June 2021

मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने २०१७ पासून मूक आंदोलने सुरू आहेत. ५७ मूक अंदोलनाच्या माध्यमातून गेले ३ वर्ष मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतू हा प्रश्न अजून ही प्रलंबीत आहे. मराठा मूक अंदोलनाची पुढील दिशा २१ जूनला समन्वयकांशी चर्चा करून ठरवणार असल्याची, माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या बैठकीत राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगीतले. कोल्हापूरमध्ये सुरु झालेले मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. असे खासदार संभाजीराजे म्हणाले. नाशिकला २१ जूनला सकल मराठा समाजाच्यावतीने मूक आंदोलन करण्यात येणार आहे.सारथी हे सगळ्याचे हृदयस्थान आहे. सारथीच्या माध्यमातूनच आपण मराठा समाजाला पायावर उभे करु शकतो. अधिकारी वर्गाकडून योग्य रित्या काम होत नसल्याचे त्यांनी मान्य केले. येत्या शनिवारी त्याबाबत पुण्यात बैठक होणार आहे. माझी अपेक्षा आहे की शनिवारी सारथीच्या चेअरमननी पैशाची मागणी करावी. सरकारने लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे. समाजासाठी जे लोक योगदान देत आहेत असे लोक घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. असे देखील संभाजीराजे म्हणाले.याशिवाय राज्य सरकारसोबतच्या बैठकीत २०१४ पासूनच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलनातील १ गुन्हा वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती देखील स्थापन केली जाईल, असे सरकारने सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले.

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास ४ ते ५ तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.'मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये या तिघांचा सहभाग होता. हे तिघेही सचिन वाजेंसोबत मिळून हा गुन्हा केला आहे. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा या दोघांनी कट रचून मनसुखच्या हत्येनंतर पुरावे नष्ट केले आहेत.' असा युक्तीवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच आत्तापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी हे या प्रकरणानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या पिस्तूलच्या लायसनची मुदत संपली असल्याचेही एनआयएतर्फे सांगण्यात आले.दरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून एनआयएने लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचेदेखील आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले. एनआयएने यापूर्वी आरोपींना चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळीही आरोपी उपस्थित होते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. यावेळी प्रदीप शर्मा भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच 'माझा आणि सचिन वाजेचा काहीही संबंध नसून अटकेत असलेला संतोष माझा जुना खबरी आहे, बाकी अटक केलेल्या आरोपींना मी ओळखत नाही, असे प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात सांगितले.

मुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात आली. तसेच शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा शर्मा यांची एनआयने चौकशी केली होती.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. यामध्ये मुंबई पोलीस खात्यातील क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या कारवाईत क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्वात पहिली अटक केली होती. त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी स्थित घरावर गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे.याआधी पकडण्यात आलेल्या दोन आरोपींमध्ये संतोष शेलार व आनंद जाधव या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणातील आणखीन एक व्यक्ती मनसुख याची ज्या टवेरा गाडीमध्ये हत्या करण्यात आली होती, त्या गाडीला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबईतील गोरेगाव परिसरातून जप्त करण्यात आले होते. या गाडीचा मालक आनंद जाधव असून गाडीचा चालक हा संतोष शेलार असल्यामुळे या दोघांच्या चौकशीनंतर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष शेलार व आनंद जाधव यांच्यात चौकशीदरम्यान त्यांनी कबूल केले आहे की सचिन वाझेकडून त्यांची भेट प्रदीप शर्मा सोबत झाली होती. ही भेट मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये झाली असल्याचेही तपासात समोर आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आले आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत १०० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केले आहेत. शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातल्या धुळे येथे पूर्ण झाले. एमएससी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या प्रदीप शर्मांनी अल्पावधीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळवली. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मांना २००८ मध्ये सेवेतून निलंबीत करण्यात आले. मात्र, सबळ पुराव्याअभावी प्रदीप शर्मांना क्लीनचिट मिळाली. ९ वर्षांच्या दिर्घ कालावधीनंतर २०१७ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाले. प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली. त्यांनंतर विधानसभेच्या तोंडावर प्रदीप शर्मांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा शिवसेनेचा अधिकृत अर्ज दिला होता.

पाटणा (बिहार) - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. बिहारमधूनही अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. जनता दलही (संयुक्त) यावेळी मंत्रिमंडळात आपली दावा करत आहे. जेडीयूमधून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि संतोष कुशवाहा यांच्या नावाची चर्चा आहे.यावेळी सुशील मोदींसारखे भाजपामधील मोठे नेते मंत्रिपदाचे दावेदार आहेत. याशिवाय, लोक जनशक्ती पक्षातूनही एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते. भाजपचे लक्ष्य उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. तेथील सामाजिक समिकरणेही भाजपला लक्षात घ्यावे लागतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह म्हणत आहेत की, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. मात्र, किती जणांना आणि कोणाकोणाला मंत्रिपद मिळेल, याबाबत बोलणे त्यांनी टाळले. ते म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सर्वांचा सन्मान केला जातो.वरिष्ठ पत्रकार रवि उपाध्याय म्हणाले की, जेडीयूतून ललन सिंह, आरसीपी सिंह और संतोष कुशवाहा यांच्या नाव पुढे केले जाऊ शकते. ललन सिंह बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जवळचे आहेत. त्यांच्या नावाची चर्चा खूप आधीपासून आहे. तर दुसरीकडे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह हेदेखील केंद्रीय मंत्रिपदाचे दावेदार आहेत. नीतीश कुमार संतोष कुशवाहा यांनादेखील पक्षाकडून संधी देऊ शकतात, असेही ते म्हणाले.सुशिल मोदी बिहार भाजपचे मोठे नेते आहेत. तेदेखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला गेला तर बिहारला त्याचा फायदा होईल. तसेच सामाजिक समिकरणे पाहता दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपति पारस यांच्यारुपाने मोठ्या दलित चेहऱ्याचाही विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे रवि उपाध्याय यांनी सांगितले. तर भाजपचे प्रवक्ते विनोद शर्मा म्हणाले की, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा अनेक जणांना संधी मिळेल. जेडीयूचा मागच्या वेळेत समावेश झाला नव्हता. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूचा समावेश करण्यात येईल. तर बिहार भाजपाचे नेते सुशिल मोदींनाही संधी देण्याची शक्यता आहे. बिहार भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांची इच्छा आहे की, सुशिल मोदींना केंद्रात मंत्रिपद मिळावे, असेही भाजप प्रवक्ते विनोद शर्मा यांनी सांगितले.बिहारमध्ये भाजपचे १७ खासदार आहेत. यातील पाच जणांना मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जेडीयूचे १६ खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला यावेळी किती पदे मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जेडीयूला दोन ते तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. लोजपमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपति पार आणि चिराग पासवान यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जेडीयूच्या नेत्यांनी आधीच चिराग पासवान यांच्याप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भाजप नेत्यांची चिराग पासवान यांच्या नावाला पसंती आहे. मात्र, तरीही जेडीयूच्या नाराजीमुळे चिराग पासवान यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, हे भाजपसाठी सोपे नाही.जेडीयू आणि भाजप २००५ पासून बिहारमध्ये सत्तेत आहेत. मात्र, वाजपेयी सरकार में जेडीयूला संख्याबळानुसार जागादेखील मिळाल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर जेव्हा सरकार बनले तेव्हा जेडीयू बिहारमध्ये भाजपसोबत नव्हती.२०१७ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार बनवले. मात्र, यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. यावेळी जेडीयू केवळ एक मंत्रिपद देण्यात येत होते.


मुंबई - मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना आता पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

लसीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे -

१) परदेशी शिक्षण घेण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी विद्यापिठाचे प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, परगेशी व्हिसा मिळण्यासाठी संबंधीत विद्यापिठाचे I-20किंवा DS – 160 फॉर्म

२) परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जायचे असल्यास संबंधित विद्यापिठ किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित असलेली अधिकृत कागदपत्रे

३) नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांकडे संबंधित कंपनीचे ऑफर लेटर, मुलाखतीचे पत्र, पुन्हा नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना एम्प्लॉयर लेटर

४) टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा अधिकारी यांच्याकडे क्रिडा मंत्रालयाचे अधिकृत पत्र असणे अनिवार्य

परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देतांना त्यावर पारपत्राचा क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. जर पहिला डोस घेते वेळी पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल तर लसीकरण अधिकाऱ्यांना केवळ पारपत्राचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र देता येईल.

लसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांसाठीच्या लसीकरणाचा नमुना फॉर्म भरुन घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्ड लस आपातकालिन वापरासाठी मान्य केल्याने लसीकरण प्रमाणपत्रात या कोविशील्ड लसीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहिल.


मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मराठी ठेकेदाराला फोन करून धमकावत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे.काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला वरळी येथील १ कोटी १९ लाखांच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० या कामाचे वर्क ऑर्डर काढण्यात आले. तसेच शिवडी विभागात २० लाख ७१ हजारांची कामे मिळाली. या कामाच्या सिमेंट चाचणीचा रिपोर्टही झाला. काव्या इंटरप्रायजेसने शासनाच्या नियमांप्रमाणे ई निविदा भरून कंत्राट मिळवले होते. परंतु टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता शिवसेनेचे एजेंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याचा फोन करत होते, असा आरोप मनसेने केला आहे.वरळी विभागाचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाने धमकी देण्यात येत होती. वारंवार पाठपुरावा करूनही म्हाडाचे अधिकारी दबावात येऊन व टक्केवारीसाठी काम करू देत नव्हते. तसेच कंपनीने वारंवार पत्र व्यवहार करूनही म्हाडाकडून चालढकल करण्यात येत होती. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठी माणसाने मुंबईमध्ये काम करायचे नाही का? असा सवाल करत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकावली व घोषणा देत त्यांच्या तोंडाला काळे फासले.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी ६ नोव्हेंबर २०२०ला राज्यपाल यांना सादर केली होती. यादी सादर करुन ७ महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ लोकांची नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती, ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती. यावर आज राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. यावेळी राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे.

अनिल गलगली यांनी या माहितीबाबत प्रथम अपील दाखल केले होते त्यामुळे आज राज्यपालांच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीत अनिल गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास ती यादी नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे?, असा सवाल केला. त्यावर, राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण माहिती आहे. निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी की नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल. असे उत्तर राज्यपाल भवणाकडून आरटीआय कार्यक्रते अनिल गलगली यांना मिळाले आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी माहिती विचारली होती की, मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी. तसेच मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जावर १९ मे २०२१ ला राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले, की राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी (प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही.

कोलकाता -  मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये सामील झाले. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणीही भाजपामध्ये राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे आणखी बरेच नेते पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे.तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुकुल रॉय म्हणाले की, मी भाजपा सोडला आणि टीएमसीमध्ये आलो आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसमध्ये पश्चिम बंगाल भाजपामधील अनेक बडे नेते प्रवेश करणार आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने नवनिर्वाचित भाजपा आमदार जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तथापि, तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केले आहे की, ज्या लोकांनी तृणमूल सोडले आणि निवडणुकीपूर्वी ताबडतोब भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांना पुन्हा पक्षात समाविष्ट केले जाणार नाही.रॉय यांनी टीएमसीत प्रवेश केल्यानंतर ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. मुकुल यांची घरवापसी झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही मुकुल रॉय विरोधात बोलले नाहीत. त्यांच्यासोबत कधीही मतभेद नव्हते, असे ममता म्हणाल्या. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये धमक्या येत असत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला, असे ममतांनी सांगितले. तसेच रॉय यांची आता तृणमूलमध्ये असलेली भूमिका ममतांनी स्पष्ट केली. मुकुल रॉय यांनी यापूर्वीही महत्वाची भूमिका साकारली होती. भविष्यातही तीच भूमिका राहील. तृणमूल एक कुटुंब आहे, असे ममता म्हणाल्या.दरम्यान, भाजपा सोडल्यानंतर मुकुल रॉय आपल्या जुन्या मित्रपक्षांच्या लक्ष्य स्थानी आले आहेत. पश्चिम बंगालमधील बराकपूरचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. अभिषेक बॅनर्जी यांचा राजकारणात उदय झाला. तेव्हा मुकुल यांना टीएमसीने घराबाहेर हाकलले. त्यानंतर ते भाजपामध्ये आले. आता पुन्हा टीएमसीत गेले आहेत. त्यांची अवस्था आयाराम-​गयाराम सारखी झाली आहे, असे अर्जुन सिंह म्हणाले.

मुंबई - निर्माता मधु मंटेना यांचा ‘रामायण’ हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. माध्यम अहवालानुसार या चित्रपटात दीपिका पदुकोण,हृतिक रोशन आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जर, या अहवालांवर विश्वास ठेवला तर, हृतिक रोशनच्या या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप मुख्य कलाकारांविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट खास बनवण्यासाठी मेकर्स परिश्रम घेत आहेत. रावणाचे पात्र अधिक उठावदार होण्यासाठी त्याच्या लूकची खास पद्धतीने रचना करण्याची तयारी सुरू आहे. या अहवालांनुसार, यूएस बेस्ड कॉस्च्युम टीम हृतिकच्या या लूकसाठी विशेष मेहनत घेणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यांनी ‘अवतार’ चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केले होते. मेकर्स आणि टीममधील हा करार फायनल झाला, तर ही टीम हृतिक रोशनसाठी खास रावणच्या लूकची रचना करेल.

मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे ५०० कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ३ डी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. मधु मंटेना, नील मल्होत्रा ​​आणि अल्लू अरविंद या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.  या आधी या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. परंतु, ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो आधीपासूनच ‘रामा’ची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यानंतर, लगेचच मधु मंटेनाने ‘रामायण ३ डी’ची घोषणा केली. चित्रपटासाठी त्याला निर्माते देखील मिळाले आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची टीम एका अशा सुपरस्टारचा शोध घेत आहे, जो ‘रामा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकेल आणि त्यांच्या मते, महेश बाबू या भूमिकेत चपखल बसेल.

स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेनाने, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून फँटम फिल्म्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. आता फँटम फिल्म तो एकट्याने चालवणार आहे. फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तो आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जात आहे की, मधु मंटेना त्यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करणार आहे. कारण, इतक्या मोठ्या महाकाव्याची कथा एका चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे कठीण आहे.

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती, वेगवेगळ्या आजारांचे मुलांवर होणारे परिणाम पाहता विद्यार्थ्यांच्या मनात तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, यासंबधीचा अधिकृतरित्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेनंतर सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने, परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीचे १४ लाख विद्यार्थी कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून दूर राहणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकनाचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शालेय शिक्षण मंत्र्यांनी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषीत करण्याच्या सूचना केंद्र सरकारला पाठवल्या आहेत. त्यामुळे आता निकलाबाबाद केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्यावर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या पवारांच्या निवासस्थानी तीन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता असल्याचा संदर्भ या उभयतांच्या भेटीला असल्याचे सूत्रांकडून समजते. केंद्राच्या विरोधात जनमानसातील भावना प्रबळ होत आहे. त्यात वाढती महागाई, करोनाची साथ आटोक्यात आणण्यातील अपयश, वाढती बेरोजगारी व अन्य आर्थिक धोरणांचा परिणाम देशाच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.पश्चिम बंगालच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावूनही तेथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकहाती बहुमत मिळवले. 'तृणमूल'च्या या रणनीतीत प्रशांत किशोर यांचा निवडणूक आराखडा कामी आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील बदलत्या घटना आणि त्यानुसार झालेल्या प्रचार व त्यातील काही किस्से याविषयी शरद पवार यांना प्रशांत किशोर यांनी माहिती दिल्याचे कळते.सुमारे तीन तासांच्या या बैठकीदरम्यान, काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार उपस्थित असल्याचे समजते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या 'लंच डिप्लोमसी'त देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर शरद पवार दुपारी मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले. मात्र, मुंबईतील राजकीय वर्तुळात या बैठकीची दिवसभर चर्चा रंगली होती. दरम्यान, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील ही राजकीय भेट नाही. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीचा सल्ला घेण्यासाठी अनेक नेते त्यांना भेटत असतात. त्यानुसार प्रशांत किशोर हे त्यांना भेटले असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

देशातील राजकीय वातावरणात बदल होत असल्याचे शरद पवार व प्रशांत किशोर यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असून, विरोधकांची एकजूट झाली, तर वेगळे चित्र दिसू शकते. यामुळे विरोधकांची मोट कशी बांधता येईल, यावरही चर्चा झाल्याचे समजते.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १५ दिवसांत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने गुरुवारी तात्काळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १६ जून रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. संख्याबळ असल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर गेल्या वर्षी भाजप बंडखोराला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला स्थायी समिती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. गेल्या वर्षी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेने भाजपच्या अधिकृत स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असतानाच शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या उपमहापौर भगवान भालेराव यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला होता. त्याचवेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तर शासनाने नव्याने आदेश काढून जुन्याच सदस्यांना कारभार पाहण्याचे आदेश दिले. याविरुद्ध स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. बुधवारी न्यायालयाने याबाबत निकाल देत येत्या १५ दिवसांत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी तातडीने उल्हासनगर महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली. येत्या १६ जून रोजी नव्या सभापतीची निवड केली जाणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज भरण्यात येतील. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका निवडणुकांना अवघे ८ महिने शिल्लक असताना होऊ  घातलेल्या स्थायी समिती निवडणुकीमुळे शहरात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपविरोधात असलेले रिपाइंचे भगवान भालेराव हे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उपमहापौर झाले. मात्र स्थायी समिती सभापतीपदाचे वेध लागल्याने त्यांनी महिनाभरापूर्वी भाजपच्या गोटात प्रवेश केला. एकूण १६ सदस्यीय स्थायी समितीत नगरसेवक संख्येनुसार भाजपचे ९ सदस्य आहेत. शिवसेनेचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचा प्रत्येकी १ सदस्य आहे. रिपाइंचे भालेराव हे भाजपच्या गोटात गेल्याने भाजपचे संख्याबळ १० पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शिवसेना ६ सदस्यांवर मर्यादित राहिली आहे. हेच चित्र कायम राहिल्यास भाजप सहजरीत्या स्थायी समिती पुन्हा मिळवेल असे बोलले जाते. 

वसई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे. नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर व मिरा भाईंदर येथील भूमिपुत्र एकत्र येत गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे मानवी साखळी आंदोलन केले.माजी खासदार दि. बा.  पाटील यांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त व येथील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारला होता. यामुळे नवी मुंबईत तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी अनेकदा सरकार दरबारी केली आहे. मात्र, विमानतळाचे काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले असतानाच सिडको संचालक मंडळाने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मंजूर करून राज्य मंत्री मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. रायगड, नवी मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील फाऊंटन येथे एकत्र येत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वसई विरार, ठाणे, मीरा भाईंदर या भागातील शेकडोच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते. विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्या असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. दि बा पाटील यांनी स्थानिक भूमीपुत्रांच्यासाठी केलेले कार्य हे मोठे असून त्यांना त्याचा मान मिळाला पाहिजे. जो पर्यंत विमानतळाला दि बांचे नाव दिले जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली


कल्याण - बजाज फायनान्सच्या नावाखाली डोंबिवलीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर नांदेड पोलिसांनी धाड टाकली. नांदेड पोलीस आणि कल्याण क्राइम ब्रँचने आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. दिनेश मनोहर चिंचकर (३१) आणि रोहित पांडुरंग शेरकर (२८) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.कर्जाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गरजूंना गंडा घालण्यासाठी, बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या नावाखाली लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीबाबत नांदेड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदारांना ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल आले, त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले असता, ही टोळी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे असल्याची माहिती मिळाली.नांदेड पोलिसांनी क्राइम ब्रँचचे फौजदार नितीन मुदगुन यांच्याशी संपर्क साधला. पोलीस पथकाने डोंबिवली येथील बनावट कॉल सेंटर शोधून काढले. बुधवारी रात्री नांदेड पोलिसांसह क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली स. पो. नि. भूषण दायमा, फौजदार नितीन मुदगून, मोहन कळमकर, आदींच्या पथकाने डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर कॉलेज समोरील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ११६ क्रमांकाच्या गाळ्यावर छापा टाकला. या सेंटरमध्ये दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहित पांडुरंग शेरकर हे दोघे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

आरोपी चालवत असलेल्या या बोगस कॉल सेंटरमध्ये १८ ते २० कर्मचारी नोकरीला ठेवले आहेत.तसेच उत्तरप्रदेश राज्यातील काही साथीदारांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे आढळून आले. मोबाइल क्रमांकाचा ऑनलाइन डाटाबेस मिळवून सेंटरवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाइल क्रमांकाच्या डाटाबेसमधील क्रमांकावर फोन करण्यास लावले जात असे. चौकशीदरम्यान बजाज फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देतो, असे अमिश दाखवून कर्ज पास करण्याकरिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून गरजूंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकाच्या रुळावर धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर स्टंटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्याचे नाव अरमान शेख आहे. घाटकोपर भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले.आरोपी तरुण मंद प्रकाशात बंदूक घेऊन रेल्वे रुळाजवळ बसला असून त्याच्या मागून एक रेल्वे जात आहे. यादरम्यान तो एक बंदूक उचलतो आणि स्वत:वर गोळीबार करतो. यादरम्यान, तो रडतानाही दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो बंदूक त्याच्या कानाजवळ ठेवतो आणि स्वत: वर गोळी मारण्याचे भासवत तो ट्रॅकच्या मध्यभागी पडला.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या तपासात हा अंधेरी स्थानकाच्या ट्रॅकवर चित्रित करण्याच दिसून आले. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपी अरमान शेख याला अटक केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही व्हिडिओ ८-१० दिवसांपूर्वी तयार केले गेले होते आणि ८ जूनला आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोपीने सोशल मीडियावर हा अत्यंत धोकादायक व्हिडिओ शूट करत खूप अ‌ॅक्टिंग केल्याचा अभिमान दाखविला होता. मात्र, पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर लगेचच आपली चूक मान्य केली आणि माफी मागण्यास सुरूवात केली. दरम्यान, या आरोपीने आणखी बरेच स्टंट केल्याचे व्हिडिओही समोर आले आहे. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसात स्टंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपी स्टंटमॅनला अटक केल्यानंतर त्याच्याबरोबर आणखी कोण आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करत आहेत.

मुंबई - मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचारपूस केली. दुर्घटना कशी घडली? तुमच्या कुटुंबातील सर्व सुखरूप आहेत ना? जास्त मार लागला नाही ना? आदी विचारपूस केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून या दुर्घटनेतील गंभीर रुग्ण किती आहेत, किरकोळ मार लागलेले रुग्ण किती आहेत? कुणाची प्रकृती अधिक गंभीर तर नाही ना आदींचीही माहिती घेतली. मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले १० वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.मुंबई -  शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू असे कधी वाटले नव्हते. शिवसेना  हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, या देशाने अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचे हे वैशिष्ट्य आहे २२ वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले.हे आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथे आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. सहकाऱ्यांच्या कष्टाने राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचे आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मविआ सरकार ५ वर्ष टिकणार, नुसती टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असे शरद पवारांनी सांगितले. देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळले नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारले, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असे पवार म्हणाले.ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

मुंबई - शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. बुधवारी मुंबईत मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणीमधील इमारत कोसळळी. या घटनेनंतर जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या आणि धोकादायक अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आणि त्यांनी कारवाईबाबतची महत्त्वाची माहिती दिली. पाटील म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे. या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टीत बदल केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.

पणजी  - पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांचे एलएसडी आणि गांजा विक्री करणाऱ्या एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांनी ही कारवाई केली आहे. तब्ब्ल ८ लाख ५० हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी मोरजिम येथे ड्रग्स घेऊन येणार असल्याचे समजले होते. म्हणून पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. त्या दरम्यान परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीच्या ताब्यात एलएसडी व गांजा असा अंमली पदार्थ सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत ८ लाख ५० हजार इतकी आहे.पंचनामा करून मुद्देमाल व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिमित्री बोल्डोव (वय ४१ वर्ष, राहणार रशिया) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध एनडीपीएस कलम २० (बी) (२) (अ) आणि २२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा आरोपी जिथे उतरला होता. त्या गेस्ट हाऊस मालकाने आरोपी परदेशी नागरिकाचा सी फॉर्म भरला नाही आणि म्हणूनच परदेशी कायद्याच्या कलम १४ अंतर्गत दुसरा गुन्हा स्वतंत्रपणे नोंदविला गेला आहे.पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवबा दळवी यांच्यासह पीएसआय हरीश वैंगणकर, हवालदार विनोद पेडणेकर, रोहन वेल्गेनकर, देश खांडेकर, विष्णू गड आणि महेश नाईक यांनी या छाप्यात सहभाग घेतला होता. दरम्यान एसडीपीओ गजानन प्रभुदेसाई आणि उत्तर गोव्याचे एसपी शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मुंबई
-
मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी गालत आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. १० आणि ११ जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील १०३ दरडग्रस्त गावांना धोका असल्याने स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या स्थलांतरांचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.समुद्र, खाडीकिनारी राहण्याऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४ दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात ३०० मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर केंद्र सरकारने लसपुरवठा तसेच इतर बाबींशी निगडित धोरणात्मक निर्णय घेणे सुरु केले आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड तसेच स्पुतनिक-व्ही या लसींचे दर निश्चित केले आहेत. तसेच लसीवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयही केंद्राने घेतला घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. या निर्णयानुसार कोव्हिशिल्ड या लसीची किंमत प्रतिडोस ७८० रुपये एवढी असेल. तर कोव्हॅक्सिन या लसीचा दर हा प्रतिडोस १४१० एवढा असेल. स्पुतनिक-V या लसीचा दर प्रतिडोस ११४५ रुपये एवढा असेल. हे सर्व दर हे खासगी रुग्णालयांसाठी असतील.केंद्र सरकारने कोरोना प्रधिबंधक लसीवर ५ टक्के GST आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व लसींवर १५० रुपये प्रतिडोस सर्व्हिस चार्ज आकारण्याचेसुद्धा केंद्राने ठरवले आहे. येत्या २१ जूनपासून केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसपुरवठा आणि लसीकरण पद्धतीविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या एकूण ७४ कोटी डोसेसाठी ऑर्डर दिलेली आहे. त्यामध्ये २५ कोटी कोव्हिशिल्ड, तर १९ कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसेसचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सरकारने ई-बायोलॉजिकल लिमिटेडला ३० कोटी डोसेसची ऑर्डर दिल्याचेही केंद्राने सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारने लसीच्या या सर्व कंपन्यांना लसखरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ३० टक्के रक्कम आधीच देऊ केली आहे.

दरम्यान, सध्याच्या नव्या गाईडलाईन्सनुसार एकूण लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तसेच या सर्व लसी राज्यांना मोफत दिल्या जातील. नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी तशी माहिती दिली. तसेच ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण जास्त असेल तिथे लसी जास्त प्रमाणात पोहचवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. कानपूरच्या किसान नगर येथील महामार्गावर एसी बस आणि टेम्पो एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला. यामध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तब्बल ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी १० जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर संपूर्ण महामार्गावर मृतदेह इतरत्र पडलेले दिसत होते, तर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या होत्या. त्यामुळे जखमींना टेम्पो आणि अन्य गाड्यांमधून हॅलेट रुग्णालयात पोहोचवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी लोडरच्या माध्यमातून अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवले.महामार्गावर DCM चा ड्रायव्हर बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि यादरम्यान टेम्पो आणि बसचा अपघात झाला. या अपघातात जितक्या लोकांचा मृत्यू झाला ते सर्व टेम्पोमध्ये होते. हे सर्व कानपूरच्या सचेंडी पोलीस ठाण्याहद्दीतील लाल्हेपुर गावातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व एका बिस्किट फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि नाईट शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फॅक्टरीत जात होते.

कानपूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना दोन-दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएमओनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपघातावर शोक व्यक्त करत म्हटले की राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदतीची घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघातावर दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या नातेवाईकांना २-२ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


मुंबई - मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले असून थोड्याचवेळात ते दिल्लीत दाखल होतील. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई - गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ड्राइव्‍ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्‍या हस्‍ते या केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. कोविड-१९ विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्‍हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्‍या वाढवत आहे. याचाच एक भाग म्‍हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनांतून येवून, वाहनांत बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्‍याची सोय देखील करण्‍यात येत आहे. राज्‍याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ५१ चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्‍या प्रयत्‍नांतून हे ड्राइव्‍ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्‍यात आले आहे. स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्‍याच मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत हे लोकार्पण करण्‍यात आले.मुंबईत आतापर्यंत एकूण ३५ लाख ८१ हजार ६७४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात २८ लाख १३ हजार ३५ लाभार्थ्यांना पहिला तर ७ लाख ६८ हजार ६३९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

कोलकाता - मुंबईहुन कोलकात्याला जाणारी विस्तारा कपंनीच्या विमानात टर्बुलंसमुळे आठ प्रवासी जखमी झाले आहेत. तर यातील तीन गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे ही घटना काल सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जेव्हा विमान कोलकाता येथून २५ किमी दूर असताना घडली. कोलकाता विमानतळ प्रशासनाने याबाबत माहिती दिली. विस्तारा कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, ७ जूनला मुंबई-कोलकाता दरम्यान उड्डाण करणारी प्लाइट यूके ७७५ ला उड्डाण करण्यापूर्वीच टर्बुलेंसचा सामना करावा लागला. यादरम्यान, काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच कोलकाता येथे पोहेचल्यावर त्यांना भरपाईही देण्यात आली. आम्ही प्राथमिकतेच्या आधारावर या घटनेची चौकशी करत आहोत आणि लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, अशी माहिती विस्ताराच्या प्रवक्त्यांनी दिली. कोलकाता विमानतळाचे संचालक सी पट्टाभी यांनी सांगितले की, काल (सोमवारी) सायंकाळी चार वाजून २५ मिनिटांच्या दरम्यान यूके ७७५ प्लाइटने सुरक्षितरित्या कोलकाता विमानतळावर लँडिंग केले. दरम्यान, या विमानात एकूण १२३ प्रवासी होते.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केजरीवाल सरकारच्या महत्वाकांक्षी 'घर घर रेशन योजने'वर बंदी घातली आहे. ही योजना दिल्लीतील प्रत्येक घरात रेशन पोहचवण्यासाठी बनवण्यात आली होती. ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजूरी घेण्यात आली नव्हती. यामुळे ही योजना रोखण्यात आल्याची माहिती आहे. रेशन योजनेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. केजरीवाल सरकारची ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येते. त्यात बदल फक्त संसद करू शकते. त्यामुळे दिल्ली सरकार या योजनेचे नावही बदलू शकत नाही, असे केंद्राने म्हटले आहे.दिल्ली, यूपी आणि हरियाणामध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केंद्र सरकारला दिले होते. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशन द्यावे, असेही कोर्टाने म्हटले होते. मे महिन्यापासून परप्रांतीयांना रेशन द्यावे आणि दिल्ली-एनसीआरमधील स्थलांतरितांना आयडी कार्डशिवाय रेशन दिले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते. यापूर्वी केंद्राने योजनेच्या नावावरून आक्षेप घेतला होता. तेव्हा या योजनेला मुख्यमंत्री योजना म्हणार नाही. कोणतेही नाव राहणार नाही आणि केजरीवाल सरकार या योजनेचे कोणतेही श्रेय घेणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. या योजनेला नाव असो वा नसो आम्ही फक्त लोकांच्या दारात रेशन वितरित करू, असेही ते म्हणाले होते.

मुंबई - दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे. युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही स्वत:ची ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जागृत केला. ते राजनीती, युद्धनीती, अर्थनीती, संघटनकौशल्याचा सखोल अभ्यास असलेले, मानवी मुल्यांवर निष्ठा असलेले दूरदृष्टीचे राजे होते. महाराजांचे शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांनी घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श आद्वितीय असून त्यांचे जीवन, कार्य, विचार महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन केले आहे. राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वंदन केले. त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुन चालण्याचा, महाराष्ट्राचा सन्मान वाढवण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या, शिवस्वराज्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी राज्य सरकराने लोकेश चंद्रा यांची नियुक्ती केली आहे. चंद्रा यांनी कुलाबा बेस्ट भवन येथे पदाचा कार्यभार स्वीकारला. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चंद्रा यांच्या समोर असणार आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्राबेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रालोकेश चंद्रा यांनी बेस्ट उपक्रमाचे प्रभारी महाव्यवस्थापक पी. दैलाम् यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी आय.आय.टी. (दिल्ली) मधून एस.टेक. ही पदवी देखील संपादन केली आहे. लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपुर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी म्हणून चंद्रा यांनी काम केले आहे. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपुर सुधार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्वाच्या पदांवर देखील ते कार्यरत होते. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला ४ हजार कोटींचा तोटा आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान लोकेश चंद्रा यांच्या समोर असणार आहे.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची अशोक चव्हाणांबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करूनही आपली भूमिका मांडली आहे. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आम्ही ‘सारथी’ला एक एकर जागा दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती बिल्डिंग बांधायला ५ वर्ष लागतील. अजितदादा, या ५ वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?, असा सवालही त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का? ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल अॅप्रोचचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई - मुंबईत युरेनियम सापडल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी झारखंड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यासंबंधी तपासासाठी एनआयएचे पथक रवाना होणार आहे. मुंबईत एप्रिलमध्ये एका भंगार दुकानात युरेनियम सापडले होते. युरेनियम हा अणू स्फोटकांमधील अत्यावश्यक घटक असून, ते संरक्षित श्रेणीत आहे. त्याचा सार्वजनिक, तसेच व्यावसायिक वापर करण्यावर बंदी आहे. त्यामुळेच मुंबईत हे युरेनियम सापडल्यानंतर त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आला. भंगारात सापडलेल्या या स्फोटकांचे धागेदोरे झारखंडपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे.'एनआयए'मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड पोलिसांनी बोकारो येथे युरेनियमचा ६.४० किलो साठा दोन दिवसांपूर्वी जप्त केला. त्या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे. हा साठा शुद्ध युरेनियम स्वरूपातील नसून, खनिज स्वरूपातील आहे. अमेरिकेत ते तयार झाल्याचे झारखंड पोलिसांनी सांगितले. मुंबईत सापडलेले युरेनियमदेखील अमेरिकेतच तयार झाले होते. त्यामुळेच मुंबईतील साठ्याचा संबंध झारखंडशी असल्याचा अंदाज आहे. त्याबाबत तपासासाठी 'एनआयए'चे पथक तिकडे रवाना झाले आहे.झारखंड पोलिसांनी केलेल्या तपासात अनिल सिंह नावाची व्यक्ती युरेनियम पुरवत असल्याची माहिती समोर आली असून, त्याला अटक झाली आहे. पण, या प्रकरणी मुन्ना ऊर्फ इशाक हा फरार आहे. इशाक हा देशात अनेक ठिकाणी युरेनियम पुरवतो, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळेच हे प्रकरण मुंबईतील युरेनियमचा तपास करणाऱ्या 'एनआयए'च्या पथकाने स्वत:कडे घेतले आहे.

कोलकाता  - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. केंद्र सरकारकडून लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देण्यात येत होता. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा फोटो राज्य सरकारने खरेदी केलेल्या सर्व प्रमाणपत्रांवर छापण्यात येत आहे. यामुळे केंद्र आणि राज्यातील संघर्षात आणखी एक ठिणगी पडली आहे. देशात कोरोनाचा कहर असून त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना लस घेतली आहे. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र छापण्यात आले होते. लसीकरण प्रमाणपत्रावर छायाचित्र छापून पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, आता इतर राज्यांकडून लस प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्याचे छायाचित्र छापण्यात येत आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापल्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, आता तेच कृत्य टीएमसीने केले आहे.पश्चिम बंगालमध्ये तीसऱ्या टप्प्यामध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. ममता यांचा फोटो असलेले लस प्रमाणपत्र १८-४४ वर्षांच्या लोकांना देण्यात येत आहे. यापूर्वी झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांनीदेखील लस प्रमाणपत्रावर छापला जाणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. या राज्यांत आता कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. जम्मू - जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मन्याल भागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांचा एक छुपा उड्डा उद्ध्वस्त केला आणि शस्त्रे व दारूगोळा हस्तगत केला.ठाणामंडीतील अझमताबाद भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर व पोलीस यांनी मन्याल, दाना व कोपरा येथे संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाने मन्याल येथील अड्डा शोधून काढला. या अड्ड्यात त्यांना ४ पिस्तुले व त्यांची ८ मॅगझिन, एक एके रायफल व तिचे दोन मॅगझिन, ५४ काडतुसे आणि इतर साहित्य सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.काश्मीर खोऱ्यात पाठवण्यासाठी शस्त्रे व दारूगोळ्याचा हा साठा अलीकडेच या भागात ड्रोनच्या साहाय्याने टाकण्यात आला असावा असे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुणे - महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, महाआघाडी होऊ शकली नाही तर स्वबळावर लढणे अशा दोन्ही पर्यायांची तयारी ठेवली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल. पुण्यामध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एका भूमिकेत असू, असे राऊत म्हणाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, असेही ते म्हणाले.
पुणे - जागतिक दर्जाचे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर जोरदार हल्ला चढवला. “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागल्यामुळे देशातील सामान्य माणसांचे प्रचंड हाल झाले. या काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार या नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही देऊ शकले नाही,” असे मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. ते राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्राय डे फ्लेम’ या कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्र सेवा दलातर्फे सध्या कोरोनाचे बळी ठरलेल्यांच्या स्मरणार्थ फ्राय डे फ्लेम अंतर्गत ऑनलाईन आदरांजली आणि निर्धार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर हल्ला चढवला. अमर्त्य सेन म्हणाले, “कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागले आणि देशातील सामान्य माणसांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. कोरोना काळात गरीब भारतीयांची परिस्थिती खूप हलाखीची झाली. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोई नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. पंतप्रधानानी लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरात बसायला सांगितलं, पण लोकांना नोकऱ्या नाहीत, उत्पन्नाची साधनं नाहीत याकडे दुर्लक्ष केलं. स्थलांतरित मजुरांचे खूप हाल झाले. अगोदरच नोट बंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता. पण काळा पैसा आला नाही. उलट उद्योग धंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले. बेरोजगारी वाढली.”


बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांचा आलेख वाढतच आहे. देशात कोरोनासोबत आता ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. ब्लॅक फंगसचा प्रकोप थांबता थांबेनासा झाला आहे. कर्नाटकात ब्लॅक फंगसमुळे १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६२ जण बरे झाले आहेत. तर १११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ५६४ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्री डॉ.के सुधाकर यांनी ही माहिती दिली. ब्लॅक फंगचे रुग्णांना उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. तर पूर्ण बरे होण्यासाठी हे रुग्ण पाच ते सहा आठवडे घेतात.ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी देशात ऍम्फोटेरेसिन-बी नावाच्या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. सध्या या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ब्लॅक फंगसचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनाप्रमाणे ते लपवता येऊ शकत नाही. कोरोनाची लागण झालेला व्यक्ती घरात इतरांपासून लपून राहू शकतो. मात्र, ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णाला रुग्णालयात जावेच लागते. रुग्णाच्या चेहऱ्यावर, डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. याला काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस म्हटले जाते. तर, आता पांढरी बुरशी आणि त्यापाठोपाठ पिवळ्या बुरशीची चर्चा आहे. काळी, पांढरी, पिवळी बुरशी हे म्युकरमायकोसिसचे प्रकार आहेत, स्ट्रेन आहेत. त्यामुळे, रंगांची चर्चा न करता कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या ब्लॅक फंगसला कसे टाळता येईल, याकडे लक्ष देणे गरचेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोलकाता - तृणमूल काँग्रेसने खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. कोलकाता येथे बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संघटनात्मक बैठकीत ही घोषणा करण्यात आली. एप्रिल ते मे या विधानसभा निवडणुकीतील निर्णायक विजयानंतर तृणमूलची ही पहिली बैठक होती. पक्षाने खासदार काकोली घोष दस्तीदा यांना पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी आणि अभिनेत्री सयोनी घोष यांची युवा शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सयोनी यांनी गेल्या महिन्यात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आतापर्यंत पडद्यामागे राहून काम करत होते. त्यांनी यापूर्वी युवा संघटनेचे नेतृत्व केले आहे. आता त्यांच्या पदोन्नतीनंतर ते त्या पदावरून हटतील. ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की पक्षाकडे "एक व्यक्ती, एक पद" फॉर्म्युला आहे. बंगालच्या बाहेर तृणमूल काँग्रेसचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले. येत्या वर्षात उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव केल्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जीं यांना पंतप्रधानपदासाठी पंसती दिली आहे. तर देशाच्या पंतप्रधान व्हायचे, या उद्देशाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यांनी तशी घोषणा केलेली नाही. दरम्यान, पंतप्रधानपदासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. ममता बॅनर्जींकडून बिगरभाजप पक्षाला एकत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर आणि दक्षिण २४ परगनाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षात दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. त्यांनी २०११ मध्ये झाले राजकारणात प्रवेश केला होता. ममता बॅनर्जी यांचे भाऊ अमित बॅनर्जी यांचे ते पुत्र आहेत.

मुंबई - सलमान खानचा राधे हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून कौतुकाचा वर्षाव केला तर दुसरीकडे टीकाकारांनी मात्र भाईजानला जोरदार ट्रोल केले. शिवाय ऑनलाईन प्रदर्शित झाल्यामुळे  सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत राधेला आर्थिक यश देखील थोड कमीच मिळाले. मात्र तरी देखील भाईजानने हार मानलेली नाही. आता सलमान राधेचा सिक्वल घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधे चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत सलमानने ही मोठी घोषणा केली. या चित्रपटाचा सिक्वेल यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर माझी टीम सिक्वेलचा विचार करत आहे. जर राधेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही त्याचा सिक्वल घेऊन नक्कीच येऊ.

तो म्हणाला, “राधे हा वॉण्टेडचा सिक्वल नाही. वॉण्टेडमधील व्यक्तिरेखा घेऊन त्याच्यावर एक वेगळाच चित्रपट आम्ही तयार केला आहे. पण दोन्ही चित्रपटातील स्टाईल किंवा अॅक्शन सीन एकसारखे वाटत असल्यामुळे प्रेक्षकांना हा गैरसमज झाला. आम्ही सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत आहोत. ज्या प्रमाणे चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा दबंग चित्रपट सीरिजमधून विस्तारली गेली. त्या प्रमाणे राधेला देखील आणखी विस्तारता येऊ शकते का? याबद्दल आमची क्रिएटिव्ह टीम विचार करत आहे.”१३ मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो झी प्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने  zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचे पाहायाला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचे  समजत आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये २.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.

मुंबई -  अभिनेता मनोज वाजपेयी  सध्या ‘द फॅमिली मॅन  २’मुळे चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजबद्दल अनेक विवाद समोर येत होते. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरून या वेबसिरीजवर बंदी आणण्याची मागणीदेखील होत होती. मात्र रिलीजनंतर अभिनेता मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे खुपच कौतुक होत आहे. आगामी काळामध्ये या अभिनेत्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.अलीकडेच अशी चर्चा सुरु होती की, मनोज वाजपेयी अभिनेता हृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. मात्र आत्ता मनोज वाजपेयीने या वेबसिरीजमधून काढता पाय घेतला आहे. टॉम हिडलेस्टन यांच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसिरीज साठी मेकर्सनी मनोज वाजपेयी यांना विचारणा केली होती. शस्त्रांची डील करणाऱ्या रिचर्ड रोपरची ही भूमिका होती. ‘द नाईट मॅनेजर’ मध्ये ही भूमिका ह्युग लॉरीने साकारली होती. तसेच टॉम हिडलेस्टनने यामध्ये जोनाथन पाइन ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘द नाईट मॅनेजर’ च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे. आणि या वेबसिरीजसाठीच अभिनेता मनोज वाजपेयीला विचारणा करण्यात आली होती.मात्र अभिनेता मनोज वाजपेयीने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार दिला आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार मनोज यांच्याजवळ डेट उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांनी या वेबसिरीजसाठी नकार कळवला आहे. आणि म्हणूनच हृतिक रोशनच्या या डेब्यू वेबसिरीजमध्ये ते दिसणार नाहीत.तसेच मिड डे कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना महामारीमुळे त्यांच्या २ वेबसिरीजना आधीच विलंब झाला आहे. आणि ते सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. आणि त्यानंतर ते आपली विलंब झालेली कामे आटोपून घेणार आहेत. आणि अशातच त्यांना या वेबसिरीजसाठी मेकर्सला हव्या असणाऱ्या डेट देणे  शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी  यामधून काढता पाय घेतला आहे.

मुंबई - दक्षिण मुंबईमधून जलदगतीने पश्चिम उपनगरांमध्ये पोहोचण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्गावरील एका जोडपुलाआड येत असलेल्या १७ गिरणी कामगारांच्या घरांवर बुलडोझर फिरविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या जोडपुलामुळे महालक्ष्मी येथील मॉडर्न मिल कम्पाऊंडमधील सातपैकी एक चाळ काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी काळबादेवी येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली दरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी-वांद्रे सागरीसेतूदरम्यान पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या उभारणीचे काम मुंबई महापालिकेने सुरू केले आहे. या मार्गावरून काही जोडरस्ते शहरातील विविध भागांमध्ये जाणार आहेत. त्यासाठी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. महालक्ष्मी परिसरातील सात रस्त्यानजिक प्रस्तावित पूल सागरी किनारा मार्गाला जोडण्यात येणार आहे. हा पूल केशवराव खाडय़े मार्गावरून जात आहे. या मार्गावरील मॉडर्न मिल कम्पाऊंडमधील १७ कुटुंबीयांची एक चाळ पुलाला अडथळा बनली आहे. त्यामुळे पालिकेने या चाळीला नोटीस बजावली आहे.ब्रिटिश काळातील पूर्वाश्रमीच्या गार्डन मिलमधील कामगारांच्या वास्तव्यासाठी बोमेनजी पपेटी यांनी महालक्ष्मी परिसरात बैठी घरे बांधली होती. येथे सहा चाळी १९०२ च्या सुमारास उभ्या राहिल्या. मिलमधील कामगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन १९३० तेथेच एक दुमजली इमारतही बांधण्यात आली. या कामगार वसाहतींमध्ये १५६ कामगारांची कुटुंबे गेली अनेक वर्षे वास्तव्यास आहेत. मात्र आता सागरी किनारा मार्ग प्रकल्पामुळे १७ कुटुंबीय अडचणीत आले आहेत.गिरणी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा मालकाचाही मानस आहे. मात्र आता सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी जागा द्यावी लागणार आहे. एक अख्खी चाळ काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे असून १७ रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये आपली व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण आम्हाला प्रकल्पग्रस्तांच्या घरात वास्तव्यास जायचे नाही. इतर कामगार कुटुंबीयांबरोबरच आम्हाला राहायचे आहे. मॉडर्न मिल कम्पाऊंडच्या भूखंडावरच संक्रमण शिबीर बांधून तेथे तात्पुरती वास्तव्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे - अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणेच आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले आहेत.राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद आहे. तरीही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लशीची पहिली मात्रा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. पालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे तिचे लसीकरण करण्यात आले होते.या प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.


वसई - वसई / विरार महापालिकेचे आयुक्त प्रेमसिंग जाधव हे गेल्या दोन दिवासांपासून बेपत्ता असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.प्रेमसिंग जाधव यांच्याकडे कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी होती. मात्र जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी प्रेमसिंग जाधव, कार्यालयात आले होते. मात्र कामावरून निघाल्यानंतर ते घरी पोहोचलेच नाहीत. बराच वेळ झाला तरी जाधव घरी न परतल्याने नातेवाईकांनी चौकशी सुरु केली. शोध लागत नाही हे लक्षात आल्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. जाधव यांनी शहरात उत्तम कामे केली आहेत. सहाय्यक आयुक्त पदावर राहून त्यांनी शहरातील अनेक अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. त्यामुळे काहींचा त्यांच्यावर राग असेल, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय असावे, याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.


मीरा भाईंदर  - मीरा रोड येथील आर्किड रुग्णालयात बिगर कोविड रुग्णांचा कोरोना अहवाल सकारात्मक दाखवून पैसे लुबाडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयावर पालिका प्रशासनाने धाड टाकून रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द केली आहे.

मीरा भाईंदर शहरातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरी देखील काही खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास येत होती. त्यामुळे अशा रुग्णालयांवर व खासगी प्रयोग शाळेवर पालिकेकडून विशेष लक्ष देण्यात येत होते. त्यामध्ये मीरा रोड येथील आर्किड रुग्णाल्यावर संशय अधिक वाढल्यामुळे ३१ मे रोजी पालिकेच्या आरोग्य पथकाद्वारे धाड टाकण्यात आली. यात रुग्णालयात तब्बल ५ हून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित नसताना देखील त्यांच्यावर कोविड उपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांच्या नावावर खोटे नमुने तयार करून ते अपूर्वा या प्रयोगशाळेच्या मदतीने सकारात्मक करून घेतले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्किड रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करण्यात आली असून पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रिजेश पटेल यांच्या तक्रारीवरुन अर्चिड हॉस्पिटलचे डॉ. पिरजादा असिफ शफीउद्दीन, अपूर्वा लॅबचे डॉ. कांचन आर, स्वस्तिक लॅबचे डॉ.विठ्ठल रेड्डी यांच्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - कोरोना काळात राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रस्ताव विचाराधीन असल्य सरकारने म्हट ह. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही  विरोधकांकडून झाली.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी राज्यात पाच टप्प्यात ‘अनलॉक’ केला जाणार असल्याची घोषणा केली होती. कोणत्या टप्प्यात कोणता जिल्हा असेल आणि किती प्रमाणात निर्बंध हटवले जातील, यासाठीचे निकष निश्चित करण्यात आल्यही वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर असा निर्णय झाला नसल्या सरकारने म्हंटले होते. हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगत सरकारने अनलॉकबद्दलची चर्चा थांबवली. अखेर शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी

पहिला गट - ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे.

तिसरा गट - पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत.

चौथा गट - पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत.

पाचवा गट - पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहेत.

मुंबई - मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही जोरदार राजकारण रंगले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर काँग्रेसला काय भूमिका मांडता येईल, याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा झाली. राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असा दावाही पटोले यांनी केला. भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही पटोले यांनी केला.मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी २ वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे पटोले म्हणाले. त्याचबरोबर ७ जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांचे नाव घोषित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, अशी टीकाही पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी असल्याचा घणघात पटोले करत आहेत.


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget