधी मय्यमला २.५ टक्के मते पडली.

पक्षाला एवढा मोठा चेहरा असूनही निराशाजनक कामगिरीमुळे पक्षाचे उपाध्यक्ष आर. महेंद्रन, सरचिटणीस संतोष बाबू, पद्मप्रिया, एजी मौर्या, थंगावेल, उमादेवी, सेकर, सुरेश अय्यर आणि सीके कुमरावेल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या मोठ्या चेहऱ्यांनी पदे सोडल्यानंतर कमल हासनदेखील राजकारण सोडतील अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, एक व्हिडिओ शेअर करत हासन यांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. तसेच एका निवडणुकीतील पराभवामुळे मी खचलेलो नाही, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहीन, असे स्पष्ट केले.काही लोकांना पक्षाच्या पायाभूत सुविधांचे पुनर्गठन त्यांच्या स्वत: च्या फायद्यांकरिता करायचे होते, परंतु पुन्हा तसे होणार नाही. कष्टकरी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. मक्कल निधी मय्यमचा बदललेला चेहरा येत्या काळात सर्वांना दिसेल. आमच्या विचारसरणीत आणि आमच्या मार्गावर प्रामाणिकपणा असल्याने, कोणीही आमचा प्रवास थांबवू शकत नाही, असेही कमल हासन म्हणाले.


जयपूर - राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचे घबाड सापडले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असे सांगितले जात आहे. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नॅशनल हायवे रस्ता क्रमांक ८ वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचे घबाड आढळून आले. तब्बल ४.५ कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असे डीएसपी मनोज सवारियां यांनी सांगितले.कारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणेही शक्य नव्हते. पोलीस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.बिछीवाडा पोलीस ठाणे हे गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर आहे. येथून नॅशन हायवे जातो. या ठिकाणी नेहमीच तस्करी केली जाते. त्याचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाशही केला जातो. मात्र, बिछीवाडा पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली आहे. 


मुंबई - परळमधील के.ई.एम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या दोन अकाउंटंटला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दहा वर्ष या दोन आरोपींनी संस्थेतील माजी अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षरीने रुग्णालय प्रशासनाच्या खात्यातून पैसे लाटले आहेत. आरोपींनी रुग्णालयाची रक्कम स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर व इतर खात्यांमध्ये वळवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केईएम रुग्णालय हे मुंबईतल्या मोठ्या रुग्णालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मात्र, हे रुग्णालय आता येथे झालेल्या कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्यामुळे अधिकच चर्चेत आले आहे. संस्थेत काम करणाऱ्या दोन अकाउंटंटनी तब्बल ५ कोटी २३ लाख ९६ रुपयांचा हा घोटाळा केला आहे. शेठ गोवर्धन सुंदरदास मेडीकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या आकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. राजन राऊळ असे अटकेतील तर श्रीपाद देसाई असे फरार आरोपीचे नाव आहे.

रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात राज्यातल्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र येथे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. आरोपी रुग्णालय प्रशासनामध्ये अकाउंटंट विभागात काम करत होता. त्याचा हा पैसे लुटीचा काळा धंदा मागच्या ११ वर्षापासून सुरू होता. आरोपीने या काळात रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्या बनावट सह्या करून रक्कम लाटली आहे. या अकरा वर्षाच्या काळात डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. निर्मला रेगे हे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. याच काळात या आरोपींनी रुग्णालय प्रशासनाची पाच कोटी रुपयांची रक्कम विविध बँक खात्यामध्ये वर्ग करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे. एका आरोपीला अटक केली असून दुसरे आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाला सुरुच आहे. २६ मे रोजी या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतील. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने हा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी पंतप्रधान मोदी आपल्या कार्यालयात सात वर्षांचा कालावधी पूर्ण करतील.संयुक्त किसान मोर्चाने या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सीमेवर यावे, अथवा आपल्या घरुनच या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असेही ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे सह-संयोजक अविक शाह यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घरांवर, दुकानांवर किंवा कार्यालयांवर काळे झेंडे लाऊन या आंदोलनाला पाठिंबा दाखवावा, असे ते म्हणाले. संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा वाद लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, युनायटेड किसान मोर्चानेही सरकारने शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा सुरू करावी अशी पंतप्रधानांना मागणी केली आहे.दरम्यान, ऑल इंडिया फार्मर्स सोसायटीचे अध्यक्ष कृष्णबीर चौधरी यांनी किसान मोर्चालाच लक्ष्य केले आहे. किसान मोर्चा एमएसपीच्या आपल्या जुन्या मागण्यांवर अडून राहिल्यामुळेच चर्चा पुढे सरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर तो फरार झाला होता. १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत, दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला अटक केली. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ४ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा कुस्तीपटू सागर राणा याच्यासोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी देखील झाले होते. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हा वाद मॉडेल टाऊन परिसरातील एका फ्लॅटवरून झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांच्या हाती घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 'सुशील कुमार आणि त्याचा साथीदार यांचा शोध आमची पथके घेत आहेत. दोघांच्या विरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. ते फरार आहेत. त्यामुळे दोघांच्या अटकेसाठी बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे रोख बक्षिस दिल्ली पोलिसांकडून देण्यात येईल. तर अजय कुमार यांची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे.' असे दिल्ली पोलीस डीसीपी उषा रंगनाणी यांनी सांगितले होते. सुशील कुमारने या विरोधात दिल्ली न्यायालयात जामीनसाठी याचिका दाखल केली होती. परंतु, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची याचिका फेटाळली होती.

रायगड - रायगड समुद्र किनाऱ्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी सात, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक असे पुरुष जातीचे आठ मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळा दरम्यान खोल समुद्रात बुडालेल्या पी - ३०५ बार्जवरील मृतदेह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने ओएनजीसी आणि मुंबई पोलिसांनी माहिती कळवली आहे. सध्या हे आठही मृतदेह अलिबाग जिल्हा सामान्य रुगणलायत ठेवण्यात आले आहेत. ओएनजीसी पथक नातेवाईकांना घेऊन रायगडात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.अलिबाग तालुक्यातील नवगाव दोन, सासावणे दिघोडी एक, आवास एक तर किहीम समुद्रकिनारी तीन तर मुरुड समुद्रकिनारी एक असे आठ मृतदेह वाहून समुद्र किनारी आले आहेत. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करून डीएनए सॅम्पल घेण्यात आले आहेत. तसेच ओएनजीसी अधिकाऱ्यांना ओळख पटविण्यासाठी येण्यास कळविले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.


मुंबई - मुंबई हाय येथील हिरा तेल विहीरजवळ समुद्रात बुडालेला बार्ज अखेर नौदलाला ३० मीटर खोलीवर सापडला. शनिवारी केलेल्या शोधमोहिमेनंतर नौदलाला हा बार्ज शोधण्यात यश आलं आहे.तौक्ते चक्रीवादळामुळं 'ओएनजीसी'च्या हीरा इंधन विहीर परिसरात 'पी - ३०५' ही बार्ज समुद्रात बुडाली. ही इंधनविहीर ओएनजीसीची होती, तर बार्जचे परिचालक अॅफकॉन्स या कंपनीचे होते. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. त्यातील १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात नौदलाच्या बचावपथकांना यश आले आहे. मात्र, या दुर्घटनेत ६६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ९ जणं बेपत्ता आहेत. चक्रीवादळात जलसमाधी घेतलेल्या पी - ३०५ या बार्जवरील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.‘पी ३०५’ या बार्ज दुर्घटनेच्या शोधकार्यासाठी नौदल कसून प्रयत्न करत आहेत. शनिवारी दिवसभराच्या शोधानंतर समुद्राच्या तळाशी हा बार्ज सापडला.'आयएनएस मकर' या कॅटामरान श्रेणीतील नौकेने विशेष सोनार रडारच्या साहाय्याने त्याचा शनिवारी रात्री शोध लावला, असल्याची माहिती नौदलाने दिली आहे.वादळात अडकलेला बार्ज तीन नांगर टाकून उभा होता. पण एकाएकी लाटांचा आणि वाऱ्यांचा जोर अनपेक्षितरित्या वाढला. लाटा बार्जच्यावरून जाऊ लागल्या. त्यामुळे एकेक करून तिन्ही नांगर लाटांच्या धडाक्यात तुटून वाहून गेले. त्यानंतर हा बार्ज समुद्रात अस्थिर झाला. त्यात तो तेल उत्खनन विहिरीच्या एका खांबाला जाऊन धडकला. त्यामुळे वाकडा झाला. त्यात पाणी आत शिरू लागले आणि अवघ्या काही तासांत तो समुद्रात बुडाला, असे स्पष्टीकरण ‘ओएनजीसी’ने दिले आहे.बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांच्या जबाबावरून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव यांच्यासह अन्य काही जणांवर ही कारवाई करण्यात आली. चक्रीवादळाची सूचना देऊन, तसेच कर्मचारी वारंवार सांगत असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी ऐकले नसल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बल्लव यांच्यावर काही जखमी, दुखापत झालेल्या व बुडालेल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, स्वतः बल्लव अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना बार्ज समद्रातून हलवू नये यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याची शक्यता असल्याने अनोळखी व्यक्तींनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अकोले - राज्यातील महावितरण,पारेषण व वीज निर्मिती कंपनीतील सर्व कामगार, कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा व कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय योजनेत परस्पर नेमलेला टीपीए  बदलावा या मागणीसाठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.२४)  राज्यभर काम बंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली.महाराष्ट्र वीज कामगार महासंघासह वर्कस फेडरेशन, सबऑर्डीनेट इंजिनियर असोसिएशन, वीज तांत्रिक कामगार युनियन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार काँग्रेस या कृती समितीतील प्रमुख सहा संघटनांच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे करोनामुळे मृत्यू झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांना आघाडी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन अग्रक्रमाने त्यांचे व कुटुंबीयांचे  लसीकरण पूर्ण करावे,कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचा वारसांना पन्नास लाख रुपये अनुदान द्यावे, वीज बिल वसुलीची सक्ती थांबवावी  या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात वीज कामगार, कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी मोठय़ा संख्यने सामील व्हावे असे आवाहन वीज कामगार महासंघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रविकांत सरोवरे, सचिव गणेश कुंभारे, राजेंद्र क्षीरसागर, सुधाकर पुंड, राजश्री कुमावत, राहुल वरघंटे, संभाजी पिसे,पंढरीनाथ साबळे, दिलीप काळे आदींनी केले आहे.काम बंद आंदोलन असले तरी कोविड सेंटर, दवाखाने यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असतील मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसलेली कुठलेही कामे कर्मचारी करणार नाहीत, अशी माहिती वीज कामगार महासंघाचे नाशिक परिमंडळ अध्यक्ष संजय दुधाने यांनी दिली.

कोल्हापूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत संभाजीराजे समाजाची भूमिका जाणून घेणार आहेत. बैठकीनंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन राज्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असल्याचे समजते. संभाजीराजे यांनी यापूर्वीच आपण २७ मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोल्हापुरातील बैठकीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला छत्रपती संभीजीराजे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत छत्रपती संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी २७ तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझे - तुझे केले तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असते, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात. आंदोलनाला काय लागते, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण? शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले असले, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. सीबीआयच्या कारवाईने कोलकात्यातील राजकारण पेटले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या पत्राची सध्या बंगालमध्ये चर्चा होत आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिले आहे. “भाजपात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय राहू शकत नाही,” असे म्हणत घरवापसी करून घेण्याची विनवणी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपात दाखल झाले होते. ममतांच्या वर्तुळातील सुवेंदू अधिकारींपासून ते अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी कमळ हाती घेतले. यात तृणमूल काँग्रेसमध्ये असताना चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीआधी भाजपात दाखल झालेल्या सोनाली गुहा यांना आता पुन्हा तृणमूलच्या वाटेवर आहेत. त्यांनी तसे पत्र लिहून आपल्याला पक्षात घेण्याची विनवणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.सोनाली गुहा यांना ममता बॅनर्जींच्या वर्तुळातील म्हणून त्यांना ओळखलं जात होते. त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्या नाराज होत्या. माध्यमांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाकडून त्यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र पक्ष मजबूत करण्याचे काम करू, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. “माझा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि त्याची जाणीव मला होत आहे. तिथे मला नेहमी वेगळे  असल्याची जाणीव झाली. त्यांनी माझा वापर केला. मला ममतांची बदनामी करण्यास सांगितले, पण मी असे केले नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.दुभंगलेल्या मनाने मी हे पत्र लिहित असून, भावनिक होऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. जर आपण मला माफ केले नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझे उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेल. ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही,” असे म्हणत सोनाली गुहा यांनी आपल्याला पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याची विनवणी ममता बॅनर्जी यांना केली आहे.


नवी दिल्ली - भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेमध्ये भारतासमोर प्रकर्षाने ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी भारत सरकार, राज्य सरकार, एनजीओ युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन वाहतुकीसाठी लागणाऱ्या लागणाऱ्या क्रायोजनिक टँकरची कमी जाणवत असल्याने त्याची आयात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने (MEIL) थायलँडहून ११ टँकर्स आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी तीन क्रायोजेनिक टँकर्स भारतात दाखल होत आहेत. हे टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवण्यात येणार आहेत.भारतात ऑक्सिजन तुटवडा कमी व्हावा म्हणून युद्धपातळीवर काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून मेघा इंजिनिअरींग कॉर्पोरेशन लिमिटेड ११ क्रायोजेनिक टँकर्स तेलंगणा सरकारकडे सोपवणार आहे. प्रत्येक टॅंकरमधून १.४० कोटी लिटर ऑक्सिजन वाहतूक केली जाऊ शकते.मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भारतातील व ऑक्सिजनचा तुटवड्यावर मात करण्यासाठी अकरा क्रायोजनिक टँकरची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे क्रायोजनिक टँकर्स थायलँड येथून भारतात आणले जात आहेत. क्रायोजनिक टॅंकर्स भारतात आणून ऑक्सिजनचा तुटवडा कमी करावा या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड हे काम करत आहे.इंडियन आर्मीच्या एअरक्राफ्टमधून क्रायोजेनिक टँकर्सची वाहतूक केली जात आहे. मेघा इंजिनिअरिंग लिमिटेड ११ क्रायोजेनिक टँकर्स भारत सरकारला मोफत देत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा कमी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मेघा इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे सांगण्यात आले.


नवी दिल्ली - 'ऑलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे' असे म्हणणारे योगगुरु बाबा रामदेव अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत. जनतेसमोर खोटे दावे करणाऱ्या आणि भ्रम निर्माण करणाऱ्या रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी 'इंडियन मेडिकल असोसिएशन'कडून (IMA) करण्यात आली आहे. इतकेच नाही तर रामदेव यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर असोसिएशनला संघर्षावर उतरण्याची वेळ येईल आणि यासाठी न्यायालयाचीही मदत घेतली जाईल, असा इशाराच आयएमएने दिला आहे.स्वत: मॉडर्न मेडिसीन अॅलोपॅथीचा उपचार घेणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी एक तर रामदेव यांचे आरोप मान्य करत अॅलोपॅथी उपचारच अमान्य करत रोखावेत किंवा धाडस दाखवत रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे आव्हानच आयएमएकडून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना देण्यात आले.करोनाविरुद्धच्या या लढाईत सरकारसोबत मॉडर्न मेडिसिन अॅलोपॅथी डॉक्टर खांद्याला खांदा लावून लढत आहेत. आत्तापर्यंत या लढाईत १२०० डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. इतकेच काय तर जे अॅलोपॅथीवर टीका करत आहेत त्या रामदेव रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण हेदेखील अॅलोपॅथी उपचार घेत आले, असे म्हणत आयएमएने रामदेवांच्या आरोपातला फोलपणा उघड केला.आंतरराष्ट्रीय स्तरावर योगगुरु म्हणून ओळख मिळवण्याशिवाय रामदेव हे 'फार्मास्युटिकल युनिट'चे कॉर्पोरेट दिग्गज आहेत. केवळ आपल्या कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ते जनतेला भूलवत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत, असाही आरोप आयएमएने केला आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पूंछमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एका दहशतवादी तळावर छापा मारुन ही कारवाई करण्यात आली.पूंछमध्ये एका ठिकाणी दहशतवादी तळ असल्याची माहिती पोलिसांना आपल्या खबरीकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पूंछ पोलिसांच्या एका स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) ही कारवाई केली. एसएसपी डॉ. विनोद कुमार आणि डीएसपी मुनीश शर्मा यांनी या पथकाचे नेतृत्व केले. या पथकासोबतच लष्कराचे स्थानिक पथकही या कारवाईत सहभागी होते.काही तास चाललेल्या या शोधमोहीमेनंतर एक एके-५६ रायफल, या रायफलीची एक मॅगझीन, एके रायफलीची ३० जिवंत काडतुसे, दोन चिनी बनावटीची पिस्तुले आणि एक पिस्तुल मॅगझीन जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

गडचिरोली - पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीच्या एटापल्लीमधील पेदी कोटमी येथील जंगलात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. तसेच मृत नक्षलवाद्यांचा आकडा १६ पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहोचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत, याबाबतची माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल, असे ते म्हणाले.कसनसूर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्षलवादी हे तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची एक बैठक सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे गडचिरोलीकडे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या कामगिरीबाबत पोलिसांचे कौतुक केले.पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने रात्रीच याठिकाणी दाखल होऊन संपूर्ण गावाला घेराव घातला. कमांडो आल्याचे कळताच नक्षलवादी जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान पोलीस आणि नक्षलवादी आमने-सामने येऊन चकमक सुरू झाली, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळी ६ पुरुष आणि ७ महिला असे एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले.  


मुंबई -  बॉलिवूड मध्ये अशा अनेक जोड्या पाहायला मिळतात ज्यांच्यामध्ये वयाचे मोठे अंतर आहे. मात्र तरीसुद्धा हे लोक एकमेकांना तितकच प्रेम करतात. बी टाउनमध्ये असेच एक कपल आहे, त्यांचे वय त्यांच्या प्रेमाच्या आड कधीच येत नाही. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा असे या कपलचे नाव आहे. मलायका आणि अर्जुन अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अर्जुन कपूर कधीच आपल्या नात्याबद्दल माध्यमांसमोर बोलत नाही. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने याचे कारणसुद्धा स्पष्ट केले आहे. कॅम्पेनियन या युटयूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने नुकताच याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी अर्जुनला त्याच्या खाजगी आयुष्याबाबत काही प्रश्न करण्यात आले होते. यावर उत्तर देत अर्जुनने म्हटले आहे. ‘मला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोलायचे नसते. त्याच्या पाठीमागे तसेच कारण देखील आहेत. मी माझ्या जोडीदाराचा आदर करतो. तिच्या भावना लक्षात घेतो.कारण तिच्यापाठीमागे एक भूतकाळ आहे. माझ्या बालपणी मी या परिस्थितीतून गेलोय. त्यामुळे मी समजू शकतो की हे सर्व कसे असते. आणि याचा मुलांच्यावर काय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टी खाजगी ठेवाव्या लागतात. मी माझ्या जोडीदाराविषयी पूर्ण आदर बाळगतो. मी तेच करतो ज्यात तिची सहमती असते. माझे पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य एकमेकांवर अजिबात अवलंबून नाही आहे. असा खुलासा अर्जुनने केला आहे.मलायकाने अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानसोबत लग्न केल होते. मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. मलायका आणि अरबाजला एक मुलगा देखील आहे. सध्या मलायका अर्जुनसोबत नात्यात आहे. आणि हे दोघे सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget