पदकासाठी तब्बल ४१ वर्षे

टोक्यो ऑलिम्पिकमधील गुरुवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिकच होता. भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळविले. १९८० नंतर तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाला पदक मिळविण्यात यश आले आहे. हा विजयोत्सव देशभर साजरा केला. भारताच्या पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमधील भारताची मोहोर पुन्हा एकदा उमटवली. या ऐतिहासिक योगाचे औचित्य साधून मोदी सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार असे नामकरण केले. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणे योग्यच आहे. देशवासीयांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतने हा ऐतिहासिक विजय कोरोनायोद्ध्यांना समर्पित करून हॉकी संघाची समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली. हे कांस्य पदक आपल्या देशातील कोरोनायोद्धे आणि सर्व फ्रंटलाइन वर्कर्ससाठी आहे, असे मनप्रीत म्हणाला. तर, गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने गोलपोस्टला साष्टांग दंडवत घातले. या दोघांनीही सर्वांची मने जिंकली आहेत. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या या विजयाने भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. १९२८ पासून १९८० पर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने तब्बल ११ पदकांची कमाई केली होती. त्यात ८ सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्यातही १९२८ ते १९५६ या कालावधीत सलग सहा वेळा सुवर्णपदकावर भारतीय संघाचे नाव कोरले. सुरुवातीच्या काळात, तर हॉकीपटू मेजर ध्यानचंद आणि त्यांचे धाकटे बंधू कॅप्टन रूपसिंग यांचा तर हॉकीमध्ये मोठा दबदबा होता. १९२८ च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये भारताने नेदरलॅण्डचा ३-० ने पराभव करून ऑलिम्पिकमधील सुवर्ण युगाचा पाया रचला होता. तर, १९३२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचा दबदबा कायम होता. त्यावेळी भारतीय संघाने अमेरिकेचा तब्बल २४-१ असा धुव्वा उडवला होता. त्यात रूपसिंग यांनी १० गोल झळकावले होते. लगेचच १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने जर्मनीचा ८-१ अशा फरकाने पराभव करून सुवर्णपदकावरील दावा कायम ठेवला होता. या स्पर्धेत भारताने एकूण ३८ गोल नोंदवले. त्यात ध्यानचंद यांचे १३, तर त्यांचे बंधू रूपसिंग यांनी ९ गोल झळकावले. १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर हॉकीमधील भारताच्या या वैभवाला उतरती कळा लागली.खरेतर, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी असतानाही दरम्यानच्या काळात क्रिकेटचा बोलबोला वाढू लागला. आता हा खेळ पूर्णपणे व्यावसायिक झाला आहे. पण हॉकीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. पण आता पुन्हा ऑलिम्पिकमधील विजयानंतर देशभरात ‘चक दे’चा जयघोष सुरू झाला आहे. रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव केला.रोमहर्षक लढतीत अगदी शेवटच्या सेकंदाला भारताने विजय मिळविला आणि त्यानंतर भारतीयांनी आनंद साजरा केला. सोशल मीडियावरून भारतीय हॉकी संघावर स्तुितसुमने उधळली जाऊ लागली. विद्यमान भारतीय हॉकी खेळाडूंबरोबरच मेजर ध्यानचंद आणि त्यांचे बंधू रूपचंद यांच्याबद्दलची माहिती आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट होऊ लागली.त्याचबरोबर भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही. भले त्यांना पदक मिळाले नसले, तरी या संघाने पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविले, हेही कौतुकास्पद आहे. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले होते. त्यानंतर महिला हॉकीलाही उतरती कळा लागली. ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे सुद्धा कठीण झाले होते. पण आता ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जोरदार पुनरागमन केले.एकंदरीतच या ऐतिहासिक विजयानंतर तमाम भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कांस्यपदकाने पायाभरणी झालेली आहे, आता आपल्या राष्ट्रीय खेळाचा येत्या काळात पुन्हा तोच सुवर्णकाळ पाहायला मिळेल, एवढे मात्र नक्की. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget