July 2021

मुंबई - मलायका अरोरा लवकरच एका रिअॅलिटी शोचा भाग बनणार आहे. या शोचे नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २' आहे. मलायकाचा या शोमधून लूक समोर आला आहे. मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, तरी ती अनेकदा टीव्ही शोमध्ये जजची भूमिका साकारताना दिसते. मलायका अरोरा आता पुन्हा एकदा एका शोमध्ये जजची भूमिका साकारणार आहे आणि त्या शोचे नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर २'.मलायका अरोराने या शोच्या सुरुवातीला स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता मलायकाच्या या जबरदस्त लूकचे फोटो व्हायरल होत आहेत.मलायका अरोरा स्वतः एक मॉडेल आहे आणि तिने 'सुपर मॉडेल ऑफ द इयर २' साठी एक मॉडेल लूक देखील दिला आहे.सुपरमॉडेल ऑफ द इयरचा दुसरा सीझन २२ ऑगस्टपासून एमटीव्हीवर रिलीज होणार आहे. मलायका अरोरा व्यतिरिक्त, शोमध्ये मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर देखील जज असणार आहेत.मलायका अरोरानं तिच्या खास गाण्यांद्वारे बॉलिवूड चित्रपटांमध्ये जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिने 'छैय्या छैय्या', 'अनारकली' आणि 'मुन्नी बदनाम' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत.


मुंबई - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत, आता पुन्हा एकदा हा शो त्याच्या नवीन सीझनसह चाहत्यांना भेटीसाठी सज्ज आहे. विशेष गोष्ट म्हणजे टीव्हीवर येण्यापूर्वी ‘बिग बॉस १५’ ओटीटी प्लॅटफॉर्म वूट सिलेक्टवर प्रदर्शित होणार आहे. आता या शोच्या पहिल्या स्पर्धकाचे नाव निश्चित झाले आहे.अलीकडेच ‘बिग बॉस १५’च्या घरामधील काही फोटो लीक झाले आणि करण जोहर वूटवर शो होस्ट करताना दिसणार असल्याची खात्री झाली. अशा परिस्थितीत, आता बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे तर वूटने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आपल्या पहिल्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आहे.वूट सिलेक्टवरील व्हिडीओसह स्पर्धकाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनची पहिली स्पर्धक प्रसिद्ध गायिका नेहा भसीन आहे. नेहा खूप प्रसिद्ध गायिका आहे. वूट सिलेक्टवर नेहाचा परिचय देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात ती ‘बाजरे दा सिट्टा’ हे गाणे गाऊन घरात प्रवेश करते.

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा चौकशीचे समन्स बजावले आहे. ते व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख यांना कोणताच दिलासा मिळू शकलेला नाही. 

मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर 'ईडी'कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती 'ईडी' ला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ४.२१ कोटी रुपयांची संपत्ती 'ईडी'ने जप्त केली आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक यांनादेखील या प्रकरणी अटक झाली आहे. पण देशमुख यांची चौकशी 'ईडी'ला अद्याप करता आलेली नाही.अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांचे पैशांच्या गैरव्यवहाराशी संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चौकशीशिवाय तपास अपूर्ण आहे. त्यासाठी आतापर्यंत चार वेळा देशमुख यांना समन्स बजावण्यात आले होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या दोघांनीही सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या बेलार्ड पीयर येथील कार्यालयात उपस्थित राहणे अपेक्षित आहे.सुप्रीम कोर्टातही अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकला नाही. दंडात्मक कारवाई करण्यापासून ईडीला अटकाव करण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज अनिल देशमुख व ऋषिकेश देशमुख यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. मात्र असा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. याआधी अन्य अशा कोणत्याही प्रकरणात दंडात्मक कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे असा आदेश या प्रकरणात देणे उचित ठरणार नाही, असे कोर्टाने नमूद केले. यावर ३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मुंबई - बेस्ट कामगारांना बीडीडी आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी श्यामसुंदर राणे, विष्णू कांबळे, सूर्यकांत चौगुले यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभ शुक्रवारी वडाळा डेपो येथे पार पडला. यावेळी समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, बेस्ट समिती सदस्य राजेश हाटले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.बेस्ट डेपोच्या जागेवर खासगी विकासकांनी बांधकामे केली पण अद्याप त्यांनी बेस्टचे ३५० कोटी रुपये येणे बाकी आहेत. ते मिळण्यास प्रयत्न केले पाहिजेत, बेस्ट वाचवली पाहिजे, बेस्ट कामगारांची देणी वेळेवर मिळायला हवीत. त्यासाठी बेस्ट कामगारांसोबत जनआंदोलन उभारायचे झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे कोळंबकर यावेळी म्हणाले


मुंबई - राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी १४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्यशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.या बदली सत्रामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य बियाने महामंडळ अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जी एस पापळकर यांच्याकडे आता हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर नांदेड महापालिका आयुक्त पदी एन आर गटणे यांची बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेले अधिकारी-

१) संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

२) अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

३) मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

४) सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

५) प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

६) कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

७) जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

८) एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

९) एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

१०) राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

११) जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

१२) रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

१३) एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

१४) दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

पनवेल - पनवेल महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीत पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधकांतील वादामुळे गोंधळ झाला. भाजपचे नगरसेवक मुकीद काझी यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांच्यावर सुपारी घेऊन तुम्ही सभेत बोलताय का? असा आरोप केल्याने मोठा गदारोळ झाला.

विरोधकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी संबंधित वाक्य व शब्द इतिवृत्तातून वगळण्याचे आदेश दिले. त्यानंतर शेकाप, महाविकास आघाडीचे सदस्य नगरसेवक काझी यांच्या माफीनाम्यावर ठाम होते. संबंधित वाक्य इतिवृत्तातून वगळण्यात आल्यानंतर इतर विषयांवर चर्चा करून सभा संपली.पनवेल पालिका प्रशासनाने करोनाच्या अनुषंगाने १२ विविध विषयांसाठी ही सभा आयोजित केली होती. सर्व विषय हे करोना साथरोगाशी संलग्न असल्याने रुग्ण व रुग्णालयांसंबंधित महत्त्वाच्या विषयांना तातडीने मंजुरी देण्याची पद्धत पनवेल पालिकेने अमलात आणावी असा आग्रह राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी धरला. त्यावर नगरसेवक मुकीद काझी यांनी विरोध करत पाटील हे सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा शाब्दिक वाद झाला.सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची उलट तपासणी न करता तातडीने अशा विषयांना मंजुरी देण्याचा आग्रह महाविकास आघाडीच्या सदस्यांनी या वेळी धरला. सभाशास्त्राप्रमाणे सभा चालत नसल्याचे समजल्यावर सभापती संतोष शेट्टी यांनीही संबंधित वाक्य इतिवृत्तातून वगळण्यात येणार असल्याचे सांगून सभेचे पुढील कामकाज चालविले.

वसई - वसई-विरार महापालिकेचे लसीकरण संथ गतीने होत असून दुसरीकडे लशीच्या टंचाईमुळे केवळ दुसरी मात्रा देण्यात येत आहे. यामुळे पहिली मात्रा मिळविण्यासाठी नागरिकांनी आता खासगी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. शनिवार आणि रविवारी शहरात तब्बल १५ ठिकाणी खासगी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार शहरात लसटंचाई निर्माण झालेली आहे. शासनाकडून पुरेसा लशींचा साठा येत नसल्याने नागरिकांना लशी कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे पालिकेने पहिली मात्रा घेतलेले दीड लाखांहून अधिक जण प्रतीक्षेत आहेत. त्यांचे ८४ दिवस पुर्ण झाले आहेत तरी त्यांना लस मिळालेली नाहीत. त्यामुळे पालिकेने सध्या केवळ पहिली मात्रा देण्यास सुरुवात केली आहे. पहिली मात्रा मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यासाठी त्यांनी खासगी लसीकरणाकडे धाव घेतली आहे. वसई-विरार मध्ये सध्या खासगी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याची चढाओढ लागली आहे. सर्वच पक्षांनी लसीकरण शिबिरांचे आयोजन केले आहे. शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी आदी पक्षांनी पुढाकार घेत ठिकठिकाणी सशुल्क लसीकरणाची शिबिरे भरवली आहेत.शनिवार आणि रविवार या विकेंड च्या दिवशी शहरात तब्बल १५ ठिकाणी सशुल्क लसीकरण शिबिरे भरविण्यात आली आहेत. मात्र नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणी केवळ ५०० रुपये तर काही ठिकाणी ७०० रुपयांना कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.पालिकेकडे लशींचा तुटवडा असताना दुसरीकडे खासगी लसीकरण महोत्सव जोरात सुरू आहे.

वसई - विरारमधील आयसीआयसीआय बँक लुटण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अनिल दुबे याला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबे याच्यावर १ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट आखल्याचे तपासात समोर आले. या हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापिका योगिता वर्तक-चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रोखपाल श्रद्धा देवरुखकर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.विरार पूर्व येथील आयसीआयसीआय बँकेचा माजी व्यवस्थापक असलेला आरोपी अनिल दुबे याने गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास बँकेत शिरून दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. या वेळी त्याने बँकेच्या लॉकरमधील सव्वादोन कोटी रुपयांचा सोने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तो पकडला गेला. त्याने केलेल्या हल्ल्यात योगिता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या. आरोपी दुबे याचे शेअर बाजारात ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच त्याने वैयक्तिक कर्जे घेतली होती. त्याच्यावर एकूण १ कोटीचे कर्ज झाले होते. त्यामुळे त्याने बँक लुटण्याची योजना आखली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

ठाणे -  पत्रकार असल्याचे सांगून एक व्यक्तीने भिवंडी शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली. त्यांनतर या महिलेला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवले. त्यानंतर या अमिषाखाली त्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. मनोहर विशे (वय 35, रा. पुर्णा, भिवंडी ) असे अटक केलेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे.भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मनोहर विशे हा ग्रामीण भागात पत्रकार म्हणून गेल्या काही वर्षांपासून वावरतो. त्यातच २०१६ साली एका ३५ वर्षीय महिलेशी त्याची ओळख निर्माण केली. त्यांनतर तुला नोकरी लावून देतो, तसेच तुझ्याशी लग्न करतो असे आमिष देवून या महिलेवर बलात्कार केला.गेल्या काही दिवसांपासून महिलेने या व्यक्तीकडे नोकरी व लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, त्याने लग्नास नकार देऊन महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, तीला धमकीही दिली. यामुळे भयभीत झालेल्या पीडितेने नारपोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रर दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी मनोहर विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ मनोहर विशे याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले करीत आहेत.

ठाणे - खोट्या केसमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी वसुली प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर यांच्यासह एकूण २८ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि ठाण्यातील एका समाजसेवकाचाही समावेश आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. परमबीरसिंह यांच्या विरोधात पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालान आणि रियाज भाटी या तिघांनी परमबीरसिंग आणि त्यांचे २७ सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ठाणे नगर पोलिसांनी गुरुवारी सोनू जालान यांचा जबाब नोंदविला होता. तर शुक्रवारी केतन तन्ना आणि रियाज भाटी यांचा जबाब नोंदवून अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तत्कालीन पोलीस आयुक्तांसह २८ जणांचा गुन्ह्यात समावेश ठाणे नगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, दीपक देवराज, एन. टी. कदम, चकमक फेम प्रदीप शर्मा, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ राजकुमार कोथीमिरे, स.पो.उप.नि. मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी , किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनु वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया , प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्या पैकी आठ जण हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे खंडणी खोर रवी पुजारी याच्या नावाचा समावेश आहे. परमबीर सिंग आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी सारखे दहाहून अधिक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथीमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, तसेच दोन पोलीस शिपाईचा समावेश आहे. माजी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठाणे आयुक्तालयात दोन गुन्हे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीत एक असे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत.या खंडणी प्रकरणामध्ये २८ आरोपींमध्ये रवी पुजारी हा सुद्धा एक आरोपी आहे याचा अर्थ पोलिसांनी आणि परमबीर सिंग यांनी रवी पुजारी यांच्या नावाचा वापर करत अनेक लोकांकडून खंडणी वसूल केलेली आहे, असा आरोप यावेळी केतन यांनी केला आहे.

मुंबई - कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे.ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एमआय़डीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयातून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १ हजार राशनचे पाकिटे( २५ हजार किलो), २ हजार पाण्याच्या बाटल्या, ५ हजार ५० बँकेट्स, ५ हजार ५०० टॉवेल्स पाठविण्यात आले. तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे 25 हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या संदर्भात बुधवारी राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण केले.पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील पंधरा दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा असे यावेळी ठरले. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआऱएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरु आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

मुंबई - राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी याचे लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे टोपे यांनी सांगितले. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली

कोकण: रायगड, ठाणे, मुबई

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक


 

पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती वैदेही वाढाणा आणि पालघर जिल्हा कृषी सभापती गुरोडा मॅडम यांची भेट घेऊन त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल 'पोलिस कि आवाज' यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी नितीन पाटील, पाल पंधारी,किशोर पाटील आणि लोकेश वसावा उपस्थित होते.मुंबई - मुंबईत बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत समोरच्या घरांवर कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेली ५ लोक अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी रेस्क्यू केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममध्ये जुहू गल्ली परिसरात अमर सोसायटीमध्ये एका १+३ असे ४ मजल्याच्या घराचे बांधकाम सुरु असताना  ते बांधकाम समोरच्या ३ घरांवर कोसळले. या घरांच्या ढिगाऱ्याखाली ५ लोक अडकलेली होती ज्यांना मुंबई अग्निशमन दलाचा जवानाने घटनास्थळावर धाव घेऊन तीन ते चार तासांमध्ये बाहेर काढले. या ५ जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र या सर्व घरांचा ढिगारा मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवान काढण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वन प्लस थ्री असे मिळून चार मजल्यांच्या अनधिकृत घरे असल्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये भीती पसरली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. वेगाने येणाऱ्या ट्रक्टरने एका बसला जोरदार धडक दिली. यात १८ लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ लोक गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  लखनऊ-आयोध्या राष्ट्रीय मार्गावर हा अपघात झाला. लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजता घडल्याची माहिती आहे. बस हरयाणाकडून बिहारकडे जात होती.  देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी ४१५ जणांचा मृत्यू होतो. 

मुंबई - उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक नाव अभिनेत्री वशिष्ट हिचे देखील आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोर्नोग्राफी प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.अश्लिल चित्रपट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला समन्स बजावले आहे. क्राईम ब्रँचने समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गहना म्हणते मी म्हणजे काही चालता बोलता कंप्युटर नाही.गहनाला पोलीस स्टेशनमध्ये रविवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ती हजर झाली नव्हती. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे हजर होण्यास उशीर लागत असल्याचे तिने म्हटले होते. सोमवारी गहनाने यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले, पहिल्यांदा मी १४ दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये होते. त्यानंतर आठ दिवस मालवणी पोलिसांसोबत होते. सीआयडी, डीसीबी टीमने माझे तिनही फोन, लॅपटॉप, सर्व अकाऊंट्स, पासवर्ड घेतले. मला माहिती असलेली सर्व गोष्टी मी त्यांना सांगितल्या. त्याला आता सहा महिने झाले. माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम फॉरेन्सीक टीम आहे. मग अजून काय विचारायचे राहिले.ज्यांचे नंबर हवे तेही मी दिले आहेत. जर मी चुकीची असते तर माझे तोंड मी बंद ठेवले असते, जो माझा अधिकार आहे. तरीही मी सहकार्य केले.पाच महिने तुरुंगात घालविल्यानंतर मला त्याच खटल्यात जामीन मिळाला. यानंतरही मी सीआयडी डीसीबी कार्यालयात गेले. त्यानी माझी सुमारे ४ तास चौकशी केली. ते आता मला का कॉल करीत आहेत? माझ्या शरीरात चिप तर लागलेली नाही. किंवा मी चालता बोलता कंप्यटर तर नाही. किंवा मी पैसे खाण्याचे मशीन तर नाही जे मी एका बाजूला खाते आणि दुसर्‍या बाजूने बाहेर येते. तुम्हा लोकांकडे सर्व काही आहे, आता काय हव आहे..?गहना वशिष्ठची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहे. राज कुंद्रा अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात अडकल्यापासून गहना नेमी त्याची पाठराखण करीत असते. कुंद्रा हा पॉर्न फिल्म बनवीत नव्हता तर इरॉटिक सिनेमा बनावयचा असा युक्तीवाद केला जात आहे.दरम्यान, पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक ठिकाणी पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी मोफत तांदूळ, गहू, डाळ, रॉकेल आणि शिवभोजन थाळी वितरण करण्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत देण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर मंत्री भुजबळ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.गेल्या २ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आदी भागालाही पावसाने झोडपून काढले. राज्यावर महासंकट कोसळले आहे. अनेक भागात दरडी कोसळून मोठी हानी झाली. अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. काही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. कधीही भरुन न येणारी अशी हानी आहे. रस्ते मार्गात अडथळे आहेत. बचावकार्यात अडचणी येत असल्याने प्रयत्न अपूरे पडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आहेत. येथील लोकांचा जीव वाचविण्याचा शासनाचा पहिला प्रयत्न आहे. तसेच औषधोपचार करणे, निवारा आणि पोटापाण्यासाठी अन्न धान्याची व्यवस्था करण्यावर शासनाचा भर आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना २ करोड रुपये देण्यात आले आहेत. संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन हा निधी खर्च करण्याचे निर्देश दिल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.पावसामुळे आणि पुरामुळे लोकांची घरदार गेली. घरातील सामान वाहून गेली आहेत. अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी जे क्षेत्र पाण्यात बुडाले आहेत, घरे वाहून गेली असतील किंवा नुकसान झाले आहे, अशा निराधार कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भातला शासकीय आदेश मार्च २०१९ला काढण्यात आला आहे. त्यात थोडा बदल करण्यात आला असून ज्यांना गहू नको असेल, त्यांना तांदूळ देण्याचा निर्णय घेतल्याचे अन्न व धान्य पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. कोकणात प्रामुख्याने भाताचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे तांदूळ देखील पुरवले जातील. यासोबतच तिथे उपलब्ध असलेली किंवा लोकांच्या आहारात असलेली ५ किलो डाळ देखील पुरवण्याचा निर्णय झाला आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मदत करण्याची ही घोषणा केली आहे. परंतु, केंद्राकडून मदत यायला वेळ लागेल. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी अर्थसहाय्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्त मदत केली जाईल, माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.


मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थित महाराष्ट्र सरकारकडूनही मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. राज्यातील खासदारांना यासंदर्भातील पत्र देत चव्हाण यांनी आरक्षणासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे.१०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुनःश्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार सध्या सुरू असलेल्या संसदेच्या मान्सून अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे. परंतु, एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्र वा राज्य कोणाकडेही असले तरी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही. कारण तेथील आरक्षणे अगोदरच ५० टक्क्यांच्या वर गेलेली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना देणे पुरेसे नाही, तर विविध न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद असलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून शिथिल करणे महत्त्वपूर्ण आहे. मराठा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी राज्य शासनाने न्यायालयीन पातळीवर केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी खासदारांना दिली आहे. परंतु, या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेले नसल्याने आता केंद्र सरकारने याबाबत संसदेच्या पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ८ जून २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीमध्ये इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेची बाधा व त्याचे परिणाम निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यावर सहकार्य म्हणून राज्य शासनाला केंद्र सरकारकडून संसदेच्या पातळीवर उचित कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन निवाड्यांमध्ये नमूद आरक्षणाची ५० टक्के मर्यादा संसदेत घटना दुरूस्ती करून शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अशोक चव्हाण सातत्याने मांडत आले आहेत. राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या मान्सून अधिवेशनात ५ जुलै २०२१ रोजी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्राला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार पी. चिदंबरम, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेऊन सदरहू विषय संसदेत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी आता सर्व खासदारांना पत्र लिहून या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

महाड -  तळीये दुर्घटनाग्रस्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर टाहो फोडला. कोणी सांगितले माझे वडील गायब आहेत.कोणी आई गायब असल्याचे सांगितले. तर, कोणी आमचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. तसेच राज्य सरकार तुमच्या पाठिशी उभे आहे, असे आश्वासनही या ग्रामस्थांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये येथे येऊन दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस केली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. या दुर्घटनेत काही लोक वाचले. ते कामाला गेले होते म्हणून वाचले. तर अजूनही काही जण बेपत्ता आहेत. माझे वडील गायब आहे. मी खूप लांबून आलोय. एक जण तर हिमाचल प्रदेशातून आला आहे, असे एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. या दुर्घटनेनंतर लगेचच शासकीय यंत्रणा घटनास्थळी येईल अशी अपेक्षा होती. रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टर येईल असे वाटत होते, पण कोणीच आले नाही. आता आम्हाला लवकरात लवकर दिलासा द्या. आमचे पुनर्वसन करा. आमचा सरकारवर पूर्णपणे विश्वास आहे, असे सांगतानाच कोकणात जे लोक डोंगरात राहतात त्यांना दरडीची भीती असते. तर जे जमिनीवर राहतात त्यांना पाण्याची भीती असते, असेही या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचं म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना धीर दिला. परिस्थिती प्रचंड अवघड होती. भयानक स्थिती होती, सगळीकडे पाणी होते. यंत्रणा लवकर पोहोचू शकली नाही. आम्ही आर्मी आणि नेव्हीला पाठवले होते. पण पावसामुळे यंत्रणांना पोहोचता येत नव्हते, असे सांगतानाच तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सर्वांचे पुनर्वसन केले जाईल. तुमची कागदपत्रे गहाळ झालीत. त्याचीही चिंता करू नका, ते सर्व तुम्हाला मिळवून देऊ. तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या सर्व आम्ही करू. तुम्ही फक्त स्वत:ला सावरा. तुम्ही काहीच चिंता करू नका. सर्व गोष्टी सरकारवर सोडा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.मागच्यावेळी प्रमाणे यावेळीही दुर्घटनेत गायब झालेल्या लोकांचा दोन दिवस शोध घेऊ. त्यानंतरही कोणी सापडले नाही तर त्यांना मृत घोषित करू, असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

सांगली - तीन दिवसांच्या संततधार पावसानंतर शनिवारी सांगली जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली. या पार्श्वभूमीवर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूर स्थितीबाबत बैठक घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.सांगलीत पाणी ओसरताच शेती, घरे आदी सर्वच बाबींच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा. पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक औषध फवारणी करा. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरीत दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करा. पूरप्रवण क्षेत्रातील अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढवण्यासाठी आराखडे तयार करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेूवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता श्री. काटकर, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लखनऊ - उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पानीपत झाल्यानंतर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजीनिअरिंगच्या फॉर्म्युल्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यासाठी त्यांनी आता ब्राह्मण मतदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांचाच एक भाग म्हणून त्यांनी ब्राह्मण संमेलनही घेतले. ही संमेलने आणखी होणार आहेत.बसपाला २००७ मध्ये प्रचंड विजय मिळाला होता. सोशल इंजीनिअरिंगच्या माध्यमातून त्यांना हा विजय मिळाला होता. आता २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हाच फॉर्म्युला अंमलात आणण्याचा बसपाचा प्रयत्न आहे. दलित आणि ब्राह्मणांची मते एकत्र करण्याचा हा फॉर्म्युला आहे. एकेकाळी “तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार” अशी घोषणा देणाऱ्या मायावती यांनी २००७ मध्ये दलित आणि ब्राह्मणांची मोट बांधून सत्तेत आल्या होत्या. अर्थात ही सोशल इंजीनिअरिंग घडवून आणण्यात बसपा नेते आणि मायावतींचे विश्वासू सतीश चंद्र मिश्रा यांचा मोठा हात होता. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मिश्रा कामाला लागले आहेत. मायावती यांनी पुन्हा एकदा या सोशल इंजीनिअरिंगची जबाबदारी मिश्रा यांच्याकडे सोपवली आहे. त्याची सुरुवात आयोध्येतून झाली आहे. प्रबुद्ध वर्ग संवाद, सुरक्षा आणि सन्मान विचार मंथनच्या माध्यमातून ब्राह्मणांशी संवाद साधला जात आहे. उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यात ही परिषद होणार आहे. विशेष म्हणजे आता बसपाच्या बॅनरवर श्रीराम आणि परशुरामाचे फोटोही दिसत आहेत. तसेच सर्व परिषदांची सुरुवात शंखनाद आणि मंत्रोच्चाराने होत आहे.२००७ मध्ये बसपाने ८६ जागेवर ब्राह्मण उमेदवार दिले होते. त्यापैकी ४१ जागांवर बसपाला विजय मिळाला होता. विशेष म्हणजे निवडणुकीच्या एक वर्ष आधीच मायावती यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे या उमेदवारांना आपल्या मतदारसंघात काम करण्यास भरपूर संधी मिळाली होती. २००७ मध्ये काही राजकीय पंडितांनी ही सोशल इंजीनिअरिंग यशस्वी होणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, निवडणूक निकालानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ४०३ पैकी २०६ जागांवर बसपाने विजय मिळवून स्वबळावर सत्ता काबीज केली होती. त्यामुळे मायावती मुख्यमंत्री बनल्या होत्या.उत्तर प्रदेशात ब्राह्मणांची संख्या १२-१३ टक्के आहे. काही विधानसभा मतदारसंघात हा आकडा २० टक्के आहे. त्यामुळे राज्यात ब्राह्मण मतदार निर्णायक आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील बुलंदशहर, हाथरस, अलिगड, मेरठसह पूर्वांचल आणि लखनऊमध्ये ब्राह्मण मतदार सर्वाधिक आहेत. या मतदारसंघात कुणाला जिंकवायचे आणि कुणाला नाही हे ब्राह्मण मतदार ठरवत असतात.


कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय राजकारणात उतरत असल्याचे दिसत आहे. खासदार नसतानाही ममता बॅनर्जी यांची संसदीय दल नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ही माहिती दिली. ममता बॅनर्जी येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत असल्याचे बोलले जात आहे.दिल्ली दौऱ्यापूर्वींच संसदीय पक्षाच्या नव्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका पाहता, ममता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.ममता बॅनर्जी खासदार नसतानाही त्यांची संसदीय दल नेतेपदी निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर ममता सातवेळा खासदार राहिल्या असून याआधीही आम्हाला मार्गदर्शन करत होत्या. हा आमचा रणनीतीक निर्णय आहे, असे डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले. तथापि, कोणताही पक्ष आपल्या ज्येष्ठ खासदाराची पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करतो. ही पक्षाची अंतर्गत बाब असून याचा नियमांशी काही संबंध नाही. बंगालमध्ये मोदी आणि शाह जोडीला पराभूत केल्यानंतर ममतांची पत वाढली आहे. अशा परिस्थितीत स्वत: ममता आणि त्यांचा पक्ष देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीवर दिदीला पाहू इच्छित आहे.ममता विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. कोरोना व्यवस्थापन, पेगासस हेरगिरी प्रकरण आणि माध्यमांवर धाड टाकल्याबद्दल ममता यांनी केंद्र सरकारवर उघडपणे टीका केली होती. आता टीएमसीच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष झाल्यानंतर देशपातळीवर त्या थेट पक्षाचा अधिकृत चेहरा बनल्या आहेत .म्हणजेच पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील कोणत्याही विषयावर विरोधी पक्षांच्या संसदीय मंडळाच्या नेत्यांची बैठक बोलावली, तर ममतांना बोलावले जाईल.पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला आव्हान दिले आहे. अनेक नेत्यांनी ममता या मोदींना तोडीस तोड असल्याचेदेखील म्हटले होते. 

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (‘इस्रो’) माजी शास्त्रज्ञ एस नंबी नारायण यांच्यावरील कथित हेरगिरीच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने १५ जुलै रोजी सीबीआयला या प्रकरणाच्या तपासाबाबत यथास्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सीबीआयने २४ जुलैला या प्रकरणी बंद लिफाफ्यात अहवाल सादर केला. आता सर्वोच्च न्यायालय २६ जुलै रोजी सुनावणी घेत निर्णय घेईल. या अहवालात काय निष्कर्ष आहेत आणि त्याबाबत काय पुरावे देण्यात आलेत यावरच न्यायालय निर्णय घेणार आहे.इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांना हेरगिरीच्या बनावट आरोपांमध्ये फसवल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने यापूर्वी केरळ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली. याशिवाय सीबीआय अन्य काही गोष्टींचाही तपास करत आहे. याच तपासाच्या अहवालाचा स्टेटस रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने बंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश १५ जुलै रोजी दिले होते.१९९४ मध्ये इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यावर गोपनीय माहिती अन्य देशांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता. नंबी नारायणन यांच्यावर हेरगिरी आणि भारताचे रॉकेट तंत्रज्ञान शत्रु राष्ट्राला विकल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर देशभर गदारोळ झाला. नंबी नारायणन यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटकही करण्यात आली होती. मात्र यानंतर तपासात हे सर्व आरोप खोटे असल्याचे समोर आले. त्यामुळे, न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.१९९४ मध्ये केरळमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर होते. या आरोपांनंतर काँग्रेसमध्ये देखील दोन गट तयार झाले. एका गटाने तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्यावर दबाव तयार केला. अखेर या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. नंबी नारायण यांनी देखील केरळ सरकारच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली. याला केरळ सरकारने आव्हान दिले. अखेर सर्वोच्च न्यायालयानं १४ सप्टेंबर २०१८ रोजी केरळ सरकारला भरपाई देण्याचा आदेश दिला होता. तसेच या प्रकरणी संबधित केरळ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

जम्मू - बनावट बंदूक परवाना प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून (CBI) जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाशी निगडीत ४० वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयने अचानक धाडी टाकल्या. यातील १२ ठिकाणे ही काश्मीर खोऱ्यातील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीनगर स्थित एका अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानावरदेखील छापा टाकण्यात आला.जम्मू, श्रीनगर, उधमपूर, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला, दिल्लीसहीत ४० ठिकाणांचा यात समावेश आहे. २०१८ साली सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या एका बनावट बंदूक परवान्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या चंदीगड शाखेद्वारे ही छापेमारी करण्यात आली. छापेमारीत काश्मीरच्या १२ तर जम्मूच्या १० ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये तुलसीबाग स्थित श्रीनगरचे माजी जिल्ह्या उपायुक्त शाहिद चौधरी यांच्या सरकारी निवासस्थानाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. शाहिद चौधरी सध्या सेक्रेटरी आणि 'मिशन यूथ जम्मू काश्मीर'चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


श्रीनगर  - सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. बांदीपुरामधील सुमलार अरागाम परिसरात असलेल्या जंगलात दहशतवादी असल्याची पोलिसांना विशेष माहिती मिळाली. या माहितीवरून सुरक्षा दलाने संयुक्त शोधमोहिम राबविली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचा जवान जखमी झाला आहे.अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सुरक्षा दल परिसरात शोधमोहिम राबवित होते. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार चालू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरात गोळीबार करून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही माहिती श्रीनगरमधील सैन्यदलाचे जनसंपर्क अधिकारी इम्रान मुसावी यांनी दिली आहे. जखमी झालेल्या जवानाला हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दहशवाद्यांची व त्यांच्या गटाची अद्याप ओळख पटू शकली नाही. अजूनही सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू आहे. त्याबाबत अधिक माहितीची प्रतिक्षा असल्याचेही जनसंपर्क अधिकारी मुसावी यांनी सांगितले.दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टर येथे २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या कारवाईत कृष्णा वैद्य या जवानाला वीरमरण आले आहे. अखनूर जिल्ह्यातील कनाचक भागात सुरक्षा दलाने शुक्रवारी एक पाकिस्तानी ड्रोन पाडले. या ड्रोनमधून स्फोटक साहित्य करण्यात आली आहेत. तत्पूर्वी बकरीदच्या दिवशी सतवारी भागात एक संशयास्पद ड्रोन दिसले होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. या संशयी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे.

नंदुरबार - योगिता तांबोळी नंदुरबार जिल्हातील राहणारे अतिशय कष्टाने मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केल आहे आई वडिलांना सात दिली पुढे ते कामाला लागल्या शिक्षिका म्हणून इमानदारी जबाबदारीने पार पाडत आहे तिचे स्वपन हते पत्रकार व्हायचे आणि समाजाला न्याय मिळून द्यायचा आणि आई वडिलांचे नाव मोठे करायचे नंदुरबार जिल्हा मध्ये नाव रोशन करायच आणि ती वेळ आली आहे पत्रकारच्या स्वपरूपात काम कराची संधी मिळाली आणि ते नक्की पार पाडतील या चैनल २४ न्यूज चे मुख्यासंपादक आकाश हेमके नागपूर  व संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे यांनी त्याचे काम पाहून प्रतिनिधी नंदुरबार जिल्हासाठी नेमणूक करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा पदी नियुक्ती केली आहे त्यांचे काम पाहून समाजासाठी न्याय मिळून देण्यासाठी धडपड करत आहे पोर्टल आणि युट्युब वर सध्या बातमी देण्याचे काम करत आहे. निस्वार्थी पणे काम करेन गोरगरिबांना नक्की न्याय मिळून देईन असे त्यांनी नियुक्ती केल्यानांतर सांगितले. शिक्षिका, लेखिका ,कलाकार, चित्रकार, आहे.लेखनातून (नाटक,विनोद शायरी,गंभीर विषयांवर लिखाण ) करूण सत्य घटना मांडण्याचे प्रयत्न करत असतात. त्यांना अनेक बोली भाषांचे ज्ञान प्राप्त आहे.जीवनात अनेक अडचणींवर मात करत आपले अभ्यास व लेखन कार्य सुरूच ठेवले विचारवंत,जिज्ञासू  वृत्ती कायम असुन नवनवीन गोष्टी शिकणे अधिक माहिती मिळविणे असा छंद त्यांना आहे.

मुंबई - डोंगर कोसळला आणि महाड तालुक्यातील अख्ख तळीये गाव उद्ध्वस्त झाले. गावातील ३२ घरे दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून  ४० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती, असे ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, गावाच्या पुनर्वसनाचे ठिकाण अजून ठरलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी तळीये गावकऱ्यांना सांगितले, शासन तुमच्या मागे उभे आहे. धोकादायक परिस्थितीत जी घरे आहेत, ती सुरक्षित ठिकाणी वसवणे आवश्यक आहे. ही सुरुवात आहे. आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. शरद पवारसाहेबांशीही चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सूचना केली होती म्हाडाने अशी घरे बांधून द्यावी. त्यामुळे आम्ही घरे बांधून देणार आहोत. छान सुंदर, कोकणातले गाव उभे राहील, हे म्हाडा करेल. 

मुंबई - महाराष्ट्रभरात पावसाने हाहा:कार माजवल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात एकूण ८ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये ७० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी राज्य सरकारकडून पूरग्रस्त जिल्ह्यांना मदतनिधी वितरित करण्यात आला आहे. तशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ यांनी राज्य आपत्ती निवारण कक्षात जाऊन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी तत्काळ मदत म्हणून प्रत्येकी २ कोटी आणि इतर जिल्ह्यांसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती भूजबळ यांनी दिली. तसेच अलमट्टी धरणातून साडे तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. रायगडमध्ये अद्याप ५३ जण बेपत्ता आहेत. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही धोका कायम आहे. मदतकार्य करणारी पथके तैनात आहेत. त्यात राज्य आपत्ती व्यवस्थान विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, विविध संस्थांचा समावेश आहे, असे भुजबळांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागात आतापर्यंत एनडीआरएफच्या ३४, एसडीआरएफच्या ४ टीम तैनात आहेत. आतापर्यंत ८२ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ७५ जनावरांचा मृत्यू झाला. तर ३८ जण जखमी झाले असून ५९ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. ९० हजार ६०४ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची राहत्या घरी पोलीस चौकशी करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला होता. अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का? याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. यावेळी शिल्पा शेट्टीला जवळपास १० महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीमशुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेली होती. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

शिल्पाला १० महत्त्वाचे प्रश्न विचारले

१) तुमच्याकडे चांगले शेअर्स होते, तेव्हा २०२० मध्ये तुम्ही विआन कंपनी का सोडली?

२) विआन आणि कॅमरिन कंपनी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

३) लंडनमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी विआनच्या ऑफिसचा वापर बर्‍याच वेळा केला गेला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

४) हॉटशॉट कोण चालवते हे आपणास माहित आहे का?

५) हॉटशॉटच्या व्हिडीओ सामग्रीबद्दल आपल्याला काय माहिती आहे?

६) तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभाग घेतला आहे का?

७) हॉटशॉटबद्दल प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) यांच्याशी कधी संवाद झाला आहे का?

८) अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलवरील काही चॅट्स आणि मेसेजबद्दल प्रश्न

९) आपल्याकडे राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? (तो काय काम करतो, त्याचा व्यवसाय क़ाय आहे )

१०) राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राजला याबाबत विचारले असता, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाही, असा दावा त्याने केला.मुंबई - टीव्हीचा सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षक या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी बिग बॉस खूप खास असणार आहे. या कार्यक्रमाचा प्रीमियर टीव्हीवर होणार नाही, तर ओटीटी वर होईल. वास्तविक, शोचे पहिले ६ आठवडे प्रथम ओटीटीवर दाखवले जातील. सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे. करण जोहरच्या आधी सिद्धार्थ शुक्ला याचेही नाव यासाठी पुढे आले होते. असे म्हटले जात होते की, सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस ओटीटी होस्ट करेल. पण स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, करणचे नाव यासाठी निश्चित करण्यात आले आहे.अद्याप मेकर्स किंवा करण कडून कोणतेही अधिकृत निवेदन आले नसले तरी करण या कार्यक्रमाचे होस्टिंग कसे करतो आणि प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.व्हूटने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, बिग बॉस ओटीटीचा प्रीमिअर होईल आणि चाहते २४ तासांमधून कधीही हा शो पाहू शकतात. अलीकडेच सलमानने शोचा पहिला प्रोमोही शेअर केला होता, ज्यामध्ये तो स्वत: खूप हसतो आणि प्रेक्षकांना सांगतो की, हा सीझन खूप खतरनाक होणार आहे. या वेळी शोमध्ये सामान्य लोकही येणार आहेत, ज्यांची सेलेब्सशी तगडी स्पर्धा होणार आहे. निर्मात्यांनी आश्वासन दिले आहे की, हा हंगाम मनोरंजन आणि इमोशन्सनी परिपूर्ण असेल, म्हणून त्यांनी बिग बॉस ओटीटीची मजा सर्वात आधी व्हूटवर दिसणार आहे.‘बिग बॉस ओटीटी’बद्दल बोलताना सलमान खान म्हणाला की, ‘हे चांगले आहे की, यावेळी बिग बॉस डिजिटली दाखवले जाईल. टीव्ही आधी ६ आठवडे व्हूटवर दिसतील. याद्वारे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच होणार नाही, तर ते स्वतः सहभागी होऊन टास्कही देऊ शकतात. यावेळी प्रेक्षक देखील ‘बिग बॉस’ची भूमिका बजावू शकणार आहेत.

नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. अशोक हंसराज सोणकर उर्फ अशोक मिर्ची (३४) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो अरुण गवळी गँगचा गुंड आहे. नुकताच तो तुरुंगामधून सुटून आला आहे. त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.या घटनेतील आरोपी अशोक मिर्ची हा सराईत गुन्हेगार असून बुधवारी दुपारी तो एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने भाजी मार्केटमधील मयूर बारवे याला आपण एपीएमसी मार्केटमधील भाई असल्याचे व नुकतेच तुरुंगामधून सुटून आल्याचे सांगून धमकावले. तसेच, मार्केटमध्ये धंदा करायचा असेल तर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता न दिल्यास मारून टाकण्याची धमकी त्याने मयूरला दिली. या प्रकारानंतर मयूर बारवे याने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अशोक मिर्ची याच्या विरोधात रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला. आरोपी अशोक मिर्ची हा कृष्णा बारसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमेध खोपिकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी कृष्णा बारजवळ सापळा लावून त्याला अटक केली.अशोक मिर्ची हा अरुण गवळी टोळीचा गुंड असून तो एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांना धमकावून, त्यांच्यात दहशत माजवून त्यांच्याकडून खंडणी उकळत होता. आरोपी अशोक मिर्ची याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, धमकावणे, जबरी चोरी असे विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ठाणे - बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठजणांवर मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतानाच त्यापाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाचजणांवर ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.आपल्या काकावर मोक्काची कारवाई करण्याची तसेच भावाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह दोन जमिनी बळाविल्याचा आरोप मिरा-भाईंदरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्यावर केला आहे. या गुन्ह्यामुळे सिंग यांच्यासह मणेरे हेअडचणीत आले आहेत.


नवी मुंबई - मेट्रोसाठी लागणारे सर्व डबे हे चीनमधून आयात करण्यात आले असून त्यांची जोडणी ही चीनमधील अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होती. मात्र गेली दीड वर्षे करोना साथीच्या संसर्गामुळे चीनमधून भारतप्रवासाला बंदी असल्याने हे अभियंत्यांचे पथक भारतात दाखल होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला तरी चीन अभियंत्यांच्या परिसस्पर्शाशिवाय सुरू होण्याची शक्यता कमी आहे.डबे पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अभियंत्याच्या साह्य़ाने तसेच दूरचित्र संवादाने हे काम काही प्रमाणात केले जात आहे. तरीही चीनमधील काही प्रमुख अभियंत्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असल्याने त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.बेलापूर ते पेंदार या मार्गावर ११ सप्टेंबर २०१९ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणीदेखील करण्यात आलेली आहे. या ११ किलोमीटर मार्गासाठी एकूण २४ डबे चीनवरून अडीच वर्षांपूर्वीच आणण्यात आलेले आहेत. या २४ डब्यांच्या ८ मेट्रो तयार केल्या जाणार असून त्यांची जोडणी ही चीनमधील अभियंत्यांच्या उपस्थितीत केली जाणार होती. चीनमधील सीआरआरएस या कंपनीने हे डबे पुरविले आहेत. त्यासाठी भारतातील एका नामांकित कंपनीने मध्यस्थी केलेली आहे. या कंपनीचे काही अभियंते पहिल्या दिवसापासून या डबाजोडणीसाठी प्रयत्नशील आहेत. भारतात जानेवारी २०२० मध्ये चीनहून आलेला पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मार्चपासून विविध राज्यांत रुग्णसंख्या आढळून येऊ लागली. २२ मार्चला देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर चीनमधून विमानप्रवासाला बंदी घालण्यात आली. ती आजतागायत कायम आहे. त्यामुळे चीनमधून ही मेट्रो डब्यांची टीम भारतात दाखल होऊ शकलेली नाही. त्यावर उपाय म्हणून सिडकोने चीनमधील या अभियंत्याशी दूरसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) साधून काही प्रमाणात हे डबाजोडणीचे काम कायम ठेवलेले आहे. तरीही चीनमधील या अभियंत्यांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न उच्च पातळीवर सुरू असून सीआरआरसी त्यासाठी प्रयत्न करीत आहे. करोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला गेला आहे. त्यामुळे चीनमधून या अभियंत्याची भारतभेट लांबणीवर पडणार असून गेल्या वर्षी सुरू झालेल्या भारत-चीन सीमावादामुळे हा प्रवास आणखी बिकट झाला आहे. केंद्र सरकारने चीनचा सहभाग असलेल्या काही प्रकल्पांवर यापूर्वीच बंदी घातली आहे, मात्र नवी मुंबई मेट्रोसाठी लागणारे २४ डबे हे अडीच वर्षांपूर्वीच दाखल झाले आहेत. त्यांच्या जोडणीचा प्रश्न मात्र अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे, पण सिडको आणि आता महामेट्रो यावर मात करीत असल्याचे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प आता लवकर सुरू करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची मदत घेतली आहे, पण आता हा चीन अभियंत्याचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. तो कसा सोडवावा यावर सध्या खल सुरू आहे.

पालघर - जिल्ह्यतील सहा विधानसभा मतदारसंघातील २०.४४ लक्ष मतदारांपैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचा विशेष कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाने हाती घेतला असून अजूनपर्यंत ७१ हजार ५६१ मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नालासोपारा मतदारसंघातील ४३ हजार मतदारांची छाननी व नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू असून छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा उद्दिष्ट जिल्हा निवडणूक विभागाने ठेवले आहे.जिल्ह्यामध्ये २० लाख ४४ हजार २८९ मतदारसंख्या असून त्यापैकी एक लाख २१ हजार ४८१ मतदारांची छायाचित्रे मतदार यादी नसल्याचे निष्पन्न झाले होते. सुमारे सहा टक्के छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संग्रहित करण्याची विशेष मोहीम मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) स्तरावर हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत आजवर ७०४६ छायाचित्र संग्रहित करण्यात आले असून ७१ हजार ५६१ छायाचित्र नसलेली नावे वगळण्यात आली आहेत.सद्य:स्थितीत नालासोपारा मतदारसंघातील ४२ हजार ८७४ छायाचित्रे नसलेल्या मतदारांची पडताळणी सुरू असून त्यांची नावे वगळण्यासाठी शासनाने नमूद केलेली प्रक्रिया व योग्य प्रसिद्धी देऊन करण्याचे हाती घेण्यात येत आहे. सध्याच्या करोना परिस्थितीत हे काम करण्यास मर्यादा येत असल्या तरीही जिल्ह्यतील छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे नाव वगळण्याचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे यांनी सांगितले.मतदार याद्यांची पडताळणी करून संपूर्ण यादी छायाचित्रांसह सुसज्ज करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मतदार याद्यांचे नूतनीकरण करण्यासाठी १ जूनपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या निवासी पत्त्यावर किंवा परिसरात जाऊन त्यांचे फोटो संकलित करणे, मतदार प्रत्यक्षात राहत नसल्यास परिसरातील व्यक्तींचा जाबजबाब नोंदवून घेणे,  छायाचित्र जमा करण्यासाठी सूचना फलकांवर आवाहन करणे तसेच वृत्तपत्रांमध्ये किंवा अन्य माध्यमांतून वगळण्यात येणाऱ्या नावांची माहिती प्रसिद्ध करणे अशी प्रक्रिया राबवली जात आहे.मतदार याद्या अद्ययावत करण्यात जिल्ह्यतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी नमूद केले असून जिल्ह्यच्या याद्या १५ ऑगस्ट पूर्वी अद्ययावत होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई - उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितले. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केला आहे. कुंद्रा यांनी जेएल स्ट्रीम्ससोबत सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती. पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हिडीओ शूट केलेले. या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचे न्यूज चॅनेलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अंधेरी पश्चिमेमध्ये असणाऱ्या राज कुंद्रांच्या वियान कंपनीच्या कार्यालयामध्ये छापा टाकून तेथून मोठ्याप्रमाणात डिजीटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. या छाप्यामध्ये तपास यंत्रणांना बऱ्याच मोठ्याप्रमाणात माहिती आणि साहित्य सापडले आहे. हा डेटा काही टेराबाईट्समध्ये आहे यावरुनच या छाप्यामध्ये पोलिसांना तपासासाठी आवश्यक असणारे पुढील धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करण्याआधीच मोठ्या प्रमाणामध्ये डेटा डिलीटही करण्यात आला असून आता गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हरीचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई - राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आणखी एक-दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच, यामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. अनपेक्षित असे संकट राज्यावर ओढवले आहे. राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संपर्क साधला असून, पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या राज्यात पोहोचल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले. जीवितहानी होऊ नये, यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, आर्मी, हवाई दलामार्फत बचावकार्यही सुरु आहे. दुसरीकडे महाड येथे दरड कोसळून सुमारे ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंब दरडीखाली अडकले. त्यांना बाहेर काढण्याचेही काम युध्द पातळीवर सुरु आहे. नागपूर, किनारपट्टी, महाबळेश्वर भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे हे अनपेक्षित संकट असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पुरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफ'च्या पथकांनाही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या आस्मानी संकटाशी मुकाबला करत सगळ्यातून मार्ग काढत, पथके त्या ठिकाणी पोहोचवली जात आहे. पूरस्थितीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले जात आहे. अन्नांची पाकिटे, कपडे, ओषधे पुरविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.दरम्यान, कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये, मधलीवाडी गोवेले, साखर सुतारवाडी, पोलादपूर येथील केवनाळे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून हे मृत्यू झाले आहेत. वशिष्टी नदीवरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा पूल कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. महाड माणगांव येथे २००० लोकांची निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच, पूरग्रस्तांना अन्न व कपडे गरजेनुसार पुरविण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह भागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच माहिती आणि जनसंपर्क विभागातील पाच अधिकारी इस्रायलला गेले होते. हे पाचही अधिकारी सोशल मीडियाचे प्रशिक्षण घ्यायला गेले होते. विशेष म्हणजे कुणाचीही परवानगी न घेता हे अधिकारी इस्रायलाल गेले असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा पेगाससशी काही संबंध आहे का? असा सवाल केला जात असून त्याच्या सखोल चौकशीचा अहवाल ठाकरे सरकारने मागवला आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरद्वारे देशात हेरगिरी करण्यात आल्याचं उघड झाले आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीही या पेगागसद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोनही टॅप करण्यात आल्याचे म्हटले आहे. आम्ही महाविकास आघाडीचे सरकार बनवत असताना सरकार बनविण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्वांचे फोन टॅप केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांचे हे आरोप ताजे असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक नवा खुलास करून एकच खळबळ उडवून दिली आहे.फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? याच्या चौकशीची सचिन सावंत यांनी मागणी केली आहे. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

मुंबई - अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. महानगरपालिकेच्या २४ वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा १ लाख २८ हजार दशलक्ष लिटरने वाढला होता.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेगासेस प्रकरणावरुन पंतप्रधानानांवर निशाणा साधला. पेगासस प्रकरण खरे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.कोरोना परिस्थितीत हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, महागाई नियंत्रण, बेरोजगारी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या विषयांमध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे ते आणखी या प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष हटवत आहेत. मात्र, पेगासस प्रकरणात सत्य असेल, तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.पेगासस फोन प्रकरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणी आता ईस्रायलमध्ये गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तसे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच धागा पकडत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण २०१७-१८ मधील असल्याचे ते म्हणाले.जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगासस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगासस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था ‘एनएसओ’ ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता. कॉंग्रेसने संसदीय अधिवेशनात यावरुन रान उठविले आहे. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येत असून ते गंभीर आहे. देशातील महत्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडे जाऊ शकते, असे थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातही फोन टॅपिंगचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात उचलून धरला होता.

नवी दिल्ली - चीनबरोबर असलेल्या सीमावादाचा विषय हा संसदेच्या मान्सून अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चेला येणार आहे. चीनबरोबरील सीमेबाबत काय स्थिती आहे, याबाबतच्या अहवालाची विरोधी पक्षाकडून सरकारकडे मागणी केली जाणार आहे.संसदेचे अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. तर १३ ऑगस्टला संसदेचे अधिवेशन संपणार आहे. यावेळी अधिवेशनात देशाच्या संरक्षणाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे विरोधी पक्षांकडून उपस्थित केले जाणार आहेत.शरद पवार आणि ए. के. अँटोनी या दोन माजी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. यावेळी सैन्यदलाचे प्रमुख मनोज नरवणे आणि डिफेन्स स्टाफचे चीफ जनरल बिपीन रावत हे देखील उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांना ८६ व्या वाढदिवसानिमित्त दलाई लामा यांचे ६ जुलैला अभिनंदन केले होते. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केला जात असताना डेमचोकमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर चिनी नागरिकांनी बॅनर लावले होते. त्यावेळी चीनचे सैनिक आणि नागरिक लडाखच्या भागातील डेमचोक येथील सिंधू नदीजवळ आले होते. त्यांनी दलाई लामांचा वाढदिवस होत असताना निषेध व्यक्त केला होता.पूर्व लडाखमध्ये भारत व चीनचे सैनिक हे गतवर्षी समोरासमोर उभे ठाकले होते. यावेळी भारताने बचाचात्वमक धोरण स्वीकारले नाही. भारताने पूर्व लडाखमध्ये ५० हजार सैनिकांच्या तुकड्या हलविल्या आहेत.संसदेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक घेतली. या बैठकीत चीनबरोबरील सीमावादाचा विषय उपस्थित करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.संसदीय समितीच्या बैठकीत देशाच्या संरक्षणासंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी संसदीय समितीच्या चेअरमनने मान्य केली नाही. त्यावर राहुल गांधी हे बैठकीतून बाहेर पडले. संसदीय समितीने अत्यंत महत्त्वाच्या आणि संबंधित मुदद्यावर जाणीवपूर्वक चर्चा करावी, असा राहुल गांधी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत आग्रह धरला. यामध्ये पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर असलेली स्थिती आणि पाकिस्तानकडून असलेला दहशतवाद्याचा धोका अशा मुद्द्यांचा समावेश होता.

बीड - भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यावरुन राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले होते. त्यावरुन शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंना थेट शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल, असेही शंभुराज देसाई म्हणाले. ते बीड जिल्हा दौऱ्यावर असताना याबाबतचे वक्तव्य केले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द पंकजा मुंडे यांनी  कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू” माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचे वृत्त काही माध्यमांनी चालवले. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसे काही दिसते का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंढरपूर - आषाढी एकादशी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पांडुरंगाचा वारी सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा करणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाची संचारबंदी, तर आसपासच्या ९ गावांमध्ये चार दिवसांची संचारबंदी लागू असणार आहे. पोलीस प्रशासनाकडून नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपुरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.येत्या २० जुलैला पांडुरंगाची एकादशी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला वारकरी व भाविकांनी गर्दी करू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून पंढरीत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी १८ जुलै ते २४ जुलै दरम्यान पंढरीत असणार आहे. तर आसपासच्या नऊ गावांमध्ये १८ जुलै ते २२ जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत. पंढरपुरातील प्रत्येक भागामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत. यामध्ये वाखरी तळ, चंद्रभागा नदी पात्र, प्रदक्षिणामार्ग, विठ्ठल मंदिर परिसरावर विशेष लक्ष असणार आहे.१९ जुलैच्या दुपारी तीन वाजेपर्यंत दहा मानाच्या पालख्या एसटी बसच्या माध्यमातून वाखरी पालखी तळावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तालुका प्रशासनाकडून विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीन एकर परिसरातील पालखी तळ पूर्ण बॅरेगेटिंग करण्यात आले आहे. यामध्ये अधिकृत महाराज मंडळी व वारकऱ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर वाखरी ते विसावा अशी पायी दिंडी ची परवानगी देण्यात आली आहे. वाखरी पालखी तळावर दहा पालख्यासाठी मंडप व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वातंत्र्य भोजन व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी लागणारे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. धर्मशाळा किंवा मठांमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून साडेचारशे मठांमध्ये तपासणी करण्यात आहे. पंढरपूर शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. सात दिवसाच्या कालखंडामध्ये तीन हजार पोलिसांचा पंढरपुरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल व होमगार्ड अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. 

लखनऊ  - सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर अखेर उत्तर प्रदेश सरकारने बहुचर्चित कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.धार्मिक भावना विचारात घेऊन यंदा प्रतीकात्मक यात्रा आयोजित करू देण्याच्या निर्णयाचाही फेरविचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांचे आरोग्य आणि त्यांचा जगण्याचा हक्क सर्वांत महत्त्वाचे आहे. इतर सर्व भावना, मग त्या धार्मिक का असेनात, या सर्वांत प्राथमिक अशा मूलभूत अधिकाराच्या अधीन आहेत, असे भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केले होते.करोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी याबाबत केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तराखंड सरकारला म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या सूचनेनंतर उत्तराखंडने ही यात्रा रद्द केली होती. उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी, धार्मिक भावनांचा विचार करून केवळ प्रतीकात्मक कावड यात्रा आयोजित करण्यात येईल, असे खंडपीठाला सांगितले होते. त्यावर त्याचाही फेरविचार करण्याची सूचना खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारला केली होती. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर टीका केली असून तो मान्य नसल्याचे म्हटले आहे.कावड यात्रा २५ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती.


नवी दिल्ली - अफगाणिस्तानात भारतीय पत्रकार छायाचित्रकार दानिश सिद्दीकी याचा नुकताच मृत्यू झाला आहे. दानिशच्या मृत्यूवर पहिल्यांदाच तालिबानची भूमिका समोर आली. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने एका टीव्ही चॅनलशी बोलताना, तालिबानचा दानिशच्या हत्येमागे कोणताही हात नसल्याची प्रतिक्रिया दिली.दरम्यान, दानिश सिद्दीकी याचं पार्थिव शरीर 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस'ला (ICRC) सोपवण्यात आला आहे. याची सूचना भारताला देण्यात आल्यानंतर भारतीय अधिकारी मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कंदहारच्या 'स्पीन बोल्डक' जिल्ह्यात अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान दानिशचा मृत्यू झाला होता.गोळीबारात एखाद्या भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. त्याचा मृत्यू कसा झाला याचादेखील आम्हाला पत्ता नाही. युद्ध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराने आम्हाला या बाबतीत सूचना दिली तर आम्ही त्या व्यक्तीची खास काळजी घेऊ, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने याने म्हंटले. 

सोबतच, तालिबानने दानिशच्या मृत्यूवर खेद व्यक्त केला आहे. 'आम्हाला भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी याच्या मृत्यूचा खेद आहे. आम्हाला या गोष्टीचे दु:ख होते की कोणतीही माहिती न देता पत्रकार युद्ध क्षेत्रात प्रवेश करत आहेत', असेही मुजाहिद याने म्हटले. पुलित्झर पुरस्कार विजेता छायाचित्रकार आणि पत्रकार दानिश सिद्दीकी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेसाठी काम करत होता. अफगाण सैन्याच्या कमांडरने वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या 'स्पीन बोल्डक' या भागावर तालिबानने कब्जा मिळवला होता. अफगाण स्पेशल फोर्सची या भागातील मुख्य बाजार ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होती. याच दरम्यान तालिबानकडून करण्यात आलेल्या क्रॉस फायरिंग दरम्यान दानिश सिद्दीकी आणि एक वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget