August 2021

मुंबई - ड्रग्स प्रकरणी बॉलीवुडमधील अनेक नामवंत कलाकारांचे नाव समोर येत आहेत. शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापेमारी केली. त्यानंतर आता एनसीबीने त्यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरमान कोहलीच्या घरून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर एनसीबीने त्याला कार्यालय घेऊन गेली. एनसीबीचे मुंबई निर्देशक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान अरमान कोहलीने स्पष्ट उत्तर दिली नाहीत. त्यामुळे त्यांना कार्यालयात आणण्यात आले.


नाशिक - ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप न सुटल्याने महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले असले तरी पक्षपातळीवर मोर्चेबांधणी सुरूच आहे. नाशिकमध्ये याचीच प्रचिती आली. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेत सगळ्यांनाच धक्का दिला. गीते हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व नागपूरप्रमाणेच नाशिक महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सध्या सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना भाजपने मनसेला चारीमुंड्या चीत करत नाशिकची सत्ता ताब्यात घेतली होती. आता राज्यात सत्ता नसल्याने ही महापालिका राखणे हे भाजपसमोर आव्हान आहे. तर, राज ठाकरे यांचे  आवडते शहर असलेल्या नाशिकवर पुन्हा मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी अमित ठाकरे हे स्वत: मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत: राज्याचे मुख्यमंत्री असल्याने शिवसेनाही सध्या जोमात असून त्यांनीही नाशिकमध्ये जोर लावला आहे.संजय राऊत यांनी स्वत: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले असून भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी राऊत यांची भेट घेतली. गीते यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. पक्ष प्रवेशाची तारीख मात्र अद्याप निश्चित नाही. भाजपमध्ये गळचेपी होत असून बोलू दिले जात नसल्याचा आरोप गीते यांनी केला आहे.प्रथमेश गीते हे माजी आमदार वसंत गीते यांचे सुपुत्र आहेत. ते माजी उपमहापौर असून सध्या भाजपचे नगरसेवक आहेत. वसंत गिते हे नाशिकमधील एक वजनदार नेते आहेत. त्यांनी नाशिकचे महापौरपदही भूषवले आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वसंत गीते हे मनसेमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सहा महिन्यांपूर्वीच ते स्वगृही परतले आहेत. त्यानंतर आता त्यांचे चिरंजीव प्रथमेश गीते देखील शिवसेनेत येत आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवी दिल्ली -  केंद्रीय तपास यंत्रणा अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाखाली उद्योजक आणि व्यावसायिकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि ईडीने संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपी 'हॅलो, ईडीच्या  कार्यालयातून बोलतोय', असे सांगत ईडीच्या नावाने नोटीस पाठवून अनेकांना लुबाडत होते. तसेच गैरमार्गाने मिळवलेला हा पैसा चित्रपट बनवण्यासाठी वापरत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे.याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं तीन आरोपींना अटक केली. संबंधित आरोपी ईडीच्या नावाने शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकांना नोटीस पाठवायचे. तसेच चौकशीसाठी बोलावण्याच्या नावाखाली बेकायदेशीर पैसे उकळत होते.संबंधित आरोपींनी अनेक व्यावसायिकांकडून लाखो आणि करोडो रुपये उकळले असल्याचंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. संबंधित आरोपीने शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकाना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे फोन करत आपण ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत. तसेच ईडी मुख्यालयाच्या लँडलाईन क्रमांकाशी मिळत्या जुळत्या नंबरवरून व्यावसायिकांना धमकी देण्यात येत होती. अशा पद्धतीने आरोपीने अनेक व्यावसायिकांना करोडो रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

अहमदनगर - राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 'क्लीनचिट' देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे व्हायरल झाली आहेत. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. 'सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकले जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत देशमुख यांच्यावरील आरोपात काही तथ्य नसल्याचे वाटत असल्याचे सुचविणारी 'पीडीएफ' समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहे. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर देशमुख यांच्यावरील आरोपांत काहीच तथ्य नसल्याने चौकशी बंद करण्याची शिफारस केल्याचा दावा यामध्ये करण्यात येत आहे. या कथित अहवालामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या एका जुन्या ट्विटचाही संदर्भ दिला आहे. पवार यांनी म्हटले आहे, 'सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकले जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो.' असे पवार यांनी म्हटले आहे.


कणकवली - शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे पितापुत्रांदरम्यान जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना, अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना, ‘करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?’ असा सवाल निलेश राणे यांनी केला. संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत, केवळ शिवसेना अडवा-अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे, असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरून भाजपा आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे.

नागपूर - आपल्या मातृभाषा मराठीसाठी आपण सर्वांनी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजे असे आवाहन राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी २०१२-१३ पासून प्रस्ताव केंद्रात पाठवला पण पण काहीच झाले नाही. यामुळे सेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे या दोघांनीही प्रयत्न करावे असे आवाहन या निमित्ताने केले. उच्च शिक्षण विभाग तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ . विकास महात्मे , कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी यांच्यासह कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, उज्जैनच्या महर्षि पाणिनि संस्कृत व वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजयकुमार उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची भावनिक हाक आहे. मराठी १२००ते १५०० वर्षाचा इतिहास आहे. शेजारच्या राज्यातील भाषेला दर्जा मिळू शकतो तर मग महाराष्ट्राला का नाही यासाठी हा मुदा केंद्रात उचलावा. यासाठी पक्षीय भेद दूर ठेवावे असे संस्कृत साधना पुरस्कार कार्यक्रमच्या निमित्याने संकल्प घेऊन केंद्र सरकारला विचरणा केली पाहिजे असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यात मंत्री असताना हा प्रस्ताव मराठीत केंद्राला पाठवला होता. तत्कालीन केंद्रीय सचिवानी हा प्रस्ताव पाठवावा असे आवाहन केले. तो पाठवून आज आठ ते नऊ वर्ष लोटले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतसंस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा मोजक्याच लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी. केवळ रामटेक पुरतेच मर्यादित राहू नये यासाठी रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत साधना पुरस्काराची परंपरा यापुढे अखंडितपणे सुरु राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित सर्व सत्कारमूर्तींनी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सामाजिक कार्य यापुढेही अविरतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रामटेक येथे केले. संस्कृत भाषा केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल.

या सोहळ्यामध्ये सन २०१५ ते २०२० या कालावधीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी ४८ सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र तसेच रोख २५ हजार रुपयांची रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण सहा गटात झाले आहे. त्यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक व इतर, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अध्यापक, संस्कृत कार्यकर्ता तसेच अन्य राज्यातील संस्कृत पंडितांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अहमदाबाद - भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज (Rigs) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केली. एमईआयएलच्या या नव्या यशामुळे भारताचे मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार आहे. बुधवारी (२५ ऑगस्ट) अहमदाबादमध्ये एमईआयएलने पहिली स्वदेशी रिग्जचे तेल उत्पादक सरकारी कंपनी ओएनजीसीला (ONGC) हस्तांतरण केले. भारतासाठी तंत्रज्ञान स्वालंबनात ही मोठी उपलब्धता मानली जात आहे. अत्यंत खोल समुद्रात खनिज तेल उत्पादनात Rigs ची भूमिका महत्त्वाची असते. याचे तंत्रज्ञान अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचे असते. असे  असताना ही यंत्रणा उभी करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील मोजक्या देशांपैकी एक बनला आहे. यामुळे जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढणार आहे. एमईआयएलने ड्रिलमेकचे प्रमुख बोमारेड्डी यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा हस्तांतरीत केली. यावेळी ऑईल रिग्ड विभागाचे प्रमुख एन. कृष्णाकुमार, उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी हेही उपस्थित होते. एमईआयएलला ओएनजीसीकडून एकूण ४७ तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जच्या निर्मितीचे काम मिळाले आहे. याची एकूण किंमत ६,००० कोटी रुपये आहे. याचाच भाग म्हणून एमईआयएलने पहिली रिग्ज ओएनजीसीकडे सुपुर्त केली. यासह एमईआयएल देशातील पहिली खासगी कंपनी बनली जिने खनिज तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जची स्वदेशी तंत्रज्ञानावर निर्मिती केली.इंदूर - मध्य प्रदेशची व्यावसायिक राजधानी इंदूरमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे 'चेंबर ऑफ कॉमर्स'चे अध्यक्ष आणि सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली. आपल्या दुकानातून या मूर्त्यांची विक्री करण्याचा वर्मा यांचा मानस आहे.वर्मा यांनी याआधीही आपल्या दुकानातून मोदींचा फोटो असलेल्या चांदीच्या नोट आणि नाणी विक्री केली होती. 'घर घर मोदी' मोहिमेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा हा अंदाज सामान्यांत चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्त्या पाहण्यासाठी वर्मा यांच्या दुकानासमोर सध्या प्रचंड गर्दी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५० ग्राम मूर्तीची किंमत ११ हजार रुपये निर्धारीत करण्यात आली. या मूर्त्या वेगवेगळ्या हावभावात आणि वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत दिसून येत आहेत. वर्मा यांच्याकडे सध्या दोन मूर्त्या पोहचल्या आहेत तर पाच लवकरच दाखल होणार आहेत. मुंबईच्या एका मोठ्या ज्वेलर्स शोरुमवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्त्या पाहिल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीच्या मूर्त्या बनवण्याची ऑर्डर दिली होती.

करनाल - हरियाणा करनालमध्ये भाजपच्या बैठकीचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणातील बसताडा टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. तर, ५ सप्टेंबरला मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीने करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचे ठरवले होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवामध्ये एका ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागाने या ग्रुपच्या ४४ हून अधिक मालमत्तांवर छापे टाकले आहेत. हा ग्रुप आघाडीचा स्टील उत्पादक कंपनीचा आहे. या ग्रुपकडून पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवामध्ये व्यवसाय करण्यात येतो.प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनाशी संबंधित ग्रुपच्या मालमत्तांवर २५ ऑगस्टला छापे टाकले आहे. प्राप्तिकर विभागाने छाप्यादरम्यान अनेक कागदपत्रे आणि डिजीटल पुरावे जप्त केली आहेत. ग्रुप बेकायदेशीरपणे भंगार खरेदीसारख्या प्रकरणात गुंतल्याचे पुराव्यातून दिसून येत असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाने छाप्यादंरम्यान बनावट बिलेही जप्त करण्यात आली आहेत. बनावट बिलामधून ग्रुपने १६० कोटींची खरेदी झाल्याचे दाखविले. सध्या, या बिलांबाबत पडताळणी सुरू असून फसवणुकीच्या रकमेमध्ये आणखी वाढ होऊ शकते.एकूण १७५.५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्तबेहिशोबी मालमत्ताही आढळून आली आहे. यामध्ये ३ कोटी रोख रक्कम आणि ५.२० कोटी रुपयांचे ज्वेलरी, १९४ किलो चांदीच्या वस्तू (किंमत १.३४ कोटी) यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने एकूण १७५.५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. अजून प्राप्तिकर विभागाचे छापे आणि तपास सुरू आहे.

म्हैसूर - कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून १३ कि.मी दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघेजण एकातांत बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाइलवर खासगी क्षण चित्रित केले. आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडिताकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, २ वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाइल घेत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी या प्रकरणातील ५ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे तामिळनाडूतील रोजंदारी मजुरी करणारे आहेत, अशी माहिती डीजी-आयजीपी प्रवीण सूद यांनी दिली आहे. म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण सूद म्हणाले, "म्हैसूरमध्ये मुंबईतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ५ आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी हे तिरूपूर, तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते शहरात ड्रायव्हर सुतार आणि इतर रोजंदारी काम करतात, या आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. आतापर्यंत ६ पैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे असे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे, की आरोपींनी पीडिता आणि तिच्या मित्राकडे 3 लाख रुपयांची मागणी केली होती. ते पैशाची जुळवाजुळव करू शकले नाही त्यावेळी त्यांनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि पीडितेवर अत्याचार केला. पीडितेला अजूनही धक्का बसलेला आहे. आम्ही तिच्याकडून अधिक माहिती मिळवू शकलो नाहीत. आम्ही तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना अटक केली आहे आणि फरार आरोपीवर ५ लाखांचे बक्षिसही जाहीर केलेले आहे, असे प्रविण सूद यांनी सांगितले.


मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील ‘रात अकेली है’ आणि ‘सीरियस मॅन’ या शोमध्ये दिसला. ज्यात त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि आता नवाजच्या आणखी एका प्रोजेक्टची बातमी समोर आली आहे. पीपिंग मूनच्या अहवालानुसार, मुन्ना मायकेल चित्रपटानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दिग्दर्शक शब्बीर खान पुन्हा एकदा हात मिळवणी करणार आहेत. विनोदी चित्रपटासाठी नवाज आणि शब्बीर खान यांचे हे कॉलेब्रेशन होत आहे, ज्याचे नाव ‘अमेझिंग’ असेल.जरी नवाजने अनेक चित्रपटांमध्ये हलकी फुल्की कॉमेडी केली असली तरी नवाजला यावेळी कॉमेडीची फुल स्पेस मिळेल असे सांगितले जात आहे. हिरोपंती आणि बागीची स्क्रिप्ट लिहिल्यानंतर दिग्दर्शकाने स्वतः या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहिली आहे. अहवालानुसार, चित्रपट निर्माते लवकरच या चित्रपटासाठी मोठ्या बॅनरसह चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करतील. जे खरोखरच त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीचे टॅलेंट बॉलिवूडमध्ये इतके चालत आहे की आतापर्यंत ते मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये कास्ट केले जात होते किंवा सोलो चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळत होती. तर आज नवाज आपल्या कामाची अशी छाप सोडत आहे की मोठे चित्रपट निर्माते त्याच्यावर पैसे गुंतवण्यास तयार आहेत आणि मुख्य कलाकारांच्या भूमिका आता त्याला ऑफर केल्या जात आहेत.


मुंबई - कोरोनामध्ये लॉकडाऊनचा सामना केल्यापासून मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. मनोरंजनसृष्टीत तर मानसिक आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इंडस्ट्रीत अपेक्षांचे ओझे वाहण्यात कमी पडणाऱ्या कलाकारांना नैराश्याचा सामना करावा लागतो हे अनेकांनी जाहीरपणे सांगितले आहे. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर देखील याला अपवाद नाही हे त्याने तो सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये ‘संडे का वार’ मध्ये सांगितले.बिग बॉस ओटीटीमध्‍ये करण जोहरने स्‍वत:हून आयुष्यात अनुभवलेल्‍या नैराश्याबाबत वक्तव्य केले. त्याने, सामोरे गेलेल्या, चिंताग्रस्‍त वातावरणाबाबत जाहीरपणे वक्तव्य केले. बिग बॉस ओटीटी होस्‍ट करणारा करण जोहर लोकांमध्ये आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा शो सुरू झाल्‍यापासून प्रेक्षकांनी त्‍याच्‍यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे. शोचे दोन ॲक्शन-पॅक्ड वीकेण्‍ड मधील त्याचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडतोय. शमिताबाबत व्‍यक्‍त केलेल्‍या मतासाठी दिव्‍याची मस्‍करी करण्‍यापासून झीशानला महिलांसोबत कशा पद्धतीने बोलावे हे दाखवून देण्‍यापर्यंत केजो याने घरातील प्रत्‍येक सदस्‍याला ते काय बोलत आहेत आणि कोणासोबत बोलत आहेत याबाबत दक्ष केले आहे.मागील 'संडे का वार'दरम्‍यान केजो झीशानवर नाराज झाले, कारण त्‍याने बिग बॉस घरामध्‍ये काही औषधे सेवन करण्‍यासंदर्भात शमिता शेट्टीशी उद्धटपणे संवाद केला होता. आपले स्‍टार होस्‍ट करण जोहर यांना घरामध्‍ये घडलेल्‍या घटनेबाबत समजल्‍यानंतर ते रागाने लालबुंद झाले. केजो यांनी शोमध्‍ये उलगडा केला की त्‍यांनी स्‍वत: देखील अशा स्थितीचा सामना केला आहे, जेथे ते नैराश्य, चिंताग्रस्‍तपणा व तणावाचा सामना करण्‍यासाठी ३ वर्षे ट्रीटमेंट घेत होते आणि औषध सेवन करत होते. झीशानला खडसावत करण म्हणाला की, “चिंता व मानसिक आरोग्‍य या समस्‍यांबाबत ज्‍या पद्धतीने बोलले जाते, ते ऐकून मला त्रास होतो. तुला माहित नसेल तर त्‍याबाबत बोलू नकोस’.''सेलिब्रिटीला मानसिक आरोग्‍याबाबत व वैयक्तिक अनुभव सांगण्‍यासाठी खूप धाडस करावे लागते. करण जोहर ने नैराश्याबाबत कशाप्रकारे उपचार घेतला याबाबतच्‍या त्‍यांच्‍या अनुभवाबाबत जाहीरपणे सांगितले आणि त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ठाणे - पुढील महिन्यात होत असलेल्या गणेशोत्सवादरम्यान विसर्जन दिवशी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार यंदाही गतवर्षीप्रमाणे ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून विसर्जन टाक्या शहरभर फिरवण्यात येणार आहेत. याखेरीज कृत्रिम तलावांतील विसर्जनासाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून विसर्जनस्थळी शीघ्र प्रतिजन केंद्रांचीही उभारणी करण्यात येणार आहे.करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळत साधेपणाने सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पुढील महिन्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उत्सवामध्ये गणेश मूर्ती विसर्जनावेळी नागरिक एकत्रित येऊन गर्दी करतात. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आतापासूनच नियोजन आखण्यास सुरुवात केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर अथवा जीपच्या पाठीमागे टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या वाहनांवर विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार आहे. गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावांमध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन होते, त्याचप्रमाणे फिरत्या विसर्जन व्यवस्थेमध्येही मूर्तीचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये वाहनांद्वारे फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पनवेल - वारंवार मागणी करूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने खारघर व तळोजा वसाहतीतील नागरिकांनी सिडकोवर शुक्रवारी धडक मोर्चा काढला. खोटी आश्वासने बंद करा, नको रोजची आणीबाणी, आंम्हाला हवे पुरसे पाणी,आशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालकांबरोबर झालेल्या बैठकीत आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलक परतले. लाखो रुपयांच्या सदनिका खरेदी केल्या आहेत, मात्र पाणी नाही. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी सिडको या भागात नव्याने घरे उभारत आहे. त्यामुळे अगोदर पूर्वीच्या रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही तर नवीन घर खरेदी करणाऱ्यांना पाणी कुठून मिळणार? असा या आंदोलकांचा सवाल आहे. सिडको काही करीत नसल्याने रहिवाशांनी विंधन विहिरीचा पर्यायही केला. मात्र त्यातून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने अखेर रहिवाशांनी सिडकोवर मोर्चा काढला.या मोर्चात खारघर व तळोजा या वसाहतींमधील नागरिकांसाठी कामोठे आणि कळंबोली येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी धावून आल्याचे दिसत होते. कामोठे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनने मोर्चाचे नियोजन केले होते.पाऊस पडत असून धरणे तुडुंब वाहत आहेत. असे असताना पिण्यासाठी पाणी का मिळत नाही असा या रहिवाशांचा प्रश्न असून त्यांनी तो सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांना विचारला. यावर सिडकोने पाणी समस्या सोडविण्यासाठी ठोस नियोजन केले आहे. बाळगंगा व कोंढाणे या धरणातून तसेच पाताळगंगा नदीतील पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर हा प्रश्न कायमचा सुटेल असे शिंदे यांनी आंदोलकांना सांगितले. मात्र यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ज्या गृहनिर्माण संस्थांत पाणी समस्या आहे, त्याचा शोध घेण्यासाठी सिडको पाणी सर्वेक्षण हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या गृहनिर्माण सोसायटय़ांना पाण्याची समस्या आहे, अशांना तात्पुरते १०० रुपये प्रति टँकर दराने पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र ही योजना ज्या सोसायटय़ांना एक ते दोन टॅंकर पाणी लागते अशांसाठीच असेल असे शिंदे यांनी सांगितले. तसेच १ स्पटेंबर रोजी पुन्हा बैठक घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.


विरार - वसई-विरार परिसरात करोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पालिकेकडून नियमांचे पालन करण्याची सक्ती केली आहे तरी नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. अशाच हजारो नागरिकांवर पालिकेने मागील दोन महिन्यांत कारवाई करत १२ लाख ३४ हजार १५० रुपयाची दंडवसुली केली आहे.जून महिन्यापासून करोना वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पालिकेकडून करोना टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने करोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेकडून दैनंदिन बाजार, दुकाने, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरात नागरिकांचा वावर वाढला आहे. पण त्यांना मुखपट्टय़ाचा वापर बंधकारक केला आहे. मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यानुसार पालिकेच्या सर्वच प्रभागात कारवाई करण्यात येत आहे.पालिकेकडून प्रभागानुसार १ जुलै  ते २१  ऑगस्ट मध्ये कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती अ ६७१ मध्ये मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत १ लाख ३४ हजार २०० रुपयांची दंड वसुली केली आहे. प्रभाग समिती ब मध्ये  ७३० नागरिकांवर कारवाई करत  १ लाख ४६  हजाराची वसुली केली आहे. प्रभाग समिती सी मध्ये ८०५ नागरिकांवर कारवाई करत  १ लाख ६१ हजार रुपये दंड वसुली केली आहे.प्रभाग समिती डी मध्ये ६९२ नागरिकांवर कारवाई करत १  लाख ६५ हजार ४००, प्रभाग समिती ई मध्ये  ४६८ नागरिकांवर कारवाई केली आहे. यात ९३  हजार ७५०  रुपये, प्रभाग समिती एफ  मध्ये मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्या ३४१  नागरिकांवर कारवाई करत ७१ हजार २०० हजार रुपये, प्रभाग समिती जी मध्ये १३३५ नागरिकांवर कारवाई करत २ लाख ६७ हजार रुपयाची दंड वसुली केली आहे.  प्रभाग समिती एच मध्ये ३३२ जणांवर कारवाई करत ६६ हजार ४०० रुपयाची दंड वसुली केली आहे. आणि प्रभाग आय मध्ये ६६४ जणांवर कारवाई करत १ लाख २९ हजार २०० रुपयाची दंड वसुली केली आहे. पालिकेने निर्बंध कमी केल्याने शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत  आहे. त्यातही नागरिक नियमनाचे पालन करत नसल्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे.


जव्हार -  जव्हार तालुक्यातील खडखड गावातील शिधावाटप दुकानदाराकडून धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला दुकानातील धान्य विक्रीसाठी इतर ठिकाणी टेम्पोतून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी तो अडविला. मात्र टेम्पोचालकाने टेम्पो तिथेच ठेवून पळ काढला. जव्हारचे तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून त्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात कडक कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जव्हारचे तहसीलदार, पुरवठा अधिकारी, संबंधित तलाठी यांच्याकडून सदर दुकानदारांची तपासणी करून त्यांच्या अहवालावरून दुकाननदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जव्हारचे प्रांत अधिकारी आयुषी सिंग सांगितले आहे.ठाणे - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था खूपच बिकट आहे. शिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेसची फारशी ताकद नाही. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत काँग्रेस एक घटक पक्ष म्हणून सामील आहे. मात्र राज्यात सत्ता असतानाही राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरलेल्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नाही.असे असूनही महापालिका निवडणुकित 'एकला चलो रे'चा नारा दिला. मात्र काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षासह स्थानिक नेत्यांनी दिलेल्या 'एकला चलो'च्या घोषणाच्या फुग्यातून हवा काढली असून यापुढे सर्वच निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत लढविल्या जातील, असे बुलढाण्यात जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज निवडणुका लढविणाऱ्यावरून एकमत झाल्याचे दिसून येत नाही.काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. आक्रमक नेतृत्व अशी नानांची ओळख आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वामुळे तरी जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळणार का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. मुंबई लगत असलेला ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. यातील बहुतांशी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात आहे. काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने ठाणे जिल्ह्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यातही काँग्रेसने कल्याणचे संजय दत्त आणि मीरा भाईंदरचे मुझफ्फर हुसेन यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले. मात्र जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास त्यांच नेतृत्व सक्षम ठरलेले नाही. जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा आलेख घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येतो. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची उणीव नेहमीच भासली आहे. मात्र त्याकडे वरिष्ठांकडून नेहमीच कानाडोळा केल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. 

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे लखनऊ येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनकच होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेता गमावला आहे. दरम्यान, अयोध्येतील भव्य राम मंदिराचे दर्शन घेऊनच या जगाचा निरोप घेण्याची कल्याण सिंह यांची अंतिम इच्छा होती. ही त्यांची इच्छा अधुरी राहिली. उत्तर प्रदेशातील भाजपचा दिग्गज नेता अशी कल्याण सिंह यांची ओळख होती. कल्याण सिंह यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. १९९१ मध्ये प्रथम आणि नंतर १९९७ मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उत्तर प्रदेशमधून संसदेतही भाजपकडून सिंह यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मोदी सरकारच्या काळात राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.उत्तर प्रदेशच्या विकासात कल्याण सिंह यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपचे एक प्रमुख नेते होते. कल्याण सिंह मुख्यमंत्री असतानाच अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. विधानसभेत ४२५ पैकी २२१ इतके संख्याबळ असूनही कल्याण सिंह सरकारला तेव्हा पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर कल्याण सिंह यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत राहिले होते. प्राथमिक शाळांतील वर्गांची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने करावी, यस सर ऐवजी वंदे मातरम् बोलावे, असे नियम त्यांनी लागू केले होते. फेब्रुवारी १९९८ मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित गुन्हे त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याच काळात भाजपने 'मंदिर वहीं बनाएंगे' ही घोषणा केली होती.

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत कल्याण सिंह यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल नेता, कर्तव्यकठोर प्रशासक आणि तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेला नेता आम्ही गमावला आहे, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

श्रीनगर - महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळणे भाग पडल्याचे सांगून, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील परिस्थितीची तुलना अफगाणिस्तानशी केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारप्रमाणे केंद्र सरकारने चर्चा सुरू करून अनुच्छेद ३७० पुन्हा बहाल करावे, अन्यथा फार उशीर झालेला असेल. ‘आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका’, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.अजूनही तुम्हाला संधी आहे. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका आणि तुमची कार्यपद्धती सुधारा. वाजपेयींनी शांतता प्रक्रिया कशी सुरू केली होती हे आठवा. तुम्ही काश्मिरींशी बोलणी पुन्हा सुरू करून, जे काही लुटले आहे ते परत करायला हवे, असे मुफ्ती त्यांच्या भाषणात म्हणाल्या. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याच्या विरोधात ‘शांततेने’ लढा देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. दरम्यान, मेहबूबा यांचा राजकीय पराभव झालेला असल्याने त्या निराश झाल्या आहेत, अशा शब्दांत भाजपचे नेते निर्मल सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ‘त्या आम्हाला ब्लॅकमेल करू शकतात असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की हा मोदींचा भारत आहे. पूर्वीचे दिवस गेले आहेत, आम्ही ब्लॅकमेल होणार नाही’, असे ते म्हणाले.


नवी दिल्ली - सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) संयुक्त संचालक राजेश्वर सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर राजेश्वर सिंह राजकारणात प्रवेश करतील. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.राजेश्वर सिंह हे सध्या ‘ईडी’चे संयुक्त संचालक असून ते लखनऊ येथील विभागीय मुख्यालयात कार्यरत आहेत. राजेश्वर सिंह यांनी बी.टेक आणि सामाजिक न्याय व मानवी अधिकार हा विषय घेऊन पीएचडी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलातील राजेश्वर सिंह यांनी २००९ मध्ये प्रतिनियुक्तीवर ‘ईडी’मध्ये आले होते. यानंतरच्या काळात राजेश्वर सिंह यांनी एअरटेल मॅक्सिस, टु जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा आणि ऑगस्टा वेस्टलँड अशा महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात प्रमुख भूमिका बजावली होती. तसेच पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील भ्रष्टाराच्या प्रकरणाचा तपासही राजेश्वर सिंह यांनी केला होता.राजेश्वर सिंह यांच्या भगिनी आभा सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. या ट्विटमध्ये आभा सिंह यांनी म्हटले आहे की, माझ्या भावाचे अभिनंदन त्याने स्वेच्छानिवृत्ती पत्कारून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांना २०१५ साली ‘ईडी’मध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले होते. राजेश्वर सिंह यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. २०१८ साली केंद्रीय अर्थमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाकडे एक गोपनीय अहवाल सुपूर्द केला होता. यामध्ये राजेश्वर सिंह यांना दुबईवरून येणाऱ्या फोन कॉल्सचा उल्लेख होता. त्यानंतर ‘ईडी’चे तत्कालीन संचालक कर्नाल सिंह यांना पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. याप्रकरणात राजेश्वर सिंह यांची चौकशीही झाली होती. मात्र, त्यामधून राजेश्वर सिंह यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

गाझियाबाद - अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.  अफगाणिस्तानातून भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान १६८ जणांना घेऊन गाझियाबादमध्ये दाखल झाले.यापूर्वी भारताने अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुतासह २०० भारतीयांना सी-१७ या हवाईदलाच्या विमानाने भारतात आणले होते. तर गेल्या सोमवारी अफगाणिस्तानमधून ४० जण मायदेशी परतले होते. यात भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली. अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. २० वर्षांपूर्वीची परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने देश सोडून जात आहेत. तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. भारतीय सुरक्षित असल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. 


मुंबई - सध्या आगामी रिजनल चित्रपट बरेच चर्चेत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या असाच एका तमिळ चित्रपटाचे नाव आहे ‘विक्रम’. १९८६ मध्ये याच नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता. हा एक स्पाय थ्रिलर होता, ज्यामध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत होता. १९८६ चित्रपट ‘विक्रम’ हा गाणी रेकॉर्ड करण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट होता. एक कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपटही होता.‘विक्रम’ या नवीन रिलीजचा टीझर रिलीज झाला तेव्हा, १९८६ च्या चित्रपटातील एका गाण्याची रीमिक्स आवृत्ती वापरली गेली. तेव्हापासून अशी चर्चा रंगली आहे की, हा २५ वर्षांपूर्वी आलेल्या ‘विक्रम’ चा रिमेक आहे. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

मुंबई - राखी सावंत हिला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखलं जातं. चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच ती तिच्या स्पायडरमॅन व्हिडीओमुळे चर्चेत होती. रस्त्यावर ती स्पायडरमॅनचा पोशाख परिधान करून फिरत होती. त्यानंतर आता ती रक्षा बंधन या सणामुळे चर्चेत आहे. राखीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला राखी बांधायची आहे.पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राखीने आपल्या वैयक्तीक आयुष्यावर भाष्य केले. त्यावेळी तिने सलमान खानला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. “मला सलमानला राखी बांधायची आहे, कारण त्याने माझ्या आईला नवीन जीवन दिले. मला त्याच्यासाठी खास त्याचा फोटो असलेली राखी हवी आहे. कोणी बनवू शकेल का?” असे ती या मुलाखतीत म्हणाली. सलमानसोबतच तिला ‘बिग बॉस १४ चा स्पर्धक विकास गुप्ताला देखील राखी बांधायची आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत एकापाठोपाठ एक चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहे आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता अलीकडेच, इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करून कंगनाने सांगितले की, तिने ‘तेजस’चे शूटिंग सुरू केले आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिले, ‘आता मी माझ्या पुढच्या मिशनवर जात आहे.या फोटोत कंगना हवाई दलाच्या गणवेशात दिसत आहे आणि यावेळी ती खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने याआधी अनेक भिन्न पात्रे साकारली आहेत पण पहिल्यांदा ती गणवेशात दिसली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना समर्पित करण्यात आली आहे. प्रसिद्ध निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. तसेच, सर्वेश मेवाडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, त्याची पहिली झलक दाखवताना कंगनाने सांगितले की, ती या चित्रपटाचा एक भाग बनणार आहे. चित्रपटाच्या नाव आणि पोस्टरवरून असेही समजले आहे की, हा चित्रपट केवळ हवाई दलाच्या शूर वैमानिकांची कथा नाही, तर भारताच्या एकमेव स्वदेशी प्रगत लाइट कॉम्बॅट विमान तेजसची कथा आहे.याआधी कंगनाने नुकतेच ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. धाकडचे शूटिंग संपल्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. मात्र, काही वापरकर्त्यांनी तिच्या बोल्ड चित्रांसाठी तिला ट्रोल केले.कंगनाने धाकडचे शूटिंग पूर्ण केले आणि तेजसचे शूटिंग सुरू केले, तर दुसरीकडे तिचा ‘थलायवी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून, आता प्रत्येकजण या चित्रपटाच्या रिलीजबद्दल उत्सुक आहे.यासोबतच कंगना आणीबाणीवर आधारित चित्रपटाचीही तयारी करत आहे, ज्यात ती देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याच्या तयारीचीही काही छायाचित्रेही शेअर केली होती. चाहते कंगनाच्या या सर्व चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मुंबई - मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणामध्ये टॉप मॉडेल आणि अभिनेत्री अडकल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरी एक अभिनेत्री आहे. तिनेही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना पकडले आहे. या मॉडेल आणि अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली नसली तरी त्यांना सेक्स रॅकेटच्या या जाळ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अभिनेत्री आणि मॉडेलऐवजी रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर चौकशीत ईशा खानने सांगितले की, ती गेली अनेक वर्षे हे सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. यामध्ये ती तिचे ५० हजार रुपये कमिशन ठेवायची आणि उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला द्यायची. चौकशी दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की, करोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शूटिंग थांबले होते, काम उपलब्ध नव्हते. म्हणूनच ती सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली. हे रॅकेटमध्ये ईशा खान ग्राहकांशी संपर्क साधायची. ती मॉडेल, अभिनेत्री आणि कॉल गर्ल्सची प्रोफाइल आणि छायाचित्रे ग्राहकांसोबत शेअर करायची. ज्या ग्राहकांना आवडले त्यांच्यासोबत दर, तारीख आणि वेळ निश्चित केली जायची. मग जुहूसारख्या पॉश भागात असलेल्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक करायचे. 

नवी मुंबई - महावितरणच्या वाशी मंडळाकडून ज्या प्रयोजनासाठी वीज घेतली आहे, त्यासाठी विजेचा वापर न करता बेकायदा, वेगळ्या कारणासाठी वीज वापरणाऱ्या कंपन्यांविरोधात महावितरणच्या वाशी मंडळाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कंपन्या आणि कोल्डस्टोरेजकडून तब्बल १३ कोटी १६ लाख रुपयांची वसुली करण्यात वाशी मंडळाला यश आले आहे. वाशी मंडळाचे सुप्रिडेण्डण्ट इंजिनीअर राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे विजेचा गैरवापर करणाऱ्यांचे आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत. विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसोबत जे ग्राहक विजेचा गैरवापर करीत आहेत, अशा उच्च दाबाच्या ग्राहकांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विद्युत अधिनियम २००३ अन्वये कलम १२६ अंतर्गत एखादा ग्राहक अनधिकृतरीत्या विजेचा वापर करीत असेल तर त्याला प्रोव्हिजनल बिल दिले जाते. त्यावर समोरील ग्राहकाची बाजू ऐकून घेऊन अंतिम बिल देण्यात येते. संबंधित ग्राहकाला बिल मान्य नसल्यास अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. बऱ्याचदा महावितरणची वीज वापरणारे ग्राहक त्यांच्या कंपन्यांचे अर्धवट पत्ते देतात, तर काही उद्योजक त्यांच्या वापरासाठी वीज घेतात आणि दुसऱ्यांना भाड्याने वीज देतात, असे निदर्शनास येते. एमआयडीसीतील कागदपत्रे जागेवर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची प्रोव्हिजनल बिलाची रक्कम जास्त असू शकते. त्याबाबत ग्राहकाला त्याची बाजू मांडण्यास पूर्ण वेळ दिला जातो. काही वेळेस ग्राहकाने महावितरणला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रोव्हिजनल बिलाची रक्कम शून्य येऊ शकते. त्यानुसार वाशी मंडळाने जानेवारी २०२० पासून जून २०२१ या १८ महिन्यांच्या कालावधीत वीजचोरी करणाऱ्यांकडून १३ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल गोळा केला. या कारवाईत वाशी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्डस्टोरेजचा समावेश आहे. या कोल्ड स्टोरेजच्या वीज संचाची तपासणी केली असता चार कोल्ड स्टोरेजनी गैरवापर केल्याचे उघडकीस आले असून पी. एम. कोल्ड स्टोरेज, व्हीनस कोल्ड स्टोरेज, मीरा मॅक्स, सुरेश फूट वेअर आणि सावला कोल्ड स्टोरेज अशा कोल्डस्टोरेज संस्थांना शेती ते औद्योगिक दराच्या फरकाच्या रकमेची आकारणी करून तीन कोटी ८२ लाख रुपये वसूल केले आहेत. तसेच, संबंधित वीजग्राहक शेती व्यवसाय दाखवून वीजवापर करीत होते. त्यामुळे त्यांना शेतीसाठी असणाऱ्या कमी दरात वीज वापरता येत होती. परंतु त्यांचा बेकायदा वापर उघडकीस आल्यामुळे त्यांना यापुढे औद्योगिक विजेचे दर आकारण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे महावितरणच्या महसुलात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.वाशी मंडळाअंतर्गत दलालांच्या अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत. काही टोळ्या तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करतात. खोट्या तक्रारींसाठी ग्राहकांकडून अधिकारपत्र घेऊन पोलिसात महावितरणविरोधात फिर्यादही दाखल करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यात महावितरणच्याच फुटीर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वापर होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अशा टोळ्यांवरही मोठी कारवाई करण्याचे संकेत महावितरणकडून देण्यात आले आहेत.

पालघर - पालघर जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री येणार नसल्याचे समजल्यानंतर आयोजनात अपेक्षित बदल करण्याची समयसूचकता आयोजकांनी न दाखवल्याने मुख्य कार्यक्रमात अनेक मान्यवरांना उपस्थित राहण्याची संधी प्राप्त होऊ शकली नाही. लाखो रुपयांचा खर्च करून आयोजित केलेला हा कार्यक्रम निवडक अधिकारी वर्गासमोर पार पडला. जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांच्यासह नऊ-दहा मंत्री उपस्थित राहणार असल्याने उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमात ४० प्रतिष्ठित मान्यवरांना उपस्थित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. अशा सर्व मान्यवरांसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचे १९ ऑगस्टच्या सकाळीच जाहीर झाले. तसेच या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने होणार हे लिंकवरून स्पष्ट झाले होते. असे असताना देखील जिल्हा कार्यालय संकुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त पूर्ववत ठेवण्यात आल्याने अनेक मान्यवरांना प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागले. बदललेल्या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील मान्यवरांच्या भेटी सुमारे तासभर अगोदर आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. शिवाय मुख्यमंत्री येणार नसल्याने आयोजन ठिकाणी ठेवण्यात आलेली ४० आसन क्षमता शिथिल करून शंभर-दीडशे मान्यवरांची बैठक व्यवस्था करणे शक्य होते. मात्र आयोजकांनी त्याबाबत समयसूचकता दाखवली नाही.

प्रमुख मंत्रीगणांच्या अनुपस्थितीत आमदारांना व्यासपीठावर बसण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली विशेष आसन व्यवस्था मोकळीच राहिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशासाठी लाल रंगाचे प्रवेश पास आवश्यक असताना अशा रंगाचे पास नसणाऱ्या जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती, विद्यमान व माजी सदस्य तसेच इतर मान्यवरांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे मंत्रीमहोदयांसोबत प्रवेश घेतलेल्या काही राजकीय मंडळी व मोजके पत्रकारांसह सिडको व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.


वसई - राज्य परिवहन एसटी महामंडळातर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी देण्यात येणाऱ्या एसटी सेवेला यंदाच्या वर्षी चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अवघ्या महिनाभरातच कोकणात जाण्यासाठीच्या दोनशेहून अधिक गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.यावर्षी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहे.त्यानुसार पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाडय़ा सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे. वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासूनच आगाऊ आरक्षण सेवा एसटी महामंडळातर्फे सुरू केली आहे. अवघ्या महिन्या भराच्या कालावधीमध्ये एकूण २१५ गाडय़ांचे आरक्षण झाले आहे. यात १० शिवशाही गाडय़ांचाही समावेश असल्याची माहिती पालघर विभाग एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. सन २०१९ मध्ये २८० गाडय़ा  कोकणात सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद पाहता गाडय़ांचे आरक्षण हे ३३० पर्यंत जाईल असा अंदाज पालघर एसटी विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे - मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापनाची टीमने हा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, हा मृतहेह नौपाडा परिसरातील ज्वेलर्स भरत जैन यांचा असल्याची माहिती आहे. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भरत जैन हे सराफा व्यावसायिक होते. ते १५ ऑगस्टपासून घरातून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लापता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे भरत जैन हे मुंब्रा रेतीबंदर परिसरात कशासाठी गेले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या हेही अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत शवविच्छेदानंतर खुलासा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केले आहे.

मुंबई - डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत सकाळी ७ ते ९ या वेळेत निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. घाटकोपर मध्ये भटवाडी ते सर्वोदय हॉस्पिटल व गणपती मंदिर ते घाटकोपर स्टेशन या दरम्यान दोन ठिकाणी; तर कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जोगेश्वरी येथे इस्माईल युसूफ कॉलेज व दहिसर येथे जरी मरी गार्डन या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यात आले.दादरमध्ये नायगाव मधील देवरुखकर मार्गावरील संविधान चौक येथून राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पहिल्या मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. पुढे वरळी सी फेसला आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन पुतळ्याजवळून दुसरा मॉर्निंग वॉक सुरू झाला व शेवटी शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या मार्गावरून शेवटचा मॉर्निंग वॉक करून चैत्यभूमीवर मुंबईतील या सर्व मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, समविचारी, हितचिंतक व सजग नागरिक यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास अजूनही पूर्ण होत नाही व खुनाच्या सुत्रधारांचाही शोध लागत नाही याबाबत निषेध व्यक्त केला व जोपर्यंत खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ही मागणी नेटाने लावून धरू व याबाबत अधिकाधिक जनजागृती करू असा  निर्धार व्यक्त केला. 

मुंबई - शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद काही नवीन नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दरम्यान देखील त्यांच्यात खटके उडताना दिसत आहे. नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसैनिकाने या भागाचे शुद्धीकरण केल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाला. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी देखील कोण नारायण राणे? याबाबत मला माहिती नाही, याबाबत आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार बोलतील, असे म्हणत खोचक टोला लगावला. हा स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केल आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेपूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे गोमुत्र टाकून शुद्धीकरण केले. त्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, माध्यमांना त्यांनी नारायण राणे यांना ओळखत नसल्याचे सांगत यावर शाखाप्रमुख उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया दिली.शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उत्तराला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असे नारायण राणे म्हणाले आहेत.


मुंबई - मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असतानाच जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महदनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष. त्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण सुरू होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शेतकरी सुनील गुजर यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतीत मोठे नुकसान झाले आहे. घर गहाण ठेवले आहे. घरची परिस्थिती बेताची झाल्याने आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्याने अचानक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेऊन त्याला आत्मदहन करण्यापासून रोखले. त्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शेतीच्या नुकसाीचे कारण आणि आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याचे कारण त्या शेतकऱ्याने दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


नागपूर -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे खळबळ माजली आहे. आता या वादात काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. 'राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे' असे म्हणत पटोले यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, गेली २५ वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती अशी शंका नाना पटोलेंनी व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी रा.मा.क्र.७५३ सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे काम बंद पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कंत्राटदाराला मारण्याची धमकी  देऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान खासदार भावना गवळी याच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये राष्ट्रीय मार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना अडथळा निर्माण करत आहे असे थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची कामे रखडली असून याचे कारण शिवसेना कार्यकर्त्यांनी कामे थांबवली असल्याची माहिती मिळाल्याचे गडकरी म्हणाले. यासंदर्भात गडकरींनी पत्रामध्ये काही महत्त्वाची उदाहरणे देऊन या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल असे म्हटले आहे. अकोला आणि नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील दहीसर पूर्व अशोकवन परिसरात असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांनी भरलेली एक गाडी आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून गाडी ताब्यात घेतली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशोकवन येथील कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून टाटा सुमो ही गाडी पार्क करण्यात आली होती. परंतु, कार्यालयातील काही जणांना संशय आल्यानंतर त्यांनी या गाडीची पाहणी केली. त्यानंतर यात काही असल्याचे समजताच पोलिसांना त्वरित या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, या गाडीत बॉक्समध्ये फटाके भरलेले असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हा घातपाताचाही प्रकार असू शकतो, असा संशय प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला. पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली असून संबंधित गाडीच्या मालकाची ओळख पटली आहे. तो जवळच्याच इमारतीत राहतो आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी, चौकशी केली असता, आपण रस्त्यावर फटाके विकतो आणि पावसामुळे आपण ते आपल्या गाडीतच ठेवले होते, असा दावा गाडी मालकाने केला आहे. तसेच, यासंदर्भात आम्ही सर्वांचा कसून तपास करु आणि त्यानुसार कारवाई करू, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांंनी दिली आहे.


नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक मनोज शशिधर यांना स्वतंत्रता दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शशिधर यांची निर्भिड आणि इमानदार पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. शशिधर हे गुजरात कॅडरचे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, शशिधर यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास केला आहे.शशिधर यांची जानेवारी २०२० साली सीबीआयच्या सहसंचालक पदावर नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती. शशिधर यांनी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करार, विजय माल्या बँक फसवणूक प्रकरण, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचे प्रकरण, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सारख्या काही मोठ्या प्रकरणांचा तपास केला आहे. शशिधर यांनी अलीकडेच एका रेल्वे अधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयांच्या वसुलीचे प्रकरण उघड केले होते.

शशिधर यांच्याव्यतिरिक्त २९ सीबीआय अधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि कौतुकास्पद सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.एका अधिकाऱ्याने सांगितले की, शशिधर हे गुजरातमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर राहिले आहेत. त्यांनी सूरतमध्ये पोलीस आयुक्त, गुजरात दहशतवादविरोधी पथक, अहमदाबाद गुन्हे शाखेच प्रमुख आणि गुजरात राज्य इंटेलिजन्स ब्युरोचे एडीजी पद देखील सांभाळले होते. शशिधर गुजरात पोलीस नियमावली सुधारण्यासाठी बनवलेल्या समितीचे अध्यक्षही होते.


श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी चार दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पर्दाफाश केला. जैशचे मॉड्यूल स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रात्रे गोळा करून ते काश्मीरमधील जैशच्या इतर दहशतवाद्यांना पोहोचवणार होते. तसेच ते १५ ऑगस्टपूर्वी जम्मूमध्ये आयईडी स्फोट करण्यासह देशातील काही महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत होते. दहशतवाद्यांकडील शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हा हल्ला करण्यासाठी मोटारसायकल आयईडीचा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी सर्वप्रथम पुलवामा येथील प्रचू परिसरातील मुंतझीर मंजूरला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन, आठ जिवंत राऊंड आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात शस्त्रे नेण्यासाठी वापरला जाणारा एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे. मुंतझीर मंजूरच्या अटकेनंतर जैशचे आणखी तीन दहशतवादी पकडले गेले.


मुंबई - ‘जॉबलेस’ तरुणाच्या चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे ‘जॅाबलेस’ मधून अधोरेखित केले. कोरोना विषाणूचा आघात झाल्यावर संपूर्ण जगच थांबले होते. देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या होत्या. सर्व व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अजूनही ती परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. कोरोना काळात अनेक जण ‘जॉबलेस’ झाले आणि जॉबलेस झालेल्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थेवर आधारित एक वेब सिरीज आली जिचे नावसुद्धा ‘जॉबलेस’ आहे. या एका चुकीच्या निर्णयातून आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, हे दर्शविणारी ही वेबसिरीज लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' वर येत आहे.आयुष्य जगण्यासाठी माणसाच्या काही गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. आणि त्यासाठीच प्रत्येक व्यक्ती नोकरी, बिझनेस करतो. सर्व काही सुरळीत सुरु असताना काही कारणास्तव जॉब गेला किंवा बिझनेस ठप्प झाला तर अशा वेळी संपूर्ण आयुष्याचे गणितच बिघडून जाते. माणसाची मानसिक स्थिती ढासळू लागते आणि पैसे कमावण्याच्या नादात, उतावळेपणात अनेकदा चुकीचा निर्णयही घेतला जातो. 'जॉबलेस' या वेबसिरीज मध्ये सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री प्रमुख भूमिकेत असून निरंजन पत्की दिग्दर्शक आहेत. नवीन मराठी वेब सिरीज'जॉबलेस' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. सद्यस्थितीवर आधारित ही वेबसिरीज आहे. हा ज्वलंत विषय 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ने 'जॉबलेस' या वेबसिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल.'जॉबलेस'चा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो, पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का, या अडचणीतून तो बाहेर येतो का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये त्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी ३०० स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती. १९७१ मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान सुरू केले. पाकिस्तानने १४ दिवसात भुज विमानतळावर ३५ वेळा ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेटने हल्ला केला होता. युद्धाच्या वेळी शत्रूने हवाई तळ नष्ट केले. माधापूर गावातील ३०० महिलांसह भारतीय हवाई दलाचे विमान उतरू शकेल म्हणून एक हवाई तळ तयार केला होता. या चित्रपटात हवाई दलाची शक्ती आणि पराक्रम दाखवण्यात येणार आहे.चित्रपटाच्या डिस्क्लेमरमध्ये लिहिल्याप्रमाणे, चित्रपटाची काल्पनिक कथा असून, सत्य घटनांवर आधारित आहे. पूर्वार्धात अनेक पात्रांचे कॅमिओ आहेत ज्यात शौर्याचे भाषण दिले जाते. त्यात भुज एअरबेसवरील हल्ला दाखवला आहे. उत्तरार्धाच्या भागात हा चित्रपट अधिक रंजक होतो. हा चित्रपट तुम्हाला संपूर्ण वेळ खुर्चीला खिळवून ठेवेल हे नक्की! यातील हवाई लढाईची दृश्ये देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडतील चित्रपटातील व्हीएफएक्सचे काम चांगले आहे.अजय देवगण त्याच्या पात्रामध्ये इतका परिपूर्ण वाटला आहे की, त्याच्याशिवाय इतर कोणीही हे सीन करू शकले नसते. संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आणि एमी विर्क यांनीही चांगले काम केले आहे. कॅमिओमध्ये नवनी परिहार माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे.जर, तुम्हाला देशभक्तीपर चित्रपट आवडत असतील तर, हा चित्रपट तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि तुम्ही हा चित्रपट कुटुंबासह देखील पाहू शकता.

मुंबई - मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात इसमाने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी व्हॉट्सअप वरून दिली असून नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेले कित्तेक वर्षं मिलिंद नार्वेकर हे काम बघत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या अनेक राजकीय महत्त्वाच्या निर्णयात नार्वेकर यांचा सहभाग राहिला आहे. मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवरून ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकार पावले उचलत आहे. 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत १५ ऑगस्टपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरेंट रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यासंदर्भात बुधवारी, ११ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १५ ऑगस्टपासून हॉटेल, मॉल आणि रेस्टॉरेंटला दहा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा असणार आहे. यासोबतच आंतरराज्य प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असणार आहे. किंवा ७२ तास आधी केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे असणार आहे. राज्यात 'मिशन बिगेन अगेन' अंतर्गत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने पुन्हा निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून निर्बंधातून सूट दिलेल्या सर्वांना नियमावली लागू होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरेंटच्या वेळा ४ पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बदल करून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरेंटच्या वेळा वाढवून द्याव्यात, अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिल्याचे बोलले जाते.मॉलमधील सर्व दुकान, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार असून केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील ५० टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य असेल. दरम्यान, कोरोनाच्या त्रिसूत्री नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल. जे हॉटेल नियम मोडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने सिनेमा, नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने लग्न सोहळ्यासाठी ५० टक्के लोकांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांबाबत सध्या निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार आंतरराज्य प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, डोस घेऊन १४ दिवस झालेले असावेत. त्यानंतरच आंतरराज्य प्रवास करता येणार आहे. किंवा त्या व्यक्तीकडे ७२ तास आधीचे आरटी-पीसीआर टेस्ट केलेले निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यापैकी त्या व्यक्तीकडे काहीच आढळले नाही तर, त्या व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. मंदिरे व प्रार्थनास्थळे खुली करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. मंदिरे व प्रार्थनास्थळे सध्या खुली करता येणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि दोन डोस घेऊन १५ दिवस झालेले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशा नागरिकांना मासिक आणि त्रैमासिक पास देण्यात येणार आहे. मात्र, पासची वैधता पडताळणीबाबत रेल्वेला अधिकार देण्यात आले आहेत. पास ज्या दिवसापर्यंत असेल त्याच दिवसापर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांचा दंड आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा केली जाणार आहे.खुल्या प्रांगणातील विवाह सोहळ्यांना २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. तर, बंद मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी असेल. इनडोअर खेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून दोन डोसचा नियम त्यांना बंधनकारक राहील. तसेच, खासगी कार्यालयांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कार्यालयात २५ टक्के क्षमतेने शिफ्ट्समध्ये कामाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टोपे म्हणाले.

ठाणे - देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून ठाणे व रायगड जिल्ह्यात सोमवारपासून १६ ते २० ऑगस्टपर्यंत झंझावाती जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला २७ मंत्रीपदे मिळाली असून, वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या ओबीसी व मागासवर्गीय समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला ठाणे जिल्ह्यासह कोकणातून नागरिकांची पसंती मिळत आहे. त्यानिमित्ताने जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजपकडून यात्रा काढली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून ठाणे व रायगडमधील यात्रेचे नेतृत्व केले जाणार आहे. ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून १६ ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून यात्रा जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल.तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागांतून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे, तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट आदी कार्यक्रमांमध्येही मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत भाजप नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

ठाणे - शेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात डांबून बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ७ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना मार्च २०१८ रोजी भिंवडीत घडली होती. इशरत सर्फराज अन्सारी असे कारावासाची शिक्षा ठोठवलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पीडित मुलीने आरोपीच्या आई व भावाला घटनेची माहिती देऊनही उलट तिलाच धमकावून घरात बेकायदेशीररित्या रात्रभर डांबून ठेवल्याच्या गुन्ह्यात त्यांनाही शिक्षा सुनावली आहे. यामध्ये अत्याचार करणाऱ्यास ७ वर्ष सश्रम कारावासाची तर धमकावून घरात बेकायदेशीररित्या डांबल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

पीडित मुलगी ही १६ वर्षीय असून ती, तिच्या भावाकडे राहण्यासाठी भिवंडीत आली होती. याचदरम्यान २८ मार्च २०१८ रोजी दुकानात जात असताना त्याच परिसरात राहणाऱ्या इशरत सर्फराज अन्सारी याने तिला त्याच्या घरात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तिला मारण्याची धमकी देऊन घरात डांबून ठेवले. त्यानंतर घरी आलेल्या आरोपीची इशरतची आई निलोफर आणि भाऊ अर्शद या दोघांना पीडित मुलीने झालेला प्रकार सांगितल्यावर त्यांनीही तिला धमकावून रात्रभर घरात बेकायदेशीररित्या डांबून ठेवले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अर्शद याने तिला घरातून बाहेर मुख्य रस्त्यावर सोडले.रात्रभर आरोपीच्या घरात डांबून ठेवल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी आल्यानंतर भावाला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या भावाने तिला घेऊन भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यावेळी तिघाही मायलेकांना अटक केली होती. तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर हा खटला ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील संजय मोरे यांनी तपासलेल्या आठ साक्षीदारांची साक्ष आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून त्या तिघांना अंतिम सुनावणीत एकाच गुन्ह्यात वेगवेगळ्या कलमान्वेय दोषी ठरवले.

मुख्य आरोपी इशरत याला ७ वर्षे सश्रम कारावासाची एक हजार रुपये दंड तो न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच अन्य एका कलमात दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच तिघांना प्रत्येकी एक हजार दंड आणि तो न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

विरार - वसई-विरार महानगरपालिका वैद्यकीय विभागाने एका खासगी रुग्णालयाची मान्यता रद्द करत रुग्णालयाला कुलूप ठोकले आहे. अशा पद्धतीने कारवाई करत बंद केलेले हे वसईतील पहिले रुग्णालय आहे.महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने वसई आनंदनगर परिसरातील ‘ब्रेथ केअर’ रुग्णालयावर ही कारवाई केली आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रुग्णालयाच्या विरोधात येथील स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी होत्या. या रुग्णालयात ‘नर्सिग होम’ च्या नावाखाली क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात राज्य आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार आरोग्य विभागाने या रुग्णालयासंदर्भात चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली की, या रुग्णालयाच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच या रुग्णालयाकडे स्थानिक रहिवासी संकुलाचा ना हरकत दाखला नव्हता, या रुग्णालयाचे अग्निसुरक्षा चाचणी प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच नागरिकांच्या सततच्या तक्रारी असल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.  दरम्यान,रुग्णालयाची मान्यता रद्दप्रकरणी वसई-विरार डॉक्टर संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हे रुग्णालय  या परिसरात सुरू होते. जर रुग्णालयाला परवाना नव्हता तर पालिकेने आधी त्यांना परवानगी कशी दिली हा सवाल डॉक्टर संघटना विचारत आहेत. अनेक नर्सिग होम, रुग्णालये ही नागरी वस्तीत आहेत. अशा पद्धतीने कारवाईचा धसका आता या रुग्णालयांनी घेतला आहे.

पनवेल - पनवेल महापालिका हद्दीत ६० विविध झोपडपट्टय़ा असून त्यात आठ हजारांहून अधिक कुटुंब राहत आहेत. यातील जुन्या नगर परिषद क्षेत्रातील २६ झोपडपट्टय़ांमधील ४ हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळावीत यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र सिडको हद्दीत असलेल्या झोपडपट्टय़ांचे पुनर्वसनाचा पेच कायम आहे. सिडको पुढाकार घेत नसल्याने महापालिकेने सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे. मात्र त्यासही सिडकोने नकार दिला आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील सुमारे ११ झोपडपट्टींमधील रहिवाशांचे पुनर्वसन रखडले आहे.पनवेल तालुक्यात विविध प्राधिकरणांना विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारने नेमणूक केल्याने प्रत्येक विकास कामांमध्ये सिडको विरुद्ध पनवेल महापालिका असा संघर्ष गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. यातच झोपडपट्टी पुनर्वसन रखडले आहे.पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सिडकोला रीतसर पत्र पाठवत सिडकोने पालिकेला जमीन दिल्यास सिडको हद्दीतील झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा पर्याय दिला होता. मात्र सिडकोने त्यांच्या भूखंडावर झोपडपट्टी घोषित करू नये, असे प्रतिउत्तर लेखी स्वरूपात दिले. तसेच यासाठी भूखंड देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे दोन हजारांहून अधिक घरांचे पुनर्वसन यामुळे रखडले आहे.वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यावर राजकारण सुरू झाले आहे. या मुद्दय़ावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू झाला आहे. निवडणुका आल्या की हा विषय चर्चेला येतो, मात्र निवडणुकांनंतर त्यावर कोणताही राजकीय पक्ष चर्चा करत नसल्याने गरिबांना घरे कधी मिळणार, असा प्रश्न सामान्य झोपडीवासीयांना पडला आहे.


मुंबई - मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बाटल्या सापडल्या आहेत. बुधवारी (११ ऑगस्ट) रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने या परिसराची तपासणी केली. संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट पेट्रोलच्या बाटल्या आढळल्याने सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सतर्क झाले आहे. या बाटल्या विमानतळाच्या गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरुन धावपट्टीवर फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर सीआयएसएफने तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला बोलावले.या पथकाला परिसरात काही पेट्रोलच्या बाटल्या सापडल्या. त्यांनी या बाटल्या निष्क्रिय केल्या. यानंतर सीआयएसएफने स्थानिक पोलिसांना माहिती देत घटनास्थळावर बोलावले. पोलिसांनी हा परिसर पिंजून काढत शोधमोहिम राबवली. मात्र, आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे या घटनेनंतर विमानतळाच्या नियमित उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

कोल्हापूर - दोनशे रुपयांच्या खऱ्याखुऱ्या नोटेपासून दोन हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोटा बनवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. बरेच महिने प्रयोग केल्यानंतर आरोपीने दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेपासून २ हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोट तयार करण्यात आली होती. आरोपीने आपल्या मित्राच्या माध्यमातून या नोटा एका राष्ट्रीयकृत बँकेत भरण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीचे बिंग फुटले आहे. संबंधित बनावट नोटांचा सिरीअल क्रमांक एकच असल्याने आरोपीचे गुपित समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उत्तम पोवार आणि त्याचा मित्र अनिकेत असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. संशयित आरोपी उत्तम पोवार याने या नोटा बनवल्या होत्या. आरोपी पोवार हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथील रहिवासी आहे. त्याचे वडील शेतकरी असून त्यांच्या घरी थोडी शेती आहे. तर आरोपीचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. पण आरोपीने सर्च चॅनेलवरून प्रशिक्षण घेत, दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेपासून दोन हजार रुपयांची बनावट नोट तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. आरोपीने दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेचा वापर करत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून आरोपी पोवार आपल्या घराच्या पोटमळ्यावर संगणक आणि प्रिंटरद्वारे असे प्रयोग करत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर तो या प्रयोगात यशस्वी झाला होता. यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या १७ नोटा तयार केल्या होत्या. यानंतर आरोपीने आपल्या एका मित्राकडे हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी दिली. संबंधित मित्रांच्या वडिलांचा जेसीबीचा व्यवसाय होता. त्यामुळे ते नेहमी बँकेत मोठ्या रकमेचा भरणा करतात ही बाब आरोपीला माहीत होती.याचाच फायदा घेतं आरोपीने आपल्या मित्राकडे दोन हजार रुपयांच्या १७ बनावट नोटा बँकेत भरणा करण्यासाठी दिल्या. मित्राने एक लाख रुपयांच्या खऱ्या आणि ३४ हजार रुपयांच्या खोट्या नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या. बँकेतील कर्मचारी देखील सुरुवातीला फसला होता. पण संबंधित नोटा एकाच सिरीअल नंबरच्या असल्याचं बँक कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यामुळे आरोपीचे बिंग फुटले. केवळ बनावट नोंटाचा सिरिअल क्रमांक एकच असल्याने आरोपीचे बिंग फुटले. याप्रकरणी बँक कर्मचाऱ्यांने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget