बेकायदा वीज वापरणाऱ्या कंपन्यांविरोधात महावितरण मंडळाची धडक मोहीम

नवी मुंबई - महावितरणच्या वाशी मंडळाकडून ज्या प्रयोजनासाठी वीज घेतली आहे, त्यासाठी विजेचा वापर न करता बेकायदा, वेगळ्या कारणासाठी वीज वापरणाऱ्या कंपन्यांविरोधात महावितरणच्या वाशी मंडळाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कंपन्या आणि कोल्डस्टोरेजकडून तब्बल १३ कोटी १६ लाख रुपयांची वसुली करण्यात वाशी मंडळाला यश आले आहे. वाशी मंडळाचे सुप्रिडेण्डण्ट इंजिनीअर राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे विजेचा गैरवापर करणाऱ्यांचे आणि दलालांचे धाबे दणाणले आहेत. विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसोबत जे ग्राहक विजेचा गैरवापर करीत आहेत, अशा उच्च दाबाच्या ग्राहकांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विद्युत अधिनियम २००३ अन्वये कलम १२६ अंतर्गत एखादा ग्राहक अनधिकृतरीत्या विजेचा वापर करीत असेल तर त्याला प्रोव्हिजनल बिल दिले जाते. त्यावर समोरील ग्राहकाची बाजू ऐकून घेऊन अंतिम बिल देण्यात येते. संबंधित ग्राहकाला बिल मान्य नसल्यास अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागता येते. बऱ्याचदा महावितरणची वीज वापरणारे ग्राहक त्यांच्या कंपन्यांचे अर्धवट पत्ते देतात, तर काही उद्योजक त्यांच्या वापरासाठी वीज घेतात आणि दुसऱ्यांना भाड्याने वीज देतात, असे निदर्शनास येते. एमआयडीसीतील कागदपत्रे जागेवर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची प्रोव्हिजनल बिलाची रक्कम जास्त असू शकते. त्याबाबत ग्राहकाला त्याची बाजू मांडण्यास पूर्ण वेळ दिला जातो. काही वेळेस ग्राहकाने महावितरणला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रोव्हिजनल बिलाची रक्कम शून्य येऊ शकते. त्यानुसार वाशी मंडळाने जानेवारी २०२० पासून जून २०२१ या १८ महिन्यांच्या कालावधीत वीजचोरी करणाऱ्यांकडून १३ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल गोळा केला. या कारवाईत वाशी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कोल्डस्टोरेजचा समावेश आहे. या कोल्ड स्टोरेजच्या वीज संचाची तपासणी केली असता चार कोल्ड स्टोरेजनी गैरवापर केल्याचे उघडकीस आले असून पी. एम. कोल्ड स्टोरेज, व्हीनस कोल्ड स्टोरेज, मीरा मॅक्स, सुरेश फूट वेअर आणि सावला कोल्ड स्टोरेज अशा कोल्डस्टोरेज संस्थांना शेती ते औद्योगिक दराच्या फरकाच्या रकमेची आकारणी करून तीन कोटी ८२ लाख रुपये वसूल केले आहेत. तसेच, संबंधित वीजग्राहक शेती व्यवसाय दाखवून वीजवापर करीत होते. त्यामुळे त्यांना शेतीसाठी असणाऱ्या कमी दरात वीज वापरता येत होती. परंतु त्यांचा बेकायदा वापर उघडकीस आल्यामुळे त्यांना यापुढे औद्योगिक विजेचे दर आकारण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे महावितरणच्या महसुलात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.वाशी मंडळाअंतर्गत दलालांच्या अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत. काही टोळ्या तर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करतात. खोट्या तक्रारींसाठी ग्राहकांकडून अधिकारपत्र घेऊन पोलिसात महावितरणविरोधात फिर्यादही दाखल करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यात महावितरणच्याच फुटीर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वापर होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अशा टोळ्यांवरही मोठी कारवाई करण्याचे संकेत महावितरणकडून देण्यात आले आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget